अष्टावक्रगीता

प्रकरण १ ले

विषयांचा त्याग करून चैतन्यमय होणे हीच मुक्ति होय.

कथं ज्ञानमवाप्नोति कथं मुक्तिर्भविष्यति ।
वैराग्यं च कथं प्राप्रमेतद् ब्रुहि मम प्रभो ॥ १ ॥


अनुवाद - ज्ञान प्राप्ती व मुक्तिच्या उद्देशाने राजा जनकाने अष्टावक्र मुनींना जिज्ञासापूर्वक विचारले की - 'हे प्रभो । ज्ञान कसे प्राप्त होते ? मुक्ति कशाने होते ? आणि वैराग्य कशाने प्राप्त होते हे मला सांगा.


विवेचन - अध्यात्मशास्त्रात ज्ञानाचा अर्थ आहे - आत्म-ज्ञान. आत्मज्ञानच ज्ञान आहे. बाकी सर्व विज्ञान आहे, माहिती किंवा सूचना आहे. असे विज्ञान मनुष्याला बाहेरून प्राप्त होते. ही जड सृष्टी त्या चैतन्य-तत्त्वाची अभिव्यक्ति आहे. चैतन्याचाच सारा खेळ आहे, त्याचीच लीला आहे. चैतन्याचे नृत्य आहे. समस्त सृष्टीचे आधारभूत तत्त्व चैतन्य आहे व सर्व चराचरात चैतन्यच व्याप्त आहे. एकेका पदार्थात, व्यक्तित समाविष्ट चैतन्याला आत्मा आणि संपूर्ण दृष्टी मिळून व्याप्त असणार्‍या चैतन्याला "ब्रह्म" म्हटले आहे. दोन्ही एकच मूल-तत्त्व आहेत. आत्म्याचे ज्ञान हेच परमात्म्याचे ज्ञान आहे. आत्म्याहून परमात्मा (ब्रह्म) भिन्न नाही. या आत्म-तत्त्वाचे ज्ञान झाले म्हणजे सर्व बाबींचे ज्ञान प्राप्त होते. उपनिषदे सांगतात, "यस्मिन विज्ञाते सर्वमिदं विज्ञातं भवति ।" (ज्याला जाणल्याने सर्व काही जाणले जाते.) सर्व सृष्टीचे रहस्य माहित होते. मग माहित करून घेण्यासारखे काही बाकी रहात नाही. शरीर, मन, बुद्धि, अहंकार म्हणजे मनुष्य नाही, तर मनुष्य म्हणजे आत्मा आहे. आत्मा हेच त्याचे वास्तविक रूप आहे. तो नित्य, शाश्वत व सनातन आहे. प्रकृति अनित्य आहे. ह्या आत्म्याचे ज्ञान हेच 'स्व' चे ज्ञान आहे. स्थूल असणार्‍या प्रकृतीलाच अज्ञानी ओळखतात कारण अज्ञ हे इंद्रियग्राह्य आहे. परंतु ज्ञानी सूक्ष्मरूपी चैतन्यालाही ओळखतात जे इंद्रियातीत आहे.

ह्या ज्ञानप्राप्रीमुळे मुक्ति होते. सृष्टीच्यामूल आधाराचे ज्ञान झाल्यावर संपूर्ण विश्व-प्रपंचाचे ज्ञान होते, भ्रांती नष्ट होते. या ज्ञानाने मनुष्य शांत होतो. सार्‍या सृष्टीव्यापाराचा तो केवळ 'साक्षी' किंवा 'द्रष्टा' होतो. यामुळे संसार बंधनातून मुक्त होऊन तो स्वतंत्र होतो. ज्ञानाशिवाय मुक्ति होऊ शकत नाही. जीवनाचा परम उत्कर्ष मुक्ति आहे. तीच जीवाची अन्तिम स्थिती आहे.

आत्मज्ञानासाठी वैराग्य अती आवश्यक आहे. वैराग्याचा अर्थ संसार सोडणे किंवा त्यापासून दूर पळणे असा नाही; तर त्याविषयीच्या आसक्तितून मुक्त होणे असा आहे. आसक्तीचा त्याग म्हणजे वैराग्य. संसार बंधन नाही, त्याचे प्रति जी आसक्ति आहे, माया आहे ती बंधन आहे. ह्या आसक्तिचे कारण आहे अहंकार. जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत आसक्ति आहे व तीचेच बंधन आहे. संसार व आत्मा दोन टोके आहेत. बाह्मांगी आहे तो संसार, जो अंतर्यामी आहे तो आत्मा (परमात्मा). दोन्ही रस्ते भिन्न भिन्न दिशांना जातात. मनुष्य दोघांच्या मधे उभा आहे. जर संसाराच्या दिशेने धाव घेतली तर तो परमात्म्यापासून दूर जातो. जर त्याने परमात्म्याच्या दिशेने धाव घेतली तर तो संसारापासून दूर जातो. संसारापासून विन्मुख होणे म्हणजे वैराग्य. हे केवळ दृष्टी-परिवर्तन झाल्याने शक्य आहे. समाज सोडून जंगलात पळून गेल्याने हे साध्य होणार नाही. जर व्यक्तिने संसाराबद्दलची आसक्ति सोडली तर त्यास ज्ञान-प्राप्तीचा अधिकार मिळतो. मनुष्याच्या अहंकारामुळेच लोभ, मोह, वासना आदि निर्माण होतात व त्यामुळे मनुष्य कर्माच्या जाळ्यात अडकतो. अज्ञानामुळे हे जाळे त्याने स्वतःच निर्माण केले आहे. पण ज्ञानाने हे जाळे नष्ट करता येते. परंतु ज्ञान-प्राप्तीसाठी मुमुक्षु असण्याची गरज अटळ आहे. अन्यथा ज्ञान काही कोणी देवता भेट म्हणून आणून देत नाही.

राजा जनक मुमुक्षु आहे. त्याच्यामध्ये ज्ञान व मुक्तिची तीव्र इच्छा आहे. अष्टावक्र ज्ञानी आहे. ज्यांनी स्वतः ज्ञान प्राप्त केले आहे तेच देऊ शकतात. ज्यांना स्वतःला ज्ञान मिळवता आले नाही ते दुसर्‍याला देऊ शकत नाही. एवढेच नाही तर अजून दिशाभूल करतात. आज संसार अशा अज्ञानी व्यक्तिमुळे दिशा भ्रमीत झाला आहे. मूढांपेक्षा अज्ञानी माणसांनी दुनीयेचे जास्त नुकसान केले आहे. हे अज्ञानीच 'पंथवाद' पसरवतात व त्यामुळे संसार, समाज विकृत होतो. राजा जनकाच्या तीन प्रश्नात सार्‍या आध्यात्माचे सार साठविलेले आहे. प्रत्येक व्यक्ति ज्ञानप्राप्तीची इच्छा बाळगतो परंतु सारे काही करूनसुद्धा सद्‌गुरूच्या अभावामुळे त्यास ज्ञानप्राप्ती होत नाही. ह्याची तीन कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे स्वतःला मोक्षाची ओढ नसते, मुमुसुत्व नसणे. दुसरे कारण पात्रता नसणे व तिसरे कारण म्हणजे सद्‌गुरूचा अभाव. मुमुक्षुवृत्ती, पात्रता व सद्‌गुरू हे तीन्ही जिथे एकत्र येतात तिथे त्रिवेणी संगम होतो. तिथे चेतना अवश्य प्रगट होते. तत्त्व-बोध घडविण्याची क्षमता फक्त ज्ञानी गुरू मधेच असते. राजा जनकाचे मुमुक्षत्व व पात्रता पाहून नंतरच अष्टवक्राने तीन संक्षिस वाक्यात ज्ञानाचे सारतत्व राजास सांगितले व त्याचे समाधान केले.

अष्टावक्र सर्वप्रथम वैराग्याचे स्वरूपाचे वर्णन सांगतो कारण वैराग्याशिवाय मनुष्य आत्मज्ञान प्राप्तीचा अधिकार मिळवू शकत नाही. तीच प्रारंभीची अट आहे.मुक्तिमिच्छसि चेत्तात विषयान् विषवत्त्यज ।
क्षमार्ज्जवदयातोषं सत्यं पियूषवद् भज ॥ २ ॥


अनुवाद - अष्टवक्राने उत्तर दिले, 'हे प्रिय जनक राजा ! जर तुला मुक्ति हवी असेल तर सर्व विषय हे विष समजून त्यांचा त्याग कर आणि क्षमा, आर्जव, सरलता, दया, सन्तोष आणि सत्य यांना अमृत समजून त्यांचा अंगिकार कर.


विवेचन - वय कमी असूनही ज्ञानश्रेष्ठ असल्याने अष्टवक्र गुरूपदावर आसीन आहेत. राजा जनक शिष्य होऊन आपल्या जिज्ञासा-तृप्तीकरितां अष्टवक्रास वेगवेगळे प्रश्न करतोय. अष्टवक्र मुनी म्हणतात - 'हे राजा, जर तुला मुक्ति हवी आहे तर विषयांचा मोह विष आहे असे मानून त्यांचा त्याग कर. या एका वाक्यात वैराग्याचे रहस्य प्रकट झाले आहे. इंद्रियोपोभोग व त्याद्वारे विषयाची आसक्ति यामुळेच मनुष्य आत्मज्ञानापासून वंचित रहातो. विषय केवळ शरीर व मनाला तृप्त करू शकतात. आत्म्याला नाही. भोगामुळे वासना कधी तृप्त होत नाही. वासना पुन्हा पुन्हा जागृत होतात व अनेक जन्म पिच्छा पुरवतात म्हणून आत्म-ज्ञानाची इच्छा असणार्‍यांनी विषयांची आसक्ति विषसमान मानून सोडून दिली पाहिजे. मनुष्याच्या वारंवार जन्म व मरणाचे कारण ही आसक्ति आहे. मात्र केवळ विषय वासनांचा त्याग करताच मनुष्य आत्म-ज्ञानी होत नाही, तर त्यात आत्मज्ञानाकरिता आवश्यक असणारी पात्रता निर्माण होते. हे विषय बंधन नसून त्यांचेबद्दलची आसक्ति बंधन आहे. विषयांचा त्याग करणे म्हणजे खाणे-पिणे सोडून, कपडे किंवा बिछाना सोडून नग्न होऊन उपाशी राहणे नव्हे. शरीर धारणेसाठी जे कमीत कमी आवश्यक आहे, त्यापेक्षा अधिक उपभोग न घेणे असा त्याचा अर्थ आहे. उपभोग घेण्याच्या आसक्तिमुळे लोभ, मोह, क्रोध, ईर्ष्या, द्वेष, मृणा, चिन्ता, आदि अवगुण निर्माण होतात व एक असे दुष्टचक्र सुरू होते की जे अनेक जन्मोजन्म सुरू रहाते. आसक्ति हेच या सर्व अवगुणांचे मूळ कारण आहे. आसक्तिचा त्याग केल्यानेच मनुष्य ह्या दुर्गुणातून मुक्त होतो व ज्ञान संपादन करण्याची पात्रता प्राप्त करतो.

अष्टवक्र पुढे सांगतात की विषय वासनेच्या त्यागामुळेच तुझ्यात पात्रता निर्माण होईल, सद्‌गुण प्राप्तीसाठी लायक बनशील. पात्रात जे विषयरूपी विष भरलेले आहे ते फेकून पात्र रिकामे केल्याशिवाय त्यात ज्ञानामृत ओततां येत नाही. यास्तव पहिल्यांदा अंतःकरण स्वच्छ कर तरच सद्‌गुणांचा प्रभाव पडू शकेल; अन्यथा विषात ओतलेल्या अमृताप्रमाणे हे ज्ञान सुद्धा दूषित होईल. अंतःकरण स्वच्छ झाल्यावर त्यात तू क्षमा, दया, संतोष व सत्यरूपी अमृत भरून प्राशन कर, तेंव्हा तूला अमृताचा लाभ मिळेल. विषय अनित्य आहेत, अविद्या आहेत. क्षमा, सरलता, संतोष शाश्वत आहेत. अनित्याचा भोग सोडून शाश्वताचे सेवन कर. देहाबद्दल जे खोटे तादात्म्य (मी म्हणजे माझा देह) निर्माण झाले आहे ते, विषयासक्तिच्या त्यागामुळे नष्ट होईल व तेंव्हाच आत्म्याबरोबर तादात्म्य स्थापित होईल.न पृथिवी न जलं नाग्निर्न वायुद्यौर्न वा भवान् ।
एषां साक्षिणमात्मामं चिद्‌रूपं विद्धि मुक्तये ॥ ३ ॥


अनुवाद - तू पृथ्वी नाहीस, जल नाहीस, अग्नि नाहीस, वायु नाहीस आणि आकाशसुद्धा नाहीस. या सर्वाचा तू साक्षी आहेस व चैतन्यरूपाने साक्षी आहेस हे जाण.
विवेचन - ज्ञान कसे प्राप्त होते या राजा जनकाच्या पहिल्या प्रश्नाला उत्तर म्हणून ज्ञान संपादन करण्यापूर्वी पात्रता संपादन करण्याची गरज सांगून अष्टवक्र मुनी त्यासाठी वैराग्य प्राप्ती व आसक्ति-मुक्तिची अनिवार्य अट सांगतात. या वैराग्याचा खुलासा केल्यानंतर मुनीश्रेष्ठ निज स्वरूप काय व कसे आहे याबद्दल येथे सांगतात. ते म्हणतात मनुष्य केवळ शरीर नाही, तो चैतन्यरूपी आत्मा आहे. आत्मा हे त्याचे वास्तविक रूप आहे. आत्मा हाच सम्राट आहे. शरीर, मन, बुद्धि हे आत्म्याचे दास आहेत जे त्याचे आज्ञेनुसार कार्य करतात. शरीर, मन हे स्थूल असल्याने त्यांचा प्रत्यक्ष बोध होतो. आत्मा सूक्ष्म आहे व त्याचे ज्ञान नसल्यामुळे असा भ्रम होतो की मी म्हणजे केवळ शरीर आहे. हेच अज्ञान आहे. अष्टवक्र मुनी ह्या अज्ञानाचे निराकरण करण्यासाठी सांगतात की पृथ्वी, जल, अग्नि, वायु व आकाश या पाच तत्वांनी बनलेले शरीर म्हणजे तू नाहीस. हे पंचतत्व भौतिक आहेत. अनित्य आहेत नष्ट होणारे आहे. मृत्यूनंतर ते नष्ट होतील पण तू मृत्यूनंतर सुद्धा जीवंत राहशील व मृत्यूनंतर पुढच्या यात्रेला निघून जाशील. शरीराचे जुने वस्त्र त्यागून नव्या शरीराचे वस्त्र धारण करशील. हे शरीर केवळ वस्त्र आहे. तू त्यापेक्षा भिन्न आहेस. हे तुझे शरीर भौतिक तत्वांनी बनले आहे. तू घर नसून घरात राहणारा मालक आहेस. तूं त्यात राहणारा चैतन्यरूप साक्षी आहेस. सर्व भौतिक जगाचा आधार चैतन्यच आहे. तू सुद्धा चैतन्यच आहेस. अनेक जन्माच्या सवयीमुळे तुला स्वतःला भौतिक शरीर समजण्याची सवय झाली आहे. ती भ्रांती संपवून स्वतःचे चैतन्यरूप ओळख. हेच ज्ञान आहे. जर तू संपूर्ण जगाचा, जगाचे व्यवहारांचा केवळ साक्षी, द्रष्टा होशील तर तुला आत्मबोध होईल. हेच सत्यसूत्र आहे, जे प्राप्त केल्यावर दुसरी कोणतीही साधना आवश्यक रहात नाही. आपण म्हणतो - हे शरीर माझे आहे, मन माझे आहे, बुद्धि माझी आहे. पण या सर्व वाक्यातला 'मी' कोण आहे ? माझे आहे म्हणजे कुणाचे आहे ? निश्चितच शरीर, मन हे 'मी' पासून वेगळे, भिन्न असले पाहिजे म्हणून तर आपण म्हणतो की माझे आहे, जे मी नाही व जे 'माझे' आहे ते 'माझे' या खर्‍या 'मी’ मधे जोडले जात असेल तर ते वेगळे काढून त्याचा त्याग केला पाहिजे. आणि जे जे माझे आहे ते 'मी' मधून बाजूला काढल्यावर जे खाली शिल्लक राहील तो 'मी' आहे. हेच 'मी' तत्व, आत्मातत्त्व आहे, ज्याचे ज्ञान झाल्यावर सर्व विजातीय तत्वे त्यापासून वेगळी दिसू लागतात. हेच आत्मज्ञान आहे.
यदि देहं पृथक्कृत्य चित्ति विश्राम्य तिष्ठसि ।
अधुनैव सुखी शान्तः बन्धमुक्तो भविष्यसि ॥ ४ ॥


अनुवाद - आपल्यापासून देहाला वेगळे करून चैतन्याचा विश्रामरूपी अनुभव घेशील तर तु आत्ताच शान्त, बंधनमुक्त व सुखी होशील.


विवेचन - मुनीश्रेष्ठ अष्टवक्र म्हणतात, वैराग्य प्राप्ती झाल्याने पात्रता निर्माण होईल. नंतर गुरूद्वारा तत्वज्ञानाचा बोध केला गेल्यावर आत्मज्ञान होईल. परंतु मुक्तिसाठी आत्मज्ञान पुरेसे नाही. मी शुद्ध चैतन्य-आत्मा आहे, मी केवळ साक्षी आहे, मी शरीर नाही एवढे जाणणे मुक्तिसाठी पुरेसे नाही. या आत्मज्ञाना नंतरसुद्धा शरीराशी तादात्म्य राहिले तर पुन्हा पुनर्जन्म होण्याची शक्यता निर्माण होते. म्हणून त्यास सुद्धा मुक्ति म्हणता येणार नाही. हे ज्ञान सविकल्प समाधीत सुद्धा होते. या समाधित बीजरूपाने सर्व संस्कार विद्यमान असतात. उचित व अनुकूल वातावरण मिळाल्यावर या बीजातून पुन्हा वृक्ष निर्माण होऊ शकतो. म्हणून त्या बीजाला सुद्धा नष्ट करणे ही निर्विकल्प समाधी आहे. तीच मुक्तावस्था आहे. अष्टवक्र मुनी ह्याच मुक्तीची चर्चा करतांना सांगतात, "तू आत्म-ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर जर देहासक्ति सोडून पूर्णरूपाने चैतन्य आत्म्यात स्थिर होशील तर तू आता सुखी, शान्त व बंधनमुक्त होशील. आपले शुद्ध स्वरूप आत्मा आहे हे ओळखणे पुरेसे नाही तर त्यात निरंतर स्थिर राहणे आवश्यक आहे. हीच निर्विकल्प समाधी आहे, मुक्ति आहे." पातंजली अष्टांग योगात शेवटच्या स्थितीत समाधीची चर्चा करतात. अष्टवक्र पहिल्याच वाक्यात राजा जनकास समाधीचे ज्ञान व अनुभव देतात.

शरीर आणि आत्मा यांच्यात सात पडदे, आवरणे आहेत. योगशास्त्र शरीरापासून सुरवात करून एक एक आवरण शास्त्रविधीपूर्वक दूर करून आत्म्यापर्यंत पोहचवते. अष्टवक्र सरळ आत्म्याचा साक्षात्कार घडवतात व बाकीची सर्व आवरणे एकाच प्रयत्नात नष्ट करण्यास सांगतात. मुनी म्हणतात ही आवरणे वास्तविक (सत्य) नाहीत. केवळ भ्रम आहे. प्राप्तीचा विनाश केवळ बोधतत्वानेच शक्य आहे. तिथे क्रिया कर्माचा उपयोग नसतो. आत्मा अहंकाराशी जोडलेला आहे. अहंकारातून वासना निर्माण होते. वासनापूर्ती साठी अहंकाराचे साधन असणार्‍या शरीराचा तो उपयोग करतो. जर वासना नसतील तर शरीराची आवश्यकताच नाही. योगाचे केंद्र शरीर आहे, जर यातून तू वेगळा होऊन सरळ आत्मभाव आत्मसात केलास तर सुखी, शान्त व बंधनमुक्त होशील. केवढे सारगर्भित तथ्य आहे हे. 'आताच' सुखी होशील, एका क्षणाचाही विलंब होणार नाही. दोरी पाहून सापाचा भ्रम झाल्यास ती दोरी उजेडात पाहिल्यानंतर तो भ्रम तत्काळ संपतो. त्यासाठी कर्मकांड, जप-तप, मंत्र-साधना, हठयोग असे काहीही करावे लागत नाही. त्याचप्रमाणे आत्म-बोध हा पुरेसा असतो. ज्यामुळे सर्व भ्रम नष्ट होतात व मनुष्याला मुक्तिचा मार्ग खुला होतो. ही मुक्ति काही एखादे विशेष ठिकाण नाही किंवा ती मिळविण्यासाठी काही एखादी कालनदी पार करावी लागत नाही. मुक्ति म्हणजे आपल्या वास्तविक स्थितीचे ज्ञान आहे, जे प्रत्यक्ष दर्शनानेच मिळू शकते. यामुळेच सर्व अज्ञानाच्या ग्रंथींची बंधने तुटतात. म्हणूनच शिवगीतेत म्हटले आहे की

मोक्षस्य न हि वासीऽस्ति न ग्राम्यान्तरमेव वा ।
अज्ञानहृदयग्रन्थिनाशो मोक्ष इति मतः ॥

(मोक्ष कुठे दुरवर, कुठे एखाद्या घरात किंवा कोणत्या एखाद्या गावात रहात नाही. अज्ञानरूपी हदयग्रंथींचा नाश हाच मोक्ष होय.)

जो चैतन्यरूपी आत्म्यात स्थिर झाला तो मुक्त आहे. कर्म, क्रिया ह्या सर्व शरीराच्या व मनाच्या आहेत. जो शरीर व मन यांच्या आसक्तित आहे, त्याचे कर्म त्याच्यासाठी बंधन होतात. आत्म्याचे कोणतेही बंध नाही. आत्म कर्ता नसून केवळ द्रष्टा आहे. द्रष्टा कधी कर्मबंधनात सापडत नाही. सर्व भोग, कर्म, अहंकार, लोभ हे शरीर व मनाचे धर्म आहेत, आत्म्याचे नाही. जो स्वतःचे आत्मस्वरूप ओळखून शरीरासक्ती सोडून देतो तो मुक्त आहे व हाच मुनीश्रेष्ठ अष्टवक्राचा परमश्रेष्ठ उपदेश आहे.
न त्वं विप्रादिको वर्णो नाश्रमी नाक्षगोचरः ।
असंगोऽसि निराकारो विश्वसाक्षी सुखी भव ॥ ५ ॥


अनुवाद - तू ब्राह्मण किंवा अन्य वर्ण नाहीस अणि तू आश्रमीसुद्धा नाहीस. तू डोळे किंवा अन्य इंद्रियाद्रारे जाणता येतो, हेच सत्य ओळखून सुखी हो.


विवेचन - अष्टवक्राने तीन सूत्रात राजा जनकाच्या तीन प्रश्नांचे उत्तर देऊन, ज्ञान, मुक्ति व वैराग्य ह्मांचे स्पष्टीकरण करून मुक्तिचा मार्गही सांगितला. नंतर राजा जनकाला हा उपदेश ग्रहण करण्यास मदत व्हावी या हेतूने अष्टवक्र सविस्तर विवेचन करतांना म्हणतात, "तू शरीर नाहीस, तू आहेस आत्मा जो साक्षी आहे, चैतन्य आहे. आत्म्याचा कोणताही वर्ण नसतो. आत्मा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र काहीच नसतो. ही तर चैतन्य उर्जा आहे जी सर्व प्रकारच्या जीवात (व अ-जीवात) समान प्रमाणात व्याप्त आहे.

आत्म्याचा वर्ण नसतो आणि आत्मा कुठल्याही आश्रमातही नसतो. आत्मा गृहस्थाश्रमी नसतो किंवा वानप्रस्थाश्रमी नसतो. त्याची कोणतीच जात नाही, त्याचे कोणतेच लिंग नाही. आत्मा कर्ता नाही, भोक्ता नाही किंवा भोग्य विषयसुद्धा नाही. या सर्वांपेक्षा निराळा, असंग, निराकार आणि विश्वाचा साक्षीमात्र आहे. केवळ द्रष्टा आहे. अष्टावक्र जनकाला सांगतात तू तो आत्मा आहेस हे जाणून सुखी हो. वर्ण, आश्रम हे आत्म्याचे विषय नाहीत म्हणून ते तुझेसुद्धा होऊ शकत नाही. वर्णाश्रम धर्माची व्यवस्था केवळ अज्ञानी व्यक्तींसाठी आहे कारण त्यामुळे ते क्रमशः स्वतःचा विकास करून घेत आत्मज्ञान प्राप्तीसाठी लायक होऊ शकतील.

अष्टवक्र जनकाला आत्म्याचे वास्तविक रूप समजून घेण्यासाठी मदत करत सांगतात की 'तू हे जाणून घे व आत्ताच सुखी ही ' यात उशिर होतच नाही. हा रोकडा, नगदी धर्म आहे, उधार नाही की आज कर्म केले आणि पुढच्या जन्मात फळ मिळेल. काही लोक म्हणतात की हे कलियुग आहे, हा पंचम काल आहे, यात मुक्ति होणार नाही. काहींचे म्हणणे आहे की अंतिम तिर्थंकर, अवतार होऊन गेले आता पुन्हा कुणी होणार नाही. परंतु अष्टवक्र निर्भिडपणे सांगतात की ही सर्व निरर्थक बडबड आहे. तू आपल्या आत्मस्वरूपी चैतन्याला ओळखून त्यात स्थिर हो आणि आत्ताच मुक्त हो. अशी घोषणा, असा उपदेश कोणत्याही गुरूने केलेला नाही. आध्यात्म जगतातील ही एक अद्‌‍भुत घोषणा आहे. दिवा प्रच्चलित होताच अंधार अदृश्य होतो त्याच प्रकारे आत्मज्ञानाच्या प्रकाशाने अज्ञानरूपी अंधार एका क्षणात विलिन होतो व सारी भ्रांती नाहीशी होते. फक्त 'बोध' होणे पुरेसे आहे.
धर्माऽधर्मौ सुखं दुःखं मानसानि न ते विभो ।
न कर्ताऽसि न भोक्ताऽसि मुक्त एवासि सर्वदा ॥ ६ ॥


अनुवाद - हे विभो ! धर्म आणि अधर्म, सुख आणि दुःख हे मनाचे विषय आहेत. तुझे नाहीत. तू न कर्ता आहेस न भोक्ता. तू तर सदैव मुक्तच आहेस.


विवेचन - आत्मा चैतन्य आहे, असीम आहे, मुक्त आहे व सर्वत्र व्यापून आहे. आत्मा कोणत्याही बंधनात अडकलेला नाही. शरीर सीमित आहे. शरीर, मन, बुद्धि यांना मर्यादा आहेत. आत्मा कोण्या एका शरीराशी किंवा मनाशी बांधलेला नाही. ही सारी शरीरगत व मानसिक भिन्नता आहे. आत्मगत कोणतीही भिन्नता नाही. म्हणून अष्टवक्राने राजा जनकाला विभो (व्यापक) शब्दाने संबोधित करून सांगितले की तू शरीर नसून व्यापक आहेस, व्यापक आत्मा आहेस. म्हणून सदैव मुक्त आहेस, ही मुक्ति हाच तुझा स्वभाव आहे. ही कष्टाने मिळवायची नसून ती मिळालेलीच आहे फक्त जागृत होऊन दृष्टी-परिवर्तन करून बघायची आहे. केवळ ग्रहणकर्ता होऊन जर कुणी व्यवस्थित ऐकले तर तत्काळ घटना घटित होते - त्याच क्षणी अनेक जन्मांचे विस्मरण नष्ट होते व स्मरण जागृत होते. शोधत फिरणारा वाट चुकतो. शोधाशोध करून परमात्म्याची भेट होत नाही. शोधाशोध सोडून संसाराबद्दल उदासिन, वैराग्यशील होऊन चैतन्यरूपी आत्म्यात स्थिर होणे हाच प्राप्तीचा मार्ग आहे. आत्मा व्यापक आहे व सर्वात एकच आत्मा आहे, पण अज्ञानी माणसाला भिन्न भिन्न आत्मा असल्याचा सम होतो, शरीरांच्या वेगवेगळेपणामुळे आत्मा वेगवेगळा असल्याचा भ्रम होतो. जसे हा माझा आत्मा आहे, तो त्याचा आत्मा आहे, आत्मे असंख्य आहेत वगैरे भ्रम होय.

अष्टवक्र म्हणतात की तू अहंकारामुळे स्वतःला कर्ता व भोक्ता मानतोस. हा तुझा अहंकार तुझा भ्रम आहे. स्वतःला कर्ता व भोक्ता मानल्यानेच सुख दुःखाला तुला तोंड द्यावे लागते. तू धर्म, अधर्मांच्या गोष्टी करतोस. वास्तवात, धर्म, अधर्म आणि सुखदुःख हे सर्व मनाचे आहेत. तू अहंकारामुळे स्वतःला आत्म्यापेक्षा भिन्न समजतो. हा अहंकारयुक्त भ्रम सोडून दिलास तर तू आत्म्याप्रमाणे सदा मुक्त होशील. अहंकार व मन यांचा अडथळा दूर होताच तू कर्तेपण व भोक्तेपण यातून मुक्त होशील व त्याच बरोबर सुख दुःखातूनही तुझी सुटका होईल.
एको दृष्टाऽसि सर्वस्व मुक्तप्रायोऽसि सर्वदा ।
अयमेव ही ते बन्धो दृष्टारं पश्यसीतरम् ॥ ७ ॥


अनुवाद - तू सर्वांचा द्रष्टा आहेस आणि सदैव मुक्त आहेस. स्वतः ऐवजी दुसर्‍याला द्रष्टा मानतोस हेच तुझे बंधन आहे.


विवेचन - ह्या सूत्रात अष्टावक्र अद्वैताचे महत्त्व स्पष्ट करून द्वैतवादी विचारांनाच बंधनाचे कारण मानून जनकास सांगतात की, "हा आत्माच परमात्मा आहे हाच ब्रह्म आहे. दोन्ही भिन्न नाहीत, एकच आहेत. तू सुद्धा तेच ब्रह्म आहेस आणि संपूर्ण सृष्टी सुद्धा त्याच एका ब्रह्माची अभिव्यक्ति आहे. आणि हा आत्माच सर्वाचा द्रष्टा आहे. म्हणून तूच सर्वांचा द्रष्टा आहेस. परमात्मा मुक्त आहे म्हणून तू सुद्धा खरोखर मुक्त आहेस. परंतु तुझ्या बंधनाचे कारण हेच आहे की तू स्वतःला सोडून दुसर्‍याला द्रष्टा मानतोस." द्वैत अद्वैत दृष्टीकोनाविषयी हेसूत्र फार महत्त्वपूर्ण विचार मांडते. अष्टावक्र म्हणतात, "तू सर्वांचा द्रष्टा आहेस, दुसरा कुणी द्रष्टा नाही." द्वैतवादी म्हणतात की ईश्वर व मनुष्य भिन्न आहेत, परमात्मा व आत्मा भिन्न आहे, ईश्वर व सृष्टी वेगवेगळे आहेत. ईश्वर कर्ता आहे, त्याने सृष्टी निर्माण केली. तो आकाशात किंवा स्वर्गात बसला आहे, आणि तेथून सर्व सृष्टीचे संचालन करतोय. सर्व त्याच्या मर्जीनुसार व आदेशानुसार होत आहे. तो दया करतो, बक्षीस देतो, दंड देतो व तोच न्याय करतो. सर्व त्याचे शासन आहे. त्याची संपूर्ण शासन व्यवस्था आहे. त्याने सृष्टी बनवली, स्वर्ग-नरक तयार केलेत, पशु-पक्षी, जीव-जन्तू, मनुष्य त्यानेच बनविले. हा आत्मा ईश्वर नसून त्याची संतती आहे. ईश्वराचा व आत्म्याचा पिता-पुत्राचा संबंध आहे. मालक-गुलामाचा संबंध आहे. ईश्वर मुक्त आहे, आत्मा गुलाम आहे व तो बंधनात आहे. गुलाम कधी मालक होऊ शकत नाही. ईसाइ (खिश्चन), मुसलमान व ब्रह्मकुमारी पंथाचे लोक असेच मानतात. काही धर्म ब्रह्म, जीव व प्रकृती तीघांनाही अनादि मानतात. काही आत्मा व सृष्टीला अनादि मानतात. काही पुरुष व प्रकृति दोघांना अनादि मानतात. काही प्रकृतीलाच सर्व काही मानतात व ईश्वराच्या सत्तेवर (अस्तित्वावर) विश्वास ठेवत नाही. ते या चेतन्याला प्रकृतीचा गुणधर्म समजतात. अशा वेगवेगळ्या सिद्धान्तांच्या, धारणांच्या मध्यभागी अष्टवक्र धैर्याने जाहीर करतात की चैतन्य आत्माच ब्रह्म आहे, याच्याहून वेगळा असा कोणी ईश्वर नाही. हा आत्मा एकमेव द्रष्टा आहे, साक्षी आहे. काही धर्म असे मानतात की आकाशात ईश्वर बसलाय व तेथून बसल्या-बसल्या तो सर्व पाहतोय, पाप-पुण्य न्याहाळतोय. अष्टवक्र म्हणतात हा आत्माच परमात्मा आहे व तोच द्रष्टा आहे. ह्याच्याहून वेगळा कोणी द्रष्टा नाही. हा आत्मा मुक्तच आहे, तो कोणत्याही बंधनात नाही. मुनीश्रेष्ठ जनकाला सांगतात की तुझे बंधन हेच आहे की तू स्वतः ऐवजी दुसर्‍याला द्रष्टा मानतोस. जर दुसरा कुणी असेल तर बंधन आलेच. जर एकच असेल तर कोण कुणाला बांधणार ? तो मुक्तच आहे. जर ईवर आत्म्यापेक्षा वेगळा असेल, आत्मापेक्षा मोठा असेल तेंव्हा बंधनाचा प्रश्न येतो, की आत्मा त्याच्या अधीन आहे, गुलाम आहे, त्याचा सेवक आहे. जेव्हा दुसरा कुणी नाही तेंव्हा बंधन कुणाचे ? तो मुक्तच आहे. म्हणून आत्म्यापेक्षा ईश्वराचे अस्तित्व वेगळे मानणे हेच बंधन आहे. असे मानले ल आत्मा कधीच मुक्त होऊ शकत नाही. याच कारणानी ईश्वराचे अस्तित्व आत्म्यापेक्षा वेगळे मानणार्‍या धर्मात मुक्तिची धारणी आढळत नाही. म्हणून अन्य धर्म, स्वर्ग-नरक व ईश्वराच्या साम्राज्याच्या गोष्टी करतात. केवळ अद्वैतवादीच मुक्तिची गोष्ट करू शकतात. स्वतंत्र होण्यात फार भय आहे. फार असुरक्षितता आहे. मनुष्य स्वभावतः सुरक्षिततेकरिता गुलामी शोधतो. म्हणून अन्य धर्मात ईश्वराला आपला मालक ठरवून स्वतःला त्याचे गुलाम मानतात. याच विचारधारणेने द्वैतवादी अन्य धर्मांना जन्म दिला. उपनिषदे म्हणतात, 'अयमात्मा ब्रह्म', 'तत्त्वमसि' म्हणजे मीच तो ब्रह्मरूपी आत्मा आहे व तूसुद्धा तेच ब्रह्म आहेस. हीच अद्वैताची धारणा आहे, मुनीश्रेष्ठ अष्टवक्र अद्वैतवादी आहेत. म्हणून राजा जनकाला ते सांगतात, तू आत्मा आहेस व हा आत्माच द्रष्टा परमात्मा आहे. ह्याच्याहून वेगळा असणार्‍या आकाशात बसणार्‍या ईश्वराला द्रष्टा मानणे हेच तुझे बंधन आहे. अज्ञानीच आत्म्यापेक्षा वेगळा असणार्‍या ईश्वराला द्रष्टा किंवा कर्मफल दाता आणि कर्ता मानतात. ज्ञानी तसे मानत नाही.
अहं कर्त्तेत्यहंमान महाकृष्णाहि दंशितः ।
नाहं कर्त्तेति विश्वासामृतं पीत्वा सुखी भव ॥ ८ ॥


अनुवाद - 'मी कर्ता आहे' - या अहंकाररूपी विशाल काळ्या सापाचा तुला दंश झाला आहे; 'मी कर्ता नाही' विश्वासरूपी अमृत प्राशन करून सुखी हो.


विवेचन - अहंकार हेच दुःखाचे कारण असल्याचे या सूत्रात सांगून मुनीश्रेष्ठ अष्टवक्र म्हणतात, अहंकाररूपी महासर्पाचा दंश झाल्यामुळे तू स्वतःला कर्ता मानतोस. ही 'मी' ची भावनाच तुला ब्रह्म किंवा चेतनेपासून दूर करते. जोपर्यंत तुझ्यात अहंकार आहे तो पर्यंत तू स्वतःला त्या ब्रह्मापासून वेगळा मानशील आणि ही वेगळेपणाची भावनाच सर्व दुःखाचे कारण आहे. ह्माकरतां तू 'मी वेगळा आहे', 'मी कर्ता आहे' या अहंकाराचा त्याग करून 'मी कर्ता नाही', 'कर्ता ईश्वर आहे, मी केवळ उपकरण (साधन) आहे किंवा निमित्तमात्र आहे. या विश्वासरूपी अमृताचे प्राशन करून सुखी हो. संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती एकाच ब्रह्मापासून झाली आहे. एकच चेतना भिन्न भिन्न रूपात व्यक्त झाली आहे. शरीरगत चेतना म्हणजेच आत्मा व समष्टीगत चेतना म्हणजे ब्रह्म; हे दोन्ही एकच आहेत. जगाचे प्रारंभी ब्रह्माचे मनात इच्छा निर्माण झाली की मी एकच असून अनेक रूपे धारण करीन. (एकोऽहं बहुस्याम) ह्या स्फुरणातून सुप्त शक्ति जागृत झाली. ही शक्ति पुढे वेगवेगळी रूपे साकार करत गेली. ह्या वेगवेगळ्या रूपातील व्याप्त चेतनेला त्या परम चेतनेपासून आपण वेगळे आहोत असे वाटल्याने 'मी' पणाचा उदय झाला. या अहंकारामुळे स्व-चेतना त्या विराट चेतनेपेक्षा भिन्न वाटू लागली. या भिन्न प्रत्ययाचे कारण मनुष्याची बुद्धि आहे. ही बुद्धि या जीवाला ईश्वराच्या सान्निध्यापासून वेगळे करते. भारतीय दर्शनशास्त्र सैतानाला अहंकार समजते. अहंकारच सैतान आहे. त्याची उत्पत्ति अज्ञानापासून होते म्हणून भारतीय तत्त्वज्ञान अज्ञानाला पाप समजते. अज्ञानामुळे आलेली ही वेगळेपणाची जाणीव व अहंकार, आत्म-ज्ञानामुळे नष्ट होऊ शकते. जेव्हा आत्म्याचा बोध व ज्ञान होते तेव्हा भ्रम नाहीसा होतो आणि मनुष्य आपल्या वास्तविक रूपाला ओळखू शकतो. तेंव्हाच तो शान्त व सुखी होतो.

म्हणून अष्टवक्र सांगतात की 'मी कर्ता नाही' ह्या विश्वासाचे अमृत प्राशन करून सुखी हो. अहंकार भिकारी असतो. तो सतत जास्तीची मागणी करतो. कितीही मिळाले तरी तो रिकामा रहातो. सिकंदरासारखा ज्यगज्जेता सुद्धा मरतांना 'मी रिकाम्या हाताने जातोय' असे उद्‌गार काढतो. या जगातला व्यवहार म्हणजे सारा अहंकाराचा खेळ आहे. हा अहंकार स्वतःचे प्रदर्शन करू इच्छितो. मनुष्याचा खर्‍या गरजा खूप कमी आहेत व त्या सहजपणे पुर्‍या होऊ शकतात; पण त्याचे अधिकांश कार्य अहंकार तृप्तीसाठीच केले जाते. हा अहंकार कठीण व असाध्य कार्य करण्यातही स्वारस्य दाखवितो. उदाहरणार्थ - डोक्यावर उभे राहणे, एका पायावर उभे राहणे, तप करणे, नग्न राहणे, दिर्घकाळ उपवास करणे, डोंगरावर उंच चढणे, समाधीस्थ होणे, हठयोग करणे वगैरे. आपण सर्व जीवसृष्टीत श्रेष्ठ आहोत ही समजूत सुद्धा अहंकारामुळेच निर्माण झाली आहे. ह्या अहंकारामुळेच पृथ्वीला संपूर्ण ब्रह्मांडाचे स्तेस्थान मानण्याची चूक घडते. मी महान, मी आणि माझी जात महान या सर्व अहंकाराच्या घोषणा आहेत. आमच्या शिक्षणसंस्था सुद्धा जातीच्या अहंकारातून निर्माण झालेल्या व जातीच्या अहंकाराचे शिक्षण देणार्‍या आहेत. अहंकाराशिवाय जीवनावर दुसरे कोणतेही ओझे नाही, कोणताही तणाव नाही आणि कोणतेही बंधन नाही. अहंकार नेहमी कशाची तरी मागणी करतो, तो देत काहीच नाही. देणारा निरहंकारी होतो. घेण्याची इच्छा हेच दुःखाचे कारण आहे. जेवढे जास्त गोळा कुण्याची ईच्छा ठेवाल तेवढे जास्त दुःखी व्हाल. सुखी होण्याचा तो रस्ता नाही. ईश्वराने जे सर्वश्रेष्ठ आहे ते मनुष्याला दिले पण त्यामुळे मनुष्य संतुष्ट नाही. यावर धर्म हाच एक उपाय आहे. ज्यादिवशी हा अहंकार नष्ट होईल त्याचवेळी हे कर्तेपण नष्ट होईल व ईश्वराच्या सान्निध्याचा अनुभव प्राप्त होईल. अहंकारामुळे मनुष्य साहस व शौर्य प्रकट करू शकतो, तपस्या करू शकतो, उपाशी राहू शकतो, उंच पर्वतावर चढू शकतो, राजकीय नेता बनू शकतो परंतु समर्पित होऊ शकत नाही, भक्त होऊ शकत नाही. असा माणूस जर कर्मयोगी झाला तर त्याचा अहंकार कमी होऊ शकतो पण त्यासाठी त्याने कर्मातच समर्पित व्हावे व कर्म परमार्थाकरिताच करायला हवे. अहंकारामुळे जगाला उपयुक्त अशा काही गोष्टी मनुष्य करू शकतो. पण आध्यात्मिक दृष्ट्या अशा माणसाचा कस कमी होतो. कारण त्याचे नैतिक पतन झालेले असते. नैतीक पतन झालेला माणूस चोरी, हत्या, शोषण किंवा हिंसा सर्व काही करू शकतो. म्हणून अहंकारी लोकांनी त्यांचे त्यांचे एक वेगळे जग निर्माण केले आहे, जे या आध्यात्मिक जगापेक्षा फार वेगळे आहे. सर्व प्रकारची पापे व अनैतिकता या अहंकारामुळे जन्माला येतात. जर अहंकार असेल तर नरकात जाण्याकरिता अजून दुसरे पाप करण्याची आवश्यकता नाही. सर्व पापे आपोआप होत जातील, करावीसुद्धा लागणार नाहीत. म्हणून अष्टवक्राने अहंकाराला महासर्पाची उपमा दिली आहे. या अहंकार रोगाचे निदान करून मुनीश्रेष्ठ अष्टवक्र थांबत नाही, तर ते रोगावरचा उपायसुद्धा सांगतात. मनुष्याने 'मी' कर्ता नाही असे मानायला शिकावे. 'मी' पणातून मुक्त व्हावे. मी कर्ता नाही, ही सृष्टी आपल्या विशिष्ट नियमांनी कार्यरत आहे, परमेवर हाच एकमात्र कर्ता आहे या सत्याचा विश्वासपूर्वक स्विकार करणे हेच औषध आहे. यामुळे मनुष्य सुखी होऊ शकतो. अहंकारी व्यक्तिला सुखी करणे अशक्य आहे. तर निरहंकारीला दुःखी करणे अशक्य आहे. अष्टवक्र यासाठी कोणताही विधी, पूजा, तपस्या, साधना करण्यास सांगत नाही. महामुनी अष्टवक्र म्हणतात, 'दृष्टी-परिवर्तन करा, पूर्ण श्रद्धेने व निष्ठेने तर निश्चितच विचारात परिवर्तन होईल. आजची तुमची अहंकाराची दृष्टीच तर तुमच्या दुःखाचे कारण आहे. चुकीची दृष्टी ही की तुम्ही समग्र अस्तित्वाचा स्वतःला एक हिरा आणि अंश मानत नाही. स्वतःचाच अहंकार फुगवत आपलाच हट्ट चालवित आहात. समग्र अस्तित्वाचा तुम्ही एक भाग आहात, वेगळे नाही. न जन्मावर तुमचा अधिकार आहे, न मृत्यूवर तुमचा अधिकार आहे. मधल्या भागात उगाचच स्वतःला कर्ता समजून स्वमुक्ति पथात खाली मांडी घालून बसला आहात. मुनिश्रेष्ठ अष्टवक्राने सर्व सारगर्भ या सुत्रात विदित केला आहे. अमृत मानून निष्टापूर्वक हे सूत्र ग्रहण करणारा अत्यंत सुखी होऊ शकतो.
एको विशुद्ध बोधव्योऽहमिति निश्चयवह्निना ।
प्रज्वाल्याज्ञानगहनं वीतशोकः सुखी भव ॥ ९ ॥


अनुवाद - 'मी एक विशुद्ध बोध आहे' या श्रद्धायुक्त अग्निने स्वतःचे घोर अज्ञान जाळून तू शोकरहित व सुखी हो !


विवेचन - अष्टवक्र केवळ काही गोष्टी नाकारण्याचा उपदेश करत नाही. केवळ अहंकार सोडला की ज्ञान होणार नाही. फक्त नकार देणे एवढीच अट नाही. नकारात्मक दृष्टीकोनाचे धर्म केवळ त्यागाच्या गोष्टी सांगतात. घरदार, पत्‍नी, मुले, कपडे सर्व सोडून जंगलात जा; उपाशी रहा, भिक्षा मागून खा वगैरे वगैरे. ह्या केवळ त्यागाच्या नकारात्मक शिकवणूकीने जगाचे फार नुकसान केले आहे. सर्व काही त्यागले पण मिळाले काहीच नाही. अशा व्यक्तिची स्थिती फार दयनीय होते. त्याची दिशाभूल होऊन तो हरवून जातो. धोब्याच्या गाढवाप्रमाणे घरी आश्रय नाही आणि घाटावर रहाता येत नाही. परंतु अष्टवक्रांचा उपदेश सकारात्मक व होकारवादी आशापूर्ण दृष्टीकोन आहे. मुनिश्रेष्ठ सांगतात - 'केवळ अहंकार सोडल्याने, कर्तेपण सोडल्याने ब्रह्माची प्राप्ती होईल असे नाही. अहंकार सुटला असा भ्रम सुद्धा होऊ शकतो. पण प्रत्यक्षात मनात अबोध पातळीवर अहंकार शिल्लक राहू शकतो. अंधार नाही असे मानल्याने अंधार नष्ट होत नाही. दीप प्रज्वलित झाल्यानेच तो नाहीसा होतो. म्हणून अष्टवक्र निश्चयपूर्वक विश्वास देत सांगतात की आत्मज्ञान होण्यासाठी तू श्रद्धापूर्वक हे सत्य स्वीकार की तू एक विशुद्ध बोधस्वरूप आत्मा आहेस. म्हणजे तुझे अज्ञान कितीही असले तरी एका क्षणात ते नष्ट होईल. अज्ञान अस्तित्वातच नसते. तो केवळ ज्ञानाचा अभाव आहे. जोपर्यन्त ज्ञान नाही तोपर्यंत अज्ञान राहते. परंतु ज्ञानोदय होताच ते नाहीसे होते. या ज्ञानप्राप्तीनंतरच मनुष्य शोकरहित होऊन सुखी होतो. अज्ञानामुळे माणसाच्या अनेक अपेक्षा असतात. जेव्हा. या अपेक्षा पूर्ण होत नाही तेंव्हा तो दुःखी होतो. अपेक्षारहित जगणे ही एक कला आहे. जे मिळाले त्यातच समाधान मानून संतोषाने जगणे हेच परम सुख आहे. जेवढ्या अपेक्षा वाढतील तेवढे दुःख वाढते. सर्व अपेक्षा पूर्ण झाल्या असे कुणाचेचबाबतीत घडत नाही. हे माहीत असूनही मनुष्य अपेक्षा करत जातो व दुःख वाढत जाते. या दुःखाचे कारण तो स्वतःच आहे. दुसरा कुणी नाही. हे अज्ञान विशुद्ध ज्ञानानेच नष्ट होऊ शकते. म्हणून आत्म-बोध हाच आवश्यक व पुरेसाही आहे.
यत्र विश्वमिदं भाति कल्पितं रज्जूसर्पवत् ।
आनन्दपरमानन्दः स बोधस्त्वं सुखं चर ॥ १० ॥


अनुवाद - दोरीमधे साप दिसावा त्याप्रमाणे हे सर्व विश्व मनोकल्पनेतून जन्माला आले आहे. परम आनन्याची प्राप्ती करून सुखाने राहण्यासाठी बोधाची आवश्यकता आहे. ते प्राप्त करून सुखाने रहा.


विवेचन - आत्मा आणि सृष्टी यातला संबंध स्पष्ट करत अष्टवक्र या सूत्रात आत्मा निराकार (अरूप) असल्याचे प्रतिपादन करतात. त्या निराकाराचे साकार रूप सृष्टी आहे. रूप, आकार तयार होतात व विलयाला जातात पण मूलतच तेच राहते. सोन्यापासून अनेक अलंकार बनतात पण त्यांना वितळवून पुन्हा दुसरे अलंकार केले जातात तरीही त्यातले स्वर्ण तत्त्व तेच रहाते. जे जन्मते व नष्ट होते, ते अनित्य आहे. ते शाश्वत नाही. चैतन्यतत्त्वच शाश्वत आहे. अनित्याला नित्य समजणे यालाच आध्यात्मात भ्रम म्हटले आहे. जे आज दिसते, ते उद्या रहाणार नाही. त्यामुळे त्याचा आधार घेणे भ्रम आहे मूर्खता आहे. दोरीमध्ये साप दिसावा तशी ही सृष्टी आहे. आहे वेगळी व दिसते वेगळी. केवळ मनोदृष्टीमुळे दोरी सापासारखी दिसते. ती जशी आहे त्याचे ज्ञान तुम्हाला नाही. मनुष्याच्या मनात जसे भाव असतात तसे त्याला जग दिसते. पण जग त्यापेक्षा वेगळे असते. मनात भूताचे भय असेल तर जंगलातच काय घरातसुद्धा भूत दिसू शकते. स्वप्नातसुद्धा भूत छातीवर चढून बसेल. काही जणांना चांदणे रम्य वाटते पण विरही जनांना ते आगीसारखे भासते. सुखी माणसाला त्याचे घर स्वर्ग वाटते तर दुःखी माणसाला तेच घर खायला उठते. कुणात दोरी सापासारखी दिसते तर तुलसीदासजींना साप दोरीसारखा दिसला. कुणासाठी हे जग फुलांची बाग आहे तर काहींसाठी काटेरी वन आहे. काही म्हणतात ईश्वराने जग निर्माण केले. ते फार सुंदर आहे. पर्वत, नद्या, झरे, मैदान, वन, समुद्र, ढग, इंद्रधनुष्य, सूर्य चंद्र कुणाला सुंदर वाटतात तर कुणाला त्रासदायक वाटतात. ही सर्व माणसाची नजर आहे, त्याचा पाहण्याचा दृष्टीकोन आहे. त्याची जशी मानसिक स्थिती असेल तशी त्याला सृष्टी दिसते. हा दोष सृष्टीचा नसून दृष्टीचा आहे. याच प्रकारे ज्ञानी व अज्ञानी व्यक्तिची दृष्टी असते.

अज्ञानी माणसाला ही सृष्टी सत्य दिसते. तो या सृष्टीला अनादि व शाश्वत असल्याचे मानतो. सृष्टीची निर्मिती करणारा कुणी नाही. ही सृष्टी सत्य आहे. यापेक्षा वेगळे असे सत्य नाही. जे प्रत्यक्ष दिसते आहे, ते खोटे कसे असू शकेल ? परमात्मा दिसत नाही, तो खोटा असू शकेल, पण सृष्टी खोटी असू शकत नाही. ती नित्य, शाश्वत व सत्य आहे. काही विद्वानांनी या सत्याचे व भ्रमाचे चांगले वर्णन केले आहे की सृष्टी भ्रम नाहीं, खोटी नाही, सत्य आहे पण शाश्वत नाही म्हणून ती क्षणिक सत्य आहे. थोड्या काळासाठी सत्य आहे. पूर्ण सत्य त्याच गोष्टीला म्हणतात जी शाश्वत आहे. जे शाश्वत नाही ते सत्य असू शकत नाही. अष्टवक्राची दृष्टी प्रतिभावान आहे. ते या सर्व गोष्टीच्या पलीकडची मार्मिक बाब सांगतात. सर्व अद्वैतवादी दोरीत भासणार्‍या सापाचे, शिंपल्यामधल्या चांदीचे, मृगजलाचे, अलंकारातील सोन्याचे व माठातल्या मातीचे उदाहरण देतात. अष्टवक्र म्हणतात, "हे विश्व दोरीमध्ये साप भासावा त्याप्रमाणे काल्पनिक असे दिसते याचा अर्थ असा नाही की जग अस्तित्वात नाही; किंवा जग कल्पनेतच आहे. किंबहुना याचा अर्थ जग तर अस्तित्वात आहे; सृष्टी आहे, ही वने, पर्वत, नद्या, झरे, जीव-जंतु, वनस्पति सर्व काही आहे पण त्यांचेपासून सुखाची आशा करणे हे मृगजळासारखे आहे. कारण ते सुख मिळू शकत नाही. हे खरेच आहे. कारण भौतिक दृष्टीने आजचे जग अतिसंपन्न आहे. आज कृषीविज्ञान, प्रवास, दूरदर्शन, दूरध्वनी आदि बाबतीत प्रचंड प्रगती झाली आहे. मनुष्य आज चंद्रावर जाऊन आला. सूर्य, चंद्र, तारे यांची माहिती मनुष्याने प्राप्त केली. बुद्धीचा कमालीचा विकास झाला. जे एक लाख वर्षांत झाले नाही ते गेल्या तीनस्गे-चारशे वर्षात झाले आहे. आज सामान्य माणसाला घरात ज्या सोयी-सुविधा प्राप्त झाल्या आहेत त्या पाचशे वर्षापूर्वीच्या अतिश्रीमंत व्यक्तींनासुद्धा उपलब्ध नव्हत्या. मग तरीही मनुष्य दुःखी का आहे ? सत्य तर हेच आहे की जेवढ्या सुख-सोयी वाढल्या तेवढा माणूस अधिकच दुःखी झाला आहे. आज हॉस्पिटलमधल्या सोयी जेवढ्या वाढल्या आहेत, चिकित्सा-शास्त्र व त्याची साधने जेव्हढी प्रगत झाली आहेत तेवढेच रोग वाढले आहेत. न्यायालये जेवढी वाढली गुन्हेगारी तेवढी वाढली आहे. जेवढ्या भौतिक सुविधा वाढल्यात तेवढेच माणसाचे नैतिक अधःपतन वाढले आहे. जेवढे ज्ञान वाढले तेवढेच अज्ञान वाढले. जेवढे मंदिर, गुरुद्वारे वाढलेत तेवढाच अधर्म वाढला. शेती व उद्योगधंद्याचा जेवढा विकास झाला तेवढीच उपासमार व गरीबी वाढली. जेवढे मंगल करण्याचा प्रयत्‍न झाला तेवढेच अमंगल वाढलेले दिसते. एक अनिष्ट समांतर व्यवस्था विकसित होत गेली. याचे कारण काय आहे ? याचे उत्तर कुणाजवळ नाही. केवळ अध्यात्मच याचे उत्तर देऊ शकतो की या जगात सुखोपभोगात आनन्द प्राप्ती होईल ही आशा खोटी आहे. हे मृगजळ आहे. त्याने तहान कधीच भागणार नाही. कारण ह्या बाह्य वस्तूंमध्ये सुख नाहीच. तो आनंदाचा समुद्र सुख-सागर तर तुमच्याच आंत आहे. त्याची प्राप्ती केल्याशिवाय सुख मिळू शकणार नाही. त्याची प्राप्ती करून घ्याल तर धन्य व्हाल. स्वामी रामतीर्थांनी सांगितले आहे की, "या प्रापंचिक दुनियेत आनंदाचा शोध घेणे व्यर्थ आहे. हा आनंद तुमच्या अन्तर्यामीच स्थित आहे." अष्टवक्र याच सत्याचा निर्देश करण्यासाठी म्हणतात की हे जग दोरीप्रमाणे आहे, निर्जीव आहे, प्रकृती आहे, भौतिक आहे. हे तुम्हाला सुख देऊ शकत नाही आणि दुःख देऊ शकत नाही. ते निरपेक्ष आहे. तुम्ही या जगाचा उपयोग कसा करणार हे तुमच्यावर अवलंबून आहे. हे सापाप्रमाणे नाही. ह्याला घाबरण्याची गरज नाही. विवेकपूर्ण पद्धतीने या जगाचा उपयोग करायला हवा. पण तुम्ही सापाच्या कल्पनेने पळून जात आहांत, साप पाहिल्याप्रमाणे तुमची घबराट उडाली आहे. हा सर्व तुमचा भ्रम आहे कारण तुम्ही दोरीला साप समजला आहात. तुमचा हा भ्रम अज्ञानामुळे निर्माण झाला आहे. अज्ञानरूपी अंधारामुळे तुम्ही याचे वास्तविक रूप पाहू शकला नाहीत म्हणून हा भ्रम निर्माण झाला. म्हणून तुम्ही जोपर्यंत ज्ञान-चक्षुंनी हे जग पहात नाही तोपर्यंत हा भ्रम दूर होणार नाही. ज्ञान-प्रकाशात जग पाहण्याऐवजी तुम्ही हनुमान चालिसा किंवा रामरक्षा म्हणत दूर पळून जाता, यायुळे तुमचा भ्रम दूर होणार नाही. ही तुमची मानसिक स्थिती आहे. जर वास्तवापासून पळून गेला तर तो साप स्वप्नातसुद्धा दिसू शकतो. म्हणून या मानसिक रोगाचा उपाय केवळ प्रत्यक्ष दर्शन आहे. तुम्ही वास्तविकता ओळखा, आपल्या डोळ्यांनी पहा. अन्य क्रिया-विधी उपयोगाचे नाहीत. हेच या सूत्राचे सार आहे.

याच बरोबर अष्टवक्र राजा जनकाला सांगतात की हे जग सत्य आहे की असत्य ? चांगले आहे की वाईट ? दोरी आहे की साप ? याच्याशी काही मतलब नाही. तू जग नाहीस. तुझ्यासाठी भितीचे काही कारण नाही. तू आत्मा आहेस. हा आत्मा परमानंदाचा आनंद आहे. मग तुझ्यात दुःख, भिती कशी असू शकेल ? तू ज्ञानी नसून स्वतःच ज्ञान आहेस, बोध आहेस. यामुळे तू संतोषाने जीवन जग. या आत्मज्ञानाने तुझे सारे भ्रम व भय नष्ट होईल. जगाकडे बघण्याची दृष्टी बदलून जाईल. ज्याप्रकारे स्वप्नातले दृश्य पाहून भिती वाटते व जाग आल्यावर भय दूर होते, त्याप्रमाणे अज्ञानी या जगात घाबरतो. ज्ञान प्राप्तीनंतर या काल्पनिक भयातून तो मुक्त होतो.
[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

मुक्ताभिमानी मुक्तो हि बद्धो बद्धाभिमान्यपि ।
किं वदन्तीह सत्येयं या मतिः सा गतिर्भवेत् ॥ ११ ॥


अनुवाद - ज्याला मुक्तिची ओढ आहे, तो मुक्त होतो व ज्याला बंधनात राहण्यात मोठेपणा वाटतो तो बंधनात बांधलेला रहातो. ही लोक समजूत खरीच आहे की जशी मती असेल तशी गती मिळते.


विवेचन - या सूत्रात 'जशी मती असेल तशी गती मिळते' हे एक आध्यात्मिक सत्य असल्याचे अष्टवक्र सांगतात. एक अन्य सूत्र असे आहे की, अन्ते मति सो गती' अन्त म्हणजे मृत्यू. मृत्यूसमयी जशी मति असेल तशी गती प्राप्त होते. याचे पुष्ट्यर्थ अनेक कथा उपलब्ध आहेत. कृष्णाने गीतेत म्हटले आहे की, 'अनासक्त पुरुष कर्मशील राहून परम पदाला प्राप्त होतो. जनकादि राजे ज्ञानी असल्याने आसक्तिरहित कर्म करत त्यांनी परमसिद्धि प्राप्त केली. गीतेत असेही सांगितले आहे की - 'योगः कर्मसु कौशलम्' (योग म्हणजे कर्म-कुशलता आहे). जो योगबुद्धिने म्हणजे स्थितप्रज्ञ होऊन जो कार्यशील रहातो तो मुक्ति मिळविण्यास पात्र होतो. अध्यात्मात अशी अनेक उदाहरणे आहेत की ज्यावरून हे सिद्ध होते की कर्म स्वतः बंधन नाही तर कर्मामधे कर्म करणार्‍याची जी आसक्ति आहे ती बंधन आहे. जी फळाची आशा आहे ती बंधन आहे. बंधनाच्या भितीने कर्म-त्याग करणे सुद्धा पाप आहे आणि कर्माच्या आसक्तिचा त्याग करून कर्म करणे हे मुक्तिचे साधन आहे. म्हणून पापपुण्य कर्मात नसून आसक्तित आहे. निष्काम कर्म बंधन होत नाही. पण तरीही चुकीचे गैरसमजामुळे कर्म हे बंधन व कर्म-त्याग (संन्यास) हे पुण्य असल्याचे सर्रास मानले जाते. ज्या कर्मात कोणताही 'राग' म्हणजेच ईर्ष्या, बदला घेण्याची इच्छा, राग-द्वेष अशा भावना नाहीत ते कर्म बंधन होऊ शकत नाही. कर्माचे कारण शरीर नसून मन आहे. पहिल्यांदा मनात विचार येतो व नंतर कर्म घडते. मृत्यूनंतर शरीराची सोबत सुटून जाते पण मन बरोबर येते. मनाबरोबरच विचार, वासना, आकांक्षा, इच्छा, अपेक्षा याही जोडलेल्या आहेत. तीच मती होय. उपनिषदात म्हटले आहे की 'बंधन व मुक्तिचे कारण मन आहे'. मनात जशी भावना असते तशी गती मिळते. 'यादृशी भावना यस्य सिद्धिर्भवती तादृशी' (ज्याची जशी भावना असेल तशी त्याला सिद्धि मिळते.) पापपुण्याचे फळ कर्मातही नसते व त्या फळातही नसते. ते कर्म करणार्‍याच्या भावनेत असते.

याच तथ्याचा निर्देश अष्टवक्र करतात. ते म्हणतात, 'मी मुक्त आहे' असे जो मानतो तो मुक्त असतो. जो स्वतःला बद्ध मानतो तो बद्ध असतो. श्रद्धापूर्वक स्वतःला मुक्त मानणेच आवश्यक आहे. मुक्ति ही कर्मातून मिळत नाही. ते ज्ञानाचे फळ आहे. कर्माचे नाही. आत्मज्ञानीसुद्धा स्वतःला बद्ध मानेल तर तो मुक्त नाहीच, वासनाग्रस्त आहे. वासना त्याला पुन्हा बंधनात ओढून घेतील. आत्म-ज्ञान झाल्यानंतर सुद्धा मुक्तिची जाणीव जागृत व्हायला हवी. कर्म-बंधन अज्ञानी माणसांसाठी आहेत. अज्ञानी स्वतःला मुक्त समजेल तर त्यामुळे तो मुक्त होऊ शकत नाही. ज्ञान व्हावेच लागते. येथे हे समजणे महत्त्वाचे आहे की हे सूत्र आत्म-ज्ञानी माणसाकरिता सत्य आहे. हे अज्ञानी माणसांकरिता सांगितलेले सूत्र नाही.आत्मा साक्षी विभुः पूर्ण एको मुक्तश्चिदक्रियः ।
असंगो निस्पृहः शान्तो भ्रमात्संसारवानिव ॥ १२ ॥


अनुवाद - आत्मा साक्षी आहे, व्यापक आहे, पूर्ण आहे, एक आहे. मुक्त आहे, चैतन्यस्वरूप आहे, क्रियारहित आहे, असंग आहे, निस्पृह आहे, शान्त आहे. भ्रमामुळे तो बंधनग्रस्त असल्याप्रमाणे (संसारिक असल्याप्रमाणे) भासतो.


विवेचन - या सूत्रात अष्टवक्र जनकाला सांगतात की तूच आत्मा आहेस. आत्मा तुला मिळवावयचा नाहीये. तो तुला प्राप्त झाला असे सुद्धा नाही. कारण मग तू व आत्मा अशी भिन्नता निर्माण होते. अशी भिन्नता नाहीच. तू स्वतःच आत्मा आहे. केवळ अज्ञानाच्या कारणाने तू हे विसरून गेला आहेस. ज्ञान व बोध यांचे द्वारा जागरूक होऊन वास्तव पहायचे आहे, पुन्हा स्मृती जागृत करायची आहे. यापेक्षा निराळे काही करायचे नाहीये. आत्म्याचे स्वरूप सांगतांना अष्टवक्र म्हणतात की हा आत्मा साक्षी आहे, सर्वांचा द्रष्टा आहे. हा सर्वांना पाहतो पण याला पाहणारे कुणी नाही. हा व्यापक आहे. ह्याला मर्यादा घालता येत नाही, संकुचित करता येत नाही, कोणत्याही शास्त्रीय परिभाषेत कैद करता येत नाही. हा पूर्ण आहे. ब्रह्म पूर्ण आहे. 'पूर्णातून' पूर्णाचीच निष्पत्ति होते. म्हणून आत्मासुद्धा ब्रह्माप्रमाणे पूर्ण आहे. त्यात कोणतीही उणीव किंवा कमतरता नाही. आई मुलाला जन्म देते, तो मुलगा पूर्णच असतो व त्यामुळे मातेच्या पूर्णतेत कमीपणा येत नाही. अनेक मुलांना जन्म देऊनही आई पूर्णच रहाते. ब्रह्म व आत्मा ही असेच आहेत. ह्या प्रकारे ज्ञान, प्रेम, दया, करूणा दुसर्‍याला दिल्याने कधी कमी होत नाही. ब्रह्म व आत्म्याचे वर्णन करतांना उपनिषदे सांगतात की, "ते पूर्ण आहे व हे सुद्धा पूर्ण आहे. कारण पूर्णापासून पूर्णाचीच उत्पत्ति होते."

बीज पूर्ण असते म्हणून त्यातून पूर्ण वृक्ष प्रकट होतो. हे जग त्या पूर्णाचीच अभिव्यक्ति असल्याने पूर्ण आहे. म्हणून अष्टवक्र सांगतात की हा आत्मा पूर्ण आहे, एक आहे. जर ब्रह्म एक आहे तर आत्मा पण एक आहे. भिन्नता नाहीये. सर्व जीवांत भिन्न भिन्न आत्मा नाही. आत्मा सुद्धा अनेक नाही. ज्याप्रमाणे आत आणि बाहेर आकाश सर्वत्र व्याप्त आहे त्याप्रमाणे उघडे आकाश, रांजणाचे (घटाचे) आतले आकाश, शरीराच्या आतले आकाश एकच आहे; त्यात भिन्नता नाही. त्याप्रमाणे आत्म्यातही भिन्नता नाही. भिन्नता भासते ती भ्रमामुळे व अज्ञानामुळे. ज्यांना आत्म्याचे ज्ञान नाही, ब्रह्माचे ज्ञान नाही तेच भिन्न-भिन्न जीवांतील आत्मा भिन्न-भिन्न मानतात. पण तो भिन्न नाही. शिवाय हा आत्मा मुक्त आहे. आत्म्याला कोणतेही बंधन नाही. बंधन शरीरगत असते. बंधन मनोगत असते. जेव्हा त्यांच्याशी संबंध सुटतो तेंव्हा जाणीव होते की आत्मा मुक्त आहे. त्याआधी शरीर व मनामुळे आत्म्याला बंधन असल्याची भ्रांती होते. ही भ्रांती ज्ञान व बोध यामुळे नाहीशी होते. हा आत्मा चैतन्यस्वरूप आहे. ही सृष्टी याच चैतन्याची अभिव्यक्ति आहे, फैलाव आहे. हेच चैतन्य वेगवेगळ्या रूपात दिसते. हा आत्मा क्रिया-रहित आहे. हा स्वतः कर्ता नाही. क्रिया हा त्याचा स्वभाव नाही, हा अक्रिय आहे. ह्याच्या उपस्थितीत सर्व काही होत आहे. याला स्वतःला काही करावे लागत नाही. ज्याप्रमाणे सूर्याच्या केवळ उपस्थितीनेच सर्व काही होत असते त्याप्रमाणे आत्म्याच्या उपस्थितीने सर्व घडते. ही क्रिया हा त्याच्या शक्तिचा खेळ आहे. हा आत्मा असंग आहे, त्याचा कोणी साथी-सोबती, मुले, नातू कुटुंब, मित्र वगैरे कुणी नाही. तो एकटा आहे. हा कुणावर प्रेम करीत. नाही. कुणाचा द्वेष करीत नाही. हा स्वर्गात स्वतःचे राज्य स्थापन करीत नाही. ह्माचे कुणी राज दरबारी नाहीत, कुणी देवदूत नाहीत; याचे कोणतेही न्यायालय नाही. हा एकटा सर्वगुण संपन्न आहे. आत्मा निस्पृह आहे. इच्छाविरहित आहे. त्याच्या कोणत्याही आकांक्षा नाहीत. इच्छा नाही, अपेक्षा नाही. हा प्रसन्न होऊन पुरस्कार (बक्षिस) देत नाही, क्रोधायमान होऊन दंड देत नाही. हा शान्त आहे गंभीर आहे. ह्याच्यात कोणतीही हालचाल होत नाहीं, ह्याच्यात तरंग उठत नाही. हा उद्वेलित-आंदोलीत होत नाही. असा आहे आत्म्याचा स्वभाव व रूप. परंतु भ्रमामुळे तो संसारी (दुनिये सारखा) भासतो. हे जग त्याची अभिव्यक्ति आहे. सारी शक्ति त्याचाच खेळ आहे. या सांसारिक गोष्टी आत्म्याला चिकटत नाहीत. तो निर्लिप्त आहे. त्याच्या उपस्थितीत सर्व काही होत आहे. तो साक्षी आहे, द्रष्टा आहे. परंतु अज्ञानींना असा भ्रम होतो की आत्माच सर्व काही करतोय. परमात्मा सगळे काही करतो. सर्व काही परमात्माच्या मर्जीने घडते, त्याचा आदेश झाल्यावर काही घडते. अशा अनेक भ्रांतीपूर्ण समजूतीमुळे आत्मा संसारी भासतो. जसे जग बंधनात आहे, तसाच आत्मा बंधनात आहे, तो जन्म घेतो, त्याचा मृत्यू होतो, त्याला मुक्त करावे लागते वगैर अज्ञानातून तयार झालेले भ्रम आहेत.


कूटस्थं बोधमद्वैतमात्मानं परिभावयः ।
आभासोऽहं भ्रमं मुक्त्वा भावं बाह्यमथान्तरम् ॥ १३ ॥


अनुवाद - मी आभासात्मक (अहंकारी जीव) आहे असा भ्रम आणि आत-बाहेर असा भाव सोडून तू कूटस्थ (अचल), स्थीर बोधरूप आणि अद्वैत आत्म्याचा विचार कर.


विवेचन - अष्टवक्र पुढे राजाला सांगतात की हा अहंकार सत्य नाही. तो आभासरूप आहे. ह्या आभासरूपी अहंकारामुळेच स्वतःला वेगळा जीव समजतात आणि या भ्रमामुळे आत्मा भिन्न समजतात. म्हणून तू या भ्रमाचा त्याग कर आणि आत्म्याचे आंतले व बाहेरचे असे वेगवेगळे अस्तित्व नाही. हा आत-बाहेरचा भेद मनामुळे निर्माण झाला आहे. आत्मा सर्वत्र आहे. बाहेरसुद्धा आहे, आत सुद्धा आहे. तू केवळ स्थिर व अचल (कूटस्थ) व बोधस्वरूप अद्वैत आत्म्याचा विचार कर. जनक राजाचा भ्रम दूर करण्यासाठी अष्टवक्र सांगतात की तूला हे सर्व उधार मिळालेले विचार आहेत, हे तुझे विचार नाहीत. दुसर्‍यांच्या सांगण्यावरून तू हे मानतोस की तू जीव आहेस व आत्मा वेगळा आहेस. कुणी आत्मा आकाशात आहे समजतात, कुणी स्वर्गात तर कुणी स्वतःत, कुणी स्वतःबाहेर परमात्मा आहे असे मानतात. हे सर्व भ्रम आहेत. या खोट्या समजूतींमुळे सगळेच दुःखी आहेत. त्यांचे बरोबर तू सुद्धा दुःखी होत आहेस. या उधार घेतलेल्या समजूतींचा त्याग करून स्वतः जागृत होऊन पाहिलेस तर सारे भ्रम मीटून 'मी कोण आहे व आत्मा कुठे आहे ?' सारा उलगडा होईल. फक्त ज्ञान जागृत व्हायचे आहे. वेगळे काही करायचे नाहीये. अष्टवक्राने आत-बाहेर असा जो विचार सांगितला आहे तो समजवून घ्यायला हवा. मनुष्याचे बाहेर एक विश्व आहे. या बाह्य, संपूर्ण सृष्टीला कर्म जगत म्हणतात. मनुष्याच्या व्यक्तिमत्वाचा एक पैलू बहिर्मुखी आहे. तो सतत बाहेर पहातो सतत बाह्य जगाचे निरीक्षण करतो. हा पैलू किंवा हे मन आत पाहू शकत नाही. त्याला ध्यानस्थ होणे अवघड वाटते. अशी व्यक्ति कर्मयोगाद्वारे आत्म्यापर्यंत पोहचू शकते. त्याच्यासाठी अन्य पद्धती उपयोगाच्या नाहीत. कर्म योगाचा अर्थ आहे, निष्काम कर्मयोग. आसक्तिचा त्याग करून आपले कर्म हे ईश्वरी कार्य आहे असे समजून काम करणे म्हणजे कर्मयोग होय. हे आहे बाहेरच्या जगाबद्दलचे सांगणे. मनुष्याच्या आतसुद्धा तीन विश्वे आहेत. एक आहे विचारांचे विश्व, त्याच्या आत आहे भाव-जगत आणि त्याच्या आत आहे आत्म-जगत किंवा साक्षी जगत. बुद्धिवादी विचार विश्वात जगतो. बुद्धिवादी विचारांबरोबरच ध्यानाद्वारा चैतन्य आत्म्याला प्राप्त करू शकतो. त्याला कर्म मार्गात नेणे अवघड असते. बुद्धिवादी असल्याने, तो तर्कावर अवलंबून असल्याने चिन्तन आणि विचारांबरोबरच ध्यानाद्वारे त्यात आत्मज्ञान प्राप्त होऊ शकते. याला ज्ञानमार्ग म्हणतात, व अशा व्यक्तिला ज्ञानयोगी म्हणतात. दुसरे जगत भाव-जगत आहे. हे भक्ति व प्रेमाचे जग आहे. ज्या व्यक्तित भावुकता जास्त आहे त्याचे साठी भक्तिचा मार्ग आहे. अशा व्यक्तिला 'भक्त' म्हणतात. भावनाप्रधान व्यक्तिसाठी ज्ञान व कर्म मार्ग उपयुक्त नाहीत. हे ज्ञान कर्म व भक्ति असे तीन मार्ग आहेत, ते भिन्न-भिन्न व्यक्तित्वांच्यासाठी उपयोगी आहेत. चौथे जगत आहे 'आत्म-जगत' किंवा 'साक्षीजगत' याच्या आधारावर सृष्टीचा विकास झाला आहे. सार्‍या सृष्टीचक्राचा आधार आत्म-जगत आहे. हेच लक्ष्य आहे. ज्ञान, कर्म व भक्ति मार्ग या तीन मार्गांनी जे प्राप्त होते ते हेच आहे. कृष्णाचा कर्मयोग, कपिलमुनींचा सांख्ययोग व नारदाचा भक्तियोग हे तीन मार्ग आहेत. पण अष्टवक्राचा मार्ग अद्‌भूत आहे. सरळ साक्षी आत्म्याकडे जाणे हा तो मार्ग आहे. ते कोणची पद्धत सांगत नाहीत. कोणतेही तंत्र सांगत नाही. कर्मयोग नाही ज्ञानयोग नाही व भक्तियोग नाही. सरळ 'साक्षी' तत्त्वाची गोष्ट सांगतात. अत्तिमतः हेच ध्येय आहे. या साक्षीतत्वाची जागृती झाल्याने सर्व भ्रम नष्ट होतात. हा देह, मन, बुद्धि, अहंकार, जग सर्व काही भ्रामक वाटू लागते. त्यांच्यामधे जे मन गुरफटले असते ते मोकळे होते. सर्व समजूती नाहीशा होतात. ज्याप्रमाणे दिवा पेटवल्यावर खोलीतले भूत नाहीसे होते त्याप्रमाणे अन्य समजूती नष्ट होतात. कारण खोलीत जसे भूत नसतेच फक्त भ्रम असतो तसेच या जगाबद्दलचे आपले विचारसुद्धा भ्रम असतात व आत्म्याचे ज्ञान झाल्यावर ते नाहीसे होतात. हे भ्रम नाहीसे करण्याचे अनेक रस्ते, पद्धती आहेत. भक्ति आहे, ईश्वराला शरण जाणे आहे, आपल्याला अकर्ता मानणे आहे. भिक्षान्न खाणे आहे, नम्रता धारण करणे, चरणांवर झुकणे (साष्टांग नमस्कार करणे) यासारख्या अनेक पद्धतींनी अहंकार नष्ट करता येतो. परंतु अष्टवक्रमुनी या कोणत्याही पद्धतीचा उपयोग करत नाहीत. ते सरळ त्या परम शक्तिचा बोध घडवून अहंकार आपोआप गळून पडण्यावर भर देतात. आत्म्याचे ज्ञान झाल्यावर सर्व भ्रम आपोआप नाहीसे होतात. धर्म शाश्वत, सनातन आहे. माणसाने धर्म बनविलेला नाही तर सृष्टीतल्या चैतन्याच्या धर्मातून माणून बनला आहे. माणसाच्या आधी सृष्टी होती म्हणजेच माणसाच्या आधीसुद्धा धर्म होता. धर्म जुना होत नाही, तसा तो नवाही होत नाही. अस्तित्व हाच एक धर्म आहे. धर्म म्हणजे मनुष्याची पूर्ण क्रांती आहे. यामुळे मनुष्यात अंतर्बाह्य बदल होतो. मनुष्य सत्य प्राप्त करतो असे नसून धर्मशीलतेमुळे मनुष्य स्वतःच सत्य होतो. स्वतःच ज्ञान होतो. धार्मिक व्यक्ति समाजातल्या केवळ निष्प्राण झालेल्या रूढी परंपरा पाळत नसतो. ते स्वतः नवीन परंपरा-पद्धती निर्माण करतो. म्हणून अनेकदा रूढीग्रस्त समाजात धर्मप्रवण व्यक्ति अप्रिय होतात. समाज त्यांचा विरोध करतो. म्हणून संत ज्ञानेश्वर, संत रामदास, यांचे समाजाने छळ केले, निंदा केली. संत मीरेला विष दिले, सॉक्रेटिसला विष दिले, कोपर्निकस सारख्या शास्त्रज्ञाला तुरूंगात टाकून मारहाण करून राजसत्तेने पृथ्वी नसून सूर्य फिरतो असे लिहून घेतले. या जड सृष्टीत चेतन्याचा काय उपयोग होणार ? अज्ञानी समाजामुळे एका ज्ञानी पुरुषाचे काय चालणार ? जिथे अज्ञानता एखाद्या वरदानासारखी सर्वांनी स्वीकारली आहे तिथे बुद्धिमान होणे हा मूर्खपणा ठरतो. यामुळेच धर्मसंस्थापक, शास्त्रज्ञ, विचारवंत यांचा दुनियेने छळ केला व अनेकदा हत्या केली.

या सूत्रात अष्टवक्र आत्म्याला कूटस्थ (स्थिर व अचल) म्हणतात. हा आत्मा अचल आहे. संसार गतीमान आहे व त्यात बदल होतात. आत्मा स्थिर आहे व त्यात बदल होत नाही. बैलगाडीच्या चक्राची धांव (परिघ-रेषा) चालते. मधला आस (धुरी) चालत नसते. पण मधला आस (धुरा) स्थिर असल्यानेच चाक चालू शकते. शेवटच्या लोखंडी धांवेजवळ गती तीव्र असते व जसे जसे केन्द्रबिंदूकडे, मध्यभागाकडे जावे तशी गती कमी होत जाते. अधार्मिक माणसांची गती जास्त असते व जसा जसा माणूस धार्मिक होत जातो तशी तशी त्यांची संसारिक-प्रापंचिक गती कमी होत जाते. जेवढा राग, द्वेष, लोभ, अहंकार, मोह जास्त तेवढी गती जास्त. ज्ञानाच्या दिशेने प्रवासाला निघालेला सर्वांना सोडून जातो. तेव्हा त्याची प्रापंचिक गती कमी होत जाते. गति, प्रगति हे भौतिक विकासाचे सूत्र आहे. क्रिया शिलता हे भौतिक विकासाचे सूत्र आहे. अध्यात्माचे सूत्र विश्रांती, शान्ति आहे. अमेरिका, रशिया हे भौतिकवादी देश असल्याने त्यांची गती सर्वांत जास्त आहे. भारत आध्यात्मवादी असल्याने त्याची गती कमी झाली व भौतिक समृद्धी भारत मिळवू शकला नाही. केंद्र आणि परिघ ह्या दोन स्थिती, दोन भिन्न दिशा आहेत. परिघ विज्ञान आहे व केन्द्र ज्ञान आहे. ज्ञानाच्या अभावात विज्ञानाचे सुद्धा लाभ समाजाच्या पचनी पडत नाहीत. विज्ञान शक्ति देते पण त्याचा उपयोग कसा करावा याचे ज्ञान देत नाही. त्यामुळे विज्ञानाचे अनेक विनाशकारी परिणाम होतात व विज्ञान हे भस्मासूराचा अवतार बनते. येथे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की आत्मा स्थिर, अचल असला तरी तो मध्यभागातला आस (धूरा) असल्याने त्याच्यामुळेच विश्वचक्र गतीमान होते. जर धूरा नसेल तर चाकाचा परिघ कशाच्या आधारावर चालू शकेल ? प्रत्येक गतिमान पदार्थाचे एक स्थिर मध्य केन्द्र असते, ज्यामुळे चक्राला गती मिळते. वार्‍याच्या भोवरीला (चक्रावर वात) सुद्धा केन्द्र असते. याचप्रमाणे सूर्यमंडलाच्या सूर्य हे मध्यबिंदुत स्थित असलेले केन्द्र आहे. सूर्याचे केन्द्र निहार आहे व निहाराचे केन्द्र आकाशगंगा आहे. सृष्टीमध्ये केन्द्राशिवाय कोणतीही गोष्ट चालू शकत नाही. जे म्हणतात की कोणतेही केन्द्र नाही, आधार नाही सर्व काही आपोआप होत आहे, ते लोक मूर्ख आहेत. कबीराने चालत्या परिघाची गोष्ट सांगितली तर त्याचा मुलगा 'कमाल' याने केन्द्राची गोष्ट सांगितली. परिघाला शक्ति केन्द्रातून मिळते. केन्द्र स्वतः चालत नाही, केवळ शक्ति देते, ज्यामुळे संपूर्ण सृष्टीतल्या सर्व क्रिया संचलित होतात. ह्या जड शरीरात जी गती आहे ती चैतन्याचीच गती आहे. हे केन्द्र शक्ति बरोबर ज्ञानसुद्धा देते. ज्ञानविरहित शक्ति ही पाशवी तर ज्ञानयुक्त शक्ति ही दैवी शक्ति आहे. शक्ति दोन्ही ठिकाणी आहे पण ज्ञानामुळे फरक पडतो. अष्टवक्र हेच सांगतात की हा आत्मा स्थिर आहे पण त्याच्या शक्तिमुळे ही समस्त सृष्टी संचलित होते. तेथेच बोधरूप सुद्धा असते. शिवाय ज्ञान-शक्ति व बोध भिन्न नाहीत. सर्व त्या आत्मांची रूपे आहेत. दोघांना भिन्न मानणे अज्ञान आहे. ह्या सूत्रात मुनीश्रेष्ठ अष्टवक्रांनी 'कूटस्थ', 'बोधस्वरूप' आणि 'अद्वैत' या तीन शब्दांनी संपूर्ण सृष्टीचे परिवर्णन केले आहे. हेच गुरूचे अलौकिकत्व आहे.देहाभिभानपाशेन चिरं बद्धोऽसि पुत्रक ।
बोधोऽहं ज्ञानखड्गेन तन्निकृष्य सुखी भव ॥ १४ ॥


अनुवाद - "हे पुत्रा, तू दीर्घकाळापासून देहाभिमानाच्या बंधनात अडकलेला आहेस. 'मी बोध आहे' या ज्ञानाच्या तलवारीने हे बंधन कापून तू सुखी हो !"


विवेचन - अष्टावक्र सांगतात की ते एकच चैतन्य अनेक रूपात अभिव्यक्त झाले आहे. शरीरस्थ आत्मा सुद्धा तेच चैतन्य आहे. हे शरीर त्याचाच विस्तार आहे. पण ते भौतिक तत्त्वांनी, पंचतत्त्वांनी बनले आहे असा भ्रम होतो. पण पंचतत्त्व सुद्धा त्याच चैतन्यातून निर्माण झाले आहेत. भौतिक पदार्थसुद्धा त्याच आत्म्याच्या विकास आहे. शरीर म्हणजे दृश्य आत्मा आहे आणि आत्मा हे अदृश्य शरीर आहे. त्यात भिन्नता नाही. परंतु तुझा भ्रम हाच आहे की तू स्वतःला आत्मा न मानता केवळ शरीर मानतो. ह्या एकत्वाच्या भावनेचा विसर पडल्यानेच तू देहाभिमानाच्या बंधनात अडकला आहेस. तुला कुणी बांधलेले नाही, स्वतःच्या भ्रमात तू बद्ध आहेस. शरीर व आत्मा भिन्न असल्याची ही भ्रांति तुला अनेक जन्मापासून आहे. ह्या बंधनातून मुक्त होण्याचा एकच उपाय आहे तो म्हणजे बोध होय. अनेक जन्मापासून तू या देहाभिमामुळे बंधनात आहेस. हे बंधन बोध झाल्याने तुटू शकते कारण हे बंधन वास्तव नाही. जर ही बंधने वास्तव असती तर ती तोडण्यासाठी काही क्रिया किंवा कर्म करण्याची, साधनाची गरज भासली असती. परंतु 'हा देह माझा आहे' हा देह आत्मा नाही. असे भ्रम केवळ कल्पनामात्र आहेत. म्हणून हा भ्रम 'मी देह नसून आत्मा आहे' या ज्ञानरूपी तलवारीने कापून सुखी हो, मुक्त हो, भ्रमाचा उपचार विश्वासाने, श्रद्धेने होतो. अशावेळी ऍलोपॅथीच्या गोळ्या-इंजेक्शन निरूपयोगी आहेत. भूताचा इलाज, बाबाजीच्या, साधुसंतांच्या अग्नीकुंडातील राखच करू शकते. तेथे डॉक्टर निरूपयोगी आहे. घरातभूत असल्याचा भ्रम दिवा प्रज्वलित केल्यानेच दूर होतो. रामकृष्णर्जीना साकार कालीमातेच्या स्वरूपातून मुक्त करून निराकारात प्रवेश करण्याची प्रेरणा देण्यासाठी त्यांचे गुरू तोतापुरी यांनी समाधीच्या स्थितीत खोट्या तलवारीचा प्रयोग केला होता कारण "साकार" हाही एक भ्रमच होता; याचप्रमाणे अष्टवक्र ज्ञानरूपी तलवारीने हा अज्ञानरूपी देहाभिमानाचा भ्रम नष्ट करण्यास सांगतात. कारण अज्ञानाचा विनाश साधनेमुळे नव्हे ज्ञानामुळे होतो.निःसंगो निष्क्रियोऽसि त्वं स्वप्रकाशो निरंजनः ।
अयमेव ही ते बन्धः समाधिमनुतिष्ठिसि ॥ १५ ॥


अनुवाद - तू असंग आहेस. क्रिया-रहित आहेस, स्वयंप्रकाशी आहेस आणि दोषविरहित आहेस. तू या ईश्वराच्या प्राप्तीसाठी समाधीचे अनुष्टान करतोस हेच तुझे बंधन आहे.


विवेचन - या सूत्रात अष्टावक्र आत्म-ज्ञानासाठी समाधीच्या अनुष्टानाचे वर्णन 'बंधन' असे करून पुन्हा सांगतात की तू आत्माच आहेस. शरीर मन वगैर नाहीस. आत्मा प्राप्त करायचा नसून तो प्राप्त आहेच, त्याला कुठे शोधायचे नसून तो तुझ्यात विद्यमान आहे. मग हे समाधिचे अनुष्टान समाधीचे प्रयत्न कशासाठी करतोस ? प्रयत्न केल्याने सांसारिक, प्रापंचिक सुखाच्या भौतिक गोष्टींची प्राप्ती करून घेता येते. श्रुति म्हणतात "अ-कृत रूपातील मोक्ष काही कृती केल्याने प्राप्त होऊ शकत नाही, कारण कर्माचे क्ल अनित्य असते." मोक्ष कर्माने मिळत नाही, ज्ञानाने सुद्धा मिळत नाही. ज्ञानाने भ्रांती नाहीशी होते. अविद्येनंतर जे शिल्लक रहाते, ते तूच आहेस. त्यामुळे तू जेथे आहेस तेथे मुक्त आहेस. अज्ञान नष्ट करण्यासाठी फक्त तत्त्वबोधाचाच उपयोग होतो. अष्टवक्र म्हणतात कोणतीही भावना किंवा कृती मुक्त करू शकत नाही कारण तू तीच्यानेच बांधला जाशील. हा आत्मा सर्वत्र विद्यमान आहे. तो प्राप्त नसल्याचा केवळ भ्रम निर्माण झाला आहे. ब्रह्माची प्राप्ती अप्राप्य वस्तूची प्राप्ती नाही. नित्य प्राप्त असलेल्या वस्तूच्या अप्राप्तीच्या भ्रमाची निवृत्ती म्हणजे ब्रह्म. त्यासाठी उपासना, योग, धारणा, ध्यान, समाधि या कशाचीही आवश्यकता नाही. रोगनिवृत्ती झाल्यावर कोणत्याही साधनाची सुद्धा आवश्यकता नसते. स्वास्थ्य उपलब्ध असेल, शरीर आरोग्यपूर्ण असेल तर औषध काय करायचे ? औषध रोग असेल तर उपयोगाचे असते. तुमच्याजवळ जो अनमोल हिरा आहे तो ओळखा. क्रिया शरीर करते व उपासना मन करते. चित्ताची चंचलता योगामुळे दूर होते. यामुळे अनुकूल स्थिती निर्माण होते. प्रत्यक्ष प्राप्ती होत नाही. यामुळे तू समाधी अनुष्ठान करून जो प्रयत्न करतोस तेच तुझे बंधून आहे. याचा त्याग कर कारण या प्रयत्नांचे मागे तुझी मोक्ष प्रातीची वासना आहे. जोपर्यंत वासना आहे तोपर्यंत मोक्ष मिळणार नाही. वासनाच तर मुख्य बंधन आहे मग ती वासना या जगातल्या भौतिक सुखाची असो किंवा मोक्षाची असो. वासने-वासनेत काही फरक नसतो. आत्मरूप तर असंग, क्रियारहित, स्वयंप्रकाशी आणि निर्दोष आहे. हे तू फक्त जाणून घे, तेवढे पुरेसे आहे. तू निर्दोष आहेस, पापी नाहीस तर काही दोष असेल तर तो दोष शरीराने किंवा मनामुळे झालेला असेल. पण तू 'शरीर व मन' यापेक्षा निराळा आहेस. मग तुला दोष कसा लागू शकेल ? आत्मरूप असलेला तू स्वभावानेच निर्दोष आहेस. आत्मा कर्म करतच नाही. आत्मा पापी नाही किंवा पुण्यवान नाही, आत्मा साधू वृत्तीचा नाही व गैरसाधू पण नाही. ज्या शरीराने व मनाने ही कर्मे केलीत ते तर निघून गेलेत. तू फक्त द्रष्टा आहेस. द्रष्ट्याला पाप लागत नाही. या प्रमाणे अष्टवक्रमुनींचा उपदेश 'बोध' प्राप्तीचा आहे. सिद्धिची उच्चतम स्थिती म्हणजे काय हेच अष्टवक्राच्या बोधातून स्पष्ट होते.त्वया व्याप्तमिदं विश्वं त्वयि प्रोतं यथार्थतः ।
शुद्धबुद्धस्वरूपस्त्वं मा गमः क्षुद्रचित्तताम् ॥ १६ ॥


अनुवाद - हे जग तुझ्यात व्याप्त आहे. तुझ्यामध्येच गुंफलेले आहे. वास्तवतः तू चैतन्यस्वरूप आहेस. म्हणून तू स्वतःला हीन मानून क्षुद्रचित्त होऊ नकोस.


विवेचन - आत्म्याचे स्वरूप स्पष्ट करून या सूत्रात अष्टवक्र जगाशी त्याचा संबंध कसा आहे ते राजा जनकाला स्पष्ट करतात. अष्टवक्र म्हणतात की तू स्वतः आत्मा आहेस. स्वतः ब्रह्म आहेस व हे जग तुझी अभिव्यक्ति आहे. हे जग तुझ्या शक्तीने व्याप्त आहे. ह्याचा प्रत्येक कण तुझे स्वरूप आहे. ह्याचे स्पंदन तुझे स्पंदन आहे. ह्याचा विस्तार तुझा विस्तार आहे. ह्याची चेतना तुझी चेतना आहे. ह्याचे सौंदर्य तुझे सौंदर्य आहे. ह्याची शक्ति तुझी शक्ति आहे. सृष्टीचे नियम वास्तविक तुझेच नियम आहेत. ह्यात जे वैविध्य दिसते त्यात एक अंतर्गत एकता आहे. वैविध्य याचा अर्थ भिन्नता असा नाही. कारण ही सृष्टी त्या ब्रह्मापेक्षा वेगळी नाही, त्या परमात्म्यापेक्षा वेगळी नाही. ह्या जगाच्या वेगवेगळ्या अवयवापासून माळेप्रमाणे हे ब्रह्म गुंफलेले आहे. ह्या दृष्टीत वैविध्य असूनही एक सामंजस्य आहे व तो एकरूप असा या सृष्टीचा नियम आहे. त्यामुळे याच्यात एक तादात्म्य दिसून येते व ते तुझ्याच चैतन्यामुळे आहे. ज्याच्यामुळे ही सारी सृष्टी आहे त्याच्यामुळे तू सुद्धा आहेस. जशी ही सृष्टी त्यापासून वेगळी नाही तसाच तू सुद्धा भिन्न नाहीस. तू सुद्धा तेच शुद्ध चैतन्य आहेस म्हणून स्वतःला शरीर मानून क्षुद्रचित्त होऊ नकोस. सर्व पदार्थांचे केन्द्रिय तत्त्व आत्माच आहे व आत्मा वेगवेगळा नाही परंतु तो एकच आहे तो सर्वात व्याप्त आहे. यामुळे सर्वात एकसूत्रता आहे आत्म्याला भिन्न मानणे मूर्खता आहे. स्वतःला केवळ शरीर मानणे महा अज्ञान आहे.मूढ लोकच स्वतःला हीन समजतात. आत्म-ज्ञानी स्वतःला हीन समजत नाही. रामतीर्थ स्वामी ह्यामुळे स्वतःला 'बादशाह' म्हणत असत.


निरपेक्षो निर्विकारो निर्भरः शीतलाशयः ।
अगाधयुद्धिरक्षुब्धो भव चिन्मात्रवासनः ॥ १७ ॥


अनुवाद - तू अपेक्षारहित आहेस, निर्विकार आहेस, आत्म-निर्भर आहेस शान्ति व मुक्तिचे स्थान आहेस, अगाध बुद्धिरूप आहेस, क्षोभ-शून्य आहेस. म्हणून फक्त चैतन्यावरच निष्ठा असू दे.


विवेचन - राजा जनकाचा आत्मस्वरूपाचा बोध दृढ करण्यासाठी मुनीश्रेष्ठ अष्टवक्र सांगतात -तू आत्मा असल्यास निरपेक्ष आहेस. आत्म्याची काहीच अपेक्षा नसते. अपेक्षा तर शरीर व मनाची असते. तू विकारशून्य आहेस, भूक व तहान हे प्राणाचे स्वभाव आहेत, शोक व मोह हे मनाचे स्वभाव आहे, आणि जन्म व मरण हे शरीराचे स्वभाव आहे. आत्मा या सर्वांच्या पलीकडे आहे. कारण हे स्वभाव काही आत्म्याचे नाहीत. आत्मा केवळ द्रष्टा म्हणून निर्विकार आहे. देहाभिमानामुळे तू स्वतःला विकारी समजतोस. याच कारणाने तू स्वतःला परमुख अपेक्षा समजतोस अन्यथा तू स्वतःवरच अवलंबून आहेस. आत्मा कुणावर अवलंबून नाही. तू आत्मस्वरूप असल्याने शान्ति व मुक्तिचे स्थान आहेस. अशांती हा तुझा स्वभावच नाही. ही हिंसा, ओढाताण, संघर्ष, अस्वस्थता, महत्त्वाकांक्षा ईर्ष्या, आक्रमण सर्व राजनीती आहे जे मनुष्याचे क्षुद्र स्वरूप आहे. मनुष्याच्या दैवी प्रतिभेचा हा दुरूपयोग आहे. याच्यात कुठेच शान्ति व स्वस्थता नाही. राजकारणात संघर्षच संघर्ष आहे. मग तो संघर्ष पदाचा असो किंवा पैशाचा. त्यातून काहीच फलनिष्पत्ति होत नाही. शान्ति व मुक्ति त्यात असू शकत नाही. हे तर आत्म्याचे गुण आहेत. तू अगाध बुद्धिस्वरूप आहेस. तुझ्यात अगाध ज्ञानाचा समुद्र भरलेला आहे. असे असूनही तू बुद्धिहीन असल्याप्रमाणे वागतोस. हे तुझे वागणेच तुला क्षुब्ध बनविते अन्यथा तू क्षोभशून्य आहेस. तू स्वतःला नव्हेस तर प्रकृतिला जास्त महत्त्व देतोस, त्यामुळे तुला क्षोभाचा अनुभव येतो. अन्यथा आत्म्याला क्षोभ कुठला ? यामुळे अन्य बाबींचा भ्रम सोडून तू केवळ चैतन्य स्वरूपात निष्ठावान व एकरूप हो. आत्म्याशी एकनिष्ठता असल्यास त्याचे पूर्ण ज्ञान प्राप्त होते. दुसरी उपाय योजना कामाची नाही. जे सदैव तुझ्याजवळ आहे, त्याच्याशी निष्ठा असणे पुरेसे आहे. राजसत्ता व साक्षीभाव यामुळेच आत्मस्वरूपाचा बोध होईल.
साकारमनृतं विद्धि निराकारं तु निश्चलम् ।
एतत्तत्वोपदेशेन न पुनर्भवसम्भवः ॥ १८ ॥


अनुवाद - साकार दिसते ते निराकार आहे हे ओळख, जे निराकार आहे ते स्थिर आहे हे जाणून घे. ह्या तत्त्व-उपदेशाचा स्वीकार केल्याने पुनःनिर्मिती वा उत्पत्ती होत नाही.


विवेचन - या सूत्रात पुनर्जन्माचे कारण स्पष्ट करत अष्टवक्र सांगतात की साकार व निराकार, जड व चैतन्यशील, स्थूल व सूक्ष्म, सृष्टी आणि परमात्मा ही सर्व चैतन्यतत्वाचीच रूपे आहेत. साकार, स्थूल, जड, दृष्टी वगैरे सर्व त्या निराकार सूक्ष्मतत्त्वाची अभिव्यक्ति आहे. ही साकार सृष्टी जशी दिसते तशी ती नाही. हे त्या सूक्ष्माचे प्रकट व परिवर्तीत रूप आहे. त्यामुळे या रूपात एकाअर्था सत्यता नाही. आहे ते वेगळे व दिसते ते वेगळे. आज एक रूप आहे, उद्या दुसरे रूप असेल, त्यामुळे त्यावर विश्वास ठेवता येत नाही. हा सर्व भ्रम आहे म्हणून खोटे आहे कारण याचे रूप सतत बदलत रहाते. ह्यामधे सुख-दुःख यांचा जो भास होतो तो सुद्धा नित्य नाही शाश्वत नाही कारण वेगवेगळ्या प्राण्यांना वेगवेगळी अनुभूती होते. हे सर्व त्याच्या मानसिक स्थितीमुळे घडते. मन सतत बदलत रहाते म्हणून ते सुद्धा विश्वासयोश्व नाही. हे शरीर सुद्धा विश्वासयोग्य नाही. या साकार जगताशी निगडीत अनेक प्रश्न आहेत. उदाहरणार्थ, केव्हा जन्म होईल, केंव्हा मृत्यू होईल, केंव्हा तारूण्य येईल, केव्हां सुख व केंव्हा दुःख येईल ? केव्हां कुणाशी प्रेम किंवा शत्रुत्व निर्माण होईल, केव्हां आपली माणसे परकी होतील व केव्हा परकी माणसे आपली होतील ? वगैर वगैर. हे असे प्रश्न आहेत की ज्यांची खात्रीची उत्तरे कुणी शोधू शकलेला नाही. ज्या सृष्टीत काहीच निश्चित नाही, ती खोटी व भासमान म्हटली तर त्यात काय चूक आहे ? ह्या साकार जगाची कोणतीही स्वतःची सत्ता व अस्तित्व नाही. हे सर्व त्या सूक्ष्म निराकार चैतन्याचेच परिवर्तित रूप आहे. परिवर्तन हाच ह्या साकार जगाचा स्वभाव आहे म्हणून ते विश्वसनीय असू शकत नाही. विश्वसनीय फक्त तो परमात्मा आहे जो चैतन्यरूप, निराकार व सूक्ष्म आहे. तसेच प्रत्येक पदार्थात विद्यमान आहे. तोच स्थिर आहे, नित्य आहे. केवळ त्याच्यावरच विश्वास ठेवता येईल कारण तो आज सुद्धा आहे व उद्या सुद्धा आहे व नंतरही राहणार आहे. सृष्टीच्या उत्पत्तिचे कारण कधी नष्ट होत नाही. दृष्टी नष्ट झाली तरीसुद्धा मूलतत्वाचे अस्तित्व कायम राहिल्याने तिची पुनः निर्मिती होईल. मूलतत्त्व कधी नष्ट होत नाही. सोने कायम असल्यावर दागीने नवे नवे होत राहतात. म्हणून जे दागिने किंवा अलंकार किंवा रूपाचे आकार नंतर होणार आहेत त्यांचेवर विश्वास ठेऊ नकोस. त्या शाश्वत नित्य ब्रह्मावर विश्वास ठेवणार्‍याची पुनः उत्पत्ति होत नाही कारण साकार जगाविषयीची आसक्ति हे उत्पतिचे कारणच नष्ट होते. निराकार आत्म्याचे महत्त्व जाणून घेतले मग उत्पत्ति कशा करता ? जर राजमहाल प्राप्त झाला तर झोपडीत कोण परत येणार ? अष्टवक्र सांगतात. 'या साकार जगातून मुक्ति मिळविण्यासाठी हाच सारभूत उपदेश आहे, हेच तत्वोपदेश आहे.'यथैवादर्शमध्यस्थे रूपेऽन्तः परितस्तु सः ।
तथैवास्मिञ्छरीरेऽन्त परितः परमेश्वरः ॥ १९ ॥


अनुवाद - ज्याप्रमाणे आरसा त्याच्यातील प्रतिबिंबाचे रूपात आहे व त्या रूपाच्या बाहेरसुद्धा आहे, त्याचप्रमाणे तो परमात्मा या शरीराच्या आत व बाहेरसुद्धा अस्तित्वात आहे.


विवेचन - या सूत्रात अष्टवक्र आत्म्याचे स्वरूप अजून जास्त स्पष्ट करून सांगतात. परमात्मा म्हणजे काही एक व्यक्ति नाही की सम्राटाप्रमाणे एका जागी बसून सार्‍या सृष्टीचे संचलन करेल. तो सर्व व्याप्त आहे. सृष्टीचा असा एकही कण नाही की ज्यात तो नाही. मनुष्याच्या शरीरात सुद्धा तो आत व बाहेर व्याप्त आहे. शरीरात आत्म्याच्या रूपाने व सृष्टीत परमात्म्याचे रूपाने तोच चैतन्यरूप परमात्मा व्याप्त आहे. आरशात दिसणारे प्रतिबिंब आपलेच असते त्याप्रमाणे आत्म्यातही आपले प्रतिबिंब दिसते.


एकं सर्वगतं व्योम बहिरन्तर्यथा घटे ।
नित्यं निरंतरं ब्रह्म सर्वभूतगणो तथा ॥ २० ॥


अनुवाद - ज्याप्रमाणे सर्वव्यापी एकच आकाश घड्याचे आत व बाहेर व्याप्त आहे, त्याचप्रमाणे नित्य व निरंतर असणारे ब्रह्म सर्व भूतांत व्याप्त आहे.


विवेचन - घट व आकाशाचे उदाहरण देऊन अष्टवक्र सांगतात की ज्याप्रमाणे घटाचे आंत व बाहेर एकच सर्वव्यापी आकाश व्याप्त आहे त्याचप्रमाणे सर्व भूतांत म्हणजे सृष्टीच्या सर्व पदार्थांत व्याप्त आहे. ज्याप्रमाणे शरीराच्या आत व बाहेर एकच आकाश आहे, दोन्ही आकाशांत काहीही भेद नाही त्याचप्रमाणे ब्रह्मसुद्धा आत व बाहेर एकच आहे. शरीरांत जे जीवंतपण आहे, चेतना आहे, हालचाल आहे ही सर्व त्या आत्मतत्त्वाची आहे. ते निघून गेल्यावर शरीर निर्जिव होते. ज्याप्रकारे यंत्राचे काही भाग बदलून त्यास जास्त वर्ष कार्यरत ठेवता येते त्याप्रमाणे काही चर्षें हे शरीर काही काळ जास्त जीवंत ठेवणे शक्य असते. पण आत्मा निघून गेल्यानंतर असे काही बदल करणेही व्यर्थ आहे. आत्मा आहे तोपर्यंतच शरीरात काही बदल करता येतो. म्हणून हे आत्मतत्त्वच प्रमुख आहे, इतर गोष्टी किंवा शरीर मुख्य नाही.

राजा जनकाला अष्टवक्र मुनींद्वारा सांगितला गेलेला मुख्य उपदेश एवढाच आहे की आत्मा व परमात्मा एकच आहे व त्याला प्राप्त करायचे नसून तो प्राप्त आहे. केवळ अज्ञानामुळे त्याचे विस्मरण झाले आहे. त्याची पुन्हा आठवण करावयाची आहे. ध्यान, योग, उपासना हे आन्तरिक स्वच्छतेसाठी आहेत. शरीरातील त्या परमशक्तिच्या जागृतीची पूर्व तयारी आहे. त्यामुळे पात्रता निर्माण होते की तुम्ही शक्तिचे संवाहन करू शकाल. अचानक एखादी घटना घडली तर मनुष्य गोंधळून जातो व त्याला त्या शक्तिचा व ज्ञानाचा स्वीकार करता येत नाही. ध्यान, योग उपासना यांचे महत्त्व एवढेच आहे की बोध झाल्यानंतरच्या स्थितीचा तुम्हाला अभ्यास व्हावा. ज्ञानबोध होतांना गोंधळ उडू नये. हे तत्त्वज्ञान बुद्धिचा विषय नाही. बुद्धि फार मर्यादित आहे. तिच्यामधे तो अमर्यादित आत्मा सामावू शकत नाही. या तत्त्वज्ञानाविषयीची माहिती वाचून किंवा ऐकून कुणाला वाटेल की 'मी परमात्मा झालो आहे' तर ते ढोंग ठरेल. जेव्हा आतून सर्व आसक्ति नष्ट होते तेंव्हाच ज्ञान मिळते. केवळ बाह्य आचरणाने काही मिळत नाही. स्वप्न खंडित झाल्यावरच समजते की ते असत्य होते, भास होता, तसेच हे ज्ञान आहे. आत्मज्ञान झाल्यानंतरच जगासंबंधीच्या सार्‍या धारणा, मान्यता खोट्या असल्याचे समजते. त्याच्या आधी ते घडत नाही. त्याच्याआधी जग सत्य व शाश्वत असल्याचेच वाटत राहते. त्यावेळी आत्मा असत्यच वाटतो पण जीवनात साक्षीभाव आला की असे भ्रम नष्ट होतात. म्हणून अष्टवक्र निष्ठेचे, श्रद्धेचे महत्त्व सांगतात व समाधीला सुद्धा बंधन मानतात.

हा उपदेश एवढा साररूप आहे की तो ऐकता ऐकता राजा जनकाला आत्मबोध झाला. स्व-रूपाचे सत्य ज्ञान झाले. कारण त्याने पात्रता आधीच प्राप्त केली होती. पात्रता नसेल तर केवळ या माहितीमुळे ज्ञान प्राप्त होत नाही. पात्रता प्राप्त होण्यासाठीच उशिर लागतो. एकदा पात्रता संपादित केली की मग उशिर लागत नाही. एका क्षणात घटना घडते व बोध होऊन मनुष्य मुक्त होतो.GO TOP