॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥

॥ अवधूतगीता ॥

॥ अथ षष्ठोऽध्यायः - अध्याय सहावा ॥


॥ मोक्षनिर्णयः ॥


श्रीदत्त उवाच -
बहुधा श्रुतयः प्रवदन्ति वयं
     वियदादिरिदं मृगतोयसमम् ।
यदि चैकनिरन्तरसर्वशिव-
     मुपमेयमथो ह्युपमा च कथम् ॥ १ ॥

श्रीदत्त म्हणाले, श्रुती अनेक प्रकारांनी , आम्ही स्वतः आकाशादिक हे सर्व जगत् हे मृगजलाप्रमाणे आहे असे सांगत आहेत आणि जर ते तत्त्व एक निरंतर सर्वत्र शिवव्यापक असे आहे तर ते कोणत्या उपमेचे उपमेय होणार ? (१)

अविभक्तिविभक्तिविहीनपरं
     ननु कार्यविकार्यविहीनपरम् ।
यदि चैकनिरन्तरसर्वशिवं
     यजनं च कथं तपनं च कथम् ॥ २ ॥

भेद व अभेद यांनी रहित असून श्रेष्ठ, तसेच कार्य व अकार्य यांनी असून जर ते श्रेष्ठ आहे; आणि जर ते एक निरंतर व सर्व व्यापी असे आहे, तर यजन किंवा तपन कसे होणार ? (२)

मन एव निरन्तरसर्वगतं
     ह्यविशालविशालविहीनपरम् ।
मन एव निरन्तरसर्वशिवं
     मनसापि कथं वचसा च कथम् ॥ ३ ॥

मन हेच निरंतर व सर्वगत आहे. तसेच ते विस्ताररहित (विस्तृतता यांनी रहित) असून श्रेष्ठ आहे. मन हेच निरंतर व सर्वदा कल्याणकारक आहे, तर मनाने किंवा वाचेने तरी ज्ञान कसे होणार ? (३)

दिनरात्रिविभेदनिराकरण-
     मुदितानुदितस्य निराकरणम् ।
यदि चैकनिरन्तरसर्वशिवं
     रविचन्द्रमसौ ज्वलनश्च कथम् ॥ ४ ॥

दिवस आणि रात्र हे भेद ज्याठिकाणी नाहीत, उदय आणि अस्त यांचाही जेथे संस्पर्श नाही, आणि जर निरंतर एक सर्व कल्याणकारक असे ते आहे, तर रवि, चंद्र, अग्नि हे कोठून आले ? (४)

गतकामविकामविभेद इति
     गतचेष्टविचेष्टविभेद इति ।
यदि चैकनिरन्तरसर्वशिवं
     बहिरन्तरभिन्नमतिश्च कथम् ॥ ५ ॥

काम आणि अकाम हा भेद ज्याठिकाणी नाही, चेष्टा आणि निश्चेष्टा हा प्रकारही जेथे नाही असे ते तत्त्व आहे. जरी एक निरंतर व कल्याणकारण असे ते तत्त्व आहे, तरी बाह्य आणि आंतर ही भेद बुद्धि कोठून आली ? (५)

यदि सारविसारविहीन इति
     यदि शून्यविशून्यविहीन इति ।
यदि चैकनिरन्तरसर्वशिवं
     प्रथमं च कथं चरमं च कथम् ॥ ६ ॥

जरी सार आणि असार यांनी ते रहित आहे; जरी शून्य आणि अशून्य यांनी ते रहित आहे; आणि जर ते एक निरंतर व सर्वत्र शिव आहे, तर प्रथम कसे व शेवटचे कसे ? (६)

यदिभेदविभेदनिराकरणं
     यदि वेदकवेद्यनिराकरणम् ।
यदि चैकनिरन्तरसर्वशिवं
     तृतीयं च कथं तुरीयं च कथम् ॥ ७ ॥

जर भेद आणि अभेद यांचा तेथे संबंध नाही; जर ज्ञान आणि ज्ञेय यांचा तेथे स्पर्श नाही; आणि जर एक निरंतर व सर्वत्र कल्याणकारक आहे तर सुषुप्ति व तुरीय कोठून आली ? (७)

गदितागदितं न हि सत्यमिति
     विदिताविदितं नहि सत्यमिति ।
यदि चैकनिरन्तरसर्वशिवं
     विषयेन्द्रियबुद्धिमनांसि कथम् ॥ ८ ॥

बोललेले आणि न बोललेले ही दोन्हीही सत्य नव्हेत व जाणलेले आणि न जाणलेले ही दोन्ही सत्य नव्हेत आणि जर एक निरंतर सर्व कल्याणकारक असे ते तत्त्व आहे तर विषय, इंद्रिये व मनही कोठून आली ? (८)

गगनं पवनो न हि सत्यमिति
     धरणी दहनो न हि सत्यमिति ।
यदि चैकनिरन्तरसर्वशिवं
     जलदश्च कथं सलिलं च कथम् ॥ ९ ॥

आकाश व वायु ही सत्य नव्हेत, पृथ्वी व अग्नि ही सत्य नाहीत, आणि जर ते तत्त्व एक निरंतर व सर्व कल्याणकारक आहे, तर मेघ व उदक ही कोठून आली ? (९)

यदि कल्पितलोकनिराकरणं
     यदि कल्पितदेवनिराकरणम् ।
यदि चैकनिरन्तरसर्वशिवं
     गुणदोषविचारमतिश्च कथम् ॥ १० ॥

जर भूरादि ह्या कल्पित, लोकांचा त्या तत्त्वाशी काही संबंध नाही; इंद्रादि देवांचाही त्याच्याशी काही संबंध नाही आणि जर ते एक निरंतर व कल्याणकारक तत्त्व आहे, तर गुणदोषविचाराची बुद्धि कोठून आली ? (१०)

मरणामरणं हि निराकरणं
     करणाकरणं हि निराकरणम् ।
यदि चैकनिरन्तरसर्वशिवं
     गमनागमनं हि कथं वदति ॥ ११ ॥

त्याचा मरणामरणांशी काही संबंध नाही, त्याची साधन व असाधन याच्याशी संबंध नाही. जर ते एक निरंतर व कल्याणकारक आहे, तर गमनागमन होते असे (येणे जाणे) हे वेद कसे सांगतो ? (११)

प्रकृतिः पुरुषो न हि भेद इति
     न हि कारणकार्यविभेद इति ।
यदि चैकनिरन्तरसर्वशिवं
     पुरुषापुरुषं च कथं वदति ॥ १२ ॥

प्रकृति व पुरुष असा भेद नाही. कारण व कार्य असाही भेद नाही. आणि जर ते एक निरंतर सर्व कल्याणकारक आहे, तर पुरुष व अपुरुष हे कसे मानणार ? (१२)

तृतीयं न हि दुःखसमागमनं
     न गुणाद्‌द्वितीयस्य समागमनम् ।
यदि चैकनिरन्तरसर्वशिवं
     स्थविरश्च युवा च शिशुश्च कथम् ॥ १३ ॥

जेथे तिसरी वृद्धावस्थारूप दुःख प्राप्ति नाही व गुणतः प्राप्त होणार्‍या द्वितीय तारुण्यावस्थेचीही प्राप्ति नाही आणि जर एक निरंतर वे सर्वदा कल्याणकारक असे ते तत्त्व आहे तर वृद्ध, तरुण आणि शिशु ही नावे येणार कोठून ? (१३)

ननु आश्रमवर्णविहीनपरं
     ननु कारणकर्तृविहीनपरम् ।
यदि चैकनिरन्तरसर्वशिव-
     मविनष्टविनष्टमतिश्च कथम् ॥ १४ ॥

काय हो ? आश्रम व ब्राह्मणादि धर्म यांन रहित असून श्रेष्ठ, आणि जर एक, निरंतर वे कल्याणकारक असे ते तत्त्व आहे, तर नष्ट झालेले व न झालेले (जननमरण) हे शब्द कोठून आले ? (१४)

ग्रसिताग्रसितं च वितथ्यमिति
     जनिताजनितं च वितथ्यमिति ।
यदि चैकनिरन्तरसर्वशिव-
     मविनाशि विनाशि कथं हि भवेत् ॥ १५ ॥

व्याप्त व अव्याप्त ही दोन्ही मिथ्या, उत्पन्न व अनुत्पन्न ही दोन्ही मिथ्या; असे असून जर एक निरंतर व सर्व शिव असे ते तत्त्व आहे, तर विनाशी व अविनाशी हे शब्द कोठून येणार ? (१५)

पुरुषापुरुषस्य विनष्टमिति
     वनितावनितस्य विनष्टमिति ।
यदि चैकनिरन्तरसर्वशिव-
     मविनोदविनोदमतिश्च कथम् ॥ १६ ॥

पुरुष व अपुरुष हा भेद जेथे नाहीं, वनिता व अवनिता हाही विशेष जेथे नाही, आणि जर एक, निरंतर कल्याणकारक असे ते तत्त्व आहे तर विनोद व अविनोद हे शब्द कोठून आले ? (१६)

यदि मोहविषादविहीनपरो
     यदि संशयशोकविहीनपरः ।
यदि चैकनिरन्तरसर्वशिव-
     महमेति ममेति कथं च पुनः ॥ १७ ॥

जर मोहे आणि विषाद, संशय आणि शोक यांनी रहित असून श्रेष्ठ आणि जर एक निरंतर सर्वत्र कल्याणकारक असे ते तत्त्व आहे तर मी किंवा माझे असे कोठून येणार. (१७)

ननु धर्मविधर्मविनाश इति
     ननु बन्धविबन्धविनाश इति ।
यदि चैकनिरन्तरसर्वशिव-
     मिहदुःखविदुःखमतिश्च कथम् ॥ १८ ॥

अहो, जर धर्माधर्म शून्य, बंधमोक्षशून्य असे तर ते तत्त्व आहे आणि जर एक निरंतर सर्वत्र कल्याणकारक आहे तर दुःख व सुख ही कोठून आली ? (१८)

न हि याज्ञिकयज्ञविभाग इति
     न हुताशनवस्तुविभाग इति ।
यदि चैकनिरन्तरसर्वशिवं
     वद कर्मफलानि भवन्ति कथम् ॥ १९ ॥

याज्ञिक ब्राह्मण व यज्ञ हा विभाग त्याचप्रमाणे अग्नि, इंधन इत्यादि वस्तु विभाग जेथे नाही. आणि जर ते एक निरंतर कल्याणकारक असे तत्त्व आहे, तर कर्म कोठून मिळणार ? (१९)

ननु शोकविशोकविमुक्त इति
     ननु दर्पविदर्पविमुक्त इति ।
यदि चैकनिरन्तरसर्वशिवं
     ननु रागविरागमतिश्च कथम् ॥ २० ॥

अहो, सुखदुःखरहित गर्व व निगर्व यानी रहित असे ते आहे आणि जर एक निरंतर सर्वदा कल्याणकारक, तर मग प्रीति व विरक्ति ही बुद्धि कोठून येणशर ? (२०)

न हि मोहविमोहविकार इति
     न हि लोभविलोभविकार इति ।
यदि चैकनिरन्तरसर्वशिवं
     ह्यविवेकविवेकमतिश्च कथम् ॥ २१ ॥

जेथे मोह विमोह यांचा विचार नाही, लोभ आणि अलोभ यांचा विकार नाही, आणि जर ते एक निरंतर व कल्याणकारक आहे। तर अविवेक व विवेक ही बुद्धि कोठून येणार ? (२१)

त्वमहं न हि हन्त कदाचिदपि
     कुलजातिविचारमसत्यमिति ।
अहमेव शिवः परमार्थ इति
     अभिवादनमत्र करोमि कथम् ॥ २२ ॥

खरोखर तू आणि मी हा भेद कधीहि नाही, त्याचप्रमाणे कुलजाती हे विचार हे असत्य आहेत. त्याचप्रमाणे परम पुरुषार्थ जो शिव तो मीच आहे अशा स्थितीत मी नमस्कार तरी कसा कोणाला करावा ? (२२)

गुरुशिष्यविचारविशीर्ण इति
     उपदेशविचारविशीर्ण इति ।
अहमेव शिवः परमार्थ इति
     अभिवादनमत्र करोमि कथम् ॥ २३ ॥

गुरूशिष्य हा विचार, उपदेश हा विचार जेथे नष्ट झाला आहे, मीच परम पुरुषार्थ शिव झालो आहे तर नमस्कार कोणाला आणि कसा करू ? (२३)

न हि कल्पितदेहविभाग इति
     न हि कल्पितलोकविभाग इति ।
अहमेव शिवः परमार्थ इति
     अभिवादनमत्र करोमि कथम् ॥ २४ ॥

कल्पित देहविभाग, किंवा कल्पिलेल्या लोकांचा विभागही तेथे नाही, मीच परमपुरुषार्थ शिव आहे तर नमस्कार कोणाला करू. (२४)

सरजो विरजो न कदाचिदपि
     ननु निर्मलनिश्चलशुद्ध इति ।
अहमेव शिवः परमार्थ इति
     अभिवादनमत्र करोमि कथम् ॥ २५ ॥

रजोयुक्त किंवा रजोगुण विरहित असा मी कधीहि नाही, कारण निर्मल निश्चल व शुद्ध असा आहे. शिवाय परमपुरुषार्थ शिव तो मीच. त्याअर्थी मी नमस्कार कोणाला करावा. (२५)

न हि देहविदेहविकल्प इति
     अनृतं चरितं न हि सत्यमिति ।
अहमेव शिवः परमार्थ इति
     अभिवादनमत्र करोमि कथम् ॥ २६ ॥

देह विदेह ही कल्पना जेथे नाही, सर्वच सत्य असल्यामुळे अतृप्त शब्दच जेथे नाही. शिव मीच आहे तर नमस्कार कोणाला ? (२६)

विन्दति विन्दति न हि न हि यत्र
     छन्दोलक्षणं न हि न हि तत्र ।
समरसमग्नो भावितपूतः
     प्रलपति तत्त्वं परमवधूतः ॥ २७ ॥

ज्ञान अज्ञान शब्द नाही, छंदोलक्षणही नाही. समरसामध्ये मग्न झाल्यामुळे अंतःकरण अत्यंत पवित्र झालेला अवधूत श्रेष्ठ तत्त्वाविषयी बोलतो. (२७)

इति अवधूतगीतायां मोक्षनिर्णयो नाम षष्ठोऽध्यायः ॥ ६ ॥

मोक्ष निर्णय सहावा अध्याय समाप्त.

GO TOP