|
॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥ ॐ नमो सद्गुरु वैकुंठनाथा । स्वानंदवैकुंठीं सदा वसता । तुझे ऐश्वर्य स्वभावतां । न कळे अनंता अव्यया ॥ १ ॥ हे ओंकाररूप सद्गुरो ! हें वैकुंठनाथा ! तुला नमस्कार असो. सदासर्वदा स्वानंदवैकुंठांतच वस्ती करून असतोस १. तुझ्या निजबोधाचा गरुड । कर जोडूनि उभा दृढ । ज्याच्या पाखांचा झडाड । उन्मळी सुदृढ भववृक्षा ॥ २ ॥ अनंता !हे अव्यया ! तुझे खरें ऐश्वर्य काय आहे त्याचा अंत लागत नाही. तुझा निजबोधाचा गरुड तुझ्यापुढे हात जोडून उभा असतो. त्याने नुसते पंख फडफडावले, की प्रचंड भववृक्ष उन्मळून पडतो २. तुझें स्वानुभवैकचक्र । लखलखित तेजाकार । द्वैतदळणीं सतेजधार । अतिदुर्धर महामारी ॥ ३ ॥ तुझ्या हातांतील स्वानुभावाचे चक्र लखलखीत तेजोमय असून त्याला अभेदभावनेची तीक्ष्ण धार लावलेली आहे. त्यामुळे त्याचा मार फारच भयंकर असतो ३. कैसा पांचजन्य अगाध । निःशब्दीं उठवी महाशब्द । वेदानुवादें गर्जे शुद्ध । तोचि प्रसिद्ध शंख तुझा ॥ ४ ॥ तुझा पांचजन्य शंख तर किती अगाध ! तो निःशब्दांतही भयंकर शब्द उत्पन्न करतो. वेदवाणीने शुद्ध गर्जना करीत असतो. तोच तुझा प्रसिद्ध शंख होय ४. झळफळित सर्वदा । निजतेजें मिरवे सदा । करी मानाभिमानांचा चेंदा । ते तुझी गदा गंभीर ॥ ५ ॥ सदासर्वदा आत्मतेजाने झगझगत असणारी गदा तुझ्या हातामध्ये सर्वकाळ शोभत असते. ती तुझी गदा इतकी खंबीर आहे की, ती अभिमानाचा चेंदाच करून सोडते ५. अतिमनोहर केवळ । देखतां उपजती सुखकल्लोळ । परमानंदें आमोद बहळ । तें लीलाकमळ झेलिसी ॥ ६ ॥ दिसण्यामध्ये अत्यंत मनोहर, जे पाहातांच आनंदाच्या उकळ्या फुटतात आणि ज्याला परमानंदरूप घमघमाट सुटलेला असतो, असें जें लीलाकमळ ते झेलीत असतोस ६. जीव शिव समसमानी । जय विजय नांवें देउनी । तेचि द्वारपाळ दोनी । आज्ञापूनी स्थापिले ॥ ७ ॥ समसमान असणारे जीव आणि शिव या दोघांना जय आणि विजय अशी नाव देऊन त्यांना आज्ञा करून द्वारसंरक्षणार्थ ठेवले आहेत ७. तुझी निजशक्ति साजिरी । रमारूपें अतिसुंदरी । अखंड चरणसेवा करी । अत्यादरीं सादर ॥ ८ ॥ तशीच तुझी अवियोगिनी सुकुमार निजशक्ति अति सुंदर अशा लक्ष्मीरूपाने अत्यादराने चरणसेवा करीत असते ८. तुझे लोकींचे निवासी जाण । अवघे तुजचिसमान । तेथ नाहीं मानापमान । देहाभिमान असेना ॥ ९ ॥ तुझ्या लोकांत राहाणारे जितके म्हणून रहिवाशी आहेत, तितके सारे तुझ्याचसारखे आहेत. तेथे मानापमान नाही व देहाभिमानही नाहीं ९. तेथ काळाचा रिगमु नाहीं । कर्माचें न चले कांहीं । जन्ममरणाचें भय नाहीं । ऐशिया ठायीं तूं स्वामी ॥ १० ॥ तेथे काळाचा शिरकाव नाहीं; कर्माचे काही चालत नाहीं; व जन्ममरणाचे भय नाही; अशा ठिकाणचा तू स्वामी आहेस १० जेथ कामक्रोधांचा घात । क्षुधेतृषेचा प्रांत । निजानंदें नित्यतृप्त । निजभक्त तुझेनि ॥ ११ ॥ जेथे कामक्रोधांचा घात होतो; व क्षुधेतृषेचा अंत होतो; तेथें तुझे भक्त निजानंदाने नित्यतृप्त असतात ११. तुझेनि कृपाकटाक्षें । अलक्ष न लक्षितां लक्षें । तुझे चरणसेवापक्षें । नित्य निरपेक्षें नांदविसी ॥ १२ ॥ तुझ्या कृपाकटाक्षाच्या योगानें, अलक्ष्य वस्तु न लक्षितांच लक्षात येते. तुझ्या चरणसेवेच्या अपेक्षेनें तूं भक्तांना निरपेक्षपणे वागवितोस १२. साम्यतेचें सिंहासन । ऐक्यतेची गादी जाण । त्यावरी तुझें सहजासन । परिपूर्ण स्वभावें ॥ १३ ॥ साम्यतेच्या सिंहासनावर ऐक्यतेची गादी असते. तीवर तुझे पूर्णपणाचे व स्वाभाविक असें सहजासन असते १३. तन्मयतेचें निजच्छत्र । संतोषाचें आतपत्र । ज्ञानविज्ञानयुग्म चामर । सहजें निरंतर ढळताती ॥ १४ ॥ तन्मयता हेंच छत्र; संतोष हीच अबदागिरी; ज्ञान-विज्ञान या दोन चवऱ्या, तुझ्यावर सर्वदा ढाळत असतात १४. तेथ चारी वेद तुझे भाट । कीर्ति वर्णिती उद्भीट । अठरा मागध अतिश्रेष्ठ । वर्णिती चोखट वंशावळी ॥ १५ ॥ तेथें चार वेद हे तुझे भाट होत. ते मोठमोठ्याने तुझी कीर्ति वर्णीत असतात आणि अठरा पुराणे हे मागध (बंदी-भाट) तुझी उत्तम वंशावळी वर्णन करतात १५. तेथ साही जणां वेवाद । नानाकुसरीं बोलती शब्द । युक्तिप्रयुक्तीं देती बाध । दाविती विनोद जाणीव ॥ १६ ॥ तसेंच तेथें म्ह० तुझ्या सभेंत सहाजण (षट्शाखें) वादविवाद करून कोट्यांवर कोट्या रचीत असतात. युक्तिप्रयुक्तीने खंडण मंडण करून आपापल्या ज्ञानाचे कौतुक दाखवितात १६. एक भावार्थी तुजलागुनी । स्तुति करिती न बोलुनी । तेणें स्तवनें संतोषोनी । निजासनीं बैसविसी ॥ १७ ॥ कोणी भावार्थी भक्त न बोलतांच तुझी स्तुति करतात. तशा स्तवनाने तूं संतोषित होऊन त्यांना आपल्या पदावर बसवितोस १७. ऐसा सद्गुवरु महाविष्णु । जो चिद्रूपें सम सहिष्णु । जो भ्राजमानें भ्राजिष्णु । जनीं जनार्दनु तो एक ॥ १८ ॥ असा तूं सद्गुरु महाविष्णु आहेस, जो चिद्रूपाने सम व सहिष्णु आहे. जो तेजाने भ्राजिष्णु म्ह. देदीप्यमान आहे, तोच जनामध्ये एकरूप जनार्दन होय १८. जनीं जनार्दनुचि एकला । तेथ एकपणें एका मीनला । तेणें एकपणाचाही ग्रास केला । ऐसा झाला महाबोध ॥ १९ ॥ जनामध्ये एकीएक जनार्दनच भरलेला आहे. त्यात एकरूपाने एकनाथ एकरूप होऊन गेला. त्यामुळे त्याने एकपणाचाही ग्रास करून टाकला. असा महाबोध त्याला प्राप्त झाला १९. या महाबोधाचें बोधांजन । हातेंवीण लेववी जनार्दन । तेणें सर्वांगीं निघाले नयन । देखणेंपण सर्वत्र ॥ २० ॥ त्याच महाबोधाचे बोधांजन डोळ्यांत हाताशिवायच जनार्दन घालून देतात. त्यामुळे साऱ्या अंगालाच डोळे फुटतात आणि त्यामुळे दृष्टि सर्वव्यापक होउन राहाते २०. परी सर्वत्र देखतां जन । देखणेनि दिसे जनार्दन । ऐंशी पूर्ण कृपा करून । एकपण सांडविलें ॥ २१ ॥ पण सर्वत्र जनाला पाहिले तरी त्या ठिकाणी सारा एक जनार्दनच दिसतो. अशी परिपूर्ण कृपा करून त्याने एकपणाही नाहींसा करून टाकला २१. ऐसा तुष्टोनि भगवंत । माझेनि हातें श्रीभागवत । अर्थविलें जी यथार्थ । शेखीं प्राकृत देशभाषा ॥ २२ ॥ ह्याप्रमाणे भगवानच प्रसन्न होऊन त्याने माझ्या हाताने श्रीमद्भागवताचा अर्थ यथार्थ रीतीने करविला, व तोही प्राकृत अशा देशभाषेत ! २२. श्रीभागवतीं संस्कृत । उपाय असतांही बहुत । काय नेणों आवडलें येथ । करवी प्राकृत प्रबोधें ॥ २३ ॥ श्रीमद्भागवतावर अनेक संस्कृत टीका असतांही त्यांना काय आवडले कोण जाणे? त्यांनी प्राकृत व सुगम असा अर्थ करविला २३. म्यां करणें कां न करणें । हेंही हिरूनि नेलें जनार्दनें । आतां ग्रंथार्थनिरूपणें । माझें बोलणें तो बोले ॥ २४ ॥ माझें करणेपण किंवा न करणेपण हे त्या जनार्दनाने हिरावून नेले. आतां ग्रंथार्थाच्या निरूपणाचे माझे बोलणेही तोच बोलत आहे २४. तेणें बोलोनि निजगौरवा । वेदविभागसद्भा वा । तो एकादशीं विसावा । उद्धवासी बरवा निरूपिला ॥ २५ ॥ त्याने आपल्या गौरवाकरितां प्रेमादराने वेदाचे विभाग ज्यांत सांगितले असा एकादश स्कंधांतील विसावा (विसावा देणारा) अध्याय उद्धवाला उत्तम रीतीने सांगितला २५. तेथ भक्त आणि सज्ञान । त्यासी पावली वेदार्थखूण । कर्मठीं देखतां दोषगुण । संशयीं जाण ते पडिले ॥ २६ ॥ त्यामुळे भक्त आणि ज्ञानी ह्यांना वेदार्थाची खूण पटली; परंतु कर्मठ होते ते गुणदोषाकडे पाहू लागल्यामुळे संशयांत पडले २६. त्या संशयाचें निरसन । करावया श्रीकृष्ण । एकविसावा निरूपण । गुणदोषलक्षण स्वयें सांगे ॥ २७ ॥ त्या संशयाचे निरसन करण्याकरितां एकविसाव्या अध्यायाचे निरूपण करून गुणदोषाचे लक्षण स्वतः श्रीकृष्ण सांगत आहेत २७. त्या गुणदोषांचा विभाग । सांगोनिया विषयत्याग । करावया श्रीरंग । निरूपण साङ्ग सांगत ॥ २८ ॥ त्या गुणदोषांचा प्रकार सांगून श्रीकृष्ण विषयाचा त्याग करण्याकरितां सविस्तर निरूपण करीत आहेत २८. श्रीभगवानुवाच - य एतान्मत्पथो हित्वा भक्तिज्ञानक्रियात्मकान् । क्षुद्रान्कामांश्चलैः प्राणैर्जुषन्तः संसरन्ति ते ॥ १ ॥ म्यां सांगितले जे विभाग । भक्तिज्ञानक्रियायोग । हा सांडूनि शुद्ध वेदमार्ग । सकाम भोग जे वांछिती ॥ २९ ॥ भक्ति, ज्ञान व कर्मयोग असे विभाग मी सांगितले, तो शुद्ध वेदमार्ग होय. तो सोडून देऊन लोभिष्ट लोक विषयसुखाची इच्छा करतात २९. क्षणभंगुर देहाचा योग । हें विसरोनियां चांग । सकाम कर्माची लगबग । भवस्वर्गभोग भोगावया ॥ ३० ॥ देहाचा संबंध क्षणभंगुर आहे. हे पुरते विसरून संसारांतील व स्वर्गातील सुखोपभोग मिळण्यासाठी लोभिष्ट लोक सकाम कर्माची धाई करतात ३०. चळतेनि प्राणसंगें । देहातें काळ ग्रासूं लागे । येथ नानाकर्मसंभोगें । मूर्ख तद्योगें मानिती सुख ॥ ३१ ॥ चंचल प्राणाच्या संगतीने काळ हा देहाला ग्रासीतच असतो. असे असतां इहलोकांतील अनेक प्रकारच्या विषयोपभोगांत व त्याच्या खटपर्टीतच मुर्ख लोक सुख मानतात ३१. भोगितां कामभोगसोहळे । नेणे आयुष्य ग्रासिलें काळें । मग जन्ममरणमाळें । दुःखउेमाळे भोगिती ॥ ३२ ॥ कामभोगांचे सोहळे भोगीत असतां काळ आयुष्य ग्रासीत असतो हे समजतच नाहीं; मग जन्ममरणाच्या फेऱ्यांमध्ये दुःखाचे उमाळे भोगीत राहातात ३२. काम्य आणि नित्यकर्म । आचरतां दिसे सम । तरी फळीं कां पां विषम । सुगम दुर्गम परिपाकु ॥ ३३ ॥ काम्यकर्म आणि नित्यकर्म हें आचरण करतांना सारखेच दिसते, तरी फलामध्ये त्याचे विषमत्व म्हणजे चांगले व वाईट परिणाम कां ? ३३. तें कर्मवैचित्र्यविंदान । संकल्पास्तव घडे जाण । तेचि अर्थींचें निरूपण । जाणोनि श्रीकृष्ण सांगत ॥ ३४ ॥ तर हा कर्मवैचित्र्याचा प्रकार संकल्पामुळेच घडतो. ह्याच अर्थाचे निरूपण श्रीकृष्ण सांगत आहेत ३४. स्वे स्वेऽधिकारे या निष्ठा स गुणः परिकीर्तितः । विपर्ययस्तु दोषः स्यादुभयोरेष निश्चयः ॥ २ ॥ कर्म विचारितां अवघें एक । परी अधिकारी भिन्नभिन्न देख । ते मी सांगेन आवश्यक । जेणें सुखःदुख भोगणें घडे ॥ ३५ ॥ विचार केला तर कर्म सारे येथून तेथून एकच आहे. परंतु अधिकार मात्र भिन्न भिन्न असतात. त्यांच्याच योगाने सुखदुःख भोगणे भाग पडते. तें मी तुला अवश्य सांगतों ३५, मुखाचा व्यापार भोजन । तो नाकें करूं जातां जाण । सुख बुडवूनि दारुण । दुःख आपण स्वयें भोगी ॥ ३६ ॥ भोजन करणे हे मुखाचे काम आहे; हें जर नाकाने करूं लागलों, तर सुख जाऊन भयंकर दुःख मात्र आपणाला भोगावे लागेल ३६. कां पायांचें जें चालणें । पडे जैं डोईं करणें । तैं मार्ग न कंठे तेणें । परी कष्टणें अनिवार ॥ ३७ ॥ पायांचे जे चालणे आहे ते जर डोक्याने करावे लागले, तर त्याने मार्ग सरावयाचा तर नाहीच, पण अनिवार कष्ट मात्र भोगावे लागतील ३७. तेवीं जें कर्म स्वाधिकारें । सुखातें दे अत्यादरें । तेचि कर्म अनधिकारें । दुःखें दुर्धरे भोगवी ॥ ३८ ॥ त्याप्रमाणे अधिकारपरत्वे जें कर्म निश्चयपूर्वक सुखावह होते, तेच कर्म अनधिकाराने केल्यास दुःसह दुःख मात्र भोगावे लागेल ३८. गजाचें आभरण । गाढवासी नव्हे भूषण । परी भारें आणी मरण । तेवीं कर्म जाण अनधिकारीं ॥ ३९ ॥ हत्तीची अंबारी काही गाढवाला भूषणास्पद व्हावयाची नाही. इतकेच नव्हे, तर ते तिच्या भाराने मरूनही जाईल. त्याप्रमणेच अनधिकाराने केलेल्या कर्माची गोष्ट आहे ३९. मेघ वर्षे निर्मळ जळ । परी जैसें बीज तैसें फळ । एका भांगी पिके सबळ । एका प्रबळ साळी केळें ॥ ४० ॥ मेघ वृष्टि करतो ती निर्मळ जळाचीच करतो. तरी जसें बीज असेल तसेंच फळ येते. एका प्रदेशांत नुसती भांगच पिकते, आणि दुसऱ्या प्रदेशांत साळी केळीच रगडून येतात ४०. पाहें पां जैसें दुग्ध चोख । ज्वरितामुखीं कडू विख । तेंचि निरुजां गोड देख । पुष्टिदायक सेवनीं ॥ ४१ ॥ हे पाहा! दूध कितीही उत्तम असले तरी तापकऱ्याच्या तोंडाला जसें कडू विख लागते, पण तेंच निरोगी मनुष्याला गोड लागते; आणि तें प्याल्याने पुष्टिदायक होते ४१. तेवीं सकामीं कर्म घडे । ते बाधक होय गाढें । तेंचि कर्म निष्कामाकडे । मोक्षसुरवाडें सुखावी ॥ ४२ ॥ तद्वत् कामना धरून केलेले कर्म अतिशय बाधक होते. तेच कर्म निष्कामबुद्धीनें केल्यास मोक्षसुखाचे साधन होते ४२. स्वाधिकारें स्वकर्माचरण । तोचि येथें मुख्यत्वें गुण । अनधिकारीं कर्म जाण । तोचि अवगुण महादोष ॥ ४३ ॥ आपल्या अधिकाराप्रमाणे कर्माचरण करणें तोच येथे मुख्य गुण होय; आणि अनधिकाराने केलेले कर्म, तोच येथे अवगुण म्हणजे महादोष होय ४३. या रीतीं गा कर्माचरण । उपजवी दोष आणि गुण । हेंचि गुणदोषलक्षण । शास्त्रज्ञ जाण बोलती ॥ ४४ ॥ अशा रीतीने कर्माचरण गुण आणि दोष उत्पन्न करते आणि शास्त्रवेत्ते ह्याच गुणदोषाचे लक्षण सांगतात ४४. तेंचि गुणदोषलक्षण । शुद्ध्यशुद्धींचें कारण । तेचि अर्थींचें विवंचन । देवो आपण सांगत ॥ ४५ ॥ हेच गुणदोषलक्षण शुद्धाशुद्धीला कारण आहे. ह्याच अर्थाचें विवेचन देव आपण सांगतात ४५. शुद्ध्यशुद्धी विधीयेते समानेष्वपि वस्तुषु । द्रव्यस्य विचिकित्सार्थं गुणदोषौ शुंभाशुभौ ॥ ३ ॥ पंचभूतें समान जाण । वस्तु सर्वत्र समसमान । तेथ गुणदोष अप्रमाण । परी केलें प्रमाण या हेतू ॥ ४६ ॥ पंचमहाभूते ही समानच आहेत. तसेंच परब्रह्मही सर्वत्र समसमानच आहे. तेथे गुणदोष अप्रमाण म्ह. मिथ्या आहेत. परंतु ते वर सांगितलेल्या हेतूनेच प्रमाणभुत झाले आहेत ४६. न प्रेरितां श्रुतिस्मृती । आविद्यक विषयप्रवृत्ती । अनिवार सकळ भूतीं । सहजस्थितिस्वभावें ॥ ४७ ॥ श्रुतीने किंवा स्मृतीने सांगितल्याशिवायच सर्व प्राणिमात्रांमध्ये आविद्यक विषयप्रवृत्ति स्वभावसिद्धच असते ४७. ऐसी स्वाभाविक विषयस्थिती । तिची करावया उपरती । नाना गुणदोष बोले श्रुती । विषयनिवृत्तीलागुनी ॥ ४८ ॥ अशी विषयवासना नैसर्गिकच असल्यामुळे तिची उपरति म्ह. निवृत्ति करण्याकरितांच श्रुतीने अनेक प्रकारचे गुणदोष सांगितले आहेत ४८. हें एक शुद्ध एक अशुद्ध । पैल शुभ हें विरुद्ध । मीचि बोलिलों वेदानुवाद । विषयबाध छेदावया ॥ ४९ ॥ विषयाची बाधा दूर करण्याकरितां एक शुद्ध व एक अशुद्ध ; पलीकडचें तें शुभ, अलीकडचे हे अशुभ. असें वेदवाणीच्या रूपाने मीच सांगून ठेवले आहे ४९. विषयांची जे निवृत्ती । तिची वेदरुपें म्यां केली स्तुति । निंदिली विषयप्रवृत्ती । चिळसी चित्तीं उपजावया ॥ ५० ॥ विषयांची जी निवृत्ति, तिची वेदरूपाने मीच स्तुति केलेली आहे. मनांत चिळस उत्पन्न होण्यासाठींच विषयवृत्तीची निंदाही मीच केली आहे ५०. चालतां कर्मप्रवृत्ती । हो विषयांची निवृत्ती । ऐशी वेदद्वारें केली युक्ती । ऐक तुजप्रती सांगेन ॥ ५१ ॥ कर्मप्रवृत्ति चालत असतां विषयांची निवृत्ति होवो अशी वेदाच्या द्वाराने मी युक्ति करून ठेविली आहे. तीच तुला सांगतों ऐक ५१. धर्मार्थं व्यवहारार्थं यात्रार्थमिति चानघ । दर्शितोऽयं मयाऽऽचारो धर्ममुद्वहतां धुरम् ॥ ४ ॥ उद्धवा तूं निष्पाप त्रिशुद्धी । यालागीं तुझी शुद्ध बुद्धी । धर्मादि व्यवहारसिद्धी । ऐक तो विधि सांगेन ॥ ५२ ॥ उद्धृवा! तूं खरोखर निष्पाप आहेस. म्हणून तुझी बुद्धिही शुद्ध आहे. ह्याकरितां धर्मादि व्यवहारसिद्धीचाही विधि तुला सांगतो ऐक ५२. करितांही धर्माचरण । प्रवृत्तिधर्म तो अप्रमाण । निवृत्तिधर्म तो अतिशुद्ध जाण । हे दोषगुण स्वधर्मीं ॥ ५३ ॥ धर्माचरण करीत असतांनाही प्रवृत्तिधर्म हा अप्रमाण आहे. निवृत्तिधर्मच अत्यंत शुद्ध होय. हेच स्वधर्मातील गुणदोष होत ५३. जो व्यवहार विषयासक्तीं । ते अशुद्ध व्यवहारस्थिती । जे परोपकारप्रवृत्ती । तो व्यवहार वंदिती सुरनर ॥ ५४ ॥ विषयाच्या आसक्तीने जो जो व्यवहार करावा, तो तो अशुद्धच होय; आणि परोपकारवृत्तीने जो व्यवहार करावा तो देवाला व मनुष्याला वंद्य होतो ५४. अद्रुष्टदाता ईश्वर । हें विसरोनि उत्तम नर । द्रव्यलोभें नीचांचे दारोदार । हिंडणें अपवित्र ते यात्रा ॥ ५५ ॥ अदृष्टदाता ईश्वर आहे, हे मोठमोठे पुरुष विसरून जातात; आणि द्रव्यलोभाने नीचांच्या दारोदार हिंडत असतात, ती अमंगल यात्रा होय ५५. आळस सांडोनि आपण । करूं जातां श्रवण कीर्तन । कां तीर्थयात्रा साधुदर्शन । पूजार्थ गमन देवालयीं ॥ ५६ ॥ परंतु आपण आळस सोडून कीर्तनादि श्रवण करणे किंवा तीर्थयात्रा करणे, साधूंची दर्शनें घेणे, किंवा पूजा करावयासाठी देवालयांत जाणे ५६. कां अनाथप्रेतसंस्कार । करितां पुण्य जोडे अपार । पदीं कोटियज्ञफळसंभार । जेणें साचार उपजती ॥ ५७ ॥ किंवा अनाथाचा प्रेतसंस्कार करणे, ह्या योगानें अगणित पुण्य लागते. इतकेच नव्हे, तर पावलोपावली तेणेकरून कोटि यज्ञांचें फळ उत्पन्न होते ५७. जेणें पाविजे परपार । तिये नांव यात्रा पवित्र । हा यात्रार्थसंचार । गुणदोषविचार वेदोक्त ॥ ५८ ॥ ज्याच्या योगाने संसारांतून पार जाता येईल, तिचेच नांव पवित्र यात्रा. हेच वेदांत सांगितल्याप्रमाणे यात्रेस जाणे, आणि हाच गुणदोषांचा विचार होय ५८. राजा निजपादुका हटेंसीं । वाहवी ब्राह्मणाचे शिसीं । तो दोष न पवे द्विजासी । स्वयें सदोषी होय राजा ॥ ५९ ॥ राजाने आपले जोडे जर हट्टानें ब्राह्मणांच्या डोक्यावर दिले, तर तो दोष कांहीं ब्राह्मणाला लागावयाचा नाहीं; तर राजा हा स्वतःच दोषी होतो ५९. जेवीं आपत्काळबळें जाण । पडतां लंघनीं लंघन । तैं घेऊनि नीचाचें धान्य । वांचवितां प्राण दोष नाहीं ॥ ६० ॥ त्याचप्रमाणे आपत्काल प्राप्त झाला असतां उपासावर उपास पडू लागले, तर नीचाचे धान्य घेऊन प्राण वाचविला तर त्यात काही दोष नाहीं ६०. तेंचि नीचाचें दान । अनापदीं घेतां जाण । जनीं महादोष दारुण । हेंही जाण वेदोक्त ॥ ६१ ॥ पण तेंच नीचाचें दान आपत्काल नसतांना घेतले तर लोकांमध्ये महादोष लागतो. हेही वेदांतच सांगितलेले आहे ६१. जे कर्मधर्मप्रवर्तक शुद्ध । मनुपराशरादि प्रसिद्ध । तिंहीं गुणदोष विविध । शुद्धाशुद्ध बोलिले ॥ ६२ ॥ प्रसिद्ध असे मनु-पराशरादिक शद्ध कर्मधर्मप्रवर्तक होऊन गेले. त्यांनी नानाप्रकारांनी गुणदोष व शुद्धाशुद्ध सांगून ठेवले आहे ६२. तेंचि शुद्धाशुद्धनिरूपण । तीं श्लोकीं नारायण । स्वयें सांगताहे आपण । गुणदोषलक्षणविभाग ॥ ६३ ॥ तेच गुणदोषाचे विभाग व शुद्धाशुद्धविषयक निरूपण तीन श्लोकांनी स्वतः नारायण आपण होऊन सांगत आहेत ६३. भूम्यंब्वग्न्यनिलाकाशा भूतानां पञ्च धातवः । आब्रह्मस्थावरादीनां शारिरा आत्मसंयुताः ॥ ५ ॥ वेदेन नामरूपाणि विषमाणि विषमाणि समेष्वपि । धातुषृद्धव कल्प्यन्ते एतेषां स्वार्थसिद्धये ॥ ६ ॥ पृथ्वी आप तेज वायु गगन । ब्रह्म्यादि स्थावरान्त जाण । भूतीं पंचभूतें समान । वस्तुही आपण सम सर्वीं ॥ ६४ ॥ ब्रह्मदेवापासून तो स्थावरजंगमापर्यंत सर्व प्राण्यांमध्ये पृथ्वी, आप, तेज, वायु व आकाश ही पंचमहाभूतें समसमानच आहेत; आणि ब्रह्मवस्तुही सर्वामध्ये समसमानच आहे ६४. नाहीं नाम रूप गुण कर्म । ऐसें जें केवळ सम । तेथ माझेनि वेदें विषम । केलें रूप नाम हितार्थ ॥ ६५ ॥ ज्याला नाम व रूप नाहीं, गुण नाहीं व कर्मही नाही, अशा सम ब्रह्माचे ठिकाणी लोककल्याणाकरितां माझ्या वेदानें नामरूपाचे भेद कल्पून ठेवले आहेत ६५. तळीं पृथ्वी वरी गगन । पाहतां दोनीही समान । तेथ दश दिशा कल्पिल्या जाण । देशांतरगमनसिद्ध्यर्थ ॥ ६६ ॥ खाली पृथ्वी आणि वर आकाश पाहावयास गेले असतां दोन्ही सारखीच दिसतात; परंतु देशांतरी जाण्यास सोपे पडावे म्हणून दशदिशांची कल्पना करून ठेवली आहे ६६. तेवीं नाम रूप वर्णाश्रम । समाच्या ठायीं जें विषम । हा माझेनि वेदें केला नेमे स्वधर्मकर्मसिद्ध्यर्थ ॥ ६७ ॥ त्याप्रमाणे नाम, रूप आणि वर्णाश्रम, हे माझ्या वेदाने समाच्या ठिकाणी जें विषम उत्पन्न करून ठेवले आहे, ते स्वधर्मकर्माच्या सिद्धीसाठींच ६७. येणेंचि द्वारें सुलक्षण । धर्मार्थकाममोक्षसाधन । पुरुषांच्या हितालागीं जाण । म्यां केलें नियमन वेदाज्ञा ॥ ६८ ॥ ह्याच द्वाराने पुरुषांच्या हिताकरितां उत्तम लक्षणांनी युक्त असे धर्मार्थकाममोक्षसाधनांचे नियम अथवा नियंत्रण मी वेदाज्ञेच्या रूपानें केलें आहे ६८. रूप नाम आश्रम वर्ण । वेदु नेमिता ना आपण । तैं व्यवहारु न घडता जाण । मोक्षसाधन तैं कैंचें ॥ ६९ ॥ रूप, नाम, आश्रम, वर्ण यांचे नियम वेदाने घालून दिले नसते, तर मुळी व्यवहारच चालला नसता; मग मोक्षसाधन कसे होणार ? ६९. एवं वेदें चालवूनि व्यवहारु । तेथेंचि परमार्थविचारु । दाविला असे चमत्कारु । सभाग्य नरु तोचि जाणे ॥ ७० ॥ अशा प्रकारे वेदाने व्यवहार चालवून त्यांतच परमार्थविचाराचा चमत्कारही दाखवून दिला आहे; परंतु भाग्यवान् असेल त्यालाच तो कळेल ७०. अत्यंत करिता कर्मादरु । तेणें कर्मठचि होय नरु । तेथ परमार्थ नाहीं साचारु । विधिनिषेधीं थोरु पीडिजे ॥ ७१ ॥ कर्मावरच अतिशय भर ठेवला, तर तो पुरुष कर्मठच होऊन राहील; त्यामुळे परमार्थ साधणार नाही; त्याला विधिनिषेधाचा त्रास मात्र सोसावा लागेल ७१ . केवळ स्वधर्मकर्म सांडितां । अंगीं आदळे पाषंडता । तेणेंही मोक्ष न ये हाता । निजस्वार्था नागवले ॥ ७२ ॥ बरें, स्वधर्मकर्म निखालस सोडून दिले, तर अंगावर पाखंडीपणा येऊन आदळेल ! त्यामुळे मोक्ष हाती न येता आपल्या हितावर पाणी पडेल! ७२. यालागीं स्वधर्म आचरतां । निजमोक्ष लाभे आइता । हे वेदार्थाची योग्यता । जाणे तो ज्ञाता सज्ञान ॥ ७३ ॥ ह्याकरितां स्वधर्म आचरण करीत असतांच आयता मोक्षलाभ होईल अशी वेदार्थाची योग्यता ज्याच्या लक्षात येईल, तो ज्ञाता शहाणा होय ७३. हे वेदार्थनिजयोग्यता । सहसा न ये कवणाचे हाता । याचिलागीं गा परमार्थ । गुरु तत्त्वतां करावा ॥ ७४ ॥ पण जें वेदाच्या अर्थातील रहस्य सहसा कोणाच्या हाती लागत नाही. ह्याचसाठी परमार्थमार्ग दाखविणारा गुरु केला पाहिजे ७४. त्या सद्गुगरूची पूर्ण कृपा होय । तरीच आतुडे वेदगुह्य । गुरुकृपेवीण जे उपाय । ते अपाय साधकां ॥ ७५ ॥ त्या सदुरूची पूर्ण कृपा होईल तरच वेदांतील रहस्य हाती लागेल. गुरुकृपेशिवाय जी जी साधने करावीत, ती ती साधकांना अपायकारक मात्र होतात ७५. यालागीं माझा वेद जगद्गुेरु । दावी आपातता व्यवहारु । नेमी स्वधर्मकर्मादरु । जनाचा उद्धारु करावया ॥ ७६ ॥ ह्याकरितां माझा वेद हा जगाचा गुरु आहे. त्याने प्रथमदर्शनी व्यवहार दाखवून लोकांचा उद्धार करण्यासाठी स्वधर्मकर्मादर लावून दिला आहे ७६. ऐसा माझा वेदु हितकारी । दावूनि गुणदोष नानापरी । जन काढी विषयाबाहेरीं । वेद उपकारी जगाचा ॥ ७७ ॥ असा माझा वेद लोकहितकारी आहे. तो नाना प्रकारचे गुणदोष दाखवून लोकांना विषयाच्या बाहेर काढतो. अशा रीतीने वेद हा जगावर उपकार करतो ७७. देशकालादिभावानां वस्तुनां मम सत्तम । गुणदोषौ विधीयेते नियमार्थं हि कर्मणाम् ॥ ७ ॥ भक्तांमाजी भक्तोत्तम । साधुलक्षणीं साधुसम । यालागीं उद्धवासी 'सत्तम' । म्हणे पुरुषोत्तम अतिप्रीतीं ॥ ७८ ॥ उद्धव हा भक्तांमध्ये अत्युत्तम भक्त आणि साधुलक्षणांमध्ये साधूसारखाच असल्यामुळे श्रीकृष्ण त्याला अत्यंत प्रेमाने 'सत्तम' म्हणजे हे साधुश्रेष्ठा असे म्हणाले ७८. उद्धवा येथ भलता नर । भलता करील कर्मादर । यालागीं वर्णाश्रमविचार । नेमिला साचार वेदांनीं ॥ ७९ ॥ उद्धवा! ह्या जगामध्ये हवा तो मनुष्य हवें तें कर्माचरण करूं लागेल, ह्याकरितां वेदांनी वर्णाश्रमाचा विचार ठरवून टाकला आहे ७९. जेथ करूं नये कर्मतंत्र । ऐसा देश जो अपवित्र । आणि काळादि द्रव्य विचित्र । पवित्रापवित्र सांगेन ॥ ८० । जेथें कर्मतंत्र करता कामा नये असा जो अपवित्र देश, आणि अपवित्र काल व वस्तु, ह्यांचीही पवित्रता व अपवित्रता तुला मी सांगेन ८० अकृष्णसारो देशानामब्रह्मण्योऽशुचिर्भवेत् । कृष्णसारोऽप्यसौवीरकीकटासंस्कृतेरिणम् ॥ ८ ॥ कोणे एके पृथ्वीतळीं । मेघ न वर्षतां जळीं । पेरिलीं धान्यें सदा निळीं । वसुधा-जिव्हाळी ते म्हणती ॥ ८१ ॥ पृथ्वीवर एखाद्या ठिकाणीं मेघवृष्टि मुळीच होत नाही; पण तेथे पेरलेली शेते हिरवींचार दिसतात. तेव्हां ती जमीनच पाणथळ आहे असे म्हणतात ८१. तेंचि पाहतां पृथ्वीवरी । एके भागीं गा उखरी । मेघ वर्षतां शरधारीं । अंकुरेना डिरी उखरत्वें ॥ ८२ ॥ त्याच पृथ्वीवर दुसऱ्या ठिकाणी पाहावं तर, एका ठिकाणी अगदीच खडकाळ जमीन असते, तेथें मुसळधार पाऊस पडला तरी जमीनच खडकाळ असल्यामुळे तेथे अंकुरच येत नाहीं! ८२. तेवीं देशाची शुद्ध्यशुद्धी । तुज मी सांगेन यथाविधी । जेथ कर्मीं नोहे कार्यसिद्धी । तेथ कर्म त्रिशुद्धी न करावें ॥ ८३ ॥ त्याप्रमाणे देशाची शुद्धाशुद्धि आहे, ती मी तुला सविस्तर सांगतो. जेथें कर्माने कार्यसिद्धि होत नाही, त्या ठिकाणी मुळींच कर्म करू नये ८३. कृष्णामृग जेथ नाहीं । ते जाण पां अपवित्र भुयी । कर्मादरु तिये ठायीं । न करावा पाहीं सर्वथा ॥ ८४ ॥ जेथें कृष्णमृग नसतो ती भूमि अपवित्र म्हणून समजावी. तशा ठिकाणी कधीही कर्म करण्याची यातायात करूं नये ८४. जेथ ब्राह्मणचि नाहीं । तो देश अपवित्र पाहीं । ब्राह्मण अकर्मीं जे ठायी । भूमी तेही अपवित्र ॥ ८५ ॥ तसेच जेथे ब्राह्मणच नसतो, तो देश अपवित्र होय; किंवा जेथें निषिद्ध कर्म करणारे ब्राह्मण असतील; ती भूमिही अपवित्रच होय ८५. जेथ ब्राह्मणाची अभक्ती । शेखों हेळूनि निंदिती । तो देश गा कर्माप्रती । जाण निश्चितीं अपवित्र ॥ ८६ ॥ त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी ब्राह्मणांवर भक्ति नाही, शेवटी त्यांची निंदा करून अवहेलनाही करतात, तो देशही कर्माला खरोखर अपवित्र होय हे लक्षात ठेव ८६. जे देशीं कृष्णमृग असती । परी नाहीं भगवद्भतक्ती । तो देश कर्मप्रती । जाण निश्चितीं अपवित्र ॥ ८७ ॥ एखाद्या देशांत कृष्णमृगही असतात, परंतु भगवद्गक्ति नसते, तो देशही कर्माला निश्चयाने अपवित्र आहे असे समज ८७. भक्तिहीन देश प्रसिद्ध । कीकट कलिंग मागध । तेथ स्वधर्म नव्हती शुद्ध । जाण अशुद्ध ते देश ॥ ८८ ॥ कीकट, कलिंग, आणि मागध हे देश भक्तिहीन असल्याविषयी प्रसिद्ध आहेत. ते देश अशुद्ध असल्यामुळे तेथेही स्वधर्म शुद्ध होत नाहीत ८८. नाहीं उपलेप संमार्जन । ते स्वगृहीं भूमी अशुद्ध जाण । कां जेथ वेदबाह्य असज्जन । तेंही स्थान अपवित्र ॥ ८९ ॥ जेथें सडा संमार्जन होत नाही, अशी आपल्या घरांतील जमीनही अशुद्धच समजावी; किंवा जेथें वेदबाह्य असे दुर्जन राहातात, तेंही स्थान अपवित्र होय ८९. जे भूमी केवळ उखर । ते जाण सदा अपवित्र । आतां काळाचें काळतंत्र । पवित्रापवित्र सांगेन ॥ ९० ॥ जी जमीन केवळ खडकाळ असते, तीही सदा अपवित्रच होय. आता काळाच्या तंत्राचीही पवित्रापवित्रता सांगतों ९०. कर्मण्यो गुणवान्कालो द्रव्यतः स्वत एव वा । यतो निवर्तते कर्म स दोषोऽकर्मकः स्मृतः ॥ ९ ॥ देश काळ द्रव्य पात्र । हे सामग्री होय स्वतंत्र । तोचि काळ अतिपवित्र । वेदशास्त्रसंमत ॥ ९१ ॥ ज्या काळी देश, काल, द्रव्य आणि पात्र ही सामुग्री स्वतंत्रपणे मिळेल तोच काळ अत्यंत पवित्र असून वेदशास्त्राला संमत आहे ९१. ग्रहणकपिलाषष्ठ्यादिद्वारा । तो काळ परम पवित्र खरा । कां संतसज्जन आलिया घरा । काळाचा उभारा अतिपवित्र ॥ ९२ ॥ ग्रहण, कपिलाषष्ठी , इत्यादि पर्वांच्या द्वारें जो काळ येतो, तो काळ परम पवित्र होय. तसेंच संतसज्जन घरी आले असतां तो काळ अत्यंत पवित्र समजावा ९२. हो कां संपत्ति आलिया हाता । कां धर्मी उल्हास जेव्हां चित्ता । तो 'पुण्यकाळ' तत्त्वतां । वेदशास्त्रार्थां अनुकूल ॥ ९३ ॥ किंवा अकल्पितपणे संपत्ति मिळाली, किंवा धर्म करण्याचा चित्ताला उल्हास वाटला, तो काळ खरोखर 'पुण्यकाळ' असून वेदशास्त्रांनाही मान्य असतो ९३. पुरुषासी पर्वकाळ । जन्मात जोडे एकवेळ । मातापित्यांचा अंतकाळ । ते धर्माची वेळ अपवित्र ॥ ९४ ॥ खरा पर्वकाळ पुरुषाला जन्मामध्ये एकच वेळ प्राप्त होत असतो. तो कोणता ? तर मातापित्याचा अंतकाळ ! ती धर्माची अत्यंत पवित्र वेळ म्हणून समजावी ९४. हा पर्वकाळ मागुता । पुरुषासी नातुडे सर्वथा । तेथ श्रद्धेनें धर्म करितां । पवित्रता अक्षय ॥ ९५ ॥ हा पर्वकाळ पुरुषाला पुन्हा मिळत नसतो. अशा वेळी श्रद्धापूर्वक धर्म केल्यास अक्षय पवित्रता प्राप्त होते ९५. स्वभावें काळाची पवित्रता । तुज मी सांगेन आतां । जो उपकारी सर्वथा । निजस्वार्था साधक ॥ ९६ ॥ आता काळाची स्वाभाविक पवित्रता कोणती ती मी तुला सांगतो. तो काळ सर्वोपरी उपकारक व साधकाचा निजस्वार्थ साधणारा आहे ९६. ब्राह्म मुहूर्त तत्त्वतां । पवित्र जाण स्वभावतां । जो साधकांच्या निजस्वार्था । होय वाढवितां अनुदिनीं ॥ ९७ ॥ खरोखर 'ब्राह्ममुहूर्त' म्ह० पहाटे सूर्योदयापूर्वीच्या पांच घटका, हा स्वभावतांच पवित्र होय; ती वेळ साधकाच्या हिताची असून दिवसेंदिवस हिताची वृद्धीच करीत असते ९७. काळाची अकर्मकता । ऐक सांगेन मी आतां । कर्म करूं नये स्वभावतां । निषिद्धता महादोषु ॥ ९८ ॥ आतां कर्माला अयोग्य काळ कोणता तेंही सांगतों ऐक. अशा वेळी स्वभावतां कर्म करूंच नये, कारण तो काळ निषिद्ध असल्यामुळे मोठा दोष लागतो ९८. जेथ जळस्थळादि सर्वथा । विहित द्रव्य न ये हाता । तो काळ अकर्मकता । जाण तत्त्वतां निश्चित ॥ ९९ ॥ ज्या ठिकाणी जळ, स्थळ किंवा विहित द्रव्यही मिळत नसेल, तो काळ खरोखर कर्म करण्यास योग्य नव्हे हे लक्षात ठेव ९९. जो काळ सूतकें व्यापिला । कां राष्ट्र-उपप्लवें जो आला । जे काळीं देह परतंत्र झाला । तो काळ बोलिला अकर्मक ॥ १०० ॥ ज्या काळांत सुतक असेल, किंवा राष्ट्रावर कांहीं संकट ओढवले असेल किंवा ज्या वेळी देहाला परतंत्रता आलेली 'असेल, तो कालही कर्म करण्यास योग्य नव्हे असे म्हटलेलें आहे १००. जो काळ दुर्भिक्षासी आला । जो कां ज्वरादिदोषीं दूषिला । जो काळ चोराकुलित झाला । तो काळ बोलिला अकर्मक ॥ १ ॥ ज्या काळांत दुष्काळ येतो, तापाची सांथ वगैरे येऊन जो काळ दूषित झालेला असतो, ज्या काळांत चोरांचा सुळसुळाट असतो, तो काळही कर्म करण्यास योग्य नव्हे १. जे काळीं क्रोध संचरला । जेथ तमोगुण क्षोभला । निद्राआलस्यें व्यापिला । तो काळ बोलिला अकर्मक ॥ २ ॥ ज्या वेळेला राग आलेला असतो, किंवा तमोगुण खवळलेला असतो, निद्रेनें आणि आळसाने ज्यांत ठाणे दिलेले असते, तो काळही कर्म करण्यास योग्य नव्हे असे म्हणतात २. अकस्मात सुखसंपदा । कां अभिनव वार्ता एकदा । कां लंघिजे भल्याची मर्यादा । तो काळ सर्वदा अकर्मक ॥ ३ ॥ अकस्मात् सुखसंपदा मिळाली; किंवा कधीं न ऐकलेली गोष्ट कानांवर आली, किंवा सज्जनांच्या मर्यादेचा भंग झाला, तर तो काळ कर्म करण्याला कधीच योग्य नव्हे ३. कां मार्गीं विषमता । पंथ क्रमिजे चालतां । तेथ पडे दुर्धर्षता । तो काळ तत्त्वतां अकर्मक ॥ ४ ॥ किंवा वाट चालतांना मार्गामध्ये काहीं संकट आले, त्यामुळे जीवावर येऊन बेतले, तर तो काळही खरोखर कर्म करण्यास योग्य नव्हे ४. जे काळीं द्रव्यलोभ दारुण । जे काळीं चिंता गहन । केव्हां विकल्पें भरे मन । तो काळ जाण अकर्मक ॥ ५ ॥ ज्या वेळी द्रव्याचा अतिशय लोभ सुटतो, ज्या वेळेस जिवाला अत्यंत काळजी वाटते, विकल्पाने जेव्हां मन भरून जाते, त्या वेळीही कर्म करणे उचित नव्हे ५. ऐशी काळाची अकर्मकता । तुज म्यां सांगितली तत्त्वतां । आतां द्रव्याची शुद्धाशुद्धता । ऐक सर्वथा सांगेन ॥ ६ ॥ अशा प्रकारे कर्माला अनुचित काल कोणता तें तुला बरोबर सांगून दिले. आता द्रव्याची शुद्धाशुद्धताही सविस्तर सांगतों ऐक ६. द्रव्यस्य शुद्ध्यशुद्धी च द्रव्येण वचनेन च । संस्कारेणाथ कालेन महत्त्वाल्पतयाऽथवा ॥ १० ॥ पुरुषें गोमूत्र सेवितां । तत्काळ पावे पवित्रता । तेंचि ताम्रपात्रें घेतां । ये अपवित्रता तत्काळ ॥ ७ ॥ पुरुषाने गोमूत्र प्राशन केले असतां तत्काळ पवित्रता येते; पण तेच तांब्याच्या भांड्यांतून घेतले असतां तत्काळ अपवित्र होते ७. पुरुषें जळ प्रोक्षितां । पुष्पांसी ये पवित्रता । तेंचि पुरुषें अवघ्राणीतां । अपवित्रता पुष्पासी ॥ ८ ॥ पुरुषाने जलप्रोक्षण केले असतां पुष्पांना पवित्रता येते ; तेंच फूल पुरुषाने हुंगले तर त्याला अपवित्रता येते ८. अग्नीची सेवा करितां । द्विजासी परम पवित्रता । तोचि द्विज अग्निहोत्रें जाळितां । ये अपवित्रता अग्नीसी ॥ ९ ॥ अग्नीची सेवा केली असतां ब्राह्मणाला पवित्रता येते; पण तोच ब्राह्मण अग्निहोत्राने जाळला असता त्या अग्नीला अपवित्रता येते ९. दर्भीं पिंड ठेवितां पवित्र । पिंडस्पर्शें दर्भ अपवित्र । ऐशी शुद्ध्यशुद्धी विचित्र । बोले धर्मशास्त्र श्रुत्यर्थें ॥ ११० ॥ दर्भावर पिंड ठेवला असतां तो पवित्र होतो, परंतु पिंडाचा स्पर्श झाल्याने दर्भ अपवित्र होतात. श्रुतीला अनुसरून धर्मशास्त्र वस्तूची शुद्धयशुद्धि अशी विचित्र सांगते ११०. जे वस्तु संशयापन्न । त्याच्या शुद्धीसी ब्राह्मणवचन । ज्यांचे वचन प्रमाण । हरिहर जाण मानिती ॥ ११ ॥ जी वस्तु संशयापन्न असते, तिच्या शुद्धीला ब्राह्मणवचन पुरे होते. कारण, ब्राह्मणवचन हरिहरांनासुद्धा मान्य होते ११. घृतसंस्कारें शुद्ध अन्न । होमसंस्कारें नवधान्य । अग्निसंस्कारें लवण । पवित्र जाण शास्त्रार्थें ॥ १२ ॥ तुपाच्या संस्काराने अन्न शुद्ध होतें होमाच्या संस्कारानें नवधान्ये शुद्ध होतात; आणि अग्नीच्या संस्काराने मीठ पवित्र होते, असा शास्त्रार्थ आहे १२. राकारापुढें मकार । मांडूनि करितां उच्चार । जिणोनि पापांचा संभार । होय तो नर शुद्धात्मा ॥ १३ ॥ 'रा' ह्या अक्षरापुढे 'म' अक्षर घालून उच्चार केला तर पातकांचा भार नाहीसा होऊन तो पुरुष शुद्धात्मा होतो १३. त्याचि मकारापुढें द्यकार । ठेवूनि करितां उच्चार । अंगीं आदळे पाप घोर । तेणें होय नर अतिबद्ध ॥ १४ ॥ त्याच मकारापुढे ' द्य , अक्षर ठेवून उच्चार केला असतां घोर पातक येऊन डोक्यावर आदळते. आणि तेणेकरून तो पुरुष अत्यंत बद्ध होतो १४ . रजस्वला शुद्ध चरुर्थाहानीं । मेघोदक शुद्ध तिसरे दिनीं । वृद्धिसूतक दहावे दिनीं । काळ शुद्धपणीं या हेतू ॥ १५ ॥ रजस्वला ही चौथ्या दिवशी शुद्ध होते, मेघोदक तिसऱ्या दिवशी शुद्ध होते. वृद्धि किंवा सुतक दहाव्या दिवसानंतर निवृत्त होते. अशा रीतीने कालाची शुद्धता आहे १५. पूर्व दिवशींचें जें अन्न । तें काळेंचि पावे गा दूषण । ज्यासी आलें शिळेपण । तें अन्न जाण अशुद्ध ॥ १६ ॥ आधल्या दिवशींचें अन्न काळानेच दूषित होते. आणखी ज्याला शिळेपणा आला, ते अन्नही अशुद्ध ठरतें १६. तैसें नव्हे घृतपाचित । तें बहुत काळें तरी पुनीत । जें विटोनि विकारी होत । तें अपुनीत काळेंचि ॥ १७ ॥ तुपात तळलेल्या अन्नाची गोष्ट मात्र तशी नाही. ते पुष्कळ दिवसपर्यंतही शुद्ध राहाते. जें विटून जाऊन आंबते, ते तत्काळ अपवित्रच होते १७. जें सांचवणीं अल्प जळ । त्यासी स्पर्शला चांडाळ । तें अपवित्र गा सकळ । नये अळुमाळ स्पर्श करूं ॥ १८ ॥ जें सांचवणीचे व थोडेसे पाणी असेल. त्याला चांडाळाने स्पर्श केला, तर तें निखालस अपवित्र होते. त्याला मुळीच स्पर्श करूं नये १८. तेंचि निर्झर कां अक्षोभ जळ । तेथ स्पर्शल्याही चांडाळ । त्यासी लागेना तो विटाळ । तें नित्य निर्मळ पवित्र ॥ १९ ॥ पण तेच पाणी झऱ्याचे किंवा डोहातले असेल तर त्याला चांडाळाने स्पर्श केला तरी त्याला विटाळ होत नाही. ते नित्य निर्मळ व पवित्रच असते १९. अल्प केलिया स्वयंपाक । त्यासी जैं आतळे श्वान काक । तैं तें सांडावें निःशेख । अपवित्र देख तें अन्न ॥ १२० ॥ थोडा स्वयंपाक केलेला असला आणि त्याला कुत्रे किंवा कावळा शिवला तर तो साराच्या सारा स्वयंपाक टाकून दिला पाहिजे. कारण, तें अन्न अपवित्र होतें १२०. तोचि सहस्त्रभोजनाचा पाक । त्यासी आतळल्या श्वान कां काक । सांडावें जेथ लागलें मुख । येर अन्न निर्दोख भोजनी ॥ २१ ॥ तोच स्वयंपाक सहस्रभोजनाचा असून त्याला कुत्रे किंवा कावळा शिवेल, तर त्यांचे तोंड ज्या ठिकाणी लागलेले असेल तेवढे अन्न काढून टाकावे. बाकीच्या अन्नाचे भोजन करण्यांत दोष नाही २१. शक्त्याअशक्त्या अथवा बुद्ध्या समृद्ध्या च यदात्मने । अघं कुर्वन्ति हि यथा देशावस्थानुसारतः ॥ ११ ॥ झालिया चंद्रसूर्यग्रहण । शक्तें स्नान न करितां दूषण । बाळक वृद्ध आतुर जन । न करितां स्नान दोष नाहीं ॥ २२ ॥ चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण आले असतां, निरोग्याने स्नान न केल्यास त्याला दोष लागतो; परंतु बालक, वृद्ध आणि रोगी ह्यांनी स्नान न केले तरी दोष नाही २२. पुत्र जन्मलिया देख । स्वगोत्रज जे सकळिक । त्यांसी जाण आवश्यक । बाधी सूतक दहा दिवस ॥ २३ ॥ पुत्र जन्मला असतां सारे भाऊबंद असतात, त्यांना दहा दिवस सुतकाची (सुवेराची) बाधा अवश्य आहे २३. तेंचि स्थळांतरीं पुत्रश्रवण । सूतकाअंतीं झाल्या जाण । त्या सूतकाचें बंधन । न बाधी जाण सर्वथा ॥ २४ ॥ तेच देशांतर असून सुतक संपल्यावर पुत्रजन्म झाल्याचे कळेल, तर त्याला सुतक पाळण्याचे मुळींच बंधन नाही २४. पूर्वदिनीं गोत्रज मरे । तें स्वगोत्रीं सूतक भरे । येरे दिवशीं दुसरा जैं मरे । तैं सूतकें सूतक उतरे दोहींचेंही ॥ २५ ॥ आधल्या दिवशी एखादा भाऊबंद मरण पावला तर त्याच्या गोत्रजांना सुतक येते. पण दुसऱ्या दिवशी जर दुसरा कोणी मेला, तर पहिल्या सुतकांतच दुसऱ्याचे सुतक फिटून जातें २५. जेणें घेतलें होय विख । त्यासी सर्पु लाविलिया देख । तेणें विखें उतरे विख । तेवीं सूतकें सूतक निवारे ॥ २६ ॥ ज्याने विष घेतलेले असते त्याला जर साप चावविला, तर त्याच्या विषाने पहिले विष उतरते. त्याप्रमाणे सुतकानेच सुतक नष्ट होतें २६. जें बुद्धीपूर्वक केलें आपण । तें अवश्य भोगावें पापपुण्य । जें बुद्धीसी नाही विद्यमान । तें अहेतुकपणें बाधिना ॥ २७ ॥ आपण जें बुद्धिपूर्वक पाप किंवा पुण्य केलेले असते, त्याचे फळ अवश्य भोगावे लागते, परंतु जें बुद्धीला माहीत नसते, ते अहेतुकपणाने झालेले असल्यामुळे बाधक होत नाहीं २७. आपुलें जें अंतःकरण । त्यासी पवित्र करी निजज्ञान । हे 'बुद्धीची शुद्धि' जाण । विवेकसंपन्न वैराग्यें ॥ २८ ॥ आपलें जें अंत:करण आहे, त्याला आत्मज्ञान पवित्र करतें; हीच विवेकयुक्त वैराग्याची 'बुद्धीची शुद्धि' होय २८. जो धनवंत अतिसंपन्न । त्यासी जुनें वस्त्र अपावन । शिविलें दंडिलें तेंही जाण । नव्हे पावन समर्था ॥ २९ ॥ जो धनाढ्य म्ह० अत्यंत श्रीमंत असेल त्याने जुनें वस्त्र परिधान करणे अपवित्र होय. शिवलेले किंवा दंड भरलेले धोतरही श्रीमंतांना पवित्र नव्हे २९. तेंचि दुर्बळाप्रति जाण । अतिशयें परम पावन । हे वेदवाद अतिगहन । स्मृतिकारीं जाण प्रकाशिले ॥ १३० ॥ तेंच गरिबाला अतिशय पवित्र होते. हें वेदांतील रहस्य फार खोल आहे. तें स्मृतिकारांनी विशद करून ठेवले आहे १३०. समर्थासी असाक्षी भोजन । तें जाणावें अशुद्धान्न । दुर्बळासी एकल्या अशन । परम पावन श्रुत्यर्थें ॥ ३१ ॥ कोणी पंक्तीला न घेतां श्रीमंतांनी जेवणें तें अशुद्ध अन्न म्हणून समजावें; पण गरिबाने एकट्याने जेवणे हे अत्यंत पवित्र असें वेदानेंच म्हटले आहे ३१. स्वयें न करितां पंचयज्ञ । भोजन तें पापभक्षण । सकळ सुकृतासी नागवण । जैं पराङ्मुेखपण अतिथीसी ॥ ३२ ॥ पंचमहायज्ञ न करतां भोजन केले असतां पातक भक्षण केल्याप्रमाणे आहे. अतिथीला विन्मुख दवडला तर साऱ्या पुण्यावर पाणी पडते ! ३२. स्वग्रामीं सर्वही स्वाचार । ग्रामांतरीं अर्थ आचार । पुरीं पट्टणीं पादमात्र । मार्गीं कर्मादर संगानुसारें ॥ ३३ ॥ आपल्या गांवांत राहात असतांना सारे आचार पाळावे; परगांवीं गेलें असतां अर्धे आचार करावे ! एखाद्या शहरांत किंवा नगरांत गेले असतां एकचतुर्थांश आचार पाळावे. आणि मार्गामध्ये म्ह० प्रवासांत संगतीच्या लोकानुसार कर्म करीत असावें (आग्रह धरूं नये) ३३. विचारोनि देशावस्था । हे धर्ममर्यादा तत्त्वतां । याहूनि अन्यथा करितां । दोष सर्वथा कर्त्यासी ॥ ३४ ॥ देशकाळाचा व परिस्थितीचा विचार करूनच ही मर्यादा धर्मशास्त्राने लावून दिली आहे. याहून भिन्न आचरण केले असतां कर्त्याला सर्वथा दोषच लागेल ३४. पाटव्य असतां स्वदेहासी । कर्म न करी तो महादोषी । रोगें व्यापिल्या शरीरासी । कर्मकर्त्यासी अतिदोष ॥ ३५ ॥ देहांत कर्म करण्याचे सामर्थ्य असून जो कर्म करणार नाही त्याला मोठा दोष लागतो; तसेच शरीर रोगाने व्यापलेले असतां कर्म करणारा अतिशय दोषी होतो ३५. पूर्वीं द्रव्याद्रव्यशुद्धी । सांगितली यथाविधी । तेचि मागुतेनि प्रतिपादी । धर्मशास्त्रसिद्धी वेदोक्त ॥ ३६ ॥ आतापर्यंत वस्तूंची शुद्धि व अशुद्धि विधिपूर्वक सांगितली. तीच वेदोक्त धर्मशास्त्राला धरून पुन्हा प्रतिपादन करतात ३६. धान्यदार्वस्थितन्तूनां रसतैजसचर्मणाम् । कालवाय्वग्निमृत्तोयैः पार्थिवानां युतायुतैः ॥ १२ ॥ शूद्र प्रतिग्रहाचें धान्य । एकरात्रीं शुद्ध जाण । स्त्रुक्स्त्रुवादिकाष्ठभाजन । जलप्रक्षालनें शुद्धत्व ॥ ३७ ॥ शुद्रानें दान दिलेले धान्य एक रात्रीने शुद्ध होते. स्त्रुक्, स्त्रुवा इत्यादि जी लाकडाची पात्रे असतात, ती पाण्याने धुतली म्हणजे शुद्ध होतात ३७. व्याघ्रनख गजदंत । अपवित्र जंव स्नेहयुक्त । जेव्हा होती स्नेहतीत । अतिपूनीत ते काळीं ॥ ३८ ॥ वाघाची नखे आणि हस्तिदंत हे ओलसर असतात तोपर्यंत अशुद्ध होत. तेच वाळले की अत्यंत पवित्र होतात ३८. पट्टतंतु स्वयें पुनीतु । वायूनें शुद्ध ऊर्णातंतु । वस्त्रतंतु जळाआंतु । होय पुनीतु प्रक्षाळिल्या ॥ ३९ ॥ रेशमाचे धागे मूळचेच शुद्ध असतात. लोकरीचे तंतू वायूनें शुद्ध होतात, आणि कापसाच्या वस्त्राचे तंतु पाण्यांत धुतले म्हणजे शुद्ध होतात ३९. गोक्षीर पवित्र कांस्यमृत्पात्रीं । तेंचि अपवित्र ताम्रपात्रीं । ताम्र पवित्र आम्लेंकरीं । आम्ल लवणांतरीं पवित्र ॥ १४० ॥ गाईचे दूध कांशाच्या भांड्यात किंवा मडक्यात ठेवल्याने पवित्र होते ; तेच तांब्याच्या भांड्यात ठेवले तर अपवित्र होतें. चिंच वगैरे आंबट पदार्थाने ताबें स्वच्छ होते व मिठानें आंबट पदार्थ शुद्ध होतात १४०. घृत पवित्र अग्निसंस्कारीं । अग्नि पवित्र ब्राह्मणमंत्रीं । ब्राह्मण पवित्र स्वाचारीं । पवित्रता आचारीं वेदविधीं ॥ ४१ ॥ तूप हे अग्निसंस्काराने शुद्ध होतें; अग्नि ब्राह्मणाच्या मंत्रांनी पवित्र होतो, ब्राह्मण स्वधर्माचरणाने पवित्र होतो; आणि धर्माचरण वेदविधीनें पवित्र होतें ४१. वेद पवित्र गुरुमुखें । गुरु पवित्र निजात्मसुखें । आत्मा पवित्र गुरुचरणोदकें । पवित्र उदकें द्विजचरणीं ॥ ४२ ॥ वेद गुरुमुखाने पवित्र होतो, गुरु आत्मानंदाने पवित्र होतो, आत्मा (जीव) गुरुचरणोदकानें पवित्र होतो, आणि उदक ब्राह्मणांच्या चरणाने पवित्र होतें ४२. पृथ्वी पवित्र जळसंस्कारीं । जळ पवित्र पृथ्वीवरी । चर्म पवित्र तैलेंकरीं । तेल चर्मपात्रीं पवित्र ॥ ४३ ॥ सडासंमार्जनाने पृथ्वी पवित्र होते : मातीने जल पवित्र होते : तेलाने चामडे पवित्र होते; आणि चामड्याच्या पात्रांत ठेवल्याने तेल पवित्र होतें ४३. व्याघ्रादि जें मृगाजिन । इयें स्वभावें पवित्र जाण । अग्निसंस्कारें सुवर्ण । पवित्रपण स्वभावें ॥ ४४ ॥ व्याघ्रांबर, कृष्णाजिन वगैरे चामडी मुळचींच पवित्र असतात असे समज. अग्निसंस्काराने सुवर्ण सहजच पवित्र होते ४४. एवं इत्यादि परस्परीं । शुचित्व बोलिलें स्मृतिशास्त्रीं । आतां मळलिप्त झालियावरी । त्यांचेही अवधारीं शुचित्व ॥ ४५ ॥ अशा प्रकारें परस्पर पदार्थांनी परस्परांस पवित्रपणा येत असल्याचे स्मृतिशास्त्रांत सांगितले आहे. आता मलानें लिप्त झाल्यानंतर त्याला कसा पवित्रपणा येतो तो ऐक ४५. अमेध्यलिप्तं यद्येन गन्धं लेपं व्यपोहति । भजते प्रकृतिं तस्य तच्छौचं तावदिष्यते ॥ १३ ॥ पात्र पीठ कां आसन । अमेध्यलिप्त झाल्या जाण त्या गंधाचें निःशेष क्षालन । तेणें पवित्रपण तयासी ॥ ४६ ॥ भांडे, चौरंग किंवा कसलेही आसन अमंगल पदार्थानें लिप्त झाले असता त्याची दुर्गधी जाईपर्यंत त्यास धुतले की पवित्रपणा येतो ४६. नाभीखालता ज्याच्या शरीरा । अमेध्यलेप लागल्या खरा । ते ठायींचा गंधु जाय पुरा । ऐसें धुतल्या त्या नरा शुचित्व लाभे ॥ ४७ ॥ शरीराला नाभीच्या खाली अमंगल पदार्थाचा लेप लागला असेल त्या ठिकाणची दुर्गंधी निखालस जाईपर्यंत धुतले म्हणजे त्या पुरुषाला पवित्रता येते ४७. नाभीवरतें अमेध्यलेपन । अवचटें झालिया जाण । तैं करावें मृत्तिकास्नान । तेणें पावन तो पुरुष ॥ ४८ ॥ नाभीच्यावर अकस्मात् अमंगल पदार्थाचा लेप लागला, तर मृत्तिकास्नान करावें; म्हणजे तो पुरुष पवित्र होतो ४८. मळ धुतल्या तत्काळ जाती । परी त्या गंधाची होय निवृत्ती । प्रकृति पावे जैं निजस्थिती । 'मळनिष्कृति' त्या नांव ॥ ४९ ॥ मळ धुतले म्हणजे तत्काळ जातात; पण त्याचा वास जाईल तेव्हांच ते अंग पहिल्याप्रमाणे होते आणि त्याचंच नांव 'मलनिष्कृति' ४९ . बाह्य पदार्थ निवृत्तिनिष्ठें । वेद बोलिला या खटापटें । आतां कर्त्याचें शुचित्व प्रकटे । ते ऐक गोमटे उपाय ॥ १५० ॥ बाह्य पदार्थांच्या मलनिवृत्तीसाठींच वेदाने एवढे सांगण्याची खटपट केली. आतां कर्त्यांच्या पवित्रतेसंबंधाने उत्तम उपाय सांगतो ते ऐक १५०. स्नानदानतपोऽवस्थावीर्यसंस्कारकर्मभिः । मत्स्मृत्या चात्मनः शौचं शुद्धः कर्माचरेद्द्विजः ॥ १४ ॥ गर्भधानादि अन्नप्राशन । ते बाल्यावस्था संपुर्ण । चौल तें कुमारावस्था जाण । ब्राह्मणपण उपनयनें ॥ ५१ ॥ गर्भाधानापासून अन्नप्राशन संस्कार होतात ती बाल्यावस्था होय. चौल संस्कार होतो ती कुमारावस्था होय. आणि उपनयनसंस्काराने ब्राह्मणपणा येतो ५१. कर्मभूमिकेलागीं स्नान । द्रव्यशुद्धीलागीं कीजे दान । वैराग्यलागीं तप जाण । कर्माचरण जडत्वत्यागा ॥ ५२ ॥ कर्माधिकार येण्यासाठी स्नान करावें ; द्रव्यशुद्धीसाठी दान करावें: वैराग्यासाठी तप करावें; आणि आलस्य जाण्यासाठी कर्म करावें ५२. माझिया भजनीं दृढबुद्धि । त्या नांव जाण 'वीर्यशुद्धि' । माझेनि स्मरणें 'चित्तशुद्धि' । जाण त्रिशुद्धि उद्धवा ॥ ५३ ॥ माझ्या भजनाच्या ठिकाणी दृढबुद्धि असणे ह्याचें नांव 'वीर्यशुद्धि'; आणि माझ्या अविरत स्मरणाने 'चित्तशुद्धि' निश्चयेंकरून प्राप्त होते ५३. ऐसऐेसिया विधीं । ब्राह्मण जे कां सुबुद्धी । सबाह्य पावावया शुद्धी । वेद उपपादी स्वकर्में ॥ ५४ ॥ जे बुद्धिमान् ब्राह्मण असतील त्यांनी अशा अशा रीतीने अंतर्बाह्य शुद्ध व्हावे, म्हणून वेदानें आपआपली कमैं सांगितली आहेत ५४. मंत्रस्य च परिज्ञानं कर्मशुद्धिर्मदर्पणम् । धर्मः संपद्यते षड्भिरधर्मस्तु विपर्ययः ॥ १५ ॥ मंत्रशुद्धि मंत्रार्थज्ञानें । कर्मशुद्धि ब्रह्मार्पणें । इयें कर्त्याचे शुद्धीकारणें । साही लक्षणें वेदु बोले ॥ ५५ ॥ मंत्रार्थज्ञानाने मंत्रशुद्धि होते; ब्रह्मार्पणाने कर्मशुद्धि होते ; कर्त्याच्या शुद्धीसाठीही सहा लक्षणे वेदाने सांगितली आहेत ५५. देश-काळ-द्रव्यसंपन्नता । मंत्र-कर्म-निरुज कर्ता । या साहींच्या शुद्धावस्था । स्वधर्मता फलोन्मुख ॥ ५६ ॥ देश, काल, द्रव्यसंग्रह, मंत्र, कर्म आणि निरोगी कर्ता ह्या सहांच्या अवस्था शुद्ध असल्या म्हणजे स्वधर्म हा फलद्रूप होतो ५६. जें द्रव्य पावे दीनांचे आर्ता । कां माझिया निजभक्तां । या नांव 'द्रव्यपवित्रता' । जाण तत्त्वतां निश्चित ॥ ५७ ॥ अनाथ, दीन लोकांच्या संकटसमयीं जें द्रव्य पोचतें, किंवा माझ्या भक्ताकडे जातें, तीच खरोखर 'द्रव्याची पवित्रता' होय ५७. धर्मशास्त्रार्थें शुद्ध धन । कष्टें मिळवूनियां आपण । धनलोभीं ठेविल्या प्राण । अवघेंचि जाण अशुद्ध ॥ ५८ ॥ स्वतः कष्टाने मिळविलेले द्रव्य धर्मशास्त्रानुसार शुद्ध होय; पण धनलोभांत जीव गुंतलेला असला तर ते सारें द्रव्य अशुद्ध होय ५८. या नांव 'द्रव्यशुद्धता' । ऐक मंत्राची पवित्रता । जेणें मंत्रें पाविजे मंत्रार्था । शुद्ध सर्वथा तो मंत्र ॥ ५९ ॥ ह्यालाच द्रव्याची शुद्धि म्हणतात. आता मंत्राची पवित्रता ऐक, ज्या मंत्राने मंत्राचा अर्थ साध्य होतो, तोच मंत्र सर्वथा शुद्ध होय ५९. जेथ केलिया मंत्रग्रहण । अंगीं चढता वाढे अभिमान । कां जेथ जारण-मारण-उच्चाटण । तें मंत्र जाण अपवित्र ॥ १६० ॥ जो मंत्र घेतला असतां अंगामध्ये चढता अभिमान वाढतो, किंवा ज्यांत जारण मारण उच्चाटण इत्यादि असते, ते मंत्र अपवित्र होत १६०. या नांव 'मंत्रशुद्धि' जाण । ऐक कर्माचें लक्षण । जेणें कर्में तुटे कर्मबंधन । तें कर्माचरण अतिशुद्ध ॥ ६१ ॥ ह्याप्रमाणे 'मंत्रशुद्धि' सांगितली. आतां कर्माचे लक्षण ऐक. तर ज्या कर्माच्या योगाने कर्मबंधन तुटते, तें कर्माचरण अत्यंत शुद्ध होय ६१. स्वयें करितां कर्माचरण । जेणें खवळें देहाभिमान । कर्त्यासी लागे दृढ बंधन । तें कर्म जाण अपवित्र ॥ ६२ ॥ स्वतः कर्माचरण करीत असतां ज्यांत देहाभिमान खवळतो, आणि कर्त्याचे बंधन अधिक दृढ होते, तें कर्म अपवित्र होय ६२. जेणें कर्में होय कर्माचा निरास । तें शुद्ध कर्म सावकाश । जेथ समबुद्धि सदा अविनाश । तो 'पुण्यदेश' उद्धवा ॥ ६३ ॥ ज्या कर्माने कर्माचा निरास होतो, तेंच कर्म खरोखर शुद्ध होय, आणखी उद्धवा! जेथें सदासर्वदा अविनाश समबुद्धि असते, तो देश पुण्यवंत होय ६३. जरी सुक्षेत्रीं केला वास । आणि पराचे देखे गुणदोष । तो देश जाणावा तामस । अचुक नाश कर्त्यासी ॥ ६४ ॥ सुक्षेत्रांतही वास केला, आणि तेथेही दुसऱ्याचे गुणदोष दिसू लागले, तर तो देशही तामस म्हणून समजावा. त्याच्या योगाने कर्त्यांचा अचूक नाश होतो ६४. अन्य क्षेत्रीं देखिल्या दोष । त्याचा सुक्षेत्रीं होय नाश । सुक्षेत्रीं देखिल्या दोष । तो न सोडी जीवास कल्पांतीं ॥ ६५ ॥ अन्य क्षेत्रांत दोष पाहिले तर त्यांचा उत्तम क्षेत्रांत नाश होतो; परंतु उत्तम क्षेत्रांतच दोष पाहिले तर ते मात्र कल्पांतीही जीवाला सोडीत नाहीत ६५, जेथ उपजे साम्यशीळ । तो देश जाणावा निर्मळ । चित्त सुप्रसन्न जे वेळ । तो 'पुण्यकाळ' साधकां ॥ ६६ ॥ जेथें ऐक्यभाव उत्पन्न होतो, तो देश निर्मळ म्हणून समजावा; आणि चित्त सुप्रसन्न असलेली जी वेळ, तोच साधकाचा पुण्यकाळ जाणावा ६६. स्वभावें शुद्ध ब्राह्ममुहूर्त । तेथही क्षोभल्या चित्त । तोही काळ अपुनीत । जाण निश्चित वेदार्थ ॥ ६७ ॥ 'ब्राह्ममुहूर्त ' म्हणजे पहाटेची (अखेरची पांच घटका रात्रीची) वेळ ही स्वभावतःच शुद्ध होय. त्यांतही चित्तक्षोभ होईल तर तोही काळ खरोखर अपवित्र होय, असें वेदार्थांचे म्हणणे आहे ६७. येथ जो कां कर्मकर्ता । त्याची गेलिया कर्मअतहंता । पुढें कर्म चाले स्वभावतां । हे 'पवित्रता कर्त्याची' ॥ ६८ ॥ आता जो कर्मकर्ता असतो त्याची कर्मांची अहंता नष्ट झाली, तरच तें कर्म स्वाभाविकपणे चालते. हीच कर्त्याची पवित्रता होय ६८. येथ जो म्हणे ' अहं कर्ता ' । तो पावे अतिबद्धता । हे कर्त्याची अपवित्रता । देहअरहंता अभिमानें ॥ ६९ ॥ त्यांत जो कोणी 'मीच कर्ता' असें म्हणेल, तो अत्यंत बद्ध होतो. देहअहंतेच्या अभिमानामुळे कर्ता अपवित्र होतो ६९. धर्मधर्माचे साही प्रकार । हें वेदार्थाचें तत्त्वसार । येही धर्मीं मुक्त होय नर । अधर्मीं अपवित्र अतिबद्ध ॥ १७० ॥ ह्याप्रमाणे धर्माधर्माचे सहा प्रकार आहेत. हेच वेदार्थांच्या तत्त्वांतील सार आहे. याच धर्मानें पुरुष मुक्त होतो, व अधर्मानें अपवित्र होऊन मोठे बंधन पावतो १७०. गुणदोषांचें लक्षण । सांगतां अतिगहन । येथ गुंतले सज्ञान । अतिविचक्षण पंडित ॥ ७१ ॥ ह्याप्रमाणे गुणदोषांचे लक्षण सांगू लागले तर फार खोल आहे. त्यांत मोठमोठे ज्ञानी, अत्यंत चतुर पंडितसुद्धा घोटाळ्यांत पडतात ७१. क्वचिद्गु"णोऽपि दोषः स्याद्दोषोऽपि विधिना गुणः । गुणदोषार्थनियमस्तद्भिदामेव बाधते ॥ १६ ॥ ज्याचा मानिजे उत्तम गुण । तोचि दोष होय परतोन । एवं कर्मचि कर्मासी जाण । दोष दारुण उपजवी ॥ ७२ ॥ एखाद्याचा एक गुण उत्तम म्हणावा तर तोच फिरून दोष ठरतो! याप्रमाणे कर्मच कर्मामध्ये भयंकर दोष उत्पन्न करते ७२. कर्मीं मुख्यत्वें गा आचमन । हें कर्मशुद्धीचें निजकारण । तेंचि दक्षिणाभिमुखें केल्या जाण । दोष दारुण उपजवी ॥ ७३ ॥ कर्मामध्ये आचमन करणें हें मुख्य आहे. कारण हेच कर्म शुद्धीचे मूळ होय; पण तेंच दक्षिणेस तोंड करून केल्यास मोठा दोष उत्पन्न होतो ७३. कानींची जेणें जाय तिडिक । तेंचि मुखीं घालितां देख । होय अत्यंत बाधक । प्राणांतिक अतिबाधा ॥ ७४ ॥ कानाची तिडीक ज्याने कमी होते. तेच (औषध) तोंडांत घातल्यास अतिशय पीडा होऊन प्राणांतिक समय प्राप्त होतो ७४. आचमनीं माषमात्र जीवन । घेतल्या होईजे पावन । तेंचि अधिक घेतां जाण । सुरापानसम दोष ॥ ७५ ॥ आचमन करतांना उडीद बुडेल इतकेच पाणी घेतल्यास तो पुरुष पवित्र होतो; पण तेच अधिक घेतल्यास मद्यपानाचा दोष लागतो ! ७५. फणस खातां लागे गोड । तें जैं अधिक खाय तोंड । तैं शूळ उठे प्रचंड । फुटे ब्रह्मांड अतिव्यथा ॥ ७६ ॥ फणस खातांना गोड लागतो, पण तोच जर तोंडाने अधिक खाल्ला, तर पोटांत कळ उठून ब्रह्मांड फुटून जाईल इतका भयंकर त्रास होतो ७६. सूर्यपूजनीं पुण्य घडे । तेथ जैं बेलपत्र चढे । तैं पुण्य राहे मागिलीकडे । दोष रोकडे पूजकां ॥ ७७ ॥ सूर्याची पूजा केल्याने पुण्य लागते, पण त्यांतच जर बेलाचे पान वाहिले तर पुण्य लागावयाचे बाजूलाच राहन पूजा करणाराला हटकून पातक मात्र लागते ७७. ऐसा कर्मीं कर्मविन्यास । गुण तोचि करी दोष । कोठें दोषांचाही विलास । पुण्य बहुवस उपजवी ॥ ७८ ॥ असा कर्मातच कर्माचा विधिनिषेध प्रकार असतो. केव्हां केव्हां गुण असतो तोच दोष होतो; तसेंच कोठे कोठे दोषानेही पुष्कळ पुण्य लागते ७८. चोराकुलितमार्गीं जाण । ब्राह्मण करितां प्रातःस्नान । तो नेतां कर्म त्यागून । दोषचि परी गुण गंभीर होय ॥ ७९ ॥ (उदाहरणार्थ)- चोरांनी भरलेल्या मार्गामध्ये प्रातःस्नान करीत असलेल्या ब्राह्मणाला तें कर्म न करूं देता जर दुसरीकडे नेले तर तो दोषच, पण मोठा गुण होतो ७९. सर्पगरळेचें जीवन । ब्राह्मणें करितां प्राशन । तें पात्र घेतां हिरोन । दोषचि परी गुण गंभीर होय ॥ १८० ॥ सर्पाने गरळ टाकलेले पाणी, ब्राह्मण पीत असतां, ते त्याचे भांडे जर हिसकून घेतले, तर तो दोष असूनही मोठा गुण होतो १८०. गृहस्थासी अग्निहोत्र गुण । तोचि संन्याशासी अवगुण । ब्राह्मणीं विहीत वेदमंत्रपठण । शूद्रासी जाण तो दोष ॥ ८१ ॥ अग्निहोत्र करणे हा गृहस्थाचा गुण आहे; पण तेच संन्याशाने केल्यास दोष होतो. वेदमंत्र पठण करणे हा ब्राह्मणाचा विहित गुण आहे; पण तोच शूद्राला दोषकारक होतो ८१. विषयनिवृत्तीलागीं सुगम । गुणदोषांचा केला नेम । हें नेणोनि वेदाचें वर्म । विषयभ्रम भ्रांतासी ॥ ८२ ॥ विषयापासून निवृत्ति व्हावी म्हणून गुणदोषांचे सुगम नियम करून ठेवले आहेत. हे वेदांतील वर्म न कळल्यामुळे भ्रांतिष्ट लोकांना विषयाचा भ्रम पडतो ८२. जंव भ्रांति तंव कर्मप्रवृत्ती । तेथ गुणदोषांची थोर ख्याती । जेवीं कां खद्योत लखलखिती । आंधारे रातीं सतेज ॥ ८३ ॥ जोपर्यंत भ्रांति असते, तोपर्यंत कर्मप्रवृत्ति असते. अंधेऱ्या रात्रींतच काजवे चमकत असतात, त्याप्रमाणे अज्ञान स्थितींत गुणदोषांचा पगडा फार मोठा असतो ८३. तेवीं गुणदोषांमाजीं जाण । अवश्य अंगी आदळे पतन । तेचि अर्थींचें निरूपण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ ८४ ॥ गुणदोषांमध्ये पतन हें अवश्य येऊन माथ्यावर आदळते. त्याच अर्थाचे निरूपण श्रीकृष्ण स्वतः सांगत आहेत ८४. समानकर्माचरणं पतितानां न पातकम् । औत्पत्तिको गुणः सङ्गो न शयानः पतत्यधः ॥ १७ ॥ स्वकर्म पतित जाहले जाण । डोंब भिल्ल कैवर्तक जन । त्यांसी मद्यपानादिदोषीं जाण । नाहीं पतन पतितांसी ॥ ८५ ॥ महार, भिल्ल, मच्छिमार हे आपल्या कर्मानेंच पतित झालेले आहेत, तशा पतितांना मद्यपानादि दोषांपासून अधिक पतन नाही ८५. जें नीळीमाजीं काळें केलें । त्यासी काय बाधावें काजळें । कां अंधारासी मसीं मखिलें । तेणें काय मळलें तयाचें ॥ ८६ ॥ निळीत बुडवून काळे करून टाकलेल्या वस्त्राला काजळ आणखी काळें तें काय करणार? किंवा अंधारालाच शाईने माखले, तर त्याचे अधिक काय मळणार? ८६. जो स्वभावें जन्मला चांडाळ । त्यासी कोणाचा बाधी विटाळ । हो कां काळें करवें काजळ । ऐसें नाहीं बळ कीटासी ॥ ८७ ॥ त्याप्रमाणे स्वतःच जो चांडाळकुळांत जन्मास आला, त्याला कोणाचा विटाळ-बांधणार ? काजळाला आणखी काळे करण्याची शक्ति कीटाला नसते ८७. निर्जीवा दीधलें विख । तेणें कोणासी द्यावें दुःख । तेवीं पतितासी पातक । नव्हे बाधक सर्वथा ॥ ८८ ॥ निर्जीवाला विष दिले, तर ते त्याला काय दुःख देणार ? त्याप्रमाणे पतिताला पातक हे कधीच बाधक होत नाही ८८. जो केवळ खालें निजेला । त्यासी पडण्याचा भेवो गेला । तेवीं देहाभिमाना जो आला । तो नीचाचा झाला अतिनीच ॥ ८९ ॥ जो निखालस खालींच निजलेला असतो, त्याला पडण्याचे भयच नसते. त्याप्रमाणे ज्याला देहाचा अभिमान चढतो, तो नीचाहूनही नीच होतो ८९. रजतमादि गुणसंगीं । जो लोलंगत विषयांलागीं । त्यासी तिळगुळादि कामभोगीं । नव्हे नवी आंगीं देहबुद्धी ॥ १९० ॥ रजतमादि गुणांच्या संगतीनें जो विषयलपट होऊन राहातो, त्याला तिळगुळासारख्या सुखोपभोगाने काही नवी देहबुद्धि वाढते असें नाहीं १९०. जो कनकबीजें भुलला । तो गाये नाचे हरिखेला । परी संचितार्थ चोरीं नेला । हा नेणेचि आपुला निजस्वार्थ ॥ ९१ ॥ जो धोत्र्याचे बी खाऊन बरळू लागतो, तो रंगांत येऊन गाऊं नाचू लागतो; पण गांठीस असलेले द्रव्य चोरीस गेले, याची त्याला दादही नसते ९१. तेवीं देहाभिमानें उन्मत्त । अतिकामें कामासक्त । तो नेणे बुडाला निजस्वार्थ । आपुला अपघात देखेना ॥ ९२ ॥ त्याप्रमाणे देहाभिमानाने जो उन्मत्त होतो, अत्यंत विषयलोलुपतेनें जो कामासक्त होतो, त्याला आपल्या स्वार्थाची हानि झालेली समजत नाही व आपला घात झालेलाही कळत नाहीं ९२. ज्यासी चढला विखाचा बासटा । त्यासी पाजावी सूकरविष्ठा । तेवीं अतिकामी पापिष्ठा । म्यां स्वदारानिष्ठा नेमिली ॥ ९३ ॥ ज्याला विषाचा अंमल चढलेला असतो, त्याला डुकराची विष्टा पाजतात; त्याप्रमाणे अत्यंत विषयलोलुप अशा पातकी लोकांना मी स्वपत्नीनिष्ठत्वाची मर्यादा करून दिली आहे ९३. ज्यासी विख चढलें गहन । त्यासी सूकरविष्ठेचें पान । हें ते काळींचें विधान । स्वयें सज्ञान बोलती ॥ ९४ ॥ कारण, ज्याला अतिशय विष चढलेले असते, त्याला डुकराच्या विष्ठेचे औषध त्या कालापुरते दिले पाहिजे, असें ज्ञाते लोक सांगतात ९४. तेवीं जेथवरी स्त्रीपुरुषव्यक्ती । तेथवरी स्वेच्छा कामासक्ती । त्याची करावया निवृत्ति । स्वदारास्थिति नेमिली वेदें ॥ ९५ ॥ त्याप्रमाणे स्त्री आणि पुरुष व्यक्ति जोपर्यंत आहेत, तोपर्यंत विषयलंपटाचा 'स्वेच्छाचार' हा चालावयाचाच, त्याला आळा पडावा म्हणून वेदानें स्वपत्नीनिष्ठा लावून दिली आहे ९५. वेदें निरोप दिधला आपण । तैं दिवारातीं दारागमन । हेंही वेदें नेमिलें जाण । स्वदारागमन ऋतुकाळीं ॥ ९६ ॥ तथापि वेदानें आज्ञा दिली म्हणून लोक आपल्या स्त्रीशीसुद्धा अहोरात्र गमन करतील, म्हणून वेदानेंच निर्बंध घातला आहे की, फक्त ऋतुकाळीच गमन केले पाहिजे ९६. तेथ जन्मलिया पुत्रासी । 'आत्मा वै पुत्रनामाऽसी' । येणें वेदवचनें पुरुषासी । स्त्रीकामासी निवर्तवी ॥ ९७ ॥ त्यांतही पुत्र जन्मास आला असतां 'आत्मा वै पुत्रनामासि' ह्या वाक्याने वेदाने स्त्रीकामापासून परावृत्त केलें आहे ९७. निःशेष विष उतरल्यावरी । तो सूकरविष्ठा हातीं न धरीं । तेवीं विरक्ति उपजल्या अंतरीं । स्वदारा दूरी त्यागिती ॥ ९८ ॥ कारण निखालस विष उतरल्यावर तो डुकराची विष्ठा हातांतसुद्धा घेत नाही ; त्याप्रमाणे अंत:करणांत विरक्ति उत्पन्न झाली असतां स्वस्त्रीचाही दूर त्याग करतात ९८. यापरी विषयनिवृत्ती । माझ्या वेदाची वेदोक्ती । दावूनि गुणदोषांची उक्ती । विषयासक्ती सांडावी ॥ ९९ ॥ अशा प्रकारे विषयाची निवृत्तिच वेदांत सांगितली आहे. ती वेदोक्ति गुणदोष दाखवून विषयावरची आसक्तिच सोडावयास लावते ९९. यतो यतो निवर्तेत विमुच्येत ततस्ततः । एष धर्मो नृणां क्षेमः शोकमोहभयापहः ॥ १८ ॥ माझिया वेदाचें मनोगत । विषयीं व्हावें निवृत्त । यालागीं गुणदोष दावित । विषयत्यागार्थ उपावो ॥ २०० ॥ विषयापासून निवृत्त व्हावें हाच माझ्या वेदाचा हेतु आहे, म्हणून विषय सोडण्यासाठीच गुणदोष दाखविण्याचा उपाय योजलेला आहे २००. एकाएकीं सकळ विषयांसी । त्याग न करवे प्राण्यासी । यालागीं निषेधें निंदूनि त्यांसी । शनैःशनैः विषयांसी त्यागावी ॥ १ ॥ प्राण्यांना एकाएकींच काही सर्व विषयांचा त्याग करवतः नाहीं; म्हणून निषेधरूपाने त्यांची निंदा करून हळूहळू विषय सुटतील अशी युक्ति केली आहे १ . जों जों विषयांची निवृत्ती । तों तों निजसुखाची प्राप्ती । पूर्ण बाणल्या विरक्ती । साधक होती मद्रूप ॥ २ ॥ जसजशी विषयाची निवृत्ति होते, तसतशी आत्मसुखाची प्राप्ती होत जाते. पूर्णपणे विरक्ति बाणली म्हणजे साधक मत्स्वरूपच होऊन जातो २. मद्रूपतेचिये प्राप्तीं । अडवी असे विषयासक्ती । ते झालिया विषयनिवृत्ती । साधक होती मद्रूप ॥ ३ ॥ मत्स्वरूपाच्या प्राप्तीला विषयासक्तिच आड येत असते. तीच विषयाची निवृत्ति झाली की, साधक मत्स्वरूपच होऊन जातात ३. जेथ माझिया स्वरूपाची प्राप्ती । तेथ निःशेष निमे अहंकृती । तेव्हा शोकमोहाची होय शांती । जाय निश्चितीं अविद्या ॥ ४ ॥ आणि माझ्या स्वरूपाची जेव्हां प्राप्ति होते तेव्हां अहंकार निखालस नष्ट होतो. आणि शोकमोहाची शांति होऊन अविद्या ही खरोखरच नष्ट होते ४. अविद्यानाशासवें जाण । नाशती जन्मभाव दारुण । तेव्हां मरणासीच ये मरण । हारपे जीवपण जीवाचें ॥ ५ ॥ अविद्येचा नाश झाला की, त्याच्याबरोबर भयंकर जन्मभाव नाश पावतात. तेव्हां मरणालाच मरण आणि जीवाचे जीवपणच नाहींसें होऊन जातें ५. अविद्या निमाल्या जीवेंसीं । ठावो नाहीं भवभयासी । जेवीं सबळबळें अंधारेंसीं । नुरेचि निशी दिनोदयीं ॥ ६ ॥ ज्याप्रमाणे सूर्योदय होताच गर्द अंधारासहवर्तमान रात्रीला थारा उरत नाही, त्याप्रमाणे अविद्या जीवासहवर्तमान ठार झाली की, संसारभयाला जागाच राहात नाहीं ६. जेवीं कां मृगजळाचा पूर । न साहे दृष्टीचा निर्धार । तेवीं भवभयेंसीं संसार । झाला साचार वाउगा ॥ ७ ॥ दृष्टि निश्चित झाली असतां ज्याप्रमाणे मृगजळाचा पूर राहात नाही, त्याप्रमाणे भवभयासहवर्तमान सारा संसारच मिथ्या होऊन जातो ७. प्राणी पावावया कल्याण । हे वेदोक्त स्वधर्माचरण । विषयत्यागालागीं जाण । केलें निरूपण गुणदोषां ॥ ८ ॥ वेदोक्त स्वधर्माचरण हें प्राण्यांचे कल्याण होण्यासाठीच आहे. आणि विषयत्यागासाठीच गुणदोषांचे निरूपण केलें आहे ८. जे साच वेदार्थातें नेणती । ते वेदा प्रवृत्तिपर म्हणती । परी वेदें द्योतिली विरक्ती । विषयासक्तिच्छेदक ॥ ९ ॥ खरा वेदाचा अर्थ ज्यांना कळत नाही, ते वेद हा प्रवृत्तिपर आहे असे म्हणतात; पण वेदाने विषयावरील आसक्ति नष्ट करणारी विरक्तिच सांगितलेली आहे ९. वेदोक्त स्वधर्मस्तिथीं । होय विषयांची विरक्ती । प्राणी निजमोक्ष पावती । हे वेदोक्ती पैं माझी ॥ २१० ॥ वेदांत सांगितल्याप्रमाणे स्वधर्मस्थितीने राहिले असतां विषयांविषयीं विरक्ति उत्पन्न होते, आणि प्राणी मोक्षाला जातात, हीच माझी वेदोक्ति आहे २१०. हे सांडोनियां वेदस्थिती । केवळ विषयांची आसक्ति । प्राणी अतिदुःख पावती । ऐक तुजप्रती सांगेन ॥ ११ ॥ वेदाची आज्ञा सोडून केवळ विषयांचीच आसक्ति धरली असतां प्राणी अत्यंत दुःख पावतात. तेही मी तुला सांगतों ऐक ११. प्रवृत्ति तितुकी अनर्थहेतु । येचि अर्थींचा वृत्तांतु । चौं श्लोकीं श्रीभगवंतु । असे सांगतु उद्धवा ॥ १२ ॥ प्रवृत्ति जितकी आहे, तितकी अनर्थकारकच आहे. ह्याच अर्थाचे निरूपण श्रीभगवान् चार श्लोकांनी उद्भवाला सांगतात १२. विषयेषु गुणाध्यासात्पुंसः सङ्गस्ततो भवेत् । सङ्गात्तत्र भवेत्कामः कामादेव कलिर्नृणाम् ॥ १९ ॥ कलेर्दुर्विषहः क्रोधस्तमस्तमनुवर्तते । तमसा ग्रस्यते पुंसश्चेतना व्यापिनी द्रुतम् ॥ २० ॥ विषयांचें गोडपण । सदा ध्याय ज्याचें मन त्यासी विषयासक्ती जाण । अतिगहन उल्हासे ॥ १३ ॥ ज्याचे मन सदासर्वदा विषयाच्या गोडपणाचाच निदिध्यास करीत असते, त्याला अतिशय घोर विषयासक्ति उत्पन्न होत असते १३. विषयासक्तीचा संभ्रम । तेणें निर्लज्ज खवळे काम । कामास्तव अतिविषम । सोशी दुर्गम उपाय ॥ १४ ॥ विषयासक्ति वाढली की निर्लज काम खवळून उठतो आणि त्या कामाकरितां अतिशय संकटाचे व दुर्गम प्रसंग सहन करतो १४. विषयकामार्थ जे उपाय । त्यासी प्रतिपदीं अपाय । जेव्हां विषयकामसिद्धी न होय । तेव्हा महाकलह विवादु ॥ १५ ॥ परंतु विषयतृप्यर्थ जे उपाय म्हणून योजितात, ते पदोपदी अपायरूपच होतात. जोपर्यंत विषयवासनेची परिपूर्तता होत नाही, तोपर्यंत मोठा कलह माजून राहातो १५. जेथ अतिजल्पाचा विवाद । तेथ खटाटोपेंसीं सन्नद्ध । खवळला उठी क्रोध । अतिविरुद्ध दुर्धर ॥ १६ ॥ जेधे वितंडवादाचा कळस होतो, तेथे त्या यातायातीत साहाय्य करणारा अत्यंत विरुद्ध व दुर्धर असा क्रोध चवताळून उठतो १६. क्रोध खवळल्या दारुण । बुद्धीचें तत्काळ नासे ज्ञान । तेव्हां विवेकाचें प्राशन । करी जाण महामोह ॥ १७ ॥ क्रोध भयंकर रीतीनें चवताळला म्हणजे बुद्धीचे ज्ञान तत्काळ नष्ट होऊन जाते. तेव्हां महामोह हा विवेकाचा ग्रास करून टाकतो १७. विवेकाचें लोपल्या भान । स्तब्ध चेतना होय जाण । तेव्हां कार्याकार्यआाठवण हेंही स्मरण बुडालें ॥ १८ ॥ विवेकाचे भान लोपलें कीं, चेतनाही स्तंभित होते, आणि त्यामुळे कार्य कोणतें व अकार्य कोणतें ह्याची आठवणही बुजून जाते १८. तया विरहितः साधो जन्तुः शून्याय कल्पते । ततोऽस्य स्वार्थविभ्रंशो मूर्च्छितस्य मृतस्य च ॥ २१ ॥ विवेकशून्य स्तब्धवत । तेथ विषयो ना परमार्थ । न कळे सन्मार्गपंथ । आत्मघात पदोपदीं ॥ १९ ॥ विवेकशून्य होऊन केवळ मूढ बनला म्हणजे तेथें विषयही नाही आणि परमार्थही नाही अशी स्थिति होते. सन्मार्गाची वाट कळत नाही, त्यामुळे पदोपदीं आत्मघात मात्र होत असतो १९. केवळ जड मूढ होऊनी । जेवीं कां मूर्च्छित प्राणी । तैसेपरी स्तब्ध होऊनी । अज्ञानपणीं श्रमला ॥ २२० ॥ केवळ जड मूढ होऊन बेशुद्धाप्रमाणे स्तब्ध होतो, आणि अज्ञानपणामध्ये कुचंबत असतो २२०. यापरी जीत ना मेला । जड मूढ होऊनी ठेला । थित्या निजस्वार्था मुकला । अंगीं वाजला अनर्थु ॥ २१ ॥ अशा प्रकारे धड सजीवही नव्हे आणि धड निर्जीवही नव्हे, अशा प्रकारे मूढ होऊन राहातो, आणि असलेल्या लाभाला मुकून अनर्थ मात्र अंगावर कोसळून घेतो २१. विषयाभिनिवेशेन नात्मानं वेद नापरम् । वृक्षजीविकया जीवन् व्यर्थं भस्त्रेव यः श्वसन ॥ २२ ॥ एवं विषयांचे आसक्तीं । तमागुणें ग्रासिली वृत्ती । तेव्हां एकीहि स्फुरेना स्फूर्ती । मी कोण हें चित्तीं स्फुरेना ॥ २२ ॥ ह्याप्रकारे विषयाच्या आसक्तीमुळे तमोगुणाने वृत्तीला ग्रासून टाकल्याने कोणतीच आठवण राहात नाही. मी कोण हेंही मनाला स्मरत नाही! २२. ऐसा भ्रमें भुलला प्राणी । जैसा उन्मत्त मदिरापानी । त्यासी स्मरणाची विस्मरणी । भ्रमिस्त मनीं पडिला ॥ २३ ॥ दारू प्याला म्हणजे मनुष्य जसा झिंगून जातो, आणि त्याच्या स्मरणाचे विस्मरण होऊन मनांत भ्रम उत्पन्न होतो, त्याप्रमाणे मनुष्यप्राणी भ्रमाने भुललेला आहे २३. कां विषमसंधीज्वरु । तेणें ज्वरें हुंबरे थोरु । त्यासी नावडे आपपरु । वृथा विकारु बडबड करी ॥ २४ ॥ किंवा विषमज्वर झालेला मनुष्य हवी तशी बडबड करतो, त्याला आपले व परकेही आठवत नाहीत. तो व्यर्थ भलभलतें बरळत सुटतो २४. फाटां फुटलियावरी । भलतेंचि स्मरण करी । तया नाठवे कांहीं ते परी । प्राणी अघोरीं पडले जाण ॥ २५ ॥ चित्ताला भ्रम झाल्यामुळे भलभलतेच आठवते ; त्याला कशाचीच नीट आठवण असत नाही. याप्रमाणे प्राणी संकटांत कुचंबत असतात २५. कां झालिया भूतसंचार । प्राणी हुंबरें हुंहुंकार । पडिला चित्तासी विसर । म्हणे मी कुकर म्हणोनि भुंके ॥ २६ ॥ अथवा अंगांत भूतसंचार झाला म्हणजे तो मनुष्य 'हः हः हः हः' असें म्हणून हुंकारे देत बसतो; आणि चित्ताला भुरळ पडून आपण स्वतः कुत्रेंचं आहे असे मानून भोंकत असतो २६. ऐसें जीविके नेणोनि प्राणी । घाबरे जैसा स्वप्नीं । म्हणे मी पडलों रणीं । ऐसे प्राणी स्वप्नीं भुलले ॥ २७ ॥ अशाच रीतीने निजलेला मनुष्य आपलेपणाचे भान विसरून स्वप्नांत जसा घाबरतो, आणि मी रणांत पडलों असें म्हणतो, त्याप्रमाणेच हे सारे प्राणी भुलले आहेत २७. तैशी भुली लटकी भुलवणी । काममोहें व्यापिले प्राणी । जडमूढपण ठाकूनी । अंतःकरणीं वेडावले ॥ २८ ॥ याप्रमाणे मिथ्याच भुलीनें भूल पडून कामाच्या मोहाने प्राणी व्यापून गेले आहेत. आणि जडमूढ होऊन अंत:करणांत वेडावले आहेत २८. मुक्यानाकीं भरे मुरकुट । तें फेंफें बें बें करी निकृष्ट । न कळे रडे करी हाहाट । ते खटपट वाउगी ॥ २९ ॥ मुक्याच्या नाकांत चिलट शिरले असता तो घाबरून जाऊन बेबें फेंफें करीत बसतो, काय झाले हें कळत नाहीं, व्यर्थ हाकाहाक करतो, त्याची ती खटपट ज्याप्रमाणे व्यर्थ होते २९, तैसे दुःखबळें प्राणी । परी न कळे उंच करणी । पडिले मोहमदें भुलोनी । मुकपणीं बेंबात ॥ २३० ॥ त्याप्रमाणे दुःखाच्या आवेशाने प्राणी विव्हळ होतात व सन्मार्ग न कळल्यामुळे मोहमदाने भुलून मुकेपणाने विवळत पडतात २३०. अहंकृतीचा उभारा । शरीरीं भरलासे वारा । तो होऊनि बाधक नरा । पडले आडद्वारा अंधकूपीं ॥ ३१ ॥ अहंकाराच्या जोराने शरीरांत वारे भरते व तेंच बाधक होऊन आडमार्गानं जाऊन खोल विहिरीत पडतात ३१. कां तेलियाचा ढोर पाहीं । डोळां झांपडी स्वदेहीं । अवघा वेळ चाले परी पाहीं । पंथ कांहीं न ठकेचि ॥ ३२ ॥ किंवा तेल्याचा बैल जसा डोळ्यावर झापड बांधून केवळ शरीराने सारा वेळ चालत असतो, तरी वाट म्हणून काही सरत नाही ३२. भवंता फिरे लागवेगीं । परी पाहतां न लगे आगी । घाणियाचि भोंवतें वेगीं । भोवंडी अंगीं जिराली ॥ ३३ ॥ लौकर लौकर आपल्या भोवती फिरतो, पण पाहावयाला गेले तर त्या फिरण्याला काही शेवटच नाही. पाण्याच्या भोवती फिरून फिरून अंगांतील भोवंडही जिरून गेलेली असते ३३. तैसे विषय भवंडित भवु । परी नकळेचि विधिमावु । जैसा सर्प भ्रमला लागे धांवूं । तैसे विषय आघवे धावंति ॥ ३४ ॥ त्याप्रमाणे विषय हें सतत फिरणारे संसारचक्र आहे. परंतु विधीची माया कळत नाही. साप वेडावला म्हणजे तो जसा धावत सुटतो, त्याप्रमाणे सारे विषय धावत सुटलेले असतात ३४. अंवसेचें काळे गडद । तैसा जड मूढ झाला स्तब्द । स्फुरेना आप पर हा बोध । जगदांध्य वोढवलें ॥ ३५ ॥ अमावास्येचा अंधार जसा काळा भिन्न असतो, त्याप्रमाणे तो जड मूढ व स्तब्ध होतो. त्याला आप-पर हें भान राहात नाही. साऱ्या जगांत अंधत्व पसरतें ३५. जेंवी लोहकाराची भाती । तेवीं वृथा श्वासोच्छ्वास होती । वृक्षाची जैसी तटस्थ स्थिती । यापरी जीती जीत ना मेलीं ॥ ३६ ॥ लोहाराच्या भात्याप्रमाणे फुकट श्वासोच्छ्वास मात्र होत असतात. वृक्ष जसे तटस्थ उभे असतात, त्याप्रमाणे तेही धड जिवंत नव्हत व मेलेलेही नव्हत असे तटस्थ होऊन राहातात! ३६. सकामासी स्वर्गप्राप्ती । म्हणसी बोलिली असे वेदोक्ती । तेही प्रलोभाची वदंती । ऐक तुजप्रतीं सांगेन ॥ ३७ ॥ आता तूं म्हणशील की, सकाम कर्में करणाराला स्वर्गप्राप्ति होते असें वेदांत सांगितले आहे; पण ते सुद्धा लोभिष्ट लोकांचेच म्हणणे आहे ते तुला सांगतो, ऐक ३७. फलश्रुतिरियं नृणां न श्रेयो रोचनं परम् । श्रेयो विवक्षया प्रोक्तं यथा भैषज्यरोचनम् ॥ २३ ॥ निष्काम जे कां कर्मस्थिती । ते मूर्ख सर्वथा न करिती । त्यांसी दावूनियां फलश्रुती । स्वकर्मप्रवृत्तीं लाविले ॥ ३८ ॥ मूर्ख लोक निष्काम असें कर्म कधीच करीत नाहीत, म्हणून त्यांना फलश्रुति दाखवून स्वकर्माला प्रवृत्त केले आहे ३८. सकाम अथवा निष्काम । कर्मक्रिया दोंहीची सम । येथ वासनाचि विषम । सकामनिष्कामफलहेतू ॥ ३९ ॥ सकाम कर्म करणे आणि निष्काम कर्म करणे या दोहींची क्रिया सारखीच असते. पण सकाम व निष्काम कर्माच्या फलाचा हेतु मात्र निराळा असतो ३९. जेवीं कां स्वातीचें जळ । शिंपीमाजीं होय मुक्ताफळ । तेंचि सेवी जैं महाव्याळ । तैं हळाहळ होऊनि ठाके ॥ २४० ॥ ज्याप्रमाणे स्वातीचे जळ शिंपीत पडले तर मोती होते, पण तेंच सर्पाने प्राशन केले तर दुर्धर विष होऊन राहातें २४०. तेवीं आपुली जे कां कल्पना । निष्कामें आणी मुक्तपणा । तेचि सकामत्वें जाणा । द्रुढबंधना उपजवी ॥ ४१ ॥ त्याप्रमाणे आपली कल्पना असते ती निष्काम बुद्धीनें मुक्तपणाला पोचविते, आणि सकामबुद्धीने दृढतर बंधनास पात्र करते ४१. वेदु बोलिला जें स्वर्गफल । तें मुख्यत्वें नव्हे केवळ । जेवीं भेषज घ्यावया बाळ । देऊनि गूळ चाळविजे ॥ ४२ ॥ वेदानें स्वर्गाचे जे फळ सांगितले आहे, तें कांहीं मुख्य नव्हे. तर वैद्य ज्याप्रमाणे मुलाला औषध घेण्यासाठी गुळाची लालुच दाखवितो, त्याप्रमाणे ती ठकवण आहे ४२. ओखद घेतलियापाठीं । क्षयरोगाची होय तुटी । परी बाळ हातींचा गूळ चाटी । ते नव्हे फळदृष्टी भेषजीं ॥ ४३ ॥ औषध घेतल्याने क्षयरोग नाहीसा होतो; पण मूल हातातील गुळच चाटीत असते, परंतु गूळ हे काही औषधाचे फळ नव्हे ४३. तेवीं वेदाचे मनोगतीं । स्वर्गफळाची अभिव्यक्ती । मूर्खासी द्यावया मुक्ती । स्वधर्मस्थिती लावितु ॥ ४४ ॥ त्याप्रमाणे वेदाचे हृदगत हें की, स्वर्गफळाची आशा दाखवून मूर्खांना मुक्त करण्याकरितां स्वधर्माचरण लावून द्यावें ४४. म्हणसी कर्मवादि जे नर । वेद सांगती प्रवृत्तिपर । तो वेदार्थ निर्वत्तितत्पर । केवीं साचार मानावा ॥ ४५ ॥ आतां तूं म्हणशील की, कर्मवादी जे मनुष्य आहेत ते वेद हा प्रवृत्तिपर आहे असे म्हणतात; त्याच वेदाचा अर्थ निवृत्तिपर आहे हे कसें खरें मानावें? ४५. श्रुत्यर्थ जैं प्रवृत्ति धरी । तैं वेदु झाला अनर्थकारी । ते प्रवृत्ति दूषूनि श्रीहरी । दावी निवृत्तिवरी वेदार्थ ॥ ४६ ॥ (ह्याचे उत्तर) श्रुतीचा अर्थ जर प्रवृत्तिपर असता, तर वेद हा अनर्थकारक होऊन बसला असता ! ह्याकरिता त्या प्रवृत्तीलाच दोष देऊन श्रीकृष्ण हे वेदाचा अर्थ निवृत्तिपर कसा ते दाखवून देतात ४६. उत्पत्त्यैव हि कामेषु प्राणेषु स्वजनेषु च । आसक्तमनसो मर्त्या आत्मनोऽनर्थहेतुषु ॥ २४ ॥ न तानविदुषः स्वार्थं भ्राम्यतो वृजिनाध्वनि । कथं युञ्ज्यात्पुनस्तेषु तांस्तमो विशतो बुधः ॥ २५ ॥ उपजतांचि प्राणिमात्रासी । देह आवडे सर्वस्वेंसीं । देहात्मवादें विषयांसी । जीवेंप्राणेंसीं लोलुप ॥ ४७ ॥ प्रत्येक प्राणिमात्राला जन्मतांच देह सर्वस्वी आवडत असतो. 'देह तोच मी' असे मानून तो जीवाभावाने विषयावर लुब्ध असतो ४७. विषयकामाच्या आसक्तीं । स्त्रीपुत्रांची गोडी चित्तीं । स्वजनधनांची अतिप्रीती । स्वभावस्थिती अनिवार ॥ ४८ ॥ विषयाच्या आसक्तीमुळे मनामध्ये स्त्रीपुत्रांविषयी प्रेम उत्पन्न होते. स्वजनांवर व द्रव्यावर अत्यंत प्रीति जडते. ती स्वाभाविक स्थिति अनिवार्य असते ४८. जेणें जाइजे अधोगती । ऐशी जे कां कामासक्ती । ते प्राण्यासी सहजगती । विषयासक्ती स्वभावें ॥ ४९ ॥ जिच्या योगानें अधोगतीलाच जावे लागते, ती कामासक्ति म्ह. विषयासक्ति प्राण्यांना नैसर्गिकच असते ४९. तेचि विषयांची प्रवृत्ती । वेद बोले जैं विध्युक्ती । तैं सर्वांचा स्वार्थघाती । झाला अनर्थीं वेदवादु ॥ २५० ॥ त्याच विषयाची प्रवृत्ति जर वेद विधियुक्त रीतीनें सांगेल, तर ती वेदवाणी सर्वांचा स्वार्थ बुडविणारी अशी महाअनर्थकारकच होईल २५०. मरतया तरटमारु केला । बुडत्याचे डोयीं दगड दीधला । आंधळा अंधकूपीं घातला । तैसा वेदु झाला अनर्थीं ॥ ५१ ॥ मरणाराला चाबकाचा मार द्यावा, किंवा बुडत्याच्या मस्तकावर दगड घालावा, किंवा आंधळ्याला विहिरीत ढकलावें, त्याप्रमाणे वेदही अनर्थकारकच होईल ५१. वेदु जैं विषयीं गोंवी । तैं प्राण्यातें कोण उगवी । राजा सर्वस्वें नागवी । तैं कोण सोडवी दीनतें ॥ ५२ ॥ वेदच जर विषयांत गोवू लागला, तर प्राण्यांना दुसरे कोण सोडविणार ? राजाच जर सर्वस्वी नागवू लागला, तर गरिबाला कोण मुक्त करणार? ५२. नेणोनि वेदींचा मथितार्थु । स्वयें जो कां विषयासक्तु । तो मानी प्रवृत्तिपर श्रुत्यर्थु अनर्थहेतु बालिशां ॥ ५३ ॥ वेदांतील मथितार्थ न समजतां जो स्वत:च विषयासक्त होतो, तो श्रुतीचा अर्थ प्रवृत्तिपरच आहे असे मानतो. आणि त्यामुळेच मूर्खाना तो अनर्थास कारणीभूत होतो ५३. पुत्र पित्यास पुसे जाण । ग्रहणीं जेवूं परमान्न । येरू म्हणे सुटल्या ग्रहण । उष्ण भोजन स्वगृहीं करूं ॥ ५४ ॥ पुत्र पित्याला ग्रहणामध्ये म्हणाला, सकाळची खीर खाऊ या. त्यावर त्याला बाप सांगतो की, ग्रहण सुटलें म्हणजे आपण आपल्या घरी केलेलें ऊन ऊन ताजें जेवणच जेवू ५४. तैशी माझ्या वेदाची उक्ती । निषेधमुखें दावी प्रवृत्ती । येणें वेदाच्या मनोगतीं । विषयनिवृत्ती मुख्यत्वें ॥ ५५ ॥ तसेंच माझ्या वेदाचे सांगणे आहे. निषेधमुखाने प्रवृत्ति दाखवून दिली आहे. तात्पर्य, विषयाची निवृत्ति हेंच वेदाचें मनोगत आहे ५५. विषयीं बुडते जे जन । त्यांचें करावया उद्धरण । माझा वेदवादु जाण । सकामपण त्या नाहीं ॥ ५६ ॥ विषयांत बुडणारे जे लोक आहेत, त्यांचा उद्धार करण्याकरितांच माझी वेदवाणी आहे. तिच्यांत सकामपणा नाही ५६. कोणी एक मंदबुद्धी । केवळ विषयांध त्रिशुद्धी । ते सकाम जल्पती वेदविधी । त्यांची कुबुद्धी हरि सांगे ॥ ५७ ॥ परंतु मंदबुद्धीचे लोक असतात ते, निखालस विषयांध असतात. तेच वेदांतील विधि सकामच आहे अशी बडबड करतात. त्यांची ती दुर्बुद्धि श्रीकृष्ण सांगतात ५७. एवं व्यवसितं केचिदविज्ञाय कुवुद्धयः । फलश्रुतिं कुसुमितां न वेदज्ञा वदन्ति हि ॥ २६ ॥ फलत्यागें स्वध्र्मस्थिती । सर्वथा सकाम न करिती । यालागीं वेद बोले फलश्रुती । स्वधर्मप्रवृत्तीलागुनी ॥ ५८ ॥ सकाम लोक फलेच्छा सोडून स्वधर्माचरण कधीच करीत नाहीत, म्हणून स्वधर्माकडे प्रवृत्ति होण्यासाठी वेदानें फलश्रुति सांगून ठेवली आहे ५८. सैंधव सागरा भेटूं जातां । जेवीं कां हारपे सैंधवता । तेवीं स्वधर्मीं प्रवर्ततां । सकामता उरेना ॥ ५९ ॥ मीठ समुद्राला भेटावयास गेले असता त्याचा मीठपणाच नाहीसा होतो, त्याप्रमाणे स्वधर्माकडे प्रवृत्ति झाली असता त्याची सकामताच राहात नाही ५९. जैशी दों दिव्यांची वाती । एकवट केलिया ज्योती । तेथ न दिसे भेदगती । पाहतां ज्योती एकचि ॥ २६० ॥ ज्याप्रमाणे दोन दिव्यांतील वाती एकत्र करून त्यांची एकच ज्योति केली तर त्यांत कांहीं भेद दिसत नाही; पाहावयास गेले असतां ज्योत एकच दिसते २६०, जेवीं अग्नीं कापुर मिळतां । तो अग्नीचि होय तत्त्वतां । तेवीं स्वधर्मकर्मीं प्रवर्ततां । कर्मीं निष्कर्मता स्वयें प्रकटे ॥ ६१ ॥ कापूर अनीमध्ये जाऊन मिळाला म्हणजे तोही खरोखर अग्निच होऊन जातो, त्यांत कांहीं भेद दिसत नाही; त्याप्रमाणे स्वधर्मकर्माने वागले असतां आपोआपच निष्कर्मता प्रकट होते ६१. कर्माकर्मांची वेळुजाळीं । ते स्वधर्माचे कांचणिमेळीं । पडे नित्तशुद्धीची इंगळी । ते करी होळी कर्माकर्मांची ॥ ६२ ॥ कर्माकर्म हें एक कळकाचें बेट आहे, त्याला स्वधर्माचें घर्षण झाले म्हणजे त्यांत चित्तशुद्धीची ठिणगी पडते; आणि ती त्या कर्माकर्माचे जाळून भस्म करिते ६२. सकामता करितां कर्म । स्वधर्म नाशी फळकाम । तेव्हां सकाम आणि निष्काम । दोंहींचें भस्म स्वधर्म करी ॥ ६३ ॥ कामना धरून कर्म केले तरी, स्वधर्म हा फलेच्छेचा नाश करतो; त्या वेळी सकाम आणि निष्काम या दोहोंचेही स्वधर्म भस्म करून टाकतो ६३. जेवीं दों काष्ठांच्या घसणी । माजीं प्रकटे जो कां वन्ही । तो दोंहीतेंही जाळूनी । स्वतेजपणीं प्रकाशे ॥ ६४ ॥ दोन लाकडे एकावर एक घासली असता त्यांत अग्नि उत्पन्न होतो, आणि तो त्या दोन्ही लाकडांना जाळून आपल्याच दीप्तीने प्रगट होतो ६४. तेवीं माझा वेदवादु । स्वकर्में छेदी कर्मबाधु । हें नेणोनि जे विषयांधु । जडल्या सुबद्धु फळशो ॥ ६५ ॥ त्याप्रमाणे माझी वेदवाणी आहे; ती स्वकर्मानेच कर्मबंध छेदून टाकते. हे वर्म न कळल्यामुळे विषयांध असतो तो फलाच्या आशेला जखडला जातो ६५. वेदें प्रवृत्तिरोचनेकारणें । स्वर्गाचि नाना फलें बोलणें । त्यांलागीं ज्याचें बैसे धरणें । तेणें नागवणें निजस्वार्थां ॥ ६६ ॥ वेदाने स्वकर्मप्रवृत्तीमध्ये रुचि उत्पन्न व्हावी म्हणून स्वर्गादिक अनेक फळे सांगितली आहेत; पण त्यांच्याच जो नादी लागतो, तो आपल्या लाभाला मुकतो ६६. कष्टोनि शेतीं पेरिले चणे । त्यांची उपडोनि भाजी करणें । तो लाभ कीं तेणें नाडणें । तैसें फळ भोगणें सकार्मीं ॥ ६७ ॥ पुष्कळ मेहनत घेऊन शेतामध्ये हरभरा पेरला, आणि तो उपटून त्याची भाजी केली, तर तो लाभ समजावा की हानी समजावी? त्याचप्रमाणे सकामाने फळ भोगणे आहे ६७. वोलीं जोंधळियाचीं करबाडें । खातां अत्यंत लागतीं गोडें । त्यालागीं शेत जैं उपडे । तैं लाभु कीं नाडे निजस्वार्था ॥ ६८ ॥ जोंधळ्याची ओली ताटें खाऊं लागलों असतां मोठी गोड लागतात; म्हणून त्याच्यासाठी जर सारे शेतच उपटले, तर लाभ की आपली नागवण झाली म्हणावी ? ६८. तैशी सकामकामनाउन्मत्तें । जें फळीं फळाशालोलिंगतें । ते नाडलीं स्वधर्मलाभातें । ऐक तूतें सांगेन ॥ ६९ ॥ त्याप्रमाणे जे लोक सकाम बुद्धीनें उन्मत्त होतात, जे फलाच्या आशेला लुब्ध होतात, ते स्वधर्माच्या लाभाला कसे अंतरतात, तेंही तुला सांगतों ऐक ६९. शेतीं पेरावया आणिले चणे । त्यांचे आदरें करी जो फुटाणे । तो शाहणा कीं मूर्ख म्हणणें । तैसें फळ भोगणें सकामीं ॥ २७० ॥ शेतांत पेरावयासाठी हरभरे आणले, त्यांचे जो आवडीने भाजून फुटाणे करील, त्याला शहाणा म्हणावा की मूर्ख म्हणावा ? त्याप्रमाणेच सकामांचे फल भोगणें आहे ! २७०. घोडा विकोनि पलाण घेणें । लोणी देऊनि ताक मागणें । भात सांडूनि वेळण पिणें । तैसें फळ भोगणें सकामीं ॥ ७१ ॥ घोडा विकून खोगीर घ्यावे. किंवा लोणी देऊन टाकून ताक मागावें, भात टाकून पेज प्यावी, त्याप्रमाणेच सकामाचे फल भोगणें आहे ७१. ऐसे सकाम अतिदुर्बुद्धी । जे नाडले स्वधर्मसिद्धी । यालागीं देवो म्हणे 'कुबुद्धी' । ते कुबुद्धीची विधी हरि सांगे ॥ ७२ ॥ असे जे सकाम आणि अत्यंत दुर्बुद्ध असतात ते स्वधर्माच्या सिद्धीला मुकतात. म्हणून देव त्यांना 'कुबुद्धि' म्हणतात. त्या कुबुद्धीची लक्षणेही श्रीकृष्ण सांगत आहेत ७२. कामिनः कृपणा लुब्धाः पुष्पेषु फलबुद्धयः । अग्निमुग्धा धूमतान्ता स्वं लोकं न विदन्ति ते ॥ २७ ॥ सकामाची तृष्णा पूर्ण । कदाकाळीं नव्हे जाण । कामेच्छा तो सदा दीन । 'कृपणपण' या हेतू ॥ ७३ ॥ सकामांची तृष्णा कधींच पुरी होत नसते. कामाच्या इच्छेनें तो सर्वकाळ दीन असतो, त्यामुळे त्याला 'कृपण' असे म्हणतात ७३. जळीं बक धरोनि ध्यान । जेवीं कां टपत राहे मीन । तेवीं सकामा अनुष्ठान । लुब्धोनि जाण कामासी ॥ ७४ ॥ बगळा पाण्यामध्ये माशासाठी जसा ध्यान धरून टपून बसतो, त्याप्रमाणे सकाम मनुष्य फलेच्छेलाच लुब्ध होऊन अनुष्ठान करीत असतो ७४. जावया परपुरुषापासीं । लवोठवो दावी निजपतीसी । तेवीं काम धरोनि मानसीं । स्वधर्मकर्मासी आचरे ॥ ७५ ॥ परपुरुषापाशी जाणे सुलभ व्हावे म्हणून जारिणी स्त्री ज्याप्रमाणे आपल्या पतीच्या पुढे पुढे नाचत असते, त्याप्रमाणे तोही मनामध्ये फलेच्छा धरून स्वधर्मकर्म आचरीत असतो ७५. जेवीं कां अज्ञान बाळ । फूल तेंचि म्हणे फळ । तेवीं स्वर्गभोग केवळ । मानी अढळ मूर्खत्वें ॥ ७६ ॥ अज्ञान मूल ज्याप्रमाणे फुलालाच फळ समजते, त्याप्रमाणे तोही मूर्खपणानें स्वर्गातील सुखें अक्षयची आहेत असे समजतो ७६. त्याही स्वर्गभोगासी पाहें । कर्मवैकल्य होय कीं नोहे । हाही संदेह वर्तताहे । तेणेंही होय अतिदीन ॥ ७७ ॥ त्या स्वर्गसुखाप्रीत्यर्थ कर्म यथासांग होईल की नाही हाही संशय त्याला वाटत असतो, त्यामुळे तो अत्यंत दीन होतो ७७. सकाम तो सदा दीन । दीनत्वें अतिकृपण । कृपणत्वें स्लोभपण । लोभास्तव ज्ञान महामोह ग्रासी ॥ ७८ ॥ सकाम नेहमी दीन झालेला असतो, त्या दीनत्वामुळे अति कृपण व कृपणत्वामुळे लोभी होतो; आणि लोभामुळे त्याचे ज्ञान महामोह ग्रासून टाकतो ७८. मोहाचें खवळल्या भान । सविवेक ग्रासी ज्ञान । तेव्हां बुद्धीमाजीं तमोगुण । सबाह्य परिपूर्ण उल्हासे ॥ ७९ ॥ मोह खवळला म्हणजे तो विवेकासहवर्तमान ज्ञानालाच गिळून टाकतो. त्या वेळी बुद्धीमध्ये अंतर्बाह्य तमोगुणच भरून उचंबळू लागतो ७९. तमें कोंदाटल्या वृत्ती । धूमांकित होय स्थिती । जेवीं कां आंधळ्याचा सांगती । अंधारे रातीं आडवीं चुके ॥ २८० ॥ तमोगुणानें वृत्ति भरली म्हणजे धुकें कोंदाटल्याप्रमाणे स्थिति होऊन जाते. आंधळ्याच्या संगतीने ज्याप्रमाणे अंधेऱ्या रात्री आडरानांत चुकावे त्याप्रमाणे गत होते २८०. त्या आंधळ्याची जैशी स्थिती । तैशी सकामाची गती । चुकला विवेकाचा सांगती । आंधळी वृत्ती अतिमुग्ध ॥ ८१ ॥ त्या आंधळ्याची जशी स्थिति होते, त्याप्रमाणेच सकाम पुरुषाचीही गति होते. विवेकाची संगत चुकली की, आंधळी वृत्ति अत्यंत मुग्ध होते ८१. जैसें कां अज्ञान बाळ । तैसा मुग्ध होय केवळ । कोण कर्म काय तें फळ । नेणे विवळ मुग्धत्वें ॥ ८२ ॥ अज्ञान मूल असावे, त्याप्रमाणेच तो निखालस मुग्ध होऊन जातो; मुग्धपणामुळे कर्म कोणते आणि त्याचे फळ काय हें त्याला स्पष्ट कळत नाही ८२. माझी कोणे लोकीं स्थिती । पुढें कोण आपुली गती । हें कांहींच न स्मरे चित्तीं । धूम्रवृत्ती देहांतु ॥ ८३ ॥ जगांत माझी स्थिति कोणती ? पुढे आपली गति काय ? हें देहामध्ये धूम्रवृत्ति झाल्याकारणानें कांहींच स्मरत नाही ८३. न ते मामङ्ग जानन्ति हृदिस्थं य इदं यतः । उक्थशस्त्रा ह्यसुतृपो यथा नीहारचक्षुषः ॥ २८ ॥ वेद तात्पर्याचे निजखुणे । तुवां पुसिलें मजकारणें । तीं वेदाचीं गुह्य निरूपणें । तुजकारणें म्यां निरूपिलीं ॥ ८४ ॥ वेदांतील रहस्याचे मर्म काय, म्हणून तूं मला विचारलेंस ; म्हणून त्यांतील गुह्य गोष्टी मी तुला सांगितल्या ८४. परिसोनि वेदाचे विभाग । उद्धव सुखावला चांग । तेणें संतोषें श्रीरंग । संबोखोनि 'अंग' उद्धवासी म्हणे ॥ ८५ ॥ हे वेदांतील विभाग ऐकून उद्धवाला अतिशय आनंद झाला. त्यामुळे श्रीकृष्णाला संतोष होऊन त्यांनी उद्धवाला 'हे अंग' असें प्रेमाने संबोधून म्हटले ८५. जो मी हृदयामाजिले वस्ती । परमात्मा निकटवर्ती । त्या मातें सकाम निणती । कामासक्तीं नाडले ॥ ८६ ॥ सकाम असतात ते कामावर आसक्ति ठेवल्यामुळे भ्रमात पडून सर्वांच्या हृदयात वस्ती करून राहणारा जो मी सन्निध असणारा परमात्मा, त्या मला जाणत नाहीत ८६. तो मी हृदयामाजीं असें । हें एकादेशित्व मज नसे । जगदाकारें मीचि भासें । जेवीं कल्लोळविलासें सागरु ॥ ८७ ॥ मी हृदयांत असतों खरा, पण तेवढ्यानें मी एकदेशी होत नाही. तर समुद्र जसा लाटांच्या रूपाने भासतो, तसा जगदाकाराने मीच भासत आहे ८७. अलंकार झालेपणें । जेवीं असे निखळ सोनें । तेवीं जगदाकारें म्यां श्रीकृष्णें । परिपूर्ण असणें पूर्णत्वें ॥ ८८ ॥ अलंकाररूप झाले तरी ते जसें शुद्ध सोनेच असते, त्याप्रमाणे मी श्रीकृष्णही जगाच्या आकाराने परिपूर्णतेनें पूर्णच आहे ८८. नाम रूप वर्ण विविध । माझेन प्रकाशें जगदुद्बो ध । परी नामरूपजातिभेद । मजसी संबंध असेना ॥ ८९ ॥ नाम, रूप, किंवा अनेक प्रकारचे वर्ण, किंवा हे जग असा जो बोध, तोही माझ्याच ज्ञानप्रकाशाने होत असतो. तरी नामरूप किंवा जातिभेद यांचा माझ्याशी काही संबंध नाही ८९. आकाश जळीं बुडालें दिसे । परी तें न माखे जळरसें । तेवीं मी जगदाकारें असें । जगदादि दोषें अलिप्त ॥ २९० ॥ आकाश जरी पाण्यात बुडालेले दिसले, तरी ते काही पाण्याच्या ओलेपणाने मिजत नाही. त्याप्रमाणे मीही जगाच्या आकाराने असून जगाच्या दोषापासून अलिप्त असतो २९०. ऐसा मी विश्वात्मा विश्वंभरु । विश्वमूर्ति विश्वेश्वरु । त्या मज नेणती अज्ञान नरु । जे कां शिश्नोदरुपोषक ॥ ९१ ॥ असा मी विश्वात्मा व विश्वंभर, विश्वमूर्ति व विश्वेश्वर, असे असतां शिस्नोदरपरायण असणारे जे अज्ञान लोक ते मला जाणत नाहीत ९१. ज्यासी आंधारें दाटे गाढें । कां महाकुहरीं जो सांपडे । तो कांहीं न देखे पुढें । अवचिता पडे महागर्तीं ॥ ९२ ॥ ज्याच्या डोळ्यांपुढे गर्द अंधारी येते, किंवा जो भयंकर गुहेमध्ये सांपडतो, त्याला मागचे पुढचे काही दिसत नसल्यामुळे तो अकस्मात् मोठ्या खड्यांत पडतो ९२. तेवीं अतिमोहममताभ्रांतें । अज्ञाननिद्रा सबाह्य व्याप्तें । जवळिल्या न देखोनि मातें । पडिले महागर्ते तमामाजीं ॥ ९३ ॥ त्याप्रमाणे अत्यंत मोहममतेच्या भ्रांतीने व अज्ञानरूप निद्रेनें अंतर्बाह्य व्याप्त होऊन जवळ असलेल्या मला पहात नाहीत; आणि अज्ञानाच्या विशाळ गर्तेत पडतात ९३. न कळोनि माझ्या वेदार्थातें । केवळ जीं कां कामासक्तें । तीं पावलीं अधःपातातें । जवलिल्या मातें नेणोनि ॥ ९४ ॥ माझ्या वेदाचा अर्थ न कळल्यामुळे जे निखालस कामासक्त होतात, ते मी जवळ असतां मला न ओळखून अधःपाताला पावतात ९४. तो मी जवळी कैसा म्हणसी । तरी सर्वांच्या हृदयदेशीं । वसतसें अहर्निशीं । चेतनेसी चेतविता ॥ ९५ ॥ तो मी जवळ कसा आहे असे म्हणशील तर ज्ञानाला प्रकाश देणारा असा मी सर्वांच्या हृदयामध्ये रात्रंदिवस राहात असतों ९५. त्या माझें वेदार्थमत । नेणतीचि कामासक्त । तेचिविखीं श्रीकृष्णनाथ । विशदार्थ स्वयें सांगे ॥ ९६ ॥ त्या माझ्या वेदाचा खरा अर्थ कामासक्तांना कळत नाही. त्याविषयींच श्रीकृष्ण स्वतः स्पष्टार्थ सांगत आहेत ९६ . ते मे मतमविज्ञाय परोक्षं विषयात्मकाः । हिंसायां यदि रागः स्याद्यज्ञ एव न चोदना ॥ २९ ॥ माझ्या वेदाचा अगम्य भावो । न कळोनि गूढ अभिप्रावो । तेणें सकामासी उत्साहो । स्वर्गातें पहा हो मानिती सत्य ॥ ९७ ॥ माझ्या वेदाचा भाव अगम्य आहे. त्यांतील गूढार्थ न समजल्यामुळे सकाम मनुष्य मोठ्या उत्साहाने स्वर्गालाच सत्य मानतात! ९७. 'रोचनार्थ' स्वर्ग बोले वेद । तो प्रगटार्थ मानूनि शुद्ध । मग स्वर्गसाधनें विविध । कामलुब्ध आदरती ॥ ९८ ॥ केवळ रुचि उत्पन होण्यासाठी वेदाने स्वर्गाचा उल्लेख केलेला आहे, पण तोच त्याचा प्रकट अर्थ खरा मानून कामलुब्ध लोक अनेक प्रकारची स्वर्गादिक साधनें मोठ्या उत्साहानें करूं लागतात ९८. तेथ यज्ञ हें मिषमात्र जाण । स्वयें करावया मांसभक्षण । अविधीं करिती पशुहनन । अतिदृप्त जाण कामार्थीं ॥ ९९ ॥ त्यांत स्वतः मांसभक्षण करण्याकरितां यज्ञ एक निमित्त मात्र करतात. आपली इच्छा पूर्ण होण्याकडेच त्यांची दृढतर प्रवृत्ति असल्यामुळे अविधीनेंच पशूची हत्या करतात ९९. त्यांसी पैं गा देहांतीं । मारिले पशु मारावया येती । हातीं घेऊनि गड्ग काती । सूड घेती यमद्वारीं ॥ ३०० ॥ अशांना देहाच्या अंती ते मारलेले पशुच मारावयाला उठतात. हातांत लखलखित तरवारी घेऊन सूड घेण्याकरितां यमाच्या दारांत ते उभे असतात ३००. तेथ कैंचें स्वर्गसुख । अविधि-साधनें महामूर्ख । पावले गा अघोर नरक । सकामें देख नाडले ॥ १ ॥ त्यांना स्वर्गसुख कशाचें? अविधीनें साधन केल्यामुळे ते महामूर्ख अघोर नरकाला मात्र जातात. अशा प्रकारें सकाम लोक सफाई बुडतात १. यथेष्ट करावया मांसभक्षण । स्वेच्छा जें कां पशुहनन । त्यांसी वेदें केलें निर्बंधन । पशुहनन यज्ञार्थ ॥ २ ॥ यथेच्छ मांसभक्षण करण्याकरितां स्वेच्छेनेच जें पशु मारणे, त्याला आळा घालण्यासाठी वेदानें केवळ यज्ञाकरितांच पशूचे हनन करावे असा निर्बंध लावून दिला आहे २. तेथही घातली जाण । देश काळ आणि वर्तमान । मंत्र तंत्र विधि विधान । धन संपूर्ण अतिशुद्ध ॥ ३ ॥ त्यांतही देश, काल, वर्तमान, मंत्र, तंत्र, विधि, विधान आणि सारे द्रव्य ही शुद्ध असावीत असाही निर्बंध घातलेला आहे ३. शक्त सज्ञान धनवंत । ऐसा कर्ता पाहिजे थेथ । मुष्टिघातें करावया पशुघात । पडे प्रायश्चित्त 'मे' म्हणतां ॥ ४ ॥ आणखी कर्ता असावा तोसुद्धा सशक्त, ज्ञानसंपन्न व श्रीमान् असा पाहिजे. कारण मुठीच्या तडाक्याने पशु मारतांना त्याने जर 'मे मे' असा शब्द केला तर प्रायश्चित्त घ्यावे लागते ४. ऐशी वेदाज्ञा नाना अवघड । घातलीं प्रायश्चित्तें अतिगूढ । तरी सकाम जे महामूढ । ते धांवती दृढ पशुहनन ॥ ५ ॥ अशी वेदाची आज्ञा मोठी बिकट आहे. तींत मोठमोठी अवघड प्रायश्चित्तें सांगितली आहेत, तरी महामूर्ख सकाम लोक पशु मारावयास धावतच असतात! ५. ऐसें झाल्या पशुहनन । विभाग येईल कवळ प्रमाण । तेंचि करावें भक्षण । दांतांसी जाण न लागतां ॥ ६ ॥ अशा रीतीने पशु मारल्यानंतर प्रमाणाने जेवढा वाटा येईल तेवढाच भक्षण करावा; पण तोसुद्धा दांताला न लागू देतां खाल्ला पाहिजे ६. विभाग भक्षितां आपण । जो करी रसस्वादन । त्यासीही प्रायश्चित्र जाण । हेंही निर्बंधन वेदें केलें ॥ ७ ॥ असा आपला वाटा खातांना जो कोणी त्याची चव घेईल, त्यानेही प्रायश्चित्त घेतले पाहिजे, असाही वेदानें निर्बध घातला आहे ७. करावें मांसभक्षण । हे वेदाज्ञा नाहीं जाण । त्याचें करावया निराकरण । लाविलें विधान यज्ञाचें ॥ ८ ॥ सारांश, मांसभक्षण करावे अशी वेदाची आज्ञा नाही; तर मांसभक्षणाची निवृत्ति करण्यासाठीच यज्ञाचे विधान लावून दिले आहे असें तूं समज ८. स्वेच्छा पशु न मारावया जाण । यज्ञीं नेमिलें पशुहनन । न करावया मांसभक्षण । नेमिला प्रमाण यज्ञभाग ॥ ९ ॥ आपल्याच इच्छेने पशु मारूं नये, म्हणून यज्ञामध्ये पशु मारण्याचा नियम करून दिला आहे; आणि मांसभक्षण करूं नये म्हणूनच यज्ञांतील भागाला प्रमाण ठेवले आहे ९. हेंही वेदाचें बोलणें । मूर्खप्रलोभाकारणें । येर्ह वीं पशुहिंसा न करणें । मांस न भक्षणें हें वेदगुह्य ॥ ३१० ॥ पण हेसुद्धा वेदाचे सांगणे मूर्खाच्या लोभिष्टपणाकरितांच आहे; बाकी पशुहिंसाही करूं नये व मांसभक्षणही करूं नये, हेच वेदाचे खरें गुह्य आहे ३१०. हिंसाविहारा ह्यालब्धैः पशुभिः स्वसुखेच्छया । यजन्ते देवता यज्ञैः पितृभूतपतीन् खलाः ॥ ३० ॥ न मानें वेदविधानासी । पशुहननीं क्रीडा ज्यांसी । अविधी मारूनि पशूंसी । मिरविती श्लाघेसी यज्ञिकत्वें ॥ ११ ॥ वेदोक्त विधीला न जुमानतां पशुहत्येचा जे खेळ खेळतात, ते अविधीनें पशुवध करून याज्ञिकपणाची आढ्यता मिरवितात! ११. अविधीं करूनि जीवहनन । तेणें पशूनें करिती यज्ञ । पितृदेवभूतगण । करिती यजन सुखेच्छा ॥ १२ ॥ अविधीने जीव घेऊन त्या पशूनें यज्ञ करतात; आणि खुशाल पितृ-देव-भूतगण ह्यांना हविर्भाग देतात १२. बाबडें बीज पेरिल्या शेतीं । पिकास नाडले निश्चितीं । शेखीं निजबीजा नागवती । राजे दंडूनि घेती करभार ॥ १३ ॥ पोकळ (अथवा भाजलेले) बी घेऊन शेतात पेरले, तर पिकाला मुकावेच लागेल; इतकेच नव्हे, तर बीं नाहींसें होतेच, आणि सरकारचा सारा मात्र भरावा लागतो! १३. तैशी अविधी यज्ञिकांची गती । स्वर्ग स्वप्नींही न देखती । थित्या नरदेहा नागवती । शेखीं दुःख भोगिती यमदंडें ॥ १४ ॥ अविधीने यज्ञ करणारांची गति अशीच होते. स्वर्ग तर स्वप्नांतसुद्धा दिसत नाहीं; आणि असलेला नरदेह मात्र गमावतात ; व शेवटी यमयातनेचे दुःख भोगतात ! १४. वृथा पशूंस दुःख देती । तेणें दुःखे स्वयें दुःखी होती । ऐशी यज्ञिकांची गती । आश्चर्य श्रीपती सांगत ॥ १५ ॥ पशूंना व्यर्थ दुःख देतात; आणि त्यामुळे स्वतः दुःखी होतात, अशी याज्ञिकांची गति विलक्षण होते. तीच श्रीकृष्ण सांगतात १५. स्वप्रोपमममुं लोकमसन्त श्रवणप्रियम् । आशिषो हृदि सङ्कल्प्य त्यजन्त्यर्थान्यथावणिक् ॥ ३१ ॥ स्वप्नीं दिसे सवेंचि नासे । तेवीं विकल्पेनि जग भासे । येथ सकाम कामनपिसें । स्वर्ग विश्वासें मानिती सत्य ॥ १६ ॥ स्वप्न दिसते आणि लागलेंच नाहींसें होते, त्याप्रमाणे जगही कल्पनेनेच भासते. येथे कामनेने वेडावलेल्या सकाम पुरुषांचा स्वर्ग सत्य आहे असाच विश्वास असतो १६. मुळींच मिथ्या मृगजळ । त्यामाजीं शीतळ जळ । थाया घेऊनि मागे बाळ । तैसे सकाम केवळ स्वर्गालागीं ॥ १७ ॥ मृगजळ हे मुळीच मिथ्या; त्यांतलें गार पाणी द्या म्हणून मुलाने हट्ट घ्यावा, त्याप्रमाणेच सकाम लोक स्वर्गासाठी हट्ट घेऊन बसतात १७. 'पिंपळावरून मार्ग आहे' । ऐकोनि रुखावरी वेंघों जाये । तो जेवीं भ्रमें गुंतोनि राहे । तेवीं स्वर्गश्रवणें होये सकाम ॥ १८ ॥ 'पिंपळावरून मार्ग आहे' असें ऐकून जो त्या वृक्षावर चढू लागतो, तो जसा भ्रमाने गुंतून राहतो, त्याप्रमाणे स्वर्गाचे वैभव ऐकून सकामाची दशा होते १८. स्वधर्ममार्गीं चालावया नर । वेदु स्वर्ग बोले अवांतर । ते फांटां भरले अपार । स्वर्गतत्पर सकाम ॥ १९ ॥ मनुष्याने स्वधर्माच्या मार्गाने चालावे म्हणून वेद स्वर्गाचें एक अवांतर फळ दाखवितो (मुख्य फळ नव्हे); पण सकाम लोक भ्रमिष्ट होऊन स्वर्गाच्याच पाठीला लागतात ! १९. वाट पिंपळावरी ऐकोनी । शहाणा चाले मार्ग लक्षोनी । अश्वत्थ सांडी डावलोनी । तो पावे स्वस्थानीं संतोषें ॥ ३२० ॥ 'पिंपळावरून वाट आहे' हे ऐकून शहाणा असतो तो त्या मार्गाकडे लक्ष ठेवून चालू लागतो व पिंपळाला वळसा घालून आनंदाने आपल्या ठिकाणी पोचतो ३२०. तेवीं स्वधर्माच्या अनुष्ठानीं । जो सांडी स्वर्गफळें उपेक्षूनी । तो चित्तशुद्धीतें पावोनी । ब्रह्मसमाधानीं स्वयें पावे ॥ २१ ॥ त्याप्रमाणे स्वधर्माच्या अनुष्ठानांत जो स्वर्गाची फळें उपेक्षून टाकून देतो, त्याचे चित्त शुद्ध होऊन तो स्वतः ब्रह्मसमाधान पावतो २१. या सांडूनि स्वधर्ममार्गासी । श्रवणप्रिय स्वर्गसुखासी । सकाम भुलले त्यासी । जेवीं घंटानादासी मृग लोधे ॥ २२ ॥ ह्या स्वधर्ममार्गाला सोडून ऐकण्यास गोड वाटणाऱ्या स्वर्गसुखाला सकाम लोक भुलतात. घंटानादाला मृग भुलून पडतात २२, तेवीं जन्मोनि कर्मभूमीसी । वेंचूनि धनधान्यसमृद्धीसी । थित्या नाडले नरदेहासी । स्वर्गसुखासी भाळोनी ॥ २३ ॥ त्याप्रमाणे कर्मभूमीत जन्माला येऊन धनधान्यसमृद्धि खर्च करून स्वर्गसुखाला भाळून, अनायासें लाभलेल्या नरदेहाला फुकटचे मुकतात! २३. जैसा कोणी एक वाणी । जुनी नाव आश्रयोनी । द्वीपांतरींचा लाभ ऐकोनी । न विचारितां मनीं समुद्रीं रिघे ॥ २४ ॥ ज्याप्रमाणे कोणी एखादा वाणी जुनें मोडके तोडकें गलबत घेऊन, द्वीपांतरी गेले असता मोठा नफा होतो असें ऐकून, मनांत फारसा विचार न करितां समुद्रात रिघतो २४; उन्मत्त कर्णधाराचे संगतीं । फुटकी नाव धरोनि हातीं । घेऊनियां सकळ संपत्ते । रिघे कुमती महार्णवीं ॥ २५ ॥ आणि उन्मत्त खलाशाच्या नादाला लागून फुटकी नाव हातीं धरून व सारी संपत्ति घेऊन तो अविचारी मनुष्य महासागरांत शिरतो २५, तो जेवीं समुद्रीं बुडे । तैसेंचि सकामांसी घडे । स्वर्ग वांछितां बापुडे । बुडाले रोकडे भवार्णवीं ॥ २६ ॥ भग तो जसा समुद्रात बुडतो, तीच गत सकामांची होते! बिचारे स्वर्गाची इच्छा धरून संसारसागरामध्ये बुडून जातात!२६. वांछितां स्वर्गसुखफळ । बुडालें स्वधर्मवित्त सकळ । बुडालें चित्तशुद्धीचें मूळ । बुडालें मुद्दल नरदेह ॥ २७ ॥ स्वर्गसुखाची इच्छा केली, की स्वधर्मरूपी सारे द्रव्य बुडते ; चित्तशुद्धीचें मूळच नाहीसे होऊन नरदेहरूपी मुद्दल नष्ट होते! २७. एव्हडें हानीचें कारण । देवो सांगत आहे आपण । सकामतेसी मूळ गुण । तेंही लक्षण स्वयें सांगे ॥ २८ ॥ एवढ्या हानीचे कारण, देव आपण सांगतात की, सकामतेला मूळ त्रिगुण आहेत. त्यांचेही विशेष लक्षण स्वतः सांगतात २८. रजः सत्त्वतमोनिष्ठा रजःसत्वतमोजुषः । उपासत इन्द्रौख्यान् देवादीन्न तथैव माम् ॥ ३२ ॥ रजतमाचेनि उन्मत्तें । सत्त्व संकीर्ण होय तेथें । तेव्हां रजाचेनि संमतें । काम चित्ततें व्यापूनि खवळे ॥ २९ ॥ रज व तम अत्यंत वाढले असता त्यांत सत्त्वही मिश्रित होते, त्यावेळी रजाच्या संगतीने काम चित्ताला व्यापून खवळतो २९ . अतिकाम खवळल्या चित्तीं । गुणनुसारें विषयीं प्रीती । तेव्हा सकामाची संगती । धरी निश्चितीं भावार्थें ॥ ३३० ॥ चित्तामध्ये काम अतिशय खवळला म्हणजे गुणानुसार विषयावर प्रेम जडते. तेव्हा निश्चितपणे भक्तिपूर्वक तो सकामाचीच संगत धरतो ३३०. सकामसंगती साचार । काम्यकर्मी अत्यादर । स्वर्गभोगीं महातत्पर । यजी देवपितर प्रमथादिक ॥ ३१ ॥ खरोखर सकामाच्या संगतीमुळे काम्यकामध्येच अत्यंत आदर वाटू लागतो आणि स्वर्गभोगामध्ये तत्पर होऊन देव, पितर, भूत, प्रमथगण यांचे यजन करतो ३१. मी सर्वात्मा सवेश्वर । त्या माझ्या ठायीं अनादर । कामलंपटत्वें नर । देवतांतर उपासिती ॥ ३२ ॥ ह्याप्रमाणे वासनालुब्ध असणारे लोक, मी सर्वांत्मा, सर्वेश्वर, जवळ असतां माझा अनादर करून इतर देवांचीच उपासना करतात ३२. म्हणसी देवतांतर जें कांहीं । तें तूंचि पैं गा सर्वही । हाही ऐक्यभावो नाहीं । भेदबुद्धीं पाहीं विनियोग ॥ ३३ ॥ आता कदाचित म्हणशील, इतर देव जरी झाले तरी सर्व काही तूंच आहेस; पण असा ऐक्यभावही त्यांचा असत नाही. तर सारा विनियोग भेदबुद्धीतच ३३. एंद्रादि देवद्वारां जाण । मीचि होय गा प्रसन्न । त्या माझ्या ठायीं नाहीं भजन । सकाम मन स्वर्गार्थी ॥ ३४ ॥ अरे ! इंद्रादि देवांच्या द्वाराने मीच प्रसन्न होतो, पण त्यांचे सकाम मन स्वर्गाचीच इच्छा धरीत असल्यामुळे ते माझे भजन करीत नाहीत ३४. दृढ कामना जडली चित्तीं । सांगतां स्वर्गीं पुनरावृत्ती । तेही हितत्वेंचि मानिती । ऐक निश्चितीं अभिप्रावो ॥ ३५ ॥ मनामध्ये दृढ वासना बिंबलेली असते, यामुळे स्वर्गाला पुनरावृत्तीचे फेरे आहेत असे जरी त्यांना सांगितले, तरी ते त्यांना हितकरच वाटते. तोही अभिप्राय निश्चित ऐक ३५. इष्द्वेह देवता यज्ञैर्गत्वा रंस्यामहे दिवि । तस्यान्त इह भूयास्म महाशाला महाकुलाः ॥ ३३ ॥ जे कर्मभूमीसी मनुष्य झाले । ते सहजें मोक्षाधिकारा आले । तेथही कामना नागविले । स्वर्गार्थ भजले देवतांतरा ॥ ३६ ॥ जे कर्मभूमीमध्ये मनुष्यरूपाने जन्माला येतात, ते सहजच मोक्षाचे अधिकारी असतात. असें असताही ते कामनेने नाडले जातात आणि स्वर्गासाठी इतर देवतांचेच भजन करतात! ३६. स्वर्गभोगीं ठेवूनि मन । नाना यागीं करिती यजन । तेणें दिविभोग पावेन । हा निश्चिय जाण याज्ञिकां ॥ ३७ ॥ स्वर्गभोगावरच मन ठेवून अनेक यज्ञयाग करितात, आणि तेवढ्याने आपल्याला स्वर्गातील सुखोपभोग मिळतील अशी याज्ञिकांना खात्री वाटत असते ३७. काळें भोगक्षयाच्या पतनीं । तेही घेती हितत्वें मानोनी । सवेंचि इहलोकीं जन्मोनी । ब्राह्मणपणीं सुशील ॥ ३८ ॥ कालांतराने पुण्यक्षय होतांच ती स्वर्गसुखें नाहींशी होऊन त्यांना पतन घडते, तेही त्यांना हितकरच वाटते. आम्ही पुण्यवान् स्वर्गस्थ जीव म्हणून सुशील ब्राह्मणाच्या कुळांत जन्माला आलो असे म्हणतात ३८. वेदवेदांगअोध्ययन । धनधान्यें अतिसंपन्न । आम्ही विख्यात गृहस्थ होऊन । क्षीणपुण्य स्वर्गस्थ ॥ ३९ ॥ स्वर्गातील पुण्य संपले तरी आम्ही वेदवेदांगाचे अध्ययन करून धनधान्याची अत्यंत समृद्धि मिळवून विख्यात गृहस्थ होऊन राहूं असें त्यांस वाटत असते ३९. नेणोनि वेदार्थनिजस्थिती । ऐसऐनशिया उपपत्तीं । सकामीं मानिली निश्चिती । ऊंस सांडोनि मागती कणीस त्याचें ॥ ३४० ॥ वेदार्थातील खरे रहस्य न समजल्यामुळे वरील उपपत्तीने हे लोक काम्यकर्मामध्येच निश्चिति मानितात आणि ऊस सोडून त्याचे कणीस मागत बसतात ! ३४०. एवं पुष्पितया वाचा व्याक्षिप्तमनसां नृणाम् । मानिनां चातिस्तब्धानां मद्वार्तापि न रोचते ॥ ३४ ॥ फल सांडूनि फुल खाये । तैसा परिपाक याज्ञिकां होये । स्वर्गकामाचेनि उपायें । अपायीं स्वयें पडताती ॥ ४१ ॥ फळ टाकून फूल खावें तसाच याज्ञिकांचा प्रकार होतो. ते स्वर्गाच्या इच्छेने जे उपाय म्हणून करितात, तेच त्यांना अपायांत पडतात ४१. अवघा संसार काल्पनिक । तेथ सत्य कैंचे स्वर्गसुख । परि श्रवणमात्रें देख । भुलले मूर्ख स्वर्गसुखा ॥ ४२ ॥ सारा संसारच मुळी काल्पनिक, त्यांत स्वर्गाचें सुखच खरे कसे असणार? परंतु केवळ ऐकीव गोष्टीवरूनच मूर्ख लोक स्वर्गसुखाला भुलतात ४२. जैसा नपुंसक वांछी स्त्रीसुख । परी संग तया कैंचा देख । मुळींच नाहीं बीजारोप । मा कैंचा कामसाटोप तयासी ॥ ४३ ॥ ज्याप्रमाणे नपुंसकानें स्त्रीसुखाची इच्छा केली, तरी त्याला संग कसा करता येणार ? मुळीं बीजोत्पत्तिच नाही, तर त्याला कामाचा खटाटोप काय कामाचा ४३. परी लटिकाचि तडतडां उडे । कष्टोनि व्यर्थाचि पहुडे । परी तया नसे भगभोग रोकडे । तैसे स्वर्ग फुडे प्राणिया ॥ ४४ ॥ पण फुकटच तडतडा उडतो; धडपड करून व्यर्थ निजतो मात्र; पण त्याला खरेखुरें स्त्रीसुख काही मिळत नाही! त्याप्रमाणेच अगदी स्वर्गासंबंधाने मनुष्यांची स्थिति होते ४४. गव्हांचा जो प्रथम मोड । तोंडीं घालितां लागे गोड । परी जो जाणे पिकाचा निवाड । तो मोड जाण उपडीना ॥ ४५ ॥ गव्हांचा जो पहिला कोंब येतो, तो तोंडांत घातला असतां गोड लागतो; परंतु पिकाचे महत्त्व ज्याला कळते, तो त्या कोंबाला उपटीत नाही ४५. पालेयाची चवी घेतां । गव्हांची गोडी न लगे तत्त्वतां । मग पाला पाळूनी स्वभावतां । शेवटीं रडता गव्हांचिकारणें ॥ ४६ ॥ पाल्याचीच चव घेऊ लागले तर त्याला काही गव्हांची गोडी येत नाही, असे असतां पालाच काढून घेतला तर शेवटी गव्हांकरितां रडतच बसावे लागते ४६. तेवीं वेदु बोलिला स्वर्गफल । तें स्वधर्माचें कोंवळें मूळ । तें उप्डूनि खातां तत्काळ । मोक्षफळ अंतरे ॥ ४७ ॥ त्याप्रमाणे वेदानें स्वर्गाचे फळ सांगितले आहे ते स्वधर्माचे कोवळे मूळ आहे. ते लगेच उपटून खाल्लं तर मोक्षफळ अंतरलेंच! ४७. हें जाणती जे सज्ञान । ते स्वर्गासी नातळती आपण । परी मूर्खाचें सकामपण । अनिवार जाण अतिशयें ॥ ४८ ॥ जे ज्ञाते लोक हे जाणतात, ते स्वर्गाला शिवतही नाहीत; पण मूर्खाची विषयतृष्णा अनिवार असते ४८. कामाचिया लोलंगती । सदा सकाम कर्में करिती । तेणें जन्ममरणांचे आवर्तीं । पडले नुगंडती आकल्प ॥ ४९ ॥ ते लोक कामाच्या आसक्तीने सकाम कार्मेचं करीत असतात, त्यामुळे ते जन्ममरणाच्या भोवऱ्यांत सांपडून कल्पपर्यंत त्यांतून बाहेर निघत नाहीत ४९. त्यांसी हित सांगती साधुजन । ते न मानिती संतवचन । आम्ही वेदार्थीं सज्ञान । हा ज्ञानाभिमान अतिगर्वें ॥ ३५० ॥ त्यांना साधुलोक हितबोध सांगत असतात, पण ते साधूचे बोलणे मान्य करीत नाहीत. आम्ही ज्ञाते आहोत, वेदाचा अर्थ आम्हांसच कळतो, असा ज्ञानाभिमान असल्यामुळे ते गर्वाने फुगून जातात ३५०. मी भगवंत नियंता सृष्टी । हें वेदें दाविल्या नवडे गोष्टी । निष्कामता कपाळ उठी । सकम पोटीं सुबुद्ध ॥ ५१ ॥ मी भगवान् सृष्टीचा नियंता आहे, असें वेदाने दाखवून दिले असताही ती गोष्ट त्यांना मान्य नाही. निष्काम कर्म म्हटले की त्यांचे कपाळच उठते. कारण त्यांची सकामबुद्धि अगदी दृढ झालेली असते ५१. एवं वेद मानूनि प्रवृत्तिपर । ठकले सकळ सकाम नर । तोचि वेदार्थ ब्रह्मपर । स्वयें श्रीधर सांगत ॥ ५२ ॥ अशा प्रकारे वेद हे प्रवृत्तिपरच आहेत असे मानून सगळे सकाम लोक फसतात. ह्याकरिता त्या वेदाचा ब्रह्मपर अर्थ स्वतः श्रीकृष्ण सांगत आहेत ५२. वेदा ब्रह्मात्मविषयास्त्रिकाण्डविषया इमे । परोक्षवादा ऋषयः परोक्षं मम च प्रियम् ॥ ३५ ॥ कर्मकांड उपासना ज्ञान । इंहीं त्रिकांडीं वेदु आपण । चित्तशुद्धिद्वारा जाण । ब्रह्मसंपन्न जीव करी ॥ ५३ ॥ वेद हा कर्मकांड, उपासनाकांड व ज्ञानकांड या तीन कांडांनी आपण होऊन चित्तशुद्धीच्या द्वाराने जीवाला ब्रह्मस्वरूप करतो ५३. पारधी लावून बडिशपिंडी । मीनांसी जळाबाहेर काढी । तेवीं दावून स्वर्गसुखगोडी । वेद जीवास ओढी परमार्थीं ॥ ५४ ॥ कोळी जसा गळाला मांसाचा तुकडा लावून माशांना पाण्याच्या बाहेर काढतो, त्याप्रमाणे वेदही स्वर्गसुखाची गोडी दाखवून जीवाला परमार्थाकडे ओढीत असतो ५४. परोक्षवाद वेदव्युत्पत्तीं । त्यागमुखें गा अन्योक्ती । सांडविली विषयासक्ती । ब्रह्मप्राप्तीलागूनि ॥ ५५ ॥ वेदविभाग हा परोक्षवाद म्ह० अस्पष्ट कथन करणारा असून ब्रह्मप्राप्ति व्हावी म्हणून त्यागमुखाने अन्योक्तीच्या द्वारे विषयावरील आसक्ति सोडविली आहे ५५. हें जाणोनि वेदार्थगुह्यज्ञान । जो जीव झाला ब्रह्मसंपन्न । तेथ कर्म-कर्ता मिथ्या जाण । आश्रम-वर्ण कैंचे ॥ ५६ ॥ हें वेदार्थातील गुह्यज्ञान लक्षात आणून जीव जेव्हां ब्रह्मस्वरूप होतो, तेव्हां कर्म व कर्ता मिथ्या होऊन जातो. मग आश्रम आणि वर्ण कशाचे ? ५६. तेथ कैंचें ध्येय-ध्याता-ध्यान । कैंचें ज्ञेय-ज्ञाता-ज्ञान । नाहीं भज्य-भजक-भजन । ब्रह्म परिपूर्ण पूर्णत्वें ॥ ५७ ॥ ध्येय, ध्याता आणि ध्यान कशाचें ? ज्ञेय, ज्ञाता, आणि ज्ञान तरी कशाचें ? तो परिपूर्णतेने परब्रह्मस्वरूपच झाल्यामुळे भज्य,भजक आणि भजन हीही शिल्लक राहात नाहीत ५७. तेथ कैंचे कर्म-कर्माचरण । कैंचा वेद-वेदाध्ययन । कैंचें साध्य आणि साधन । ब्रह्म परिपूर्ण पूर्णत्वें ॥ ५८ ॥ तेव्हां कर्मकर्माचरण तरी कशाचें ? वेद कशाचा व वेदाध्ययन कशाचे आणि साधन कशाचें? कारण, तो पूर्णपणाने परिपूर्ण ब्रह्मच झालेला असतो ५८. तेथ कैंचे दोष कैंचे गुण । कैंचे पाप कैंचें पुण्य । कैंचें जन्म कैंचें मरण । ब्रह्म परिपूर्ण पूर्णत्वें ॥ ५९ ॥ तेव्हां दोष आणि गुण, पाप आणि पुण्य, जन्म आणि मृत्यु कसा असणार ? परिपूर्णत्वाने सारें पूर्ण ब्रह्मच भरलेले असते ५९. तेथ कैंचा भेदु कैंचा बोधु । कैंचा मोक्ष कैंचा बंधु । सदोदित परमानंदु । हा वेदार्थ शुद्ध उद्धवा ॥ ३६० ॥ तेथे भेद कशाचा आणि ऐक्यज्ञान तरी कशाचें ? बंध कशाचा आणि मोक्ष कशाचा? उद्धवा! सदा सर्वकाल परमानंदच साठलेला असतो. हाच वेदाचा खरा अर्थ होय ३६०. या वेदार्थाचें निरूपण । प्रकट करितां आपण । निजस्वार्था नाडती जन । यालागीं जाण म्यां गुप्त केलें ॥ ६१ ॥ परंतु ह्या वेदार्थांचे निरूपण आपण होऊन प्रागट केले, तर लोकांच्या हितावर पाणी पडेल, म्हणून मी तें गुप्त ठेवले आहे ६१. हें वेदार्थाचें गुह्य सार । मज गुप्ताचें गुप्त भांडार । तुझा देखोनि अधिकार । म्यां साचार सांगितलें ॥ ६२ ॥ वेदार्थातील रहस्याचे सार असून माझ्या गुप्त ज्ञानाचे भांडार आहे, खरोखर तुझा अधिकार लक्षात आणूनच ते मी तुला सांगितलें आहे ६२. हा गुह्यार्थ करितां प्रकट । सांडोनि कर्ममार्गाची वाट । कर्म ब्रह्म उभयभ्रष्ट । होतील नष्ट अनधिकारी ॥ ६३ ॥ हा गुह्यार्थ प्रगट केला तर नष्ट व अनधिकारी असतील ते कर्ममार्गाची वाट सोडून कर्म व ब्रह्म या उभयतांनाही मुकतील ६३. हें जाणॊनि ज्ञाते ऋषीश्वरीं । वेदार्थनिरूपणकुसरी । हा मुख्यार्थ झांकोनि निर्धारीं । परोक्षवादावरी व्याख्यान केलें ॥ ६४ ॥ हेंच मोठमोठ्या ज्ञानसंमन्न ऋषींनी लक्षात आणून वेदार्थ सांगण्याच्या शैलीत खरोखर हा मुख्य अर्थ गुप्त ठेवून परोक्षवाद म्ह० प्रवृत्तिमार्गच प्रतिपादन केलेला आहे ६४ . सकळलोकहितार्थ । माझेंही हेंचि मनोगत । परोक्षवाद गोड लागत । लोकासंग्रहार्थ उद्धवा ॥ ६५ ॥ उद्धवा ! सर्व लोकांच्या हितासाठी व लोकांना वळण लागावे म्हणून तसेंच करणे उक्त आहे असे मलाही वाटते. कारण, सर्वांना प्रवृत्तिमार्गच गोड लागतो ६५. मीही लोकसंग्रहार्थ । अकर्ता कर्में आचरत । वेदाचें जें परोक्ष मत । मी स्वयें राखित लोकहिता ॥ ६६ ॥ लोकांना वळण लावून देण्याकरितां मी अकर्ता असूनही कर्मे करतो आणि लोककल्याणाकरितां वेदाचे जे प्रवृत्तिपर मत माहे मी स्वतःही पाळतों ६६. वेदाचें स्वरूप गहन । अतर्क्य अलक्ष्य अगम्य जाण । तेचि अर्थींचें निरूपण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ ६७ ॥ त्या वेदाचे स्वरूप फार खोल ,अतर्क्य, अलक्ष्य आणि अगम्य आहे असें तूं जाण. त्याच अर्थाचे निरूपण (पुढील श्लोकांत) श्रीकृष्ण स्वतः करीत आहेत ६७. शब्दब्रह्म सुदुर्बोधं प्राणेन्द्रियमनोमयम् । अनन्तपारं गम्भीरं दुर्विगाह्यं समुद्रवत् ॥ ३६ ॥ माझी वेदरूप जे बोली । शब्दतः अर्थतः अगाध खोली । ब्रह्मादिकां भुली पडली । मर्यादा केली न वचेनि ॥ ६८ ॥ माझं वेदरूपी भाषण आहे ते शब्दशः आणि अर्थशः फार खोल आहे, याबद्दल ब्रह्मदेवादिकांनासुद्धा भ्रम पडतो. कारण, त्याची मर्यादाच त्यांना करवत नाही ६८. बाहीं न तरवे समुद्र । तेवीं स्वमतीं न कळे वेदपार । येचि अर्थीं नाना ऋषीश्वर । युक्तीचे संभार वेंचिले ॥ ६९ ॥ समुद्र जसा हातांनी पोहून जाता येत नाही, तसा आपल्याच बुद्धीने वेदाचाही अर्थ कळत नाही. म्हणूनच अनेक ऋषिवर्यांनी नाना प्रकारच्या युक्तिप्रयुक्ति लढविल्या आहेत ६९. परी एवंविध तत्त्वतां । हे वेदवादाची कथा । न येचि कोणाचेही हाता । अर्थतः शब्दतः दुर्ज्ञेय ॥ ३७० ॥ पण अशाने खराखुरा वेदाचा अर्थ कोणाच्याच हाताला येत नाही. कारण तो शब्दशः व अर्थशःही दुर्बोधच असतो ३७०. ज्याची शब्दवाचकता । स्वरवर्णें शुद्ध न ये हाता । त्याची अर्थावबोधकता । अगम्य सर्वथा सुरनरां ॥ ७१ ॥ ज्याच्या शब्दांची मोडणीच शुद्ध स्वरवर्णानं आधी पुरती कोणाच्या हाती येत नाही, त्याच्या अर्थाची गोष कशाला विचारावी? ती मनुष्यांनाच नव्हे, तर देवांनाही अगम्य आहे ७१. पूर्वीं हाचि वेद अनुच्छिष्ट । म्यां ब्रह्मयाहातें करविला पाठ । तेणेंही नेणोनियां स्पष्ट । कर्मीं कर्मठ होऊनि ठेला ॥ ७२ ॥ पूर्वी हाच वेद अनुच्छिष्ट म्ह. दुसऱ्या कोणीही पाहिला नव्हता, तेव्हा ब्रह्मदेवाच्या हातून पाठ करविला. पण त्यालाही तो नीटसा न समजल्यामुळे कर्मानें तो कर्मठच होऊन बसला ७२. ते कर्मक्रिया अतिगोमटी । शंखें ह्रिली उठाउठी । ब्रह्मा विसरला वेदगोठी । पडलें सृष्टीं कर्मांध्य ॥ ७३ ॥ ती अत्यंत सुंदर अशी कर्मक्रिया हां हां म्हणता शंखासुराने चोरून नेली. त्यामुळे ब्रह्मदेव वेदाची गोष्टच विसरून गेला, आणि सृष्टयुत्पत्तीचे कार्यच बंद पडलें ७३. तो करावया वेदोद्धार । म्यां मर्दिला शंखासुर । सकळ श्रुतींचा संभार । ब्रह्मयासी साचार दीधला ॥ ७४ ॥ त्या वेदांचा उद्धार करण्याकरिता मी शंखासुराचा वध केला; आणि सारी वेदाची रास ब्रह्मदेवाला आणून दिली ७४. म्यां वेद ठेविले ब्रह्ययापुढें । तो पूर्व स्मरेना धडफुडें । तेव्हा चाकाटलें बापुडें । केवळ वेडें होऊनि ठेलें ॥ ७५ ॥ अशा प्रकारें ते सारे वेद जरी मी ब्रह्मदेवापुढे आणून ठेविले, तरी त्याला ते काही पहिल्याप्रमाणे स्मरेनात. तेव्हा तो बिचारा अगदी घाबरून जाऊन वेडाच होऊन बसला ७५. त्या वेदभागालागीं जाण । ऋषीं वेंचिलें निजज्ञान । शाखोपशाखीं रावण । वेदविभागन करूं आला ॥ ७६ ॥ त्या वेदविभागासाठी ऋषींनी आपलें ज्ञान खर्ची घातलें त्याच्या शाखाउपशाखांचा पदच्छेद करण्यासाठी रावण पुढे आला ७६. परी इत्थंभूत तत्त्वतां । माझ्या वेदविभागाची वार्ता । न येचि कोणाचिया हाता । जाण तत्त्वतां उद्धवा ॥ ७७ ॥ तरी उद्धवा! माझ्या वेदविभागाची इत्थंभूत वार्ता तत्त्वता कोणाच्याच हाताला लागली नाहीं ७७. तो मी वेदस्थापक श्रीहरी । लोक राखावया मर्यादेवरी । स्वयें सत्यवतीच्या उदरीं । झालों अवतारधारी श्रीव्यास ॥ ७८ ॥ तोच मी वेदसंस्थापक श्रीहरि, लोकांना मर्यादेत ठेवण्यासाठी स्वतः श्रीव्यासाचा अवतार धारण करून सत्यवतीच्या पोटी जन्मास आलों ७८. वेदविभागीं राजहंसु । यालागीं नामें 'वेदव्यासु' । तेणें म्यां केला श्रुतिविलासु । वेदविशेषु चतुर्धा ॥ ७९ ॥ वेदविभाग करण्यांत तो केवळ राजहंस होता, म्हणूनच त्याला 'वेदव्यास' असें म्हणतात. त्याने वेदार्थ प्रगट करून त्याचे चार प्रकार केले ७९. वेद अर्थत्वें अतिदुर्घट । परी वाचकत्वें झाला प्रगट । त्या चारी वाचा अतिश्रेष्ठ । ऐक स्पष्ट सांगेन ॥ ३८० ॥ वेद हा अर्थाच्या दृष्टीने अत्यंत गूढ आहे, पण शब्दाच्या दृष्टीने प्रगट आहे. ते शब्द म्ह० वाणी चार प्रकारच्या आहेत. त्या मी स्पष्ट करून सांगतों ऐक ३८०. नादाचें प्रथम स्फुरण । घोषमात्र सूक्षम प्राण । ती नांव 'परा' वाचा जाण । प्रथम लक्षण ॐकारीं ॥ ८१ ॥ नादाचे जें पहिले स्फुरण म्हणजे घोषमात्र सूक्ष्म प्राण, त्याचे नाव 'परावाणी'. तेच ओंकाराचे प्रथम लक्षण होय ८१. तोचि नादयुक्त प्राण । अंतःकरणीं होय स्फुरण । ते 'पश्यंती' वाचा जाण । विवेकलक्षण तीमाजीं ॥ ८२ ॥ तोच नादयुक्त प्राण अंत:करणांत स्फुरण पावला म्हणजे त्याला 'पश्यंती वाणी' असे म्हणतात. ती विवेकलक्षणरूप आहे ८२. नाभीपासोनी नाभिस्वरीं । जे घुमघुमी कंठवरी । ते 'मध्यमा' वाचा खरी । स्वयें श्रीहरी सांगत ॥ ८३ ॥ आणि नाभीपासून नाभिस्वरानें कंठापर्यंत घुमघुमणारी जी वाणी ती 'मध्यमा' होय. असें श्रीकृष्णांनी स्वतः सांगितले ८३. अकार-उकार-मकार । स्वरवर्णयुक्त उच्चार । जेथ प्रगट होय ओंकार । ते वाचा साचार 'वैखरी' ॥ ८४ ॥ त्यानंतर अकार, उकार व मकार असा स्वर-वर्णयुक्त उच्चार, ज्यापासून 'ओंकार' प्रगट होतो, तीच 'वैखरी वाणी' होय ८४. ते वैखरीच्या ठायीं । शाखोपशाखीं जो कांहीं । वेद अनंतरूप पाहीं । त्यासही नाहीं मर्यादा ॥ ८५ ॥ त्या वैखरी वाणींत शाखोपशाखांमध्ये जो अनंतरूपाने वेद भरलेला आहे, त्यालाही मर्यादा नाहींच ८५. यापरी वेद अमर्याद । जरी चतुर्धा केला विशद । तरी जनासी अतिदुर्बोध । यालागीं उपवेद विभागिले ॥ ८६ ॥ याप्रमाणे वेद हा अमर्याद आहे. त्याचे चार विभाग करून स्पष्टीकरण केले, तरी तो लोकांना अतिशय दुर्बोधच झाला, ह्याकरिता त्याचे 'उपवेद' म्हणून आणखी विभाग केले ८६. ऐसेनिही जनासी न कळे वेद । यालागीं वेदावरी पद । श्रीव्यासें केले विशद । तरी वेदार्थ शुद्ध कळेना ॥ ८७ ॥ इतकें केलें तरीसुद्धा लोकांना वेद कळेनाच. ह्यास्तव श्रीव्यासांनी वेदांची पदे पाडून त्याचा अर्थ स्पष्ट केला. तरीही वेदाचा खरा अर्थ कळत नाही तो नाहींच ८७. येचि अर्थीं ऋषीश्वर बहुत । सुमंतु जैमिनी भाष्य भारत । पैल सूत्रादि जे समस्त । शिणतां वेदार्थ न कळेचि ॥ ८८ ॥ ह्याचा अर्थ लावण्याकरितां सुमंत, जैमिनी, भाष्यभारत, पैल सूत्र इत्यादि सारे मोठमोठे ऋषी थकले. तरीही त्यांस वेदाचा अर्थ कळलाच नाही ८८. एवं वाच्यता आणि लक्ष्यता । स्थूलसूक्ष्मत्वें वेदार्थज्ञाता । मजवांचूनि तत्त्वतां । आणिक सर्वथा असेना ॥ ८९ ॥ तात्पर्य, वेदाचा स्थूल व सूक्ष्म वाच्यार्थ व लक्ष्यार्थ जाणणारा माझ्याशिवाय दुसरा कोणीच नाही ८९. मयोपबृंहितं भूम्रा ब्रह्मणानन्तशक्तिना । भूतेषु घोषरूपेण बिसेषूर्णेव लक्ष्यते ॥ ३७ ॥ जो मी अंतर्यामी आपण । ’भूमा’ म्हणिजे अपरिछिन्न । सबाह्य व्यापकत्वें संपूर्ण । ब्रह्म परिपूर्ण जो कां मी ॥ ३९० ॥ जो मी स्वतः सर्वांच्या अंत:करणांत 'भूमा' म्हणजे अपरिच्छिन्नपणे अंतर्बाह्य व्यापूनही परिपूर्ण असा जो पूर्णब्रह्म ३९०, तेणें म्यां वेद अधिष्टित । या नांव बोलिजे 'उपबृंहित' । अधिष्ठाता विकारी होत । जेवीं अभ्रांत चंद्रमा ॥ ९१ ॥ त्या मजकडून वेद अधिष्ठित आहे, ह्यालाच 'उपबृंहित' असे म्हणतात. परंतु अधिष्ठाता हा अभ्रांतल्या चंद्राप्रमाणे विकृत होतो (झालासा दिसतो) ९१. कां अग्नि काष्ठीं अधिष्ठितां । त्यासी तत्काळ ये साकारता । मग प्रबळ आणि शांतता । या विकारावस्था अग्नीसी ॥ ९२ ॥ किंवा अग्नि काष्ठामध्ये अधिष्ठित झाला की, त्याला लगेच आकार येतो; तेव्हां त्या अग्नीलाही प्रबळता व शांतता ह्या दोन विकारावस्था प्राप्त होतात ९२. यापरी विकारी नव्हे जाण । मी अंतर्यामी नारायण । ब्रह्मस्वरूपें परिपूर्ण । विकारनिर्दळण स्वयें कर्ता ॥ ९३ ॥ त्याप्रमाणे मी अंतर्यामी नारायण विकारी होत नाही. मी ब्रह्मस्वरूपाने परिपूर्ण असून स्वतः विकाराचे निर्दालन करणारा आहे ९३. मीचि विकारांचा कर्या । करूनि मीचि अकर्ता । त्या मज न ये विकारता । ब्रह्मस्वरूपतास्वभावें ॥ ९४ ॥ विकारांचा कर्ता मीच; आणि करून अकर्ताही मीच ; मी स्वयंभू ब्रह्मस्वरूप असल्यामुळे मला विकार म्हणून होतच नाही ९४. ब्रह्म केवळ निर्धर्म । तें केवीं विकारी कर्म । ऐसा कांहीं कल्पिसी भ्रम । तेंही सुगम सांगेन ॥ ९५ ॥ ब्रह्म केवळ निर्धर्म आहे. ते विकाराचे कर्म कसे करील? अशी काही तरी तुझ्या मनामध्ये शंका उत्पन्न होईल, तर त्याचेही उत्तर स्पष्ट करून सांगतों ऐक ९५. माझी योगमाया अनंतशक्ती । जे शंभुस्वयंभूंसी न ये व्यक्ती । तिचेनि योगें मी चिन्मूर्ती । उत्पत्तिस्थितिसंहर्ता ॥ ९६ ॥ माझी अनंत शक्तिरूप जी योगमाया आहे, ती शंकर व ब्रह्मदेव ह्यांनासुद्धा समजत नाही; तिच्या योगानेच मी चिन्मूर्ति असतांही उत्पत्ति, स्थिति व संहारकर्ता होतों ९६. एवं योगमाया स्वभावतां । मी सकळ करूनि अकर्ता । त्या मज देशतां काळतां । विकारिता स्पर्शेना ॥ ९७ ॥ असा योगमायेचा स्वभाव आहे. मी सर्व कांहीं करून अकर्ता आहे. त्यामुळे मला देश व काल ह्यांचा विकार शिवत नाहीं ९७. जरी सत्य असती भेदता । तरी मज येती विकारिता । माझे निजस्वरूपीं पाहतां । भेदाची वार्ता असेना ॥ ९८ ॥ भेदभाव जर खरा असता, तर मला विकार झाला असता; परंतु माझ्या निजस्वरूपांत पाहिले तर भेदाची वार्ताच असत नाहीं ९८. जेवीं भ्रमें सर्पत्व दोरावरी । परी दोर सर्पत्व कदा न धरी । तेवीं मी परमात्मा श्रीहरी । करूनि अविकारी निजरूपें ॥ ९९ ॥ भ्रमानें ज्याप्रमाणे दोरावर सर्पाचा भास होतो, परंतु दोर कांहीं सर्प कधीच होत नाही, त्याप्रमाणे मी परमात्मा श्रीहरि सर्व करूनही निजरूपाने अविकारीच असतों ९९. घोषरूपें अतिसूक्ष्म नादु । तो मी प्रणवरूपें निजवेदु । प्राणिमात्रीं असें स्वतःसिद्धु । परी नेणती बोधु सकामत्वें ॥ ४०० ॥ घोषरूपाने असणारा जो अत्यंत सूक्ष्म नाद तो मी प्रणवरूपानें खरा वेद प्रत्येक प्राणिमात्राच्या ठिकाणी स्वतःसिद्धच आहे; परंतु लोक सकामबुद्धीमुळे हे जाणत नाहीत ४००. जेवीं कां विष्ठा भक्षी सूकर । उपेक्षी कस्तुरी कापुर । तेवीं सूक्ष्मवेदाचें निजसार । सकाम नर उपेक्षिती ॥ १ ॥ डुक्कर ज्याप्रमाणे कस्तूरी वा कापूर टाकून विष्ठाच खात बसते, त्याप्रमाणे सूक्ष्मवेदाचें जें अंतरंग त्याची सकाम पुरुष उपेक्षा करितात १. मी निजानंद हृदयाआंत । त्या मज उपेक्षूनि भ्रांत । कामासक्तीं लोलंगत । द्वारें वोळंगत नीचांचीं ॥ २ ॥ मी निजानंदस्वरूपी प्रत्येकाच्या हृदयांतच राहात असतां, भ्रांतिष्ट लोक कामासक्तीने लोलिंगत होऊन नीचांचे उंबरठे झिजवीत असतात २. त्या हृदयस्थ देवाचें ध्यान । नित्य योग्यासी निदिध्यासन । सम करोनि प्राणापान । सदा अनुसंधान नादाचें ॥ ३ ॥ योगी लोक मात्र त्या हृदयस्थ देवाचें ध्यान करीत असतात, त्याचा त्यांना निदिध्यास लागलेला असतो, प्राणापान सम करून ते निरंतर नादाचें अनुसंधान ठेवतात ३. माझें वेदतत्त्व जें कां गुप्त । प्रणवरूपें हृदयाआंत । योगीसदा अनुभवित । त्यांचे स्वरूप निश्चित अवधारीं ॥ ४ ॥ माझें वेदरहस्य जें गुप्त म्हणून आहे, ते प्रणवरूपाने हृदयाच्या आंतच आहे ; योगी सर्वकाळ त्याचा अनुभव घेतात. त्याचे निश्चितस्वरूप सांगतों ऐक ४. जैसा कमळमृणाळबिसतंत । तैसा लूक्ष्म नाद अत्यंत । नाभीपासोनि ब्रह्मरंध्रांत । ओंकार स्वरांत लक्षिती ॥ ५ ॥ कमळाच्या देठांतील कोमल तंतूप्रमाणे हा अत्यंत सूक्ष्म नाद नाभीपासून ब्रह्मरंध्रापर्यंत असलेला ओंकारस्वरूपाने लक्षितात ५. ऐसा ओंकाराच्या स्वराआंत । नाभीपासोनि ब्रह्मरंध्रांत । सूक्ष्म नादाचा निजतंत । योगधारणा राखत महायोगी ॥ ६ ॥ अशा प्रकारच्या नाभीपासून ब्रह्मरंध्रापर्यंत ओंकाररूपाने चालणारा जो सूक्ष्म नादरूपी तंतु, तो महायोगी योगधारणेनें अनुसंधानांत राखतात ६. हाचि नाद पैं प्रस्तुत । लौकिकीं असे भासत । दोंही कर्णीं देतां हात । तोचि घुमघुमित निजनादु ॥ ७ ॥ हाच नाद लोकांत दोन्ही कानांवर दोन हात ठेवले म्हणजे घुमघुमत असलेला ऐकू येतो ७. योगी म्हणती 'अनाहत शब्द' । वेदांती म्हणती 'सूक्ष्म नाद' । आम्ही म्हणों हा 'शुद्धवेद' । असो अनुवाद हा नांवांचा ॥ ८ ॥ योगी लोक ह्याला ' अनाहतशब्द ' म्हणतात. वेदांती लोक ह्यालाच 'सूक्ष्मनाद ' असें म्हणतात, व आम्ही ह्याला 'शुद्ध वेद ' असे म्हणतों. पण हा नांवाचा अनुवाद असू द्या ८. ऐशिया स्वतःसिद्ध वेदापाशीं । श्रद्धा नुपजेचि प्राणियांसी । यालागीं सूक्ष्म वेद स्थूलतेसी । म्यां जनहितासी आणिला ॥ ९ ॥ अशा स्वत:सिद्ध वेदावर मनुष्याची श्रद्धा बसत नाहीं; म्हणून तो सूक्ष्मवेदच मी लोककल्याणाकरिता स्थूलरूपाला आणला ९. तोचि स्थूलत्वें झाला प्रकट । ते प्रकट होती वेदवाट । दृष्टांतेंकरूनि स्पष्ट । तुज मी चोखट सांगेन ॥ ४१० ॥ हा जो स्थूलरूपाने प्रगट झालेला वेद, तोच वेदाचा प्रसिद्ध मार्ग बनला. तेच दृष्टांताने तुला अगदी स्पष्ट करून सांगतों ऐक ४१०. ऐसें बोलिला श्रीनिवास । तेणें उल्हासला हृदयहंस । म्हणे मजकारणें हृषीकेश । अत्यंत सौरस निरूपणीं ॥ ११ ॥ असें श्रीकृष्ण बोलले त्यामुळे उद्धवाच्या आत्म्याला मोठा संतोष झाला. आणि म्हणाला, श्रीकृष्ण माझ्यासाठी फारच सुरस निरूपण करताहेत ११. मजवरी बहुत स्न्नेहाळ । मज उद्धारावया गोपाळ । निरूपणीं सुकाळ । अतिसरळ अमृतरसु ॥ १२ ॥ माझ्यावर फारच प्रेम असल्यामुळे केवळ माझा उद्धार करण्याकरितांच श्रीकृष्ण हे निरूपणाचा सुकाळ करून त्यांत अमृताहूनही गोड रस भरीत आहेत १२. ऐसें उद्धवाचें बोलणें ऐकोनी । काय बोलिला सारंगपाणी । म्हणे मी तोचि निरूपणीं । सांगेन तुजलागोनी उद्धवा ॥ १३ ॥ उद्धवाचे भाषण ऐकून श्रीकृष्ण काय म्हणाले ? ते म्हणाले की, उद्धवा ! तोच (वेद) आतां तुला मी निरूपणामध्ये सांगून देतो १३. यथोर्णनाभिर्हृदयादूर्णामुद्वमते मुखात् । आकाशाद्घोिषवान्प्राणो मनसा स्पर्शरूपिणा ॥ ३८ ॥ छन्दोमयोऽमृतमयः सहस्त्रपदवीं प्रभुः । ओंकाराठद्व्य ञ्जितस्पर्शस्वरोष्मान्तःस्थभूषिताम् ॥ ३९ ॥ विचित्रभाषाविततां छन्दोभिश्चतुरुत्तरैः । अनन्तपारां बृहतीं सृजत्याक्षिपते स्वयम् ॥ ४० ॥ ऊर्णनाभि म्हणिजे कांतणी । ते जेवीं निजमुखापासूनी । तंतु काढी अतिसूक्ष्मपणीं । तेवीं निर्गुणीं 'ओंकार' ॥ १४ ॥ ऊर्णनाभि म्हणजे कांतीण (कोळी), ती जशी आपल्या तोंडांतून अतिशय बारीक असे तंतु काढते, त्याप्रमाणेच निर्गुणामधून ओंकाराचा धागा निघतो १४. तो ओंकार होतां सप्राण । सहजस्वभावें गा जाण । झाला 'हिरण्यगर्भ' अभिधान । आपणिया आपण वेदाज्ञा ॥ १५ ॥ तो ओंकार आपल्या स्वभावधर्मानुसार 'सप्राण' म्ह. सचेतन होतांच 'हिरण्यगर्भ ' संज्ञक होतो असें वेदांत सांगितले आहे १५. 'प्रभु' म्हणजे ऐश्वर्यख्याति । अचिंत्यानंत त्याची शक्ति । तो छंदोमय वेदमूर्ती । जाण निश्वितीं उद्धवा ॥ १६ ॥ उद्धवा ! तोच 'प्रभु' म्ह. ऐश्वर्ययुक्त स्वामी होय. त्याची शक्ति अचिंत्यानंत आहे. आणि तोच छंदोमय वेदमूर्ति होय असें तूं जाण १६. तो अविनाशी वास्तवस्थिती । नित्य सुखमय सुखमूर्ती । तेणें सप्राण नादाभिव्यक्ति । मनःशक्ती चेतवी ॥ १७ ॥ तो वस्तुतः अविनाशी असून नित्य सुखमय व सुखमूर्तिच आहे. तो प्राणोपाधि घेऊन नादरूपाने मनःशक्तीला जागृत करतो १७. चेतविली जे मनःशक्ती । होय स्पर्श-स्वर-वर्ण कल्पिती । वेदाज्ञ 'बृहती' म्हणती । जिचा अपरिमिती विस्तार ॥ १८ ॥ ही जी जागृत केलेली मनःशक्ति असते, तीच स्पर्श-स्वर-वर्ण यांना निर्माण करते. हिलाच वेदवेत्ते पुरुष 'बृहती' असे म्हणतात. कारण हिचा विस्तार अपरिमित आहे १८. ते स्वरवर्णसंवलित मंत्र । हृदयाकाशीं विचित्र । सहस्त्रशाखीं विस्तार । वाढली अपार वैखरी ॥ १९ ॥ ते स्वरांनी व वर्णांनी युक्त असलेले मंत्र, हृदयाकाशामध्ये विलक्षण रीतीनें हजारों शाखांनी विस्तार पावतात. याप्रमाणे वैखरी वाणीचा विस्तार अपरंपार वाढला आहे १९. स्वरवर्णादि उच्चारीं । वेदधिष्ठान वैखरी । ते उपजली जेणेंकरी । तेही परी सांगेन ॥ ४२० ॥ स्वर आणि वर्ण इत्यादिकांच्या उच्चाराने वेदांना अधिष्ठान असणारी वैखरी वाणी कशी उत्पन्न झाली, तोही प्रकार सांगतों ऐक २० . मात्रात्रयमिळणीं लोक । ओंकार बोलती आवश्यक । हा ओंकार अलोलिक । अतिसूक्ष्म देख देहस्थ ॥ २१ ॥ अ-उ-म या तीन मात्रा एकत्र झाल्या म्हणजे लोक त्याला 'ओंकार' म्हणतात. हा ओंकार अलौकिक असून अत्यंत सूक्ष्म रूपाने देहांतच असतो २१. त्याचि ओंकारासी प्राणसंगती । आधारादि चक्रीं ऊर्ध्वगती । तेथ वाचांची होय अभिव्यक्ती । परा-पश्यंती-मध्यमा ॥ २२ ॥ त्याच ओंकाराला प्राणाच्या संगतीनें मूलाधारादि चक्रामध्ये ऊर्ध्वगति सुरू होते, तेव्हां परा, पश्यंती, मध्यमा वाणींची अभिव्यक्ति होते २२. परावाचेच्या अभ्यंतरीं । जन्मे पश्यंती ज्येष्ठकारी । मध्यमा जन्मे तिच्या उदरीं । एवं परस्परीं जन्मती ॥ २३ ॥ परा वाणीच्या आंत 'पश्यंती' श्रेष्ठत्वाने जन्मास येते. तिच्या पोटीं 'मध्यमा' जन्मास येते. अशा त्या एकमेकींपासूनच उत्पन्न होतात २३. तैशाचि येरीतें येरी । नोसंडोनि क्षणभरी । चालती उपरांउपरी । चक्रींच्या चक्रांतरीं समवेत ॥ २४ ॥ त्याचप्रमाणे त्या एकमेकींना सोडून कधीं एक क्षणभरही राहात नाहीत. त्या एकमेकींना घेऊन एक चक्र ओलांडलें म्हणजे दुसरें चक्र 'आधारचक्रीं' परा वाचा । 'स्वाधिष्ठानीं' जन्म पश्यंतीचा । 'मणिपूरीं' हूनि 'विशुद्धी' चा । ठायीं मध्यमेचा रिगुनिगू ॥ २५ ॥ व दुसरे ओलांडले म्हणजे तिसरे चक्र, अशा रीतीने वर वरच चढत जातात २४. तेथोनियां मुखद्वारीं । वाचा प्रकाशे वैखरी । तैं स्वर-वर्ण-उच्चारीं । नानामंत्रीं गर्जत ॥ २६ ॥ 'मूलाधार' चक्रामध्ये परा वाचा उत्पत्र होते. 'स्वाधिष्ठान' चक्रामध्ये पश्यंतीचा जन्म होतो, आणि 'मणिपूर' चक्रापासून 'विशुद्धी ' चक्रापर्यंत मध्यमेची जा-ये चालत असते २५. तेचि स्वर आणि वर्ण । सांगेन 'स्पर्श' व्यक्तिलक्षण । 'अंतस्थ' 'ऊष्म' कोण कोण । विभागलक्षण अवधारीं ॥ २७ ॥ तेथून मुखाच्या द्वारें वैखरी' वाणी प्रगट होते. तेव्हा ती स्वरवर्ण यांच्या उच्चाराने अनेक मंत्ररूपाने गर्जत असते २६. केवळ 'अ क च ट त प' देख । हे ककारादि पंच पंचक । स्पर्शवर्णाचें रूपक । अक्षरें निष्टंक पंचवीस ॥ २८ ॥ त्याच स्वरांमध्ये आणि वर्णामध्ये 'स्पर्श' वर्ण कोणते, 'अंतस्थ' वर्ण कोणते, व 'ऊष्म वर्ण कोणते, यांचा विभाग तूं ऐक २७. सवर्णें गर्जतां उच्चार । ते अकारादि सोळाही स्वर । 'य र ल व' यांचा विचार । जाण साचार 'अंतस्थ' ॥ २९ ॥ केवळ अ ते अः हे स्वर ; कवर्ग, चवर्ग, टवर्ग, तवर्ग व पवर्ग अशी पांच वर्णांची पांच पंचके म्हणजे पंचवीस अक्षरें, यांना स्पर्शवर्ण म्हणतात २८. 'श ष स ह' हे वर्ण चारी । 'ऊष्म' बोलिजे शास्त्रकारीं । विसर्गादि अनुस्वारीं । 'अंअः' वरी विभागु ॥ ४३० ॥ ज्यांच्या साहाय्यानेच वर्णाचा नीट उच्चार होतो ते अकारादिक सोळा 'स्वर' होत. य, र, ल, व यांना 'अंतस्थ' वर्ण म्हणतात २९. येथ बावन्नावी मातृका एक । केवळ 'क्ष' कारु गा देख । यांतु सानुनासिक निरनुनासिक । जाणति लोक शास्त्रज्ञ ॥ ३१ ॥ आणि श, ष, स, ह या चार वर्णाना शास्त्रकार 'उष्म ' वर्णं म्हणतात. अ-अ: हे अनुस्वार व विसर्गविभाग होत ४३०. एवं स्वरवर्णविधिउच्चारीं । लौकिकी वैदिकी भाषावरी । वेदशास्त्रार्थप्रकारीं । वाढली वैखरी शब्दचातुर्यें ॥ ३२ ॥ ह्यांत क्षकार ही केवळ बावन्नावी मातृका होय. यांत आणि आणखी निरनुनासिक व सानुनासिक हे भेद असलेले शास्त्रज्ञ लोक जाणतातच ३१. बोलेंचि गा बोलाप्रती । चाळूनि नाना उपपत्ती । बोलें बोल निगृहिती । युक्तिप्रयुक्ती साधुनी ॥ ३३ ॥ अशा प्रकारे स्वर व वर्ण यांच्या यथाशास्त्र उच्चाराने व वेदशास्त्रांच्या अर्थप्रकारांनी लौकिक आणि वैदिक भाषा विस्तारलेली आहे. ३२. ऐशिया नानाशब्दकुसरीं । अत्यंत विस्तरिली वैखरी । तेचि चौं चौं अक्षरीं । वाढवूनि धरी नाना छंदें ॥ ३४ ॥ शब्दांच्या नाना प्रकारच्या उपपत्ति लावून, युक्तिप्रयुक्तीनें शब्दानेच शब्दाचे खंडन करितात ३३. वाढतां चतुरक्षरभेदें । उत्तरोत्तर नाना छंदें । वाढविलीं स्वयें वेदें । निजज्ञान बोधें बोलूनि ॥ ३५ ॥ अशा नानाप्रकारच्या शब्दकौशल्याने ही वैखरी वाणी अतिशयच विस्तारली आहे. तीच चार चार चार अक्षरांनी वाढून तिचेच अनेक छंद झाले आहेत ३४. अतएव अनंत अपार । अर्थतां शब्दतां अतिसुस्तर । माझ्या शब्दज्ञानाचा पार । सुरनर नेणती ॥ ३६ ॥ अशा प्रकारे उत्तरोत्तर चार चार अक्षरांच्या वाढण्याने नवे नवे अनेक छंद साधून वेदाने आपल्या ज्ञानाचा बोध बोलून दाखविला आहे ३५. ऐशी वैखरीची अनंतशक्ती । यालागीं म्हणिजे ते 'बृहती' । इच्या विस्ताराची गती । स्वयें नेणती शिव स्त्रष्टा ॥ ३७ ॥ म्हणूनच ती वैखरी वाणी अनंत आणि अपार आहे. शब्दतः व अर्थतः ती अत्यंत कठिण आहे. माझ्या शब्दज्ञानाचा अंतपार सुरांनरांनाही लागत नाही ३६. हिरण्यगर्भत्वें स्वयें जाण । जीव-शिव-अंतर्यामीलक्षण । माझी वेदाज्ञा प्रकाशी आपण । जिचें नामाभिधान 'वैखरी' ॥ ३८ ॥ वैखरीची अशी अनंत शक्ति आहे, म्हणूनच तिला 'बृहती' असे म्हणतात. हिच्या विस्ताराची मर्यादा शंकर व ब्रह्मदेवही जाणत नाहीत ३७. जो मी वेदात्मा श्रीहरी । तो वेदु या रीतीं विस्तारीं । स्वयें विस्तारोनि संहारीं । मर्यादेवरी स्वकाळें ॥ ३९ ॥ स्वतः हिरण्यगर्भाच्या रूपाने जीव, शिव आणि अंतर्यामी यांना माझी वेदाज्ञा प्रगट करते. तिचंच नामाभिधान 'वैखरी' ३८. मागां बोलिलीं छंदें जाण । त्या छंदांचें निजलक्षण । स्वयें सांगताहे श्रीकृष्ण । जो वेदाचें कारण निजस्वरूप ॥ ४४० ॥ जो वेदात्मा श्रीहरि, तो मी अशा रीतीने वेदाचा विस्तार करतो. स्वत:च विस्तार करून त्याची ठरीव मर्यादा संपल्यावेळी त्याचा संहारही मीच करतों ३९. गायत्र्युष्णिगनुष्टप् च बृहती पङ्क्तिरेव च । त्रिष्टब्जगत्यतिच्छन्दो ह्यत्यष्ट्यतिजगद्विराट् ॥ ४१ ॥ पूर्वी छंद सांगून दिले त्या छंदाचें निज लक्षण, वेदाचे कारण जो परमात्मा श्रीकृष्ण तो स्वत:च सांगत आहे ४४०. सकळ छंदांचें अधिष्ठान । मुख्य गायत्री छंद जाण । त्या गायग्री छंदाचें लक्षण । ऐक संपूर्ण सांगेन ॥ ४१ ॥ आठाअठां अक्षरीं त्रिपद । गणितां जेथ यती शुद्ध । त्या नांव 'गायत्री' छंद । हें वेदानुवाद निजबीज ॥ ४२ ॥ 'गायत्री छंद' हा सर्व छंदांचे मुख्य अधिष्ठान होय. त्या गायत्री छंदाचे लक्षण तुला सविस्तर सांगतों ऐक ४१. हें वेदाचें निजजिव्हार । ब्रह्मज्ञानाचें परपार । परमानंदाचें सोलींव सार । जाण साचार गायत्री ॥ ४३ ॥ आठ आठ अक्षरांचे तीन चरण आणि मोजतांना ज्यांत शुद्ध यति (विराम) येतो, त्याला गायत्री छंद असें म्हणतात. वेदोक्तींतील हेच काय ते मुख्य बीज होय ४२. हें चैतन्याचें जीवन । मज गोप्याचें गुप्तधन । जेथ जीवशिवां समाधान । तें हें छंद जाण गायत्री ॥ ४४ ॥ वेदाचे रहस्य, ब्रह्मज्ञानाचे परतीर, आणि परमानंदाचे सोलीव सार तीच ही गायत्री होय ४३. ये छंदींचे एक एक अक्षर । अक्षराचें निजसार । सच्चिदानंदाचें निजभांडार । जाण साचार गायत्री ॥ ४५ ॥ ही चैतन्याचे जीवन व माझ्या गुप्ताचे गुप्तधन आहे. ज्यांत जीवा-शिवाचे समाधान होते, तोच हा गायत्री छंदच होय ४४. करितां गयत्रीचें अनुष्ठान । विश्वामित्र झाला ब्राह्मण । मी कृष्ण वंदीं त्याचे चरण । माझाही तो गुरु जाण रामावतारीं ॥ ४६ ॥ ह्या छंदांतील एक एक अक्षर हे अक्षराचे म्ह० परब्रह्माचे सार आहे आणि गायत्री ही खरोखर सच्चिदानंदाचे भांडारच आहे असे समज ४५, यालागीं सकळ छंदीं प्राधान्य । मुख्यत्वें गायत्री छंद जाण । इतर छंद होती पावन । कासे लागोन पैं इच्या ॥ ४७ ॥ गायत्रीचे अनुष्ठान करूनच विश्वामित्र क्षत्रियाचा ब्राह्मण झाला. मी कृष्णसुद्धा त्याचे चरण वंदन करतो. रामावतारी तो माझाही गुरु होता ४६. गायत्रीछंदाचें अंगीकारीं । त्यासी मिळाल्या अक्षरें चारी । 'उष्णिक्' छंदाची थोरी । त्याचिवरी ठसावे ॥ ४८ ॥ याकरितां सकळ छंदांमध्ये मुख्यत: गायत्री छंदच श्रेष्ठ आहे, हिच्या कासेला लागूनच इतर छंद पावन होतात असें तूं समज ४७. उष्णिक् छंदाचे अंगीकारीं । त्यासी मिळाल्या । अक्षरें चारी । 'अनुष्टप्' छंदाची थोरी । त्याचिवरी ठसावे ॥ ४९ ॥ गायत्री छंदांतील अक्षरें जमेस धरून त्यांत आणखी चार अक्षरे मिळविली, तर त्यापेक्षा मोठा 'उष्णिक ' छंद उत्पच होतो ४८. अनुष्टप् छंदाचे अंगीकारीं । आणीक मिळाल्या अक्षरें चारी । 'बृहती' छंदाची थोरी । त्याचिवरी ठसावे ॥ ४५० ॥ उष्णिक छंदांतील अक्षरें जमेस धरून त्यात आणखी चार अक्षरे मिळविली की, त्याच्याहीपेक्षा मोठा असा 'अनुष्टुप् छंद उत्पन्न होतो ४९. एवं 'पंक्ति' 'त्रिष्टप्' 'जगती' । 'अत्यष्टि' 'अतिजगती' । चौं चौं अक्षरांचे अधिकप्राप्तीं । छंदें वेदोक्तीं विभाग ॥ ५१ ॥ अनुष्टुप् छंदांतील अक्षरें जमेस धरून त्यांत आणखी चार अक्षरें चढविली की, त्याहूनही मोठा असा 'बृहती' छंद होतो ४५०. ऐशिया चतुरक्षरमिळणीं । नाना छंदांचिया श्रेणी । वेदरायाची राजधानी । मंत्रध्वनीं गर्जती ॥ ५२ ॥ अशाच प्रकारें 'पंक्ति- त्रिष्टुप्- जगती- अत्यष्टि- अतिजगती' इत्यादि छंद, चार चार अक्षरें अधिक घातल्याने वेदवाणीच्या विभागाचे छेद होतात ५१. तेथ अक्षरमर्यादा न करवे । शाखांची मर्यादा न धरवे । अर्थता वाच्यता नेणवें । वेद वैभवें दुर्ज्ञेय ॥ ५३ ॥ अशी चार चार अक्षरे अधिक घालून अनेक छंदांच्या पंक्ति तयार होतात. आणि वेदराजाची राजधानी त्या मंत्रध्वनीने गर्जत असते ५२. किं विधत्ते किमाचष्टे किमनूद्य विकल्पयेत् । इत्यस्या हृदयं लोके नान्यो मद्वेद कश्चन ॥ ४२ ॥ त्यांतील अक्षरांची मोजदाद करता येत नाही; शाखांचा पत्ता लागत नाही, अर्थज्ञान आणि शब्दज्ञानही समजत नाही. याप्रमाणे वेदाचे वैभव अगम्य आहे ५३. कर्मकांडविधिनिषेधीं । कोण अर्थ त्यागार्थ निंदी । कोण तो अर्थ प्रतिपादी । स्वहितबुद्धी साधकां ॥ ५४ ॥ मंत्रकांडें मंत्रमूर्ती । सांगोपांग सायुधस्थिती । उपासना-उपास्ययुक्ती । किमर्थ भक्ती करविली ॥ ५५ ॥ कर्मकांडांतील विधिनिषेध सांगतांना वेद कोणत्या अर्थांची त्यागासाठी निंदा करितो, व साधकाच्या हितबुद्धीने कोणत्या अर्थाचे प्रतिपादन करितो ५४, ज्ञानकांड त्रिशुद्धी । कोण पदार्थ निषेधी । कोण्या अर्थातें प्रतिपादी । निजबुद्धी बोधुनी ॥ ५६ ॥ मंत्रकांडाने सर्व मंत्रमूर्ति सांगून आयुधांचे प्रकार, उपासना व उपास्य इत्यादि भाग दाखवून देऊन भक्ति कशासाठी करविली आहे ५५, एवं वेदाचें अचळ मूळ । विधिविधानेसीं मुख्य फळ । जाणावया गा केवळ । नाहीं ज्ञानबळ सुरनरां ॥ ५७ ॥ ज्ञानकांडांत खरोखर कोणत्या पदार्थाचा निषेध केला आहे? आणि कोणत्या अर्थाचे प्रतिपादन करून आत्मज्ञानाचा उपदेश केला आहे ? ५६ या वेदार्थातें तत्त्वतां । मीचि एक सर्वज्ञ ज्ञाता । माझे कृपेवीण सर्वथा । हें न येचि हाता ब्रह्मादिकां ॥ ५८ ॥ याप्रमाणे वेदाचे अढळ असलेलें मूळ कोणते? किंवा विधिविधानासाहवर्तमान मुख्य फळ कोणते ? हे जाणण्याइतके ज्ञान मनुष्यांना तर काय, देवांनासुद्धा नाही ५७. तेथ उद्धवाचें मनोगत । देवो जाणे वेदींचा इत्यर्थ । तरी भक्तकृपाळू श्रीकृष्णनाथ । मजही तो अर्थ दयेनें सांगों ॥ ५९ ॥ खरोखरच हा वेदार्थाला खऱ्या रीतीने जाणणारा मीच एक सर्वज्ञ ज्ञाता आहे. माझ्या कृपेशिवाय हा अर्थ महादेवादिकांच्यासुद्धा हाताला यावयाचा नाही ५८. हा उद्धवाचा निजभावो । जाणों सरला देवाधिदेवो । तो वेदार्थाचा अभिप्रावो । श्लोकान्वयो पहा हो सांगत ॥ ४६० ॥ हे ऐकून उद्धचाच्या मनांत आले की, वेदांतील खरें खरें अर्थस्वारस्य एका देवालाच माहीत आहे. आणि श्रीकृष्ण हे भक्ताविषयीं कृपाळू आहेत, तेव्हां ते माझ्यावरही दया करून तो अर्थ मला सांगोत ५९. मां विधत्तेऽभिधत्ते मां विकल्प्यापोह्यते त्वहम् । एतावान् सर्ववेदार्थः शब्द आस्थाय मां भिदाम् । मायामात्रमनुद्यान्ते प्रतिषिद्ध्य् प्रसीदति ॥ ४३ ॥ हा उद्धवाच्या मनातील हेतु जाणून देवाधिदेव तो सांगावयाला पुढे सरले. आणि तो वेदार्थातील सारांश श्लोकरूपाने सांगू लागले ६० . इति श्रीमद्भा्गवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां एकादशस्कन्धे एकविंशोऽध्यायः ॥ २१ ॥ माझी पावावया स्वरूपसिद्धी । मलिनाचिया चित्तशिद्धी । वेद स्वधर्म प्रतिपादीं । त्यागावी निषेधीं विषयातें ॥ ६१ ॥ माझ्या स्वरूपाची प्राप्ति होण्यासाठी, मलिनचित्त लोकांची चित्तशुद्धि होण्याकरितां वेदानें स्वधर्माचे प्रतिपादन केले आहे. आणि निषेध सांगून विषयांचा त्याग करविला आहे ६१. तेथ अग्निहोत्रादि विधान । यज्ञान्त कर्माचरण । तें चित्तशुद्धीचें कारण । वैराग्य दारुण उपजवी ॥ ६२ ॥ त्यांत अग्निहोत्रादि विधान व यज्ञातील कर्माचरण हें चित्तशुद्धीला मोठे कारणीभूत आहे. त्याच्या योगानें कडकडीत वैराग्य उत्पन्न होते ६२. दारुण वैराग्यउीत्पत्ती । इहामुत्रविषयनिवृत्ती । तेव्हा साधकास माझी प्राप्ती । सहजस्थिती स्वभावें ॥ ६३ ॥ कडकडीत वैराग्य उत्पन्न झालें व इहपर विषयांची निवृत्ति झाली, म्हणजे साधकाला सहजस्थितीने माझी प्राप्ति होते ६३. एवं कर्मकांडचिये स्थिती । विधिनिषेध वेदोक्ती । साधकांसी माझी प्राप्ती । जाण निश्चितीं या हेतू ॥ ६४ ॥ अशा प्रकारे कर्मकांडामध्ये वेदवाणीने सांगितल्याप्रमाणे विधिनिषेध पाळले असता चित्तशुदि होऊन साधकाला माझी प्राप्ति होते ६४. विषयीं परम बाधा देखती । परी त्यागीं नाहीं सामर्थ्यशक्ती । ऐशिया साधकांप्रती । वेदें मद्भयक्ती द्योतिली ॥ ६५ ॥ आता ज्यांना विषयामध्ये बाधकता आहे हे समजते, परंतु त्यांचा त्याग करण्याचे सामर्थ्य नसते. अशा साधकांसाठी वेदाने माझी भक्ति प्रगट केली आहे ६५. येथ मंत्रमूर्ति-उपासन । माझे सगुण अनुष्ठान । तेथ करितां अनन्यभजन । रजतम जाण नासती ॥ ६६ ॥ ह्यांत मंत्र-मूर्तीची उपासना, माझे सगुण रूपाचे अनुष्ठान आणि एकनिष्ठेनें भजन ही केली असतां रजोगुण व तमोगुण नाश पावतात ६६. मग केवळा सत्त्ववृत्तीं । श्रवणकीर्तनीं अतिप्रीती । तेणें मद्भा्वो सर्वांभूतीं । माझी चौथी भक्ती तेणें होय ॥ ६७ ॥ मग निखालस सत्त्ववृत्तिच शिल्लक राहते. त्यामुळे श्रवणकीर्तनामध्ये अत्यंत प्रेम जडते, आणि सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी माझीच भावना उत्पन्न होऊन तिच्या योगाने माझ्या चौथ्या भक्तीचा लाभ होतो ६७. आतुडल्या माझी चौथी भक्ती । मद्भंक्तां नावडे मुक्ती । अद्वैत भजनाचिया प्रीतीं । धिक्कारिती कैवल्य ॥ ६८ ॥ माझी चौथी भक्ति हाती आली की, माझ्या भक्तांना मुक्ति सुद्धा आवडत नाही; अद्वैत भजनाच्या पुढे ते मोक्षाचा सुद्धा धिकार करतात ६८. अद्वैतबोधें करितां भजन । मी अनंत अपार चिद्घलन । भक्तीमाजीं आकळें जाण । ये मद्रूपण मद्भचक्तां ॥ ६९ ॥ अद्वैतबोधाने माझे भजन केले असता अनंत, अपार व चिद्घन स्वरूप असा मी भक्तांना वश होतों, आणि माझ्या भक्तांना मद्रूप प्राप्त होते ६९. तेव्हा भज्य-भजक-भजन । पूज्य-पूजक-पूजन । साध्य-साधक-साधन । अवघें आपण स्वयें होय ॥ ४७० ॥ त्या वेळी भज्य, मजक आणि भजन : पूज्य, पूजक आणि पूजन; साध्य, साधक आणि साधन : ही सारी तो स्वतःच होतो ४७०. माझी ऐश्वर्यसामर्थ्यशक्ती । तेही ये निजभक्तांच्या हातीं । अद्वैतभजनाचिया प्रीतीं । मत्पदप्राप्ती मद्भाक्तां ॥ ७९ ॥ माझे ऐश्वर्य, सामर्थ्य आणि शक्ति माझ्या भक्तांच्या हाती येतात. अद्वैतभजनाच्या प्रेमानेंच माझ्या भक्तांना माझ्या पदाची प्राप्ति होते ७१. मी देव तो भक्त शुद्ध । हा बाहेरी नांवाचाचि भेद । आंतुवट पाहतां बोध । सच्चिदानंद निजऐंक्यें ॥ ७२ ॥ मी देव आणि तो भक्त , हा बाहेरून नावाचाच भेद राहतो; अंतस्थ रीतीने पाहिलें तर दोघेही निजात्मज्ञानामुळे सच्चिदानंदस्वरूपच असतो ७२. हे उपासनाकांडस्थिती । साधकीं करूनि माझी भक्ती । यापरी पावले माझी प्राप्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ ७३ ॥ उद्धवा ! उपासनाकांड तें हेंच होय. अशा प्रकारे साधक माझी भक्ति करून निश्चयाने मलाच पावतात ७३. 'मायाप्रतिबिंबित' चैतन्य । त्वंपदार्थें वाच्य जाण । ज्याच्या अंगीं जीवभिधान । अविद्या जाण उपजवी ॥ ७४ ॥ (आता ज्ञानकांडाची उपपत्ति सांगतात )-मायाप्रतिबिंबित जें चैतन्य, ज्याचा 'त्वं ' या पदार्थाने उल्लेख करतात; त्याला अविद्येमुळे 'जीव' संज्ञा प्राप्त होते ७४. जेवीं स्वप्रामाजीं आपण । आन असोनि देखे अन । तेवीं आविद्यकत्वें जाण । 'जीवपण' एकदेशी ॥ ९५ ॥ स्वप्नांत ज्याप्रमाणे आपण एक असतां अनेकत्वाने दिसतो, त्याप्रमाणे अविद्येमुळे आलेलें हें जीवत्व एकदेशीय आहे ७५. जें 'मायासंवलित' चैतन्य । जो योगजन्य जगत्कारण । जो सर्वद्रष्टा सर्वज्ञ । सदा संपन्न ऐश्वर्यें ॥ ७६ ॥ दुसरे, मायासंवलित (मायाप्रतिबिंबित नव्हे) चैतन्य, जो योगजन्य : असून जगदुत्पत्तीला कारण, जो सर्वद्रष्टा, सर्वज्ञ, सदा सर्वकाल ऐश्वर्यसंपन्न ७६, जो सकळ कर्मांचा कर्ता । तो कर्ताचि परी अकर्ता । ज्याचे अंगीं स्वभावतां । नित्यमुक्तता स्वयंभ ॥ ७७ ॥ जो सर्व कर्माचा कर्ता ; व कर्ता असूनही अकर्ता ; आणि ज्याच्या अंगी स्वभावतःच स्वयंभू नित्यमुक्तता असते ७७, ज्याची अकुंठित सहजसत्ता । जो परमानंदें सदा पुरता । ज्यासी ईश्वरत्वें समर्थता । हे जाण वाचकता तत्पदार्थाची ॥ ७८ ॥ ज्याची नैसर्गिक अकुंठित सत्ता; जो परमानंदाने सदा परिपूर्ण ; जो ईश्वर असल्यामुळे सर्वसमर्थ ; तो (शिव) 'तत् ' पदार्थाचा वाच्यार्थ होय ७८. जीवाचें सांडोनियां अज्ञानत्व । शिवाचें सांडूनि सर्वज्ञत्व । दोंहीचें शोधित जें लक्ष्यत्व । ऐक्यें निजतत्त्व साधिती ॥ ७९ ॥ त्या जीवाचा अज्ञानपणा सोडून व शिवाचा सर्वज्ञपणाही टाकून दोहोंमधील शोधून काढलेले जे सार (लक्ष्यार्थतत्त्व ) त्याच्याशींच ऐक्यता पावून आपला हेतु साधतात ७९. लग्नीं नोवरा निमासुरा । तोचि गेलिया देशावरा । विदेशीं देखिला एकसरा । तारुण्यमदभरा संपन्न ॥ ४८० ॥ लग्नांत वयाने लहान असलेला सुंदर नवरा देशांतराला गेला, आणि काही काळाने तोच अकस्मात् परदेशांत तारुण्याने संपन्न झालेला दृष्टीस पडला ४८०, ते काळींची त्यजूनि बाल्यावस्था । आजिची नेघूनि तारुण्यता । पत्नी अनुसरे निजकांता । निजस्वरूपतास्वभावें ॥ ८१ ॥ तर त्यावेळची बाल्यदशा टाकून व आजची तारुण्यदशाही सोडून त्याच्या मूळ स्वरूपास अनुलक्षून त्याची पत्नी जशी त्यास अनुसरते ८१, तेवीं त्वंपदतत्पदवाच्यार्थ । दोंहीचा सांडावा निश्चितार्थ । ऐक्यें अंगीकारावा लक्ष्यार्थ । हा ज्ञानकांडार्थ उद्धवा ॥ ८२ ॥ त्याप्रमाणे उद्धवा ! ' त्वंपद' आणि 'तत्पद' ह्या दोहोंचाही लौकिकार्थ म्ह० वाच्यार्थ सोडून द्यावा, आणि ऐक्यभावाने जें दिसून येईल, त्याचा म्ह० लक्ष्यार्थाचा स्वीकार करावा, हा ज्ञानकांडांतील इत्यर्थ होय ८२. जीवशिवांचेनि ऐक्यें जाण । माझे चित्स्वरूपीं समाधान । स्वयें पाविजे आपण । हें ज्ञानकांड संपूर्ण बोलिलें वेदें ॥ ८३ ॥ जीवाचे आणि शिवाचे ऐक्य करून माझ्या चित्स्वरूपामध्ये आपण स्वतः समाधान पावावे. हे वेदाने संपूर्ण ज्ञानकांडांत सांगितले आहे ८३. वेदा आदि-मध्य-अवसानीं । मातें लक्षितीं कांडें तीनी । तोचि अर्थ उपसंहारूनी । ग्रंथावसानीं हरि बोले ॥ ८४ ॥ वेदांतील तिन्ही काडे आदि-मध्य-अंती मलाच लक्षीत असतात. हाच अर्थ ग्रंथाच्या शेवटीं उपसंहार करतांना श्रीकृष्ण सांगत आहे ८४. उद्धवा वेदाचें वचन । अर्थगंभीर अतिगहन । तेथ शिणतां ऋषिजन । अर्थावसान अलक्ष्य ॥ ८५ ॥ उद्धवा ! वेदांचे भाषण अर्थगांभीर्याने फार खोल असल्यामुळे अत्यंत गहन आहे. त्याविषयी अनेक ऋषींनी पुष्कळ परिश्रम केले तरी त्यांना खरा अर्थ कळला नाहीं ! ८५. तें वेदार्थाचें निजसार । माझे गुह्य ज्ञानभांडार । तुज म्यां सांगितलें साचार । पूर्वापरअंविरोधें ॥ ८६ ॥ तेच वेदार्थांचे सार म्ह० माझें गुप्त ज्ञानभांडार मी तुला पूर्वापर विरोध न येऊ देतां सविस्तर सांगितले ८६. तें ऐकोनि देवाचें उत्तर । उद्धव चमत्कारला थोर । तेंचि वेदाचें निजसार । पुढती श्रीधर सांगो कां ॥ ८७ ॥ हे देवाचे भाषण ऐकून उद्धवाला चमत्कार वाटला व तो मनांत म्हणाला की, हे वेदाचें सार देव पुढे का सांगत नाहीत ? ८७. पान्हा लागतांचि तोंडीं । दोहक वांसरूं आंखुडी । त्यापरी अतिआवडीं । स्वयें चडफडी उद्धव ॥ ८८ ॥ वासराचे तोंड लागून गाईला पान्हा फुटला की, धार काढणारा वासराला आंखडून ठेवतो, त्याप्रमाणे हा अत्यंत आवडीचा विषय असून देवांनी मध्येच का बंद केला ? म्हणून उद्धव मनामध्ये अगदी चरफडूं लागला ८८. जेवीं कां पक्षिणीपुढें । चारा घ्यावयाचे चाडें । पिलें पसरीं चांचुवडें । तेवीं कृष्णाकडे उद्धवु ॥ ८९ ॥ पक्षिणीच्या पुढे चारा घ्यावा म्हणून पिलें जशी चोंचा पसरतात, त्याप्रमाणे उद्धवही श्रीकृष्णापुढे आ करून बसला ८९. तें उद्धवाचें मनोगत । जाणोनियां श्रीअनंत । सकळ वेदार्थ संकळित । ग्रंथांतीं सांगत निजसारंश ॥ ४९० ॥ तो उद्धवाचा हेतु लक्षात आणून श्रीकृष्ण वेदाचा अर्थ संक्षेपानें ग्रंथाच्या शेवटी सारांशाने सांगत आहेत ४९०. नानाशाखीं अतिप्रसिद्ध । त्रिकांडीं वाढला जो वेद । तेथील नाना शब्दीं हाचि बोध । जो मी अभेद परमात्मा ॥ ९१ ॥ अनेक शाखांमध्ये अत्यंत प्रसिद्ध असा जो त्रिकांडात्मक वाढलेला वेद, त्यांतील साऱ्या शब्दांमध्ये बोध हाच की, अभेद परमात्मा जो मी ९१, त्या मातें धरोनि हातीं । त्रिकांडीं चालिल्या श्रुती । त्या श्रुत्यर्थाची उपपत्ती । यथास्थितीं सांगेन ॥ ९२ ॥ त्या मला हातीं धरून श्रुति ह्या तीन कांडांमध्ये चालत आहेत. त्या श्रुत्यातील सारांश मी तुला नीट रीतीने सांगतों ऐक ९२. मी कर्मादिमध्यअंचतीं । मी कर्मकर्ता क्रियाशक्ती । कर्मफळदाता मी श्रीपती । हा इत्यर्थ निश्चितीं 'कर्मादिकांडीचा' ॥ ९३ ॥ कर्माच्या आदीं, मध्य व अंती मीच; कर्मकर्ता व क्रियाशक्ति मीच; कर्माचे फळ देणारा श्रीपति मीच; हाच काय तो कर्मकांडांतील इत्यर्थ होय ९३. मंत्रमूर्ति आणि मंत्रार्थ । तेही मीचि गा निश्चित । पूज्य पूजक पूजा समस्त । मजव्यतिरिक्त आन नाहीं ॥ ९४ ॥ मंत्रमूर्ति आणि मंत्रार्थ तोही खरोखर मीच; पूज्य, पूज्यक व पूज्य ही सारीही मीच , माझ्याशिवाय दुसरे काहीही नाहीं ९४. देवें देवोचि पूजिजे । देव होऊनि देवा भजिजे । हें वेदींचें विजबीज माझें । हेंचि आगमीं बोलिजे मुख्यत्वें ॥ ९५ ॥ देवानेच देवाची पूजा करावी; देव होऊनच देवाला भजावें च वेदांतील माझें रहस्य व हेच आगमांनीही सांगितले आहे ९५. मीच देवो मीचि भक्त । पूजोपचार मी समस्त । मीचि मातें पूजित । हे इत्थंभूत 'उपासना' ॥ ९६ ॥ मीच देव आणि मीच भक्त, सारें पूजेचे साहित्यही मीच माझी मीच पूजा करतो. हीच इत्थंभूत 'उपासना' होय ९६. हें उपासनाकांडींचें निजसार । आगमशास्त्रींचें गुह्य भांडार । माझ्या निजभक्तांचें वस्तीचें घर । ते हे साचार उपासना ॥ ९७ ॥ वेदाच्या उपासनाकांडांतील मुख्य सार तें हेच; आगमशास्त्रांतील गुप्त भांडार हेच; माझ्या भक्तांचे खरोखर वस्तीचें जें घर तीच ही उपासना होय ९७. 'ज्ञानकांड' तें अलौलिक । वेद आपला आपण द्योतक । अवघा संसाराचि काल्पनिक । तेथ वेद नियामक कोणे अर्थें ॥ ९८ ॥ 'ज्ञानकांड' तर फारच विलक्षण आहे. त्यांत वेद हा आपला आपणच द्योतक होतो. सारा संसारच जर मुळी काल्पनिक, तर 'वेद हे नियामक' असे कोणत्या अर्थान म्हणावें ? ९८. वोस घरास वस्तीस पहा हो । निर्जीव पाहुणा आला राहों । त्याचा कोण करील वोठवो । तैसा भावो वेदाज्ञे ॥ ९९ ॥ अहो! असें पहा! ओसाड घरांत निर्जीव पाहुणा राहावयाला आला, तर त्याचे आदरातिथ्य कोण करणार? तीच दशा वेदाज्ञेची आहे ९९. [ श्रुति-'एकमेवाद्वितीयं ब्रह्म, नेह नानास्ति किंचन' ] खांबसूत्रावरील पुतळीसी । तीतें बोडिलें जेवीं शिसीं । तेथें नाहीं निघणें पुढारे केंसीं । तेवीं शुद्धीं वेदासी ठाव नाहीं ॥ ५०० ॥ कळसूत्रांतील बाहुली घेऊन तिचे मुंडण केले, तर तिच्या डोक्यावर पुन्हा काही केस उगवावयाचे नाहीत. त्याचप्रमाणे शुद्ध ब्रह्मामध्येही वेदाला ठाव नाही ५००. मूळ संसारचि मायिक । तेथ वेद तोही तद्रूप देख । मृगजळीं नाहीं उदक । परी वोलावाहि देख असेना ॥ १ ॥ मूळ संसारच जर मायिक, तर त्यांतील जो वेद तोही तद्रूपच असला पाहिजे. मृगजळामध्ये उदक तर नसतेच, पण ओलावासुद्धा असत नाहीं १. जेथ मूळीं मुख्य अद्वैतता । तेथ कैंचा वक्ता कैंचा श्रोता । कैंचें कर्म कैंचा कर्ता । वेदवार्ता ते कैंची ॥ २ ॥ जेथे मुळामध्येच मुख्य अद्वैतपणा, तेथें श्रोता-वक्ता कसला? कर्म आणि कर्ता कशाचा ? तेथें वेदवार्ता तरी कोठची! २. नाहीं दृश्य-दृष्टा-दर्शन । नाहीं ध्येय-ध्याता-ध्यान । नाहीं ज्ञेय-ज्ञाता-ज्ञान । वेदवचन तेथें कैंचें ॥ ३ ॥ जेथें दृश्य, दृष्टा व दर्शन नाहीं; जेथें ध्येय, ध्याता आणि ध्यान नाहीं; ज्ञेय, ज्ञाता व ज्ञान नाही, तेथें वेदवचन तरी कशाचे ३. जेथ भ्रमाची राणीव । जेथ भेदाची जाणीव । तेथ वेदाची शहाणीव । गोड गाणीव उपनिषदांची ॥ ४ ॥ जेथे भ्रमाचे राज्य व भेदाची जाणीव असते, तेथेंच वेदाचें शहाणपण आणि उपनिषदांचे गोड गायन चालते ४ . जंव भेदाची सबल स्थिती । तंव वेदाची थोर ख्याती । भेदु आलिया अद्वैतीं । वेद विराला 'नेति' म्हणोनी ॥ ५ ॥ भेद जोपर्यंत प्रबळ आहे, तोपर्यंतच वेदाचें माहात्म्य ; भेद अक्षतांत शिरला की वेदही 'नेति नेति' म्हणत विरून जातो ५. जळगार जळीं विरे । तेवीं वेदु अद्वैतीं मुरे । हें 'ज्ञानकांड' साचोकारें । तुज म्यां खरें सांगितले ॥ ६ ॥ पाण्याची गार जशी पाण्यांतच विरून जाते, त्याप्रमाणे वेदही अद्वैतांत मुरून जातो. हेच खरेखरे ज्ञानकांड होय. ते मी तुला प्रेमानें सांगितले ६. तेथ उपजला स्वयें अग्नी । त्या अरणी जाळूनि शमे वन्ही । तेवीं ज्ञानकांडनिरूपणीं । वेदु निज निर्दळणीं पर्वतला ॥ ७ ॥ ज्या अरणीकाष्ठातून अग्नि स्वतः उत्पन्न होतो, त्या अरणी जाळून टाकून तो शांत होतो. याप्रमाणे ज्ञानकांडनिरूपणामध्ये वेदानें आपलें आपल्यालाच नाहींसें करून घेतले आहे ७. एक ब्रह्म जें अद्वैत । येणें श्रुतिवाक्यें मिथ्या द्वैत । हें बोलूनि वेद हारपे तेथ । ब्रह्म सदोदित संपूर्ण ॥ ८ ॥ 'अद्वैतरूप ब्रह्म एक आहे,' या श्रुतिवाक्यानेच द्वैत मिथ्या होऊन जाते. इतकें सांगून वेद नाहीसा होतो, व ब्रह्म हें पूर्णपणाने सदोदित असते तसेंच असते ८. 'मी ब्रह्म' हे शुद्धीं स्फुरे स्फूर्ती । तेथचि ॐकाराची उत्पत्ती । तोही ब्रह्मरूप निश्चितीं । त्यासी 'बह्म' म्हण्ती एकाक्षर ॥ ९ ॥ निर्विकार शुद्ध ब्रह्मांत 'मी ब्रह्म' अशी स्फूर्ति स्फुरण पावते, तेथेंच ओंकाराची उत्पत्ति होते. तो ओंकारही ब्रह्मरूपच आहे. त्याला 'एकाक्षर ब्रह्म' असे म्हणतात ९. त्या ॐकारापासोनि गहन । श्रुति शाखा स्वर वर्ण । झालें तें ब्रह्मरूप जाण । एवं वेद पूर्ण परब्रह्म ॥ ५१० ॥ त्या ओंकारापासूनच स्वरवर्ण उत्पन्न होऊन श्रुतीच्या मोठमोठ्या शाखा उत्पन्न झाल्या. तें सारें ब्रह्मरूपच होय. याप्रमाणे सर्व वेद पूर्ण परब्रह्मरूप आहे ५१०. जेवीं सोन्याचे अळंकार । पाहतां सोनेंचि साचार । तेवीं श्रुतिशाखावेदविस्तार । तो अवघा ॐकार मद्रूपें ॥ ११ ॥ ज्याप्रमाणे सोन्याचे दागिने पाहिले असतां खरोखर सारें सोनेच असते, त्याप्रमाणे श्रुतिशाखांनी झालेला जो वेदाचा विस्तार तोही सारा ओंकारस्वरूपानें मद्रूपच आहे " ११. जो वेदप्रतिपाद्य पुरुषोत्तम । जो भक्तकामकल्पद्रुम् । तो हें बोलिला मेघश्याम । आत्माराम श्रीकृष्ण ॥ १२ ॥ वेदांनी प्रतिपादन केलेला जो पुरुषोत्तम, जो भक्तांच्या मनःकामना पूर्ण करण्याविषयी कल्पतरुच, तो मेघश्याम आत्माराम श्रीकृष्ण ह्याप्रमाणे बोलला १२. तिंही कांडी निजसंबंध । पूर्वापर अविरुद्ध । हा वेदार्थ परम शुद्ध । तुज म्यां विशद बोधिला ॥ १३ ॥ तिन्ही कांडांमधील संबंध पूर्वापर विरोध नसणाराच आहे. हाच अत्यंत शुद्ध वेदाचा अर्थ होय. तो मी तुला विशद करून सांगितला १३. याहोनियां परता । वेदार्थ नाहीं गा सर्वथा । तो तुज म्यां सांगितला आतां । जाण तत्त्वता उद्धवा ॥ १४ ॥ उद्धवा ! याहून निराळा असा वेदाचा अर्थ मुळीच नाही. मी जो तुला आता अर्थ सांगितला तोच खरा होय १४. या वेदार्थाची निजखूण । हृदयीं भोगितां आपण । होय जीवशिवां समाधान । ऐसें श्रीकृष्ण बोलिला ॥ १५ ॥ ह्या वेदाच्या अर्थातील निजखूण हृदयामध्ये ठेवली असतां जीवा-शिवास समाधान होते. असें श्रीकृष्ण बोलले १५. हें ऐकोनि उद्धव जाण । झाला वेदार्थीं निमग्न । दोनी टंवकारले नयन । स्वानंदीं मन बुडालें ॥ १६ ॥ ते उद्धवाने ऐकून तोही वेदाच्या अर्थामध्ये निमग्न झाला. त्याचे दोन्ही डोळे भरून आले व मन आत्मानंदामध्ये बुडून गेलें १६. चित्तचैतन्या मिळणी पाडी । कंठीं बाष्प दृढ अडी । लागतां स्वानंदाची गोडी । उभिली गुढी रोमांची ॥ १७ ॥ चित्त चैतन्यांत लय पावलें, गहिवराने गळा दाटून आला, स्वानंदाची गोडी लागतांच रोमांची गुढी उभारली १७. शरीरीं स्वेद सकंपता । नयनीं स्वानंदजळ येतां । बोल बुडाला सर्वथा । मूर्च्छा येतयेतां सांवरी ॥ १८ ॥ शरीराला घाम सुटून ते थरथर कापू लागले. डोळ्यांत आनंदाश्रु भरल्यामुळे शब्द फुटेनासा झाला. मूर्छा येऊ लागली, पण ती सांवरून धरली १८. तंव हृदया आली आठवण । हें भलें नव्हे दुश्चित्तपण । झणीं निजधामा जाईल श्रीकृष्ण । येणें धाकें नयन उघडिले ॥ १९ ॥ त्याच्या मनाला आठवण झाली की, हा गैरसावधपणा उपयोगी नाही. कारण न जाणों, इतक्यांत श्रीकृष्ण कदाचित् निजधामालाही जावयाचे. त्या धाकाने त्याने डोळे उघडले १९. तंव घवघवीत । मुकुट कुंडलें मेखळा । कांसे झळके सोनसळा । आपाद बनमाळा शोभत ॥ ५२० ॥ तो झगझगीत मेघासारखा श्यामसुंदर; मुकुट, कुंडलें व मेखला धारण केलेली; कासेला सोनसळेचा कसलेला पीतांबर; पायांपर्यंत रुळत असलेली वनमाला, असा श्रीकृष्ण त्याला दिसला ५२०. अंतरीं भोगी चैतन्यघन । बाहेरी उघडितां नयन । आनंदविग्रही श्रीकृष्ण । मूर्ती संपूर्ण संमुख देखे ॥ २१ ॥ तो हृदयांत चैतन्यधन अनुभवीत होताच. डोळे उघडतांच आनंदघन श्रीकृष्णाची मूर्ति तशीच्या तशीच समोर दिसू लागली २१. म्हणे श्रीकृष्ण चैतन्यघन । जैतन्यविग्रही श्रीकृष्ण । सगुणनिर्गुणरूपें जाण । ब्रह्म परिपूर्ण श्रीकृष्ण ॥ २२ ॥ तो म्हणूं लागला की, श्रीकृष्ण चैतन्यघन असून, चैतन्याची केवळ मूर्तिच आहे. सगुण व निर्गुणरूपानें श्रीकृष्ण हा परिपूर्ण ब्रह्मस्वरूप आहे २२. बाप भाग्य उद्धवाचें । सगुणनिर्गुण दोंहीचें । सुख भोगितसे साचें । हें श्रीकृष्णकृपेचें महिमान ॥ २३ ॥ उद्धवाचे भाग्यच मोठे ! कारण, सगुण आणि निर्गुण या दोन्ही स्वरूपांचे सुखं तोच एक भोगीत होता. हे केवळ श्रीकृष्णकृपेचे माहात्म्य होय २३. जेथ सद्गुसरुकृपा संपूर्ण । तेथ शिष्याची आवडी प्रमाण । तो जैं मागे मूर्ति सगुण । तैं तेचि जाण गुरु देती ॥ २४ ॥ सद्गुरूची जेव्हां परिपूर्ण कृपा होते, या शिवाची आवड हीच प्रमाण असते. त्याने जर सगुण मूर्ति मागितली, तर गुरुही तीच देतात २४. पाहिजे निर्गुण निजप्राप्ति । ऐशी आवडी ज्याचे चित्तीं । तैं निर्गुणाचिये निजस्थितीं । गुरुकृपा निश्चितीं नांदवी ॥ २५ ॥ निर्गुण स्वरूपाची प्राप्ति व्हावी, असें त्याच्या मनांत असेल, तर गुरूची कृपा ही त्याला निर्गुणस्वरूपाच्या स्थितीत निश्चलपणे नांदविते २५. सगुण निर्गुण स्वरूपें दोनी । भोगावया आवडी ज्याचे मनीं । तेही स्थितीच्या गुरु दानीं । कृपाळुपणीं समर्थ ॥ २६ ॥ किंवा सगुण व निर्गुण ह्या दोन्ही स्वरूपांचा उपभोग घ्यावयाची ज्याच्या मनांत आवड असेल, त्याच्या त्या दोन्ही आवडी पुरविण्याविषयी कृपाळूपणाने गुरु समर्थ असतात २६. सद्गुसरूचें अगाध महिमान । जें वेदा न बोलवेचि जाण । त्याची कृपा झालिया पूर्ण । दुर्लभ कोण पदार्थ ॥ २७ ॥ सद्गुरूचा महिमा अगाध आहे, तो वेदालासुद्धा सांगता येत नाही. त्यांची परिपूर्ण कृपा झाल्यानंतर दुर्लभ असा कोणता पदार्थ आहे ? २७. ते कृष्णकृपेस्तव जाण । फिटलें उद्धवाचें दुर्लभपण । सगुण निर्गुण एक कृष्ण । हे खूण संपूर्ण बाणली ॥ २८ ॥ त्या श्रीकृष्णाच्या कृपेमुळे उद्ध्वाचें तें दुर्लभपण नाहींसें झालें. आणि सगुण व निर्गुण दोन्ही एक कृष्णच आहे, ही हृदयाला पुरती खूण पटली २८. जाणोनि कृष्णाचें पूर्णपण । त्याचे लक्षोनि श्रीचरण । धांवोनि उद्धव आपण । घाली लोटांगण हरिचरणीं ॥ २९ ॥ ही कृष्णाची परिपूर्णता जाणून, त्याच्या चरणकमळी लक्ष ठेवून उद्धवाने धावून जाऊन श्रीकृष्णचरणावर लोटांगण घातले २९. तेव्हां सांवळा सकंकरण । चारी बाह्या पसरी श्रीकृष्ण । उद्धवासी प्रेमें उजलून । दीधलें आलिंगन स्वानंदें ॥ ५३० ॥ तेव्हां सांवळा असा जो श्रीकृष्ण त्याने आपले सकंकण चारही हात पसरून प्रेमानें उद्धवाला उठविलें, आणि स्वानंदानें आलिंगन दिले ५३०. त्या आलिंगनाचें सुख । अनुभवी जाणती देख । जो उद्धवासी झाला हरिख । त्याचा जाणता एक श्रीकृष्ण ॥ ३१ ॥ त्या आलिंगनाचे सुख अनुभवी असतील तेच जाणतील. त्या वेळी उद्धवाला जो आनंद झाला, त्याचा जाणता एक श्रीकृष्णच होय ३१. तो कृष्ण म्हणे उद्धवा । हा विसाव्याचा विसावा । माझ्या वेदाचा निजगुह्यठेवा । तो हा एकविसावा तुज सांगितला ॥ ३२ ॥ तो कृष्ण म्हणाला, उध्दवा ! हा विसाव्याचाही विसावा, माझ्या वेदरहस्याचा गुप्त ठेवा, तो हा एकविसावा अध्याय मी तुला सांगितला ३२. जेणें मोडे लिंगदेहाचा यावा । जेणें जीवत्व नाठवे जीवा । तो हा विसाव्याचा विसावा । तुज एकविसावा निरूपिला ॥ ३३ ॥ ह्याने लिंगदेहाचे बळ मोडतें: जीवाला जीवपणा आठवत नाहीं: तो हा विसाव्याचा विसावा असा एकविसावा अध्याय तुला मी सांगितला ३३. जेणें मिथ्यात्व ये देहभावा । जेणें शून्य पडे रूपनांवा । तो हा विसाव्याचा विसावा । एकविसावा निरूपिला ॥ ३४ ॥ ज्याच्या योगेंकरून देहभावना मिथ्या होऊन जाते व नामरूपावर पाणी पडते; तो हा विसाव्याचा विसावा म्ह. एकविसावा अध्याय तुला मी सांगितला ३४. जेथ अज्ञाना होय नागोवा । जेथ ज्ञान ये अभावा । तो विसाव्याचा विसावा । एकविसावा निरूपिला ॥ ३५ ॥ ज्यांत अज्ञानाचा नाश व ज्ञानाचाही अभाव होऊन जातो; तो हा विसाव्याचा विसावा म्ह० एकविसावा अध्याय मी तुला सांगितला ३५. जेथ वेदुही वेडावला । बोधही लाजोनि बुडाला । अनुभवो स्वयें थोंटावला । तो हा निरूपिला वेदार्थ ॥ ३६ ॥ ज्याकरिता वेदही वेडावून जातो; ज्ञानही लाजून नाहीसे होते; अनुभव बुडून जातो; तो हा वेदाचा अर्थ मी तुला सांगितला ३६. हें वेदार्थसारनिरूपण । मज विश्वात्म्याचें निजनिधान । तुज म्यां सांगितलें संपूर्ण । हे जीवींची खूण उद्धवा ॥ ३७ ॥ हे वेदार्थसाराचे निरूपण म्हणजे माझे विश्वात्म्याचें गुप्त निधान आहे. उद्धवा ! तुला म्हणूनच मी ही माझ्या जीवाची सारी खुण सांगितली ३७. कोटिकोटि साधनें करितां । गुरुकृपेवीण सर्वथा । हे न ये कोणाचे हाता । जाण तत्त्वतां उद्धवा ॥ ३८ ॥ उद्धवा ! कोट्यवधि जरी साधनें केली, तरी हे गुरुकृपेशिवाय खरोखर कधी कोणाच्याच हाती लागावयाचें नाहीं हें लक्षात ठेव ३८. ते गुरुकृपेलागीं जाण । आचरावे स्वधर्म पूर्ण । करावें गा शस्त्रश्रवण । वेदपठण तदर्थ ॥ ३९ ॥ ती गुरुकृपा साध्य करण्यासाठीच आपण पूर्ण स्वधर्माप्रमाणे आचरण करावें: त्याच्याकरितांच शास्त्रश्रवण व वेदपठणही त्याकरितांच करावें ३९. ते कृपेलागीं आपण । व्हावें दीनाचेंही दीन । धरितां संतांचे चरण । स्वामी जनार्दन संतुष्टे ॥ ५४० ॥ त्या गुरुकृपेसाठी आपण दीनाचेही दीन व्हावे व संतांचे चरण धरावे म्हणजे स्वामी जनार्दन प्रसन्न होईल ५४०. गुरु संतुष्टोनि आपण । करवी भागवतनिरूपण । एका विनवी जनार्दन । कृपा नित्य नूतन करावी ॥ ४१ ॥ श्रीगुरु प्रसन्न होऊन आपणच भागवताचे निरूपण करविताहेत. म्हणून एकनाथ जनार्दनाला विनंती करीत आहे की, नित्य नूतन कृपा करीत असावी ४१. पूढील अध्यायीं गोड प्रश्न । उद्धव पुसेल आपण । प्रकृतिपुरुषांचें लक्षण । तत्त्वसंख्या पूर्ण विभाग ॥ ४२ ॥ पुढच्या अध्यायामध्ये उद्धव प्रकृति-पुरुषाचे लक्षण व तत्त्वांच्या संख्येचे सारे विभाग याविषयीं गोड प्रश्न विचारील ४२. त्याचें सांगतां उत्तर । जन्ममरणाचा प्रकार । स्वयें सांगेल शर्ङ्गधर । कथा गंभीर परमार्थी ॥ ४३ ॥ त्याचे उत्तर सांगतांना जन्ममरणाचा प्रकारही स्वतः श्रीकृष्ण सांगतील. त्या कथेत गहन परमार्थ भरलेला आढळेल ४३. जे कथेचें करितां श्रवण । वैराग्य उठे कडकडून । येणें विन्यासें निरूपण । स्वयें श्रीकृष्ण सांगेल ॥ ४४ ॥ त्या कथेचे श्रवण करतांना वैराग्य कडकडून उठेल, अशाच विस्ताराने श्रीकृष्ण स्वतः निरूपण करतील ४४. घटाकाशें ठाकिजे गगन । तेवीं एका जनार्दना शरण । त्याचे वंदिता श्रीचरण । रसाळ निरूपण स्वयें स्मरे ॥ ५४५ ॥ घटाकाश महाकाशांत मिसळून जाते त्याप्रमाणे एकनाथ जनार्दनाला शरण आहे. त्याचे चरणाला वंदन केले असतां आपोआपच रसाळ निरूपणाची स्फूर्ति होते ४५. इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कंधे एकाकारटीकायां वेदत्रयविभागनिरूपणं नाम एकविंशोऽध्यायः ॥ २१ ॥ याप्रमाणे श्रीमद्भागवतमहापुराणांतील एकादशस्कंधामधील श्रीकृष्ण-उद्धवसंवादाचा एकनाथकृत टीकेचा 'वेदत्रयविभागनिरूपण' नावाचा एकविसावा अध्याय समाप्त झाला. |