|
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥ ॐ नमो सद्गुरु तूं ज्योतिषी । एकात्मतेचें घटित पाहसी । चिद्ब्रह्मेंसी लग्न लाविशी । ॐ पुण्येंसी तत्त्वतां ॥१॥ हे ओंकाररूप सद्गुरो ! तुला नमस्कार असो. तूं एक मोठा ज्योतिषी आहेस. तूं जीवाचें व ब्रह्माचें एकात्मतेचें घटित पाहून 'ॐपुण्याहं'-(मी प्रणवरूप पुण्यस्वरूपच आहे) या मंत्राने जीव-ब्रह्माचे लग्न लावून देतोस १. वधूवरां लग्न लाविती । हें देखिलें असे बहुतीं । आपुली आपण लग्नप्राप्ती । हे अलक्ष्य गती गुरुराया ॥२॥ नवरानवरीचें लग्न लावलेले पुष्कळ लोक पाहातात. परंतु हे गुरुराजा ! आपले आपल्याशीच लग्न लावून टाकतें हें तुझें कौशल्य फार अलौकिक आहे. २. लग्न लाविती हातवटी । पांचां पंचकांची आटाटी । चुकवूनि काळाची काळदृष्टी । घटिका प्रतिष्ठी निजबोधें ॥३॥ आणखी तुझी लग्न लावण्याची हातवटी अशी आहे की, पांचा पंचकाची आटाआट व काळाची काळदृष्टि चुकवून तूं आत्मबोधाची घटका स्थापन करतोस ३. चहूं पुरुषार्थांचें तेलवण । लाडू वळिले संपूर्ण । अहंभावाचें निंबलोण । केलें जाण सर्वस्वें ॥४॥ चारही पुरुषार्थाचे लाडू वळून तेलवण तयार करून अहंभावाचे सर्वस्वी लिंबलोण उतरून टाकतोस ४. साधनचतुष्ट्याचा सम्यक । यथोक्त देऊन मधुपर्क । जीवभावाची मूद देख । एकाएक सांडविली ॥५॥ साधनचतुष्टयाचा यथाविधि मधुपर्क करून जीव-भावाची मूद एकीकडे फेंकून देतोस ५. विषयसुख मागें सांडे । तेंचि पायातळीं पायमांडे । सावधान म्हणसी दोंहीकडे । वचन धडफुडें तें तुझें ॥६॥ विषयसुख मागें पडतें, तीच पायाखालची पायघडी होय; आणि दोहीकडे 'सावधान' म्हणतोस तेच तुझे मोठे वचन अथवा खरा उपदेश होय ६. व्यवधानाचें विधान तुटे । सहजभावें अंत्रपटु फिटे । शब्द उपरमोनि खुंटे । मुहूर्त गोमटे पैं तुझें ॥७॥ विषयाचे व्यवधान हाच अंतरपाट, तो सहजसमाधीनें फिटतो; आणि शब्द बंद पडून जिकडे तिकडे शांति प्राप्त होते. असा तुझा मुहूर्त मोठा मंगलकारक असतो ७. अर्धमात्रा समदृष्टी । निजबिंबीं पडे गांठी । ऐक्यभावाच्या मीनल्या मुष्टी । लग्नकसवटी अनुपम ॥८॥ प्रणवाच्या अर्धमात्रेमध्ये समदृष्टि झाली म्हणजे ब्रह्मस्वरूपाची गांठ पडून ऐक्यभावाच्या मुठी मिटतात. अशी लग्न लावण्याची तुझी तर्हा केवळ अनुपम आहे ८. तेथ काळा ना धवळा । गोरा नव्हे ना सांवळा । नोवरा लक्षेना डोळां । लग्नसोहळा ते ठायीं ॥९॥ तेथे काळाही नाही व पांढराही नाहीं; गोराही नव्हे आणि सावळाही नव्हे ; नवरा मुळी डोळ्याला दिसतच नाही. अशा ठिकाणी लग्नाचा समारंभ ! ९. परी नवल कैसें कवतिक । दुजेनवीण एकाएक । एकपणीं लग्न देख । लाविता तूं निःशेख गुरुराया ॥१०॥ परंतु हे गुरुराजा ! हे किती आश्चर्य ! आणि केवढा हा चमत्कार ! की दुसरे कोणीच तेथे नसताना एकीएकी एकाबरोबरच एकट्यानेच लग्न लावणारा तूंच एक खरा आहेस ! १०. तुज गुरुत्वें नमूं जातां । तंव आत्मा तूंचि आंतौता । आंतु कीं बाहेर पाहों जातां । सर्वीं सर्वथा तूंचि तुं ॥११॥ गुरु समजून तुला बाहेर नमस्कार करावयास जावें, तर अंतरांतील आत्माही तूंच, आंत किंवा बाहेर पाहावयास गेले, तर सर्व ठिकाणी तुझा तूंच भरलेला आहेस ११. तुझें तूंपण पाहतां । माझें मीपण गेलें तत्त्वतां । ऐसें करूनियां गुरुनाथा । ग्रंथकथा करविसी ॥१२॥ तुझें तूंपण पाहावयास जावें, तो खरोखर माझे मीपणच नाहींसें होऊन जाते. गुरुनाथा ! असे करूनही आपण ग्रंथकथा करविता ! १२. मागील कथासंगती । सप्तमाध्यायाचे अंतीं । अवधूतें यदूप्रती । कथा कपोती सांगीतली ॥१३॥ आता मागील कथेचा संबंधः-सातच्या अध्यायाच्या शेवटी अवधूताने यदूला कपोताची कथा सांगितली १३. पृथ्वी-आदिअंतीं चोखट । कपोतापर्यंत गुरु आठ । सांगितले अतिश्रेष्ठ । गुरु वरिष्ठ निजबोधें ॥१४॥ आदिअंती उत्तम असलेल्या पृथ्वीपासून तो कपोतापर्यंत अत्यंत श्रेष्ठ असे आठ गुरु सांगितले. आत्मबोधानेच गुरूंना श्रेष्ठत्व येतें १४. उरल्या गुरूंची स्थिती । अवधूत सांगेल यदूप्रती । तेथें सावधान ठेवा चित्तवृत्ती । श्रवणें स्थिति तद्बोधें ॥१५॥ आतां बाकी कांही लक्ष ठेवा. श्रवणाने ती बोधस्थिति तुम्हालाही लाभेल १५. श्रीब्राह्मण उवाच - सुखमैन्द्रियकं राजन् स्वर्गे नरक एव च । देहिनां यद्यथा दुःखं तस्मान्नेच्छेत तद् बुधः ॥ १ ॥ श्रवणीं सादरता यदूसी । देखोनि सुख जालें ब्राह्मणासी । तेणें सुखें निरूपणासी । उल्हासेंसी करीतसे ॥१६॥ यदूला श्रवणाची आवड असलेली पाहून त्या ब्राह्मणाला मोठा संतोष झाला. त्या आनंदाच्या भरांत मोठ्या उल्हासाने त्याने पुढच्या निरूपणाला सुरुवात केली १६. तो म्हणे राया सावधान । विषयसुखाचें जें सेवन । तें स्वर्गनरकीं गा समान । नाहीं अनुमान ये अर्थी ॥१७॥ तो म्हणाला, हे राजा ! नीट लक्ष दे. विषयाचे सुख हें स्वर्गात व नरकांत सारखेच असते, ह्यांत संशय मुळीच नाहीं १७. भोगितां उर्वशीसी । जें सुख स्वर्गीं इंद्रासी । तेंचि विष्ठेमाजीं सूकरासी । सूकरीपासीं निश्चित ॥१८॥ उर्वशीचा उपभोग घेतांना स्वर्गामध्ये इंद्राला जे सुख वाटते, तेच सुख खरोखर विष्ठेमध्ये डुकरालाही डुकरिणीचा उपभोग घेतांना वाटत असते १८. हें जाणोनि साधुजन । उभय भोगीं न घालिती मन । नेदवे प्रेतासी आलिंगन । तेवीं साधुजन विषयांसी ॥१९॥ हेच लक्षात आणून साधु पुरुष दोहों ठिकाणच्या भोगांत मन घालीत नाहीत. प्रेताला जसें आलिंगन देववत नाही, त्याप्रमाणे साधुपुरुषही विषयाला शिवत नाहीत १९. जीत सापु धरावा हातीं । हें प्राणियांसी नुपजे चित्तीं । तेवीं विषयांची आसक्ती । साधु न धरिती सर्वथा ॥२०॥ जिवंत साप हातांत धरावा असे कधीं प्राण्याच्या मनात येत नाही, त्याप्रमाणे साधुपुरुष विषयाची आसक्ति कधीं धरीत नाहींत २०. जैसें न प्रार्थितां दुःख । प्राणी पावताति देख । तैसें न इच्छितां इंद्रियसुख । भोगवी आवश्यक अदृष्ट ॥२१॥ ज्याप्रमाणे दुःखाला आमंत्रण केल्याशिवायच प्राण्याकडे दु:ख येते, त्याप्रमाणे इच्छा केल्याशिवायच प्राक्तन हें इंद्रियसुखही प्राण्याला बलात्काराने भोगावयाला लावते २१. मज दुःखभोगु व्हावा । हें नावडे कोणाच्या जीवा । तें दुःख आणी अदृष्ट तेव्हां । तेवीं सुखाचा यावा अदृष्टें ॥२२॥ स्वतःला दु:खभोग व्हावा, हे कोणाच्याही जिवाला आवडत नाही; परंतु दैव जसें दुःख मागितल्यावांचून देते, तसेच तें सुखाचा वाटाही त्याच्याकडून भोगवितें २२. ऐसें असोनि उद्योगु करितां । तेणें आयुष्य नाशिलें सर्वथा । यालागीं सांडूनि विषयआस्था । परमार्था भजावें ॥२३॥ असे असून लोक त्यासाठी उद्योग हा करतातच; आणि त्यामुळे सार्या आयुष्याचा नाश होतो. ह्याकरिता विषयाची आस्था सोडून परमार्थाच्याच भजनीं लागावें २३. केवळ झालिया परमार्थपर । म्हणसी आहारेंवीण न राहे शरीर । येच निर्धारीं साचार । गुरु 'अजगर' म्यां केला ॥२४॥ परंतु तूं म्हणशील की, केवळ परमार्थाच्याच नादाला लागले, तर आहाराशिवाय हा देह राहणार नाही. तर त्याचाच खरोखर अनुभव पाहाण्यासाठी मी अजगराला गुरु करून घेतले २४. ग्रासं सुमृष्टं विरसं महान्तं स्तोकमेव वा । यदृच्छयैवापतितं ग्रसेदाजगरोऽक्रियः ॥ २ ॥ उद्योगेंवीण आहारु । अयाचित सेवी अजगरु । डंडळोनि न सांडी धीरु । निधडा निर्धारु पैं त्याचा ॥२५॥ अजगर हा उद्योग केल्यावांचून सहज यदृच्छेनें जो आहार मिळेल, तो सेवन करतो. डगमगून धीर सोडीत नाही. त्याचा निश्चय दांडगा असतो २५. स्वभावें तो मुख पसरी । सहजें पडे जें भीतरीं । सरस नीरस विचारु न करी । आहार अंगीकारी संतोषें ॥२६॥ तो स्वभावत: तोंड पसरतो, आणि सहजगत्या जें तोंडांत पडेल-मग तें सरस का निरस ह्याचा विचार करीत नाही-तो आहार संतोषानें ग्रहण करतो २६. तैशीचि योगियांची गती । सदा भाविती आत्मस्थिती । यदृच्छा आलें तें सेवती । रसआसक्ती सांडूनि ॥२७॥ तसाच प्रकार योग्यांचा आहे. ते निरंतर निजात्मस्थितींतच रंगलेले असतात. ते रसावरील आसक्ति सोडून यदृच्छेने जे चालून येईल ते सेवन करितात २७. योगियांचा आहारु घेणें । काय सेविलें हें रसना नेणे । रसना-पंगिस्त नाहीं होणें । आहारु सेवणें निजबोधें ॥२८॥ योग्यांचे आहार सेवन करणे म्हणजे काय सेवन केलें हें रसनेला कळावयाचे नाही. रसनेच्या अंकित न होता आहार घ्यावयाचा तो स्वात्मदृष्टीने घ्यावयाचा २८. आंबट तिखट तरी जाणे । परी एके स्वादें अवघें खाणें । सरस नीरस कांहीं न म्हणे । गोड करणें निजगोडियें ॥२९॥ आंबट तिखट वगैरे तो जाणतो, पण सर्व काही एकाच स्वादानें-ब्रह्मरसभावनेनें-ग्रहण करतो; सरस, नीरस हा भाव ठेवीत नाही. आत्मसुखाच्या गोडीनेच गोड करून घेतो २९. मुख पसरिलिया निर्धारा । स्वभावें रिघालिया वारा । तोचि आहारु पैं अजगरा । तेणेंचि शरीरा पोषण ॥३०॥ खरोखर तोंड पसरले असतां नुसता वारा जरी आंत शिरला, तरी तोच अजगराचा आहार होऊन बसतो. त्यानेंच त्याच्या शरीराचे पोषण घडते ३०. तैशीचि योगियांची स्थिति । वाताशनें सुखें वर्तती । आहारालागुनी पुढिलांप्रती । न ये काकुलती सर्वथा ॥३१॥ त्याचप्रमाणे योग्यांचीही स्थिति असते. ते वायुभक्षण करूनही सुखानें रहातात. आहारासाठी ते इतरांपाशीं बिलकुल काकुळतीला येत नाहीत ३१. थोडें बहु सरसनिरसासी । हें कांहीं म्हणणें नाहीं त्यासी । स्वभावें जें आलें मुखासी । तें सावकाशीं सेवितु ॥३२॥ थोडें, फार, सरस, नीरस हा भावच त्यांचेपाशी नसतो. जे स्वभावत; तोंडांत येऊन पडेल, तें स्वस्थचित्ताने सेवन करतात ३२. शयीताहानि भूरीणि निराहारोऽनुपक्रमः । यदि नोपनयेद्ग्रासो महाहिरिव दिष्टभुक् ॥ ३ ॥ अजगरासी बहु काळें । यदृच्छा आहारु न मिळे । तरी धारणेसी न टळे । पडिला लोळे निजस्थानीं ॥३३॥ अजगराला बहुतकालपर्यंत आपोआप आहार न मिळाला तरीही त्याची धारणा चळत नाहीं; तो स्वस्थानी जशाचा तसाच लोळत असतो ३३. तैसें योगियासी अन्न । बहुकाळें न मिळे जाण । तरी करूनियां लंबासन । निद्रेंविण निजतु ॥३४॥ त्याचप्रमाणे हे पाहा ! योग्याला बहुतकाल अन्न न मिळाले तरी तो लांब आसन करून निद्रेशिवायच निजलेला असतो ३३. निद्रा नाहीं तयासी । परी निजे निजीं अहर्निशीं । बाह्य न करी उपायासी । भक्ष्य देहासी अदृष्टें ॥३५॥ निद्रा म्हणून त्याला नसतेच; पण तो अहोरात्र निजसुखाच्याच तंद्रेत असतो. बाह्य उपाय म्हणून काही करीत नाही. नशिबाने जें भक्ष्य देहाला मिळेल तें ! ३५. अदृष्टीं असेल जें जें वेळें । तें तें मिळेल तेणें काळें । यालागीं त्याचें ज्ञान न मैळे । धारणा न ढळें निजबोधें ॥३६॥ ज्या ज्या वेळी जें जें नशिबी असेल, तें तें त्या त्या वेळी मिळेल, ह्या निश्चयाने त्याचे ज्ञान मलीन होत नाही. निजात्मबोधामुळे त्याची धारणा ढळत नाही ३६. ओजःसहोबलयुतं बिभ्रद् देहमकर्मकम् । शयानो वीतनिद्रश्च नेहेतेन्द्रियवानपि ॥ ४ ॥ अजगरासी बळ उदंड । देहो पराक्रमें प्रचंड । परी न करी उद्योगाचें बंड । पसरूनि तोंड पडिलासे ॥३७॥ अजगराची शक्ति अचाट ; देह व पराक्रम प्रचंड असतो; परंतु उद्योगाची धामधूम म्हणून काही करीत नाही. आपला तोंड पसरून पडलेला असतो ! ३७. तैसाचि योगिया केवळ । शरीरीं असे शारीर बळ । बुद्धिही असे अतिकुशळ । इंद्रियबळ पटुतर ॥३८॥ योगीही केवळ तसाच असतो; त्याला शरीरसामर्थ्य असते; त्याची बुद्धीही मोठी कुशल असते; व त्याचे इंद्रियबलही चांगलेच असते ३८. आहारालागीं सर्वथा । हेतु स्फुरों नेदी चित्ता । कायावाचा तत्वतां । नेदी स्वभावतां डंडळूं ॥३९॥ पण तो आहाराची कल्पनाच मुळी मनाला शिवू देत नाही. खरोखरी कायेला व वाचेला स्वाभाविकपणे तो डळमळूंच देत नाही ३९. स्वप्नजागृती मुकला । सुषुप्ती सांडोनि निजेला । शून्याचा पासोडा झाडिला । निजीं पहुडला निजत्वें ॥४०॥ तो स्वप्न आणि जागृति ह्यांना मुकतो; सुषुप्ति सोडून झोपतो; आणि शून्याची पासोडी झाडून निजस्वरूपी निजात्मभावाने (अर्थात स्वरूपानंदांत) शयन करितो ४०. मुनिः प्रसन्नगम्भीरो दुर्विगाह्यो दुरत्ययः । अनन्तपारो ह्यक्षोभ्यः स्तिमितोद इवार्णवः ॥ ५ ॥ 'समुद्र' जो गुरु करणें । त्याचीं परिस पां लक्षणें । गंभीरत्व पूर्णपणें । निर्मळ असणें इत्यादि ॥ ४१ ॥ आतां, ज्या समुद्राला गुरु करावयाचा त्याची लक्षणे ऐक. त्याच्यांत गंभीरपणा, परिपूर्णता आणि निर्मळपणा इत्यादि गुण असतात ४१. समुद्र सदा सुप्रसन्न । योगी सदा प्रसन्नवदन । केव्हांही धुसमुशिलेंपण । नव्हें जाण निजबोधें ॥४२॥ समुद्र सदोदित सुप्रसन्न असतो, तसा योगीही सर्वकाळ प्रसन्नमुख असतो. आत्मबोधामुळे धुसफुसेपणा म्हणून त्याला केव्हांही माहीत नसतो ४२. मीनल्या सरितांचें समळ जळ । समुद्र डहुळेना अतिनिर्मळ । तैसीं नाना कर्में करितां सकळ । सदा अविकळ योगिया ॥४३॥ नद्यांचे गढूळ पाणी येऊन मिळाले तरी समुद्र गढूळ होत नाही, तो अगदी निर्मळच असतो. तसाच योगीसुद्धा नाना प्रकारची कर्मे करीत असूनही सदोदित निस्त्रस्त (शांत अथवा अलिप्स) असतो ४३. जळें गंभीर सागर । योगिया स्वानुभवें गंभीर । वेळा नुल्लंघी सागर । नुल्लंघी योगीश्वर गुरुआज्ञा ॥४४॥ समुद्र जसा जळाने गंभीर, तसा योगी स्वात्मानुभवानें गंभीर असतो. तो जसा मर्यादा उल्लंघीत नाही, तसाच योगीश्वर गुरु-आज्ञेचे उल्लंघन करीत नाही ४४. समुद्रीं न रिघवे भलत्यासी । तो बुडवी जळकल्लोळेंसी । योगिया बुडवी संसारासी । भावें त्यापासीं गेलिया ॥४५॥ समुद्रात भलत्यास शिरवत नाही. तो पाणी व लाटा यांखाली बुडवून टाकतो. तसाच योगीही भाव धरून त्याजपाशी गेल्यास त्याच्या जन्ममरणरूप संसाराला बुडवून टाकतो ४५. जो रिघणें निघणे जाणें जळीं । तो समुद्रीं करी आंघोळी । येरांसी लाटांच्या कल्लोळीं । कासाकुळी करीतसे ॥४६॥ समुद्रांत शिरावयाचे कसें व परत यावयाचे कसे हें जो जाणतो, तोच समुद्रांत आंघोळ करूं शकतो. इतरांना तो लाटांच्या कल्लोळाने कासावीस करून सोडतो ४६. तैसीचि योगियासी । सलगी न करवे भलतियासी । आपभयें भीती आपैसी । तो भाविकांसी सुसेव्य ॥४७॥ तशीच योग्याची संगतीही भलत्यासलत्याला व्हावयाची नाही. ते आपभयाने आपोआपच भीत असतात. भाविकांनाच तो सुसेव्य असतो ! ४७. जाहल्या धनवंतु वेव्हारा । उपायीं नुल्लंघवे सागरा । तैसें नुल्लंघवे योगीश्वरा । नृपां सुरनरां किन्नरां ॥४८॥ मोठा धनवंत झाला तरी कोणत्याच उपायांनी त्याला समुद्राचे उल्लंघन करवत नाहीं; त्याप्रमाणे देव, राजे, मनुष्य किंवा किन्नर यांसही योगीश्वराचे उल्लंघन करवत नाहीं ४८. मळु न राहे सागरीं । लाटांसरिसा टाकी दुरी । तैसाचि मळु योगियाभीतरीं । ध्यानें निर्धारीं न राहे ॥४९॥ समुद्रांत मळ रहात नाही, लाटांबरोबर तो दूर फेकून देतो, त्याचप्रमाणे योग्याच्या ठिकाणीही ध्यानाच्या योगेकरून निश्चयाने मळ रहात नाही ४९. समुद्रीं मीनली ताम्रपर्णी । तेथ जाहली मुक्ताफळांची खाणी । योगिया मिनली श्रद्धा येऊनि । तेथ मुक्तखाणी मुमुक्षां ॥५०॥ ताम्रपर्णी नदी समुद्राला जाऊन मिळाली तो ती तेथें मुक्तखाण म्हणजे मोत्यांची खाण होऊन बसली, तशीच योग्याला श्रद्धा येऊन मिळाली व तीही तेथे मुक्तखाण म्हणजे मुक्तीची खाण होऊन बसली ५. जो समुद्रामाजीं रिघोनि राहे । तो नानापरीचीं रत्ने लाहे । योगियांमाजीं जो सामाये । त्याचे वंदिती पाये चिद्रत्नें ॥५१॥ जो समुद्रात बुडी देऊन रहातो, त्याच्या हातास नानाप्रकारची रत्ने लागतात; त्याचप्रमाणे जो योग्याशी समरसून जातो. त्याच्या पायावर ज्ञानरत्ने येऊन पडतात ५१. जैशी समुद्राची मर्यादा । कोणासी न करवे कदा । तैशी योगियांची मर्यादा । शास्त्रां वेदां न करवे ॥५२॥ ज्याप्रमाणे समुद्राची मर्यादा कधी कोणाला करवत नाही, त्याचप्रमाणे योग्याची मर्यादाही वेदांना व शास्त्रांना करवत नाही ५२. प्रवाहेंवीण जळ । समुद्रीं जेवीं निश्चळ । मृत्युभयेंवीण अचंचळ । असे केवळ योगिया ॥५३॥ समुद्राचे पाणी ज्याप्रमाणे प्रवाहरहित-निश्चळ असतें, त्याचप्रमाणे योगी हाही मृत्युभयरहित, केवळ निश्चळ होऊन राहिलेला असतो ५३. समुद्रीं प्रवाहो नव्हे कांहीं । सदा पूर्ण ठायींच्या ठायीं । तैसे योगिया जन्ममरण नाहीं । परिपूर्ण पाहीं सर्वदा ॥५४॥ समुद्राला केव्हांही प्रवाह म्हणून नाही, तो सदोदित जशाच्या तसाच परिपूर्ण; तसेंच योग्यासही जन्ममरण नाही. तो सर्वकाळ परिपूर्णच असतो ५४. समुद्रलक्षणें साधितां । अधिक दशा आली हातां । ते योगियाची योग्यता । परिस तत्त्वतां सांगेन ॥५५॥ समुद्राची लक्षणे जुळवितां जुळवितां योग्याच्या ठिकाणी त्याहूनही विशेषपणा दिसून आला. ती योग्याची थोरवी (आतां) तत्त्वतः सांगतों, श्रवण कर ५५. समुद्रामाजीं जळ । लाटांखालीं अतिचंचळ । योगिया अंतरी अतिनिश्चळ । नाहीं तळमळ कल्पना ॥५६॥ समुद्राचे पाणी लाटांच्या खाली अत्यंत चंचल असते, परंतु योगी आंतून अगदी शांत असतो. तळमळ की कल्पना, काही नाही ! ५६. समुद्र क्षोभे वेळोवेळे । योगिया क्षोभेना कवणें काळें । सर्वथा योगी नुचंबळें । योगबळें सावधु ॥५७॥ समुद्र हा वरचेवर क्षोभतो, पण योगी कधींच क्षोभ पावत नाही. योग्याचे मन कशानेही उचंबळत नाही. तो (सर्वदा) योगबलाने सावध असतो ५७. समुद्रीं भरतें पर्वसंबंधें । योगिया परिपूर्ण सदानंदें । समुद्रीं चढूवोहटू चांदें । योगिया निजबोधें सदा सम ॥५८॥ समुद्रास पौर्णिमा-अमावास्यादि पर्वकाळी भरती येते, पण योगी हा सदानंदाने (अक्षय्य निजानंदानें-स्वरूपानंदाने) निरंतर परिपूर्ण असतो. समुद्रास चंद्रामुळे भरती ओहटी असते. परंतु योगी हा स्वात्मानुभवानें सदोदित समच असतो ५८. समुद्र सर्वांप्रति क्षार । तैसा नव्हे योगीश्वर । तो सर्वां जीवांसी मधुर । बोधु साचार पैं त्याचा ॥५९॥ समुद्र हा सर्वांना खारट ; तसा मात्र योगिराज नव्हे. तो सर्व प्राणिमात्रांस मधुर; त्याचा बोधही मधुर व सत्य असतो ५९. जयासी बोधु नाहीं पुरता । अनुभव नेणे निजात्मता । त्यासी कैंची मधुरता । जेवीं अपक्वता सेंदेची ॥६०॥ ज्याला पूर्ण बोध नसतो, निजात्मतेचा अनुभव ज्याला असत नाही, त्याच्या ठिकाणी-अपक्क दशेंतील शेंदाडाप्रमाणे-माधुर्य कोठचें येणार ? ६०. सागरीं वरुषल्या घन । वृथा जायें तें जीवन । तैसा योगिया नव्हे जाण । सेविल्या व्यर्थपण येवों नेदी ॥६१॥ सागरावर मेघवृष्टि झाली असतां तें जीवन फुकट जातें ! पण योग्याचे मात्र तसे नाही. त्याची सेवा केल्यास तो ती मुळीच वाया जाऊ देत नाही ६१. अल्पही योगिया होये घेता । तेणें निवारी भवव्यथा । यालागीं मुमुक्षीं सर्वथा । भगवद्भक्तां भजावें ॥६२॥ योग्याने यत्किंचितही सेवा ग्रहण केली तरी तेवढ्याने तो भवव्यथा निवारण करतो. ह्यासाठी मुमुक्षु जनांनी सर्वथैव हरिभक्तांची सेवा करावी ६२. समृद्धकामो हीनो वा नारायणपरो मुनिः । नोत्सर्पेत न शुष्येत सरिद्भिरिव सागरः ॥ ६ ॥ वर्षाकाळीं सरिता सकळ । घेऊनि आल्या अमूप जळ । तेणें हरुषेजेना प्रबळ । न चढे जळ जळाब्धीं ॥६३॥ पर्जन्यकाळांत एकूण एक नद्या अपरंपार पाणी घेऊन आल्या तरी त्यायोगें समुद्र हर्षाने उचंबळत नाही किंवा तेणेंकरून समुद्रात पाणी चढत नाहीं ६३. ग्रीष्मकाळाचिये प्राप्ती । सरितांचे यावे राहती । ते मानूनियां खंती । अपांपती वोहटेना ॥६४॥ ग्रीष्मऋतु आला असतां नद्यांचे प्रवाह बंद होतात, म्हणून त्याची खंत घेऊन तो नद्यांचा स्वामी काही ओसरत नाहीं ६४. तैसेंचि योगियांच्या ठायीं । नाना समृध्दि आलिया पाहीं । अहंता न धरी देहीं । गर्वु कांहीं चढेना ॥६५॥ त्याचप्रमाणे योग्याच्या ठिकाणी नानाप्रकारची समृद्धि चालून आली तरी तो आपले ठिकाणी अहंता बाळगीत नाही व यत्किंचितही गर्व करीत नाहीं ६५. समृध्दि वेंचिलिया पाठीं । खंती नाहीं योगिया पोटीं । तो नारायणपरदृष्टीं । सुखसंतुष्टी वर्ततु ॥६६॥ बरें; ती समृद्धि गेली, तरी त्याच्या अंत:करणास खंती वाटत नाहीं ! तो (सर्वकाल) नारायणात्मक दृष्टीने सुखानंदांतच नांदत असतो ६६. संपत्तीमाजीं असतां । मी संपन्नु हें नाठवे चित्ता । दरिद्र आलिया दरिद्रता । नेणे सर्वथा योगिया ॥६७॥ श्रीमंतींत असला तरी 'मी श्रीमंत' हा भाव त्याच्या मनास शिवत नाही. बरें दरिद्री झाला तरी दरिद्रता योग्याला माहीतही नसते ६७, दरिद्र आणि संपन्नता । दोन्ही समान त्याचिया चित्ता । नाहीं प्रपंचाची आसक्तता । नारायणपर तत्त्वतां निजबोधें ॥६८॥ श्रीमंती काय आणि दारिद्य काय दोन्ही त्याच्या चित्ताला सारखींच ! प्रपंचाची आसक्ति म्हणून नाही. स्वात्मानुभवानें तत्त्वतः तो नारायणस्वरूपच झालेला असतो ६८. या प्रपंचाचा कठिण लागु । नाशासी मूळ स्त्रीसंगु । येचिविषयी गुरु पतंगु । केला चांगु परियेसीं ॥६९॥ हा प्रपंचाचा पाश कठीण ! स्त्रीसंग हें नाशाचे मूळ होय. ह्याचसंबंधांत पतंग हा मी उत्तम गुरु केला, ती हकीकत ऐक ६९. दृष्ट्वा स्त्रियं देवमायां तद्भावैरजितेन्द्रियः । प्रलोभितः पतत्यन्धे तमस्यग्नौ पतङ्गवत् ॥ ७ ॥ दैवी गुणमयी जे माया । तिचें सगुणस्वरूप त्या स्त्रिया । तेथ प्रलोभ उपजला प्राणियां । भोग भोगावया स्त्रीसुखें ॥७०॥ 'दैवी गुणमयी' जी माया, तिचे सगुणस्वरूप म्हणजेच स्त्रिया होत. तेथें स्त्रीसुखाचे भोग भोगण्याची प्राण्यांच्या ठिकाणी बलवत्तर इच्छा उत्पन्न झाली ७०. हावभावविलासगुणीं । व्यंकट कटाक्षांच्या बाणीं । पुरुषधैर्य कवच भेदोनि । हृदयभुवनीं संचरती ॥७१॥ हावभाव विलासादि गुणांनी (गुण पक्षीं धनुष्याची दोरी, असाही श्लेषार्थ) व वक्र (चंचल) कटाक्षबाणांनी पुरुषाचें धैर्यरूप चिलखत फोडून ह्या स्त्रिया हृदयप्रदेशीं संचार करतात ७१. दारुण कटाक्षांच्या घायीं । पुरुषधैर्य पाडिलें ठायीं । योषिताबंदीं पाडिले नाहीं । भोग-कारागृहीं घातले ॥७२॥ भयंकर कटाक्षप्रहारांनी पुरुषाचे धैर्य जमीनदोस्त करून स्त्रीरूप पाशात अडकवून भोगरूप बंदिशाळेंत जखडून टाकतात ७२. स्त्रीभोगाचें जें सुख । तें जाण पां केवळ दुःख । तोंडीं घालितां मधुर विख । परिपाकीं देख प्राणांतु ॥७३॥ स्त्रीभोगाचे जें सुख ते निव्वळ दुःख आहे, हे ध्यानात ठेव. मधुर विष तोंडांत घातले तर परिणामी प्राणघात ठेवलेला ! ७३. दीपाचिया अंगसंगा । कोण सुख आहे पतंगा । वळें आलिंगूं जातां पैं गा । मरणमार्गा लागले ॥७४॥ दिव्याला जाऊन बिलगण्यामध्ये पतंगाला काय सुख आहे बरें ? जोराजोरानें कवटाळायाला जाऊन मृत्युपंथाला मात्र लागतात ! ७४. पुढिला पतंग निमाला देखती । तरी मागिल्या दीपीं अतिआसक्ती । तेवीं स्त्रीकामें एक ठकती । एकां अतिप्रीती पतंगन्यायें ॥७५॥ पुढचा पतंग मेलेला पाहतात, तरी मागच्यांचा दिव्याच्या ठिकाणी जबर लोभ आहेच ! त्याचप्रमाणे स्त्रीकामानें एक फशी पडतात, तरी पण दुसरे पतंगन्यायाने त्या विषयांत आसक्त होतातच ७५. तेवीं विवेकहीन मूर्खा । लोलुप्य उपजे स्त्रीसुखा । तत्संसर्गें मरण लोकां । न चुके देखा सर्वथा ॥७६॥ ह्याप्रमाणे विवेकशून्य मूर्ख लोक स्त्रीसुखाला लालचावतात; पण त्यांच्या संसर्गाने लोकांना प्राप्त होणारे मरण मात्र काही केल्या चुकत नाहीं ७६. दीप-रूपाचेनि कोडें । पतंग जळोनि स्नेहीं बुडे । तेवीं स्त्रीसंगे अवश्य घडे । पतन रोकडें अंधतमीं ॥७७॥ दिव्याच्या रूपाला भुलून पतंग जळून तेलांत पडतो त्याप्रमाणे त्रियांच्या संगतीने निश्चयपूर्वक 'अंधतम' नांवाच्या नरकामध्ये पतन घडतेंच ७७. योषिद् हिरण्याभरणाम्बरादि द्रव्येषु मायारचितेषु मूढः । प्रलोभितात्मा ह्युपभोगबुद्ध्या पतङ्गवन्नश्यति नष्टदृष्टिः ॥ ८ ॥ पहा पां कांता आणि सोनें । वस्त्रें आभरणें रत्ने । मायेनें रचिलीं पडणें । पतनाकारणें जनांच्या ॥७८॥ हे पहा ! स्त्रिया, सोनें, वस्त्रें, अलंकार व रत्ने ही लोकांच्या पतनासाठी मायेनें निर्माण केलेली पडणी म्हणजे पतनें आहेत ७८. एकली योषिता नरकीं घाली । सुवर्णलोभे नरकु बळी । रत्नें भूषणें तत्काळीं । नरकमेळीं घालिती ॥७९॥ एक स्त्रीच (आधीं) नरकांत लोटते. सोन्याचा लोभ तर त्यापेक्षा जबरदस्त नरक. रत्नें आणि भूषणें ही सुद्धा तत्काल नरककुंडांत नेऊन घालतात ७९. ते अवघेचि अनर्थकारी । मीनले योषिताशरीरीं । ते देखतांचि पुरंध्री । जनांसी उरी मग कैंचेनि ॥८०॥ ही सगळींच अनर्थाची घरें एका स्त्रीच्या ठिकाणी एकवटली आहेत. (तेव्हां ) अशी स्त्री दृष्टीस पडतांच लोक कशाचे रहातात ? ८०. अंगीं वेताळसंचारा । त्यावरी पाजिलिया मदिरा । मग डुल्लत नाचतां त्या नरा । वोढावारा पैं नाहीं ॥८१॥ अंगांत अगोदरच पिशाच-संचार झालेला, त्यावर आणखी दारू पाजली, म्हणजे मग त्या मनुष्याच्या डोलण्याला आणि नाचण्याला जसा सुमारच नसतो ८१; कां भांडाचे तोंडीं भंडपुराण । त्यावरी आला शिमग्याचा सण । मग करितां वाग्विटंबन । आवरी कोण तयासी ॥८२॥ किंवा एखाद्या बाष्कळाच्या तोंडचे जसे भाकडपुराण; त्यांत आणखी शिमग्याचा सण यावा-मग जी वाचेची विटंबना होते तिला आळा कोण घालणार ? ८२. हो कां मोहक मदिरा सर्वांसी । त्यांतु घातलें उन्मादद्रव्यासी । सेवन करितां त्या रसासी । पारु भ्रमासी पैं नाहीं ॥८३॥ मदिरा ही आधींच सर्वांना भुरळ पाडणारी; त्यांत आणखी मादक द्रव्य तीमध्यें मिसळले; मग तो रस प्राशन केल्यावर भ्रमाला जशी सीमाच रहात नाही ८३; तैसें सोलीव मोहाचें रूप । तें जाण योषितास्वरूप । त्याहीवरी खटाटोप । वस्त्रें पडप भूषणें ॥८४॥ त्याप्रमाणे मोहाचे अस्सल रूप तेच स्त्रीचें स्वरूप होय; त्यांत आणखी वस्त्रेंप्रावरणे अलंकार ह्यांची भर ! ८४. काजळ कुंकूं अलंकार । लेऊनि विचित्र पाटांबर । वनिता शोभित सुंदर । मायेचे विकार विकारले ॥८५॥ काजळ, कुंकू, अलंकार, वस्त्रें, तर्हेतर्हेच्या शालूपैठण्या वगैरेंनी स्त्री सुंदर शोभूं लागते, तिच्यामध्ये मायेचे विकार फैलावून राहतात ! ८५. माया अजितेंद्रिया बाधी । दासांसंमुख नव्हे त्रिशुद्धी । ज्याची अतिप्रीती गोविंदीं । त्यासी कृपानिधि रक्षिता ॥८६॥ ज्यांनी इंद्रियदमन केले नाही, त्यांनाच माया ताप देते. परंतु भक्तांच्या समोर ती कालत्रयींही उभी रहात नाही. ज्याची श्रीगोविंदाच्या ठिकाणी अत्यंत भक्ति त्याचा तो कृपानिधिच रक्षणकर्ता असतो ! ८६. कैसा रीतीं रक्षी भक्त । मूळीं अत्मा आत्मी नाहीं तेथ । स्त्रीरूपें भासे भगवंत । भक्त रक्षित निजबोधें ॥८७॥ भक्तांचे कसें रक्षण करतो म्हणाल, तर 'हा आत्मा' ही 'आत्मी' असा स्त्रीपुरुष भेदच मुळांत नाही, तेथे भगवंतच स्त्रीरूपानें भासतो (असा) आत्मानुभव देऊन तो भक्तांचे रक्षण करतो ८७. वनिता देखोनि गोमटी । विवेकाची होय नष्ट दृष्टी । प्रलोभें उपभोगा देती मिठी । ते दुःखकोटी भोगिती ॥८८॥ सुंदर स्त्री पाहून ज्यांची विवेकदृष्टि नष्ट होते व आसक्तिपूर्वक उपभोगाला जे मिठी मारतात, ते कोटीच्या कोटि दुःखें भोगतात. ८८. देखोनि दीपरूपीं झगमगी । उपभोगबुद्धि पतंगी । उडी घालितां वेगीं । जळोनि आगीं नासती ॥८९॥ दिव्याच्या रूपांतली झगमग पाहून पतंगाच्या ठिकाणी उपभोगाची लालसा उत्पन्न होते म्हणून ते झपाट्याने झडप घालतात व अग्नीत जळून खाक होतात ८९. एवं योषितारूपें माया । उपभोगबुद्धि भुलवी प्राणियां । जे विमुख हरीच्या पायां । त्यांसीच माया भुलवितु ॥९०॥ अशा प्रकारे स्त्रीच्या रूपानें माया ही उपभोग लालसेनें जीवांना भुरळ घालते. जे हरिचरणाला विमुख असतात, त्यांनाच माया भुरळ घालीत असते ९०. मधुकरीचेनि विंदाणें । 'मधुकर' म्यां गुरु करणें । दुःख नेदितां कार्य साधणें । तींहि लक्षणें परिस पां ॥९१॥ आता मधुकरीच्या (भ्रमरवृत्तीच्या) लक्षणाने मी भ्रमरासही गुरु केलें. इतरांस दुःख न देता आपला कार्यभाग साधावयाचा असतो. त्याचीही लक्षणे ऐकून घे. ९१. स्तोकं स्तोकं ग्रसेद् ग्रासं देहो वर्तेत यावता । गृहानहिंसन्नातिष्ठेद् वृत्तिं माधुकरीं मुनिः ॥ ९ ॥ भ्रमरु रिघोनि पुष्पामधीं । फुल तरी कुचुंबों नेदी । आपुली करी अर्थसिद्धी । चोखट बुद्धि भ्रमराची ॥९२॥ 'भ्रमर' हा फुलांत शिरून फूल चुरडू देत नाही व आपला कार्यभाग तर साधून घेतो अशी भ्रमराची बुद्धि चांगली असते ९२. तैसीच योगियाची परी । ग्रासमात्र घरोघरीं । भिक्षा करूनि उदर भरी । पीडा न करी गृहस्थां ॥९३॥ तोच प्रकार योग्याचा आहे. घरोघर घांस घांसभर भिक्षा मागून निर्वाह करतो. गृहस्थांना ताप देत नाही. ९३. प्राणधारणेपुरतें । योगी मागे भिक्षेतें । समर्थ दुर्बळ विभागातें । न मनूनि चित्तें सर्वथा ॥९४॥ समर्थ किंवा दुर्बळ असा भेदभाव मनांत मुळीच न आणतां योगी केवळ प्राणधारणेपुरतीच भिक्षा मागतो ९४. रिघोनि कमळिणीपाशीं । भ्रमरु लोभला आमोदासी । पद्म संकोचे अस्तासी । तेंचि भ्रमरासी बंधन ॥९५॥ भ्रमर कमलिनींत शिरून परिमळाला लुब्ध होऊन बसतो. अस्तमानी कमल मिटते व तेंच भ्रमरास बंधन होते ! ९५. जो कोरडें काष्ठ भेदोनि जाये । तो कमळदळीं गुंतला ठाये । प्रिया दुखवेल म्हणौनि राहे । निर्गमु न पाहे आपुला ॥९६॥ जो सुकलेलें कठिण लाकूड भेदून जातो, तो कोमल अशा कमलदलामध्ये कोंडून पडतो ! प्रियकरिणी दुखवेल म्हणून स्तब्ध राहतो. बाहेर निघण्याचा मार्ग शोधीत नाहीं ९६. तैसाचि जाण संन्यासी । एके ठायीं राहिल्या लोलुप्येंसीं । तेंचि बंधन होये त्यासी । विषयलोभासी गुंतला ॥९७॥ त्याचप्रमाणे संन्याशीही जर एकाच ठिकाणी आसक्त होऊन राहिला तर तेच त्याला बंधन होऊन बसतें. तो विषयाच्या लोभाला गुंतून पडतो ९७. अणुभ्यश्च महद्भ्यश्च शास्त्रेभ्यः कुशलो नरः । सर्वतः सारमादद्यात् पुष्पेभ्य इव षट्पदः ॥ १० ॥ अतिलहान सुमन जें कांहीं । भ्रमरा तेथ उपेक्षा नाहीं । रिघोनि त्याच्याही ठायीं । आमोद पाहीं सेवितु ॥९८॥ अगदी लहान फूल असलें तरी तेथे सुद्धा भ्रमराचा अनादर नाही. त्यांतही शिरून भ्रमर परिमळ सेवन करीत असतो ९८. थोराथोरा ज्या कमळिणी । विकासल्या समर्थपणीं । त्यांच्याही ठायीं रिघोनी । सारांश सेवुनी जातसे ॥९९॥ पूर्णपणे विकसित झालेल्या ज्या मोठ्या कमलिनी, त्यांच्यांतही शिरून तो सार-अंश तेवढा घेऊन जातो ९९, तैसाचि योगिया नेटकु । शास्त्रदृष्टी अतिविवेकु । न करी लहान थोर तर्कु । सारग्राहकु होतसे ॥१००॥ त्याचप्रमाणे योगीही नीटनेटका यथाशास्त्र असा पुष्कळसा विचार किंवा लहान मोठे तर्क करीत बसत नाही. फक्त सार तेवढे ग्रहण करीत असतो १००. वेदांतीं ब्रह्मस्थिती । बोलिली मानी यथानिगुतीं । इतर स्तोत्रीं ब्रह्मव्युत्पत्ती । तेही अतिप्रीतीं मानितु ॥१॥ वेदांतांत सांगितलेल्या ब्रह्मस्थितीलाही तो यथोचित मान देतो, त्याचप्रमाणे इतर स्तोत्रादिकांत वर्णिलेल्या ब्रह्मव्युत्पत्तीलाही तितक्याच आदराने मानतो १. पंडितांचें वचन मानी । साधारणु बोलिला हितवचनीं । तेंही अतिआदरें मानूनी । सार निवडूनि घेतसे ॥२॥ पंडितांचे वचन मानतो; तसाच कोणी सामान्य मनुष्य जरी काही हिताचे भाषण बोलला, तरी तेंही अत्यादरपूर्वक मानून त्यांतलें सार ग्रहण करतो २. प्रीती होआवी पतीच्या मानसीं । कुळवधू मानी सासुसासर्यांसी । मान देतसे त्यांच्या दासासी । तेचि प्रीतीसी लक्षूनि ॥३॥ पतीच्या अंत:करणांत प्रेम उत्पन्न व्हावे म्हणून कुलवधू जशी सासूसासऱ्यांना मान देते, तसेच त्याच प्रेमास अनुलक्षून त्याच्या चाकरनोकरांचाही आदर करते ३. भेसळल्या क्षीरनीरासी । निवडुनि घेईजे राजहंसीं । तैसा विवेकयुक्त मानसीं । सारभागासी घेतसे ॥४॥ पाणी आणि दूध एकत्र झाले तरी ते जसें राजहंसाने निवडून घ्यावे तसाच योगीही सारासारविचारपूर्वक सार-अंश तेवढा ग्रहण करतो ४. सर्वभूतीं भगवद्भावो । हा सारभागु मुख्य पहा हो । हे निष्ठा ज्यासि महाबाहो । त्यासी अपावो स्वप्नीं नाहीं ॥५॥ सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी भगवंताची भावना हाच मुख्य सारांश आहे, हे ध्यानांत ठेवावे. हे महाबाहो ! हीच निष्ठा म्ह. हीच भावना ज्याला ठसली त्याला स्वप्नांतसुद्धा अपाय माहीत नाही ५. भरलेया जगाआंतु । सारभागी तो योगयुक्तु । यदूसि अवधूत सांगतु । गुरुवृत्तांतु लक्षणें ॥६॥ या भरलेल्या जगामध्ये जो सारग्राही असतो, तोच योगी होय. ह्याप्रमाणे यदूला अवधूतांनी गुरूची लक्षणे सांगितली ६. गुरुत्वें म्यां मानिली 'माशी' । ऐके राया दो प्रकारेंसी । एक ते मोहळमासी । ग्रामवासी दूसरी ॥७॥ (पुढे अवधूत म्हणाले-) हे राजा, मी दोन प्रकारच्या माशा गुरु केल्या. एक 'मधमाशी' आणि दुसरी 'साधीमाशी'. ७. सायन्तनं श्वस्तनं वा न सङ्गृह्णीत भिक्षितम् । पाणिपात्रोदरामत्रो मक्षिकेव न सङ्ग्रही ॥ ११ ॥ पहा पां घरींची माशी । बैसल्या साखरेचे राशीं । हातीं धरोनि घाली मुखाशी । संग्रहो तिसी पैं नाहीं ॥८॥ अरे ! पहा की, घरांतली माशी साखरेच्या ढिगावर बसली तरी आपल्या हातांनी साखर तोंडांत घालते, परंतु तिच्याजवळ संग्रह मुळींच नसतो ८. हे होईल सायंकाळा । हे भक्षीन प्रातःकाळां । ऐसा संग्रहो वेगळा । नाहीं केला मक्षिका ॥९॥ हें संध्याकाळला होईल, एवढे सकाळला खाईन, असा वेगळा संग्रह कांहीं माशीने केलेला नसतो ५. तैशी योगसंन्यासगती । प्राप्तभिक्षा घेऊनि हातीं । तिसी निक्षेपु मुखाप्रती । संग्रहस्थिति त्या नाहीं ॥११०॥ योगसंन्याश्याचीही तीच गति असते. मिळेल ती भिक्षा हातात घेऊन तोंडांत घालावयाची. संग्रह म्हणून करावयाचा नाही ११०. भिक्षेलागीं पाणिपात्र । सांठवण उदरमात्र । या वेगळें स्वतंत्र । नाहीं घरपात्र सांठवणें ॥११॥ हात हे भिक्षापात्र, आणि पोट हेंच सांठवण ! ह्याहून वेगळे काही सांठवण्यास घर किंवा स्वतंत्र भांडें नाही ११. सायन्तनं श्वस्तनं वा न सङ्गृह्णीत भिक्षुकः । मक्षिका इव सङ्गृह्णन् सह तेन विनश्यति ॥ १२ ॥ सायंकाळ-प्रातःकाळासी । भक्ष्यसंग्रहो नसावा भिक्षूसी । संग्रहें पावती नाशासी । येविषीं 'मधुमाशी' गुरु केली ॥१२॥ भिक्षुजवळ सकाळला किंवा संध्याकाळला अन्नाचा संग्रह म्हणून नसावा. संग्रह केला असता त्यांचा नाश होतो. याचसंबंधाने मधमाशीला मी गुरु केले १२. रिघोनि नाना संकटस्थानांसी । मधुसंग्रहो करी मधुमाशी । तो संग्रहोचि करी धातासी । मधु न्यावयासी जैं येती ॥१३॥ नानाप्रकारच्या अवघड अशा ठिकाणी मधमाशी मधाचा संग्रह करते. (परंतु) मध नेणारे लोक जेव्हां येतात तेव्हां तो संग्रहच तिच्या घातास कारण होतो १३. संग्रहो यत्नाचिया चाडा । मोहळ बांधिती अवघडां कडां । ते दुर्गमीं रिगू करिती गाढा । अर्थ-चाडा मधुहर्ते ॥१४॥ संग्रहाच्या खटपटीच्या लालसेनें अवघड अशा कड्यांवर मोहोळ बांघतात. तशा अडचणीच्या ठिकाणीसुद्धा मध काढणारे लोक मधाच्या लालचीनें कडोविकडीने रिघाव करतात १५. कां झाडितां मोहळासी । नाशु होतसे मासियांसी । संग्रहाची जाती ऐशी । जीवाघातासी करवितु ॥१५॥ आणि पहा ! मोहोळ झोडलें म्हणजे माशांचाही फडशा पडतो. अशा प्रकारें संग्रहाचा प्रकार प्राणघातास कारण होतो १५. ऐसें देखोनिया जनीं । भक्त-भिक्षु-योगी-सज्जनीं । संग्रहो न करावा भरंवसेनी । नाशु निदानीं दिसतुसे ॥१६॥ हा जगांतला प्रकार पाहून भक्त, भिक्षु, योगी व इतर सजन यांनी बिलकूल संग्रहाच्या भरीस पडूं नये. कारण, परिणामी नाश हा ठेवलेलाच असतो १६. आचारावें सत्कर्म । संग्रहावा शुद्ध धर्म । हेंचि नेणोनियां वर्म । धनकामें अधम नाशती ॥१७॥ सत्कर्म आचरावें व शुद्ध धर्मांचा संग्रह करावा, हें वर्म न समजून धनाच्या लालसेने अधम लोक नाश पावतात १७. अर्थ विनाशाचें फळ । दुसरें एक नाशाचें मूळ । विशेष नाशाचें आहळबाहळ । स्त्री केवळ वोळख पां ॥१८॥ द्रव्य हें विनाशाचें फळ आहे. तसेंच नाशाचेही मूळ आहे; आणि विशेष नाशाचे विस्तीर्ण ठिकाण म्हणजे केवळ स्त्री होय, असें तूं ओळखून रहा १८. मूळ नाशासि जीविता । कनक आणि योषिता । जंव जंव यांची आसक्तता । तंव तंव चढता भवरोगु ॥१९॥ जीविताच्या नाशाला मूळ म्हटले म्हणजे कनक आणि कांता. ह्यांची आसक्ति जो जो अधिक तो तो संसाराचे दुःखही अधिक १९. कनक आणि कामिनी । ज्यासी नावडे मनींहुनी । तोचि जनार्दनु जनीं । भरंवसेंनी ओळख पां ॥१२०॥ कनक आणि कांता यांचा ज्याला मनापासून कंटाळा तोच जनामध्ये जनार्दन आहे. हें तूं खात्रीपूर्वक समजून ठेव १२०. जो सुख इच्छील आपणासी । तेणें नातळावें स्त्रियेसी । येचिविषयीं 'मदगजासी' । गुरु विशेषीं म्यां केला ॥२१॥ ज्याला स्वतःला (आत्म) सुखाची इच्छा आहे, त्याने स्त्रियांचा संसर्ग ठेऊं नये. यासंबंधाने मी विशेषेकरून मत्त हत्तीला गुरु केला २१. पदापि युवतीं भिक्षुर्न स्पृशेद् दारवीमपि । स्पृशन् करीव बध्येत करिण्या अङ्गसङ्गतः ॥ १३ ॥ पहा पां षष्टिहायन भद्रजाती । त्यांपुढें मनुष्य तें किंती । ते हस्तिणीचे अंगसंगतीं । बंधन पावती मनुजांचें ॥२२॥ पहा की, साठ वर्षे जगणाऱ्या मत्त हत्तीपुढे मनुष्य तो काय ? परंतु ते हत्ती हत्तिणीच्या अंगसंगाच्या इच्छेमुळे मनुष्याच्या बंधनांत सांपडतात २२. जो दृष्टीं नाणी मनुष्यांसी । तो स्त्रियां वश केला मानवांसी । त्यांचेनि बोलें उठी बैसी । माथां अंकुशीं मारिजे ॥२३॥ जो मनुष्यांना आपल्या दृष्टिसमोर फिरकूंही देत नाही, तो हत्ती स्त्रीने त्या मनुष्यांचा अंकित करून सोडला. त्यांच्या शब्दासरसा तो उठूं बसूं लागला; व मस्तकावर अंकुशाचा मार घेऊ लागला ! २३. एवं जिणावया संसारासी । जे स्वधर्मनिष्ठ संन्यासी । तिंही देखोनि योषितांसी । लागवेगेंसी पळावें ॥२४॥ एवंच, जे स्वधर्मनिष्ट संन्याशी आहेत, त्यांनी संसार जिंकण्यासाठी स्त्रियांना पाहिले की ताबडतोब पळ काढावा २४. नको स्त्रियांची भेटी । नको स्त्रियांसी गोष्टी । स्त्री देखतांचि दिठीं । उठाउठीं पळावें ॥२५॥ खियांचे दर्शन नको की त्यांच्याशी भाषण नको. स्त्री दृष्टीस पडली की लगोलग 'यःपलाय' करावें २५. पळतां पळतां पायांतळी । आल्या काष्ठाची पुतळी । तेही नातळावी कुशळीं । निर्जीव स्त्री छळी पुरुषातें ॥२६॥ पळतां पळतां पायांखाली 'काष्ठाची पुतळी' आली तरी, शहाण्यांनी तिला स्पर्शसुद्धा करू नये. कारण निर्जीव स्त्रीसुद्धा पुरुषाला ताप देते २६. अनिरुद्धें स्वप्नीं देखिली उखा । तों धरूनि नेला चित्ररेखा । बाणासुरें बांधिला देखा । कृष्णा सखा जयाचा ॥२७॥ अनिरुद्धाने उषा स्वप्नांत पाहिली (स्वप्नांत दोघांचा संग झाला), तो त्याला चित्ररेखेनें धरून नेला, आणि कृष्णासारखा त्याचा सखा असतां बाणासुराने त्याला बांधून ठेविलें २७. त्यासी सोडवणेलागीं हरी । धांवतां आडवा आला कामारी । युद्ध जाहलें परस्परीं । शस्त्रास्त्री दारुण ॥२८॥ त्याला सोडविण्याकरितां श्रीहरि हा धावत आला असतां त्याला शंकर आडवा आला. उभयतांचे शस्त्रास्त्रांनी तुंबळ युद्ध झालें ! २८. एवं हरिहरां भिडतां । जो बांधला स्वप्नींचिया कांता । तो सहसा न सुटेची सोडवितां । इतरांची कथा कायसी ॥२९॥ अशा प्रकारे हरिहर भिडले असतांही जो स्वप्नांतल्या स्त्रीने बांधला गेला होता, त्याची सुटका करण्याचा प्रयत्न केला असतांही सुटका झाली नाहीच. मग इतरांचा काय पाड ? २९. पहा पां स्वप्नींचिया कांता । अनिरुद्धासी केली निरुद्धता । मा साचचि स्त्री हाती धरितां । निर्गमता त्या कैंची ॥१३०॥ पहा की, जो खरोखर अनिरुद्ध (कधीही बांधला जाणारा नव्हे असा) त्याचाही जर स्वप्नांतल्या स्त्रीने निरोध केला, तर मग खरोखरीच्या स्त्रीने हाती धरले तर त्याची सुटका कशी होणार ? १३०. 'पुरुष' आपणया म्हणविती । सेखीं स्त्रियांचे पाय धरिती । त्यांसी कैसेनि होईल मुक्ती । स्त्रीसंगतीं अधःपात ॥३१॥ स्वतःला 'पुरुष' म्हणवितात, आणि अखेर स्त्रियांच्या पायीं लागतात ! त्यांना मुक्ति कशी मिळणार ? स्त्रियांच्या संगतीने पतनच ठेवलेलें ? ३१. नाधिगच्छेत् स्त्रियं प्राज्ञः कर्हिचिन्मृत्युमात्मनः । बलाधिकैः स हन्येत गजैरन्यैर्गजो यथा ॥ १४ ॥ क्रीडतां गजींमाजीं गजपती । त्यावरी सबळ भद्रजाती । येऊनियां युद्ध करिती । निजबळें मारिती तयातें ॥३२॥ गजराज हत्तिणींमध्ये क्रीडा करीत असतां त्यावर दुसरे बलिष्ट हत्ती चालून येऊन युद्ध करतात, आणि आपल्या अंगबळाने त्यास ठार करतात. ३२. तो मारोनियां हस्ती । त्या हस्तिणी समस्ती । सबळ भोगी भद्रजाती । नाशप्रती स्त्री मूळ ॥३३॥ त्या हत्तीस मारून त्या सर्व हत्तिणी, प्रबळ हत्ती असतो तो भोगतो, (एवंच) नाशाला मूळ कारण स्त्री ३३. अहल्येचिया संगतीं । गौतमें विटंबिला अमरपती । भस्मासुरासी नाशप्राप्ती । स्त्रीसंगतीस्तव जाली ॥३४॥ अहल्येच्या संबंधामुळेच गौतमानें इन्द्राची विटंबना केली. भस्मासुराचाही नाश स्त्रीसंगतीनेच झाला ३४. देखोनि तिलोत्तमा उत्तम वधू । सुंद उपसुंद सखे बंधु । स्त्री अभिलाषें चालिला क्रोधु । सुहृदसंबंधू विसरले ॥३५॥ सुंदर अशा तिलोत्तमा स्त्रीला पाहून, सुंद व उपसुंद हे सख्खे भाऊ खरे, पण स्त्रीच्या अभिलाषानें क्रोध खवळून ते आपले नाते पार विसरले ३५. मग स्त्रीविरहें युद्धाचे ठायीं । दोघे निमाले येरयेरांचे घायीं । शेखीं स्त्रीभोगुही नाहीं । मरणमूळ पाहीं योषिता ॥३६॥ आणि रणांगणांत स्त्रीविरहाने दोघेही एकमेकांच्या प्रहारांनी गतप्राण झाले ! शेवटीं स्त्रीभोगही अंतरला ! (एवंच) स्त्री हें मरणाचे मूळ, हे ध्यानात ठेव ३६. ऐसीच पूर्वकल्पींची कथा । अवतारी श्रीकृष्ण नांदतां । तेणें शिशुपाळ गांजोनि सर्वथा । हिरोनि कांता पैं नेली ॥३७॥ अशीच पूर्वकल्पांतील एक कथा आहे. अवतारी श्रीकृष्ण नांदत असतां त्याने शिशुपालाला सर्वस्वी ताप देऊन कांता हिरावून नेली ३७. एवं सुरनरपशूंप्रती । नाशासी मूळ स्त्रीसंगती । तिचेनि संगें गृहासक्ती । कलहप्राप्ती स्त्रीमूळ ॥३८॥ तात्पर्य, देव काय, मनुष्य काय, किंवा पशु काय, ह्यांच्या नाशाला मूळ एक स्त्रीसंगति. तिच्याच संगतीनें गृहावर आसक्ति उत्पन्न होते. कलह होण्याला स्त्री हे कारण असते ३८. ग्राम्य स्त्रियांचे संगतीं जाणें । तो बैसला मरणाधरणें । मरण आल्याही न करणें । जीवेंप्राणें स्त्रीसंगु ॥३९॥ ग्राम्य स्त्रियांच्या संगतीं जाणें म्हणजे तर मरणाच्या दारींच जाणे होय ! याकरितां मरण आले तरी ग्राम्य स्त्रीसमागम करूं नये ३९. वेश्येचे संगती जातां । बळाधिक्य करी घाता । निरंतर स्वपत्नी भोगितां । नाहीं बाधकता हें न म्हण ॥१४०॥ आतां वेश्येचा समागम केला असतां विशेष नाश होतो आणि स्वपत्नीशी निरंतर रत झाले असता बाधकता नाही, असें मात्र समजू नको १४०. अविश्रम स्त्री सेवितां । कामु पावे उन्मत्तता । उन्मत्त कामें सर्वथा । अधःपाता नेइजे ॥४१॥ कारण एकसारखें स्त्रीसेवन केलें असतां काम जोरावतो; आणि उन्मत्त कामाने सर्वस्वी अधःपातच होतो ! ४१. एवं हा ठावोवरी । स्त्रीसंग कठिण भारी । क्वचित्संगु जाहल्यावरी । नरकद्वारीं घालील ॥४२॥ तात्पर्य स्त्रीसमागम म्हणजे इतका भयंकर आहे. चुकून संग घडला तरीसुद्धा तो नरकांत नेऊन घालील ४२. नरकीं घालील हे वार्ता । उद्धाराची कायसी कथा । नरकरूप ग्राम्य योषिता । पाहें सर्वथा निर्धारें ॥४३॥ नरकांत घालील ही गोष्ट अगदी निश्चित. तिकडे उद्धाराची गोष्ट कशाला ? ग्राम्य स्त्रिया तर पहा अगदी नरकरूपच आहेत ! ४३. स्त्री आणि दुसरा अर्थु । हाचि ये लोकीं घोर अनर्थु । येणें अंतरला निजस्वार्थु । शेखीं करी घातु प्राणाचा ॥४४॥ एक स्त्री, आणि दुसरा अर्थ म्ह. द्रव्य, हेच ह्या लोकांतले भयंकर अनर्थ आहेत. यांच्या योगाने आपला खरा स्वार्थ म्ह. आत्मप्राप्ति दूरच राहिली, पण अखेर प्राणघात मात्र होतो ४४. न देयं नोपभोग्यं च लुब्धैर्यद् दुःखसञ्चितम् । भुङ्क्ते तदपि तच्चान्यो मधुहेवार्थविन्मधु ॥ १५ ॥ स्वयें खाये ना धर्मु न करी । घरच्यांसी खाऊं नेदी दरिद्री । मधुमक्षिकेच्या परी । संग्रहो करी कष्टोनि ॥४५॥ हीनकपाळी मनुष्य आपणही खात नाही, धर्मही करीत नाही, आणि घरच्यासही खाऊं देत नाही ! मधमाशीप्रमाणे कष्ट करून करून सांठा करीत असतो ४५. माशा मोहळा बांधिती बळें । माजीं सांचले मधाचे गोळे । तें देखोनि जगाचे डोळे । उपायबळें घेवों पाहाती ॥४६॥ मधमाशा मोठ्या सायासाने मोहोळ बांधतात; आणि आंत मध डबडबलेला असतो, तो पाहून जगाची नजर कोणत्या उपायाने ते घ्यावे म्हणून पहात असते ४६. मग झाडींखोडीं अरडींदरडीं । जेथिंच्या तेथ जगु झोडी । भरती मधाचिया कावडी । ते सेविती गोडी श्रीमंत ॥४७॥ मग झाडेंझुडें, अरडी दरडी इत्यादि न जुमानतां जागच्या जागी जग त्यांना झोडून काढते; अशा रीतीने ते मध काढणारे लोक मधाच्या कावडी भरतात; व श्रीमंत लोक त्याची गोडी घेतात ४७. माशा मधु न खाती काकुळतीं । झाडित्याचे हात माखती । स्वादु श्रीमंत सेविती । ज्यांसी लक्ष्मीपती प्रसन्न ॥४८॥ माशा बिचाऱ्या मध खात नाहीत ; बरें, जे काढतात त्यांचे हात मधाने लिडबिडतात; आणि श्रीमंत म्हणजे ज्यांना लक्ष्मीपति प्रसन्न असतो ते त्याचा स्वाद लुटतात ! ४८. तैसेंचि कृपणाचें यक्षधन । नाहीं दान धर्मसंरक्षण । त्यातें तस्कर नेती मारून । त्यांसही दंडून राजा ने ॥४९॥ त्याचप्रमाणे कृपणाची संपत्ति यक्षासारखी होय; ना दान, ना धर्मसंरक्षण, चोर मारहाण करून ती लुटून नेतात, आणि चोरांनाही शासन करून राजा घेऊन जातो ४९. जे शिणोनि संग्रह करिती । त्यांसी नव्हे भोगप्राप्ती । ते द्रव्यें अपरिग्रही सेविती । दैवगती विचित्र ॥१५०॥ जे कष्ट करून संग्रह करतात, त्यांना त्याचा उपभोग घडत नाही, त्याने तिसऱ्यांचीच धन होते. तेव्हां दैवगती विचित्र हेच खरें ! १५०. प्रयासें गृहस्थ करवी अन्न । तें संन्यासी न शिणतां जाण । करूनि जाय भोजन । अदृष्ट प्रमाण ये अर्थीं ॥५१॥ गृहस्थ मोठ्या सायासाने अन्न तयार करवितो, तेंच संन्यासी कांहीं कष्ट न करता आयतें खाऊन जातो. त्याअर्थी दैव हेच प्रमाण ठरतें ५१. यालागीं दैवाधीन जो राहे । तो संग्रहाची चाड न वाहे । तें अदृष्टचि साह्य आहे । कृपणता वायें करिताति ॥५२॥ म्हणून जो दैवाच्या आधीन होऊन रहातो, तो संग्रहाची लालसा धरीत नाही. तेथे दैवच सहाय असते, (पण) उगाच कृपणपणा करतात ५२. सुदुःखोपार्जितैर्वित्तैराशासानां गृहाशिषः । मधुहेवाग्रतो भुङ्क्ते यतिर्वै गृहमेधिनाम् ॥ १६ ॥ दुःखें उपार्जूनि वित्त । गृहसामग्री नाना पदार्थ । त्याचे पाक करवी गृहस्थ । निजभोगार्थ आवडीं ॥५३॥ यातायातीने द्रव्य संपादन करून, प्रपंचाचे साहित्य अशा नाना वस्तु जमवून गृहस्थ आपल्या भोगासाठी हौसेने त्याचे पाक तयार करवितो ५३. तेथ समयीं आला अतिथ । संन्यासी ब्रह्मचारी अन्नार्थ । गृहस्थाआधीं तो सेवित । तोंड पाहत गृहमेधी ॥५४॥ तों आयत्या वेळेस एकादा अन्नार्थी ब्रह्मचारी किंवा संन्यासी तेथें अतिथि म्हणून आला असतां तो त्या गृहस्थाच्या आधी पाक ग्रहण करून जातो. गृहस्थाश्रमी त्याच्या तोंडाकडे पहात राहतो ५४. जैसें दवडून मोहळमाशियांसी । मधुहर्ता मधु प्राशी । तैसें होय गृहस्थासी । नेती संन्यासी सिद्धपाकु ॥५५॥ ज्याप्रमाणे मोहोळावरील माशांना पिटाळून लावून मध लुटणारा मध पितो, त्याचप्रमाणे गृहस्थाची स्थिति होते. सिद्ध झालेला पाक संन्यासी खाऊन जातात ५५. समयीं पराङ्मुख झालिया यती । सकळ पुण्यें क्षया जाती । यथाकाळीं आलिया अतिथी । स्वधर्मु रक्षिती सर्वथा ॥५६॥ वेळेस संन्यासी विन्मुख गेला तर सर्व पुण्यें लयास जातात. यथाकाळी अतिथि आल्यास ते सर्वतोपरी धर्माचे रक्षण करतात ५६. अर्थ संग्रहाची बाधकता । तुज म्यां सांगितली तत्त्वतां । 'मृग' गुरु केला सर्वथा । तेही कथा परियेसी ॥५७॥ अर्थसंग्रहांत काय दोष असतो तो मी तुला तत्त्वतः सांगितका (आतां) 'मृगा'स निखालस गुरु केला, तोही वृत्तांत श्रवण कर ५७. ग्राम्यगीतं न शृणुयाद् यतिर्वनचरः क्वचित् । शिक्षेत हरिणाद् बद्धान् मृगयोर्गीतमोहितात् ॥ १७ ॥ ग्राम्यजनवार्ता । कां ग्राम्य स्त्रियांच्या गीता । ऐके जो कां तत्त्वतां । बंधन सर्वथा तो पावे ॥५८॥ ग्राम्य लोकांच्या गोष्टी किंवा ग्राम्य स्त्रियांची गाणी जो आवडीने ऐकतो, त्याला निश्चयेंकरून बंधन घडते ५८. अखंड पाहतां दीपाकडे । घंटानादें झालें वेडें । मृग पाहों विसरला पुढें । फांसीं पडे सर्वथा ॥५९॥ दिव्याकडे एकसारखें पाहात असतांना घंटानादाने मृग बिचारा वेडापिसा होऊन समोरचे पाहीनासा होतो आणि सर्वथैव फांशांत अडकतो ५९. ग्राम्य योषितांचे गीत । ऐकतां कोणाचें भुलेना चित्त । मृगाच्या ऐसा मोहित । होय निश्चित निजस्वार्था ॥१६०॥ वेश्यांचे गाणे ऐकून कोणाचें चित्त मोह पावत नाही ? (प्रत्येकजण ) मृगाप्रमाणे स्वार्थाने निखालस मोहित होऊन पडतो १६०. जो बोलिजे तापसांचा मुकुटी । ज्यासी स्त्रियांसी नाहीं भेट गोष्टी । तो ऋष्यश्रृंग उठाउठी । स्त्रीगीतासाठीं भुलला ॥६१॥ ज्याला तपस्व्यांचा मुकुटमणि म्हणतात, ज्याची व स्त्रियांची पूर्वी कधी भेट किंवा गोष्टही झाली नाही, तो ऋष्यशृंग एकदम स्त्रीगीतामुळे भुलून गेला ६१. नृत्यवादित्रगीतानि जुषन् ग्राम्याणि योषिताम् । आसां क्रीडनको वश्य ऋष्यशृङ्गो मृगीसुतः ॥ १८ ॥ मधुर वीणागुणक्वणित । ग्राम्य स्त्रियांचें गीत नृत्य । देखतां पुरुष वश्य होत । जैसें गळबंधस्थ वानर ॥६२॥ वीणेच्या तारेंतून निघालेला मधुर झणत्कार, कलावंतिणींचे गायन व नाच हे पाहून-गळ्यास दोरी बांधलेल्या माकडाप्रमाणे - पुरुष वश होतात ६२. जो तपसांमाजीं जगजेठी । जो जन्मला मृगीच्या पोटीं । जो नेणे स्त्रियांची भेटीगोठी । न पाहे दृष्टीं योषिता ॥६३॥ जो तपस्व्यांमध्ये अत्यंत श्रेष्ठ तपस्वी-हरिणीच्या पोटी जन्मास आलेला, ज्याला स्त्रियांचे दर्शन किंवा भाषण ठाऊक नव्हतें, स्त्रियांना ज्याने पाहिलेही नाही ६३, तो ऋष्यश्रृंग स्त्रीदृष्टीं । वश्य जाहला उठाउठी । धांवे योषितांचे पाठोवाठीं । त्यांचे गोष्टीमाजी वर्ते ॥६४॥ तो ऋष्यश्रृंग स्त्रीदर्शनाबरोबर त्यांना तत्काल वश झाला, तो स्त्रियांच्या मागोमाग धावला व त्यांच्या शब्दाप्रमाणे वागू लागला ! ६४. गारुड्याचें वानर जैसें । स्त्रियांसंगें नाचे तैसें । प्रमदादृष्टीं जाहला पिसें । विवेकु मानसें विसरला ॥६५॥ गारुढ्याचे माकड जसें नाचते, त्याप्रमाणे स्त्रियांसंगतीं तो नाचूं लागला; तरुणींच्या दर्शनाने वेडापिसा झाला, त्याच्या चित्तांत विवेक कसा तो राहिलाच नाही ! ६५. विसरला तपाचा खटाटोपु । विसरला विभांडक बापु । विसरला ब्रह्मचर्यकृत संकल्पु । स्त्रियानुरूपु नाचतु ॥६६॥ तपाचे सायास विसरून गेला, पिता विभांडक यासही विसरला, ब्रह्मचर्याचा संकल्पही विसरला, आणि स्त्रियांच्या अनुरोधाने नाचूं लागला ! ६६. स्त्रीबाधे एवढा बाधु । संसारी आणिक नाहीं गा सुबुद्धु । नको नको स्त्रियांचा विनोदु । दुःखसंबंधु सर्वांसी ॥६७॥ स्त्रियांच्या उपसर्गाएवढा उपसर्ग संसारांत दुसरा कोणताही नाही. छे छे ! स्त्रियांशी विनोदही कामाचा नाही. सर्वांसच स्त्रीसंग दुःखकारक आहे ६७. वारिलें नाइकावें ग्राम्य गीता । हे सत्य सत्य गा सर्वथा । तेथ हरिकीर्तन कथा । जाहल्या परमार्थतां ऐकावें ॥६८॥ ग्राम्य गाणी बिलकुल ऐकू नयेत ; अगदी वर्ज्य करावी. खरोखर गोष्ट ही आहे की, जेथें हरिकीर्तन असेल तेथील भक्तिगीत मात्र परमार्थदृष्टीने श्रवण करावें ६८. रामनामें विवर्जित । ग्रामणीं बोलिजे तें 'ग्राम्यगीत' । तें नाइकावें निश्चित । कवतुकें तेथ न वचावें ॥६९॥ रामनाम ज्यांतून वगळले आहे, अशा प्रकारच्या, ग्राम्यपुरुषांनी गायलेल्या गीतास 'ग्राम्यगीत' असे म्हणतात. ते मुळीसुद्धा ऐकू नये. कौतुकाखातरही तिकडे जाऊं नये ६९. 'मीन' गुरु करणें । तेंही अवधारा लक्षणें । रसनेचेनि लोलुप्यपणें । जीवेंप्राणे जातसे ॥१७०॥ आता, 'मासा' गुरु करावयाचा, त्याचीही लक्षणे ऐक. तो केवळ रसनेच्या लोलुपतेने आपल्या प्राणाला मुकतो ! १७०. जिह्वयातिप्रमाथिन्या जनो रसविमोहितः । मृत्युमृच्छत्यसद्बुधिर्मीनस्तु बडिशैर्यथा ॥ १९ ॥ अर्थ-संग्रहें जीवघातु । स्त्रिया-आसक्तीं अधःपातु । रसनालोलुप्यें पावे मृत्यु । विविध घातु जीवासी ॥७१॥ अर्थसंग्रहाने जीवघात, स्त्रियांच्या संगतीने अधःपात आणि रसनेच्या लोलुपतेने मृत्यु, असे जीवाला तीन प्रकारचे घात आहेत ७१. ज्यासी रसनालोलुप्यता गाढी । त्यासी अनर्थुचि जोडे जोडी । दुःखाच्या भोगवी कोडी । रसनागोडी बाधक ॥७२॥ ज्याचें जिव्हालौल्य जबरें आहे, त्याच्या वाट्याला अनर्थच येतो. (ती रसना) कोटीच्या कोटि दुःखें भोगावयास लाविते. अशी रसनेची गोडी घातक आहे ७२. रसना आमिषाची गोडी । लोलुप्यें मीनु गिळी उंडी । सवेंचि गळु टाळू फोडी । मग चरफडी अडकलिया ॥७३॥ रसनेला आमिषाची म्ह. भक्ष्याची गोडी, आणि त्या लालचीनें मासा गळाला लावलेला घांस गिळतो; तो लगेच गळ टाळू फोडतो व मग तडफडत बसतो ! ७३. पाहतां रस उत्तम दिसत । भीतरीं रोगांचे गळ गुप्त । रस आसक्तीं जे सेवित । ते चडफडित भवरोगें ॥७४॥ पहावयास गेले तर (विषयरूप) रस उत्तम दिसतो, पण आंत रोगरूप गळ गुप्त असतात. जे आसक्तिपूर्वक रसाचे सेवन करतात, ते भवरोगाने तडफडत बसतात ७४. गळीं अडकळा जो मासा । तो जिता ना मरे चरफडी जैसा । तेवीं रोगु लागल्या माणसा । दुःखदुर्दशा भोगित ॥७५॥ गळाला अडकलेला मासा असतो तो धड जिता ना मेला अशा स्थितीत तडफडत असतो, त्याचप्रमाणे रोग जडलेला माणूस हालअपेष्टा भोगीत पडतो ७५, जो रसनालोलुप्यें प्रमादी । त्यासी कैंची सुबुद्धी । जन्ममरणें निरवधी । भोगी त्रिशुद्धी रसदोषें ॥७६॥ रसनालोलुपतेचा दोष असणाराला सुबुद्धि कोठून येणार ? केवळ विषयांच्या संसर्गाने तो निश्चयेंकरून अनंत जन्ममरणे भोगीत राहतो ७६. रस सेविलियासाठीं । भोगवी जन्मांचिया कोटी । हें न घडे म्हणसी पोटीं । राया ते गोठी परियेसीं ॥७७॥ केवळ रसविषय सेवन केल्यामुळे कोटीच्या कोटि जन्म भोगावे लागतात ! असे घडणार नाही म्हणशील, तर हे राजा ! ती उपपत्ति सांगतों ऐक ७७. इंद्रियांची सजीवता । ते रसनेआधीन सर्वथा । रसनाद्वारें रस घेतां । उन्मत्तता इंद्रियां ॥७८॥ इंद्रियांचा सजीवपणा हा सर्वथैव रसनेवर अवलंबून असतो. रसनेच्या द्वाराने रस ग्रहण केला असतां इंद्रियांना उन्मत्तता येते ७८. मातली जे इंद्रियसत्ता । ते नेऊन घाली अधःपाता । रसना न जिणतां सर्वथा । भवव्यथा चुकेना ॥७९॥ इंद्रियसत्ता प्रबळ झाली म्हणजे ती अधःपाताला नेऊन घालते. रसना जिंकिली नाही तर भवव्यथा कधीही चुकावयाची नाही ७९. आहारेंवीण देह न चले । सेविल्या इंद्रियवर्गु खवळे । रसनाजयाचें मूळ कळे । तैं दुःखें सकळें मावळतीं ॥१८०॥ आहारावांचून देह चालत नाहीं; बरें तो सेवन केला तर इंदियसमुदाय बळावतो; याकरितां रसना जिंकण्याचे मूळ कळले की, सर्व दुःखें लयास जातात १८०. इन्द्रियाणि जयन्त्याशु निराहारा मनीषिणः । वर्जयित्वा तु रसनं तन्निरन्नस्य वर्धते ॥ २० ॥ आहार वर्जूनि साधक । इतर इंद्रियें जिंतिलीं देख । तंव तंव रसना वाढे अधिक । ते अजिंक्य न जिंकवे ॥८१॥ हें पहा ! साधकानें आहार वर्ज्य करून इतर इंद्रिये जिंकिली तसतशी रसना अधिकच जोरावत जाते. ती अजिंक्य -जिंकली म्हणून जात नाही ८१. इंद्रियांसी आहाराचें बळ । तीं निराहारें झालीं विकळ । तंव तंव रसना वाढे प्रबळ । रसनेचें बळ निरन्नें ॥८२॥ इंद्रियांना आहाराचेंच काय ते बळ अथवा आधार. ती इंद्रियें निराहारानें व्याकुळ होतात, तसतसे रसनेला अधिकच बळ चढत जाते. रसनेचा जोर निराहाराने वाढतो. (कमी होत नाही) ८२. तावत् जितेन्द्रियो न स्याद् विजितान्येन्द्रियः पुमान् । न जयेद्रसनं यावज्जितं सर्वं जिते रसे ॥ २१ ॥ निरन्नें इंद्रियें जिंतली । तीं जिंतलीं हे मिथ्या बोली । अन्न घेतांचि सरसावलीं । सावध जाहलीं निजकर्मी ॥८३॥ उपासाने इंद्रियें जिंकिली म्हणतात, पण 'जिंकली' हे म्हणणे खोटें होय. अन्नग्रहण केल्याबरोबर ती पुनः जोरावतात व आपापल्या कर्माच्या ठिकाणीं जागृत होतात. ८३. जंव रसना नाहीं जिंकिली । तंव 'जितेंद्रिय' मिथ्या बोली । जैं साचार रसना जिंकली । तैं वाट मोडिली विषयांची ॥८४॥ जोपर्यंत रसना जिंकिली नाही, तोपर्यंत 'जितेंद्रिय' हे म्हणणे मिथ्या होय. ज्या वेळी रसना खरोखरच जिंकली जाते, त्या वेळींच विषयांची वाट मोडते ८४. विषयाआंतील गोडपण । रसने-आंतील जाणपण । दोंहीसी ऐक्य केल्या जाण । रसना संपूर्ण जिंतिली ॥८५॥ विषयांमधील गोडपण व रसनेमधील जाणपण ह्यांचे म्ह. विषयचैतन्य व इंद्रियचैतन्य यांचे ऐक्य केलें म्हणजेच रसना जिंकली, असे समजावे ८५. सर्वां गोडियांचें गोड आहे । ते गोडीस जो लागला राहे । त्यासीचि रसना वश्य होये । रस-अपाये न बाधिती ॥८६॥ सर्व गोडींची जी गोडी असते, त्या गोडीला जो चिकटून राहतो, त्यालाच रसना वश होते. त्याला रस-अपाय बाधत नाहीत ८६. रसनाजिताचें वाधावणें । तेणें ब्रह्मसायुज्यीं पडे ठाणें । सोहळा परमानंदे भोगणें । रसना जेणें जिंतिली ॥८७॥ रसनाजिताचे 'वाधावणे ' म्ह. जयघोषाची मिरवणूक ब्रह्मसायुज्याच्या ठिकाणी ठाण देऊन राहाते. ज्यानें रसना जिंकली, तोच परमानंदाचा सोहळा भोगूं शकतो. ८७. पिङ्गला नाम वेश्याऽऽसीद् विदेहनगरे पुरा । तस्या मे शिक्षितं किञ्चिन्निबोध नृपनन्दन ॥ २२ ॥ अवधूत म्हणे नृपनंदना । 'वेश्या' गुरु म्यां केली जाणा । तिच्या शिकलों ज्या लक्षणां । विचक्षणा अवधारीं ॥८८॥ अवधूत म्हणतात-हे राजा ! हे पहा, मी एक वेश्या गुरु केली. हे चतुरा ! तिच्यापासून मी ज्या गोष्टी शिकलों, त्या ऐकून घे ८८. पूर्वी विदेहाचे नगरीं । 'पिंगला' नामें वेश्या वासु करी । तिसी आस निरासेंवरी । वैराग्य भारी उपजलें ॥८९॥ पूर्वी जनकराजाचे नगरीत 'पिंगला' नावाची एक वेश्या राहात होती. तिची आशानिराशा झाल्यानंतर तिला तीव्र वैराग्य उत्पन्न झाले ८९. सा स्वैरिण्येकदा कान्तं सङ्केत उपनेष्यती । अभूत् काले बहिर्द्वारि बिभ्रती रूपमुत्तमम् ॥ २३ ॥ ते स्वैरिणी स्वेच्छाचारी । सायंकाळीं उभी द्वारीं । नाना अळंकार-अंबरीं । श्रृंगारकुसरी शोभत ॥१९०॥ ती स्वैरिणी म्ह. स्वच्छंदा वागणारी असे. सायंकाळी दारांत उभी राहून नानाप्रकारचे अलंकार वस्त्रें लेऊन शृंगाराभिनयांनी शोभत होती १९०. आधींच रूप उत्तम । वरी श्रृंगारिली मनोरम । करावया ग्राम्यधर्म । पुरुष उत्तम पहातसे ॥९१॥ आधींच रूप उत्तम, त्यांत मनोरम श्रृंगार केलेला ! अशी ती विलासासाठी उत्तम पुरुषाची वाट पाहात उभी राहिली ९१. मार्ग आगच्छतो वीक्ष्य पुरुषान् पुरुषर्षभ । तान् शुल्कदान्वित्तवतः कान्तान् मेनेऽर्थकामुकी ॥ २४ ॥ सगुण सुरूप धनवंत । कामकौशल्यें पुरवी आर्त । अर्थ देऊनि करी समर्थ । ऐसा कांत पहातसे ॥९२॥ गुणवान्, रूपवान् व धनवान् असून कामशास्त्रांतील नैपुण्याने आपले आर्त पुरविणारा, आणि धन देऊन सधन करील, असा पुरुष ती पाहात होती ९२. ऐक गा पुरुषश्रेष्ठा । पुरुष येतां येतां देखे वाटा । त्यासी खुणावी नेत्रवेंकटा । कामचेष्टा दावूनि ॥९३॥ पुरुषश्रेष्ठा, ऐक. रस्त्याने पुरुष येतांना पाहिला की पुरे, त्याला ती आपल्या नेत्रकटाक्षाने शृंगाराभिनय प्रकट करून खुणावीत असे ९३. आगतेष्वपयातेषु सा सङ्केतोपजीविनी । अप्यन्यो वित्तवान् कोऽपि मामुपैष्यति भूरिदः ॥ २५ ॥ येत्या पुरुषास हाणी खडा । एकासी म्हणे घ्या जी विडा । डोळा घाली जात्याकडा । एकापुढां भंवरी दे ॥९४॥ येणाऱ्या पुरुषावर खडा मारावयाचा ; कोणास 'महाराज ! विडा घेऊन जा' असे म्हणावयाचे रस्त्यावरून जाणाऱ्याकडे डोळा मोडावयाचा; कोणापुढे मुरका मारावयाचा ९५; ठेवूनि संकेतीं जीवित । ऐसे नाना संकेत दावित । पुरुष तिकडे न पाहात । येत जात कार्यार्थी ॥९५॥ मनांत धरलेल्या योजनेंत जीवभाव ठेवून वरील प्रकारचे नाना संकेत ती दाखवीत असे. परंतु येणारे जाणारे कार्यार्थी लोक तिकडे पाहात नसत ९५. गेल्या पुरुषातें निंदित । द्रव्यहीन हे अशक्त । रूपें विरूप अत्यंत । उपेक्षित धिक्कारें ॥९६॥ निघून गेलेल्या पुरुषांची 'हे दरिद्री, दुर्बळ !' म्हणून हेटाळणी करी; 'रूप काय हिडिस !' म्हणून त्यांचा धिक्कार करी ९६. आतां येईल वित्तवंत । अर्थदानीं अतिसमर्थ । माझा धरोनियां हात । कामआर्त पुरवील ॥९७॥ आतां कोणी तरी द्रव्य देणारा भला खंबीर पैसेवाला येईल; तो माझा अंगीकार करून माझी इच्छा पूर्ण करील, असें ती मनांत चिंतू लागली ९७. एवं दुराशया ध्वस्त निद्रा द्वार्यवलम्बती । निर्गच्छन्ती प्रविशती निशीथं समपद्यत ॥ २६ ॥ ऐसें दुराशा भरलें चित्त । निद्रा न लगे उद्वेगित । द्वार धरोनि तिष्ठत । काम वांछित पुरुषांसीं ॥९८॥ अशा प्रकारें अंतःकरण दुराशेने भरून गेलेलें ; उद्वेगामुळे झोपसुद्धा नाहीं; दार धरून उभी राहिलेली; पुरुषभोग मिळावा म्हणून इच्छा धरून असलेली ९८, रिघों जाय घराभीतरीं । सांचल ऐकोनि रिघे बाहेरी । रिघतां निघतां येरझारी । मध्यरात्री पैं झाली ॥९९॥ घरांत जावें, तो थोडी चाहूलशी वाटून बाहेर यावें; आंत जा, बाहेर ये, असे हेलपाटे करता करता मध्यरात्र झाली ! ९९. सरली पुरुषाची वेळ । रात्र झाली जी प्रबळ । निद्रा व्यापिले लोक सकळ । पिंगला विव्हळ ते काळीं ॥२००॥ पुरुष येण्याची वेळ टळली; रात्रीचा भर लोटला. सर्व लोक निद्रेंत अगदी डाराडूर ! त्या वेळी पिंगला विव्हळ होऊन राहिली होती २००. तस्या वित्ताशया शुष्यद् वक्त्राया दीनचेतसः । निर्वेदः परमो जज्ञे चिन्ताहेतुः सुखावहः ॥ २७ ॥ तुटला आशेचा जिव्हाळा । सुकले वोंठ वाळला गळा । कळा उतरली मुखकमळा । खेदु आगळा चिंतेचा ॥१॥ आशेचा ओलावा तुटला; ओंठ सुकून गेले; घसा कोरडा पडला; व मुखकमल म्लान झालें ! जबरदस्त चिंता लागली. २०१. वित्त न येचि हाता । तेणें ते झाली दीनचित्ता । वैराग्यें परम वाटली चिंता । सुखस्वार्था ते हेतु ॥२॥ हाती द्रव्य पडलें नाहीं; त्यामुळे अंतरांत अगदी दीन होऊन गेली. वैराग्याने परम चिंता वाटू लागली व तीच तिच्या सुखस्वार्थाला कारण झाली २. तस्या निर्विण्णचित्ताया गीतं श्रृणु यथा मम । निर्वेद आशापाशानां पुरुषस्य यथा ह्यसिः ॥ २८ ॥ @न ह्यङ्गाजातनिर्वेदो देहबन्धं जिहासति । यथा विज्ञानरहितो मनुजो ममतां नृप ॥ २९ ॥ कैसें वैराग्य उपजलें तिसी । जे चिंतीत होती विषयासी । त्या विटली विषयसुखासी । छेदक आशेसी वैराग्य ॥३॥ तिला वैराग्य कसे झाले पाहा. जी विषयाचे चिंतन करीत होती, ती त्या विषयसुखाला विटून गेली ! सारांश, वैराग्य हेच आशेला छेदणारे आहे ३. तेणें वैराग्यें विवेकयुक्त । पिंगलेनें गाइलें गीत । तें आइक राया समस्त । चित्तीं सुचित्त होऊनि ॥४॥ त्या वैराग्याने विवेकयुक्त होऊन पिंगलेने गीत गाइलें. हे राजा ! तें सर्व सांगतों, सावधान चित्त करून श्रवण कर ४. ऐक राया विवेकनिधी । वैराग्य नाहीं ज्याचे बुद्धीं । त्यासी जन्ममरणाची आधिव्याधी । प्रतिपदीं बाधकु ॥५॥ हे राजा ! विवेकसागरा ! ज्याच्या बुद्धींत वैराग्य नाही, त्याला जन्ममरणाची आधिव्याधि पावलोपावलीं बाधक होते ५. अनुतापु नाहीं ज्यासी । विवेक नुपजे मानसीं । तो संसाराची आंदणी दासी । आशापाशीं बांधिजे ॥६॥ ज्याला अनुताप नाही, ज्याच्या अंत:करणांत विवेक उत्पन्न होत नाही, तो संसाराची आंदण दिलेली दासी होय. आशारूप दोरीनें तो बांधला जातो ६. त्यासी मोहममतेची गाढी । घालिजे देहबुद्धीची बेडी । अहोरात्र विषय भरडी । अर्ध घडी न राहे ॥७॥ त्याला मोहममतेने आवळलेली देहबुद्धीची बेडी घातलेली असते. तो रात्रंदिवस विषयाचे दळण दळीत असतो. अर्ध घटकेचाही खळ नाही ७. जराजर्जरित वाकळे । माजीं पडले अखंड लोळे । फुटले विवेकाचे डोळे । मार्गु न कळे विध्युक्त ॥८॥ जरेनें जर्जर झालेल्या गोधडीमध्ये अखंड लोळत पडलेला असतो. त्याच्या विवेकाचे डोळे फुटलेले असतात. त्याला विध्युक्त मार्ग दिसत नाही ८. त्यासी अव्हासव्हा जातां । अंधकूपीं पडे दुश्चिता । तेथूनि निघावया मागुता । उपावो सर्वथा नेणती ॥९॥ असे लोक वेडेवांकडे भटकूं लागून चित्त चळून घोर काळोख्या विहिरींत पडतात; तेथून वर निघावयाला त्यांना बिलकूल मार्ग सापडत नाही ९. तेथ काया-मनें-वाचें । निघणें नाहीं जी साचें । तंव फणकाविला लोभविंचें । चढणें त्याचें अनिवार ॥२१०॥ खरोखर कायावाचामनेंकरून तेथून बाहेर निघण्याचीच इच्छा होत नाही. तितक्यांत लोभरूप विंचू नांगी मारतो. तो फणकारा अनिवार चढतो २१०. तेथ निंदेचिया तिडका । आंत बाहेर निघती देखा । वित्तहानीचा थोर भडका । जळजळ देखा द्वेषाची ॥११॥ मग आंतून बाहेरून निंदारूप कळा मारू लागतात. द्रव्यनाशाचा आगडोंबाळा व द्वेषाची फुणफुण सुरू होते ११. अभिमानाचे आळेपिळे । मोहउमासे येती बळें । तरी विषयदळणें आगळें । दुःखें लोळे गेहसेजे ॥१२॥ अभिमानाचे आळोकेपिळोके देऊं लागतो व मोहाचे उमासे जोराने येऊं लागतात. तरीही हा विषयाचे दळण जोराने दळीत गृहरूपी शेजेवर दुःखाने लोळत असतो १२. ऐशीं अवैराग्यें बापुडीं । पडलीं देहाचे बांदवडीं । भोगितां दुःखकोडी । सबुडबुडीं बुडालीं ॥१३॥ अशा प्रकारें बिचारे अवैराग्यामुळे देहाच्या कैदखान्यांत सांपडून कोट्यवधि दुःखें भोगून रसातळास जातात ! १३. पहा पां नीच सर्व वर्णांसी । निंद्य कर्में निंदिती कैशीं । वैराग्य उपजलें वेश्येसी । देहबंधासी छेदिलें ॥१४॥ पाहा. सर्व वर्णामध्ये नीच व अति निंद्य कर्में करणारी, अशा त्या वेश्येच्या पोटी वैराग्य उत्पन्न झाले व त्याने देहबंधन छेदून टाकिलें ! १४. देहबंध छेदी त्या उक्ती । वेश्या बोलिली नाना युक्ती । झाली पिंगलेसी विरक्ती । चक्रवर्ती परीस पां ॥१५॥ जेणेकरून देहबंधन तुटेल, अशींच भाषणे ती वेश्या बोलली. हे चक्रवर्ती राजा ! त्या पिंगलेला विरक्ति कशी बाणली तें ऐक १५. पिङ्गलोवाच - अहो मे मोहविततिं पश्यताविजितात्मनः । या कान्तादसतः कामं कामये येन बालिशा ॥ ३० ॥ मिथ्या मोहाचा विस्तार । म्यां वाढविला साचार । माझ्या मूर्खपणाचा पार । पाहतां विचार पांगुळे ॥१६॥ पिंगला म्हणाली-खरोखरी लटकाच मायेचा विस्तार मी वादविला होता. माझ्या मूर्खपणाचा अंतपार पाहावयाला गेलें असतां विचारच कुंठित होतो १६. नाहीं अंतःकरणासी नेम । अपार वाढविला भ्रम । असंतपुरुषांचा काम । मनोरम मानितां ॥१७॥ माझ्या मनाला काही धरबंधच नव्हता. नीच पुरुषाशीं रममाण होऊन आनंद मानण्यांत मी भ्रमाचा कळस करून सोडला १७. जरी स्त्रीसी पुरुष पाहिजे । तरी जवळील पुरुष न लाहिजे । हेंचि मूर्खपण माझें । सदा भुंजे असंतां ॥१८॥ स्त्रीला जर पुरुष पाहिजे तर जवळचा (अंतरांतला) पुरुष टाकावयाचा आणि निरंतर नीच पुरुषाशी रत व्हावयाचे, हाच आधीं माझा मूर्खपणा ! १८. सन्तं समीपे रमणं रतिप्रदं वित्तप्रदं नित्यमिमं विहाय । अकामदं दुःखभयाधिशोक मोहप्रदं तुच्छमहं भजेऽज्ञा ॥ ३१ ॥ संतपुरुषाची प्राप्ती । जवळी असतां नेणें आसक्ती । ज्यासी केलिया रती । कामनिवृत्ती तत्काळ ॥१९॥ संत म्ह. शाश्वत पुरुषाचा लाभ अगदी जवळ असतांना, विषयासक्तीमुळे तो मला कळला नाही. त्याच्याशी रत झाले असतां तत्काळ कामनिवृत्ति होते १९. काम निवर्तवूनि देख । अनिवार पुरवी नित्यसुख । चित्तदाता तोचि एक । अलोलिक पैं देणें ॥२२०॥ कामाची निवृत्ति करून अपार शाश्वत सुख जोडून देतो, तोच वित्तदाताही होय. त्याचे देणें अलौकिक असते ! २०. सकळ ऐश्वर्य निजपदेंसीं । संतोषोनि दे रतीसी । रमवूं जाणे नरनारींसीं । रमणु सर्वांसी तो एकु ॥२१॥ निजात्मपदासह संपूर्ण ऐश्वर्य - प्रेमरतीने संतोष पावून तो बहाल करतो; आणि पुरुष व स्त्रिया ह्या दोघांनाही तो रमवूं जाणतो ! तोच एक सर्वांचा रमण म्हणजे पति होय २१. सांडोनि ऐशिया कांतासी । माझी मूढता पहा कैशी । नित्य अकामदा पुरुषासी । कामप्राप्तीसी भजिन्नलें ॥२२॥ असा कांत टाकून मी केवढी मूर्ख पाहा, की निरंतर कामप्राप्तीसाठी ज्याच्यापासून काम पूर्ण व्हावयाचा नाही अशा पुरुषास भजत होते ! २२. आपुला पूर्ण न करवे काम । ते मज केवीं करिती निष्काम । त्यांचेनि संगें मोहभ्रम । दुःख परम पावलें ॥२३॥ ज्यांना आपला काम पूर्ण करता येत नाही, ते मला काय निष्काम करणार ? तशांच्या संगतीने मी मिथ्या मोह व अत्यंत दुःख मात्र पावलें ! २३. त्यांचेनि सुख नेदवेच मातें । परी झाले दुःखाचेचि दाते । भय-शोक-आधि-व्याधींतें । त्यांचेनि सांगातें पावलें ॥२४॥ त्यांच्याने मला सुख देववत नव्हतेंच; पण उलट मला दुःख देणारेच ते झाले. त्यांच्या संगतीने मी भय, शोक व आधिव्याधि मात्र पावलें ! २४. अहो मयाऽऽत्मा परितापितो वृथा साङ्केत्यवृत्त्यातिविगर्ह्यवार्तया । स्त्रैणान्नराद् यार्थतृषोऽनुशोच्यात् क्रीतेन वित्तं रतिमात्मनेच्छती ॥ ३२ ॥ जारपुरुषापासोनि सुख । इच्छितें ते मी केवळ मूर्ख । वृथा परितापु केला देख । मज असुख म्यां दीधलें ॥२५॥ जार पुरुषापासून मी जी सुखाची इच्छा करीत होत्ये, ती मी केवळ मूर्ख म्हणूनच ! व्यर्थ संताप मात्र करून घेतला. मीच मला दुःख करून घेतलें २५. स्त्रैण पुरुष ते नराधम । वेश्यागामी त्याहूनि अधम । त्यांत कृपणु तो अधमाधम । तयांचा संगम मी वांच्छीं ॥२६॥ स्त्रीच्या अधीन असणारे पुरुष नराधम होत; वेश्यागामी पुरुष तर त्याहूनही अधम; त्यांतही जो कृपण, तो तर अधमाहूनही अधम होय ! अशांचा संग मी इच्छीत होते ! २६. जितुक्या अतिनिंदका वृत्ती । मज आतळतां त्या भीती । योनिद्वारें जीविकास्थिती । नीच याती व्यभिचारु ॥२७॥ अति निंद्य वृत्ति म्हणून जितक्या आहेत त्या मला स्पर्श करावयाला भीत असतील ! (हरहर !) भोगेंद्रियावर उदरनिर्वाह ! व्यभिचारव्यवसायाची जात नीच खरी २७. अल्प द्रव्य जेणें देणें । त्याची जाती कोण हें नाहीं पाहणें । याहोनि काय लाजिरवाणें । निंदित जिणें पैं माझें ॥२८॥ कारण थोडेसें धन जो देतो, त्याची जात कोण हे सुद्धा पाहावयाचे नाही ! याहून लाजीरवाणी स्थिति ती कोणती ? धिक्कार असो माझ्या जिण्याला ! २८. जया पुरुषासी देह विकणें । तें अत्यंत हीनदीनपणें । काय सांगों त्याची लक्षणें । सर्वगुणें अपूर्ण ॥२९॥ ज्या पुरुषाला देह विकावयाचा तोही अत्यंत हीन दीनपणाने ! त्या पुरुषाची लक्षणे काय सांगावी ? सर्वच गुणांनी अपूर्ण ! २९. वित्त नेदवे कृपणता । काम न पुरवे पुरता । प्रीति न करवे तत्त्वतां । भेटी मागुती तो नेदी ॥२३०॥ कंजुषपणामुळे पैसा देववत नाही, कामही पूर्ण करवत नाहीं; प्रीति म्हणावी तर तिचेही नांव नाही. इतकेच नव्हे तर तो फिरून तोंडही दाखवीत नाही ! ३०. ऐशियापासाव सुख । वांछितां वाढे परम दुःख । जळो त्याचें न पाहें मुख । वोकारी देख येतसे ॥३१॥ अशा लोकांपासून सुख इच्छिलें असतां अत्यंत दुःख मात्र वाढत असतें ! आग लागो त्याला ! त्याचे तोंडसुद्धा पाहूं नये. अगदी ओकारी येते हो ! ३१. एवं जारपुरुषाची स्थिती । आठवितां चिळसी येती । पुरे पुरे ते संगती । चित्तवृत्ति वीटली ॥३२॥ तात्पर्य, ती जारपुरुषाची स्थिति आठवली म्हणजे मनाला चिळसच येते. पुरे पुरे ती संगत ! मन अगदी विटून गेले ३२. यदस्थिभिर्निर्मितवंशवंश्य स्थूणं त्वचा रोमनखैः पिनद्धम् । क्षरन्नवद्वारमगारमेतद् विण्मूत्रपूर्णं मदुपैति कान्या ॥ ३३ ॥ नरशरीर गृह सांकडें । आढीं पाखाड्या नुसधीं हाडें । अस्थींच्या मेढी दोंहीकडे । वोलेनि कातडें मढियेलें ॥३३॥ हें मनुष्यदेहरूप घर मोठे किचाट ! येथल्या आढेंपाखाड्या म्हणजे निव्वळ हाडें; दोंहीकडे हाडांच्या मेढी; आणि ओल्या कातड्याने मढविलेलें ! ३३. त्यासी सर्वांगीं सगळे । दिधले रोमावळिचे खिळे । घालूनि नखाचे खोबळे । अग्रीं आंगवळे बूजिले ॥३४॥ त्याला सर्वांगास दरोबस्त केशसमुदायाचे खिळे मारले आहेत. अग्रांच्या ठिकाणी नखांच्या गुडद्या घालून फटी खुजवून टाकिल्या आहेत ! ३४. अस्थि-मांस-चर्मबांधा । सर्वांगीं आवळूनि दिधला सांदा । रंगीत चर्मरसना स्वादा । पुढिले बांधा बांधिली ॥३५॥ हाडे, मांस, कातडे यांची चौकट गच्च करून तिला सांधे बसविले आहेत आणि स्वादासाठी लाल चामड्याची जीभ पुढेंच तयार करून ठेविली आहे ३५, वायुप्रसरणपरिचारें । केलीं प्राणापानरंध्रें । वरिले डळमळीत शिखरें । बालांकुरें लाविलीं ॥३६॥ वायु आंत जाण्यायेण्यासाठी प्राण, अपान यांची झरोकीं तयार केली असून वरच्या हालत्याडोलत्या शिखरावर केशरूप रोपें लावून ठेविली आहेत ३६. बुजूनि भीतरील सवडी । बांधाटिलें नवनाडीं । विष्ठामूत्रांची गाढी । नित्य परवडी सांठवण ॥३७॥ आंतील अवकाश बुजवून नऊ नाड्यांनी बांधून काढिले आहे ह्याच्यांत मलमूत्राचा नित्यनवा साठांच होत असतो ! ३७. भीतरिले अवकाशीं । दुर्गंधि ऊठली कैशी । तेचि प्रवाह अहर्निशीं । नवद्वारांसी वाहताति ॥३८॥ आंतल्या पोकळीत कोण दुर्गंधि माजलेली ! नवद्वारांनी अहोरात्र त्याचेच पाट चाललेले असतात ३८. अखंड पर्हावे वाहती मळें । देखोनि ज्याचें तो कांटाळे । अहर्निशीं धुतां जळें । कदा निर्मळे ते नव्हती ॥३९॥ मोर्या एकसारख्या घाणीने वहाताहेत, हे पाहून ज्याचा तोच कंटाळतो. त्या रात्रंदिवस जरी पाण्याने धुतल्या तरी स्वच्छ म्हणून कधी होतच नाहीत ! ३९. सांगतांचि हे गोष्टी । ओकारी येतसे पोटीं । ऐशियास मी भुलल्यें करंटी । विवेक दृष्टीं न पाहें ॥२४०॥ हा प्रकार सांगितला म्हणजेच पोटांतून उमसून येते ! आणि मी फुटक्या नशिबाची अशाला भुलून पडत होत्ये ! विवेक म्हणून कसला तो करीतच नव्हत्ये २४०. अस्थिमांसाचा कोथळा । विष्ठामूत्राचा गोळा । म्यां आलिंगिला वेळोवेळां । जळो कंटाळा न येचि ॥४१॥ असा हा हाडामांसांचा कोथळा व विष्ठामूत्राचा गोळाच मी वेळोवेळां आलिंगीत होत्ये. आग लागो त्याला ! कंटाळा कसा तो येतच नसे. २४१ विदेहानां पुरे ह्यस्मिन्नहमेकैव मूढधीः । यान्यमिच्छन्त्यसत्यस्माद् आत्मदात् काममच्युतात् ॥ ३४ ॥ ये विदेहाचे नगरीं । मूर्ख मीचि एक देहधारी । हृदयस्थ सांडूनि श्रीहरी । असंतां नरीं व्यभिचारु ॥४२॥ या जनकराजाच्या नगरांत मीच एक मूर्ख जन्मास आल्यें ! हृदयस्थ श्रीहरीला सोडून नीच पुरुषाशी व्यभिचार केला ! ४२. असंत पुरुष नेणों किती । म्यां भोगिले अहोरातीं । सुख न पवेंची निश्चितीं । रति भगवंतीं जंव नाहीं ॥४३॥ मी असे नीच पुरुष रात्रंदिवस किती भोगले असतील कोण जाणे ! जोपर्यंत भगवंताचे ठिकाणी प्रेम उत्पन्न झाले नाहीं, तोपर्यंत खरोखरीचें सुख मिळणारच नाही ! ४३. जो निकटवर्ती हृदयस्थु । पुरुषीं पुरुषोत्तम अच्युतु । वीर्यच्युतीवीण रमवितु । संतोषें देतु निजात्मना ॥४४॥ जो अगदी निकटवर्ती हृदयस्थ, पुरुषांमध्ये पुरुषोत्तम व अच्युत, वीर्यच्युति न करितां रमविणारा, आणि संतोषाने निजात्मपद देणारा ४४; अच्युतें ज्यासि निजसुख दिधलें । ते सुख च्यवेना कांहीं केलें । ऐशिया हृदयस्था विसरलें । आणिक भुललें अकामदा ॥४५॥ त्या अच्युताने ज्याला निजसुख दिलें, त्वाच्या त्या सुखाला कांही केल्या च्युति नाही. अशा हृदयस्थाला (नारायणाला) विसरल्ये, आणि ज्यांच्या हातून कामप्राप्ति व्हावयाची नाही, अशा इतर पुरुषांना मात्र मी भाळल्यें ! ४५. अकामद ते नाशवंत । त्यांसी संग केलिया दुःखचि देत । कैसें माझें मूर्ख चित्त । त्यासी आसक्त पैं होतें ॥४६॥ अकामद पुरुष नाशवंत होत. त्यांची संगति केल्यास ते दुःखच देणार ! पण माझे मन पाहा ! किती मूर्ख ! ते त्यांवर आसक्त होतें ! ४६. त्या आसक्तीची झाली तडातोडी । लागली अच्युतसुखाची गोडी । ज्याचें सुख भोगितां चढोवढी । घडियाघडी वाढतें ॥४७॥ आतां त्या आसक्तीची ताटातूट झाली; आणि अच्युत सुखाची, अक्षय्य हरिसुखाची गोडी लागली. ज्याचें सुख भोगूं लागलें असतां क्षणोक्षणीं तें वृद्धिच पावतें ४७. सुहृत् प्रेष्ठतमो नाथ आत्मा चायं शरीरिणाम् । तं विक्रीयात्मनैवाहं रमेऽनेन यथा रमा ॥ ३५ ॥ जो सोयरा माझा हृदयस्थु । सुख प्रीति प्रिय अच्युतु । तोचि अंतरात्मा सर्वगतु । नाथ कांतु तो माझा ॥४८॥ जो माझ्या हृदयांतला आप्त, जो (माझे) सुख, जो (माझी) प्रीति, (माझा ) प्रियकर अच्युत तोच सर्वत्र भरून राहिलेला माझा अंतरात्मा होय. तोच माझा स्वामी, व तोच माझा पति होय ४८. त्यासीच आपुले संवसाटी । विकत घेईन उठाउठी । परमानंदें देईन मिठी । गोठी चावटी सांडोनी ॥४९॥ त्यालाच मी आपलें साटेंलोटें करून ताबडतोब विकत घेईन, आणि इतर चावटपणाच्या गोष्टी टाकून मी त्यालाच परमानंदाने मिठी मारीन ४९. रमा झाली पायांची दासी । मी भोगीन अनारिसी । सर्वकाळ सर्वदेशीं । सर्वरूपेसीं सर्वस्वें ॥२५०॥ लक्ष्मी पायांची दासी झालेली आहे. पण मी त्याला-सर्वकाळी, सर्वदेशीं, सर्वरूपीं, अशा प्रकारे सर्वस्वेकरून स्वतंत्रपणेच भोगीन २५०. कियत् प्रियं ते व्यभजन् कामा ये कामदा नराः । आद्यन्तवन्तो भार्याया देवा वा कालविद्रुताः ॥ ३६ ॥ सांडूनि हृदयस्था अच्युतातें । वरावें वरां निर्दैवांतें । तंव तो द्वैतभये भयचकिते । काळग्रस्ते सर्वदा ॥५१॥ हृदयस्थ अच्युताला टाकून इतर कपाळकरंट्यांना पति करावें, इतर ते सर्व द्वैताच्या भयाने भिऊन गेलेले, सदोदित काळग्रस्त असे आहेत ५१. जे निजभयें सर्वदा दुःखी । ते भार्येसी काय करिती सुखी । अवघीं पडलीं काळमुखीं । न दिसे ये लोकीं सुखदाता ॥५२॥ जे सदानकदा आपभयाने कष्टी झालेले, ते स्त्रीला काय कपाळाचे सुख देणार ? सारीच काळाच्या जबड्यांत सांपडलेली ! ह्या लोकांत सुख देणारा कोणीच दिसत नाही ५२. असो नराची ऐशी गती । वरूं अमरांमाजीं अमरपती । विळांत ते चौदा निमती । पदच्युति अमरेंद्रा ॥५३॥ असो. ही झाली मनुष्यांची स्थिति ; आतां देवांमधील देवाधिदेव इंद्राला वरावें, तर एका कल्पांत ते चौदा होऊन जातात. अर्थात् देवश्रेष्ठ इंद्राला पदभ्रष्ट व्हावें लागते ५३. एवं सुर नर लोक लोकीं । आत्ममरणें सदा दुःखी । ते केवीं भार्येसी करिती सुखी । भजावें मूर्खीं ते ठायीं ॥५४॥ अशा प्रकारे लोकांत देव काय, मनुष्य काय, आपमरणानेंच सदोदित कष्टी झालेले असतात, ते आपल्या स्त्रीला काय सुखी करणार ? त्या ठिकाणी मूर्खानींच रममाण व्हावें ! ५५. धन्य माझी भाग्यप्राप्ती । येचि क्षणीं येचि रातीं । झाली विवेकवैराग्यप्राप्ती । रमापति तुष्टला ॥५५॥ धन्य माझें भाग्य, की याच रात्रीं हाच क्षणीं मला विवेक व वैराग्य यांची प्राप्ति झाली; माझ्यावर लक्ष्मीपति संतुष्ट झाला ! ५५. नूनं मे भगवान् प्रीतो विष्णुः केनापि कर्मणा । निर्वेदोऽयं दुराशाया यन्मे जातः सुखावहः ॥ ३७ ॥ ये जन्मींचें माझें कर्म । पाहतां केवळ निंद्य धर्म । मज तुष्टला पुरुषोत्तम । पूर्वजन्मसामग्रीं ॥५६॥ ह्या जन्मांतले माझे कर्म पाहिलें तर ते केवळ निंद्य स्वरूपाचे आहे. पूर्वजन्मींचा काही ठेवा होता, म्हणूनच मजवर पुरुषोत्तम प्रसन्न झाला ५६. मज कैंचे पूर्वजन्मीं साधन । ज्याचें नाम 'पतितपावन' । कृपाळु जो जनार्दन । त्याचे कृपेन हें घडलें ॥५७॥ पण पूर्वजन्मीं तरी माझ्या हातून काय घडले असेल ? तर 'पतितपावन ' हे ज्यांचे नांव, असा जो कृपाळू जनार्दन त्याच्या कृपेनेंच हे घडून आले आहे ५७. दुष्ट दुराशा व्यभिचारु । भगद्वारा चालवीं संसारु । तिसी मज वैराग्ययुक्त विचारु । विष्णु साचारु तुष्टला ॥५८॥ नीच, दुर्वासनायुक्त, व्यभिचारी, देह विकून संसार चालविणारी, अशा मला वैराग्यपूर्ण विचार ! म्हणजे खरोखरीच भगवान् विष्णु प्रसन्न झाला असे म्हटले पाहिजे ५८. जरी असतें पूर्वसाधन । तरी निंद्य नव्हतें मी आपण । योनिद्वारा कर्माचरण । पतित पूर्ण मी एकी ॥५९॥ जर कांहीं पूर्वजन्मींचें सुकृत असतें, तर मी नीच जन्माला आले नसतें. योनिद्वारे कर्माचरण करणारी मी केवळ पूर्णपातकी आहे ५९. यापरी मी पूर्ण पतित । पतितपावन जगन्नाथ । तेणें कृपा करून येथ । केलें विवेकयुक्त वैरागी ॥२६०॥ याप्रमाणे मी पूर्ण 'पतित' आणि तो जगन्नाथ 'पतितपावन,' त्यानेंच येथे कृपा करून मला विवेकयुक्त वैरागी केलें २६०. तेणें वैराग्यविचारें देख । दुष्ट दुराशेचें फिटलें दुःख । मज झालें परम सुख । निजसंतोख पावलें ॥६१॥ त्या वैराग्यविचारानेंच माझें दुष्ट दुर्वासनेचे दुःख लयास गेलें ! आणि मला परमसुख होऊन स्वात्मसुखाचा लाभ झाला ! ६१. दुःख आदळतां अंगासी । वैराग्य नुपजे अभाग्यासी । भगवंतें कृपा केली कैशी । दुःखें निजसुखासी दीधलें ॥६२॥ दुःख अंगावर येऊन कोसळलें असतां ज्यांना वैराग्य उत्पन्न होत नाहीं, ते अभागी होत. परंतु भगवंताची केवढी कृपा ! त्याने दुःखाच्या द्वाराने निजसुखच मला जोडून दिले ! ६२. मैवं स्युर्मन्दभाग्यायाः क्लेशा निर्वेदहेतवः । येनानुबन्धं निर्हृत्य पुरुषः शममृच्छति ॥ ३८ ॥ अंगीं आदळतां दुःखद्वंद्व । अभाग्यासी ये सबळ क्रोध । थिता विवेक होय अंध । भाग्यमंद ते जाणा ॥६३॥ दुःखरूप द्वंद्व अंगाशी येऊन भिडले कीं, अभाग्याला फारच क्रोध चढतो ! ज्यांच्या अंगचा विवेक आंधळा होतो, ते मंदभाग्य समजावे ६३. दुःख देखतांचि दृष्टी । ज्यासी वैराग्य विवेकेंसी उठी । तेणें छेदूनि स्नेहहृदयगांठी । पावे उठाउठी निजसुख ॥६४॥ दुःख दृष्टीस पडतांच ज्याला विवेकयुक्त वैराग्य प्राप्त होते, तो हृदयांतील मोहममतेची गांठ तोडून तत्काळ आत्मसुख पावतो ६४. पुरुषांसी परमनिधान । विवेकयुक्त वैराग्य जाण । तेणें होऊनियां प्रसन्न । समाधान पावती ॥६५॥ 'विवेकयुक्त वैराग्य' हेंच पुरुषाचें परम निधान आहे असे समज. त्याच्या योगानें ते सुखी होऊन परम समाधान पावतात ६५. मी पूर्वी परम अभाग्य । महापुरुषांचे जें निजभाग्य । तें भगवंतें दिधलें वैराग्य । झालें श्लाघ्य तिहीं लोकीं ॥६६॥ मी पूर्वी अत्यंत अभागी होते. परंतु भगवंताने महापुरुषाचे निजभाग्य जें वैराग्य, ते मला जोडून दिले, आणि मी त्रैलोक्यांत धन्य झाले ! ६६. तेनोपकृतमादाय शिरसा ग्राम्यसङ्गताः । त्यक्त्वा दुराशाः शरणं व्रजामि तमधीश्वरम् ॥ ३९ ॥ कृपा करोनि भगवंते । निजवैराग्य दिधलें मातें । तेणें सांडविलें दुराशेतें । ग्राम्य विषयातें छेदिलें ॥६७॥ भगवंतानें कृपा करून मला निजवैराग्य प्राप्त करून दिले, आणि त्याच्या योगाने दुर्वासना नाहीशी केली व ग्राम्य विषय छेदून टाकिले ६७. तो उपकार मानूनियां माथां । त्यासी मी शरण जाईन आतां । जो सर्वाधीश नियंता । त्या कृष्णनाथा मी शरण ॥६८॥ ते उपकार शिरावर धारण करून त्याला मी आतां शरण जात आहे; जो सर्वाधीश व सर्वनियंता त्या श्रीकृष्णनाथाला मी शरण आहे ६८. सन्तुष्टा श्रद्दधत्येतद् यथालाभेन जीवती । विहराम्यमुनैवाहं आत्मना रमणेन वै ॥ ४० ॥ शरण गेलियापाठीं । सहज संतुष्ट मी ये सृष्टीं । स्वभावें सत्श्रध्दा पोटीं । जीविका गांठी अदृष्ट ॥६९॥ शरण रिघाल्यानंतर मी ह्या लोकांत सहजच सुखी होईन, पोटांत स्वभावतःच सात्त्विक श्रद्धा आहे; शरीरनिर्वाह अदृष्टावर सोपवून देईन ६९. मुनीश्वर भोगिती निजात्मा । त्या मी भोगीन आत्मयारामा । जो का पुरवी निष्कामकामा । तो परमात्मा वल्लभु ॥२७०॥ ज्या निजात्म्याचा महान् ऋषि उपभोग घेतात, त्याच आत्मारामाला मी भोगीन. निष्कामांचे काम पुरविणारा जो कां परमात्मा, तोच माझा पति होय २७०. ब्रह्मादिक समर्थ असती । ते सांडूनियां निश्चितीं । भगवद्भजनाची स्थिती । अतिप्रीती कां म्हणसी ॥७१॥ खरोखर ब्रह्मादिक समर्थ आहेत ते सोडून अत्यंत प्रेमपूर्वक भगवद्भजनच कां करावें असें म्हणशील ७१, मजसारिखिया दुराचारी । जड जीवांतें उद्धरी । तारकु तोचि भवसागरीं । स्वामी श्रीहरि कृपाळु ॥७२॥ (तर) मजसारख्या दुराचारी जड जीवांचा जो उद्धार करतो, तोच कृपाळु स्वामी श्रीहरि संसारसागरांत तारक आहे ७२. संसारकूपे पतितं विषयैर्मुषितेक्षणम् । ग्रस्तं कालाहिनाऽऽत्मानं कोऽन्यस्त्रातुमधीश्वरः ॥ ४१ ॥ संसारलक्षण कूप अंध । तेथ विषयदृष्टीं विषयांध । पडोनि गेले अंधांध । बुद्धिमंद उपायीं ॥७३॥ संसाररूप खोल अंधकारमय विहीर; तीत विषयदृष्टीने विषयांध झालेले आंधळे लोक पडले आहेत; वर निघण्याच्या उपायाविषयी त्यांची बुद्धिच चालत नाहीं ७३. ते कल्पनाजळीं बुडाले । वासनाकल्लोळीं कवळले । दंभमदादि जळचरीं तोडिले । तृष्णेच्या पडले कर्दमीं ॥७४॥ कोणी कल्पनेच्या जळांत बुडाले ; वासनांच्या लाटांत सांपडले ; दंभमदादि जलचरांनी कोणाचे लचके तोडले, आणि कोणी तृष्णेच्या चिखलात रुतून बसले ७४. दुःखाच्या खडकीं आदळले । स्वर्गपायरीसी अडकले । तेथूनिही एक पडले । निर्बुजले भवदळें ॥७५॥ कोणी दुःखरूप खडकावर आदळले; व स्वर्गाच्या पायरीला अडकून राहिले; कोणी तेथूनही कोसळले व संसाररूप पाण्याने गुदमरून गेले ७५, नास्तिकें गेलीं सबुडबुडीं । कर्मठीं धरिल्या कर्मदरडी । वेदबाह्य तीं बापुडीं । पडलीं देव्हडीतळवटीं ॥७६॥ नास्तिक होते त्यांना समूळ जलसमाधि मिळाली; कर्मठ होते त्यांनी कर्मरूप दरडी पकडल्या; आणि जी बिचारीं वेदबाह्य होती, ती देवडीच्या तळाशी जाऊन पडली ७६. निंदेचे शूळ कांटे । फुटोनि निघाले उफराटे । द्वेषाचे पाथर मोठे । हृदय फुटे लागतां ॥७७॥ तेथें निंदेचे सुळासारखे कांटे बोचून उरफाटे वर निघाले. तसेंच द्वेषाचे मोठमोठे फत्तर, त्यांची धडक बसली असतां हृदयाच्या ठिकर्या उडतात ! ७७. कामाची उकळी प्रबळ । भीतरूनि बाहेरी ये सबळ । तेणें डहुळलें तें जळ । होय खळबळ जीवासी ॥७८॥ कामाची उसळी जबर ! आंतून फारच जोरानें वर येते ! त्याच्या योगाने ते पाणी गढूळ होऊन जाते आणि जीवाची फार तारांबळ उडते ७८. सुटले क्रोधाचे चिरे । वरी पडिल्या उरी नुरे । वनितामगरीं नेलें पुरें । विवरद्वारें आंतौतें ॥७९॥ (तेथे ) क्रोधाचे चिरे सुटलेले आहेत, ते मस्तकावर पडले की काहीं बं पार आंत ओढून नेतात ! ७९. तेथ अवघियांसी एकसरें । गिळिलें काळें काळअजगरें । विखें घेरिलें थोरें घोरें । ज्ञान पाठिमोरें सर्वांसी ॥२८०॥ तेथे एकदमच सगळ्यांना काळरूप काळसर्प गट्ट करून टाकतो; अति भयंकर विषाने ते घेरले जातात, आणि ज्ञानाची सर्वांशी फारकत होते २८०. सर्प चढलिया माणुसा । गूळ कडू लागे कैसा । निंब खाये घसघसां । गोड गूळसा म्हणौनि ॥८१॥ साप माणसाला चढला म्हणजे जसा गूळ कडू लागतो, आणि तो गोड गूळ म्हणून कडूलिंब जसा खसखसा खात असतो ८१. केवळ विषप्राय विषयो कडू । तो प्रपंचिया जाला गोडु । अमृतप्राय परमार्थ गोडु । तो जाहला कडू विषयिकां ॥८२॥ ; (त्याचप्रमाणे) प्रापंचिकांना विषय हा केवळ विषासारखा कडू असून गोड वाटतो; आणि परमार्थ हा अमृतासारखा गोड, पण विषयीजनांना कडू वाटतो ! ८२ कूपाबाहेर वासु ज्यांसी । ते न देखती कूपाआंतुलांसी । कूपांतले बाहेरिलांसी । कदाकाळेंसी न देखती ॥८३॥ जे या कूपाच्या (विहिरीच्या) बाहेर राहातात, त्यांना कूपांत पडलेले दिसत नाहीत; आणि कूपांत जे आहेत, त्यांना कालत्रयींही बाहेरचे दिसत नाहीत ८३. ऐसिया पीडतयां जीवांसी । काढावया धिंवसा नव्हे कोण्हासी । तुजवांचोनि हृषीकेशी । पाव वेगेंसीं कृपाळुवा ॥८४॥ अशा पिडलेल्या प्राण्यांस वर काढण्याचे धैर्य, हे हृषीकेशा ! तुझ्याशिवाय इतर कोणालाही नाही. तर हे कृपाळो ! मला त्वरित भेट दे ८४. एवं दुःखकूपपतितां । हृदयस्थु भगवंतुचि त्राता । धांव पाव कृष्णनाथा । भवव्यथा निवारीं ॥८५॥ अशा प्रकारे दुःखरूप विहिरीत पडलेल्यांचा त्राता तूं हृदयस्थ नारायणच आहेस. तर हे कृष्णनाथा धाव, दर्शन दे, आणि माझे संसारदुःख निवारण कर ८५. ऐसें जाणोनि तत्त्वतां । त्याच्या चरणा शरण आतां । शरण गेलिया सर्वथा । सहज भवव्यथा निवारे ॥८६॥ हे मी तत्त्वतः जाणून आतां त्याच्या पायांस शरण जात आहे. त्यायोगें माझें संसारदुःख सहज नाहीसे होईल (असा मला विश्वास आहे) ८६. आत्मैव ह्यात्मनो गोप्ता निर्विद्येत यदाखिलात् । अप्रमत्त इदं पश्येद्ग्रस्तं कालाहिना जगत् ॥ ४२ ॥ ऐसें कळलें जी तत्त्वतां । येथ आपणचि आपणिया त्राता । सर्व पदार्थीं सर्वथा । निर्वेदता दृढ जाहल्या ॥८७॥ अहो ! मला तत्त्वत: असे कळून आले की, सर्व पदार्थमात्रांचे ठिकाणी निखालस दृढ वैराग्य बाणलें असतां येथे आपणच आपला उद्धारकर्ता होतों ८७. दृढ वैराग्यता ते ऐशी । विषयो टेंकल्या अंगासी । चेतना नव्हे इंद्रियांसी । निद्रितापासीं जेवीं रंभा ॥८८॥ दृढ वैराग्य तें असें की, गाढ झोपी गेलेल्यापाशी रंभा आली असतांही तो निर्विकार असतो, त्याप्रमाणे विषय अंगाशी येऊन भिडला तरीही इंद्रियांना विकार होत नाही ! ८८. अथवा वमिलिया अन्ना । जेवीं वांछीना रसना । तेवीं विषय देखोनि मना । न धरी वासना आसक्ती ॥८९॥ ओकलेल्या अन्नावर ज्याप्रमाणे रसनेची वांच्छा जात नाही, त्याप्रमाणे विषय पाहून मन आसक्त होत नाही किंवा वासना धरीत नाही ! ८९. तें वैराग्य कैसेनि जोडे । तरी सावधान पाहतां रोकडें । जग काळें गिळिलें चहूंकडे । वेगळें पडे तें नाहीं ॥२९०॥ असें तें वैराग्य कशाने प्राप्त होईल ? तर विवेकदृष्टीने पाहूं गेलें असतां दिसून येते की, जगाला सर्व बाजूंनी काळाने ग्रासले आहे, त्याच्या तडाक्यांतून कोणीही सुटत नाही २९०. पिता-पितामह काळें नेले । पुत्रपौत्रां काळें गिळिलें । वैराग्य नुपजे येणें बोलें । तरी नागवले नरदेहा ॥९१॥ बाप आजे काळ घेऊन गेला, पुत्र व नातू काळाने गट्ट केले, हे प्रत्यक्ष पाहूनसुद्धा ज्यांना वैराग्य होत नाही, ते मनुष्यजन्माला येऊन व्यर्थ गेले ! ९१. मृत्युलोक याचें नांव । अनित्य स्वर्गाची काइसी हांव । वैराग्येंवीण निर्दैव । झाले सर्व सर्वथा ॥९२॥ ह्याचें नांवच मुळीं मृत्युलोक ! स्वर्गसुद्धा असाच नाशिवंत ! त्याची तरी हांकाय कामाची ? एका वैराग्यावांचून सर्व जीव सर्वथैव हीनकपाळी झाले आहेत ! ९२. श्रीब्राह्मण उवाच - एवं व्यवसितमतिर्दुराशां कान्ततर्षजाम् । छित्त्वोपशममास्थाय शय्यामुपविवेश सा ॥ ४३ ॥ अवधूत म्हणे यदूसी । धन्य भाग्य तये वेश्येसी । वैराग्य उपजलें तिसी । विवेकेंसी निजोत्तम ॥९३॥ अवधूत यदूला म्हणतो-धन्य भाग्य त्या वेश्येचें, की तिला उत्तम विवेकासहित वैराग्य उत्पन्न झाले ९३. एवं विवंचूनि निजबुद्धी । परपुरुषदुराशा छेदी । ज्याचेनि संगें आधिव्याधी । बहु उपाधी बाधक ॥९४॥ अशा प्रकारे स्वात्मबुद्धीने विचार करून, ज्यांच्या संसर्गानें आधिव्याधि व आणखीही नाना तर्हेच्या उपाधि ताप देत होत्या, त्या परपुरुषांविषयींची दुर्वासना तिने पार छाटून टाकिली ! ९४. जे उपाधीचेनि कोडें । जन्ममृत्यूचा पुरु चढे । दुःखभोगाचें सांकडें । पाडी रोकडें जीवासी ॥९५॥ ज्या उपाधींच्यामुळे जन्ममृत्यूचा पूर चढतो आणि जीवाला दुःखभोगाचे प्रत्यक्ष संकट भोगणें प्राप्त होते ९५, येणें वैराग्यविवेकबळें । छेदूनि दुराशेचीं मूळें । उपरमु पावली एके वेळे । निजात्मसोहळे ते भोगी ॥९६॥ त्या दुर्वासनेची मुळे वैराग्ययुक्त विवेकाच्या सामर्थ्यानें तिनें तोडून टाकली. त्याबरोबर तिला तत्काळ शांति प्राप्त झाली; आणि ती स्वात्मसुखाचे सोहळे भोगूं लागली ९६. नित्यसिद्धसुखदाता । तो हृदयस्थ कांत आश्रितां । विकल्प सांडूनि चित्ता । वेगीं हृदयस्था मीनली ॥९७॥ नित्यसिद्ध असलेले सुख देणारा असा जो हृदयस्थ कांत, त्याचा आश्रय करतांच चित्तांतले विकल्प नाहीसे होऊन ती हृदयस्थ आत्मारामाशी ऐक्य पावली ९७. त्यासी देखतां अनुभवाचे दिठीं । ऐक्यभावें घातली मिठी । निजसुख पावली गोरटी । उठाउठीं तत्काळ ॥९८॥ त्याला अनुभवदृष्टीने पाहतां क्षणीं ऐक्यभावाने आलिंगन दिले, त्याबरोबर ती सुंदरी तत्काळ निजसुख पावली ९८. बोलु घेऊनि गेला बोली । लाज लाजोनियां गेली । दृष्य-द्रष्टा दशा ठेली । वाट मोडिली विषयांची ॥९९॥ वाणी वाणीला घेऊन गेली; लाजच लजित झाली ; दृश्य-द्रष्टा ही अवस्था नाहीशी झाली; त्यामुळे विषयांचा मार्गच खुंटला ९९. सुखें सुखावलें मानस । तें सुखरूप जालें निःशेष । संकल्पविकल्प पडिले वोस । दोघां सावकाश निजप्रीती ॥३००॥ मन सुखानें (आत्मसुखानें) सुखावले; ते पूर्ण सुखरूपच होऊन बसलें; संकल्प माणि विकल्प वोस पडले; उभयताही निजप्रेमांत निमग्न झाले ३००. नाबद पडलिया उदकांत । विरोनि तया गोड करित । तेवीं निराशीं पावोनि भगवंत । समरसत स्वानंदे ॥१॥ खडीसाखर पाण्यात पडल्याबरोबर विरून पाणी गोड करून सोडते, त्याप्रमाणे नैराश्याच्या योगें भगवंताची भेट होऊन ती निजानंदांत समरस झाली ! १. तेथ हेतूसी नाहीं ठावो । निमाला भावाभावो । वेडावला अनुभवो । दोघां प्रीती पाहा हो अनिवार ॥२॥ हेतूचे ठाणेंच उठलें ! भाव आणि अभाव थंड पडले; अनुभव वेडावून गेला; आणि पाहा ! दोघांचे निजप्रेम अनिवार होऊन बसलें ! २. सांडूनि मीतूंपणासी । खेंव दिधलें समरसीं । मग समाधीचिये सेजेशी । निजकांतेंसी पहुडली ॥३॥ मीतूंपणा टाकून देऊन सामरस्याने मिठी मारली, आणि समाधीच्या शेजेवर त्या निजपुरुषाबरोबर तिने शयन केले ३. झणें मायेची लागे दिठी । यालागीं स्फूर्तीचिया कोटी । निंबलोण गोरटी । उठाउठी वोवाळी ॥४॥ न जाणो कदाचित् मायेची दृष्ट लागेल ! म्हणून ती सुंदरी कोट्यवधि स्फूर्तीचे निंबलोण त्या पुरुषावरून ओवाळती झाली ४. ऐसी समाधिशेजेशीं । पिंगला रिघे निजसुखेंसीं । अवधूत म्हणे यदूसी । वैराग्यें वेश्येसी उपरमु ॥५॥ येणेप्रमाणे समाधिरूप शेजेवर पिंगला निजसुखाने पहुडली. यदूला अवधूत सांगतात:-(अशा प्रकारें) वैराग्यानें वेश्येला शांति प्राप्त झाली ५. वैराग्ये छेदिले आशापाश । पिंगला जाहली गा निराश । निराशासी असमसाहस । सुखसंतोष सर्वदा ॥६॥ वैराग्यानें आशेचे पाश तोडून टाकले व पिंगला निरिच्छ झाली. तात्पर्य, निरिच्छालाच अपार सुख व आनंद सर्वकाळ प्राप्त होतो ६. आशा हि परमं दुःखं नैराश्यं परमं सुखम् । यथा सञ्छिद्य कान्ताशां सुखं सुष्वाप पिङ्गला ॥ ४४ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां एकादशस्कन्धे अष्टमोऽध्यायः ॥ ८ ॥ आशा तेथ लोलुप्यता । आशेपाशीं असे दीनता । आशा तेथ ममता । असे सर्वथा नाचती ॥७॥ आशा तेथें लोलुपता (आसक्ति); आशेपाशी दीनता व आशा तेथें ममता, ही सर्वथैव नाचत असतात ७. आशेपाशीं महाशोक । आशा करवी महादोख । आशेपाशीं पाप अशेख । असे देख तिष्ठत ॥८॥ आशेपाशी महाशोक असतो; आशा हीच महान् दोष घडविते; आणि आशेपाशीच संपूर्ण पातकाचा सांठा असतो ८. आशेपाशीं अधर्म सकळ । आशा मानीना विटाळ । आशा नेणे काळवेळ । कर्म सकळ उच्छेदी ॥९॥ आशेजवळ सर्व अधर्म वास करतात; आशा कोणाचा विटाळ मानीत नाही; आशा काळवेळ जाणत नाहीं सर्व कर्मांचा ती उच्छेद करून टाकते ९. आशा अंत्यजातें उपासी । नीचसेवन आशेपाशीं । आशा न सांडी मेल्यासी । प्रेतापाशीं नेतसे ॥३१०॥ आशा अंत्यजाच्या भजनीं लागते, आशा नीचांची सेवा करविते; आशा मेलेल्यासही सोडीत नाही; ती प्रेताजवळसुद्धां जाते ३१०. आशा उपजली अनंतासी । नीच वामनत्व आलें त्यासी । आशें दीन केलें देवांसी । कथा कायसी इतरांची ॥११॥ अनंताला आशा उत्पन्न झाल्याबरोबर त्याला लघु वामनरूप प्राप्त झालें ! आशेने देवांनाही दीन करून सोडलें ! मग इतरांचा काय पाड ? ११. जगाचा जो नित्य दाता । तो आशेनें केला भिकेसवता । वैर्याचे द्वारीं झाला मागता । द्वारपाळता तेणें त्यासी ॥१२॥ जो जगाचा शाश्वत दाता, त्यालाही आशेने भिकारी करून सोडला; आणि शत्रूच्या दारांत तो याचना करावयाला गेला; त्यायोगाने त्याला द्वारपाळ व्हावें लागले १२. आशा तेथ नाहीं सुख । आशेपाशीं परम दुःख । आशा सर्वांसी बाधक । मुख्य दोष ते आशा ॥१३॥ जेथे आशा आहे तेथे सुख नाहीं; आशेपाशी परमदुःख आहे ; आशा सर्वांना बाधकच होते. तात्पर्य, आशा हाच मुख्य दोष आहे १३. ज्याची आशा निःशेष जाये । तोचि परम सुख लाहे । ब्रह्मादिक वंदिती पाये । अष्टमा सिद्धि राहे दासीत्वें ॥१४॥ ज्याची आशा निःशेषपणे नाहीशी झाली, तोच परमसुख पावतो; ब्रह्मा आदिकरून त्याच्या पायीं लागतात, व अष्टसिद्धि त्याच्या दासी होऊन राहतात १४. निराशांचा शुद्ध भावो । निराशांपाशीं तिष्ठे देवो । निराशांचें वचन पाहा हो । रावो देवो नुल्लंघी ॥१५॥ आशाजितांचा भाव शुद्ध असतो; आशाजितांजवळच भगवंत राहत असतो; आशाजिताचें वचन राव किंवा देवसुद्धा उल्लंघीत नाहीं ! १५. निराश तोचि सद्बुद्धि । निराश तोचि विवेकनिधी । चारी मुक्ती पदोपदीं । नैराश्य आधीं वंदिती ॥१६॥ आशारहित तोच सुबुद्धिवान् ; आशारहित तोच विवेकनिधि चारही मुक्ति पावलोपावली निराशवंताला वंदन करतात १६. निराशा तीर्थांचें तीर्थ । निराशा मुमुक्षूचा अर्थ । निराशेपाशीं परमार्थ । असे तिष्ठत निरंतर ॥१७॥ निराशा हे सर्व तीर्थाचे. तीर्थ; निराशा हाच मुमुक्षूंचा अर्थ ; आणि निराशेजवळच सर्वकाळ परमार्थ नांदत असतो १७. जाण नैराश्यतेपाशीं । वैराग्य होऊन असे दासी । निराश पहावया अहर्निशीं । हृषीकेशी चिंतितु ॥१८॥ नैराश्याजवळ वैराग्य हें दास होऊन राहते; हृषीकेश अहोरात्र आशारहिताला पहावें म्हणून इच्छा करीत असतो १८. निराश देखोनि पळे दुःख । निराशेमाजीं नित्यसुख । निराशेपाशीं संतोख । यथासुखें क्रीडतु ॥१९॥ नैराश्याला पाहिले की, दुःख पळून जाते; निराशेजवळ नित्यसुख असते व संतोष हा निराशेजवळ खुशाल खेळत असतो १९. नैराश्याचे भेटीसी पाहाहो । धांवे वैकुंठीचा रावो । नैराश्याचा सहज स्वभावो । महादेवो उपासी ॥३२०॥ नैराश्यवंताच्या भेटीला वैकुंठींचा राणा धाव घेतो. महादेवही नैराश्याची सहज स्वभावेंकरून उपासना करतो २०. निराशेपाशीं न ये आधी । निराशेपाशीं सकळ विधी । सच्चिदानंदपदीं । मिरवे त्रिशुद्धी निराशु ॥२१॥ निराशेजवळ मनोदुःख कधीही फिरकत नाहीं; सर्व विहित धर्म निराशेपाशी वसतात; आशारहित हा निश्चयेंकरून सच्चिदानंदपदी विराजमान होतो २१. ऐकोनि निराशेच्या नांवा । थोरला देवो घेतसे धांवा । त्या देवोनियां खेंवा । रूपनांवा विसरला ॥२२॥ निराशेचें नांव ऐकलें की, देवाधिदेव धाव घेऊन येतो, आणि त्याला आलिंगन देऊन नामरूपाला विसरून जातो २२. ते निराशेचा जिव्हाळा । पावोनि वेश्या पिंगला । जारपुरुषाशेच्या मूळा । स्वयें समूळा छेदिती झाली ॥२३॥ त्या निराशेचा जिव्हाळा मिळाल्यामुळे पिंगला वेश्या जारपुरुषाच्या आशेचे मूळ तोडून टाकिती झाली २३. जें आशापाशांचें छेदन । तेंचि समाधीचें निजस्थान । ते निज समाधी पावोन । पिंगला जाण पहुडली ॥२४॥ आशापाशांचे छेदन तेच समाधीचें निजस्थान होय. अशी निजसमाधि प्राप्त करून घेऊन पिंगलेने शयन केलें २४. सर्व वर्णामाजीं वोखटी । कर्म पाहतां निंद्य दृष्टीं । ते वेश्या पावन झाली सृष्टीं । माझे वाक्पुटीं कथा तिची ॥२५॥ सर्व वर्णामध्यें नीच, कर्म पाहूं गेले असतां निंद्यच, (परंतु ) ती वेश्या या जगांत पावन झाली. त्यामुळे माझ्या तोंडांत तिची कथा आली २५. यालागीं वैराग्यापरतें । आन साधन नाहीं येथें । कृष्ण थापटी उद्धवातें । आल्हादचित्तें प्रबोधी ॥२६॥ म्हणून 'येथे वैराग्यापरतें दुसरे साधन नाही,' (असें ) पाठीवर थाप देऊन कृष्ण उद्धवाला प्रसन्नान्तःकरणाने सांगता झाला २६. अवधूत सांगे यदूसी । प्रत्यक्ष वेदबाह्यता वेश्येसी । निराश होतां मानसीं । निजसुखासी पावली ॥२७॥ अवधूत यदूला म्हणाला-वेदाला अनधिकारी अशा वेश्येला चित्तांत विरक्ति बाणल्याबरोबर स्वात्मसुख प्राप्त झाले २७, यालागीं कायावाचाचित्तें । उपासावें निराशेतें । यापरतें परमार्थातें । साधन येथें दिसेना ॥२८॥ यास्तव कायावाचामनेंकरून नैराश्याचीच उपासना करावी, परमार्थप्राप्तीला यापरतें येथे दुसरे साधन नाही २८. इतर जितुकीं साधनें । तितुकीं आशा-निराशेकारणें । ते निराशा साधिली जेणें । परमार्थ तेणें लुटिला ॥२९॥ इतर जितकी म्हणून साधनें आहेत, ती सर्व निराशेकरितांच ! तेव्हा ती निराशाच ज्याने साध्य केली, त्याने परमार्थ लुटला (यांत शंका नाही) २९. कृपा जाकळिलें अवधूतासी । यदूसी धरोनियां पोटासी । निराशता हे जे ऐसी । अवश्यतेसीं साधावी ॥३३०॥ अवधूत करुणेनें व्याप्त झाला व त्याने यदूला पोटाशी धरून सांगितले की, "अशी जी ही निराशा म्ह. विरक्ति ती जरूर जरूर साध्य कर" ३३०. एका जनार्दना शरण । त्याची कृपा परिपूर्ण । तोचि आशापाश छेदून । समाधान पाववी ॥३३१॥ एकनाथ जनार्दनाला शरण आहे; त्याची कृपा परिपूर्ण आहे; तोच आशेचे पाश तोडून टाकून समाधान देणारा आहे ३३१. इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कंधे एकाकारटीकायां यदु-अवधूतसंवादे अष्टमोऽध्यायः ॥८॥ (याप्रमाणे श्रीमद्भागवत महापुराणांतील एकादश स्कंधामधील यदु-अवधूत संवादाचा एकनाथकृत टीकेचा आठवा अध्याय संपूर्ण झाला. ) ॐ तत्सत्-श्रीकृष्णार्पणमस्तु |