॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥

॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥

॥ अर्थात् श्रीमद् भगवद्‌गीतेवरील मराठी टीका ॥

। अथ अष्टमोऽध्यायः - अध्याय आठवा


अक्षरब्रह्मयोगः




[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]



अर्जुन उवाच ।
किं तद्‌ब्रह्म किं अध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम ।
अधिभूतं च किं प्रोक्तं अधिदैवं किमुच्यते ॥ १ ॥
अर्जुन म्हणाला, हे पुरुषोत्तमा, ते ब्रह्म म्हणजे काय ? अध्यात्म कशाला म्हणतात ? कर्म म्हणजे काय व अधिभूत कशाला म्हणतात ? अधिदैव कशाला म्हणतात ? ॥८-१॥

मग अर्जुनें म्हणितलें । हां हो जी अवधारिलें ।
जें म्यां पुसिलें । तें निरूपिजो ॥ १ ॥
मग अर्जुन म्हणाला, अहो महाराज, ऐकले का ? जे मी विचारले ते सांगावे. ॥८-१॥

सांगा कवण तें ब्रह्म । कायसया नाम कर्म ।
अथवा अध्यात्म । काय म्हणिपे ॥ २ ॥
सांगा, ते ब्रह्म कोणते ? कर्म कशाचे नाव आहे ? आणि अध्यात्म म्हणतात ते काय ? ॥ ८-२॥

अधिभूत तें कैसें । एथ अधिदैव तें कवण असे ।
हें उघड मी परियेसें । ऐसें बोला ॥ ३ ॥
अधिभूत म्हणतात ते कसे आहे ? यात अधिदैव कोण आहे ? हे मला स्पष्ट समजेल असे सांगा. ॥ ८-३॥

अधियज्ञः कथं कोऽत्र देहेऽस्मिन्मधुसूदन ।
प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः ॥ २ ॥
हे मधुसूदना, या देहात अधियज्ञ कोणता व कसा ? अंत:करण-निग्रह केलेले योगी देहावसानासमयी तुला कसा जाणतात ? ॥८-२॥

देवा अधियज्ञ तो काई । कवण पां इये देहीं ।
हें अनुमानासि कांहीं । दिठी न भरे ॥ ४ ॥
देवा, अधियज्ञ तो काय आहे ? व या देहात तो कोण आहे ? हे अनुमानाने पाहू म्हटले तर काहीच समजुतीस येत नाही. ॥८-४॥

आणि नियता अंतःकरणीं । तूं जाणिजसी देहप्रयाणीं ।
तें कैसेनि हे शारङ्गपाणी । परिसवा मातें ॥ ५ ॥
आणि हे श्रीकृष्णा, ज्या पुरुषांनी आपले अंत:करण स्वाधीन करून घेतले आहे, त्या पुरुषाकडून त्यांच्या प्रयाणकाळी तू जाणला जातोस तो कसा जे मला ऐकवा. ॥८-५॥

देखा धवळारीं चिंतामणीचा । जरी पहुडला होय दैवाचा ।
तरी वोसणतांही बोलु तयाचा । सोपु न वचे ॥ ६ ॥
(ज्ञानेश्वर महाराज म्हणतात) पहा एकदा भाग्यवान पुरुष जर चिंतामणीचे घरात निजला असेल तर त्याचे बरळाण्यातले शब्द सुद्धा व्यर्थ जाणार नाहीत. ॥८-६॥

तैसें अर्जुनाचिया बोलासवें । आलें तेंचि म्हणितलें देवें ।
तें परियेसें गा बरवें । जे पुसिलें तुवां ॥ ७ ॥
त्याप्रमाणे अर्जुनाच्या विचारण्याबरोबरच श्रीकृष्णाच्या मनात जे आले तेच श्रीकृष्ण सांगू लागले, 'अरे, जे तू विचारलेस ते चांगले ऐक.' ॥८-७॥

किरीटी कामधेनूचा पाडा । वरी कल्पतरूचा आहे मांदोडा ।
म्हणौनि मनोरथसिद्धीचिया चाडा । तो नवल नोहे ॥ ८ ॥
अर्जुन हा कामधेनूचा बछडा असून शिवाय तो कल्पतरूच्या मांडवाखाली आहे. म्हणून त्याने आपले मनोरथ सिद्धीस जावेत अशी इच्छा केली तर ते आश्चर्य नाही. ॥८-८॥

श्रीकृष्ण कोपोनि ज्यासी मारी । तो पावे परब्रह्मसाक्षात्कारीं ।
मा कृपेनें उपदेशु करी । तो कैशापरी न पवेल ॥ ९ ॥
श्रीकृष्ण रागावून ज्याचा वध करतात त्यास ब्रह्माचा साक्षात्कार होतो, मग ज्याला कृपेने उपदेश करतील तो ब्रह्मसाक्षात्काराला कसा पावणार नाही ? ॥८-९॥

जैं कृष्णचि होइजे आपण । तैं कृष्ण होय आपुलें अंतःकरण ।
मग संकल्पाचें आंगण । वोळगती सिद्धी ॥ १० ॥
जेव्हा आपण कृष्णाचे अनन्य भक्त व्हावे तेव्हा आपले अंत:करण कृष्ण होते व मग त्यावेळी आपल्या संकल्पाच्या अंगणात अष्टमहासिद्धी राबतील. ॥८-१०॥

परि ऐसें जें प्रेम । तें अर्जुनींचि आथि निस्सीम ।
म्हणौनि तयाचें काम । सदां सफळ ॥ ११ ॥
परंतु असे जे प्रेम ते अर्जुनाच्याच ठिकाणी अमर्याद आहे, म्हणून त्याच्या इच्छा सफल आहेत. ॥८-११॥

या कारणें श्रीअनंतें । तें मनोगत तयाचें पुसतें ।
होईल जाणोनि आइतें । वोगरूनि ठेविलें ॥ १२ ॥
यासाठी अर्जुन आपल्याला ही गोष्ट विचारील अशी त्याच्या मनातील गोष्ट ओळखून अगोदरच त्या गोष्टीरूपी पक्वान्नाचे ताट वाढून ठेवले. ॥८-१२॥

जें अपत्य थानीहूनि निगे । तयाची भूक ते मायेसीचि लागे ।
एर्‍हवीं तें शब्दें काय सांगें । मग स्तन्य दे येरी ? ॥ १३ ॥
कारण स्तनपान केल्यानंतर दूर असलेल्या मुलाची भूक आईला समजते. एरवी काय ते शब्दाने 'मला भूक लागली दूध पाज' असे सांगते काय ? आणि मग ती त्याला स्तनपान देते ? ॥८-१३॥

म्हणौनि कृपाळुवा गुरूचिया ठायीं । हें नवल नोहे कांहीं ।
परि तें असो आइका काई । जें देव बोलते जाहले ॥ १४ ॥
म्हणून कृपाळू गुरूच्या बाबतीत हे काहीच आश्चर्य नाही. परंतु ते असो. देव जे काही बोलला ते ऐका. ॥८-१४॥

श्रीभगवानुवाच ।
अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते ।
भूतभावोद्‌भवकरो विसर्गः कर्मसंज्ञितः ॥ ३ ॥
श्रीकृष्ण म्हणाले जे परम अविनाशी आहे ते ब्रह्म. ब्रह्माची(आकाराच्या उत्पत्ति-विनाशाबरोबर उत्पन्न व नष्ट न होणे ही) जी सहज स्वरूपस्थिती तिला अध्यात्म असे म्हणतात. अक्षर ब्रह्मापासून भूतमात्रादी चराचर पदार्थांची उत्पत्ती करणारा जो विसर्ग म्हणजे सृष्टिव्यापार त्याचे नाव कर्म होय. ॥८-३॥

मग म्हणितलें सर्वेश्वरें । जें आकारीं इयें खोंकरें ।
कोंदलें असत न खिरे । कवणे काळीं ॥ १५ ॥
मग सर्वेश्वर श्रीकृष्ण म्हणाले, जे या सर्व फुटक्या (नाशिवंत) आकारामत्रात गच्च भरले असताही कोणत्याही वेळी गळत नाही ॥८-१५॥

एर्‍हवीं सपूरपण तयाचें पहावें । तरी शून्यचि नव्हे स्वभावें ।
वरी गगनाचेनि पालवें । गाळूनि घेतलें ॥ १६ ॥
एरवी त्याचा सूक्ष्मपणा पाहू गेले तर ते शून्यच वाटेल पण ते स्वभावाने शून्य नाही. (कारण ते मूळचे सत् आहे). शिवाय ते इतके सूक्ष्म आहे की सूक्ष्मात सूक्ष्म जे आकाश त्याच्या पदरातून ते गाळून घेतले आहे ॥८-१६॥

जें ऐसेंही परि विरुळें । इये विज्ञानाचिये खोळे ।
हालवलेंहि न गळे । तें परब्रह्म ॥ १७ ॥
जे इतकेही सूक्ष्म आहे, परंतु झिरझिरीत असलेल्या या प्रपंचरूप वस्त्राच्या गाळणीतून हलवले तरी गाळले जात नाही. ते परब्रह्म होय. ॥८-१७॥

आणि आकाराचेनि जालेपणें । जन्मधर्मातें नेणें ।
आकारलोपीं निमणें । नाहीं कहीं ॥ १८ ॥
आणि आकारवान पदार्थांच्या उत्पत्तीबरोबर जे जन्मरूपी विकाराला जणात नाही व आकारवान पदार्थ नाहीसे झाल्यावर जे केव्हाही नाश पावत नाही ॥८-१८॥

ऐशिया आपुलियाची सहजस्थिती । जया ब्रह्माची नित्यता असती ।
तया नाम सुभद्रापती । अध्यात्म गा ॥ १९ ॥
अर्जुना याप्रमाणे आपल्या सहज स्थितीने असणार्‍या ब्रह्माचे जे अखंडत्व, त्या अखंडत्वास अध्यात्म असे नाव आहे. ॥८-१९॥

मग गगनीं जेविं निर्मळें । नेणों कैचीं एके वेळे ।
उठती घनपटळें । नानावर्णें ॥ २० ॥
मग ज्याप्रमाणे निर्मळ आकाशात एकदम अनेक रंगाच्या मेघांच्या फळ्या कशा येतात ते कळत नाही ॥८-२०॥

तैसें अमूर्तीं तिये विशुद्धें । महदादि भूतभेदें ।
ब्रह्मांडाचे बांधे । होंचि लागती ॥ २१ ॥
त्याप्रमाणे त्या विशेष शुद्ध व निराकार अशा ब्रह्माचे ठिकाणी महतत्व वगैरे भूतभेदाने ब्रह्मांडाचे आकार उत्पन्न व्हायला लागतात. ॥८-२१॥

पैं निर्विकल्पाचिये बरडीं । फुटे आदिसंकल्पाची विरूढी ।
आणि तें सवेंचि मोडोनि ये ढोंढी । ब्रह्मगोळकांच्या ॥ २२ ॥
निर्विकल्प परब्रह्मरूपी माळ जमिनीवर मूळसंकल्प (एकोऽहं बहुस्याम्) रूपी अंकुर फुटतो आणि त्याबरोबर ब्रह्मगोळकांचे दाट आकार येतात. ॥८-२२॥

तया एकैकाचे भीतरीं पाहिजे । तंव बीजाचाचि भरिला देखिजे ।
माजीं होतिया जातिया नेणिजे । लेख जीवा ॥ २३ ॥
त्या एकेक ब्रह्मांडामधे पहावे तो ते ब्रह्मांड बीजांनीच (मूळ संकल्पांनीच) भरलेले दिसते व त्या एकेका ब्रह्मांडामधे होणार्‍या जाणार्‍या जीवांची तर गणतीही नाही. ॥८-२३॥

मग तया ब्रह्मगोळकांचें अंशांश । प्रसवती आदिसंकल्प असमसहास ।
हें असो ऐसी बहुवस । सृष्टी वाढे ॥ २४ ॥
मग त्या गोळकांमधील अंशरूपी एकेक जीव असंख्य आदिसंकल्प करावयास लागले. हे असो. याप्रमाणे सृष्टि फार वाढावयास लागली. ॥८-२४॥

परि दुजेनविण एकला । परब्रह्मींचि संचला ।
अनेकत्वाचा आला । पूर जैसा ॥ २५ ॥
पणा दुसर्‍याशिवाय एक परब्रह्मच सर्वत्र भारलेले आहे आणि त्याच्या ठिकाणी अनेकत्वाचा जसा पूर आला आहे ॥८-२५॥

तैसें समविषमत्व नेणों कैचें । वायांचि चराचर रचे ।
पाहतां प्रसवतिया योनीचे । लक्ष दिसती ॥ २६ ॥
याप्रमाणे त्या ब्रह्माचे ठिकाणी समविषमत्व कोठून आले हे कळत नाही. तेथे उगीचच स्थावर जंगम पदार्थ उत्पन्न होतात. ते पाहिले असता प्रसवणार्‍या योनींचे लक्षावधी प्रकार दिसतात. ॥८-२६॥

येरी जीवभावाचिये पालविये । कांहीं मर्यादा करूं नये ।
पाहिजे कवण हें आघवें विये । तंव मूळ तें शून्य ॥ २७ ॥
इतर जीवभावाच्या पालवीची काही गणानाच करता येत नाही. हे कोण प्रसवते ? म्हणून पाहू गेले तर त्याचे मूळ शून्य आहे. ॥८-२७॥

म्हणौनि कर्ता मुदल न दिसे । आणि सेखीं कारणहीं कांहीं नसे ।
माजीं कार्यचि आपैसें । वाढों लागे ॥ २८ ॥
म्हणून मुळात याचा कर्ता कोणी दिसत नसून शेवटी याचे कारणही काही नाही व मध्ये कार्यच आपोआप वाढावयास लागले आहे. ॥८-२८॥

ऐसा करितेनवीण गोचरु । अव्यक्तीं हा आकारु ।
निपजे जो व्यापारु । तया नाम कर्म ॥ २९ ॥
याप्रमाणे कर्त्याशिवाय अव्यक्ताच्या ठिकाणी (ज्याच्या योगे) हा भासमान होणारा आकार उत्पन्न होतो असा जो व्यापार त्याला 'कर्म असे नाव आहे. ॥८-२९॥

अधिभूतं क्षरो भावः पुरुषश्चाधिदैवतम् ।
अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतां वर ॥ ४ ॥
हे नरश्रेष्ठा, अधिभूत म्हणजे नश्वर वस्तु, जीव हाच अधिदैवत, आणि या देहात (देहभावाचा उपशमन करणारा) अधियज्ञ मीच आहे. ॥८-४॥

आतां अधिभूत जें म्हणिपे । तेंहि सांगों संक्षेपें ।
तरी होय आणि हारपे । अभ्र जैसें ॥ ३० ॥
आता अधिभूत ज्याला म्हणतात तेही थोडक्यात सांगतो. तर ज्याप्रमाणे ढग उत्पन्न होतात व लय पावतात ॥८-३०॥

तैसें असतेपण आहाच । नाहीं होईजे हें साच ।
जयातें रूपा आणिती पांचपांच । मिळोनियां ॥ ३१ ॥
त्याप्रमाणे ज्याचे असतेपण उगीच वरवर असते, व न होणे हेच ज्याचे खरे स्वरूप आहे, आणि ज्याला पंचमहाभूते एकत्र होऊन व्यक्त दशेला आणतात ॥८-३१॥

भूतांतें अधिकरूनि असे । आणि भूतसंयोगें तरी दिसे ।
जें वियोगवेळे भ्रंशें । नामरूपादिक ॥ ३२ ॥
जे पंचमहाभूतांचा आश्रय करून असते, आणि पंचमहाभूतांचा संयोग (पंचीकरण) झाला तरच जे दिसते, आणि पंचमहाभूतांचा वियोग झाला असता जे नामरूपात्मक शरीर नाशाला पावते ॥८-३२॥

तयातें अधिभूत म्हणिजे । मग अधिदैव पुरुष जाणिजे ।
जेणें प्रकृतीचें भोगिजे । उपार्जिलें ॥ ३३ ॥
त्या शरीराला अधिभूत म्हणावे. मग अधिदैव म्हणजे पुरुष समजावा. तो कसा तर जो प्रकृतीने मिळवलेले भोग भोगतो ॥८-३३॥

जो चेतनेचा चक्षु । जो इंद्रियदेशींचा अध्यक्षु ।
जो देहास्तमानीं वृक्षु । संकल्प विहंगमाचा ॥ ३४ ॥
जो चेतनेचा प्रकाशक आहे, जो इंद्रियरूपी देशाचा स्वामी आहे, आणि जो देह पडण्याच्या वेळी संकल्परूप पक्षी रहाण्याचा वृक्ष आहे ॥८-३४॥

जो परमात्माचि परी दुसरा । जो अहंकारनिद्रा निदसुरा ।
म्हणौनि स्वप्नीचिया वोरबारा । संतोषें शिणे ॥ ३५ ॥
जो वास्तविक परमात्माच आहे पण जो दुसरा (वेगळा) झाला. कारण की ज्यास अहंकाररूपी झोप येऊन द्वैतभासात्मक) स्वप्नाच्या व्यवहाराने जो संतोष पावतो व कष्टी होतो, ॥८-३५॥

जीव येणें नांवें । जयातें आळविजे स्वभावें ।
तें अधिदैवत जाणावें । पंचायतनींचें ॥ ३६ ॥
ज्याला जीव या नावाने स्वभावत: बोलतात, त्याला पंचभूतात्मक शरीररूपी घरातील अधिदैव समजावे. ॥८-३६॥

आतां इयेचि शरीरग्रामीं । जो शरीरभावातें उपशमी ।
तो अधियज्ञु एथ गा मी । पंडुकुमरा ॥ ३७ ॥
आता याच शरीररूपी गावामधे जो शरीरभावाला (देहाहंकारादिकांना) नाहीसे करतो तो शरीरातील अधियज्ञ, अर्जुना मी आहे. ॥८-३७॥

येर अधिदैवाधिभूत । तेहि मीचि कीर समस्त ।
परि पंधरें किडाळा मिळत । तें काय साकें नोहे ?॥ ३८ ॥
इतर अधिदैव, अधिभूत तेही खरोखर मीच आहे. परंतु अस्सल सोने डाकाला मिळाले तर ते हिणकस होत नाही काय ? ॥८-३८॥

तरि तें पंधरेपण न मैळे । आणि किडाळाचियाही अंशा न मिळे ।
परि जंव असे तयाचेनि मेळें । तंव साकेंचि म्हणिजे ॥ ३९ ॥
वास्तविक त्या सोन्याचा उत्तमपणा मळत नाही आणि ते सोने किडाच्या भागाबरोबर तद्रूप होत नाही पण जोपर्यंत उत्तम सोने किडाच्या मिलाफाने असते तिपर्यंत त्याला हिणाकसच म्हटले जाते. ॥८-३९॥

तैसें अधिभूतादि आघवें । हें अविद्येचेनि पालवें ।
झांकलें तंव मानावें । वेगळें ऐसें ॥ ४० ॥
त्याप्रमाणे अधिभूत वगैरे हे सर्व जोपर्यंत अविद्येच्या पदराने झाकलेले आहेत तोपर्यंत वेगळे असे समजावेत. ॥८-४०॥

तेचि अविद्येची जवनिका फिटे । आणि भेदभावाची अवधी तुटे ।
मग म्हणों एक होऊनि जरी आटे । तरी काय दोनी होती ? ॥ ४१ ॥
तोच अविद्येचा पडदा काढला म्हणजे द्वैतभावाची हद्द संपते. मग ते एकमेकात मिळून तद्रूप झाले असे म्हणावे तर ते पहिल्याप्रथम दोन होते का ? ॥८-४१॥

पैं केशांचा गुंडाळा । वरि ठेविली स्फटिकशिळा ।
ते वरि पाहिजे डोळां । तंव भेदली गमती ॥ ४२ ॥
केसांचा गुंडाळा आहे व त्यावर स्फटिकाची शिळा ठेवली तर ती वरून डोळ्याने पाहिली असता फुटलेली दिसते. ॥८-४२॥

पाठीं केश परौते नेले । आणि भेदलेपण काय नेणों जाहालें ।
तरी डांक देऊनि सांदिलें । शिळेतें काई ? ॥ ४३ ॥
नंतर केस त्या स्फटिक-शिळेपासून दूर काढले, मग त्या शिळेचा फुटकेपणा कोठे गेला ? ते कळत नाही, तर डाग देऊन त्या शिळेला जोडले का ? ॥८-४३॥

ना ते अखंडचि आयती । परि संगें भिन्न गमली होती ।
ते सारिलिया मागौती । जैसी कां तैसी ॥ ४४ ॥
तर नाही. ती मूळची अखंड होती तशीच आहे. परंतु केसांच्या संगतीने फुटलेली वाटत होती. ते केस दूर केल्यावर पुन्हा ती मूळची अखंड होती तशीच आहे. ॥८-४४॥

तेवींचि अहंभावो जाये । तरी ऐक्य तें आधींचि आहे ।
हेंचि साचें जेथ होये । तो अधुयज्ञु मी ॥ ४५ ॥
त्याप्रमाणे अहंकार गेला तर ऐक्य मूळचेच आहे. हा प्रकार खरोखर जेथे घडतो, तो अधियज्ञ मी आहे. ॥८-४५॥

पैं गा आम्हीं तुज । सकळ यज्ञ कर्मज ।
सांगितलें कां जें काज । मनीं धरूनि ॥ ४६ ॥
अरे आम्ही जो हेतु मनात धरून सर्व यज्ञकर्मापासून झाले आहोत असे (चौथ्या अध्यायात) तुला सांगितले ॥८-४६॥

तो हा सकळ जीवांचा विसांवा । नैष्कर्म्य सुखाचा ठेवा ।
परि उघड करूनि पांडवा । दाविजत असे ॥ ४७ ॥
तो हा अधियज्ञ सर्व जीवांचा विसावा आहे व नैष्कर्म्य सुखाचा ठेवा आहे. पण अर्जुना, तुला मी तो उघड करून दाखवत आहे. ॥८-४७॥

पहिलिया वैराग्य‍इंधन परिपूर्तीं । इंद्रियानळीं प्रदीप्तीं ।
विषयद्रव्याचिया आहुती । देऊनियां ॥ ४८ ॥
प्रथम वैराग्यरूपी काष्ठांच्या पूर्ण भरीने चांगला पेट घेतलेल्या इंद्रियरूपी अग्नीत शब्दादि विषयरूपी द्रव्यांच्या आहुती देऊन ॥८-४८॥

मग वज्रासन तेचि उर्वी । शोधूनि आधारमुद्रा बरवी ।
वेदिका रचे मांडवीं । शरीराच्या ॥ ४९ ॥
नंतर वज्रासन हीच कोणी पृथ्वी, ती शुद्ध करून, शरीररूपी मांडवात आधारमुद्रारूपी चांगला ओटा घालतात. ॥८-४९॥

तेथ संयमाग्नीचीं कुंडें । इंद्रियद्रव्याचेनि पवाडें ।
यजिजती उदंडें । युक्तिघोषें ॥ ५० ॥
तेथे ध्यान-धारणा-समाधि-रूपी अग्नीच्या कुंडात बंधत्रयाच्या मंत्रघोषाने इंद्रियरूपी विपुल द्रव्याच्या साहाय्याने यजन करतात. ॥८-५०॥

मग मनप्राणसंयमु । हाचि हवनसंपदेचा संभ्रमु ।
येणें संतोषविजे निर्धूमु । ज्ञानानळु ॥ ५१ ॥
नंतर मन, प्राण, आणि संयम अशा या यज्ञसंपत्तीच्या समारंभाने धूररहित ज्ञानरूप अग्नीला संतुष्ट करतात. ॥८-५१॥

ऐसेनि हें सकळ ज्ञानीं समर्पें । मग ज्ञान तें ज्ञेयीं हारपे ।
पाठी ज्ञेयचि स्वरूपें । निखिल उरे ॥ ५२ ॥
अशा रीतीने हे वर सांगितलेले साहित्य, ज्ञानरूपी अग्नीमधे समर्पण केल्यावर मग त्या ज्ञानाचाही ज्ञेयामधे लय होतो नंतर केवल ज्ञेयच स्वरूपाने रहाते ॥८-५२॥

तया नांव गा अधियज्ञु । ऐसें बोलिला जंव सर्वज्ञु ।
तंव अर्जुन अतिप्राज्ञु । तया पातलें तें ॥ ५३ ॥
त्यास अधियज्ञ असे नाव आहे. असे सर्व जाणणारा श्रीकृष्ण म्हणाला तेव्हा अर्जुन अतिशयच बुद्धिमान असल्यामुळे त्याच्या हे लक्षात आले. ॥८-५३॥

हें जाणोनि म्हणितलें देवें । पार्था परिसतु आहासि बरवें ।
या कृष्णाचिया बोलासवें । येरु सुखाचा जाहला ॥ ५४ ॥
हे लक्षात येऊन देव म्हणाले, अर्जुना, तू चांगल्या तर्‍हेने ऐकत आहेस. ह्या कृष्णाच्या संतोषाने अर्जुन आनंदित झाला. ॥८-५४॥

देखा बालकाचिया धणि धाइजे । कां शिष्याचेनि जाहलेपणें होइजे ।
हें सद्‌गुरूचि एकलेनि जाणिजे । कां प्रसवतिया ॥ ५५ ॥
पहा, लहान मुलाच्या तृप्तीने आपण तृप्त व्हावे किंवा शिष्याच्या पूर्ण होण्याने आपण कृतार्थ व्हावे हे एक जन्मदात्री आई किंवा सद्गुरूच समजतात. ॥८-५५॥

म्हणौनि सात्त्विक भावांची मांदी । कृष्णाआंगीं अर्जुनाआधीं ।
न समातसे परी बुद्धी । सांवरूनि देवें ॥ ५६ ॥
म्हणून अष्टसात्विकभावांचा समुदाय अर्जुनाच्या अगोदर श्रीकृष्णांच्या अंगी मावेनासा झाला. परंतु देवाने आपल्या बुद्धीने तो सावरून ॥८-५६॥

मग पिकलिया सुखाचा परिमळु । कीं निवालिया अमृताचा कल्लोळु ।
तैसा कोंवळा आणि सरळु । बोलु बोलिला ॥ ५७ ॥
नंतर सुख हेच कोणी पिकलेले फळ, त्याचा सुवास अथवा थंड अशा अमृताची लाट, त्याप्रमाणे मृदु व सरळ असे भाषण केले. ॥८-५७॥

म्हणे परिसणेयांचिया राया । आइकें बापा धनंजया ।
ऐसी जळों सरलिया माया । तेथ जाळितें तेंही जळे ॥ ५८ ॥
श्रीकृष्ण म्हणाले, श्रोत्यातील श्रेष्ठ अर्जुना ऐक. याप्रमाणे माया जळण्याची संपली की तिला जाळणारे जे ज्ञान तेही त्या प्रसंगी जळते. (नाहीसे होते). ॥८-५८॥

अन्तकाले च मामेव स्मरन्मुक्त्वा कलेवरम् ।
यः प्रयाति स मद्‌भावं याति नास्त्यत्र संशयः ॥ ५ ॥
मरणाचे वेळी जो केवळ माझेच स्मरण करीत शरीराचा त्याग करतो, तो मत्स्वरूप पावतो, याविषयी संशय नाही. ॥८-५॥

जें आतांचि सांगितलें होतें । अगा अधियज्ञ म्हणितला जयातें ।
जे आदींचि तया मातें । जाणोनि अंतीं ॥ ५९ ॥
अर्जुना, ज्यास अधियज्ञ म्हणतात म्हणून आताच सांगितले त्या मला जे पुरुष हयात असतानाच जाणून, मरणकाळीही जाणतात ॥८-५९॥

ते देह झोल ऐसें मानुनी । ठेले आपणपें आपण हो‍उनी ।
जैसा मठ गगना भरुनी । गगनींचि असे ॥ ६० ॥
ज्याप्रमाणे मठ (घर) हा पोकळीने भरून पोकळीत असतो, त्याप्रमाणे ते पुरुष देह खोटा आहे असे विचाराने जाणून आपणच (आत्मरूप) होऊन आपल्या ठिकाणी असतात. ॥८-६०॥

ये प्रतीतीचिया माजघरीं । तया निश्चयाची वोवरी ।
आली म्हणौनि बाहेरी । नव्हेचि से ॥ ६१ ॥
अशा या वरील अनुभवाच्या माजघरात निश्चयाच्या खोलीत त्यास झोप आली. म्हणून त्यास बाह्य विषयांची आठवणच होत नाही. ॥८-६१॥

ऐसें सबाह्य ऐक्य संचलें । मीचि होऊनि असतां रचिलें ।
बाहेरि भूतांचीं पांचही खवलें । नेणतांचि पडिलीं ॥ ६२ ॥
याप्रमाणे अंतर्बाह्य ऐक्य भरलेले असून ते पुरुष मद्रूप होऊन राहिले असता बाहेर पाच भूतांच्या खपल्या पडल्या तरी त्यास समजत नाही. ॥८-६२॥

आतां उभेयां उभेपण नाहीं जयाचें । मा पडिलिया गहन कवण तयाचें ।
म्हणौनि प्रतीतीचिये पोटींचें । पाणी न हाले ॥ ६३ ॥
जिवंतपणी शरीर उभे असता (सर्व व्यवहार करत असता) ज्यास शरीराच्या उभेपणाची जाणीव नाही, त्यास मग शरीर पडण्य़ाचे संकट काय करणार ? म्हणून अशाही प्रसंगी त्यांच्या स्वरूपानुभावाच्या पोटातील (निश्चयरूपी) पाणी हलत नाही. ॥८-६३॥

ते ऐक्याची आहे वोतिली । कीं नित्यतेचिया हृदयीं घातली ।
जैसी समरससमुद्रीं धुतली । रुळेचिना ॥ ६४ ॥
ती त्यांची प्रतीती ऐक्यरसाची जणु काय ओतलेली असते. अथवा त्रिकालाबाधित जे स्वरूप त्या स्वरूपाच्या हृदयात ती जणुकाय घातलेली असते. त्यांची प्रतीती ऐक्यतारूपी समुद्रात जणुकाय धुतलेली असते त्यामुळे ती मळत नाही. ॥८-६४॥

पैं अथावीं घट बुडाला । तो आंतबाहेरी उदकें भरला ।
पाठीं दैवगत्या जरी फुटला । तरी उदक काय फुटे ? ॥ ६५ ॥
खोल पाण्यात घट बुडाला असता तो आतबाहेर पाण्यानेच भरलेला असतो. नंतर दैववशात् पाण्यात असतांनाच जर फुटला तर त्या घटात असलेले पाणी फुटते काय ? ॥८-६५॥

नातरी सर्पें कवच सांडिलें । कां उबारेनें वस्त्र फेडिलें ।
तरी सांग पां काय मोडलें । अवेवामाजीं ? ॥ ६६ ॥
अथवा सर्पाने कात टाकली अगर एखाद्याने उकडते म्हणून वस्त्र टाकले तर असे करण्यात अवयवांमधे काही मोडतोड झाली का ? सांग बरे ? ॥८-६६॥

तैसा आकारु हा आहाच भ्रंशे । वांचूनी वस्तु ते सांचलीचि असे ।
तेचि बुद्धि जालिया विसकुसे । कैसेनि आतां ॥ ६७ ॥
त्याप्रमाणे वरवर भासणारा जो शरीररूपी आकार तोच नाश पावत असून त्या शरीराशिवाय असणारी आत्मवस्तु तर जशी सर्वत्र भरलेली आहे तशीच आहे. तीच आत्मवस्तु आपण अनुभवाने झाल्यावर आता (देहपाताच्या वेळी) बुद्धीचा निश्चय कसा डगमगेल ? ॥८-६७॥

म्हणौनि यापरी मातें । अंतकाळीं जाणतसाते ।
जे मोकलिती देहातें । ते मीचि होती ॥ ६८ ॥
म्हणून याप्रमाणे मला अंतकाळी जाणत असता जे देहाचा त्याग करतात ते मद्रूपच होतात. ॥८-६८॥

एर्‍हवीं तरी साधारण । उरीं आदळलिया मरण ।
जो आठवु धरी अंतःकरण । तेंचि होईजे ॥ ६९ ॥
एरवी साधारण विचार करून पाहिले तर मरण येऊन ठेपले असता मनुष्याच्या मनाला ज्या वस्तूची आठवण होते, तीच वस्तु तो प्राणी होतो. ॥८-६९॥

जैसा कवणु एकु काकुळती । पळतां पवनगती ।
दुपाउलीं अवचितीं । कुहामाजीं पडियेला ॥ ७० ॥
ज्याप्रमाणे कोणी एखादा मनुष्य दीनपणे वार्‍यासारखा पळत असता एकाएकी दोन्ही पावले निसटून आडात पडला ॥८-७०॥

आतां तया पडणयाआरौतें । पडण चुकवावया परौतें ।
नाहीं म्हणौनि तेथें । पडावेंचि पडे ॥ ७१ ॥
आता त्याला पडण्यापूर्वी ते पडणे चुकवण्याकरता दुसरा काही उपाय नाही. म्हणून जसे त्याला पडावेच लागते. ॥८-७१॥

तेविं मृत्यूचेनि अवसरें एकें । जें येऊनि जीवासमोर ठाके ।
तें होणें मग न चुके । भलतयापरी ॥ ७२ ॥
त्याप्रमाणे मृत्यूच्या प्रसंगी जी काही एक वस्तु जीवाच्यासमोर येऊन उभी रहाते (ज्या वस्तुकडे मन लागते) ती वस्तु होणे मग कोणत्याही प्रकारे चुकत नाही. ॥८-७२॥

आणि जागता जंव असिजे । तंव जेणें ध्यानें भावना भाविजे ।
डोळां लागतखेंवो देखिजे । तेंचि स्वप्नीं ॥ ७३ ॥
आणि जेव्हा मनुष्य जागा असतो त्यावेळेला ज्याचा ध्यास घेतलेला असतो तेच त्याला डोळा लागल्याबरोबर स्वप्नात दिसते. ॥८-७३॥

यं यं वापि स्मरन्भावं त्यजत्यन्ते कलेवरम् ।
तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भायवभावितः ॥ ६ ॥
हे कुंतिपुत्रा ज्या ज्या वस्तूचे स्मरण करत मनुष्य अंतकाली देहाचा त्याग करतो, त्या त्या वस्तुप्रत तो सर्वदा (तिच्या स्मरणामुळे) तिच्या ठिकाणी एकाग्रचित्त झालेला असल्यामुळे जातो. ॥८-६॥

तेविं जितेनि अवसरें । जें आवडोनि जीवीं उरे ।
तेंचि मरणाचिये मेरे । फार हों लागे ॥ ७४ ॥
याप्रमाणॆ जिवंत असतांना, जी गोष्ट आवडीने अंत:करणात रहाते, तीच मरणाचे वेळी वारंवार मनात येते. ॥८-७४॥

आणि मरणीं जया जें आठवे । तो तेचि गतीतें पावे ।
म्हणौनि सदा स्मरावें । मातेंचि तुवां ॥ ७५ ॥
आणि मरणसमयी ज्यास जी वस्तु आठवते त्याच गतीला तो जातो, असे आहे म्हणूण तू नेहेमी माझेच स्मरण कर. ॥८-७५॥

तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च ।
मय्यर्पितमनोबुद्धिर्मामेवैष्यस्यसंशयम् ॥ ७ ॥
म्हणून सर्व प्रसंगी माझे स्मरण कायम ठेव आणि युद्ध कर. मन व बुद्धी माझ्या ठिकाणी अर्पण करून राहिलास म्हणजे तू नि:संसय मजप्रतच येशील. ॥८-७॥

डोळां जें देखावें । कां कानीं हन ऐकावें ।
मनीं जें भावावें । बोलावें वाचें ॥ ७६ ॥
डोळ्यांनी जे पहावे किंवा कानांनी जे ऐकावे अथवा मनाने ज्याची कल्पना करावी किंवा वाणीने जे बोलावे ॥८-७६॥

तें आंत बाहेरी आघवें । मीचि करूनि घालावें ।
मग सर्वीं काळीं स्वभावें । मीचि आहें ॥ ७७ ॥
वरील सांगितलेले व्यवहार आत बाहेर मीच करून घाल, मग सर्वकाळ मी सहजच आहे. ॥८-७७॥

अर्जुना ऐसें जाहालिया । मग न मरिजे देह गेलिया ।
मा संग्रामु केलिया । भय काय तुज ? ॥ ७८ ॥
अरे असे झाले (सर्व मद्स्वरूप आहे असे) झाले म्हणजे मग देह नाहीसा झाला तरी तो मरत नाही. मग लढाई केलीस तरी तुला काय भय आहे ? ॥८-७८॥

तूं मन बुद्धि सांचेंसीं । जरी माझिया स्वरूपीं अर्पिसी ।
तरी मातेंचि गा पावसी । हे माझी भाक ॥ ७९ ॥
तू मनबुद्धि ही खरोखर माझ्या स्वरूपात अर्पण करशील तर मग माझ्याशी एकरूपच होशील., हे माझे प्रतिज्ञापूर्वक सांगणे आहे. ॥८-७९॥

हेंच कायिसया वरी होये । ऐसा जरी संदेहो वर्ततु आहे ।
तरी अभ्यासूनि आदीं पाहें । मग नव्हे तरी कोपें ॥ ८० ॥
अशी स्थिती कशाने होईल असा जर संशय तुझ्या मनात राहिला असेल तर अगोदर अभ्यास करून पहा. मग ती स्थिती झाली नाही तर रागाव. ॥८-८०॥

अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना ।
परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिन्तयन् ॥ ८ ॥
हे पार्था अभ्यासामुळे (अभ्यास-विषयांपासून मन परावृत्त करणे) स्थिर झालेल्या व अन्यत्र न जाणार्‍या चित्ताने (परम पुरुषाचे) सतत स्मरण करणारा मनुष्य त्या तेजस्वी परम पुरुषाप्रत जातो. ॥८-८॥

येणेंचि अभ्यासेंसी योगु । चित्तासि करी पां चांगु ।
अगा उपायबळें पंगु । पहाड ठाकी ॥ ८१ ॥
याच अभ्यासाबरोबर चित्ताची सांगड चांगल्याप्रकारे घाल. अरे प्रयत्नांच्या बळावर पांगळा देखील पर्वत चढून जातो. ॥८-८१॥

तेविं सदभ्यासें निरंतर । चित्तासि परमपुरुषाची मोहर ।
लावीं मग शरीर । राहो अथवा जावो ॥ ८२ ॥
त्याप्रमाणे चांगल्या अभ्यासाने तू निरंतर आपल्या चित्ताला परमपुरुषाचे ध्यान लाव. असे झाल्यावर मग शरीर राहो अथवा जावो ॥८-८२॥

जें नानागतीतें पाववितें । तें चित्त वरील आत्मयातें ।
मग कवण आठवी देहातें । गेलें कीं आहे ? ॥ ८३ ॥
अनेक गतीस पावणार्‍या चित्ताने एकदा आत्म्यास वरले मग देह आहे किंवा गेला ह्याची आठवण कोणी ठेवायची ? ॥८-८३॥

पैं सरितेचेनि ओघें । सिंधुजळा मीनलें घोघें ।
तें काय वर्तत आहे मागें । म्हणौनि पाहों येती ? ॥ ८४ ॥
नदीच्या ओघाने घो घो करीत समुद्राच्या पाण्यास मिसळालेले जे पाणी ते मागे काय चालले आहे म्हणून पहाण्याकरता परत येते काय ? ॥८-८४॥

ना तें समुद्रचि होऊन ठेलें । तेविं चित्ताचें चैतन्य जाहालें ।
जेथ यातायात निमालें । घनानंद जें ॥ ८५ ॥
नाही तर ते समुद्रच होऊन राहिले, त्याप्रमाणे ते चित्तच चिद्रूप बनल्यावर मग त्या ठिकाणी जन्ममरणाचा शीण सहजच राहिला, कारण ते चैतन्य एकरस व आनंद आहे. ॥८-८५॥

कविं पुराणमनुशासितारमणोरणीयांसमनुस्मरेद्यः ।
सर्वस्य धातारमचिन्त्यरूपमादित्यवर्णं तमसः परस्तात् ॥ ९ ॥
सर्वज्ञ, पुरातन, विश्वाचा नियंता, अणूपेक्षा सुद्धा लहान, सर्वस्थूलसूक्ष्म जगाचा आश्रय, ज्याचे स्वरूप कल्पनेला अगोचर आहे असा, सूर्याप्रमाणे (प्रकशरूप असे) ज्याचे स्वरूप आहे असा (अज्ञनरूप) अंधकाराच्या पलीकडे असलेला जो परम पुरुष त्याचे जो खालील प्रकारे सतत स्मरण करतो ॥८-९॥

जयाचें आकारावीण असणें । जया जन्म ना निमणें ।
जें आघवेंचि आघवेंपणें । देखत असे ॥ ८६ ॥
ज्याचे अस्तित्व आकाराशिवाय आहे, व जे जन्ममृत्युरहित असून जे सर्वच असल्यामुळॆ सर्वपणाने पहाते ॥८-८६॥

जें गगनाहूनि जुनें । जें परमाणुहूनि सानें ।
जयाचेनि सन्निधानें । विश्व चळे ॥ ८७ ॥
जे आकाशाहून पुरातन आहे व जे परमाणुपेक्षाही लहान असून ज्याच्या सांनिध्याने विश्वाची हालचाल होते ॥८-८७॥

जें सर्वांते यया विये । विश्व सर्व जेणें जिये ।
हेतु जया बिहे । अचिंत्य जें ॥ ८८ ॥
जे या सर्वांना प्रसवते व ज्याच्या योगाने सर्व असते, तर्क ज्याला भितो असे जे कल्पनेच्या पलिकडचे आहे ॥८-८८॥

देखे वोळंबा इंगळु न चरे । तेजीं तिमिर न शिरे ।
जे दिहाचे अंधारें । चर्मचक्षूसीं ॥ ८९ ॥
पहा विस्तवास जशी वाळवी लागत नाही, ज्या स्वरूपप्रकाशाच्या ठिकाणी अज्ञानरूप अंधाराचा लाग लागत नाही, त्याचप्रमाणे जो स्वभावत: ज्ञानप्रकाशाचा दिवस असूनही स्थूल दृष्टीला अंधार आहे, ॥८-८९॥

सुसडा सूर्यकणांच्या राशी । जो नित्य उदो ज्ञानियांसी ।
अस्तमानाचे जयासी । आडनांव नाहीं ॥ ९० ॥
(जो स्वरूपदिवस अज्ञान्यांना अंधाराप्रमाणे असतो, तोच स्वरूपदिवस ज्ञान्यांना कसा असतो हे या ओवीत सांगतात.) जे चैतन्य स्वच्छ सूर्यरूपी कणांचा ढीग आहे, जे ज्ञानवानांना नित्य अपरोक्ष आहे व ज्या चैतन्यरूप दिवसाला अस्तमानाचे आडनाव सुद्धा नाही (जेथे अस्त होत नाही). ॥८-९०॥



[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]



प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव ।
भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक् स तं परं पुरुषमुपैति दिव्यम् ॥ १० ॥
(म्हणजे जो) मरणसमयी एकाग्र मनाने, भक्तीने व योगबलाने युक्त होत्साता, दोन भुवयांच्यामधे प्राणवायूची योग्य प्रकारे स्थापना करून (त्याचे स्मरण करतो) तो त्या तेजस्वी परम पुरुषाप्रत जातो. ॥८-१०॥

तया अव्यंगवाणेया ब्रह्मातें । प्रयाणकाले प्राप्ते ।
जो स्थिरावलेनि चित्तें । जाणोनि स्मरे ॥ ९१ ॥
मरणकाळ प्राप्त झाला असतांना, स्थिर अंत:करणाने काहीच व्यंग नसलेल्या ब्रह्माला, जो जाणून स्मरतो, ॥८-९१॥

बाहेरी पद्मासन रचुनी । उत्तराभिमुख बैसोनि ।
जीवीं सुख सूनि । क्रमयोगाचे ॥ ९२ ॥
बाहेर पद्मासन घालून, उत्तरेकडे तोंड करून बसून, कर्मयोगाचे सुख (कर्मयोगाच्या आचरणाने प्राप्त झालेल्या समाधानाचे सुख) अंत:करणात साठवून ॥८-९२॥

आंतु मीनलेनि मनोधर्में । स्वरूपप्राप्तीचेनि प्रेमें ।
आपेआप संभ्रमें । मिळावया ॥ ९३ ॥
आत मन एकाग्र झाल्याने व आत्मस्वरूपप्राप्तीच्या प्रेमाने आपल्या ठिकाणी आपण समारंभाने मिळण्याकरता ॥८-९३॥

आकळलेनि योगें । मध्यमा मध्य मार्गें ।
अग्निस्थानौनि निगे । ब्रह्मरंध्रा ॥ ९४ ॥
स्वाधीन झालेल्या अष्टांगयोगाने, सुषुम्ना नाडीच्या मध्यममार्गाने, अग्निस्थानापासून ब्रह्मरंध्रास जाण्यास जो प्राण निघतो ॥८-९४॥

तेथ अचेत चित्ताचा सांगातु । आहाचवाणा दिसे मांडतु ।
जेथ प्राणु गगनाआंतु । संचरे कां ॥ ९५ ॥
जेथे प्राणवायु मूर्ध्नीआकाशात प्रवेश करतो, तेथे प्राणांचा आणि चित्ताचा वरवर संबंध झालेला दिसतो ॥८-९५॥

परी मनाचेनि स्थैर्यें धरिला । भक्तीचिया भावना भरला ।
योगबळें आवरला । सज्ज होऊनि ॥ ९६ ॥
परंतु मनाच्या स्थिरतेने धरलेला व भक्तीच्या भावाने व योगबलाने आवरलेला असा तयार होऊन ॥८-९६॥

तो जडाजडातें विरवितु । भ्रूलतामाजीं संचरतु ।
जैसा घंटानाद लयस्तु । घंटेसीच होय ॥ ९७ ॥
तो प्राणवायु चेतन व अचेतन पदार्थास नाहीसे करून भुवयात संचार करतो (आणि तेथे लय पावतो). ॥८-९७॥

कां झांकलिया घटींचा दिवा । नेणिजे काय जाहला केव्हां ।
या रीतीं जो पांडवा । देह ठेवी ॥ ९८ ॥
अथवा घटाखाली झाकलेला दिवा केव्हा काय झाला (विझला) हे जसे कळत नाही, त्याप्रमाणे अर्जुना जो देह ठेवतो, ॥८-९८॥

तो केवळ परब्रह्म । जया परमपुरुष ऐसें नाम ।
तें माझें निजधाम । होऊनि ठाके ॥ ९९ ॥
तो पुरुष जे केवल ब्रह्म आहे, असे जे माझे खास स्वरूप आहे ते होऊन रहातो. ॥८-९९॥

यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यतयो वीतरागाः ।
यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्ष्ये ॥ ११ ॥
जे अविनाशी आहे असे वेदवेत्ते सांगतात (संसाराच्या) इच्छेपासून पराड्मुख झालेले विरक्त ज्यामधे प्रवेश करतात व जे जाणण्याची इच्छा करणारे ब्रह्मचर्य आचरण करतात ते ब्रह्म नामक पद मी तुला संक्षेपाने सांगतो. ॥८-११॥

सकळां जाणणेयां जे लाणी । तिये जाणिवेची जे खाणी ।
तयां ज्ञानियांचिये आयणी । जयातें अक्षरु म्हणिपे ॥ १०० ॥
जे ज्ञान, संपूर्ण ज्ञानाचा शेवट आहे, त्या ज्ञानाची जे केवळ खाणच आहेत, त्या ब्रह्मज्ञान्यांच्या बुद्धीने ज्यास (ब्रह्मरूपास) अविनाशी असे म्हणतात ॥८-१००॥

चंडवातेंही न मोडे । तें गगनचि की फुडें ।
वांचूनि जरी होईल मेहुडें । तरी उरेल कैंचें ? ॥ १०१ ॥
प्रचंड वार्‍यानेही जे नाहीसे होत नाही, ते खरोखर आकाशच होय, नाहीतर ते ढग असते तर ते प्रचंड वार्‍यापुढे कसे टिकते ? ॥८-१०१॥

तेविं जाणणेया जें आकळिलें । तें जाणिवलेपणेंचि उमाणलें ।
मग नेणवेचि तया म्हणितलें । अक्षर सहजें ॥ १०२ ॥
त्याप्रमाणे ज्ञानाला जे विषय झाले आणि विषय झाल्यामुळेच त्याच्याकडून जे मोजले गेले (ते क्षर होय). नंतर वृत्तीज्ञानाला जे विषय होत नाही (तर उलट वृत्तिज्ञानच जेथे लय पावते) त्याला सहजच अक्षर असे म्हटले. ॥८-१०२॥

म्हणौनि वेदविद नर । म्हणती जयातें अक्षर ।
जें प्रकृतीसी पर । परमात्मरूप ॥ १०३ ॥
म्हणून वेद जाणणारे पुरुष ज्याला अक्षर असे म्हणतात आणि जे परमात्मस्वरूप प्रकृतिपलिकडचे आहे, ॥८-१०३॥

आणि विषयांचे विष उलंडूनि । जे सर्वेंद्रियां प्रायश्चित्त देऊनि ।
आहाति देहाचिया बैसोनि । झाडातळीं ॥ १०४ ॥
आणि जे विषयांचा विषवत् त्याग करून सर्वेंद्रियांना शुद्ध करून देहरूप झाडाच्या खाली बसलेले आहेत, ॥८-१०४॥

ते यापरी विरक्त । जयाची निरंतर वाट पाहात ।
निष्कामासि अभिप्रेत । सर्वदा जें ॥ १०५ ॥
याप्रमाने जे विरक्त पुरुष आहेत, ते ज्याची (परब्रह्माची) नेहेमी वाट पहात असतात आणि जे (परब्रह्म) निष्काम पुरुषांना अखंड प्रिय असते ॥८-१०५॥

जयाचिया आवडी । न गणिती ब्रह्मचर्याचीं सांकडीं ।
निष्ठुर होऊनि बापुडीं । इंद्रियें करिती ॥ १०६ ॥
ज्याच्या प्रेमाने ते ब्रह्मचर्यासारख्या कठिण गोष्टी जुमानीत नाहीत आणि इंद्रियांवर कठोर होऊन त्यांना दीन करतात, ॥८-१०६॥

ऐसें जें पद । दुर्लभ आणि अगाध ।
जयाचिये थडिये वेद । चुबुकळिले ठेले ॥ १०७ ॥
असे जे ठिकाण (ब्रह्मस्वरूप) जे मिळावयास कठिण व जाणण्यास कठिण व ज्याच्या अलिकडच्या काठाशीच वेद गटांगळ्या खात राहिले आहेत (वेदासही जे अगम्य आहे) ॥८-१०७॥

तें ते पुरुष होती । जे यापरी लया जाती ।
तरी पार्था हेचि स्थिती । एकवेळ सांगों ॥ १०८ ॥
(ते परब्रह्म जे पुरुष याप्रमाणे देह ठेवतात ते होतात. तर अर्जुना हाच प्रकार तुला आणखी एक वेळ सांगतो. ॥८-१०८॥

तेथ अर्जुनें म्हणितलें स्वामी । हेंचि म्हणावया होतों पां मी ।
तंव सहजें कृपा केली तुम्हीं । तरी बोलिजो कां ॥ १०९ ॥
त्या प्रसंगी अर्जुन म्हणाला, महाराज, मी हेच विचारण्याच्या बेतात होतो. इतक्यात तुम्ही सहज कृपा केली तर महाराज, आता सांगावे. ॥८-१०९॥

परि बोलावें तें अति सोहोपें । तेथें म्हणितलें त्रिभुवनदीपें ।
तुज काय नेणों संक्षेपें । सांगेन ऐक ॥ ११० ॥
परंतु जे सांगाल ते अतिशय सोपे करून सांगा. त्या प्रसंगी तीन लोकांचे प्रकाशन करणारे श्रीकृष्ण म्हणाले, आम्ही तुला ओळखत नाही काय ? तुला थोडक्यात सांगतो ऐक. ॥८-११०॥

तरी मना या बाहेरिलीकडे । यावयाची साविया सवे मोडे ।
हें हृदयाचिया डोहीं बुडे । तैसें कीजे ॥ १११ ॥
तरी या मनाला बाहेर येण्याची जी सवय आहे ती सहज नाहीशी करून ते हृदयाच्या डोहात बुडेल तसे करावे. ॥८-१११॥

सर्वद्वाराणि संयम्य मनो हृदि निरुध्य च ।
मूर्ध्न्याधायात्मनः प्राणमास्थितो योगधारणाम् ॥ १२ ॥
सर्व इंद्रियांचे नियमन करून हृदयाचे ठिकाणी मनाचा निरोध करून आणि आपला प्राणवायु मस्तकामधे ठेऊन योगाचरणामधे स्थित होत्साता, ॥८-१२॥

परी हे तरीच घडे । जरी संयमाचीं अखंडें ।
सर्वद्वारीं कवाडें । कळासती ॥ ११२ ॥
परंतु जर सर्वेंदियांच्या द्वारात नेहेमी निग्रहाची कवाडे लावली तरच हे घडेल. ॥८-११२॥

तरी सहजें मन कोंडलें । हृदयींचि असेल उगलें ।
जैसें करचरणीं मोडलें । परिवरु न संडीं ॥ ११३ ॥
मग ज्याप्रमाणे हात-पाय मोडलेला मनुष्य घर सोडत नाही, त्याप्रमाणे मग स्वभवत:च कोंडलेले मन अंत:करणात स्वस्थ राहील. ॥८-११३॥

तैसें चित्त राहिलिया पांडवा । प्राणांचा प्रणवुचि करावा ।
मग अनुवृत्तिपंथें आणावा । मूर्ध्निवरी ॥ ११४ ॥
अर्जुना तसे चित्त स्थिर झाले असता मग प्राणवायूचा ॐकार करून (प्राणाने ॐकाराचे चिंतन केले असता प्राण प्रणवरूप होतो) त्यास मग सुषुम्ना नाडीच्या मार्गाने मूर्ध्नीआकाशापर्यंत आणावा. ॥८-११४॥

तेथ आकाशीं मिळे न मिळे । तैसा धरावा धारणाबळें ।
जंव मात्रात्रय मावळे । अर्धबिंबीं ॥ ११५ ॥
तेथे मूर्ध्नीआकाशात प्राणवायूचा लय होईल न होईल अशा अर्धवट स्थितीत, धारणेच्या जोरावर धरून ठेवावा. जेथेपर्यंत अकार, उकार व मकार या तीन मात्रा अर्धमात्रारूप ॐकार बिंदूमधे नाहीशा झाल्या नाहीत, ॥८-११५॥

तंववरी तो समीरु । निराळीं कीजे स्थिरु ।
मग लग्नीं जेविं ॐकारु । बिंबींच विलसे ॥ ११६ ॥
तोपर्यंत तो प्राणवायु मूर्ध्नीआकाशात निश्चल करावा. मग अर्धबिंबात मात्रात्रयाचे ऐक्य झाले असता ॐकार अर्धमात्रेत जसा शोभतो (लयाला पावतो) तसा तो प्राण मूर्ध्न्याकाशात शोभतो (लयाला पावतो). ॥८-११६॥

ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन्मामनुस्मरन् ।
यः प्रयाति त्यजन्देहं स याति परमां गतिम् ॥ १३ ॥
ॐ या एकाक्षरी ब्रह्माचा उच्चार करत असता व माझे स्मरण करत असता जो देहाचा त्याग करतो. तो अत्यंत श्रेष्ठ अशा गतीला जातो. ॥८-१३॥

तैसें ॐ हें स्मरों सरे । आणि तेथेंचि प्राणु पुरे ।
मग प्रणवांतीं उरे । पूर्णघन जें ॥ ११७ ॥
तेव्हा ॐ हे स्मरण्याचे संपून तेथेच प्राणवायु संपतो. मग ॐकार स्मरण्याचे राहिले की जे पूर्णब्रह्म तेच काय ते एक रहाते. ॥८-११७॥

म्हणौनि प्रणवैकनाम । हें एकाक्षर ब्रह्म ।
जो माझें स्वरूप परम । स्मरतसांता ॥ ११८ ॥
म्हणून प्रणव हे एक ज्याचे नाम आहे व जे एकाक्षर ब्रह्म आहे, ते माझे मुख्य स्वरूप असून त्या स्वरूपाचे स्मरण करत असतांना ॥८-११८॥

यापरी त्यजी देहातें । तो त्रिशुद्धी पावे मातें ।
जया पावणया परौतें । आणिक पावणें नाहीं ॥ ११९ ॥
जो अशा स्थितीतच देहत्याग करतो, तो ज्या ब्रह्मप्राप्तीपलिकडे दुसरी काही एक गोष्ट साध्य करण्याची नाही त्या माझ्या स्वरूपाला निश्चयाने पावतो. ॥८-११९॥

तेथ अर्जुना जरी विपायें । तुझ्या जीवीं हन ऐसें जाये ।
ना हें स्मरण मग होये । कायसयावरी अंतीं ॥ १२० ॥
येथे अर्जुना, कदाचित तुझ्या मनात असे वाटेल की अंतकाळी स्मरण कशाने होणार ? ॥८-१२०॥

इंद्रियां अनुघडु पडलिया । जीविताचें सुख बुडालिया ।
आंतुबाहेरी उघडलिया । मृत्युचिन्हें ॥ १२१ ॥
कारण इंद्रिये आपापली कामे करण्यास असमर्थ स्थितीत असल्यावर जगण्यात असलेले सुख नाहीसे झाल्यावर आत बाहेर मरणाची लक्षणे उघड दिसू लागल्यावर ॥८-१२१॥

ते वेळीं बैसावेंचि कवणें । मग कवण निरोधी करणें ।
तेथ काह्याचेनि अंतःकरणें । प्रणव स्मरावा ॥ १२२ ॥
मग त्यावेळेस योगसाधनास कोणी बसावे ? व इंद्रियांचा निग्रह कोणी करावा ? आणि कोणत्या अंत:करणाने ॐकाराचे स्मरण करावे ? ॥८-१२२॥

तरि गा ऐशिया हो ध्वनी । झणें थारा देशी हो मनीं ।
पैं नित्य सेविला मी निदानीं । सेवकु होय ॥ १२३ ॥
तर बाबा अशा शंकेला कदाचित तू मनात जागा देशील तर अशी शंका मनात आणू नकोस. कारण माझी जे नेहेमीच सेवा करतात त्या भक्तांच्या मरणकाळी मी त्यांचा सेवक होतो. ॥८-१२३॥

अनन्यचेताः सततं यो मां स्मरति नित्यशः ।
तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः ॥ १४ ॥
मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयमशाश्वतम् ।
नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धि परमां गताः ॥ १५ ॥
पार्था, जो सतत अनन्यचित्त (माझ्याखेरीज इतरत्र चित्त न ठेवणारा) होत्साता नित्य माझे स्मरण करतो, त्या माझ्याशी निरंतर एकवटलेल्या योग्याला मी सुलभच आहे. ॥८-१४॥
ही श्रेष्ठ स्थिती प्राप्त झालेल्या महात्म्यांना मजप्रत आल्यानंतर, दु:खाचे आगर असलेला व नश्वर असा पुनर्जन्म प्राप्त होत नाही. ॥८-१५॥

जे विषयांसि तिळांजळी देउनी । प्रवृत्तीवरी निगड वाऊनि ।
मातें हृदयीं सूनि । भोगिताती ॥ १२४ ॥
जे विषयांना तिलांजली देऊन (विषयांवर पाणी सोडून) प्रवृत्तीला बेडी घालून मला अंत:करणात साठवून माझ्या स्वरूपाचा अनुभव घेतात ॥८-१२४॥

परि भोगितया आराणुका । भेटणें नाहीं क्षुधादिकां ।
तेथ चक्षुरादि रंकां । कवण पाडु ॥ १२५ ॥
परंतु मला हृदयात घालून कितीही भोग घेतला तरी त्यांचे समाधान होत नाही, त्यामुळे भूक व तहान इत्यादिकांचा त्यास पत्ता नसतो, तेथे डोळे इत्यादिकांची काय किंमत आहे ? ॥८-१२५॥

ऐसें निरंतर एकवटले । जे अंतःकरणीं मजशीं लिगटले ।
मीचि होऊनि आटले । उपासिती ॥ १२६ ॥
अशा प्रकारे जे अखंड माझ्याशी एकरूप होऊन अंत:करणाने मला चिकटले ते मद्रूप होऊन माझीच भक्ती करतात. ॥८-१२६॥

तयां देहावसान जैं पावे । तैं तिहीं मातें स्मरावें ।
मग म्यां जरी पावावें । तरी उपास्ति ते कायसी ? ॥ १२७ ॥
त्यांना ज्या वेळेला देह सोडण्याचा प्रसंग येतो त्यावेळेला त्यांनी माझी आठवण करावी आणि मग जर मी त्यांच्याकडे जावे तर त्यांच्या त्या केलेल्या भक्तीची किंमत काय राहिली ? ॥८-१२७॥

पैं रंकु एक आडलेपणें । काकुळती धांव गा धांव म्हणे ।
तरी तयाचिये ग्लानि धांवणें । काय न घडे मज ? ॥ १२८ ॥
कोणी एखादा दीन अडल्यामुळे मरणसमयी काकुळतीने जर मला देवा धावा हो धावा असे म्हणाला तर त्याच्या संकटासमयी मी धावत नाही का ? ॥८-१२८॥

आणि भक्तांही तेचि दशा । तरी भक्तीचा सोसु कायसा ।
म्हणौनि हा ध्वनी ऐसा । न वाखाणावा ॥ १२९ ॥
आणि भक्तांचीही जर तीच अवस्था होत असेल तर मग भक्तीचा एवढा हव्यास तरी कशाकरता करावयाचा ? (अशी आपत्ती येईल) म्हणून अशा प्रकारच्या शंकेला तू महत्व देऊ नकोस. ॥८-१२९॥

तिहीं जे वेळीं मी स्मरावा । ते वेळीं स्मरिला कीं पावावा ।
तो आभारुही जीवां । साहवेचि ना ॥ १३० ॥
त्यांनी ज्यावेळी माझी आठवण करावी त्य़ावेळेला स्मरण करताच मी हजर व्हावे एवढे ओझे देखील माझ्या मनाला सहन होत नाही. ॥८-१३०॥

तें ऋणवैपण देखोनि आंगीं । मी आपुलियाचि उत्तीर्णत्वालागीं ।
भक्तांचियां तनुत्यागीं । परिचर्या करीं ॥ १३१ ॥
तो कर्जदारपणा आपल्या ठिकाणी असलेला पाहून त्या आपल्याच कर्जाच्या फेडीकरता मी भक्तांच्या देह पडण्याच्यावेळी त्यांची सेवाचाकरी करतो. ॥८-१३१॥

देहवैकल्याचा वारा । झणें लागेल या सुकुमारा ।
म्हणौनि आत्मबोधाचिया पांजिरां । सूयें तयातें ॥ १३२ ॥
देहान्तसमयीच्या व्याकुळतेचा स्ंबंध कदाचित् माझ्या या सुकुमा रभक्ताला लागेल म्हणून त्यास मी आत्मज्ञानाच्या पिंजर्‍यात ठेवतो. ॥८-१३२॥

वरी आपुलिया स्मरणाची उवाइली । हींव ऐसी करीं साउली ।
ऐसेनि नित्य बुद्धि संचली । मी आणीं तयातें ॥ १३३ ॥
शिवाय आणखी माझ्याविषयी त्याला असलेले स्मरण हीच कोणी प्रशस्त्त थंडगार अशी सावली, ती त्या पिंजर्‍यावर मी करतो. अशा तर्‍हेने आत्म्याच्या नित्यतेविषयी दृढ झालेली बुद्धी मी त्याला देतो. ॥८-१३३॥

म्हणौनि देहांतींचें सांकडें । माझिया कहींचि न पडे ।
मी आपुलियातें आपुलीकडे । सुखेंचि आणीं ॥ १३४ ॥
म्हणून मरणाचे संकट माझ्या भक्ताला कधीच पडत नाही. माझ्या भक्ताला मी आपल्याकडे काही आयास न पाडता आणतो. ॥८-१३४॥

वरचील देहाची गंवसणी फेडुनी । आहाच अहंकाराचे रज झाडुनी ।
शुद्ध वासना निवडुनी । आपणपां मेळवीं ॥ १३५ ॥
आत्म्यावर असणारी देहरूपी गवसणी काढून टाकून, अहंकाररूपी वरवर असणारी धूळ झाडून, शुद्ध वासना वेगळी काढून घेऊन, त्या भक्ताचे मी आपल्याशी ऐक्य करतो. ॥८-१३५॥

आणि भक्तां तरी देहीं । विशेष एकवंकीचा ठावो नाहीं ।
म्हणौनि अव्हेरु करितां कांहीं । वियोगु ऐसा न वाटे ॥ १३६ ॥
आणि भक्तांना तरी देहात असतांना विशेषत: देहतादात्म्याचा पत्ता नसतो, म्हणून देहत्याग करतांना त्यात देहाचा वियोग असा वाटत नाही. ॥८-१३६॥

नातरी देहांतींचि मियां यावें । मग आपणपें यातें न्यावें ।
हेंही नाहीं स्वभावें । जे आधींचि मज मीनले ॥ १३७ ॥
अथवा मरणाच्या वेळेलाच मी यावे आणि नंतर त्यांना आपणाकडे न्यावे (म्हणजे आपल्या स्वरूपात मिळवावे) हेही घडत नाही, कारण ते भक्त आधीच मला सहज मिळालेले असतात. ॥८-१३७॥

येरी शरीराचिया सलिलीं । असतेपण हेचि साउली ।
वांचूनि चंद्रिका ते ठेली । चंद्रींच आहे ॥ १३८ ॥
एरवी चंद्राच्या चांदण्याचा भास जरी पाण्यात झाला, तरी ते चांदणे चंद्राचेच ठिकाणी आहे, त्याप्रमाणे शरीररूपी पाण्यात जरी तो भक्त भासला, तरी तो नुसता भासमात्र आहे, वास्तविक तो माझ्या स्वरूपीच आहे. ॥८-१३८॥

ऐसे जे नित्ययुक्त । तयांसि सुलभ मी सतत ।
म्हणौनि देहांतीं निश्चित । मीचि होती ॥ १३९ ॥
याप्रमाणे जे माझ्या ठिकाणी नित्य जडलेले असतात, त्यांना मी नेहेमी जवळ आहे. म्हणून ते देह पडल्यावर खात्रीने मीच होतात. ॥८-१३९॥

मग क्लेशतरूची वाडी । जे तापत्रयाग्नीची सगडी ।
जे मृत्युकाकासीं कुरोंडी । सांडिली आहे ॥ १४० ॥
नंतर जे शरीर दु:खरूप झाडांचा बाग व अध्यात्मादि तीन तापरूपी विस्तवाची शेगडी व मृत्युरूपी कावळ्यास उतरून टाकलेला बळी आहे. ॥८-१४०॥

जें दैन्याचें दुभतें । जें महाभयातें वाढवितें ।
जें सकळ दुःखाचें पुरतें । भांडवल ॥ १४१ ॥
जे दीनता प्रसवणारे आहे, जे मरणाला पोसते व जे सर्व दु:खांचे पुरेसे भांडवल आहे ॥८-१४१॥

जें दुर्मतीचें मूळ । जें कुकर्माचें फळ ।
जें व्यामोहाचें केवळ । स्वरूपचि ॥ १४२ ॥
जे दुष्टबुद्धीचे उत्पत्तिस्थान व वाईट क्रियांचे फल आहे, जे मूर्तिमंत केवळ गाढ अविवेकच आहे, ॥८-१४२॥

जें संसाराचें बैसणें । जें विकारांचें उद्यानें ।
जें सकळ रोगांचें भाणें । वाढिलें आहे ॥ १४३ ॥
जे संसाराची बैठक आहे, जे विकाररूपी झाडांचा बगिचा आहे, व जे सर्वरोगांचे वाढलेले ताट आहे, ॥८-१४३॥

जें काळाचा खिचु उशिटा । जें आशेचा आंगवठा ।
जन्ममरणाचा वोलिंवटा । स्वभावें जें ॥ १४४ ॥
जे मृत्यूचे खाऊन उरलेले अन्न आहे, जे मूर्तिमंत आशा आहे, जे जन्म व मृत्यूची स्वाभाविक वाहती वाट आहे. ॥८-१४४॥

जें भुलीचें भरिव । जें विकल्पाचें वोतिंव ।
किंबहुना पेंव । विंचुवांचें ॥ १४५ ॥
जे भ्रमाचे भरलेले व संशयाचे ओतलेले आहे, फार खाय सांगावे ? जे विंचवाचे पेव आहे, ॥८-१४५॥

जें व्याघ्राचें क्षेत्र । जें पण्यांगनेचें मैत्र ।
जें विषयविज्ञानयंत्र । सुपूजित ॥ १४६ ॥
जे शरीर वाघाचे वसतीस्थान आहे, जे वेश्येच्या स्नेहाप्रमाणे दिखाऊ आहे, जे विषयांचा अनुभव करून देणारे सुपूजित यंत्रच आहे, ॥८-१४६॥

जें लावेचा कळवळा । निवालिया विषोदकाचा गळाळा ।
जें विश्वासु आंगवळा । संवचोराचा ॥ १४७ ॥
जे राक्षसांची दिखाऊ कळकळ आहे, जे निवालेल्या विषाचा घोट आहे, जे सावाचे सोंग घेतलेल्या चोराचा मिळवलेला विश्वास आहे, ॥८-१४७॥

जें कोढियाचें खेंव । जें काळसर्पाचें मार्दव ।
गोरियेचें स्वभाव । गायन जें ॥ १४८ ॥
जे रक्तपित्याचे आलिंगन आहे, जे हटकून मरण आणणार्‍या सापाचा मऊपणा आहे व जे पारध्याचे स्वाभविक गायन आहे ॥८-१४८॥

जें वैरियाचा पाहुणेरु । जें दुर्जनाचा आदरु ।
हें असो जें सागरु । अनर्थांचा ॥ १४९ ॥
जे शत्रूचा पाहुणचार आहे, जे दुष्ट लोकांचा सन्मान आहे, हे राहू द्या, जे सर्व अनर्थांचा समुद्र आहे ॥८-१४९॥

जें स्वप्नीं देखिलें स्वप्न । जें मृगजळें सासिन्नलें वन ।
जें धूम्ररजांचें गगन । ओतलें आहे ॥ १५० ॥
जे शरीर स्वप्नात पाहिलेले स्वप्न आहे अथवा मृगजळाच्या पाण्याने भरास आलेले रान आहे, किंवा जे शरीर म्हणजे धुराच्या कणांचे बनविलेले आकाश आहे, ॥८-१५०॥

ऐसें जें हें शरीर । तें ते न पवतीचि पुढती नर ।
जे होऊनि ठेले अपार । स्वरूप माझें ॥ १५१ ॥
ते जे पुरुष माझे अमर्याद स्वरूपच होऊन राहिलेले आहेत त्यांना पुन्हा प्राप्त होत णाही. ॥८-१५१॥

आब्रह्मभुवनाल्लोकाः पुनरावर्तिनोऽर्जुन ।
मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते ॥ १६ ॥
अर्जुना, ब्रह्मलोकासकट सर्व लोकांचे प्राणी पुनर्जन्म पावणारे आहेत. कुंतीपुत्रा, परंतु मजप्रत आल्यानंतर पुनर्जन्म नाही. ॥८-१६॥

एर्‍हवीं ब्रह्मपणाचिये भडसे । न चुकतीचि पुनरावृत्तीचे वळसे ।
परि निवटलियाचे जैसें । पोट न दुखे ॥ १५२ ॥
सहज विचार करून पाहिले तर ब्रह्मपदाचा थोरपणा जरी प्राप्त झाला तरी त्यास पुन्हा पुन्हा पुन्हा येणारे जन्ममरणांचे फेरे चुकतच नाहीत. परंतु ज्याप्रमाणे मेलेल्या माणसाचे पोट दुखत नाही ॥८-१५२॥

नातरी चेइलियानंतरें । न बुडिजे स्वप्नींचेनि महापुरें ।
तेवीं मातें पावले ते संसारें । लिंपतीचि ना ॥ १५३ ॥
अथवा जागे झाल्यानंतर स्वप्नातील महापुराने बुडत नाही, त्याप्रमाणे जे माझ्या स्वरूपी प्राप्त झाले ते पुरुष संसारबंधनात सापडतच नाहीत. ॥८-१५३॥

एर्‍हवीं जगदाकाराचें सिरें । जें चिरस्थायीयांचे धुरे ।
ब्रह्मभुवन गा चवरें । लोकाचळाचें ॥ १५४ ॥
सहज विचार करून पाहिले तर जगदाकाराचा शिरोभाग आणि सर्व चिरस्थायी पदार्थांमधे अग्रगण्य व स्वर्गादी लोकरूपी पर्वताचे शिखर जो सत्यलोक (ब्रह्मदेवाचा लोक) ॥८-१५४॥

जिये गांवींचा पहारु दिवोवरी । एका अमरेंद्राचें आयुष्य न धरी ।
विळोनि पांतीं उठी एकसरी । चवदाजणांची ॥ १५५ ॥
ज्या सत्यलोकरूपी गावाच्या प्रहर दिवसपर्यंत एका इंद्राचे आयुष्य टिकत नाही तर ज्या गावच्या एका दिवसात एकसारखी चौदा इंद्रांची पंगत उठते, (चौदा इंद्र होऊन जातात) ॥८-१५५॥

सहस्रयुगपर्यन्तं अहर्यद्ब्रह्मणो विदुः ।
रात्रि युगसहस्त्रान्तां तेऽहोरात्रविदो जनाः ॥ १७ ॥
एक सहस्र युगे (चार युगांच्या चौकड्या) झाली म्हणजे संपणारा असा ब्रह्मदेवाचा एक दिवस होय आणि एक सहस्र युगे रहाणारी (ब्रह्मदेवाची) एक रात्र होय. असे जे जाणतात ते ब्रह्मदेवाचे अहोरात्र जाणणारे होत. ॥८-१७॥

जैं चौकडिया सहस्र जाये । तैं ठाये ठावो विळुचि होये ।
आणि तैसेचि सहस्रवरिये पाहे । रात्री जेथ ॥ १५६ ॥
चार युगांच्या जेव्हा हजार फेर्‍या होतात, तेव्हा ब्रह्मदेवाचा एक दिवस पूर्ण होतो व पहा त्याच प्रमाणे हजार चौकड्या भरल्या म्हणजे जेथील एक रात्र होते ॥८-१५६॥

येवढें अहोरात्र जेथिंचें । तेणें न लोटती जे भाग्याचे ।
देखती ते स्वर्गींचे । चिरंजीव ॥ १५७ ॥
ज्या ठिकाणचा दिवस व रात्र एवढा मोठा आहे, त्य़ा दिवसाने जे मरत नाहीत ते भाग्यवान हा दिवस पहातात. ते स्वर्गातील चिरंजीव होत. ॥८-१५७॥

येरां सुरगणांची नवाई । विशेष सांगावी येथ काई ।
मुद्दल इंद्राचीचि दशा पाहीं । जे दिहाचे चौदा ॥ १५८ ॥
इतर देवांचे या ठिकाणी विशेष आश्चर्य काय सांगायचे आहे ? मुख्य देवांचा राजा जो इंद्र त्याचीच दशा पहा की ते इंद्र ब्रह्मदेवाच्या एका दिवसात चौदा होतात. ॥८-१५८॥

परि ब्रह्मयाचियाहि आठां पाहारांतें । आपुलिया डोळां देखते ।
जे आहाति गा तयांतें । अहोरात्रविद म्हणिपे ॥ १५९ ॥
परंतु ब्रह्मदेवाच्या आठा प्रहरांना आपल्या डोळ्यांनी पहाणारे जे आहेत, त्यांना ब्रह्मदेवाच्या दिवसरात्रीला जाणणारे म्हणावेत. ॥८-१५९॥

अव्यक्ताद्व्यक्तयः सर्वाः प्रभवन्त्यहरागमे ।
रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्तसंज्ञके ॥ १८ ॥
भूतग्रामः स एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते ।
रात्र्यागमेऽवशः पार्थ प्रभवत्यहरागमे ॥ १९ ॥
ब्रह्मदेवाच्या दिवसाला प्रारंभ झाला म्हणजे सर्व व्यक्त वस्तु अव्यक्तापासून उत्पन्न होतात. रात्रीला प्रारंभ झाला की त्याच अव्यक्तामधे सर्व नाश पावतात. ॥८-१८॥
भूतांचा तोच हा समुदाय याप्रमाणे पुन: पुन्हा जन्मून पराधीन होत्साता, रात्र सुरू झाली की लय पावतो आणि हे अर्जुना, दिवस सुरू झाला की पुन्हा जन्मतो. ॥८-१९॥

तये ब्रह्मभुवनीं दिवसें पाहे । ते वेळीं गणना केहीं न समाये ।
ऐसें अव्यक्ताचें होये । व्यक्त विश्व ॥ १६० ॥
त्या ब्रह्म लोकात जेव्हा दिवस उगवतो, तेव्हा ज्याची मोजदाद कोठेही करता येत नाही, असे लीन असलेले जग आकाराला येते. ॥८-१६०॥

पुढती दिहाची चौपाहारी फिटे । आणि हा आकारसमुद्र आटे ।
पाठीं तैसाचि मग पाहांटे । भरों लागे ॥ १६१ ॥
पुढे दिवसाचे चार प्रहर संपले की हा आकारसमुद्र आटतो व पुन्हा पहाटे तसाच आकारसमुद्र भरावयास लागतो. ॥८-१६१॥

शारदीयेचिये प्रवेशीं । अभ्रें जिरती आकाशीं ।
मग ग्रीष्मांतीं जैशीं । निगती पुढती ॥ १६२ ॥
शरद् ऋतूच्या आरंभी ज्याप्रमाणे ढग आकाशात नाहीसे होतात व नंतर ग्रीष्म ऋतूच्या शेवटी जसे ते पुन्हा उत्पन्न होतात ॥८-१६२॥

तैशी ब्रह्मदिनाचिये आदी । हे भूतसृष्टीची मांदी ।
मिळे जंव सहस्रावधी । निमित्त पुरे ॥ १६३ ॥
त्याप्रमाणे ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या आरंभी हे भूतसृष्टीचे समुदाय हजार चौकड्यांच्या काळाचे कारण संपेपर्यंत उत्पन्न होत रहातात. ॥८-१६३॥

पाठीं रात्रींचा अवसरु होये । आणि विश्व अव्यक्तीं लया जाये ।
तोही युगसहस्र मोटका पाहे । आणि तैसेंचि रचे ॥ १६४ ॥
मग रात्रीचा वेळ होतो आणि विश्व अव्यक्तात मायेत लीन होते. ती ही हजार चौकड्यांची रात्र अंमळ उजाडली की पूर्वीप्रमाणे जगत् उत्पन्न होऊ लागते. ॥८-१६४॥

हें सांगावया काय उपपत्ती । जे जगाचा प्रळयो आणि संभूती ।
इये ब्रह्मभुवनींचिया होती । अहोरात्रामाजीं ॥ १६५ ॥
हे सांगावयास कारण काय तर ब्रह्मलोकाच्या एका दिवसामधे जगाची उत्पत्ती व संहार होतात. ॥८-१६५॥

कैसें थोरिवेचें मान पाहें पां । जो सृष्टीबीजाचा साटोपा ।
परि पुनरावृत्तीचिया मापा । शीग जाहाला ॥ १६६ ॥
ब्रह्मदेवाच्या मोठेपणाचे प्रमाण कसे आहे पहा की तो सृष्टीरूपी बीजाचे कोठार आहे, पण तोही पुनरावृत्तीच्या मापाला शीग (टोक) झाला. ॥८-१६६॥

एर्‍हवीं त्रैलोक्य हें धनुर्धरा । तिये गांवींचा गा पसारा ।
तो हा दिनोदयीं एकसरां । मांडतु असे ॥ १६७ ॥
हे अर्जुना, सहज विचार करून पाहिले तर हा जो त्रैलोक्याचा विस्तार तो त्या ब्रह्मदेवाच्या गावाचा दिवस उजाडल्याबरोबर एकदम रचला जातो. ॥८-१६७॥

पाठीं रात्रींचा समो पावे । आणि अपैसाचि सांठवे ।
म्हणिये जेथिंचें तेथ स्वभावें । साम्यासी ये ॥ १६८ ॥
मग रात्रीचा वेळ प्राप्त झाला की तो त्रैलोक्याचा पसारा आपोआप लीन होतो व तो जेथून उत्पन्न झाला तेथे स्वभावत: साम्याला येतो असे म्हणतात. ॥८-१६८॥

जैसें वृक्षपण बीजासि आलें । कीं मेघ हें गगन जाहालें ।
तैसें अनेकत्व जेथ सामावलें । तें साम्य म्हणिपे ॥ १६९ ॥
ज्याप्रमाणे झाड बीजरूपाला येते, अथवा ढग हे आकाशरूप होतात, त्याप्रमाणे या अनेकत्वाचा जेथे समावेश होतो त्यास साम्य असे म्हणतात. ॥८-१६९॥

परस्तस्मात्तु भावोऽन्योऽव्यक्तोऽव्यक्तात्सनातनः ।
यः स सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति ॥ २० ॥
पण या वर सांगितलेल्या अव्यक्तापलिकडचा (व्यक्ताव्यक्त कल्पना निरपेक्ष असा) दुसरा जो सनातन अव्यक्त पदार्थ आहे तो सर्व भूते नाहीशी झाली तरीही नाहीसा होत नाही. ॥९-२०॥

तेथ समविषम न दिसे कांहीं । म्हणौनि भूतें हे भाष नाहीं ।
जेविं दूधचि जाहालिया दहीं । नामरूप जाय ॥ १७० ॥
तेथे त्या साम्यावस्थेत सम (एकसारखे एक) विषम (एकाहून एक भिन्न) हे काही दिसत नाही. म्हणून (त्या साम्यावस्थेस) भूते म्हणता येत नाही. ते कसे तर ज्याप्रमाणे दूध हे दही झाल्यावर त्याचे दूध हे नाव व पातळपणाचे स्वरूप ही जातात ॥८-१७०॥

तेविं आकारलोपासरिसें । जगाचें जगपण भ्रंशे ।
परि जेथें जाहालें तें जैसें । तैसेंचि असे ॥ १७१ ॥
त्याप्रमाणे आकार नाहीसा झाल्याबरोबर जगाचा जगपणा नाश पावतो. पण जग जेथून झाले, ते अव्यक्त जसेच्या तसेच असते. ॥८-१७१॥

तैं तया नांव सहज अव्यक्त । आणि आकारावेळीं तेंचि व्यक्त ।
हें एकास्तव एक सूचित । एर्‍हवीं दोनी नाहीं ॥ १७२ ॥
त्यावेळी त्य़ास (साम्यावस्थेस) स्वभावत: अव्यक्त असे म्हणतात आणि आकाराला आले म्हणजे त्यास व्यक्त असे म्हणतात. व्यक्त व अव्यक्त ही दोन नावे एकाच्यामुळे दुसरे अशी सापेक्ष दिलेली आहेत. विचार करून पाहिले तर स्वरूपदृष्ट्या हे दोन्ही भाव भिन्न नाहीत. ॥८-१७२॥

जैसें आटलिया रूपें । आटलेपण ते खोटी म्हणिपे ।
पुढती तो घनाकारु हारपे । जे वेळीं अलंकार होती ॥ १७३ ॥
ज्याप्रमाणे अलंकार आटवल्यावर आटलेल्या आकाराला लगड असे म्हणतात व पुढे ज्यावेळी त्या लगडीचा लगडपणा नाहीसा होतो. ॥८-१७३॥

हीं दोहीं जैशीं होणीं । एकीं साक्षिभूत सुवर्णीं ।
तैसी व्यक्ताव्यक्ताची कडसणी । वस्तूच्या ठायीं ॥ १७४ ॥
अलंकार व लगड ह्या दोहींचे होणे जसे एका आधारभूत सोन्यावर असते, त्याप्रमाणे आकार (जग) व निराकार (माया) यांचा विचार चैतन्याच्या ठिकाणी आहे. (म्हणजे आकार व निराकार या दोन्ही सापेक्ष कल्पनांना आधार चैतन्यच आहे). ॥८-१७४॥

तें तरी व्यक्त ना अव्यक्त । नित्य ना नाशवंत ।
या दोहीं भावाअतीत । अनादिसिद्ध ॥ १७५ ॥
ते चैतन्य तर साकारही नाही आणि निराकारही नाही. त्यास तिन्ही कालात असणारे असेही म्हणता येत नाही व क्षणभंगुर असेही म्हणता येत नाही. ते या परस्पर सापेक्ष दोन्ही स्थितींच्या पलीकडे असून नित्यसिद्ध आहे. ॥८-१७५॥

जें हें विश्वचि होऊनि असे । परि विश्वपण नासिलेनि न नासे ।
अक्षरें पुसिल्या न पुसे । अर्थु जैसा ॥ १७६ ॥
जे चैतन्य विश्वाच्या रूपाने बनलेले आहे परंतु विश्वपण नाहीसे झाल्याने ते चैतन्य नाहीसे होत नाही. ज्याप्रमाणे पाटीवर लिहिलेली अक्षरे पुसून टाकली तरी त्यापासून होणारा बोध पुसून टाकता येत नाही ॥८-१७६॥

पाहें पां तरंग तरी होत जात । परि तेथ उदक तें अखंड असत ।
तेवीं भूताभावीं न नाशत । अविनाश जें ॥ १७७ ॥
हे पहा पाण्यावर लाटा तर उत्पन्न होतात आणि नाहीशा होतात, परंतु त्या ठिकाणी त्या लाटांना आधारभूत असलेले पाणी सर्वकाळ असते, त्याप्रमाणे या नाशिवंत प्राणिमात्रात त्यास आधारभूत असलेले जे चैतन्य ते अविनाशच असते. ॥८-१७७॥

नातरी आटतिये अळंकारीं । नाटतें कनक असे जयापरी ।
तेवीं मरतिये जीवाकारीं । अमर जें आहे ॥ १७८ ॥
अथवा आटणार्‍या अलंकारात जसे न आटणारे सोने असते, त्याप्रमाणे मरणार्‍या जीवांच्या आकारात जे अमर आहे ॥८-१७८॥

अव्यक्तोऽक्षर इत्युक्तस्तमाहुः परमां गतिम् ।
यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ॥ २१ ॥
ज्यास अव्यक्त अक्षर असे म्हणतात, त्यालाच परम (अत्यंत श्रेष्ठ) गति म्हणतात. ज्याप्रत गेल्यावर प्राणी जन्ममृत्यूमधे परत येत नाहीत, ते माझे अत्यंत श्रेष्ठ असे स्वरूप आहे. ॥८-२१॥

जयातें अव्यक्त म्हणों ये कोडें । म्हणतां स्तुति हें ऐसें नावडे ।
जें मनाबुद्धी न सांपडे । म्हणौनियां ॥ १७९ ॥
(ज्याला) परब्रह्माला कौतुकाने अव्यक्त असे म्हटले तर त्याची स्तुती होते असे वाटत नाही, कारण ते मन-बुद्धीला अगोचर आहे, म्हणून. ॥८-१७९॥

आणि आकारा आलिया जयाचें । निराकारपण न वचे ।
आकार लोपें न विसंचे । नित्यता गा ॥ १८० ॥
अर्जुना, आणि आकाराला आल्याने ज्याचे निराकारपण जात नाही व आकाराच्या लोपाने ज्याची नित्यता बिघडत नाही. ॥८-१८०॥

म्हणौनि अक्षर जें म्हणिजे । तेवींचि म्हणतां बोधुहि उपजे ।
जयापरौता पैसु न देखिजे । या नाम परमगती ॥ १८१ ॥
म्हणून ज्या ब्रह्माला अक्षर असे म्हणावे तसेच ज्या ब्रह्मास अक्षर असे म्हटले असता ज्याचा बोधही उत्पन्न होतो व ज्याच्या पलीकडे काही एक विस्तार दिसण्यात येत नाही, म्हणून ज्यास परमगति असे म्हणतात ॥८-१८१॥

परि आघवा इहीं देहपुरीं । आहे निजेलियाचे परी ।
जे व्यापारु करवी ना करी । म्हणौनियां ॥ १८२ ॥
परंतु संपूर्ण देहरूपी नगरामधे जो परमात्मा कोणताही व्यापार करत नाही व करीतही नाही म्हणून ॥८-१८२॥

एर्‍हवीं जे शारीरचेष्टा । त्यांमाजीं एकही न ठके गा सुभटा ।
दाहीं इंद्रियांचिया वाटा । वाहतचि आहाती ॥ १८३ ॥
एरवी शरीराचे जे व्यापार आहेत त्यापैकी अर्जुना एकही थांबत नाही तर दहाही इंद्रियांचे व्यापार सुरूच आहेत. ॥८-१८३॥

उकलूनि विषयांचा पेटा । होत मनाचा चोहटा ।
तो सुखदुःखाचा राजवांटा । भीतराहि पावे ॥ १८४ ॥
मनरूपी चव्हाट्यावर विषयरूप बाजार उघडलेले असतात व त्यापासून होणार्‍या सुखदु:खरूपी प्राप्तीतील राजाच्या हक्काचा मुख्य हिस्सा आत जीवालाही पावता होतो. ॥८-१८४॥

परि रावो पहुडलिया सुखें । जैसा देशींचा व्यापारु न ठके ।
प्रजा आपुलालेनि अभिलाखें । करितचि असती ॥ १८५ ॥
परंतु राजा सुखाने निजला असता ज्याप्रमाणे देशाचा व्यापार थांबत नाही तर त्याची प्रजा आपापल्या इच्छेप्रमाणे व्यापार करीतच असते ॥८-१८५॥

तैसें बुद्धीचें हन जाणणें । कां मनाचें घेणें देणें ।
इंद्रियांचें करणें । स्फुरण वायूचें ॥ १८६ ॥
त्याप्रमाने बुद्धीची जाणण्याची क्रिया अथवा मनाची संकल्पविकल्परूप घेण्यादेण्याची क्रिया, इंद्रियांचे व्यापार व प्राणवायूची हालचाल ॥८-१८६॥

हे देहक्रिया आघवी । न करवितां होय बरवी ।
जैसा न चलवितेनि रवी । लोकु चाले ॥ १८७ ॥
ही सर्व देहक्रिया परमात्म्याने स्वत: न करविता चांगली होते. ज्याप्रमाने सूर्य हा स्वत: लोकांना व्यापार करावयास न लावता लोकांचे व्यापार चांगले चालतात ॥८-१८७॥



[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]



पुरुषः स परः पार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया ।
यस्यान्तःस्थानि भूतानि येन सर्वमिदं ततम् ॥ २२ ॥
ज्यामधे ही सर्व भूते आहेत व ज्याने हे सर्व विश्व व्यापलेले आहे, तो पर श्रेष्ठ पुरुष हे पार्था, अनन्य (एकनिष्ठ) भक्तीने प्राप्त होणारा आहे. ॥८-२२॥

अर्जुना तयापरी । सुतला ऐसा आहे शरीरीं ।
म्हणौनि पुरुषु गा अवधारीं । म्हणिपे जयातें ॥ १८८ ॥
अर्जुना याप्रमाणे आत्मा हा शरीरातच निजल्यासारखा असा आहे, म्हणून त्याला पुरुष असे म्हणतात हे समज. ॥८-१८८॥

आणि प्रकृति पतिव्रते । पडिला एकपत्‍नीव्रतें ।
येणेंहि कारणें जयातें । पुरुषु म्हणों ये ॥ १८९ ॥
आणि पुरुष असे म्हणण्याचे दुसरे कारण असे की हा आत्मा एकपत्नीव्रताने पतिव्रता जी प्रकृती तिच्याशी असतो. या कारणास्तव देखील ज्याला पुरुष असे म्हणता येते. ॥८-१८९॥

पैं वेदाचें बहुवसपण । देखेचिना जयाचें आंगण ।
हें गगनाचें पांघरूण । होय देखा ॥ १९० ॥
चारी वेदांचा विस्तार त्या परमात्म्याचे आंगणाही पाहू शकत नाही. हे चैतन्य आकाशाचे पांघरुण आहे पहा. ॥८-१९०॥

ऐसें जाणूनि योगीश्वर । जयातें म्हणती परात्पर ।
जें अनन्यगतीचें घर । गिंवसीत ये ॥ १९१ ॥
वर सांगितल्याप्रमाणे या पुरुषाचे स्वरूप आहे असे जाणून श्रेष्ठ योगी ज्याला सर्वात पलिकडची गती असे म्हणतात आणि जो परमात्मा एकनिष्ठ भक्ताचे घर शोधित येतो. ॥८-१९१॥

जे तनू वाचा चित्तें । नाइकती दुजिये गोष्टीतें ।
तयां एकनिष्ठेचें पिकतें । सुक्षेत्र जें ॥ १९२ ॥
जे कायावाचामनाने परमात्म्यावाचून दुसरी गोष्टच ऐकत नाहीत, त्य़ा एकनिष्ठांच्या एकनिष्ठतेचे पीक देणारे जे चांगले शेतच आहे ॥८-१९२॥

हें त्रैलोक्यचि पुरुषोत्तमु । ऐसा साच जयाचा मनोधर्मु ।
तया आस्तिकाचा आश्रमु । पांडवा गा ॥ १९३ ॥
हे त्रैलोक्यच पुरुषोत्तम आहे, अशी ज्यांची खरी समजूत आहे त्या आस्तिकांचे अर्जुना जे परमात्मस्वरूप नेहेमी रहाण्याचे ठिकाण आहे ॥८-१९३॥

जें निगर्वाचें गौरव । जें निर्गुणाची जाणिव ।
जें सुखाची राणिव । निराशांसी ॥ १९४ ॥
जे परमात्मस्वरूप गर्वरहित पुरुषांचे मोठेपण आहे, जे सुखाचे राज्य आहे, ॥८-१९४॥

जें संतोषियां वाढिलें ताट । जें अचिंता अनाथांचें मायपोट ।
भक्तीसी उजू वाट । जया गांवा ॥ १९५ ॥
जे परमात्मस्वरूप संतोषी पुरुषांस वाढलेले ताट आहे, जे संसाराची चिंता न करणारे असून ज्यांना माझ्यावाचून दुसरा कोणी मालक नाही. अशा भक्तांचे मायपोट आहे आणि ज्या गावाला पोहोचण्याला भक्ति हीच सरळ वाट आहे. ॥८-१९५॥

हें एकैक सांगोनि वायां । काय फार करूं धनंजया ।
पैं गेलिया जया ठाया । तो ठावोचि होईजे ॥ १९६ ॥
अर्जुना हे एकेक सांगून व्यर्थ विस्तार कशाला करू ? परंतु ज्या ठिकाणी गेले असता ते ठिकाणच आपण होतो. ॥८-१९६॥

हिंवाचिया झुळुका । जैसें हिंवचि पडे उष्णोदका ।
कां समोर जालिया अर्का । तमचि प्रकाशु होय ॥ १९७ ॥
थंडीच्या झुळुकांनी जसे ऊनपाणीच थंड होते अथवा सूर्यासमोर अंधार आला असता तो अंधारच प्रकाश होतो, ॥८-१९७॥

तैसा संसारु जया गांवा । गेला सांता पांडवा ।
होऊनि ठाके आघवा । मोक्षाचाची ॥ १९८ ॥
अर्जुना त्याप्रमाणे ज्या परमात्मस्वरूपी मुक्कामाला हा (दु:खरूप देहबुद्ध्यादिसंघातरूप्) संसार पोहोचला असता तो संसार सर्व बाजूंनी मोक्षच (दु:खशून्य व सुखरूप) असा होऊन रहातो. ॥८-१९८॥

तरी अग्नीमाजीं आलें । जैसें इंधनचि अग्नि जहालें ।
पाठीं न निवडेचि कांहीं केलें । काष्ठपण ॥ १९९ ॥
तरी ज्याप्रमाणे लाकूड अग्नीत गेले की अग्निरूपच होऊन रहाते व ते अग्निरूप झाल्यावर पुन्हा लाकुडपणाने निराळे काढू म्हटले तर ते जसे निराळे निघतच नाही ॥८-१९९॥

नातरी साखरेचा माघौता । बुद्धिमंतपणेंही करितां ।
परि ऊंस नव्हे पंडुसुता । जियापरी ॥ २०० ॥
अथवा उसाची साखर झाल्यावर त्या साखरेचा मूळचा ऊस करण्याचे जरी बुद्धिमान पुरुषाने मनात आणले तरी पुन्हा ऊस होणे ज्याप्रमाणे शक्य नाही ॥८-२००॥

लोहाचें कनक जाहलें । हें एकें परिसेंचि केलें ।
आतां आणिक कैचें तें गेलें । लोहत्व आणी ॥ २०१ ॥
परिसाने लोखंडाचे सोने केले आता आणिक दुसरा पदार्थ कोठे आहे की जो त्याचा नाहीसा झालेला लोखंडपणा पुन्हा आणील ? ॥८-२०१॥

म्हणौनि तूप होऊनि माघौतें । जेवीं दूधपणा न येचि निरुतें ।
तेवीं पावोनियां जयातें । पुनरावृत्ति नाहीं ॥ २०२ ॥
म्हणून ज्याप्रमाणे दुधाचे तूप झाल्यावर पुन्हा त्या तुपाला दूधपणा खात्रीने येत नाही त्याप्रमाणे ज्या परमात्मस्वरूपास पावल्यावर पुन्हा जन्म नाही. ॥८-२०२॥

तें माझें परम । साचोकारें निजधाम ।
हें आंतुवट तुज वर्म । दाविजत असे ॥ २०३ ॥
असे जे स्वरूप, ते माझे स्वत:चे खरोखर श्रेष्ठ ठिकाण आहे, ही अंतरंग गुह्यगोष्ट तुला दाखवली जात आहे. ॥८-२०३॥

यत्र काले त्वनावृत्तिमावृत्ति चैव योगिनः ।
प्रयाता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ ॥ २३ ॥
हे भरतश्रेष्ठा, कोणत्या काली देहावसान झाले असतांना योगी अनावृत्तीप्रत जातात (जन्ममरणापासून मुक्त होतात) व कोणत्या काली देहावसान झाले असतांना आवृत्तीप्रत (पुनर्जन्माप्रत) जातात तो काल सांगतो. ॥८-२३॥

तेवींचि आणिकेंही एके प्रकारें । हें जाणतां आहे सोपारें ।
तरी देह सांडितेनि अवसरें । जेथ मिळती योगी ॥ २०४ ॥
त्याचप्रमाणे आणखीही एका प्रकाराने हे निजधाम जाणणे सोपे आहे. तरी योगी लोक योग्य काली देहत्याग करून जेथे मिळातात (ते माझे निजधाम होय). ॥८-२०४॥

अथवा अवचटें ऐसें घडे । जे अवसरें देह सांडे ।
तरि माघौतें येणें घडे । देहासीचि ॥ २०५ ॥
अथवा अकस्मात असे घडते की योग्याचा देह अयोग्यकाली पडला तर त्याला पुन्हा जन्माला यावे लागते ॥८-२०५॥

म्हणौनि काळशुद्धी जरी देह ठेविती । तरी ठेवितखेंवी ब्रह्मचि होती ।
एर्‍हवीं अकाळीं तरी येती । संसारा पुढती ॥ २०६ ॥
म्हणून योग्यांनी योग्य काली देह ठेवला तर देह ठेवताक्षणीच ब्रह्म होतात. एरवी त्यांनी जर अयोग्य काली देह ठेवला तर ते पुन्हा संसाराला येतात. ॥८-२०६॥

तैसे सायुज्य आणि पुनरावृत्ती । या दोन्ही अवसराआधीन आहाती ।
तोचि अवसरु तुजप्रती । प्रसंगें सांगों ॥ २०७ ॥
त्याप्रमाणे मद्रूप होणे आणि जन्ममरणाच्या फेर्‍यात सापडणे हे दोन्ही ठराविक मरणेवेळेच्या स्वाधीन आहेत. आता प्रसंगानुसार त्याच कालासंबंधाने विचार तुला सांगतो. ॥८-२०७॥

तरि ऐकें गा सुभटा । पातलिया मरणाचा माजिवटा ।
पांचै आपुलालिया वाटा । निघती अंतीं ॥ २०८ ॥
तर अर्जुना ऐक. मरणाची गुंगी प्राप्त झाली असता शेवटी पंचमहाभूते आपआपल्या वाटेने निघतात. ॥८-२०८॥

ऐसा वरिपडिला प्रयाणकाळीं । बुद्धीतें भ्रमु न गिळी ।
स्मृति नव्हे आंधळी । न मरे मन ॥ २०९ ॥
असा मरणकाळ प्राप्त झाला असतांना बुद्धीला भ्रम गिळीत नाही, स्मरणशक्ती आंधळी होत नाही आणखी मन मरत नाही. ॥८-२०९॥

हा चेतना वर्गु आघवा । मरणीं दिसे टवटवा ।
परि अनुभविलिया ब्रह्मभावा । गंवसणी होऊनि ॥ २१० ॥
याप्रमाणे हा सर्व इंद्रियसमूह मरणसमयी टावटवीत असतो, पण तो अनुभवलेल्या ब्रह्मस्थितीला आकलन केल्यामुळे प्रसन्न असतो. ॥८-२१०॥

ऐसा सावध हा समवावो । आणि निर्वाणवेर्‍ही निर्वाहो ।
हें तरीच घडे जरी सावावो । अग्नीचा आथी ॥ २११ ॥
याप्रमाणे हा इंद्रियसमुदाय सावध असणे आणि तो त्याचा सावधपणा शेवटपर्यंत टिकणे हे जर अग्नीचे सहाय्य असेल तरच घडेल. ॥८-२११॥

पाहां पां वारेनें कां उदकें । जैं दिवियाचें दिवेपण झांके ।
तैं असतीच काय देखे । दिठी आपुली ? ॥ २१२ ॥
असे पहा की वार्‍याने अथवा पाण्याने जेव्हा दिव्याचा प्रकाश नाहीसा होतो, तेव्हा असलेलीच आपली दृष्टी पाहू शकते काय ? ॥८-२१२॥

तैसें देहांतींचेनि विषमवातें । देह आंत बाहेरी श्लेष्माआंते ।
तैं विझोनि जाय उजितें । अग्नीचें तें ॥ २१३ ॥
त्याप्रमाणे देह पडण्य़ाच्या वेळी होणार्‍या त्रिदोषाने देह आतबाहेर कफाने व्यापला जातो, त्यावेळी जेव्हा अग्नीचे तेज विझून जाते ॥८-२१३॥

ते वेळीं प्राणासि प्राणु नाहीं । तेथ बुद्धि असोनि करील काई ।
म्हणौनि अग्नीविण देहीं । चेतना न थारे ॥ २१४ ॥
त्यावेळी प्राणासच क्रियाशक्ती नसते मग तेथे बुद्धी असून काय करील ? म्हणून अग्निशिवाय शरीरात चेतना ज्ञानकला टिकत नाही. ॥८-२१४॥

अगा देहींचा अग्नि जरी गेला । तरी देह नव्हे चिखलु वोला ।
वायां आयुष्यवेळु आपला । आंधारें गिंवसी ॥ २१५ ॥
अरे अर्जुना, जर देहातील अग्नि गेला तर तो देह नाही, ओला चिखल आहे असे झाले म्हणजे आयुष्य आपला वेळ व्यर्थ अंधारात शोधीत रहाते. ॥८-२१५॥

आणि मागील स्मरण आघवें । तें तेणें अवसरें सांभाळावें ।
मग देह त्यजूनि मिळावें । स्वरूपीं कीं ॥ २१६ ॥
आणि वास्तविक पाहिले असता, मागील जे सर्व स्मरण आहे ते त्यावेळी तसेच ठेवायचे असते आणि मग देह टाकून परमात्मस्वरूपी मिळावायचे असते. ॥८-२१६॥

तंव तया श्लेष्माचे चिखलीं । चेतनाचि बुडोनि गेली ।
तेथ मागिली पुढिली हे ठेली । आठवण सहजें ॥ २१७ ॥
परंतु देहाला ज्या कफाने व्यापले, त्या कफाच्या चिखलात चेतना बुडून गेली, तेथे मागील केलेल्या अभ्यासाची पुढील स्वरूपस्थितीची आठवण स्वाभाविक रीतीने थांबली. ॥८-२१७॥

म्हणौनि आधीं अभ्यासु जो केला । तो मरण न येतांचि निमोनि गेला ।
जैसें ठेवणें न दिसतां मालवला । दीपु हातींचा ॥ २१८ ॥
म्हणून मरणाच्या अगोदरच जो जन्मभर अभ्यास केला तो मरण येण्यापूर्वी नाहीसा झाला. ज्याप्रमाणे ठेवलेली वस्तु पहाण्याकरता हातात घेतलेला दिवा ती वस्तु दिसण्यापूर्वीच मालवून जावा त्याप्रमाणे ॥८-२१८॥

आतां असो हें सकळ । जाण पां ज्ञानासि अग्नि मूळ ।
तया अग्नीचें प्रयाणीं बळ । संपूर्ण आथी ॥ २१९ ॥
आता हे सगळे असू दे. सारांश असे समजा की ज्ञानाला मूळ कारण अग्नि आहे. त्या अग्नीचे मरणाकाळी संपूर्ण बल असावे. ॥८-२१९ ॥

अग्निर्ज्योतिरहः शुक्लः षण्मासा उत्तरायणम् ।
तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः ॥ २४ ॥
आत अग्नि व ज्योतीचा प्रकाश व बाहेर दिवस, शुक्लपक्ष आणि उत्तरायणाचे सहा महिने यांचे ठिकाणी या स्थितीत ज्यांचे देहावसान होते ते ब्रह्मवेत्ते जन ब्रह्माप्रत जातात. ॥८-२४॥

आंत अग्निज्योतीचा प्रकाशु । बाहेरी शुक्लपक्षु आणि दिवसु ।
आणि सामासांमाजीं मासु । उत्तरायण ॥ २२० ॥
देहात अग्नीचा व ज्योतीचा प्रकाश असून बाहेर शुक्लपक्ष परंतु दिवस आणि उत्तरायणातील सहा महिन्यांपैकी एखादा महिना ॥८-२२०॥

ऐशिया समयोगाची निरुती । लाहोनि जे देह ठेविती ।
ते ब्रह्मचि होती । ब्रह्मविद ॥ २२१ ॥
अशा या चांगल्या जुळून आलेल्यी योगाची प्राप्ती होऊन, जे योगी आपला देह सोडतात, ते ब्रह्मवेत्ते परब्रह्म होतात. ॥८-२२१॥

अवधारीं गा धनुर्धरा । येथवरी सामर्थ्य यया अवसरा ।
तेवींचि हा उजू मार्ग स्वपुरा । यावयां पैं ॥ २२२ ॥
अर्जुना, ऐक, या कालाचे येथपर्यंत सामर्थ्य आहे. आणि त्याचप्रमाणे आत्मस्वरूपाकडे येण्य़ास हा सरळ मार्ग आहे. ॥८-२२२॥

एथ अग्नी हें पहिलें पायतरें । ज्योतिर्मय हें दुसरें ।
दिवस जाणें तिसरें । चौथें शुक्लपक्ष ॥ २२३ ॥
येथे अग्नि ही पहिली पायरी, व ज्योतीचे स्वरूप ही दुसरी पायरी आहे. दिवस ही तिसरी पायरी आणि शुक्लपक्ष ही चौथी पायरी समज. ॥८-२२३॥

आणि सामास उत्तरायण । तें वरचील गा सोपान ।
येणें सायुज्यसिद्धिसदन । पावती योगी ॥ २२४ ॥
आणि उत्तरायणातील सहा महिने ही वरची पायरी आहे. या मार्गाने योगी तद्रूपतासिद्धीच्या घराला येतात. ॥८-२२४॥

हा उत्तम काळु जाणिजे । यातें अर्चिरा मार्गु म्हणिजे ।
आतां अकाळु तोही सहजें । सांगेन आईक ॥ २२५ ॥
हा उत्तम काळ आहे असे समज. याला अर्चिरामार्ग म्हणावे. आता अकाळ जो आहे तोही ओघाने सांगतो, ऐक. ॥८-२२५॥

धूमो रात्रिस्तथा कृष्णः षण्मासा दक्षिणायनम् ।
तत्र चान्द्रमसं ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते ॥ २५ ॥
आत धूमयुक्त अग्नि, त्याचप्रमाणे बाहेर रात्र, कृष्णपक्ष, आणि दक्षिणायनाचे सहा महिने, यांचे ठिकाणी (या स्थितीत ज्याचे देहावसान होते) तो योगी चंद्रलोकापर्यंत जाऊन परत येतो. ॥८-२५॥

तरी प्रयाणाचिया अवसरें । वातश्लेष्मां सुभरें ।
तेणें अंतःकरणीं आंधारें । कोंदलें ठाके ॥ २२६ ॥
तरी मरणाचे वेळी वात व कफ (शरीरामधे फार दाटतो. त्यामुळे अंत:करणात अंधार गच्च भरून रहातो. ॥८-२२६॥

सर्वेंद्रियां लांकुड पडे । स्मृति भ्रमामाजीं बुडे ।
मन होय वेडें । कोंडे प्राण ॥ २२७ ॥
सर्व इंद्रिये लाकडासारखी जड होतात, स्मरणशक्ती भ्रमात बुडते, मन वेडे होते व प्राण कोंडतो. ॥८-२२७॥

अग्नीचें अग्निपण जाये । मग तो धूमचि अवघा होये ।
तेणें चेतना गिंवसिली ठाये । शरीरींची ॥ २२८ ॥
अग्नीची उष्णता जाते, मग धूरच होतो, त्या धुराने चेतना शरीरात कोंडलेली रहाते. ॥८-२२८॥

जैसें चंद्राआड आभाळ । सदट दाटे सजळ ।
मग गडद ना उजाळ । ऐसें झांवळें होय ॥ २२९ ॥
ज्याप्रमाणे पाण्याने गच्च भरलेले ढग चंद्राच्या आड दाट छायेत यावेत, मग त्यावेळी गडद अंधकारही नसतो आणि स्वच्छ उजेडही नसतो असा झुंजुमुंजु उजेड असतो. ॥८-२२९॥

कां मरे ना सावध । ऐसें जीवितासि पडे स्तब्ध ।
आयुष्य मरणाची मर्याद । वेळु ठाकी ॥ २३० ॥
याप्रमाणे तो धड मेलेला नसतो व शुद्धीवरही नसतो अशी जीवितास स्तब्धता येते. आयुष्य मरणाच्या वेळेची वाट पहात रहाते. ॥८-२३०॥

ऐसी मनबुद्धिकरणीं । सभोंवतीं धूमाकुळाची कोंडणी ।
तेथ जन्में जोडलिये वाहणी । युगचि बुडे ॥ २३१ ॥
याप्रमाणे मन, बुद्धि व इंद्रिये यांच्या सभोवती अशी ही धुराच्या समुदायाची कोंदणी होते. तेव्हा जन्मभर संपादन केलेला स्वरूप अभ्यासाचा मार्ग संपूर्ण नष्ट होतो. ॥८-२३१॥

हां गा हातींचें जे वेळीं जाये । ते वेळीं आणिका लाभाची गोठी कें आहे ।
म्हणौनि प्रयाणीं तंव होये । येतुली दशा ॥ २३२ ॥
बाबा अर्जुना, जन्मभर केलेला हातचा अभ्यास जेव्हा जातो, त्यावेळी दुसर्‍या प्राप्तीची गोष्ट कशाला मनात आणायला पाहिजे. ? म्हणून तर मरणकाळी अशी अवस्था होते. ॥८-२३२॥

ऐशी देहाआंतु स्थिती । बाहेरि कृष्णपक्षु वरि राती ।
आणि सामासही वोडवती । दक्षिणायन ॥ २३३ ॥
अशी ही देहाची आत स्थिती होऊन बाहेर वद्य पंधरवडा शिवाय रात्र आणि दक्षिणायनातील सहा महिनेही येतात. ॥८-२३३॥

इये पुनरावृत्तीचीं घराणीं । आघवीं एकवटती जयाचिया प्रयाणीं ।
तो स्वरूपसिद्धीची काहाणी । कैसेंनि आइके ? ॥ २३४ ॥
ही वारंवार फेर्‍यात आणणारी ठिकाणे, ज्याच्या मरणाच्या वेळेला एकत्र जुळून येतात, तो ब्रह्मप्राप्तीची गोष्ट कशी ऐकेल ? ॥८-२३४॥

ऐसा जयाचा देह पडे । तया योगी म्हणौनि चंद्रवरी जाणें घडे ।
मग तेथूनि मागुता बहुडे । संसारा ये ॥ २३५ ॥
अशा रीतीने ज्याचा देह पडतो, तो योगी असल्याकारणाने त्याचे चंद्रलोकापर्यंत जाणे घडते व नंतर तेथून तो माघारा फिरून पुन: मृत्युलोकात जन्मास येतो. ॥८-२३५॥

आम्हीं अकाळु जो पांडवा । म्हणितला तो हा जाणावा ।
आणि हाचि धूम्रमार्गु गांवा । पुनरावृत्तीचिया ॥ २३६ ॥
अर्जुना अकाळ म्हणून जो म्हटला जातो तो हाच असे समज. आणि हाच पुनर्जन्मरूप गावास येण्याचा धूम्रमार्ग आहे. ॥८-२३६॥

येर तो अर्चिरा मार्गु । तो वसता आणि असलगु ।
साविया स्वस्त चांगु । निवृत्तीवरी ॥ २३७ ॥
दुसरा जो अर्चिरादिमार्ग, तो वाहता आणि सुगम आहे आणि तो सहज कल्याणकारक असून मोक्षाची प्राप्ती करून देण्यास चांगला आहे. ॥८-२३७॥

शुक्लकृष्णे गती ह्येते जगतः शाश्वते मते ।
एकया यात्यनावृत्तिमन्ययावर्तते पुनः ॥ २६ ॥
जगाचे प्रकाशरूप व अंधकाररूप (म्हणजे अर्चिरादि व धूम्र) असे हे दोन मार्ग नित्य आहेत. एकाने मनुष्य अनावृत्तीप्रत जातो पण दुसर्‍याने आवृत्तीप्रत परत येतो. ॥८-२६॥

ऐशिया अनादि या दोन्ही वाटा । एकी उजू एकी अव्हांटा ।
म्हणौनि बुद्धिपूर्वक सुभटा । दाविलिया तुज ॥ २३८ ॥
हे अर्जुना, अशा या अनादि कालापासून चालत असलेल्या दोन वाटा आहेत. त्यापैकी एक सरळ व एक आडमार्गाची आहे. म्हणून तुला या दोन्ही वाटा मुद्दाम दाखविल्या आहेत ॥८-२३८॥

कां जे मार्गामार्ग देखावे । साच लटिकें वोळखावें ।
हिताहित जाणावें । हिताचिलागीं ॥ २३९ ॥
कारण की आपल्या हिताकरिताच योग्य-अयोग्य मार्ग पहावे, खरे-खोटे ओळखावे आणि आपले हित कशात आहे व अनहित कशात आहे हे समजावे ॥८-२३९॥

पाहें पां नाव देखतां बरवी । कोणी आड घाली काय अथावीं ।
कां सुपंथ जाणौनियां अडवीं । रिगवत असे ॥ २४० ॥
असे पहा की चांगली नाव (होडी) डोळ्यांपुढे दिसत असून तीमध्ये न बसता कोणी अथांग पाण्यात उडी घालील काय ? ॥८-२४०॥

जो विष अमृत वोळखे । तो अमृत काय सांडूं शके ? ।
तेविं जो उजू वाट देखे । तो अव्हांटा न वचे ॥ २४१ ॥
विष व अमृत ही जो ओळखतो, त्याच्याने अमृत टाकवेल काय ? त्याचप्रमाणे जो सरळ मार्गाने जातो तो आडमार्गाला जाणार नाही. ॥८-२४१॥

म्हणौनि फुडें । पारखावें खरें कुडें ।
पारखिलें तरी न पडे । अनवसरें कहीं ॥ २४२ ॥
म्हणून खरे व खोटे, याची पक्की परीक्षा करावी व अशी परीक्षा केली असता कधीही अनुचित होणार नाही, अकाली देह पडणार नाही. ॥८-२४२॥

एर्‍हवीं देहांतीं थोर विषम । या मार्गाचें आहे संभ्रम ।
जन्मे अभ्यासिलियाचें हन काम । जाईल वायां ॥ २४३ ॥
तसे केले नाही तर (वर सांगितल्याप्रमाणे) खर्‍या खोट्याची पारख केली नाही तर) मरणाकाळी या भ्रांतिकारक धूम्रमार्गाचे मोठे संकट आहे की जन्मभर ज्या हेतूने अभ्यास केला तो हेतु व्यर्थ होईल. ॥८-२४३॥

जरी अर्चिरा मार्गु चुकलिया । अवचटें धूम्रपंथें पडलिया ।
तरी संसारपांथीं जुंतलिया । भंवतचि असावें ॥ २४४ ॥
अर्चिरादि मार्ग चुकला व अकस्मात जर धूम्रमार्गात पडले तर संसाराच्या पातीला जुंपले जाऊन फिरतच रहावे लागेल. ॥८-२४४॥

हे सायास देखोनि मोठे । आतां कैसेनि पां एकवेळ फिटे ।
म्हणौनि योगमार्गु गोमटे । शोधिले दोन्ही ॥ २४५ ॥
हे (पुन्हा पुन्हा जन्ममरणाचे) मोठे सायास पाहून आता हे सायास कशाने एकवार दूर होतील (हे पहावे). म्हणून हे दोन्ही मार्ग नीट रीतीने पाहिले ॥८-२४५॥

तंव एकें ब्रह्मत्वा जाइजे । आणि एकें पुनरावृत्ती येइजे ।
परि दैवगत्या जो लाहिजे । देहांतीं जेणें ॥ २४६ ॥
तर एका मार्गाने (अर्चिदादि मार्गाने) ब्रह्मत्वास जाता येते. आणि एकाने (धूम्रमार्गाने) पुनर्जन्माला येणे होते. परंतु प्रारब्धाने मरणकाळी ज्याला जो मार्ग वाट्यास येईल (त्याला त्या मार्गाची गति मिळेल.) ॥८-२४६॥

नैते सृती पार्थ जानन्योगी मुह्यति कश्चन ।
तस्मात्सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन ॥ २७ ॥
हे पार्था, हे दोन मार्ग जाणणारा कोणताही योगी मोह पावत नाही. म्हणून अर्जुना तू सर्व काळी योगयुक्त हो. ॥८-२७॥

ते वेळीं म्हणितलें हें नव्हे । वांया अवचटें काय पावे ।
देह त्यजूनि वस्तु होआवें । मार्गेंचि कीं ? ॥ २४७ ॥
(मरणकाळी अर्चिरादिमार्ग वाट्याला येतो की धूम्रमार्ग वाट्याला येतो हे अनिश्चित आहे, असे पाहून अर्जुन खिन्न झाला). त्य़ावेळी भगवंत म्हणाले, देह जाऊन अर्चिरादिमार्गाने ब्रह्म होईल हे व्यर्थ आहे. कारण प्रारब्धवशात् अकस्मात काय प्राप्त होईल कोणास ठाऊक ? (ते कळत नाही). म्हणून हे नको. ॥८-२४७॥

तरी आतां देह असो अथवा जावो । आम्ही तों केवळ वस्तूचि आहों ।
कां जे दोरीं सर्पत्व वावो । दोराचिकडुनी ॥ २४८ ॥
तर आता देह असो अथवा जावो, आम्ही तर केवळ ब्रह्मच आहोत. कारण की जसे दोरीवर भासलेला सर्पपणा दोरीच्या दृष्टीने मिथ्या आहे. ॥८-२४८॥

मज तरंगपण असे कीं नसे । ऐसें हें उदकासी कहीं प्रतिभासे ? ।
तें भलतेव्हां जैसें तैसें । उदकचि कीं ॥ २४९ ॥
मला तरंगपणा आहे किंवा नाही असे पाण्याला केव्हा तरी वाटते काय ? ते पाणी वाटेल तेव्हा जसेच्या तसेच पाणीच असते. ॥८-२४९॥

तरंगाकारें न जन्मेचि । ना तरंगलोपें न निमेचि ।
तेविं देहीं जे देहेंचि । वस्तु जाहले ॥ २५० ॥
लाटेच्या व्यक्त होण्याने पाणी जन्मत नाही किंवा लाट नाहीशी झाली तरी ते पाणी मरत नाही. त्याप्रमाणे जे देहवान् असतांना देहानेच ब्रह्म झाले. ॥८-२५०॥

आतां शरीराचें तयाचिया ठाई । आडनांवही उरलें नाहीं ।
तरी कोणें काळें काई । निमे तें पाहें पां ॥ २५१ ॥
आता त्या तत्त्ववेत्याच्या ठिकाणी शरीराचे आडनावही उरले नाही. तर बाबा अर्जुना असा विचार कर की कोणत्या काळेकरून काय नाश पावणार आहे ? ॥८-२५१॥

मग मार्गातें कासया शोधावें ? । कोणें कोठूनि कें जावें ? ।
जरी देशकालादि आघवें । आपणचि असे ॥ २५२ ॥
जर सर्व देश व काल आपणच आहोत तर मग अर्चिरादि अथवा धूम्रमार्ग हे कशाला शोधावे ? आणि कोणी कोठून कोठे जावयाचे ? ॥८-२५२॥

आणि हां गा घटु जे वेळीं फुटे । ते वेळीं तेथिंचें आकाश लागे नीट वाटे ।
वाटा लागे तरी गगना भेटे । एर्‍हवीं चुके ? ॥ २५३ ॥
आणि अरे अर्जुना, घट ज्यावेळेला फुटतो, त्यावेळी घटातील आकाश नीट वाटेला लागते व नीट वाटेला लागले की महाकाशाला ते नेमके मिळते, नाही तर ते महाकाशाला मिळावयाचे चुकेल काय ? ॥८-२५३॥

पाहें पां ऐसें हन आहे । कीं तो आकारुचि जाये ।
येर गगन तें गगनींचि आहे । घटत्वाहि आधीं ॥ २५४ ॥
आम्ही म्हणतो असे आहे, पहा की घटाचा आकारच नाहीसा होतो. वास्तविक पाहिले तर घटपणाच्या आधीही आकाश आकाशाच्या ठिकाणीच आहे. ॥८-२५४॥

ऐसिया बोधाचेनि सुरवाडें । मार्गामार्गाचे सांकडें ।
तया सोऽहंसिद्धां न पडे । योगियांसी ॥ २५५ ॥
अशा या बोधाच्या अनुकूलतेने मार्गामार्गांचे संकट 'मी ब्रह्म आहे' असे ज्ञान झालेल्या त्या योग्यांना पडत नाही. ॥८-२५५॥

याकारणें पंडुसुता । तुवां होआवें योगयुक्ता ।
येतुलेनि सर्वकाळीं साम्यता । आपैसया होईल ॥ २५६ ॥
अर्जुना, म्हणून तू योगसंपन्न हो. एवढ्याने स्वत:च्या ठिकाणी सर्वकाळ स्वरूपसाम्यता होईल. ॥८-२५६॥

मग भलतेथ भलतेव्हां । देह असो अथवा जावा ।
परि अबंधा नित्य ब्रह्मभावा । विघडु नाहीं ॥ २५७ ॥
मग वाटेल तेथे, वाटेल तेव्हा, देहाचा पाश असो अथवा जावो, परंतु बंधरहित अखंड ब्रह्मस्थितीत बिघाड येणार नाही. ॥८-२५७॥

तो कल्पादि जन्मा नागवे । कल्पांतीं मरणें नाप्लवें ।
माजीं स्वर्गसंसाराचेनि लाघवें । झकवेना ॥ २५८ ॥
तो कल्पाच्या आरंभी जन्मात सापडत नाही, कल्पाच्या अंती तो मरणाने बुडत नाही व मधल्या स्थितीत म्हणजे स्थितिकाली स्वर्ग व संसार यांच्या मोहाने तो फसला जात नाही. ॥८-२५८॥

येणें बोधें जो योगी होये । तयासीचि या बोधाचें नीटपण आहे ।
कां जे भोगातें पेलूनि पायें । निजरूपा ये ॥ २५९ ॥
या बोधाने जो योगी होतो, त्याला या बोधाचाच सरळपणा असतो. कारण की तो स्वर्ग च संसारातील भोगांना विचाराने वजन करून पहातो व ते असार म्हणून त्यांचा त्याग करून तो आत्मस्वरूपाला येतो. ॥८-२५९॥

पै गा इंद्रादिकां देवां । जयां सर्वस्वें गाजती राणिवा ।
तें सांडणें मानूनि पांडवा । डावली जो ॥ २६० ॥
बा अर्जुना, इंद्रादिक देवांना त्यांचे सर्वस्व म्हणून जी ही राज्ये प्रसिद्ध आःहेत, ती ओवाळून टाकलेल्या बळीप्रमाणे त्याज्य समजून त्य़ास तो तुच्छ म्हणून टाकतो. ॥८-२६०॥

वेदेषु यज्ञेषु तपःसु चैव दानेषु यत्पुण्यफलं प्रदिष्टाम् ।
अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परं स्थानमुपैति चाद्यम् ॥ २८ ॥
ॐ तत्सदिति श्रीमद्भ गवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे
श्रीकृष्णार्जुनसंवादे अक्षरब्रह्मयोगो नाम अष्टामोऽध्यायः ॥ ८ ॥
वेदाध्यनामधे, यज्ञामधे, तपश्चर्येमधे अथवा दानामधे जे जे पुण्यकारक फल सांगितले आहे त्या सर्व फलांहून अधिक फल हे (जीव व न्रह्म यांचे ऐक्यरूपी ज्ञान) आहे, हे जाणून योगी त्यास (वरील वेदाधयनादिकांच्या योगाने प्राप्त होणारी स्वर्गसुखासारखी फले त्य़ास) मागे टाकून जातो व अत्यंत श्रेष्ठ अशा स्थानाप्रत जातो. ॥८-२८॥

जरी वेदाध्ययनाचें जालें । अथवा यज्ञाचें शेतचि पिकलें ।
कीं तपोदानांचे जोडलें । सर्वस्व हन जें ॥ २६१ ॥
जरी वेदाच्या अध्ययनाने मिळणारे पुण्य प्राप्त झाले अथवा यज्ञरूप शेतच पिकले किंवा तपाचे अथवा दानाचे असलेले सर्वस्व पुण्य मिळाले ॥८-२६१॥

तया आघवयाचि पुण्याचा मळा । भारु आंतौनि जया ये फळा ।
तें परब्रह्मा निर्मळा । सांटि न सरे ॥ २६२ ॥
तरी त्या सर्वच पुण्याच्या मळ्याला पुष्कळ पीक येऊन जे फळ येते ते फळ नित्यशुद्ध परमात्म्याच्या तुलनेला येत नाही. ॥८-२६२॥

जें नित्यानंदाचेनि मानें । उपमेचा कांटाळा न दिसे सानें ।
पाहा पां वेदयज्ञादि साधनें । जया सुखा ॥ २६३ ॥
जे स्वर्गसुख नित्यानंदाचे मानाने उपमेच्या ताजव्यात घालून पाहिले असता कमी दिसत नाही, पहा की ज्या सुखाच्या प्राप्तीकरता वेदयज्ञादि साधने आहेत ॥८-२६३॥

जें विटे ना सरे । भोगी तयाचेनि पवाडें पुरे ।
पुढती महासुखाचें सोयरें । भावंडचि ॥ २६४ ॥
जे स्वर्गसुख विटत नाही व संपत नाही, भोगणार्‍याच्या इच्छा पुरवते आणि शिवाय जे स्वर्गसुख ब्रह्मसुखाचे धाकटे भावंडच आहे ॥८-२६४॥

ऐसें दृष्टीचेनि सुखपणें । जयासी अदृष्टाचें बैसणें ।
जें शतमखाही आंगवणें । नोहेचि एका ॥ २६५ ॥
अशा तर्‍हेचे दिसण्यातच जे सुख आहे व ज्याला अदृष्टाचा आधार आहे व जे शंभर यज्ञ करून देखील कित्येकांना साध्य होत नाहीच. ॥८-२६५॥

तयातें योगीश्वर अलौकिकें । दिठीचेनि हाततुकें ।
अनुमानती कौतुकें । तंव हळुवट आवडे ॥ २६६ ॥
त्या स्वर्गसुखाला योगीश्वर (आपल्या) लोकोत्तर विचारदृष्टिरूपी हातावर लीलेनेच वजन करून त्या स्वर्गसुखाच्या योग्यतेचे अनुमान करतात, तो ते त्यास हलके वाटते. ॥८-२६६॥

मग तया सुखाची किरीटी । करूनियां गा पाउटी ।
परब्रह्माचिये पाठीं । आरूढती ॥ २६७ ॥
अर्जुना, मग ते योगीश्वर त्या स्वर्गसुखाची पायरी करून परब्रह्माच्या पाटावर बसतात. ॥८-२६७॥

ऐसे चराचरैक भाग्य । जें ब्रह्मेशां आराधना योग्य ।
योगियांचें भोग्य । भोगधन जें ॥ २६८ ॥
याप्रमाणे स्थावजंगमात्मक जगाचे जे एक भाग्य, जे ब्रह्मदेव व शंकर यांनाही आराधना करण्यास योग्य व जे योग्यांना भोगण्याला योग्य असे भोगरूपी ऐश्वर्य आहे, ॥८-२६८॥

जो सकळ कळांची कळा । जो परमानंदाचा पुतळा ।
जो जिवाचा जिव्हाळा । विश्वाचिया ॥ २६९ ॥
जो (परमात्मा) सर्व कळांची कळा आहे, जो परमानंदाची मूर्ति आहे व जो विश्वाचा जिव्हाळा आहे. ॥८-२६९॥

जो सर्वज्ञतेचा वोलावा । जो यादवकुळींचा कुळदिवा ।
तो श्रीकृष्णजी पांडवा- । प्रती बोलिला ॥ २७० ॥
जो परमात्मा सर्वज्ञतेचे जीवन आहे, जो यादवांच्या कुलाचा कुलदीपक आहे, महाराज तो श्रीकृष्ण अर्जुनास असे बोलला. ॥८-२७०॥

ऐसा कुरुक्षेत्रींचा वृत्तांतु । संजयो रायासी असे सांगतु ।
तेचि परियेसा पुढारी मातु । ज्ञानदेव म्हणे ॥ २७१ ॥
अशी ही कुरुक्षेत्रावरील हकीकत संजय धृतराष्ट्र राजाला सांगत होता. तीच गोष्ट पुढे तुम्ही ऐका. असे निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात. ॥८-२७१॥



इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां अष्टमोऽध्यायः ॥




GO TOP