[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
नारद म्हणाले, "हे मुनिश्रेष्ठा, प्राण्यांना संसारबंधनातून मुक्त करणारे प्रकृतीचे आख्यान मी ऐकले. आता मला वेदातील गुप्त रहस्य सांगा. राधा, दुर्गा व देवींचे विधानही सांगा."
श्री नारायणमुनी म्हणाले, "हे नारदा, हे वेदांत सार गुप्त ठेवणेच इष्ट होय. मूलप्रकृती आणि संविद्रूप ज्ञानशक्ती यांच्यापासून सर्व सृष्टी उत्पन्न होते. प्रथम तिच्यापासून प्राण व बुद्धी यांच्या अधिदेवता निर्माण झाल्या. त्या सर्व जीवांचे नियमन करतात. हे विराटादि व चराचर जगत् त्यांच्या आधीन आहे. त्यांच्या प्रसादाशिवाय मोक्षप्राप्ती नाही. म्हणून त्यांची सेवा करावी. आता राधिकेचे मंत्र सांगतो. कारण ब्रह्मा, विष्णु, महेशही तेच मंत्र जपत असतात. प्रथम "श्री राधा" हे चतुर्थ्यात पद घ्यावे. त्याच्यापुढे अग्निजाया 'स्वाहा' म्हणून देवीची पूजा करावी.
"श्री राधायै स्वाहा" हा षडाक्षरी मंत्र धर्म, अर्थ, काम यांचा प्रकाशक आहे. त्या पूर्वी "र्हीं" या मायाबीजाची योजना करावी. या मंत्राचे महात्म्य कितीही प्रयत्नांनी वर्णन करता येणार नाही. प्रथम रासमंडळात श्रीकृष्णाने हा मंत्र ग्रहण केला. नंतर त्याने हा मंत्र विष्णूस दिला. विष्णूने ब्रह्मदेवास व त्याने विराटास या मंत्राचा उपदेश केला. नंतर धर्माने मला हा मंत्र सांगितला. त्याच मंत्राचा मी सतत जप करतो.
ब्रह्मदेव वगैरे सर्वजण तो मंत्र जपत असतात. कारण राधेच्या पूजेशिवाय श्रीकृष्णाची पूजा करण्याचा अधिकार नाही. म्हणून विष्णूभक्तांनीही राधेचेच पूजन करावे. कारण तो तिच्या आधीन आहे. ती कृष्णाच्या प्राणाची देवता आहे. सर्व कामनापूर्ण करणारी म्हणून तिला राधा म्हणतात. "राध्नेति सकलानकामांस्तस्माद्राधेति कीर्तिता" अशी राधा शब्दाची व्युत्पत्ती आहे. नवम स्कंधात सांगितलेल्या सर्व मंत्रांचा मीच ऋषी आहे. देवी गायत्री छंद असून राधा ही देवता आहे. प्रणव हे बीज व भुवनेश्वरी ही शक्ती आहे. या मूलमंत्राची आवृत्ती करून षड्न्यास करावा. नंतर रासांची नायिका राधा हिचे सामवेदोक्त ध्यान करावे.
जिचे मुख चंद्राप्रमाणे आहे. कोटीसूर्याप्रमाणे जिची कांती आहे, कमलाप्रमाणे नेत्र आहे, श्रोणी विस्तृत आहे, कुंदकळ्यांप्रमाणे दंतपंक्ती आहेत, जिने रेशमी वस्त्र परिधान केले आहे, स्तनद्वय हत्तीच्या मस्तकावरील कुंभद्वयाप्रमाणे आहेत, जी शृंगार समुद्राची लाट आहे, जाईजुईची वेणी गुंफल्यामुळे जी फारच सुंदर दिसते, अशा नाजुक बांध्यांच्या, रासमंडलात रहाणार्या, चिरयौवनसंपन्न असलेल्या त्या श्रेष्ठ देवीचे वेदसुद्धा वर्णन करतात.
अशा त्या देवीचे ध्यान करून तिचे विधीपूर्वक पूजन करावे. मूलविद्येचे आचमन तीन वेळा तिच्या मुखात घालावे. तिला मधुपवी व दुभती गाय अर्पण करावी. तिची भावना करून तिला स्नानगृहात अभ्यंगस्नान घालावे. विविध वस्त्रे अर्पण करून चंदनाची उटी लावावी. तुलसीच्या मंजिर्यांची माला अर्पण करावी. सहस्र पाकळ्यांचे कमळ द्यावे.
नंतर त्या प्रभावी देवीच्या पवित्र परिवाराचीही पूजा करावी. अग्नेय, ईशान्य, नैॠत्य, वायव्य या दिशात तिच्या अंगदेवतांचे पूजन करावे. पूर्व दळावर मालतीची, आग्नेय दळावर माधवीची, दक्षिण कोणात रत्नमालेची, नैॠत्येत सुशीलेची, पश्चिमेस शशिकलेची पूजा करावी. वायव्येस पारिजात, उत्तरेस परावती, ईशान्येस त्या सुंदरी प्रियकरणीची पूजा करावी. नंतर ब्राह्मी वगैरे शक्तींची पूजा करावी. भूमीवर दिक्पालाची व वज्रादि आयुधांची पूजा करावी.
नंतर देवीचे सहस्रनाम स्तोत्र पठण करावे. मूलमंत्राचा एक हजार जप करावा.
अशारीतीने जो त्या राधेची पूजा करतो, तो विष्णुतुल्य होऊन गोलोकी जातो. कार्तिकी पौर्णिमेस राधेचा जन्मोत्सव करावा. कारण पूर्वी ती राधा वृषभानूची कन्या होऊन जन्मास आली.
जितके मंत्रवर्ण आहेत तितके लक्ष जपाची संख्या असावी म्हणजे मंत्राचे पुरश्चरण होते. त्याच्या दशांश होम करावा. धृत, मध, दूध यांनी तीलासह हवन करावे." नारद म्हणाले, "हे मुने, मला ते स्तोत्र सांगा." श्रीनारायण म्हणाले, "हे परमेश्वरी, रासमंडलनिवासिनी, कृष्णप्रिये, रासेश्वरी, तुला नमस्कार असो. हे त्रैलोक्यमाते, करुणाकर देवी तुला नमस्कार असो. हे सरस्वती देवी, हे सावित्री, हे शांकरी, हे गंगे, पद्मावती, हे षष्ठीदेवी, हे मंगलचंडिके, मी तुला वंदन करतो.
हे तुलसी देवी, हे लक्ष्मी, हे दुर्गे, तू मूलप्रकृती आहेस. तू आम्हावर कृपा कर."
असे हे राधेचे स्तोत्र त्रिकाळ म्हणणार्यास काहीही दुर्लभ नाही. तो गोलोकी रासमंडळात राहतो. हे गूढ रहस्य गुप्त ठेवावे.
आता हे ब्राह्मणश्रेष्ठा, तुला दुर्गादेवीचे पूजाविधान सांगतो. तिच्या केवळ स्मरणाने
विपत्तींचा नाश होतो. सर्वांना उपासना करण्यास योग्य, संकटनाश करणारी, अशा तिला भूलोकी दुर्गा म्हणतात.
ही विष्णुभक्त व शिवभक्तांना नित्य पूज्य असते. तिचा नवाक्षरी मंत्र सर्वोत्तम आहे. वाणीपासून उत्पन्न होणारे शंभुस्री व काम यांचे बीज प्रथम घ्यावे. नंतर चामुंडायै हे पद ठेवून विच्चे ही अक्षरे जोडावीत. असा नवाक्षरी मंत्र होतो. ब्रह्मा, विष्णु व महेश्वर हे या मंत्राचे ऋषी आहेत. गायत्री, उष्णिक, अनुष्टुप हे त्याचे तीन छंद आहेत. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती ह्या देवता आहेत.
रक्तदंतिका, दुर्गा, भ्रामरी यांचे बीज होय. नंदा, शाकंभरी, भीमा ह्या शक्ती व धर्म, अर्थ, काम, मोक्ष ह्या ठिकाणी या मंत्राचा विनियोग आहे.
ऋषी, छंद, देवता यांच्या मस्तक, मुख व हृदय या ठिकाणी न्यास करावा. कामनांची सिद्धी व्हावी म्हणून स्तनांच्या ठिकाणी शक्ती, बीज यांचा न्यास करावा. तीन बिजांनी, चामुंडायै या चतुराक्षरांनी, विच्चे या अक्षरांनी व सर्व मंत्राला नमः, स्वाहा, वषट्, हुं, वौषट व फट् ही पदे सोडून त्यायोगे षडंग न्यास करावा. शिखेचे ठिकाणी, दोन नेत्र, कर्ण, नासिका, मुख, गुद या ठिकाणी त्या मंत्राचे वर्ण योजावेत. नंतर व्यापक न्यास करावा, "खड्ग, चक्र, गदा, बाण, धनुष्ये, परिघ, शूल, भृशुंगी, शिर, शंख या आयुधांनी युक्त; त्रिनेत्र, भूषणांनी विभूषित, निलांजल पर्वताप्रमाणे नीलकांती बसलेले, दहा पाय, दहा मुखे अशा त्या देवीचे पूजन करतो."
असे तिचे ध्यान करावे. "नंतर कामबीज असून अक्षमाला, परशू गदा, बाण, कुलिश, कमल, धनुष्यबाण, दंड, शक्ती, तलवार, ढाल, पुंडरीक, घंटा, सुरापात्र, शूल, पाश, सुदर्शन इत्यादी धारण केलेली, ताम्रवर्णासनावर बसलेली, अशा देवीची मी पूजा करतो. घंटा, शूल, नांगर, शंख, मुसल, सुदर्शन, धनुष्यबाण धारण करणारी, शुंभदैत्यनाशिनी, वाणीबीजरूप, सच्चिदानंदरूप महासरस्वतीचे मी ध्यान करतो."
या देवीचे सहा कोणांनी युक्त असे त्रिकोणी यंत्र करावे. प्रथम त्रिकोण काढून त्यावर अष्टदलांचे चोवीस पत्रांचे कमल काढावे. ते भूस्थ गृहाने युक्त करावे. या यंत्रात अथवा शालग्रामाचे ठिकाणी, घटामध्ये, प्रतिमेमध्ये, बाण-लिंग यांच्या ठिकाणी किंवा सूर्याचे ठिकाणी तिची कल्पना करावी व शक्तीयुक्त पीठावर तिची भक्तीने पूजा करावी.
पूर्वेकडील कोणात सरस्वतीसह ब्रह्मदेव, नैॠत्य कोणात लक्ष्मीसह विष्णू, वायव्यात पार्वतीसह शंकर, उत्तरेस सिंह, डाव्या बाजूस महिषासुर व सहा कोणात नंदजा, रक्तदंता, शाकंभरी, दुर्गा, भीमा, भ्रामरी यांची अष्टदलात ब्राह्मी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, नारसिंही, ऐंद्री, चामुंडा यांची पूजा करावी.
त्यानंतर चोवीस पत्रांवर विष्णुमाया, चेतना, बुद्धी, निद्रा, क्षुधा, छायाशक्ती, परा, तृष्णा, सामान्य शांती, जाती, लज्जा, विशेष शांती, श्रद्धा, कीर्ती, लक्ष्मी, वृत्ती, श्रुती, स्मृती, दया, तुष्टी, माता, भ्रांती या क्रमाने पूर्वेकडून पूजा करावी.
भूमीवर पुरोगामी, कोणात क्षेत्ररक्षक, गणपती आणि बटूभैरव देवांचे तसेच योगिनीचेही पूजन करावे. नंतर बाहेर असलेल्या इंद्रादि दिक्पालांचे पूजन करावे. अशारीतीने देवीचे पूजन झाल्यावर राजोपचार अर्पण करावेत. नंतर देवीपुढे सप्तशतीचा पाठ करावा. त्यायोगे चारही पुरुषार्थ प्राप्त होतात.
हे विप्रा, याप्रमाणे मी तुला दुर्गेचे पूजाविधी सांगितले. कारण सर्व देवश्रेष्ठही तिचेच ध्यान करतात. तिच्या स्मरणानेच जन्माचे सार्थक होते. चवदा मनूही तिचीच आराधना करतात.
हे नारदा, हे अत्यंत गुप्त रहस्य मी तुला निवेदन केले. देवानांही त्यांची स्थाने देवीच्या स्तवनानेच प्राप्त झाली आहेत. तसेच पंचप्रकृती, त्यांचे अंश यांचेही वर्णन मी केले. हे ऐकून चारीही पुरुषार्थप्राप्ती होते हे निश्चित होय.
याच्या श्रवणाने निपुत्रिकास पुत्र, विद्यार्थ्यास विद्या प्राप्त होते. तसेच मनोकामना पूर्ण होतात. नवरात्रात याचा पाठ केल्यास जगन्माता प्रसन्न होते. जो पुरुष रोज एक अध्याय वाचतो तो देवीस प्रिय होतो.
कुमारी किंवा ब्रह्मचारी यांच्या हातून या ग्रंथात शकून पहावेत. संकल्प करून पुस्तकाची पूजा करावी. जगदीश्वरी देवीला नित्य नमस्कार करावा.
सुस्नात झालेल्या कन्येची यथाविधी पूजा करावी. तिच्याकडून पुस्तकात सुवर्णाची काडी घालावी. तेथे शुभ किंवा अशुभ फल समजेल. काही भाग उदासीन निघाल्यास कार्यही उदासीन होईल.