[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
धर्मराज म्हणाला, "हे सती, सर्व कुंडे पूर्ण चंद्राच्या आकाराची असतात. प्रलयकालापर्यंत ती नष्ट होत नाहीत. पापी लोकांना शिक्षा देण्यासाठी ती पेटलेल्या निखार्यासारखी केलेली असतात. बहिःकुंड जास्त क्लेश देणारे आहे. ते अर्धा कोस लांबीचे, तप्त उदकाने भरलेले, हिंस्र प्राण्यांनी युक्त असे आहे. तेथे प्राण्यांचा नित्य आक्रोश चाललेला असतो. ते 'त्राही, त्राही' असे ओरडत असतात. ते विष्ठेने भरलेले असते. त्यातील किडेही पाप्यांना चावत असतात. तसेच दुसरेही कुंड प्रचंड लांब-रुंदीचे असतात. त्यात अनेक किडे असतात. ती श्लेष्मकुंडे म्हणून प्रसिद्ध आहेत.
गरकुंड विस्तृत लांबीचे असून त्यात विषारी किडे आहेत. तेथे ओरडून ओरडून प्राण्यांचा कंठ सुकून जातो. तसेच भयभीत होऊन सैरावैरा पळणार्या पाप्यांचे दूषित कुंड आहे. वसारसाने व्याप्त असलेले वसाकुंड, शुक्रातील किडा असलेले शुक्रकुंड, तसेच पूर्ण दुर्गंधी व किडे यांनी भरलेले वक्रकुंड आहे. नेत्राश्रूंचे नेत्राश्रूकुंड, मानवशरीराच्या मलाने भरलेले गात्रमलकुंड, कानातील मळाचे कर्णविटकुंड अशी आणखीही कुंडे आहेत.
मज्जा व घाणीने भरलेले मज्जाकुंड, स्निग्ध मांसाचे मांसकुंड, कन्येची विक्री करणार्या पाप्यासाठी नखकुंडासारखी चार कुंडे आहेत. अत्यंत तप्त असे तांब्याचे कुंड आहे. तसेच लोखंडाचे तप्त खांब असलेले ते अतिभयंकर लोहकुंड, ते अंधःकाराने व्याप्त आहे. चर्मकुंड, तप्त सुरेचे कुंड, शाल्मली कुंड अशीही कुंडे आहेत. शाल्मली कुंडात काटे असतात.
सर्पाच्या विषाने भरलेले विषकुंड, तप्त तेलाचे तैलकुंड ही आणखी भयंकर व असह्य कुंडे आहेत. शूलाप्रमाणे असलेले, अस्त्रांनी युक्त असे कुतकुंड, सर्पाकाराचे तीक्ष्ण असे कृमीकुंड, पूय सेवन करणार्यासाठी पूयकुंड अशी भयंकर कुंडे आहेत.
तालवृक्षाच्या आकाराचे कोटयावधी सर्पांनी युक्त अशी व अत्यंत पापी लोकांसाठी मशकादी तीन कुंडे आहेत. त्यानंतर हातपाय बांधून यमदूत मारत असतात, अशी वज्र व वृश्चिक कुंडे आहेत. तप्त उदकाने भरलेले गोलकुंड, नंतर दुर्गंधीयुक्त, पाप्यांना अत्यंत त्रस्त करणारे, ओबडधोबड आकाराचे, विष्ठा, मूत्र, श्लेष्म यांनी भरलेले काककुंडही अत्यंत भयंकर आहे.
मंथान कुंड, बीज कुंड ही कुंडेही भयंकर आहेत. मंथान व बीज प्राण्यांनी ती पूर्ण आहेत. तीक्ष्ण पाषाणांनी तयार केलेले असे तीक्ष्ण पाषाणकुंड महापातक्यांसाठी केलेले आहे. रक्तमय असे लाल कुंड आहे. अंजन पर्वतासारख्या पाषाणांचे असे मसीकुंड आहे. चूर्ण द्रव्याने भरलेले चूर्णकुंड, चक्राप्रमाणे वेगाने ज्या ठिकाणी फिरविले जाते ते चक्रकुंड व वक्र, खोल, लांबरूंद प्रमाणाचे, तप्त उदकांचे, जंतूंनी भरलेले, जाळणार असे वक्रकुंड महापातक्यांसाठी केलेले आहे.
अत्यंत भयंकर कासवे असलेले, जलचर प्राण्यांनी भरलेले ज्वालाकुंड, तापलेल्या
राखेचे, भस्म खायला लावणारे तप्त पाषाण व लोहांनी युक्त असे, दग्ध करणारा दग्ध कुंड आहे. तापलेल्या खार्या पाण्याचे, उग्र जलचर असलेले, भयंकर तप्त असे सूचीकुंड अशी आणखीही भयंकर कुंडे आहेत. दोन्ही बाजूला धार असलेल्या पत्र्यांनी युक्त, खोल दरीप्रमाणे असलेले, पाप्यांचे रक्ताने भरलेले, अंधःकारमय, सर्वात भयंकर असे असितपत्रकुंड अतिशय त्रासदायक आहे. पाप्यांच्या रक्ताने माखलेले भयानक असे क्षुरधार कुंड आहे. सूचीपूर्ण अस्त्रांचे सूचीमुख कुंड आहे.
गोका नावाच्या प्राण्याच्या मुखासारखा आकार असलेले, कूपाप्रमाणे दिसणारे, महापाप्यांना असह्य असे गोखामुखकुंड आहे. नक्रमुखाच्या आकाराचे अत्यंत विस्तीर्ण असे कूपरूप नक्रकुंड प्रसिद्ध आहे. तसे ते प्रचंड जगदंशकुंड आहे. कालचक्राप्रमाणे फिरविणारे, कुंभाकाराचे, अंधःकारमय असे अत्यंत विस्तृत ताम्रकुंड आहे. जेथे पापीही मूर्च्छित होतात. आक्रोश करतात, मृदगलांनी ताडण करतात असे ते सर्वात चौपट कुंभीपाक कुंड होत. सर्वात कुंभीपाक कुंड महाभयंकर आहे.
ही सर्व कुंडे देहाचे सर्व क्लेशदायक भोग भोगायला लावण्यासाठी केलेली आहेत. अवट म्हणून प्रसिद्ध असलेले मत्स्योद कुंड आहे. ते तप्त उदकाने भरलेले आहे. ज्या कुंडातील पापी व्याधीग्रस्त होतात ते अरूंतुद कुंड आहे. तुषदग्ध असे तप्त कणांचे पासुभोज्य कुंड आहे. देहपतनानंतर शूलाने वेष्टित करणारे शूलप्रोत कुंड आहे. पतितांना कंप सुटतो असे बर्फमय उदकाचे कुंड आहे. ज्या कुंडातील पाप्यांना यमदूत तोंडात कोलीत धरायला लावतात, उल्कांनी व्याप्त असे उल्कामुख कुंड आहे.
एक लाख पुरुष खोल असलेले, कृमींनी भरलेले भीतीदायक, उकळणार्या उदकाचे, अंधकारमय असे अंधकूप कुंड होय. विविध शस्त्रांचे प्रहार पाप्यांवर जेथे करतात ते वेधनकुंड होय. दंडाने पाप्यांना ताडण जेथे करतात ते दंडताडन कुंड आहे. पाप्यांना जाळ्यात अडकविणारे जलरंध्र कुंड होय. जड लोखंडी बेडयांनी बद्ध करणारे, प्राण्यांच्या देहाचे चूर्ण करणारे देहचूर्ण कुंड आहे. जेथे यमदूत पाप्यांना फाडतात ते दलनकुंड म्हणून प्रसिद्ध आहे. तप्त वाळू असलेले पाप्यांचा कंठ शुष्क करायला लावणारे शोषण कुंड आहे.
पाप्यांना अधिक दुःखदायक, दुर्गंधीयुक्त कषकुंड सांगितले आहे. शूर्पाकाराचे तप्त लोखंडाचे दुर्गंधीयुक्त शूपाकार कुंड आहे. तप्त वाळूने भरलेले अग्नीज्वालांनी युक्त पाप्यांना भयंकर असे ज्वालाव्याप्त मुखकुंड आहे. तापलेल्या विटांनी देहाला भाजणारे जिह्मकुंड आहे. धूमाने भरल्यामुळे अंधार असलेले पापी प्राण्यांनी व्याप्त असे धूमांध कुंड आहे. देहपतनानंतर ज्या ठिकाणी प्राणी सर्पानी वेढला जातो ते नागवेष्टित कुंड होय.
हे सावित्री, अशाप्रकारची ही कुंडांची माहिती मी तुला सांगितली. त्यांची लक्षणे सांगितली. आता तुला आणखी काय ऐकायचे आहे ?"