श्री रामदासस्वामीकृत् 'मनोबोध' (मनाचे श्लोक) विवरण
॥ श्रीराम समर्थ ॥
मना मछरे नाम सांडू नको हो । अती आदरे हा निजध्यास राहो ॥
समस्तामधें नाम हें सार आहे । दुजी तूळणा तूळितां ही न साहे ॥ ८१ ॥
आतां या श्लोकापासून पुढें वीस-बावीस श्लोकांत समर्थांनी नाममाहात्म्य सांगितलें आहे. मागच्या श्लोकातील मत्सराचा संबंध पुन्हा येथें आल्याने मागील प्रकरणाशी तें जणू जोडले गेलें आहे.
मनामध्ये मत्सर ठेवून नाम घेणे सोडू नये असें जें सांगितलें आहे तें नीट समजून घेतलें पाहिजे. मत्सर शब्दाने एकाद्याविषयीची तुच्छताबुद्धि सांगितली जाते. गीतेने मत्सर हें आसुरी संपत्तीचें लक्षण सांगितलें आहे, आणि श्रीज्ञानेश्वर महाराजांनीं त्याचा अर्थ करतांना संत, ईश्वराचे भक्त, महात्मे, यांची निंदा करण्याची वृत्ति असा अर्थ केला आहे. पुढें १८ व्या अध्यायांत गीता कोणाला सांगू नये त्याचे वर्णन करतांना 'माझ्याविषयी ज्याच्या मनांत असूया आहे त्याला गीता सांगू नये' असें भगवंतांनीं म्हटलें आहे आणि श्रीज्ञानेश्वरमहाराजांनी हा दोष भयंकर असल्याचें निरनिराळ्या उपमांतून सुचविले आहे. शरीर सुंदर आणि तरुण असावें, दागदागिन्यांनीं शृंगारलेलेहि असावे पण त्या शरीरांत प्राण मात्र नसावा, रात्रीच्या वेळी पणतीमध्ये तेलवात असावी पण ज्योत नसावी, एकाद्या वैभवशाली प्रशस्त घराकडे आश्रयासाठी म्हणून जावे तो तेथें विषारी नागीण दारांत बसलेली असावी, पंचपक्वान्नांनी भरलेल्या ताटांत विष कालवले असावें किवा एकाद्याने पोटामध्ये कपट ठेवून वरवर मैत्री दाखवावी तसें इतर सगळे गुण असतांना मनामध्ये मत्सर (असूया) आहेच म्हणून समजावे असें श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात (ज्ञा. १८ / १५०१-३.) मत्सराने अंतःकरण भरलेली माणसे इतराचे कांहीं ऐकून घेण्याच्या मनःस्थितींतच नसतात आणि मग त्यांना घोर अधःपात सोसावा लागतो. गीतेच्या तिसऱ्या अध्यायामध्ये, ' असूयेनें माझें मत स्वीकारीत नाहींत, अशी अंतःकरणहीन माणसे सर्वज्ञानविमूढ असून नष्ट असतात असें समज, " असें श्रीभगवान् म्हणतात. 'ये त्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् । सर्वज्ञाविमूढांस्तान् विद्धि नष्टानचेतसः ॥ " (भ. ३।३२.) यावर भाष्य करतांना मत्सरीवृत्तीची भूमिका श्रीज्ञानेश्वर महाराजांनी सूक्ष्मपणे स्पष्ट केली आहे. "नातरी प्रकृतिमंतु होऊनि । इंद्रिय लळा देऊनी । जे हें मत माझें अव्हेरूनि । ओसडिती ॥ जे सामान्यत्वे लेखिती । अवज्ञा करून देखिती । की हा अर्थवादु म्हणती । वाचाळपणे ॥ " (ज्ञा. ३/१९४-५)
१८ व्या अध्यायांतहि असूयेचा अर्थ करतांना "तरी गीताशास्त्र निर्मिता । जो मी सकललोकशास्ता । तया मातें सामान्यता । बोलेल जो !" (ज्ञा. १८-१४९८) असेच म्हटले आहे.
अत्यंत श्रेष्ठ, सोपे आणि प्रभावी असलेलें ईश्वराचें नाम घ्यावेसे वाटत नाहीं, त्यामागे हीच सामान्यपणाची, तुच्छतेची, भावना असते. नाममहात्म्य हा अर्थवाद वाटतो. तें, केवळ गौरवाचे, पोकळ बोलणें वाटतें, व्याजस्तुति वाटते आणि मग स्वाभाविकपणेच नाम घेतले जात नाहीं, निदान त्या नामस्मरणाच्या मागे असावी तितकी श्रद्धा नसते. असे होऊं नये म्हणून पुढच्याच ओळीमध्यें समर्थ रामनामाचा निजध्यास असावा, तें सातत्याने लक्षपूर्वक घ्यावें, पण ते घेतांना मनामध्ये नामाविषयीं अत्यंत आदराची भावना ठेवावी, असें आवर्जून सांगत आहेत. कारण नाम हें मनुष्याच्या उद्धाराची जेवढी साधनें असूं शकतात, त्या सर्व साधनामध्ये, अगदीं सारभूत असें आहे. त्याच्याशी तुलना करता येईल असें दुसरें कोणतेंहि साधन उपलब्ध नाहीं. वामनपंडितांनीं नामाची वस्तुतंत्रता मोठ्या प्रभावीपणे सांगितली आहे. ते म्हणतात- "अजित नाम वदो भलत्या मिसे । सकल पातक भस्म करीतसे । न कळतताः पद अग्निवरी पडे । न करि दाह असें न कधीं घडे । " यासाठीं नामाचा हा प्रभाव जाणून माणसाने नामाविषयीं उपेक्षाहि बाळगू नये किंवा नाम घेण्याचा कंटाळाहि करूं नये.
बहू नाम या रामानामीं तुळेना । अभाग्या नरा पामरा हें कळेना ॥
विषा औषध घेतलें पार्वतीशें । जिवा मानवा किंकरा कोण पुसे ॥ ८२ ॥
भगवान् रामचंद्र हे समर्थांचे आराध्यदैवत. रामचंद्र हा त्यांच्या अनन्यनिष्ठेचा विषय. त्यामुळें राम या नामाविषयीं समर्थांना असाधारण प्रेम असणें स्वाभाविक आहे. त्यामुळें नाममहात्म्य गातांना समर्थ म्हणतात-देवदेवतांची सहस्त्रावधि नामे आहेत. पण त्यांतील कोणतेंहि नाम राम या नांवाशी तुलना करण्याच्या योग्यतेचें नाहीं. नितांत श्रद्धेच्या दृष्टिकोनातून समर्थांची ही धारणा योग्यच आहे. प्रत्येक साधकाचीहि तशीच धारणा असली पाहिजे. शास्त्रदृष्टीनें आपल्या आराध्य देवतेच्या नांवाविषयीं असा विश्वास नसेल तर त्याला नामस्मरणाचें फल तितकेसें प्राप्त होणार नाहीं "पतिव्रता नेणे आणिकांची स्तुति । सर्वभावें पति ध्यानी मनीं ॥" असेंच प्रत्येकाला आपल्या आराध्यदेवतेविषयीं वाटलें पाहिजे; या वास्तविक श्रेष्ठ श्रद्धेच्या अनुषंगाने त्या त्या देवतेच्या नामाचे महत्त्व पटवून देणारी इतरहि कांहीं कारणें असूं शकतात; त्यांचाहि उल्लेख केला गेला तर सामान्यांची श्रद्धा दृढ होण्यास सहाय्य होतें. थोर लोक जगत्कल्याणासाठी त्यांचाहि उपयोग करतात. रामरक्षेचा उपसंहार करतांना रामनामाचे महत्त्व वर्णिले आहे कीं "राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे । सहस्रनाम ततुल्यं रामनाम वरानने ॥" एकच रामनाम हें सहस्रनामाच्या तोडीचें आहे, असे भगवान श्रीशंकरांनी श्रीपार्वती देवीला सांगितले आहे. अलीकडे विज्ञानाच्या सहाय्याने निरनिराळ्या मैत्रांच्या व मंत्रसामर्थ्यानें युक्त अशी धारणा असलेल्या वेगवेगळ्या शब्दांच्या उच्चारातून निर्माण होणारे स्पंद, वेग, तरंग यांचे मापन केले जाते. आणि त्यावरून त्या मंत्राचे वा मंत्रमय शब्दाचे सामर्थ्य ठरविले जाते. आपला गायत्रीमंत्र जगांतील सर्व मंत्रामध्ये या दृष्टीनें फार प्रभावी आणि म्हणूनच श्रेष्ठ आहे असे एका विद्वानांनी प्रसिद्ध केले आहे. एकेरी शब्दाच्या नामांत राम हें नांव असेंच शब्दोच्चार मापनाच्या दृष्टीने फार श्रेष्ठ आहे असे काशीच्या एका वृद्ध वैद्यांनी मला स्वतःलाच सांगितले होते. रक्तदाबादि अनेक विकारांवर स्पष्ट, दीर्घ, मंद अशा पद्धतीने रामनामाच्या जपाचा फार उपयोग होतो असेहि त्यांनी मला सांगितले. निरनिराळ्या मंत्रांना, शब्दांना, प्रकृतिभेदानें असें सामर्थ्य असणें शक्य आहे. त्यासाठीं सर्वांना विश्वासार्ह वाटणाऱ्या विज्ञानाचीहि साक्ष निघू शकते.
समर्थांचा तर रामनामाविषयीचा स्वतःचा अनुभवच आहे. म्हणून हें नाममहात्म्य ज्याला पटत नाहीं त्याला समर्थांनी अभागी, पामर, अशीं विशेषणे दिली आहेत. जे सोपें आहे, सर्वसुलभ आहे, अत्यंत श्रेष्ठ आहे, फार उपयोगाचे आहे तें नामहि घेण्याकडे कोणाची प्रवृत्ति नसेल तर त्याला अभागी, करंटा, दीन, तुच्छ असें त्याच्या हिताची कळकळ असणारांनी म्हणणें स्वाभाविकच आहे.
रामनामाचे महत्त्व पटावे म्हणून समर्थ म्हणतात- अरे ! समुद्रमंथनाच्या वेळीं विषप्राशनानें झालेला दाह नाहींसा होण्यासाठी केलेलें सर्व उपाय निरुपयोगी ठरल्यानंतर भगवान् शंकरांनींहि हें रामनाम औषध म्हणून घेतले आणि त्यामुळे त्या पार्वतीपतीला विलक्षण लाभ झाला.
सामान्य मानवी जीवाच्या आपत्ति त्या काय ? त्यांना असणाऱ्या वेदना किती ? महाभयंकर अशा हालाहल विषाचेंहि दुष्परिणाम ज्या नामाच्या सामर्थ्यापुढें निष्प्रभ ठरले त्या रामनामाच्यासमोर या सामान्य व्यथा-वेदनांना काय मूल्य आहे ? कोण विचारतो त्यांना ?
मनाच्या श्लोकांत रामाचे वा रामनामाचें महात्म्य गातांना उदाहरण म्हणून अनेक वेळा शंकरांचा उल्लेख आलेला आहे. कारण आपल्या पुराणांतून, विशेषतः अध्यात्मरामायण व तुलसीरामायण या ग्रंथांतून शंकरांची ही रामभक्ति मोठ्या गौरवाने वर्णिलेली आढळते. शंकर हे दैवत फार व्यापक क्षेत्रांत लोकप्रिय असल्यानें त्या माध्यमाने रामनामाचा प्रचार अधिक होणें शक्य आहे. म्हणून समर्थ तसा उल्लेख पुन्हा पुन्हा करीत आहेत. सर्वमान्य असलेल्या उदाहरणांनी सामान्यांच्या मनावर अनुकूल परिणाम स्वाभाविकपणें घडतो. म्हणून समर्थ वारंवार शंकराचे उदाहरण देतात. पुढील २ - ३ श्लोकांत त्यांनीं हेंच उदाहरण पुन्हां पुन्हां दिले आहे.
जेणें जाळिला काम तो राम ध्यातो । उमेसीं अती आदरें गुण गातो ॥
बहू ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथें । परी अंतरी नामविश्वास तेथें ॥ ८३ ॥
ज्यानें कामाला जाळून भस्म केले, अत्यंत प्रबल, मी मी म्हणाऱ्या थोर थोर तपस्यांनाहि अजिंक्य असलेला मदन, ज्यांच्या नुसत्या नेत्रकटाक्षानें जळून गेला, ज्यांना कशाचीहि आशा आकांक्षा उरली नाहीं, कोणत्याहि ऐहिक, पारलौकिक स्वरूपाचा मोह ज्यांच्या ठिकाणीं संभवत नाहीं, ते भगवान् शंकरहि रामाचे ध्यान करतात. त्यांनाहि रामनामाची ओढ आहे, तें त्यांना जिवाभावाने प्रिय आहे. आपल्या प्रिय पत्नीला, पार्वतीला त्यांनीं रामाचे श्रेष्ठत्व, रामनामाचे महत्त्व अनेक वेळां, अनेक प्रकारांनीं गौरवून सांगितलें आहे.
भगवान् शंकरांची योग्यता ही असामान्य कोटीतील आहे. ते देवाधिदेव आहेत, त्यांना महादेव म्हणतात. सर्व विश्वाचे ते धनी आहेत. म्हणून त्यांना विश्वनाथ म्हणतात. सर्व प्रकारचे ज्ञान त्यांचे ठिकाणीं आहे. व्याकरणापासून वेदान्तापर्यंत आणि शिल्पशास्त्रापासून ज्योतिषापर्यंत सर्वप्रकारच्या ज्ञानविज्ञानशाखांचे ते प्रवर्तक आहेत. भगवातू शंकरांच्या प्रसादानेंच तीं तीं शास्त्रें त्या त्या ऋषींना लाभली अशी आपली धारणा आहे. भगवातू शंकरांचे वैराग्य हें जाज्वल्य आहे. त्यांच्या त्या वैराग्याच्या तेजानेंच तर मदन जळाला. स्मशानांत राहणें, चिताभस्म लावणे, भिक्षाटन करणें, ही त्या वैराग्याची अत्यंत बाह्य अशीं चिन्हें आहेत. या ज्ञानवैराग्यासमवेतच भगवातन् शंकरांचे सामर्थ्यहि अलौकिक आहे. त्रिपुरासुराला ठार मारणे, कैलास पर्वत उचलू पाहणाऱ्या रावणासारख्या अत्यंत बलिष्ठ राक्षसाला पायाच्या नुसत्या अंगठ्यानें सहज दडपून टाकणें, आशीर्वाद देऊन कुबेराला संपत्तीचा राजा करणें, ही शंकरांच्या अलौकिक सामर्थ्याची कांहीं उदाहरणे आहेत. अशा ज्ञानवैराग्यसामर्थ्यानें संपन्न असलेले भगवान् शंकरहि रामाच्या नांवावर विश्वास ठेवतात. आपल्या अंतरंगामध्यें तोच एक ध्यास घेतात. त्या रामनामाविषयीं सर्वसामान्य माणसानें अविश्वास दाखवावा हें केवढे आश्चर्य आहे !
विठोनें शिरी वाहिला देवराणा । तया अंतरीं ध्यास रे त्यासि नेणा ॥
निवाला स्वये तापसी चंद्रमौळी । जिवा सोडवी राम हा अंतकाळी ॥ ८४ ॥
पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मस्तकी शिवलिंग आहे. ते ध्यानांत घेऊन समर्थ म्हणतात-विठ्ठलाने ज्यांना मस्तकी धारण केले ते भगवान् शंकरहि रामाचे ध्यान करतात. शंकरांच्या अंतःकरणांत तोच एक ध्यास असतो आणि रामाचे हें महत्त्व लोकांना पटत नाहीं याला काय म्हणावें ? मस्तकी चंद्र धारण करूनहि जी शांतता शंकरांना लाभली नाहीं- ती त्यांना रामनामाने लाभली. हा निःसंग तपस्वीहि रामनामाने निवला, शांत झाला. त्या रामनामाचा ध्यास आत्मकल्याणासाठी सर्वांनी घेतला पाहिजे. प्रत्येकानें यथाशक्ति रामनामाचा जप केला पाहिजे. अंतकाळीं दुसरें कोणी उपयोगी पडणारे नाही. काळ जेव्हां माणसावर झेप घेईल, झडप घालील, तेव्हां आप्त-इष्ट, सत्तासंपत्ति यांतील कुणीहि उपयोगी पडणारे नाहीं. कृतकर्माचे प्रायश्चित्त म्हणून भोगाव्या लागणाऱ्या इहपरलोकींच्या सर्व प्रकारच्या यातनांतून शेवटीं रामाचे नांव हेंच जीवाला सोडविणारें असते. म्हणून त्याचें विस्मरण होऊं देऊं नये.
भजा राम विश्राम योगेश्वरांचा । जपू नेमिला नेम गौरीहराचा ॥
स्वयें नीववी तापसी चंद्रमौळी । तुम्हां सोडवी राम हा अंतकाळीं ॥ ८५ ॥
एकच कल्पना समर्थ निरनिराळ्या शब्दानी आळवून सांगत आहेत. आपल्या आराध्यदेवतेविषयी अत्युत्कट भक्तिभाव असला म्हणजे तीच तीच गोष्ट पुन्हां पुन्हां सांगावीशी वाटते. पतिव्रतेला आपल्या पतीचे असेंच कौतुक असतें. वत्सल माता आपल्या लेकरांच्या बाललीला अशाच गात असते. स्वामिभक्त सेवक आपल्या धन्याला आणि एकनिष्ठ शिष्य आपल्या गुरूला असेंच वाखाणीत असतो. पुनरुक्ति हा येथें दोष नाही. अंतःकरणाच्या उत्कटतेचे तें एक प्रतीक आहे. आपण सामान्य माणसे स्वतःविषयी असेंच बोलत असतो. आपलें महत्त्व लोकांस पटावे म्हणून स्वतःविषयीच्या त्याच त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा आपण ऐकवीत असतो. आपलें हें अहंकाराने होते. संतांची स्थिति याच्या उलट असते. ते भक्तिभावाने आराध्यदैवतेचे गुण गातांना दमत नाहीत.
या श्लोकांत पुनरुक्ति वाटली तरी रामनामाचा एक फार महत्त्वाचा गुण समर्थ श्लोकाच्या पहिल्या चरणांत सुचवीत आहेत. ते म्हणतात राम हा योगेश्वरांचाहि विश्राम आहे. म्हणून त्याचें भजन करा. योगेश्वरांचा विश्राम म्हणणें हें फार अर्थपूर्ण आणि महत्त्वपूर्ण आहे. योगी मंडळींना अनेक प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात. दूरदर्शन, दूरश्रवण, भूतभविष्यज्ञान, दूरगमन, दुसऱ्याच्या मनांतील ओळखणे, अन्नपाण्यावांचून राहणें, जमिनींत पुरून घेणे, पाण्यावरून चालत जाणें, अंतराळी आसन बांधणे, निरनिराळ्या वस्तू काढून दाखविणे इत्यादि इत्यादि लहानमोठ्या सिद्धी योगादींच्या सामर्थ्यानें प्राप्त होतात. पण हे असे सिद्धी प्राप्त झालेले पुरुषहि असमाधानी असतात. कारण कामक्रोधादींचे त्यांचे वेगहि सामान्याासारखेच उत्कट असतात. इब्नवतूत या नांवाच्या एका अरबी प्रवाशाने लिहिलेले भारतातील प्रवासाचे वर्णन प्रसिद्ध आहे. त्यांत त्यानें एका राजाच्या सभेत अधर आसन लावणाऱ्या योग्याचा प्रसंग वर्णन केला आहे. चांगला मानसन्मान न झाल्यामुळें तो मोगी रुष्ट होऊन निघून गेला असें वर्णन तेथें आहे. लग्नामद्धो मुलीच्या बापानें हवा तो मानपान दिला नाहीं म्हणून रुसणारी विहीण आणि हा योगी खरें तर एकाच जातीचे म्हटलें पाहिजेत.
योगानें चित्तवृत्तीचा निरोध होऊन चित्त स्थिर, शांत, प्रसन्न झालें पाहिजे. सर्व क्लेश मिटले पाहिजेत. सर्व द्वंद्वे शमली पाहिजेत. योग शब्दाचा तोच खरा अर्थ आहे. योगाचे तेंच ध्येय आहे. पण तेथें जणू कुणी पोचतच नाहीं. श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याप्रमाणें योगमार्गानें प्रगति होत असतांना वाटेत सिद्धी भेटतात. त्यांच्या मोहाला गुंतून त्या तपस्व्यांची बुद्धि भ्रष्ट होते आणि मग ते कुठे तरी भरकटल्यासारखे होतात. मठमहंती, प्रतिष्ठा, नांवलौकिकात गुंततात आणि मग सामान्य संसारी माणसाप्रमाणे तेहि अस्वास्थ्याने घेरले जातात. ज्यांना मोठेमोठे मानलें जावे त्याचेहि असें होतें. त्यांच्या अंतःकरणांत खऱ्या भक्तीचा उदय झाला नाहीं तर त्यांनाहि जीवनांत विश्रांति म्हणून लाभत नाहीं. खऱ्या सुखासाठी त्यांनाहि शेवटी ईश्वरभक्तीचाच आश्रय करावा लागतो. म्हणून समर्थ रामाला योगेश्वरांचा विश्राम म्हणतात.
योगेश्वर म्हणजे शंकर असेंहि समजणें शक्य आहे. आणि रामनाम हें त्यांचें विश्रांतिस्थल झालें हें प्रसिद्धच आहे. रामनामाच्या उच्चाराने लाभलेल्या स्वास्थाचा विचार करून भगवान् शंकरांनींहि रामनामाचा जप करण्याचा नियम केला आहे. जणू त्यांनीं तें व्रत घेतलें आहे. विशिष्ट वेळीं, विशिष्ट पद्धतीने, विशिष्ट प्रमाणांत, नामाचा उच्चार करणें याला जप वा नेम असें म्हणतात. तो नियम शंकरांनींहि स्वीकारला आहे. त्यामुळे ते स्वतः तर शांत झालेच, विषदाहाच्या व्यथेंतून मुक्त झालेच, शिवाय ते रामनामाचा उपदेश करून इतरहि संसारसंतप्त जीवांना निववितात, शांत करतात.
काशीचें महात्म्य वर्णन करतांना म्हटलें आहे कीं काशीमध्ये येऊन जो देहत्याग करतो त्याच्या अंतकाळीं स्वतः भगवातू शंकर त्या मरत्या जीवाला रामनामाचा उपदेश करतात त्यामुळें मग तो जीव मुक्त होतो. रामाच्या नामाचे असें महत्त्व आहे.
योगेश्वर भगवान् शंकरांनींहि तें अनुभवले आहे. अनेक कारणांनी संत्रस्त झालेल्या इतर थोर व्यक्तींचाहि तोच अनुभव आहे. इतर कांहीहि उपयोगी पडणारे नाहीं. "योगवागविधि येणें नोहे सिद्धी । वांयाचि उपाधि दंभ धर्म ॥" असें नामाव्यतिरिक्तच्या साधनांचा उल्लेख करतांना ज्ञानेश्वरांनीहि म्हटलें आहे. तेव्हां नामाविना आपल्याला कोणी तारक नाहीं; या विश्वासानें माणसाने नित्य नामस्मरण करावे.
मुखी राम विश्राम तेथें चि आहे । सदानंद आनंद सेऊनि राहे ॥
तयावीण तो सीण संदेहकारी । निजधाम हें नाम शोकापहारी । ८६ ॥
जो अतिशय प्रेमादरानें रामाचे नांव उच्चारीत असतो, रामनाम सतत ज्याच्या मुखामद्धो राहते, त्यालाच विश्राम लाभतो, विश्रांति लाभते, सुखसमाधान प्राप्त होतें, जीवनामध्ये अस्वास्थ उत्पन्न करणारे कोणत्याही प्रकारचे ताण त्याला बाधूं शकत नाहींत.
आमच्याकडचा एकादा अकिंचन शेतकरी, कामकरी पंढरपूरची वारी करतो, ज्ञानोबातुकारामांचें अभंग म्हणतो, दासबोध वाचतो, मनाचे श्लोक गुणगुणतो आणि गवताच्या पाख्याखालीं ओले कोरडे खाऊन समाधानाने राहतो. उलट सर्व प्रकारचे ऐश्वर्य उशापायथ्याशी असतांना, गोळ्या खाल्याशिवाय झोप येत नाहीं असे लोक आहेत. परदेशांतील संपत्तीचा थाटमाट आपल्याला दिसतो पण कडेलोटाला पोचलेले तेथील सर्व प्रकारचे अस्वास्थ्य आपण लक्षांत घेत नाहीं. आज तिकडील सहस्त्रावधि तरुण मुले "हरेरामा हरेकृष्णा"ची धून लावून बसतात आणि हा संप्रदाय तिकडेहि वेगाने वाढतो आहे. त्यांतील सर्व अंगोपांगें मोठ्या शास्त्रीय पद्धतीने विचारांत घेतली जात आहेत, असें म्हणतां येणार नाहीं. पण या नामचिंतनाचा कांहीं लाभ त्यांना होतो आहे आणि त्याचें कांहीं आकर्षण संपत्तीला विटलेल्या त्या समाजापुढे आहे हें नाकारता येणार नाहीं.
प्रेमाने ईश्वराचें नाम घेणारी माणसे खरोखरीच प्रतिकूल परिस्थितींतहि त्यामानाने पुष्कळच समाधानी असतात असें पहावयास मिळतें. तापाने फणफणलेल्या माणसाच्या अंगावरून देणाचे नांव घेत हळूवारपणे हात फिरविला तर त्याला बरें वाटते असाहि अनुभव सांगणारे पुष्कळ आहेत.
रामाचे नांव हें असें आहे कीं त्याकरिता स्थलकालाचें बंधन नाहीं. घेणाराच्या पात्रतेचा प्रश्न नाहीं. तें गुरूकडूनच घेतलें पाहिजे असा आग्रह नाहीं. असें सहजसुलभ असून त्याचें विश्रांति देण्याचे सामर्थ्य अलौकिक आहे. नाम स्वतःच सदानंद आहे. कारण तें ब्रह्मस्वरूप आहे. त्याचें सेवन जो भावाने करतो तो आनंद उपभोगीत राहतो यांत शंका नाहीं.
या नामस्मरणावांचून इतर कांही करूं जावे तर त्यानें शीण मात्र वाट्यास येतो. नामाच्या सुलभतेमुळे माणसास त्याच्या सामर्थ्याविषयी संदेह वाटत असतो, आणि कटकटीची, अवघड अशीं इतर साधनें, अधिक समर्थ असतील या कल्पनेने माणूस तीं स्वीकारीत असतो. त्या अवघड साधनांवर तरी निष्ठा बसते वा टिकून राहते असें थोडेच आहे ? काहीतरी वेगळे केल्याचे समाधान थोडा वेळ मिळतें इतकेंच. परमार्थामध्ये आपण काय करतो यापेक्षा किती विश्वासानें करतो, त्यांत भाव किती, हें महत्त्वाचें असतें. सुखसमाधान लाभावयाचें असतें या भावामुळे, या विश्वासामुळे, "संशयात्मा विनश्यति" हें सगळीकडेच खरें आहे. परमार्थांत तर आहेच आहे. साध्या संसारांत सुद्धां संबंधितांचा एकमेकांवर पूर्ण विश्वास असला तरच तीं नाती वा तो सहवास सुखाचा होतो. प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक घटनेचा, साऱ्याच कृतींचा पंचनामा करावयाचें ठरविलें तर जीवन दुःसह होईल. प्रत्येकाच्या प्रत्येक हालचालीवर पहारा ठेवला तर संसारांत काय होईल ? सुखानें श्वास तरी घेतां येईल काय ? व्यापारी विश्वासाला जपतात. तसें न केल्यास व्यापार होणारच नाहीं. लाखालाखाच्या उलाढाली नुसत्या शब्दाच्या भरंवशानें होतात. दक्ष असावे, सावध असावे, पण संशयी असूं नये. श्रद्धा डोळस कां आंधळी हा वादविवाद व्यर्थ आहे. तें वाचारंभण आहे. आंधळ्याला सुद्धां कुणी अगदीं सहजपणे आंधळे म्हटलें तरी आवडत नाहीं. आंधळ्या माणसांच्या अगदीं बारीक सारीक हालचालीने ते आंधळे आहेत असें दिसत असले तरी डोळ्याच्या खाचा दिसूं नयेत म्हणून अशीं माणसे उन्हाचा चष्मा घालून हिंडतात. तेव्हां श्रद्धेला मुद्दाम आंधळी हें विशेषण देण्याचे कारण काय ? भाव समजून घेतला पाहिजे. बुद्धीचें कार्य संपले, थांबले म्हणजेच श्रद्धेचे आरंभतें. श्रद्धा ही महाराणी आहे. तिला जेथें वावरायचे आहे त्या स्थानाची स्वच्छता, टापटीप, नीटनेटकेपणा ठेवण्याचे काम बुद्धीचे आहे, तें तिने अवश्य करावें. बुद्धीनें श्रद्धेचे आसन मांडून ठेवावें, पण आपणच त्यावर बसूं नये. सेवकाची इतर अपूर्णता समजूं शकते. पण त्याचा उर्मटपणा असह्य असतो.
बुद्धीनें आपली मर्यादा ओळखावी. श्रद्धेला आणि विश्वासाला सहाय्य करावें पण त्यांना पदच्युत करूं नये. नाहीतर अराजक माजते आणि मग सर्व जीवन अस्वास्थ, वैताग, विषण्णता, यांनी भरून जातें. तेव्हां नाममहात्म्याविषयी उगीच शंका घेऊं नये. देणे घेणे कांहीं नसल्याने मिळेल तो रिकामा वेळ नामस्मरणांत घालविण्यांत हानी कांहींच नाहीं. वस्तुतः नाम हें सर्व प्रकारच्या शोकाचे, संतापाचे विनाशक आहे. ते जीवनाचे निजधाम आहे, सासुरवास असलेल्या मुलीला माहेर जसें सुखाचे वाटतें तसें नामस्मरणानें चित्ताचें होतें. अनेक प्रकारच्या दडपणाखाली वावरणारे संसारी मन नामस्मरणाच्या सहाय्याने सुखाचा मोकळा वारा अनुभवूं शकते, म्हणून कल्याण हवें असलेल्या साधकाने नामाची उपेक्षा करूं नये.
मुखी राम त्या काम बाधू शकेना । गुणे इष्ट धारिष्ट त्याचें चुकेना ॥
हरीभक्त तो शक्त कामास मारी । जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी ॥ ८७ ॥
ज्याच्या मुखांत अहर्निश परमेश्वराच्या नामाचा जप असतो, त्याला काम बाधूं शकत नाहीं. त्यांच्या अंतःकरणांत कोणत्याहि प्रकारचा काम उत्पन्नच होत नाहीं असा याचा अर्थ नाहीं. कामाचींहि धर्म आणि अधर्म अशीं दोन रूपें आहेत. गीतेच्या सातव्या अध्यायामध्ये धर्माच्या मर्यादेत राहणाऱ्या कामाला भगवंताचे स्वरूप मानलें आहे, तर अधर्म्य कामाला 'महाशन', 'महापाप्मा' अशी विशेषणें देऊन गीतेने तिसऱ्या अध्यायांत त्याला मनुष्यजातीचा वैरी म्हणून संबोधिले आहे. सोळाव्या अध्यायात त्याला नरकाचे दार म्हटलें आहे.
गरज आणि चैन यामधले अंतर ज्याला समजते, त्याला हें समजूं शकेल. गरज बाधत नाहीं. चैन बाधते. असें बाधणारे रूप "कामाला" येत नाहीं हें नामाचे सामर्थ्य आहे. आणि हा गौरव नाहीं, अर्थवाद नाहीं, प्रचार नाहीं, प्रसिद्धीचें तंत्र नाहीं, तर ती वस्तुस्थिति आहे. सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये ज्या वृत्ति उमटतात, त्यांचे विशिष्ट स्पंद असतात. आजच्या प्रगत विज्ञानाच्या सहाय्यानें त्यांचे आलेखहि घेतां येतात असें म्हणतात. या वृत्तीमध्येंहि जीवनाला, आरोग्याला, प्रसन्नतेला अनुकूल ठरणाऱ्या आणि प्रतिकूल ठरणाऱ्या वृत्तींचे गट असतात. विशिष्ट विशिष्ट नामाचे विशिष्ट विशिष्ट स्पंद अंतःकरण वृत्तींच्या स्पंदांना नियंत्रित करून, प्रतिकूल वृत्तींना अनुकूल वृत्ती बनवूं शकतात. नामजपाचे हे सामर्थ्य वस्तुतंत्र आहे. यालाच सद्भावाचे, पवित्र आचरणाचे, म्हणजेच सद्वर्तनाचे, सहाय्य लाभेल तर नामाचे हें हें वस्तुतंत्र सामर्थ्य अनेक पटीनें वाढेल. प्रामाणिक नामधारकाच्या वृत्तीमध्यें अनुकूल पालट निश्चयानें होतो. या विश्वासानें तर संतानी "चाल केलासी मोकळा । बोल विठ्ठल वेळोवेळा ॥" असें आश्वासन दिलें आहे.
नामाच्या उच्चारामुळे इष्ट ते गुण साधकाला चढत्या वाढत्या प्रमाणांत, क्रमानें सहजपणाने लाभतात. नामस्मरण हें एक तंत्रविज्ञान आहे. तें आधिभौतिकाला अध्यात्माशी जोडून देते. तें विज्ञान, अवगत असणारे कांहीं चमत्कारहि दाखवू शकतात. कांहीं मर्यादित अर्थाने त्यांत थोडा अर्थहि असतो. खऱ्या पारमार्थिकांनीं त्याची उपेक्षा करावी हें बरं. यासाठींच तुकाराममहाराजानी त्यांचा उपहासहि केला आहे.
तुका म्हणे भोग सारे । गुणा येताती अंगारे ।
कांहीं थोडे चमत्कार घडत असले तरी तें नामाचे खरें महात्म्य नाहीं. मांत्रिकांनी, तांत्रिकांनी, व्यवसायाच्या हेतूनें केलेला नामाचा तो दुरुपयोगच आहे. साधकाने त्या मोहाला बळी न पडणेंच चांगलें. सर्व प्रकारच्या आपत्तींना तोंड देण्यास धैर्याने उभे राहावे, असे धारिष्ट्य नामधारकास लाभते हेंच नामाचे खरें सामर्थ्य. सतत अनुकूलच घडावे, प्रतिकूल म्हणून कांहीं घडूंच नये, सुखोपभोगांत व्यात्यय येऊ नये, रंगविलासांत कशाचीहि उणीव पडूं नये, असें माणसास सुखासीनपणें वाटत राहते. पण या सुखासीनतेमुळे शरीराचे आरोग्य तर नाहींसें होतेंच, पण मनबुद्धीची कार्यक्षमताहि उणावते हें माणूस लक्षांत घेत नाहीं. कुणीतरी परिस्थिति पालटून द्यावी, तिची प्रतिकूलता नष्ट करावी, म्हणजे मला सुख लाभेल असें वाटणे खरें नाहीं. परिस्थितीवर मात करावी लागते, ती तिच्याशी झगडून. पुरुषार्थ यांतच आहे. तो गाजविण्यासाठी धारिष्ट्य लागतें. तें नामावरचा विश्वासानें नामधारकास प्राप्त होते.
जो हरिभक्त आहे, नामधारक आहे, आळस न करतां भावानें नामस्मरण करणारा आहे, तो शक्त म्हणजे समर्थ होतो, शक्तिशाली होतो आणि त्याला सर्व विकारांचे आणि आपत्तींचे मूळकारण असलेल्या 'कामास' जिंकण्याचें बळ लाभते. विषयोपभोगाची अतिरिक्त वासना आणि त्यासाठी सर्व नीतिनियम, न्यायान्याय गुंडाळून ठेवून केलेले दुराग्रही प्रयत्न, हेंच काम या शत्रूचें सैन्य आहे. नामस्मरणाच्या नियमानें आसक्तीचें तणाव शिथिल होतात त्यामुळे कामाचे बळ तुटते. मग स्वाभाविकपणेंच कामाला मारणे, जिंकणे सोपे जातें. ईश्वरनिष्ठा, नामस्मरण, अंतःकरणांतील भक्तिभाव यांचा आधार असला म्हणजे माणसाला विलक्षण बळ प्राप्त होते.
श्रीतुकारामहाराजांच्याविषयी एक कथा ऐकली आहे ती अशी कीं कोणी एक चांगला ज्योतिषी तुकाराम महाराजांकडे आला आणि म्हणाला- पुढच्या महिन्यात तुमच्या राशीला शनि येतो आहे, तेव्हांपासून तुमच्या साडेसातीस आरंभ होईल. तुम्हांला नाना प्रकारची संकटे भोगावी लागतील. तेव्हां सावध असावे. श्रीतुकाराममहाराज हसले आणि म्हणाले - हा शनि सदा सर्वदा माझ्याच राशीला राहील असे कांहीं उपाय तुमच्या शास्त्रांत असले तर सांगा म्हणजे ते करतो. ज्योतिषी काय बोलणार यावर ? पाया पडून निघून गेला.
साडेसातीचे भय सामान्यांना ! थोर भगवद्भक्ताला तिचें भय नसतें. सर्व भोग हे प्रारब्धाच्या स्वाधीन असतात हें त्याने ओळखलेलें असतें. प्रारब्ध टळत नाहीं हेहि त्याला ठाऊक असते. निष्काम भावनेने त्याचें संचित नाहींसे होते. ईश्वरनिष्ठेने विहित कर्तव्यावरहि त्याचा भर दृढ असल्यानें त्याचे क्रियमाण सदैव सदाचारी कल्याणकारीच असतें. रामभक्त हनुमान हें यादृष्टीने उत्कट उदाहरण आहे. मारूतीचे नैष्ठिक ब्रह्मचर्य, त्याचा अलौकिक पराक्रम, त्याचें अद्भुत बळ, त्याची विलक्षण बुद्धिमत्ता, अत्यंत विनम्र असा दासभाव हे सर्व मारुतीच्या रामभक्तीचे आणि नामस्मरणाविषयीच्या अद्भुत आवडीचेच परिणाम आहेत.
बहू चांगलें नाम या राघवाचें । अती साजिरे स्वल्प सोपें फुकाचें ॥
करी मूळ निर्मूळ घेतां भवाचें । जिवा मानवा हें चि कैवल्य साचें ॥ ८८ ॥
रामाचे नांव फारच चांगलें आहे. कार आणि गायत्री यांच्या तोडीची मंत्रशक्ति यांत आहे. राम या शब्दातील र हा अग्निवर्ण दीर्घोच्चारयुक्त असून त्याची परिणति म या शीतल, शांत गुणाच्या ऱ्हस्व वर्णांत होत आहे. संताचे वर्णन करतांना श्रीज्ञानेश्वरांनी 'मार्तंड जे तापहीन' असे म्हटले आहे. अत्यंत तेजस्वी, पराक्रमी, प्रभावी आणि तरी शांत, शीतल, प्रसन्न, कोणत्याहि प्रकारचा ताप न देतां सुखावह असणारे असें स्वरूप त्यांतून सुचविले जातें. तीच स्थिति राम या नामाची आहे. "नमः शांताय तेजसे" हे वर्णन येथेहि लागूं पडते. तेज नसेल तर कार्यक्षमता नसते. प्रखर असेल तर जवळीक साधत नाहीं. रामनामामध्यें दोन्हींकडून अनुकूलता आहे. म्हणून समर्थ त्यांचें वर्णन "बहू चांगले" अशा शब्दांनी करीत आहेत.
"बहू चांगलें" म्हणण्याची आणखीहि कांहीं कारणें दुसऱ्या ओळींत सांगितली आहेत. रामाचे नांव हें साजरें म्हणजे सुंदर आहे. उत्कट आणि शुद्धभावानें तें रूपविषय होऊं शकते. ध्यानाच्या अभ्यासाने प्रथम अंतःचक्षूंपुढे त्याचे सौंदर्य प्रगट होतें. शुद्धभावाच्या उत्कटतेने ते चर्मचक्षूलाहि गोचर होऊं शकते. कारण नाम आणि नामी यांच्यांत भेद नसतो असें भक्तिशास्त्र सांगते. नामाच्या माध्यमांतून, नामाच्या सहाय्याने नामीचा लाभ होत असल्यामुळें कधीकधी नामीपेक्षांहि नामाला अधिक महत्त्व दिलें जातें. साधनेवर एवढी निष्ठा असलीच पाहिजे, नाहीतर साध्य कधींच हातीं लागणार नाहीं. मूलतः अवाङ्मनसगोचर असलेले, केवळ सत्तामात्र असें, निर्गुण, निराकार, ब्रह्म, नामस्मरणाच्या सामर्थ्यानेच सगुण साकार रूपानें साक्षात्कारास येतें. घनःश्यामल, राजीवलोचन रामचंद्राचें सर्व सौंदर्य त्याच्या 'या' नामाचे ठिकाणींहि एकवटले असते. यासाठीं समर्थ ' अतिसाजिरे' असें म्हणतात. तें स्वल्प आहे. अगदीं छोटे, चिमुकले आहे. उच्चारण्यास सोपे आहे. सुलभ आहे. त्यात कुठचे जोडाक्षर नाहीं आणि ते उच्चारण्यासाठी कोणतेंहि धन वेंचावें लागत नाहीं. संतमहात्म्यांच्या कृपेने मानवी जीवांना तें अगदीं फुकट लाभलेले आहे. पण असें स्वल्प, सोपे, फुकाचे असलें तरी त्याची शक्ति सामान्य नाहीं, ती अलौकिक आहे. ज्याच्या पाशांत एकदां सांपडलें असतां पुन्हा सुटून जाणें फार दुर्घट होते अशा सर्वदूर पसरलेल्या संसाराचे मूळच या नामाच्या जपानें निर्मूळ होतें, नाहीसे होतें. अहं आणि मम ही भावना किंवा वासना हें संसाराचे मूळ आहे. 'एकोऽहं बहुस्याम्' किंवा "कामस्तदग्रे समवर्तताष्टि" या स्वरूपांत उपनिषदांनीं त्याचें वर्णन केलें आहे. ईश्वराच्या ठिकाणीं तें शुद्धसत्त्वात्मक स्वरूपांत असल्यानें सुष्टीची बाधा ईश्वरास होत नाहीं. जीवाचे ठिकाणी तें रजोगुणानें आणि तमोगुणाने भारले जात असल्यानें पुनरावर्ति संसाराचा सर्व ताप जीवाला भोगावा लागतो. भक्तिमार्गांत ईश्वरनिष्ठेनें अहं सुटतो आणि नामस्मरणाच्या सातत्याने वासना शुद्ध होत जाऊन नीरजस्तम बनतात. अर्थांतच मग त्यांतून संसार जन्म घेऊं शकत नाहीं, आणि म्हणूनच शेवटच्या ओळींत वासनाक्षयानें संसार निर्मूल करणाऱ्या नामालाच कैवल्य, मोक्ष म्हटलें आहे. संसार निर्मूल होणें म्हणजे जन्ममरणाच्या फेऱ्यांतून सुटणें, मूळ तत्त्वाशी एकरूप होणें आणि हेंच मोक्षाचे किंवा कैवल्याचें स्वरूप आहे. कार्यकारणाचा अभेद शास्त्रसंमत असल्यानें नामाला कैवल्य म्हणणें योग्य ठरतें. निष्ठेच्या भावजगतांत तें शोभतेंहि.
जनीं भोजनीं नाम वाचे वदावें । अती आदरें गद्य घोषें म्हणावें ॥
हरीचिंतनें अन्न सेवीत जावें । तरी श्रीहरि पाविजेतो स्वभावें ॥ ८९ ॥
नामाचे महात्म्य मान्य करूनहि कांहीं लोक 'काय करावें हो ! वेळच मिळत नाहीं, नाहीतर आम्हींहि नामस्मरण केलें असतें' असें म्हणतात. त्यांच्यासाठी समर्थ एक निश्चित पण सोयीची वेळ सांगत आहेत. वेळ नसतो हें म्हणणें बहुधा खरें नसतें. राजकारणाचा काथ्याकुट, पक्षोपपक्षाच्या ध्येय धोरणाविषयीची चर्चा, पदार्थांची महागाई, कारभारांतील भ्रष्टाचार, तरुणांचे स्वैर वर्तन, नटनटघाचे जीवन, नाटकांची-चित्रपटांचीं कथानके, वृद्धांचे बुरसटलेले विचार, उगीचच वेळ खाणारे खेळ, स्वतःच्या शरीराचें साजशृंगार, यांत माणसाचा किती वेळ फुकट जातो तें शोधून पाहिलें म्हणजे वेळ नसतो हें म्हणणें यथार्थ नसल्याचे पटेल. वरील गोष्टींत जाणाऱ्या वेळाचा सदुपयोग करावयाचें ठरविलें तर "जनीं नाम वाचें वदावें" हें सहज साधेल. पण वेळ नाहीं हें खरेंच गृहीत धरले तरी जेवणाची वेळ तर हातातलीच आहे. त्यावेळीं नाम घ्यावें. पूर्वी आपल्याकडे त्रिसुपर्ण, गीतेचे अध्याय म्हणण्याची पद्धति होती. जेवतांना श्लोक म्हटलें जात असत. परकीय शिष्टाचाराच्या आकर्षणानें आपण पश्चिमी सभ्यतेला बळी पडलो आणि मग या गोष्टी केव्हां सुटल्या तें कळलेहि नाहीं. भोजनाच्या वेळीं नामस्मरण सहज शक्य आहे आणि तसे केले तर त्याचे अनेक लाभ आहेत.
अन्न नीट पचत नाहीं, अंगीं लागत नाही, याला मनःक्षोभ, अंतःकरणांतील चिंता, शोक, भय, चित्ताला असलेले ताण, हें महत्त्वाचें कारण आहे. नामस्मरणानें हा ताण उणावतो, क्रमानें नाहींसाहि होतो, आणि त्यामुळें अन्न सुखानें पचते, अंगीं लागतें.
खाल्लेल्या अन्नाच्या स्थूल अंशांतून जसें रसरक्तमांसादि स्थूल शरीराचे पोषण होतें, तसें अन्नाच्या सूक्ष्म अंशांतून मनबुद्धीचें पोषण होते. म्हणून अन्नशुद्धीचा विचार आपल्याकडे फार व्यापक प्रमाणांत आणि सूक्ष्मरीतीनें केला आहे. दुर्दैवानें तो केवळ स्पर्शास्पर्शाच्या अगदी ढोबळ, अगदीं बाह्य अशा नियमांच्या स्वरूपांतच टिकून राहिला आहे. अन्न कोणतें आहे आणि तें कसें मिळविले आहे हा विचार अन्नशुद्धींत फार महत्त्वाचा आहे. त्याला कोण शिवले आहे हे त्यामानाने फारच गौण आहे. "सत्यं तु ऋतेन परिसिंचामि" या संकल्पांत अन्नशुद्धीचा विचारच सांगितला आहे. नामस्मरणानेंहि अन्नशुद्धि होतें, आणि मग मनबुद्धीच्या शुद्धतेसाठीं त्याचा लाभ क्रमाक्रमानें होत राहतो म्हणून जेवतांना मोठ्या आदरानें ईश्वराचें नाम घेत जावे. याला तालसुराची, सुरेल कंठाची कांहीं बंधने नाहीत तें पद्यमय, कविताबद्ध नको. अगदीं साध्या गद्यांत मोठ्याने म्हटले म्हणजे झाले. या नामघोषाचे सूक्ष्म स्पंद आपलें काम योग्य रीतीनें करतील. परमेश्वराच्या नामाचे चिंतन करीत जो अन्नाचे सेवन करतो, त्याला परमेश्वराची प्राप्ति सहजपणाने होते असें समर्थ सांगतात.
"अन्नाचे सेवन करणें" या शब्दांत अन्न मिळविणे आणि प्रत्यक्ष खाणे या दोन्हींचाहि समावेश करणें शक्य आहे, आणि परमेश्वराची प्राप्ति हें फल विचारांत घेतां तो तसा केलाहि पाहिजे. जीवनांतले सर्वच व्यापार नामस्मरणानें पुनीत झाले असले पाहिजेत. अन्नभक्षण हे त्याचें प्रवेशद्वार समजावे. शरीरपोषणासाठीं आणि जीवनधारणेसाठीं अन्नाची नितांत आवश्यकता असल्याने, नामस्मरणानें पवित्र झालेलें अन्न जीवनालाहि पवित्र बनवील आणि मग परमेश्वराला पुढें आणून उभा करण्याइतकी उत्कटता, निष्ठा, नामस्मरणाला, अगदीं न कळत, सहजपणे, पण निश्चयानें, हळूहळू प्राप्त होत जाईल
न ये राम वाणी तया थोर हाणी । जनीं वेर्थ प्राणी तया नाम काणी ॥
हरीनाम हें वेदशास्त्री पुराणी । बहू आगळें बोलिली व्यासवाणी ॥ ९० ॥
नामस्मरणाविषयीं आदरभाव उत्पन्न होत नाहीं, प्रेम निपजत नाहीं, ओढ लागत नाहीं हे एकवेळ समजूं शकते, कारण प्रेमावर नियंत्रण नसतें. तें उत्पन्न व्हावें म्हटल्यानें उत्पन्न होत नाहीं. पण कर्मेंद्रियांचे तर तसें नाहीं. नुसत्या तोंडाने, वाणीनें, जिभेनें रामाचे नांव घ्यावयाचे ठरविलें तर शक्य आहे. तेंहि जो घेत नाहीं, त्याची हानी केवढी होईल ते कल्पनेनेहि समजणें कठिण आहे. सुधारण्याचे सर्व मार्ग त्यानें आपल्या हाताने बंद करून टाकल्यासारखे हें आहे. तोंडानेंहि नामाचा उच्चार न करणाराला सर्व संतानी यासाठीच फार नावें ठेविली आहेत. काहींनी तर संतापून शिव्या घातल्या आहेत. न ऐकणाऱ्या नाठाळ मुलाला आईनें कळवळून 'मेल्या' म्हणावें तसेंच हें आहे.
समर्थ म्हणतात-जो नाम उच्चारीत नाहीं, त्याचें जीवन व्यर्थ आहे, आयुष्य फुकट आहे, केवळ श्वासोच्छ्वास करतो म्हणून त्याला प्राणी म्हणावयाचे असेल तर म्हणावें. लोहाराचा भाताहि श्वासोच्छ्वास करतो, तो प्राणी नाही, पण उपयुक्त असतो. तेवढाहि उपयोग याचा नाहीं. नामाचा उच्चार न करणाऱ्या माणसाला प्राणी म्हणण्याऐवजी काणी म्हटलें पाहिजे. काणी म्हणजे विशिष्ट रोगानें आंतून काळा पडलेला जोंधळा. वरून दाणा सामान्यतः जोंधळ्यासारखाच दिसतो. पण आतले पीठ जंतुसंसर्गाने विषारी होऊन काळे पडलेले दिसते. तें अपायकारकहि असतें. नाम न घेणाऱ्या माणसाचें स्वरूप अशा काणी जोंधळ्यासारखे असतें असें समर्थ म्हणतात. कितीहि सांगितलें तरी नामाचे महात्म्य या लोकांना कसें पटत नाही तेंच लक्षांत येत नाहीं, असें समर्थ म्हणतात. भगवान् वेदव्यासांनी नामस्मरण हें वेदशास्त्रपुराणें यांतहि, यांच्या तुलनेनेहि फार वेगळे, अत्यंत श्रेष्ठ आहे, असें सांगितलें आहे. "एष मे सर्व धर्माणां धर्मोऽधिकतमो मतः । " असें वेदव्यास विष्णूसहस्रनामाच्या प्रस्तावनेत भीष्ममुखानें म्हणतात. अशा स्थितींत जें सहज करणें शक्य आहे तें नामोच्चारण तरी अवश्य करावें असें समर्थ आग्रहानें सांगत आहेत.
नको वीट मानूं रघूनायेकाचा । अती आदरें बोलिजे राम वाचा ॥
न वेचे मुखीं सांपडे रे फुकाचा । करी घोष त्या जानकीवल्लभाचा ॥ ९१ ॥
एकच कल्पना समर्थ अनेक प्रकारांनी पुन्हां पुन्हां सांगत आहेत. पुन्हां पुन्हां सांगण्याचा मनावर ठसण्याच्या दृष्टीनें, बुद्धीला पटण्याच्या दृष्टीनें, उपयोग होतो. समर्थ म्हणतात-बाबा ! माझ्या रामचंद्राचा वीट मागू नकोस, कंटाळा करूं नकोस, अतिशय आदरानें त्याचें नांव घे. कांहीं खर्च न करतां, कांहीं श्रम न करतां नामाच्या बळाने, परमेश्वराची प्राप्ति होऊं शकते म्हणून सीतापतीच्या नांवाचा सतत घोष करीत जा.
अती आदरें सर्व ही नामघोषें । गिरीकंदरे जाईजे टूरि दोषें ॥
हरी तिष्ठतु तोषला नामतोषें । विशेषें हरा मानसी रामपीसें ॥ ९२ ॥
अत्यंत आदरानें जर नाम घेतलें, भावानें नामाचा घोष करीत राहिलें, तर माणसाच्या अंतःकरणांतील सर्व दोष, कामक्रोधादि विकार, पापाचे संकल्प, हे सर्व त्याला सोडून जणू गिरीकंदरांमध्यें, दूर दूर पर्वतामध्ये, पळून जातात. सिंहाची गर्जना, ऐकली कीं इतर वन्य पशुपक्ष्यांचे जसें होतें तसे रामनामापुढे दोषांचें होतें. मात्र हें नाम आदरानें उच्चारले पाहिजे. नामाविषयी, आपल्या आराध्यदेवतेविषयी, नितांत आदर असला पाहिजे. असे असेल तर निश्चयानें लाभ होतो.
रामकृष्ण परमहंसांचे एक शिष्य होते. चांगले साहित्यिक होते. रामकृष्णांविषयी त्यांच्या अंतःकरणांत अतिशय पूज्यबुद्धि होती. त्यांना दारूचे फार व्यसन होतें. पुष्कळ प्रयत्न करूनहि तें सुटत नव्हतें. कोणत्याहि व्यसनाचे असेंच असतें. दारूचे तर विशेषच. एकदां त्यांनीं रामकृष्णांच्या पुढें आपलें हें दुःख कळवळून सांगितले तेव्हां परमहंस म्हणाले हे बघ ! प्रयत्न करूनहि दारू सुटत नाही ना ! मग अगदीं राहवेनासें होईल तेव्हां घेत जा. पण त्यावेळीं एक कर. माझें स्मरण करून त्या दारूचा नैवेद्य मला दाखव आणि मग घे. भक्त म्हणाला-ठीक आहे. त्यानें एकदोनदा तसें केलेहि, पण एकदां आपल्या या कृतीचा त्याला उबग आला. त्याला वाटलें श्रीरामकृष्णपरमहंसांसारख्या अत्यंत शुद्ध, पवित्र आचरणाच्या, महापुरुषाला मी माझ्या व्यसनापायी दारूसारखी, सर्वशास्त्रांनीं निंदा केलेली घाणेरडी वस्तु अर्पण करावी हें किती अधमपणाचें आहे ! पश्चात्तापाने त्याचें अंतःकरण भरून आलें. त्याने झटक्यासरशीं दारूची पात्रे दूर फेकून फोडलीं आणि त्या क्षणापासून त्या सदगृहस्थाची दारू सुटली, ती नित्याचीच. रामकृष्णांविषयीं अत्यंत आदराची भावना असल्याचा हा परिणाम आहे. समर्थ प्रत्येक वेळीं नाम घ्या पण अति आदरानें घ्या असें म्हणतात तें यासाठींच. नाम प्रेमादरानें घेत राहिले म्हणजे हातून घडत असणाऱ्या दुकृत्याविषयी तिरस्कार वाटणे सहज होतें. प्रामाणिक मनाला असें वाटणारच.
प्रेमादरपूर्वक केलेल्या नामस्मरणानें परमेश्वर इतर कोणत्याहि साधनांपेक्षां अधिक संतुष्ट होतो आणि त्या भक्ताला दर्शन देण्यासाठी आपण होऊन पुढें येऊन उभा राहतो. "परी तयांपासीं पांडवा । मीं हारपला गिंवसावा । जेथ नामघोपु बरवा । करिती माझा ॥ " (ज्ञा. ९ ! २०८) असें श्रीज्ञानेश्वरमहाराजहि म्हणतात. येथें नामघोषाला दिलेलें "बरवा" हें विशेषण लक्षांत घेतलें पाहिजे. "नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदये रवौ । मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद । " असें दुसरें एक संस्कृत वचन आहे. तेथे गायन्ति या शब्दाचा प्रयोग केला आहे. 'गायन्ति' म्हणजे गातात. या वर्णनातून भक्ताचा उचंबळता आनंद आणि तल्लीनता सुचविली जाते. अत्यंत आदर असण्याचीच ही सर्व रूपें आहेत.
भगवान शंकरासारख्या देवाधिदेवाचे अंतःकरणहि रामनामाच्या उच्चाराने वेडावलेलें आहे. शंकरांसारख्यालाहि रामाचे विशेष वेड आहे. मग सामान्याला तो नाद कां लागूं नये ?
जगीं पाहतां देव हा अन्नदाता । तया लागली तत्वता सार चिंता ॥
तयाचें मुखीं नाम घेतां फुकाचें । मना सांग पां रे तुझें काय वेंचे ॥ ९३ ॥
अनेक प्रकारांनी नाममहात्म्य पटवून देतांना समर्थ म्हणतात- अरे ! आम्हीं पुन्हां पुन्हां आग्रहाने नाम घ्या असें सांगतों. हें आमचें म्हणणें ऐकलेंस तर तें तुझ्याच हिताचे आहे. त्यामुळें आमच्यावर, खरे म्हणजे देवावर फार उपकार झाले असें समजत असलास तर ठीक नाहीं. ईश्वराचें नांव घेण्यांत एक प्रकारची कृतज्ञता आहे. कृतघ्नपणा हें फार भयंकर पातक आहे. त्याला प्रायश्चित्त नाहीं. "कृतघ्नेवे नास्ति निष्कृतिः "
सर्व सृष्टी परमेश्वराच्या कृपेनें चालते. माणसाचे सर्व जीवनहि, खरें म्हणजे ईश्वरच चालवितो. तोच त्याचा अन्नदाता आहे. आपण हें लक्षांत घेत नाहीं ही खेदाची गोष्ट आहे.
२५ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आमच्या ती. दादांच्याकडे मराठवाड्यातील एक सामाजिक कार्यकर्ता, कोण्या एका धरणाच्या भूमिपूजनाचें आमंत्रण घेऊन आला. या धरणामुळे शेतीचा किती लाभ होणार आहे आणि कोण्या एका मंत्र्याच्या कृपेमुळे हे काम कसें होतें आहे तें त्यानें मोठ्या अभिमानाने गौरवून सांगितले. तेव्हां दादा म्हणाले, ' राज्यकर्ते भरमसाठ कर गोळा करतात, मात्र अनेक प्रकारच्या विनवण्या, निदर्शने केल्यानंतरच ही एवढीशी समाजोपयोगी कामें करतात, यांत मंत्र्यांचे उपकार कसले ? त्यांचा इतका गौरव कशाला करतोस ? धरणाचा उपयोग निश्चित आहे. पण पाऊसच पडला नाही' तर धरण भरण्यासाठी तुझा हा मंत्री काय करील ?'
आपण फार वरवर पाहतों, वरवर विचार करतों. आपल्या सुखस्वार्थाची कल्पनाच डोळ्यापुढे असल्यानें खोलवर जावें, मुळाशी पहावें हें कधीं सुचत नाहीं. त्यामुळे आपली कृतज्ञताहि "आभारी आहे" असें म्हणण्यापुरती वरवरची असते आणि खरें म्हणजे या आभार मानण्यामागेंहि स्वतःच्या कर्तृत्वाचा अभिमानच डोकावत असतो. भूषणाचें असतें म्हणून मनुष्य आभारी आहे असें म्हणतो इतकेंच.
नीट विचार केला, चांगलें शोधून पाहिलें म्हणजे लक्षांत येतें कीं ज्या निसर्गनियमानें आणि निसर्गाच्या सहाय्याने, आपलें जीवन चालते, सृष्टीचे व्यापार घडतात, तो निसर्ग कोणत्यातरी समर्थ जाणत्याच्या नियंत्रणाखालीं काम करीत असतो. तो जो कोणी आहे त्यालाच आपण परमेश्वर म्हणतो. तो सर्वसमर्थहि आहे, आणि सर्वज्ञहि आहे ही सार गोष्ट आहे. सर्वांची काळजी तोच वाहतो. तत्त्वतः विचार केला म्हणजे हें लक्षांत येतें. मी त्याच्यासाठी न करतां त्यानें माझ्यासाठी कितीतरी केलें आहे. माझ्या शरीराचा, कार्यक्षमतेचा मला अभिमान असतो, पण हें शरीर कोणाच्या सत्तेने चालते याचा विचार मी कधी करीत नाहीं. पण मोरोपंत म्हणतात- "देवा तू मला कितीतरी दिलेंस कार्यक्षम इंद्रियें दिलीस, माणसाच्या जन्माला घातलेस, खाण्यापिण्याची सोय केलीस, चांगलें वाईट कळण्याची पात्रता दिलीस, सदाचाराची आवड दिलीस, कीर्तनश्रवणाचें प्रेम दिलेस, कितीतरी तूं मला दिलेस." कृतज्ञतेचा हा भाव संतानी बाळगलेला असतो. म्हणून तें अत्यंत नम्रपणानें परमेश्वराचे गुणानुवाद गातात, आणि आम्हां मानवांनाहि कृतज्ञ रहा म्हणून सांगतात आणि कळवळून म्हणतात-अरे ! हें फुकटचे नाव घ्यायला तुझें काय खर्च होते ? घे ना नाम ! एवढी तरी कृतज्ञताबुद्धि दाखव.
तिन्ही लोक जाळूं शके कोप येतां । निवाला हरू तो मुखें नाम घेतां ॥
जपे आदरें पार्वती विश्वमाता । म्हणोनी म्हणा ते चि हें नाम आतां ॥ ९४ ॥
संतापले तर तिन्ही लोकांना जाळून टाकण्याचे सामर्थ्य असलेले भगवान् शंकरहि रामनामाच्या प्रभावाने शांत झाले, सुखी झालें. त्यांनीं आपल्या प्रियपत्नी पार्वतीलाहि या रामनामाचा उपदेश केला, आणि ती विश्वाची जननी जगदंबा पार्वतीहि तें नाम आदरानें जपते. समर्थ म्हणतात- असा हा इतिहास आम्ही तुम्हाला सांगतों आहोत आतां तरी तें नाम उच्चारा.
अजामेळ पापी वदे पुत्रकामें । तया मुक्ति नारायणाचेनि नामें ॥
शुकाकारणें कुंटणी राम वाणी । मुखें बोलतां ख्याति जाली पुराणीं ॥ ९५ ॥
श्रीमद् भागवतामध्यें अजामिळाची कथा आहे. हा एक अत्यंत दुर्वर्तनी ब्राह्मण होता. सारे आयुष्य अनाचारांत गेलें. त्या स्वैरवर्तनातूनच त्याला मुले बाळे झालीं. लाव्या धाकट्या मुलाचे नांव नारायण. त्याचेवर अजामिळाचें फार प्रेम होतें. अरे नारायणा ! अरे नारायणा ! म्हणून तो त्याला सारखी हाक मारीत असे. अंतकाळीं जीव कासावीस झाला. 'अरे नारायणा धाव' असें म्हटलें आणि तेवढ्यांत त्याचा प्राण गेला. त्या पातक्याला नेण्यासाठी यमदूत आले होते. अंतकाळीं त्यानें नारायणा धाव असें विष्णूचे नांव घेतले या कल्पनेने त्याला नेण्यासाठी विष्णूदूतहि तेथें येऊन पोंचले. हें कुळ आपलेंच म्हणून विष्णूदूत व यमदूत दोघेहि भांडले. या भांडणांत अजामिळाचें मरण टळले तो सावध झाला. त्याच्या मनावर या घटनेचा विलक्षण परिणाम झाला. मुलाच्या निमित्तानें सहजपणे घेतलेल्या देवाच्या नावाचे जर एवढे महात्म्य आहे तर सदाचाराने वागून प्रेमादरानें मी नामस्मरण करीन तर माझें किती कल्याण होईल असे अजामिळाला वाटलें. कहाणी ऐकल्याचे हे फळ तर वसा घेतल्याचे किती, असें म्हणतात. अजामिळ पुढें नामस्मरणांत रंगून गेला व उद्धरला असें वर्णन आहे.
पिंगला नांवाची एक वेश्या होती. ती आपल्या पोपटाला बोलावयास शिकवीत असतांना पुन्हा पुन्हा राम राम म्हणाली आणि त्या बळाने उद्धरून गेली अशी एक कथा पुराणांत आहे.
नामस्मरणानें घोर पातक्यांचेहि असें कल्याण होतें. तेव्हा मानवानें नामाची उपेक्षा करूं नये असें समर्थ म्हणतात -
महां भक्त प्रल्हाद हा दैत्यकूळी । जपे रामनामावळी नित्यकाळीं ॥
पिता पापरूपीं तया देखवेना । जनीं दैत्य तो नाम मूखें म्हणेना ॥ ९६ ॥
दैत्याच्या कुळांत जन्माला आलेला प्रल्हाद हा अगदीं बालपणापासून, जन्मापासून म्हटलें तरी चालेल, भगवंताच्या भक्तींत रंगलेला होता. तो ईश्वराचें नाम सदैव मोठ्या प्रेमानें उच्चारीत असे. त्याचा बाप हिरण्यकशिपू जणू मूर्तिमंत पातक होता. गीतेने सांगितलेल्या आसुरी संपत्तीचे जणू मूर्त प्रतीक होता. अत्यंत दुराचारी, अत्यंत सत्तालोलुप, उर्मट, अहंकारी असा हा हिरण्यकशिपू स्वतः तर देवाचें नांव घेत नसेच पण आपल्या मुलाला नामजपाचे वेड आहे, ईश्वरभक्तीत तो रंगून जातो, हेहि त्याला पाहवत नसे.
आसुरी संपत्ति आणि दैवी संपत्ति ही गीतेची वर्णने कांहीं विद्वान् समजतात त्याप्रमाणे मनुष्याच्या संदर्भांत नसून देवकोटींतील आणि राक्षसकोटींतील व्यक्तींच्यासाठी आहेत, असें समजूं नये. मनुष्याच्या हृदयांतील या दोन प्रकारच्या प्रवृत्ति आहेत, आणि त्या उण्या अधिक प्रमाणांत प्रत्येक माणसाच्या अंतःकरणांत असतातच. या माणसाच्या प्रवृत्ति आहेत हें "द्वौ भूतसर्गो लोकेऽस्मिन् दैव आसुर एव च ।" (गी. १६।६) या शब्दांत गीतेने स्पष्ट केलें आहे. जगाचा कुणी नियंता आहे हें नाकारणें, सृष्टीतील सर्व पदार्थांना केवळ उपभोगाची साधनें मानणें, कार्यकारणभावाची व्यापकता नाकारणें, अपघात वा योगायोग यांनाच तत्त्वज्ञान मानणें, स्वतःचा सुखविलासासाठीं अन्यायानेंहि सत्ता-संपत्ति मिळविणे, हृदयामध्यें अहंकार, स्वतःच्या शक्तीची जाणीव, काम, क्रोध, मत्सर, दंभ, दर्प, या विकारांचे प्राबल्य असणें, ही आसुरी प्रकृतीची लक्षणें आहेत. ज्यांची शक्ति कमी पडते ते हिरण्यकशिपु, रावण झाल्याचे दिसत नाहींत इतकेंच.
दैवी संपत्ति म्हणून सांगितलेल्या सद्गुणांच्या बळावर, माणसाने या दुर्गुणांवर मात करावयाची असते. पूजापाठादि धार्मिकतेचे संस्कार त्याला या दृष्टीनें सहाय्यक होतात. पण माणसाची उन्मत्तता आणि कृतघ्नता अशी विलक्षण आहे कीं तो ईश्वरच मुळांत नाकारतो, अर्थांतच ईश्वरी प्रसाद मिळवून देणारीं नामस्मरणादि साधनें झिडकारतो. हिरण्यकशिपूसारख्या सामर्थ्यसंपन्नाचे ठीक आहे. त्याचें उपद्रवमूल्य पुष्कळ असल्यानें त्याच्या विनाशासाठीं भगवंताला स्वतः यावें लागलें आणि त्यामुळें त्या दुष्टाचाहि लाभच झाला. दुर्बलानें तो दर्प मिरविण्यांत कांहीं अर्थ नाहीं, त्यानें नम्र आणि आस्तिक असणेंच परमार्थांत लाभदायक आहे. पण माणसे हा विवेक करीत नाहींत, नामस्मरणाची उपेक्षा करतात. तसें करूं नये म्हणून तर संतांची तळमळ असते.
हिरण्यकशिपू प्राप्त झालेल्या वराच्या योगानें फार समर्थ झाला होता, आणि म्हणून त्याचा उन्मत्तपणाहि टोंकाला गेलेला होता. कुणी ईश्वरभक्ति करीत असेल तर त्याला आपला स्वतःचाच अपमान होतो आहे असे वाटत असे. मत्सरी बुद्धीची ही परिसीमा झाली. त्यानें आपल्या मुलाला आधीं समजावून सांगण्याचे पुष्कळ प्रयत्न केले, पण तो ऐकत नाहीं असें पाहतांच त्याला नाना प्रकारांनी ठार मारण्याचेहि प्रयत्न केले. आमच्या ती. दादानी वर्णन केलें आहे-
कडावरून लोटिला परि न मृत्यु आला मुळीं !
तसाच स्थिर राहिला परम उग्र दावानळीं ॥
समर्थ नच जाहले किमपि शस्त्र मारावया ।
खराच हरिभक्त तो गणित ना कशाच्या भया ॥
शेवटीं स्वतःच्या महापतिव्रता पत्नीकडून, प्रल्हादाच्या आईकडून, प्रल्हादाला विषहि देवविलें. त्याचाहि उपयोग झाला नाहीं. तेव्हां हिरण्यकशिपू फारच संतापला. त्यानें प्रल्हादाला दरडावून विचारले. ज्याच्या आधारावर तूं एवढा निर्भय झाला आहेस तो तुझा रक्षणकर्ता कोण आहे ? कुठे आहे ? प्रल्हाद हसून म्हणाले-तो सर्वत्र आहे. सदैव आहे. फार काय तो माझ्यांत आहे आणि तुमच्यांतहि आहे. "सर्वत्रास्ति सदास्ति किंबहु गिरा क्तव्यस्ति मध्यस्ति च । " मग या समोरच्या खांबातहि तो असलाच पाहिजे. असें म्हणून हिरण्यकशिपूनें आपली गदा त्या खांबावर हाणली आणि प्रल्हादवरद नरसिंह अत्यंत, उग्र, भयंकर अशा स्वरूपांत प्रगट झाले. त्यांनी हिरण्यकशिपूला, वराने प्राप्त झालेल्या सर्व अटी पाळून, ठार केलें. त्या अत्यंत रौद्र स्वरूपानें सगळे देव थरकांपलें. भगवान् शंकरहि पुढें होईनात. प्रत्यक्ष लक्ष्मीलाहि पुढें जाऊन त्या रूपाचे शांतवन करण्याचें धैर्य होईना. शेवटीं भक्तराज प्रल्हाद प्रेमादरानें पुढें सरसावले. त्यांनी नरसिंहाच्या चरणाला वंदनासाठी स्पर्श करतांच भगवान शांत झाले. आतां तें दैवत उग्र राहिलें नाहीं. लक्ष्मनृसिंहाच्या स्वरूपांत तें परममंगल झालेलें आहे. अनेकांचे तें कुलदैवत आहे.
नामाचे महात्म्य सांगत असतांना समर्थांना प्रल्हादाची ही कथा अभिप्रेत आहे. या श्लोकांतील वर्णनाच्या संदर्भांत कांहीं गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत.
समर्थांनी अजामिळाला पापी असे विशेषण दिले आहे, आणि त्यानें उच्चारलेले नाम हे निर्धाराचे नव्हतें व भगवंताला उद्देशूनहि नव्हतें, पण योगायोगाने, अगदी आकस्मिकपणे त्याला भगवंताच्या नामाचे महात्म्य लक्षांत आलें आणि पूर्वजीवनाचा पश्चात्ताप होऊन तो सन्मार्गाला लागला आणि उद्धरला.
समर्थांनी प्रल्हादाला महाभक्त म्हटलें आहे. भक्तांची नामावली सांगितली जात असतांना महर्षि नारदांच्याहि आधीं प्रल्हादाच्या नांवाची गणना केली जाते. एवढा त्याचा अधिकार भक्तिमार्गांत आहे. अगदीं बालपणीच ते नामधारक झाले. शिक्षकांनी धुळाक्षरें गिरविताना शिकविलेल्या ॐच्या पहिल्या उच्चारानेंच जणू त्यांची भावसमाधि लागली आणि भक्ति हेंच जीवन झालें. अजामिळ, प्रल्हाद, या दोघांच्या चरित्रांमध्यें आकाश-पाताळापेक्षांहि अधिक अंतर आहे. आणि तरी नाममहात्म्य सांगतांना उदाहरण म्हणून एकामागोमाग एक दोघांचेहि उल्लेख केले गेले यांतील मर्म ओळखले पाहिजे. नामाचे सामर्थ्य अलौकिक आहे. त्याच्या जपानें सर्व पापे नष्ट होतात, हें खरेंच आहे, पण नामजप म्हणजे दुर्वर्तनासाठी संमतिपत्र नव्हे. अत्यांत दुराचारीहि उद्धरतात पण अनन्यभावानें भजल्यानंतर. हा अनन्य-भजनाचा आनंदहि त्यांना अनुतापतीर्थी न्हाल्यानंतर प्राप्त होतो, असें श्रीज्ञानेश्वरमहाराज म्हणतात तें फार महत्त्वाचे आहे.
पातकाचे ओझे सोसेनासें झालें म्हणजे मग नामाचे महात्म्य ऐकून देवाचें नांव उच्चारावें, केवळ वाणीनें उच्चाराचे, कारण तशी सवड असल्याचें संतांनीच सांगितले आहे आणि पूर्वीचीं सगळीं पातकें नष्ट झालीं या भावनेने नव्या उत्साहाने पुन्हा पातके करूं लागावें, प्रत्यक्ष सर्वनाश ओढवेपर्यंत हाच क्रम चालू ठेवावा. नाममहात्म्याचा असा अर्थ लावणे अगदीं चुकीचे आहे. नाममहात्म्याच्या आधाराने पुन्हां पुन्हां पातकें करीत राहणे हें योग्य नव्हे. यांत पातकांविषयी अनुताप नाहीं आणि नामाविषयीं अनन्यताहि नाहीं "मनीं नसे तरी नसो । परी वाचे तरी वसो ॥ " ही सवड माणसाची अगतिकता, अपूर्णता, दुर्बलता लक्षांत घेऊन दिलेली आहे. त्याचा अर्थ दांभिकपणे करूं नये. नाम घेतो या बळावर अनाचाराने वागतो हें चालत नाहीं -
"अन्यक्षेत्रे कृत पापं पुण्यक्षेत्रे विनश्यति ।
पुण्यक्षेत्रे कृतं पापं वज्रलेपो भविष्यति । "
हें या संदर्भांतहि लक्षांत ठेवले पाहिजे. चुकून लागलेल्या सवयी एकदम नष्ट होत नसल्याने, मोहानें पाप घडणे हें समजू शकते, पण आवर्जून पातकें करावी आणि नामोच्चाराने मोकळे झालों असें समजावे हा दंभ आहे. आणि परमार्थांत त्याला कधींच क्षमा नाहीं. या अशा दांभिकतेच्या नामस्मरणाला उद्देशून कबिराचे ते प्रसिद्ध वचन आहे.
"रामनाम सब कोई लेत, ठक ठाकुर अरु चोर ।
जिस नामसे ध्रुव प्रल्हाद तरे, वह नाम कुछ और ॥ "
नामाच्या उच्चारांतील हा भेद अक्षरांचा, स्वरांचा व तालाचा नाहीं, तो मनोवृत्तीचा आहे, हें लक्षांत घेतले पाहिजे. इतरांना ठकविण्याकरतां चोरहि नामधारक म्हणून मिरवतो. गोसावी, बैरागी, वारकरी, रामदासी, यांची सोंगे घेऊन व त्यांच्या पद्धतीनें भजन करीत लुच्चे चोरहि आपला कावा साधत असतात.
"अजित नाम वदो भलत्या मिसे " चें सवडशास्त्र येथें काय कामाचे ? तेव्हां दंभाला आणि वंचकतेला वाव नाहीं, हे लक्षांत ठेवलेंच पाहिजे. अजामिळ पूर्वायुष्यांत कितीहि पातकी असला तरी नाममहाल्पाचा साक्षात्कार झाल्यानंतर त्यानें कोणतेंहि दुर्वर्तन केलें नव्हतें हें फार महत्त्वाचे आहे. भक्ताग्रणी प्रल्हादाच्या विषयांत तर दुर्वर्तनाचा प्रश्नच उरला नाही.
आणखीहि एक गोष्ट या अनुषंगाने लक्षांत घेण्यासारखी आहे. रामचंद्र हें समर्थांचे आराध्यदैवत, रामभक्तीचा प्रसार हें त्यांचे जीवितकार्य. तेव्हां नामाचें महात्म्य सांगत असतांना "राम" या नांवाचा उच्चार करणें अगदीं स्वाभाविक आहे. पण ईश्वराचे कोणतेंहि नाम, नामस्मरणाच्या दृष्टीनें सारखेच महत्त्वाचें आहे, हेहि समर्थांना मान्य आहे हें अजामिळाची आणि प्रल्हादाची कथा संदर्भासाठी घेतली आहे, त्यावरून लक्षांत येईल. अजामिळाच्या संदर्भांत त्यांनी नारायण हें वेगळे नाम स्पष्टपणेंच सांगितलें आहे. हरि किंवा श्रीहरि याहि नामाचा ते उल्लेख करतात. "मना वासना वासुदेव वसो दे" या चरणामध्ये वासुदेव हे नाम आले आहे. प्रल्हाद हा विष्णूभक्त. त्याचेसाठी नृसिंहावतार झाला. तेव्हां त्याचें तोंडी जपासाठी राम हेंच नाम असेल असें समजण्याचे कारण नाहीं, येथें रामनाम या शब्दाचा अर्थ सामान्यपणे "ईश्वराचें नाम" असाच केला पाहिजे. साधुसंतांची ही अनाग्रही वृत्ति स्वतःच्या संप्रदायाचे आचार निष्ठेने सांभाळीत असतानांहि कशी जागृत असतें, ते यावरून साधकाने लक्षांत घेण्यासारखे आहे. नाम अमुकच असावें असा आग्रह नाहीं. आपली आवड, कुलाचार, संप्रदाय वा गुरूचा उपदेश याप्रमाणें, प्रेमादरानें आणि आळस टाकून नाम घ्यावें हें महत्त्वाचे.
मुखी नाम नाहीं तया मुक्ति कैंची । अहंतागुणें यातना ते फुकाची ॥
पुढें अंत येईल तो दैन्यवाणा । म्हणोनि म्हणा रे म्हणा देवराणा ॥ ९७ ॥
माणसाच्या एकूण परिस्थितीचा विचार करतां ईश्वरनिष्ठा आणि नामजप यांविना त्याच्या उद्धाराचे खरें तर दुसरें साधन उपलब्ध नाहीं. पण या साधनांचा स्वीकार तो करीत नाहीं. अहंकाराला बळी पडतो आणि उगीचच नानाप्रकारच्या यातना भोगीत राहतो. ईश्वरावर श्रद्धा ठेवली नाही, नामस्मरणासारखे अतिशय सोपे, साधे, सोयीचे साधनहि केलें नाहीं तर जीवन निराधार होईल आणि मग त्याचा शेवटहि दीनवाणा झाल्याविना राहणार नाहीं. शरीराची कार्यक्षमता टिकून आहे, ऐहिक सुखोपभोगाची साधनें पुरेशी उपलब्ध आहेत, तोंवर ईश्वर मानीत नाही म्हणण्याची मूर्ख ऐट थोडी तरी निभते असें म्हणतां येते, पण जेव्हा शरीर दुबळे होईल, विषयोपभोगाची शक्ति इंद्रियांना राहणार नाही, धनादि साधनें उणावतील, परिवारांतील लोक कंटाळा करूं लागतील, वेळ खायला उठेल, तेव्हां मग जीवन कसें यातनामय व दीन बनते तें नास्तिकाच्या लक्षांत येईल, पण तेव्हां फार उशीर झालेला असेल. हे होऊं नये म्हणून समर्थ म्हणतात-बाबा ! देवाच्या नांवाचा प्रेमाने उच्चार कर असें आम्ही तुला पुन्हा पुन्हा सांगतों आहो तें आतांच लक्षांत घे.
हरीनाम नेमस्त पाषाण तारी । बहू तारिले मानवदेहधारी ॥
तया रामनामीं सदा जो विकल्पी । वदेना कदा जीव तो पापरूपी ॥ ९८ ॥
कोणत्याहि प्रकारचे चेतना नसलेले अत्यंत निर्जीव असे दगड, तेहि नामाच्या बळाने निश्चयानें तरले असें समर्थ सांगत आहेत. लंकेला जातांना नळाने समुद्रावर जो सेतु बांधला, त्याच्या संबंधीच्या कथेला उद्देशून हा चरण आला आहे. नळाच्या हातून दगड पाण्यात तरतील असा त्याला वर होता म्हणून सेतु बांधण्याचे काम नळाकडे आलें. आपल्या या कर्तृत्वाचा नळाला अभिमान वाटूं लागला आणि त्यामुळे सेतु बांधण्यासाठी दगड स्थिरावेना. तेव्हां मारुतरायांनीं प्रत्येक दगडावर राम राम अशीं अक्षरे लिहिली आणि त्यामुळें दगड व्यवस्थितपणे तरंगून सेतु व्यवस्थितपणे पूर्ण झाला. हें शेवटीं रामनामाचेंच सामर्थ्य ठरलें. एका संस्कृत सुभाषितकाराने ही गोष्ट स्पष्टच केली आहे. तो म्हणतो-
ये मज्जनि निमज्जयन्ति च परान् ते प्रस्तरा दुस्तरे ।
वाघौ वीर तरन्ति वानरभटान् सन्तारयन्तेऽपिच ॥
नेते ग्रावगुणा न वारिधिगुणा नो वानराणां गुणाः ।
श्रीमद्दाशरथेः प्रतापमहिमा सोयं समुजृम्भते ॥
"स्वतः बुडणारे आणि जवळ केले तर दुसऱ्यालाहि बुडविणारे असे जड दगड, तरून जाण्यास अत्यांत कठिण असलेल्या समुद्रांत, स्वतः तरले आणि त्यांनीं वानरवीरांनाहि तारून नेले. हे जें घडले त्याला दगडाचे गुण कारण नाहींत, कोणा वानरांत तें सामर्थ्य नव्हतें. किंवा ती शक्ति समुद्राचीहि नव्हे. भगवान् दाशरथि रामाच्या सामर्थ्याचा तो महिमा आहे. हीच गोष्ट समर्थ "हरीनाम नेमस्त पाषाण तारी" या ओळींत सांगत आहेत. दगडसुद्धा तरतात, उद्धरून जातात, असा भाव या चरणांत आहे. दगडच तेवढे तरतात. तरून जायला आम्ही काम दगड आहों ? असा तर्कटतीर्थी अर्थ कुणी काढूं नये. म्हणून समर्थ दुसऱ्या ओळींत लगेच "बहू तारिले मानवदेहधारी" असें सांगतात. मानवी देह धारण करणारेहि असंख्य जीव नामस्मरणाच्या बळावर उद्धरून गेले.
नुसते मानव असें न म्हणतां मानव देहधारी असा शब्दप्रयोग करण्यांत कांहीं विशेष हेतु असण्याचीहि शक्यता आहे. भारतीय तत्त्वज्ञानाचा एक विशेष त्यांतून प्रगट होतो असें मला वाटतें. आपलें तत्त्वज्ञान प्रत्येक भूतजाताच्या ठिकाणीं वस्तूमात्राच्याठिकाणीं, चैतन्य भरून राहिलें आहे असें सांगते. अद्वैत तत्त्वज्ञानाचा तर तो गाभाच आहे. तेव्हां मृत्तिका, पाषाण, वृक्षवल्ली, कृमिकीटक, पशुपक्षी हेहि देहच आहेत, आणि विशिष्ट विशिष्ट प्रसंगाने, कारणानें चैतन्य त्यांना धारण करतें असें आपला धर्म सांगतो. म्हणून भावावेशांत असलेल्या सद्भक्तानी, इतर कोठेंतरी वैभवशाली राजघराण्यांत पण भक्तिहीन असा माणसाचा देह मिळण्याच्या ऐवजी, आम्हांला नंदनंदन भगवान् गोपालकृष्णाच्या विहारभूमीवरील, त्याच्या चरणतलींचे धूलिकण होण्याचे भाग्य लाभले तरी तें अधिक श्रेयस्कर आहे असें म्हटलें आहे. अशा अर्थाचें उद्गार प्रेमाची उत्कटता व्यक्त करणारे असले तरी मातीचे कण वा दगडगोटे हे देह आहेत आणि कारणपरत्वे जीव तें धारण करतो ही धारणाच त्यातून स्पष्ट होते. तेव्हां दगडाच्या रूपांत असलेले जडजीवहि उद्धरतात, तर चेतनेची पूर्ण अभिव्यक्ति असलेले, मनुष्यशरीर धारण करणारे जीव, नामस्मरणानें निश्चितपणेंच उद्धरतील असें समर्थांना सुचवावयाचें असेल.
मानव देहधारी असें म्हणण्यांत ज्यांचें शरीर केवळ माणसाचे आहे पण वागणे मात्र माणसाला शोभण्यासारखे नाहीं, असेहि जे कोणी पातकी, पतित आहेत त्यांचाहि उद्धार नामस्मरणानें होऊं शकतो असेंहि म्हणावयाचे असेल. महर्षि वाल्मीकींच्या संदर्भांत रूढ असलेली एक कथा यादृष्टीनें विचारांत घेण्यासारखी आहे.
वाल्मीकि हे पूर्वी हिंसक, घातकी असे निषाद होते. आल्यागेल्या वाटसरूला लुटून ते त्याचा घात करीत असत. एक माणूस मारला कीं त्याच्या नांवानें एक खडा रांजणांत टाकून आपला पराक्रम मोजावयाचा अशी त्यांची पद्धति होती. अशा खड्यांनी सात रांजण भरले होते म्हणे ! दैवयोगाने एकदां या वाल्याची नारदाशी गांठ पडली. नारदावर त्यानें आपलें शस्त्र उगारले. नारदानी विचारले, अशी निष्पाप माणसाची हत्या तूं कां करीत आहेस ? वाल्या म्हणाला-बायकापोरांच्या भरण-पोषणासाठीं.
पण तुझ्य पातकांत ते अंशभागी होणार आहेत कां ?
कां नाहीं ? मिळालेल्या संपत्तीचा जर ते उपभोग घेतात तर ती संपत्ति ज्यामुळे मिळाली त्यातहि त्यांनीं वाटेकरी झालेच पाहिजे.
हें तुझे मत. त्यांना कधीं प्रत्यक्ष विचारले आहेस काय ? नारद हसून म्हणाले-जा, पहा, विचारून ये. मी येथेच थांबतो. माझ्या देवाची शपथ घेऊन सांगतो मी पळून जाणार नाहीं.
कर्दनकाळासारख्या वाल्याच्या उगारलेल्या शस्त्रापुढें इतक्या निर्भय प्रसन्नतेनें उभा राहणारा आणि सहजपणे प्रश्न करणारा, अद्भुत माणूस वाल्याने प्रथमच पाहिला. तो प्रभावित झाला. हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे असें त्याला वाटले. नारदांना थांबावयास सांगून तो आपल्या गढीवर आला. त्याने बायका- मुलांना विचारले. उत्तर सहजपणे नकारार्थी आलें. पातके प्रत्यक्ष करूनहि पातकांचा परिणाम भोगण्याची सिद्धता माणसाची नसते, अशा परिस्थितींत ज्या पातकांशी संबंध दुरान्वयानें आहे त्यांचे परिणाम भोगण्याचे कोण मान्य करणार ? पण वाल्याच्या भावनांना मात्र धक्का बसला. त्याच्या हृदयाला तो आघात सहन झाला नाही तो विषण्ण झाला. खालीं मान घालून परतला. कृतकर्माच्या पश्चात्तापानें त्याचें अंतःकरण भरून गेलें. त्यानें येऊन नारदांचे पाय धरले आणि गहिंवरलेल्या कंठाने आपला उद्धाराचा मार्ग त्यांना विचारला. नारदांनी त्याला धीर दिला आणि रामनामाचा जप करण्यास सांगितले वाल्या निष्ठेनें आणि निग्रहाने जप करूं लागला. त्याचें तें तप इतकें दिव्य होतें कीं त्याच्या हातांतील लाकडाच्या वाळलेल्या दंडाला कोवळी पालवी फुटली. वाल्याचे आमूलाग्र परिवर्तन झाले आणि तोच पुढें आद्यकवि महर्षि वाल्मीकि या नावाने प्रसिद्धीस आला.
ही कथा विश्वसनीय मानण्यासारखा कोणताहि पुरावा वाल्मीकि रामायणांत नाही. तेथें त्यांना प्रचेतस् प्रजापतीचे पुत्र म्हणून उल्लेखिलेले आहे. पण कांहीं पुराणांतून ही कथा वाल्मीकीच्या संबंधात आली आहे, आणि आपल्या परंपरेमध्ये अनेक संतानी जवळजवळ याच पद्धतीने नाममहात्म्यासाठी तिचा उपयोग केला आहे. तेव्हां ही कथा महर्षि वाल्मीकींच्या पूर्वीच्या जन्मांतील एकाद्या घटनेशी संबद्ध असावी. मानवाचा देह धारण करणारी वाल्यासारखीं दुष्ट, हिंसक, क्रूर अशीं पातकी माणसेंहि नामप्रभावाने उद्धरून जातात, त्याचें कल्याण होतें, त्यांचा भविष्यकाळ उज्वल होतो, तर मग सर्वसाधारण भली माणसे, जी अशीं वा इतकी वाईट नाहीत, असूं शकत नाहींत, ती नामस्मरणाच्या बळाने तरतील यांत कांहींच नवल नाहीं.
संतमहात्म्यांनीं असे अनुभव अनेक प्रकारांनी सांगितले आहेत आणि नाममहात्म्य परोपरीने गायिले आहे. तरीसुद्धा नामाविषयीं जर कोणाच्या मनांत संशय राहत असेल आणि नाम घ्यावें, नामस्मरण करावें, असें वाटत नसेल तर या दुर्दैवाला काय म्हणावें ? समर्थ अगदी संतापून अशा संशयी माणसाला "पापरूपी" म्हणत आहेत. इतर प्रकारें पातक करणारा हा खरा पापी नव्हे. कारण नामस्मरणासारखा त्याच्या उद्धाराचा मार्ग त्याला मोकळा आहे. पण हातून पातके तर घडली आहेत, पुन्हां पुन्हां घडताहेत, परिणाम लगेच फळाला न आल्यामुळे "आमचें काय बिघडले, पुढें तरी काय बिघडणार आहे ? " हा अहंकार बळावतो आहे, त्यामुळें दुर्वर्तनाला उन्मत्त अशा स्वैरतेचे रूप येत आहे आणि नामावर विश्वास नसल्याने उद्धाराचा मार्ग मात्र उरलेला नाहीं. आतां या व्यक्तीला "पापरूपी" मूर्तिमंत पाप असें म्हणणेंच योग्य आहे.
आमचा देवावर विश्वास नाहीं पण आम्ही न्यायनीतीनें वागतो, सदाचरणाने राहतो असें कांहीं लोक म्हणतात. अगदीं मर्यादित अर्थाने तें खरेंहि असतें. पण एकूण मानवी जीवनाचा विचार करतां नास्तिकाचें सदाचरण हें वरवरचे असतें. कारण चांगल्या वाईटाचा खरा निर्णय विज्ञानाने घेतां येत नाहीं, श्रेष्ठ-कनिष्ठतेची खरी परीक्षा केवळ बुद्धिवादावर तर्काने करतां येत नाही, कोणत्याहि सदाचरणाला काय, नीतीला काय, वा न्यायाला काय, श्रद्धेचे, विश्वासाचेच अधिष्ठान असावे लागते. नास्तिक ही श्रद्धाच नाकारतो. आतां पायावांचून त्याचें सदाचरणाचे घर उभे कसें रहावयाचे ? पाहूं नये तें डोळे पहातच नाहीत, बोलू नये तें वाणी बोलतच नाहीं, करूं नये तें मनांतच येत नाही, अशी जीवनाची पवित्रतम अवस्था प्राप्त होणें हें साधारण काम नाहीं. त्यासाठीं अनेक जन्माच्या पुण्याईची आवश्यकता आहे. सामान्य माणसाने हा अहंकार मिरवू नये. त्याला मनबुद्धीवर नियंत्रण ठेवूनच वागावे लागतें. आणि तरी मोहवश इंद्रियें त्याला केव्हां आणि कसा सदाचारापासून दूर नेतील तें सांगता येत नाहीं. अशा स्थितीत ज्यातून मनबुद्धिचा निश्चय दृढावतो, ध्येयावरचे लक्ष ढळत नाहीं, प्रयत्नाचें बळ वाढते, उत्साहाला धैर्य लाभते, तो देवावरील विश्वास, भ्रामक बुद्धिवादानें झुगारला तर पथप्रष्ट होण्यावाचून, पातकांच्या दरीत कोसळण्यावांचून, अन्य गतीच उरणार नाही.
यासाठीं समर्थ म्हणतात-नामाविषयीं संशय बाळगू नका; तसें केलेत तर पापरूप व्हाल.
जगीं धन्य वाराणसी पुण्यरासी । तयेमाजि जातां गती पूर्वजांसी ॥
मुखें रामनामावळी नित्य काळी । जिवा हीत सांगे सदा चंद्रमौळी ॥ ९९ ॥
काशी, वाराणसी, हे भागिरथीच्या तीरावरचे सर्व हिंदुस्थानांत अत्यंत प्रसिद्ध असले पुण्यक्षेत्र. एक ज्योतिर्लिग जेथें आहे तें पवित्र स्थान. भारतीय विद्वत्तेचें माहेरघर. ज्या ठिकाणीं जाऊन देह ठेवला असतां माणसाला मोक्ष मिळतो, अशी भारतीयांची दृढ श्रद्धा याहि काळांत टिकून आहे, तेथें गंगाकिनार्यावर लहान लहान पर्णकुट्या आहेत. तेथें राहणाराला थोडेसें अन्न मिळण्याची सोय आहे. त्या झोपड्यांत राहून देहपाताची वाट पाहणारी श्रद्धावंत माणसे आहेत. पंडित राजेश्वरशास्त्री द्रविडांच्या समागमें जाऊन, झोपडीत राहणाऱ्या अशा एका वृद्धाला मी पाहिलें आहे. त्या सदगृहस्थांचे वय ऐंशीच्या आसपास असावे. हातपाय दुर्बल, शरीर कृश, मुद्रा सुकलेली पण स्वर खणखणीत व डोळे तेजस्वी. गृहस्थ एक घोंगडी टाकून खाटेवर पडले होते. अक्षरशः चार घास अन्न आणि गंगाजल याशिवाय कांहीं घेत नव्हते. त्यांना घरीं करणारी, विचारणारी सगळी, नातेवाईक मंडळी होतीं. सांपत्तिक स्थितीहि चांगली. प्रापंचिक कर्तव्ये पार पडताच ते वृद्ध येथें येऊन राहिले होते, मृत्यूची वाट पहात. औषध-पाणी घेत नसत. शुश्रूषेसाठी कोणाला जवळ राहू देत नसत. मी फार आदरानें त्यांना नमस्कार केला. त्यांच्या सात्त्विक त्यागाने, अलोट धैर्यानें आणि असाधारण निष्ठेनें मी भारावल्यासारखा झालो होतो. परंपरागत श्रद्धा कशी टिकून आहे त्या संदर्भांत मी हें सांगतो आहे.
काशीवासाचें हें जें फळ आहे तेहि वस्तुतः काशीवासाचे नाही. कामदहन भगवान, चंद्रमौली शंकर सर्वदाच अत्यंत हितकर असा रामनामाचा उच्चार, अशा मरत्या जीवाच्या कानांत करतात आणि अंतकालीं श्रवणी पडलेल्या या रामनामाच्या बळाने जीव उद्धरून जातो. म्हणजे काशीमध्ये मोक्ष मिळतो हें सुद्धा नाममहात्म्यच आहे. जो सदैव नामस्मरणांत रमलेला आहे त्याला मग देह ठेवण्यासाठी काशींतच गेले पाहिजे असें नाहीं. आदरानें केलेल्या नामस्मरणानें परमेश्वरच त्या भक्ताचा ऋणी होतो. 'ते ऋणवैपण देखोनि अंगीं । मी आपुलियाचि उत्तीर्णत्वा लागी । भक्ताचिया तनुत्यागीं । परिचर्या करीं ॥ म्हणोनि देहांतीचें साकडे । माझिया काहींचि न पडे । मी आपुलीयातें आपुलीकडें । सुखेंचि आणी ॥" (ज्ञा. ८ । १३१, ३४) असा देवाने दिलेल्या आश्वासनाचा उल्लेख ज्ञानेश्वर महाराज करतात. यासाठीं जसें होईल तसें, जितके होईल तितके, साधेल त्या पद्धतीनें नामस्मरण करीत असावे. तेंच सोयीचे आहे, श्रेयस्करहि आहे.
यथासांग रे कर्म तें ही घडेना । घडे धर्म तों पुण्य गांठी पडेना ॥
दया पाहतां सर्व भूतीं असेना । फुकाचें मुखीं नाम तें ही वसेना ॥ १०० ॥
नाम तेंच तेवढे कशासाठी घ्यावयास पाहिजे ? सरळ पाहतांना त्यांच्याहिपेक्षां अधिक महत्त्वाच्या असणाऱ्या गोष्टी आम्हीं करतो, असें माणसाला वाटतें, व्यवहारांत तसे दिसतेंहि. माणसे यज्ञयाग, पूजापाठ, तीर्थयात्रा, होमहवन, व्रतवैकल्यें, अशा अनेक गोष्टी करीत असतात. नास्तिक म्हणविणाराच्या घरांतहि हें होतें. त्यासाठीं, कधीं वडिलांची, कधी पत्नीची, कधीं इतर आप्तेष्टांची, ढाल वापरली जातें. अन्नसंतर्पणें होतात, दक्षिणा दिली जाते, हें सर्व होतें पण तें यथासांग होतें काय ? असें समर्थ विचारतात तें फार महत्त्वाचें आहे. खरोखरीच्या शारीरिक, आर्थिक दौर्बल्यानें वा परिस्थितीच्या प्रतिकूलतेने जें उणे पडेल तें सोडून दिलें तरी आळस, उपेक्षा, तुच्छता, वंचना, अश्रद्धा, विपरीत धारणा, यामुळे जें चुकते त्याचें प्रमाण किती असतें ? हा विचार माणसाने कधीं केला आहे काय ? पुण्याहवाचनाचा सुपाऱ्या, होमाचे तूप आणि वाणासाठी दिला जाणारा खण यांचें स्वरूप कसें असतें तें कधी लक्षांत घेतलें जातें कां ? सुपाऱ्या इत्यादि वस्तू कशासाठी पाहिजे आहेत तें वाणीच विचारतो. सन्माननीय पाहुण्याला देण्यासाठी वा नवीन जांवयाच्या उपयोगासाठी आणलेल्या वस्तूची जी प्रत असते, तीच धार्मिक कारणासाठी आणलेल्या वस्तूचीहि असली पाहिजे, असें कधीं वाटतें कां ? लग्नासारख्या महत्त्वाच्या संस्काराचे वेळी जी धर्मकृत्ये करावयाची तीं नवरदेवाच्या आग्रहामुळें कशीतरी उरकली जातात. आणि स्वागत समारंभाचेवेळीं तोच नवरा मुलगा, मोठ्या आनंदाने पाश्चात्य पोषाखाने गुदमरलेला जीव सांभाळीत, चार चार तास ताटकळत बसतो. संपन्न घर, चांगलें सुसज्ज असतें. कपबशांचे अनेक प्रकारचे संच आणि नाना प्रकारची काचपात्रे यांनीं कपाटे भरलेली असतात, पण संध्येसाठी वा देवपूजेसाठी साधे पळीपंचपात्री आणि ताम्हन कांहीं मिळत नाहीं. मंडप, वाजंत्री, पाहुण्यांचें आगत-स्वागत, विजेचा लखलखाट, फुलांचे साजशृंगार यांत कितीहि पैसा गेला तरी तो सुखसंतोषांनीं वेचणारी माणसे दिवसभर राबणाऱ्या भटजीला ५ - १० रुपये अधिक द्यावे लागले तर कुरकुरतात. आपण ज्याला अन्नदान समजतो त्या जेवणावळींत पन्नास पानें घातली' असलीं तर त्यांतील पंचेचाळीस नातलगांची व हा ज्यांच्याकडे पूर्वी अनेक वेळां जेवला आहे, ज्यांना परतफेडीसाठी एकदां तरी जेवायला बोलाजिले पाहिजे अशांची असतात. एखादा दीन दरिद्री अगांतुक त्यावेळीं आला तर यजमानाचे पित्त वाढते. आतां या सर्व गोष्टींना धर्मकृत्ये म्हणावयाची कां आपल्या विपरीत धारणेप्रमाणें लौकिक आणि प्रतिष्ठा संभाळण्याचे तंत्र म्हणावयाचे ? आपण लौकिकासाठी, प्रतिष्ठेसाठी उदार असतो. धर्मकृत्ये कृपणपणानें संकोचलेलीं राहतात. सुखविलासासाठीं पैसे खर्च करतांना आपल्या हाताला हाड राहत नाहीं, परंतु देवापुढे, पोथीपुढे, रुपया तर राहो पाचदहा पैसे ठेवले तरी आपण कांहीं विशेष केले असे आपणास वाटतें. मनुष्य जो जो श्रीमंत तो तो त्याचा हा कृपणपणा जास्तच व्यक्त होतो. र्हिया देयं, भिया देयं हें लोक लक्षांत ठेवतात. पण श्रिया देयं, संविदा देयम् हें मात्र लक्षांत ठेवीत नाहींत. सगळा आळस, सगळी वंचना, सगळी भागवाभागवी, धर्मकृत्यांच्या वाट्याला येते. केली जाणारी कृशदुर्बल धर्मकृत्येहि लौकिकासाठी राबविली जातात. आदर, प्रेम, श्रद्धा, यांचें बळ त्यामागे नसतें.
कांहीं माणसे स्वतःला दयाळू समजतात, कधीं कधीं तसें दिसतेंहि. पण ही दमा सर्वभूती असते कां ? "दया करणें जे पुत्रासी । तौच दासा आणि दासी ॥" असें स्वरूप कोणाच्या दयेला प्राप्त होतें कां ? रंजल्या गांजलेल्याला कोणी पोटांतून आपले म्हणत नाहीत. त्याच्याविषयी तिरस्काराची, निदान तुच्छतेची, तरी भावना अंतःकरणांत असते. ती व्यक्त असते, सोयीची नसेल तेव्हां अव्यक्त राहते, पण दीनाविषयीं वाटणारा कनवळा खरा नसतो. त्यांत देखाव्याचा भागहि असूं शकतो. सर्व भूतजातांविषयी तर तो नसतोच नसतो. दाखविल्या जाणाऱ्या कनवळ्याला, केल्या जाणाऱ्या दयेलाहि "मी-माझे"ची मर्यादा पडलेली असते.
प्रत्येकवेळीं रंतिदेवासारखे वा रघुराजासारखे सर्वस्व समर्पण करावें लागतें असें नाहीं. आपलें जीवनच अडचणींत येईल इतकें दान द्यावे असें शास्त्रकारहि म्हणत नाहीत. 'न तद् दानं प्रशंसनि येन वृत्तिर्विपद्यते । दाधं यज्ञष्त कर्म लोके वृत्तिमतो यतः ॥ ' असें वचन भागवतांत आहे. पण जें दिलें जातें तें श्रीमंतींला साजेसे असावें लागतेंच. तेंहि घडत नाहीं. त्यामुळें दयाळू स्वभावाचा म्हणून जो पारमार्थिक लाभ माणसाला मिळावयाचा, तोहि मिळत नाहीं. समर्थ म्हणतात- धार्मिकतेच्या नांवाखाली या ज्या अनेक गोष्टी तुम्ही करतां त्या खऱ्या अर्थाने तुमच्या उपयोगी पडणाऱ्या नसतात. त्यांची प्रत चांगली नसते. औषधाचा जो गुण येतो तो औषधी द्रव्यांच्या नेमकेपणाचा आणि उत्कृष्टतेचा. बाटलीवरचे नांव, आकर्षक वेष्टण, बाटलीचा आकार या खऱ्या औषधासारखे दिसणारे आंतील पदार्थाचे रंगरूप यांना कांहीं गुण नसतो. तेव्हा माणसाने अशा या यथासांग न घडणाऱ्या धर्मकृत्यांचा वा मुळींच व्यापक नसलेल्या दयाबुद्धीचा भरवसा धरण्यांत अर्थ नाहीं. नामस्मरणाचाच विश्वास त्यांनी धरला पाहिजे. पण तें साधे-सोपे-फुकाचे म्हणून त्याला घ्यावेसें वाटत नाहीं. एका कारखानदारानें सांगितलें, 'एकाद्या वस्तूचे मूल्य स्वस्त ठेवले तर गिऱ्हाइकाला ती वस्तू चांगल्या प्रतीची आहे असे वाटत नाहीं. मूल्य भरपूर ठेवले आणि ती परदेशी बनावटीची आहे असें सांगितलें कीं मग गिऱ्हाईक त्या वस्तूवर तुटून पडते.' इतर अनेक व्रतवैकल्याप्रमाणे नामस्मरणाचा खप नाहीं, त्याचें कारण असेंच आहे. हा गबाळेपणा माणसाने सोडला पाहिजे. चांगली वस्तू कधीं कधी महाग असूं शकते पण जें जें महाग तें तें चांगलें समजणें भ्रमिष्टपणाचेंच आहे. माणसाने हा खुळेपणा करूं नये. नाम साधे, सोपे असले तरी त्यावरच विश्वास ठेवावा.
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥ |