समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध १२ वा - अध्याय १२ वा
श्रीमद्भागवताची संक्षिप्त सूची -
सूत सांगतात -
( अनुष्टुप् )
तमो या भागवत्धर्मा विधाता कृष्ण तो नमो ।
द्विजांसी नमुनी आता वदे धर्म सनातन ॥ १ ॥
पुसले तुम्हि जे प्रश्न चरित्र विष्णुचे तसे ।
अद्भूत श्रवणीयो तो कथिले सर्व ते असे ॥ २ ॥
श्रीमद्भागवता मध्ये पवित्र हरिकीर्तन ।
हृदयीं नांदतो तोचि नाशितो पाप सर्वचि ॥ ३ ॥
ब्रह्मतत्त्व असे गुह्य ब्रह्माचे हेतु सर्व ते ।
ज्ञान जे अपरा ऐसे स्पष्ट साधन यात की ॥ ४ ॥
प्रथमस्कंधि तो सर्व वर्णिला भक्तियोग नी ।
वैराग्य वर्णिले तैसे संवाद व्यास नारदी ॥ ५ ॥
द्विजाचा मिळता शाप अनशन व्रते नृप ।
परीक्षित् बैसला तेंव्हा शुक संवाद चालला ॥ ६ ॥
द्वितीयस्कंधि ते कैसे योगाने देह त्यागिणे ।
ब्रह्म नारद संवाद सृष्टि उत्पत्ति आदि ते ॥ ७ ॥
विदुरोद्धव मैत्रेय तिसर्या स्कंधि भेटती ।
पुराण संहिता प्रश्न महापुरुषसंस्थिती ॥ ८ ॥
प्रकृती विकृती क्षोभ सृष्टिचे सात सर्ग ते ।
उत्पत्ति ब्रह्मअंडाची विराट रूप वर्णिले ॥ ९ ॥
स्थूल सूक्ष्मादि तो काळ उत्पत्ती लोकपद्मची ।
वराह रक्षितो पृथ्वी हिरण्याक्षवधो तदा ॥ १० ॥
देवता पशु पक्षी नी मनुष्य सृष्टि रुद्र ते ।
उत्पत्तीचे प्रसंगो नी नर नारीश्वरो रुप ॥ ११ ॥
स्वायंभूव मनू तैसे जन्म तो शतरूपिचा ।
कर्दमा जन्म नी तैसे मुनिपत्न्यास जन्म तो ॥ १२ ॥
भगवद् अवतारो तो महात्मा कपिलो मुनी ।
माता देवहुनीसी तो संवाद मुनिच्या पुढे ॥ १३ ॥
चौथ्या स्कंधात तो जन्म मरीच्यादी नवास नी ।
दक्षयज्ञ विनाशो नी ध्रुव नी बर्हि वर्णिले ॥ १४ ॥
प्रियव्रत उपाख्यान पाचव्या स्कंधि वर्णिले ।
नाभी ऋषभ भरत ययांचे चरितो तसे ॥ १५ ॥
द्वीप वर्ष समुद्राचे नद्यांची वर्णने पुढे ।
ज्योतिचक्र नि पाताळ नरकस्थिति वर्णिली ॥ १६ ॥
सहाव्या स्कंधि त्या दक्षा जन्म नी वंश तो पुढे ।
चराचरास तो जन्म वृत्रासुर गती तशी ॥ १७ ॥
सातव्या स्कंधि दैत्येंद्र हिरण्यकशिपू यया ।
महात्मा बाल प्रल्हाद चरित्र वर्णिले असे ॥ १८ ॥
आठव्यात कथा आल्या मनवंतर सर्व नी ।
गजेंद्रमोक्ष नी तैसे अवतारहि विष्णुचे ॥ १९ ॥
कूर्म वामन नी मत्स्यद् धन्वंतरि हयग्रिव ।
समुद्र मंथनो तैसे देव दानव संगर ॥ २० ॥
नवव्या स्कंधि ते आले मुख्यत्वे राजवंशची ।
इक्ष्वाकू जन्म कर्मोनी वंशविस्तार तो तसा ॥ २१ ॥
सुफ़्युम्न नि इला तारा उपाख्यानहि वर्णिले ।
वृत्तांत सूर्यवंशाचा शशाद नृप वर्णन ॥ २२ ॥
सुकन्या आणि शर्याती मांधता सौभरी तसे ।
खट्वांग सगरो तैसे बुद्धिमंत कुकुत्स्थ तो ॥ २३ ॥
पापहर अशी गाथा श्रीराम कोसलेंद्रची ।
निमिचा देहत्यागो नी उत्पत्ति जनकाचि ती ॥ २४ ॥
पर्शुराम कथा सर्व चंद्रवंशी पुरूरवा ।
ययाति नहुषो तैसे दुष्यंत भरतो कथा ।
शंतनू भीष्म आदी नी विस्तार यदुवंशिचा ॥ २५ ॥
दहाव्या स्कंधि ते आले यदुवंशी जगत्पती ।
श्रीकृष्ण अवतारो नी असुरा मोक्ष देइ तो ॥ २६ ॥
लीला अनंत त्या त्याच्या थोडक्या वर्णिल्या तिथे ।
देवकी वसुदेवाच्या गर्भीं श्रीकृष्ण जन्मले ॥ २७ ॥
गोकुळी नंदबाबाच्या वाढले कृष्ण ते पुढे ।
पूतना वधिली तैसे गाड पायेचि तोडिला ॥ २८ ॥
तृणावर्त बको तैसे असूरवत्स मारिला ।
प्रलंब धेनुकासूरा गती तैसीच ती दिली ॥ २९ ॥
अग्नीत रक्षिले गोपां कालियादमनि तसे ।
अज्गरा पासुनी नंद बाबाना सोडवीयले ॥ ३० ॥
गोपिंनी पतिरूपात कृष्ण तो मेळवीयण्या ।
केलेसे व्रत ते तेंव्हा प्रसन्न कृष्ण जाहले ।
पावले यज्ञ पत्न्यांना द्विजांसी अनुताप तो ॥ ३१ ॥
गोवर्धनासि उद्धार इंद्र नी कामधेनुने ।
यज्ञाभिषेक तो केला क्रीडा रात्रीस जाहली ॥ ३२ ॥
शंखचूड अरिष्टो नी केशीला वधिले असे ।
अक्रूर पातता कृष्ण मथुरीं पातले पहा ॥ ३३ ॥
विरहो सुंदर्यांचा तो मथुरी राम कृष्ण ते ।
चाणूर मुष्टिको हत्ती कंस आदीस मारिले ॥ ३४ ॥
मेलेल्या गुरुपुत्राला जिवंत आणिले पुन्हा ।
मथुरीं राहता दोघे यदुंचे हित साधिले ॥ ३५ ॥
ससैन्य तो जरासंध ठेचिता मारिला पुन्हा ।
जाळिला यवनेंद्रो नी रचिली द्वारकापुरी ॥ ३६ ॥
सुधर्मा कल्पवृक्षो तो स्वर्गीचे आणिले पहा ।
शत्रुंचे दळ जिंकोनी जिंकिली रुक्मिणी प्रिया ॥ ३७ ॥
हरा नी लढता बाणासुराच्या बाहु कापिल्या ।
भौमासुरास मारोनी वरिल्या युवती तिथे ॥ ३८ ॥
चेद्य पौंड्रक शाल्वाला दंतवक्त्रा नि शंबरा ।
द्विवीद पीठ नी मूर मारिले वर्णिले तिथे ॥ ३९ ॥
चक्राने जाळिली काशी पुन्हा भारत युद्ध ते ।
निमित्त पांडवा केले पृथ्विचा भार हारिला ॥ ४० ॥
त्या एकादश स्कंधात यदुवंशास शाप तो ।
कृष्ण उद्धव संवाद स्कंधी अद्भूत तो असे ॥ ४१ ॥
आत्मज्ञान तयीं पूर्ण धर्म नीर्णय गोधही ।
आत्मयोग प्रभावाने कृष्णे हा लोक त्यागिला ॥ ४२ ॥
बाराव्यात युगांचे ती लक्षणे वर्णिली पहा ।
कलिची गति ती तैशी प्रलयो वर्णिले तसे ॥ ४३ ॥
परीक्षित् त्यागिती देहा वेदांचे ते विभाजन ।
मार्कंडेय कथा तैसी भगवत् अंग आयुधे ।
सूर्याचे गण ते सारे वर्णिले स्कंधि याच की ॥ ४४ ॥
सत्संगी पुसले तुम्ही वर्णिले सर्व मी तसे ।
घडले नच संदेह हरीचे कीर्तनो मला ॥ ४५ ॥
पडता फसता दुःखी शिंकता उंच बोलणे ।
हरि हरी अशा शब्दे पळती पाप दूर ते ॥ ४६ ॥
( इंद्रवज्रा )
संकीर्तनी श्रीहरिच्या लिला या
नी वर्णिता नाम गुणोहि ऐसे ।
राही हरी त्या हृदयात नित्य
नी दुःख संपे रवि जै तमाते ॥ ४७ ॥
जी वाणि ना घे गुण नाम त्याचे
निरर्थकोची किति गोड राहो ।
जी पूरवानी हरिगान गाता
ती मंगला नी मुळि सत्य तीच ॥ ४८ ॥
जी वाणि गाते यश श्रीहरीचे
ती नित्य हो नूतन सुंदराची ।
आकल्प लाभे सुख त्याजला नी
संपून जाति मुळि क्लेश सारे ॥ ४९ ॥
राही रजी वाणि अलंकृता ती
ना गीत गाता हरिचे कधी ती ।
तो कावळ्याचा कवळोचि जाणा
ते हंसभक्तो कधि सेवि ना की ॥ ५० ॥
नाही जरी सुंदर काव्य तैसे
झाले जरी व्याकरणे दुषीत ।
त्या श्लोकि येता यश श्रीहरीचे
पापास नष्टी तइ संत गाती ॥ ५१ ॥
ते ज्ञान शुद्धो जइ मोक्ष लाभे
भक्तीविना ना मुळि ज्ञान शोभे ।
झाले कितीही जरि श्रेष्ठ कर्म
कृष्णार्पणी ना तइ दुःख घोर ॥ ५२ ॥
वर्णाश्रमीही बहु कष्ट घेती
नी केवलो श्री यश घेति लोक ।
ऐको नि गाता हरि नाम लीला
राही तयाचे पदु स्थीर चित्त ॥ ५६३ ॥
नी संपते पाप नि ताप सारे
अमंगलो नष्टुनि शांति लाभे ।
नी भक्ति लाभे हरिची तयास
वैराग्य ज्ञानो स्वरुपी मिळे की ॥ ५४ ॥
तुम्ही द्विजांनो बहु धन्य आहा
प्रेमे धरीला हृदयात कृष्ण ।
तो शक्तिमंतो अन सर्व आत्मा
भजोनि घेता त्यजिता दुजाला ॥ ५५ ॥
परेक्षिताला शुक बोलले जे
ते ऐकिले मी बसुनी तिथेची ।
तुम्ही दिली ती स्मृति हे पुसोनी
मी जाहलो की ऋणि आपुला तो ॥ ५६ ॥
( अनुष्टुप् )
कीर्तनीय अशा लीला विप्रांनो हरिच्या अशा ।
प्रसंगी वर्णिल्या मी या अशूभ सर्व संपते ॥ ५७ ॥
एकाग्रे क्षण वा जास्त गाती वा ऐकती यया ।
सदेह शुद्ध ते होती हृदयात तसेचि ते ॥ ५८ ॥
ऐके जो द्वादशीला वा त्या एकाद्दशिच्या दिनी ।
लाभते दीर्घ आयू त्या निरहंकारि वाचिता ।
संपते पाप ते सर्व पापबुद्धीहि नष्टते ॥ ५९ ॥
पुष्करीं द्वारकेमध्ये मथुरीं हीच संहिता ।
उपोष्ये वाचिती त्यांचे भय ते सर्व संपते ॥ ६० ॥
ऐकोनी कीर्तनी सांगे त्याजला देवता मुनी ।
पितरे मनु नी राजे तोषोने तुष्टती तया ॥ ६१ ॥
ऋग्यजु साम पाठाने द्विजांना सर्व लाभते ।
पाठे भागवताच्याही कामना पूर्ण होत तैं ॥ ६२ ॥
पुराण संहिता ही जो संयमे द्विज वाचितो ।
पद लाभे तया श्रेष्ठ बोलले भगवान् स्वये ॥ ६३ ॥
प्रज्ञा ऋतुंभरा विप्रां वाचता मिळते पहा ।
क्षत्रिया राज्य ते लाभे कुबेरा परि वैष्य हो ।
शूद्राची सर्व ती पापे नष्टती ऐकता यया ॥ ६४ ॥
( पुष्पिताग्रा )
कलिमलगिरि नष्टितो हरी तो
हरिगुण ना मिळती कुठेहि ऐसे ।
पदि पदि भरले ययीं पुराणी
स्वरुप कथीं हरिचेचि वर्णियेले ॥ ६५ ॥
जनन मरण मुक्त आत्मतत्त्व
स्थिति प्रलयो जननोहि शक्ति हीच ।
कमलज शिव नेणती स्तवाया
सदचिद मोदरुपा नमो तुला रे ॥ ६६ ॥
निपजि तनिच शक्ति सृष्टी दावी
करुनि मनि स्वविचार स्थीर राही ।
भगवतपदप्राप्ति चित्ति होय
पुजनीय देव पदा नमो तुझीया ॥ ६७ ॥
निजसुखि शुक डिंबले सदाचे
मुरलिधरे मन वेधिले जगाचे ।
कथन प्रगटवीयण्या पुराण
तमहरि हे शुक मी पदी नमीतो ॥ ६८ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर बारावा अध्याय हा ॥
॥ पहिला अध्याय हा ॥ १२ ॥ १२ ॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|