समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ११ वा - अध्याय २३ वा

एका तितिक्षु ब्राह्मणाचा (कदर्युचा) इतिहास -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्री शुकदेवजी सांगतात -
( इंद्रवज्रा )
कथा हरीच्या श्रवणीय ऐशा
     तो मुक्तीदाता बहु प्रेम देई ।
श्री उद्धवांनी जधि प्रार्थिले ते
     प्रशंसुनीया मग कृष्ण बोले ॥ १ ॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले -
( अनुष्टुप )
जगी ना मिळती संत दुर्जने कटुवाणिने ।
त्रासिता राहती शांत श्रीदेवगुरुशिष्यजी ॥ २ ॥
बाणाने विंधिता देहा न त्रास तेवढा घडे ।
दुर्जने विंधिता शब्दे होतो त्रास बहू मना ॥ ३ ॥
इतिहास जुना संत संदर्भा सांगती पहा ।
तुम्हासी सांगतो सर्व चित्त देऊन ऐकणे ॥ ४ ॥
एका भिक्षूस दुष्टाने त्रासिता भिक्षु गायिला ।
धैर्याने पूर्वजन्मीचा इतिहासचि वर्णिला ॥ ५ ॥
उज्जैनीं पूर्वि तो विप्र राही व्यापार ही करी ।
श्रीमंत कृपणो कामी शब्दा शब्दास रागवे ॥ ६ ॥
अतिथी ज्ञातिबंधूंना न शब्दे गोड बोलला ।
रिकाम्या घरिची राही स्वयंही सुख भोगिना ॥ ७ ॥
कद्रुता पाहुनी पुत्र पुत्रि बंधु नि पत्नि नी ।
राहती दुःखि ते भृत्य अनिष्ट चिंतिती मनीं ॥
न व्यव्हार कुणा प्रीय कधीच करि तो तसा ॥ ८ ॥
लोक नी परलोकाला मुकोनी रक्षिले धना ।
न धर्म भोग ना घेई देवता क्रोधल्या तदा ॥ ९ ॥
पूर्वपुण्यसहाय्याने टिकले धन जेवढे ।
सरता पुण्य ते सारे धनही सरले तसे ॥ १० ॥
नीचाचे धन ते पुत्रे चोरांनी लुटिले असे ।
जळाले देवता कोपे उरले दंडि संपले ॥ ११ ॥
धन ते सरले ऐसे धर्म भोगाविनाच ते ।
संबंधी दूर ते गेले चिंतेने विप्र ग्रासिला ॥ १२ ॥
हृदयी भडका झाला मनाला खेद जाहला ।
अश्रूनी दाटला कंठ वैराग्य जाहले मनीं ॥ १३ ॥
हाय मी कष्टलो व्यर्थ जीवाला त्रासुनी असे ।
धर्म कर्म न ते केले न भोग घेतले सुखे ॥ १४ ॥
कळले कृपणा नाही धनात सुख ते मुळी ।
चिंतेने जळती नित्य अधर्मे नर्कि पावती ॥ १५ ॥
रुपा थोडाहि तो कोड यशाला लोभ नासवी ।
गुणाचा गर्व तो होता मिटवी गुण सर्व ते ॥ १६ ॥
संचयी वर्धनी खर्चीं भोग नाशात दुःखची ।
परिश्रम भयो चिंता भ्रमासी नित्य झुंजणे ॥ १७ ॥
चोरी हिंसा तसे खोटे दंभ काम नि क्रोध तो ।
अहंकार तसा गर्व स्पर्धा भेद नि वैर ते ॥ १८ ॥
अविश्वास तसा लोभ जुगार मदिरा तशी ।
अर्थाचे हे अनर्थोची ज्ञात्याने सोडिणे असे ॥ १९ ॥
माता पिता तसे बंधू पुत्र नी सोयरे सखे ।
कवडीच्या निमित्ताने शत्रू ते बनती पुन्हा ॥ २० ॥
क्रोधती अल्प पैशाने स्नेहही त्यजिती तसा ।
प्राणाशी बेतती नित्य सर्व नाशास योजिती ॥ २१ ॥
देवदुर्लभ हा देह द्विज ज्ञाती मिळोनिया ।
नाशिती सत्य तो स्वार्थ अशूभ गति मेळिती ॥ २२ ॥
मनुष्यशरिरी मोक्ष स्वर्गाचे दार हे असे ।
बुद्धिमंत असा कोण अनर्थीं फसुनि वसे ॥ २३ ॥
देवता पितरे प्राण्या भागाने नच तोषवी ।
न भोग स्वयही घेई दुर्गती लाभते तया ॥ २४ ॥
कर्तव्या ढळलो मी ते प्रमादे सर्व वेचिले ।
विवेकी मोक्षही घेती वृद्धत्वीं काय ते करू ॥ २५ ॥
विव्दान धन तृष्णेने दुःखी कां नच ते कळे ।
माया संसारिही सर्वां मोहित करिते पहा ॥ २६ ॥
विक्राळ काळदाढेत मनुष्य देह सापडे ।
धन नी धनदादेव कर्म त्यां काय ते करी ॥ २७ ॥
सर्वदेवमयो विष्णू प्रसन्न नच संशय ।
म्हणोनी दिधला त्याग वैराग्यनाव ही दिली ॥ २८ ॥
उरली आयु ती त्यात करीन परमार्थ तो ।
सुकवीन तसा देह तपाने मम सर्व हा ॥ २९ ॥
अनुमोदन संकल्पा त्रिलोकस्वामी तो करी ।
खट्‍वांगे घडि त्या दोन उरता मोक्ष साधिला ॥ ३० ॥
भगवान श्रीकृष्ण सांगतात-
त्या द्विजे निश्चये ऐशी अहंची गाठ तोडिली ।
पुन्हा तो शांत होवोनी मौनी संन्यासि जाहला ॥ ३१
आसक्ति त्यजुनी सर्व इंद्रिया वश ठेविले ।
भिक्षेला नगरीं जाई नोळखी परि त्या कुणी ॥ ३२ ॥
अवधूत असा भिक्षू वृद्धत्वी पावला पुन्हा ।
पाहोनी त्रासिती दुष्ट तिरस्कार तसाच तो ॥ ३३ ॥
हिसकावी कुणी दंड भिक्षापात्रास फेकिती ।
माला कमंडलू कंथा घेवोनी पळती कुणी ॥ ३४ ॥
दावोनी हरिती वस्तू जेवता नदिसी कधी ।
थुंकती मुतती माथी गावचे पापि लोक ते ॥ ३५ ॥
मौन पाहोनि बोलाया लावण्या त्रासिती तसे ।
न बोलता कुणी त्याला मारिती दुष्ट दुर्जन ॥ ३६ ॥
त्रासिती चोर मानोनी बांधा बांधा वदे कुणी ।
दोरीने बांधिती कोणी त्रासिती दुष्ट ते असे ॥ ३७ ॥
तिरस्कारे कुणी बोले कृपणे ढोंग घेतले ।
मुलांनी त्यजिले यासी भीक मागोनि हा जगे ॥ ३८ ॥
पहा हा तगडा भिक्षू धैर्यवान पर्वतापरी ।
मौनाने साधितो काम बगळ्याहुनि ढोंगि हा ॥ ३९ ॥
हासती पाहती कोणी पाळीव पोपट जसे ।
टाकिती पिंजर्‍या मध्ये घरात बंद ठेविती ॥ ४० ॥
सर्व ते गप्प हा साही ज्वराने पीडिला तरी ।
न करी द्वेष कोणाचा कर्माचे फळ मानिले ॥ ४१ ॥
त्रासिती मोडण्या धर्म परी हा निश्चये स्थिरे ।
सात्वीक बांधुनी धैर्य कधी उद्‍गार तो करी ॥ ४२ ॥
ब्राह्मण म्हणे -
( इंद्रवज्रा )
दुःखास कोणी नच कारणी या
     न देह देवो गृह नी शरीर ।
आहेत ते कर्म नि काल आदी
     मनोचि बांधी श्रुति संत बोला ॥ ४३ ॥
बलिष्ठ आहे मन हे रची ते
     गुणात्मका ही सगळीच सृष्टी ।
त्रैगुण्य कर्मे मुळि वृत्ती होते
     कर्मेचि होते गति भिन्न जीवा ॥ ४४ ॥
आत्म स्थिरोनी मन नित्य धावे
     आत्मा सखा तो प्रगटोनि येतो ।
भोक्ता बनोनी मग बद्ध होतो ॥ ४५ ॥
दान स्वधर्मे नियमे यमाने
     वेदे नि कर्मे सदवर्तनाने ।
एकाग्र चित्ते हरिसी पुजीता
     स्थिरावता चित्तचि श्रेष्ठ योग ॥ ४६ ॥
समाहितो हे मन शांत ज्याचे
     दानादि पुण्ये फळ लाभ होतो ।
चांचल्य आलस्य मनास होता
     दानेहि त्याला मुळि लाभ नाही ॥ ४७ ॥
इंद्रिय सारे वशती मनाला
     मनो न होते वश इंद्रियाला ।
बळीहुनी हे बळि ते नी होय
     बलिष्ठ देवो मन हेच आहे ॥ ४८ ॥
खरेचि आहे मन थोर शत्रू
     आवेग त्याचा नच साहवे तो ।
ते मर्मस्थानी हृदयास भेदी
     या शत्रुलागी प्रथमो जितावे ।
ते मूर्ख याला नच जिंकिती नी
     निराश होती जगतास अंती ॥ ४९ ॥
अंधत्व येते मतिसी तदा ते
     त्या मीपणाच्या फसतीच फंदी ।
मानी दुजाभाव फसोनी फंदी
     अनंत अज्ञान तमात गुंत ॥ ५० ॥
मानीयल्या दोषिच देवता त्या
     तरीहि आत्म्या नच हानि कांही ।
आत्मा असे एक तनूत सार्‍या
     अंगास अंगे नच द्वेष जैसा ॥ ५१ ॥
समानार्थी समश्लोक नाही ॥ ५२ ॥
आत्मा जरी कारण दुःख मानो
     तरी तयाचा स्वय तोच आहे ।
आत्म्याहुनी ना नच भिन्न रूप
     न क्रोध दुःखास मुळीच राही ॥ ५३ ॥
निमित्त झाले ग्रह ते सुखाला
     आत्म्यास हानी नच कांहि तेंव्हा ।
ते पीडिती या तनुसी सदा नी
     आत्मा परा तो मग क्रोध कोणा ? ॥ ५४ ॥
कर्मास मानी सुख दुःख तेंव्हा
     जडास आत्मा नच की शिवे तो ।
आत्मा सदा साक्षि नि निर्विकार
     कर्मा न तत्त्वो मग क्रोध कोणा ॥ ५५ ॥
तो काळ मानी जर सौख्य दुःखा
     अग्नीस अग्नी नच जाळितो की ।
न बर्फ बर्फे कधि थंड होई
     आत्म्यां तसा काळ न दुःख देई ॥ ५६ ॥
देहा नि धर्मा अन कार्य लेशा
     न स्पर्शि आत्मा मुळि गंध ना त्या ।
न तो पडे त्या मुळि चक्रि कोण्या
     म्हणोनि तो ना भयभीत होतो ॥ ५७ ॥
मोठे ऋषी आश्रय तोच घेती
     घेईन मी आश्रय तोच आत्मा ।
मुक्ती तथा प्रेमदाता हरी तो
     तरेन त्याच्या पदि लागुनिया ॥ ५८ ॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले-
धना सवे क्लेशही दूर झाले
     संन्यास घेताचि विरक्त झाला ।
त्रासी कुणी त्या परि शांत राही
     मौनी असे गीतचि गायिला तै ॥ ५९ ॥
( अनुष्टुप )
सुख दुःख न ते देई आपणा दुसरे कोणी ।
चित्ताचा भ्रम तो होय अज्ञानें कल्पना गमे ॥ ६० ॥
माझ्यात म्हणूनी वृत्ती लावोनी शक्तिने पुन्हा ।
मनास वश ठेवावे योगाचे सार हे असे ॥ ६१ ॥
भिक्षुचे गीत ते कार्य मूर्तिमान ब्रह्मज्ञान ते ।
एकाग्रे ऐकुनी घेता मिटती सर्व द्वंद्व नी ॥
निर्भयी राहतो आत सिंहाच्या परि गर्जुनी ॥ ६२ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर तेविसावा अध्याय हा ॥
॥ ११ ॥ २३ ॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP