समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ११ वा - अध्याय १७ वा

वर्णाश्रम धर्माचे वर्णन -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

उद्धवजी म्हणाले -
( अनुष्टुप )
सामान्य त्या मनुष्याला जेणे लाभेल भक्ति ती ।
वर्णाश्रम असा धर्म तुम्ही प्रथम बोधिला ॥ १ ॥
कृपया सांगणे आता मनुष्या कोणत्या परी ।
धर्मां अनुष्ठिता लाभे भक्ति या चरणासि ते ॥ २ ॥
अगोदर महाबाहो हंस रूपास घेउनी ।
ब्रहम्यासी बोध तो केला श्रेष्ठ धर्मचि माधवा ॥ ३ ॥
मृत्युलोक असा झाला असोनी नसल्या परी ।
बहूत दिन ते झाले तुम्ही ना उपदेशिले ॥ ४ ॥
पृथ्वि नी सत्य लोकात मुर्तिमान वेद राजती ।
वक्ता ना कुणिही त्यांचा तुमच्याविण या जगीं ॥ ५ ॥
धर्मप्रवर्तको तैसे रक्षिते उपदेशक ।
तुम्हीच एकटे आहा पूर्वीही रक्षिले तुम्ही ॥
आवरोनि लिला सर्व जाता धामास तैं तुम्ही ।
धर्म हा लोप पावेल सांगेल कोण तो पुन्हा ॥ ६ ॥
मर्मज्ञ सर्व धर्माचे म्हणोनी सांगणे प्रभो ।
भक्ति प्राप्त जये होय विधान कोणते तसे ॥ ७ ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
पुसता प्रश्र हा ऐसा भगवंतास उद्धवे ।
हासोनी वदले कृष्ण कल्याणप्रद धर्म तो ॥ ८ ॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले -
धर्ममय असा प्रश्र मनुष्या मोक्ष दायक ।
म्हणोनी बोधितो सर्व ऐक सावध होउनी ॥ ९ ॥
पूर्वी कृतयुगा मध्ये हंस एकचि वर्ण तो ।
कृतकृत्य प्रजा सारी म्हणोनी कृतयूग ते ॥ १० ॥
ॐकारीं वेद तै होते धर्म मी वृषभो रुपीं ।
निष्पाप सर्व तै भक्त हंस रूपास पूजिती ॥ ११ ॥
त्रेतायुगात माझ्याची श्वासे त्रै वेद जाहले ।
तै यज्ञ रूप घेवोनी तदा मी पातलो असे ॥ १२ ॥
विराटामुखि ते विप्र भुजांत क्षत्रियो तसे ।
मोडासी वैश्य नी पायीं शूद्र ते जन्मले पहा ।
स्वभावे वर्तने येती आपणा ओळखावया ॥ १३ ॥
गृहस्थाश्रम मांडीसी ब्रह्मचर्य हृदीं मम ।
छातीसी वानप्रस्थो नी संन्यास शिरिं जाहला ॥ १४ ॥
जन्मस्थानानुसारेच वर्ण आश्रम पौरुषी ।
स्वभाव जाहले तैसे उत्तमाधम मध्यम ॥ १५ ॥
शम दमो तपो शुद्‍धी संतोष शांति आर्जव ।
मद्‍भक्ती नि दया सत्य विप्रस्वभाव तो असे ॥ १६ ॥
धैर्य तेज बले शौर्य उदार क्षम्य उद्यमी ।
ऐश्वर्य स्थैर्य ब्रह्मण्यत क्षात्र स्वभाव तो असा ॥ १७ ॥
अस्तिक्य दानशीलो नी अदंभ व्दिजसेवन ।
धनार्जनी असंतुष्ट वैश्याचा तो स्वभावची ॥ १८ ॥
व्दिज गो देवतासेवा निष्ठेने करणे तसे ।
लाभात तोष मानावा शूद्रवर्ण स्वभाव तो ॥ १९ ॥
खोटे अशौच नी चौर्य नास्तिक्य भांडणे तसे ।
काम क्रोध तसे तृष्णी वशणे हा स्वभावची ॥ २० ॥
अहिंसा सत्य अस्तेयी रहावे दृढ निश्चये ।
काम क्रोधीं न बद्धावे हा तो सर्वास धर्मची ॥
तेणे प्रसन्न हो चित्त तयात लाभ तो खरा ॥ २१ ॥
सोळा संस्कार ते घेता दुसरा जन्म त्या त्रया ।
लाभता शिकणे वेद गुरूच्या आश्रमी पुन्हा ॥ २२ ॥
मेखळा चर्म नी दंड ब्रह्मसूत्र कमंडलू ।
रुद्राक्ष नि जटा व्हाव्या दात वस्त्रे नटोनये ॥
रंगीत आसना ना घे कुश घेवोनि बैसणे ॥ २३ ॥
स्नान भोजन नी होम जप शौचासि मौन ते ।
बगला गुप्त अंगाचे केश नख न काढिणे ॥ २४ ॥
ब्रह्मचर्य असो पूर्ण स्वयेंही वीर्य ना त्यजो ।
स्वप्नात पडता वीर्य स्नाने गायत्रि जापिणे ॥ २५ ॥
पवित्र राहुनी त्याने अग्नि आचार्य गो व्दिज ।
वृद्ध नी देवता यांची करावी ती उपासना ॥
संध्या नी जप गायत्री मौन संध्येसि ते करा ॥ २६ ॥
स्वरूपी गुरूची मानो तिरस्कार नकोच तो।
माणूस नच तो मानो सर्वदेवमयो गुरु ॥ २७ ॥
भिक्षा मागोनि आणावी गुरुच्या ठेविणे पुढे ।
संयमे घेउनी आज्ञा भिक्षेचा तो स्विकार हो ॥ २८ ॥
आचार्या पाठिसी चालो सावधे दूर बैसणे ।
थकता चोपणे पाय आज्ञेसी हात जोडणे ॥ २९ ॥
मिळेपर्यन्त विद्या ती भोग सर्वचि त्यागुनी ।
रहावे गुरुकूलात न खंडा ब्रह्मचर्य ते ॥ ३० ॥
ब्रह्मलोक हवा त्याने नैष्ठीक ब्रह्मचारि ते ।
राहोनी गुरुची सेवा आजन्म करणे असे ।३१ ॥
संपन्न ब्रह्मतेजाने निष्पाप शिष्य होतसे ।
गुरु अग्नि तनू मध्ये सर्वत्र मजला पुजो ॥ ३२ ॥
पाहू नये स्त्रियांना नी स्पर्श तो नच हो मुळी ।
हास्य विनोद टाळावा न पहा प्राणि मैथुन ॥ ३३ ॥
शोच आचमनो स्नान संध्योपासन आर्जव ।
तीर्थसेवा मम जाप्य संयमे सम पाहणे ॥ ३४ ॥
अस्पृश्या नच हो स्पर्श संभाषण नको तया ।
अभक्ष्य नच हो खाणे चारी आश्रम धर्म हा ॥ ३५ ॥
ब्रह्मचारी व्रते ऐशा अग्निच्या परि शोभतो ।
तपाने जळती कर्म शुद्ध होता मला मिळे ॥ ३६ ॥
नैष्ठीक ब्रह्मचारी जे राहण्या नच इच्छिती ।
अभ्यास संपता द्यावी गुरुला युक्त दक्षिणा ॥
समावर्त करोनीया गुर्वाज्ञे आश्रमा त्यजो ॥ ३७ ॥
वन वा गृह सेवावे व्दिज तो यति हो शके ।
इच्छिता तो क्रमे घ्यावा स्वेच्छाचारी न हो कधी ॥ ३८ ॥
गृहार्थी तो वरो पत्‍नी कुलीन अनुरूपची ।
समवर्ण वयीं सान अथवा क्रमि खालच्या ॥ ३९ ॥
यज्ञाध्यायन नी दान त्रैवर्णि कर्म हे असे ।
अध्यापनो प्रतिगृह्य यज्ञकर्म व्दिजासची ॥ ४० ॥
परंतु प्रतिगृह्याने व्दिजांचे तेज संपते ।
अध्यापने नि यज्ञाने साधावा चरितार्थ तो ॥
दिसता त्यातही दोष कण वेचूनि भक्षिणे ॥ ४१ ॥
दुर्लभो व्दिज देहो तो तुच्छ भोगार्थ तो नसे ।
तप नी कष्ट सोसोनी स्वानंद मोक्ष मेळिणे ॥ ४२ ॥
( इंद्रवज्रा )
निष्काम भावे व्दिज जो रहातो
     वेचून दाणे जगतो असा नी ।
जो अर्पि देहो अन प्राण माते
     संन्यासि जाणा घरि राहता तो ॥ ४३ ॥
( अनुष्टुप )
मम भक्त व्दिजाची ती विपत्ति पाहता उठे ।
तयाही शीघ्र मी पावे नाव ती बुडत्या जशी ॥ ४४ ॥
नृपे कष्टे प्रजा सर्व उद्धार करणे पहा ।
हत्ती हत्तीस रक्षी जैं तसा तो मोक्ष पावतो ॥ ४५ ॥
रक्षिता ती प्रजा ऐसी पापमुक्तचि हो‍उनी ।
सूर्याचे तेज लाभोनी इंद्राच्या सम हो सुखी ॥ ४६ ॥
वैश्यवृत्ती विपत्तीत विप्रे घेवोनि त्यागिणे ।
संकटी शस्त्रही घ्यावे श्वानवृत्ती न हो कदा ॥ ४७ ॥
तसेचि क्षत्रिये घ्यावी वैश्यवृत्ती विपत्तिसी ।
अध्यापने शिकारीने जगावे,श्वानवृत्ति ना ॥ ४८ ॥
वैश्याने शूद्रवृत्ती ती करणे त्या विपत्तिसी ।
चटया विणणे आदी संकटीच असे असो ॥ ४९ ॥
हवन तर्पणो यज्ञ बलीहरण आदि ते ।
गृहस्थे पूजिणे नित्य समस्त विभुती पहा ॥ ५० ॥
उचित धन मेळोनी अन्यां कष्ट न पोचिता ।
गृहस्थे करणे यज्ञ विधि न्याय जसा असे ॥ ५१ ॥
कुटुंबी नच गुंतावे व्यापाने भक्ति ना त्यजो ।
भोग ते नाशवंतोची चतुरे जाणणे पहा ॥ ५२ ॥
पुत्र आप्त सखे स्त्रि नी गुरुसी भेटणे सदा ।
क्षणाचे सोबती सारे मरता कोण ये सवे ॥ ५३ ॥
अतिथी परि तै व्हावे प्रपंचात असोनिया ।
ममता त्यजिता सर्व घराचा बंध ना पडे ॥ ५४ ॥
घरीच मज चिंतावे भक्त प्रापंचिके पहा ।
पुत्रवंते वना जावे किंवा संन्यास घे‍इजे ॥ ५५ ॥
गृहस्थी जीवना मध्ये गृहस्था परि राहता ।
स्त्रैण नी कृपणा मूढा भवाचा फेर ना चुके ॥ ५६ ॥
चिंतिती पितरे वृद्ध लेकुरे सान सानची ।
जाता मी दुःख हो सर्वा जगतील कसे पुन्हा ॥ ५७ ॥
वासनात असे ज्याचे राहिले चित्त गुंतुनी ।
विषयी तृप्त ना होय शेवटी जाय नर्कि तो ॥ ५८ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सतरावा अध्याय हा ॥
॥ ११ ॥ १७ ॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP