श्रीशुकदेव सांगतात -
( अनुष्टुप् )
रामकृष्ण असे दोघे राहती द्वारकापुरीं ।
सूर्यास एकदा तेंव्हा मोठे खग्रास लागले ॥ १ ॥
ज्योतिषे सांगता पूर्व कल्याण कोक कैक ते ।
उपार्जना कुरुक्षेत्री येवोनी पोचले पहा ॥ २ ॥
समंतपंचको क्षेत्री पूर्वी श्री पर्शुरामने ।
पाचकुंड रुधिराने भरिले क्षत्रियांचिये ॥ ३ ॥
जसे ते पापनाशार्थ करिती लोक कर्म तै ।
अकर्म असुन रामे यज्ञ केला असे तिथे ॥ ४ ॥
सर्व प्रांतातुनी तेथे पर्वाला लोक पातले ।
अक्रूर वसुदेवो नी उग्रसेनादि ज्येष्ठ ही ।
प्रद्युम्न सांब आदीही पाप नाशार्थ पातले ॥ ५ ॥
अनिरुद्ध कृतवर्मा सारणो आदि वीर ते ।
राहिले द्वारकेमाजी रक्षणार्थ तिथे पहा ॥ ६ ॥
तेजस्वी यदुवंशीय दिव्यमाला गळ्यात नी ।
बहुमूल्य तसे वस्त्र सजली कवचे तयां ॥ ७ ॥
लाटेच्या गतिने अश्व चालती भूमिसी पहा ।
चालती हत्ति वेगाने विमानां परि ते रथ ॥ ८ ॥
राण्या त्या पालख्यां माजी कुरुक्षेत्रासि पातले ।
संयमे जाहली स्नाने उपवासहि जाहला ॥ ९ ॥
सुवर्णम्होरक्या माला घालोनी गायि दानिल्या ।
पर्शुरामाचिये कुंडी यदुंनी स्नान घेतले ॥ १० ॥
भोजने दिधली विप्रा हेतू की कृष्णभक्ति हो ।
सर्व ते मानिती कृष्णा आपुला इष्टदेवची ॥ ११ ॥
द्विजाज्ञे जेवले सर्व वृक्षाच्या तळि थांबले ।
विश्रांती घेतली कोणी कोणी मित्रास भेटती ॥ १२ ॥
तिथे मत्स्य उशिनरो विदर्भी कोसली कुरू ।
सृंजयो कंबुजो मद्र कैकयो कुंति केरलो ॥ १३ ॥
आनर्त आदि देशाचे शत्रु मित्र कितेक ते ।
तसेच गोपही आले कृष्णाच्या दर्शनास तै ॥ १४ ॥
( इंद्रवज्रा )
भेटोनि वार्तें बहु प्रेम दाटे
पद्मापरी ते खुलले जनो नी ।
अश्रू तयांचे झडले तसेच
रोमांच अंगी उठले पहा की ॥ १५ ॥
स्त्रिया तशाची भरल्या प्रमोदे
नी मंद हास्ये बघतात कृष्णा ।
ते केशराचे स्तनही सखीच्या
स्तनावरी दाबुनि मोद घेती ।
आनंद घेता बहुमोल ऐसा
प्रेमाश्रु त्यांच्या गळतात नेत्रें ॥ १६ ॥
( अनुष्टुप् )
वंदिती सान थोराते थोर तैसे स्विकारिती ।
आगते स्वागते अन्यां कृष्णलीलाच बोलती ॥ १७ ॥
कुंती नी वासुदेवोही सखे नी सोर्यांस त्या ।
तसेच भेटता कृष्ण संपते सर्व दुःख ते ॥ १८ ॥
कुंती वसुदेवास म्हणाली -
बंधो खरी अभागी मी इच्छा ना पुरल्या कधी ।
साधुस्वभाव हा बंधू न पुसे संकटी मला ॥ १९ ॥
विधाता डावली त्याला संबंधी वागती तसे ।
पिताही विसरे तेंव्हा तुमचा दोष काय तो ॥ २० ॥
वसुदेव म्हणतात -
नको खेद तसा मानू सर्व दैवाधिनी असू ।
वागती ईश इच्छेने भोगिती फळ जीव ते ॥ २१ ॥
कंसाने त्रासिले तेंव्हा दिशांना पांगले अम्ही ।
पुन्हा ईश कृपेने त्या स्थान प्राप्तहि जाहले ॥ २२ ॥
श्रीशुकदेवजी सांगतात -
उग्रसेने वसुदेवे सर्वां सत्कार तो दिला ।
सर्वांना लाभली शांती कृष्णाच्या दर्शने तदा ॥ २३ ॥
द्रोण भीष्म नि गांधारी धृतराष्ट्र नि पांडव ।
सपत्न धर्म नी कुंती सृंजयो विदुरो कृपा ॥ २४ ॥
कुंति भोज विराटो नी भीष्मको नृपनग्नजित् ।
पुरुजित् द्रुपदो शल्य धृतकेतू नि काशि तो ॥ २५ ॥
मदभोष विशालाक्ष मिथिलो मद्र केकयो ।
युधामन्यू सुशर्मा नी सुपुत्र बाल्हिको तसे ॥ २६ ॥
धर्माचे मित्र ते राजे कृष्णविग्रह पाहुनी ।
राण्याही पाहुनी सार्या झाले सर्वचि विस्मित ॥ २७ ॥
कृष्ण नी बलरामाचा सन्मान घेउनी असा ।
द्वयां सन्मान देण्याला यदुवंशा प्रशंसिती ॥ २८ ॥
वदती उग्रसेनाला जगी आपण सर्व ते ।
धन्य धन्य असे झालो घडते कृष्णदर्शन ॥ २९ ॥
( वसंततिलका )
गाती श्रुती हरिपदी वहतेय गंगा
जी पावनो करि जगा नित सर्वकाळ ।
कालप्रवाहि अमुचे नत भाग्य होते
ते लाभले पुनरपी हरिच्या पदाने ॥ ३० ॥
हे उग्रसेन तुम्हि तो हरिआप्त आहा
स्पर्शी तसा नि बघता बसता तयासी ।
खाता पिता हरिसवे इतरापरी ते
नांदे घरात हरि तै मिळतोच मोक्ष ॥ ३१ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
नंदासी कळले की श्री कुरुक्षेत्रात कृष्ण हा ।
पातला, पातले तेंव्हा सगोप क्षेत्रि त्या पहा ॥ ३२ ॥
नंदादि पाहता हर्ष यदुंना जाहला असे ।
दृढ आलिंगने देती एकमेकास बोलती ॥ ३३ ॥
प्रेमाने वसुदेवो ते नंदा वक्षासि भेटले ।
आठवे मागचे सारे कृष्णाचे बाळरूप ते ॥ ३४ ॥
यशोदा नंद यांना ही भेटले रामकृष्ण ते ।
वंदिले दाटला कंठ न बोलू शकती मुळी ॥ ३५ ॥
यशोदा नंदबाबांनी भुजात घेतले द्वया ।
वियोग मिटला तैसे दुःखही सर्व संपले ॥ ३६ ॥
रोहिणी देवकी दोघी यशोदेसीहि भेटल्या ।
स्मरुनी पूर्विचे सारे बोलल्या दोघि त्या तिला ॥ ३७ ॥
राणी गे तुज नी नंदा मित्राच्या सम वागलो ।
न फिटे उपकारो तो विसरे कोण तो तसा ॥ ३८ ॥
( वसंततिलका )
आम्ही असोनि पितरे तुम्हि पाळिले की
ना ठेविलाच तुम्हि भेद मुळी तसा तो ।
संस्कार मंगल असे तुम्हि सर्व केले
नेत्रापरीच जपले नित राम कृष्णा ॥ ३९ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
गोपीस कृष्ण जिवची वदलो तुम्हाला
पाहावया तरसती नच अंत कांही ।
नेत्रेचि आकळिति नी मनि तृप्त होती
योग्यास जे कठिण ते जमले तयांना ॥ ४० ॥
( अनुष्टुप् )
तादात्म्य पावल्या गोपी कृष्णाने पाहिले तदा ।
एकांती हृदयी घेता वदला हासुनी पुन्हा ॥ ४१ ॥
स्वजनी भद्र साधाया साजनी त्यागिल्या अम्ही ।
लढता दिन ते गेले कधी का स्मरता मला ॥ ४२ ॥
कृतघ्न मजसी का ते मानिले चित्ति नी तसे ।
वाईट वाटले का ते ईशात मोद तो जिवा ॥ ४३ ॥
वार्याने कचरा जैसा मिळतो सुटतो तसा ।
ईशइच्छे तुम्ही आम्ही भेटतो तुटतो पहा ॥ ४४ ॥
भाग्याने लाभले प्रेम जेणे मी मिळतो तुम्हा ।
प्रेमभक्ती मला देता वैकुंठधाम देइ मी ॥ ४५ ॥
घटात मृत्तिका जैसी वस्त्रात सूत ते जसे ।
सृष्टीमध्ये तसा मी की बाहेर आत मध्यि ही ॥ ४६ ॥
पंचभूत रुपाने नी भोक्ता आत्माहि मी असे ।
अविनाशी तसा सत्य मला ’तो’ हृदयी पहा ॥ ४७ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
( अनुष्टुप् )
अध्यात्मज्ञान देवोनी गोपिका शिकवीयल्या ।
जीवकोश त्यजोनीया सदाच्या कृष्ण जाहल्या ॥ ४८ ॥
त्या म्हणाल्या -
( वसंततिलका )
हे पद्मनाभ तुज योगिहि नित्य ध्याती
संसारि जीव बुडता तुचि एक नाव ।
संसार कर्म करिता हृदयात राही
आम्हा पडो विसर ना क्षणमात्र तैसा ॥ ४९ ॥