[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
( इंद्रवज्रा )
श्रीशुकदेव सांगतात -
त्या पाहती उद्धव कृष्णभक्त
कृष्णापरी भूषित कंजनेत्र ।
विशाल बाहू अन पीत वस्त्र
माळा तसे कुंडल शोभले ते ।
मुखारविंदो अतिही प्रसन्न
गोपींसि भासे जणु कृष्ण आला ॥ १ ॥
पवित्र हास्ये वदल्या सख्यांना
हा सुंदरो कोण नि दूत कोणा ।
कृष्णापरी धारियतोय वेष
गोपी तया घेरुनिया उभ्या तै ॥ २ ॥
हा कृष्णसंदेश पहूचण्याला
आला असे हे कळले तयांना ।
सलज्ज हास्ये बघता तयाला
नेवोनि एकांतिच बोलल्या त्या ॥ ३ ॥
( अनुष्टुप् )
उद्धवा जाणितो आम्ही कृष्णाचे पार्षदो तुम्ही ।
निरोप घेउनी आले माता नी पितरास तो ॥ ४ ॥
अन्यथा नंदगोठ्यात तुमचे काय काम ते ।
नात्याच्या स्नेहबंधाला ऋषीही तोडु ना शके ॥ ५ ॥
प्रेमाचे सोंग ते अन्या स्वार्था पायीच होतसे ।
फुलांसी भृंग नी स्त्रीया साथी पुरुष स्वार्थ तो ॥ ६ ॥
निर्धन्या हाकती वेश्या प्रजा न रक्षि त्या नृपा ।
गुरुशी शिकता शिष्य दक्षिणोत्तर ते द्विज ॥ ७ ॥
बहार संपता पक्षी त्यागिती वृक्ष तो जसा ।
जेवता अतिथी जैसा न थांबे अन्य त्या घरी ॥
वनास लागता आग पळती पशु पक्षिही ।
स्त्रियेचे जतरि ते प्रेम जार ना पाहि मागुती ॥ ८ ॥
परीक्षित् मन वाणीने गोपी तल्लीन त्या रुपी ।
उद्धवा बोलता सर्व न कळे काय त्यां वदो ॥ ९ ॥
आठ-आठवुनी चित्ती किशोर-बाल त्या लिला ।
गायिल्या लाज सोडोनि रडल्या स्फुंद-स्फुंदुनी ॥ १० ॥
कृष्ण संगम तो कोणी स्मरता भृंग एक ये ।
कृष्णाचा दूत त्या मानी, गोपी भृंगास सांगते ॥ ११ ॥
( मालिनी )
मधुपि कपटि कृष्णो त्याजचा तू सखा की ।
नच पदि शिवु आम्हा कृष्णमाळा सखीची ॥
हलद उटिहि लागे पीत तो रंग पुच्छीं ।
नच करि प्रित तू ही एक पुष्पास कोण्या ॥
मधुपति हरि जैसा मानिना नायिका जै ।
हळदउटि तशीची न्यावि तू त्या हरीला ॥ १२ ॥
हरिहि तव परी तो कृष्णवर्णीच आहे ।
कुसुमि बसुनि तू जै जाशि दूरी उडोनी ॥
अधर मधु पिवोनी कृष्ण गेला तसाची ।
नच मनि कळते की सेविते लक्ष्मि कैसी ॥ १३ ॥
वनज अम्हि असू कां गातसे गीत कृष्णी ।
मन जर वळवाया गासि तू गीत त्याचे ॥
अनुनय नच चाले गीत ते रे पुराणे ।
नववधु हरिप्रीया तेथ जा गीत गा हे ॥ १४ ॥
कपटि हरि हसोनी उंचवी भूवई तै ।
पळत नच हरीशी ये न स्त्री या जगात ॥
चरण रज उपासि लक्ष्मि त्याच्या पदासी ।
मग अम्हि पुढती त्या कोण ऐशा रुपाने ॥
इथुनि निघुनि जावे सांगणे त्या हरीला ।
गुण तव जन गाती लाविशी खोट त्याला ॥ १५ ॥
निपुण अनुनयीं तू ना पदासी शिवू तू ।
मनि मम गमते की याचण्यासी क्षमा ही ॥
हरि तुज वदला ती ना चले येथे मात्रा ।
हरिसिच वद तू की ना तुझा तो भरोसा ॥ १६ ॥
अति हरि अपराधी राम रूपात तेणे ।
कपिबलि वधियेला जंगली त्या लपोनी ॥
वधियलि विरुपाही काम घेवोनि येता ।
वरुणकरि धरी हा दानदात्या बळीला ॥ १७ ॥
कण जरि कुणि घेतो कीर्ति कानात त्याची ।
नच मग भय त्यासी द्वंद्वही ते तुटे की ॥
भरति उदर ते की पक्षियांच्या समान ।
मधु अति रस त्याचा नाद ना तो सुटे की ॥ १८ ॥
सुमधुर गति गाता गुंतते ती मृगी जै ।
गति स्तशि मम झाली बोलता गोष्टि गोड ॥
नझ जरि हरि टोची कामव्याधी गमे ती ।
नच वदु मुळि त्याते बोल ते शब्द अन्य ॥ १९ ॥
प्रियतम हरिमित्रा जाउनी ये पुन्हा तू ।
मग अम्हि समजू की कृष्ण तो धाडि तू ते ॥
परि पदि रिघतो तो ना निघे तो फिरोनी ।
अम्हि जर पदि जातो साहि ना ती रमा की ॥ २० ॥
मधुपरि हरि कैसा मोदितो हा न तैसा ।
गुरुकुल त्यजुनीया पातला तो कधी की ॥
कधि तरि स्मरतो का नंद गोपादि आम्हा ।
वद वद मज भृंगा ठेवि का डोइ हात ॥ २१ ॥
उद्धव म्हणाला -
अनुष्टुप्
परीक्षित् गोपि अस्वस्थ कृष्णाच्या दर्शनार्थ की ।
ऐकता उद्धवे त्यांचे केले सांत्वन ते बहू ॥ २२ ॥
गोपिंनो आज मी धन्य पूजनीय तुम्ही जगा ।
तुम्ही तो कृष्णदेवाला प्राण सर्वस्व अर्पिले ॥ २३ ॥
दान व्रत तपो यज्ञ जप ध्यान समाधिही ।
कल्याणकारि त्या कर्मे प्रयत्न भक्तिचा असे ॥ २४ ॥
भाग्याची गोष्ट ही श्रेष्ठ कृष्णाची प्रेमभक्ती ती ।
साधुनी दाविला मार्ग न गावे ऋषिसीहि जो ॥ २५ ॥
खरेच भागय हे आहे पति पुत्र नि देह हा ।
स्वजनो घर सोडोनी कृष्ण तो वरिला पती ॥ २६ ॥
गोपिंनो विरहा मध्ये ईंद्रियातीत भाव तो ।
साधिला, सर्व वस्तूत पाहता कृष्णरूप ते ।
तो भाव मजला झाला दया ती तुमची असे ॥ २७ ॥
गुप्तसंदेश स्वामीचा देण्या मी पातलो इथे ।
कृष्णसंदेश तो ऐसा सांगतो ऐकणे तुम्ही ॥ २८ ॥
भगवान् श्रीकृष्णाने सांगितले की -
सर्वात राहतो मी नी आत्मा सर्वात मी असे ।
वियोग न सहे तेणे, सर्व वस्तूत मी वसे ।
माझ्यात सर्व त्या वस्तू त्या रूपे सत्य मी दिसे ॥ २९ ॥
इंद्रीय विषया भूता आश्रयो मीचि तो असे ।
रचितो रूप मी माझे पोषितो लीन होतसे ॥ ३० ॥
आत्मा माया नि ते कर्म वेगळे शुद्ध सर्वथा ।
गुणांचा स्पर्श ना त्यांना माया त्रीरुपिणी गुणी ॥ ३१ ॥
इंद्रीय विषयो सारे स्वप्नवत् मानणे जिवे ।
रोधावे विषयी चित्त साक्षात्कारे मला पहा ॥ ३२ ॥
नद्या जै सगळ्या जाती सागरा अंती मेळुनी ।
तपादी सर्व तै धर्म मलाच मिळती पुन्हा ॥ ३३ ॥
ध्रुव मी तुमच्या नेत्रा राहतो दूर मी असा ।
तेणे तुम्हा घडे ध्यान असेचि चित्त ठेविणे ॥ ३४ ॥
दूर प्रीय असे तेंव्हा प्रेमिका प्रेम वाढते ।
समोर असता तैसे न वाढे प्रेम ते मनी ॥ ३५ ॥
अशेष वृत्ति ठेवोनी मजसी चित्त ठेविणे ।
शीघ्र तै मज गोपिंनो सदाच्या मिळताल की ॥ ३६ ॥
रासक्रीडेस ज्या गोपी येऊ ना शकल्या तदा ।
स्मरता मजला त्याही चित्ताने मिळल्या पहा ॥ ३७ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
कृष्णसंदेश ऐकोनी गोपिंना हर्ष जाहला ।
रूप लीला स्मरोनीया प्रेमाने पुसती पुन्हा ॥ ३८ ॥
गोपिका म्हणाल्या -
भाग्यची ! मारिला कंस यदुंना त्रासिले जये ।
आता ते सुखि हो सर्व आनंद त्यातही अम्हा ॥ ३९ ॥
उद्धवा सांगणे हेही आम्ही कृष्णासि प्रेमिले ।
आता तेथील त्या स्त्रीया हरीला प्रेमितात का ॥ ४० ॥
प्रेमतज्ञ असा कृष्ण न वशे कोण त्याजला ।
पदासी कोणिही येता हरि तो प्रेम अर्पितो ॥ ४१ ॥
वदली तिसरी कोनी साधू सांगा अम्हा तसे ।
स्त्रियांत बोलता कृष्ण स्मरतो कां कधी अम्हा ॥ ४२ ॥
( वसंततिलका )
रात्री कधी हरि अम्हा स्मरतो मनीं का
त्या चांदण्यात फुलता कळे जळीची ।
रासक्रीडेत रमला हरि आमुच्यात
गावोनि गोपिसह तो बहु नाचला की ॥ ४३ ॥
( अनुष्टुप् )
वदली आणखी कोणी विरहे जळतो अम्ही ।
चंद्रस्पर्शे तृणा जीव तसा स्पर्शील का हरी ॥ ४४ ॥
वदे दुजी सखे त्याने शत्रूचे राज्य घेतले ।
वरिती राजकन्या त्या कशास येइ तो इथे ॥ ४५ ॥
वदे कुणी हरी तृप्त स्वयं तो लक्षुमीपती ।
कोणाशी काम ना त्याचे आडतो काय तो कुठे ॥ ४६ ॥
पिंगला वदते वेश्या अशा त्यागात सौख्य ते ।
सुटेना हरिची आशा त्यात धन्यचि जीव हे ॥ ४७ ॥
संत गाती जया नित्य बोले एकांति तो अम्हा ।
क्षण ना लक्षुमी त्यागी त्यां कैसा त्यजु गे अम्ही ॥ ४८ ॥
उद्धवा ही नदी येथे पोहला कृष्ण तो इथे ।
फिरला धेनु चाराया वन हे समिपी असे ॥
रासक्रीडा करी रात्री येथोनी येइ जाइ तो ।
ओठांनी वाजवी वेणू आथवे सर्व सर्व ते ॥ ४९ ॥
पदचिन्ह इथे त्याचे धुळीत शोभले बहु ।
नित्य तो आठवे आम्हा विसरू आम्हि तो कसा ॥ ५० ॥
हंसाच्या परि तो चाले मधूर शब्द हास्य ते ।
कृष्णाने चोरिले चित्त विसरू आम्हि तो कसा ॥ ५१ ॥
स्वामी तू प्रीय कृष्णारे रमानाथ जरीहि तू ।
आमुचा एक तू स्वामी गायी आम्हास रक्ष तू ॥ ५२ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
कृष्ण संदेश ऐकोनी गोपी त्या शांत जाहल्या ।
आत्म्यात पाहिला कृष्ण उद्धवा तै प्रशंसिले ॥ ५३ ॥
गोपिंचे दुःख वाराया राहिले कैक मास तै ।
कृष्णाच्या सांगुनी लीला व्रजिंना मोद तो दिला ॥ ५४ ॥
जेवढे दिन ते तेथे कृष्णलीलेस सांगता ।
राहिले उद्धवो तेथे व्रजिंना क्षण भासला ॥ ५५ ॥
उद्धवो हरिभक्तो ते कधी जात नदीतिरी ।
वनीं गिरी कधी जाती रमती पुष्प पाहुनी ।
व्रजिंना नित्य ते देती कृष्णाचे स्मरणो तसे ॥ ५६ ॥
गोपिंचे पाहिले प्रेम कृष्णतन्मयता अशी ।
आनंद उद्धवा झाला गोपीस वंदुनी वदे ॥ ५७ ॥
( वसंततिलका )
गोपीत प्रीत धरिसी बरवी हरी तू
हे उच्च प्रेम न मिळे तपियास ऐसे ।
गोविंदप्रेम मिळता मग यज्ञि काय
ब्रह्मीतनूहि मिळता हरिवीण व्यर्थ ॥ ५८ ॥
कोठे हरी नि वनजा हरिप्रेम कोठे
येणेचि सिद्धि घडते हरिप्रेम व्हावे ।
तेणेचि पावुनि करी मग भद्र सारे
पीता चुकून रस हा मग मृत्यु कैसा ॥ ५९ ॥
गोपीस तो करितसे बहु प्रेम रासीं
यांच्या परी न करितो कधि प्रीत श्रीसी ।
देवांगनास मग ते मिळते कुठून
अन्यस्त्रियास नच हा करणे विचार ॥ ६० ॥
वृंदावनात मज हो तरु वेलि जन्म
व्रजांगनापदधुळे मह स्नान व्हावे ।
सोडोनि सर्व हरिशी मन अर्पिती या
ते प्रेम रूप न गवे श्रुति आदिकांना ॥ ६१ ॥
लक्ष्मीस देव पुजिती शिव विप्रदेव
ती सेविते हरिपदा नित सर्वभावे ।
ते पाय गोपि धरिती स्तनि आपुल्या की
आलिंगुनी करिती शांत व्यथा जिवाची ॥ ६२ ॥
( अनुष्टुप् )
नंदव्रजस्त्रियांच्या मी वंदितो पदधूळिसी ।
कृष्णाच्या गाति त्या लीला त्रिलोकात पवित्र की ॥ ६३ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
यशोदा नंदबाबांना गोपिंनाही विचारुनी ।
देता निरोप गोपांना जाण्यास रथि बैसले ॥ ६४ ॥
व्रजा बाहेर येताची नंदे गोपे सअश्रुने ।
उद्धवा बोलता प्रेमे भेटवस्तूहि अर्पिल्या ॥ ६५ ॥
उद्धवा सर्व या वृती कृष्णपदाश्रितोचि हो ।
गावो वाणी नमो देह आज्ञापालनही घडो ॥ ६६ ॥
खरेचि सांगतो ऐका मोक्षा आम्ही न इच्छितो ।
लाभो जन्म कुठेही तो शुद्ध राहोनि दान ते ।
करोत, फळ हो त्याचे वाढवी कृष्णभक्ति ही ॥ ६७ ॥
परीक्षित् नंद गोपांनी दिला सत्कार उद्धवा ।
आता ते कृष्ण कृपेने मथुरापुरि लोटले ॥ ६८ ॥
पोचता वंदिले कृष्णा व्रजिंची प्रेमभक्ति ती ।
वदले सर्वच्या सर्व भक्ति उद्रेक सर्व तो ।
वसुदेव बळिरामा भेट वस्तुहि अर्पिल्या ॥ ६९ ॥