समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ३९ वा

श्रीकृष्ण बलरामाचे मथुरागमन -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

( अनुष्टुप् )
श्रीशुकदेव सांगतात -
वाटेने चिंतिले तैसा कृष्ण नी बलरामने ।
केलासे बहु सन्मान शय्यी अक्रूर बैसले ॥ १ ॥
लक्षुमी आश्रये ज्याच्या काय तो देउ ना शके ।
तरीही हरिचे भक्त नेच्छिती कांहि वस्तु त्या ॥ २ ॥
कृष्णाने जेवणे होता पुसले कंसवर्तन ।
पुसे क्षेम स्वलोकाचे योजनाही विचारिल्या ॥ ३ ॥
श्री भगवान् म्हणाले -
काका मंगल हो सारे प्रवासी कष्टलात कां ।
मथुरी सुहृदो तैसे घरचे सुखरूप का ? ॥ ४ ॥
नामे मामा कुलांगार कुळाची व्याधि तो असे ।
तयाच्या नगरीचे ते क्षेम काय पुसो अम्ही ॥ ५ ॥
माझ्या मुळे तसे काका पितरां कंस त्रासितो ।
वाटतो खेद तो चित्ती बांधोनी ठेवि दुष्ट तो ॥ ६ ॥
रोज मी पाहिली वाट स्वजना भेटण्यास की ।
भाग्याने भेटले तुम्ही येण्याचा हेतु सांगणे ॥ ७ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
कृष्णाने पुसता ऐसे वदले कंसवैर ते ।
वाढले यदुवंशासी पित्याला मारु इच्छितो ॥ ८ ॥
कंससंदेश सारा नी नारदाचे भविष्य ते ।
अक्रूरे सर्व ते तैसे कथिले कृष्णजीस की ॥ ९ ॥
ऐकता हासले बंधू विपक्षदमनो द्वय ।
पिता नंदास कंसाची आज्ञा ती वदले पहा ॥ १० ॥
तदा त्या नंदबाबाने आज्ञा गोपास ती दिली ।
गोरसा करणे एक जाण्या जाड्याहि जुंपिणे ॥ ११ ॥
सकाळी मथुरी जाऊ कंसा गोरस देउ हे ।
दवंडी पिटली ग्रामीं उत्सवा मथुरीं चला ॥ १२ ॥
अक्रूर कृष्ण रामाला आले नेण्या मथूरिसी ।
कळता गोपिका दुःखी व्याकूळ जाहल्या तदा ॥ १३ ॥
पोळल्या उष्णश्वासाने सुकली मुखपद्म ती ।
दुःखाने हारपे शुद्ध केश वस्त्रा न लक्षची ॥ १४ ॥
भगवान् ध्यायिता चित्ती आत्मरूपी स्थिरावल्या ।
सांसार नाठवे त्यांना निवृत्त चित्ति जाहल्या ॥ १५ ॥
गाती नी नाचती गोपी हासुनी कृष्णगीत ते ।
तल्लीन नाचता झाल्या मोहीत गायनी तशा ॥ १६ ॥
लटकी हरिची चाल हासणे प्रेमयुक्त ते ।
मनात चिंतिती गोपी विरहे कांपरे भरे ॥ १७ ॥
कृष्णार्पण अशी बुद्धी तयांचा प्राण कृष्ण तो ।
आसू ते वाहिले नेत्री जमोनी गोपि बोलती ॥ १८ ॥
( इंद्रवज्रा )
गोपिका म्हणाल्या -
अरे विधात्या तुजला दया ना
     तू जोडिशी लोकचि प्रेम भावे ।
अतृप्त त्यांना तुचि तोडिशी रे
     हा खेळ सारा लटका तुझा की ॥ १९ ॥
देवा किती हे बहू दुःख आहे
     तू दाविला श्याम प्रियो अम्हाला ।
कपाळि ज्याच्या कुरुळेच केस
     नी पोवळ्याच्या परि लालि गाली ॥
ते सुंदरो नाक नि हास्य तैसे
     क्षणात नष्टे शिण भार सारा ।
ऐशा मुखाते तुचि दाविले नी
     नी आज नेशी ययि दृष्टि आड ॥ २० ॥
अक्रूर दोषी मुळि ना ययात
     ही क्रूरता तो तव मूर्खतेची ।
कृष्णात सृष्टी अम्हि पाहतो की
     हे कृत्य ऐसे नच तू करावे ॥ २१ ॥
चटावला हा बहु प्रेम देण्या
     क्षणात संपे बहु प्रेम त्याचे ।
सोडोनि आलो घरदार सारे
     शोकात आम्हा नच पाहि कृष्ण ॥ २२ ॥
ही आजची मंगल सुप्रभात
     मथूरिच्या त्या तरुणी स्त्रियांना ।
पूर्तील इच्छा बहुता दिनीच्या
     पाहील त्यांना मिचकोनि नेत्र ।
नी मंदहास्ये मुखिच्या मधाला
     वाटोनि जाई मथुरा पुरात ।
नी त्या स्त्रिया हे मधुपान पीता
     होतील तृप्तो बहु मोदिताही ॥ २३ ॥
आज्ञेत श्यामो गुरुनी पित्याच्या
     तरी हि त्याला भळतील नारीं ।
सलज्ज हास्ये हरि हा भुलेल
     कशास येई मग गोपि मध्ये ॥ २४ ॥
ते आज धन्यो मथुरेस लोक
     दाशार्ह भोजांधक यादवो नी ।
वृष्णी कुळीचे हरि पाहतील
     होतील मार्गी मग तृप्त सारे ॥ २५ ॥
पहा सखे अक्रूर निर्दयी हा
     श्री नंदलाला बघ दूर नेई ।
न धीर देई नच बोलतो की
     अक्रूर ऐस नच या म्हणावे ॥ २६ ॥
हा श्याम तैसा बहु निष्ठुरो की
     पहा पहा तो रथिं बैसला की ।
हे मत्त गोपो पळवीति गाड्या
     जा जा मना येइल ते करावे ॥ २७ ॥
धावा पळा गे धरु कृष्ण सार्‍या
     पाहोत वृद्धो करतील काय ।
क्षणो न साहे हरिच्या विना हा
     दुर्भाग्य आले अनि या नशीबी ॥ २८ ॥
( वसंततिलका )
त्या प्रेमहास्यि वदता बहु गोष्टि गोड
     आलिंगनी नि रसक्रीडत रात्र गेली ।
मोठीच रात्र असुनी क्षण भासली ती
     साहेल का विरह हा मग या मनाला ॥ २९ ॥
संध्येसि तो प्रतिदिनी परतोनि येता
     ते हार केश हरिचे धुळिमाखलेले ।
वंशीस तो करि रवो अन हास्य तैसे
     तो पाहता हृदयवेधि, कसे जगावे ॥ ३० ॥
(इंद्रवज्रा )
श्रीशुकदेव सांगतात -
गोपी जरी हे वदतात शब्द
     आलिंगि कृष्णो मनि गोपिकांच्या ।
गोविंद दामोदर माधवारे
     सोडोनि लज्जा रडल्या वदोनी ॥ ३१ ॥
( अनुष्टुप् )
रडता रडता गोपी सरली रात्र ती अशी ।
स्नान संध्या करोनीया अक्रूर रथि बैसले ॥ ३२ ॥
नंदबाबादि गोपांनी गोरसी कुंभ भेटि त्या ।
गाड्यात ठेविल्या पाठी सर्वची चालु लागले ॥ ३३ ॥
त्या वेळी गोपिका कृष्णा पाहोनीच सुखावल्या ।
संदेश ऐकण्या हेते तशाचि राहिल्या उभ्या ॥ ३४ ॥
कृष्णाने पाहिल्या गोपी हृदयी जळती अशा ।
येईन मी अशा शब्दे कृष्णाने धीर तो दिला ॥ ३५ ॥
चित्रवत् राहिल्या गोपी रथाचा ध्वज पाहात ।
दाटली धूळ ती सारी कृष्णासी चित्त धाडिले ॥ ३६ ॥
इच्छिती दूर जावोनी कृष्ण येईल सत्वर ।
न येता दुःखि गेहासी पातल्या गात त्या लीला ॥ ३७ ॥
इकडे बल नी कृष्ण वेगवान् रथि बैसुनी ।
यमुनातिरि ते आले अक्रूरासह सर्वही ॥ ३८ ॥
सर्वांनी धुतले हात सुधावत् जल प्राशिले ।
पुन्हा ते कृष्ण नी रामो रथात बैसले पुन्हा ॥ ३९ ॥
रथीं बैसवुनी त्यांना अक्रूरे त्यां विचारुनी ।
यमुनाकुंडि ते आले विधिवत् स्नान घेतले ॥ ४० ॥
करोनी स्नान त्या कुंडी गायत्री जपण्या पुन्हा ।
घेतली बुडि त्या डोही दिसले राम-कृष्ण तै ॥ ४१ ॥
रथात असुनी दोघे इथे हे पातले कसे ।
पाहती वर येवोनी येई शंका मनीं तदा ॥ ४२ ॥
रथात बैसले होते पूर्ववत् बंधु ते तसे ।
भ्रम हा मानुनी त्यांनी बुडी पाण्यात घेतली ॥ ४३ ॥
तरीही दिसले तेंव्हा अनंत देव शेषजी ।
गंधर्व चारणो सिद्ध झुकोनी स्तुति गात तै ॥ ४४ ॥
हजार फणिचा शेष तेवढे टोप त्यां वरी ।
नीलांबर शरीरासी सहस्रश्वेत जै गिरी ॥ ४५ ॥
अक्रूरे पाहिले हे ही घनश्याम असा हरी ।
शेषाच्या कुशिसी आहे चतुर्भुज पितांबर ।
राजीव लोचने शांत आरक्त दिसले पहा ॥ ४६ ॥
प्रसन्न वदनी हास्य सुडौल नाक भूवया ।
सुंदरो गाल नी कान ओठांना लाल ती छटा ॥ ४७ ॥
आजानबाहु त्या पुष्ट श्रीचिन्ह स्कंध उंच ते ।
त्रगुड्या पिंपळी पोट खोल नाभी सुशोभली ॥ ४८ ॥
शंखाकार अशी मान सुडौल हरिची असे ।
गजशुंडी अशा मांड्या नितंब स्थुळ ते दिसे ॥ ४९ ॥
गुडघे पिंढर्‍या टाचा उभार दिव्य ती नखे ।
बोटे ती चरणाचीया कावळ्या पाकळ्यां परी ॥ ५० ॥
मुकूट मणि रत्‍नांचा कर्धनी हार नूपुरे ।
कडे नी कुंडले तैसे यज्ञोपवित दिव्य ते ॥ ५१ ॥
शंख चक्र गदा पद्म हरिने धारिले करी ।
श्रीवत्सचिन्ह वक्षास कौस्तुभो वनमाळही ॥ ५२ ॥
सुनंद नंद हे दोघे सनकादिक संत ते ।
ब्रह्मा सर्वेश्वरो रूद्र महर्षी नी प्रजापती ॥ ५३ ॥
प्रह्लाद नारदो दोघे आथीही वसुस्वामि हा ।
निर्दोष वेदवाणीने गात तैं स्तोत्र गाउनी ॥ ५४ ॥
श्रिया पुष्टी गिरा कांती कीर्तीऽला तुष्टि नी इला ।
ल्हादिनी संविती माया मूर्तिमान् सेविती हरी ॥ ५५ ॥
हृदयी हर्ष ना मावे शोभाही पाहता अशी ।
भक्तिने हर्षले अंग प्रेमाने अश्रु पातले ॥ ५६ ॥
अक्रूरे धैर्य मेळोनी चरणीं त्यां प्रणामिला ।
सगद्‌गद अशा शब्दे भगवत् स्तुति गायिली ॥ ५७ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर एकोणचाळिसावा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP