समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ३३ वा

महारास -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

( अनुष्टुप् )
श्रीशुकदेव सांगतात -
ऐकता भगवत्‌शब्द गोपिंचा शेष तापही ।
मिटता अंगसंगाने साफल्य जाहले असे ॥ १ ॥
फेरतो धरिला त्यांनी हातात हात घालुनी ।
स्त्रीरत्‍नांसह तो कृष्ण रमला क्रीडता तिथे ॥ २ ॥
प्रत्येक गोपिच्या मध्ये श्रीयोगेश्वर राहिला ।
दिधले हात हातात सर्वांना आपुला गमे ॥ ३ ॥
रासोत्सव सुरू झाला मध्ये कृष्ण विराजला ।
विमाने घेउनी देव सपत्‍न पातले तिथे ।
पहाया रासक्रीडेते न शुद्ध राहिली तया ॥ ४ ॥
फुलांची वृष्टी ही झाली दुंदुभी झडल्या वरी ।
गंधर्वे गायिली गाणी सपत्‍न हरिकीर्तने ॥ ५ ॥
कृष्णाच्या सह त्या गोपी नाचल्या रासमंडली ।
वाजली कंकणे चाळ मधूर शब्द जाहले ॥ ६ ॥
यमुनावाळवंटात अनोखा हर्ष जाहला ।
जणू सोन्यांचिये माळी नीलरत्‍न सुशोभले ॥ ७ ॥
( मंदाक्रांता )
पादान्यासे ठुमकत बहू गोपिका नाचताना ।
     वेगाने नी हळुच कधि त्या टाकिती पावलांना ॥
हाताने त्या उभवुनि कधि दाविती भाव सारा ।
     हासोनीया बघति भुवया उंचिती ढंग प्रेमे ॥
नृत्यामध्ये कमर तुटते वाटल्या कृश ऐशा ।
     स्फूर्तीमध्ये हलति स्तन ते बैसता ऊठताना ॥
वस्त्रे ही ते उडति हलती कर्णि ती कुंडले की ।
     नाचे नाचो थकुनि मग त्यां घाम येई कपाळा ॥
वेण्या नाड्या सुटुही बघती नाचता गोपि गीते ।
     गाती ऐशा प्रियसखि हरी नंदलाल प्रियाला ॥
श्यामो कृष्णो ढगचि जणु तो गोपिका त्या विजा की ।
     शोभा ऐशी असिम गमली वाळवंटी तटासी ॥ ८ ॥
( अनुष्टुप )
नाचता रत त्या गोपी गाती कृष्णास खेटुनी ।
आनंदे गायिल्या राग आजही नाद येतसे ॥ ९ ॥
कृष्णशब्दात शब्दांना मेळोनी गायल्या कुणी ।
वाहवा बोलतो शब्द् कोणी धृवपदा धरी ॥ १० ॥
नाचता थकली एक वेणीची गळली फुले
बाहूत धरि तैं कृष्ण खांदे दोन्ही धरूनिया ॥ ११ ॥
कृष्णाने दुसरा हात दुजीच्या स्कंधि ठेविला ।
चंदनीगंध तो हात गोपीने चुंबिला असे ॥ १२ ॥
थकता एक ती गोपी कृष्णगालास गाल तो ।
लाविता चाविल्या पाना मुखात देतसे तिच्या ॥ १३ ॥
कर्धनी नुपुरींनादे गोपी त्या नाच नाचता ।
थकता हरि तो हात ठेवितो दोन्हि त्या स्तनी ॥ १४ ॥
श्रीहुनी भाग्य गोपींचे एकांती कृष्ण गातसे ।
गळ्यात घातला हात सर्व त्या धन्य जाहल्या ॥ १५ ॥
( वसंततिलका )
लक्ष्मीहुनीहि बहु भाग्यचि गोपिकांचे
     कृष्णास प्रीय बघुनी रमती नि गाती ।
भाळास केश कुरुळे अन घर्मथेंब
     गातात भृंग गळती फुलं वेणिची ती ॥ १६ ॥
( इंद्रवज्रा )
त्या सावलीसी जयि बाळ खेळे
     गोपी तशा आवळिती तयाला ।
हासोनि पाही तिरक्याच नेत्रे
     गोपिंसवे तो क्रिडला हरी की ॥ १७ ॥
त्या अंगस्पर्शे विव्हळोनि गेल्या
     वेण्या सुटोनी गळली फुले की ।
केसां नि वस्त्रा अन कंचुकीला
     सांभाळण्याला नच भान राही ॥ १८ ॥
( अनुष्टुप् )
पाहता इच्छिती भोग स्वर्गीच्या देव‍अंगना ।
पाहता चंद्रमा तारे विस्मीत जाहले तदा ॥ १९ ॥
आत्माराम असा कृष्ण आसक्ती त्याजला नसे ।
जेवढ्या गोपि त्या होत्या तेवढी घेतली रुपे ॥ २० ॥
थकता गोपि त्या सर्व करुणामय कृष्णने ।
हाताने मुख ते त्यांचे प्रेमाने पुसले पहा ॥ २१ ॥
( वसंततिलका )
आनंदल्या बहूहि तो नखस्पर्श होता
     ती कुंडले चमकली बहु केशभागी ।
त्या प्रेमहास्यि विरल्या बहुमान होता
     नी गायिल्या बहुतही हरिकीर्ति तेंव्हा ॥ २२ ॥
हत्ती जसा घुसतसे जळि त्या तळ्यात
     क्रीडावयास हरि तै यमुनी जळात ।
गेला घुसोनि भिजली वनमाळ त्याची
     जी थोडिशी सुकलिसे रगड्यात त्यांच्या ॥ २३ ॥
फेकोनि खूप जल ते हरि न्हाविला त्या
     गोपीस वृष्टि कुसुमी करितात देव ।
गाती विमानी हरिचे गुणगान तैसे
     कृष्णो गजापरिच तै जलि क्रीडला की ॥ २४ ॥
( इंद्रवज्रा )
गर्दीत गोपी अन भृंग यांच्या
     आला तटासी मग कृष्णदेव ।
गलीं स्थलीं गंधित पुष्प होती
     क्रीडे हरी जै गज हत्तिणीसी ॥ २५ ॥
ही शोभली रात्र शरद्‍ऋतूची
     काव्यात येती जशि वर्णने ती ।
तै चांदणे तेथ क्रिडे हरी तो
     स्वकामरूपीं हरि बंदि होय ॥ २६ ॥
( अनुष्टुप् ) राजा परीक्षिताने विचारले -
एक स्वामी जगा कृष्ण अंशे तो बलरामही ।
उद्देध धर्म स्थापावा नसावा तो अधर्म की ॥ २७ ॥
द्विज हो ! धर्ममर्यादा करणारा स्वयं हरि ।
मग त्या परस्त्रीयांना तयाने स्पर्शिले कसे ॥ २८ ॥
मानितो पूर्ण कामी तो निष्काम तरिही कसे ।
निंदनीय असे कर्म का केले कृपया वदा ॥ २९ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
ईश नी सूर्य अग्नी हे धर्म आज्ञाहि लंघिती ।
तेजाने दोष ना त्यांना जै अग्नी दोष मुक्तची ॥ ३० ॥
सामर्थ्य नसता तैसे चित्ती ते स्मरुही नये ।
मूर्खत्वे नाश तो होय हलाहल पियी शिव ॥ ३१ ॥
शिवादी ईश्वरो त्यांचा बोध जै वागणे तसे ।
आचार करणे त्यांचा सर्वथैव अशक्यची ॥ ३२ ॥
अहंकार नसे त्यांना न स्वार्थ मुळि त्याजला ।
अनर्थ न घडे त्यांच्या वर्तने कधिही तसा ॥ ३३ ॥
पशूपक्षी मनुष्यांचा प्रभू एकचि तो हरी ।
मानवी मापदंडाने मोजणे शक्य हे कसे ॥ ३४ ॥
( वसंततिलका )
ती पायधूळ हरिची भजकास तृप्ती
     योग्यासि धान्य् मिळते पद सिद्ध मुक्ती ।
भक्तार्थ तो हरिही ये प्रगटोनि रूपी
     त्यां कर्मबंध कसले नच कल्पना हो ॥ ३५ ॥
( अनुष्टुप् )
गोप गोपी नि जीवांचा आंतरात्मा महापती ।
तो दिव्य चिन्मयी रूपे लीला या करितो अशा ॥ ३६ ॥
मनुष्यरूप तो घेतो कृपा ती करण्या जिवां ।
ज्या लीला ऐकता जीव भगवत् भक्त होतसे ॥ ३७ ॥
मुळीच नव्हती गोपा हरिसी दोषबुद्धि ती ।
योगमाये तयां वाटे आपणा पाशि पत्‍नि ही ॥ ३८ ॥
ब्रह्मरात्र अशी गेली मुहूर्त ब्राह्म पातले ।
कृष्णाज्ञे पातल्या गेही संकल्पे इच्छिती हरी ॥ ३९ ॥
( वसंततिलका )
विक्रीडती व्रजवधू हरिच्याच ध्यानी
     ऐके तयास मिळते हरिभक्ति शुद्ध ।
नी शुद्धची हृदय हो अन मुक्ति कामीं
     कामस्वभाव जळतो अशि ही लिला की ॥ ४० ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर तेहेतिसावा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP