समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध ९ वा - अध्याय २४ वा
विदर्भाच्या वंशाचे वर्णन -
श्रीशुकदेव सांगतात -
(अनुष्टुप्)
भोज्यापोटी विदर्भाला रोमपाद कुश क्रथ ।
रोमपाद यया वंशी कैक श्रेष्ठचि जन्मले ॥१॥
त्याच्या बभ्रूस कृति नी कृतीच्या उशकास तो ।
चेदि जो याच वंशात शिशुपालादि जन्मले ॥२॥
क्रथाचा पुत्र तो कुंती त्याच्या धृष्टीस निवृत्ती ।
तयाचा तो दशर्होनी दशार्हा व्योम जाहला ॥३॥
व्योमाच्या जिमुतां झाला विकृती त्याजला पुढे ।
भीमरथ्या नवरथो त्याचा दशरथो पहा ॥४॥
दशरथा शकूनी नी त्याच्या करंभिला पुढे ।
देवरात देवक्षेत्र ययाचा मधु तो असे ॥
मधुचा तो कुरुवशो ययाला अनु जाहला ॥५॥
अनूचा तो पुरूहोत्र तयाच्या आयुला पुढे ।
सात्वतो जाहला पुत्र सात्वता सात पुत्र ते ॥६॥
भजमान भजी दिव्य वृष्णी देवावृधो तसे ।
अंधको नि महाभोजो भजमानास पत्नि दो ॥७॥
निम्लोची किंकिणो धृष्टी एकीचे दुजिचे पहा ।
शतजित् नी सहस्राजित् तिसरा अयुती जित ॥८॥
देवधृतास बभ्रू तो याचे संबंधि सांगती ।
आम्ही ते ऐकिले कानी समक्ष बघतो अता ॥९॥
मानवी बभ्रू तो श्रेष्ठ देवावृधचि दैवतो ।
चौदाहजार पासष्ट लोकांना उपदेशुनी ॥१०॥
केले मुक्त यये दोघे सात्वाचा पुत्रही तसा ।
धर्मात्मा याच वंशात भोजी यादव जन्मले ॥११॥
परीक्षित् वृष्णिचे पुत्र सुमित्रो नी युधाजित ।
अनमित्र शिनी दोघे पुत्र हे त्या युधाजिता ॥
अनमित्रासि तो पुत्र निम्न हा जाहला असे ॥१२॥
सत्राजितो प्रसेनो हे निम्नाचे पुत्र की द्वय ।
अनमित्रा शिनी झाला त्याला सत्यक पुत्र तो ॥१३॥
सत्यकीचा युयूधानो सात्यकी हेहि नाम त्यां ।
त्याच्या जयास कुणि नी कुणीचा तो युगंधर ॥१४॥
वृष्णीला अनमित्राच्या श्वफल्क आणि चित्ररथ् ।
श्वफल्का गांदिनीपत्नी तिचा अक्रूर अन्य ते ॥१५॥
आसंग सारमेयो नी मृदुरो मृदुविद् गिरी ।
धर्मवृद्ध सुकर्मा नी क्षेत्रोपेक्षरिमर्दन ॥१६॥
गंधमादन शत्रुघ्न प्रतिबाहू तयात ती ।
सुचिरा भगिनी झाली अक्रूरा दोन पुत्र ते ॥१७॥
देववान् उपदेवो हे चित्ररथास ते पृथु ।
विदुरथो तसे कैक पुत्रही जाहले तया ॥१८॥
अंधका सात्वताच्या त्या कुकुरो भजमान् शुची ।
कंबल्बर्हि यया मध्ये कुकुरा वन्हि जाहला ॥
वन्हिच्या त्या विलोमाच्या कपात्रोमास तो अनू ॥१९॥
अनूची मित्रता होता गंधर्व तुंबरादिका ।
अनुच्या अंधको पुत्रा दुदुंभी जाहला असे ॥
दुदुंभीला अरिद्योत तयाचा तो पुनर्वसू ॥२०॥
ययाला आहुको पुत्र देववान् उपदेव नी ।
आहुका उग्रसेनोनी देववान् उपदेव नी ॥२१॥
देववर्धन सूदोवो भगिनी सात यांजला ।
शांतिदेवा धृतादेवा श्रीदेवा देवरक्षिता ॥२२॥
उपदेवा सहदेवा देवकी सातवी असे ।
वसुदेवे अशा साती वरिल्या भगिनी पहा ॥२३॥
कंस सुनामा न्यग्रोध्र कंक शंकू सुहू तसे ।
सृष्टी नी राष्ट्र पालो नी तुष्टिमान् उग्रसेनचे ॥२४॥
कंसा कंसवती कंका शूरभू राष्ट्रपालिका ।
पुत्री या उग्रसेनाच्या वरिल्या देवभागने ॥२५॥
विदुरथा शूर हा पुत्र शूरा भजमान् तो ।
शूराच्या निशिच्या राजा स्वयंभोजासि तो हृदिक् ॥२६॥
देवबाहू शतधन्वा कृतवर्मा तिघे पुढे ।
देवमीढास तो शूर मारिषा पत्नि त्याजला ॥२७॥
तयाने मारिषागर्भी निष्पाप पुत्र निर्मिले ।
वसुदेवो देवभाग देवश्रवा नि आनको ॥
संजयो श्यामको कंक शमिको वत्सको वृक ॥२८॥
पुण्यात्मे सर्व हे होते जन्मता वसुदेव तो ।
नगारे झडले स्वर्गी आनक्दुदूंभि नाम तै ॥
श्रीकृष्णाचा पिता हाची बहिणी पाच याजला ॥२९॥
कुंती आणि श्रुतदेवा शुतकीर्ती श्रुतश्रवा ।
राजाधिदेवि ह्या ऐशा शूरसेनास मित्र तो ॥३०॥
कुंतीभोज निसंतान म्हणोनी कुंति ही तये ।
ओटित घेतली आणि मानिली पुत्रि आपुली ॥३१॥
दुर्वासा कडुनी विद्या देवता बोलवायच्या ।
पृथा ती शिकली तेंव्हा सूर्याला बोलवीयले ॥३२॥
भगवान् सूर्य ते आले कुंती विस्मय पावली ।
वदली पाहण्या विद्या केले तेंव्हा क्षमा करा ॥३३॥
पृथूला वदले सूर्य नच दर्शन निष्फळ ।
सुंदरी तुजला पुत्र देतो योनी न दोषिता ॥३४॥
वदता स्थापिला गर्भ गेले स्वर्गात सूर्य ते ।
तेजस्वी जाहला पुत्र जणू सूर्य असा दुजा ॥३५॥
पृथाने लोकनिंद्यर्थ जळात पुत्र सोडिला ।
पणजोबा पंडू वीरे पृथा त्यांनी वरीयली ॥३६॥
परीक्षित् ! पृथुची सान बहीण श्रुतदेविचा ।
विवाह करूषी राजा वृद्धशर्मासि जाहला ॥
वक्रदंत तया झाला दितिपुत्रचि पूर्वीचा ॥३७॥
श्रुतकीर्ति वरी राजा केकयी धृष्टकेतु तो ।
संतर्दनादि ते पाच केकया पुत्र जाहले ॥३८॥
राजाधिदेवि नी राजा जयसेनास पुत्र दो ।
अनुविंद तसा विंद अवंती नृपती द्वय ॥
चेदिराज दमघोषे वरिली ती श्रुतश्रवा ॥३९॥
शिशुपाल यया पुत्र वर्णिला स्कंधि सातव्या ।
कंसा नी देवभागो यां चित्रकेतू बृहद्बलो ॥४०॥
सुविरो इषुमान् झाले देवाश्रवास पत्नि जी ।
कंसावती मुळे दोघे आनका पत्नि कंकच्या ॥
उदरी सत्यजित् आणि पुरुजीतहि जाहला ॥४१॥
सृंजये आपुल्या पत्नीगर्भात राष्ट्र पालिका ।
वृष दुर्मण इत्यादी पुत्र ते जन्मिले पहा ॥
श्यामके शूरभू गर्भी दोनपुत्रहि निर्मिले ।
हरीकेश हिरण्याक्ष दोघांचे नाव हे असे ॥४२॥
मिश्रका अप्सरा गर्भी वत्सको त्यां वृकादिक ।
वृके दुर्वास गर्भाने तक्ष पुष्कर शाल हे ॥४३॥
शमिका धर्मपत्नी जी सुदामीनी हिला पुढे ।
सुमित्रार्जुनपालादी जन्मिले पुत्र ते पहा ॥
कंकाच्या कर्णिकापोटी ऋतधाम नि तो जय ॥४४॥
पौरवी रोहिणी भद्रा मदिरा रोचना इला ।
देवकी आदि त्या पत्न्या वसुदेवास त्या अशा ॥४५॥
रोहिणीचे बलरामो गद सारण दुर्मद ।
विपुलो कृत नी ध्रुव आणीक तिजला पहा ॥४६॥
पौरवी उदरी झाले बारापुत्र असेच की ।
सुभद्रो भद्रवाहो नी भूतदुर्मद भूत ते ॥४७॥
मदिराचे उपनंद नंद नी कृतकादिक ।
कौसल्या गर्भिचा एक केशी हा जन्मला असे ॥४८॥
केशीच्या रोचना गर्भी हस्त हेमांगदादि ते ।
उरूवल्क इलागर्भी प्रधान यदुवंशि ही ॥४९॥
परीक्षित् वसुदेवाला विपृष्ठ धृतदेविचा ।
शांतिदेवा हिला झाले श्रम आदि प्रतिश्रुत ॥५०॥
कल्प वर्षादिते राजे उपदेवास ते दहा ।
वसू हंस सुवंशादी श्रीदेवाचे सहा पहा ॥५१॥
त्या देवरक्षितागर्भी गदादि नवु पुत्र ते ।
पुरुविश्रुत इत्यादी आठ त्या सहदेविला ॥५२॥
उदार वसुदेवाने देवकी गर्भि आठ ते ।
वसू आठ जसे धर्मे जन्मिले तैचि हे पहा ॥५३॥
कीर्तिमान सुषेणो नी भद्रसेन ऋजु तसे ।
संवर्धन तसा भद्र शेषावतार तो बलो ॥५४॥
त्या दोघा आठवा पुत्र भगवान् जन्मले स्वये ।
भाग्यवती सुभद्रा ती आजी जी पुत्रि यास ती ॥५५॥
धर्माचा र्हास हो जेंव्हा पापाची वृद्धि होतसे ।
शक्तिमान् भगवान् तेंव्हा स्वयेंचि जन्म घेतसे ॥५६॥
द्रष्टा असंग आत्मा तो माया ती आत्मरूपिणी ।
योगमाया विना कांही न जन्म कर्म त्याजला ॥५७॥
मायेचा खेळ हा त्याचा जन्म जीवन मृत्युचा ।
मायेला सारिता मागे दर्शनो आत्मरूप ते ॥५८॥
असूर जाहले राजे सैन्य अक्षौहिणी किती ।
जमवोनी धुमाकूळ घातला पृथिवीवरी ॥
भार तो उतरायाते स्वये श्रीमधुसूदन ॥५९॥
बलरामा सवे आला घेवोनी अवतार तै ।
अद्भूत घडवी लीला देवांना अनुमान ना ॥
मनाने करिता येते तेंव्हा देहा कसा कळे ॥६०॥
धरेचा उतरी भार भक्तासी बोध देउनी ।
विस्तारी यश ते ऐसे गाता दुःखचि संपते ॥६१॥
पवित्र यश ते त्याचे पवित्र श्रेष्ठ तीर्थची ।
संतकर्णा सुधा साक्षात् आचम्ये वासना जळे ॥६२॥
अंधको भोज नी वृष्णी शूरसेन मधू कुरू ।
सृंजयो पांडुवंशीय आदरे त्या प्रशंसिती ॥६३॥
सर्वांग सुंदरो श्याम हास्य नी गोड पाहणे ।
प्रसादपूर्ण ते शब्द शौर्य आनंदधाम तो ॥६४॥
(वसंततिलका)
कर्णी तया विलसती अति कुंडले नी ।
गालावरी हि रुप ते झळके अतीव ॥
ते हास्य तो करि जधी तयि दंतपंक्ती ।
ओसंडुनीच बहु मोद जणू वहातो ॥
ते नेत्रपात्र भरुनी नर नारी सारे ।
शांती न होय कधिही दिनरात्र पीता ॥
आनंद तो मिळतसे अति थोर त्यांना ।
त्या पापण्या न मिटती मिटताहि मोदे ॥६५॥
तो जन्मला मथुरि श्रीवसुदेवपोटी ।
नंदाघरीच रमला नच तेथ राही ॥
गोपाळ गोपि करण्या सुखि गायि आला ।
व्रजी तसेचि मथुरीं हत शत्रु केले ॥
केले विवाह किति पुत्रहि त्यां बहूत ।
झाले तसेचि श्रुतिचे रूप स्थापण्याला ॥
दावावया स्वरूप तो करि यज्ञ थोर ।
यज्ञात तो यजितसे स्वयची स्वताला ॥६६॥
त्या पांडवोनि कुरुच्या कलहा निमित्ये ।
काढोनि ते नरपती वधिता जहाला ॥
ते येश सर्व जगती करि अर्जुनाचे ।
बोधोनि उद्धव नि तो निजधामि गेला ॥६७॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर चोविसावा अध्याय हा ॥ ९ ॥ २४ ॥ ॥ नववा स्कंध समाप्त ॥
॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|