समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ९ वा - अध्याय १७ वा

क्षत्रवृद्ध, रजि आदी राजवंशाचे वर्णन -

श्रीशुकदेव सांगतात - (अनुष्टुप्‌)

राजा पुरुरव्या एक आयु हा पुत्र तो तया ।
नहूष क्षत्रवृद्धो नी अनेना रंभ नी रजी ॥१॥
आयचे पुत्र हे पाच क्षत्रवृद्धास वंश हा ।
पुत्र त्याचा सुहोत्रो नी त्याते काश्य कुशो तसा ॥२॥
गृत्समद असे तीन गृत्सचा शूनको पुढे ।
शूनका शौनको झाला ऋग्वेदीमाजि श्रेष्ठ जो ॥३॥
काश्याच्या काशिला राष्ट्र राष्ट्रा दीर्घतमो तया ।
धन्वंतरी असे पुत्र आयुर्वेद प्रवर्तको ॥४॥
यज्ञभोक्ता वासुदेवो तयाचा अंश हा असे ।
याच्या स्मरणमात्राने पळती रोग सर्व ते ॥
धन्वतरीस केतूमान्‌ तया भीमरथो पुढे ॥५॥
भीमरथ दिवोदास तया द्यूमान्‌-प्रतर्दनो ।
नामे वत्स ऋतध्वज शत्रुजित्‌ कुवलाश्व ही ।
तया पुत्र अलर्कादी जाहले पुढती तसे ॥६॥
अलर्का परि ना कोणी सहासष्ट हजार ते ।
वर्षे राज्य धरेशी या केले तरुण राहुनी ॥७॥
वंशात पुढती झाले संतती सुनिथो पुढे ।
सुकेतनो धर्मकेतु तयाचा सत्यकेतु तो ॥८॥
तयाचा धृष्टकेतु नी तयाच्या सुकुमारच्या ।
वीतहोत्रासि तो गर्भ तयाला भार्गभूमि हा ॥९॥
सर्व हे क्षत्रवृद्धाच्या काशीचे ते नराधिप ।
रंभाच्या रभसा झाला गंभीर त्यास अक्रिय ॥१०॥
अक्रीय पत्‍निपासोनी द्विजवंश असे पुढे ।
अनेन वंश तो ऐका एकाचे एक पुत्र जे ॥
अनेन शुद्ध नी शूची त्रिककुद्‌ धर्मसारथी ॥११॥
शांतरय तयाचा जो ज्ञानाने कृतकृत्यची ।
संतान नच तो इच्छी आयूचा पुत्र तो रजी ॥
तया अत्यंत तेजस्वी पाचशे पुत्र जाहले ॥१२॥
रजीला प्रार्थिता देवे दैत्यांना वधुनी तये ।
इंद्राला दिधला स्वर्ग परी प्रल्हाद या सम ॥
शत्रुंना भिउनी राही म्हणोनी स्वर्ग घेवुनी ॥१३॥
स्वर्ग हा दिधला त्यांना पायासी लागला असे ।
रजी मेला तये पुत्रे इंद्रा स्वर्ग न तो दिला ॥
यज्ञभागहि ते सारे स्वयेचि भक्षु लागला ॥१४॥
विनंती करिता इंद्रे हवी गुरु बृहस्पती ।
अभिचार विधीने ते धर्मभ्रष्टचि जाहले ॥१५॥
इंद्राने सहजी त्यांना मारोनी स्वर्ग घेतला ।
पौत्र जो क्षत्रवृद्धाचा कुश तो त्याजला प्रती ॥
प्रतीच्या संजयो याला जाहला जय पुत्र तो ॥१६॥
जयाच्या कृत नी त्याचा हर्यवनचि पुत्र तो ।
तयाच्या सहदेवाच्या ही नला जयसेन तो ॥१७॥
तयाच्या संकृती याला वीरशीरोमणी जय ।
वंशात क्षत्रवृद्धाच्या एवढे नृपती पहा ॥
आता मी नहुषोवंश सांगतो ऐकणे पुढे ॥१८॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सतरावा अध्याय हा ॥ ९ ॥ १७ ॥
॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP