समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध ९ वा - अध्याय १० वा
भगवान् श्रीरामाच्या लीलांचे वर्णन -
खट्वांगा दीर्घबाहू नी तयाला रघु जाहला ।
रघूचा अज नी त्याचा पुत्र दशरथो असे ॥१॥
तया साक्षात् परब्रह्म अंशांशे पुत्र तो हरि ।
राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न रूपि जन्मला ॥२॥
त्या सीतापति रामाची कथा थोरांनि वर्णिली ।
तूही ती कैक वेळेला बहूत ऐकिली असे ॥३॥
(स्रग्धरा)
गेला श्रीराम पायी वनि पितरमनहेतु पूरा कराया ।
बंधूनी मारूती तो चरणकमळ ते चेपिती कष्ट जाण्या ॥
कापीता कान नाका सुपनखस्त्रिचिये होय सीता वियोग ।
बांधोनी सेतु गेला वधि खल सगळे राम तो रक्षु आम्हा ॥४॥
(अनुष्टुप्)
विश्वामित्राचिये यज्ञीं रामे मारीच मारिला ।
लक्ष्मणे पाहिला थोर दैत्य मेला तदा तसा ॥५॥
(वसंततिलका)
मोठे धनुष्य धरिले तिनशे विरांनी ।
आणियले तयि यये द्वय छेद केले ॥
श्रीराम ते उचलुनि सहजीच तोडी ।
ऊसास तोडिति मुले नच कष्टता जै ॥६॥
वक्षस्थलासि हरि तो धरि श्रीरमेला ।
ती जन्मली जनक गेहि रूपे सितेच्या ॥
श्रीरामरूप अनुरूप अशीच दिव्य ।
स्वयंवरी धनु जधी तुटता मिळाली ॥
मार्गात तो परशुराम मिळे लढाया ।
हारीयला मनिचिया अतिगर्व त्याचा ॥७॥
पत्नीस दे दशरथो वर गुंतला तै ।
ते साधिण्या पितर बोल वनात गेला ॥
त्यागोनि राज्य धन मित्र महाल सारे ।
मुक्ती सवे जशि तनू करि त्याग योगी ॥८॥
शूर्पोनखा धरिमनी बहु काम हीन ।
विद्रूप रावणबहीण सदाचि केली ॥
पक्षीय दूषण खरो चवदा हजार ।
रामेचि ते वधियले वनि जे सदैव ॥९॥
ऐकोनि रूप मनिकामिक रावणाने ।
मारीच मृग करूनी दुर राम नेला ॥
मारीच मृग वधिला जरि मोहवी तो ।
दक्षो जसा वधियला विरभद्र याने ॥१०॥
तो राम गेहि नसता हरिले सितेला ।
त्या रावणे, वनि फिरे सह बंधु राम ॥
सीतेस शोध करिता अनवाणि पायी ।
दारेस गुंतु तयि दाविहि दुःख ऐसे ॥११॥
कर्मा त्यजी परि जटायुस अंत्यकर्म ।
केले, कबंध वधिला कपि मैत्र झाला ॥
वालीस मारुनि तये वनजेचि सीता ।
शोधीयली मग हरी करि वन्यसेना ॥१२॥
तो सागरासि धरि कोप तदा जळात ।
अस्वस्थ प्राणि उठता मग शांत झाला ॥
तो मानवी तनु धरी मग प्रार्थी रामा ।
आणून भेटि शरणी वदला असा तो ॥१३॥
मी मूर्ख राम नच मी तुज जाणिले रे ।
आदीपुरुष जगती तव रूप सारे ॥
सत्वात तू प्रगटता रुप देव होसी ।
राजे रजो गुणी नि रुद्र रमेचि होसी ॥१४॥
इच्छेनुसार विर तू मज पार होय ।
त्या रावणा वधुनिया निजपत्नि न्यावी ॥
तू बांध सेतु मजला मग पार होई ।
पाहोनि तो नरपती करतील गान ॥१५॥
रामे गिरी शिखर गाठुनि पूल केला ।
जै वानरे गिरि करी उचलोनि नेती ॥
तेंव्हा तये शिखरही थरकांप होती ।
बीभीषणास वदुनी हनुमान नील ॥
सुग्रीव वीर सह राम निघे विदेशी ।
लंकेत त्या हनुमते वनवाचि केला ॥१६॥
लंकेस वानर विरें भुवने खजीने ।
घेरीयले नि सगळे ध्वज तोडिलेही ॥
ते हत्ति झुंड करूनी जळ नाशिती जै ।
विध्वंस तैचि गमला बहु तेथ लंकी ॥१७॥
ते पाहता समर रावण ते कराया ।
धुम्राक्ष कुंभ प्रकरा सुर अंतकाला ॥
वीकंपना अनुचरा सुत मेघनादा ।
नी कुंभकर्ण इतरां स्वय पाठवी तो ॥१८॥
ते राक्षसो धनुष बाण त्रिशू नि शक्ती ।
भाले नि खड्ग धरुनी अति रक्षितोही ॥
रामो निलांगद नि सुग्रिव मारूती नी ।
सौमित्रबंधु तइ जांब विरास घेई ॥१९॥
हेतू धरोनि विजयी भिडले रणात ।
ते राक्षसी चतुर सैन्य नि वानरांनी ॥
वृक्षो गदा नि गिरि फेकियले अमूप ।
त्या राक्षसा मरण हे नियतीत होते ॥२०॥
त्या रावणे बघितले मरतेय सेना ।
बैसोनि पुष्पक विमानि पुढेहि आला ॥
क्रोधीत पाहुनि रथो मग इंद्र धाडी ।
श्रीराम त्यात बसला लढण्यास सिद्ध ॥२१॥
रामो वदे कुतरिया मम प्राणप्रीया ।
माझ्या परस्परिचि आणिलि हद्द झाली ॥
गर्व्यास काळ फळ दे नच सोडि तैसे ।
कर्मासि दंड फळ घे मनसोक्त चाखी ॥२२॥
हे बोल बोलुनि शरा मग सोडिले नी ।
वज्रापरीच हृदया अति भेद घेई ॥
दाही मुखा सहचि तो पडला धरेशी ।
त्या रावणा बघुनि राक्षस दुःखि झाले ॥२३॥
(अनुष्टुप्)
हजारो राक्षसी तेंव्हा रडता तेथ पातल्या ।
मंदोदरीहि आली तैं रडता रणभूमिसी ॥२४॥
पाही स्वजन ती सारे लक्ष्मणे बाण वेधुनी ।
मारिले छिन्न विछिन्न छाती बडवु लागल्या ॥२५॥
हाय ! स्वामी जित्या आम्ही मेलोत जीव आसुनी ।
तुम्हा त्राही वदे विश्व लंकेला कोण त्राहि तो ॥२६॥
नव्हते न्यून ते कांही कामाने वशिले तुम्हा ।
सीतेचे तेज ना जाणे तेणेचि दुर्दशा अशी ॥२७॥
राक्षसी वंश हा होता सुखेनैव कसा पहा ।
विधवा जाहलो सर्व गिधाडे तोडिती तुम्हा ॥
कामाने नाशिले सारे नरकी जातसा तुम्ही ॥२८॥
श्रीशुकदेव सांगतात -
कोसलाधीश रामाच्या आज्ञेने बिभिषेणने ।
पितृयज्ञ विधीने ते केले अंत्येष्टि कर्मही ॥२९॥
रामाने पाहिली सीता अशोकवनि बैसली ।
तीही त्याच्याच ध्यासाने पीडीत कृशव्याधिने ॥३०॥
प्रियेचे पाहुनी दुःख श्रीरामा प्रेम जाहले ।
सीतेने पाहता राजा आनंदे खुलले मुख ॥३१॥
बिभीषणास रामाने केले स्वामीहि राक्षसां ।
लंकेचे दिधले राज्य कल्प आयू दिली तशी ॥३२॥
व्रताचे चवदा वर्षे संपली वनि ही अशी ।
लक्ष्मणा हनुमंता नी सीतेला घेतले सवे ॥
विमानी बैसले राम निघाले देशि आपुल्या ।
ब्रह्मादिकेहि मार्गात प्रेमाने वर्षिली फुले ॥३३॥
ब्रह्म्याने गायिली कीर्ती, रामाला कळले असे ।
भरतो जव गोमूत्री शिजवी सेवि तेच नी ॥
वल्कले नेसुनी आहे झोपे तो कुश टाकुनी ॥३४॥
जटाही वाढल्या खूप ऐकता दुःख जाहले ।
भरता कळले बंधू श्रीराम येत तो असे ॥
तेणे मंत्री पुरोहीत घेवोनी पादुका शिरी ॥३५॥
स्वागता निघला तेंव्हा नंदीग्राम निवासि ते ।
मंगलो गान गावोनी सवाद्य चालले सवे ॥३६॥
ब्राह्मणे म्हटले वेद ध्वनी सर्वत्र जाहला ।
सोनेरी नक्षिचे झेंडे फडकू लागले तदा ॥३७॥
सुवर्णरथ झेंड्यांचे अश्वही सजले तसे ।
सुवर्णकवचीं सेना सेठ नी साहुकार ही ॥३८॥
सेवको चालले पायी इष्ट वस्तूसि घेउनी ।
रामाने पाहिला बंधू प्रेमाने पायि लागता ॥३९॥
प्रभूच्या पादुका ठेवी हात जोडोनि ठाकला ।
नयनी वाहिले अश्रू हरिने धरिला उरीं ॥
भगवत्प्रेम अश्रूने भरता स्नान जाहले ॥४०॥
लक्ष्मणासह सीतेच्या रामाने वंदिले द्विजा ।
प्रजेने झुकुनी रामा चरणि वंदिले तदा ॥४१॥
अयोध्यावासि ते लोक स्वामीला पाहता तदा ।
पुष्पवृष्टी करोनीया हर्षाने नाचले बहू ॥४२॥
पादुका भरतो घेई चवर्या बिभिषेण तो ।
सुग्रिवे घेतला पंखा हनुमंतेचि छत्र ते ॥४३॥
शत्रुघ्ने धनु नी भाता सीतेने तीर्थ हंडि ती ।
अंगदे खड्ग सोन्याचे जांबाने ढाल घेतली ॥४४॥
सर्वांच्या सह श्रीराम पुष्पकीं बैसले तदा ।
योग्यस्थानी स्त्रिया सर्व बंदींनी स्तुति गायिली ॥
श्रीराम शोभला जैसा उगवे चंद्र तारका ॥४५॥
स्वागते बंधुने ऐशा अयोध्यी प्रभु आणिला ।
पूर्णानंद अशी सारी नगरी सजली तदा ॥
येता प्रभू महालात कौसल्या अन्य मातृ नी ॥४६॥
गुरु मित्र समानांना योग्य ते वंदिले असे ।
सन्मान घेतला तैसा सीता बंधू सवेहि तै ॥४७॥
प्रेतात प्राण संचारे तशा माताहि हर्षल्या ।
पोटासी घेतले रामा प्रेमाश्रू गळले तदा ॥४८॥
वसिष्ठे गुरु अन्यांच्या सहाय्ये विधिपूर्वक ।
उतरिल्या जटा त्याच्या इंद्राभिषेक जाहला ॥
तसे चारी समुद्राच्या जले रामाऽभिषेकिले ॥४९॥
रामाने स्नान हे होता माला वस्त्रहि धारिले ।
सीतेने उच्च तै वस्त्र अलंकारहि धारिले ॥
सीतेच्या सह श्रीराम अत्यंत शोभला पहा ॥५०॥
भरते प्रार्थिले तेंव्हा बसे सिंहासनी प्रभू ।
प्रजेल पुत्रवत् त्याने मानोनी पाळिले असे ॥
प्रजाही पितया ऐसा श्रीरामा मान देत की ॥५१॥
त्रेतायुग असोनीया वाटे सत्ययुगोचि ते ।
राजा धर्मज्ञ श्रीराम सर्वांना सुख दे सदा ॥५२॥
परीक्षिता ! तये वेळी नद्या नी वन पर्वत ।
वर्षद्वीप समुद्रो ते कामधेनू परी सदा ॥
कामना करिती पूर्ण लोकांच्या त्या समस्तही ॥५३॥
चिंता रोग कुणा नाही श्रीरामराज्यि तेधवा ।
जरा दुःख भयो शोक थकवा नच तो कुणा ॥
नेच्छी जो मरणा त्याला मृत्युही स्पर्शिना कधी ॥५४॥
एकपत्नीव्रती राम राजर्षी अति पावनो ।
गृहोचित स्वधर्माची शिक्षा देण्यासि आचरे ॥५५॥
सतीशिरोमणी सीता पतीहेतूस जाणती ।
प्रेमे सेवे शिले नम्र बुद्धि लज्जादि या गुणे ॥
पती श्रीराम याची ती सदैव चित्त चोरटी ॥५६॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर दहावा अध्याय हा ॥ ९ ॥ १० ॥
॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|