समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ९ वा - अध्याय ८ वा

सगरचरित्र -

श्रीशुकदेव सांगतात -
(अनुष्टुप्‌)
हरीत रोहिता पुत्र त्याच्या चंपेचि निर्मिली ।
चंपापुरी सुदेवो त्या तयाचा विजयो पुढे ॥१॥
विजया भरुको त्याच्या वृकाचा बाहुको पुढे ।
शत्रुंनी हरिता राज्य सपत्‍न्य वनि पातला ॥२॥
वृधत्वे वनिची मेला सती उद्युक्त जाहली ।
और्वाने जाणुनी गर्भ सतीला रोधिले असे ॥३॥
कळता सवतींनी तैं अन्नात विष ते दिले ।
प्रभाव नच तो झाला सुखाने बाळ जन्मले ॥
गराच्या सह तो जन्म तै नाम सगरो तया ॥४॥
चक्रवर्ती पुढे झाला पुत्रांनी महि खोदुनी ।
निर्मिले सागरा तैसे गुर्वाज्ञे सगरे न ते ॥
मारिले तालजंघो नी यवनो शक हैहय ॥५॥
बर्बरो, परि ते त्यांचे शिरां मुंडन योजिले ।
दाढ्याचि ठेविल्या त्यांना कुणा मुक्तहि केश ते ॥
विद्रूप करूनी त्यांना सोडोनी दिधले असे ॥६॥
वस्त्र पांधरणे कोणा कुणा लंगोटि ठेविली ।
पुढे त्या सगरे और्व ऋष्याज्ञे यज्ञ योजिले ॥७॥
आत्मस्वरूप भगवान्‌ यज्ञाने पूजिला असे ।
यज्ञींचा हय तो इंद्रे एकदा चोरिला तदा ॥८॥
सुमतीराणिपुत्रांनी आज्ञेने पृथ्वि धुंडिली ।
न मिळे अश्व तो तेंव्हा पृथ्वि खोदिली असे ॥९॥
ईशान्यी खोदता त्यांना कपिलापाशि अश्व तो ।
पाहता धावले सर्व वदले चोर हा पहा ॥१०॥
मिटवी नेत्र हा कैसा पाप्याला मारण्या चला ।
कपिले पाहिले त्यांना पापण्या उचलोनिया ॥११॥
इंद्राने हरिली बुद्धी साठ सहस्त्र पुत्र ते ।
द्वेषिता ऋषिसी तेंव्हा जळोनी खाक जाहले ॥१२॥
(इंद्रवज्रा)
क्रोधे ऋषीच्या नच दग्ध झाले
     ते शुद्ध सत्वोगुण आश्रयीची ।
तो क्रोध त्यांना नच स्पर्शि केंव्हा
     नभो धुळीने नच माखते की ॥१३॥
संसार मृत्युपथ एक आहे
     न पार होणे अति तो कठीण ।
ती सांख्ययोगी तयि नाव केली
     जो इच्छि त्याला मिळतेच मुक्ती ॥
न ज्ञान ते केवळ श्रीहरीचे
     न मित्र त्यांना नच शत्रु कोणी ॥१४॥
(अनुष्टुप्‌)
दुसरी केशिनी हीस असमंजस नावचा ।
पुत्र तो त्याजला झाला अंशमान्‌ पुत्र थोर तो ॥१५॥
असमंजस तो पूर्व-जन्मात योगिची असे ।
संगाने विसरो होता परी त्या स्मृति जाहली ॥
तेणे कर्म करी सारे परी मोही न गुंतला ॥१६॥
निंदीतही करी कर्म खेळते मूलही कधी ।
टाकी तो शरयू मध्ये लोकां उद्वेग जाहला ॥१७॥
पित्याने पाहता ऐसे त्यजिले पुत्र प्रेम नी ।
असमंजस याने ती मुले जीवीत दाविली ॥
पित्याला दावुनी ऐसे वनात पातला तपा ॥१८॥
अयोध्यावासियांनी ते मुले जीवीत पाहता ।
स्तिमीत जाहले सर्व पित्याला खेद जाहला ॥१९॥
आज्ञा ती सगराची तो अंशुमान्‌ अश्वि बैसला ।
शोधावयासि तो गेला यागाश्व पाहिला तये ॥
राखेचा ढीग मोठा नी समुद्रकाठी थोर तो ॥२०॥
भगवान्‌ कपिला त्याने पाहोनी वंदिले असे ।
हात जोडोनि एकाग्र स्तुती केली तये अशी ॥२१॥

अंशुमान्‌ म्हणाला -
(इंद्रवज्रा)
ब्रह्मा न पाहू शकतो तुम्हाते
     समाधि जोडी परि जाणिना तो ।
बुद्धि मनाने अम्हि अज्ञ जीव
     तेंव्हा तुम्हा जाणु कसाच मी हो ॥२२॥
गुणप्रधानी जगि या जिवांना
     अज्ञानची ते तिन्हि या अवस्थी ।
मोहीत माया करिते तुझी त्यां
     न पाहती ते हृदयी तुला की ॥२३॥
तू असशी ज्ञानघनो परी ते
     संते तुला पाहिले ज्ञान योगे ।
मायेत आम्ही भुललो सदाचे
     मी मूढ कैसा तुजला स्मरू ते ॥२४॥
माया नि कर्मे तुज लिंग नाही
     न नाम रूपो तुज कार्य कांही ।
तू ज्ञान देण्या धरिले शरीरा
     प्रणामितो रे तुज आम्हि देवा ॥२५॥
(अनुष्टुप्‌)
माया ती रचिते विश्व तिला मानोनि लोक हे ।
ईर्षेने लोभ मोहाने घरां देहात गुंतती ॥२६॥
जीवांचा जीव तू राम दर्शने मोह नाशला ।
जो मोह कामना कर्म इंद्रीया पोषितो सदा ॥२७॥

श्रीशुकदेव सांगतात -
अंशुमाने अशी गाता स्तुति ते कपिलो मुनी ।
वदते जाहले बोध मनोमन तया असा ॥२८॥

श्रीभगवान्‌ म्हणाले -
आजोबाच्या तुझ्या अश्व यज्ञाचा पशु हा पहा ।
चुलते जळले त्यांना जगाया गंगातीर्थची ॥
उपाय एक तो आहे अन्य कांही नसेचि पा ॥२९॥
अंशुमान्‌ नम्र भावाने करोनी ती परीक्रमा ।
घोडा घेवोनि तो आला यज्ञ पूर्णहि जाहला ॥३०॥
सगरे अंभुमान्‌ याला अभिषेक करोनिया ।
और्वाचा बोध घेवोनी परंधामास पातला ॥३१॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर आठवा अध्याय हा ॥ ९ ॥ ८ ॥
॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP