समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ९ वा - अध्याय ३ रा

महर्षि च्यवन आणि सुकन्याचरित्र, राजाशर्यतिचा वंश -

श्रीशुकदेव सांगतात -
(अनुष्टुप)
वेदनिष्ठ तसा विद्वान्‌ शर्याती मनुपुत्र तो ।
अंगिरागोत्रजां यज्ञीं सांगे द्वितिय सत्र ते ॥१॥
सुकन्या नावची त्याला कन्या कमललोचना ।
सुकन्यासह तो राजा च्यवनाश्रमि पातला ॥२॥
सखिंच्यासह ती कन्या निसर्ग पाहता तदा ।
वारुळा मधुनी छिद्रीं दो ज्योति दिसल्या तिला ॥३॥
दैवाची प्रेरणा होता काटा छिद्रात घातला ।
वारुळा मधुनी खूप रक्त ते सांडले तदा ॥४॥
शर्यातीसैनिकांचे तै रुकले मलमूत्र नी ।
आश्चर्य मानुनी चित्ती बोलला नृप तेधवा ॥५॥
अरे तुम्ही वनामाजी गैर ते वागलात का ? ।
मला ते वाटते स्पष्ट अनिष्ट वागले कुणी ॥६॥
सुकन्या भिउनी बोले पिताजी चूक जाहली ।
न मी जाणोनि ज्योतिंना काट्याने छेदिले असे ॥७॥
कन्येचे वाक्य ऐकोनी राजा घाबरला तदा ।
शर्याती स्तविता झाला च्यवना वारूळातल्या ॥
ऐका स्तुति ती सर्व प्रसन्न मुनि जाहले ॥८॥
मुनीचे मन जाणोनी सुकन्या अर्पिली तया ।
संकटी सुटला राजा पातला राजधानिसी ॥९॥
क्रोधिष्ट मुनिच्या गेही सुकन्या दक्ष राहुनी ।
प्रसन्न करण्या त्याते नित्याची सेवि लागली ॥१०॥
कांही काळ असा जाता अश्विनीकुमारो तिथे ।
पातता मुनिने त्यांना पूजिलेहि यथोचित ॥
वदले मुनि ते त्यांना द्यावे तारूण्य ते मला ॥११॥
असे रूप मला द्यावे स्त्रिया जे इच्छिती मनीं ।
न तुम्हा सोमपानाचा भाग तो यज्ञि अर्पितो ॥१२॥
वैद्यश्रेष्ठ महर्षिंनी च्यवना अभिनंदिले ।
वदले कुंड हे सिद्ध यात स्नान ते करा ॥१३॥
वृद्ध हा च्यवनो होता नसा अंगास स्पष्ट त्या ।
सुर्कुत्या, केश ही शुभ्र कुंडी प्रवेशले तिघे ॥१४॥
क्षणात रूपवान्‌ तीन पुरुष निघले तयी ।
पद्ममाला तसे वस्त्र स्त्रियांना जे हवे तसे ॥१५॥
तिघे तेजस्वि जै सूर्य सुकन्या पति नोळखी ।
अश्विनीकुमरा प्रार्थी कोणता पति सांगणे ॥१६॥
पातिव्रत्य बघोनिया तोषले कुमरो मनीं ।
तिला दाखवुनी स्वामी गेले स्वर्गात ते द्वय ॥१७॥
पुढती यज्ञहेतूने शर्याती पातले जधी ।
तेजस्वी पुरुषा त्यांनी मुली शेजारि पाहिले ॥१८॥
सुकन्या वंदिती झाली पित्याच्या चरणा तदा ।
आशिर्वाद न ते देता खिन्न शब्देचि बोलले ॥१९॥
(इंद्रवज्रा)
दुष्टे असे कृत्य कसेचि केले
     तू वंचिले त्या च्यवना पतीला ।
वृद्धासि तू त्या त्यजिलेस आणि
     हे जार कर्मो करिशी अशी कां ॥२०॥
तू जन्मली ते कुळ श्रेष्ठ तैसे
     कलंक आहे तव वर्तनाचा ।
हे राम निर्लज्जचि वर्तनाने
     पती नि आम्हा नरकात नेसी ॥२१॥
(अनुष्टुप्‌)
पित्याचे ऐकुनी शब्द कन्या हासोनि बोलली ।
पिताजी हे महर्षी ते च्यवनो भृगुनंदन ॥२२॥
सौंदर्य तारूणाईचा वृत्तांत बोलली तदा ।
झाला विस्मित तो राजा मुलीसी भेटला गळां ॥२३॥
महर्षि च्यवनो यांनी शर्यातीच्या कडोनिया ।
मांडिला सोमयागो नी कुमारां सोमपानिले ॥२४॥
क्रोधला इंद्र पाहोनी मारण्या वज्र काढिले ।
स्तंभिले वज्र नी हात च्यवने जेथच्या तिथे ॥२५॥
तदा त्या देवतांनीही मानिला सोमभाग तो ।
पूर्वी वैद्य म्हणोनिया नव्हता सोमभाग त्यां ॥२६॥
उत्तानबर्हि आनर्त भूरिषेण असे तिघे ।
शर्यातीपुत्र ते होते आनर्ता रेवतो पुढे ॥२७॥
रेवते त्या समुद्रात नगरी जी कुशस्थली ।
रचिली तेथुनी सारे करीत राज्य ते तिघे ॥२८॥
रेवता शत ते पुत्र कुकुद्‌मी थोरला तयिं ।
कुकुद्‌मे आपुली कन्या रेवती साठि योग्यची ॥२९॥
पुसाया वर तो श्रेष्ठ पातला ब्रह्मलोकि नी ।
गाण्यांची धून ऐकोनी थांबला क्षण कांहि तै ॥३०॥
उत्सवो संपता गेला वंदोनी हेतु बोलला ।
ऐकता हासले ब्रह्मा हासोनी बोलले तया ॥३१॥
महाराजा ! जयांच्या त्या हेतूने पातले इथे ।
काळाच्या मुखि ते गेले गोत्र ही नच ते उरे ॥३२॥
येथल्या इतुक्या वेळी सत्ताविस चतुर्युगे ।
संपली म्हणुनी जावे पृथ्वीसी तो महाबळी ॥
भगवान्‌ अंश रूपाने बलदेव नृपो असे ॥३३॥
राजा रे ! नररत्‍ना त्या कन्यारत्‍न समर्पिणे ।
पवित्र कीर्ति ती त्याची प्राण्यांचा भार तो हरी ॥३४॥
कुकुद्‌मे वंदिली आज्ञा पातला आपुल्या पुरा ।
वंशजे सोडिले पूर यक्षांचे भय घेउनी ॥३५॥
सर्वांगसुदंरी पुत्री कुकुद्‌मे बलरामला ।
अर्पिली नी तपा गेले आश्रमी बादरायणी ॥३६॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर तिसरा अध्याय हा ॥ ९ ॥ ३ ॥
॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP