समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ९ वा - अध्याय १ ला

वैवस्वत मनुचापुत्र राजा प्रद्युम्नची कथा -

राजा परीक्षिताने विचारले -
(अनुष्टुप्‌)
सर्व मन्वंतरे तैसे अनंत भगवान्‌ हरी ।
याचे ऐश्वर्य शक्ती ती वर्णिली ऐकिलीहि मी ॥१॥
मागील कल्पांतात द्रवीड देशिस्वामि तो ।
सत्यव्रत नृप-ऋषि सेवेने ज्ञान मेळवी ॥२॥
तोचि या कल्पिही झाला वैवस्वत मनू पुढे ।
इक्ष्वाकु आदि पुत्रांना तयाच्या वर्णिले तुम्ही ॥३॥
कृपया वंश त्यांचा नी चरित्र वर्णिने पुढे ।
महाभागा अम्ही नित्य उत्सुक ऐकण्या कथा ॥४॥
वैवस्वत मनूवंशी झाले आहेत होतिल ।
पवित्र पुरुषोकीर्ति सांगणे तो पराक्रम ॥५॥

सूत सांगतात -
परीक्षिते असा प्रश्न ब्रह्मवादी ऋषीं सभी ।
पुसता धर्ममर्मज्ञ भगवान्‌ शुक बोलले ॥६॥

श्रीशुकदेव सांगतात -
संक्षेपे सांगतो ऐका मनुवंश तुम्हा असा ।
विस्तारे शेकडो वर्षे पुरती ना कथावया ॥७॥
सर्वात्मा पुरुषो एक उरतो प्रलयीं पहा ।
विश्व हे आणखी कांही नव्हते उरले तदा ॥८॥
महाराजा ! तये नाभीं सुवर्णपद्मकोष तो ।
प्रगटे प्रगटे त्यात ब्रह्माजी जो चतुर्मुखी ॥९॥
ब्रह्म्याच्या त्या मना मध्ये मरिची नातु कश्यपे ।
तयाची अदिती पत्‍नी विवस्वान्‌ पोटि तो तिच्या ॥१०॥
विवस्वान्‌ पत्‍नि जी संज्ञा श्राद्धदेव मनू तिचा ।
मनस्वी श्राद्धदेवाचे श्रद्धागर्भात ते दहा ॥११॥
इक्ष्वाकू नृप शर्याति दिष्ट धृष्ट करूष नी ।
नरिष्यंत अशी नामे पृषध्र नभगो कवी ॥१२॥
नव्हते मुळि संतान वैवस्वत मनू यया ।
मित्रावरूण यज्ञाने वसिष्ठे दिधले तयां ॥१३॥
यज्ञ आरंभ पासोनी राहिली दूध पीउनी ।
श्रद्धेने नमिला होता कन्याच इच्छिली तिने ॥१४॥
श्रद्धेचे बोल लक्षोनी अध्वर्यू ब्राह्मणे तदा ।
वषट्‌कारास उच्चारे यज्ञात आहुती दिली ॥१५॥
विपरीत अशा कर्मे पुत्राच्या स्थानि पुत्रि ती ।
इला ही जन्मली तेंव्हा वसिष्ठा मनु तो पुसे ॥१६॥
ब्रह्मवादी तुम्ही सर्व उलटे फळ हे कसे ।
फळ ना उलटे लाभे वैदिक कर्म श्रेष्ठ ते ॥१७॥
मंत्रज्ञान तुम्हा पूर्ण जितेंद्रिय तुम्ही तसे ।
तपे निष्पापही तुम्ही तेंव्हा हे उलटे कसे ॥१८॥
परीक्षित्‌ ! आमुचे वृद्ध पितामह वसिष्ठ तै ।
संकल्प जाणुनी चित्ती मनूला बोलले असे ॥१९॥
होत्याच्या उलट्या हेते संकल्प उलटा असा ।
तरी मी तप सामर्थ्यो देईन श्रेष्ठ पुत्र तो ॥२०॥
यशो ईश वसिष्ठाने कन्येचा पुत्र व्हावया ।
निश्चये स्तविला विष्णु राजा रे ! पुरुषोत्तमा ॥२१॥
तेंव्हा संतोष पावोनी हरीने वरही दिला ।
इलेचा जाहला पुत्र सुद्युम्न श्रेष्ठ या जगी ॥२२॥
एकदा तो महाराजा ! शिकार करण्या वनीं ।
बसोनी सिंधु अश्वाशी निघाला उत्तरेकडे ॥२३॥
कवचो धनुसी बाण लावोनी पाठलागि तो ।
धावला उत्तरीं खूप हरिणा पाठ-पाठची ॥२४॥
शेवटी तळ मेरूच्या वनात पातला असे ।
त्या वनी शिव तो क्रीडे पार्वती सह नित्यची ॥२५॥
सुद्युम्न पातता तेथे स्वयें स्त्रीरूप पाहिले ।
अश्वही अश्विनी झाला सुद्युम्न पाहिले असे ॥२६॥
परीक्षिता तदा सर्व मंत्री स्त्रीरूप जाहले ।
परस्परासि पाहोनि उदास बहु जाहले ॥२७॥

राजा परीक्षिताने विचारिले -
भगवन्‌ ! कोणता ऐसा विचित्र गुण त्या वनीं ।
कोणी केले असे त्यांना कृपया सांगणे अम्हा ॥२८॥

श्रीशुकदेव सांगतात -
एकदा तैं व्रतोधारी ऋषी मिटविता तमा ।
पातले त्या वनामाजी दर्शना शिवशंकरा ॥२९॥
वस्त्रहीन अशी अंबा लाजली ऋषि पाहुली ।
त्वरित उठली आणि वस्त्र ते धारिले असे ॥३०॥
ऋषिंनी पाहिले गौरी - शंकरो ते विहारती ।
म्हणोनी फिरले मागे नर-नारायणाश्रमी ॥३१॥
प्रिया भगवती हीस प्रसन्न करण्या शिवे ।
वदले येइ जो येथे स्त्रीरूप होय सत्वरी ॥३२॥
तेंव्हा पासोनि ते स्थानी पुरूष न प्रवेशती ।
सुद्युम्नादि असे झाले स्त्रिया नी अन्य त्या वनी ।
विचरू लागले सर्व प्रधान सेवको तिथे ॥३३॥
शक्तिशालि बुधाने त्या आश्रमी पाहिल्या स्त्रिया ।
सुंदरी श्रेष्ठ ती व्हावी प्राप्त हे इच्छिले मनी ॥३४॥
बुध या चंद्रपुत्राला स्त्रीनेही इच्छिले तसे ।
पती मानोनिया गर्भी झाला पुत्र पुरूरवा ॥३५॥
सुद्युम्न तो मनुपुत्र स्त्रीरुप जाहला असा ।
ऐकता की वसिष्ठांना त्या रूपी स्मरिले तये ॥३६॥
कृपाळू ऋषि ते झाले दु:खी पाहूनि रूप ते ।
तयांनी प्रार्थिला शंभू पुरूष करण्या तिला ॥३७॥
प्रसन्न जाहले सांब कामना पूर्ण व्हावया ।
वसिष्ठा बोलले ऐसे आपुला शब्द पाळण्या ॥३८॥
वसिष्ठा ! यजमानो हा एकमास पुरूष नी ।
एक मास तसा स्त्री तो इच्छेने पृथ्वि पाळि हा ॥३९॥
अनुग्रहे वसिष्ठांच्या सुद्युम्न तो अशा परी ।
घेवोनिया पुरूषत्व सांभाळी पृथिवी तशी ।
न प्रजा वंदिते त्याला अभिनंदन ना करी ॥४०॥
तयाचे पुत्र ते तीन विमलो उत्कलो गय ।
परीक्षिता तिघे राजे दक्षीणापथि जाहले ॥४१॥
अनेक वरुषे जाता प्रतिष्ठान प्रभू असा ।
पुरूरवा यया पुत्रा राज्य ते देउनी पुन्हा ।
तपार्थ वनि तो गेला सुद्युम्नश्री अधीपती ॥४२॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर पहिला अध्याय हा ॥ ९ ॥ १ ॥
॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP