समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध ८ वा - अध्याय १९ वा
भगवान् वामन तीन पाऊल जमीन मागतात, बळीचे वचन शुक्राचार्याचा विरोध -
श्री शुकदेवजी सांगतात -
(अनुष्टुप्)
बळीचे बोलणे होते धर्मयुक्त नि गोडही ।
ऐकता वामनो मोदे अभिनंदुनि बोलले ॥ १ ॥
श्री भगवान् म्हणाले -
(इंद्रवज्रा)
राजा ! तुझे बोल कुलानुसार
भक्ती यशा वाढविती मधूर ।
शिष्योत्तमो तू भृगुपुत्र यांचा
पितामहा मानिसि वंद्य तू तो ॥ २ ॥
(अनुष्टुप्)
तुझ्या वंशात कोणी ना कृपणो धैर्यहीनही ।
न मोडी शब्दही कोणी दानहीन कुणी नसे ॥ ३ ॥
(इंद्रवज्रा)
न युद्धतीर्थी भिरु तो कुणीही
शत्रुसि पाहोनि पळोनि गेला ।
का ते न व्हावे ययि वंशि भक्त
प्रल्हाद येशो जर शांतचंद्र ॥ ४ ॥
(अनुष्टुप्)
हिरण्याक्षापरी वीर या कुळी जन्मला असे ।
सगदे हिंडला पृथ्वी परी युद्धार्थ जोड ना ॥ ५ ॥
जळात रक्षिण्या पृथ्वी विष्णु तो युद्ध योजुनी ।
काठिण्ये मेळवी येश परी तो न तसे म्हणे ॥ ६ ॥
हिरण्यकश्यपू याला कळाला बंधुमृत्यु नी ।
वैकुंठी पोचला होता शत्रूला ठार मारण्या ॥ ७ ॥
भगवान् रचितो माया जाणितो समया तसा ।
लक्षिले मारण्या हा तो पोचला शूळ घेउनी ॥ ८ ॥
मृत्यु जै गाठितो जीवा तसा गाठील आपणा ।
भितीने विष्णु तै गेला तयाच्या हृदयात की ॥
हिरण्यकश्यपू तेंव्हा न पाहू शकला तया ॥ ९ ॥
(इंद्रवज्रा)
दैत्येंद्र ! तेंव्हा भिउनी हरीने
अतीव सूक्ष्मी रुप घेतले नी ।
श्वासे तया नासिकमार्ग द्वारा
हृदी तयाच्याचि लपोनि ठेला ॥ १० ॥
धुंडीयली ही पृथिवी तयाने
न सापडे तो हरि त्यास कोठे ।
दाही दिशांना करि सिंहनाद
परी तया तो नच की मिळला ॥ ११ ॥
(अनुष्टुप्)
कोठेही न दिसे तेंव्हा वदला भ्रातृघातकी ।
गेला असेल तो तेथे कोणी जेथून येत ना ॥ १२ ॥
संपले वैर ते सर्व वैर त्याच्या तनूस ते ।
अहंकारेचि अज्ञान अज्ञाने क्रोध वाढतो ॥ १३ ॥
पिता विरोचनो होते द्विजभक्त बहू असे ।
द्विजवेष धरोनीया देवता पातल्या जधी ॥
द्विजांचा छळ पाहोनी तयांना आयु अर्पिली ॥ १४ ॥
तुम्ही तो पाळिता धर्म शुक्राचार्य गुरुहि जो ।
प्रल्हाद पाळिती नी ज्या गृहस्थद्विज पाळिती ॥ १५ ॥
दैत्येंद्रा ! मागता सर्व देण्या साठी समर्थ तू ।
तीन पाऊल ती पृथ्वी देयावी मजला अशी ॥ १६ ॥
विश्वाचा स्वामि तू आणि उदार तरि अल्प हे ।
राजा तू मजला द्यावे, घ्यावे लागेल तेवढे ॥ १७ ॥
राजा बळी म्हणाला -
अहो ! द्विजकुमारा हे वृद्धाच्या परि बोलणे ।
बाळबुद्धी अशी कैसी हानी लाभ न जाणता ॥ १८ ॥
राजा मी या त्रिलोकाचे द्वीपही देउ ते शके ।
प्रसन्न करुनी माते मागणे बुद्धिचे नसे ॥ १९ ॥
बटो ! मागोनिया जाती ते ना भिक्षूक राहती ।
जीविका चालण्या ऐशी भूमि ती मागणे मला ॥ २० ॥
श्री भगवान् म्हणाले -
इंद्रिया नसता ताबा सृष्टिच्या सर्व वस्तुही ।
एकाही व्यक्तिच्या इच्छा पूर्ण ना शकती करू ॥ २१ ॥
त्रिपाद भूमिमध्ये ज्या संतोष नसतो तया ।
नवू देशाचिये द्वीप देताही तोष ना तया ॥
इच्छितो सातही द्वीप असंतुष्ट असेल तो ॥ २२ ॥
पृथू नी गय राजाचे ऐकतो राज्य सात त्या ।
द्वीपी असोनि संपत्ती तरी ना तोषले मनीं ॥ २३ ॥
प्रारब्धे मिळते त्यात तोषता सुख ते बहू ।
संयमी ना तया दुःख अतृप्ती आग जाळिते ॥ २४ ॥
धनभोगी न संतोषी भवचक्री पडे असा ।
मिळते त्यात संतोषी तोष तो मोक्षकारक ॥ २५ ॥
संतुष्ट राहता विप्र तेजाची वृद्धि होतसे ।
तेज नष्टे अतृप्ताचे जले अग्नि विझे तसे ॥ २६ ॥
मागता सर्व ते देसी यात संदेह तो नसे ।
त्रिपाद भूमिने माझी कामना होय पूर्ण ती ॥
गरजे पुरता व्हावा धनाचा संचयो पहा ॥ २७ ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
ऐकता हासला राजा वदला ठीक गोष्ट ही ।
संकल्पा वामने तेंव्हा घेतले जलपात्र तै ॥ २८ ॥
जाणिले गुरुशुक्राने लीला ही विष्णुची असे ।
क्रोधोनी शापवाणीते राजाला बोलले असे ॥ २९ ॥
श्री शुक्राचार्य म्हणाले -
बळी ! हा भगवान् विष्णु अविनाशी स्वयं इथे ।
देवांचे कार्य साधाया अदिती पोटि जन्मला ॥ ३० ॥
अनर्थ नच तू जाणी हिरावी सर्व हा तुझे ।
मला अयोग्य हे वाटे अन्याय घडतो पहा ॥ ३१ ॥
योग माये स्वयें विष्णू बटू होवोनि पातला ।
ऐश्वर्य धन नी राज्य कीर्ती तेज हरील हा ॥
सर्व कांही तुझे जे जे इंद्रासी देई हा पहा ॥ ३२ ॥
विश्वरूप तिन्हि पदे त्रिलोक व्यापु हा शके ।
मूर्खा सर्वचि ते देता निर्वाह करिसी कसा ॥ ३३ ॥
पृथिवी एक पायाने दुजाने स्वर्ग झाकि हा ।
ठेवील तिसरा पाय कुठे ते सांग तू बळी ॥ ३४ ॥
न शब्द पाळिशी तेंव्हा नर्काची गति ती असे ।
प्रतिज्ञा तव ना होई कधी पूर्ण तया पुढे ॥ ३५ ॥
ज्या दाने न उरे कांही ज्ञाते त्याला न मानिती ।
धनाने दान यज्ञो नी उपकार तपो घडे ॥ ३६ ॥
धन ते पाच भागात मनुष्ये वाटणे पहा ।
धर्म नी यश भोगार्थ स्वजना अभिवृद्धिसी ॥ ३७ ॥
दैत्येंद्रा श्रुति ऋग्वेदी सांगते ऐकणे पहा ।
संकल्प करिता दान अस्विकार असत्य तो ॥ ३८ ॥
तनुचे पुण्य ते सत्य ते नाशे तनु संपता ।
संचयो तनुचे मूळ संचयो धर्म हा खरा ॥ ३९ ॥
नासता मूळ ते वृक्ष पडतो धरणीस की ।
संचयो संपता सारे सुकोनी जाय जीवन ॥ ४० ॥
हां मी देतो अशा वाक्ये धन हे दूर धावते ।
याचके लुटिता सर्व न राही कांहि आपणा ॥ ४१ ॥
मी ना देतो अशा वाक्ये असत्ये धन राहते ।
शब्दीं गुंतोनि ना देता तयाची अपकीर्ति हो ॥ ४२ ॥
विनोदे नी विवाहात कन्यादानी नि पत्निसी ।
गो ब्राह्मण हितासाठी आणीक प्राण संकटी ॥
असत्य बोलणे नाही निंदनीयचि तेवढे ॥ ४३ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर एकोणिसावा अध्याय हा ॥ ८ ॥ १९ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|