समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ८ वा - अध्याय ४ था

गज आणि नक्राचे पूर्वचरित्र तसेच त्यांचा उद्धार -

श्री शुकदेवजी म्हणाले -
(अनुष्टुप्‌)
राजा ! ब्रह्मादि देवांनी ऋषी गंधर्व यांनि ही ।
प्रशंसिले हरीसी नी केली तै पुष्पवृष्टि ती ॥ १ ॥
स्वर्गात वाजल्या भेरी गंधर्व नाचले तसे ।
ऋषी चारण सिद्धांनी स्तविले पुरुषोत्तमा ॥ २ ॥
तेंव्हा त्वरित तो नक्र दिव्यदेहीच जाहला ।
या पूर्वी नक्र तो होता गंधर्व हुहु नामक ॥
गती नक्राचि ही त्याला देवले शापिल्या मुळे ।
श्रीहरी दर्शने आता त्वरीत मुक्त जाहला ॥ ३ ॥
त्यापदी ठेवुनी डोळे स्तुती गाऊहि लागला ।
अविनाशी असा विष्णू कीर्तनीय असाचि तो ॥
मनोहर अशा त्याच्या लीला गाण्यास योग्य त्या ॥ ४ ॥
भगवान्‌ स्पर्शिता त्याचे पाप तापहि नष्टले ।
स्वलोका बघता गेला नमून हरिसी पुन्हा ॥ ५ ॥
गजेंद्रही हरिस्पर्शे अज्ञानमुक्त जाहला ।
भगवद्‌रूप तो झाला पीतवस्त्र चतुर्भुज ॥ ६ ॥
गजेंद्र पूर्वजन्मीचा पांड्य राजा द्रवीडि तो ।
इंद्रद्युम्न तया नाम हरिभक्तीत श्रेष्ठही ॥ ७ ॥
(इंद्रवज्रा)
जो राज्य त्यागे मलयात गेला
    दाढी जटावेश तपस्वियाचा ।
तो एकदा स्नान करोनि मौने
    पूजावया श्रीहरि बैसला जैं ॥ ८ ॥
दैवे अगस्तीमुनि तेथ आले
    शिष्योत्तमाच्या सह पाहिले की ।
त्यजोनि राजाचि गृहस्थ धर्मा
    पाहून त्यासी बहु तप्त झाले ॥ ९ ॥
बोधा न घेता गुरुच्या ययाने
    परोपकारा त्यजिलेचि गर्वे ।
द्विजासि येणे अवमानिले की
    मिळेल याला गजयोनि जन्म ॥ १० ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
(अनुष्टुप्‌)
अगस्ति शापिता ऐसे गेले शिष्यांसवे पुढे ।
राजर्षी इंद्रद्युम्नाने प्रारब्धीं तोष मानिला ॥ ११ ॥
आत्मविस्मृतिच्या जन्मी गजयोनीत पातला ।
परी श्रीहरिच्या पूजे त्या जन्मी स्मृति राहिली ॥ १२ ॥
(वसंततिलका)
उद्धारिता गज असा मग श्रीहरीने
    पार्षद तो करुनिया निजधामि नेला ।
गंधर्व सिद्ध मुनिने स्तविले तयाला
    बैसोनि तो गरुडि श्रीहरिधामि गेला ॥ १३ ॥
(इंद्रवज्रा)
माहात्म्य ऐसे हरिचे नृपारे
    गजेंद्र मोक्षा सह मी कथीले ।
दुःस्वप्नदोषा किलच्या हरी ही
    यशोन्नती देइ कथा नि स्वर्ग ॥ १४ ॥
(अनुष्टुप्‌)
कल्याण इच्छिता विप्रे दुःस्वप्न शांति इच्छिता ।
सकाळी उठुनी याचा पवित्र पाठ योजिने ॥ १५ ॥
परीक्षिता ! गजेंद्राची प्रसन्न हो‌उनी स्तुती ।
स्वयेचि सर्व लोकांना श्रीहरी वदला असे ॥ १६ ॥
श्री भगवान म्हणाले -
पहाटे एकचित्ताने स्तुती माझी नि ही तुझी ।
सरोवर गिरी गुंफा वन वेत नि कर्दम ॥ १७ ॥
वेळुंचे बेट नी दिव्य गिरीशिखर नी तरू ।
माझे ब्रह्मा शिवो स्थान ते धाम क्षीरसागरू ॥ १८ ॥
श्वेतद्वीप प्रकाशी ते श्रीवत्स कौस्तुभोमणी ।
गदा कौ‌मुदि माझी नी श्रीसुदर्शन चक्र हे ॥ १९ ॥
पांचजन्य गरूडो हा कालस्वरुप शेषजी ।
लक्षुमी नारदो ब्रह्मा शिवो प्रल्हाद मत्स्य तो ॥ २० ॥
वराह कूर्म इत्यादी श्रेष्ठ पुण्यमयी कथा ।
चंद्रमा सूर्य नी अग्नी ॐकार मूळ प्रकृती ॥ २१ ॥
सत्य गो द्विज नी धर्म दक्षपुत्रीसती तशी ।
कश्यपो सोम नी गंगा नंदा नी यमुनाहि ती ॥ २२ ॥
तथा ऐरावतो आणि भक्त ध्रुवशिरोमणी ।
सप्तर्षी नल जनको युधिष्ठिर महामहिम्‌ ॥ २३ ॥
स्मरता सुटतो जीव पापाच्या बंधनातुनी ।
सर्वच्या सर्व ते माझे रूप माझेचि जाणणे ॥ २४ ॥
गजेंद्रा प्रिय भक्ता रे ! पहाटेस उठोनिया ।
तुझी माझी स्तुती गातो स्तवितो मज जो सदा ॥
मृत्युच्या समयी शुद्ध बुद्धी मी दान त्यां करी ॥ २५ ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
परीक्षिता ! ह्रषीकेशे देवतांना कथोनिया ।
आनंदे शंख फुंकोनी गरुडावरि बैसला ॥ २६ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर चवथा अध्याय हा ॥ ८ ॥ ४ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP