समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध सातवा - अध्याय ५ वा
हिरण्यकश्यपूकडून प्रल्हादाच्या वधाचा प्रयत्न -
श्रीनारद सांगतात -
दैत्याने भगवान् शुक्रा पौरोहित्य दिले असे ।
शंड अर्मक या नामे शुक्राचार्यसुतो द्वय ॥१॥
प्रासादापासि राहोनी राज अर्थ निती तदा ।
निती नैपुण्य प्रल्हादा शिकवू लागले पहा ॥२॥
प्रल्हाद गुरूचे पाठ ऐके सांगे त्वरीतची ।
परी ते नावडे त्यासी खोटा स्व-पर आग्रह ॥३॥
पिता तो एकदा पोटी प्रल्हादा घेवुनी पुसे ।
सांग बाळ तुला काय खरेच आवडे जगी ॥४॥
प्रल्हाद म्हणाला -
(इंद्रवज्रा)
त्या मी-पणाने अतिदुःखि प्राणी
ते मूळ त्यांच्या पतनासि होय ।
अंधारकूपा परि गेह सर्व
त्यजोनि जाता हरिसी भजावे ॥५॥
श्रीनारद म्हणाले -
(अनुष्टुप्)
प्रशंसा शत्रुची ऐसी ऐकता दैत्य हासला ।
परबुद्धे अशी बाळबुद्धि ही नासते पहा ॥६॥
वाटते विष्णुपक्षाचा कोणी वेष करोनिया ।
असता बोलला कोणी, दुर्लक्ष्ये बिघडेल हा ॥७॥
गुरूच्या घरि प्रल्हादा दैत्ये धाडियले जधी ।
चुचकारूनिया गोड शब्दाने गुरू तो पुसे ॥८॥
वत्सा भद्र तुझे होवो सांग खोटे नको वदू ।
बुद्धी उल्टी कशी झाली बाळाची बुद्धि ना अशी ॥९॥
कुलनंदन प्रल्हादा गुरू मी जाणु इच्छितो ।
स्वताची का अशी बुद्धी का अन्ये बहकीयले ॥१०॥
प्रल्हाद म्हणाला -
मोहाने ग्रासिता बुद्धी दुराग्रह ममत्वि तो ।
मी त्या मायापती देवा भगवंतासची नमी ॥११॥
भगवान् पावतो तेंव्हा पाशवीबुद्धि नष्टते ।
पशुबुद्धि मुळे प्राण्या भेदभावचि होतसे ॥१२॥
(इंद्रवज्रा)
आत्माचि आहे परमात्मरूप
अज्ञानि भेदे वदती निराळा ।
मोहे कळेना विधि आदिकासी
तो ईश बुद्धी बिघडी अशी की ॥१३॥
(अनुष्टुप्)
गुरूजी ! चुंबकापासी आकर्षे लोह ते जसे ।
स्वच्छंदे चक्रपाणीसी तसा मी वशीभूत हो ॥१४॥
नारद सांगतात -
बोलता गुरूसी ऐसे प्रल्हाद गप्प राहिला ।
पुरोहित पराधीन राजसेवेत तत्पर ॥
क्रोधाने झिडकारोनी प्रल्हादा वदला असे ॥१५॥
छडी आणा कुणी माझी कलंक मज लावि हा ।
कुलांगार अशा पुत्रा दंड हा उपयुक्तची ॥१६॥
चंदनीवंशि दैत्याच्या बाभूळ जन्मली कशी ।
या वना विष्णु भक्तांची कुर्हाड मूळ छेदिते ॥
नादान मूल हे त्यांचे सहाय्या बेटची बने ॥१७॥
या परी धाक देवोनी गुरूजींनी परो परी ।
धर्मार्थ काम संबंधी बोधिले धमकावुनी ॥१८॥
प्रल्हादे जाणिली सर्व पोथी ती गुरूची तदा ।
गुरू ते घेवुनी आले मातेच्या पुढती तया ॥
मातेने घातले स्नान कपडे घातले तया ।
सजवोनि असे बाळा पित्याच्यापासि आणले ॥१९॥
पितया वंदिले बाळे दैत्य आशिष बोलला ।
प्रेमाने भेटला बाळा हृदयी प्रेम दाटले ॥२०॥
प्रल्हादा अंकि घेवोनी दैत्याने शीर हुंगिले ।
प्रेमाने भिजले नेत्र तदा पुत्रासि तो वदे ॥२१॥
हिरण्यकश्यपु म्हणाला -
प्रल्हादा रे चिरंजीव गुरूने काय ते तुला ।
शिकविले दिना माजी चांगले सांग काय ते ॥२२॥
प्रल्हाद म्हणाला -
पिताजी हरिची भक्ती आहे नवविधा अशी ।
श्रवणे कीर्तने रूपा नामदी स्मरणे तया ॥२३॥
सेवा पूजा नि वंदावे दास्य सख्य निवेदन ।
अशी नवविधा भक्ती करी तो शिकला पहा ॥२४॥
पुत्राचे शब्द ऐकोनी क्रोधे ओठ थरारले ।
हिरण्यकश्यपू तेंव्हा गुरूपुत्रासि बोलला ॥२५॥
अरे नीच द्विजा ऐसे कर्तृत्व काय हे तुझे ।
माझा धाक न मानोनी हीन शिक्षण तू दिले ॥
अवश्य शत्रूचा होसी तू तो आश्रित येथला ॥२६॥
जगात असले कैक मित्राचे सोंग घेवुनी ।
शत्रूचे साधिती कार्य पितळो उघडे पडे ॥
समयी पाप रोग्याच्या स्वरूपे नागवे करी ॥२७॥
गुरूपुत्र म्हणाले -
(इंद्रवज्रा)
न बोललो आम्हि न अन्य कोणी
तया अशी बुद्धि न कोणि केली ।
स्वभाव त्याचा परि जन्मजात
व्हा शांत आम्हा नच दोष द्दावा ॥२८॥
श्रीनारद सांगतात -
(अनुष्टुप्)
गुरूजी बोलता ऐसे प्रल्हादा दैत्य तो पुसे ।
कांरे अहीत बुद्धि ही सांग कोठोनि घेतली ? ॥२९॥
प्रल्हाद म्हणाला -
(इंद्रवज्रा)
जगातले लोक पिसेचि झाले
ते चावति चावुनि घेति नित्य ।
अंकीत ना ते विषयो तयांच्या
भोगात नर्की फिरूनीहि जाती ।
आसक्त त्यांची नच बुद्धी जाते
आपैसि श्रीकृष्ण हरी पदासी ।
त्यांना तसे ते शिकणेचि लागे
किंवा अपूल्यापरि संग व्हावा ॥३०॥
जे मूर्खतेने विषयासि इष्ट
मानून अंधार कुपात जाती ।
जे वेदकर्मी अडकून घेती
त्यांना न ठावे हरि हाच स्वार्थ ॥३१॥
बुद्धी जयांची पदपद्म स्पर्शी
न जन्ममृत्यू भय ही न त्याला ।
जे संतपायीं पडले कधी ना
ते काम्यकर्मी हरि त्यांस कैचा ॥३२॥
(अनुष्टुप्)
एवढे बोलुनी पुत्र पुन्हा गप्पचि राहिला ।
मांडीचा पुत्र त्या दैत्यें पृथ्वीसी आप्टिला पहा ॥३३॥
न साही बोल बाळाचे क्रोधाने लाल जाहला ।
दैत्यांनो ठार हा मारा वदला दैत्य तेधवा ॥३४॥
ज्याने मारियला काका त्याचाचि दास ज्या परी ।
पायासी पूजितो नित्य पोटी का विष्णु जन्मला ॥३५॥
विश्वासाचा नसे हा तो पाचव्या वर्षि प्रेम ते ।
पित्याला त्यागिले याने कृतघ्न भलताच हा ॥
कद्रू विष्णू असाची तो करील हित काय ते ॥३६॥
(इंद्रवज्रा)
न लागते औषधि पथ्य खाता
अहीत्र पोरे जणु घोर रोग ।
अंगेचि नासे जर अंग अन्य
चतूर कापी तरि अंग रोगी ।
ते कापित्याने मग अन्य देह
जगे सुखाने उरल्या आयुष्यीं ॥३७॥
(अनुष्टुप्)
पुत्राचे रूप घेवोनी शत्रू कां पातला असे ।
योग्याला विषयेंद्रीय अनिष्ट ठरती तया ॥
अनिष्ट मज हा तैसा खाता वा झोपल्यावरी ।
कधीही मारणे याला उपाये कोणत्याहि त्या ॥३८॥
राजाने करिता आज्ञा विक्राळ दैत्य तेधवा ।
दाढी लाल मिशा ज्यांच्या हाती त्रिशूळ घेउनी ॥३९॥
मारा कापा अशा शब्दे ओरडू लागले पहा ।
शांत बाळासि ते सारे त्रिशूळे टोचु लागले ॥४०॥
प्रल्हादे आपुले चित्त परमात्म्यात लाविले ।
सर्वात्मा शक्तिआधार मन वाणी अगोचर ॥
म्हणोनी फसले यत्न प्रल्हादा मार ना बसे ।
मोठे उद्दोग धंदे ते अभाग्याचेचि व्यर्थ जै ॥४१॥
युधिष्ठिरा शुळाने त्या प्रल्हादा परिणाम ना ।
साशंकता तदा दैत्य हट्टाने यत्नि लागला ॥४२॥
रगडी हत्तिच्यापायी विषारी सर्प डंखिले ।
निर्मिली राक्षसी कृत्या पहाडाहुनि लोटला ॥
अंधारी कोंडिला वीष देवोनी अन्न ना दिले ॥४३॥
बर्फी अग्नीतही टाकी समुद्रीं ढकली कधी ।
कधी वार्यात सोडी नी शिळेच्या खालि दाबिला ॥
परी निष्पाप पुत्राचा न झाला केस वाकडा ।
विवशता बघोनिया दैत्य चिंतीत जाहला ॥
शोधुनी न मिळे त्याला मारण्या कांहि साधन ॥४४॥
विचार करि तो चित्ती याला मी बोललो बहू ।
वधिण्या यत्नही केले वाचे हा एकटा कसा ॥४५॥
असूनी बाळ हा राही निःशंक मजला तसा ।
समजूत यया अंगी सामर्थ्य निश्चये असे ॥
शुनःशेपा परी हा ही घेईल बदला तसा ॥४६॥
कुणाची या भिती नाही मृत्यु तो स्पर्श ना करी ।
शक्तीचा थांगही नाही माझा मृत्यु यया करे ॥
होईल अथवा ना हो दोन्हीही शक्य ते असे ॥४७॥
विचारे सुकले तोंड शंड - बंधूनि पाहिले ।
एकांति गाठिला दैत्य वदले त्यास हे असे ॥४८॥
(इंद्रवज्रा)
स्वामी तुम्ही तो विजयी जगाचे
ते लोकपालो थरकांपात ।
आम्हा न वाटे मुळि कांहि चिंता
खेळी न कांही घडते अनिष्ट ॥४९॥
पाशात ठेवा वरूणासवे हा
आचार्य येतील तदा वयाने ।
वाढेल तेंव्हा गुरूपाद सेवा
करोनि होई मग बुद्धि शुद्ध ॥५०॥
(अनुष्टुप्)
ठीक हे वदला दैत्य मानी गोष्ट तयाचि ती ।
करावा बोध हा ऐसा जो धर्म पाळिती जन ॥५१॥
राजा ! त्या पाठशाळेत नेवोनी गुरूजी तया ।
धर्मार्थ काम यांचेच शिक्षणा देउ लागले ॥५२॥
तीन या पुरूषार्थाचे नावडे त्यास शिक्षण ।
शिक्षण बोध त्या होई विषयी वासना जया ॥५३॥
एकदा गुरूजी जाता निघोनी स्वगृहा कडे ।
प्रल्हादा अन्य मित्रांनी खेळाया बाहिले असे ॥५४॥
तेंव्हा यानेच त्यांना तै गोड शब्दात बाहुनी ।
प्रसन्न होउनी चित्ती हासुनी ज्ञान बोधिले ॥५५॥
निरागस असे सर्व बुद्धि दूषित ती नसे ।
आदरे बसले सर्व खेळणे सोडुनी तिथे ॥५६॥
प्रेमाने बघती बाळे ऐकाया उपदेश तो ।
प्रेमी तो भक्त प्रल्हाद मैत्रभावेचि बोलला ॥५७॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर पाचवा अध्याय हा ॥ ५ ॥ ५ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|