समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध सहावा - अध्याय १० वा

देवतांकडून दधीची ऋषीच्या अस्थिपासून वज्राचे निर्माण
आणि वृत्रासुराच्या सेनेवर आक्रमण -


श्रीशुकदेव सांगतात -
(अनुष्टुप्)
ऐसे इंद्रासि सांगोनी श्रीहरी व्ह्सिवभावन ।
समोर देवतांच्या त्या अंतर्धानहि पावला ॥ १ ॥
उदार दधिचीपाशी आज्ञा मानोनि देव ते ।
गेले नी याचिले त्यासी आनंदे बोलले ऋषी ॥ २ ॥
देवतांनो ! तुम्ही नेणा मरता काय कष्ट ते ।
अतीव साहने कष्ट मूर्च्छेने देह हा सुटे ॥ ३ ॥
जगावे वाटते त्यासी अमूल्य देह त्यासि हा ।
मागता जरि तो विष्णू देह हा कोण देइ त्यां ॥ ४ ॥
देवता म्हणाल्या -
ब्रह्मन् ! उदार तो तुम्ही थोर संत प्रशंसिती ।
जीवांचे हित जे त्यासी नकार नच द्या कधी ॥ ५ ॥
स्वार्थी याचक ते होती दात्याचे मन नेणती ।
कळल्या नच तो मागे दाता संकट नेणतो ।
म्हणॊनी पुढचा मागे अन्यथा नच मागतो ॥ ६ ॥
दधीचि ऋषि म्हणाले -
धर्माच्या गोष्टि ऐकाव्या म्हणोनी मी उपक्षिले ।
घ्या हे शरीर त्यागी मी प्रीय ते त्यागिणे असे ॥ ७ ॥
दया हा तनुचा धर्म विनाशी देह हा असे ।
दयेने यश ना घेता झुडूप तनु ती जशी ॥ ८ ॥
अविनाशी असा धर्म थोरांनी पाळला असे ।
सुखदुःख जिवांचे ते मानणे आपुलेच की ॥ ९ ॥
क्षणाचे धन पुत्रादी तनू ही क्षणभंगुर ।
कामाचे तू दुजा लागी कद्रू ते नच जाणती ॥ १० ॥
श्रीशुकदेव सांगतात -
अथर्ववेद दधिच्ये निश्चयो करिता मनीं ।
लीन तो हरिसी झाला टाकिला जडे देह ही ॥ ११ ॥
इंद्रीय मन नी प्राण बुद्धी संयत होय तै ।
दृष्टी तत्त्वमयी आणि बंधमुक्तचि ते तसे ।
भगवत्‌प्रीय ते झाले सहजी तनु ती सुटे ॥ १२ ॥
भगवत्‍६शक्ति घेवोनी बलिष्ट इंद्र जाहला ।
विश्वकर्मा कडोनीया करोनी वज्र घेतले ॥ १३ ॥
ऐरावतीं बसोनीया घेतले देवसैन्य नी ।
पाहता इंद्र हा ऐसा ऋषिंनी स्तोत्र गायिले ॥ १४ ॥
हर्षाने बोलल हल्ला काळासी रुद्र क्रोधि जै ।
तदा मोठ्यांचि सैन्याने वृत्रासुरहि पातला ॥ १५ ॥
त्रेतायुगासि प्रारंभ वैवस्वत् मनवंतरे ।
नर्मदा तटि तै दैत्य-देव संग्राम जाहला ॥ १६ ॥
देवेंद्र शोभला वज्रे आदित्य वसु रुद्र नी ।
पितृ अग्नी मरुद् सिद्ध साध्य नी विश्वदेवही ॥ १७ ॥
प्रभेने शोभले सर्व इंद्राचे सैन्य हे असे ।
वृत्रासुर बघोनिया चिडला बहु तो मनी ॥ १८ ॥
तेव्हा नमुचिद्वीमूर्धा अनर्वा शंबरो तसा ।
ऋषभो अंबरो हेती हयग्रीव नि उत्कल ॥ १९ ॥
प्रहेती वृषवर्वा नी पुलोमा नी अयोमुख ।
विप्रचित्ती शिराशंकू सुमाली मालि नी तसे ॥ २० ॥
हजारो दैत्य नी यक्ष हेमालंकार लेवुनी ।
जाहले पुढती सारे देवेंद्रा रोधु लागले ।
मृत्यूचा तै नसे देवा भयाचा लवलेश ही ॥ २१ ॥
सिंहनाद करोनीया घमेंडी आसुरे तदा ।
मोठ्याचि सावधानीने देवांना त्या प्रहारिले ॥ २२ ॥
परीघ तोमरे बाण गदा भाले नि मुद्‌गर ।
परशू शूल नी तोफा भुशुंड्यादी हि अस्त्र नी ।
शस्त्रांना सोडिले दैत्ये देवतांवरि योजुनी ॥ २३ ॥
वर्षाव कैक शस्त्रांचा देवता झाकल्या तये ।
व्यापता नभ मेघांनी तारांगण जसे लपे ॥ २४ ॥
अस्त्रांची वृष्टि ती सर्व देवांना स्पर्शिली नसे ।
हाताच्या लाघवे त्यांनी आकाशी मोडिले लिले ॥ २५ ॥
संपता अस्त्र जै सर्व वृक्ष पाषाण पर्वत ।
दैत्यांनी वर्षिता देवे पहिल्या परि मोडिली ॥ २६ ॥
(इंद्रवज्रा)
वृत्रासुरे पाहियले कि अस्त्रे
    त्या देवतांना नच त्रास देती ।
या पर्वतांनी नच चेपती ते
    भ्याला मनी स्वस्थ बघोनि देवा ॥ २७ ॥
त्या देवतांच्या वरि अस्त्र जे जे
    योजियले ते तर नष्ट झाले ।
भक्तासि जैसे अतिहीन बोल
    न त्रासिती त्या जर कृष्ण रक्षी ॥ २८ ॥
निराश झाला हरिद्वेषि दैत्य
    तै शौर्य नी गर्व जिरोनि गेले ।
साथी तयाचेहि पळोनि गेले
    त्या देवतांनी बळ संपवीले ॥ २९ ॥
ते सर्व योद्धे भयभीत झाले
    युद्धीय क्षेत्रातुनि ते पळाले ।
बघोनि वृत्रासुर ही अवस्था
    हासोनि ऐसे मग बोल बोले ॥ ३० ॥
पाहोनि ऐशा समयास त्याने
    नमूचि विप्रचिति यास बोले ।
हे आसुरांनो नच जा पळोनी
    ऐका अशी एकचि गोष्ट तुम्ही ॥ ३१ ॥
जो जन्मला त्या मरणे असेची
    मृत्यू मधोनी न सुटे कुणीही ।
युद्धात मेला तर स्वर्ग लाभ
    यामृत्युला कोण चतूर त्यागी ॥ ३२ ॥
ते दोन मृत्यू जगि थोर जाणा
    जिंकोनि प्राणा हरिचिंति आणि ।
सेने पुढे राहुनि मृत्यु तैसा
    कां त्यागिता हा शुभवेळ मृत्यू ॥ ३३ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर दहावा अध्याय हा ॥ ६ ॥ १० ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP