समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध पाचवा - अध्याय २१ वा

सूर्याचा रथ व त्याच्या गतिचे वर्णन -

श्री शुकदेवजी सांगतात -
(भृंगनाद)
राजन् ! परिमाण नी लक्षणांसहित या
भूमंडलाचे कुल विस्तारे जे तुम्हा बोललो ॥ १ ॥
याचे अनुसारे विद्वान् द्युलोकाचेही परिमाण
वदती । परी हरभरे वाटाणे या द्वीदलाचे एक
दल जाणिता दुजे कळे, त्या परी भूर्लोकाच्या
परिमाणेचि द्यूलोकाचेही परिमाण जाणणे । या
दोहोंच्या मध्ये अंतरीक्ष लोक । हे या दोहोंचे
स्थान संधिचे ॥ २ ॥
याचे मध्यभागी स्थित ग्रह नी नक्षत्रांचे
अधिपती भगवान् सूर्य आपुल्या तापे नी
प्रकाशे तिन्ही लोकां तापिती नी प्रकाशिती ।
ते उत्तरायण दक्षिणायन नी विषुवत् नावाच्या
क्रमशः मंद उंच-नीच नी समान स्थानी जाउनी
दिन-रात्रीसी मोठे लहान वा समान करिती ॥ ३
जेंव्हा सूर्यभगवान् मेष वा तूला राशीसी येती,
तेंव्हा दिन-रात्र समान होतसे, जेंव्हा वृषादी
पाच राशिसी चालती तदा प्रतिमास रात्रिची
एकेक घडी कमी होतसे नी त्या गणितें दिन ही
वाढती ॥ ४ ॥
जधी वृश्चिकादी राशीत चालती तदा रात्रीत
या उलटा बदल होतसे ॥ ५ ॥
या प्रकारे दक्षिणायन आरंभ हो पर्यंत दिन
क्रमे वाढती नी उत्तरायण प्रारंभ हो पर्यंत त्या
रात्री ॥ ६ ॥
या प्रकारे पंडित जन मानसोत्तर पर्वतावरी
सूर्याच्या परिक्रमेचा मार्ग नऊ कोटी एक्क्यान्नव
लक्ष योजने वदती । त्या पर्वतावरी मेरुच्या
पूर्वेसी इंद्राची देवधानी दक्षिणी यमराजाची
संयमनी पश्चिमीं वरुणाची विम्लोचनी नी उत्तरी
चंद्राची विभावरी अशा पुर्‍या । या पुर्‍यात
मेरुच्या चोहो बाजुसी वेळोवेळी सूर्योदय,
मध्यान्ह, सायंकाल नी अर्धरात्री होती, यये
कारणे संपूर्ण जीवांची प्रवृत्ती वा निवृत्ती
होतसे ॥ ७ ॥
राजा ! जे जन सुमेरुवरी राहती तयां तो सूर्यदेव
सदा माध्यान्ही राहुनी तापिती । ते आपुल्या
गतिनुसार अश्विनी आदी नक्षत्रांकडे जाती नी
जरी मेरुच्या डाव्या बाजूने चालती तरीही
सार्‍या ज्योतिर्मंडला फिरविणार्‍या वायुद्वारा
फिरविता तयाच्या उजव्या बाजूने चालता
दिसती ॥ ८ ॥
ज्या पुरीसी सूर्यभगवान् उगवती, तयाच्या
दुसरीकडील पुरीत सूर्यभगवान् अस्त पावती
नी तेथे लोकांच्या शरीरा घाम घाम करिती
तयाच्या ठीक समोर अर्धीरात्र होता लोक
निद्रावश असती । ज्या लोकां माध्यान्ही ते
स्पष्ट दिसती तेचि जेंव्हा सूर्य सौ‌मदिशीं जाता
तयाचे दर्शनही न घडे ॥ ९ ॥
सूर्यदेव जधी इंद्रपुरीहुनी यमपुरीकडे निघती
तदा पंधरा घडिसी ते सव्वादोन कोटि नी साडे
बारालक्ष योजनांहुनी पंचविस हजार योजने
अधिक चालती ॥ १० ॥
पुन्हा या क्रमे ते वरुण नी चंद्रमाच्या पुरी पार
करुनि पुन्हा इंद्रपुरीस पोचती । या परी
चंद्रमादी अन्य ग्रहही ज्योतिश्चक्रीं अन्य
नक्षत्रांच्या उदय नी अस्त पावती ॥ ११ ॥
यापरी भगवान् सूर्याचा वेदमय रथ एक मुहूर्ती
चौतिस-लक्ष आठशे योजनांच्या गणिते चाले
नी चारी पुर्‍यांसही फिरती ॥ १२ ॥
यासी संवत्सर नावाचे एक चक्र म्हणती । मास
रुप बारा आरे, ऋतुरुप पुठठे सहा तीन चौ‌मासे
तीन आवन । या रथाची आखरी (धुरी) एक
टोके मेरुपर्वत शिखरावरी नी दुसरे मानसोत्तर
पर्वती । तयासी लावियेलेले हे चक्र तेल्याच्या
घाण्यासम मानसोत्तर पर्वतावरी फिरे ॥ १३ ॥
या धुरीचा मूळ जिथे जुळे तो आणखी धुरी
एक । जी लांबीने चौथाई हिच्या । हिच्या
वरच्या भाग तैलयंत्रासम ध्रुवलोकी
लागला ॥ १४ ॥
या रथीं बैसण्या स्थान छत्तिस योजने लांब नी
नवू लक्ष योजने रुंद । याचे जूही छत्तिस लक्ष
योजनेचि लांब । ययासी अरुण नावाच्या
सारथ्याने गायत्र्यादी छंदाच्या नामाचे सात
अश्वही जुंपिले तेचि या रथीं बैसल्या सूर्यासी
घेउनी चालती ॥ १५ ॥
सूर्यदेवा पुढे समोर तोंड करुनी बसलेला अरुण
करी सारथ्य ॥ १६ ॥
भगवान् सूर्याच्या पुढे अंगुष्ठपेर्‍या एवढे साठ
सहस्त्र वालखिल्यादी ऋषी नियुक्त स्वस्ति
वाचना । ते तयांची करिती स्तुति ॥ १७ ॥
यांच्या व्यतिरिक्त ऋषी गंधर्व अप्सरा नाग यक्ष
राक्षस नी देवता ज्या मिळुनी चौदा परी जोडी
मुळे सात गण संबोधन-प्रत्येक मासीं भिन्न
भिन्न कर्माने भिन्न भिन्न नाम धारण करणारे
आत्मस्वरुप भगवान् सूर्याची दो दो मिळुनि
उपासना करिती ॥ १८ ॥
या परी भगवान् सूर्य भूमंडलाचे नवूकोटी
एक्क्यान्नव लक्ष योजने लांब परिघीं क्षणी दोन
हजार योजने पार करिती ॥ १९ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर एकविसावा अध्याय हा ॥ ५ ॥ २१ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP