समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध पाचवा - अध्याय ८ वा

भरतजी मृगमायेत फसतात, मृगयोनीत जन्म मिळतो -

श्री शुकदेवजी सांगतात -
(भृंगनाद)
एकदा भरतजी गंडकीस्नान करुनि नित्य नैमित्तिक
कर्म करुनि शौचादिकृत्यीं निवृत्त हो‌उनी तीन मुहूर्ते
नदी किनारी प्रणवा जापत बैसले ॥ १ ॥
राजन् यावेळी तृष्णे व्याकुळ हरिणी एकटी
पाणी पिण्या नदीकिनारी पातली ॥ २ ॥
जल पिंऊ लागताचि तिच्या भयंकर सिंहगर्जना
कर्णी पडली ॥ ३ ॥
हरिण जातीस्वभावतःचि भयभरित असते । ती
तो प्रथमेचि कावरी बावरी होवोनी इकडे
तिकडे पाहत तेथ पातली । आता तो तिच्या
कर्णीं भयंकर सिंहगर्जना पडली नी तिचे
काळीज धड्धडू लागले नि नेत्रहि कावरे बावरे
जाहले । तहानहि भागली नच परी प्राणावरी
बेतले । तेंव्हा तिने भयवश एकाकी नदीपार
करण्या मारिली उडी ॥ ४ ॥
उडी मारिताच तिच्या पोटीचा गर्भभये
योनिमार्गे जळात पडला ॥ ५ ॥
त्या कृष्णमृगीचा गर्भ पडला अकस्मात घेता
उंच उडी, सिंहभये अति पीडिता जाहली ।
आता तर कळपातुनीहि चुकली नि कुठे गुंफेत
जाउनी मृत जाहली ॥ ६ ॥
राजर्षी भरताने पाहिले की बिचारे पाडस प्रवाही
पडुनि वाहते । त्यामुळे तया बहुत दया वाटली नि
मुलाप्रमाणे त्या पाडसा घेउनी आश्रमी पातले ॥ ७ ॥
त्या मृगपाडसी भरताची ममता उत्तरोत्तर वाढली ।
ते नित्य त्याच्या खाण्या-पिण्याच्या व्यवस्थीं,
व्याघ्रादी पासुनी रक्षणा, लाडाने चोंबाळणे अशा
चिंतेत बुडुनी राहिले । थोडयाचि दिनी त्यांचे यम-
नियम नि भगवत्‌पूजादी आवश्यक कृत्ये एकेक
करुनि सुटूं लागले नि अंती सर्वचि सुटले ॥ ८ ॥
तयांना ऐसाचि विचार पटू लागला की अहो
खेदाची गोष्ट की या बिचार्‍या पाडसा आपुल्या
कळपातुनि कालचक्रवेगाने माझ्या शरणि
धाडिले । हा तो मलाच आपुले माता पिता भाऊ
भाउकी नि सखा सोबती मानितो । याला न
माझ्या शिवाय माहित कुणी नि त्याचा
माझ्यावरि बहुतचि विश्वासहि । मीहि जाणितो,
शरणागताच्या उपेक्षी दोषहि बहू । मी यासाठी
याचे सर्व दोषबुद्धि त्यजुनि प्रतिपालन नि चोज
पुरवियलेचि पाहिजे ॥ ९ ॥
निश्चितचि दीनरक्षक, परोपकारी, शांतस्वभावी,
सज्जन, शरणागत भयहरणार्थ अधिकात अधिक
स्वार्थाची तमा न बाळगिती ॥ १० ॥
यापरी राजा भरत हरिण आसक्तीत राहुनी विचार
करिता बसत झोपत थांबत नी भोजन समयीं
तयाचे चित्त पाडसीं स्नेहपाशे गुंतुनीच राही ॥ ११ ॥
जेंव्हा ते दर्भ पुष्प फल मूलादी साहित्य नि
समिधा पात्रादी आणण्या जाती, तेंव्हा कुत्रे
नी लांडगे यांच्या भये पाडसा नेती सोबती
वनीं ॥ १२ ॥
मार्गी कोमल तृणांकुरादी पाहुनि हरित पाडस
थांबताचि ते अतीशय प्रेमपूर्वक हृदये,
दयावश तया खांदी घेउनि चालती । या परी
तया कधी कुशित, कधी मांडीवरि घेण्यातचि
तयां लाभे बहु सुख ॥ १३ ॥
नित्य नैमित्तिक कर्म समयींही राजाधिराज भरत
मधुनि-मधुनि ऊठ-उठुनि त्या मृगबालका पाहती
नि जेंव्हा तयांना तो दिसे तदाचि मिळे तयां शांति ।
त्यावेळी ते तया मंगलकामना करीत म्हणती-
‘मुला सर्वत्र हो कल्याण तुझे’ ॥ १४ ॥
एकदा तो न दिसला, तदा सर्वधन लुटल्या परि
उद्‌विग्न होती नि तया विरहे व्याकुळ, संतप्त
नि करुणावश झाले नी शोकमग्न हो‌उनीच वदले ॥ १५ ॥
"अहो ! काय सांगावे ? ते मातृहीन पाडस मला
अनार्या किरातापरि ठग, पुण्यहीना वरि साधु
प्रमाणे अपराध क्षमुनि (विसरुनि) येईल परत
कां ॥ १६ ॥
काय मी पुन्हा ईशकृपे तया या आश्रमी पाहू
शकेल कां हिरवी हिरवी हरळी खाताना ॥ १७ ॥
असे तर न हो की कोणी लांडगा कुत्रा फाडणारे
वाघ सूकरादी किंवा एकटा फिरता खातिल तया ॥ १८ ॥
अरे ! संपूर्ण जगत्‌कल्याणा प्रगटणारे वेदत्रय
रूप भगवान् सूर्य इच्छिति परी अद्यापी न ते
पाडस परते ॥ १९ ॥
कां तो हरिणराजकुमार पुण्यहीन माझ्यापाशी
येउनी पाडस उचित क्रीडा करुनि मला स्वता
आनंदी करिल ? ॥ २० ॥
अहो ! मी प्रणयकोपी कोपता खोटी समाधी
लावुनि दृष्टि मिटुनि बसता तो जलबिंदूसमान
आपुल्या कोमल श्रृंगे मला होता खाजवित की ॥ २१ ॥
मी कधी दर्भावरि हवनसामुग्री ठेविता तो
दातांनी ओढिता अपवित्र करी तेंव्हा मी त्यास
दटाविताचि तो ऋषिपुत्राप्रमाणे भिउनि इंद्रिये
एक करुनि बसे जाउनि गप्प की ॥ २२ ॥
(जमिनीवर त्याच्या खुरांची चिन्हे पाहून)
अहो ! या तपस्वी पृथिवीने ऐसे कोणते तप
आचरिले, ज्या योगे मी जे मृग धन लुटल्याने
दीन व्याकुळ जाहलो त्या कृष्णसार किशोराची
सान सुंदर सुखकारी कोमल पदचिन्हे मज
मृगधनमार्ग तिने दाखवावा, नि ती आपुल्या
शरीरी पदचिन्हाविभूषित करुनि स्वर्ग नी
अपवर्ग इच्छुक द्विजां यज्ञस्थल जाहली ॥ २३ ॥
(चंद्रावर हरिणाप्रमाणे असणारा काळा डाग पाहून)
अहो ज्याची माता सिंहभये मेली, तो आज
मृगशिशू सोडुनि आश्रमा गेला चुकुनि म्हणुनि
तो दीनवत्सल नक्षत्रनाथ दया वशे रक्षा करितो
की काय ? ॥ २४ ॥
(चंद्राच्या शीतल किरणाकडे पहात )
का मी माझ्या पुत्रवियोगरूप दावानल
विषमज्वालांनी हृदयकमल दग्ध झाल्याने एका
मृगबालकाचा घेतला आश्रय । आता तो सोडोनि
गेल्याने माझे हृदय पुनश्च जळते म्हणुनि आपुल्या
शीतल शांत स्नेहपूर्ण नी वदनसलिलरूपी अमृतमय
किरणांनी मज करु लागला शांत" ॥ २५ ॥
राजन् ! यापरी ज्यांचे पूर्णत्व असंभवचि, त्या
मनोरथे भरतचित्त व्याकूळले । आपुले
मृगशावकाचे रूपी प्रतित प्रारब्ध-कर्माचे
कारणी तपस्वी भरतजी भगवत् आराधन
रूपक नी योगानुष्ठानापासुनि च्युत जाहले । ना
तो जये मोक्षमार्गीं साक्षात् विघ्नरूप जाणुनि
आपुल्यां हृदये उत्पन्न दुस्त्यज्य पुत्रादि कांही
त्यागिले, तयांची अन्य जातीय हरिणशिशुसी
ऐसी आसक्ती कैसी हो शके । या परी
राजर्षीभरत विघ्नांचा वशिभूत हो‌उनि
योगसाधनीं नि त्या मृगबछडयाच्या पालन
पोषणीं नी लालनीं-प्रेमातचि राहिले नि
आत्मरूपा विसरले । या वेळी जो टाळणे अति
कठिण, तो प्रबळ कराल काळ जसा मूषक
बिळात सर्प ये, तसा तयांच्या शिरी
पातला ॥ २६ ॥
त्या वेळी हरिणशावक तयांच्यापाशी बसला
पुत्रासम शोक हो‌उनी । याही अवस्थीं ते त्या
कडे बघत राहिले नी चित्तही लागले । यापरी
मृगचिंतनीच त्यांचा देहही सुटला । तदनंतरे
तयांना अन्य सामान्य जनांपरी मृगदेहचि
लाभला । परंतु ते पूर्ण साधकचि, त्यामुळे
तयांची पूर्वजन्मस्मृति झाली न नष्ट ॥ २७ ॥
या जन्मीही ते आपणा मृगदेह लाभला बघुनि
अत्यंत पश्चाताप करिता या परी म्हणूं लागले ॥ २८ ॥
अहो मोठया खेदाची गोष्ट की मी संयमशील
महानुभाव मार्गापासुनि पतित जाहलो । मी तो
धैर्याने सर्वचि आसक्ती त्यजुनि एकांत नी पवित्र
आश्रमी घेतला आश्रय । तिथे राहून मी
सर्वभूतात्मा वासुदेवात, निरंतर तयाचे कीर्तनात,
श्रवण-मनन नि प्रत्येक क्षणी आराधनादि केले
सफल, पूर्णभावे तया अर्पिले माझे अज्ञाचे चित्त
अकस्मात एका लहानशा पाडसा बघुनि
आपुल्या लक्ष्या पासुनि ढळले ॥ २९ ॥
यापरी मृग जाहल्या राजर्षि भरता हृदयी जे
वैराग्य जाहले त्या लपवुनि तये आपुली माता
त्याजिलि नि जन्मभू कालंजर पर्वता पासुनि
शांतस्वभाव मुनिच्या प्रिय अशा शालिग्राम
तीर्थीं जिथे भगवंताचे पवित्र क्षेत्र, पुलस्त्य नि
पुलह ऋषि आश्रमी पातले ॥ ३० ॥
काळाच्या प्रतिक्षी लागले राहुनि तिथे ।
आसक्तीचे तयां मोठेचि भय जडले । राही
एकटा, खाई वाळले गवत नी वाळली पाने नी
मृगयोनि सरण्या बसले पाहत वाट की । शेवटी
त्यांनी आपुल्या तनुचा अर्धा भाग गंडकी
नदीत बुडवुनि मृगदेहा त्यागिले ॥ ३१ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर आठवा अध्याय हा ॥ ५ ॥ ८ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP