समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ४ था - अध्याय २९ वा

पुरंजन उपाख्यानाचे तात्पर्य -

राजा प्रचिनबर्हिने विचारिले -
(अनुष्टुप्‌)
भगवन्‌ ! आपुल्या शब्दीं अर्थ ना कळता मला ।
तात्पर्य जाणिती ज्ञानी आम्ही ना कर्ममोहित ॥ १ ॥
नारदजी सांगतात -
नृपा पुरंजनो जीव रचितो देहही पुरी ।
एक द्वी त्री चतुष्पाद बहुपाद न पाद जै ॥ २ ॥
अविज्ञात सखा हा तो ईश्वरो जाणिजे तया ।
तयासी गुण ना नाम कर्माचा खेळ ना कळे ॥ ३ ॥
सुख दुःखादि भोगांना जीवाने इच्छिले तदा ।
नऊद्वारी असा देह मानवीय स्विकारला ॥ ४ ॥
अविद्या बुद्धि जाणावी पुरंजनिच स्त्री तशी ।
ममत्व आणिते हीच हिच्याने भोग भोगितो ॥ ५ ॥
इंद्रिये दश ते मित्र तशाच वृत्ति मैत्रिणी ।
पाच वृत्तींसवे प्राण फणेंद्र पाच वृत्तिचा ॥ ६ ॥
महाबळी! मना जाणी दशेंद्रीयास वेगळे ।
शब्दादी विषयी देश पांचाल त्यात ही पुरी ॥ ७ ॥
एकेका स्थळी ते द्वार दो नेत्र छिद्र नासिकी ।
कर्ण दो मुख नी लिंग नववे द्वार ते गुदा ॥
यातुनी विषया भोगी जीव बाहेर जाउनी ॥ ८ ॥
मुख नेत्र नि ते नाक पूर्वेचे द्वार पाच नी ।
उजवा दक्षिणी द्वार डाव्या कानास उत्तर ॥ ९ ॥
पश्चिमीं गुदनी लिंग द्वार दो मानिजे असे ।
खद्योताऽऽविर्मुखी नाम दो नेत्र मानणे तसे ॥
रूप विभ्राजिती देश चक्षूने बघतो तया ॥ १० ॥
नलिनी नालिनी नाक मिळे सौरभ तेथुनी ।
अवधूत सखा तेथे रसज्ञ मुखि वीपण ॥ ११ ॥
बहूदने मिळे अन्न डाव्या कानास देवहू ।
पितृहू उजव्या कानी या परी बोलिले असे ॥ १२ ॥
प्रवृत्ती नी निवृत्ती हे पांचाल दक्षिणोत्तर ।
पितृयानो देवयानो मार्गे जीव फिरोनि ये ॥ १३ ॥
लिंग हे आसुरी द्वार उपस्थेंद्रियि दुर्मद ।
नावाचा मित्र तो रही गुदा निऋति द्वार ते ॥ १४ ॥
वैशसो देश तो नर्क गुदेंद्रीयासि लुब्धक ।
आंधळे हात नी पाय ययांनी जीव आचरे ॥ १५ ॥
अंतःपुरात हृदय प्रधान मन वीशुची ।
प्रसन्न हर्ष नी मोह सत्वाने मन जाणते ॥ १६ ॥
बुद्धि ही महिषी तेथे करी इंद्रिय विकृत ।
जरी निर्गुण तो आत्मा नाचतो बुद्धिच्या सवे ॥ १७ ॥
शरीर रथ हा त्याचा इंद्रिये अश्व जाणिजे ।
ध्वजा त्रैगुण नी तैसे दोर ते पंचप्राण की ॥
पाप पुण्य असे चक्र संवत्सरीय काळ तो ॥ १८ ॥
लगाम मन हे त्याचे सारथ्थ्या बुद्धि बैसली ।
जियेचे हृदयो स्थान सुख दुःखादि दोन जूं ॥
आयुधे विषयेंद्रीय पडदे सात धातुचे ॥ १९ ॥
इंद्रियांच्या गती पाच रथीं तो मृगतृष्णित ।
अन्याये वागतो जीव त्याची ही मृगया पहा ॥ २० ॥
ज्याच्याने कळतो काळ गंधर्व चंडिवेग तो ।
तीनशे साठ गंधर्व दिन ते आयु नष्टिती ॥ २१ ॥
कालकन्या जरा साक्षात्‌ तिला कोणी पुसेचिना ।
यवनो यम तो बंधू मनिला जीव मारण्या ॥ २२ ॥
आधि व्याधीच सैनीक जीवांसी पीडिती बहू ।
मृत्यूत ओढिती शीघ्र ज्वार प्रज्वार बंधु त्यां ॥ २३ ॥
या परी जीव अज्ञानें देहाभिमानी हो‌उनी ।
आध्यात्मिक तसे अन्य ताप ते कष्ट भोगि तो ॥ २४ ॥
निर्गुणी असुनी जीव प्राणेंद्रिय तसे मने ।
मी पणे बांधितो सारे विषया चिंति नी करी ॥ २५ ॥
आत्मज्योत असोनीया परेशा नच जाणि तो ।
तोवरी प्रकृतीमध्ये बंदिस्त पूर्ण राहतो ॥ २६ ॥
गुणांच्या अभिमानाने त्रिगुणी कर्म आचरी ।
कर्मांच्या अनुसारेची भिन्न योनीत जन्मतो ॥ २७ ॥
सत्वाने स्वर्ग तो भोगी रजाने दुःख पृथ्विसी ।
तमाने शोक हो सारा या परी योनि लाभते ॥ २८ ॥
या परी पुण्य कर्माने देव मानव योनि नी ।
पशू पक्ष्यादि योनीत स्त्री-पुरूषहि जन्मतो ॥ २९ ॥
भुकेला श्वान जै हिंडे प्रारब्धे द्वार द्वार नी ।
कुठे त्यां भेटतो सोटा कुठे त्यां भात लाभतो ॥ ३० ॥
जीवही त्या परी हिंडे वासना चित्ति घेउनी ।
उच्च नीच अशा मार्गे कर्माचे भोग भोगितो ॥ ३१ ॥
दैवभूतात्म भोगात न तो केंव्हा सुटू शके ।
जरी तो सुटला वाटे तरी तो क्षण भासची ॥ ३२ ॥
शिराचे स्कंधि जै ओझे अशी निवृत्ति ती असे ।
वारिता एक दुःखाला दुसरे बसते उरीं ॥ ३३ ॥
स्वनीं स्वप्नांतरो होय स्वप्नाची सुटका नसे ।
त्या परी कर्मभोगाची कर्माने सुटका नसे ॥ ३४ ॥
स्वप्नात लिंगदेहाला नसत्या वस्तु भासती ।
तशीच दिसते सृष्टी अज्ञाने जन्म मृत्यु हे ॥ ३५ ॥
परंपरा अनर्थाची अविद्येनेचि लाभते ।
आत्मा तै मुक्तची होय हरीची भक्ति साधिता ॥ ३६ ॥
भगवान्‌ वासुदेवाचा भक्तियोगचि साधुनी ।
प्रगटे ज्ञान वैराग्य सम्यक्‌ एकाग्र साधने ॥ ३७ ॥
राजर्षी भक्तिचा भाव कीर्तनी आश्रया असे ।
श्रद्धेने कथिता तैसे ऐकता शीघ्र लाभ तो ॥ ३८ ॥
जिथे ते भक्त श्रद्धळू राहती सांगती कथा ।
तिथे हरिकथेच्या त्या नित्यची वाहती नद्या ॥ ३९ ॥
(इंद्रवज्रा)
अतृप्त चित्ते श्रवणास येती
    नामामृता प्राशुनि धन्य हो ते ।
क्षुधा तहाने भय शोक मोह
    बाधा तयांना नच हो कधीही ॥ ४० ॥
हाय ! स्वभाव प्राप्तीने क्षुधादी विघ्ननाशक ।
कथासिंधूवरी प्रेम जीव ना करितात की ॥ ४१ ॥
प्रजापतिपती साक्षात्‌ शिव स्वायंभुवो मनू ।
प्रजापती नि दक्षादी सनकादिक नैष्ठिक ॥ ४२ ॥
अंगिरा मरिची अत्री पुलस्त्य पुलह क्रतु ।
भृगु वसिष्ठ आणि मी ब्रह्मवादी मुनी गण ॥ ४३ ॥
वाङ्‌मयादीपती हेही तप पूजा समाधिने ।
धुंडोनी थकलो सारे न देखो परमेश्वरा ॥ ४४ ॥
वेद विस्तीर्ण त्यांचा तो थांग हा खेळ तो नसे
मंत्र लिंगे भजे कोणी तरी ते रूप नेणती ॥ ४५ ॥
वारंवार स्मरे त्याला भगवान्‌ पावतो हरी ।
तेंव्हा त्यां सुटका लाभे कर्माची पूर्ण ती पुढे ॥ ४६ ॥
बर्हिष्मन्‌ ! कर्ममार्गाला न मानी परमार्थ की ।
न त्याचा स्पर्शही होतो अज्ञाने भासतो तसा ॥ ४७ ॥
मलीन कर्मवादी ते वेदांसी कर्मकांडची ।
मानिती नच ते मर्म स्पष्ट कारण ते असे ॥
न जाणिती स्वरूपाला भगवान्‌ हृदयी वसे ॥ ४८ ॥
पूर्वाग्र कुश टाकोनी झाकिता भूमि नी पशू ।
मारण्या धन्यता वाटे अती उद्धट जाहला ॥
परंतू भक्तिचे गुह्य यांचा तो ठावही नसे ।
कर्म जे सत्य ते जाणा जिथे विद्या नि तो हरी ।
ज्याच्यात चित्त लागोनी पावतो ज्यात श्रीहरी ॥ ४९ ॥
हरी तो देहधारींचा आत्मा आणि नियामक ।
स्वतंत्र कारणी आहे तत्‌ पादे क्षेम या जगी ॥ ५० ॥
ज्याच्याने भय ना कोणा आत्मा तो प्रिय त्यास की ।
ऐसे जो जाणितो तोचि गुरु ज्ञानी हरीहि तो ॥ ५१ ॥
नारदजी पुढे सांगतात -
नृपा जे पुसले त्याचे पुरे उत्तर एवढे ।
साधना गुप्त नी चांग सांगतो ध्यान देइजे ॥ ५२ ॥
(वसंततिलका)
बागेत तो मृग फिरे मृगिच्या सवे नी
    दुर्वांकुरी चरत भृंगरवास ऐके ।
तै लांडगाहि टपुनी बघतो मृगाला
    व्याधेहि नेम धरिला नच गम्य त्याते ॥ ५३ ॥
(भृंगनाद)
राजन्‌ ! रुपक ध्यानि घे हरिण तू मृतप्राय
ऐसा जाणी नि विचार करुनी स्थिती आपुली ती ।
ह्या सुंदर्‍या दिसती सुंदर जै फुलेचि यांचे असे घर
जणूफुलवाटिका ती । यांच्यात राहुनी तू मध गंध
समान क्षुद्र फल जिव्हा जननेंद्रियाला जे प्रीय
भोजन तथा स्त्री संगादी तुच्छ भोग चहूकडे परि
शोधितोसी । स्त्रियांत घेरुनि सदा तुझ्या मनाला
त्यांच्यात तूचि फसवुनी तयात घेसी । स्त्री-पुत्र
मधुर भाषण भृंगगान गुंजतसे आसक्त कान श्रवणी
झाले तुझे । पुढे तुझ्या लांडगे करुनि झुंड कालांश
दिन रात्र आयु हरिति परंतु क्षिति न तुला गृह
सुखातच धुंद झाला । पाठीस काळव्याध लपुनी
करण्या शिकार टपला दूरेचि हृदया भेदु पाही ॥ ५४ ॥
(वसंततिलका)
मृगापरीच स्थिति आपुलि तू बघोनी
    घाली हृदींत मन, बांध तयास घाली ।
वृत्ती तयात रचुनी त्यजि हा प्रपंच
    जायी हरीस शरणीं तुज पावतो तो ॥ ५५ ॥
राजा प्राचीनबर्हि म्हणाला -
(अनुष्टुप्‌)
कृपेने बोधिले तुम्ही ऐकिले मी नि चिंतिले ।
कर्माचे गुरु जे माझे त्यांना ठावे नसेचि हे ॥
ठावे तो मजला त्यांनी कधी का नच बोधिले ॥ ५६ ॥
विप्रा त्या गुरुने आम्हा संशयी टाकिले बहू ।
तुम्ही तो छेदिला सर्व मोही द्रष्टेहि गुंतती ॥ ५७ ॥
कथिती वेदवादी ते त्यागिता देह हा इथे ।
इथल्या कृत कर्माचे दुज्यां जन्मी फलो मिळे ॥ ५८ ॥
कसे होईल हे ऐसे कर्मी जो देह नष्टता ।
क्षणात नष्टती कर्म मरता लाभ तो कसा ? ॥ ५९ ॥
नारदजी सांगतात -
लिंगशरीर योगाने कार्य ते जीव तो करी ।
मरता लिंग देहाला कर्माचे भोग लाभती ॥ ६० ॥
जिवंत शरिराचा तो गर्व स्वप्नात सोडिता ।
भोगितो जीव ते कर्म संस्कारी मन जै असे ॥ ६१ ॥
स्त्री पुत्रादिकीं देही ममत्व मन लाविते ।
त्यामुळे पाप पुण्यासी नेते नी भोगिते तसे ॥ ६२ ॥
ज्ञान कर्मेंद्रिया द्वारा चित्ताचे अनुमान ते ।
त्या परी वृत्तिच्या द्वारे पूर्वकर्मानुमान ते ॥ ६३ ॥
न देखो ऐकिता कानीं परी ते स्वप्नि भासते ।
आणि ती असते जैसी तसी प्रत्यंतरास ये ॥ ६४ ॥
लिंगदेहाभिमानी या जीवाच्या पूर्वजन्मिच्या ।
मनात वासना जैशा तशा त्या मिळती पुन्हा ॥ ६५ ॥
राजा ! भद्र तुझे होवो मन हे दाविते गुण ।
पूर्व नी भाविजन्माचे शरीर कायसे असे ? ॥
जयां ना पुढती जन्म विदेह मुक्ति लाभणे ।
अशाच तत्ववेत्त्यांना मनात कळते तसे ॥ ६६ ॥
असंबद्ध असे कांही दृष्टीसी स्वप्नि भासते ।
स्वप्नांचा दोष तो आहे असेही असते कधी ॥ ६७ ॥
वारंवार असे कांही भोग येती नि संपती ।
कधी ना ऐकिले पाहो असे ना स्वप्नि ये कधी ॥
याचे कारण ते ऐसे जीवाच्या सह ते मन ॥ ६८ ॥
क्रमाने भान हो सारे परी त्या भगवत्‌ कृपे ।
जगाचे भान हो सार्‍या चंद्राने राहु जै दिसे ॥ ६९ ॥
इंद्रीय मन बुद्धीने लिंग देह तयार हा ।
तो वरी नच हो मोह स्थूळ देहास मीपणा ॥ ७० ॥
मूर्च्छा सुषुप्ति नी दुःख मृत्यू नी घोर ज्या ज्वरे
व्याकूळ इंद्रिये होता मीपणा स्पष्ट ना दिसे ।
परी त्या समयासीही गर्व जो स्पष्ट तो दिसे ॥ ७१ ॥
अमावास्यी असोनीया न दिसे चंद्र जै कुणा ।
इंद्रिये ते असोनीया दिसता लिंगदेहि ना ॥ ७२ ॥
स्वप्नीचा भास तो खोटा स्वप्न भंगेचि संपतो ।
स्वप्नात सत्य तो भासे अज्ञाना भव तो तसा ॥ ७३ ॥
तन्मात्र तत्त्वरूपाने त्रिगुणी लिंग जाहले ।
चेतना शक्तिने युक्त होता त्या जीव बोलती ॥ ७४ ॥
पुरूष या मुळे भिन्न-भिन्न देहास धारितो ।
त्यागितो हर्ष नी शोक सुखदुःखादि भोगितो ॥ ७५ ॥
तृणकीट पुढे जैसे तृणासी धरिता चले ।
जीव मृत्यूचिये वेळी कर्म भोगोनि त्यागितो ॥ ७६ ॥
तोवरी नच तो अन्य नव्या देहास धारितो ।
लिंगदेही मनोराजा जीवाचा जन्मकारण ॥ ७७ ॥
भोगासी चिंतिता जीव त्याच्यासाठीच राबतो ।
कर्मात रमता अज्ञ कर्मात बद्ध राहतो ॥ ७८ ॥
बंधना तोडण्या ऐशा भगवद्‌रूप श्रीहरी ।
भजावा सर्व भावाने त्रिस्थिती तोच मांडतो ॥ ७९ ॥
मैत्रेयजी सांगतात -
विदुरा! नारदे राया जीवात्मा बोधिता असा ।
निरोप घेउनी तेव्हा सिद्ध लोकात पातले ॥ ८० ॥
प्राचीनबर्हि ही तेंव्हा पुत्रांना राज्य अर्पुनी ।
तपस्या करण्यासाठी कपिलाश्रमि पातला ॥ ८१ ॥
वीराने त्या तिथे केले चित्त एकाग्र भक्तिसी ।
आसक्ती त्यजिल्या सर्व सारुप्य पद घेतले ॥ ८२ ॥
परोक्षरूप हे ज्ञान नारदे बोधिले असे ।
ऐकता तुटती बंध लिंगदेहास जे नसो ॥ ८३ ॥
(वसंततिलका)
हे आत्मज्ञान कथिले मुनि नारदांनी
    हे श्री मुकुंद यशगान त्रिलोकि धन्य ।
आत्म्यासि शोध घडतो हरिही प्रकाशे
    ऐके तयास गति लाभ न जन्म मृत्यू ॥ ८४ ॥
(अनुष्टुप्‌)
पुरंजन गृहस्थाच्या रुपके हे परोक्ष जे ।
बोललो ज्ञान अद्‌भूत गुरुजींच्या कृपेमुळे ॥
लाभले मज हे सर्व निवृत्ती हेच सार की ।
बुद्धियुक्त जिवाने त्या गर्वाला सोडणे तसे ॥
परलोका मधे कैसे जीवासी कर्म भोगणे ।
कथेने मिटती शंका ऐकावी नित्य मानव ॥ ८५ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर एकोणतिसावा अध्याय हा ॥ ४ ॥ २९ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP