समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ४ था - अध्याय २२ वा

महाराज पृथूला सनकादिकांचा उपदेश -

मैत्रेयजी म्हणाले -
(अनुष्टुप्‌)
विक्रमी पृथुला ऐसे प्रजेने प्रार्थिले तदा ।
चार सूर्यापरी चार तेजस्वी ॠषि पातले ॥ १ ॥
सर्वांनी जाणिले त्यांना सिद्धेश्वरचि कांतिने ।
पवित्र तिन्हि लोकांना करता येथ पातले ॥ २ ॥
राजाचे हर्षले प्राण जै भोगा जीव हर्षती ।
सर्वांच्या सह तो आला धावतचि तयांकडे ॥ ३ ॥
अर्घ्य स्वीकारुनी तेंव्हा आसनी बैसले मुनी ।
आनंदे नम्र भावाने पृथूने पूजिले तयां ॥ ४ ॥
पादोदक शिरी घेता केले स्वागत ते बहू ।
दाविले सर्व लोकांना संतांसी वागणे कसे ॥ ५ ॥
सनकादिक हे संत शंकराचे हि अग्रज ।
बैसले आसनी तेंव्हा दिसले अग्निच्यापरी ॥
प्रभूने भाव ठेवोनी पुसले प्रेमपूर्वक ॥ ६ ॥
पृथूजी म्हणाले -
मंगलो दर्शनी संत योग्यांना भेट दुर्लभ ।
कोणते पुण्य ते माझे जेणे दर्शन हे दिले ॥ ७ ॥
ज्यांना ते द्विज विष्णू नी शिव तो भेटता तदा ।
त्रिलोकी कोणती वस्तू मानवा दुर्लभो असे ॥ ८ ॥
दृश्याते कारणी तत्व आत्मदर्शन ना तया ।
सर्वत्र फिरता तुम्ही परी पाप्या न दर्शन ॥ ९ ॥
ज्या घरी तुमच्या ऐसे जलान्न पर्ण वा भुमी ।
स्वीकार करिता तोही दरिद्री धन्य होतसे ॥ १० ॥
रजःकण पदांचे त्या संतांचे नसता कधी ।
संपन्न घर ते जाणा सर्पवृक्ष जसा असे ॥ ११ ॥
सुस्वागतम्‌ मुनीवर्य बालयोगी तुम्ही असा ।
व्रते ते ब्रह्मचर्यादी श्रद्धेने आचरीतसा ॥ १२ ॥
स्वामी या कर्ममोहाने विपत्ती क्षेत्ररूप या ।
भवात भोगितो दुःख सुटण्या मार्ग कोणता ॥ १३ ॥
क्षेम ते पुसणे नाही तुम्ही तो आत्मचिंतनी ।
कुशलाकुशली वृत्ती तुम्हाते स्पर्श ना करी ॥ १४ ॥
सखये तुम्हि तो त्यांचे संसाराग्नीत जीव जे ।
विश्वासे पुसतो त्यांचे कल्याण साधणे कसे ॥ १५ ॥
धीरवान्‌ पुरुषामध्ये आत्मारूपे प्रकाशतो ।
भक्तांच्या हृदयी तैसे स्वरुपा नित्य दाविता ॥
विचरे संतरुपे तो भक्ता पाववया हरी ॥ १६ ॥
मैत्रेयजी सांगतात -
गंभीर युक्त राजाचे थोडे नी गोड बोलणे ।
ऐकोनी ते मुनीवर्य प्रसन्ने बोलु लागले ॥ १७ ॥
सनत्कुमार म्हणाले -
ज्ञाते तुम्ही महाराजा सर्वांना स्वस्ति प्रश्न हा ।
पुसला चांगले झाले साधुंची बुद्धि ही अशी ॥ १८ ॥
संत भेटीत हा लाभ श्रोता वक्ता जुळे मतीं ।
प्रश्नोत्तरे तयांची ती कल्याण साधती जगी ॥ १९ ॥
(इंद्रवज्रा)
राजा तुझी प्रीति हरीपदासी
    सर्वां न लाभे बहु ती कठीण ।
ज्या लाभते त्यास न वासना ही
    नाही मिटे अन्य कुण्याहि योगे ॥ २० ॥
मोक्षार्थ जीवां झटतात शास्त्रे
    त्यासाठि व्हावा अनुराग त्याग ।
देहातुनी भिन्न बघोनि आत्मा
    हितार्थची साधन एकमेव ॥ २१ ॥
शास्त्रार्थ तो हाचि गुरु नि शास्त्र
    विश्वास यांच्यावरि नित्य व्हावा ।
जो आचरे भागवतीपथाने
    इच्छोनि तत्वा अन ज्ञाननिष्ठे ॥ २२ ॥
योगेश्वरासी पुजिता नि गाता
    न द्रव्य देही रत प्रेम होता ।
लाडार्थ त्यांच्या नच वस्तु घेता
    कथामृताते नित सेवि भक्त ॥ २३ ॥
एकांति आत्मीं परितुष्ट प्रेम
    न कष्ट घेई परका बघोनी ।
आत्मानुसंधी हरिगूण गाता
    कर्मात निष्काम तरीहि राही ॥ २४ ॥
अनिंद्य, पोटार्थ न वाहि चिंता
    शीतोष्ण दोन्ही सम साहुनीया ।
विरक्त होतो हरिगूण गाता
    ब्रह्मस्वरुपी मग लोभ होतो ॥ २५ ॥
ब्रह्मात प्रीती गुरु घट्‍ट ठेवी
    तैं ज्ञान वैराग्यबळे करोनी ।
जाळी तसे लिंग देहाभिमाना
    काष्ठाग्नि जाळी जशि लाकडेची ॥ २६ ॥
त्यां जाळिता सर्व गुणास मुक्त
    होतो न मोही मग कांहि वस्तू ।
स्वप्नातला भोग जसा असत्य
    ना हो असे तो मग भेद राही ॥ २७ ॥
(अनुष्टुप्‌)
उपाधी राहता देही इंद्रीय विषयातुनी ।
अहंकारचि तो भासे पुढे ना भासतो तसा ॥ २८ ॥
आरसा जल यांच्याने भासते प्रतिबिंब ते ।
आरसा जल ना होता न भासे प्रतिबिंबही ॥ २९ ॥
चिंतिता विषया नित्य मानासी ओढिती तसे ।
इंद्रियासक्त ती बुद्धी विचारशक्ति नासिते ॥ ३० ॥
स्मृतीचा नाश तो होता ज्ञानाचा र्‍हास होतसे ।
विद्वान म्हणती याला ‘स्वयेचि आत्म घात तो’ ॥ ३१ ॥
ज्या लोभे प्रिय त्या वस्तू स्वार्थघ्न लोभ तोचही ।
याहुनी दुसरी ऐसी हानी मोठी न त्या जिवां ॥ ३२ ॥
चिंतिता इंद्रिया वित्ता नासती पुरुषार्थ ते ।
चिंतेने ज्ञान विज्ञान भ्रष्टता ती अधोगती ॥ ३३ ॥
तमनाशा जया इच्छा आसक्ती सोडणे तये ।
धर्मार्थ काम मोक्षाच्या मार्गाचा अवरोध ती ॥ ३४ ॥
चारी त्या पुरुषार्थात मोक्ष हा श्रेष्ठची असे ।
तीन त्या पुरुषार्थाना काळाचे भय नित्यची ॥ ३५ ॥
प्रकृती गुण क्षोभाने पदार्थ उच्च नीच ते ।
जाहले परि ना क्षेम भगवान्‌ नाशितो तया ॥ ३६ ॥
(वसंततिलका)
इंद्रीय देह अन प्राण नि बुद्धि यांनी
    जो झाकला हृदयि स्थावर जंगमात ।
साक्षात तोचि भगवान प्रकाशमान
    आत्मा रुपी हरिहि मी नृप ! जाण चित्ती ॥ ३७ ॥
माला मनीं समजता नच सर्प बुद्धी
    तैसे विवेक मिळता नच राहि माया ।
ज्याच्यात कार्य-करणी भय भास होतो
    त्यातूनि मुक्त विमला मति ज्ञान पावे ॥ ३८ ॥
कर्मेचि जो गठितसा मनिं गर्व सारा
    नष्टेचि संतपदधूळ उडोनि येता ।
जे इंद्रिया दमिति तेच करो न ऐसे
    तू वासुदेव भजनी मन देह लावी ॥ ३९ ॥
इंद्रीय रूप सुसरें धरिले जयांना
    योगादि दुष्कर यया मग साधनांनी ।
यत्‍नात तेचि फसती हिर तेथ नोहे
    ती नाम नाव करुनी तर तू भवात ॥ ४० ॥
मैत्रेयजी सांगतात -
(अनुष्टुप्‌)
त्या चौघा ब्रह्मपुत्रांचा बोध तो घेउनी मनी ।
प्रशंसा करुनी राजा पुढे हे बोलला असे ॥ ४१ ॥
पृथूजी म्हणाले -
भगवन्‌ ! दीनबंधू तो पूर्वीच पावला हरी ।
कृपा ती करण्या पूर्ण तुम्ही तो पातले इथे ॥ ४२ ॥
दयाळू तुम्हि हो संत ज्या कार्या पातले इथे ।
चांगले पूर्ण ते केले काय मी उतराय हो ? ॥
तनू नी भोवती जे जे संतांचाचि प्रसाद तो ॥ ४३ ॥
प्राण स्त्री पुत्र नी राज्य सामग्रीपूर्ण गेह हे ।
सेना नी खजिना पृथ्वी तुमचे अर्पितो तुम्हा ॥ ४४ ॥
सेनाधिकार नी राज्य न्यायदंड नि शासन ।
जनासी शासन्या सत्ता वेद शास्त्रज्ञब्राह्मण ॥ ४५ ॥
खातो मी तुमचे लेतो दान ही तुमचेच दे ।
क्षत्रीय सर्व ते खाती हरीची लाभता कृपा ॥ ४६ ॥
(वसंततिलका)
वेदानुगामि तुम्हि ज्ञानचि बोधियेले
    त्याच्याचि प्राप्तिकरिता भजणे तयाला ।
तुम्ही दयाळु म्हणुनी मनि नित्य तुष्ट
    कोणी न होय उतराय न यत्‍न व्हावा ॥ ४७ ॥
मैत्रेयजी सांगतात -
(अनुष्टुप्‌)
पुन्हा त्या आदिराजाने सनकादीक पूजिले ।
प्रशंसुनी तदा संत आकाशमार्गि लागले ॥ ४८ ॥
महात्माग्र पृथू याने आत्मोपदेश घेउनी ।
एकाग्र करुनी चित्त आत्मस्थितचि राहिले ॥ ४९ ॥
ब्रह्मार्पण मनी ध्याता स्थान शक्ती नि वेळ नी ।
न्यायवित्तानुसारेची कर्मात राहिले पुढे ॥ ५० ॥
एकाग्र करिता चित्त श्रीकृष्णार्पण कर्म ते ।
अलिप्त करिते कर्मा दिसतो सर्वसाक्षि तो ॥ ५१ ॥
सूर्य तो दावितो सर्व परी ना गुंततो कुठे ।
सम्राट असुनी तैसा निरहंमति राहिला ॥ ५२ ॥
आत्मस्थित असोनिया यथोचितचि वर्तता ।
भार्यागर्भी स्वताऐसे पाच पुत्रासि जन्मिले ॥ ५३ ॥
विजिताश्व धूम्रकेश हर्यक्ष द्रविणो वृक ।
नावे पाचास तो होतो विष्णूचा अंश तो पृथू ॥ ५४ ॥
वेळोवेळी जसे व्हावे तसे तो जनरक्षणा
एकटा धाव तो घेतो लोकपाला परी गमे ।
उदार मन ठेवोनी प्रियवाक्य हितंकर
सौ‌म्य सौंदर्य या योगे प्रजेला रमवीतसे ।
राजा हे नाम त्या लाभे चंद्रमासम भासता ॥ ५५ ॥
पृथ्वीचे जल ओढोनी दुष्काळीं वाटिले पुन्हा ।
वाटिता धन हे ऐसे प्रभावे सूर्यची जसा ॥ ५६ ॥
अजेय इंद्र तो जैसा दुर्धर्ष अग्निच्या परी ।
पृथ्वीपरी क्षमाशील कामना पुरवीतसे ॥ ५७ ॥
मेघाच्या परि तो दान प्रजेसी इच्छिताचि दे ।
गंभीर सिंधुची जैसा धैर्यवान्‌ पर्वतापरी ॥ ५८ ॥
संग्रहास हिमाद्री नी पाप्यां दंडी यमापरी ।
कुबेरापरिची द्रव्या गुप्तता वरुणा परी ॥ ५९ ॥
चापल्या नि गती शक्त्ये वायूच्या परि तो फिरे ।
असह्य तेजही त्याचे भगवान्‌ शंकरापरी ॥ ६० ॥
सौदर्यी कामदेवैसा उत्साही केसरीपरी ।
मनुच्यापरि वात्सल्य अधीप ब्रह्मयापरी ॥ ६१ ॥
ब्रह्मवादीं बृहस्पती संयमी हरिच्या परी
गो ब्राह्मण गुरू विष्णू यांचा भक्तिपरायण ।
नम्र शील तशी लज्जा परोपकार या गुणीं ॥ ६२ ॥
त्रिलोकी जन ते गाती मोठयाने कीर्ति त्याचि ती
साधुंच्या हृदयी राम स्त्रियांच्या कर्णि त्या परी ।
सदैव वसुनी राही कीर्ती त्याची अशी पहा ॥ ६३ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर बाविसावा अध्याय हा ॥ ४ ॥ २२ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP