समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ४ था - अध्याय १८ वा

पृथ्वीदोहन -

मैत्रेयजी म्हणाले -
(अनुष्टुप्‌)
महाराजा पृथू यांचे क्रोधाने ओठ कंपले ।
पृथ्वीने स्तुति ही केली भीत भीतच बोलली ॥ १ ॥
प्रभो हा आवरी क्रोध शांत चित्तेचि ऐक हे ।
बुद्धिवान्‌ भ्रमरा ऐसे फिरती सार सेविती ॥ २ ॥
तत्त्वदर्शी मुनी यांनी स्वर्ग नी पृथिवीवरी ।
कल्याणा कृषि नी यज्ञ उपाय योजिले पहा ॥ ३ ॥
प्राचीन त्या ॠषींनी जे योजिले कार्य त्या सुखा ।
श्रद्धेने आजही होता लाभेल इष्ट ते फळ ॥ ४ ॥
अज्ञानी स्वमने घेती आश्रयो अन्य साधनी ।
वारंवार तयांचे ते राहती यत्‍न निष्फळ ॥ ५ ॥
राजा त्या पूर्व काळात ब्रह्म्याने धान्य निर्मिले ।
मी ते पाहीयले नेत्रे दुराचारीच भक्षिती ॥ ६ ॥
राजांनी मम सन्मान सोडिला नी न रक्षिती ।
त्यामुळे माजल्या चोर्‍या त्यामुळे यज्ञकारणी ।
माझ्यात औषधी सार्‍या मीच त्या लपवीयल्या ॥ ७ ॥
जाहला बहु त्यां काळ धान्य ते जीर्ण जाहले ।
असेल उदरी माझ्या पूर्वोक्त कार्य ते करी ॥
उपाय करुनी तैसे घ्यावे काढोनि ते पुन्हा ॥ ८ ॥
लोकपालक वीरा रे कल्याण जर इच्छिसी ।
बलवृद्धयर्थ अन्नाचा गरजू असशील तैं ॥ ९ ॥
वासरु मजसी योग्य पात्र नी दोहिता तसा ।
आणावा पान्हवायास दुग्धे सर्वचि देइ मी ॥ १० ॥
आणखी करणे एक सपाट मजला करी।
वर्षाही संपता तेणे ओल राहील चांगली ॥ ११ ॥
हिताचे पृथ्विचे बोल राजाने मानिले तदा ।
वत्स स्वायंभुवा हात दुग्ध धान्यहि घेतले ॥ १२ ॥
पृथूच्यासम जे विज्ञ त्यांनीही सार घेतले ।
पृथूवश धरेतूनी हव्या त्या वस्तु घेतल्या ॥ १३ ॥
बृहस्पतीस ही वत्स ॠषींनी त्या करोनिया।
पात्र वाणीं मनीं कानीं वेद दुग्धचि घेतले ॥ १४ ॥
देवतांनीहि इंद्राते वासरू स्वर्णपात्र ते ।
करोनी वीर्य नी ओज बल अमृत घेतले ॥ १५ ॥
प्रल्हादा वासरु दैत्ये करोनी लोहपात्रि त्या ।
आसवो मदिरा रुपी दूध ते मेळवीयले ॥ १६ ॥
गंधर्व अप्सरांनीही विश्वावसुस वत्स ते ।
करोनी पद्मपात्रात सौंदर्य गीत घेतले ॥ १७ ॥
पितृगणे अर्यमा वत्स नि ते पात्र मातिचे ।
तयात कव्य हे दुग्ध काढोनी घेतले तदा ॥ १८ ॥
कल्पोनी कपिलां वत्स सिद्धांनी आणिमादि या ।
आकाशीं घेतल्या सिद्धी आकाशीं फिरणे कुणी ॥ १९ ॥
मायावी किंपुरुषांनी केले वत्स मयासुरा ।
विचित्र रूप नी गुप्त आदि संकल्प घेतले ॥ २० ॥
यक्ष राक्षस भूतांनी रुद्रासी वत्स कल्पुनी ।
कपालपात्रि ते रक्तरूपाने दूध घेतले ॥ २१ ॥
विंचू नी साप नागांनी विषारी जंतु नी तसे ।
मुखपात्रात ते वीष दूध काढोनि घेतले ॥ २२ ॥
पशुंनी नंदिला वत्स मानोनी तृण मेळिले ।
हिंस्त्रांनी सिंह हा वत्स करोनी मांस घेतले ॥ २३ ॥
पक्ष्यांनी गरुडा वत्स केले नी फळ कीटके ।
अन्न ते मेळिले त्यांनी दुग्ध ते या धरेतुनी ॥ २४ ॥
वृक्षांनी वड तो वत्स मानोनी रस घेतले ।
घेतल्या पर्वतें धातू हिमाद्री वत्स कल्पुनी ॥ २५ ॥
दात्री अभीष्ट वस्तूंची पृथुची अधिना धरा ।
तरीही सर्व जातींनी दोहिता वस्तु घेतल्या ॥ २६ ॥
पृथुने आणि सर्वांनी भिन्न वत्स नि पात्र ते ।
घेवोनी दोहिली पृथ्वी विभिन्न अन्न घेतले ॥ २७ ॥
यापरी सर्वदा पृथ्वी राजाची स्नेहि जाहली ।
पृथुने पृथिवीलाही पुत्री मानोनी घेतले ॥ २८ ॥
पुन्हा राये धनूटोके पर्वता खणिले असे ।
भूमंडल सपाटीस केले लोकहितास ते ॥ २९ ॥
पित्यापरी प्रजेला तो नित्याचा पोसु लागला ।
सर्वत्र त्या प्रजेसाठी निवासा भाग निर्मिले ॥ ३० ॥
पट्‌टणे ग्राम नी पूरे दुर्ग गोठे नि वस्तिही ।
खाने नी छावण्या वाड्या पहाडीवसत्या तशा ॥ ३१ ॥
नव्हती पृथुच्या पूर्वी पूरग्रामादि कल्पना ।
सोयीने फिरता वस्त्या करोनी राहती जन ॥ ३२ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर अठरावा अध्याय हा ॥ ४ ॥ १८ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP