समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ४ था - अध्याय १४ वा

ध्रृवाच्या वंशाचे वर्णन, राजा अंगचे चरित्र -

राजा वेनची कथा -
मैत्रेयजी म्हणाले -
भृग्वादि सर्व ऋत्वीज सर्वांचे क्षेम इच्छिती ।
तयांनी पाहिले अंग जाता शास्ता नसे कुणी ।
माजले पशु से लोक वागती ते उताविळ ॥ १ ॥
सुनिथासि पुसोनिया मंत्र्यांच्या नसता मनीं ।
भूमंडळासि वेनाला राज्याच्यापदि स्थापिले ॥ २ ॥
क्रूर शास्ता असा वेन राज्यी येताचि तस्कर ।
लपले भिउनी त्याला जैसे सर्पास उंदिर ॥ ३ ॥
वैभवे अष्टदिक्पाली उन्मत्त वेन जाहला ।
स्वताला श्रेष्ठची मानी संतांना अवमानि तो ॥ ४ ॥
अंकूशहीन हत्तीसा मदांध रथि बैसुनी ।
भिववी सर्व सृष्टीला पृथ्वी आकाशि तो फिरे ॥ ५ ॥
दवंडी पिटुनी सार्‍या धर्मकार्यासि रोधिले ।
“ कोणीही त्या द्विजातीये दान यज्ञ करू नये ”॥ ६ ॥
वेनाचा पाहिला सारा अत्याचार असा जगी ।
ऋषी ते जाहले एक बोलती आपसात की ॥ ७ ॥
जळत्या लाकडामाजी जीवा संकट येतसे ।
तैचि डाकूनि राजाच्या संकटी पडले जन ॥ ८ ॥
अराजक भया पोटी वेन राज्यासि स्थापिला ।
परी तोचि भयो झाला न मिळे सुखशांति ती ॥ ९ ॥
सुनिथापुत्र हा वेन स्वभावे अति दुष्ट हा ।
सर्पासि पाजिणे दूध अनर्थ जाहला तसा ॥ १० ॥
योजिले जन रक्षार्थ परी हा मारितो तया ।
समजावू तसे त्याला जेणे पाप न स्पर्शि ते ॥ ११ ॥
दुराचारी असा वेन जाणोनी राज्यि स्थापिला ।
जर तो आपुल्या बोला न मानी भस्म त्या करु ॥ १२ ॥
धिक्‌कारे जनवाणीच्या पूर्वीच भस्म जाहला ।
लक्षोनी क्रोध झाकोनी गेले नी प्रिय बोलले ॥ १३ ॥
मुनी म्हणाले -
नृपा आम्ही तुला गोष्टी बोलतो लक्ष देइ जे ।
येणे कीर्ती बल श्री नी आयूची वृद्धि होतसे ॥ १४ ॥
बापा! बुद्धी तनू वाणी मनाने धर्म आचरी ।
स्वर्गची लाभतो तेणे मिटतो सर्व शोक तो ॥
निष्काम भाव ठेवोनी करिता मोक्ष ही मिळे ॥ १५ ॥
वीरा हा आपुल्या हाते न व्हावा नष्टची कधी ।
नसता धर्म तो ऐसा ऐश्वर्य सर्व संपते ॥ १६॥
दुष्ट मंत्री नि चोरांच्या पासुनी रक्षिता प्रजा ।
न्यायाने करिता राज्य लाभे सुख परं असे ॥ १७ ॥
ज्या राज्यीं नगरीं लोक पाळिती वर्ण-आश्रम ।
भगवान्‌ यज्ञ पुरुषा पूजूनी धर्म रक्षिती ॥ १८ ॥
महाभागा अशा राज्यीं राजाला हरि पावतो ।
कांकी तो रक्षितो भूतां विश्वात्मा नित्य श्रीहरी ॥ १९ ॥
सर्वचि लाभती वस्तू तुष्टता जगदीश्वर ।
ब्रह्मादी देवता यांचा देव तो पुरुषोत्तम ॥
इंद्रादी सर्व ते लोक आदरे पूजिती तया ॥ २० ॥
(इंद्रवज्रा)
राजा! नियंता हरि सर्व लोकां
    वेदत्रयी द्रव्य तप स्वरुप ।
प्रजा हितासी यजि यज्ञ देवा
    कृपा तयाची हवि आपणासी ॥ २१ ॥
राज्यीं द्विजाच्या करवी यजाने
    त्यां पूजिता श्रीहरि पावतो नी ।
तेणेचि लाभे फळ सर्व लोका
    ना द्वेष व्हावा हवनानुष्ठाना ॥ २२ ॥
वेन म्हणाला -
(अनुष्टुप्‌)
आहा श्रेष्ठ तुम्ही मूर्ख अधर्मा धर्म मानिता ।
पोषितो मी दुज्या जारा मानिता पति खेद हा ॥ २३ ॥
मूर्खत्वे नृप देवाचा करिता अवमान त्या ।
न सूख इह लोकात परलोकात मिळे ॥ २४ ॥
अरे! ज्याच्यावरी भक्ती करिता कोण तो हरी ।
कुलटा वागती जैशा सोडोनी पति आपुला ॥ २५ ॥
विष्णू ब्रह्म महादेव इंद्रवायू नि सूर्य तो ।
कुबेर यम चंद्रादि वरूण पृथ्विअग्नि नी ॥ २६ ॥
शापादपी अशा सार्‍या राजदेहात देवता ।
राहती अंश मात्राने सर्वदेवचि भूपती ॥ २७ ॥
द्विजांनो द्वेष सोडोनी कर्माने मज पूजिणे ।
मलाचि बळि अर्पावा श्रेष्ठ मी अग्रपूजनी ॥ २८ ॥
मैत्रेयजी म्हणाले -
विपर्यस्त अशा बुद्ध्ये कुमार्गी पापि जाहला ।
सरले पुण्य ना मानी ऋषींचीं नम्र प्रार्थना ॥ २९ ॥
स्वताला बुद्धिवान्‌ ऐसे मानुनी वेनने तदा ।
अव्‌मानिता मुनी सारे कोपीत अति जाहले ॥ ३० ॥
मारा या दुष्ट पाप्याला जर हा जगला तर ।
थोड्याचि तो दिनामाजी संसार भस्म हा करी ॥ ३१ ॥
राजसिंहासनी पापी सर्वथा नच योग्य हा ।
निर्लज्ज निंदि विष्णूला प्रत्यक्ष यज्ञ-देव जो ॥ ३२ ॥
अहो ज्याच्या कृपे सारे ऐश्वर्य लाभले यया ।
कोण त्या हरिला निंदी अभागी वेन सोडुनी ॥ ३३ ॥
झाकला क्रोध बोलोनी त्यांनी तो वध नेमिला ।
निंदेने सरली आयू हुंकारे कार्य जाहले ॥ ३४ ॥
स्वाश्रमी मुनि ते जाता शोकाकूलेचि सूनिथा ।
मंत्रादी युक्तिने पुत्रशवाला रक्षु लागली ॥ ३५ ॥
सरस्वती जलीं सर्व मुनींनी एकदा तिरीं ।
अग्नि होत्र करोनीया हरिचर्चेस बैसले ॥ ३६ ॥
विद्रोह वाढला सारा पाहता त्रास वाढला ।
त्राता ना कोणि पृथ्वीला घडे कां ते अमंगल ॥ ३७ ॥
ॠषी हे बोलती ऐसे चौबाजू चोर धावले ।
डाकूंच्या कारणे सारी सर्वत्र धुळ माजली ॥ ३८ ॥
पाहता जाणिले त्यांनी मेल्याने वेन तो असा ।
विद्रोह वाढला सारा राजाचे भय संपले ॥ ३९ ॥
वाढले चोर नी डाकू धन रक्तासि शोषिती ।
समर्थ असता तेजे तयांनी रोधले न हे ॥ ४० ॥
शांत द्विज समदर्शी असुनी तेज ते सरे ।
दीनांचे पाहता कष्ट जळ जै भग्न घागरीं ॥ ४१ ॥
तसेच अंगिचा वंश न व्हावा नष्ट कां कि तै ।
वंशामाजी हरीभक्त राजे ते श्रेष्ठ जाहले ॥ ४२ ॥
निश्चयोनि असे त्यांनी मांड्या त्या मृत वेनच्या ।
मंथिता बुटका त्यात पुरुष जन्मला तदा ॥ ४३ ॥
कोळशापरि तो काळा हात पाय अखूडची ।
नाक ते चपटे आणि जबडा तो प्रचंडची ॥
रक्तार्णव असे नेत्र तांब्याच्या परि केश ते ॥ ४४ ॥
पुसिता नम्र भावे तो वदला “काय मी करु?” ।
“निषीद” वदले विप्र निषाद नाम जाहले ॥ ४५ ॥
वेनाचे पाप घेवोनी निषाद जन्मला तसा ।
वंशजो पुढचे सारे वनीं हिंसाचि साधिती ॥ ४६ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर चौदावा अध्याय हा ॥ ४ ॥ १४ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP