समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ४ था - अध्याय १० वा

उत्तमचा मृत्यू, ध्रुव व यक्षाचे युद्ध -

मैत्रेयजी सांगतात -
(अनुष्टुप्‌)
प्रजापती शिशूमार याची पुत्री भ्रमी हिसी ।
ध्रुवाचे हो‌उनी लग्न झाले त्यां कल्प वत्सर ॥ १ ॥
महाबळी ध्रुवासी जी अन्य पत्‍नी इला हिला ।
उत्कलो पुत्र नी पुत्री जाहली रुपवान्‌ गुणी ॥ २ ॥
हिमालयी एकदा तो अविवाहित उत्तम ।
शिकार करण्या जाता यक्षाने ठार मारिले ॥
माताही त्यापरी त्याची स्वर्गस्थ जाहली पुन्हा ॥ ३ ॥
ध्रुवाने बंधुचे वृत्त ऐकता कोपला बहू ।
शोकी उद्वेगि होवोनी विजयीरथि बैसला ॥
यक्षाचा सूड तो घ्याया यक्षदेशात पातला ॥ ४ ॥
हिमघाटी मधे यक्ष अलकापुरि पाहिली ।
भूतप्रेत पिशाचादी रुद्रानुचर ही तिथे ॥ ५ ॥
विदुरा पोचता तेथे ध्रुवाने शंख फुंकिला ।
चौदिशा गर्जल्या तेणे यक्षपत्‍न्या भिल्या तदा ॥
भयाने कातरी नेत्रे भोवती बघु लागल्या ॥ ६ ॥
बलवान्‌ यक्षवीरांना न सहे शंखनाद तो ।
शस्त्रास्त्रे घेउनी आले तुटले ध्रुवजीवरी ॥ ७ ॥
महारथी ध्रुवो थोर धनुर्विद्या परायण ।
प्रत्येका विंधिले त्याने बाणाने तीन तीन त्या ॥ ८ ॥
सर्वांनी आपुल्या माथीं घुसले बाण पाहिले ।
जाणिली हार चित्तात ध्रुवासी स्तवु लागले ॥ ९ ॥
न साही छेडिता साप तसे ते उलटोनिया ।
उत्तरा क्षण एकेची द्विगुणी शर सोडिले ॥ १० ॥
यक्ष तेरा आयुतीते कोपुनी रथि बैसले ।
परीघ खड्‍ग नी प्रास त्रिशूळ परशू तसे ॥ ११ ॥
शक्ति ऋष्टि भुशुंडी नी पंखदार असे शर ।
सोडुनी वृष्टिची केली बदला कारणे तये ॥ १२ ॥
प्रचंड पावसा माजी गिरी मोठाहि ना दिसे ।
झाकला ध्रुवही तैसा अमाप शरवृष्टिने ॥ १३॥
आकाशस्थित ते सिद्ध दृश्याते पाहु लागले ।
वदती हाय या सैन्यी बुडाला वीर सूर्य तो ॥ १४ ॥
यक्ष ते विजयी घोषे सिंहाच्यापरि गर्जले ।
सूर्य जै उगवे तैसा रथाच्यासह तो ध्रुव ॥
त्यातुनी वरती आला तोडोनी शर मेघ ते ॥ १५ ॥
दिव्य धनू टणत्‌कारे शत्रूंचे धैर्य मोडिले ।
बाणांची करिता वृष्टी अंधार पडला तदा ॥ १६ ॥
पर्वती घुसते वज्र बाण त्याचे तसे तदा ।
यक्षांच्या शरिरामाजी घुसले तोडुनी कडे ॥ १७ ॥
यक्षांची तोडिली डोकी शोभली रत्‍नमंडित ।
सोनेरी ताडवृक्षैशा मांड्यानी हात हार ते ॥ १८ ॥
भुजबंद तसे टोप पडले युद्धभूमिसी ।
वीरांना आवडे ऐसी शोभली रणभूमि ती ॥ १९ ॥
(इंद्रवज्रा)
जिवंत जे यक्ष तयाहि अंगा
    घायाळ बाणे ध्रुव तै करी की ।
घायाळ होताचि पळोनि गेले
    सिंहा बघोनी गज धावती जै ॥ २० ॥
ध्रुवे तदा पाहियली भुमी ती
    न कोणी शत्रू शर चालवाया ।
इच्छी पहाया अलकापुरी ती
    परी पुरां माजि न कांही गेला ॥ २१ ॥
शंकेचि बोले मग सारथ्याला
    रथात बैसोनि उगाच राही ।
तेंव्हाचि झाला ध्वनि जै समुद्र
    अंधार दाटे, धुळ सर्व झाली ॥ २२ ॥
(अनुष्टुप्‌)
क्षणात दाटले मेघ झाकले नभमंडल ।
गड्‌गडाटे विजा कैक प्रलयंकर भासल्या ॥ २३ ॥
त्यातुनी कफ नी रक्त विष्ठा पू चर्बि वर्षली ।
समोर पडली प्रेते आकाशा मधुनी तदा ॥ २४ ॥
नभीं पर्वतही आला अश्मवर्षाव जाहला ।
गदा परिघ नी खड्‌ग मुसळे पडु लागली ॥ २५ ॥
फूत्कार करिती सर्प क्रोधाने बघता तये ।
ठिणग्या पडती आणि सिंहादी पशु त्रासिती ॥ २६ ॥
प्रलयंकारि ते पाणी बुडाली अवनी तदा ।
गर्जना करुनी लाटा आल्या अंगासि भेसुर ॥ २७ ॥
असूरे क्रूर भावाने दाविल्या बहुही कळा ।
जेणे भित्रा मनी कांपे पळे देहास घेउनी ॥ २८ ॥
ध्रुवासी या परी माये असुरे गाठिले तदा ।
मुनींनी येउनी त्याला दिल्या मंगल कामना ॥ २९ ॥
मुनी म्हणाले -
(वसंततिलका)
उत्तानपाद तनया तुज ईश रक्षो
    नाशो रिपूस सगळ्या भगवंत देव ।
ते नाम कीर्तनि तसे मुखि बोलल्याने
    मृत्यूतुनीहि परते सहजी मनुष्य ॥ ३० ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर दहावा अध्याय हा ॥ ४ ॥ १० ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP