समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ४ था - अध्याय ८ वा

ध्रुवाचे वनात गमन -

मैत्रेयजी सांगतात -
(अनुष्टुप्)
सनकादी ऋभू हंस अरुणी आणि तो यती ।
नैष्ठीक ब्रह्मचारी हे गृहस्थाश्रम ना तया ॥ १ ॥
ब्रह्मापुत्र अधर्मो तो तयाची पत्‍नि ती मृषा ।
तयांचा दंभ हा पुत्र माया नावेचि कन्यका ॥
निऋतीसी न संतान त्यांनी दोघासि पोषिले ॥ २ ॥
पासुनी दंभ मायेच्या लोभ निकृति जन्मले ।
क्रोध हिंसा कली याची दुरुक्ती ती सहोदरा ॥ ३ ॥
दुरुक्ति कलिसंयोगे भय मृत्युहि जन्मले ।
या दोघांची मुळे जन्म यातना नर्क याजला ॥ ४ ॥
निष्पाप विदुरा ऐसा संक्षेपे प्रलयंकर ।
त्यागिता पुण्यकार्या ते अधर्म वंश बोललो ॥ ५ ॥
श्रीहरीअंश ब्रह्माच्या अंशोत्पन्न पवित्र त्या ।
स्वायंभूव मनूवंशा वर्णितो कुरुनंदना ॥ ६ ॥
प्रियवृतोत्तानपाद शतरूपेसि ही मुले ।
तेजाने वासुदेवाच्या जगाते स्थित रक्षिती ॥ ७ ॥
सुनीती सुरुची दोघी पत्‍न्या उत्तानपादच्या ।
सुरुची प्रिय राजाची सुनिती ती तशी न त्यां ॥ ८ ॥
एकदा राज अंकासी बैसे लाडेचि उत्तम ।
ध्रुवाने इच्छिता तैसे पित्याने नच घेतले ॥ ९ ॥
सावत्रमाय तो पाही धृवाचा हट्ट तेधवा ।
क्रोधाने सुरुची त्यासी बोलली खडसाउनी ॥ १० ॥
सिंहासनासि राजाच्या मुला तू बैसु ना शके ।
जरी तू पुत्र राजाचा कुक्षीं माझ्या न जन्मला ॥ ११ ॥
अज्ञ तू तुज ना ठावे स्त्रियेच्या अन्य कोणत्या ।
गर्भाने जरि हे भोग तपें नारायणा पुजी ।
त्याच्या कृपे पुन्हा जन्म घ्यावा माझ्या कुशीतची ॥ १३ ॥
मैत्रेयजी सांगतात -
(इंद्रवज्रा)
फुत्कारतो साप जसा चिडोनी
    बोलासि ऐकोनि तसाचि ध्रूव ।
क्रोधोनि निःश्वास रडोनि गेला
    पित्यास त्यागोनि स्वमातृ गेही ॥ १४ ॥
स्फुंदोनि स्पुंदू रडला नि आला
    सुनीति घेई उचलोनि पोटी ।
जै सेवके ते कथिताच सारे
    झाली मनामाजि बहूहि कष्टी ॥ १५ ॥
वेली जसी अग्नित होरपाळे
    तसा तियेचा सुटताच धीर ।
संतप्त शोकेचि करी विलाप
    सापत्‍न बोला स्मरुनी रडे ती ॥ १६ ॥
ना अंत पार दुःखीत झाली
दीर्घोच्छ्वसे बोलली ध्रूव बाळा ।
कोण्याहि इच्छी न अमंगलाते
    तेणे मिळे दुःखचि ते स्वताला ॥ १७ ॥
ती सत्य बोले सुरुची अम्हासी
    दासी न पत्‍नी मज नृप मानी ।
अभागिनी मी मज पोटि जन्म
    झाला तुझा दूधहि पाजिले मी ॥ १८ ॥
सावत्र ती माय असोनि सत्य
    मुला तुला बोलली ती सुरूची ।
सोडोनि द्वेषा मग इच्छि राज्य
    अधोक्षजाची करणेचि भक्ती ॥ १९ ॥
पोसावया विश्व सत्वास घेई
    त्या श्रीहरीचे पद सेविताच ।
ब्रह्माजिलाही पद श्रेष्ठ लाभे
    तो वंद्य झालाहि जितेंद्रियांना ॥ २० ॥
प्रचंड यज्ञीं प्रपिते तुझ्या त्या
    अनन्यभावे हरि पूजियेला ।
तै लाभला त्यां मग मोक्ष सौख्य
    जो अन्य कोणा नच प्राप्त झाला ॥ २१ ॥
तैसेचि वत्सा हरिआश्रयो घे
    नेच्छूनि भोगा भजनास गावे ।
मुमुक्षु सारे करितात हेच
    भवास त्यागू मनि इच्छिती जे ॥ २२ ॥
ना अन्य कोणी कमलाक्ष जैसा
    दुःखा तुझ्या दूर करील ऐसा ।
कृपेसि ज्याच्या जग धुंडि सारे
    त्यां शोधिते ’श्री’ करि दीप घेता ॥ २३ ॥
मैत्रेयजी सांगतात -
(अनुष्टुप्)
अभीष्ठ वस्तु प्राप्त्यर्थ सुनीती बोलली ध्रुवा ।
पावला तो समाधानी निघाला पूर सोडुनी ॥ २४ ॥
ऐकुनी सर्व वृत्तांत जाणण्या धवहेतुसी ।
पातले नारदो तेथे आश्चर्ये मनि बोलले ॥ २५ ॥
अहो क्षत्रीयतेजो हे कसे अद्‌भूत होय पा ।
थोड्याही मानभंगाला बाळ हा नच साहि की ॥
सावत्र मातृचा बोल हृदयी कटु बैसला ॥ २६ ॥
नारदजी म्हणाले -
मुला तू खूपची सान खेळात रमणे कसे ।
या वयी मानसन्मान कुणाच्या शब्दि ना असे ॥ २७ ॥
जरी मुला तुला वाटे मानापमान तो तसा ।
संतोषा मोहची होतो कर्मे मानापमान तो ॥ २८ ॥
भगवद्‌गति ती श्रेष्ठ बुद्धीने जाणणे तिला ।
दैवाने जी स्थिती लाभे तिच्यात तोष मानणे ॥ २९ ॥
मातेच्या उपदेशाने तपाने भगवतकृपा ।
मेळण्या निघला तू तो सामान्या ते कठीणची ॥ ३० ॥
अनेक जन्म ते योगी कठोर तप साधिती ।
परी तो मार्ग ना गावे साक्षात्कार न होतसे ॥ ३१ ॥
म्ह्णोनी सोडि हा मार्ग घरास परतोनि जा ।
थोर होता जसा लाभे वेळ तेंव्हा स्मरी प्रभू ॥ ३२ ॥
ईश्वरेच्छे सुख दुःख लाभता तोष मानणे ।
असे जो मनितो तोची भवाच्या पार जातसे ॥ ३३ ॥
गुणाधिक्यास पाहोनी प्रसन्न मनिं राहणे ।
गुणाल्पीसी दया व्हावी समाना मित्र भाव तो ॥
अशाने सर्व दुःखे ती मनाला नच स्पर्शिती ॥ ३४ ॥
ध्रुवबाळ म्हणाला -
चांचल्ये सुख दुःखे ज्यां त्याच्या शांत्यर्थ छान हे ।
अज्ञ मी नच माझी ही दृष्टि तै जाउही शके ॥ ३५ ॥
मला तो लाभला ऐसा स्वभाव क्षात्र ताठर ।
न मनीं विनयो कांही शब्दे हृदय फाटले ॥
फाटल्या हृदयी ऐसा बोध तो नच साठतो ॥ ३६ ॥
इच्छी मी आसना ऐशा जेथे कोणि न बैसला ।
लाभाया श्रेष्ठ हा हेतू सांगावा मार्ग तो भला ॥ ३७ ॥
तुम्ही तो भगवान् ब्रह्मा यांचे अंगजजी असा ।
साधाया विश्वकल्याण त्रिलोकी भ्रमता सदा ॥ ३८ ॥
मैत्रेयजी सांगतात -
ऐकता ध्रुवबोलाते प्रसन्न चित्त हो़उनी ।
कृपेने नारदे त्यासी या परी बोध बोधिला ॥ ३९ ॥
नारदजी म्हणाले -
मातेने दाविला तूंते कल्याणप्रद मार्गची ।
भगवान् वासुदेवाच्या भजनीं चित्त लाविणे ॥ ४० ॥
धर्मार्थ काममोक्षाची इच्छा ज्याच्या मनीं असे ।
लाभाया एकची मार्ग श्रीहरीपद सेविने ॥ ४१ ॥
तुझे कल्याण हो पुत्रा ! तू जायी यमुनातटी ।
पवित्र त्या मधुवनीं श्रीहरी नित्य राहतो ॥ ४२ ॥
श्रीकालिंदी जले स्वच्छ स्नाने निवृत्त हो़उनी ।
विधिवत् आसना घ्यावे स्थिर भाव करोनिया ॥ ४३ ॥
प्राणायामास लावोनी मन नी इंद्रियातुनी ।
प्राणास शुद्ध योजोनी धैर्याने स्मर तो हरी ॥ ४४ ॥
प्रसन्नाभिमुखी ऐसा वरदो वाटतो तसा ।
कपाळ नाक ते भव्य दिसे तो सुरसुंदर ॥ ४५ ॥
सुडौल तरुणाईत रतीय ओठ नेत्र ते ।
शरण्यां पावतो ऐसा दयेचा सागरूचि तो ॥ ४६ ॥
श्रीवत्स चिन्ह वक्षासी जलदासम श्याम जो ।
धारी तो वनमालांना शंखचक्रादिही करी ॥ ४७ ॥
किरीट कुंडले अंगी केयूर कंकणे अशी ।
कौस्तुभें वाढली शोभा रेशमीवस्त्र शोभले ॥ ४८ ॥
कटेसी कर्धनी आणि कांचनी पैंजणे तशी ।
दर्शनीय असा शांत देई नेत्रास मोद तो ॥ ४९ ॥
करिता मानसी पूजा हृदयो पद्म कर्णिकीं ।
आपुल्या चरणा ठेवी सुरेख नख मंडित ॥ ५० ॥
अशा या ध्यान योगाने जधीं चित्त स्थिरावते ।
स्मित करी कृपेचे तो स्मरावा वरद प्रभू ॥ ५१ ॥
असे ते भगवद्‌रूप सुभद्र ध्यायिता मनीं ।
डुंबतो भक्त मोदात बाहेरी नच ये कधी ॥ ५२ ॥
"ॐ नमो भगवते वासुदेवाय । "
गुह्य हा जाणणे मंत्र ध्यानाच्या त्या बरोबर ।
ध्याता सप्त दिनी रात्री खेचरा पाहु तो शके ॥ ५३ ॥
देश कालानुलक्षोनी बुद्धिमान् पुरुषे तदा ।
सामग्री योजुनी द्रव्ये पूजावा भगवान् हरी ॥ ५४ ॥
विशुद्ध जल कंदान पुष्प दुर्वांकुरे तसे ।
वल्कले मंजिरी यांनी पूजावा भगवान् हरी ॥ ५५ ॥
लब्ध द्रव्येचि मूर्ती तै करोनी पूजिणे भले ।
संयमे शांत नी मौने मीताहारीच राहणे ॥ ५६ ॥
पुण्यकीर्ती हरी जे जे मायें अवतार घेतसे ।
त्या त्या कथा मनोहारी स्मराव्या ध्यान चिंतनी ॥ ५७ ॥
योजिले पूजनी जे जे ते ते द्वादश अक्षरी ।
मंत्राने त्या समर्पावे भगवान् विष्णुसी तदा ॥ ५८ ॥
काया वाचा मने ऐसा पूजावा भक्तिने हरी ।
भजता निश्चळे ऐसे वाढवी भाव तो मनी ॥ ५९ ॥
धर्मार्थकाम मोक्षेही प्रदान करि तो तदा ॥ ६० ॥
इंद्रियां विषयी होता वैराग्य भक्त वत्सला ।
अविच्छिन्न तये गावे श्रीहरीभजना तदा ॥ ६१ ॥
मैत्रेयजी सांगतात -
स्विकारता असा बोध नारदाला ध्रुवे तदा ।
प्रदक्षिणोनि तै वंदी गेला मधुवना कडे ॥ ६२ ॥
तपोवना ध्रुवो जाता पितया घरि नारद ।
जाताची पूजिले राये नारदे पुसले तया ॥ ६३ ॥
नारदजी म्हणाले -
राजा का सुकले तोंड विचारीं पडला दिसे ।
धर्मार्थकाम मोक्षाते पडले काय ते उणे ॥ ६४ ॥
राजा उत्तानपाद म्हणाला -
ब्रह्मन्‌ ! मी बहुही स्त्रैण हाय ! मी पाचवर्षिच्या
बाळाच्या सह ती माता घरातुनी हकालली ।
हे मुनी बहु तो पुत्र सतेज बुद्धिने असे ॥ ६५ ॥
असेल मुख ते झाले भुकेने ग्लान जाहले ।
पडेल मार्गि तो त्याला लांडगे भक्षितील की ॥ ६६ ॥
स्त्रियेचा दास मी झालो पहा माझी कुटीलता ।
प्रेमाने मांडिसी येता थोडे ना प्रेम दाविले ॥ ६७ ॥
नारदजी म्हणाले -
राजा रे न करी चिंता बाळाचा हरि रक्षक ।
श्रेष्ठत्व ते न जाणी तू त्याचे यश दुणावले ॥ ६८ ॥
समर्थ बाळ ते आहे लोकपाला न शक्य जे ।
अशा इच्छेसि साधोनी शीघ्रची परतेल तो ।
तेणे ती तुझिही कीर्ती सर्वत्र पसरेल की ॥ ६९ ॥
मैत्रेयजी सांगतात -
देवर्षिशब्द ऐकोनी राजभोगा त्यजोनिया ।
उदास जाहला राजा पुत्र चिंतेत राहिला ॥ ७० ॥
ध्रुवाने तिकडे केले यमुना जलि स्नान ते ।
आणि आरंभिले त्याने श्री नारायणध्यानही ॥ ७१ ॥
त्रिरात्र अंतरे भक्षी बोर कपित्थ ही फळे ।
असेचि मास पर्यंत श्रीहरी तो उपासिला ॥ ७२ ॥
दुसर्‍या महिन्या माजी सहारात्रीस अंतरे ।
शुष्कतृण नि पर्णे ती खाउनी हरि पूजिला ॥ ७३ ॥
तिसर्‍या महिन्यामाजी नऊ त्या दिन अंतरे ।
प्राशोनी जळची फक्त योगात हरि पूजिला ॥ ७४ ॥
चवथ्या महिन्यामाजी बाहेरी श्वास ठेवुनी ।
दिवसा एकदा त्यां तो पिवोनी ध्यान ते करी ॥ ७५ ॥
पाचव्या मासि तो बाळ श्वासाला जिंकुनी उभा ।
एक पायीच ठाकोनी ब्रह्मचिंतनि लागला ॥ ७६ ॥
शब्दादी विषया त्याने मनाच्या सह ओढिले ।
हृदयस्थ हरीमध्ये गुंतोनी स्थिर ठेविले ॥ ७७ ॥
आधार सर्व तत्वा जो अशा त्या पुरुषाहुनी ।
परब्रह्म मनी ध्याता तेजाने लोक कंपले ॥ ७८ ॥
(इंद्रवज्रा)
भारे गजाच्या जसि नाव डोले
    तशी धरा ही डुलली ध्रुवाच्या ।
एकेचि अंगुष्ट दबाव होता
    डुलून गेली द्वय त्या दिशांना ॥ ७९ ॥
इंद्रिय द्वारा करुनीहि बंद
    कोंडीयला प्राण अनन्य ध्रूवे ।
प्राणेचि समष्टि जिवांस श्वासा
    पीडीत इंद्रे हरि आठवीला ॥ ८० ॥
देवता म्हणाल्या -
चराचराचा रुकलाय श्वास
    असे न आम्ही कधि पाहिले की ।
रक्षी अता तू शरणागताला
    आलो पदासी तरि दुःख सारा ॥ ८१ ॥
श्रीभगवान म्हणाले -
नका भिऊ हो ध्रुवबाळ चित्ता
    माझ्या मधेची करितो विलीन ।
अभेद्य होवोनि निरोधि प्राणा
    जावे तुम्ही थांबवितो तपा मी ॥ ८२ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर आठवा अध्याय हा ॥ ४ ॥ ८ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP