समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ३ रा - अध्याय ३३ वा

देवहूतिला तत्वज्ञान व मोक्षप्राप्ती -

मैत्रेयजी सांगतात -
(वसंततिलका)
ऐकोनि श्रीकपिल बोल वदेचि माता
    ती कर्दमप्रियसखी अशि देवहूती ।
फाटूनि मोह सरता करुनी प्रणाम
    धाली नि तत्व विषयास करी स्तुती ती ॥ १ ॥
देवहूति म्हणाली - ( इंद्रवज्रा )
ब्रह्मा तुझ्या नाभिफुलात झाला
    नी लोप पावे प्रलयी तुझ्यात ।
जो सत्वरुपी बिज सर्व रुपा
    तोही तुझे ध्यान करी सदैव ॥ २ ॥
तू चिंतिता होय तसेचि सारे
    स्वामी जगां तू परिपूर्णवीर्य ।
तू शक्ति कांही करुनी निराळी
    ब्रह्मादि रुपें रचितोस सृष्टि ॥ ३ ॥
नाथा! लयासी उदरात सृष्टी
    घेसी पुन्हा बाळरुपास आणि ।
नी चोखितो बोट वटास पत्रीं
    गर्भात माझ्या धरिले तुला मी ॥ ४ ॥
पाप्यास तू रे करितोस शिक्षा
    नी भक्तकाजा अवतार घेसी ।
केलेस तू सोंग वराह रुपे
    हे ज्ञान देण्यास कपील झाला ॥ ५ ॥
देवा तुझे नाव ऐकोनि गाता
    तो श्वानभक्षी जरि पापि हो का ।
चांडाळ तो पूज्य असाचि होतो
    शंका नसे दर्शनि धन्य होतो ॥ ६ ॥
अहो! खरा श्रेष्ठ असोनि पापी
    जिव्हेवरी नाम विराजते हे ।
जो श्रेष्ठ गातो तव नाम नित्य
    केले तयाने तप थोर जाणा ॥ ७ ॥
तू ब्रह्म नी श्रेष्ठ पुरुष थोर
    वृत्तीस मेळोनि तुलाचि ध्यावे ।
तेजेचि तू शांत माया करीशी
    तू वेद विष्णु नमिते तुला मी ॥ ८ ॥
मैत्रेयजी सांगतात -( अनुष्टुप्‌ )
मातेने स्तुति ही सर्व करिता मातृवत्सल ।
भगवान्‌ कपिले तेंव्हा गंभीर शब्द काढले ॥ ९ ॥
भगवान्‌ कपिलदेव म्हणाले -
माते मी तुजला सोपा मार्ग हा वदलो असे ।
याच्या त्या अवलंबाने शीघ्र उद्धार पावसी ॥ १० ॥
विश्वास ठेव या शब्दीं संतांनी सेविले यया ।
लाभेल तुजला मोक्ष अन्यथा भव सोडिना ॥ ११ ॥
मैत्रेयजी सांगतात -
बोधिली अत्मबोधाने कपिले ब्रह्मवादिनी ।
मातेस पुसली आज्ञा मिळता दूर चालले ॥ १२ ॥
शारदामुकुटा ऐशा आश्रमी देवहूतिजी ।
योगाच्या साधनी योगे समाधीत स्थिरावली ॥ १३ ॥
त्रिकाल स्नान घेवोनी कुरुळे केश सर्व ते ।
जटाचि जाहले, देह तपाने क्षीण जाहला ॥ १४ ॥
कर्दमीतप सामर्थे मिळाले गृहसौख्य जे ।
त्यागिले तिजने सर्व देव ज्यां इच्छिती सदा ॥ १५ ॥
जिथे ते हस्तिदंतांचे पलंग शुभ्र कोमळ ।
सिंहासनादि सोन्याचे सोन्याचे पात्र सर्वही ॥ १६ ॥
सर्वत्र म‌उ त्या गाद्या पाचूंच्या भिंति शोभल्या ।
सुरेख दीपमूर्तींच्या रत्नज्योति प्रकाशती ॥ १७ ॥
फुलांनी शोभले वृक्ष पक्षीही गाति सुंदर ।
गुंजती भ्रमरे नित्य बारवीं पद्‌मगंध तो ॥ १८ ॥
कर्दमासह ती जेथे प्रेमाने नित्य क्रीडली ।
गंधर्व गुण ते गाती इंद्रपत्न्याहि मोहल्या ॥ १९ ॥
असे ते गृह उद्यान सर्वही त्यागिले तिने ।
वियोगे परि पुत्राच्या म्लानमुख क्वचित्‌ दिसे ॥ २० ॥
वनात पति तो गेला जाहले पुत्रदुःखही ।
वैराग्य असुनी झाली गोवत्सा परि ती स्थिती ॥ २१ ॥
विदुरा सांख्यदेवाच्या चिंतनी राहिली सती ।
ऐश्वर्य असुनी सर्व उपरी राहिली सदा ॥ २२ ॥
पुन्हा त्या भगवद्रूपी कपिले बोधिले जसे ।
तसे एकेक अंगाला ध्यानही लाविले तिने ॥ २३ ॥
भक्ति वैराग्य कर्माने जाहले शुद्ध चित्त ते ।
ज्ञानाने सर्वव्यापी तो आत्म्यात पाहिला तिने ॥ २४ ॥
ज्या त्या स्वरुप तेजाने माया दूरचि राहते ॥ २५ ॥
ईश्वरी स्थित ती बुद्धी होताचि जीवभाव तो ।
निवृत्त जाहला सारा परमानंदि राहिली ॥ २६ ॥
अखंड राहता ध्यानी सत्यवान्‌ भ्रांति संपली ।
देहाही विसरे जैसी स्वप्नी ती तनु भासते ॥ २७ ॥
दुसरे पोषिती देह तरी ना क्षीण जाहली ।
मानसी नव्हता क्लेश तेणे तेज विखूरले ॥ २८ ॥
केश पिंजारले सर्व वस्त्र ते पडले कुठे ।
ध्यानी हरपली शुद्ध प्रारब्ध रक्षि केवळ ॥ २९ ॥
अशी ती कपिलीबोधे योगाचा मार्ग आचरे ।
पावली भगवद्रूपी नित्य ती मुक्त जाहली ॥ ३० ॥
वीरवरा! जिथे सिद्धी तिजला प्राप्त जाहली ।
‘सिद्धपद’ त्रिलोकात क्षेत्र विख्यात स्थान ते ॥ ३१ ॥
साधुस्वभाव विदुरा शुद्ध ती जाहली तने ।
प्रगटे नदिच्या रुपे सिद्ध ते तीर्थ सेविती ॥ ३२ ॥
मातेची घेउनी आज्ञा भगवान्‌ कपिलो मुनी ।
पित्राश्रमास सोडोनी गेले ईशान्यकोनि ते ॥ ३३ ॥
तिथे स्वयं समुद्राने पूजुनी स्थान त्या दिले ।
जगासी शांती देण्याला योगात स्थित राहिले ॥ ३४ ॥
स्दिध चारण गंधर्व मुनी नी अप्सरागण ।
स्तविती विदुरा तुम्ही पुसले तेचि बोलले ॥
कपील देवहूतीचा जो संवाद पवित्र तो ॥ ३५ ॥
(पुष्पिताग्रा)
कपिल मुनि पवित्र योग गूढ
    करि नित जो श्रवणो कथी हि लोकां ।
गरुडध्वज कृपेचि युक्त होतो
    हरिपद शीघ्रचि प्राप्तहि तो करीतो ॥ ३६ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर तेहतिसावा अध्याय हा ॥ ३ ॥ ३३ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP