समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ३ रा - अध्याय १७ वा

हिरण्यकश्यपु व हिरण्याक्षजन्म व हिरण्याक्षाचा दिग्विजय -

मैत्रेयजी सांगतात -
( अनुष्टुप्‌ )
देवतांनी असे सारे ब्रह्म्याचे ऐकिले असे ।
निःशंक हो‍उनी चित्ती स्वर्गा माजी प्रवर्तल्या ॥ १ ॥
इकडे दीतिच्या चित्ती होती चिंता तशीच ती ।
सरली शतवर्षे तै जन्मले पुत्र दो जुळे ॥ २ ॥
उत्पात जाहला स्वर्गी आकाशीही तसाचि तो ।
भयाने भरले सर्व पाहता अंतरीक्ष ते ॥ ३ ॥
दिशाही तापल्या तेंव्हा सर्व पर्वत डोलती ।
कडाडल्या विजा तैशा आकाशी धूम्र केतुही ॥ ४ ॥
साँय साँय ध्वनीने त्या वार्‍याने वृक्ष मोडले ।
अंधारी दाटली सेना धुळीचे ध्वज डौलले ॥ ५ ॥
थैथयाटी विजेच्या ते आकाशी घन दाटले ।
आकाशी लोप सूर्याचा दिसेना कांहिही तदा ॥ ६ ॥
सागरीं जाहलाऽक्रोश लाटांनी जीव धावले।
खळ्‌बळा नदिनाल्यात कमळे सुकली तदा ॥ ७ ॥
चंद्रसूर्यासही चक्र अशूभ दिसले पुन्हा ।
गर्जना स्वच्छ आकाशी गुंफेत घर्घराटही ॥ ८ ॥
गावात घुबडे आणि गिधाडे घुग्‌घुकारले ।
आग ओकोनि कोल्हे ते अभद्र भुंकु लागले ॥ ९ ॥
श्वान ते तोंड वासोनी मानेला करुनी वरी ।
गाणे नी रडणे ऐशा स्वरांनी रडले तदा ॥ १० ॥
खुरांनी गाढवे झुंडीं पृथिवी खोदु लागले ।
माजुनी धावले तेंव्हा हुई कू शब्द दाटले ॥ ११ ॥
हिसणे गाढवांचे ते ऐकोनी घरट्यातले ।
भीतीने उडले पक्षी पशुंनी मळ त्यागिला ॥ १२ ॥
भीतीने रक्तधारा त्या गोस्तनातुनि वर्षती ।
पिवळी जाहली वृष्टी मूर्तींनी अश्रु गाळिले ॥ १३ ॥
प्रबळ जाहला राहू शनी तो वक्र चालला ।
बुध नी चंद्र यांच्याशी टकरे युद्ध जाहले ॥ १४ ॥
उत्पात जाहले कैक सनकादिक सोडुनी।
भयाने भरले सारे प्रलयो भासला तयां ॥ १५ ॥
जन्मले आदिदैत्ये नी शिघ्रची वाढु लागले ।
पोलादा परि ते देही पर्वतापरि वाढले॥
दिसली बाल लीलेत तयांची वीरता तशी ॥ १६ ॥
(इंद्रवज्रा)
स्वर्गासि टेके शिरटोप त्यांचा
    दिशास व्यापोनि शरीर राही ।
भूकंप भासे पृथिवी वरी ते
    चालोनि जाता पदभार ऐसा ।
जै ते उभे ठाकुनि चालती तै
    शोभे कटीदोर फिकाहि सूर्य ॥ १७ ॥
प्रजापती नाव तयास ठेवी
    एका हिरण्योकशिपू नि दूजा ।
तो जो हिरण्याक्षचि दीतिसूत
    झाले पुढे दैत्य पराक्रमी जे ॥ १८ ॥
( अनुष्टुप्‌ )
हिरण्यकश्यपू यास ब्रह्म्याचा वर लाभला ।
निर्भयी मृत्यु पासोनी तसा उद्धट जाहला ॥
बळाने लोकपालांना त्रिलोकाला हरीयले ॥ १९ ॥
लहान आवडे बंधू तोही ते कर्म आचरी ।
युद्धाची शोधण्या संधी हिरण्याक्ष गदाधरी ।
स्वर्गात पातला आणि देवांना शोधु लागला ॥ २० ॥
असह्य वेग त्याचा तो नुपुरे झनकारती ।
गळ्यात विजयी माळा खांदी मोठीच ती गदा ॥ २१ ॥
माजला मन देहाने ब्रह्म्याच्या त्या वरे वसा ।
गरुडां भीति जै सर्प देवता लपली तसे ॥ २२ ॥
पाहिले हिरण्याक्षाने तेजे इंद्रादि धाकती ।
समोर नसता कोणी गर्जना करि तो सदा ॥ २३ ॥
परतोनि पुन्हा त्याने समुद्रीं घेतली उडी ।
हत्तीसा पोहताना तो लाटाही गर्जल्या तदा ॥ २४ ॥
( इंद्रवज्रा )
जळाजले जीव वरुण यांचे
    त्यांना न दैत्ये मुळि कांहि केले ।
तरी भयाने भयभीत होता
    गेले पळोनी जल जीव सारे ॥ २५ ॥
अनेक वर्षे बुडुनी समुद्री
    न भेटता शत्रु कुणीच तेथे ।
लाटांवरी त्याच गदाप्रहारे
    मारुनि पाही अपुलीच शक्ती ॥ २६ ॥
स्वामी वरुणासचि तेथ गाठी
    नी हासुनी हीन नमूनि तुच्छे ।
युद्धेचि भिक्षा मज द्या नरांनो
    चेष्टेचि बोले मग अन्य कांही ॥ २७ ॥
कीर्तीवतंसा तुचि लोकपाल
    तू मन्य लोकात पराक्रमीही ।
तू राजसूयो मख पूर्ण केला
    जिंकोनि दैत्यास असाचि थोर ॥ २८ ॥
पाहूनि तो माज शत्रुस ऐसा
    तो क्रोध आला भगवान्‌ वरुणा ।
बोले तया बंधु मुळीच नाही
    आव्हानिले ना तुज हेतु कांही ॥ २९ ॥
युद्धीं तुला त्या हरिच्या शिवाय
    ना कोणि तोषि विर दैत्यराज ।
इच्छा तुझी तो पुरवील छान
    ते वीर सारे गुण गाति त्याचे ॥ ३० ॥
तो वीर मोठा तुज श्वान ऐसा
    मारोनि फेकील भुमीसि दूर ।
दुष्टास मारोनि कृपा करी तो
    संतांवरी नित्य सदाचि भाळे ॥ ३१ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सतरावा अध्याय हा ॥ ३ ॥ १७ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP