समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

श्रीमद्‌भागवतमाहात्म्य - अध्याय ६ वा

सप्ताह यज्ञाचा विधि -

कुमार म्हणाले -
(अनुष्टुप्)
साधूंनो ! सांगतो आम्ही सप्ताहविधि तो कसा ।
लोक नी धन साह्याने जशी साध्य कथीयली ॥ १ ॥
ज्योतिषा सुमुहूर्ताते घ्यावे छान विचारुनी ।
विवाहासम ते द्रव्य योजावे खर्च वेचण्या ॥ २ ॥
भादवा कार्तिकाश्वीन आषाढ मार्गशीर्ष ही ।
श्रावणासह साहीही मासी श्रावण मोक्षद ॥ ३ ॥
भद्रा नी व्यतिपातादी कुयोग त्याज्य सर्वथा ।
इच्छार्थी असता कोणी द्यावा त्या सहभाग तो ॥ ४ ॥
देशदेशात वार्ता ही धाडावी यत्‍नपूर्वक ।
त्या सर्वा सपरिवारे प्रार्थावे ऐकण्या कथा ॥ ५ ॥
स्त्रिया शुद्रादिकांना ही बोलवावे कथेस या ।
जे दूर हरिच्या भक्ती होते आजवरी तसे ॥ ६ ॥
विरक्त देशदेशीचे प्रेमी हरिकथेस या ।
निमंत्रणे तया द्यावी कथेचा विधि हा असा ॥ ७ ॥
इथे भागवतीदेवी कथा सत्संगही तसा ।
अपूर्व रसवार्ता ही सातची दिनि होतसे ॥ ८ ॥
सारे रसिक हो तुम्ही कथापानास पातणे ।
प्रेमाने शीघ्रची यावे कृपा ही एवढी करा ॥ ९ ॥
जरी तो एवढा वेळ नसला मग हे करा ।
एके तरी दिनी यावे एकेक क्षण दुर्लभ ॥ १० ॥
या अशा विनयानेच करावे ते निमंत्रण ।
येणार्‍या सर्व लोकांचा निवास युक्त ठेवणे ॥ ११ ॥
तीर्थी तैसे वनी गेही मानिली श्रवणा कथा ।
विशाल स्थान राखावे कथेच्या श्रवणास्तव ॥ १२ ॥
सडे झाडोनि टाकावे भिंतीना रंग लेपिणे ।
घरप्रपंचिची भांडी कथेच्या स्थळि ती नको ॥ १३ ॥
आधी पाच दिनाने तो भव्य मंडप टाकणे ।
खांब ते केळिच्या खांबे करावे की सुशोभित ॥ १४ ॥
फळ पुष्प दळाने त्या मंडपा सजवा बहू ।
पताका ध्वजही लावा शोभेच्या वस्तु मांडणे ॥ १५ ॥
मंडपी सात थोरांना उंच आसन ठेवणे ।
सप्त लोक स्मरोनिया विरक्त बैसवा द्विज ॥ १६ ॥
पुढे जे बसती त्यांना आसने योग्य ती असो ।
उंच सिंहासनी वक्ता व्य्वस्था करणे अशी ॥ १७ ॥
उत्तरी मुख जै वक्ता श्रोता पूर्वमुखी बसो ।
बसे पूर्वमुखी वक्ता श्रोत्याचे उत्तरेस हो ॥ १८ ॥
अथवा बसणे युक्त द्वयांचे मुखपूर्वला ।
जाणते देश कालाचे सांगती बसणे असे ॥ १९ ॥
विरक्त वैष्णवी विप्र वेदशास्त्रनिपूण जो ।
दृष्टांती निस्पृही ज्ञानी वक्ताचि अधिकारी तो ॥ २० ॥
अनेक धर्मविभ्रांत स्त्रैण पाखंडवादि जो ।
शुकशास्त्र कथेला तो त्याज्य पंडितही असो ॥ २१ ॥
वक्त्यांच्या जवळी अन्य तसाच द्विज बैसवा ।
कुशंका नी तशा शंका लोकांच्या मिटवील जो ॥ २२ ॥
वक्त्याने करणे क्षौर व्रतारंभ म्हणोनिया ।
स्नान शौचादि कर्मेही प्रभाती करणे असे ॥ २३ ॥
संध्यादी नित्यकर्मांना आटोपा थोडक्यात नी ।
कथेत टाळण्या विघ्न पूजावा श्री गणेशजी ॥ २४ ॥
पितृगणास तार्पण्य पापशुद्‌ध्यर्थ ते करा ।
करावा मंडली एका तो प्रस्थापित श्रीहरी ॥ २५ ॥
कृष्णात चित्त लावोनी मंत्राने पूजिणे तया ।
प्रदक्षिणा नमस्कार पुजेने स्तुति ती करा ॥ २६ ॥
संसारसागरी मग्न दीन मी करुणानिधे ।
गुंतलो कर्म मोहात उद्धारी रे भवार्णवी ॥ २७ ॥
श्रीमद्‌भागवतालाही पूजावे प्रार्थुनी असे ।
प्रीतीने करणे सर्व धूप दीप समर्पित ॥ २८ ॥
श्रीफलो ठेवुनी ग्रंथा नमस्कार करा पुन्हा ।
स्तुती प्रसन्न चित्ताने करावी ती पुन्हा तशी ॥ २९ ॥
श्रीमद्‌भागवताख्यान प्रत्यक्ष कृष्णरुप तू ।
स्वीकारी मजला नाथा मुक्त्यर्थ भवसागरी ॥ ३० ॥
मनोरथ करी माझा सफल सर्वथाचि तू ।
होवो निर्विघ्न हे कार्य दास मी तव केशवा ॥ ३१ ॥
प्रार्थावे लीन होवोनी वक्त्याला पूजिणे पुन्हा ।
वस्त्र आभूषणे द्यावी करावी स्तुती ती अशी ॥ ३२ ॥
शुकरुप प्रबोधज्ञ सर्वशास्त्रविशारद ।
आता कथा प्रकाशावी माझे अज्ञान नष्टिणे ॥ ३३ ॥
कल्याण धरणे चित्ती प्रसन्न हो‌उनी असे ।
सात रात्री यथाशक्ति नियमा पाळणे पहा ॥ ३४ ॥
वरणी पाच विप्रांना कथारक्षार्थ ती करा ।
द्वादशाक्षर मंत्राने जापिती भगवंत जे ॥ ३५ ॥
विप्रांना विष्णुभक्तांना नमस्कारुनि पूजिणे ।
तयांची घेवूनी आज्ञा बसावे आसनी स्वये ॥ ३६ ॥
लोक वित्त धनागार पुत्रचिंताहि सोडुनी ।
शुद्ध चित्ते कथेसी या ऐकता फळ लाभते ॥ ३७ ॥
सूर्योदये कथारंभ औटप्रहर सांगणे ।
वाचके मध्यमावाणी कथा सुंदर वाचिणे ॥ ३८ ॥
अवकाश कथेला तो द्यावा माध्यान्हि दो घडी ।
कथानुसार योजावे रिक्त वेळात कीर्तन ॥ ३९ ॥
मलमूत्र निरोधाते अल्पाहारचि सेविणे ।
श्रोत्याने एक वेळेला हविष्यान्नचि भक्षिणे ॥ ४० ॥
जर शक्य दिनी सात करावे ते उपोषण ।
दूध तूप पिवोनिया ऐकावे सुखपूर्वक ॥ ४१ ॥
एकभुक्त फलाहार चालते कोणतेहि ते ।
करावे शक्य ते जैसे सुसाध्य श्रवणास ते ॥ ४२ ॥
जेवणे चांगले का की श्रवणी लक्ष लागणे ।
उपास जर तो बाधी कथाविघ्न असाचि तो ॥ ४३ ॥
ऐकणार्‍या इतरांचे नियमा ऐकणे मुनी ।
विष्णुदीक्षा विहीनांना कथेचा अधिकार ना ॥ ४४ ॥
पाळावे ब्रह्मचर्याते झोपावे जमिनीवरी ।
श्रीकथा संपते तेव्हा पत्रावळीत जेवणे ॥ ४५ ॥
डाळी नी तेल गोडाचे गरिष्ठान्न न सेविणे ।
शिळे नी दृष्टि दोषाचे अन्न वर्ज्य असे पहा ॥ ४६ ॥
काम क्रोध मद माना मत्सरा स्थान ते नको ।
लोभ दंभ तसा मोह नको द्वेष कथाव्रती ॥ ४७ ॥
कथाव्रती असे त्याने न निंदो वेद वैष्णवा ।
गुरु गायव्रती तैसे स्त्रिया राजा नि संत ते ॥ ४८ ॥
त्यजा रजस्वला म्लेंच्छा पापी व्रात्यासही तसे ।
वेदहीन द्विजाशीही कथा ही नच सांगणे ॥ ४९ ॥
सत्य शौच दया मौन आर्जवी विनयी तसा ।
उदार मानसी त्याला कथा ही सांगणे पहा ॥ ५० ॥
धनहीन क्षयरोगी निर्भाग्यी पापकर्मि ही ।
पुत्रहीन मुमुक्षुंना ऐकवावी कथा पहा ॥ ५१ ॥
अपुष्पा काकवंध्येने वंध्या नी मृत‌अर्भका ।
गर्भश्रवा अशा स्त्रीने ऐकावे यत्‍नपूर्वक ॥ ५२ ॥
विधिवत् ऐकता त्यांनी निश्चीत फळ लाभते ।
अत्युत्तमा कथा दिव्या कोटियज्ञ फलप्रदा ॥ ५३ ॥
विधिवत् ऐकुनी वार्ता उद्यापन करा पुन्हा ।
जन्माष्टमी व्रता ऐसे करावे फळ लाभते ॥ ५४ ॥
अकिंचना नि भक्ताला असा आग्रह तो नसे ।
पवित्र श्रवणाने तो निष्काम कृष्णभक्त जो ॥ ५५ ॥
सप्ताह यज्ञ हा होता श्रोत्यांनी भक्तिपूर्वक ।
करावी ग्रंथपूजा नी वक्ताही पूजिणे तसा ॥ ५६ ॥
प्रसाद तुलसीमाला वक्त्याने वाटणे पहा ।
मृदंग टाळ नादाने करावे हरिकीर्तन ॥ ५७ ॥
जय शब्दे नमो शब्दे तसेचि शंखनाद हो ।
विप्रांना याचकांनाही वित्तान्न दान ते करा ॥ ५८ ॥
विरक्त असता श्रोता कर्मशांती दुजे दिनी ।
गीतापाठ करावा तो गृहस्थे होम योजिणे ॥ ५९ ॥
हवनी दशमस्कंधी एकेक श्लोक वाचता ।
खीर मध तिळे तूप आहुत्या त्या समर्पिणे ॥ ६० ॥
अथवा एकचित्ताने गायत्री हवनो करा ।
गायत्रीरुप हे आहे पुराण भगवत्कथा ॥ ६१ ॥
होमाची नसता शक्ती अशांतिदान ते करा ।
विप्रास होमसामग्री दिल्याने फळ लाभते ॥ ६२ ॥
सर्वदोष शमनार्थ सहस्त्र विष्णुनाम हा ।
श्रद्धेने करणे पाठ कर्म हे सर्व श्रेष्ठची ॥ ६३ ॥
पुन्हा बारा द्विजा द्यावे षड्रसान्नादि भोजने ।
गो स्वर्ण दान ते द्यावे व्रतपूर्ती म्हणोनिया ॥ ६४ ॥
घडवा तीन तोळ्याचे सिंहासन सुवर्णी जे ।
मांडावी पोथि त्या ठायी भगवद्‌रूप ही कथा ॥ ६५ ॥
आवाहनादि रीतीने पूजावे विधिपूर्वक ।
आचार्या पूजिणे तैसे वस्त्रालंकार देउनी ।
गंधादि लावूनी त्याना दक्षिणा ती समर्पिणे ॥ ६६ ॥
बुद्धिवंत असा दाता मुक्त होवोनि जातसे ।
सप्ताह वाचनाने ती पापे जळति सर्वची ॥ ६७ ॥
मिळे फळ पुराणाने श्रीमद्‌भागवते शुभ ।
धर्मार्थ काम मोक्षाच्या प्राप्तीचे तंत्र हे असे ॥ ६८ ॥
पुढे सनकादिक संत म्हणतात-
सप्ताह श्रवणाचा हा विधी ऐकविला अम्ही ।
भोग मोक्ष द्वयो लाभ श्रीमद्‌भागवते मिळे ॥ ६९ ॥
सूतजी सांगतात-
सनकांनी अशी युक्त कथा सांगितली पुन्हा ।
हरि ते पाप दे पुण्य भुक्ति मुक्ति प्रदायिनी ॥ ७० ॥
ऐकिली सर्व लोकांनी सप्ताही विधिपूर्वक ।
देवाधिदेव तो कृष्ण त्याचे कीर्तन मांडिले ॥ ७१ ॥
भक्ति वैराग्य ज्ञानाला तारुण्य पुष्टि लाभली ।
त्यांनी आकर्षिली चित्ते लोकांना हर्ष जाहला ॥ ७२ ॥
कथेने साधला हेतू नारदा मोद जाहला ।
रोमांच उठले अंगी पूर्ण आनंद लाभला ॥ ७३ ॥
श्रवणे धन्य झालेल्या नारदे हात जोडिले ।
सनकादिक संताना प्रेमे ते बोलले असे ॥ ७४ ॥
नारदजी म्हणाले-
धन्य मी मजला तुम्ही कृपेने अनुबोधिले ।
सर्वपाप विनाशी जो कृष्ण तो लाभला मला ॥ ७५ ॥
श्रीमद्‌भागवती वार्ता सर्व धर्मात श्रेष्ठ की ।
लाभे गोलोक वैकुंठ श्रीकृष्ण प्राप्त होतसे ॥ ७६ ॥
सूतजी म्हणाले -
बोलता शब्द हे तेव्हा नारदे वैष्णवोत्तमे ।
फिरता वेळि त्या आले योगेश्वर मुनी शुक ॥ ७७ ॥
(इंद्रवज्रा)
समाप्तिसी व्याससुतोहि आले
    सोळा वयाने तरि ज्ञानपूर्ण ।
जै ज्ञानधीच्या भरतीस चंद्र
    प्रेमेचि घेता हरिनाम संथ ॥ ७८ ॥
तेजस्वि ऐसे शुक पाहताच
    सभासदांनी पुजिले उठोनी ।
ते बैसता पूजिति नारदोही
    शब्दामृताते वदणे म्हणाले ॥ ७९ ॥
श्री शुकदेवजी म्हणाले -
(द्रुतविलंबित)
निगमकल्पतरु फळ पक्व हे
    शुकमुखांमृत स्पर्शित पूर्णची ।
नचहि साल बिया रसपूर्ण हे
    सुलभ प्राशुनि घे रसिका त्वरे ॥ ८० ॥
(शार्दूलविक्रीडित)
श्री व्यासे रचिले पुराणमहतो, निष्कामधर्मी असे ।
कल्याणा वदले ययेचि मिळते, शांती नि पापो हरे ।
श्रीमद्‌भागवती कथेस धरिता, कर्मो न काही उरे
पुण्यत्मा श्रवणा मनात स्मरता, राही हृदी ईश्वर ॥ ८१ ॥
श्रीमद्‌भागवती पुराणतिलको, हे वैष्णवांचे धन
मध्ये पारमहंसज्ञान विमलो, गायीयले श्रेष्ठ ते ।
येथे ज्ञान विराग भक्ति सहितो, नैष्कर्म्य सांगीतले
भावे जो कथितो करी श्रवण हे, लाभे तया मोक्षची ॥ ८२ ॥
(अनुष्टुप्)
स्वर्गी ना सत्यलोकात वैकुंठीही असा रस ।
कैलासीही नसे हा तो श्रोत्यांनो ! खूप हा पिणे ॥ ८३ ॥
सूतजी सांगतात -
(इंद्रवज्रा)
बोलोनि घेता शुक हे तदा तै
    प्रल्हाद पार्थो बळि उद्धवादी ।
सहीत आला हरि पार्षदांच्या
    सर्वास तेव्हा पुजिले ऋषिंनी ॥ ८४ ॥
देवर्षि त्यांना बघता प्रसन्न
    त्या श्रेष्ठ सिंहासनि बैसवीले ।
नी त्या पुढे कीर्तन गान होता
    ब्रह्मा शिवो दर्शनि पातले तै ॥ ८५ ॥
(स्रग्धरा)
प्रल्हादो टाळ घेई तरल गति तया उद्धवो झांज घेई
वीणा घेती सुरर्षी स्वरकुशल असा अर्जुनो राग गायी
इंद्राहाती मृदंगो जयजय वदती कीर्तनी ते कुमार
सामोरी भाववक्ता सरसकवन ते व्यासपुत्रो करीती ॥ ८६ ॥
(इंद्रवज्रा)
त्याच्याच सर्वात विरक्त भक्त
    नटांप्रमाणे बहु नाचले की ।
अलौकिकी कीर्तन पाहुनीया
    प्रसन्न चित्ते हरि बोलले तै ॥ ८७ ॥
मी कीर्तनाने बहु तोषलो हो
    भावे तुम्ही तो मज वश्य केले ।
मागा तुम्हा काय हवे असे ते
    नी भक्त प्रेमे मग बोलले की ॥ ८८ ॥
सप्ताह गाथा पुढती जधी हो
    तै पार्षदांच्या सह या तुम्ही ही ।
हे पूर्ण व्हावेचि मनोरथो की
    ‘तथास्तु’ शब्दे हरि गुप्त झाले ॥ ८९ ॥
देवर्षि तेव्हा नमिती दिशेला
    शुकादिकेही नमिले तसेची ।
कथामृते सर्वचि तृप्त झाले
    स्वस्थानि गेले मग सर्व लोक ॥ ९० ॥
भक्तीत सूतां मग स्थापिले या
    शास्त्री स्वयेची शुक या मुनींनी ।
जे ऐकती भागवती कथा ही
    विष्णू तयाच्या हृदयात नांदे ॥ ९१ ॥
दारिद्र्य दुःखी जळती तयांना
    माया पिशाच्चे जरि चेंदिलेही ।
भवात खाती जरि गोचि त्यांना
    क्षेमार्थ हे भागवतोचि गर्जे ॥ ९२ ॥
शौनकांनी विचारले -
(अनुष्टुप्)
शुके परीक्षिता लागी गोकर्णे धुंधुकारीला ।
नारदा सनकादींनी कधी सांगितली कथा ॥ ९३ ॥
सूतजी सांगतात-
वैकुंठी श्रीहरी जाता तीस वर्षांनि त्या पुन्हा ।
भादवी शुद्ध नौ‌मीला शुके आरंभिली कथा ॥ ९४ ॥
परीक्षिती कथे अंती कलीची वर्ष दोनशे ।
शुद्ध आषाढ नौ‌मीस गोकर्णाची सुरु पहा ॥ ९५ ॥
पुढती तीस वर्षांनी नवमी शुक्ल कार्तिकी ।
आरंभिली कथा तेंव्हा कुमार सनकादिके ॥ ९६ ॥
निष्पाप शौनका तुम्हा दिधली पूर्ण उत्तरे ।
कलीत कृष्ण वार्ता ही भवरोगविनाशिनी ॥ ९७ ॥
(वसंततिलका)
कृष्णप्रियो सकल कल्मष नष्टितात
    मुक्ती तयास मिळते मग भक्तिराजा ।
जे संत पीति कथना बहु आदराने
    धुंडावयास नलगे मग तीर्थ त्यांना ॥ ९८ ॥
(पुष्पिताग्रा)
स्वकियजनकरी बघोनि पाशा
    यम हळु तो वदतसे तयांसि कानीं ।
भजनि जन असे तया न स्पर्शा
    नच मज शक्ति तयास दंडिण्याची ॥ ९९ ॥
(शिखरिणी)
असारी संसारी विषय विषसंगी पुरुष हो
क्षणार्धी तो प्यावी स्वसुखकर ही भागवत सुधा ।
कशा लागी व्यर्थो भटकत असा वाम कथनी
परीक्षित् साक्षी की श्रवणि मिळतो मोक्ष सुलभो ॥ १०० ॥
(अनुष्टुप्)
रसप्रवाहि डुंबोनी श्रीशुके कथिली कथा ।
ज्या कंठी स्पर्श वार्तेचा वैकुंठस्वामि होय तो ॥ १०१ ॥
(मालिनी)
बघुनि सकल शास्त्रा आपणा बोललो मी
परम सकलसारो सर्वसिद्धांत सिद्ध ।
जगति शुक कथा ही निर्मलो अन्य नाही
परम सुख मिळाया प्यावि बाराहि स्कंधी ॥ १०२ ॥
(प्रहर्षिणी)
जो वार्ता नियमित ऐकतो मनाने
    जो शुद्धो भजक तयाचि कथी कथा ही ।
पाळावे विधिहि द्वये फळास घ्यावे
नाही काहीच त्रिभुवनि तया असाध्य ॥ १०३ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर ॥ तिसरा सहावा अध्याय हा ॥ माहात्म्य ६ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP