श्रीमद् भागवत पुराण
स्कान्दे भागवत माहात्म्ये
तृतीयोऽध्यायः

उद्धवमुखेन श्रीमद् भागवतमाहात्म्यवर्णनं
भागवतोपदेशस्य सम्प्रदायकर्मकथनं परीक्षितः
कलिनिग्रहायोद्योगः, भागवतश्रवणेन वजादीनां भगवद्दर्शनं च -

श्रीमद्‌भागवताची परंपरा आणि त्याचे माहात्म्य,
भागवतश्रवणाने श्रोत्यांना भगवद्धामाची प्राप्ती -


संहिता
मराठी अनुवाद


अयोद्धवस्तु तान् दृष्ट्वा कृष्णकीर्तनतत्परान् ।
सत्कृत्याथ परिष्वज्य परीक्षितमुवाच ह ॥ १ ॥
सूत म्हणतात - तेथे जमलेले लोक श्रीकृष्णकीर्तनात तल्लीन झालेले पाहून उद्धवाने सर्वांचा सत्कार केला आणि परीक्षिताला आलिंगन देऊन म्हटले. (१)


धन्योऽसि राजन् कृष्णैक भक्त्या पूर्णोऽसि नित्यदा ।
यस्त्वं निमग्नचित्तोऽसि कृष्णसंङ्‌कीर्तनोत्सवे ॥ २ ॥
उद्धव म्हणाला - हे राजा ! तू धन्य आहेस ! तू केवळ श्रीकृष्णांच्या भक्‍तीनेच नित्य पूर्णत्वाला पोहोचला आहेस. कारण श्रीकृष्णकीर्तनाच्या महोत्सवामध्ये तुझे मन अशा प्रकारे बुडून गेले आहे. (२)


कृष्णपत्‍नीषु वज्रे च दिष्ट्या प्रीतिः प्रवर्तिता ।
तवोचितमिदं तात कृष्णदत्ताङ्‌गवैभव ॥ ३ ॥
सुदैवाने श्रीकृष्णांच्या पत्‍न्यांच्या ठायी तुझी भक्‍ती आणि वज्रनाभावर प्रेम आहे, ते योग्यच आहे. कारण श्रीकृष्णांनीच तुला शरीर आणि हे वैभव दिले आहे. (३)


द्वारकास्थेषु सर्वेषु धन्या एते न संशयः ।
येषां व्रजनिवासाय पार्थमादिष्टवान् प्रभुः ॥ ४ ॥
सर्व द्वारकानिवासी लोकांमध्ये हे सर्वाधिक धन्य आहेत, याबाबत मुळीच शंका नाही. कारण यांनी व्रजामध्ये राहावे, अशी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला आज्ञा केली होती. (४)


श्रीकृष्णस्य मनश्चन्द्रो राधास्यप्रभयान्वितः ।
तद् विहारवनं गोभिः मण्डयन् रोचते सदा ॥ ५ ॥
श्रीकऋष्णांचा मनरूपी चंद्र राधेच्या मुखकमलाच्या चांदण्याने युक्‍त होऊन त्यांची लीलाभूमी असलेल्या वृंदावनाला आपल्या किरणांनी सुशोभित करीत येथे नेहमी प्रकाशमान असतो. (५)


कृष्णचन्द्रः सदा पूर्णः तस्य षोडश या कलाः ।
चित्सहस्रप्रभभिन्ना अत्रास्ते तत्स्वरूपता॥ ६ ॥
श्रीकृष्णचंद्र हा नित्य परिपूर्ण आहे. त्याच्या ज्या सोळा कला आहेत, त्यांतून हजारो चिन्मय किरणे बाहेर पडतात, या सर्व कलांनी युक्‍त श्रीकृष्ण या व्रजभूमीमध्ये नेहमीच असतात. (६)


एवं वज्रस्तु राजेन्द्र प्रपन्नभयभञ्जकः ।
श्रीकृष्णदक्षिणे पादे स्थानमेतस्य वर्तते ॥ ७ ॥
हे परीक्षिता ! शरणागतांचे भय दूर करणारा हा जो वज्र आहे, त्याचे स्थान श्रीकृष्णांच्या उजव्या पायाचे ठिकाणी आहे. (७)


अवतारेऽत्र कृष्णेन योगमायातिभाविताः ।
तद्‌बलेनात्मविस्मृत्या सीदन्त्येते न संशयः ॥ ८ ॥
भगवान श्रीकृष्णांनी या अवतारात या सर्वांना आपल्या योगमायेने आच्छादित केले आहे. त्यामुळे हे आपले स्वरूप विसरले आहेत. म्हणून हे दुःखी आहेत, हे निःसंशय.(८)


ऋते कृष्णप्रकाशं तु स्वात्मुबोधो न कस्यचित् ।
तत्प्रकाशस्तु जीवानां मायया पिहितः सदा ॥ ९ ॥
श्रीकृष्णांचा प्रकाश प्राप्त झाल्याशिवाय कोणालाही आपल्या स्वरूपाच बोध होऊ शकत नाही. जीवांच्या अंतःकरणामध्ये श्रीकृष्णतत्त्वाचा जो प्रकाश आहे, त्याच्यावर नेहमी मायेचा पडदा पडलेला असतो. (९)


अष्टाविंशे द्वापरान्ते स्वयमेव यदा हरिः ।
उत्सारयेन्निजां मायां तत्प्रकाशो भवेत्तदा ॥ १० ॥
अठ्ठाविसाव्या द्वापर युगाच्या शेवटी जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी स्वतःच प्रत्यक्ष प्रगट होऊन आपल्या मायेचा पडदा दूर सारला, त्यावेळी जीवांना त्यांचा प्रकाश प्राप्त झाला होता. (१०)


स तु कालो व्यतिक्रान्तः तेनेदमपरं श्रृणु ।
अन्यदा तत्प्रकाशस्तु श्रीमद् भागवताद् भवेत् ॥ ११ ॥
पण ती वेळ आता तर निघून गेली. म्हणून त्यांचा प्रकाश प्राप्त करून घेण्यासाठी आता दुसरा उपाय सांगतो, तो ऐक. इतर वेळी जर कोणी श्रीकृष्णतत्त्वाचा प्रकाश प्राप्त करून घेऊ इच्छित असेल, तर तो त्याला श्रीमद्‌भागवतापासून प्राप्त होऊ शकेल. (११)


श्रीमद् भागवतं शास्त्रं यत्र भागवतैर्यदा ।
कीर्त्यते श्रूयते चापि श्रीकृष्णस्तत्र निश्चितम् ॥ १२ ॥
भगवंतांचे भक्‍त जेव्हा कोठे श्रीमद्‌भागवतशास्त्राचे कीर्तन आणि श्रवण करतात, तेव्हा तेथे खात्रीने भगवान श्रीकृष्ण असतात. (१२)


श्रीमद् भागवतं यत्र श्लोकं श्लोकार्द्धमेव च ।
तत्रापि भगवान् कृष्णो वल्लवीभिर्वराजते ॥ १३ ॥
जेथे श्रीमद्‌भागवताच्या एका किंवा अर्ध्या श्कोलाचा सुद्धा पाठ होतो, तेथेसुद्धा ते गोपींसह विराजमान असतात. (१३)


भारते पानवं जन्म प्राप्य भागवतं न यैः ।
श्रुतं पापपराधीनैः आत्मघातस्तु तैः कृतः ॥ १४ ॥
या भारतवर्षात मनुष्यजन्म मिळूनही ज्या लोकांनी पापामुळे श्रीमद्‌भागवतकथा ऐकली नाही, ते आत्मघातकीच समजावे. (१४)


श्रीमद् भागवतं शास्त्र्॒अं नित्यं यैः परिसेवितम् ।
पिर्मातुश्च भार्यायाः कुलपङ्‌क्तिः सुतारिता ॥ १५ ॥
ज्या भाग्यवान लोकांनी दररोज श्रीमद्‌भागवत शास्त्राचे सेवन केले आहे, त्यांनी आपले पिता, माता आणि पत्‍नी अशा तिन्ही कुळांचा चांगल्या तर्‍हेने उद्धार केला, असे समजावे. (१५)


विद्याप्रकाशो विप्राणां राज्ञां शत्रुजयो विशाम् ।
धनं स्वास्थ्यं च शूद्राणां श्रीमद् भागवताद् भवेत् ॥ १६ ॥
श्रीमद्‌भागवताच्या सेवनाने ब्राह्मणांना ज्ञान प्राप्त होते, क्षत्रियांना शत्रूंवर विजय मिळतो, वैश्यांना धन मिळतो आणि शूद्रांना स्वास्थ्य लाभते. (१६)


योषितां अपरेषां च सर्ववाञ्छितपूरणम् ।
अतो भागवतं नित्यं को न सेवेत भाग्यवान् ॥ १७ ॥
स्त्रिया आणि अन्य लोकांच्यासुद्धा सर्व इच्छा श्रीमद्‌भागवतामुळे पूर्ण होतात. मग कोणता भाग्यवान त्याचे नित्य सेवन करणार नाही, बरे ? (१७)


अनेकजन्मसंसिद्धः श्रीम भागवतं लभेत् ।
प्रकाशो भगवद्‌भक्तेः उद्‌भवस्तत्र जायते ॥ १८ ॥
जन्म-जन्मांतरी साधना करून जेव्हा मनुष्य सिद्ध होतो, तेव्हा त्याला श्रीमद्‌भागवताची प्राप्ती होते. जेथे भागवताचा प्रकाश असतो, तेथे भगवद्‌भक्ती उत्पन्न होते. (१८)


सांख्यायनप्रसादाप्तं श्रीमद्‌भागवतं पुरा ।
बृहस्पतिर्दत्तवान् मे तेनाहं कृष्णवल्लभः ॥ १९ ॥
पूर्वी सांख्यायनांच्या कृपेने बृहस्पतींना श्रीमद्‌भागवत मिळाले आणि त्यांनी ते मला दिल्यामुळे मी श्रीकृष्णांना प्रिय झालो. (१९)


अखायिकां च तेनोक्तां विष्णुरात निबोध ताम् ।
ज्ञायते सम्प्रदायोऽपि यत्र भागवतश्रुतेः ॥ २० ॥
परीक्षिता ! बृहस्पतींनी मला एक आख्यायिकासुद्धा सांगितली होती, ती तू ऐक. या आख्यायिकेमुळे श्रीमद्‌भागवतश्रवणाच्या संप्रदायाचा क्रमसुद्धा समजतो. (२०)


बृहस्पतिरुवाच -
ईक्षाञ्चक्रे यदा कृष्णो मायापुरुषरूपधृक् ।
ब्रह्मा विष्णुः शिवश्चापि रजः सत्त्वतमोगुणैः ॥ २१ ॥
पुरुषास्त्रय उत्तस्थुः अधिकारान् तदादिशत् ।
उत्पत्तौ पालने चैव संहारे प्रक्रमेण तान् ॥ २२ ॥
बृहस्पती म्हणाले- आपल्या मायेने पुरुषरूप धारण करणार्‍या भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा सृष्टिनिर्मितीचा संकल्प केला, तेव्हा रजोगुण सत्त्वगुण व तमोगुण यांनी युक्‍त अनुक्रमे ब्रह्मा, विष्णू व शिव असे तीन देव प्रगट झाले. भगवंतांनी या तिघांना अनुक्रमे जगाची उत्पत्ती, पालन आणि संहार करण्याचा अधिकार दिला. (२१-२२)


ब्रह्मा तु नाभिकमलात् उत्पन्नस्तं व्यजिज्ञपत् ।
ब्रह्मोवाच -
नारायणादिपुरुष परमात्मन् नमोऽस्तु ते ॥ २३ ॥
तेव्हा भगवंतांच्या नाभिकमलापासून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाने त्यांना प्रार्थना केली.
ब्रह्मदेव म्हणाला - हे परमात्मन ! आपण नार म्हणजे पाण्यात शयन करीत असल्यामुळे "नारायण" नावाने प्रसिद्ध आहात; सर्वांचे आदिकारण असल्याने आदिपुरुष आहात, आपणास माझा नमस्कार असो. (२३)


त्वया सर्गे नियुक्तोऽस्मि पपीयान् मां रजोगुणः ।
त्वत्स्मृतौ नैव बाधेत तथैव कृपया प्रभो ॥ २४ ॥
प्रभो ! आपण मला सृष्टीची उत्पत्ती करण्यास सांगितले. परंतु या अत्यंत पापी रजोगुणाने मला आपली स्मृती ठेवण्यात विघ्न उत्पन्न करू नये, एवढी कृपा करा. (२४)


बृहस्पतिरुवाच -
यदा तु भगवान् तस्मै श्रीमद्‌भागवतं पुरा ।
उपदिश्याब्रवीद् ब्रह्मन् सेवस्वैनत् स्वसिद्धये ॥ २५ ॥
बृहस्पती म्हणतात - तेव्हा प्रथम भगवंतांनी त्याला श्रीमद्‌भागवताचा उपदेश करून म्हटले, की, "ब्रह्मन ! तुझे मनोरथ पूर्ण होण्यासाठी तू नेहमी याचे सेवन करीत राहा." (२५)


ब्रह्मा तु परमप्रीतः तेन कृष्णाप्तयेऽनिशम् ।
सप्तावरणभङ्‌गाय सप्ताहं समवर्तयत् ॥ २६ ॥
श्रीमद्‌भागवताचा उपदेश ऐकून ब्रह्मदेव अतिशय प्रसन्न झाला आणि त्याने श्रीकृष्णांची नित्य प्राप्ती होण्यासाठी व सात आवरणे नष्ट होण्यासाठी श्रीमद्‌भागवताचे सप्ताह-पारायण केले. (२६)


श्रीभागवतसप्ताह सेवनाप्तमनोरथः ।
सृष्टिं वितनुते नित्यं ससप्ताहः पुनः पुनः ॥ २७ ॥
सप्ताहयज्ञाच्या विधीनुसार सात दिवसपर्यंत श्रीमद्‌भागवताचे पारायण करण्याने ब्रह्मदेवाचे सर्व मनोरथ पूर्ण झाले. याप्रमाणे तो वारंवार सप्ताहयज्ञाचे अनुष्ठान करीत सृष्टी उत्पन्न करीत असतो. (२७)


विष्णुरप्यर्थयामास पुमांसं स्वार्थसिद्धये ।
प्रजानां पालने पुंसा यदनेनापि कल्पितः ॥ २८ ॥
विष्णूंनीसुद्धा आपले मनोरथ सिद्ध होण्यासाठी त्या परमात्म्याला प्रार्थना केली. कारण त्या पुरुषोत्तमांनीच विष्णूंची सुद्धा प्रजापालनाच्या कामात नेमणूक केली होती. (२८)


विष्णुरुवाच -
प्रजानां पालनं देव करिष्यामि यथोचितम् ।
प्रवृत्त्या च निवृत्त्या च कर्मज्ञानप्रयोजनात् ॥ २९ ॥
विष्णू म्हणाले - हे देवा ! मी आपल्या आज्ञाप्रमाणे कर्म आणि ज्ञान यांमुळे उपन्न होणार्‍या प्रवृत्ती आणि निवृत्ती यांच्याद्वारा योग्य रीतीने प्रजेचे पालन करीन. (२९)


यदा यदैव कालेन धर्मग्लानिर्भविष्यति ।
धर्मं संस्थापयिष्यामि ह्यवतारैस्तदा तदा ॥ ३० ॥
कालक्रमानुसार जेव्हा जेव्हा धर्माचा र्‍हास होईल, तेव्हा तेव्हा अनेक अवतार धारण करून मी पुन्हा धर्माची स्थापना करीन. (३०)


भोगार्थिभ्यस्तु यज्ञादि फलं दास्यामि निश्चितम् ।
भोगार्थिभ्यो विरक्तेभ्यो मुक्तिं पञ्चविधां तथा ॥ ३१ ॥
ज्यांना भोगांची फळ अवश्य देईन. त्याचप्रमाणे जे मुक्‍त होऊ इच्छितात, त्या विरक्‍तांना पाच प्रकारच्या मुक्‍तीसुद्धा देईन. (३१)


येऽपि मोक्षं न वाञ्छन्ति तान् कथं पालयाम्यहम् ।
आत्मानं च श्रियं चापि पालयामि कथं वद ॥ ३२ ॥
परंतु जे लोक मोक्षाची सुद्धा इच्छा करीत नाहीत, त्यांचे पालन मी कसे करावे, हे मला समजत नाही. तसेच मी माझे व लक्ष्मीचेसुद्धा रक्षण कसे करावे, ते आपण सांगावे. (३२)


तस्मा अपि पुमानाद्यः श्रीभागवतमादिशत् ।
उवाच च पठस्वैनत् तव सर्वार्थसिद्धये ॥ ३३ ॥
आदिपुरुष श्रीकृष्णांनी त्यांनासुद्धा श्रीमद्‌भागवताचा उपदेश करून म्हटले, ’आपल्या मनोरथांच्या सिद्धीसाठी तू या श्रीमद्‌भागवतशास्त्राचा नेहमी पाठ करीत जा.’ (३३)


ततो विष्णुः प्रसन्नात्मा परमार्थकपालने ।
समर्थोऽभूच्छ्रिया मासि मासि भागवतं स्मरन् ॥ ३४ ॥
या उपदेशाने प्रसन्न झालेले श्रीविष्णू लक्ष्मीसह प्रत्येक महिन्यात श्रीमद्‌भागवताचे स्मरण करू लागले. यामुळे ते परमार्थाचे आणि जगाचे योग्य रीतीने पालन करण्यास समर्थ झाले. (३४)


यदा विष्णुः स्वयं वक्ता लक्ष्मीश्च श्रवणे रतः ।
तदा भागवतश्रावो मासेनैव पुनः पुनः ॥ ३५ ॥
जेव्हा श्रीविष्णू स्वतः सांगतात आणि लक्ष्मी प्रेमाने श्रवण करते , त्या प्रत्येक वेळी भागवतकथेचे श्रवण एक महिन्यातच पूर्ण होते. (३५)


यदा लक्ष्मीः स्वयं वक्त्री विष्णुश्च श्रवने रतः ।
मासद्वयं रसास्वादः तदातीव सुशोभते ॥ ३६ ॥
परंतु जेव्हा लक्ष्मी स्वतः कथा सांगते आणि श्रीविष्णू ऐकतात, तेव्हा भागवतकथेचे रसास्वादन दोन महिनेपर्यंत चालू राहाते. त्यावेळी कथा खूप रंगते. (३६)


अधिकारे स्थितो विष्णूह् लक्ष्मीर्निश्चिन्तमानसा ।
तेन भागवतास्वादः तस्या भूरि प्रकाशते ॥ ३७ ॥
श्रीविष्णूंना जगाचे पालन करण्याची चिंता असते, पण लक्ष्मीला कसलीन चिंता नसते. म्हणूनच लक्ष्मीच्या मुखातून भागवताचे वर्णन अधिक प्रभावी होते. (३७)


अथ रुद्रोऽपि तं देवं संहाराधिकृतः पुरा ।
पुमांसं प्रार्थयामास स्वसामर्थ्यविवृद्धये ॥ ३८ ॥
यानंतर ज्याची भगवंतांनी संहार करण्यासाठी नेमणूक केली होती, त्या रुद्रानेही आपले सामर्थ्य वाढविण्यासाठी त्या परमपुरुषांना प्रार्थना केली. (३८)


रुद्र उवाच -
नित्ये नैमित्तिके चैव संहारे प्राकृते तथा ।
शक्तयो मम विद्यन्ते देवदेव मम प्रभो ॥ ३९ ॥
आत्यन्तिके तु संहारे मम शक्तिर्न विद्यते ।
महद्‌दुःखं ममेतत्तु तेन त्वां प्रार्थयाम्यहम् ॥ ४० ॥
रुद्र म्हणाला - हे माझे प्रभू देवाधिदेवा ! नित्य नैमित्तिक आणि प्राकृत संहार करण्याची शक्‍ती माझ्या अंगी आहे. परंतु आत्यंतिक प्रलयाची शक्‍ती नाही. हेच माझी मोठे दुःख आहे. माझ्यातील ही कमतरता नाहीशी व्हावी, म्हणून मी आपल्याला प्रार्थना करीत आहे. (३९-४०)


बृहस्पतिरुवाच -
श्रीमद् भागवतं तस्मा अपि नारायणो ददौ ।
स तु संसेवनादस्य जिग्ये चापि तमोगुणम् ॥ ४१ ॥
कथा भागवती तेने सेविता वर्षमात्रतः ।
लये त्वात्यन्तिके तेनौ आप शक्तिं सदाशिवः ॥ ४२ ॥
बृहस्पती म्हणतात - नारायणांनी रुद्राची प्रार्थना ऐकून त्यालाही श्रीमद्‌भागवताचाच केली. त्याने एका वर्णत एक पारायण या पद्धतीने भागवतकथेचे सेवन केले. या सेवनाने त्याने तमोगुणावर विजय मिळवीला आणि आत्यंतिक संहार-मोक्ष करण्याची शक्‍तीसुद्धा प्राप्त करून घेतली. (४१-४२)


उद्धव उवाच -
श्रीभागवतमाहात्म्य इमां आख्यायिकां गुरोः ।
श्रुत्वा भागवतं लब्ध्वा मुमुदेऽहं प्रणम्य तम् ॥ ४३ ॥
उद्धव म्हणतो - श्रीमद्‌भागवताच्या माहात्म्या-संबंधीची ही कथा मी माझे गुरू श्रीबृहस्पती यांचे तोंडून ऐकली आणि भागवताचा उपदेश प्रात्प करून घेऊन मी आनंदित झालो व त्यांना प्रणाम केला. (४३)


ततस्तु वैष्णवीं रीतिं गृहीत्वा मासमात्रतः ।
श्रीमद् भागवतास्वादो मया सम्यङ्‍६निषेवितः ॥ ४४ ॥
त्यानंतर श्रीविष्णूंच्याच पद्धतीने मीसुद्धा एकेका महिन्यात श्रीमद्‌भागवत कथेचा चांगल्या तर्‍हेने रसास्वद घेऊ लागलो. (४४)


तावतैव बभूवाहं कृष्णस्य दयितः सखा ।
कृष्णेनाथ नियुक्तोऽहं व्रजे स्वप्रेयसीगणे ॥ ४५ ॥
तेवढ्यानेच मी भगवान श्रीकृष्णांचा प्रियतम सखा झालो. त्यानंतर भगवंतांनी मला व्रजामध्ये आपल्या प्रियतम गोपींच्या सेवेसाठी नियुक्‍त केले. (४५)


विरहार्त्तासु गोपीषु स्वयं नित्यविहारिणा ।
श्रीमागवतसन्देशो मन्मुखेन प्रयोजितः ॥ ४६ ॥
विरहव्याकूळ गोपींमध्ये वास्तविक नित्य विहार करणार्‍या श्रीकृष्णांनी, त्यांचे भ्रमामुळे वाटणारे दुःख दूर करण्यासाठी त्या गोपींना माझ्या मुखाने श्रीभागवताचा संदेश पाठविला. (४६)


तं यथामति लब्ध्वा ता आसन् विरहवर्जिताः ।
नाज्ञासिषं रहस्यं तत् चमत्कारस्तु लोकितः ॥ ४७ ॥
तो संदेश आपल्या बुद्धीनुसार ग्रहण करून गोपी ताबडतोब विरहवेदनांतून मुक्‍त झाल्या. हे रहस्य तर मी समजू शकलो नाही. परंतु मी हा चमत्कार मात्र प्रत्यक्ष पाहिला. (४७)


स्वर्वासं प्रार्थ्य कृष्णं च ब्रह्माद्येषु गतेषु मे ।
श्रीमद्‌भागवते कृष्णः तद् रहस्यं स्वयं ददौ ॥ ४८ ॥
पुरतोऽश्वत्थमूलस्य चकार मयि तद् दृढम् ।
तेनात्र व्रजवल्लीषु वसामि बदरीं गतः ॥ ४९ ॥
या घटनेला पुष्कळ दिवस लोटल्यावर जेव्हा ब्रह्मदेव इत्यादी देव येऊन भगवंतांना आपल्या परमधामाकडे येण्याविषयी प्रार्थना करून निघून गेले, त्यावेळी पिंपळाखाली त्यांच्यासमोरच असलेल्या मला भगवंतांनी श्रीमद्‌भागवताच्या त्या रहस्याचा स्वतःच उपदेश केला आणि माझ्या बुद्धीत तो दृढ केला. त्याच्याच प्रभावाने मी बदरिकाश्रमात राहूनसुद्धा येथे व्रजातील वेलींमध्येही निवास करीत आहे. (४८-४९)


तस्मात् नारदकुण्डेऽत्र तिष्ठामि स्वेच्छया सदा ।
कृष्णप्रकाशो भक्तानां श्रीमद्‌भागवताद् भवेत् ॥ ५० ॥
त्याच आधारावर मी येथे नारदकुंडावर नेहमी स्वेच्छेने राहातो. भक्‍तांना श्रीमद्‌भागवताच्या सेवनानेच श्रीकृष्णतत्त्वाचा प्रकाश मिळेल. (५०)


तदेषामपि कार्यार्थं श्रीमद्‌भागवतं त्वहम् ।
प्रवक्ष्यामि सहायोऽत्र त्वयैवानुष्ठितो भवेत् ॥ ५१ ॥
म्हणून येथे उपस्थित झालेल्या या सर्व भक्‍तजनांचे मनोरथ सिद्ध होण्यासाठी मी श्रीमद्‌भागवताचा पाठ करीन. परंतु या कार्यात तुम्हीच मला साहाय्य केले पाहिजे. (५१)


सूत उवाच -
विष्णुरातस्तु श्रुत्वा तद् उद्धवं प्रणतोऽब्रवीत् ।
सूत म्हणतात - हे ऐकून परीक्षिताने उद्धवाला प्रणाम करून म्हटले.
परीक्षित म्हणाला - हे हरिदासा ! आपण श्रीमद्‌भागवत - कथेचे निरूपण करावे. (५२)


परीक्षिदुवाच -
हरिदास त्वया कार्य श्रीभागवतकीर्तनम् ॥ ५२ ॥
या बाबतील माझ्याकडून जे साहाय्य पाहिजे असेल, त्याची आज्ञा करावी.
सूत म्हणतात - हे ऐकून उद्धव प्रसन्न होऊन म्हणाला - (५३)


आज्ञाप्योऽहं यथा कार्यः सहायोऽत्र मया तथा ।
सूत उवाच -
श्रुत्वैतद् उद्धवो वाक्यं उवाच प्रीतमानसः ॥ ५३ ॥
उद्धव म्हणाला- भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा या पृथ्वीचा त्याग केला, तेव्हापासून येथे कली बलवान झाला आहे. ज्यावेळी हे सत्कार्य सुरू होईल, तेव्हा तो याच्यामध्ये मोठे विघ्न आणील. (५४)


उद्धव उवाच -
श्रीकृष्णेन परित्यक्ते भूतले बलवान कलिः ।
करिष्यति परं विघ्नं सत्कार्ये समुपस्थिते ॥ ५४ ॥
तस्माद् दिग्विजयं याहि कलिनिग्रहमाचर ।
अहं तु मासमात्रेण वैष्णवीं रीतिमास्थितः ॥ ५५ ॥
श्रीमद्‌भागवतास्वादं प्रचार्यं त्वत्सहायतः ।
एतान् सम्प्रापयिष्यामि नित्यधाम्नि मधुद्विषः ॥ ५६ ॥
म्हणून आता दिग्विजयासाठी जा आणि कलीला ताब्यात ठेव. इकडे मी तुझ्या साहाय्याने वैष्णवी पद्धतीने एक महिनाभर श्रीमद्‌भागवतकथेचे रसपान करवून यांना भगवान मधुसूदनांच्या नित्य गोलोक धामामध्ये पोहोचवीन. (५४-५६)


सूत उवाच -
श्रुत्वैवं तद्वचो राजा मुदितश्चिन्तयाऽऽतुरः ।
तदा विज्ञापयामास स्वाभिप्रायं तमुद्धवम् ॥ ५७ ॥
सूत म्हणतात- उद्धवाचे म्हणणे ऐकल्यावर कलीवर विजय मिळवण्याच्या विचाराने राजाला आनंद झाला. परंतु तो चिंतातुरही झाला. त्यावेळी त्याने चिंतेचे कारण उद्धवाला सांगितले. (५७)


परीक्शिदुवाच -
कलिं तु निग्रहीष्यामि तात ते वचसि स्थितः ।
श्रीभागवतसम्प्राप्तिः कथं मम भविष्यति ॥ ५८ ॥
परिक्षित म्हणाला- अहो काका ! आपल्या आज्ञेनुसार कलियुगाला मी लगाम घालीन. परंतु मला श्रीमद्‌भागवताची प्राप्ती कशी होईल ? (५८)


अहं तु समनुग्राह्यः तव पादतले श्रितः ।
सूत उवाच -
श्रुत्वैतद् वचनं भूयोऽपि उद्धवस्तं उवाच ह ॥ ५९ ॥
आपल्या चरणांना शराण आलेल्या माझ्यावरही आपण कृपा करावी.
सूत म्हणतात- हे ऐकून उद्धव पुन्हा त्याला म्हणाला. (५९)


उद्धव उवाच -
राजन् चिन्ता तु ते कापि नैव कार्या कथञ्चन ।
तवैव भगवत् शास्त्रे यतो मुख्याधिकारिता ॥ ६० ॥
उद्धव म्हणाला- राजन ! तुला तर कोणत्याही गोष्टीसाठी, कोणत्याही प्रकारे चिंता करण्याचे कारण नाही. कारण या भागवत शास्त्राचा खरा अधिकारी तूच आहेस. (६०)


एतावत् काल पर्यंतं प्रायो भागवतश्रुतेः ।
वार्तामपि न जानन्ति मनुष्याः कर्मतत्पराः ॥ ६१ ॥
जगातील माणसे प्रापंचिक कामातच गढून गेलेली असल्यामुळे आजपर्यंत तरी बहुतेकांनी भागवतश्रवणाचे नावसुद्धा काढलेले नाही. (६१)


त्वत्प्रसादेन बहवो मनुष्या भारताजिरे ।
श्रीमद्भागवतप्राप्तौ सुखं प्राप्स्यन्ति शाश्वतम् ॥ ६२ ॥
या भारतवर्षातील बहुतेक लोक तुझ्याच कृपेने श्रीमद्‌भागवतकथेची प्राप्ती झाल्यावर शाश्वत सुख प्राप्त करून घेतील. (६२)


नन्दनन्दनरूपस्तु श्रीशुको भगवान् ऋषिः ।
श्रीमद् भागवतं तुभ्यं श्रावयिष्यत्यसंशयम् ॥ ६३ ॥
महर्षी श्रीशुकदेव साक्षात श्रीकृष्णांचेच स्वरूप आहेत. तेच तूला श्रीमद्‌भागवताची कथा ऐकवतील, यात तिळमात्र शंका नाही. (६३)


तेन प्राप्स्यसि राजन् त्वं नित्यं धाम व्रजेशितुः ।
श्रीभागवतसञ्चारः ततो भुवि भविष्यति ॥ ६४ ॥
राजन ! त्या कथेच्या श्रवणाने तू व्रजेश्वर श्रीकृष्णांचे नित्यधाम प्राप्त करून घेशील. त्यानंतर या पृथ्वीवर श्रीमद्‌भागवतकथेचा प्रचार होईल. (६४)


तस्मात्त्वं गच्छ राजेन्द्र कलिनिग्रहमाचर ।
सूत उवाच -
इत्युक्तस्तं परिक्रम्य गतो राजा दिशां जये ॥ ६५ ॥
म्हणून राजेंद्रा ! तू जाऊन कलीला बंधनात ठेव.
सूत म्हणतात - उद्धवाने असे सांगितल्यावर परीक्षिताने त्याला प्रदक्षिणा घातली, नमस्कार केला आणि तो दिग्विजयासाठी निघून गेला. (६५)


वज्रस्तु निजराज्येशं प्रतिबाहुं विधाय च ।
तत्रैव मातृभिः साकं तस्थौ भागवताशया ॥ ६६ ॥
इकडे वज्रानेसुद्धा आपला पुत्र प्रतिबाहू याला मथुरेच्या राज्यावर बसविले आणि आपल्या मातांच्या बरोबर तो श्रीमद्‌भागवत ऐकण्याच्या इच्छेने वृंदावनात राहू लागला. (६६)


अथ वृन्दावने मासं गोवर्धनसमीपतः ।
श्रीमद् भागवास्वादस्तु उद्धवेन प्रवर्तितः ॥ ६७ ॥
त्यानंतर उद्धवाने वृंदावनात गोवर्धन पर्वताजवळ एक महिनाभर श्रीमद्‌भागवतकथेचे रस भक्‍तांना वाटला. (६७)


तस्मिन् आस्वाद्यमाने तु सच्चिदानन्दरूपिणी ।
प्रचकाशे हरेर्लीला सर्वतः कृष्ण एव च ॥ ६८ ॥
त्या रसाचे आस्वादन करतेवेळी प्रेमी श्रोत्यांच्या दृष्टीसमोर सगळीकडे भगवंतांची सच्चिदानंदमय लीलाच प्रगट झाली आणि त्यांना सर्वत्र श्रीकृष्णचंद्रांचा साक्षात्कार होऊ लागला. (६८)


आत्मानं च तदन्तःस्थं सर्वेऽपि ददृशुस्तदा ।
वज्रस्तु दक्षिणे दृष्ट्वा कृष्णपादसरोप्रुहे ॥ ६९ ॥
स्वात्मानं कृष्णवैधुर्यान् मुक्तस्तद्‌भुव्यशोभत ।
ताश्च तन्मातरं कृष्णे रासरात्रिप्रकाशिनि ॥ ७० ॥
चन्द्रे कलाप्रभारूपं आत्मानं वीक्ष्य विस्मिताः ।
स्वप्रेष्ठविरहव्याधिविमुक्ताः स्वपदं ययुः ॥ ७१ ॥
त्यावेळी सर्व श्रोत्यांनी स्वतःला भगवंतांच्या स्वरूपातच आपण असल्याचे पाहिले. वज्रनाभाने आपल्याला श्रीकृष्णांच्या उजव्या चरणमकलाच्या ठिकाणी असलेले पाहिले आणि त्यांच्या विरहशोकातून मुक्‍त होऊन तो त्या ठिकाणी अत्यंत शोभून दिसू लागला. वज्रनाभाच्या त्या रोहिणी इत्यादी मातासुद्धा रास-रजनीत प्रकाशित होत असलेल्या श्रीकृष्णरूपी चंद्राच्या विग्रहामध्ये स्वतःला कला आणि प्रभेच्या रूपात स्थिर झाल्याचे पाहून अत्यंत आश्चर्यचकित झाल्या. त्याचप्रमाणे आपल्या प्राणप्रियाच्या विरहवेदनेपासून मुक्‍त होऊन त्यांच्या परमधामामध्ये गेल्या. (६९-७१)


येऽन्ये च तत्र ते सर्वे नित्यलीलान्तरं गताः ।
व्यावहारिकलोकेभ्यः सद्योऽदर्शनमागताः ॥ ७२ ॥
गोवर्धननिकुञ्जेषु गोषु वृन्दावनादिषु ।
नित्यं कृष्णेन मोदन्ते दृश्यन्ते प्रेमतत्परैः ॥ ७३ ॥
यांच्याखेरीज जे श्रोते तेथे उपस्थित होते, ते सुद्धा भगवंताम्च्या नित्य अंतरंग लीलेमध्ये सामील होऊन या स्थूल व्यावहारिक जगातून तात्काळ अंतर्धान पावले. ते सर्वजण नेहमीच गोवर्धन पर्वतावरील वन आणि झाडांमध्ये, वृंदावन, काम्यवन इत्यादी वनांमध्ये तसेच तेथील दिव्य गाईंसमवेत श्रीकृष्णांच्याबरोबर विहार करीत अत्यानंदाचा अनुभव घेत असलेले, श्रीकृष्ण-प्रेमामध्ये मग्न असलेल्यांना दिसतात. (७२-७३)


सूत उवाच -
ये एतां भगवत्‌प्राप्तिं श्रुणुयाच्चापि कीर्तयेत् ।
तस्य वै भगवत् प्राप्तिः दुःखहानिश्च जायते ॥ ७४ ॥
इति श्रीस्कान्दे महापुराण् एकशीतिसाहस्र्यां संहितायां द्वितीये वैष्णवखण्डे
परीक्षिद् उद्धवसंवादे श्रीमद् भागवतमाहात्म्ये तृतीयोऽध्यायः ॥ ३ ॥
सूत म्हणतात - जे लोक ही भगवत्प्राप्तीची कथा ऐकतील आणि दुसर्‍यांना ऐकवतील, त्यांना भगवत्प्राप्ती होईल व त्यांचे दुःख नाहीसे होईल. (७४)


स्कान्दे भागवत माहात्म्ये अध्याय तिसरा समाप्त

GO TOP