श्रीमद् भागवत पुराण
एकादशः स्कन्धः
त्रयोदशोऽध्यायः

भगवता हंसरूपेण ब्रह्मणे ज्ञानोपदेशः -

हंसरुपाने सनकादिकास केलेल्या उपदेशाचे वर्णन -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


श्रीभगवानुवाच -
( अनुष्टुप् )
सत्त्वं रजस्तम इति गुणा बुद्धेर्न च आत्मनः ।
सत्त्वेन अन्यतमौ हन्यात् सत्त्वं सत्त्वेन चैव हि ॥ १ ॥
भगवान श्रीकृष्ण म्हणातात -
( अनुष्टुप )
सत्त्व रज तमो हे तो आत्म्याचे गुण ते नव्हे ।
सत्त्वे रज तमा सारा सत्त्वाने सत्त्वा जिंकिणे ॥ १ ॥

सत्त्वं रजः तमः इति गुणाः - सत्त्व रज तम हे गुण - बुद्धे न च आत्मनः - बुद्धीचे आहेत, आत्म्याचे नव्हेत - सत्त्वेन अन्यतमौ - सत्त्व गुण हाताशी घेऊन त्याने दुसरे रज आणि तम या दोन गुणांचा - सत्त्वेन हि सत्त्वं एव च - अणि उपशमात्मक सत्त्वगुणानेच सत्यदयादिवृत्तिरूप सत्त्वगुणाचा - हनात् - नाश करावा. ॥ १ ॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले - सत्त्व, रज आणि तम हे तीन बुद्धीचे गुण आहेत, आत्म्याचे नव्हेत, सत्त्वगुणाने रज आणि तमाचा नाश करावा नंतर शुद्धसत्त्वाने वृत्तिरूप सत्त्वगुणाचाही त्याग करावा. (१)


सत्त्वात् धर्मो भवेद्‍ वृद्धात् पुंसो मद्‍भक्तिलक्षणः ।
सात्त्विकोपासया सत्त्वं ततो धर्मः प्रवर्तते ॥ २ ॥
वाढता सत्त्व तै लाभे भक्तिरूप स्वधर्म तो ।
सत्त्व ते सेविता नित्य वृत्ति भक्तास लाभते ॥ २ ॥

वृद्धात् सत्त्वात् - सत्त्व गुणाची वृद्धी झाली म्हणजे - पुंसः - पुरुषाला - भद्‌भक्तिलक्षणः धर्मः भवेत् - ज्यात् माझी भक्ति आहे असा धर्म उत्पन्न होतो - सत्त्वं सात्त्विकोपासया - सात्त्विक पदार्थांच्या उपासनेने सत्त्व गुण - ततः - सत्त्व गुण वाढल्यानंतर - धर्मः प्रवर्तते - शुद्ध धर्माची प्रवृत्ति होते. ॥ २ ॥
माणसाचा सत्वगुण वाढला असता माझ्या भक्ति रूप धर्माची वाढ होते सात्त्विक पदार्थांचे सेवन केले असता सत्त्व गुण वाढतो आणि त्यामुळे धर्माकडे प्रवृत्ती होते. (२)


धर्मो रजस्तमो हन्यात् सत्त्ववृद्धिः अनुत्तमः ।
आशु नश्यति तन्मूलो हि, अधर्म उभये हते ॥ ३ ॥
ज्या धर्मे वाढते सत्त्व श्रेष्ठ तो नष्टितो गुणा ।
नष्टता अन्य ते दोन अधर्म शीघ्र नष्टती ॥ ३ ॥

सत्त्ववृद्धिः अनुत्तमः धर्मः - सत्त्वाची वाढ झाली म्हणजे प्रवृत्त झालेला अत्युत्तम धर्म - रजः तमः - रज आणि तम या गुणांना - हन्यात् - मारक होईल - उभये हते - रज तम नष्ट झाल्यानंतर - तन्मूलः अधर्मः - रज, तमाचे मूळ असणारा अधर्म - आशु नश्यति हि - तत्काळ लयास जातो. ॥ ३ ॥
सत्त्वगुणाची वाढ हाच श्रेष्ठ धर्म होय कारण तो रज आणि तम यांचा नाश करतो रज आणि तम नष्ट झाले असता त्यांच्यामुळे उत्पन्न होणारा अधर्मसुद्धा ताबडतोप नष्ट होतो. (३)


आगमः अपः प्रजा देशः कालः कर्म च जन्म च ।
ध्यानं मंत्रोऽथ संस्कारो दशैते गुणहेतवः ॥ ४ ॥
शास्त्र जल प्रजा देश काल कर्म नि जन्म नी ।
ध्यान मंत्र नि संस्कार गुणांना वर्धिती पहा ॥ ४ ॥

आगमः अपः - शास्त्र व तीर्थ - प्रजाझ् देशः कालः - संतति, देश, काल - कर्म च जन्म च - कर्म व जन्मही - ध्यानं मंत्रः अथ संस्कारः - ध्यान, मंत्र व संस्कार - एते दश - हे दहा पदार्थ - गुणहेतवः - गुणवृद्धीला हेतु आहेत. ॥ ४ ॥
शास्त्र, पाणी, प्रजा, देश, काळ, कर्म, जन्म, ध्यान, मंत्र आणि संस्कार ही दहा गुणांच्या वाढीची कारणे आहेत. (४)


तत् तत् सात्त्विकं एवैषां यद् यद् वृद्धाः प्रचक्षते ।
निंदंति तामसं तत्तद् राजसं तद् उपेक्षितम् ॥ ५ ॥
मानिती संत ते सत्त्व निंदिती तम तो असा ।
अपेक्षिती अशा सार्‍या वस्तू राजस मानणे ॥ ५ ॥

एषा यत् यत् वृद्धा प्रचक्षते - यांपैकी ज्याला शास्त्र्ज्ञ मान देतात - तत् तत् सात्त्विकं एव - ते ते खास सात्त्विकच होय - यत् निंदंति तत् तामसं - ज्याची निंदा करतात ते तामस होय - यत् तद् उपेक्षितं तत् राजसम् - आणि ज्याची उपेक्षाच करतात ते राजस होय. ॥ ५ ॥
श्रेष्ठ लोक ज्यांची प्रशंसा करतात, ते सात्त्विक समजावेत, ज्यांची उपेक्षा करतात ते राजस आणि ज्यांची निंदा करतात, ते तामस समजावेत. (५)


सात्त्विकानि एव सेवेत पुमान् सत्त्वविवृद्धये ।
ततो धर्मस्ततो ज्ञानं यावत् स्मृतिः अपोहनम् ॥ ६ ॥
होईतो गुण निवृत्ती सत्त्वार्थ शास्त्र सेविणे ।
तयाने वाढतो धर्म धर्माने ज्ञान होतसे ॥ ६ ॥

पुमान् सत्त्वविवृद्धये - मनुष्यांनी सत्त्वगुणाची वृद्धी व्हावी म्हणून - सात्त्विकानि एव सेवेत - सात्त्विक वस्तूंचे आणि सात्त्विक आचार, उच्चार आणि विचार यांचे मात्र सेवन करावे - ततः धर्मः - त्यापासून धर्म उत्पन्न व विवृद्ध होतो. - ततः - त्यापासून - यावत् स्मृतिः अपोहनः ज्ञानं - आत्मसाक्षात्कार करणारे असे स्थूल व सूक्ष्म देहाना कारणीभूत अशा गुणांचा निरास होईल असे ज्ञान होते. ॥ ६ ॥
माणसाने सत्त्वगुणाच्या वृद्धीसाठी सात्त्विक पदार्थांचेच सेवन करावे त्यामुळे धर्म वाढून ज्ञान उत्पन्न होईल आणि ज्ञानामुळे आत्मसाक्षात्कार होऊन सर्व प्रकारचे संशय नाहीसे होतील. (६)


वेणुसङ्घर्षजो वह्निः दग्ध्वा शाम्यति तद्‌वनम् ।
एवं गुणव्यत्ययजो, देहः शाम्यति तत्क्रियः ॥ ७ ॥
वेळचा पेटता अग्नि वना जाळोनि शांत हो ।
वैषम्ये जन्मतो देह ज्ञानाग्नी भस्म तो करी ॥ ७ ॥

वेणुसंघर्षजः वह्निः - वेणू-वेणूंच्या संघर्षणाने उत्पन्न होणारा अग्नि - तत् वनं दग्ध्वा - ते सर्व वन जाळून श्म्यति - शांत होतो - एवं - तसाच - गुणव्यत्ययजः देहः - गुणांच्या वैषम्याने उत्पन्न झालेला देह - तत्क्रियः - अग्निप्रमाणेच क्रिया करून - शाम्यति - शांत होतो, नष्ट होतो. ॥ ७ ॥
बांबूंच्या एकमेकावर घासण्याने उत्पन्न झालेला अग्नी जसा बांबूंचे वन जाळून स्वतः शांत होतो, त्याचप्रमाणे गुणांच्या मिश्रणाने उत्पन्न झालेले देह, सत्त्वगुणापासून उत्पन्न झालेल्या ज्ञानाग्नीने भस्म होतात. (७)


श्रीउद्धव उवाच -
विदंति मर्त्याः प्रायेण विषयान् पदमापदाम् ।
तथापि भुञ्जते कृष्ण तत्कथं श्वखराजवत् ॥ ८ ॥
उद्धवजीने विचारिले -
आपत्ति विषयां मध्ये मनुष्या ज्ञात ते असे ।
शवान खरा परी दुःखा साहोनी भोगिती कसे ॥ ८ ॥

विषयां आपदां पदं - विषयांचे स्थान म्हणजे संकटांचे स्थान - प्रायेण मर्त्याः विदन्ति - मनुष्यास सामान्यतः कळत असते - तथापि कृष्ण -- असे असूनही हे कृष्णा ! - श्वखराजवत् - कुत्रे, खेचर व मेंढा याप्रमाणे - तत् कथं भुन्जते - हे लोक कसे विषयसेवन करतात ? ॥ ८ ॥
उद्धवाने विचारले - भगवान ! साधारणतः सर्वच माणसांना हे माहीत आहे की, विषय हे संकटांचे घर आहे तरीसुद्धा ती माणसे कुत्री, गाढवे किंवा बोकडांप्रमाणे ते विषय का भोगतात ? (८)


श्रीभगवानुवाच -
अहमिति अन्यथा बुद्धिः प्रमत्तस्य यथा हृदि ।
उत्सर्पति रजो घोरं ततो वैकारिकं मनः ॥ ९ ॥
भगवान श्रीकृष्ण सांगतात -
अज्ञाने भ्रमतो जीव अहंकार वसे तदा ।
सत्त्वप्रधान ते चित्त रजोव्याप्ताच होतसे ॥ ९ ॥

प्रमत्तस्य हृदि - उन्मत्त जीवाच्या अंतःकरणामध्ये - ’अहं’ इति अन्यथाबुद्धिः - ’मी अमुक विशिष्ट लक्षणाचा आहे’ अशी अयथार्थ जाणीव - यथा उत्सर्पति - जशी व जितक्या जोराने उठाव घेते - ततः वैकारिकं मनः - त्या खोट्या अहं बुद्धीने विकृत केलेले मन - घोरं रजः उत्सर्पति - घोर म्हणजे भयंकर जो रजोगुण, त्यामध्ये प्रवेश करते. ॥ ९ ॥
श्रीकृष्ण म्हणाले - अज्ञानी माणासाच्या मनामध्ये देहाविषयी ‘मी‘ अशी खोटी कल्पना उत्पन्न होते, तेव्हा त्याच्या सत्त्वगुणप्रधान मनात घोर रजोगुण उत्पन्न होतो. (९)


रजोयुक्तस्य मनसः सङ्कल्पः सविकल्पकः ।
ततः कामो गुणध्यानाद् दुःसहः स्याद् हि दुर्मतेः ॥ १० ॥
करोति कामवशगः कर्माणि अविजितेन्द्रियः ।
दुःखोदर्काणि संपश्यन् रजोवेग विमोहितः ॥ ११ ॥
संकल्प नि विकल्पांची मालिका होतसे पुन्हा ।
विषया चिंतिते नित्य दुर्बुद्धीनेचि ते फसे ॥ १० ॥
अज्ञानां वश होवोनी कितेक काम तो करी ।
रजोगुणेचि मोहोनी दुःख लाभे नि ते करी ॥ ११ ॥

रजोयुक्तस्य मनसः - रजोगुणाने व्याप्त झालेल्या मनात - सविकल्पकः संकल्पः - विशेष प्रकारचे संशयास्पद संकल्प उत्पन्न होतात - ततः गुणध्यानात् - त्याचे गुणध्यानच चालविले असल्यामुळे - दुर्मतेःकामः दुःसहः स्यात् हि - मलीन चित्ताच्या पुरुषाचा काम अनिवार होतो. ॥ १० ॥ कामवशगः - मनुष्य कामाचा गुलाम झाल्यामुळे - अविजितेंद्रियः - इंद्रियगणांअरील ज्याचे प्रभुत्व नहीसे झाले आहे - कर्माणि दुःखोदर्काणि संपश्यन् - कर्में दुःखकारक आहेत असे जाणूनही - रजोवेगविमोहितः - रजोगुणाच्या वेगामुळे मूढ होऊन - करोति - ती ती दुःखकारक कर्में करतो. ॥ ११ ॥
रजोगुणाने घेरलेले मन अनेक प्रकारचे संकल्पविकल्प करू लागते नंतर त्याच त्याच विषयांचे चिंतन केल्यामुळे त्याच्याविषयी असह्य अशी कामना उत्पन्न होते त्या कामनांच्या अधीन झालेला व मन ताब्यात नसलेला मनुष्य कळून सवरून परिणामी दुःखदायक अशी कामे करतो कारण तो रजोगुणाच्या आवेगाने अतिशय मोहित झालेला असतो. (१०-११)


रजस्तमोभ्यां यदपि विद्वान् विक्षिप्तधीः पुनः ।
अतंद्रितो मनो युञ्जन् दोषदृष्टिर्न सज्जते ॥ १२ ॥
रजे तमे जरी विव्दान विक्षिप्त जाहला तरी ।
दोषीत विषया पाही आसक्ती त्या न हो कधी ॥ १२ ॥

रजस्तमोभ्यां - रजोगुण व तमोगुण यांनी - यदपि विक्षिप्तधीः - यदपि बुद्धि भ्रष्ट झाली असली तरी - विद्वान् - विवेकी पुरुश - पुनः मनः अतंद्रितः युंजन् - पुनः पुनः आपले मन ताळ्यावर आणण्याचा निश्चय निरलसपणे करून - दोषदृष्टिः न सज्जते - विषयांकडे दोषदृष्टीने पाहणारा त्य मध्ये आसक्त होत नाही. ॥ १२ ॥
रजोगुणतमोगुणांनी ज्ञानी माणसाचीसुद्धा बुद्धी विषयांकडे धाव घेते परंतु तो सावधगिरी बाळगून मन एकाग्र करून विषय दोषयुक्त आहेत, हे जाणून त्यांमध्ये आसक्त होत नाही. (१२)


अप्रमत्तोऽनुयुञ्जीत मनो मय्यर्प यत् शनैः ।
अनिर्विण्णो यथाकालं जितश्वासो जितासनः ॥ १३ ॥
प्राणायामे मला ध्यावे साधके शक्ति ज्यापरी ।
अपेशे उबगो ना हो उत्साहे लागणे पुन्हा ॥ १३ ॥

अप्रमत्तः - नित्य सावध रहून - अनिर्विण्णः - उदासीन न होता - मनः - जीवाने आपले मन - शनैः मयि अर्पयन् - हळूहळू मला अर्पण करून - यथाकालं - योग्यवेळी - जितासनः जितश्वासः - आसन स्थिर करून व प्राणायाम करून - अनुयुंजीत - माझ्या ठिकाणीच स्थिर करावे. ॥ १३ ॥
म्हणून साधकाने त्रिकाळ सावधपणे उत्साहपूर्वक आसन व प्राण यांवर विजय मिळवून क्रमाक्रमाने मन वारंवार माझ्या ठिकाणी लावावे. (१३)


एतावान् योग आदिष्टो मच्छिष्यैः सनकादिभिः ।
सर्वतो मन आकृष्य मयि अद्धाऽऽवेश्यते यथा ॥ १४ ॥
सनकादिक शिष्यांना योगाचे रूप बोधिले ।
साधके मन बांधोनी प्रत्यक्ष मज चिंतिणे ॥ १४ ॥

सर्वतः मनः आकृष्य - सर्व विषयांपासून मन आकर्षून घेऊन - यथा मयि अद्धा आवेश्यते - जेणेकरून माझ्याच ठिकाणी ते प्रविष्ट होईल - एतावान् योगः - अशा स्वरूपाचा हा योगाभ्यास - सनकादिभिः मच्छिष्यैः - सनकसनंदनादि माझे शिष्य यांचे द्वारा - आदिष्ट - मी प्रकट केला. ॥ १४ ॥
सर्व विषयांपासून मनाला बाजूला करून ते प्रत्यक्ष माझ्यामध्येच स्थिर करावे माझे शिष्य असणार्‍या सनकादिकांनी योगाचे हेच स्वरूप सांगितले आहे. (१४)


श्रीउद्धव उवाच -
यदा त्वं सनकादिभ्यो येन रूपेण केशव ।
योगं आदिष्टवान् एतद् रूपमिच्छामि वेदितुम् ॥ १५ ॥
उद्धवजी म्हणाले -
सनकादिक संतांना बोधिता रूप केशवा ।
कोणते घेतले तुम्ही ते रूप जाणु इच्छितो ॥ १५ ॥

केशव - हे कृष्णा ! - सनकादिभ्यः यदा - सनकादिकांस केव्हा - येन रूपेण - आणि कोणते स्वरूप धारण करून - त्वं योगं आदिष्टवान् - तू योगोपदेश केलास - एतत् रूपं वेदितुं इच्छामि - तो समय व ते रूप जाणून घ्यायची माझी इच्छा आहे. ॥ १५ ॥
उद्ववाने विचारले - हे केशवा ! हा योग आपण सनकादिकांना ज्यावेळी ज्या रूपाने उपदेशिला होता, ते रूप मी जाणून घेऊ इच्छितो. (१५)


श्रीभगवानुवाच -
पुत्रा हिरण्यगर्भस्य मानसाः सनकादयः ।
पप्रच्छुः पितरं सूक्ष्मां योगस्यैकान्तिकीं गतिम् ॥ १६ ॥
भगवान श्रीकृष्ण सांगतात -
सनकादिक त्या संते पि__ ब्रह्म्यास एकदा ।
योगाची पुसली सीमा अंताम सुक्ष्म जी असे ॥ १६ ॥

हिरण्यगर्भस्य सनकादयाः मानसाः पुत्राः - हिरण्यगर्भ जो ब्रह्मदेव त्यास सनकादि चार मानपुत्र यांनी - योगस्य ऐकांतिकीं सूक्ष्मां गतिं - योगाची अत्यंत श्रेष्ठ व अत्यंत सूक्ष्म गति यासंबंधी - पितरं प्रपच्छुः - आपल्य जनकाला म्हणजे ब्रह्मदेवाला प्रश्न विचारला. ॥ १६ ॥
श्री भगवान म्हणाले - ब्रह्मदेवाचे मानसपुत्र सनकादिकांनी एकदा आपल्या वडिलांना योगाची सूक्ष्म आणि अंतिम मर्यादा विचारली होती. (१६)


सनकादय ऊचुः -
गुणेषु आविशते चेतो गुणाश्चेतसि च प्रभो ।
कथं अन्योन्य संत्यागो मुमुक्षोः अतितितीर्षोः ॥ १७ ॥
सनकादिक परमर्षिंनी विचारिले -
विषयी शिरते चित्त मिळती गुण त्यात ते ।
एकरूपचि ते होती काढावे वेगळे कसे ॥ १७ ॥

प्रभो - ते म्हणाले, हे भगवन - गुणेषु चेतः आविशते - गुणांमध्ये अंतःकरण प्रवेश करते - च - आणि - गुणाः चेतसि - गुण अंतःकरणात प्रवेश करतात - अतितितीर्षोः मुमुक्षोः - विषय व त्यांचे चिंतन यांना उल्लंघून मोक्ष मिळवू इच्छिणार्‍या एकनिष्ठ साधकाला - कथं अन्योन्य संत्यागः - या उभयतांचा त्यग कसा करता येईल ? ॥ १७ ॥
सनकादींनी विचारले - तात ! हे चित्त स्वभावतःच विषयांचे ठिकाणी आसक्त राहाते आणि ते विषय वासनारूपाने चित्तात राहातात तर मग या संसारसागरातून तरून जाऊ इच्छिणार्‍या मुमुक्षूने त्यांना एकमेकांपासून दूर कसे ठेवावे ? (१७)


श्रीभगवानुवाच -
एवं पृष्टो महादेवः स्वयंभूः भूतभावनः ।
ध्यायमानः प्रश्नबीजं नाभ्यपद्यत कर्मधीः ॥ १८ ॥
भगवान श्रीकृष्ण सांगतात -
देवाधिदेव ते ब्रह्मा पुसता ध्यान लावुनी ।
प्रश्राचे मूळ ते त्यांना न कळे ,कर्मसाधका ॥ १८ ॥

स्वयंभूः भूतभावनः महादेव एवं पृष्टः - स्वतः आदिपुरुष असल्यामुळे स्वयंभू, सृष्टिकर्ता, देवदेश्वर जो ब्रह्मदेव, त्याला सनकादिकांनी हा प्रश्न विचारला - ध्यामानः - त्यने एकाग्र मनाने विचार केला - कर्मधीः - कर्मकर्तृत्वाची त्यचे बुद्धि अनात्मक असल्यामुळे - प्रश्नबीजं न भ्यपद्यत - प्रश्नाचे बीज त्याला समजले नाही. ॥ १८ ॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले - भूतांना उत्पन्न करणार्‍या श्रेष्ठ स्वयंभू ब्रह्मदेवाला सनक इत्यादींनी असा प्रश्न केला होता परंतु त्याची बुद्धी कर्माच्या ठिकाणी आसक्त असल्याकारणाने पुष्कळ विचार करूनही त्याला प्रश्नाचा आशय कळला नाही. (१८)


स मामचिंतयद् देवः प्रश्नपारतितीर्षया ।
तस्याहं हंसरूपेण सकाशं अगमं तदा ॥ १९ ॥
प्रश्रांच्या उत्तरा देण्या श्रद्धेने चिंतिले मला ।
तदा मी हंसरूपाने समोर पातलो तदा ॥ १९ ॥

प्रश्नपारतितीर्षया - प्रश्नाचे समर्पक उत्तर देता यावे, व आपल्यासही कळावे म्हणून - सः देवं मां अचिन्तयत् - त्या देवाने माझे द्यान केले - तदा अहं हंसरूपेण - त्यावेळी हंसरूप घेऊन मी - तस्य सकाशं अगमं - त्याच्या जवळ गेलो. ॥ १९ ॥
प्रश्नाचे उत्तर समजून घेण्यासाठी ब्रह्मदेवाने माझे स्मरण केले तेव्हा मी हंसरूपाने त्याच्यासमोर प्रगट झालो. (१९)


दृष्ट्वा मां ते उपव्रज्य कृत्वा पादाभिवंदनम् ।
ब्रह्माणं अग्रतः कृत्वा पप्रच्छुः को भवान् इति ॥ २० ॥
इत्यहं मुनिभिः पृष्टः तत्त्वजिज्ञासुभिः तदा ।
यद् अवोचमहं तेभ्यः तद् उद्धव निबोध मे ॥ २१ ॥
पाहता मजला संते समोर करुनी पिता ।
वंदिले मजला त्यांनी वदले कोण हो तुम्ही ॥ २० ॥
उद्धवा तत्त्वजिज्ञासू सनकादिक संत ते । ॥
पुसता बोललो त्यांना तेच मी सांगतो तुला ॥ २१ ॥

मां दृष्ट्वा - मला पाहून - ते ब्रह्माणं अग्रतः कृत्वा - ते ब्रह्मदेवाला पुढे करून - पादाभिवंदनं कृत्वा - माझ्या पायांवर मस्तक ठेऊन - ’कः भवान् ?’ इति प्रपच्छुः - ’आपण कोण’ असे मला विचारले. ॥ २० ॥ उद्धव - हे उद्धवा ! - इति अहं तत्त्वजिज्ञासुभिः मुनिभिः - तत्त्व जाणू इच्छिणार्‍या मुनींनी मला असा - तदा पृष्टः - त्यावेळी प्रश्न केला - तेभ्यः अहं यत् अवोचं - त्यांनी मी जे सांगितले - तत् मे निबोध - ते माझ्याकडून नीट समजून घे. ॥ २१ ॥
तेव्हा मला पाहून सनकादिक ब्रह्मदेवाला पुढे करून माझ्याजवळ आले त्यांनी मला प्रणाम केला आणि विचारले की, "आपण कोण आहात ?" हे उद्ववा ! तत्त्व जाणून घेण्यासाठीच आलेल्या मुनींनी मला असे विचारले, तेव्हा मी त्यांना जे सांगितले, ते ऐक. (२०-२१)


वस्तुनो यदि अनानात्वं आत्मनः प्रश्न ईदृशः ।
कथं घटेत वो विप्रा वक्तुर्वा मे क आश्रयः ॥ २२ ॥
व्दिजांनो परमार्थो हा तत्त्वाच्याहुनि वेगळा ।
आत्म्या संबंधि हा प्रश्र युक्तिसंगतची नसे ॥
उत्तरा बोलण जाता गुण आश्रय घेउ कां ? ॥ २२ ॥

वस्तुनः यदि अनानात्वं - वस्तुतः परमात्मा एकच आहे तर - आत्मनः ईदृशः वः प्रश्नः - तू कोण असा आत्मविषयक तुमचा प्रश्न - कथं घटेत - उत्पन्न तरी कसा व्हावा - वा विप्रा - अथवा हे ब्राह्मणहो - मे वक्तुः कः आश्रयः - मी जो वक्ता त्याला आश्रय तरी कोणाचा ? ॥ २२ ॥
हे विप्रवर ! जर आत्म्याबद्दल आपला हा प्रश्न असेल तर, आत्मारूप वस्तू एकच आहे मग तुमचा हा प्रश्न कसा योग्य आहे ? बरे ! उत्तर देण्यासाठी जर मी बोलू लागलो, तर निर्विशेष आत्म्याविषयी कशाचा आधार घेऊन बोलू ? (२२)


पञ्चात्मकेषु भूतेषु समानेषु च वस्तुतः ।
को भवानिति वः प्रश्नो वाचारंभो ह्यनर्थकः ॥ २३ ॥
देवता माणसे प्राणी अभित्र परमार्थि ते ।
तुम्ही कोण ? असा प्रश्र वाणीचा खेळ व्यर्थतो ॥ २३ ॥

वस्तुतः - वास्तविक - पंचात्मकेषु समानेषु भूतेषु च - सर्व स्थिरच भूते पंचमहाभूतांपासूनच उत्पन्न झाली असून समानच असता - ’कः भाअन्’ इति वः प्रश्नः - तू कोण हा तुमचा प्रश्न - वाचारंभः - केवळ वाणीचा मात्र विलास आहे - हि - म्हणून - अनर्थकः - निरर्थक होय. ॥ २३ ॥
वास्तविक पंचमहाभूतात्मक तत्त्वे सर्व प्राण्यांमध्ये सारखीच आहेत म्हणून "आपण कोण ?" हा आपला प्रश्न म्हणजे फक्त शब्द आहेत तत्त्वतः त्याला काहीही अर्थ नाही. (२३)


मनसा वचसा दृष्ट्या गृह्यतेऽन्यैः अपींद्रियैः ।
अहमेव न मत्तोऽन्यत् इति बुध्यध्वमञ्जसा ॥ २४ ॥
दृष्टिने मन वा शब्दे कळे ते सर्व मीच की ।
सिद्धांत तुम्हि हा माझा तत्वाने समजून घ्या ॥ २४ ॥

मनसा, वचसा, दृष्ट्या - मनाने, वाणीने, दृष्टीने - अन्यैः अपि इंद्रियः - आणि इतर सर्व इंद्रियांनी - यत् गृह्यते - ज्याचे ग्रहण केले होते - अहं एव, न मत्त अन्यत् - मीच आहे, मद्व्यतिरिक्त दुसरे काही नाही - इति अंजसा बुध्यध्वं - हे ज्ञान वस्तुगत्या जाणून घ्या. ॥ २४ ॥
मनाने, वाणीने, दृष्टीने किंवा अन्य इंद्रियांनी जे काही घेतले जाते ते सर्व "मीच आहे, माझ्याशिवाय दुसरे काहीच नाही" हे तुम्ही निश्चित समजा. (२४)


गुणेषु आविशते चेतो गुणाश्चेतसि च प्रजाः ।
जीवस्य देह उभयं गुणाश्चेतो मदात्मनः ॥ २५ ॥
विषयाकार हे होते विचारे चित्त पुत्र हो ।
दोन्ही रूपे हि ते माझे आत्मा चित्ता न स्पर्शितो ॥ २५ ॥

प्रजाः - हे ब्रह्मदेवाच्या मुलांनो ! - गुणेषुः चेतः आविशते - गुणांमध्ये अंतःकरण प्रविष्ट होते - गुणाः चेतसि च - आणि अंतःकरणामध्ये गुण प्रविष्ट होतात - मदात्मनः जीवस्य - मी ज्या जीवाचा आत्मा आहे, त्या जीवाचे - गुणाः चेतः उभयं - हे गुण व हे चेत दोन्हीही मिळून - देहः - जीवाचे शरीर होते. ॥ २५ ॥
हे पुत्रांनो ! चित्त विषयाकार होते आणि विषय चित्तात वासनारूपाने राहातात परंतु विषय आणि चित्त हे दोन्ही माझेच स्वरूप असणार्‍या जीवाचे देह आहेत. (२५)


गुणेषु च आविशत् चित्तं अभीक्ष्णं गुणसेवया ।
गुणाश्च चित्तप्रभवा मद्‌रूप उभयं त्यजेत् ॥ २६ ॥
विषयां सेविता नित्य आसक्त चित्त होतसे ।
चित्त नी विषयो यांसी आत्मा संबंधितो नसे ॥ २६ ॥

गुणसेवया गुणेषु च - गुणांची आराधना केल्यामुळे - अभीक्ष्णं आविशत् चित्तं - गुणांमध्येच वारंवार मग्न होणारे चित्त - चित्तप्रभवाः गुणाः च - आणि त्या चित्तापासून निर्माण होणारे गुण - उभयं - गुण व चित्त ही दोन्ही - मद्‌रूपः त्यजेत् - आत्मस्वरूप जो जीव त्याने टाकून द्यावी. ॥ २६ ॥
नेहमी विषयांचेच सेवन करीत राहिल्याने चित्त त्या विषयांमध्ये प्रवेश करते आणि हे विषय चित्तातूनच निर्माण होतात म्हणून साधकाने मद्रूप होऊन या दोन्हींचाही त्याग करावा. (२६)


जाग्रत् स्वप्नः सुषुप्तं च, गुणतो बुद्धिवृत्तयः ।
तासां विलक्षणो जीवः साक्षित्वेन विनिश्चितः ॥ २७ ॥
झोपता जागता स्वप्नी गुणांनी वृत्ति होत त्या ।
सच्चिदानंद ना भाव विलक्षणचि जीव तो ॥
अनुभवो असा युक्त सिद्धांत श्रुतिचा असे ॥ २७ ॥

जाग्रत् स्वप्नः सुषुप्तं च - जागृती, स्वप्नस्थिती आणि गाढ निद्रा या - गुणतः - सत्त्वादि गुणांमुळे - बुद्धिवृत्तयः - बुद्धीच्या वृत्ति उत्पन्न होत असतात - तासां विलक्षणः जीवः - या जागृत्यादि अवस्थांहून जीव विलक्षण आहे - साक्षित्वेन विनिश्चितः - या अवस्थांचा तो साक्षी असून त्यांहून तो भिन्न आहे. ॥ २७ ॥
जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या क्रमाने सात्त्विक, राजस आणि तामस गुणांपासून बनलेल्या बुद्धीच्या वृत्ती आहेत जीव या सर्वांचा साक्षी आहे, असा शास्त्रांचा सिद्धांत आहे. (२७)


यर्हि संसृतिबन्धोऽयं आत्मनो गुणवृत्तिदः ।
मयि तुर्ये स्थितो जह्यात् त्यागः तद् गुणचेतसाम् ॥ २८ ॥
बुद्धिच्या वृत्तिने बंध देती आत्म्यासि ते पहा ।
म्हणोनी तुरिया तत्वी राहोनी बंध तोडिणे ॥ २८ ॥

यर्हि - ज्याअर्थी - आत्मनः गुणवृत्तिदः - आत्म्याला म्हणजे जीवाला वुणावस्था देणारे - अयं संसृतिबंधः - हे संसाराचे बंधन आहे - तुर्ये मयि स्थितः - तुरीय म्हणजे चवथी अवस्था जो मी, त्या मजमध्ये राहण्याचा अभ्यास करून - जह्यात् - हे संसृतिबंधन तोडावे - तत् - त्यावेळी - गुणचेतसां त्यागः - गुण व चित्त यांचा त्याग आपोआपच होतो. ॥ २८ ॥
ज्याअर्थी हे बुद्धीमुळे उत्पन्न झालेले बंधन आत्म्याला तिन्ही अवस्थांत बांधून टाकते म्हणून साधकाने तुरीय अवस्थास्वरूप माझ्यामध्ये राहून बुद्धीचे बंधन तोडावे त्यामुळे विषय व चित्त या दोन्हींचाही परस्परसंबंध तुटतो. (२८)


अहङ्कारकृतं बन्धं आत्मनः अर्थविपर्ययम् ।
विद्वान् निर्विद्य संसार चिंतां तुर्ये स्थितः त्यजेत् ॥ २९ ॥
अहंकारेचि हे बंध आत्मा तो पूर्ण सत्यची ।
अखंड ज्ञान आनंदी जाणोनी शांत राहणे ॥ २९ ॥

आत्मनः अहंकारकृतं बंधं - आनंदरूप जीवाला अहंकारामुळे उत्पन्न झालेले बंधन - अर्थविपर्ययं - दुःख मात्र उत्पन्न करणारे आहे असे - विद्वान् - जाणून - निर्विद्य - विषयांपासून विरक्त होऊन - तुर्ये स्थितः - तुरीया अवस्थेमध्ये स्थिर होऊन - संसारचिंतां त्यजेत् - संसाराचे चिंतन टाकून द्यावे. ॥ २९ ॥
मी, माझे या अहंकारानेच बंधन निर्माण होते त्याच्यामुळेच आत्म्याच्या वास्तविक सच्चिदानंद रूपाचा लोप होतो म्हणून हे जाणणार्‍याने विरक्त होऊन विषयांची चिंता सोडून तुरीय अवस्थेतच असावे. (२९)


यावत् नानार्थधीः पुंसो, न निवर्तेत युक्तिभिः ।
जागर्ति अपि स्वपन् अज्ञः स्वप्ने जागरणं यथा ॥ ३० ॥
’मी माझे’ त्यजिपर्यंत निवृत्ती नच लाभते ।
अज्ञानी असुनी जागा स्वप्नवत वागतो पहा ॥ ३० ॥

युक्तिभिः - प्रमाणबद्ध युक्तींनी - यावत् पुंसः - जोपर्यंत जीवाची - नानार्थधीः न निवर्तेत - नानात्वबुद्धी ’ब्रह्मांडांत अनेकत्व आहे’ ही जाणीव नाहीशी होत नाही - अज्ञः जागर्ति अपि स्वपन् - अज्ञानी जागा असतो तरी स्वप्नामध्येच असतो - यथा स्वप्ने जागरणं - ज्याप्रमाणे स्वप्नामध्येही स्वप्नस्थ पुरुष ’आपण जागेच आहो’ असे मानतो त्याप्रमाणे. ॥ ३० ॥
मनुष्य जोपर्यंत हा अनेकत्वाचा भ्रम युक्तीयुक्तीने नाहीसा करीत नाही, तोपर्यंत जो जागृत असूनही अज्ञाननिद्रेत झोपलेलाच समजावा त्याचे हे जागेपण स्वप्नातल्या जागेपणासारखेच मिथ्या होय. (३०)


असत्त्वाद् आत्मनोऽन्येषां भावानां तत्कृता भिदा ।
गतयो हेतवश्चास्य मृषा स्वप्नदृशो यथा ॥ ३१ ॥
आत्म्याला नव ते रूप वर्ण आश्रम भेद ना ।
स्वर्गादी फळ ते त्याला मिथ्याचि स्वप्नवत असे ॥ ३१ ॥

आत्मनः - आत्म्याशिवाय - अन्येषां भावानां असत्वात् - इतर कोणतेही भाव म्हणजे पदार्थ, विकार अथवा अवस्था नसतात - तत्कृता भिदा - त्या नसत्या भावांनी उत्पन्न केलेले भेद - गतयः - त्यांनी प्रवृत्त केलेल्या कर्माची फळे - अस्य हेतवः च - आणि जीवाचे हेतु म्हणजे सकाम कर्मे ही सर्व - मृषा - मिथ्याच असतात - यथा स्वप्नदृशः - जसे स्वप्नस्थ जीवाने पाहिलेले पदार्थ मिथ्या असतात. ॥ ३१ ॥
वास्तविक या विश्वात आत्म्याव्यतिरिक्त अन्य कोणतीही देहादिक वस्तू सत्य नाही म्हणून स्वप्न पाहाणार्‍याच्या सर्व क्रिया जशा खोट्या असतात, त्याप्रमाणे अज्ञानी माणसाचेसुद्धा खोट्या देहाच्या आश्रयाने असणारे वर्णाश्रमधर्म त्यामुळे मिळणार्‍या स्वर्गादी गती आणि त्यांना कारण असणारी कर्मे हे सर्व खोटेच आहे. (३१)


( वसंततिलका )
यो जागरे बहिरनुक्षणधर्मिणोऽर्थान्
     भुङ्क्ते समस्तकरणैहृदि तत्सदृक्षान् ।
स्वप्ने सुषुप्त उपसंहरते स एकः
     स्मृत्यन्वयात् त्रिगुणवृत्तिदृक् इन्द्रियेशः ॥ ३२ ॥
( वसंततिलका )
जो जागृतीहि फळ भोगि क्षणीक ऐसे ।
     स्वप्नात भोगि सुख जे दिवसा दिसे ते ।
इंद्रीय बुद्धि मन यासिहि स्वामि आत्मा
     तो साक्षिभूत असला ययि सिद्ध होतो ॥ ३२ ॥

जागरे - जागेपणी - समस्तकरणैः - आपल्या सर्वेंद्रियमनोबुद्धिसाह्याने - अनुक्षणधर्मिणः अर्थान् बहिः - क्षणभंगुर असणार्‍या बाहेरील देहादि पदार्थांचा - यः भुंक्ते - जो अनुभव घेतो - हृदि तत्सदृक्षान् स्वप्ने - तसल्याच वस्तूंचा मनोद्वारा स्वप्नात अनुभव घेतो - सुषुप्ते उपसंहारते - गाढ निद्रेमध्ये त्या सर्वांचा उपसंहार करतो - सः त्रिगुणावृत्तिदृक् - जो जागृति-स्वप्न-सुषुप्ति या तीन गुनवृत्तींचा द्रष्टा - इंद्रियेशः - इंद्रियांचा स्वामी - एकः - एकच असतो - स्मृत्यन्वयात् - त्याला सर्व अवस्थांची स्मृति असते. ॥ ३२ ॥
जो बाल्य, तारूण्य इत्यादी अवस्थांच्या रूपाने वारंवार बदलणार्‍या देहादी पदार्थांना आपल्या इंद्रियांनी जागृत अवस्थेत उपभोगतो, तोच स्वप्नावस्थेत त्यांसारख्याच वासनामय पदार्थांचा मनाने उपभोग घेतो आणि गाढ निद्रेच्या वेळी तोच हे सर्व विषय आवरून ठेवतो अशा प्रकारे या तीनही अवस्थांचा अनुभव घेणारा साक्षी इंद्रियांचा स्वामी, चेतन आत्मा एकच आहे "ज्याने स्वप्न पाहिले, जो गाढ झोपला होता, तोच मी जागा आहे," या प्रत्यभिज्ञेवरून आत्म्याची एकता सिद्ध होते. (३२)


एवं विमृश्य गुणतो मनसः त्र्यवस्था ।
     मन्मायया मयि कृता इति निश्चितार्थाः ।
संछिद्य हार्दं अनुमानसदुक्तितीक्ष्ण ।
     ज्ञानासिना भजत माखिलसंशयाधिम् ॥ ३३ ॥
ऐसा विचार करुनी मनिच्या अवस्था
     जीवात कल्पित अशा नि असत्य तैशा ।
अंदाज बांधुनि असा गुरुच्या कडोनी
     माझे करा भजन गाठचि तोडुनीया ॥ ३३ ॥

एवं मन्मायया गुणतः - याप्रमाणे माझ्याच मायेने गुणसाह्य घेऊन - मयि कृताः - माझ्याच उत्पन्न केलेल्या - मनसः त्र्यावस्थाः - मनाच्या ती अवस्था आहेत - इति विमृश्य निश्चितार्थाः - असे जाणून निःसंदेह व्हा - अनुमान सद् उक्ति - अन्वयव्यतिरेकांनी सिद्ध होणारी अनुमाने व आप्तवाक्ये - तीक्ष्ण ज्ञानासिना - एतत्स्वरूप ज्ञानरूपी तीक्ष्ण खड्गाने - अखिलसंशयादिं संछिद्य - अखिल संशयाचे वास्तव्यस्थान जो अहंकार त्याला समूळ छाटून - हार्दं मा भजत - हृदयात राहणारा जो मी त्याचे भजन करा. ॥ ३३ ॥
मनाच्या या तीन अवस्था गुणांमुळेच झाल्या असून हे माझ्या पगडा असलेल्या मायेमुळेच माझ्यामध्ये कल्पिल्या गेलेल्या आहेत, असा निश्चय करा नंतर सगळ्या संशयांचा आधार असलेल्या अहंकाराला अनुमानप्रमाण व संतांचे उपदेश यांपासून उत्पन्न झालेल्या तीक्ष्ण ज्ञानरूपी खड्‌गाने छिन्नविच्छिन्न करा व आपल्याच हृदयात स्थित असलेल्या माझेपरमात्म्याचे भजन करा. (३३)


ईक्षेत विभ्रममिदं मनसो विलासं ।
     दृष्टं विनष्टं अतिलोलमलातचक्रम् ।
विज्ञानमेकं उरुधेव विभाति माया ।
     स्वप्नः त्रिधा गुणविसर्गकृतो विकल्पः ॥ ३४ ॥
हे विशव खेळ मनिचा अन नाशवंत
     ज्ञाता नि ज्ञेय असुनी मुळि एक भेद ।
भासे अनेक जणु हेचि अनातचक्र
     मायीकखेळ भ्रम हे हृदयो नि देह ॥ ३४ ॥

इदं विभ्रमं ईक्षेत - हे विश्व म्हणजे भ्रम आहे - मनसः विलासं - कारण ते मनाची क्रीडा आहे - दृष्टं, विनष्टं अतिलोलं, अलातचक्रं - दृश्य, विनाश्य, अलातचक्रासारखे अतिचपलतेने वर्तुलाकार फिरणारे आहे - एकं विज्ञानं उरुधा - म्हणून एकच जे हे भान ते अनेक प्रकारचे, अनेक आहे - इति विभाति - असा भास होतो - माया स्वप्नः - हे अज्ञानजन्य स्वप्नच होय - गुणाविसर्गकृतः विकल्पः त्रिधा - हा मायेचा सत्त्वादि गुनांनी उत्पन्न केलेला विकल्प तीन प्रकारचा आहे. ॥ ३४ ॥
हे जग, हा मनाचाच खेळ आहे, भास आहे अलातचक्रासारखे हे अतिशय चंचल आहे हे दिसणारे असल्यामुळे नाशवंत आहे या दृष्टीने याच्याकडे पाहावे विज्ञान म्हणजे एक परमात्माच जणू अनेक रूपांनी प्रकाशित झाल्यासारखा दिसतो गुणांचे कार्य म्हणून जो हा तीन प्रकारचा भेद दिसतो, ती त्याची माया असल्यामुळे स्वप्नाप्रमाणे खोटी आहे. (३४)


दृष्टिं ततः प्रतिनिवर्त्य निवृत्ततृष्णः ।
     तूष्णीं भवेत् निजसुखानुभवो निरीहः ।
संदृश्यते क्व च यदीदमवस्तुबुद्ध्या ।
     त्यक्तं भ्रमाय न भवेत् स्मृतिरानिपातात् ॥ ३५ ॥
देहादि रूप त्यजुनी मनि मग्न व्हावे
     लागेल भूक त‍इ हा गमतो प्रपंच ।
मिथ्याचि भास म्हणुनी त्यजिणे तयास
     संस्कार मात्र परि ते गमती मनास ॥ ३५ ॥

ततः दृष्टिं प्रतिनिवर्त्य - म्हणून आपली ज्ञानदृष्टि मागे ओढावी - निवृत्ततृष्णः - सर्व आशा-वासनांपासून निवृत्त होऊन - निरीहः - कर्तव्याची इच्छा नसणार्‍या ज्ञानी पुरुशाने - निजसुखानुभवः - आत्मसुखाचा प्रत्यक्ष अनुभव घेत् - तूष्णीं भवेत् - कर्तव्य, भोक्तृत्व सोडून स्वस्थ असावे - यदि इदं क्व च संदृश्यते - अशा स्थितींतही यदाकदाचित या दृश्य जगताचे दर्शन किंवा स्मृति झालीच - अवस्तुबुद्ध्या त्यक्तं - दृश्य वस्तूच्या ज्ञानाचा त्यग करावा - भ्रमाय न भवेत् - मोहकर होत नाही - स्मृतिः आनिपातात् - स्मृति म्हणजे दृश्यांचे स्मरण हा देह पडेपर्यंत राहणारे असते. ॥ ३५ ॥
म्हणून साधकाने हे जग नजरेआड करून सर्व इच्छा सोडून काहीही न करता स्वस्थ राहावे आणि आत्मानंदात मग्न असावे व्यवहारासाठी कधी काही दिसले तरी हे खरे नाही, असा निश्चय करून ते सोडून दिलेले असल्यामुळे भ्रम निर्माण होणार नाही शरीर असेपर्यंत फक्त स्मरणरूप संस्कार राहील. (३५)


देहं च नश्वरं अवस्थितमुत्थितं वा ।
     सिद्धो न पश्यति यतोऽध्यगमत् स्वरूपम् ।
दैवाद्-अपेतमथ दैववशाद् उपेतं ।
     वासो यथा परिकृतं मदिरा-मदांधः ॥ ३६ ॥
झिंगे पिवोनि मदिरा नच भान राही
     ते वस्त्र कोठ पडले गळुनी कटीचे ।
सिद्धे तसेचि असणे तनुशी स्वताच्या
     प्रारब्ध जाणुनि फिरे तनु ती तयाची ॥ ३६ ॥

च - आणि - यतः स्वरूपं अध्यगमत् - स्वरूपाचा अपरोक्ष साक्षात्कार झालेला असतो म्हणून - सिद्ध - जीवन्मुक्त - नश्वरं देहं - हा नश्वर देह - अवस्थितं - पडला आहे - वा उत्थितं - किंवा उठून चालतो आहे हे - न पश्यति - काही पाहत नाही - यथा मदिरामदांधः - ज्याप्रमाणे मदिरा पिऊन धुंद झालेल्याला - परिकृतं वासः - नेसलेले वस्त्र - दैवात् - नशीबाने - अपेतं उत - सुटले की - दैववशात् उपेतं - नशिबाने जाग्यावर आहे. ॥ ३६ ॥
मदिरेने धुंद झालेल्या माणसाला आपल्या अंगावरील वस्त्राची शुद्ध असत नाही, त्याप्रमाणे आत्मज्ञान झालेल्या सिद्धाला हा नश्वर देह बसला आहे की उभा आहे, दैवयोगाने तो कोठे गेला की आला आहे, हेही माहीत नसते. (३६)


देहोऽपि दैववशगः खलु कर्म यावत् ।
     स्वारंभकं प्रतिसमीक्षत एव सासुः ।
तं सप्रपञ्चं अधिरूढसमाधियोगः ।
     स्वाप्नं पुनर्न भजते प्रतिबुद्धवस्तुः ॥ ३७ ॥
प्राणेंद्रिया समचि ही तनु दैवबद्ध
     ते कर्म वाट बघते तनुच्या कडोनी ।
जाणोनि वस्तु बघता त्यजि हा प्रपंच
     स्वप्नापरीच बघतो मग सृष्टि सारी ॥ ३७ ॥

यावत् स्वारंभकं कर्म - जोपर्यंत प्रारब्धकर्माचा पूर्ण उपभोग घेतला जात आहे - दैववशगः खलु देहः अपि - दैवाच्या म्हणजे प्रारब्धकर्मफलाच्या स्वाधीन असणारा देहही - सासुः प्रतिसमीक्षते एव - प्राणांसह जिवंत असतोच - अधिरूढसमाधियोगः प्रतिबुद्धवस्तुः - संपादन केला आहे समाधीपर्यंतचा योग ज्याने असा वस्तुज्ञान झालेला सिद्ध - तं सप्रपंचं स्वाप्नं - त्या सविस्तर जगाच्या स्वप्नतुल्य प्रतिभासाचे - पुनः न भजते - पुनः सेवन करीत नाही. ॥ ३७ ॥
प्राणांसह देहसुद्धा प्रारब्धाच्या अधीन असल्याकारणाने जोपर्यंत तो प्राप्त करून देणारे कर्म शिल्लक आहे, तोपर्यंत तो पडण्याची वाट पाहात असतो समाधीमध्ये स्थिर असलेला आत्मसाक्षात्कारी प्रपंचासह या देहाचा पुन्हा स्वीकार करीत नाही स्वप्नातून जागा झालेला जसा स्वप्नातील गोष्टींचा स्वीकार करीत नाही तसाच. (३७)


( अनुष्टुप् )
मयैतदुक्तं वो विप्रा गुह्यं यत् साङ्ख्ययोगयोः ।
जानीत माऽऽगतं यज्ञं युष्मद्-धर्मविवक्षया ॥ ३८ ॥
( अनुष्टुप )
सांख्ययोग असा गुप्त विप्रांनो बोललो तुम्हा ।
स्वयं मी भगवान जाणा आलो मी उपदेशिण्या ॥ ३८ ॥

विप्राः - हे ज्ञानी सनकादिकहो - यत् सांख्ययोगयोः गुह्यं - सांख्य आणि योग यांचे रहस्य जे - एतत् मया वः उक्तं - ते मी तुम्हाला सांगितले - युष्मद्धर्मविवक्षया - तुम्हाला धर्मरहस्य सांगण्याच्या हेतूने - आगतं मां यज्ञं - मी यज्ञरूपी जो विष्णु, तो मी आलो आहे - जानीत - असे समजा. ॥ ३८ ॥
हे ऋषींनो ! सांख्य आणि योग या शास्त्रांमध्ये जे गुप्त ज्ञान सांगितले आहे, तेच मी तुम्हांला सांगितले मी यज्ञस्वरूप भगवान स्वतःच तुम्हांला तत्त्वज्ञानाचा उपदेश करण्यासाठी हंसरूपाने आलो आहे, असे समजा. (३८)


अहं योगस्य साङ्ख्यस्य सत्यस्य ऋतस्य तेजसः ।
परायणं द्विजश्रेष्ठाः श्रियः कीर्तेः दमस्य च ॥ ३९ ॥
योग सांख्या ऋतो सत्य तेज श्री कीर्ति नी दम ।
अधिष्ठान असे मी या स्वयची परमो गति ॥ ३९ ॥

द्विजश्रेष्ठाः - हे द्विजश्रेष्ठहो - योगस्य, सांख्यस्य, सत्यस्य, ऋतस्य - योग, सांख्य, सत्य, ऋत - तेजसः, श्रियः, कीर्तेः, दमस्य च - तेज, लक्ष्मी, कीर्ती, दम सर्वांचे - अहं परायनं - मी अत्यंत श्रेष्ठ अधिष्ठान आहे. ॥ ३९ ॥
हे श्रेष्ठ ब्राह्मणांनो ! योग, सांख्य, सत्य, ऋत, तेज, श्री, कीर्ती आणि इंद्रियनिग्रह या सर्वांचे आश्रयस्थान मीच आहे. (३९)


मां भजंति गुणाः सर्वे निर्गुणं निरपेक्षकम् ।
सुहृदं प्रियमात्मानं साम्यासङ्गादयः अगुणाः ॥ ४० ॥
गुणातीत असा मी तो अपेक्षा नच ती मुळी ।
तरीही आवडे भक्त सर्वात्मा सत्त्व नित्य मी ॥ ४० ॥

निर्गुणं निरपेक्षकं - मी स्वतः निर्गुण म्हणजे निर्विषय, वैशिष्ट्यशून्य आणि स्वतंत्र आहे - मां सर्व गुणाः भजंति - हे सर्व गुण माझीच भक्तिपूर्ण सेवा करतात - साम्यासंगादयः अगुणाः - समता, असंगत्व इत्यादि अगुण - मां सुहृदं - मला म्हणजे सर्वोपकारक नित्य मित्राला - प्रियं आत्मानं - निरतिशय प्रिय असणार्‍या आत्मस्वरूपाला ॥ ४० ॥
समता, अनासक्ती इत्यादी जे अविनाशी गुण आहेत, ते सर्व, निर्गुण, निरपेक्ष, सर्वांचा सुहृद, सर्वांचा प्रिय आत्मा अशा माझ्या ठिकाणी सदैव वास करतात. (४०)


इति मे छिन्नसन्देहा मुनयः सनकादयः ।
सभाजयित्वा परया भक्त्या अगृणत संस्तवैः ॥ ४१ ॥
असा संदेह संताचा शमिला उद्धवा प्रिय ।
भक्तिने पूजिले त्यांनी महिमा गायिली तदा ॥ ४१ ॥

इति मे - याप्रमाणे माझ्याकडून - छिन्नसंदेहा सनकादयः मुनयः - ज्यांचे सर्व संशय विनष्ट झाले असे सनकादि मुनि - मां सभाजयित्वा - मला फार उत्सुकतेने सन्मानून - परया भक्त्या - अति उत्कट भक्तीने - संस्तवैः अगृणत - स्तोत्रांनी माझे स्तवन केले ॥ ४१ ॥
या माझ्या उपदेशाने सनकादी मुनींचा संदेह दूर झाला, तेव्हा माझी पूजा करून अत्यंत भक्तिभावाने ते माझी स्तुती करू लागले. (४१)


तैः अहं पूजितः सम्यक् संस्तुतः परमर्षिभिः ।
प्रत्येयाय स्वकं धाम पश्यतः परमेष्ठिनः ॥ ४२ ॥
पूजिता परमर्षींनी स्तवोनी श्रेष्ठ ते तसे ।
ब्रह्म्या समक्ष मी गुप्त होता स्वधामि पातलो ॥ ४२

तैः परमर्षिभिः सम्यक् पूजितः संस्तुतः च - त्या महर्षींनी माझी यथासांग पूजा केली, आणि उत्तम स्तुति करणारी स्तोत्रे म्हटली - परमेष्ठिनः पश्यतः - ब्रह्मदेव पहात असताच - अहं स्वकं धाम प्रत्येयाय - मी आपल्या धामाला परत आलो. ॥ ४२ ॥
त्या श्रेष्ठ ऋषींनी माझी यथासांग पूजा करून स्तुती केली नंतर ब्रह्मदेवांच्या देखतच मी आपल्या धामाकडे निघून गेलो. (४२)


इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
संहितायां एकादशस्कन्धे त्रयोदशोऽध्यायः ॥ १३ ॥
अध्याय तेरावा समाप्त

GO TOP