श्रीमद् भागवत पुराण
एकादशः स्कन्धः
चतुर्थोऽध्यायः

भगवतोऽवताराणां वर्णनम्, नारायणकृतः कामपराभवः -

भगवंतांच्या अवतारांचे वर्णन -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


श्रीराजोवाच -
( अनुष्टुप् )
यानि यानीह कर्माणि यैर्यैः स्वच्छन्दजन्मभिः ।
चक्रे करोति कर्ता वा हरिस्तानि ब्रुवन्तु नः ॥ १ ॥
राजा निमिने विचारिले-
( अनुष्टुप्‌ )
भक्ताला वश होवोनि भगवान्‌ अवतारतो ।
अनेक करितो लीला सांगाव्या त्या तुम्ही अम्हा ॥ १ ॥

हरिः - परमात्मा हरिने - यैः यैः स्वच्छंदजन्मभिः - ज्या ज्या स्वच्छंद अवतारांनी - इह - या मृत्युलोकी - यानि यानि कर्माणि चक्रे - जी जी कर्मे केली - करोति - सध्या करीत आहेत - कर्ता वा - किंवा करणार आहेत - तानि नः ब्रुवन्तु - त्या सर्व लीला आम्हाला सांगाव्या. ॥ १ ॥
राजा म्हणाला - श्रीहरींनी स्वेच्छेनुसार जे जे अवतार घेऊन आतापर्यंत ज्या ज्या लीला केल्या, करीत आहेत किंवा करतील, त्या आपण आम्हांला सांगाव्यात. (१)


श्रीद्रुमिल उवाच -
( इंद्रवज्रा )
यो वा अनन्तस्य गुणान् अनन्तान्
     अनुक्रमिष्यन् स तु बालबुद्धिः ।
रजांसि भूमेर्गणयेत् कथञ्चित्
     कालेन नैवाखिलशक्तिधाम्नः ॥ २ ॥
योगीश्वर द्रुमिल म्हणाले-
( इंद्रवजा )
तो तो अनंतो गुणही अनंत
     तो मूढ होतो कुणि मोजु पाही ।
मिजील कोणी धुळिच्या कणाते
     परी न थांगो हरिच्या गुणांचा ॥ २ ॥

अनंतस्य - ज्याला अंत नाही अशा परमेश्वराचे - अनंतान् गुणान् - असंख्य गुण - अनुक्रमिष्यन् - ज्याला गणना करण्याचे इच्छा असेल - सः तु - तो तर - बालबुद्धिः - पोरबुद्धीचा समजावा. - कालेन - बहुत काळाने - कथंचित् वा - दीर्घ प्रयत्‍नांनी कदाचित् - भूमेः रजांसि - भूमीचे म्हणजे धुळीचे रजःकण - गणयेत् - गणणे शक्य आहे - अखिलशक्तिधाम्नः - पण सर्व शक्तीचा आश्रय अशा परमेश्वराचे - गुणान् न गणयेत् - गुणांची गणना करणे कधीही शक्य नाही. ॥ २ ॥
द्रुमिल म्हणाला - भगवान अनंत असून त्यांचे गुणही अनंत आहेत त्यांच्या गुणांची गणती करीन, असे जो म्हणतो, तो मूर्खच म्हटला पाहिजे एखादा कोणी कोणत्याही रीतीने पृथ्वीवरील धुळीचे कण मोजेल, परंतु सर्व शक्तींचे आश्रय असलेल्या भगवंतांच्या गुणांची कितीही काळ लागला तरी गणती करू शकणार नाही. (२)


भूतैर्यदा पञ्चभिरात्मसृष्टैः ।
     पुरं विराजं विरचय्य तस्मिन् ।
स्वांशेन विष्टः पुरुषाभिधानम् ।
     अवाप नारायण आदिदेवः ॥ ३ ॥
भूतांतुनी तो स्वय सृष्टि झाला
     ब्रह्मांड योजोनि शिरे स्वयें तो ।
तो आदि नारायण याच्ग नामे
     पुरूष जो हा अवतार आद्य ॥ ३ ॥

आदिदेवः नारायणः - सर्वांचा कारणभूत असा नारायण देव - यदा आत्मसृष्टैः - जेव्हा आपणच उत्पन्न केलेल्या - पंचभिः भूतैः - पंचमहाभूतांच्या योगे - विराजं पुरं - ब्रह्मरूप शरीर - विरचय्य - निर्माण करून - तस्मिन् - त्यामध्ये - स्वांशेन विष्टः - स्वतःच्या अंशाने प्रविष्ट झाला, - पुरुषाभिधानं अवाप - आणि त्याला ’पुरुष’ हे नाव मिळाले. ॥ ३ ॥
भगवंतांनी स्वतःच निर्मिलेल्या पंचमहाभूतांच्या योगाने विराट शरीराची निर्मिती करून आपल्या अंशाने त्यात प्रवेश केला तेव्हा त्या आदिदेव नारायणाला ‘पुरूष‘ हे नाव मिळाले हा त्यांचा पहिला अवतार होय. (३)


( वसंततिलका )
यत्काय एष भुवनत्रयसन्निवेशो
     यस्येन्द्रियैस्तनुभृतां उभयेन्द्रियाणि ।
ज्ञानं स्वतः श्वसनतो बलमोज ईहा
     सत्त्वादिभिः स्थितिलयोद्‌भव आदिकर्ता ॥ ४ ॥
( वसंततिलका )
ब्रह्मांडि त्या स्थितचि हे तिन्ही लोक राजा
     जीवां त्या दशेंद्रियहि हे हरिचेच जाणा ।
ज्ञान स्वताचि श्वसन तो बल ओज शक्ती
     निर्मी नि पोषि लयि ने गुणि आद्य कर्ता ॥ ४ ॥

यत्काये - ज्याचे शरीरावर - एषः भुवनत्रयसन्निवेशः - हा त्रिभुवनाचा सर्व पसारा आहे - यस्य इंद्रियः एव - आणि ज्याच्या इंद्रियांच्या योगाने - तनुभृतां - देहधारी प्राण्यांची - उभयेंद्रियाणि - ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये यांच्या योगे - यस्य स्वतः ज्ञानं - ज्याच्या स्वरूपभूअ सत्त्वगुणापासून जीवांना ज्ञान होते - यस्य श्वसनतः - आणि ज्याच्या श्वासोछ्वासात्मक प्राणापासून - बलं - शारीरिक शक्ति - ओजः - इंद्रियशक्ति - ईहा च प्राप्यते - व कर्मशक्ति प्राप्त होते - यः सत्त्वादिभिः - आणि जो सत्त्व, रज, तम या तीन गुणांनी - स्थिति लय उद्‌भवे - या ब्रह्मांडाचे रक्षण नाश व उत्पत्ती यांचा - आदिकर्ता - कर्ता आहे तो या सर्वांचे आदिकारण आहे. ॥ ४ ॥
त्यांच्या विराट शरीरात तिन्ही लोक राहिले आहेत त्यांच्याच इंद्रियांपासून सर्व देह धारण करणार्‍यांची ज्ञानेंद्रिये आणि कम]द्रिये निर्माण झाली आहेत त्यांच्या स्वरूपापासूनच प्राण्यांमध्ये ज्ञानाचा संचार होतो त्यांच्या श्वासोच्छ्‌वासाने सर्व शरीरात बळ येते तसेच इंद्रियांमध्ये ओज आणि काम करण्याची शक्ती उत्पन्न होते तेच सत्त्व इत्यादी गुणांनी विश्वाची उत्पत्ती, स्थिती प्रलय करतात म्हणून तेच आदिकर्ता होत. (४)


आदौ अभूत् शतधृती रजसास्य सर्गे
     विष्णुः स्थित्तौ क्रतुपतिः द्विजधर्मसेतुः ।
रुद्रोऽप्ययाय तमसा पुरुषः स आद्य
     इत्युद्‌भवस्थितिलयाः सततं प्रजासु ॥ ५ ॥
निर्मावया जग रजे अवतार ब्रह्मा
     सत्वेचि विष्णु पुढती द्विजयज्ञ रक्षी ।
संहारण्यास जग हे तम रुद्र होई
     ऐसेचि चक्र फिरवी नित श्रीहरी तो ॥ ५ ॥

आदौ - प्रथमारंभी - अस्य सर्गे - या विश्वाची उत्पत्ती कर्तव्य समयी - यस्य रजसा - ज्याच्या रजोगुणाने - शतधृतिः - ज्याला शेकडो (म्हणजे अमाप) बुद्धी आहे असा ब्रह्मदेव - अभूत् - उत्पन्न झाला. - स्थितौ - रक्षण कर्तव्य समयी - क्रतुपतिः - यज्ञाने फल देणारा - द्विजधर्मसेतुः च - आणि ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या द्विजांचे व त्यांच्या धर्मांचे रक्षण करणारा - विष्णुः अभूत् - विष्णू उत्पन्न झाला. - च अप्ययाय - आणि संहाराकरिता - तमसा - तमोगुणाने - रुद्रः - शंकर - इति प्रजासु सततं - इत्यादि प्रजांची सतत - उद्‌भवस्थितिलयाः - उत्पत्ती, स्थिती व लय ही कार्ये करणारा - स आद्यः पुरुषः - तो आदिपुरुष होय. ॥ ५ ॥
सर्वप्रथम जगाच्या उत्पत्तीसाठी त्यांच्या रजोगुणापासून ब्रह्मदेव निर्माण झाले नंतर ते आदिपुरूषच आपल्या सत्त्वांशाने जगाच्या स्थितीसाठी तसेच ब्राह्मण व धर्म यांच्या रक्षणासाठी यज्ञपती विष्णू झाले तसेच तेच तमोगुणाच्या अंशाने जगाच्या संहारासाठी रूद्र झाले अशा प्रकारे निरंतर त्यांच्यापासूनच प्रजेची उत्पत्ती, स्थिती आणि संहार होत असतात. (५)


धर्मस्य दक्षदुहितर्यजनिष्ट मूर्त्यां
     नारायणो नर ऋषिप्रवरः प्रशान्तः ।
नैष्कर्म्यलक्षणमुवाच चचार कर्म
     योऽद्यापि चास्त ऋषिवर्यनिषेविताङ्‌घ्रिः ॥ ६ ॥
धर्मो नि मूर्ति उदरी मग जन्मले ते
     नारायणो नर ऋषिप्रवरो प्रशांत ।
नैष्कर्म्य लक्षण जगा वदले असे ते
     ते आजही निवसती बदरी वनात ॥ ६ ॥

दक्षदुहितरि मूर्त्यां - दक्षप्रजापतीची कन्या मूर्ति नाम असलेल्या - धर्मस्य भार्यायां - धर्मऋषींच्या पत्‍नीचे उदरी - ऋषिप्रवरः - ऋषींमध्ये श्रेष्ठ - प्रशांत च - व अत्यंत शांत असा - नारायणः नरः - नारायण व नर अशा दोन स्वरूपांनी - अजनिष्ट - जन्माला आला - नैष्कर्म्यलक्षणं कर्म - ज्यायोगे आत्मस्वरूप पाहिले जाते असे कर्म - नारदादिभ्यः उवाच - नारदादिकांना सांगितले. - चचार च - आणि स्वतः त्याप्रमाणे आचरण केले - यः च - आणि जो - अद्य अपि - आजही - ऋषिवर्यनिषेवितांघ्रि सन् आस्ते - मोठमोठ्या श्रेष्ठ अशा नारदादि ऋषींनी ज्याची चरणसेवा करावी असा झाला आहे. ॥ ६ ॥
दक्ष प्रजापतीची मूर्ती नावाची कन्या धर्माची पत्‍नी होती आदिपुरूषाने तिच्यापासून ऋषिश्रेष्ठ, शांतचित्त अशा नर आणि नारायण यांच्या रूपाने अवतार धारण केला त्यांनी नैष्कर्म्य प्राप्त करून देणार्‍या कर्माचा उपदेश केला व स्वतःसुद्धा त्याचेच अनुष्ठान करीत आजही ते बद्रिकाश्रमामध्ये आहेत मोठमोठे ऋषी त्यांच्या चरणकमलांची सेवा करीत असतात. (६)


इन्द्रो विशङ्क्य मम धाम जिघृक्षतीति
     कामं न्ययुङ्क्त सगणं स बदर्युपाख्यम् ।
गत्वाप्सरोगणवसन्त सुमन्दवातैः
     स्त्रीप्रेक्षणेषुभिरविध्यद् अतन्महिज्ञः ॥ ७ ॥
इंद्रो तपास बघुनी मनी भीवुनिया
     स्त्री नी वसंत करवी करि विघ्न थोर ।
कामो न जाणि महती अन अप्सरांचे
     नेत्रे कटाक्ष करुनी करिही प्रयत्न ॥ ७ ॥

इंद्रः मम धाम जिघृक्षति - एकदा इंद्र हा नारायण माझे स्वर्गीचे राज्य घेण्याची इच्छा करतो आहे - इति विशंक्य - अशी शंका घेऊन - सगणं कामं न्ययुंक्त - इंद्राने सपरिवार मदनाला पाठवण्याची योजना केली - अतन्महिज्ञः सः - पण त्यांची महिमा न जाणणारा मदन - अपसरोगण वसम्तसुमंदवातैः सह - अप्सरांचा मेळा, वसंत ऋतु, व मंद वायु यांचे सह - बदर्युपाख्यं गत्वा - नारायण भगवान जेथे तप करीत होते त्या बदरिकाश्रमीं जाऊन - स्त्रीप्रेक्षणेषुभिः अविध्यत् - स्त्रियांच्या नेत्रकटाक्षरूप बाणांनी वेध घेतला, (म्हणजे विचलित करण्याचा प्रयत्‍न केला). ॥ ७ ॥
इंद्राला शंका आली की, तपश्चर्येने हे आपले स्थान हिरावून घेऊ इच्छितात, तेव्हा त्याने तपश्चर्येमध्ये विघ्न आणण्यासाठी परिवारासह कामदेवाला पाठविले कामदेवाला भगवंतांच्या महिम्याचे ज्ञान नव्हते म्हणून तो अप्सरागण, वसंत ऋतू, शीतल वायू यांच्यासह बद्रिकाश्रमात जाऊन स्त्रियांच्या कटाक्षबाणांनी त्यांना घायाळ करण्याचा प्रयत्‍न करू लागला. (७)


विज्ञाय शक्रकृतमक्रममादिदेवः
     प्राह प्रहस्य गतविस्मय एजमानान् ।
मा भैर्विभो मदन मारुत देववध्वो
     गृह्णीत नो बलिमशून्यमिमं कुरुध्वम् ॥ ८ ॥
जाणोनि इंद्रकृति ही वदले स्मितेचि
     हे कामदेव वनिता अन हे वसंता ।
भ्यावे न, स्वागत असे करणे स्विकार
     थांबा इथेच न करा रित आश्रमो हा ॥ ८ ॥

आदिदेवः - नर-नारायण - शक्रकृतं - इंद्राने केलेला - अक्रमं - अपराध - विज्ञाय - जाणून - प्रहस्य - किंचित् स्मित हास्य करून - गतविस्मयः - ’मी केवढा धैर्यवान्’ असा ज्याचा गर्व गेला आहे - एजमानान् मदनादीन् - कापणार्‍या मदनादिकांना - प्राह - म्हणाला - भोः मदन मारुत देववध्वः - हे मदना ! हे वायो ! हे अप्सरांनो ! - मा भैष्ठ - भिऊ नका - नः बलिं - आमचे आदरातिथ्य - गृहणीत - घ्या - इमं आश्रमं - ह्या आश्रमाला - अशून्यं - शून्य म्हणजे ओसाड नाही असा - कृतार्थ - कुरुध्वम् - करा. ॥ ८ ॥
हे इंद्राचे अविवेकी कृत्य आहे, हे जाणून आदिदेव, गर्व न बाळगता भयकंपित झालेल्या त्या सर्वांना हसतहसत म्हणाले "कामदेवा ! देगांगनांनो ! वायो ! तुम्ही भिऊ नका आमच्या आदरातिथ्याचा स्वीकार करा आता इथेच थांबा आमचा आश्रम सुना करून जाऊ नका". (८)


इत्थं ब्रुवत्यभयदे नरदेव देवाः
     सव्रीडनम्रशिरसः सघृणं तमूचुः ।
नैतद्विभो त्वयि परेऽविकृते विचित्रं
     स्वारामधीरनिकरा नतपादपद्मे ॥ ९ ॥
हे बोलताच अभया नरदेव देव
     लज्जीत काम वदला मग तो तयांना ।
माया परा तुम्हच तो तुमच्या पदासी
     ते श्रेष्ठ संत सगळे नमिती सदाची ॥ ९ ॥

नरदेव - राजा - अभयदे नारायणे - अभय देणारा नारायण - इत्थं वदति सति - या प्रमाणे बोलला असता - सव्रीडनम्रशिरसः देवाः - लज्जेने सलज्ज व म्हणूनच नम्र झालेले मदनादिक देव - तं - त्या नारायणाला - सघृणं - जेणेकरून करुणा उत्पन्न होईल असे - ऊचुः - बोलते झाले - विभो - हे विश्वव्यापका - परे - मायेहून पलीकदे असणार्‍या - अविकृते - कामक्रोधादि विकाररहित - स्वारामधीर निकरानत पादपद्मे च - व स्वस्वरूपाचे ठिकाणी रममाण असणार्‍याव ज्यांचे चरणकमल ब्रह्मवेत्त्यांनी वंदिले आहे अशा - त्वयि - तुझे ठिकाणी - एतत् - हे अक्षोभ आणि कृपाकारित्वरूप आचरण - विचित्रं न - आश्चर्यकारक नाही. ॥ ९ ॥
राजन ! नरनारायण ऋषींनी अभयदान देत जेव्हा त्यांना असे म्हटले, तेव्हा कामदेव इत्यादी लाजेने माना खाली घालून दयाळू नरनारायणांना म्हणाले "प्रभो ! आपल्याबाबतीत ही काही आश्चर्याची गोष्ट नाही; कारण आपण मायेच्या पलीकडे गेलेले आणि निर्विकार आहात म्हणूनच आत्माराम आणि ज्ञानी पुरूष निरंतर आपल्या चरणकमलांना प्रणाम करीत असतात. (९)


त्वां सेवतां सुरकृता बहवोऽन्तरायाः
     स्वौकः विलङ्घ्य परमं व्रजतां पदं ते ।
नान्यस्य बर्हिषि बलीन् ददतः स्वभागान्
     धत्ते पदं त्वमविता यदि विघ्नमूर्ध्नि ॥ १० ॥
भक्तीप्रभाव तुमचा निजभक्त जाणी
     स्वर्गादि ते त्यजुनिया पदि श्रेष्ठ जाती ।
ते भक्त जै भजति इंद्रचि विघ्न आणी
     यज्ञात भाग मिळता मग चुप राही ।
जे भक्त ते न ढळती जरि विघ्न येते
     डिक्यास पाय ठिवुनी चलती पुढे ते ॥ १० ॥

स्वौकः विलंघ्य - स्वतःचे स्थान जे स्वर्ग त्याचे उल्लंघन करून - ते परमं पदं - सर्वोत्कृष्ट अशा तुझ्या स्थानाला म्हणजे वैकुंठाला - व्रजतां - जाणार्‍या अशा - त्वां सेवतां - तुझी सेवा करणारांना - सुरकृता - इंद्रादि देवांनी केलेली अशी - बहवः - अनेक - अंतरायाः - विघ्ने - बर्हिषि - यज्ञामध्ये - स्वभागान् बलीन् ददतः - स्वतःचे भागरूप म्हणजे इंद्रादिकांचे हविर्भागरूप बळी देणार्‍या अशा - अन्यस्य न - दुसर्‍याला नाहीत - त्वं अविता अतः - तूं रक्षक असल्यामुळे - यदि विघ्नमूर्ध्नि पदं धत्ते - खात्रीने विघ्नाच्या मस्तकावर पाय देतो. ॥ १० ॥
तुमचे भक्त आपल्या स्थानाचे उल्लंघन करून तुमच्या परमपदाला जातात, म्हणून देव निरनिराळ्या प्रकारे त्यांच्या साधनेत विघ्ने निर्माण करतात परंतु जे लोक यज्ञ इत्यादींच्या द्वारे देवतांना आहुतींच्या रूपाने त्यांचा भाग देत राहातात, तेव्हा ते विघ्ने आणीत नाहीत परंतु जर आपली कृपा असेल, तर मात्र आपले भक्तजन त्या विघ्नांचा माथ्यावर पाय देतात. (१०)


क्षुत्तृट् त्रिकालगुणमारुत जैह्वशैश्यान्
     अस्मान् अपारजलधीन् अतितीर्य केचित् ।
क्रोधस्य यान्ति विफलस्य वशं पदे गोः
     मज्जन्ति दुश्चरतपश्च वृथोत्सृजन्ति ॥ ११ ॥
तृष्णा नि भूक गरमी सरदी नि वारा
     पाऊस काम सहुनी बहु पार होती ।
नी क्रोधि तेच वशती नच लाभ ज्यात
     नी आपुले कठिणसे तप नष्टितात ॥ ११ ॥

केचित् मूढतपस्विनः - कित्येक अज्ञ तपस्वी - क्षुतृट् त्रिकालगुण - क्षुधा, तृषा, उन्हाळा पावसाळा हिवाळा - मारुत जैह्व्य शैश्न्यात् - वारा, जिभेचे विषय व मैथुनसुख ह्या - अस्मान् अपारजलधीन् - अस्मद्‌रूप अपार समुद्रांना - अतितीर्य - उतरून - विफलस्य क्रोधस्य - फलशून्य अथवा भलतेच फल देणार्‍या क्रोधाच्या - वशं याति - स्वाधीन होतात - गोः पदे - गाईच्या पावलाने उत्पन्न झालेल्या डबक्यात - मज्जंति - बुडतात - दुश्चरतपः च - आणि आपण केलेल्या दुर्धर तपश्चर्येला - वृथा उत्सृजंति - फुकट घालवितात ॥ ११ ॥
काहीजण खोल समुद्राप्रमाणे असलेल्या तहानभूक, ऊनथंडीपाऊस, अंतर्बाह्य प्राण, यांमुळे होणारे कष्ट तसेच रसनेंद्रिये आणि जननेंद्रियांचा आवेग यांना ओलांडून पलीकडे जातात, परंतु ते पुन्हा गाईच्या खुराने तयार झालेल्या खड्‌ड्यातील पाण्यात बुडावे, तसे निष्फळ क्रोधाच्या आहारी जाऊन आपली कठीण तपश्चर्या धुळीला मिळवितात". (११)


( अनुष्टुप् )
इति प्रगृणतां तेषां स्त्रियोऽत्यद्‌भुतदर्शनाः ।
दर्शयामास शुश्रूषां स्वर्चिताः कुर्वतीर्विभुः ॥ १२ ॥
( अनुष्टुप्‌ )
स्तविता देवतांनी त्यां स्त्रिया अद्‌भूत सुंदर्‍या ।
दविल्या आपुल्या मायेंसेविती ज्या पदा किती ॥ १२ ॥

इति प्रगृणतां - याप्रमाणे बोलणार्‍या - तेषां - त्या कामादि देवांना - विभुः - नारायण - अत्यद्‌भुत दर्शनाः - अलौकिक रूपवान - शुश्रूषां कुर्वतीः - आपली सेवा करणार्‍या - स्वर्चिताः - वस्त्रालंकारांनी मंडित अशा - स्त्रियः दर्शयामासः - स्त्रिया दाखविल्या. ॥ १२ ॥
ते अशी स्तुती करीत असताना सर्वशक्तीमान नारायणांनी त्यांच्यासमोर पुष्कळशा वस्त्रालंकरांनी नटलेल्या अत्यंत रमणीय स्त्रिया प्रगट करून दाखविल्या त्या तेथे भगवंतांची सेवा करीत होत्या. (१२)


ते देवानुचरा दृष्ट्वा स्त्रियः श्रीरिव रूपिणीः ।
गन्धेन मुमुहुस्तासां रूपौदार्यहतश्रियः ॥ १३ ॥

रमेच्या परी त्या रूपे पाहता देव ते फिके ।
पडले मोहले सर्व अंगाचा गंध तो असा ॥ १३ ॥

ते देवानुचराः - ते कामादिक देवसेवक - रूपीणी श्रीः इव - मूर्तिमंत लक्ष्मीच अशा - स्त्रियः दृष्ट्वा - स्त्रियांना पाहून - तासां रूपौदार्यहतश्रियः संतः - त्यांच्या रूपाने निस्तेज झालेल्या - तासां शरीरस्य गंधेन - व त्यांच्या शरीराच्या सुगंधाने - मुमुहुः - मोहित झाले. ॥ १३ ॥
इंद्राच्या सेवकांनी जेव्हा लक्ष्मीसमान असणार्‍या त्या रूपवती स्त्रियांना पाहिले, तेव्हा त्यांच्या दिव्य सौंदर्यासमोर त्यांचे लावण्य फिके पडले त्या स्त्रियांच्या दिव्य सुगंधाने त्या मोहित झाल्या. (१३)


तानाह देवदेवेशः प्रणतान् प्रहसन्निव ।
आसां एकतमां वृङ्ध्वं सवर्णां स्वर्गभूषणाम् ॥ १४ ॥
झुकता शिर ते त्यांचे देवेश हासुनी वदे ।
अनुरूप अशी न्यावी स्वर्ग सुंदर हाय तैं ॥ १४ ॥

प्रहसन् इव - किंचित् हसल्यासारखे करीत - देवदेवेशः - देवांच्या देवांचा स्वामी - प्रणनात् तान् आह - नम्र झालेल्या त्या कामादिकांना म्हणाला - आसां सवर्णां - यांपैकी स्वतःला अनुरूप - स्वर्गभूषणां वा - अथवा स्वर्गाला भूषण अशी - एकतमां वृङ्‌ध्वं - कोणतीही एक मागून घ्या. ॥ १४ ॥
माना खाली घातलेल्या त्यांना हसल्यासारखे करून देवदेवेश म्हणाले, "जी तुम्हांला अनुरूप वाटेल, अशी कोणतीही एक स्त्री तुम्ही निवडून घ्या ती तुमच्या स्वर्गलोकाचे भूषण ठरेल". (१४)


ओमित्यादेशमादाय नत्वा तं सुरवन्दिनः ।
उर्वशीं अप्सरःश्रेष्ठां पुरस्कृत्य दिवं ययुः ॥ १५ ॥
आज्ञा ती मानुनी त्यांची वंदोनी एक घेतली ।
उर्वशी तीच स्वर्गीची अप्सरा श्रेष्ठ जाहली ॥ १५ ॥

सुरबंदिनः - देवांचे सेवक असे कामादि - ओं इति - थीक आहे असे - आदेशं आदाय - आज्ञा घेऊन - तं नत्वा - त्या नरनारायणाला नमस्कार करून - अप्सरःश्रेष्ठां उर्वशीं - अप्सरांमध्ये श्रेष्ठ अशा उर्वशीला - पुरस्कृत्य - पुढे घालुन - दिवं ययुः - स्वर्गाला गेले. ॥ १५ ॥
ठीक आहे, असे म्हणून इंद्राच्या सेवकांनी भगवंतांच्या आज्ञेचा स्वीकार करून त्यांना नमस्कार केला नंतर श्रेष्ठ अप्सरा उर्वशीला पुढे करून ते स्वर्गलोकी गेले. (१५)


इन्द्रायानम्य सदसि शृण्वतां त्रिदिवौकसाम् ।
ऊचुर्नारायणबलं शक्रः तत्रास विस्मितः ॥ १६ ॥
गेले स्वर्गात नी तेथे नर नारायणी बल ।
सभेत वदता इंद्र बहू भ्याला मनात की ॥ १६ ॥

इंद्राय आनम्य - इंद्राला नमस्कार करून - सदसि - इंद्रसभेत - त्रिद्विवौकसां श्रृण्वतां सतां - देव श्रवण करीत असता - नारायणबलं ऊचुः - नरनारायणाचा प्रभाव सांगितला. - श्क्रः विस्मितः - इंद्र आश्चर्यचकित झाला - तत्रास च अपि - व त्रासलादेखील. ॥ १६ ॥
तेथे जाऊन त्यांनी इंद्राला नमस्कार केला आणि सभेत देवतांच्या समक्ष नारायणांच्या सामर्थ्याचे वर्णन केले ते एकून आश्चर्यचकित झालेला इंद्र भयभीत झाला. (१६)


( वसंततिलका )
हंसस्वरूप्यवददच्युत आत्मयोगं
     दत्तः कुमार ऋषभो भगवान् पिता नः ।
विष्णुः शिवाय जगतां कलयावतिर्णः
     तेनाहृता मधुभिदा श्रुतयो हयास्ये ॥ १७ ॥
( वसंततिलका )
हंसस्वरूप हरिने स्थित राहुनिया
     दत्तो कुमार ऋषभो अमुचा पिता तो ।
होवोनि आत्मरूप ते वदले जगाला
     नी कैटभाहि वधिले हयग्रीव रूपे ॥ १७ ॥

जगतां शिवाय - त्रिभुवनाच्या कल्याणासाठी - कलया अवतीर्णः - अंशाने अवतरलेला - अच्युतः - स्वस्वरूपापासून कधीही च्युत न होणारा - विष्णुः - विष्णु - हंसस्वरूपी - हंसस्वरूप धारण करणारा - दत्तः - दत्तात्रेय - कुमारः - सनकादिक - नः च पिता - आणि आमचा तात - भगवान ऋषभः - भगवान ऋषभदेव - आत्मयोगं अवदत् - आत्मज्ञान सांगता झाला - तेन - त्या विष्णूने - हयास्ये - हयग्रीवावतारी - मधुभिदा सता - मधुदैत्याला माराणारा होत्साता अशा त्याने - श्रुतयः आहताः - वेद आणले. ॥ १७ ॥
भगवान विष्णूंनी आपल्या स्वरूपापासून न ढळता जगाच्या कल्याणासाठी कलावतार धारण केले विदेहराज ! हंस, दत्तात्रेय, सनकादिक आमचे वडील ऋषभ यांच्या रूपाने अवतीर्ण होऊन त्यांनी आत्मसाक्षात्काराच्या साधनांचा उपदेश केला आहे त्यांनीच हयग्रीव अवतार घेऊन मधुकैटभ नावाच्या असुरांचा संहार करून त्यांनी चोरून नेलेले वेद परत आणले. (१७)


गुप्तोऽप्यये मनुरिलौषधयश्च मात्स्ये
     क्रौडे हतो दितिज उद्धरताम्भसः क्ष्माम् ।
कौर्मे धृतोऽद्रिः अमृतोन्मथने स्वपृष्ठे
     ग्राहात् प्रपन्नमिभराजममुञ्चदार्तम् ॥ १८ ॥
मत्स्यावतार धरुनी मनु औषधींना
     रक्षोनि पॄथ्वि क्षितिजा वधिले असे की ।
होवोनि कूर्म मथनी गिरि पृष्ठि घेई
     नी त्याच श्री भगवते गज मुक्त केला ॥ १८ ॥

अपुयये - विश्वाच्या प्रलयकाली - मात्स्ये - मत्स्यावतारी - मनुः गुप्तः - मनुचे रक्षण केले - इला ओषधयः च - आणि पृथ्वी व वनस्पति - क्रौडे - वराहावतारामध्ये - अंभसः क्ष्मां - जलातून पृथ्वीला - उद्धरा सता - वर काढी होत्साता अशा त्याने - दितिजझ् हतः - दितीचा पुत्र हिरण्याक्ष मारला. - कौर्मे अमृतोन्मथने - कूर्मावतारी अमृतासाठी केलेल्या समुद्रमंथनाचे वेळी - पृष्ठे अद्रिः धृतः - आपल्या पाथीवर मंदरपर्वत धरला. - आर्तं प्रपन्नण् - पीडित झालेल्या व शरण आलेल्या - इभराजं ग्राहात् अमुंचत् - गजेंद्राला नक्रापासून सोडविले. ॥ १८ ॥
प्रलयाच्या वेळी मत्स्यावतार घेऊन त्यांनी मनू, पृथ्वी आणि वनस्पतींचे रक्षण केले तसेच वराहावतार घेऊन पृथ्वीचा रसातलातून उद्धार करतेवेळी हिरण्याक्षाचा संहार केला कूर्मावतार धारण करून अमृतमंथनाच्या वेळी आपल्या पाठीवर मंदराचल ठेवून घेतला त्याचप्रमाणे त्यांनी शरणागत आर्त भक्त गजेंद्राला मगरीपासून सोडविले. (१८)


संस्तुन्वतो निपतितान् श्रमणान् ऋषींश्च
     शक्रं च वृत्रवधतस्तमसि प्रविष्टम् ।
देवस्त्रियोऽसुरगृहे पिहिता अनाथा
     जघ्नेऽसुरेन्द्रमभयाय सतां नृसिंहे ॥ १९ ॥
नी वालखिल्य ॠषि ते तपि दुर्बलो हो
     त्या कश्यपो मुनिचिया समितार्थ जाता ।
गोक्षूर खड्डि पडले बुडु लगले तैं
     उद्धरिले तयिहि ती स्तुति ऐकुनिया ।
वृत्रासुरास वधिता मग ब्रह्महत्या
     इंद्रास गाठि तई तो लपला जळात ।
देवस्त्रियांस असुरा मधुनीहि सोडि
     दैत्येंद्र मारि हरि तो रूपि त्या नृसिंहे ॥ १९ ॥

अब्धिपतितान् - समुद्रामध्ये अगाध वाटणार्‍या गोष्पदामध्ये पडलेल्या - श्रमणाः - श्रमेलेल्या - संस्तुवन्तः - स्तुति करणार्‍या - ऋषीन् च - अंगुष्ठप्रमाण वालखिल्य ऋषींना आणि - वृत्रवधतः - वृत्राचा वध केल्यामुळे - तमसि प्रविष्टं - ब्रह्महत्यारूपी पापात पडलेल्या - शक्रं - इंद्राला - असुरगृहे - दैत्यांच्या घरी - पिहिताः - कोंडलेल्या - अनथाः - अनाथ अशा - देवस्त्रियः - देवस्त्रियांना - मोचयामास - मुक्त करता झाला - नृसिंहे - नृसिंहावतारी - सतां अभवाय - सज्जनांना अभय देण्याकरिता - असुरेंद्रं जघ्ने - असुरांचा राजा हिरण्यकशिपूला मारता झाला. ॥ १९ ॥
एकदा वालखिल्य ऋषी तपश्चर्या करता करता अत्यंत कृश झाले होते ते जेव्हा कश्यप ऋषींसाठी समिधा आणीत होते, तेव्हा थकून जणू समुद्रात पडावे, तसे गायीच्या खुरांनी केलेल्या खड्‌ड्यातील पाण्यात पडले त्यांनी स्तुती केल्यानंतर भगवंतांनी अवतार घेऊन त्यांना वर काढले वृत्रासुराल मारले तेव्हा इंद्राला ब्रह्महत्येचा दोष लागल्यामुळे तो भिऊन लपून बसला तेव्हा भगवंतांनी त्या हत्येपासून इंद्राचे रक्षण केले तसेच जेव्हा असुरांनी अनाथ देवांगनांना कैद केले, तेव्हासुद्धा भगवंतांनी त्यांना असुरांच्या बंदिवासातून सोडविले भगवंतांनी सज्जनांचे रक्षण करण्यासाठी नृसिंहावतार धारण केला आणि हिरण्यकशिपूला ठार मारले. (१९)


देवासुरे युधि च दैत्यपतीन् सुरार्थे
     हत्वान्तरेषु भुवनानि अदधात् कलाभिः ।
भूत्वाथ वामन इमामहरद् बलेः क्ष्मां
     याच्ञाच्छलेन समदाद् अदितेः सुतेभ्यः ॥ २० ॥
देवासुरा समरि दैत्यपती वधोनी
     मन्वंतरा त्रिभुवना मग रक्षि शक्त्ये ।
होवोनि वामन बळी जितला यशाने
     देवांस पृथ्वि दिधली मिळवोनि तैशी ॥ २० ॥

अंतरेषु - सर्व मन्वंतरांमध्ये - देवासुरे युधि - देवदैत्यांच्या युद्धामध्ये - सुरार्थे - देवांच्या कार्यसिद्धीसाठी - कलाभिः - अवतारांना - दैत्यपतीन् हत्वा - दैत्यांच्या अधिपतींना मारून - भुवनानि अदधात् - त्रिभुवनाचे रक्षण करता झाला - अथ वामनं भूत्वा - आणि बटूरूप वामनावतार घेऊन - याञ्चाच्छलेन - याचनेच्या मिषाने - बलेः इमां क्ष्मां अहरत् - बळीपासून या पृथ्वीचे हरण केले - अदितेः सुतेभ्यः च समदात् - आणि अदितीचे पुत्र देव यांना दिली. ॥ २० ॥
देवतांच्या रक्षणासाठी देव आणि असूर यांच्या संग्रामामध्ये त्यांनी दैत्यपतींचा वध केला तसेच वेगवेगळ्या मन्वन्तरांमध्ये आपल्या शक्तीने अनेक कलावतार धारण करून याचकाचा बहाणा करून, ही पृथ्वी दैत्यराज बलीकडून काढून घेतली व अदितिनंदन देवतांना दिली. (२०)


निःक्षत्रियामकृत गां च त्रिःसप्तकृत्वो
     रामस्तु हैहयकुलापि अयभार्गवाग्निः ।
सोऽब्धिं बबन्ध दशवक्त्रमहन् सलङ्कं
     सीतापतिर्जयति लोकमलघ्नकीर्तिः ॥ २१ ॥
एक्केविसीहि समयी वधि सर्व क्षात्र
     त्या हैहयीकुलवधा भृगुराम झाला ।
बांधोनि सेतु वधिला दशववक्त्र लंकी
     सीतापती विजयी तो जगतात सार्‍या ॥ २१ ॥

हैहयकुलाप्यय - हैहयनामक क्षत्रियकुलाच्या संहारासाठी - भार्गवाग्निः रामः तु - भार्गवकुळात उत्पन्न झालेला जणू अग्निच असा परशुराम तर - त्रिः सप्तकृत्वः - तीन गुणिले सात म्हणजे एकवीस वेळा - गां निःक्षत्रियां अकृत - पृथ्वीला क्षत्रियरहित करता झाला - सः एव लोकमलघ्नकीर्तिः - तोच लोकांची पापे नष्ट करणारा अशी कीर्ति ज्याची असा - सीतापतिः सन् - सीतापति राम होऊन - अब्धिं सेतुं बबंध - समुद्रात पूल बांधला - च सलंकं - व लंकावासी - दशवक्त्रं अहन् - दशमुख रावणाला मारता झाला. जयति - उत्कर्ष पावत आहे. ॥ २१ ॥
परशुराम-अवतार घेऊन त्यांनीच पृथ्वीला एकवीस वेळा क्षत्रियहीन केले ते म्हणजे हैहयवंशाचा नाश करण्यासाठी भृगुवंशामध्ये पेटलेला अग्नी होते त्याच भगवंतांनी रामावतारामध्ये समुद्रावर सेतू बांधून रावणासह लंका उध्वस्त केली त्यांची कीर्ती सर्व लोकांचे पाप नष्ट करणारी आहे त्या सीतापतींचा विजय असो. (२१)


भूमेर्भरावतरणाय यदुष्वजन्मा
     जातः करिष्यति सुरैरपि दुष्कराणि ।
वादैर्विमोहयति यज्ञकृतोऽतदहान्
     शूद्रान् कलौ क्षितिभुजो न्यहनिष्यदन्ते ॥ २२ ॥
त्यां जन्म तो नसुनिया यदुवंशि जन्मे
     नी तो करील बहुकार्य सुरांहुनी ही ।
अपात्र होत्रि वदण्या मग बुद्ध होई
     नी शूद्रभूप वधिण्या कलि होय अंती ॥ २२ ॥

अजन्मा - ज्याला जन्म नाही असा - भूमेः भारावतारणाय - पृथ्वीचा भार दूर करण्यासाठी - यदुषु कृष्णः जातः सन् - यादवांमध्ये कृष्णावतार घेऊन - सुरैः अपि - देवांनाही - दुष्करणि करिष्यति - करण्यास अत्यंत कठीण अशी कृत्ये करील - अतदर्हान् यज्ञकृतः - यज्ञानुष्ठानाचा अधिकार नसताही यज्ञानुष्ठान करणार्‍यांना - वादैः विमोहयति - वेदविरुद्ध तर्कच्या बोधरूप वादांनी मोहित करील - कलौ अंते - कलीच्या शेवटी - शूद्रान् क्षितिभुजः न्यहनिष्यत् - शूद्रप्राय झालेल्या राजांनामारील. ॥ २२ ॥
राजन ! अजन्मा असूनही पृथ्वीवरील भार कमी करण्यासाठी तेच भगवान यदुवंशात जन्म घेतील आणि देवताही करू शकणार नाहीत, अशी कर्मे करतील पुढे भगवानच बुद्धाच्या रूपाने प्रगट होतील आणि यज्ञाचा अधिकार नसणारे यज्ञ करीत असल्याचे पाहून, अनेक प्रकारच्या तर्कवितर्कांनी, त्यांना मोहित करतील कलियुगाच्या शेवटी कल्की अवतार घेऊन तेच शूद्र राजांचा वध करतील. (२२)


( अनुष्टुप् )
एवंविधानि जन्मानि कर्माणि च जगत्पतेः ।
भूरीणि भूरियशसो वर्णितानि महाभुज ॥ २३ ॥
( अनुष्टुप्‌ )
अनंत भगवान्‌ कीर्ती करितो तो जगत्पती ।
महात्मे वर्णिती जन्म करिती कर्मगान ते ॥ २३ ॥

महाभुज - हे आजानुबाहो जनका - भूरियशसः जगत्पते - महाकीर्तिमान अशा विश्वपतीची - एवंविधानि भूतीणि - याप्रकारची पुष्कळ - जन्मानि कर्माणि च संति - जन्मे-अवतार आणि कर्मे आहेत - तेषां संक्षेपतः ते वर्णितानि - त्यांतून तुला थोडीशी सांगितली. ॥ २३ ॥
हे विदेहराज ! अनंतकीर्ती जगन्नाथाचे असे अनेक जन्म आणि कर्मे यांचे भक्तांनी वर्णन केले आहे. (२३)


इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
संहितायां एकादशस्कन्धे चतुर्थोऽध्यायः ॥ ४ ॥
अध्याय चवथा समाप्त

GO TOP