श्रीमद् भागवत पुराण
दशमः स्कन्धः
षट्‌चत्वारिंशोऽध्यायः

स्वविरहार्तगोपगोपीनां सान्त्वनाय भगवतोद्धवस्य प्रस्थापनम्, नन्दोद्धवसंवादश्च -

उद्धवाचे व्रजगमन -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् )
वृष्णीनां प्रवरो मंत्री कृष्णस्य दयितः सखा ।
शिष्यो बृहस्पतेः साक्षाद् उद्धवो बुद्धिसत्तमः ॥ १ ॥
( अनुष्टुप् )
श्रीशुकदेव सांगतात -
शिष्य बृहस्पतीची तो उद्धवो वृष्णिवीर जो ।
बुद्धिमान् त्याहूनी कोण कृष्णप्रीय नि मंत्रिही ॥ १ ॥

वृष्णीनां प्रवरः मंत्री - यादवांमध्ये श्रेष्ठ व सल्लामसलत देणारा साक्षात् बृहस्पतेः शिष्यः - प्रत्यक्ष बृहस्पतीचा शिष्य बुद्धिसत्तमः उद्धवः - विशालबुद्धीचा असा उद्धव कृष्णस्य दयितः सखा (आसीत्) - श्रीकृष्णाचा प्रिय मित्र होता. ॥१॥
श्रीशुकदेव म्हणतात- उद्धव हा एक वृष्णींचा श्रेष्ठ मंत्री होता. तो साक्षात बृहस्पतींचा शिष्य असून अतिशय बुद्धिमान होता. तसाच तो श्रीकृष्णांचा प्रिय मित्रही होता. (१)


तमाह भगवान् प्रेष्ठं भक्तमेकान्तिनं क्वचित् ।
गृहीत्वा पाणिना पाणिं प्रपन्नार्तिहरो हरिः ॥ २ ॥
एकदा भक्तप्रीयो या कृष्णाने उद्धवास त्या ।
एकांती धरुनी हात त्याच्याशी बोलले असे ॥ २ ॥

प्रपन्नार्तिहरः - शरण आलेल्यांची पीडा दूर करणारा भगवान् हरिः - षड्‌गुणैश्वर्यसंपन्न श्रीकृष्ण क्वचित् - एके प्रसंगी तं एकान्तिनं प्रेष्ठं भक्तं - त्या एकनिष्ठ व श्रेष्ठ अशा उद्धवाला पाणिं पाणिना गृहीत्वा आह - त्याचा हात आपल्या हाताने धरून म्हणाला. ॥२॥
शरणागतांची सर्व दुःखे नाहीशी करणारे भगवान श्रीकृष्ण एके दिवशी आपला अनन्य प्रिय भक्त उद्धव याचा हात हातात घेऊन म्हणाले. (२)

विवरण :- इथपर्यंत भगवंतांच्या अवतारकार्यातील उद्दिष्टाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण झाला, असे म्हणता येईल. (कंसवध, माता-पित्यांची मुक्तता इ.) , मात्र ते गोकुळ, गोकुळवासी आणि नंद-यशोदा यांना विसरले नाहीत. आपल्या विरहाने दुःखी होऊन ते आपल्या वाटेकडे डोळे लाऊन बसले असतील, याची त्यांना कल्पना होती. म्हणून त्यांनी आपला परमसखा जो अत्यंत बुद्धिमान आणि साक्षात बृहस्पतीचा शिष्य असा उद्धव त्याला नंद-यशोदेकडे पाठविले. (उद्धवास आपणांस असणार्‍या ब्रह्मज्ञानाचा गर्व होता असे म्हटले जाते. परंतु ते योग्य नाही. भगवंतांनी नंतर त्यांना ब्रह्मज्ञान करून दिले होते. तसेच जिथे ब्रह्मज्ञान असते, तिथे सारा अभिमान गळून जातो, भक्तिरसात, प्रेमरसात अभिमान विलीन होतो. उद्धवाला अभिमान असलाच, तर तो आपण श्रीकृष्णासारख्या श्रेष्ठ दैवताचा परमसखा असण्याचा होता.) उद्धवास संदेश देण्यास सांगताना भगवंतांनी त्याचा हात आपल्या हाती घेतला, यातूनच दोघांचे प्रेमाचे, सौहार्दाचे नाते स्पष्ट होते. हात हाती घेणे म्हणजेच 'ये हृदयीचे ते हृदयी घालणे.' एकरूप होणे. भारतीय विवाहपद्धतीत पाणिग्रहणाला महत्त्व आहे, ते यासाठीच. पति-पत्नीच्या एकरूपत्वाचे ते चिन्ह, 'तू म्हणजे मी' ही भावना ! (१-२)



गच्छोद्धव व्रजं सौम्य पित्रोर्नौ प्रीतिमावह ।
गोपीनां मद्वियोगाधिं मत्सन्देशैर्विमोचय ॥ ३ ॥
उद्धवा व्रजि जा तुम्ही तेथे माता-पिता तसे ।
गोपिंना सुखवा माझा निरोप देउनी असा ॥ ३ ॥

सौ‌म्य उद्धव - हे शांत उद्धवा व्रजं गच्छ - गोकुळात जा नौ पित्रोः प्रीतिं आवह - आमच्या मातापित्यांना सुख होईल असे कर गोपीनां मद्वियोगाधिं - गोपींची माझ्या वियोगाने झालेली पीडा मत्संदेशैः विमोचय - माझ्य़ा निरोपांनी दूर कर. ॥३॥
हे सौ‍म्य उद्धवा ! तू व्रजामध्ये जा. तेथे जाऊन माझ्या माता-पित्यांना आनंदित कर. तसेच माझा विरह झाल्याने गोपींना जे दुःख झाले, ते त्यांना माझा निरोप सांगून दूर कर. (३)


ता मन्मनस्का तृष्ट्प्राणा मदर्थे त्यक्तदैहिकाः ।
मामेव दयितं प्रेष्ठं आत्मानं मनसा गताः ।
ये त्यक्तलोकधर्माश्च मदर्थे तान् बिभर्म्यहम् ॥ ४ ॥
उद्धवा नित्य माझ्यात गोपिंचे चित्त लागले ।
सर्वस्व मीच तो त्यांचा यजिले सर्व त्यांनि ते ।
अशांना पोषितो मीच माझे ते व्रतची असे ॥ ४ ॥

ताः मन्मनस्काः - त्या माझ्यावर ज्यांचे मन मत्प्राणाः - व प्राण आसक्त झाले आहेत अशा मदर्थे त्यक्तदैहिकाः - माझ्याकरिता ज्यांनी देहाभिमान सोडून दिला आहे अशा च अहं - आणि मी ये मदर्थे त्यक्तलोकधर्माः - ज्यांनी माझ्यासाठी लौकिक धर्म सोडून दिले आहेत तान् बिभर्मि - त्यांचे पोषण करितो. ॥४॥
गोपींचे मन-प्राण नित्य माझ्यामध्येच लागून राहिलेले आहेत. त्यांचे जीवन, त्यांचे सर्वस्व, मीच आहे. माझ्यासाठी त्यांनी आपले पती, पुत्र इत्यादींना सोडले आहे. त्यांनी मनानेसुद्धा मलाच आपला प्रियतम मानले आहे. ज्यांनी माझ्यासाठी लौकिक पारलौकिक धर्म सोडून दिले, त्यांचे पालन-पोषण मी करतो. (४)

विवरण :- 'आपला संदेश गोपींना दे' असे भगवंत उद्धवास सांगतात, त्या गोपी कशा ? तर 'मत्प्राणाः' मदर्थे त्यक्तदैहिकाः' इथे 'मत्प्राणाः' याचा अर्थ 'मयि मनो यासाम्' (ज्यांचे मन माझ्याठिकाणी) अशा नाहीत तर 'मम प्राणभूताः' 'अहमेव प्राणाः यासाम्' (मी म्हणजेच ज्यांचे प्राण अशा) अशी अवस्था असलेल्या गोपी. जसे प्राणाशिवाय शरीर नाही, तसे कृष्णाखेरीज जीवन नाही. शिवाय या गोपींनी माझ्यासाठी आपले देहधर्मच नाही, तर लोकाचारहि सोडून दिले आहेत. त्या माझ्याशी इतक्या एकरूप झाल्यात, की स्वर्गादि लाभांचाहि त्यांना मोह वाटत नाही. गोपींच्या उत्कट भक्तीचा आणखी कोणता साखला हवा ? या तीव्र, उत्कट भक्तीतून निर्माण झालेली एकरूपतेची आस पाहून, सध्याचा हा विरहताप या गोपींना भस्मसात तर करणार नाही ना ? अशी सार्थ भीतीही क्षणभर भगवंतांना वाटली असावी का ? (अतिस्नेहः पापशङकी ।) प्रेमरसाचे, भक्तीचे केवढे हे सामर्थ्य ! (४)



मयि ताः प्रेयसां प्रेष्ठे दूरस्थे गोकुलस्त्रियः ।
स्मरन्त्योऽङ्‌ग विमुह्यन्ति विरहौत्कण्ठ्यविह्वलाः ॥ ५ ॥
गोपिंचा प्रीय मी आहे दूर येथेहि मानिती ।
मूर्छित नित्य त्या होती प्रतिक्षा करिती सदा ॥ ५ ॥

अङग - हे उद्धवा ताः गोकुलस्त्रियः - त्या गोपी प्रेयसां प्रेष्ठे मयि दुरस्थे - प्रियांमध्ये अत्यंत प्रिय असा मी दूर असताना (माम्) स्मरन्त्यः - माझ्या दर्शनाच्या विरहौत्कण्ठयविह्वलाः - वियोगामुळे लालसेने विव्हल झालेल्या विमुह्यन्ति - मूर्च्छित होतात. ॥५॥
प्रिय उद्धवा ! त्या गोपींचा परम प्रियतम मी येथे दूर आल्यामुळे माझे स्मरण होऊन त्यांची शुद्ध हरपते. माझ्या विरहामुळे माझ्या भेटीची उत्कंठा वाढून त्या व्याकूळ होत असतात. (५)


धारयन्त्यतिकृच्छ्रेण प्रायः प्राणान्कथञ्चन ।
प्रत्यागमन सन्देशैः बल्लव्यो मे मदात्मिकाः ॥ ६ ॥
सख्या गोपी अशा दुःखे कष्टेही नच वाचती ।
येईन वदलो त्यांना तेणे जीवित सर्व त्या ।
आत्मा त्यांचा असे मी नी माझ्यात रमती सदा ॥ ६ ॥

मदात्मिकाः बल्लव्यः - मद्रूप झालेल्या गोपी मे प्रत्यागमनसंदेशैः - मी परत येईन अशा उद्देशांनी अति कृच्छ्‌रेण - मोठया कष्टाने प्रायः प्राणान् कथंचन धारयन्ति - बहुधा प्राण कष्टाने धारण करीत आहेत. ॥६॥
तन्मय झालेल्या माझ्या गोपी, "मी येईन", असे सांगितल्यामुळेच अत्यंत कष्टाने कसेबसे आपले प्राण धरून आहेत. (६)

विवरण :- मदात्मिकाः - (माझ्यात आत्मा, मन असणार्‍या, अर्थात त्यांचे मन म्हणजे मीच.) गोपींचे हे आणखी एक विशेषण. मी पुन्हा परत येईन, या एकमात्र आशेवर कसेबसे प्राण धारण करणार्‍या (विरहतापाने प्राण शरीरात शिल्लक राहिलाच तर) अशा गोपी, आणि तो प्राण राहिलहि. कारण 'आशाबन्धः कुसुमसदृशं प्रायशोह्यङगनानां । सद्यः पाति प्रणयिहृदयं विप्रयोगे रुणद्धि ।' आशारूपी नाजुक बंध खासकरून स्त्रियांना विरहामध्ये प्राण धारण करण्यास मदत करतो. त्यामुळे गोपी निश्चितच माझ्या विरहानेहि कशाबशा तगून राहतील अशी खात्री. (६)



श्रीशुक उवाच -
इत्युक्त उद्धवो राजन् संदेशं भर्तुरादृतः ।
आदाय रथमारुह्य प्रययौ नन्दगोकुलम् ॥ ७ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
ऐकता शब्द कृष्णाचे उद्धवो आदरे रथीं ।
संदेश घेउनी आले नंदगावास चालले ॥ ७ ॥

राजन् - हे राजा इति उक्तः आदृतः उद्धवः - अशारीतीने सांगून सत्कारलेला उद्धव भर्तुः संदेशं आदाय - श्रीकृष्णाचा निरोप घेऊन रथं आरुह्य - रथात बसून नंदगोकुलं प्रययौ - नंदाच्या गोकुळाला जाण्यास निघाला. ॥७॥
श्रीशुक म्हणतात- राजा ! श्रीकृष्ण असे म्हणाले, तेव्हा अत्यंत आदरपूर्वक उद्धव आपल्या स्वामींचा संदेश घेऊन रथावर आरूढ होऊन नंदगोकुळाकडे निघाला. (७)


प्राप्तो नन्दव्रजं श्रीमान् निम्लोचति विभावसौ ।
छन्नयानः प्रविशतां पशूनां खुररेणुभिः ॥ ८ ॥
अस्तमानी व्रजी आले वनीच्या धेनु येति तै ।
खुरांनी धूळ ती लोटे रथही झाकला तये ॥ ८ ॥

विभाबसौ निम्लोचति - सूर्य अस्ताला जात असता प्रविशतां - गोकुळात प्रवेश करणार्‍या पशूनां खुररेणुभिः - धेनूंच्या खुरांनी उडालेल्या धुळीने छन्नयानः - ज्याचा रथ आच्छादून गेला आहे श्रीमान् - असा श्रीमान उद्धव नंदव्रजं प्राप्तः - नंदाच्या गोकुळात येऊन पोचला. ॥८॥
उद्धव सूर्यास्ताच्या वेळी नंदांच्या व्रजामध्ये पोहोचला. त्यावेळी परत येणार्‍या गुरांच्या खुरांमुळे उडालेल्या धुळीने त्याचा रथ झाकून गेला होता. (८)

विवरण :- छन्नयान - सूर्य मावळण्याचे वेळी उद्धवाचा रथ गोकुळात पोहोचला. ती 'गोधूली' वेळ होती. त्यामुळे गायींच्या खुरांनी उडालेल्या धुळीने त्याचा रथ झाकोळून गेला होता. कदाचित त्यामुळे त्या रथातून कोण आले, हे गोपींना कळले नसावे आणि उद्धव थेट नंदगृही गेला असावा. (८)



वासितार्थेऽभियुध्यद्‌भिः नादितं शुष्मिभिर्वृषैः ।
धावन्तीभिश्च वास्राभिः उधः भारैः स्ववत्सकान् ॥ ९ ॥
माजर्‍या धेनुच्या साठी आपसी लढती वळू ।
दुधाचा भार घेवोनी दुभत्या धेनु धावती ॥ ९ ॥

वासितार्थे अभियुध्‌द्‌यद्भिः - ऋतुमती गाईंसाठी युद्ध करणार्‍या शुष्मिभिः वृषैः - उन्मत्त वृषभांनी (च) ऊधोभारैः - स्तनांच्या भारांनी स्ववत्सकान् - आपल्या वासरांकडे धावन्तीभिः वास्राभिः - धावत जाणार्‍या गायींनी नादितं (व्रजं विवेश) - गजबजलेल्या गोकुळात उद्धव गेला. ॥९॥
व्रजभूमीमध्ये माजावर आलेल्या गाईंसाठी माजलेले बैल आपापसात झुंजत होते. त्यांच्या हंबरण्याने व्रजभूमी दुमदुमून गेली होती. नुकत्याच व्यालेल्या गाई भरलेल्या सडांनिशी आपपल्या वासरांकडे धावत निघाल्या होत्या. (९)


इतस्ततो विलङ्‌घद्‌भिः गोवत्सैर्मण्डितं सितैः ।
गोदोहशब्दाभिरवं वेणूनां निःस्वनेन च ॥ १० ॥
धावती वत्स ते श्वेत सुरेख दिसती पहा ।
धारानी बासुरीच्या त्या नादाने व्रज शोभले ॥ १० ॥

इतः ततः विलङ्‌घद्भिः - इकडे तिकडे धावणार्‍या सितैः गोवत्सैः - शुभ्र वर्णाच्या वासरांनी वेणूनां निस्वनेन च मण्डितं - आणि मुरलीच्या शब्दाने शोभणार्‍या गोदोहशब्दाभिरवं - गाईचे दूध काढण्याच्या शब्दांनी गजबजून गेलेल्या. ॥१०॥
इकडे तिकडे उड्या मारणार्‍या पांढर्‍या वासरांनी गोकुळ शोभत होते. गायींच्या धारा काढण्याचा आवाज आणि वेणूंचा मधुर आवाज ऐकू येत होता. (१०)


गायन्तीभिश्च कर्माणि शुभानि बलकृष्णयोः ।
स्वलङ्‌कृताभिर्गोपीभिः गोपैश्च सुविराजितम् ॥ ११ ॥
सजोनी गोप गोपी ते गाती कृष्णलीला तदा ।
या परी व्रजिती शोभा अपूर्व वाढली असे ॥ ११ ॥

बलकृष्णयोः - बलराम व श्रीकृष्ण शुभानि कर्माणि गायन्तीभिः - ह्यांची पवित्र कृत्ये गाणार्‍या स्वलंकृताभिः गोपीभिः च गौपैः - व अलंकार घातलेल्या गोपींनी व गोपांनी सुविराजितं (व्रजं विवेश) - शोभित झालेल्या गोकुळात उद्धव शिरला. ॥११॥
तेथे सुंदर वस्त्रालंकार घातलेल्या गोपी व गोप श्रीकृष्ण-बलरामांच्या मंगलमय चरित्रांचे गायन करीत होते. त्यामुळे ते गोकुळ अधिक शोभत होते. (११)


अग्न्यर्कातिथिगोविप्र पितृदेवार्चनान्वितैः ।
धूपदीपैश्च माल्यैश्च गोपावासैर्मनोरमम् ॥ १२ ॥
अग्नी सूर्य द्विजो गाय अतिथी पितरे तसे ।
देवता गोपगेहात पूजिता गंध येतसे ॥ १२ ॥

अग्न्यर्कातिथिगोविप्र - अग्नि, सूर्य, अतिथि, गाई, ब्राह्मण, पितृदेवार्चनान्वितैः - पितर, देव ह्यांच्या पूजनांनी युक्त गोपावासैः - गोपांच्या घरांनी माल्यैः च धूपदीपैः च - आणि फुले, धूप, दीप ह्यांनी मनोरमं (व्रजं विवेश) - रमणीय झालेल्या गोकुळात उद्धव गेला. ॥१२॥
तेथे गोपांच्या घरांमध्ये अग्नी, सूर्य, अतिथी, गाई, ब्राह्मण आणि देवतापितरांची धूप, दीप, फुले इत्यादींनी पूजा होत होती. त्यामुळे सगळा व्रज मनोरम दिसत होता. (१२)


सर्वतः पुष्पितवनं द्विजालिकुलनादितम् ।
हंसकारण्डवाकीर्णैः पद्मषण्डैश्च मण्डितम् ॥ १३ ॥
रांगेत शोभले वृक्ष सपुष्प डवरोनिया ।
भुंगे नी पक्षिही गाती हंसादी ते विहारती ॥ १३ ॥

सर्वतः पुष्पितवनं - तेथे सर्वठिकाणी उपवने प्रफुल्लित झाली आहेत अशा द्विजालिकुलनादितम् - जे पक्षी व भ्रमर ह्यांच्या समूहांच्या नादाने भरलेले हंसकारण्डवाकीर्णैः - व हंस, कारंडव ह्यांनी व्यापिलेल्या पद्मखण्डैः मण्डितं (व्रजं विवेश) - कमलवनांनी शोभणार्‍या गोकुळात गेला. ॥१३॥
चारी बाजूंनी वने फुलांनी लहडलेली होती. पक्षी किलबिलाट करीत होते आणि भुंगे गुणगुणत होते. तेथील जलाशय कमळांच्या ताटव्यांनी व हंस, करडुवा इत्यादी पक्ष्यांनी शोभत होते. (१३)


तमागतं समागम्य कृष्णस्यानुचरं प्रियम् ।
नन्दः प्रीतः परिष्वज्य वासुदेवधियाऽऽर्चयत् ॥ १४ ॥
कृष्णाचा सेवको भक्त भेटता लागला गळीं ।
नंदा मोद बहू झाला कृष्णची भेटला जसा ॥ १४ ॥

नंदः - नंद आगतं कृष्णस्य प्रियं अनुचरं - आलेल्या श्रीकृष्णाचा आवडता सेवक अशा तं समागम्य - त्या उद्धवाजवळ येऊन परिष्वज्य प्रीतः - व आलिंगन देऊन प्रसन्न झालेला (तं) वासुदेवाधिया - हा श्रीकृष्णच अशा कल्पनेने अर्चयत् - उद्धवाला पूजिता झाला. ॥१४॥
श्रीकृष्णांचा प्रिय भक्त उद्धव जेव्हा व्रजामध्ये आला, तेव्हा त्याची भेट घेऊन नंद अतिशय प्रसन्न झाले. त्यांनी त्याला आलिंगन देऊन त्याचा श्रीकृष्ण समजून सन्मान केला. (१४)


भोजितं परमान्नेन संविष्टं कशिपौ सुखम् ।
गतश्रमं पर्यपृच्छत् पादसंवाहनादिभिः ॥ १५ ॥
भोजने जाहली श्रेष्ठ मंजकी बैसले तदा ।
सेवके दाबिलें पाय पंखाही ढाळिला असे ॥ १५ ॥

परमान्नेन भोजितं - उत्तम अन्नाचे भोजन घातलेल्या कशिपौ सुखं संविष्टं - शय्येवर सुखाने बसविलेल्या उद्धवाला पादसंवाहनादिभिः - पाय चेपणे इत्यादिकांनी गतश्रमं (कृत्वा) - ज्याचे श्रम दूर झाले आहेत असा (तं) पर्यपृच्छत् - त्याला विचारिता झाला. ॥१५॥
त्याला पक्वान्नाचे भोजन वाढले. नंतर तो आरामात पलंगावर पहुडला, तेव्हा त्याचे पाय वगैरे चेपून त्याचा प्रवासाचा शीण दूर केला. नंतर नंदांनी त्याला विचारले, (१५)

विवरण :- उद्धव नंदगृही आल्यानंतर उत्थापन देऊन नंदाने त्याचे स्वागत केले. त्याला 'कृष्ण' समजून हृदयाशी धरले. त्याची पूजा केली. (अतिथीदेवो भव ।) इथे कृष्णासाठी त्याने वापरलेला 'वासुदेव' शब्द महत्वाचा. कंसवधाचे वेळी कृष्ण आपला मुलगा नसून वसुदेव-देवकीचा आहे, याबद्दल नंदाची पूर्णपणे खात्री पटली होती. ते वास्तव त्याला स्वीकारावे लागले होते; ते त्याच्या 'वासुदेव' या शब्दातून प्रकट होते. यानंतरच्या त्याच्या सर्व कृतीत त्याचा दिलदार सुसंस्कृतपणाच दिसून येतो. वास्तविक उद्धव कृष्णाच्या वयाचा, स्वतः नंद नव्वदीचा, पण उद्धवाला उत्थापन देणे, त्याला छातीशी कवटाळणे (हाही मानवी स्वभावाचा एक पैलू ! उद्धव कृष्णाचा मित्र, त्याला जवळ घेणे म्हणजे कृष्णालाच जवळ घेण्याचे सुख अनुभवणे ! दुधाची तहान ताकावर !) 'कृष्ण' समजणे हा दिलदारपणाचा एक भाग. शिवाय उद्धवाला पाहिल्या-पाहिल्या त्याने कृष्णासंबंधीच्या प्रश्नांचा भडिमार त्याच्यावर केला नाही. तर सुग्रास भोजन दिले, पाय दाबून देऊन त्याचा श्रमपरिहार केला आणि मग सावकाश कृष्णाचे कुशल विचारले. अभ्यागताच्या आगमनाची दखल न घेता केवळ कृष्णालाच केंद्रस्थानी धरून प्रश्न न विचारण्यामध्ये नंदाची संयमी परिपक्वताच दिसून येते. (१४-१५)



कच्चिदङ्‌ग महाभाग सखा नः शूरनन्दनः ।
आस्ते कुशल्यपत्याद्यैः युक्तो मुक्तः सुहृद्व्रतः ॥ १६ ॥
पुसले नंदबाबाने भगवान् उद्धवा अता ।
मित्र ते जाहले मुक्त आता ते सुखि होत ना ? ॥ १६ ॥

अङग महाभाग - हे मोठया भाग्यवंता उद्धवा नः सखा शूरनंदनः - आमचा मित्र वसुदेव अपत्याद्यैः युक्तः - पुत्रादि परिवारांनी युक्त झाला आहे सुहृद्‌वृतः - मित्रांनी युक्त झाला आहे मुक्तः - मुक्त झाला आहे (सः) कुशली आस्ते कच्चित् - तो खुशाल आहे ना ॥१६॥
हे भाग्यवान उद्धवा ! आमचा मित्र वसुदेव आता तुरुंगातून मुक्त झाला. तो सुहृद, पुत्र इत्यादींसह खुशाल आहे ना ? (१६)


दिष्ट्या कंसो हतः पापः सानुगः स्वेन पाप्मना ।
साधूनां धर्मशीलानां यदूनां द्वेष्टि यः सदा ॥ १७ ॥
भाग्याची गोष्ट ही आहे मारिला कंस दुष्ट तो ।
यदुवंशीय साधुंचा कदाचि द्वेषितां असां ॥ १७ ॥

यः - जो साधूनां धर्मशीलानां - सदाचारी व धार्मिक अशा यदूनां सदा द्वेष्टि - यादवांचा नेहमी द्वेष करीत असे (सः) पापः कंसः - तो पापी कंस सानुगः - अनुयायांसह स्वेन पाप्मना दिष्टया हतः - आपल्या पापकर्माने सुदैवाने मारिला गेला. ॥१७॥
आपणच केलेल्या पापांचे फळ म्हणून पापी कंस अनुयायांसह मारला गेला, हे छान झाले ! कारण तो धार्मिक व सच्छिल यदुवंशियांचा नेहमी द्वेष करीत असे. (१७)


अपि स्मरति नः कृष्णो मातरं सुहृदः सखीन् ।
गोपान्व्रजं चात्मनाथं गावो वृन्दावनं गिरिम् ॥ १८ ॥
आठवी कृष्ण का आम्हा आई मित्र नि गोप ते ।
आठवी कृष्ण का सर्व गाई वृंदावनो गिरी ॥ १८ ॥

कृष्णः - श्रीकृष्ण नः मातरं - आम्हाला, मातेला सुहृदः सखीन् गोपान् - मित्र, सवंगडी व इतर गोप यांना आत्मनाथं व्रजं - आपणच आहे रक्षक ज्याचा अशा गोकुळाला गावः वृन्दावनं गिरिं - गाई, वृंदावन व गोवर्धन पर्वत ह्यांना स्मरति अपि - स्मरतो काय ॥१८॥
बरे तर ! उद्धवा ! श्रीकृष्णाला आम्हा लोकांची कधी आठवण येते का ? येथे त्याची आई आहे. हितचिंतक, मित्र असे गोप आहेत. त्यांनाच आपले स्वामी मानणारे हे व्रजातील लोक आहेत, गाई, वृंदावन आणि हा गोवर्धनही आहे. या सर्वांची त्याला कधी आठवण येते का ? (१८)


अप्यायास्यति गोविन्दः स्वजनान् सकृदीक्षितुम् ।
तर्हि द्रक्ष्याम तद्वक्त्रं सुनसं सुस्मितेक्षणम् ॥ १९ ॥
एकदा तरि गोविंद येई का भेटण्या अम्हा ।
येतील तर ती दृष्टी मुखही पाहु की अम्ही ॥ १९ ॥

गोविंदः - श्रीकृष्ण स्वजनान् सकृत् ईक्षितुम् - आप्तेष्टांना एकवार पाहण्याकरिता आयास्यति अपि - येईल काय तर्हि - जर आला तरच सुनसं सुस्मितेक्षणं - सरळ नाकाचे व हास्यपूर्वक अवलोकन करणारे तद्वक्त्र द्रक्ष्यामः - त्या कृष्णाचे मुख पाहण्यास मिळेल. ॥१९॥
आपल्या बांधवांना भेटण्यासाठी आमचा गोविंद एकदा तरी इकडे येईल का ? तो जर येथे आला, तर आम्ही त्याचे ते सुंदर नाक असलेले व सुहास्य नजरेने पाहणारे मुखकमल पाहू शकू ! (१९)


दावाग्नेर्वातवर्षाच्च वृषसर्पाच्च रक्षिताः ।
दुरत्ययेभ्यो मृत्युभ्यः कृष्णेन सुमहात्मना ॥ २० ॥
अनंत हरिची शक्ती अग्नी वर्षा नि दानवे ।
त्रासिता रक्षिले अम्हा वदू कितिक मी तसे ॥ २० ॥

सुमहात्मना कृष्णेन - महात्म्या श्रीकृष्णाकडून दावाग्नेः वातवर्षात् - वणव्यापासून, वादळापासून, पावसापासून वृषसर्पात् - तसेच वृषासुरापासून, दुरत्ययेभ्यः मृत्यूभ्यः च - कालियापासून आणि टाळता न येणार्‍या अशा मृत्यूपासून रक्षिताः - आम्ही रक्षिले गेलो. ॥२०॥
उदारहृदयी श्रीकृष्णाने जे टाळण्याचा आमच्याकडे काहीही उपाय नव्हता, त्या वणवा, तुफान, पाऊस, वृषासुर, अजगर इत्यादी मृत्यूंच्या अनेक प्रसंगातून आमचे रक्षण केले. (२०)


स्मरतां कृष्णवीर्याणि लीलापाङ्‌गनिरीक्षितम् ।
हसितं भाषितं चाङ्‌ग सर्वा नः शिथिलाः क्रियाः ॥ २१ ॥
विचित्र हरिची लीला मोकळे हास्य दृष्टी ती ।
बोलणे स्मरतो आम्ही तन्मये कांहिना सुचे ॥ २१ ॥

अङग - हे उद्धवा कृष्णवीर्याणि - श्रीकृष्णाचे पराक्रम लीलापाङगनिरीक्षतं - लीलायुक्त अशा कटाक्षांनी पहाणे हसितं भाषितं च - हसणे व बोलणे स्मरतां नः - स्मरणार्‍या आमची सर्वाः क्रियाः शिथिलाः (भवन्ति) - सर्व कृत्ये शिथिल होतात. ॥२१॥
उद्धवा ! आम्हांला श्रीकृष्णांचे पराक्रम, विलासपूर्व नेत्रकटाक्ष, मनोहर हास्य, मधुर भाषण इत्यादीची आठवण येते, तेव्हा आमची दुसरी कामे थांबतात. (२१)


सरिच्छैलवनोद्देशान् मुकुन्दपद भूषितान् ।
आक्रीडानीक्ष्यमाणानां मनो याति तदात्मताम् ॥ २२ ॥
ही नदी पोहला कृष्ण हा गिरी क्रीडला इथे ।
ह्या गाई वाजवी वंशी मन ते कृष्ण होय की ॥ २२ ॥

b> मुकुंदपदभूषितान् आक्रीडान् - श्रीकृष्णांच्या पायांनी भूषविलेली क्रीडांगणे सरिच्छैलवनोद्देशान् - नद्या, पर्वत, उपवने हे प्रदेश ईक्षमाणानां नः - अवलोकन करणार्‍या आमचे मनः तदात्मतां याति - मन श्रीकृष्णस्वरूपी लीन होऊन जाते. ॥२२॥
श्रीकृष्णाच्या चरणचिन्हांनी विभूषित झालेली नदी, पर्वत, वने, क्रीडांगणे इत्यादी आम्ही पाहू लागतो, तेव्हा आमचे मन तन्मय होऊन जाते. (२२)


मन्ये कृष्णं च रामं च प्राप्ताविह सुरोत्तमौ ।
सुराणां महदर्थाय गर्गस्य वचनं यथा ॥ २३ ॥
मानितो कृष्ण रामाला देवाधिदेव त्या द्वया ।
करण्या कार्य देवांचे जन्मले गर्ग बोलले ॥ २३ ॥

यथा गर्गस्य वचनं - जसे गर्ग मुनींचे भाषण (तथा) रामं च कृष्णं - त्याचप्रमाणे बलराम व श्रीकृष्ण इह सुराणां - ह्या भूलोकी देवांचे महदर्थाय प्राप्तौ - मोठे कार्य करण्याकरिता उत्पन्न झालेले सुरोत्तमौ मन्ये - श्रेष्ठ देव होत असे मी मानितो. ॥२३॥
देवांच्या महान कार्यासाठी येथे अवतरलेले राम-कृष्ण हे श्रेष्ठ आहेत, असे मी मानतो. कारण गर्गाचार्यांनी मला तसे सांगितले होते. (२३)


कंसं नागायुतप्राणं मल्लौ गजपतिं यथा ।
अवधिष्टां लीलयैव पशूनिव मृगाधिपः ॥ २४ ॥
सिंह जै हत्तिला मारी विनाशस्त्र तसाचि तो ।
मारितो जगराजाला तसे मल्लास कैकही ॥ २४ ॥

(तौ) नागायुतप्राणं कंसं - ते दोघे दहा हजार हत्तीचे बळ असणार्‍या कंसाला मल्लौ तथा गजपतिं - दोन मल्लांना तसेच मोठया हत्तीला मृगाधिपः पशून् इव - सिंह पशुंना मारतो त्याप्रमाणे लीलया एवं अवधिष्टाम् - लीलेनेच मारिते झाले. ॥२४॥
सिंह जसा पशूंना सहज मारतो, त्याचप्रमाणे त्यांनी दहा हजार हत्तींचे बळ असणारा कंस, त्याचे दोन पहिलवान आणि गजराज कुवलयापीड यांना सहज मारले. (२४)


तालत्रयं महासारं धनुर्यष्टिमिवेभराट् ।
बभञ्जैकेन हस्तेन सप्ताहं अदधाद् गिरिम् ॥ २५ ॥
त्रिताड एवढा उंच धनुष्य तोडिला यये ।
गोवर्धन करीं घेई सप्तदिन प्रियोहरी ॥ २५ ॥

(कृष्णः) तालत्रयं महासारं धनुः - श्रीकृष्ण तीन ताडांएवढे मोठे बळकट धनुष्य इभराट् यष्टिं इव बभञ्ज - जसा मोठा हत्ती काठीला त्याप्रमाणे मोडून टाकिता झाला एकेन हस्तेन - एका हाताने सप्ताहं गिरिं अदधात् - सात दिवस पर्वत धारण करिता झाला. ॥२५॥
हत्तीने एखादी काठी मोडावी, त्याप्रमाणे त्याने तीन ताड लांब असे अत्यंत बळकट धनुष्य तोडले. तसेच एकाच हाताने सात दिवसपर्यंत पर्वत उचलून धरला. (२५)


प्रलम्बो धेनुकोऽरिष्टः तृणावर्तो बकादयः ।
दैत्याः सुरासुरजितो हता येनेह लीलया ॥ २६ ॥
हाचि सर्वांपुढे खेळ खेळल्या परि मारितो ।
प्रलंब धेनुकारिष्टा तृणावर्त बकास ही ॥ २६ ॥

येन इह - ज्याने याठिकाणी प्रलंबः धेनुकः अरिष्टः तृणावर्तः - प्रलंब, धेनुक, अरिष्ट व तृणावर्त सुरासुरजितः - देवदैत्यांना जिंकणारे बकादयः दैत्याः च लीलया हताः - बकासुरादि दैत्य लीलेने मारिले. ॥२६॥
ज्यांनी सुरासुरांवर विजय मिळविला होता, त्या प्रलंब, धेनुक, अरिष्ट, तृणावर्त, बक इत्यादी दैत्यांना त्याने सहज मारले. (२६)


श्रीशुक उवाच -
इति संस्मृत्य संस्मृत्य नन्दः कृष्णानुरक्तधीः ।
अत्युत्कण्ठोऽभवत् तूष्णीं प्रेमप्रसरविह्वलः ॥ २७ ॥
परीक्षित् नंद हृदयो भरले प्रेमभक्तिने ।
स्मरता दाटला कंठ पुन्हा ते गप्प राहिले ॥ २७ ॥

इति संस्मृत्य संस्मृत्य - अशा रीतीने वारंवार स्मरण करून कृष्णानुरक्तधीः - श्रीकृष्णाच्या ठिकाणी रमली आहे बुद्धी ज्याची असा अत्युत्कण्ठः - कृष्णाविषयी उत्सुक झालेला प्रेमप्रसरविह्वलः नंदः - व प्रेमभराने विव्हल झालेला नंद तूष्णीम् अभवत् - स्तब्ध झाला. ॥२७॥
श्रीशुक म्हणतात- श्रीकृष्णांच्या प्रेमात रंगून गेलेले नंद अशाप्रकारे जेव्हा त्यांच्या एकेका लीलेचे स्मरण करू लागले, तेव्हा त्यांच्या प्रेमाला पूर आला. त्यामुळे ते व्याकूळ झाले आणि उत्कंठा अतिशय वाढल्यामुळे शेवटी स्तब्ध झाले. (२७)


यशोदा वर्ण्यमानानि पुत्रस्य चरितानि च ।
शृण्वंत्यश्रूणि अवास्राक्षीत् स्नेहस्नुतपयोधरा ॥ २८ ॥
यशोदा ऐकता गोष्टी प्रेमाश्रू नेत्रि पातले ।
पुत्रप्रेमे तिच्या आला दुग्धधारा स्तनातुनी ॥ २८ ॥

वर्ण्यमानानि पुत्रस्य - वर्णन करण्याजोगी पुत्राची चरितानि श्रृण्वन्ति - चरित्रे श्रवण करणारी स्नेहस्नुतपयोधरा - स्तनांतून प्रेमाने दुधाच्या धारा वहात आहेत यशोदा अश्रूणि अस्राक्षीत् - अशी यशोदा नेत्रांतून प्रेमाने अश्रू सोडिती झाली. ॥२८॥
नंद सांगत असलेल्या श्रीकृष्णाच्या लीला ऐकून यशोदेच्याही डोळ्यांतून अश्रू वाहू लागले होते आणि पुत्र-स्नेहामुळे तिच्या स्तनांतून दुधाच्या धारा वाहात होत्या. (२८)


तयोरित्थं भगवति कृष्णे नन्दयशोदयोः ।
वीक्ष्यानुरागं परमं नन्दमाहोद्धवो मुदा ॥ २९ ॥
यशोदा नंदबाबाचे उद्धवे प्रेम पाहिले ।
आनंदमग्न होवोनी तयांना बोलु लागले ॥ २९ ॥

उद्धवः - उद्धव तयोः नन्दयशोदयोः - त्या नंद व यशोदा ह्या दोघांचे भगवति कृष्णे - भगवान श्रीकृष्णाच्या ठिकाणी इत्थं परमं अनुरागं वीक्ष्य - ह्याप्रमाणे असलेले श्रेष्ठ प्रेम अवलोकन करून मुदा नन्दं आह - आनंदाने नंदाला म्हणाला. ॥२९॥
नंद आणि यशोदा यांचे श्रीकृष्णाबद्‍दलचे प्रगाढ प्रेम पाहून उद्धव आनंदमग्न होऊन त्यांना म्हणाला. (२९)


श्रीउद्धव उवाच -
युवां श्लाघ्यतमौ नूनं देहिनामिह मानद ।
नारायणेऽखिलगुरौ यत्कृता मतिरीदृशी ॥ ३० ॥
उद्धव म्हणाला -
मानदा ! तुम्हि तो दोघे पृथिवीवरि भाग्यवान् ।
तुमच्या पुत्र मी मानी नारायण जगद्‌गुरु ॥ ३० ॥

मानद - हे मान देणार्‍या नंदा युवां इह - तुम्ही उभयता ह्या लोकी देहिनां नूनं श्लाघ्यतमौ - खरोखर देहधारी लोकांमध्ये अत्यंत स्तुत्य आहा यत् - कारण अखिलगुरौ नारायणे - सर्वांचा गुरु अशा भगवंताच्या ठिकाणी ईदृशी मतिः कृता - अशाप्रकारची सद्‌बुद्धी ठेविली आहे. ॥३०॥
उद्धव म्हणाला- हे मान्यवर ! चराचराचे गुरु असणार्‍या नारायणांबद्दल आपल्या मनात इतका प्रेमभाव आहे, म्हणून आपण दोघे सर्वांमध्ये अत्यंत भाग्यवान आहात, यात संशय नाही. (३०)


( इंद्रवज्रा )
एतौ हि विश्वस्य च बीजयोनी
     रामो मुकुन्दः पुरुषः प्रधानम् ।
अन्वीय भूतेषु विलक्षणस्य
     ज्ञानस्य चेशात इमौ पुराणौ ॥ ३१ ॥
( इंद्रवज्रा )
दोघेचि विश्वासहि बीज योनी
     रामो मुकुंदो पुरुषो प्रधान ।
दोघे जिवांना जिवदान देती
     ज्ञानस्वरूप्या नियते द्वयोही ॥ ३१ ॥

हि रामः मुकुन्दः च एतौ - खरोखर बलराम व श्रीकृष्ण हे दोघे विश्वस्य बीजयोनी - जगाच्या उत्पत्तीला कारणीभूत होत पुरुषः प्रधानं च - हेच पुरुष व प्रकृति होत इमौ पुराणौ - हे दोघे पुराणपुरुष होत भूतेषु अन्वीय - प्राण्यांमध्ये प्रवेश करून विलक्षणस्य ज्ञानस्य = विशिष्ट ज्ञानाच्या योगाने ईशाते - अधिपति झाले आहेत. ॥३१॥
बलराम आणि श्रीकृष्ण पुराणपुरुष आहेत, ते सार्‍या विश्वाचे उपादानकारण आणि निमित्तकारणही आहेत. पुरुष आणि प्रकृति तेच आहेत. हेच दोघेजण सगळ्यांच्या शरीरांत प्रवेश करुन त्या शरीरांमध्ये राहणार्‍या प्रकृतिहून निराळ्या ज्ञानस्वरुप जीवाचे नियमन करतात. (३१)


यस्मिन्जनः प्राणवियोगकाले
     क्षणं समावेश्य मनोऽविशुद्धम् ।
निर्हृत्य कर्माशयमाशु याति
     परां गतिं ब्रह्ममयोऽर्कवर्णः ॥ ३२ ॥
जो मृत्युकाळी मन शुद्ध ठेवी
     नी एक लावी क्षण त्या पदासी ।
तैं वासना सर्व जळोनि जाती
     दैदीप्य तो हो मग ब्रह्मरुप ॥ ३२ ॥

जनः - लोक प्राणवियोगकाले - मृत्यूकाळी यस्मिन् शुद्धं मनः क्षणं समावेश्य - जेथे शुद्ध मन क्षणभर ठेवून आशु कर्माशयं निर्हृत्य - लवकरच कामवासनांचा त्याग करून ब्रह्ममयः अर्कवर्णः - ब्रह्मरूप व सूर्यकांतीचा होऊन परां गतिं याति - श्रेष्ठ गतीला प्राप्त होतो. ॥३२॥
जो जीव मृत्युच्यावेळी आपले शुद्ध मन क्षणभर का होईना, त्यांचे ठिकाणी एकाग्र करतो, तो सर्व कर्मवासनांना धुऊन टाकतो आणि लगेच सूर्याप्रमाणे तेजस्वी असा ब्रह्ममय होऊन मोक्ष प्राप्त करुन घेतो. (३२)

विवरण :- कृष्णाबद्दलचा नंद-यशोदेच्या मनातील उत्कट वात्सल्यभाव पाहून उद्धव संतुष्ट झाला. नंतर राम-कृष्णांची स्तुती करताना तो म्हणाला, हे दोघे (रामकृष्ण) प्रकृति-पुरुष आहेत. विश्वनिर्मितीचे आद्य कारण आहेत; निर्मितीमध्ये प्रधान-पुरुष आहेत. कंसादि दुष्टांना ठार मारणे हे त्यांच्या अवतारकार्याचे एकच उद्दिष्ट नसून ज्ञानोपदेश हे ही आहे. व्यासादि ज्ञानीजनांच्या रूपाने ते जगात अवतार धारण करतात, त्यांच्याकडून विशिष्ट ज्ञानाची उत्पत्ती करवून ज्ञान रक्षणाचे कार्य करतात. अशा या दोघांबद्दल तुमच्या मनात किती प्रेमभावना आहे ! धन्य तुमचे जीवन ! मनुष्यास सद्‌गती मिळण्यास शुद्ध मनाने केलेली भक्ती हीच पुरेशी आहे; अंतिम घडीला अशा शुद्ध मनाने केलेले नामस्मरण, तेही फार काळ नाही, कसे लाभदायक, मोक्षदायक ठरू शकते याचे उद्धवाने विवेचन केले आहे. त्याचवेळी कर्मवासनांचा त्याग आणि नामस्मरणामध्ये एकचित्तताही महत्त्वाची आहे. (यायोगे मनुष्य सद्‌गती प्राप्त करू शकतो.) (३१-३२)



तस्मिन् भवन्तावखिलात्महेतौ
     नारायणे कारणमर्त्यमूर्तौ ।
भावं विधत्तां नितरां महात्मन्
     किं वावशिष्टं युवयोः सुकृत्यम् ॥ ३३ ॥
तो विश्व‍आत्मा निजभक्त‍इच्छा
     पुर्‍या कराया मग देह धारी ।
त्यांच्यावरी आपुला वत्सभाव
     सत्कार्य सांगा मग काय शेष ॥ ३३ ॥

महात्मन् - हे महात्म्या नंदा भवंतौ - तुम्ही उभयतांनी तस्मिन् अखिलात्महेतौ - त्या सर्वात्मरूपी व कारणमर्त्यमूर्तौ नारायणे - मनुष्यमूर्ति धारण करणार्‍या नारायणाच्या ठिकाणी नितरां भावं विधत्तां - अत्यंत भक्ति करीत आहा युवयोः सुकृत्यं किं वा - तुमच्या हातून कोणते पुण्यकर्म अवशिष्टं - करावयाचे राहिले आहे. ॥३३॥
जे सर्वांचे आत्मा आणि परम कारण आहेत, ते नारायणच दुष्टनिर्दालन व साधुरक्षण करण्यासाठी मनुष्यासारखे शरीर धारण करुन येथे प्रगट झाले आहेत. हे महात्म्यांनो ! त्यांच्या ठिकाणीच असा सुदृढ प्रेमभाव धारण करा. मग आपल्या दोघांना कोणते शुभ कर्म करावयाचे शिल्लक राहणार आहे ? (३३)


( अनुष्टुप् )
आगमिष्यत्यदीर्घेण कालेन व्रजमच्युतः ।
प्रियं विधास्यते पित्रोः भगवान् सात्वतां पतिः ॥ ३४ ॥
( अनुष्टुप् )
भक्तवत्सल तो कृष्ण येईल वाट ती पहा ।
माय-बाप तुम्ही त्याचे तुम्हास सुखवील तो ॥ ३४ ॥

भगवान् सात्वतां पतिः अच्युतः - यादवांचा अधिपति भगवान श्रीकृष्ण अदीर्घेण कालेन - थोडक्या कालावधीतच व्रजं आगमिष्यति - गोकुळात येईल पित्रोः प्रियं विधास्यते - मातापित्यांचे प्रिय करील. ॥३४॥
भक्तवत्सल यदुकुलश्रेष्ठ भगवान श्रीकृष्ण थोड्याच दिवसात व्रजामध्ये येतील आणि आपणा दोघा आई-वडिलांना आनंदित करतील. (३४)


हत्वा कंसं रङ्‌गमध्ये प्रतीपं सर्वसात्वताम् ।
यदाह वः समागत्य कृष्णः सत्यं करोति तत् ॥ ३५ ॥
मारुनी कंस मंची तो तुमच्या पाशि एउनी ।
येईन व्रजि मी बोले बोलास सत्य तो करी ॥ ३५ ॥

कृष्णः - श्रीकृष्ण रंगमध्ये - रंगभूमीवर सर्वसात्वतां प्रतीपं कंसं हत्वा - सर्व यादवांचा शत्रु जो कंस त्याला मारून वः समागत्य - तुम्हाजवळ येऊन यत् आह - जे म्हणाला तत् सत्यं करोति - ते खरे करील. ॥३५॥
सर्व यादवांचा शत्रु असणार्‍या कंसाला आखाड्यात मारुन, आपल्याजवळ येऊन कृष्णांनी जे म्हटले, ते म्हणणे ते खरे करतील. (३५)

विवरण :- कृष्णाला भेटण्यास अत्यंत उत्सुक असणारे नंद-यशोदा तो गोकुळास येणार नाही, हे वास्तव पचवू शकतील की नाही, याबद्दल उद्धव साशंक होता. पण तो चलाख होता. त्याने युक्तीचा आश्रय घेतला, येण्याचा काळ-वेळ नक्की न सांगता 'येईल लवकरच' असे मोघम बोलून त्याने वेळ भागवली. परत येण्याचे वचन कृष्ण निश्चितच पूर्ण करेल, अशीही साखरपेरणी केली. (अनुभवी नंदाला हे उमजले नसेल का ? हाही प्रश्न येतो) कदाचित त्याला असेही सुचवायचे असावे की, 'मी, त्याचा परमसखा आलो ना ? त्याला माझ्यातच बघा की. माझ्यात तोच तुम्हाला दिसेल. कदाचित येथे असेही सुचवायचे असावे की श्रीकृष्ण हा स्वतः देव असल्याने तो अचलमूर्ती आणि उद्धव हा उत्सवमूर्तीप्रमाणे. उत्सवाचे प्रसंगी देवाची मूर्ती आपल्याच जागी असून उत्सवमूर्ती दर्शनासाठी बाहेर पालखीत असते. प्रदक्षिणा करून येते. त्याप्रमाणे माझे रूप घेऊन कृष्णच आला आहे असे समजा असाही भाव असावा. (३४-३५)



मा खिद्यतं महाभागौ द्रक्ष्यथः कृष्णमन्तिके ।
अन्तर्हृदि स भूतानाण् आस्ते ज्योतिरिवैधसि ॥ ३६ ॥
भाग्यवंत तुम्ही दोघे खेद ना करणें मनीं ।
कृष्ण तो हृदयी सार्‍या अग्नि काष्ठात जै वसे ॥ ३६ ॥

महाभागौ - हे महाभाग्यवंता नंदा, हे यशोदे मा खिद्यतम् - खेद करू नका अन्तिके कृष्णं द्रक्ष्‌यथ - लवकरच कृष्णाला पाहाल सः भूतानां अन्तर्ह्लदि - तो प्राण्यांच्या हृदयात एधसि ज्योतिः इव - काष्ठातील अग्नीप्रमाणे आस्ते - रहातो. ॥३६॥
हे भाग्यशाली मातपित्यांनो ! खेद करु नका. तुम्ही श्रीकृष्णांना आपल्याजवळच पाहाल. कारण, जसा लाकडामध्ये अग्नी नेहमी व्यापून असतो, त्याचप्रमाणे ते सर्व प्राण्यांच्या हृदयांमध्ये नेहमी विराजमान असतात. (३६)


न ह्यस्यास्ति प्रियः कश्चित् नाप्रियो वास्त्यमानिनः ।
नोत्तमो नाधमो वापि समानस्यासमोऽपि वा ॥ ३७ ॥
अभिमान नसे त्याला प्रीयाप्रीय असेहि ना ।
समभाव असा ठेवी सारखे जीव त्यास की ॥ ३७ ॥

अमानिनः समानस्य अस्य - निरभिमानी व समबुद्धी अशा ह्याला प्रियः वा अप्रियः न अस्ति - प्रिय किंवा अप्रिय नाही उत्तमः अधमः अपि नास्ति - उच्च व नीचहि नाही असमः अपि वा न - विषमहि कोणी नाही. ॥३७॥
त्यांना अभिमान नसल्याकारणाने त्यांना कोणी प्रिय नाही की कोणी अप्रिय नाही. त्यांचा सर्वांमध्ये समभाव असल्यामुळे त्यांच्या दृष्टीने कोणी उत्तम नाही की कोणी अधम नाही. एवढेच काय, त्यांच्याशी शत्रुत्व करणाराही त्यांचा शत्रु नाही. (३७)


न माता न पिता तस्य न भार्या न सुतादयः ।
नात्मीयो न परश्चापि न देहो जन्म एव च ॥ ३८ ॥
न माय बापही त्याला पत्‍नि पुत्र न त्याजला ।
आपुला परका तो ना देह ना जन्म ना तया ॥ ३८ ॥

तस्य माता न पिता न - त्याला आई नाही बाप नाही भार्या न सुतादयः न - स्त्री नाही व पुत्रादिकही नाहीत आत्मीयः न च परः अपि न - आपलाहि नाही आणि परकाहि नाही देहः च जन्म एव न - देह व जन्मसुद्धा नाही. ॥३८॥
त्यांचे कोणी माता-पिता नाहीत किंवा पत्‍नी-पुत्र नाहीत. त्यांना कोणी आपला नाही कि परका नाही. तसाच देह नाही कि जन्मही नाही. (३८)

विवरण :- पुन्हा पुन्हा नंद-यशोदेचे सांत्वन करताना उद्धव पुढे म्हणतो, कृष्ण कुठे गेलाच नाही. तो तुमच्या जवळ, तुमच्याच हृदयात आहे. ज्याप्रमाणे लाकडामध्ये अग्नी अदृश्यरूपात असतो, घर्षणाने दृष्टीस पडतो, त्याप्रमाणे भक्तीने आपल्या अंतःकरणाचे मंथन केल्यावर तो कृष्णरूपी अग्नी तुम्हास दिसेल. वास्तविक तो निर्गुण-निराकार आहे. त्याचे माता-पिता असे कोणीच नाहीत. (तुमचे भाग्य थोर म्हणून सगुण रूपात मुलगा म्हणून तो तुम्हाला लाभला.) तो विश्व व्यापून राहिला आहे. तेव्हा त्याला सर्व चराचरात पहा. 'मी' 'माझे' ही संकुचित दृष्टी सोडून दृष्टी व्यापक करा. विशाल करा. कारण ममत्वाने येणारी संकुचित दृष्टी दुःखास कारणीभूत होते. (३६-३८)



न चास्य कर्म वा लोके सदसन्मिश्रयोनिषु ।
क्रीडार्थं सोऽपि साधूनां परित्राणाय कल्पते ॥ ३९ ॥
परित्राणार्थ साधुंच्या लीला दावि अशा जगा ।
मत्स्यादि रूप तो घेतो त्याचा ना हेतु या जगी ॥ ३९ ॥

अस्य कर्म अपि न - ह्याला कर्महि नाही सः क्रीडार्थं - तो क्रीडेसाठी साधूनां परित्राणाय च - आणि साधूंच्या रक्षणासाठी सदसन्मिश्रयोनिषु - रामादि सद्योनि, मत्स्यादि असद्योनि व नरसिंहादि मिश्र योनी कल्पते - ह्यांमध्ये अवतार धारण करितो. ॥३९॥
या लोकी त्यांना कोणतेही कर्तव्य नाही. तरीसुद्धा ते सज्जनांच्या संरक्षणासाठी, लीला म्हणून देव इत्यादी सात्विक, मत्स्य इत्यादी तामस, तसेच मनुष्य इत्यादी मिश्र योनींत शरीर धारण करतात. (३९)


सत्त्वं रजस्तम इति भजते निर्गुणो गुणान् ।
क्रीडन्नतीतोऽपि गुणैः सृजत्यवति हन्त्यजः ॥ ४० ॥
अजन्मा, गुण ना त्याला सहजी गुण धारितो ।
जन्मितो पोषितो मारी त्रैगुणे खेळ हा करी ॥ ४० ॥

निर्गुणः अपि - निर्गुण असूनहि सत्त्वं रजः तमः इति गुणान् भजते - सत्त्व, रज, व तम अशा गुणांचे सेवन करितो अतीतः - गुणांच्या पलीकडे असलेला तो अजः क्रीडन् - जन्मरहित असूनहि क्रीडा करीत गुणैः सृजति - गुणांच्या योगे उत्पत्ति करितो अवति च हन्ति - रक्षितो व संहार करितो. ॥४०॥
भगवान अजन्मा व गुणांपासून अलिप्त असूनही लीला करण्यासाठी सत्व, रज आणि तम या तीन गुणांचा स्वीकार करुन त्यांच्याद्वारा जगाची उत्पत्ती, पालन आणि संहार करतात. (४०)

विवरण :- तो परमात्मा जन्म-कर्मांनी रहित असूनहि केवळ साधूंच्या रक्षणासाठी क्रीडा म्हणून जन्म घेतो. सत्त्व, रजादि गुणांनी युक्त होतो. मत्स्य, कूर्मादि अवतार धारण करून प्राणिमात्राची उत्पत्ती, पोषण आणि नाश करतो. (३९-४०)



यथा भ्रमरिकादृष्ट्या भ्राम्यतीव महीयते ।
चित्ते कर्तरि तत्रात्मा कर्तेवाहंधिया स्मृतः ॥ ४१ ॥
फुगडी खेळता वाटे फिरते पृथिवी जशी ।
मी कर्ता मानितो जीव अहंता असता तशी ॥ ४१ ॥

यथा मही - जशी पृथ्वी भ्रमरिकादृष्टया - दृष्टि फिरू लागली असता भ्राम्यती इव ईयते - फिरल्यासारखी दिसते (तथा) चित्ते कर्तरि - त्याचप्रमाणे चित्त कर्म करीत असता तत्र अहंधिया आत्मा - तेथे मीपणाने आत्मा कर्ता इव स्मृतः - कर्ता म्हणून समजला जातो. ॥४१॥
ज्याप्रमाणे मनुष्य वेगाने गोल फिरतो, तेव्हा सगळी पृथ्वी फिरते असे त्याला वाटते, त्याप्रमाणे सर्व काही करणारे चित्तच असूनही, त्या चित्तामध्ये अहंबुद्धी असल्याकारणाने, भ्रमाने आत्मा स्वतःलाच कर्ता समजू लागतो. (४१)

विवरण :- ज्याप्रमाणे भ्रमरिकेमुळे (गोल-गोल फिरण्याने) जमीनच फिरते असे वाटते, (हल्लीचे उदाहरण पाहिले तर रेल्वेत बसले की आजूबाजूच्या वस्तू फिरतात, पळतात, असे वाटते.) त्याचप्रमाणे परमात्म्याबद्दलचीही भावना. ती अज्ञानाने, अहंभावाने निर्माण होते. फक्त तोच कर्ता एवढीच भावना म्हणजे अज्ञान, तो निर्लेप आहे. कृष्णाला केवळ आपलाच मुलगा मानणे हे अज्ञानाचे, संकुचितपणाचे लक्षण आहे. तर तो सर्वांचाच आहे. असे नंद-यशोदेला सांगण्यात त्यांच्या मनाची तयारी करण्याचाहि उद्धवाचा हेतू असावा. आजपर्यंत त्याने आपल्या सहवासाचे स्वर्गसुख तुम्हाला दिले. आता 'परित्राणाय साधूनाम्' हे आपले ब्रीद पाळण्यास त्याला इतरांकडे जाणेही आवश्यक आहे, असेही उद्धवास सुचवायचे आहे. (४१)



युवयोरेव नैवायं आत्मजो भगवान् हरिः ।
सर्वेषां आत्मजो ह्यात्मा पिता माता स ईश्वरः ॥ ४२ ॥
न पुत्र तुमचा फक्त जीवांचा जीव तो तसा ।
पिता माता तसा पुत्र स्वामी सर्वांस तो असे ॥ ४२ ॥

अयं भगवान् हरिः - हा सर्वगुणसंपन्न श्रीकृष्ण युवयोः एव आत्मजः न एव - तुमचा पुत्र नव्हेच हि सः सर्वेषां आत्मजः - तो तर सर्वांचा पुत्र होय आत्मा पिता माता ईश्वरः - आत्मा, पिता, माता व ईश्वर होय. ॥४२॥
भगवान श्रीकृष्ण हे फक्त आपल्या दोघांचेच पुत्र नाहीत, तर ते सर्व प्राण्यांचे आत्मा, पुत्र, पिता, माता आणि स्वामीसुद्धा आहेत. (४२)


( इंद्रवज्रा )
दृष्टं श्रुतं भूतभवद् भविष्यत्
     स्थास्नुश्चरिष्णुर्महदल्पकं च ।
विनाच्युताद् वस्तु तरां न वाच्यं
     स एव सर्वं परमात्मभूतः ॥ ४३ ॥
( इंद्रवज्रा )
जे ऐकिले पाहियले स्व नेत्रे
     ते हे असे की अणु पर्वतेही ।
आहेत होते अन जेपुढे हो
     कृष्णा विना त्या नच कांहि वस्तू ।
जे जे दिसे ते परमात्म रूप
     तोचि खरा हो परमार्थ सत्य ॥ ४३ ॥

दृष्टं श्रुतं भूतभवद्भविष्यत् - पाहिलेले, ऐकिलेले भूत, वर्तमान व भविष्य स्थास्नुः चरिष्णुः महत् अल्पकं च - स्थावर, जंगम, मोठे व लहान वस्तु - पदार्थ अच्युतात् विना - श्रीकृष्णाहून वेगळे आहेत तरां न वाच्यं - असे कधीही सांगता येत नाहीत परमार्थभूतः सः एव सर्वं - सत्यस्वरूपी तो सर्वत्र भरला आहे. ॥४३॥
जे काही पाहिले किंवा ऐकले जाते, मग ते भूतकाळ, वर्तमानकाळ किंवा भविष्यकाळाशी संबंधित असो, स्थावर असो की जंगम, महान असो की लहान, अशी कोणतीच वस्तू नाही की, जी श्रीकृष्णांपासून वेगळी आहे. त्यांच्याव्यतिरिक्त खरे पाहता, कोणतीच वस्तू नाही. वास्तविक सत्य फक्त तेच आहेत. (४३)


एवं निशा सा ब्रुवतोर्व्यतीता
     नन्दस्य कृष्णानुचरस्य राजन् ।
गोप्यः समुत्थाय निरूप्य दीपान्
     वास्तून् समभ्यर्च्य दधीन्यमंथन् ॥ ४४ ॥
गोष्टीत ऐशा सरली निशा ती
     त्या नंद नी उद्धव या द्वयाची ।
पहाट होता उठल्याहि गोपी
     सडा करोनी मंथु लागल्या त्या ॥ ४४ ॥

राजन् - हे परीक्षित राजा नंदस्य कृष्णानुचरस्य च - नंद व कृष्णसेवक उद्धव ह्यांचा एवं ब्रुवतोः - अशा रीतीने संवाद चालला असताना सा निशा व्यतीता - ती रात्र निघून गेली गोप्यः समुत्थाय - गोपी उठून दीपान् निरूप्य - दिवे लावून वास्तून् समभ्यर्च्य - वास्तुदेवतांना पुजून दधीनि अमन्थन् - दही घुसळू लागल्या. ॥४४॥
परीक्षिता ! उद्धव आणि नंद अशाप्रकारे आपापसात गोष्टी करीत असता रात्र संपून गेली. पहाटे गोपी उठल्या. दिवे लावून त्यांनी वास्तुदेवतेचे पूजन केले आणि नंतर त्या दही घुसळु लागल्या. (४४)


( मिश्र )
ता दीपदीप्तैर्मणिभिर्विरेजू
     रज्जूर्विकर्षद् भुजकङ्‌कणस्रजः ।
चलन्नितम्बस्तनहारकुण्डल
     त्विषत् कपोलारुणकुङ्‌कुमाननाः ॥ ४५ ॥
हातातले कंकण शोभती नी
     नितंब हारो स्तन हालती ते ।
कुंकू सुशोभे अन कुंडले ती
     ज्योतीत रत्‍ने बहु शोभती की ॥ ४५ ॥

रज्जूः विकर्षद् - मंथनरज्जू ओढीत असल्यामुळे भुजकंकणस्रजः - हातांतील कांकणे शब्द करीत होती व माळा हालत होत्या अशा चलन्नितम्बस्तनहारकुण्डल - ज्यांचे नितंब, स्तन, हार, कुंडले हालत असून त्विषत्कपोलारुण - कुंडलांच्या कांतींनी आरक्त झालेले गाल कुङ्‌कुमाननाः - व आपल्या मुखावर केशर लाविले आहे अशा ताः दीपदीप्तैः - त्या गोपी दिव्यांनी प्रकाशणार्‍या मणिभिः विरेजुः - मण्यांनी अधिक शोभल्या. ॥४५॥
गोपींच्या हातांतील बांगड्या दोरी ओढताना चमकत होत्या. त्यांचे नितंब, स्तन आणि गळ्यातील हार हालत होते. हालणारी कुंडले, त्यांच्या कुंकुममंडित गालांची लाली वाढवीत होती. त्यांच्या अलंकारांतील रत्‍ने दिव्यांच्या प्रकाशाने अधिकच झगमगत होती. (४५)


उद्‍गायतीनामरविन्दलोचनं
     व्रजाङ्‌गनानां दिवमस्पृशद् ध्वनिः ।
दध्नश्च निर्मन्थनशब्दमिश्रितो
     निरस्यते येन दिशाममङ्‌गलम् ॥ ॥
गाती तदा गोपिका कृष्णगाणी
     गानध्वनी नी मथनध्वनी तो ।
स्वर्गामधे त्या मिसळोनि गेला
     अमंगलो ते दिशि नष्ट झाले ॥ ४६ ॥

दध्नः निर्मन्थनशब्दमिश्रितः - दह्याच्या मंथनापासून निघणार्‍या शब्दाने युक्त अरविन्दलोचनं उदायतीनां - श्रीकृष्णलीलांचे गायन करणार्‍या व्रजाङगनानां ध्वनिः - गोपींचा शब्द दिवं अस्पृशत् - स्वर्गापर्यंत जाऊन पोचला येन दिशां अमङ्गलं निरस्यते - ज्या शब्दाने दिशांमधील पापांचा नाश होतो. ॥४६॥
त्यावेळी गोपी, कमलनयन श्रीकृष्णांच्या चरित्रांचे मोठ्याने गायन करीत होत्या. त्यांचे ते गाणे दही घुसळण्याच्या आवाजात मिसळून स्वर्गापर्यंत जाऊन पोहोचले. त्या स्वरलहरी सगळीकडे पसरुन सर्व दिशांचे अमंगल नाहीसे करीत. (४६)


( अनुष्टुप् )
भगवत्युदिते सूर्ये नन्दद्वारि व्रजौकसः ।
दृष्ट्वा रथं शातकौम्भं कस्यायमिति चाब्रुवन् ॥ ४७ ॥
( अनुष्टुप् )
सकाळी पाहता सर्व आपसी त्या व्रजांगना ।
सुवर्ण रथ कोणाचा वदती नंदद्वारि हा ॥ ४७ ॥

व्रजौकसः - गोकुळातील लोक भगवति सूर्ये उदिते - भगवान सूर्य उगवला असता नंदद्वारि शातकौ‌म्भं रथं दृष्टवा - नंदाच्या दरवाज्याशी सुवर्णाचा रथ पाहून कस्य अयम् इति अब्रुवन् - कोणाचा हा रथ असे म्हणाले. ॥४७॥
जेव्हा भगवान सूर्यनारायणांचा उदय झाला, तेव्हा नंदांच्या दरवाजासमोर एक सोन्याचा रथ उभा असल्याचे व्रजांगनांनी पाहिले. "हा कोणाचा रथ आहे ?" असे त्या एकमेकींना विचारु लागल्या. (४७)


अक्रूर आगतः किं वा यः कंसस्यार्थसाधकः ।
येन नीतो मधुपुरीं कृष्णः कमललोचनः ॥ ४८ ॥
अक्रूर बातमीदार कंसाचा पातला असे ।
जेणे श्री प्रीय कृष्णाला नेलेसे मथुरापुरीं ॥ ४८ ॥

यः कंसस्य अर्थसाधकः - जो कंसाचा कार्यभाग साधणारा येन च - आणि ज्याने कमललोचनः कृष्णः - कमळाप्रमाणे नेत्र असणारा श्रीकृष्ण मधुपुरीं नीतः - मथुरेला नेला (सः) अक्रूरः आगतः किं वा - तो अक्रूर आला की काय. ॥४८॥
एक गोपी म्हणाली, "कंसाचा हेतू साध्य करण्यासाठी कमलनयन श्यामसुंदरांना येथून मथुरेला घेऊन जाणारा अक्रूर तर पुन्हा आला नाही ना ?" (४८)


किं साधयिष्यति अस्माभिः भर्तुः प्रीतस्य निष्कृतिम् ।
इति स्त्रीणां वदन्तीनां उद्धवोऽगात् कृताह्निकः ॥ ४९ ॥
इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
संहितायां दशमस्कन्धे पूर्वार्धे नंदशोकापनयनं षट्‌चत्वारिंशोऽध्यायः ॥ ४६ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
आम्हास नेउनी हा का कंसाचे पिंडदान ते ।
करितो, वदती ऐशा तेंव्हा उद्धव पातले ॥ ४९ ॥
॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सेहेचाळिसावा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

प्रीतस्य भर्तुः निष्कृतिं - संतुष्ट झालेल्या स्वामींचे उत्तर कार्य अस्माभिः साधयिष्यति किं - आमच्या योगे संपादन करणार की काय इति वदन्तीनां स्त्रीणाम् - असे स्त्रिया बोलत असता कृताह्निकः उद्धवः अगात् - नित्यकृत्य समाप्त केलेला उद्धव तेथे प्राप्त झाला. ॥४९॥
दुसरी एक गोपी म्हणाली, "आता तो आम्हाला घेऊन जाऊन काय करणार ? आपल्या मरण पावलेल्या राजा कंसाचे पिंडदान तर करणार नाही ना ?" व्रजवासिनी स्त्रिया अशाप्रकारे आपापसात बोलत होत्या. तेवढ्यात नित्यकर्मे आटोपून उद्धव येऊन पोहोचला." (४९)


अध्याय सेहेचाळिसावा समाप्त

GO TOP