|
श्रीमद् भागवत पुराण कुब्जायामनुग्रहः; धनुषो भङ्गः; मल्लशालासज्जीकरणं च - कुब्जेवर कृपा, धनुष्यभंग आणि कंसाची भीती - संहिता - अन्वय - अर्थ समश्लोकी - मराठी
श्रीशुक उवाच -
( मिश्र ) अथ व्रजन्राजपथेन माधवः स्त्रियं गृहीताङ्गविलेपभाजनाम् । विलोक्य कुब्जां युवतीं वराननां पप्रच्छ यान्तीं प्रहसन् रसप्रदः ॥ १ ॥
( इंद्रवज्रा ) श्रीशुकदेव सांगतात - मार्गात जाता युवती कुणी ती रूपी नि कुब्जा अशि ती तनूने । हातात होती उटि चंदनाची पाहोनी कृष्णे पुसिले हसोनी ॥ १ ॥
अथ - नंतर - रसप्रदः माधवः - शृंगारादि रस देणारा श्रीकृष्ण - राजपथेन व्रजन् - राजमार्गाने जात असता - गृहीताङगविलेपभाजनां - घेतले आहे अंगाला लावण्याच्या उटयांचे पात्र जिने अशा - युवतीं वराननां - तरुण व सुंदर मुखाच्या - कुब्जां स्त्रियं - कुबड असलेल्या स्त्रीला - यान्तीं विलोक्य प्रहसन् पप्रच्छ - जाताना पाहून हसत हसत विचारिता झाला.॥१॥
श्रीशुकदेव म्हणतात- यानंतर श्रीकृष्ण जेव्हा राजमार्गावरून पुढे चालले होते, तेव्हा त्यांनी एका युवतीला पाहिले. ती दिसायला सुंदर होती, परंतु शरीराने कुबडी होती. ती हातामध्ये उटण्यांचा डबा घेऊन चालली होती. भक्तांना आनंद देणारे श्रीकृष्ण हसत हसत तिला म्हणाले- (१)
का त्वं वरोर्वेतदु हानुलेपनं
कस्याङ्गने वा कथयस्व साधु नः । देह्यावयोरङ्गविलेपमुत्तमं श्रेयः ततस्ते न चिराद् भविष्यति ॥ २ ॥
हे सुंदरी चंदन नेशि कोठे सांगी तुझे नाम असेल सत्य । देगे अम्हाला उटि अंगराग शीघ्रेचि होई तव ते भले की ॥ २ ॥
वरोरु अङगने - हे सुंदर स्त्रिये - त्वं का - तू कोण आहेस - उह वा - आणि - एतत् कस्य अनुलेपनं - ही उटी कोणाची आहे - साधु नः कथयस्व - आम्हाला खरे सांग - उत्तमं अङगविलेपं आवयोः देहि - अंगाला लावण्याची उत्तम उटी आम्हा दोघांना दे - ततः नचिरात् ते श्रेयः भविष्यति - त्यायोगे तुझे लवकर कल्याण होईल. ॥२॥
हे सुंदरी ! तू कोण आहेस ? हे उटणे कोणासाठी घेऊन चालली आहेस ? हे आम्हांला नीट सांग. बाई ग ! ही सुगंधी उटी तू आम्हांला दे. त्यामुळे लवकरच तुझे कल्याण होईल. (२)
सैरन्ध्रि उवाच -
दास्यस्म्यहं सुन्दर कंससम्मता त्रिवक्रनामा ह्यनुलेपकर्मणि । मद्भावितं भोजपतेरतिप्रियं विना युवां कोऽन्यतमस्तदर्हति ॥ ३ ॥
सैरंध्री (कुब्जा) म्हणाली - मी कंसदासी नृपप्रीय ऐसी नामे त्रिवक्रा उटि लाविते की । या अंगरागे नृप होय तृप्त तुम्हाहुनी पात्र न कोणि याते ॥ ३ ॥
सुंदर - हे सुंदर - अनुलेपकर्मणि कंससंमता - उटी तयार करण्याच्या कामी कंसाला मान्य झालेली - अहं - मी - त्रिवक्रनामा दासी अस्मि - त्रिवक्रा नावाची दासी आहे - हि - कारण - मद्भावितं (अनुलेपनम्) - मी तयार करून दिलेली उटी - भोजपतेः अतिप्रियं (भवति) - भोजराज कंसाला फारच आवडते - तत् - ती उटी - युवां विना - तुम्हा दोघांशिवाय - अन्यतमः कः अर्हति - दुसरा कोण बरे धारण करण्यास योग्य आहे. ॥३॥
सैरंध्री म्हणाली- "हे परम सुंदरा ! मी कंसाची त्रिविका नावाची उटणे लावणारी आवडती दासी आहे. माझे उटणे भोजराज कंसाला अतिशय आवडते; परंतु आपणा दोघांखेरीज याला पात्र असा दुसरा कोण आहे बरे !" (३)
( अनुष्टुप् )
रूपपेशलमाधुर्य हसितालापवीक्षितैः । धर्षितात्मा ददौ सान्द्रं उभयोरनुलेपनम् ॥ ४ ॥
( अनुष्टुप् ) कौमार्य रूप नी हास्य पाहता दासि हारपे । हरिला अर्पिले चित्त बंधुंना उटि लाविली ॥ ४ ॥
रूपपेशलमाधुर्यहसितालापवीक्षितैः - सौंदर्य, सुकुमारपणा, मधुरपणा, मंदहास्य, मधुर भाषण व कटाक्षपूर्वक सुंदर पाहणे यांनी - धर्षितात्मा - जिचे मन हरण केले गेले अशी ती कुब्जा - सान्द्रं अनुलेपनं - घट्ट अशी तयार केलेली उटी - उभयोः ददौ - त्या दोघा रामकृष्णांना देती झाली. ॥४॥
भगवंतांचे सौंदर्य, कोमलता, मधुरता, मंद हास्य, प्रेमालाप आणि पाहाणे यांमुळे प्रभावित होऊन तिने ते उटणे त्या दोन्ही भावांना भरपूर लावले. (४)
ततस्तावङ्गरागेण स्ववर्णेतरशोभिना ।
सम्प्राप्तपरभागेन शुशुभातेऽनुरञ्जितौ ॥ ५ ॥
पिवळी सावळ्या देहा गोर्या बळिस लाल ती । नाभीच्या वरि तो लेप पाहता कृष्ण हर्षले ॥ ५ ॥
ततः - नंतर - स्ववर्णेतरशोभिना - स्वतःच्या रंगाहून इतर रंगाच्या अशा - संप्राप्तपरभोगेन - शरीरावरील भागाला लाविलेल्या - अङगरागेण - उटीने - अनुरञ्जितौ तौ - रंगून गेलेले ते दोघे रामकृष्ण - शुशुभाते - शोभते झाले. ॥५॥
तेव्हा स्वतःच्या शरीराच्या रंगाखेरीज वेगळ्या रंगाचे उटणे अंगाला लावल्यामुळे ते फारच सुंदर दिसू लागले. (५)
विवरण :- मथुरेच्या राजमार्गावरून भ्रमण करीत असता राम-कृष्णांना विलेपनपात्रे हाती घेऊन चाललेली 'त्रिवक्रा' कुब्जा दिसली. त्यांच्या मागणीवरून कुब्जेने ते विलेपन मोठया आनंदाने रामकृष्णांना दिले. (अर्थात मागणी करणे इ. सर्व नियोजितच होते.) तिची आपल्यावरील भक्ती पाहून कृष्णाने तिचे कुबड दूर करून तिला पूर्वीपेक्षाही सुंदर केले. वास्तविक ती विलेपने कंसासाठी, मथुरेच्या राजासाठी होती, ती कृष्णाला दिली, हे कळल्यावर तो शिक्षा करेल, याची कल्पना कुब्जेला नसेल का ? पण अनन्यभक्ताला भीती कोठून ? ती ही आराध्य दैवत समोर असताना कधीच नाही. आपल्या देवाला समोर पाहून कुब्जा सर्व काही अगदी स्वतःलाहि विसरून गेली. याचे फळहि तिला ताबडतोब मिळाले. आपल्या भक्तांवर कृष्ण कसा अनुग्रह करतो, याचे आणखी एक हे उदाहरण ! (अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते----तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ।) श्रीकृष्णाची आधीपासूनच भक्ती करणार्या मथुरावासीयांच्या मनामधील भक्ती या प्रसंगाने आणखीनच दृढ झाली असणार. (१-५)
प्रसन्नो भगवान् कुब्जां त्रिवक्रां रुचिराननाम् ।
ऋज्वीं कर्तुं मनश्चक्रे दर्शयन् दर्शने फलम् ॥ ६ ॥
प्रसन्न जाहले कृष्ण तात्काल फल दाविण्या । त्रिवक्रा रूपवान् दासी निटास कृष्ण इच्छितो ॥ ६ ॥
प्रसन्नः भगवान् - प्रसन्न झालेला श्रीकृष्ण - दर्शने फलं दर्शयन् - स्वतःच्या दर्शनाचे फळ दाखविणारा - त्रिवक्रां रुचिराननां कुब्जां - तीन ठिकाणी वक्र, पण सुंदर मुखाच्या कुब्जेला - ऋज्वीं कर्तुं मनः चक्रे - सरळ करण्याचे मनात आणिता झाला. ॥६॥
भगवान त्या कुब्जेवर प्रसन्न झाले. आपल्या दर्शनाचे प्रत्यक्ष फळ दाखविण्यासाठी त्यांनी तीन ठिकाणी वाकड्या परंतु सुंदर चेहर्याच्या कुब्जेला सरळ करण्याचा विचार केला. (६)
पद्भ्यामाक्रम्य प्रपदे द्र्यङ्गुल्युत्तान पाणिना ।
प्रगृह्य चिबुकेऽध्यात्मं उदनीनमदच्युतः ॥ ७ ॥
तिच्या पंजावरी पंजे पायाचे दाबिले तशी । बोटांनी हनुवटी थोडी धरिता उंच केलि ती ॥ ७ ॥
अच्युतः - श्रीकृष्ण - पद्भयां प्रपदे आक्रम्य - आपल्या दोन्ही पायांनी तिचे दोन्ही पायाचे चवडे दाबून - द्व्युङ्गुल्युत्तानपाणिना - दोन बोटे उताणी केलेल्या हाताने - चुबुके प्रगृह्य - हनुवटी धरून - अध्यात्मम् उदनीनमत् - शरीराला उंच करिता झाला. ॥७॥
भगवंतांनी आपल्या पायांनी कुब्जेची पावले दाबून धरली आणि दोन बोटांनी हनुवटी धरून तिचे शरीर किंचितसे वर उचलले. (७)
सा तदर्जुसमानाङ्गी बृहच्छ्रोणिपयोधरा ।
मुकुन्दस्पर्शनात् सद्यो बभूव प्रमदोत्तमा ॥ ८ ॥
अशी उंचविता दासी सर्वांग सम जाहली । नितंब स्तन ते पुष्ट कृष्णस्पर्शेचि जाहले ॥ ८ ॥
तदा - त्यावेळी - ऋजुसमानाङ्गी - सरळ सारखे आहेत अवयव जिचे अशा - बृहच्छ्रोणि पयोधरा - मोठे आहे ढुंगण व स्तन जिचे अशा - सा - ती कुब्जा - मुकुन्दस्पर्शनात् सद्यः प्रमदोत्तमा बभूव - श्रीकृष्णाच्या स्पर्शाने तत्काळ सुंदर झाली. ॥८॥
तत्क्षणी तिचे सर्व अंग सरळ झाले. मुकुंदांच्या स्पर्शाने ती विशाल नितंब आणि स्तनांनी युक्त अशी एक उत्तम युवती झाली. (८)
ततो रूपगुणौदार्य संपन्ना प्राह केशवम् ।
उत्तरीयान् तमकृष्य स्मयन्ती जातहृच्छया ॥ ९ ॥
उदार गुणसंपन्न होता तात्काल रुपिणी । कामना जागता लाजे चाळवी पदरा वदे ॥ ९ ॥
ततः - नंतर - जातहृच्छया - उत्पन्न झाला आहे कामविकार जिला अशी - रूपगुणौदार्यसंपन्ना - सौंदर्य, गुण व औदार्य यांनी युक्त - सा - ती कुब्जा - स्मयन्ती - स्मित हास्य करीत - उत्तरीयान्तम् आकृष्य - कृष्णाच्या अंगवस्त्राचा पदर ओढून - केशवं प्राह - श्रीकृष्णाला म्हणाली. ॥९॥
रूप, गुण आणि औदार्याने संपन्न झालेल्या तिच्या मनात भगवंतांशी मिलन व्हावे, अशी इच्छा उत्पन्न झाली. त्यांच्या शेल्याचे टोक पकडून हसत हसत ती त्यांना म्हणाली. (९)
एहि वीर गृहं यामो न त्वां त्यक्तुमिहोत्सहे ।
त्वयोन्मथितचित्तायाः प्रसीद पुरुषर्षभ ॥ १० ॥
वीरा ! माझ्या घरी यावे येथे मी सोडिना असे । ढवळे चित्त हे माझे प्रसीद पुरुषोत्तमा ॥ १० ॥
वीरं पुरुषर्षभ - हे पराक्रमी पुरुषश्रेष्ठा - एहि - ये - गृहं यामः - आपण घरी जाऊ या - इह त्वां त्यक्तुं न उत्सहे - येथे तुला टाकून जाण्यास मी धजत नाही - त्वया उन्मथितचित्तायाः - तुझ्याकडून क्षुब्ध केले गेले आहे अन्तःकरण जिचे अशा माझ्यावर - प्रसीद - प्रसन्न हो ॥१०॥
हे वीरा ! या. आपण घरी जाऊ. मी आपणास येथे सोडू इच्छित नाही; कारण आपण माझे चित्त विचलित केले आहे. हे पुरुषोत्तमा ! या दासीवर प्रसन्न व्हा. (१०)
एवं स्त्रिया याच्यमानः कृष्णो रामस्य पश्यतः ।
मुखं वीक्ष्यानुगानां च प्रहसन् तामुवाच ह ॥ ११ ॥
बळी समक्ष हे ऐसे कृष्णाला दासि बोलली । गोपमुख बघे कृष्ण हासोनी वदला तिला ॥ ११ ॥
रामस्य पश्यतः - बलरामाच्या समक्ष - एवं - याप्रमाणे - स्त्रिया याच्यमानः कृष्णः - कुब्जेने याचना केलेला श्रीकृष्ण - अनु गोपानां मुखं वीक्ष्य - मागून गोपांच्या मुखाकडे पाहून - प्रहसन् - हसत - तां उवाच ह - तिला म्हणाला. ॥११॥
जेव्हा बलरामांच्या देखत कुब्जेने अशी विनवणी केली तेव्हा श्रीकृष्ण बरोबरीच्या गोपालांकडे पाहात, हसत हसत तिला म्हणाले (११)
एष्यामि ते गृहं सुभ्रु पुंसामाधिविकर्शनम् ।
साधितार्थोऽगृहाणां नः पान्थानां त्वं परायणम् ॥ १२ ॥
सुंदरी तव तो गेह मिटवी मनव्याधि त्या । कार्य आटोपुनी येतो भट्क्या मी मज ना घर ॥ १२ ॥
सुभ्रूः - हे सुंदरी - साधितार्थः (अहं) - कंसवधादि कार्य ज्याने पार पाडले आहे असा मी - पुंसां आधिविकर्शनं - पुरुषांची मानसिक पीडा नाहीशी करणार्या - ते गृहं एष्यामि - तुझ्या घरी येईन - त्वं - तू - अगृहाणां पान्थानां नः - अविवाहीत अशा आमच्यासारख्या वाटसरूंचा मोठा - परायणम् (असि) - आश्रय आहेस. ॥१२॥
हे सुंदरी ! तुझे घर हे माणसांची काळजी मिटवणारे आहे. मी माझे कार्य पूर्ण करून तुझ्या घरी येईन. आमच्यासारख्या बेघर वाटसरूंना तुमच्यासारख्यांचाच तर आधार आहे. (१२)
विसृज्य माध्व्या वाण्या तां व्रजन् मार्गे वणिक्पथैः ।
नानोपायनताम्बूल स्रग्गन्धैः साग्रजोऽर्चितः ॥ १३ ॥
गोड गोड अशा शब्दे कृष्णे दासी निरोपिली । पेठेत पातता बंधू सर्वांनी पूजिले द्वया ॥ १३ ॥
माध्व्या वाण्या तां विसृज्य - मधुर वाणीने तिला सोडून देऊन - मार्गे व्रजन् - राजमार्गामधून जात असता - साग्रजः - बलरामासह श्रीकृष्ण - नानोपायनताम्बूलस्रग्गन्धैः वणिक्पथैः - अनेक प्रकारच्या भेटी, विडे, फुलांच्या माळा व सुवासिक चंदन ज्यांच्या जवळ आहेत अशा वैश्यांनी - अर्चितः - पूजिला गेला. ॥१३॥
अशा प्रकारे गोड गोड बोलून त्यांनी तिला निरोप दिला. ते जेव्हा बाजारपेठेत पोहोचले, तेव्हा तेथील व्यापार्यांनी त्यांचे आणि बलरामांचे विडे, फुलांचे हार, चंदन आणि निरनिराळे नजराणे देऊन पूजन केले. (१३)
तद्दर्शनस्मरक्षोभाद् आत्मानं नाविदन् स्त्रियः ।
विस्रस्तवासःकबर वलया लेख्यमूर्तयः ॥ १४ ॥
मीलना इच्छिती स्त्रीया दर्शने प्रेम दाटले । शुद्ध ना राहिली देही मूर्तीच्या परि ठाकल्या ॥ १४ ॥
विस्रस्तवासःकबरवलयालेख्यमूर्तयः - शिथिल होऊन गळू लागणारी वस्त्रे, वेण्या व कंकणे यामुळे चित्राप्रमाणे स्तब्ध आहेत शरीरे ज्यांची अशा - स्त्रियः - स्त्रिया - तद्दर्शनस्मरक्षोभात् - त्या श्रीकृष्णाच्या दर्शनाने उत्पन्न झालेल्या कामविकाराच्या क्षुब्धपणामुळे - आत्मानं न अविन्दन् - स्वतःलाच विसरून गेल्या. ॥१४॥
त्यांच्या दर्शनाने हॄदयात प्रेमाचा आवेग उत्पन्न झालेल्या स्त्रियांचे भान हरपत असे. त्यांची वस्त्रे, अंबाडे आणि हातातील काकणे शिथिल होत असत आणि त्या एखाद्या चित्रातील मूर्ती वाटत. (१४)
ततः पौरान् पृच्छमानो धनुषः स्थानमच्युतः ।
तस्मिन् प्रविष्टो ददृशे धनुरैन्द्रं इवाद्भुतम् ॥ १५ ॥
यज्ञस्थान पुसे कृष्ण रंगशाळेत पातला । अद्भूत ते धनू तेथे कृष्णाने पाहिले असे ॥ १५ ॥
ततः - नंतर - पौरान् - नागरिक लोकांना - धनुषः स्थानं पृच्छमानः - धनुर्मखाचे ठिकाण विचारीत - अच्युतः - श्रीकृष्ण - तस्मिन् प्रविष्टः - तेथे गेला - ऐन्द्रम् इव अद्भुतं धनुः - व इन्द्राच्या धनुष्याप्रमाणे आश्चर्यजनक अवाढव्य धनुष्य - ददृशे - पाहता झाला. ॥१५॥
यानंतर नगरातील लोकांना धनुष्ययज्ञाचे ठिकाण विचारीत श्रीकृष्ण तेथे जाऊन पोहोचले. तेथे त्यांनी इंद्रधनुष्याप्रमाणे असलेले एक अद्भूत धनुष्य पाहिले. (१५)
पुरुषैर्बहुभिर्गुप्तं अर्चितं परमर्द्धिमत् ।
वार्यमाणो नृभिः कृष्णः प्रसह्य धनुराददे ॥ १६ ॥
संहितेच्या समानार्थी समश्लोक नाही ॥ १६ ॥
कृष्णः - श्रीकृष्ण - नृभिः वार्यमाणः - मनुष्यांनी निषेधिला जाणारा - बहुभिः पुरुषैः गुप्तं - पुष्कळ मनुष्यांनी रक्षिलेले - अर्चितं परमर्द्धिमत् - पूजिलेले व मोठया ऐश्वर्याने भूषविलेले - धनुः - धनुष्य - प्रसह्य आददे - बलात्काराने घेता झाला. ॥१६॥
त्या मौल्यवान धनुष्याची पूजा केली होती आणि पुष्कळसे सैनिक त्याच्या रक्षणाकरिता ठेवले होते. रक्षकांनी मनाई करूनही श्रीकृष्णांनी बळजबरीने ते धनुष्य उचलले. (१६)
( वंशस्था )
करेण वामेन सलीलमुद्धृतं सज्यं च कृत्वा निमिषेण पश्यताम् । नृणां विकृष्य प्रबभञ्ज मध्यतो यथेक्षुदण्डं मदकर्युरुक्रमः ॥ १७ ॥
( इंद्रवज्रा ) डाव्या कराने उचलोनि कृष्णे ओढोनि दोरी करि दोन भाग । जै मत्त हत्ती सहजी उसाचे । दो भाग शुडे करितो लिलेने ॥ १७ ॥
उरुक्रमः - मोठा पराक्रमी असा श्रीकृष्ण - नृणां पश्यतां - मनुष्ये पहात असता - वामेन करेण - डाव्या हाताने - (धनुः) सलीलं उद्धृतं - धनुष्य सहज उचलून - च सज्यं कृत्वा - आणि त्यावर दोरी चढवून - करी यथा इक्षुदण्डं (तथा) - मत्त हत्ती जसा उसाच्या कांडयाला त्याप्रमाणे - विकृष्य - वाकवून - मध्यतः निमिषेण प्रबभञ्ज - मध्ये एका क्षणात मोडिता झाला. ॥१७॥
सगळ्यांच्या देखतच त्यांनी ते धनुष्य डाव्या हाताने सहज उचलून त्यला दोरी लावली आणि एका क्षणात दोरी ओढून बलवान उन्मत्त हत्तीने ऊस मोडावा, तसे ते मधोमध मोडले. (१७)
( अनुष्टुप् )
धनुषो भज्यमानस्य शब्दः खं रोदसी दिशः । पूरयामास यं श्रुत्वा कंसस्त्रासमुपागमत् ॥ १८ ॥
( अनुष्टुप् ) धनुष्य तुटता शब्दे पृथ्वी आकाश दुम् दुमे । ऐकता कंसही झाला मनात भयभीत तो ॥ १८ ॥
भज्यमानस्य धनुषः शब्दः - मोडणार्या धनुष्याचा शब्द - खं रोदसी दिशः पूरयामास - आकाश, पृथ्वी, स्वर्ग व दिशा भरून टाकिता झाला - कंसः - कंस - यं श्रुत्वा - जो शब्द ऐकून - त्रासम् उपागतम् - त्रासाप्रत प्राप्त झाला. ॥१८॥
जेव्हा धनुष्य मोडले, तेव्हा त्या आवाजाने आकाश, पृथ्वी आणि दिशा दुमदुमून गेल्या. तो आवाज ऐकून कंसदुद्धा भयभीत झाला. (१८)
तद् रक्षिणः सानुचरं कुपिता आततायिनः ।
गृहीतुकामा आवव्रुः गृह्यतां वध्यतामिति ॥ १९ ॥
सैनिक क्रोधले सारे वदले यां धरा धरा । बांधोनी टाकुया याला न पळो येथुनी तसा ॥ १९ ॥
सानुचराःतद्रक्षिणः - सेवकांसह धनुष्याचे रक्षणकर्ते पुरुष - कुपिताः आततायिनः - रागावलेले व हातांत शस्त्रास्त्रे घेतलेले - गृहीतुकामाः - श्रीकृष्णाला पकडण्याच्या इच्छेने - गृह्यतां बध्यतां इति - धरा, बांधा असे म्हणत - (तं) आवव्रुः - श्रीकृष्णाला वेढिते झाले. ॥१९॥
यावर धनुष्याचे रक्षण करणारे अविचारी रक्षक साथीदारांसह त्यांच्यावर अतिशय चिडले आणि त्यांनी त्यांना पकडण्याच्या इराद्याने "पकडा ! बांधा !" म्हणत वेढा घातला. (१९)
अथ तान् दुरभिप्रायान् विलोक्य बलकेशवौ ।
क्रुद्धौ धन्वन आदाय शकले तांश्च जघ्नतुः ॥ २० ॥
राम कृष्ण तदा थोडे कोपता धनुखंड ते । घेवोनी चोपले भृत्य सर्वच्या सर्वही तदा ॥ २० ॥
अथ - नंतर - रामकेशवौ - बलराम व श्रीकृष्ण - क्रुद्धौ - क्रुद्ध होऊन - दुरभिप्रायान् तान् विलोक्य - वाईट आहे अभिप्राय ज्यांचा अशा त्या पुरुषांना पाहून - धन्वनः शकले आदाय - धनुष्याचे दोन तुकडे घेऊन - च तान् जघ्नतुः - आणि त्या पुरुषांना ताडिते झाले ॥२०॥
त्यांचा दुष्ट हेतू जाणून बलराम आणि श्रीकृष्णसुद्धा रागावले आणि त्यांनी त्यांची पिटाई केली. (२०)
बलं च कंसप्रहितं हत्वा शालामुखात्ततः ।
निष्क्रम्य चेरतुर्हृष्टौ निरीक्ष्य पुरसम्पदः ॥ २१ ॥
कंसे पाठविता सेना दोघांनी खंड मारुनी । मारिले सर्वच्या सर्व द्वयो बाहेर पातले ॥ २१ ॥
हृष्टौ - आनंदित झालेले रामकृष्ण - कंसप्रहितं बलं हत्वा - कंसाने पाठविलेल्या सैन्याला मारून - च ततः शालामुखात् निष्क्रम्य - आणि नंतर त्या यज्ञशाळेच्या दारातून बाहेर पडून - पुरसंपदः निरीक्ष्य - मथुरा नगरीतील शोभा पाहून - चेरतुः - संचार करिते झाले. ॥२१॥
त्याच तुकड्यांनी त्यांनी, कंसाने जी सेना पाठविली होती, तिचासुद्धा संहार केला. यानंतर ते यज्ञशाळेच्या मुख्य दरवाजातून बाहेर आले आणि आनंदाने मथुरानगरीचे वैभव पाहात फिरू लागले. (२१)
तयोस्तदद्भुतं वीर्यं निशाम्य पुरवासिनः ।
तेजः प्रागल्भ्यं रूपं च मेनिरे विबुधोत्तमौ ॥ २२ ॥
पराक्रम असा श्रेष्ठ जनांनी ऐकिला तसे । पाहिले रूप अद्भूत जाणिले श्रेष्ठ देव हे ॥ २२ ॥
पुरवासिनः - नगरात राहणारे लोक - तयोः - त्या दोघा रामकृष्णांचे - तत् अद्भुतं वीर्यं - ते आश्चर्य करण्याजोगे सामर्थ्य - तेजः - तेज - प्रागल्भ्यं रूपं च - आणि गंभीरपणा व सुंदर स्वरूप - निशाम्य - पाहून - (तौ) विबुधोत्तमौ मेनिरे - त्यांना मोठे देव मानिते झाले. ॥२२॥
या दोन्ही भावांच्या अद्भूत पराक्रमाची गोष्ट जेव्हा नगरवसियांनी ऐकली आणि त्यांचे तेज, साहस तसेच अनुपम रूप पाहिले, तेव्हा हे दोघेजण कोणीतरी श्रेष्ठ देव असावेत असे त्यांना वाटले. (२२)
तयोर्विचरतोः स्वैरं आदित्योऽस्तमुपेयिवान् ।
कृष्णरामौ वृतौ गोपैः पुराच्छकटमीयतुः ॥ २३ ॥
बल गोप तसा कृष्ण स्वतंत्र फिरले पुरां । सायंकाळी पुन्हा आले बाहेर तळ जेथ तैं ॥ २३ ॥
तयोः स्वैरं विचरतोः - ते दोघे यथेच्छ हिंडत असता - आदित्यः अस्तं उपेयिवान् - सूर्य अस्ताला गेला - गोपैः वृतौ कृष्णरामौ - गोपांनी वेष्टिलेले ते श्रीकृष्ण व बलराम - पुरात् शकटं ईयतुः - मथुरेहून आपल्या गाड्यांच्या तळावर गेले. ॥२३॥
अशा प्रकारे ते दोघे स्वच्छंदपणे फिरत असता सूर्यास्त झाला. नंतर गोपालांसमवेत फिरत असता राम-कृष्ण नगराच्या बाहेर जेथे छकडे होते तेथे परत आले. (२३)
( वसंततिलका )
गोप्यो मुकुन्दविगमे विरहातुरा या आशासताशिष ऋता मधुपुर्यभूवन् । संपश्यतां पुरुषभूषणगात्रलक्ष्मीं हित्वेतरान् नु भजतश्चकमेऽयनं श्रीः ॥ २४ ॥
( वसंततिलका ) लक्ष्मीस इच्छिति जरी जगि सर्व लोक ती सर्व सोडुनि वसे परिच्या पदाला । आत्म्यात कृष्ण बघती मथुरा पुरीचे गोपी जशाहि वदल्या घडले तसेची ॥ २४ ॥
मुकुन्दविगमे विरहातुराः गोप्यः - श्रीकृष्ण गोकुळातून गेल्यावर वियोगाने पीडिलेल्या गोपी - याः आशिषः आशासत - ज्या इच्छा करित्या झाल्या - पुरुषभूषणगात्रलक्ष्मीं संपश्यतां आशिषा - श्रीकृष्णाच्या भूषविलेल्या अवयवांच्या शोभेला पाहणार्या जनांच्या इच्छा - मधुपुरि सत्यः अभूवन् - मथुरेत खर्या झाल्या - श्रीः - लक्ष्मी - भजतः इतरान् हित्वा - भजणार्या ब्रह्मादि देवांना सोडून - (यं) अयनं चकमे नु - ज्याचा खरोखर आश्रय करिती झाली. ॥२४॥
लक्ष्मी आपणास मिळावी, असे इच्छिणार्या इतरांचा त्याग करून लक्ष्मीने ज्यांना आपले निवासस्थान बनविले, त्याच पुरुषभूषण श्रीकृष्णांचे अंगोपांगांचे सौंदर्य मथुरावासी पाहात होते. भगवान इकडे येतेवेळी व्रजातील गोपी विरहातुर होऊन मथुरावासियांबद्दल जे जे काही बोलल्या होत्या, ते ते सर्व मथुरेत खरे ठरले. (२४)
( अनुष्टुप् )
अवनिक्ताङ्घ्रियुगलौ भुक्त्वा क्षीरोपसेचनम् । ऊषतुस्तां सुखं रात्रिं ज्ञात्वा कंसचिकीर्षितम् ॥ २५ ॥
( अनुष्टुप् ) क्षिरादि घेतले भोज कंसवार्तेस घेउनी । सुखाने झोपले सर्व कार्य योजूनि ते तसे ॥ २५ ॥
अवनिक्ताङ्घ्रियुगलौ - ज्यांनी आपले पाय धुतले आहेत असे ते दोघे रामकृष्ण - क्षीरोपसेचनं भुक्त्वा - दूधभात जेवून - कंसचिकीर्षितं ज्ञात्वा - कंसाच्या मनात काय आहे हे जाणून - तां रात्रिं सुखं ऊषतुः - ती रात्र सुखाने घालविते झाले. ॥२५॥
नंतर राम-कृष्णांनी हात-पाय धुऊन दुधाची खीर इत्यादी पदार्थांनी भोजन केले आणि कंसाचे मनोगत जाणून घेऊन त्या रात्री ते तिथेच आरामात झोपी गेले. (२५)
कंसस्तु धनुषो भङ्गं रक्षिणां स्वबलस्य च ।
वधं निशम्य गोविन्द रामविक्रीडितं परम् ॥ २६ ॥
धनुष्य तोडिले कृष्णे मारिले सर्व सैन्य ते । न कष्ट पडले त्यांना कंसाने ऐकले तदा ॥ २६ ॥
कंसः तु - कंस तर - धनुषः भङगं रक्षिणां च - धनुष्याचा भंग व रक्षकांचा स्वबलस्य वधं - व स्वतःच्या सैन्याचा नाश - च परं गोविंदरामविक्रीडितं - आणि श्रीकृष्ण व बलराम ह्यांच्या अचाट लीला - निशम्य - ऐकून . ॥२६॥
जेव्हा कंसाने असे ऐकले की, कृष्ण-रामांनी धनुष्य तोडले, त्याचे रक्षक आणि त्यांच्या मदतीसाठी पाठविलेल्या सेनेचासुद्धा संहार केला आणि हे सर्व म्हणजे त्यांचा एक खेळ होता, तेव्हा तो अतिशय घाबरला. (२६)
दीर्घप्रजागरो भीतो दुर्निमित्तानि दुर्मतिः ।
बहून्यचष्टोभयथा मृत्योर्दौत्यकराणि च ॥ २७ ॥
मनात घाबरे कंस रात्री ना झोप त्याजला । जागृत स्वप्निही त्याला दिसले मृत्युचिन्ह ते ॥ २७ ॥
दीर्घप्रजागरः - पुष्कळ काळपर्यंत जागरण झालेला - भीतः दुर्मतिः - भ्यालेला दुष्टबुद्धि असा - उभयथा - स्वप्न व जागरण या दोन्ही अवस्थात - मृत्योः दौत्यकराणि दुर्निमित्तानि - मृत्यूचा दूतच अशी पुष्कळ अशुभ चिन्हे - अचष्ट - पाहता झाला. ॥२७॥
त्या दुर्बुद्धीला रात्री उशिरापर्यंत झोप आली नाही. जागेपणी आणि स्वप्नातसुद्धा त्याला मृत्यूचे सूचक पुष्कळसे अपशकून झाले. (२७)
अदर्शनं स्वशिरसः प्रतिरूपे च सत्यपि ।
असत्यपि द्वितीये च द्वैरूप्यं ज्योतिषां तथा ॥ २८ ॥
जळात दर्पणी डोक्याविना ते दिसले धड । चंद्रादी ज्योतिही त्याला दिसल्या दोन दोनही ॥ २८ ॥
प्रतिरूपे सति अपि - उदकात प्रतिबिंब दिसत असताहि - स्वशिरसः अदर्शनं - स्वतःच्या मस्तकाचे न दिसणे - तथा च द्वितीये असति अपि - आणि त्याचप्रमाणे दुसरे नसतानाहि - ज्योतिषां द्वैरूप्यं - ज्योतीचे दुहेरी बिंब. ॥२८॥
जागेपणी त्याला असे दिसले की, त्याच्या शरीराचे प्रतिबिंब असूनही त्याला मस्तक नसे. मध्ये बोट वगैरे नसूनही चंद्र इत्यादी त्याला दोन दोन दिसत. (२८)
छिद्रप्रतीतिश्छायायां प्राणघोषानुपश्रुतिः ।
स्वर्णप्रतीतिर्वृक्षेषु स्वपदानामदर्शनम् ॥ २९ ॥
कानात घालता बोटे न येई तो अनाहत । पिवळे दिसले वृक्ष पायाचे चिन्ह ना उठे ॥ २९ ॥
छायायां छिद्रप्रतीतिः - सावलीत भोके पडल्यासारखे दिसणे - प्राणघोषाणुपश्रुतिः - कानावर तळहात ठेवून दाबला असता जो एकप्रकारचा ध्वनि निघतो तो ऐकू न येणे - वृक्षेषु स्वर्णप्रतीतिः - वृक्ष सुवर्णासारखे दिसणे - स्वपदानाम् अदर्शनम् - आपली पावले आपल्याला न दिसणे. ॥२९॥
सावली दुभंगलेली दिसे आणि कानात बोटे घालूनही घूं घूं असा आवाज ऐकू येत असे. झाडे सोनेरी दिसत होती आणि धुळीत स्वतःच्या पायांचे ठसे दिसत नव्हते.(२९)
स्वप्ने प्रेतपरिष्वङ्गः खरयानं विषादनम् ।
यायान्नलदमाल्येकः तैलाभ्यक्तो दिगम्बरः ॥ ३० ॥
स्वप्नात आवळी प्रेता गाढवावरि बैसुनी । खातसे वीष नी तेल अंगा लावोनि नग्नची । फिरतो अडुळा पुष्प-माला ती गळि घालुनी ॥ ३० ॥
स्वप्ने प्रेतपरिषङगः - स्वप्नात प्रेताला आलिंगन देणे - खरयानं - गाढवावर बसून जाणे - विषादनम् - स्वप्नात विष खाणे - नलदमाली एकः यायात् - काळ्या फुलांची माळ घालून एकटेच हिंडणे - तैलाभ्यक्तः - तेलाने अभ्यंगस्नान करणे - दिगम्बरः - नग्न असल्याप्रमाणे पहाणे. ॥३०॥
कंसाला स्वप्नात दिसले की, तो प्रेतांना मिठी मारीत आहे, गाढवावर बसून चालला आहे आणि विषप्राशन करीत आहे. त्याचे सर्व शरीर तेलाने माखले आहे, गळ्यात जास्वंदीच्या फुलांची माळ आहे आणि तो नग्न होऊन कुठेतरी एकटाच जात आहे. (३०)
अन्यानि चेत्थं भूतानि स्वप्नजागरितानि च ।
पश्यन् मरणसन्त्रस्तो निद्रां लेभे न चिन्तया ॥ ३१ ॥
जागृत स्वप्निही ऐसे दुश्चिन्ह पाहि कंस तो । भितीने वाढली चिंता चिंतेने झोप ना लगे ॥ ३१ ॥
च इत्थंभूतानि अन्यानि (मृत्यूचिहणानि) - आणि अशासारखी दुसरीही मरणचिन्हे - स्वप्नजागरितानि पश्यन् - कित्येक स्वप्नामध्ये व कित्येक जागृतावस्थेत पाहत - मरणसंत्रस्तः - मरणाच्या भीतीने पीडिलेल्या - चिन्तया निद्रां न लेभे - काळजीने निद्रा आली नाही. ॥३१॥
स्वप्नात आणि जागेपणी त्याने अशा प्रकारचे पुष्कळसे अपशकुन पाहिले. त्यामुळे मृत्यूच्या भीतीने चिंताग्रस्त होऊन त्याची झोप उडाली. (३१)
व्युष्टायां निशि कौरव्य सूर्ये चाद्भ्यः समुत्थिते ।
कारयामास वै कंसो मल्लक्रीडामहोत्सवम् ॥ ३२ ॥
परीक्षित् संपता रात्र सकाळ जाहली तदा । कंसाने मल्लक्रीडेचा केला उत्सव तो सुरू ॥ ३२ ॥
कौरव्य - हे परीक्षित राजा - कंसः - कंस - निशि व्युष्टायां - रात्र संपून उजाडले असता - च सूर्ये अद्भ्यः समुत्थिते - आणि सूर्य पाण्यातून वर आला असता - मल्लक्रीडामहोत्सवं - मल्लांच्या कुस्त्यांचा मोठा समारंभ - कारयामास वै - करविता झाला. ॥३२॥
परीक्षिता ! जेव्हा रात्र संपली आणि सूर्यनारायण पूर्व समुद्राच्या वर आले, तेव्हा राजा कंसाने मल्लक्रीडामहोत्सवास प्रारंभ केला. (३२)
आनर्चुः पुरुषा रङ्गं तूर्यभेर्यश्च जघ्निरे ।
मञ्चाश्चालङ्कृताः स्रग्भिः पताकाचैलतोरणैः ॥ ३३ ॥
सजली रंगभूमी ती तुतार्या भेरि वाजल्या । झेंडे वस्त्र फुलांनीही स्थान शोभले तसे ॥ ३३ ॥
पुरुषाः - पुरुष - रङगं - क्रीडांगणाला - आनर्चुः - पूजिते झाले - च तूर्यभेर्यः जघ्निरे - नगारे व ढोल वाजू लागले - च स्रग्भिः पताकाचैलतोरणैः - आणि माळा, पताका, ध्वज, तोरणे यांनी - मञ्चः - उच्च स्थाने - अलङ्कृताः - भूषविली गेली. ॥३३॥
राजाच्या कर्मचार्यांनी आखाडा चांगल्या रीतीने सजविला. नगारे, तुतार्या वाजू लागल्या. बैठकीच्या जागा फुलांचे गजरे, झेंडे, वस्त्रे आणि पानाफुलांच्या तोरणांनी सजविल्या गेल्या. (३३)
तेषु पौरा जानपदा ब्रह्मक्षत्रपुरोगमाः ।
यथोपजोषं विविशू राजानश्च कृतासनाः ॥ ३४ ॥
द्विजादी आपुल्या स्थानी ग्रामवासीहि बैसले । विदेश देशिचे राजे आपुल्या स्थानि बैसले ॥ ३४ ॥
ब्रह्मक्षत्रपुरोगमाः - ब्राह्मण व क्षत्रिय आहेत मुख्य ज्यांमध्ये असे - पौराः जानपदाः - नागरिक व खेडयातील लोक - तेषु - त्याठिकाणी - यथोपजोषं - अधिकारपरत्वे - विविशुः - शिरते झाले - राजानः च - आणि राजे - कृतासनाः - आपापल्या आसनांवर बसते झाले. ॥३४॥
त्यावर ब्राह्मण, क्षत्रिय इत्यादी नागरिक आणि गावातील लोक, असे सर्वजण नियोजित ठिकाणी बसले. राजेही आपापल्या आसनांवर जाऊन बसले. (३४)
कंसः परिवृतोऽमात्यै राजमञ्च उपाविशत् ।
मण्डलेश्वरमध्यस्थो हृदयेन विदूयता ॥ ३५ ॥
मांडलिका मधे कंस उच्च आसनि बैसला । तदाही दिसले त्याला कुशकून कितेक ते ॥ ३५ ॥
अमात्यैः परिवृतः - प्रधानांनी वेष्टिलेला - मण्डलेश्वरमध्यस्थः - मांडलिक राजांच्या मध्यभागी बसलेला - कंसः - कंस - विदूयता हृदयेन - दुःखित अन्तःकरणाने - राजमञ्चे उपाविशत् - राजसिंहासनावर बसला. ॥३५॥
आपल्या मंत्र्यांसह कंस, मांडलिक राजांच्या मध्ये राजसिंहासनावर जाऊन बसला. अपशकून झालेले असल्याने यावेळीसुद्धा तो मनातून घाबरलेलाच होता. (३५)
वाद्यमानेसु तूर्येषु मल्लतालोत्तरेषु च ।
मल्लाः स्वलङ्कृताः दृप्ताः सोपाध्यायाः समाविशन् ॥ ३६ ॥
हाबूक ध्वनि नी वाद्ये आखाडा घुमु लागला । गर्वे मल्ल स्वये आले आपुले गुरु घेउनी ॥ ३६ ॥
मल्लतालोत्तरेषु - मल्लांच्या तालांपेक्षा अधिक शब्द करणार्या - तुर्येषु वाद्यमानेषु - दुंदुभी वाजू लागल्या असता - दृप्ताः स्वलङकृताः - गर्विष्ठ व अलंकार घातलेले - मल्लः - मल्ल - सोपाध्यायाः समासत - उपाध्यायांसह बसले. ॥३६॥
तेव्हा पहिलवानांच्या दंड थोपटण्यापाठोपाठ वाद्ये वाजू लागली आणि गर्विष्ठ पहिलवान खूप सजून आपापल्या उस्तादांसह आखाड्यात येऊन उतरले. (३६)
विवरण :- राम-कृष्ण मथुरेत आल्यानंतरची त्यांची रात्र आणि कंसाचीही तीच रात्र, यामध्ये कसा फरक होता हे येथील वर्णनावरून दिसून येते. दिवसा राजमार्गावरून फिरत असता मथुरावासीयांची मने त्या दोघांनी आपल्या मोहक दर्शनाने आणि विलोभनीय सुसंस्कृत वागण्याने जिंकून घेतली. त्यांच्या स्वागताचा स्वीकार केला. धनुर्भंग करून कंसाच्या सैनिकांना ठार करून आपल्या वसतिस्थानी परत आल्यानंतर भोजन करून ते शांत चित्ताने निद्राधीन झाले. आपणांस ठार करण्याची कंसाची योजना आणि पूर्ण तयारीही आहे हे सर्व त्यांना माहीत होते; तरी त्यांचे मन थोडेसेही विचलित झाले नाही; कारण त्यांची बाजू सत्याची होती, मन, हेतू शुद्ध व पवित्र होता. आपल्या पराक्रमावर त्यांचा पुर्ण विश्वास होता. त्यामुळे आपल्याबाबतीत काहीच अशुभ घडणार नाही उलट कंसाचाच विनाश अटळ आहे, याची त्यांना खात्री होती. याउलट कंसाची बाजू कपटाची, असत्याची, पापी होती. बहिणीची निष्पाप मुले ठार करण्याचे पाप त्याचे माथी होतेच, आता कृष्णाची हत्या करण्याचा कुटिल डाव, तो यशस्वी होईल की नाही, याची काळजी त्याला होती. कृष्णाने क्षणार्धात केलेया धनुर्भंगाने त्याच्या सामर्थ्याची नुकतीच प्रचीतीही त्याला आली होती. या सर्वांमुळे अस्वस्थ झालेल्या कंसाला झोप येणे कसे शक्य होते ? पाप्याचे मन सतत अस्थिर, अशांत, अस्वस्थ असते, त्याने वरवर निर्भयपणाचा कितीही आव आणला तरी कुठेतरी त्याच्या मनाला, सदसद्विवेकबुद्धीला टोचणी लागलेली असते आणि तो अस्वस्थ होतो, त्याची झोप उडते. मात्र सत्य, सज्जनता, न्याय नेहमीच मनुष्याला शांत आणि स्थिरचित्त करते. (२५-३६)
चाणूरो मुष्टिकः कूतः शलस्तोशल एव च ।
त आसेदुरुपस्थानं वल्गुवाद्यप्रहर्षिताः ॥ ३७ ॥
चाणूर मुष्टिको कूट शल तोषल आदि ते । मधूर बोलती शब्द आसनी बैसले सुखे ॥ ३७ ॥
चाणूरः मुष्टिकः कूटः शलः च तोशलः एव - चाणूर, मुष्टिक, कूट, शल आणि तोशलसुद्धा - वल्गुवाद्यप्रहर्षिताः ते - मधुर वाद्यांनी आनंदित झालेले ते मल्ल - उपस्थानं आसेदुः - रंगभूमीवर प्राप्त झाले. ॥३७॥
चाणूर, मुष्टिक, कूट, शल आणि तोशल हे पहिलवान वाद्यांच्या सुमधुर आवाजाने उत्साहित होऊन आखाड्यामध्ये येऊन बसले. (३७)
नन्दगोपादयो गोपा भोजराजसमाहुताः ।
निवेदितोपायनास्ते एकस्मिन् मञ्च आविशन् ॥ ३८ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कन्धे पूर्वार्धे मल्लरङोपवर्णनं नाम द्विचत्वारिंशोऽध्यायः ॥ ४२ ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
कंसाने नंद गोपांना बोलावोनीहि ते तयां । सत्कार करुनी थोर मंचकी बैसवीयले ॥ ३८ ॥ ॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता । विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर बेचाळिसावा अध्याय हा ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
भोजराजसमाहुताः - कंसाने बोलाविलेले - निवेदितोपायनाः - ज्यांनी कंसाला भेटी दिल्या आहेत असे - नन्दगोपादयः ते गोपाः - नंद आणि इतर गोप - एकस्मिन् मञ्चे आविशन् - एकाच उच्चासनावर बसले. ॥३८॥
त्याचवेळी भोजराज कंसाने बोलाविलेले नंद इत्यादी गोप राजाला नजराणे देऊन एका मंचावर जाऊन बसले. (३८)
अध्याय बेचाळिसावा समाप्त |