|
श्रीमद् भागवत पुराण
केशिवधः; नारदकृतं भगवतस्तवनं केशी आणि व्योमासुर यांचा उद्धार आणि नारदांकडून भगवंतांची स्तुती - संहिता - अन्वय - अर्थ समश्लोकी - मराठी
श्रीशुक उवाच -
( मिश्र ) केशी तु कंसप्रहितः खुरैर्महीं महाहयो निर्जरयन्मनोजवः । सटावधूताभ्रविमानसङ्कुलं कुर्वन्नभो हेषितभीषिताखिलः ॥ १ ॥
( अनुष्टुप् ) श्रीशुकदेव सांगतात - केशीस कंसे व्रजि धाडिले तो होवोनि अश्वो व्रजि पातला नी । टापे भुमिसी उखडीत आला आयाळ झट्के ढग पांगले की ॥ १ ॥
कंसप्रहितः केशी तु - कंसाने पाठविलेला असा केशी तर - खुरैः महीं निर्जरयन् - खुरांच्या योगाने पृथ्वीला जर्जर करीत - मनोजवः - मनाच्या वेगाप्रमाणे आहे वेग ज्याचा असा - नभः - आकाशाला - सटावधूताभ्र - आयाळीने हालविलेल्या ढगांनी - विमानसङ्कुलं कुर्वन् - व विमानांनी व्यापलेले असे करणारा - हेषितभीषिताखिलः - खिंकाळण्याने भिवविले आहेत सर्व प्राणी ज्याने असा - महाहयः (सन्) - एक मोठा घोडा होऊन - ॥१॥
श्रीशुक म्हणतात- कंसाने ज्या केशी नावाच्या दैत्याला पाठविले होते, तो अतिशय मोठ्या घोड्याच्या रूपाने, मनोवेगाने दौडत नंदांच्या व्रजामध्ये आला. तो आपल्या टापांनी जमीन उकरत होता. (१)
विशालनेत्रो विकटास्यकोटरो
बृहद्गलो नीलमहाम्बुदोपमः । दुराशयः कंसहितं चिकीर्षुः व्रजं स नम्दस्य जगाम कम्पयन् ॥ २ ॥
खिंकाळता लोक भिले मनात मोठेचि डोळे मुख खोड जैसे । देहे दिसे तो घटची ढगाचा भूकंप होई पद आपटीता ॥ २ ॥
विशालनेत्रो - भयंकर विशाल डोळे असलेला - विकटहास्यकोटरो - प्रचंड गर्ना करीत - बृहद्गलो नीलमहाम्बुदोपमः - अवाढव्य मान व झाडाच्या खोडासारखे तोंड असलेला - दुराशयः कंसहितं चिकीर्षु - दुष्ट कंसाचे प्रिय करण्यासाठी - नन्दस्य व्रजं आजगाम - नंदाच्या गौळवाडयात आला. ॥२॥
त्याच्या मानेवरील आयाळीच्या झटकण्याने आकाशातील ढग आणि विमानांची गर्दी विखुरली जाऊ लागली. त्याच्या प्रचंड खिंकाळण्याने सर्वजण भयभीत झाले होते. त्याचे डोळे अतिशय विशाल होते. तोंड म्हणजे जणू काही वृक्षाची ढोलच ! मान अवाढव्य होती. प्रचंड काळ्या ढगांसारखे शरीर होते. श्रीकृष्णांना मारून कंसाचे कल्याण करण्यासाठी तो व्रजाचा थरकाप उडवीत आला. (२)
तं त्रासयन्तं भगवान् स्वगोकुलं
तद्धेषितैर्वालविघूर्णिताम्बुदम् । आत्मानमाजौ मृगयन्तमग्रणीः उपाह्वयत् स व्यनदन् मृगेन्द्रवत् ॥ ३ ॥
श्रीकृष्ण पाही जन भीतियुक्त ढगांपरी तो हलवीहि पुच्छ । झूजावया धुंडुनि पाहि अश्व सिंहध्वनीने मग कृष्ण बोले ॥ ३ ॥
भगवान् अग्रणीः (सन्) - श्रीकृष्ण पुढारी होऊन - स्वगोकुलं - आपल्या गोकुळाला - तद्धेषितैः त्रासयन्तं - त्याच्या खिंकाळण्यानी त्रास देणार्या - वालविधूर्णिताम्बुदं - शेपटीने फिरविले आहेत मेघ ज्याने अशा - आत्मानं आजौ मृगयन्तं - आपल्याला युद्धासाठी शोधणार्या - तं - त्या केशीला - उपाह्वयत् - आव्हान करता झाला - सः - तो - मृगेन्द्रवत् - सिंहाप्रमाणे - व्यनदत् - गर्जना करता झाला. ॥३॥
भगवान श्रीकृष्णांनी पाहिले की, त्याच्या खिंकाळण्याने आपले गोकुळ भयभीत झाले आहे. आणि त्याच्या शेपटीच्या केसांच्या फटकार्यांनी ढग अस्ताव्यस्त होत आहे. तसेच तो लढण्यासाठी आपला शोधही घेत आहे. तेव्हा ते आपणहून समोर आहे आणि सिंहाप्रमाणे गर्जना करून त्यांनी त्याला आव्हान दिले. (३)
स तं निशाम्याभिमुखो मखेन खं
पिबन्निवाभ्यद्रवदत्यमर्षणः । जघान पद्भ्यामरविन्दलोचनं दुरासदश्चण्डजवो दुरत्ययः ॥ ४ ॥
पाहोनि कृष्णा मग तो चिडोनी आकाश प्याया जणु तोंडवासी । खरेचि केशी बहुही प्रचंड कृष्णासि झाडी मग दोन लाथा ॥ ४ ॥
चण्डजवः - तीव्र आहे वेग ज्याचा असा - दुरासदः - कष्टाने धरता येण्यासारखा - अत्यमर्षणः - अत्यंत रागीट असा - सः - तो केशी - अरविन्दलोचनं - ज्याचे कमळासारखे डोळे आहेत - तं निशाम्य - अशा त्या कृष्णाला पाहून - अभिमुखः (सन्) - समोर तोंड करणारा होऊन - मुखेन खं पिबन् इव - तोंडाने जणु काय आकाशाला पिऊन टाकीत - (तं) अभ्यद्रवत् - त्याच्यावर धावला - पभ्द्यां जघान - दोन्ही पायांनी मारिता झाला. ॥४॥
भगवंत समोर आलेले पाहून तो आणखी चिडला आणि तोंड पसरून त्यांच्याकडे असा धावला की जणू आकाशालाच पिऊन टाकील. त्याचा वेग खरोखर अतिशय प्रचंड होता. त्याच्यावर विजय मिळवणे तर कठीण होतेच, परंतु त्याला पकडणे सुद्धा सोपे नव्हते. भगवंतांच्याकडे जाऊन त्याने त्यांच्यावर लाथा झाडल्या. (४)
तद् वञ्चयित्वा तमधोक्षजो रुषा
प्रगृह्य दोर्भ्यां परिविध्य पादयोः । सावज्ञमुत्सृज्य धनुःशतान्तरे यथोरगं तार्क्ष्यसुतो व्यवस्थितः ॥ ५ ॥
कृष्णे तया वंचियले नि हाते पायी धरी जै गरुडोचि सर्पा । क्रोधेचि त्याला फिरवून फेकी त्या चारशे हातहृ अंतराला ॥ ५ ॥
अधोक्षजः - श्रीकृष्ण - तत् वञ्चयित्वा - ते चुकवून - रुषा - रागाने - दोर्भ्यां - दोन्ही हातांनी - तं - त्याला - पादयोः प्रगृह्य - दोन्ही पायांच्या ठिकाणी पकडून - परिविध्य - सभोवार फिरवून - यथा - ज्याप्रमाणे - तार्क्ष्यसुतः - गरुड - उरगं - सापाला - सावज्ञं - तिरस्कारपूर्वक - धनुः शतान्तरे उत्सृज्य - चारशे हातांच्या अंतरावर फेकून - व्यवस्थितः - नीट उभा राहिला. ॥५॥
परंतु भगवंतांनी त्या लाथा चुकवून रागाने आपल्या दोन्ही हातांनी त्याचे मागचे दोन पाय पकडले आणि गरुड ज्याप्रमाणे सापाला झटकतो, त्याप्रमाणे स्वतः जराही न हालता त्याला तुच्छतेने चारशे हात लांब फेकून दिले. (५)
सः लब्धसंज्ञः पुनरुत्थितो रुषा
व्यादाय केशी तरसाऽऽपतद्धरिम् । सोऽप्यस्य वक्त्रे भुजमुत्तरं स्मयन् प्रवेशयामास यथोरगं बिले ॥ ६ ॥
सचेत होता मग केशि धावे फाडोनि तोंडा हरिच्या तनूशी । तो पहाता हासुनि कृष्ण पाही मुखात डावा कर घालि त्याच्या ॥ ६ ॥
लब्धसंज्ञः सः केशी - प्राप्त झाली आहे शुद्धि ज्याला असा तो केशी - पुनःउत्थितः - पुनः उठून - रुषा (मुखं) व्यादाय - रागाने तोंड पसरून - तरसा - वेगाने - हरिं अपतत् - श्रीकृष्णावर उडी घालता झाला - सः अपि - तो श्रीकृष्ण देखील - स्मयन् (सन्) - हसत हसत - यथा बिले उरगं तथा - ज्याप्रमाणे बिळात सापाला त्याप्रमाणे - अस्य मुखे - त्याच्या तोंडात - उत्तरं भुजं - उजवा हात - प्रवेशयामास - शिरकविता झाला. ॥६॥
थोड्याच वेळात केशी सावध होऊन पुन्हा उठून उभा राहिला आणि चिडून आ वासून अतिशय वेगाने श्रीहरींच्या अंगावर धावला. तो जवळ आलेला पाहून भगवंतांनी हसून बिळात जाणार्या सापाप्रमाणे आपला डावा हात त्याच्या तोंडात घातला. (६)
दन्ता निपेतुर्भगवद्भुजस्पृशः
ते केशिनस्तप्तमयस्पृशो यथा । बाहुश्च तद्देहगतो महात्मनो यथाऽऽमयः संववृधे उपेक्षितः ॥ ७ ॥
परीक्षिता ते कर कोवळे की ते तप्त लोहा परि तोंडी त्याच्या । जाळोनि दातां उपटोनि काढी नी वाढ वाढे मुखि हात त्याच्या ॥ ७ ॥
केशिनः - केशीचे - भगवद्भुजस्पृशः - श्रीकृष्णाच्या हाताला स्पर्श करणारे - ते दन्ताः - ते दात - यथा तप्तम् अयस्पृशः - तापलेल्या लोखंडाला स्पर्श केल्यासारखे - निपेतुः - पडले - च - आणि - तद्देहगतः - त्याच्या शरीरात गेलेला - महात्मनः बाहुः - महात्म्या श्रीकृष्णाचा हात - यथा उपेक्षितः आमयः तथा - ज्याप्रमाणे हयगय केलेला रोग त्याप्रमाणे - संववृधे - वाढला. ॥७॥
भगवंतांच्या तापलेल्या लोखंडासारख्या हाताचा स्पर्श होताच केशीचे दात तुटून पडले आणि जसे दुर्लक्ष केल्याने जलोदर रोग वाढतो, त्याप्रमाणे श्रीकृष्णांचा हात त्याच्या पोटात वाढू लागला. (७)
समेधमानेन स कृष्णबाहुना
निरुद्धवायुश्चरणांश्च विक्षिपन् । प्रस्विन्नगात्रः परिवृत्तलोचनः पपात लेण्डं विसृजन् क्षितौ व्यसुः ॥ ८ ॥
दाटोनि हाते मग श्वास गेला पायास आप्टी भिजले शरीर । बाहेर डोळे पडले तयाचे पडे मरोनी मळ त्यागुनीया ॥ ८ ॥
समेधमानेन - अत्यंत वाढलेल्या अशा - कृष्णबाहुना निरुद्धवायुः - श्रीकृष्णाच्या हातामुळे कोंडला आहे प्राणवायु ज्याचा असा - चरणान् विक्षिपन् - पाय झाडीत - प्रस्विन्नगात्रः - घामाघूम झाले आहे शरीर ज्याचे असे - परिवृत्तलोचनः - फिरत आहेत डोळे ज्याचे असा - सः - तो केशी - लेण्डं विसृजन् - लेंडके टाकीत - व्यसुः - गेले आहेत प्राण ज्याचे असा - क्षितौ पपात - भूमीवर पडला. ॥८॥
श्रीकृष्णांचा हात त्याच्या शरीरात जसजसा वाढू लागला तसा त्याचा श्वासोच्छवासाचा मार्ग बंद झाला. आता तो लाथा झाडू लागला. घामाने त्याचे शरीर डबडबले, डोळ्यातील बुबुळे उलटी झाली आणि तो लीद टाकीत गतप्राण होऊन जमिनीवर पडला. (८)
तद्देहतः कर्कटिकाफलोपमाद्
व्यसोरपाकृष्य भुजं महाभुजः । अविस्मितोऽयत्नहतारिरुत्स्मयैः प्रसूनवर्षैर्दिविषद्भिरीडितः ॥ ९ ॥
शेंदाड फाटे तयि फाटला तो नी कृष्ण काढी अपुल्या कराला । अनायसे शत्रुस मारिता तैं पुष्पेचि देवे बहुवृष्टि केली ॥ ९ ॥
व्यसोः - गतप्राण झालेल्या - कर्कटिकाफलोपमात् - काकडीप्रमाणे असलेल्या - तद्देहतः - त्याच्या शरीरापासून - भुजं अपाकृष्य - हात काढून - अविस्मितः - गर्वरहित असा - अयत्नहतारिः - यत्नांवाचून मारिला आहे शत्रू ज्याने असा - महाभुजः - मोठे आहेत हात ज्याचे असा कृष्ण - उत्स्मयैः - मोठयाने हसणार्या - प्रसूनवर्षैः - फुलांचा वर्षाव करणार्या - दिविषद्भिः - देवांकडून - ईडितः - स्तविला गेला. ॥९॥
त्याचे निष्प्राण शरीर जमिनीवर आपटताच पिकलेल्या चिबडासारखे फुटले. महाबाहू श्रीकृष्णांनी त्याच्या तोंडातून आपला हात सहज ओढून काढला. विनासायास शत्रूचा नाश केला, याचे देवांना अतिशय आश्चर्य वाटले आणि ते भगवंतांवर फुलांची वर्षाव करून त्यांची स्तुती करू लागले. (९)
( अनुष्टुप् )
देवर्षिरुपसङ्गम्य भागवतप्रवरो नृप । कृष्णमक्लिष्टकर्माणं रहस्येतदभाषत ॥ १० ॥
हितैषी सर्व जीवांचे भगवत्प्रेमि नारद । कंसाच्या पासुनी आले कृष्णा एकांति बोलले ॥ १० ॥
नृप - हे राजा - भागवतप्रवरः - भगवद्भक्तांमध्ये श्रेष्ठ असा - देवर्षिः - नारद - अक्लिष्टकर्माणं - क्लेशरहित आहेत कृत्ये ज्याची अशा - कृष्णं - श्रीकृष्णाला - रहसि उपसंगम्य - एकांतात भेटून - एतत् अभाषत् - हे म्हणाला. ॥१०॥
परीक्षिता ! श्रेष्ठ भगवद्भक्त देवर्षी नारद अद्भुत कर्मे करणार्या श्रीकृष्णांकडे आले आणि एकांतात नेऊन त्यांना म्हणाले - (१०)
कृष्ण कृष्णाप्रमेयात्मन् योगेश जगदीश्वर ।
वासुदेवाखिलावास सात्वतां प्रवर प्रभो ॥ ११ ॥
श्रीकृष्णा सच्चिदानंदा योगेशा जगदीश्वरा । जगाचा वासुदेवो तू यदुवंश शिरोमणी ॥ ११ ॥
कृष्ण कृष्ण - हे श्रीकृष्णा - अप्रमेयात्मन् - जाणण्यास कठीण आहे स्वरूप ज्याचे अशा - योगेश - हे श्रेष्ठ योग्या - जगदीश्वर - हे जगाच्या नियामका - वासुदेव - हे वासुदेवा - अखिलावास - हे सर्वत्र वास करणार्या - सात्वतां प्रवर - हे यादवांमध्ये श्रेष्ठ अशा - प्रभो - हे परमेश्वरा. ॥११॥
हे श्रीकृष्णा ! आपले स्वरूप हे मन आणि वाणी यांचा विषय होऊ शकत नाही. आपण योगेश्वर आहात. सार्या जगाचेही ईश्वर आहात. आपण सर्वांच्या हृदयात निवास करता आणि सगळे आपल्या ठिकाणी निवास करतात. हे प्रभो ! आपण यदुवंशशिरोमणी आहात. (११)
त्वमात्मा सर्वभूतानां एको ज्योतिरिवैधसाम् ।
गूढो गुहाशयः साक्षी महापुरुष ईश्वरः ॥ १२ ॥
सर्व काष्ठा मधे एक अग्नि तैं प्राणियात तू । राहसी पंचक्रोशात साक्षे जीवास जाणसी ॥ १२ ॥
त्वं - तू - एधसां (वर्तमानः) ज्योतिः इव - इंधनात असणार्या अग्नीप्रमाणे - सर्वभूतानां एकः आत्मा - सर्व प्राणिमात्रांचा एक असा आत्मा - गुहाशयः - अंतःकरणात राहणारा - साक्षी - पाहणारा - महापुरुषः - श्रेष्ठ पुरुष असा - गूढः - गुप्त असा - ईश्वरः (असि) - ईश्वर आहेस. ॥१२॥
जसा एकच अग्नी सर्व लाकडांमध्ये व्यापून असतो तसेच आपण एकटेच सर्व प्राण्यांचा आत्मा आहात. आत्मरूपाने असूनही आपण स्वतःला झाकून ठेवता. पंचकोशरूप गुहेच्या आत राहाता; आपण पुरुषोत्तम, सर्वांचे नियंते, आणि या सर्वांचे साक्षी आहात. (१२)
आत्मनाऽऽत्माश्रयः पूर्वं मायया ससृजे गुणान् ।
तैरिदं सत्यसङ्कल्पः सृजस्यत्स्यवसीश्वरः ॥ १३ ॥
सर्वांचा तू अधिष्ठाता अधिष्ठान विहीन तू । मायेने निर्मिसी सृष्टी पोषिसी लीनि नेशिही ॥ १३ ॥
आत्मना आत्माश्रयः - स्वतःच स्वतःचा आश्रय असलेला - सत्यसङ्कल्पः - खर्या आहेत इच्छा ज्याच्या असा - ईश्वरः - परमेश्वर - पूर्वं - पूर्वी - मायया - मायेच्या योगाने - गुणान् - सत्त्वादि गुण - ससृजे - उत्पन्न करिता झाला - तैः - त्यांच्या योगाने - इदं (जगत्) - हे जग - सृजसि - तू उत्पन्न करितोस - अवसि - रक्षण करितोस - अत्सि - खाऊन टाकितोस. ॥१३॥
प्रभो ! आपण सर्वांचे अधिष्ठान आणि स्वतः मात्र स्वतःचेच अधिष्ठान आहात. सृष्टीच्या प्रारंभी सत्यसंकल्प अशा आपण आपल्या मायेनेच गुणांची निर्मिती करता आणि त्या गुणांचाच स्वीकार करून जगाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय करीत राहता. (१३)
विवरण :- वृषभासुरानंतर कंसाने पाठविलेल्या महाभयानक अशा घोडयाच्या रूपातील 'केशी' नावाच्या दैत्यास कृष्णाने ठार केले. त्यानंतर महर्षी नारद कृष्णाकडे येऊन त्याच्या या कृत्याची स्तुती करू लागले. त्यावेळी महर्षींनी वापरलेली संबोधने महत्त्वाची आणि अर्थपूर्ण आहेत. या भूमीला दैत्यांचा भार झाला. तू त्यांचे, त्यांनी केलेल्या पापांचे निर्दालन करून सर्व विश्वाचे पालन करतोस. म्हणून तू 'जगदीश्वर' आहेस. तुझे सामर्थ्य कल्पनातीत; म्हणून तू 'अप्रमेय', योगसामर्थ्याने परिपूर्ण, म्हणजेच 'योगेश'. सर्व विश्वास तू व्यापून रहिल्यामुळे 'अखिलावास', विश्वाचा नियन्ता, विकाररहित असा तू आता (या अवतारात) 'सात्त्वत' कुलाचा भूषण आहेस. नारदमहर्षी पुढे म्हणतात, तू विश्वाचा पालक असून तुझ्यापासूनच सर्व जगाची निर्मिती झाली आहे. तू अभिन्न आणि एकरूपात आहेस. सर्व प्राणिमात्रांमध्ये आत्म्याच्या रूपाने स्थित आहेस, परंतु सामान्यांना तुझे आकलन होत नाही. कारण चर्मचक्षूंना तू दृश्य नाहीस. ज्याप्रमाणे लाकडातील अग्नी डोळ्यांना दिसत नाही, परंतु आत त्याचे अस्तित्व असतेच. त्याप्रमाणे तू गूढ आहेस. लाकडे एकमेकांवर घासल्यानंतरच त्यातील अग्नी प्रकट होतो; तसा योगी लोकांनी विचारमंथन केल्यानंतरच तुझ्या प्राप्तीची शक्यता. सामान्यांच्या हृदयरूपी गुहेत तुझे वास्तव्य, त्यामुळे भिन्न असूनहि तू अभिन्न, एकरूपाने तू विश्वाला व्यापून राहिला आहेस. तू स्वतःचा स्वतःच आश्रय आहेस. तू मायेने त्रिगुणांची निर्मिती केलीस, गुणयुक्त विश्वाची निर्मिती केलीस. तसेच विश्वाचे पालन आणि संहारहि तूच करतोस. (११-१३)
स त्वं भूधरभूतानां दैत्यप्रमथरक्षसाम् ।
अवतीर्णो विनाशाय साधुनां रक्षणाय च ॥ १४ ॥
राक्षसे दावने दैत्ये राजांचे वेष घेतले । तयांना नष्टिण्या तैसे धर्मरक्षार्थ जन्मला ॥ १४ ॥
सः त्वं - तो तू - भूधरभूतानां - राजे झालेल्या अशा - दैत्यप्रमथरक्षसां विनाशाय - दैत्य, प्रमथ व राक्षस यांच्या नाशासाठी - च - आणि - सेतूनां रक्षणाय - धर्ममर्यादांच्या रक्षणासाठी - अवतीर्णः (असि) - अवतरला आहेस. ॥१४॥
तेच आपण राजांच्या रूपात असणार्या दैत्य, प्रमथ आणि राक्षसांचा विनाश करण्यासाठी तसेच धर्ममर्यादांचे रक्षण करण्यासाठी अवतीर्ण झाला आहात. (१४)
दिष्ट्या ते निहतो दैत्यो लीलयायं हयाकृतिः ।
यस्य हेषितसन्त्रस्ताः त्यजन्त्यनिमिषा दिवम् ॥ १५ ॥
आनंद वाटतो हा की सहजी केशि मारिला । पळाले स्वर्गिचे देव खिंकाळी ऐकता तशी ॥ १५ ॥
यस्य हेषितसंत्रस्ताः - ज्याच्या खिंकाळण्याने भ्यालेले असे - अनिमिषाः दिवं त्यजन्ति - देव स्वर्गलोकाचा त्याग करतात - (सः) अयं हयाकृतिः दैत्यः - तो हा घोडयाचे आहे स्वरूप ज्याचे असा राक्षस - दिष्टया (एव) - सुदैवानेच - ते लीलया निहतः - तुझ्याकडून लीलेने मारिला गेला. ॥१५॥
आपण सहजपणे घोड्याचे रूप घेऊन राहिलेल्या या केशी दैत्याला मारलेत, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. त्याच्या केवळ खिंकाळण्याला भिऊन देव आपला स्वर्ग सोडून पळूत जात असत. (१५)
विवरण :- ज्या केशीला कृष्णाने लीलया मारले तो किती भयानक होता, हे 'त्यजन्त्यनिमिषा दिवम्' (ज्याच्या खिंकाळण्याने देवही घाबरून स्वर्गलोक सोडून पळून जात.) यावरून दिसते आणि कृष्णाचा पराक्रमही दिसून येतो. (१५)
चाणूरं मुष्टिकं चैव मल्लानन्यांश्च हस्तिनम् ।
कंसं च निहतं द्रक्ष्ये परश्वोऽहनि ते विभो ॥ १६ ॥
परवा तुझिया हाते चाणूर मुष्टिकादिक । हत्ती नी कंसराजा हे मेलेले मी बघेन की ॥ १६ ॥
विभो - हे श्रीकृष्णा - परश्वः अहनि - परवाच्या दिवशी - हस्तिनं - हत्तीला - चाणूरं - चाणूराला - मुष्टिकं - मुष्टिकाला - अन्यान् मल्लान् - दुसर्या मल्लांना - च - आणि - कंसं - कंसाला - ते निहतं - तुझ्याकडून मारलेले - द्रक्ष्ये - मी पाहीन. ॥१६॥
हे प्रभो ! आता मी, परवा आपल्या हातून चाणूर, मुष्टिक, अन्य पहिलवान, कुवलयापीड हत्ती आणि कंस यांनासुद्धा मारलेले पाहीन. (१६)
तस्यानु शङ्खयवन मुराणां नरकस्य च ।
पारिजातापहरणं इन्द्रस्य च पराजयम् ॥ १७ ॥
काल यौवन नी मूर शंखा नी नरकासुरो । मेलेले पाहि ती मौज कल्पवृक्षासि आणिता ॥ १७ ॥
तस्य अनु - त्याच्या मागून - शङखयवनमुराणां - शंख, यवन व मुर या दैत्यांचा - च - आणि - नरकस्य - नरकासुराचा - वधं - वध - पारिजातापहरणं - पारिजातक वृक्षाचे हरण - च - आणि - इन्द्रस्य पराजयं - इंद्राचा पराजय. ॥१७॥
त्यानंतर शंखासुर, कालयवन, मुर आणि नरकासुर यांचा वध झाल्याचे पाहीन. आपण स्वर्गातून कल्पवृक्ष उखडून आणाल आणि इंद्राचा पराजय कराल. (१७)
उद्वाहं वीरकन्यानां वीर्यशुल्कादिलक्षणम् ।
नृगस्य मोक्षणं शापाद् द्वारकायां जगत्पते ॥ १८ ॥
कृपा नी वीरता रूपा पाहोनी शुल्क देउनी । वरितील बहू कन्या द्वारकी नृग मोचिसी ॥ १८ ॥
जगत्पते - हे जगाच्या पालका - द्वारकायां - द्वारकेमध्ये - वीरकन्यानां - वीरकन्यांचा - वीर्यशुल्कादिलक्षणं - पराक्रमरूपी मूल्य इत्यादि लक्षणांनी युक्त असा - उद्वाहं - विवाह - नृगस्य शापात् विमोक्षणं - नृगाची शापापासून सुटका. ॥१८॥
आपण आपले शौर्य, कृपा, सौंदर्य इत्यादींच्या आधारे वीरकन्यांबरोबर विवाह कराल आणि हे जगदीश्वरा ! आपण द्वारकेत राहून नृगाची पापातून मुक्तता कराल. (१८)
विवरण :- तू पुढे कोणते पराक्रम करणार आहेस, या गोष्टींची एक यादीच महर्षी कृष्णाला देतात. त्यापैकी 'राजकन्यांशी विवाह' हा एक. त्यांची प्राप्ती, पराक्रमाचे शुल्क देऊन. म्हणजेच त्यांना पराक्रम करून जिंकून, तू प्राप्त करशील. (भीष्मकादि वीरांची कन्या रुक्मिणी हिच्याशी विवाह.) (१८)
स्यमन्तकस्य च मणेः आदानं सह भार्यया ।
मृतपुत्रप्रदानं च ब्राह्मणस्य स्वधामतः ॥ १९ ॥
स्यमंतकमणी रत्न जांबवान् पासुनी तसा । आणिसी, द्विजपुत्राला मरता जीववीसि की ॥ १९ ॥
स्यमन्तकस्य मणेः भार्यया सह आदानं - स्यमंतक मण्याचा पत्नीसह केलेला स्वीकार - स्वधामतः ब्राह्मणस्य मृतपुत्रप्रदानं - स्वतःच्या स्थानापासून ब्राह्मणाचा मेलेला मुलगा परत देणे. ॥१९॥
आपण जांबवानांकडून जांबवती आणि स्यमंतक मणी घेऊन याल. तसेच आपल्या धामातून ब्राह्मणाच्या मृत पुत्रांना परत आणून द्याल. (१९)
पौण्ड्रकस्य वधं पश्चात् काशिपुर्याश्च दीपनम् ।
दन्तवक्रस्य निधनं चैद्यस्य च महाक्रतौ ॥ २० ॥
सोंगाड्या वासुदेवाला पौंड्रका वधुनी पुन्हा । जाळीसी काशिपूराते मारिसी शिशुपाल तू ॥ २० ॥
पौण्ड्रकस्य वधं - पौंड्रकाचा वध - पश्चात् काशिपुर्याः दीपनं - नंतर काशिनगरीचे जाळणे - महाक्रतौ - मोठया यज्ञात - चैद्यस्य - शिशुपालाचे - च - आणि - दन्तवक्रस्य - दंतवक्राचे - निधनं - मरण. ॥२०॥
त्यानंतर आपण पौंड्रकाचा वध कराल. काशीपुरी जाळून टाकाल. युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञामध्ये शिशुपाल आणि नंतर दंतवक्त्र यांचा वध कराल. (२०)
यानि चान्यानि वीर्याणि द्वारकामावसन् भवान् ।
कर्ता द्रक्ष्याम्यहं तानि गेयानि कविभिर्भुवि ॥ २१ ॥
द्वारकेस वसोनीया साधिशील पराक्रम । ज्ञानी नी प्रतिभावंत गातील तेहि पाहि मी ॥ २१ ॥
च - तसेच - द्वारकां आवसन् - द्वारकेत राहून - भवान् - तू - भुवि कविभिः गेयानि - पृथ्वीवर कवींना गाण्यास योग्य असे - यानि अन्यानि वीर्याणि कर्ता - जे दुसरे पराक्रम करशील - तानि (अपि) - तेहि - अहं द्रक्ष्यामि - मी पाहीन. ॥२१॥
प्रभो ! द्वारकेत निवास असताना आपण जे आणखी पुष्कळ पराक्रम कराल की ज्यांचे भविष्यामध्ये पृथ्वीवरील ज्ञानी पुरुष वर्णन करतील, ते सर्व मी पाहीन. (२१)
अथ ते कालरूपस्य क्षपयिष्णोरमुष्य वै ।
अक्षौहिणीनां निधनं द्रक्ष्याम्यर्जुनसारथेः ॥ २२ ॥
पृथ्वीचा भार सांडाया अर्जूनसारथी तसा । होवोनी कैक अक्षौणी मारिशी मीच पाहि तैं ॥ २२ ॥
अथ - नंतर - अर्जुनसारथेः - अर्जुनाचा सारथी अशा - वै - खरोखर - अमुष्य विश्वस्य क्षपयिष्णोः - ह्या विश्वाचा संहार करू इच्छिणार्या - कालरूपस्य - कालस्वरूपी - ते (कृतं) - तुझ्याकडून केले गेलेले - अक्षौहिणीनां निधनं द्रक्ष्यामि - अनेक अक्षौहिणी सैन्याचे मरण मी पाहीन. ॥२२॥
यानंतर पृथ्वीवरील भार नाहीसा करण्यासाठी आपण कालरूपाने अर्जुनाचे सारथी व्हाल आणि कित्येक अक्षौहिणी सैन्याचा संहार कराल. हेही मी पाहीन. (२२)
( मिश्र )
विशुद्धविज्ञानघनं स्वसंस्थया समाप्तसर्वार्थममोघवाञ्छितम् । स्वतेजसा नित्यनिवृत्तमाया गुणप्रवाहं भगवन्तमीमहि ॥ २३ ॥
( इंद्रवज्रा ) विशुद्ध विज्ञान घनःस्वरूपा वस्तूत होशी मिळाल्या तुला त्या । संसार चक्री नितमुक्त तूची गुणप्रवाहा तुजला नमी मी ॥ २३ ॥
विशुद्धविज्ञानघनं - अत्यंत शुद्ध अशा अनुभविक ज्ञानाने भरलेल्या अशा - स्वसंस्थया समाप्तसर्वार्थं - आपल्या स्वरूपाच्या योगाने पूर्ण आहेत सर्व इच्छा ज्याच्या अशा - अमोघवाञ्छितं - फुकट न जाणारी आहे इच्छा ज्याची अशा - स्वतेजसा - स्वतःच्या सामर्थ्याने - नित्यनिवृत्तमायागुणप्रवाहं - माया गुणांचा पसारा ज्याने निरंतर दूर केला आहे अशा - भगवन्तं - भगवंताला - ईमहि - आम्ही शरण जातो. ॥२३॥
प्रभो ! आपण शुद्ध ज्ञानस्वरूप आहात. आपल्या परमानंदस्वरूपामध्येच आपण राहाता, म्हणून सर्व पदार्थ आपल्याला नेहमीच प्राप्त असतात. आपला संकल्प अमोघ आहे. आपल्या चिन्मय शक्तीसमोर हे संसारचक्र कधी नसतेच. अशा सच्चिदानंदस्वरूप भगवंतांना मी शरण आलो आहे. (२३)
विवरण :- कृष्णाला अनेक प्रकारची संबोधने, विशेषणे वापरून महर्षी स्तुति करताना पुन्हा शेवटी म्हणतात, 'तू स्वाश्रय आहेस, म्हणजेच कोणाचाहि आधार न घेणारा, अनन्याधार (स्वे महिम्नि प्रतिष्ठितः) आहेस. तू 'विशुद्धविज्ञानघन' म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानाची मूर्तिच आहेस. 'समाप्तसर्वार्थकाम' म्हणजे स्वसामर्थ्याने सर्व पुरुषार्थांची प्राप्ती करून घेणारा. (पण निष्काम बुद्धीने) असा आहेस. 'निवृत्तमायागुणप्रवाह' आपल्या शक्तीने सर्व प्रकृतिगुण (निसर्गधर्म) निवृत्त करणारा, त्यांना दूर ठेवणारा; निर्मोही, मायेपासून मुक्त असा तू मायेने क्रीडा करण्यासाठी जगाची निर्मिती केलीस. स्वतः मनुष्यरूपही क्रीडा करण्यास आणि दुष्टांचा नाश करण्यास धारण केलेस. (२३)
त्वामीश्वरं स्वाश्रयमात्ममायया
विनिर्मिताशेषविशेषकल्पनम् । क्रीडार्थमद्यात्तमनुष्यविग्रहं नतोऽस्मि धुर्यं यदुवृष्णिसात्वताम् ॥ २४ ॥
स्वतंत्र तू नी तै आंतरात्मा न भेद तूते मुळि शेष नाही । क्रीडार्थ तू हा अवतार घेशी नमो तुला रे यदुवंश श्रेष्ठा ॥ २३ ॥
ईश्वरं - जगाचे नियंत्रण करणार्या - स्वाश्रयं - स्वतःचा आहे आश्रय ज्याला अशा - आत्ममायया विनिर्मिताशेषविशेषकल्पनं - स्वतःच्या मायेने निर्माण केल्या आहेत सर्व प्रकारच्या कल्पना ज्याने अशा - अद्य क्रीडार्थं आत्तमनुष्यविग्रहं - सांप्रत क्रीडेसाठी घेतले आहे मनुष्याचे शरीर ज्याने अशा - यदुवृष्णिसात्वतां धुर्यं - यादव, वृष्णि व सात्वत यांमध्ये श्रेष्ठ अशा - त्वां - तुला - नतः अस्मि - नम्र झालो आहे. ॥२४॥
आपण सर्वांचे नियंते आहात. आपण स्वतः मध्येच राहून आपल्या मायेने विश्वातील सर्व गोष्टी उत्पन्न केल्या आहेत. यावेळी आपली लीला प्रगट करण्यासाठी आपण मनुष्याच्या रूपाने यदू, वृष्णी आणि सात्वतवंशियांचे अग्रणी झाला आहात. प्रभो ! मी आपल्याला नमस्कार करीत आहे. (२४)
श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् ) एवं यदुपतिं कृष्णं भागवतप्रवरो मुनिः । प्रणिपत्याभ्यनुज्ञातो ययौ तद्दर्शनोत्सवः ॥ २५ ॥
( अनुष्टुप् ) श्रीशुकदेव सांगतात - देवर्षिनी असा कृष्ण स्तविला नी प्रणामिला । रोमांच उठले अंगी गेले आज्ञाहि घेउनी ॥ २५ ॥
तद्दर्शनोत्सवः - त्याच्या भेटीमुळे झाला आहे आनंद ज्याला असा - भागवतप्रवरः - भक्तांमध्ये श्रेष्ठ असा - मुनिः - नारद मुनि - यदुपतिं कृष्णं - यादवांचा स्वामी अशा श्रीकृष्णाला - एवं प्रणिपत्य - याप्रमाणे नमस्कार करून - (तेन च) अभ्यनुज्ञातः - आणि त्याने निरोप दिला गेलेला - ययौ - निघून गेला. ॥२५॥
श्रीशुक म्हणतात- भगवद्दर्शनाने आनंदित झालेल्या भगवद्भक्त देवर्षी नारदांनी अशा प्रकारे भगवंतांची स्तुती करून त्यांना प्रणाम केला. त्यानंतर त्यांची आज्ञा घेऊन ते तेथून निघून गेले. (२५)
भगवानपि गोविन्दो हत्वा केशिनमाहवे ।
पशूनपालयत् पालैः प्रीतैर्व्रजसुखावहः ॥ २६ ॥
केशीला मारिता कृष्ण गाई चारावया पुन्हा । जातसे खेळ खेळाया वनात लपना छपी ॥ २६ ॥
व्रजसुखावहः - गोकुळाला सुख देणारा - भगवान् गोविन्दः अपि - भगवान श्रीकृष्णहि - आहवे केशिनं हत्वा - युद्धात केशीला मारून - प्रीतैः पालैः सह - संतुष्ट झालेल्या गोपांसह - पशून् अपालयत् - गाई राखिता झाला. ॥२६॥
इकडे भगवान श्रीकृष्णांनी केशीला युद्धात मारल्यामुळे आनंदित झालेल्या बालगोपालांसह ते पूर्वीप्रमाणे गाई चारू लागले आणि गोकुळवासियांना आनंद देऊ लागले. (२६)
एकदा ते पशून् पालाःन् चारयन्तोऽद्रिसानुषु ।
चक्रुर्निलायनक्रीडाः चोरपालापदेशतः ॥ २७ ॥
एकदा चारता गाई चोर नी कुणि रक्षक । जाहले खेळती खेळ लपना छपनी असा ॥ २७ ॥
एकदा - एके दिवशी - अद्रिसानुषु पशून् चारयन्तः ते पालाः - पर्वताच्या शिखरांवर गुरे चारणारे ते गोप - चोरपालापदेशतः - चोर व रक्षक यांच्या मिषाने - निलायनक्रीडाः चक्रुः - लपंडावाचे खेळ करते झाले. ॥२७॥
एकदा ते सर्व गोपाल पर्वतमाथ्यावर गुरांना चारीत होते. त्यावेळी ते चोर-शिपाई असा लपंडावाचा खेळ खेळत होते. (२७)
तत्रासन्कतिचिच्चोराः पालाश्च कतिचिन्नृप ।
मेषायिताश्च तत्रैके विजह्रुरकुतोभयाः ॥ २८ ॥
सर्वात कुणि ते चोर मेंढा नी कुणि रक्षक । जाहले निर्भये खेळ खेळता रमले तसे ॥ २८ ॥
नृप - हे राजा - तत्र - त्यांपैकी - कतिचित् - काही - चौराः - चोर - च - आणि - कतिचित् - काही - पालाः - रक्षक - च - आणि - तत्र - तेथे - एके - काही - मेषायिताः - मेंढयांसारखे - आसन् - झाले - अकुतोभयाः - ज्यांना कोठूनही भीति नाही असे - विजह्लुः - खेळते झाले. ॥२८॥
राजन ! त्यांच्यापैकी काहीजण चोर, काहीजण शिपाई तर काहीजण बोकड बनले होते. अशा प्रकारे निर्भय होऊन ते खेळात रममाण झाले होते. (२८)
मयपुत्रो महामायो व्योमो गोपालवेषधृक् ।
मेषायितानपोवाह प्रायश्चोरायितो बहून् ॥ २९ ॥
त्या वेळी गोप वेषाने तो व्योमासुर पातला । चोर तो सहसा होई लपवी गोप मेंढ जे ॥ २९ ॥
महामायः - मोठे आहे कपट ज्यांचे असा - गोपालवेषधृक् - गोप वेष धारण करणारा - मयपुत्रः व्योमः - मयासुराचा मुलगा व्योम - प्रायः चोरायितः (सन्) - बहुत करून चोर झालेला असा - बहून् मेषायितान् - पुष्कळशा मेंढ्या झालेल्या गोपांना - अपोवाह - बाजूला नेता झाला. ॥२९॥
त्याचवेळी गवळ्याचा वेष घेऊन महामायावी मयाचा मुलगा व्योमासुर तेथे आला. खेळामध्ये तो बर्याच वेळा चोर होई आणि बोकड झालेल्या पुष्कळ मुलांना चोरून नेऊन लपवून ठेवीत असे. (२९)
गिरिदर्यां विनिक्षिप्य नीतं नीतं महासुरः ।
शिलया पिदधे द्वारं चतुःपञ्चावशेषिताः ॥ ३० ॥
गुंफेत लपवी गोप शिळेने बंद ती करी । खेळता चार वा पाच राहिले बाळ गोप ते ॥ ३० ॥
(सः) महासुरः - तो महाराक्षस - नीतं नीतं मेषायितं - नेलेल्या प्रत्येक मेंढी झालेल्या गोपाला - गिरिदर्यां विनिक्षिप्य - पर्वताच्या गुहेत फेकून - शिलया द्वारं पिदधे - शिळेने दार झाकिता झाला - चतुःपञ्च अवशेषिताः - चार पाच शिल्लक राहिले. ॥३०॥
तो महान असुर वारंवार त्यांना घेऊन जाऊन एका डोंगराच्या गुहेत ठेवून तिचे दार एका मोठ्या शिलाखंडाने झाकून टाकी. अशा प्रकारे गोपाळांपैकी फक्त चार-पाच शिल्लक राहिले. (३०)
तस्य तत्कर्म विज्ञाय कृष्णः शरणदः सताम् ।
गोपान् नयन्तं जग्राह वृकं हरिरिवौजसा ॥ ३१ ॥
कृष्णाने जाणिले कृत्य येता तो गोप न्यावया । कृष्णाने धरिला त्याला सिंह मेढी धरी तसा ॥ ३१ ॥
सतां शरणदः कृष्णः - सज्जनांना आश्रय देणारा श्रीकृष्ण - तस्य तत् कर्म विज्ञाय - त्याचे ते कृत्य जाणून - गोपान् नयन्तं तं - गोपांना हरण करणार्या त्याला - हरिः वृकं इव - सिंह जसा लांडग्याला त्याप्रमाणे - ओजसा जग्राह - वेगाने पकडिता झाला. ॥३१॥
भक्तरक्षक भगवंतांनी त्याची ही चाल ओळखली. जेव्हा तो गोपालांना घेऊन जात होता, त्याचवेळी सिंह जसा लांडग्याला पकडतो, तसे त्यांनी त्याला बळेच पकडले. (३१)
स निजं रूपमास्थाय गिरीन्द्रसदृशं बली ।
इच्छन् विमोक्तुमात्मानं नाशक्नोद् ग्रहणातुरः ॥ ३२ ॥
बळी व्योमासुरो मोठा घेतसे सत्य रूप ते । वाटले सुटतो त्याला परी कृष्णेचि दाबिले ॥ ३२ ॥
बली सः - बलवान असा तो केशी - गिरीन्द्रसदृशं निजं रूपं आस्थाय - हिमालयासारखे आपले स्वरूप धारण करून - आत्मानं मोक्तुं इच्छन् (अपि) - स्वतःला सोडवू इच्छित असताहि - ग्रहणातुरः - पकडण्याने व्याकुळ झालेला - न अशक्नोत् - समर्थ झाला नाही. ॥३२॥
बलवान व्योमासुराने एखाद्या पहाडाप्रमाणे आपले खरे रूप प्रगट केले आणि स्वतःला सोडवून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु भगवंतांनी पकडल्यामुळे कळवळणारा तो स्वतःला सोडवून घेऊ शकला नाही. (३२)
तं निगृह्याच्युतो दोर्भ्यां पातयित्वा महीतले ।
पश्यतां दिवि देवानां पशुमारममारयत् ॥ ३३ ॥
पाडिले भूमिसी आणि गळाचि फाडिला असे । विमानी देवता सर्व पाहती हरिची लिला ॥ ३३ ॥
अच्युतः - श्रीकृष्ण - दोर्भ्यां तं निगृह्य - दोन्ही हातांनी त्याला धरून - महीतले पातयित्वा - पृथ्वीवर पाडून - दिवि देवानां पश्यतां - स्वर्गात देव पहात असता - पशुमारं - पशूला मारावे तसे - अमारयत् - मारता झाला. ॥३३॥
तेव्हा श्रीकृष्णांनी आपल्या दोन्ही हातांनी जखडून टाकून त्याला जमिनीवर पाडले आणि एखाद्या पशूप्रमाणे त्याचा गळा दाबून त्याला मारले. देवता विमानांत बसून त्यांची ही लीला पाहात होते. (३३)
विवरण :- 'चोर-पालक, (चोर-शिपाई) खेळ खेळणार्या अनेक गोपांना त्यांच्यातीलच एक बनून व्योमासुराने गुहेत लपवून ठेवले. कृष्णाने त्याचे खरे रूप ओळखले आणि 'पशुमारममारयत्' म्हणजेच यज्ञात बळी देणार्या यज्ञीय पशूला ज्याप्रमाणे बुक्क्यांनी बुकलून ठार मारतात, त्याप्रमाणे मारले. (यज्ञात 'अज' बोकडास बळी देतात, इथेही त्याने अजाचे (मेंढयाचे) रूप घेतले होते. त्यामुळे पशुमारम् अशी उपमा दिली असावी.) तसेच त्याला जमिनीवर आपटले, असाही उल्लेख 'शेवटी सर्व देह हे मातीचेच आणि मातीतच मिळायचे' (माती असशी मातीत मिळसी) याही भावनेचे ते प्रतीक असावे. (नारद महर्षींनी व्योमासुराचा वध पाहिला नाही. तो पूर्वी म्हणजे शंखचूडाच्या वधापूर्वी केला असावा, असे काही विद्वान मानतात, तर काही केशीवधानंतर केला असे मानतात.) (३३)
गुहापिधानं निर्भिद्य गोपान् निःसार्य कृच्छ्रतः ।
स्तूयमानः सुरैर्गोपैः प्रविवेश स्वगोकुलम् ॥ ३४ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कन्धे पूर्वार्धे व्योमासुरवधो नाम सप्तत्रिंशोऽध्यायः ॥ ३७ ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
गुंफेचे दार कृष्णाने तोडोनी गोप सोडिले । गायल्या देवता श्रेष्ठ व्रजात गोप पातले ॥ ३४ ॥ ॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता । विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सदोतिसावा अध्याय हा ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
अथ - नंतर - गुहापिधानं निर्भिद्य - गुहेचे झाकण फोडून - गोपान् कृच्छ्रतः निःसार्य - गोपांना संकटातून बाहेर काढून - सुरैः गोपैः च स्तूयमानः (कृष्णः) - देवांनी व गोपांनी स्तविलेला श्रीकृष्ण - स्वगोकुलं प्रविवेश - आपल्या गौळवाडयात शिरला. ॥३४॥
नंतर श्रीकृष्णांनी गुहेच्या तोंडाशी लावलेला शिलाखंड फोडला आणि गोपाळांना त्या अडचणीतून बाहेर काढले. तेव्हा देव आणि गोपाळ त्यांची स्तुती करू लागले आणि श्रीकृष्ण आपल्या गोकुळात परत आले. (३४)
अध्याय सदतिसावा समाप्त |