|
श्रीमद् भागवत पुराण भगवतः प्रादुर्भावः गोपीनां आश्वासनं च - भगवंतांकडून गोपींचे सांत्वन - संहिता - अन्वय - अर्थ समश्लोकी - मराठी
श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् ) इति गोप्यः प्रगायन्त्यः प्रलपन्त्यश्च चित्रधा । रुरुदुः सुस्वरं राजन् कृष्णदर्शनलालसाः ॥ १ ॥
( अनुष्टुप् ) श्रीशुकदेव सांगतात - परीक्षित् ! भगवत्प्रेमी विरहीगीत बोलता । प्रियाच्या त्या वियोगाने मधूर रडू लागल्या ॥ १ ॥
राजन् - हे राजा - कृष्णदर्शनलालसाः गोप्यः - श्रीकृष्णाच्या भेटीसाठी उत्सुक अशा गोपी - इति - याप्रमाणे - प्रगायन्त्यः - गात - च - आणि - चित्रधा प्रलपन्त्यः - अनेक प्रकारांनी विलाप करीत - सुस्वरं रुरुदुः - मधुर स्वराने रडल्या. ॥१॥
श्रीशुकाचार्य म्हणतात - परीक्षिता ! अशा प्रकारे निरनिराळ्या रीतीने गाणार्या आणि विलाप करणार्या गोपी श्रीकृष्णांच्या दर्शानाच्या लालसेने मोठमोठ्याने रडू लागल्या. (१)
तासामाविरभूच्छौरिः स्मयमानमुखाम्बुजः ।
पीताम्बरधरः स्रग्वी साक्षान्मन्मथमन्मथः ॥ २ ॥
त्याच वेळी मधे कृष्ण प्रगटे हासरा तसा । पीतांबर कटी शोभे कामदेवास चाळि जो ॥ २ ॥
स्मयमानमुखाम्बुजः - हसणारे आहे मुखकमळ ज्याचे असा - पीताम्बरधरः - पिवळे वस्त्र धारण करणारा - स्रग्वी - माळ घातलेला - साक्षात् मन्मथमन्मथः - प्रत्यक्ष मदनाला मोह पाडणारा - शौरिः - श्रीकृष्ण - तासां (पुरः) - त्या गोपींच्या पुढे - आविः अभूत् - प्रकट झाला. ॥२॥
त्याचवेळी त्यांच्या मध्यभागी भगवान श्रीकृष्ण प्रगट झाले. त्यांचे मुखकमल स्मितहास्याने खुलले होते. गळ्यात वनमाला होती, पीतांबर धारण केला होता. त्यांचे हे रूप कामदेवालाही मोहविणारे होते. (२)
तं विलोक्यागतं प्रेष्ठं प्रीत्युत्फुल्लदृशोऽबलाः ।
उत्तस्थुर्युगपत् सर्वाः तन्वः प्राणमिवागतम् ॥ ३ ॥
कोटि कामाहुनी दिव्य श्यामसुंदर पाहता । उठल्या सर्व त्या गोपी नव चैतन्य पातले ॥ ३ ॥
तं प्रेष्ठं आगतं विलोक्य - त्या अत्यंत प्रियकराला आलेला पाहून - प्रीत्युत्फुल्लदृशः - प्रेमाने फुलले आहेत नेत्र ज्यांचे - (ताः) सर्वाः अबलाः - अशा त्या सर्व स्त्रिया - प्राणं आगतं तन्वः इव - प्राण आला असता जशी शरीरे तशा - युगपत् उत्तस्थु - एकदम उभ्या राहिल्या. ॥३॥
तो प्रियतम आल्याचे पाहून गोपींचे डोळे प्रेमाने आणि आनंदाने प्रफुल्लित झाले. जशी अचेतन शरीरांमध्ये प्राणांचा संचार होताच ती उठावी, त्याप्रमाणे त्या सर्वजणी एकदम उठून उभ्या राहिल्या. (३)
काचित् कराम्बुजं शौरेः जगृहेऽञ्जलिना मुदा ।
काचिद् दधार तद्बाहुं अंसे चन्दनरूषितम् ॥ ४ ॥
एक प्रेमे धरी हात सौख्याने बोलु लागली । दुसरी चंदनी दंड खांद्याशी ठेविते तदा ॥ ४ ॥
काचित् - कोणीएक स्त्री - मुदा - आनंदाने - शौरेः कराम्बुजम् - श्रीकृष्णाचा कमळासारखा हात - अञ्जलिना जगृहे - दोन्ही हातांनी धरिती झाली - काचित् - कोणीएक स्त्री - चन्दनभूषितं तद्बाहुम् - चंदनाने भूषविलेला त्याचा दंड - अंसे - खांद्यावर - दधार - धारण करिती झाली. ॥४॥
कोणी आनंदाने श्रीकृष्णांचा हात आपल्या दोन्ही हातांमध्ये धरला, तर दुसरीने त्यांचा चंदनचर्चित बाहू आपल्या खांद्यावर घेतला. (४)
काचिद् अञ्जलिनागृह्णात् तन्वी ताम्बूलचर्वितम् ।
एका तदङ्घ्रिकमलं सन्तप्ता स्तनयोरधात् ॥ ५ ॥
तांबूल मुखिचा कोणी हातात घेतला तसा । तिसरी बसुनी कोणी स्तनाशी पाय आवळी ॥ ५ ॥
काचित् तन्वी - कोणीएक स्त्री - ताम्बूलचर्वितम् - विडयाचा चोथा - अञ्जलिना अगृह्णात् - ओंजळीत घेती झाली - (कामेन) संतप्ता एका - कामसंतप्त अशी एक स्त्री - तदङ्घ्रिकमलम् - त्याचा कमळासारखा पाय - स्तनयोः अधात् - स्तनांवर ठेविती झाली. ॥५॥
कोणी भगवंतांनी खाल्लेला विडा आपल्या हातात घेतला. तर एका विरहतप्त गोपीने त्यांचे चरणकमल आपल्या वक्षःस्थळांवर ठेवून घेतले. (५)
एका भ्रुकुटिमाबध्य प्रेमसंरम्भविह्वला ।
घ्नन्तीवैक्षत् कटाक्षेपैः सन्दष्टदशनच्छदा ॥ ६ ॥
पाचवी प्रणये कोपी विव्हला ताणि भूवया । दातांनी ओठ चावोनी कटाक्षें विंधिते पहा ॥ ६ ॥
प्रेमसंरम्भविह्वला - प्रेमाच्या तीव्रतेमुळे व्याकुळ झालेली - सन्दष्टदशनच्छदा - चावला आहे ओठ जिने अशी - एका - एक स्त्री - भ्रुकुटिं आबध्य - भुंवया वर चढवून - कटाक्षेपैः - वाकडया दृष्टीच्या - घ्नन्ती इव - प्रहारांनी जणु काय मारीतच - (तं) ऐक्षत् - त्याजकडे पाहती झाली. ॥६॥
एक गोपी प्रणयकोपाने क्रुद्ध होऊन, भुवया उंचावून, दात ओठ चावीत, आपल्या कटाक्षबाणांनी त्यांना घायाळ करीत, त्यांच्याकडे पाहू लागली. (६)
अपरानिमिषद् दृग्भ्यां जुषाणा तन्मुखाम्बुजम् ।
आपीतमपि नातृप्यत् सन्तस्तच्चरणं यथा ॥ ७ ॥
कुणी ती टक लावोनी मुखा नेत्रेचि प्राशिते । संतां तृप्ती नसे जैशी हिलाही नच तृप्ति तैं ॥ ७ ॥
अनिमिषदृग्भ्याम् - टक लावून पाहणार्या अशा डोळ्यांनी - आपीतं अपि - प्यालेल्या अशाहि - तन्मुखाम्बुजं - त्याच्या मुखरूपी कमळाचे - (पुनः) जुषाणा - फिरून सेवन करणारी - अपरा - दुसरी एक स्त्री - यथा तच्चरणं - ज्याप्रमाणे त्या श्रीकृष्णाच्या चरणाचे - (जुषाणाः) सन्तः (तथा) - सेवन करणारे सज्जन त्याप्रमाणे - न अतृप्यत् - तृप्त झाली नाही. ॥७॥
आणखी एक गोपी डोळ्यांच्या पापण्या न मिटता त्यांच्या मुखकमलातील मकरंद पिऊ लागली; परंतु ज्याप्रमांणे संतपुरुष भगवंतांच्या चरणांच्या दर्शनाने कधीही तृप्त होत नाहीत, त्याचप्रमाणे ती तृप्त होत नव्हती. (७)
तं काचिन्नेत्ररन्ध्रेण हृदिकृत्य निमील्य च ।
पुलकाङ्ग्युपगुह्यास्ते योगीवानन्दसम्प्लुता ॥ ८ ॥
एक तो हृदयी कोंडी घेई नेत्र मिटोनिया । मनीं आलिंगिता त्याला उठले रोम अंगिचे ॥ ८ ॥
नेत्ररन्ध्रेण - नेत्ररूपी छिद्राच्या द्वाराने - तं हृदि कृत्य - त्याला हृदयात घेऊन, - निमील्य उपगुह्य च - डोळे मिटून व त्याला आलिंगून - पुलकाङगी काचित् - रोमांचानी युक्त अशी एक स्त्री - योगी इव - योग्याप्रमाणे - आनंदसम्प्लुता आस्ते - आनंदात बुडून राहिली. ॥८॥
कोणी एक गोपी डोळ्यांतून भगवंतांना हृदयात घेऊन गेली आणि तिने डोळे बंद केले. आता मनोमन भगवंतांना आलिंगन दिल्याने तिचे शरीर पुलकित झाले, रोम-अन-रोम उभे राहिले आणि योग्याप्रमाणे ती परमानंदामध्ये मग्न झाली. (८)
सर्वास्ताः केशवालोक परमोत्सवनिर्वृताः ।
जहुर्विरहजं तापं प्राज्ञं प्राप्य यथा जनाः ॥ ९ ॥
संत मुक्त जसे होती तशा गोपी प्रमोदल्या । विरहो संपला सारा शांतिडोहात डुंबल्या ॥ ९ ॥
यथा जनाः प्राज्ञं प्राप्य - ज्याप्रमाणे सामान्य लोक ज्ञान्याजवळ जाऊन - केशवालोकपरमोत्सवनिर्वृताः - श्रीकृष्णाच्या दर्शनाने झालेल्या मोठया आनंदामुळे सुखी झालेल्या - ताः सर्वाः - त्या सर्व स्त्रिया - विरहजं तापं जहुः - विरहामुळे उत्पन्न झालेल्या तापाला टाकित्या झाल्या. ॥९॥
परमात्म्याची भेट झाल्यावर ज्याप्रमाणे मुमुक्षू संसार तापातून मुक्त होतात, त्याप्रमाणे श्रीकृष्णांच्या दर्शनाने सर्व गोपींना परमानंद झाला आणि विरहामुळे झालेले दुःख त्या विसरल्या. (९)
विवरण :- एकतिसावा अध्याय 'गोपीगीत' म्हणजे विरहगीत म्हटले तरी चालेल. कृष्णाच्या विरहाने गोपी इतक्या व्याकुळ झाल्या की शेवटी भावनांचा उद्रेक होऊन त्या आर्त स्वरात रडू लागल्या. अर्थात असे रडणे म्हणजेच भक्तीचा उद्रेक. त्या अश्रूंच्या पुरात त्यांचा सर्व गर्व धुवून गेला आणि त्या शुद्धचित्त झाल्या. त्याबरोबर भगवान लगेच प्रकट झाले. गोपींना ब्रह्मानंद झाला. इथे कृष्णाला 'शौरि' म्हटले आहे. गोपींना तो विरहताप देणार्या सुर्याप्रमाणे वाटला. सूर्य ताप देतो म्हणून तो नको थोडाच आहे ? त्याचेशिवाय तर जीवन नाही. म्हणून कृष्ण दिसल्याबरोबर जणू निष्प्राण शरीरात प्राण आल्याप्रमाणे त्या त्याच्याकडे धावल्या व क्रीडा करू लागल्या. इथे आणखी एक प्रश्न येतो, आपल्यावर जीव टाकणार्या गोपींना कृष्ण सोडून गेला; मग तो दिसताच सर्व विसरून त्या त्याचेकडे कशा धावल्या ? यालाच 'प्रेमाची उलटी चाल' म्हणतात. मान-अपमानरहित, हार-जीतरहित. उलट इथे जो हरतो, तो जिंकतो आणि हरवणार्याला तो आपलेसे करतो आणि जिंकणारा हरतो. हरणार्यापासून दूर जातो. कृष्णापासून दूर जाणे म्हणजे प्राणांपासून विभक्त होणे. अशा निष्प्राण शरीराचा काय उपयोग ? म्हणूनच आपल्या उत्कट भक्तीने गोपींनी कृष्णाला आपलेसे केले. (२-९)
ताभिर्विधूतशोकाभिः भगवानच्युतो वृतः ।
व्यरोचताधिकं तात पुरुषः शक्तिभिर्यथा ॥ १० ॥
एकरस असा कृष्ण सौंदर्य श्रेष्ठ ते असे । राहिला गोपिच्या मध्ये तपाने पावतो तसा ॥ १० ॥
तात - हे राजा - विधूतशोकाभिःताभिः वृतः - नष्ट झाला आहे शोक ज्यांचा अशा त्या स्त्रियांनी वेष्टिलेला - भगवान् अच्युतः - भगवान श्रीकृष्ण - यथां शाक्तिभिः (वृतः) पुरुषः (तथा) - ज्याप्रमाणे राजससामर्थ्याने युक्त असलेला मनुष्य त्याप्रमाणे - अधिकं व्यरोचत - अधिक शोभला. ॥१०॥
परीक्षिता ! ज्याप्रमाणे शक्तींनी युक्त नारायण अधिक शोभावे, त्याप्रमाणे विरहव्यथेतून मुक्त झालेल्या गोपींमध्ये श्रीकृष्ण विशेषच शोभू लागले. (१०)
ताः समादाय कालिन्द्या निर्विश्य पुलिनं विभुः ।
विकसत्कुन्दमन्दार सुरभ्यनिलषट्पदम् ॥ ११ ॥ शरच्चन्द्रांशुसन्दोह ध्वस्तदोषातमः शिवम् । कृष्णाया हस्ततरला चितकोमलवालुकम् ॥ १२ ॥
गोपिंच्या सहही कृष्ण वाळूत पातला पुन्हा । वाहे गंधीत वायू तै भुंगेही मत्त जाहले ॥ ११ ॥ त्या वेळी पूर्ण तो चंद्र चांदणे वर्षला बहू । न वाटे रात्रिची वेळ रंगमंच तटी जसा ॥ १२ ॥
ताः समादाय - त्या स्त्रियांना घेऊन - विकसत्कुन्दमन्दारसुरभ्यनिलषट्पदम् - उमलणार्या फुलांच्या योगाने सुगंधित झालेल्या वार्याबरोबर आलेले भुंगे ज्यामध्ये अशा - शरच्चन्द्रांशुसन्दोहध्वस्तदोषातमः - शरत्काळच्या चंद्रकिरणाच्या समूहाने नष्ट झाला आहे रात्रीचा अंधकार जेथील अशा - कृष्णायाः हस्ततरलाचित कोमलवालुकम् - यमुनेच्या तरंगरूपी हातांनी पसरली आहे मऊ अशी वाळू जेथे अशा - कालिन्द्याः पुलिनं निर्विश्य - यमुनेच्या वाळवंटात शिरून - विभुः (व्यरोचत) - श्रीकृष्ण शोभला. ॥११-१२॥
यानंतर भगवान श्रीकृष्णांनी त्या व्रजसुंदरींना आपल्याबरोबर घेऊन यमुनेच्या वाळवंटात प्रवेश केला. त्यावेळी उमललेल्या कुंद आणि मंदाराच्या फुलांचा सुगंध घेऊन सुगंधित वायू वाहात होता आणि त्याच्या वासाने धुंद झालेले भ्रमर इकडे तिकडे गुंजारव करीत होते. (११) शरद-पौर्णिमेच्या चांदण्यामुळे रात्रीच्या अंधाराचा काही पत्ताच नव्हता. सगळीकडे मांगल्य पसरले होते. तेथे यमुना नदीने स्वतः आपल्या लाटांच्या हातांनी कोमल वाळू पसरली होती. (१२)
विवरण :- गोपींनी वेढलेला कृष्ण यमुनेच्या वाळवंटात आला. तो कोणाप्रमाणे दिसत होता ? लक्ष्मीने युक्त असणार्या विष्णूप्रमाणे, किंवा शक्तियुक्त परमात्म्याप्रमाणे, (जणू एकमेकांशिवाय दोघांचेहि अस्तित्व अपूर्ण) प्रकृतियुक्त पुरुषाप्रमाणे, या सर्वांप्रमाणेच गोपींशिवाय कृष्णाला अपूर्णत्व, म्हणूनच त्याला 'गोपीकृष्ण' हेही नाव असावे. (११)
( मिश्र )
तद्दर्शनाह्लादविधूतहृद्रुजो मनोरथान्तं श्रुतयो यथा ययुः । स्वैरुत्तरीयैः कुचकुङ्कुमाङ्कितैः अचीक्लृपन्नासनमात्मबन्धवे ॥ १३ ॥
( इंद्रवज्रा ) उल्हास आला बहु गोपिकांना गेल्या मिटोनी मग व्याधि सर्व । श्रुती जशा त्या कृतकृत्य होती नी ओढणीशी लपवी कुणी त्या ॥ १३ ॥
तद्दर्शनाह्लादविधूतहृद्रुजः (ताः) - त्याच्या दर्शनाच्या आनंदामुळे नष्ट झाला आहे हृद्रोग ज्यांचा अशा त्या स्त्रिया - यथा श्रुतयः (तथा) - जशा श्रुति अशा - मनोरथान्तं ययुः - सर्व इच्छांच्या पूर्ततेला गेल्या - कुचकुङ्कुमाङ्कितैः स्वैः उत्तरीयैः - स्तनांवरील केशराने चिन्हीत झालेल्या आपल्या पांघरण्याच्या वस्त्रांनी - आत्मबन्धवे (तस्मै) - आपला बांधव अशा त्या श्रीकृष्णासाठी - आसनं अचीक्लुपन् - आसन करित्या झाल्या. ॥१३॥
श्रीकृष्णांच्या दर्शनाच्या आनंदाने गोपींच्या हृदयातील सगळी व्यथा नाहीशी होऊन त्यांचे मनोरथ पूर्ण झाले. जसे वेद कर्मकांडांचे वर्णन करूनही ईश्वर दर्शनाअभावी अतृप्त असतात, पण ज्ञानकांडाचे प्रतिपादन करून ईश्वर दर्शनाने कृतकृत्य होतात. आता त्यांनी आपल्या वक्षःस्थळावर लागलेल्या कुंकुम-केशराच्या रंगाने रंगलेली उपवस्त्रे आपल्या परमप्रियाला बसण्यासाठी अंथरली. (१३)
विवरण :- वेदवाक्यांचा अर्थ कर्मकाण्डपर लावल्याने त्यामध्ये अपूर्णता येते. त्यातून परमेश्वरप्राप्ती होत नाही. परंतु ज्ञानकांडपर लावल्यास कर्मकांड-अज्ञान यांचा नाश होऊन परमेश्वरप्राप्ती होते. त्याप्रमाणे श्रीकृष्ण दर्शनाने गोपींचा विरहताप नाहीसा होऊन त्या आनंदी झाल्या. (१३)
तत्रोपविष्टो भगवान् स ईश्वरो
योगेश्वरान्तर्हृदि कल्पितासनः । चकास गोपीपरिषद्गतोऽर्चितः त्रैलोक्यलक्ष्म्येकपदं वपुर्दधत् ॥ १४ ॥
योगेश्वराला हृदयी धराया त्या इच्छिताही नच थांबतो की । तो शोभला गोपिंका माजि ऐसा त्रैलोक्य शोभा जणु तैं जहाली ॥ १४ ॥
तत्र उपविष्टः - त्याठिकाणी बसलेला - योगेश्वरान्तर्हृदि कल्पितासनः - श्रेष्ठ योग्यांच्या हृदयात कल्पिलेले आहे आसन ज्याचे असा - त्रैलोक्यलक्षमयैकपदं वपुः दधत् - त्रैलोक्यातील शोभेचे एकटे एक स्थान असे शरीर धारण करणारा - सः भगवान् ईश्वरः - तो भगवान श्रीकृष्ण - गोपीपरिषद्गतः अर्चितः चकासे - गोपीच्या समुदायामध्ये बसलेला व त्यांनी पूजिलेला असा शोभला. ॥१४॥
योगेश्वरांनी आपल्या हृदयामध्ये ज्यांच्यासाठी आसन केलेले असते, तेच सर्वशक्तिमान भगवान तेथे गोपींच्या ओढण्यांवर बसले. गोपींच्या मध्यभागी त्यांच्याकडून पूजित होऊन भगवान अतिशय शोभून दिसत होते. त्रैलोक्यातील सौंदर्य ज्याच्या ठिकाणी एकवटले होते, असा श्रीविग्रह त्यांनी यावेळी धारण केला होता. (१४)
सभाजयित्वा तमनङ्गदीपनं
सहासलीलेक्षणविभ्रमभ्रुवा । संस्पर्शनेनाङ्ककृताङ्घ्रिहस्तयोः संस्तुत्य ईषत्कुपिता बभाषिरे ॥ १५ ॥
गोपिंसि आले बहु प्रेम कृष्णा केले असे स्वागत हासुनीया । पोटास कोणीी धरि पाय त्याचे रुसोनि कोणी वदती हरीला ॥ १५ ॥
सहासलीलेक्षणविभ्रमभ्रुवा - हास्याने युक्त अशा लीलेने पाहण्यामुळे चंचल आहेत भुवया ज्यांच्या अशा - अङककृताङ्घ्रिहस्तयोः संस्पर्शनेन - मांडीवर घेतलेले पाय व हात यांच्या उत्तम स्पर्शाने - अनङगदीपनं तं सभाजयित्वा - मदनाला उत्तेजित करणार्या त्याला सत्कारून - संस्तुत्य - चांगल्या रीतीने वाखाणून - ईषत्कुपिताः - थोडयाशा रागावलेल्या - बभाषिरे - म्हणाल्या. ॥१५॥
भगवान श्रीकृष्ण आपल्या या अलौकिक सौंदर्याच्या द्वारा त्यांचे प्रेम आणि आकांक्षा आणखी उंचावून ठेवीत होते. गोपींनी आपले सलज्ज पाहाणी, स्मितहास्य आणि विलासपूर्ण कटाक्ष यांनी त्यांचा सन्मान केला. कोणी त्यांचे चरणकमल मांडीवर घेऊन चुरले, तर कोणी त्यांचे हात कुरवाळले. जणू हीच त्यांनी केलेली स्तुती ! नंतर काहीशा रागावून त्या म्हणाल्या. (१५)
श्रीगोप्य ऊचुः -
( अनुष्टुप् ) भजतोऽनुभजन्त्येक एक एतद्विपर्ययम् । नोभयांश्च भजन्त्येक एतन्नो ब्रूहि साधु भोः ॥ १६ ॥
( अनुष्टुप् ) गोपिका म्हणाली - प्रेमीसी प्रेम ते कोणी अप्रेमा प्रेम दे कुणी । नेच्छिती कोणि ते दोन्ही तिन्हीत काय ते रुचे ॥ १६ ॥
एके (स्वं) भजतः अनुभजन्ति - कित्येक जण स्वतःला अनुसरणार्यांना अनुसरतात - एके एतद्विपर्ययं (अपि अनुभजन्ति) - कित्येक याच्या उलटहि अनुसरतात - च - आणि - एके - कित्येक - उभयान् (अपि) न भजन्ति - दोघांनाहि अनुसरत नाहीत - भोः - हे श्रीकृष्णा - एतत् नः साधु ब्रूहि - हे आम्हाला तू नीट सांग. ॥१६॥
गोपी म्हणाल्या - हे श्रीकृष्णा ! काही लोक प्रेम करणार्यांवरच प्रेम करतात आणि काही लोक प्रेम न करणार्यांवरसुद्धा प्रेम करतात. परंतु काहीजण तर या दोघांवरही प्रेम करीत नाहीत. तर याविषयी आम्हांला समजावून सांगा. (१६)
विवरण :- उत्कट प्रेमाची, भक्तीची आणखी एक खूण इथे दिसते. गोपी कृष्णावर अगदी मनापासून रागाऊच शकत नाहीत. जो असतो, तो लटका राग, अगदी वरवरचा, आपणांस काहीच कल्पना नसताना कृष्णाने अंतर्धान पावून भयानक विरहवेदना दिल्या; तरी तो प्रकट होताच त्या देहभान हरपून धावत त्याच्याकडे गेल्या, त्याचे स्पर्शसुख अनुभवले, त्याला डोळ्यात साठविले, मग काही वेळाने काहीशा आश्वस्त होऊन त्या त्याच्याशी हितगूज करू लागल्या. मात्र त्यांच्या मनातील सुप्त रोष प्रश्नरूपाने बाहेर पडलाच. त्यांनी प्रश्न केला, काही लोक उपकाराच्या परतफेडीसाठी काही पुन्हा मिळावे म्हणून कृतज्ञता ठेवतात व काही प्रत्युपकार करणार्याबद्दलची कृतज्ञता ठेवीत नाहीत, यातील चांगले काय ? आपणांस न सांगता कृष्ण नाहीसा झाला आणि त्याने आपल्या प्रेमाची कदर ठेवली नाही हे गोपींना सुचवायचे आहे, हे कृष्णाने जाणले. अर्थात असा प्रश्न फक्त गोपीच करू शकतात, तो त्यांचाच अधिकार हे तो जाणत होता. त्याने त्यांचे समाधान करत उत्तर दिले. तुमचे मोठेपण, सेवा मी जाणतो. पण मी दिसतो, तोपर्यंतच माझी सेवा नसावी म्हणून मी अंतर्धान पावलो. तुमचे प्रेम निष्कपट, निर्व्याज, त्यातून मी उतराई होऊ शकत नाही, तशी इच्छाही नाही. आपल्या संसाराच्या शृंखला तोडून तुम्ही माझ्याकडे येता, ही सेवा अत्यंत श्रेष्ठ, हे मी जाणतो. तुमच्या ऋणातच मला कायम राहू दे ! (१६)
श्रीभगवानुवाच -
मिथो भजन्ति ये सख्यः स्वार्थैकान्तोद्यमा हि ते । न तत्र सौहृदं धर्मः स्वार्थार्थं तद्धि नान्यथा ॥ १७ ॥
भगवान् श्रीकृष्ण म्हणाले - प्रेमीला प्रेम जे देती स्वार्थ उद्योग तो तसा । न स्नेह धर्मही त्यात हेतू स्वार्थचि एक तै ॥ १७ ॥
सख्य - हे सखींनो - ये मिथः भजन्ति - जे परस्परांची सेवा करितात - ते हि स्वार्थैकान्तोद्यमाः (सन्ति) - ते खरोखर एका स्वार्थासाठीच आहे उद्योग ज्यांचा असे होत - तत्र सौहृदं धर्मः (च) न (अस्ति) - त्याठिकाणी प्रेम किंवा धर्म नसतो - हि - कारण - तत् स्वार्थार्थं (एव अस्ति) - ते स्वतःच्या हितासाठीच असते - न अन्यथा - दुसर्यासाठी नसते. ॥१७॥
श्रीभगवान म्हणाले - सख्यांनो ! जे प्रेम करणार्यांवर प्रेम करतात, त्यांचा सर्व उद्योग हा केवळ स्वार्थासाठीच असतो, त्यामध्ये सौहार्द नाही की धर्म नाही. त्यांचे प्रेम फक्त स्वार्थापोटीच आहे; याखेरीज त्यांचा दुसरा कोणताही हेतू नाही. (१७)
भजन्त्यभजतो ये वै करुणाः पितरो यथा ।
धर्मो निरपवादोऽत्र सौहृदं च सुमध्यमाः ॥ १८ ॥
अप्रेमा प्रेम जे देती हितैषी माय-बाप जै । सत्य स्वच्छ असा धर्म व्यव्हारी तोच एकला ॥ १८ ॥
सुमध्यमाः - हे सुंदरींनो - ये वै करुणाः - जे दयाळू असे लोक - यथा पितरः (तथा) - ज्याप्रमाणे आईबाप त्याप्रमाणे - अभजतः भजन्ति - आपली सेवा न करणार्यांचीहि सेवा करितात - अत्र - ह्याठिकाणी - निरपवादः धर्मः सौहृदं च (भवति) - आक्षेपरहित असा धर्म आणि प्रेमहि असते. ॥१८॥
हे सुंदरींनो ! जे लोक प्रेम न करणार्यांवरही प्रेम करतात - जसे, स्वभावतःच करुणाशील असलेले सज्जन आणि माता-पिता. त्यांच्या मनात दुसर्यांचे हित व्हावे, एवढीच इच्छा असते आणि त्यांच्या व्यवहारामध्ये खरा धर्म असतो. (१८)
भजतोऽपि न वै केचिद् भजन्त्यभजतः कुतः ।
आत्मारामा ह्याप्तकामा अकृतज्ञा गुरुद्रुहः ॥ १९ ॥
न प्रेम लाविती कोठे तयांचा प्रश्न ना उरे । अद्वैती स्वरुपी धन्य किंवा तो गुरुद्रोहिची ॥ १९ ॥
वै - खरोखर - केचित् - कित्येक - भजतः अपि न भजन्ति - आपली सेवा करणार्याचीहि सेवा करीत नाहीत - अभजतः कुतः (भजन्ति) - आपली सेवा न करणार्यांची कोठून सेवा करणार - (एते) हि - खरोखर हे - आत्मारामाः - स्वसंतुष्ट असे, - आप्तकामाः - मिळविली आहे इष्ट वस्तू ज्यांनी असे, - अकृतज्ञाः - केलेले उपकार न जाणणारे असे - गुरुद्रुहः (इति चतुर्विधाः सन्ति) - व गुरूशी द्रोह करणारे असे चार प्रकारचे असतात. ॥१९॥
काही लोक प्रेम करणार्यांवरही प्रेम करीत नाहीत, मग प्रेम न करणार्यांच्यावर कोठून करतील ? असे लोक चार प्रकारचे असतात. एक, जे आपल्या स्वरूपातच रमणारे असतात. दुसरे, जे कृतकृत्य असतात. तिसरे, स्वतःवर कोण प्रेम करतात हे ज्यांना माहीतच नसते आणि चौथे, जाणून-बुजून परोपकारी गुरुतुल्य लोकांचासुद्धा द्रोह करणारे. (१९)
( मिश्र )
नाहं तु सख्यो भजतोऽपि जन्तून् भजाम्यमीषामनुवृत्तिवृत्तये । यथाधनो लब्धधने विनष्टे तच्चिन्तयान्यन्निभृतो न वेद ॥ २० ॥ एवं मदर्थोज्झितलोकवेद स्वानां हि वो मय्यनुवृत्तयेऽबलाः । मयापरोक्षं भजता तिरोहितं मासूयितुं मार्हथ तत् प्रियं प्रियाः ॥ २१ ॥
( इंद्रवज्रा ) न वागतो मी प्रिय इच्छि तैसे या कारणे की पदि ध्यान लागो । लोभी जसा ध्यायि धनास तैसे तसाचि जातो हृदयात त्याच्या ॥ २० ॥ मदर्थ लज्जा अन वेदमार्ग त्यजोनि येता स्थिर बुद्धि होवो । परोक्ष प्रेमार्थ लपोनि गेलो न प्रेमि माझ्या मुळि दोष लावा । प्रीया तुम्ही तो मज सर्व आहा नी प्रीय सर्वांसहि मीच आहे ॥ २१ ॥
तु - परंतु - सख्यः - हे सखींनो - भजतः जन्तून् अपि - माझी सेवा करणार्या प्राण्यांची सुद्धा - अमीषाम् अनुवृत्तिवृत्तये - त्यांच्या सेवेच्या वेतनासाठी - अहं न भजामि - मी सेवा करीत नाही - यथा - ज्याप्रमाणे - अधनः - ज्याच्याजवळ द्रव्य नाही असा मनुष्य - लब्धधने विनष्टे (सति) - मिळालेले द्रव्य नाहीसे झाले असता - तच्चिन्तया निभृतः - त्याच्या काळजीने व्यापिलेला - अन्यत् न वेद - दुसरे काही जाणत नाही - एवम् - याप्रमाणे - अबलाः - हे स्त्रियांनो - मदर्थोज्झित - माझ्यासाठी सोडले आहेत - लोकवेदस्वानां - लोकाचार, धर्माधर्म व भाऊबंद ज्यांनी अशा - वः - तुमचे - मयि अनुवृत्तये - माझ्यावरील भक्तीसाठी - परोक्षं भजता - अप्रत्यक्ष कल्याण करणारा - मया हि तिरोहितं - मी खरोखर गुप्त झालो होतो - प्रिया - हे प्रियकरिणींनो - प्रियं मा - प्रियकर अशा मजवर - असूयितं मा अर्हथ - रागावण्यास तुम्ही योग्य नाही. ॥२०-२१॥
सख्यांनो ! मी तर प्रेम करणार्यांवर सुद्धा प्रेम करीत नाही. कारण त्यांची चित्तवृत्ती माझ्याकडेच नेहमी लागून राहावी म्हणून. जसे एखाद्या निर्धन पुरुषाला कधी पुष्कळसे धन मिळावे आणि नंतर ते नाहीसे व्हावे तेव्हा त्याचे हृदय जसे हरवलेल्या धनाच्या चिंतेने भरून जाते, तसाच मीसुद्धा प्राप्त होऊन पुन्हा लपून राहातो. कारण नाहीशा झालेल्या माझेच भक्तांनी चिंतन करावे म्हणून. (२०) गोपींनो ! तुम्ही माझ्यासाठी लोकमर्यादा, वेदोपदेश आणि आपल्या नातलगांनाही सोडले आहे, याविषयी शंका नाही. अशा स्थितीत तुमची मनोवृत्ती माझ्या ठिकाणीच लागून राहावी, यासाठी अप्रत्यक्षपणे तुमच्यावर प्रेम करीत मी लपलो होतो. म्हणून हे प्रियांनो ! तुम्ही, तुम्हांला प्रिय असणार्या माझ्या, तुमच्यावरील प्रेमात उणीव पाहू नका. (२१)
न पारयेऽहं निरवद्यसंयुजां
स्वसाधुकृत्यं विबुधायुषापि वः । या माभजन् दुर्जरगेहशृङ्खलाः संवृश्च्य तद् वः प्रतियातु साधुना ॥ २२ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कन्धे पूर्वार्धे रासक्रीडायां गोपीसान्त्वनं नाम द्वात्रिंशोऽध्यायः ॥ ३२ ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
योग्या न शक्यो त्यजिणे घराला ते सर्व तुम्ही त्यजिलेच आहे । निर्दोष संयोग असाचि झाला न होय त्यागा उतराय शक्य । जन्मांतरीही तुमचा ऋणी मी प्रेमे ऋणाचा तुम्हि भार केला ॥ २२ ॥ ॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता । विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर बत्तिसावा अध्याय हा ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
निरवद्यसंयुजाम् वः - अनिंद्य आहे संबंध ज्यांचा अशा तुमच्या - स्वसाधुकृत्यं - उत्तम प्रत्युपकालाला - विबुधायुषा अपि - देवांच्या आयुष्याने देखील - अहं न पारये - मी समर्थ नाही - याः (भवत्यः) - ज्या तुम्ही - दुर्जरगेहशृंखलाः संवृश्च्य - जीर्ण होण्यास कठीण अशा गृहरूपी शृंखला पार तोडून - मा अभजन् - माझी सेवा करत्या झालात - तत् वः (साधुकृत्यम्) - ते तुमचे सत्कृत्य - (वः) साधुना (एव) - त्या तुमच्या सद्वर्तनानेच - प्रतियातु - फिटो. ॥२२॥
घर-संसाराच्या तोडण्यास कठीण बेड्या तुम्ही माझ्यासाठी तोडून मला भजू लागलात, माझ्याशी तुमचा हा आत्मिक संयोग सर्वथैव निर्दोष आहे. देवांचे आयुष्य जरी मला मिळाले, तरी तुमच्या या प्रेम, सेवा आणि त्यागाचे ऋण मी फेडू शकणार नाही. म्हणून तुम्हीच मला आपल्या सौजन्याने तुमच्या ऋणातून मुक्त करावे. (२२)
अध्याय बत्तिसावा समाप्त |