श्रीमद् भागवत पुराण
दशमः स्कन्धः
चतुर्विंशोऽध्यायः

इंद्रमखभङ्ग -

इंद्रयज्ञ निवारण -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् )
भगवानपि तत्रैव बलदेवेन संयुतः ।
अपश्यत् निवसन् गोपान् इन्द्रयागकृतोद्यमान् ॥ १ ॥
( अनुष्टुप् )
श्रीशुकदेव सांगतात -
क्रीडती भगवान् कृष्ण बलरामा सवे व्रजीं ।
तयांनी पाहिले गोप इंद्रयज्ञासि लागले ॥ १ ॥

बलदेवेन संयुतः - बळरामाने युक्त असा - भगवान् अपि - कृष्णहि - तत्र एव निवसन् - त्याठिकाणीच रहात असता - इंद्रयागकृतोद्यमान् - इंद्रासाठी यज्ञाची खटपट चालविली आहे - गोपान् अपश्यत् - ज्यांनी अशा गोपांना पहाता झाला. ॥१॥

श्रीशुकदेव म्हणतात - भगवान श्रीकृष्ण बलरामांच्यासह वृंदावनामध्येच राहात होते. एके दिवशी त्यांनी पाहिले की, सर्व गोप इंद्रयज्ञ करण्याची तयारी करीत आहेत. (१)


तदभिज्ञोऽपि भगवान् सर्वात्मा सर्वदर्शनः ।
प्रश्रयावनतोऽपृच्छत् वृद्धान् नन्दपुरोगमान् ॥ २ ॥
सर्वज्ञ हरि श्रीकृष्ण न लपे कांहि त्या कडे ।
तरीही नम्र होवोनी पुसतो नंदजीस की ॥ २ ॥

सर्वात्मा सर्वदर्शनः - सर्वांचा आत्मा व सर्वसाक्षी असा - भगवान् - श्रीकृष्ण - तत् अभिज्ञः अपि - ते सर्व जाणत असूनहि - प्रश्रयावनतः - मोठ्या नम्रतेने - नंदपुरोगमान् वृद्धान् - नंदप्रमुख वृद्ध गोपांना - अपृच्छत् - विचारता झाला. ॥२॥

भगवान श्रीकृष्ण सर्वांचे अंतर्यामी आणि सर्वज्ञ असल्यामुळे त्यांना ते माहीत होते, तरीसुद्धा विनम्रभावाने त्यांनी नंदबाबा इत्यादि वृद्ध गोपांना विचारले, (२)


कथ्यतां मे पितः कोऽयं सम्भ्रमो व उपागतः ।
किं फलं कस्य चोद्देशः केन वा साध्यते मखः ॥ ३ ॥
पिताजी कोणता मोठा पातला उत्सवो असा ।
उद्देश फळ ते काय साधने सांगणे मला ॥ ३ ॥

पितः - हे पित्या - कः अयं संभ्रमः - कोणता हा धांदलीचा प्रसंग - वः उपागतः - तुम्हाला आला आहे - इति मे कथ्यतां - हे मला सांगा - (अस्य) फलं किं - याचे फल काय - कस्य च उद्देशः (तस्मिन् अस्ति) - आणि यात कोणता उद्देश आहे - केन वाम मुखः साध्यते - आणि कशाने हा यज्ञ साध्य होतो ॥३॥

तात ! ही कोणत्या यज्ञाची गडबड चालू आहे ? त्याचे फळ काय आहे ? कोणाला उद्देशून आणि कोणत्या साधनांनी हा यज्ञ केला जाणार आहे ? आपण मला सांगाल का ? (३)


एतद्‍ब्रूहि महान् कामो मह्यं शुश्रूषवे पितः ।
न हि गोप्यं हि साधूनां कृत्यं सर्वात्मनामिह ॥ ४ ॥
ऐकण्या इच्छितो मी ते संतांना भेद तो नसे ।
न मित्र शत्रु तो त्यांना न ते कांहीच झाकिती ॥ ४ ॥

पितः - हे पित्या - शुश्रूषवे मह्यं - ऐकू इच्छिणार्‍या मला - एतत् ब्रूहि - हे सांगा - महान् कामः - मोठी उत्कंठा आहे - इह हि - येथे खरोखर - सर्वात्मनां साधूनां - सर्वत्र साक्षीरूपाने असणार्‍या साधूंना - गोप्यं कृत्यं न हि - कोणतेही कृत्य गुप्त ठेवण्यासारखे नसते. ॥४॥

बाबा ! हे ऐकण्याची मला अतिशय उत्कंठा आहे. जे संत पुरुष सर्वांना आपल्या आत्मा मानतात, ज्यांच्या दृष्टीत आपला आणि परका असा भेद नसतो, म्हणून ज्याला कोणी मित्र, शत्रू वा तिर्‍हाईत नसतो, त्याच्यापासून लपवून ठेवावी अशी कोणतीच गोष्ट नसते. (४)


अस्त्यस्व-परदृष्टीनां अमित्रोदास्तविद्विषाम् ।
उदासीनोऽरिवद् वर्ज्य आत्मवत् सुहृदुच्यते ॥ ५ ॥
नसता स्थिति ती ऐशी रहस्य नच सांगणे ।
मित्र ते आपणा ऐसे वदावे सर्व ते तयां ॥ ५ ॥

अस्वपरदृष्टींनां अपि - ज्यांची आपपर दृष्टि नाही अशा लोकांनाहि - अमित्रोदास्तविद्विषां (मध्ये) - मित्र नसलेल्या, उदासीन व शत्रू यांपैकी - उदासीनः अरिवत् वर्ज्यः - उदासीन मनुष्य शत्रूप्रमाणे वर्ज असतो - तु - परंतु - सुहृद् आत्मवत् उच्यते - मित्र स्वतःप्रमाणे म्हटला आहे. ॥५॥

परंतु असे नसेल, तर मात्र कोणतेही रहस्य शत्रूप्रमाणेच तिर्‍हाइतालाही सांगता कामा नये. मित्र तर स्वतःसारखाच असतो. म्हणून त्याच्यापासून कोणतीही गोष्ट लपवून ठेवू नये. (५)

विवरण :- नंदादि वृद्ध गोप काहीतरी विशेष तयारी करीत आहेत, हे पाहून बलराम-कृष्णांनी त्यांना त्याबद्दल विचारले. कृष्णाच्या मनात शंका आली, या मुलांना यातले काय समजणार ? असे म्हणून काहीतरी सांगून आपली बोळवण तर नाही ना करणार ? म्हणून कृष्ण हे विधान करतो. वास्तविक 'षट्‌कर्णो भिधते मन्त्रः ।' (एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीचा फार बभ्रा करू नये, त्यामुळे ती गोष्ट साध्य होत नाही.) असे जरी असले, तरी चांगले कार्य करू इच्छिणार्‍यांना त्यात सामील करून घ्यावे व त्याकडे तटस्थ नजरेने पाहणार्‍यास त्या कामापासून दूर ठेवावे. इथे आम्हांस शक्य असेल ती मदत आम्ही तुम्हाला करू शकतो, असे त्या दोघांना सुचवायचे आहे. 'साधूनाम्' या शब्दाचाहि शब्दशः अर्थ घेणे योग्य होणार नाही तर 'सज्जन' मोठे लोक असा घ्यावयाचा. कारण आत एक बाहेर एक, लपवा-लपवी असे सामान्य संसारी मनुष्य करतो. आपल्या माणसास मनातील सर्व सांगावयाचे व परक्यास काहीच थांगपत्ता लागू द्यावयाचा नाही असे तो करतो. कारण त्याच्या मागे त्याची विशिष्ट स्वार्थी बुद्धी असते. पण साधू हा सतत समदृष्टी असतो. त्याच्या मनात आप-परभाव नसतो. (आपण साधुतुल्यच आहात म्हणून आम्हाला सर्व सांगा, असा भाव.) (४-५)



ज्ञात्वाज्ञात्वा च कर्माणि जनोऽयमनुतिष्ठति ।
विदुषः कर्मसिद्धिः स्यात् तथा नाविदुषो भवेत् ॥ ६ ॥
लोक ते अंधश्रद्धेने करिती कैक कर्म ते ।
श्रद्धेने फळ ते लाभे आंधश्रद्धेत ना तसे ॥ ६ ॥

अयं जनः - हा लोकसमूह - ज्ञात्वा च अज्ञात्वा - जाणून किंवा अज्ञानाने - कर्माणि अनुतिष्ठति - कर्मे करीत असतो - विदुषः कर्मसिद्धिः (भवति) - ज्ञान्याला कर्माचे फळ मिळते - तथा अविदुषः न भवेत् - त्याप्रमाणे अज्ञान्याला मिळत नाही. ॥६॥

हा संसारी मनुष्य समजून किंवा न समजता अनेक प्रकारच्या कर्मांचे अनुष्ठान करतो. त्यांपैकी समजून करणार्‍यांची कर्मे जशी सफल होतात, तशी न समजता करण्यार्‍यांची होत नाहीत. (६)

विवरण :- केवळ परंपरेचे पालन करून कर्म करण्यापेक्षा योग्य व अयोग्याची जाणीव ठेऊन कर्म करणार्‍यांनाच त्या कर्माचे फळ प्राप्त होते. (जे कार्य करण्याची तुमची तयारी चालू आहे, त्याबाबत योग्य तो विचार करूनच मग कार्य करा असा भाव.) (६)



तत्र तावत् क्रियायोगो भवतां किं विचारितः ।
अथ वा लौकिकस्तन्मे पृच्छतः साधु भण्यताम् ॥ ७ ॥
तुम्ही जे योजिले कार्य शास्त्रसंमत वा रूढी ।
जाणणे इच्छितो मी ते कृपया सांगणे मला ॥ ७ ॥

तत्र तावत् - तर त्याअर्थी - भवतां क्रियायोगः - तुमचा हा यज्ञकर्माचा खटाटोप - किम् विचारितः - कोणत्या शास्त्रविचाराने ठरविलेला आहे - अथवा लौकिकः - किंवा लौकिक आचाराने ठरविलेला आहे - पृच्छतः मे - प्रश्न करणार्‍या मला - तत् भण्यतां - ते नीटपणे सांगा. ॥७॥

तर आपण जो यज्ञ करणार आहात, तो विचारपूर्वक आहे, की रूढी म्हणून आहे, हे मी जाणू इच्छितो. आपण मला सयुक्तिक सांगा. (७)


श्रीनन्द उवाच -
पर्जन्यो भगवान् इन्द्रो मेघास्तस्यात्ममूर्तयः ।
तेऽभिवर्षन्ति भूतानां प्रीणनं जीवनं पयः ॥ ८ ॥
नंदबाबा म्हणाले -
मेघांचा स्वामि तो इंद्र समस्त प्राणियास तो ।
पाऊस पाडुनी जीवदान तो देइ तृप्तिही ॥ ८ ॥

भगवान् इंद्रः पर्जन्यः - भगवान इंद्र हा पर्जन्यरूप आहे - तस्य (च) - व त्या इंद्राची - आत्ममूर्तयः मेघाः - जणू स्वतःची शरीरेच असे मेघ - ते - ते - भूतानां प्रीणनं - प्राणिमात्राला समाधान देणारे - जीवनं पयः - त्यांच्या जगण्याचे साधन असे पाणी - अभिवर्षंति - वर्षतात. ॥८॥

नंद म्हणाले, "देवराज इंद्र ही पर्जन्यदेवता आहे. मेघ हे त्याचे स्वतःचेच रूप आहे. सर्व प्राण्यांना तृप्त करणारे आणि जीवनदान देणारे जे पाणी, त्याचा ते वर्षाव करतात. (८)


तं तात वयमन्ये च वार्मुचां पतिमीश्वरम् ।
द्रव्यैस्तद् रेतसा सिद्धैः यजन्ते क्रतुभिर्नराः ॥ ९ ॥
प्रीयपुत्रा अम्ही सारे यज्ञाने इंद्र पूजितो ।
अर्पितो आम्हि ज्या वस्तू जले उत्पन्न होत त्या ॥ ९ ॥

तात - बाळा - वयं - आम्ही - अन्ये च नराः - व दुसरे लोक - तं वार्मुचां पतिं ईश्वरं - त्या मेघांचा स्वामी अशा इंद्राला - तद्रेतसा - त्याच्या वृष्टिरूपी जलाने - सिद्धैः द्रव्यैः - सिद्ध झालेल्या द्रव्यांनी - क्रतुभिः यजंते - यज्ञाच्या रूपाने पूजीत असतात. ॥९॥

बाळा, आम्ही आणि अन्य काही माणसे त्या मेघपती इंद्राची पाण्यापासूनच उत्पन्न झालेल्या पदार्थांनी यज्ञ करून पूजा करीत असतो. (९)


तच्छेषेणोपजीवन्ति त्रिवर्गफलहेतवे ।
पुंसां पुरुषकाराणां पर्जन्यः फलभावनः ॥ १० ॥
यज्ञाच्या शेष ज्या वस्तू निर्वाहा आम्हि सेवितो ।
शेतीत पिकते जेजे ते ते इंद्रकृपेचि हो ॥ १० ॥

तच्छेषेण - ह्या यज्ञातील शेषाने - त्रिवर्गफलहेतवे - धर्म, अर्थ व काम ह्यांच्या सिद्धीकरिता - ते उपजीवंति - ते उपजीविका करितात - पुरुषकाराणां पुंसां - कृषिकर्मादि उद्योग करणार्‍या पुरुषांना - पर्जन्यः फलभावनः (अस्ति) - पर्जन्य फल देणारा होय. ॥१०॥

यज्ञ केल्यानंतर जे शिल्लक राहते, त्याच अन्नाने सर्वजण धर्म, अर्थ आणि काम या तीन पुरुषार्थांच्या सिद्धीसाठी आपला जीवन-निर्वाह चालवितात. मनुष्यांच्या प्रयत्‍नांना फळ देणारा पाऊसच होय. (१०)

विवरण :- गोप आणि सर्वच प्राणीमात्रांच्या दृष्टीने इंद्र हाच कसा श्रेष्ठ, हे यावरून दिसते. त्याच्या इच्छेशिवाय पर्जन्यवृष्टि नाही; पर्जन्याशिवाय धान्योत्पादन अशक्य. त्यामुळे आधी यज्ञ करून त्याला संतुष्ट राखावयाचे व मग उरलेल्यातून आपली उपजीविका करावयाची, असा नंदाच्या बोलण्याचा आशय. ( जे त्याच्यामुळे मिळते, प्रथम त्याचा नैवेद्य त्याला दाखवून मग आपण त्याचा वापर करावयाचा.) (१०)



य एनं विसृजेत् धर्मं परम्पर्यागतं नरः ।
कामाल्लोभात् भयाद् द्वेषात् स वै नाप्नोति शोभनम् ॥ ११ ॥
कुलाचार असा आला जो कामी लोभि वा भयी ।
द्वेषाने सोडिती धर्म त्यांचे मंगल ना कधी ॥ ११ ॥

यः नरः - जो मनुष्य - एवं पारंपर्यागतं धर्मं - याप्रमाणे परंपरेने प्राप्त झालेल्या धर्माला - कामात् लोभात् - स्वेच्छाचारामुळे किंवा लोभाने - भयात् द्वेषात् - भयाने किंवा द्वेषाने - विसृजेत् - सोडील - सः वै - तो खरोखर - शोभनं न आप्नोति - कल्याणाला प्राप्त होत नाही. ॥११॥

कुलपरंपरेने चालत आलेला हा धर्म जो मनुष्य काम, लोभ, भय किंवा द्वेष या भावनेने सोडून देतो, त्याचे कधी कल्याण होत नाही." (११)


श्रीशुक उवाच -
वचो निशम्य नन्दस्य तथान्येषां व्रजौकसाम् ।
इन्द्राय मन्युं जनयन् पितरं प्राह केशवः ॥ १२ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
ब्रह्मा शंकर आदींचा शास्ता केशव बोलला ।
इंद्राला क्रोध आणाया नंदबाबास तो असे ॥ १२ ॥

नंदस्य - नंदाचे - तथा - त्याप्रमाणे - अन्येषां व्रजौकसां - इतर गोकुलवासी लोकांचे - वचः निशम्य - भाषण श्रवण करून - केशवः - श्रीकृष्ण - इंद्राय मन्युं जनयन् - इंद्राला क्रोध उत्पन्न होईल असे - पितरं प्राह - पित्याला बोलला. ॥१२॥

श्रीशुकदेव म्हणतात - श्रीकृष्णाने नंद आणि अन्य व्रजवासींचे हे म्हणणे ऐकून इंद्राला क्रोध आणीत वडिलांना म्हटले. (१२)


श्रीभगवानुवाच -
कर्मणा जायते जन्तुः कर्मणैव विलीयते ।
सुखं दुःखं भयं क्षेमं कर्मणैवाभिपद्यते ॥ १३ ॥
श्रीभगवान् म्हणाले -
पिताजी आपुल्या कर्मे जीव जन्मे नि तो मरे ।
कर्मानुसार त्यां लाभे सुख दुःख भयो तसे ॥ १३ ॥

जंतुः कर्मणा जायते - प्राणी कर्माने उत्पन्न होतो - कर्मणा एव विलीयते - कर्मानेच नाश पावतो - सुखं दुःखं - सुख किंवा दुःख - भयं क्षेमं - भीति किंवा कल्याण - कर्मणा एव अभिपद्यते - कर्मानेच प्राप्त होते. ॥१३॥

श्री भगवान म्हणाले - प्राणी आपल्या कर्मानुसारच जन्म घेतो आणि कर्मानेच मरतो. त्याला त्याच्या कर्मानुसारच सुख-दुःख, भय आणि कल्याण यांची प्राप्ती होते. (१३)

विवरण :- 'इन्द्राय मन्युं जनयन्' (इंद्राला क्रोध निर्माण करीत) आपल्या बोलण्याचा इंद्राला राग येणार, हे कृष्णाला माहीत होते; किंबहुना त्याला तसा राग यावा, अशीच त्याची अपेक्षाहि होती. मनुष्याला फळ देण्यास इंद्र कारणीभूत नसून ते आपणच केलेल्या कर्मानुसार मिळते. चांगल्या कर्माचे चांगले व वाईटाचे फळ वाईटच मिळते. (१२-१३)



अस्ति चेदीश्वरः कश्चित् फलरूप्यन्यकर्मणाम् ।
कर्तारं भजते सोऽपि न ह्यकर्तुः प्रभुर्हि सः ॥ १४ ॥
फळ ते लाभते कर्मी जरी सर्वस्व ना तसे ।
न कर्म करिता त्याचे अकर्त्याला न त्रासिते ॥ १४ ॥

अन्यकर्मणां फलरूपी - इतर कर्मांचा फलदाता - कश्चित् ईश्वरः - कोणी एक ईश्वर - अस्ति चेत् - जर असेल - सः अपि - तो सुद्धा - कर्तारं भजते - कर्म करणार्‍यालाच फल देतो - सः हि - तो खरोखर - अकर्तुः प्रभुः नहि - कर्म न करणार्‍याला फल देण्यास समर्थ नाहीच. ॥१४॥

ईश्वर म्हणून जर कोणी असेल, तर जीवांनी केलेल्या कर्माचे फळ देणाराच ईश्वर होय. तो कर्म करणार्‍यांनाच त्यांच्या कर्मानुसार फळ देतो. कर्म न करणार्‍यांवर त्याचे काही चालत नाही. (१४)

विवरण :- 'अस्ति चेत्' 'जर ईश्वर असलाच तर !' इथे इंद्राचे अनीश्वरत्व सुचवावयाचे आहे. शिवाय फळ देण्याइतका तो स्वतंत्रहि नाही, म्हणजेच चांगल्या कर्मास वाईट वा वाईटास चांगले फळ देऊ शकत नाही. म्हणजेच इथे त्याच्या मर्जीला महत्त्व नसून कर्माला आहे. तो कर्म-फळ देण्यास मदत करतो, इतकेच. एखाद्याने जर कोणतेच कर्म केले नाही तर तो फळ तरी कसे देणार ? (१४)



किमिन्द्रेणेह भूतानां स्वस्वकर्मानुवर्तिनाम् ।
अनीशेनान्यथा कर्तुं स्वभावविहितं नृणाम् ॥ १५ ॥
कर्मानुसार ते भोग तेंव्हा इंद्र कशास तो ।
कर्म ते पूर्व संस्कारी कर्म ना आपुल्या करीं ॥ १५ ॥

स्वस्वकर्मानुवर्तिनां - आपापल्या कर्माला अनुसरणार्‍या - भूतानाम् नृणां (च) - प्राण्यांचे व मनुष्यांचे - स्वभावविहितं - स्वभावानुरुप - अन्यथा कर्तुं - केलेले कर्म उलट करण्यास - अनीशेन इंद्रेण - असमर्थ अशा इंद्राकडून - इह किम् - या लोकात काय होण्यासारखे आहे. ॥१५॥

जर सर्व प्राणी आपापल्या कर्मांचेच फळ भोगत असतील तर आम्हांला इंद्राची काय आवश्यकता ? पूर्वसंस्कारानुसार प्राप्त होणार्‍या माणसांच्या कर्मफलाला जर तो बदलू शकत नसेल, तर तो कशाला हवा ? (१५)


स्वभावतन्त्रो हि जनः स्वभावमनुवर्तते ।
स्वभावस्थमिदं सर्वं सदेवासुरमानुषम् ॥ १६ ॥
स्वभावाधीन तो जीव ब्वागतो त्याच आधिने ।
देवता नर नी दैत्य स्वभावाधीन जीव ते ॥ १६ ॥

स्वभावतंत्रः हि जनः - खरोखर निसर्गाच्या आधीन असलेले हे लोक - स्वभावं अनुवर्तते - निसर्गाला अनुसरतात - इदं सदेवासुरमानुषं सर्वं - हे देव, असुर व माणसे यांसह सर्व जग - स्वभावस्थं - निसर्गाच्या ठिकाणी रहाणारे होय. ॥१६॥

मनुष्य आपल्या पूर्वसंस्कारांच्या अधीन आहे. तो त्यानुसारच वागतो. देव, असुर, मनुष्य या सर्वांसह हे जग स्वभावावरच अवलंबून असते. (१६)

विवरण :- प्रत्येक मनुष्य वर्णाश्रमधर्माप्रमाणे आपापले कर्म करतो. (ब्राह्मण, क्षत्रीय, वैश्य, शूद्र - चातुर्वर्ण्य.) ही कामे श्रीहरिने नेमून दिलेली आहेत. त्यामुळे ती नेमून देणारा श्रीहरिच श्रेष्ठ. (इंद्र श्रेष्ठ नाही हा भाव.) प्रत्येकाने आपले नेमून दिलेले कर्म करावे, तेच त्याचे 'तत्त्व' आणि त्याचे दैवत. (१५-१६)



देहानुच्चावचाञ्जन्तुः प्राप्योत् सृजति कर्मणा ।
शत्रुर्मित्रमुदासीनः कर्मैव गुरुरीश्वरः ॥ १७ ॥
कर्माने लाभतो देह कर्मानुसार त्यागिणे ।
कर्मानुसार् असे मित्र शत्रू नी ते त्रयस्थ ही ।
मानवा गुरु ते कर्म मानवा ईश कर्म ते ॥ १७ ॥

कर्मणा - कर्माने - उच्चावचान् - उच्च किंवा नीच - देहान् प्राप्य - देहांना प्राप्त होऊन - जन्तुः तान् उत्सृजति - प्राणी त्यांना टाकून देतो - शत्रुः मित्रं उदासीनः - शत्रु, मित्र व तटस्थ - गुरुः ईश्वरः - तसेच गुरु आणि ईश्वर हे - कर्म एव - कर्मच होत. ॥१७॥

जीव आपल्या कर्मानुसारच उत्तम किंवा कनिष्ठ शरीर ग्रहण करतो आणि सोडतो. कर्मानुसारच शत्रू, मित्र, उदासीन असा व्यवहार करतो. किंबहुना कर्मच गुरू आहे आणि कर्मच ईश्वर आहे. (१७)


तस्मात् संपूजयेत्कर्म स्वभावस्थः स्वकर्मकृत् ।
अन्जसा येन वर्तेत तदेवास्य हि दैवतम् ॥ १८ ॥
म्हणोनि आश्रमाचे ते करावे इष्ट पालन ।
सुगम जीविका ज्याने इष्टदेव तयास तो ॥ १८ ॥

तस्मात् स्वभावस्थः - त्याकरिता निसर्गाच्या ठिकाणी राहून - स्वकर्मकृत् - स्वकर्म करणार्‍या मनुष्याने - कर्म संपूजयेत् - कर्माला मान द्यावा - येन (नरः) अंजसा वर्तेत - ज्यायोगे मनुष्य सुखाने राहील - तत् एव - तेच - हि अस्य दैवतम् - खरोखर त्याचे दैवत होय. ॥१८॥

म्हणून मनुष्याने पूर्वसंस्कारानुसार आपला वर्ण आश्रम याला अनुकूल अशा धर्माचे पालन करीत कर्माचाच आदर करावा. जेणेकरून मनुष्याचे जीवन सुलभतेने चालेल तीच त्याची इष्टदेवता होय. (१८)

विवरण :- सर्वच महत्त्व कर्माला आहे, हे एकदा स्पष्ट झाल्यानंतर मनुष्य जसे कर्म करेल, त्यानुसार त्याला फळ मिळेल, हे उघड आहे. त्यामुळे त्याने कर्मालाच श्रेष्ठ मानावे. (१८)



आजीव्यैकतरं भावं यस्त्वन्यमुपजीवति ।
न तस्माद् विन्दते क्षेमं जारान्नार्यसती यथा ॥ १९ ॥
पती जी त्यागिते ऐसी न शांत व्यभिचारिणी ।
त्यागिता इष्ट देवाला न सौख्य अन्य पूजिता ॥ १९ ॥

यः तु - पण जो - एकतरं भावं आजीव्य - एकावर श्रद्धा ठेवून - अन्यं उपजीवति - दुसर्‍यावर उपजीविका चालवितो - तस्मात् - त्यापासून - क्षमं न विन्दते - कल्याणाला प्राप्त होत नाही - यथा - ज्याप्रमाणे - जारं (आजीव्य) - जारावर प्रेम दाखवून - असती नारी - व्यभिचारिणी स्त्री - क्षेमं न विन्दते - कल्याणाला प्राप्त होत नाही. ॥१९॥

जसे, जाराशी सहवास करणार्‍या स्त्रीला कधीही शांति मिळत नाही, त्याचप्रमाणे जो मनुष्य आपले जीवन चालविणार्‍या एका देवतेला सोडून अन्य देवाची उपासना करतो, त्यापासून त्याला कधीच सुख मिळत नाही. (१९)


वर्तेत ब्रह्मणा विप्रो राजन्यो रक्षया भुवः ।
वैश्यस्तु वार्तया जीवेत् शूद्रस्तु द्विजसेवया ॥ २० ॥
द्विजाने वेद पाळावा क्षत्रिये पृथ्वि रक्षिणे ।
वार्तावृत्तीत गोरक्षा वैश्याने सेवेने शूद्रजीविका ॥ २० ॥

विप्रं ब्रह्मणा वर्तेत - ब्राह्मणाने वेदाध्ययनाने रहावे - राजन्यः भुवः रक्षया - क्षत्रियाने पृथ्वीच्या रक्षणाने - वैश्यः तु - वैश्याने तर - वार्तया जीवेत् - वाणिज्य वृत्तीने उपजीविका करावी - शूद्रः तु - आणि शुद्राने - द्विजसेवया (वर्तेत) - द्विजांच्या सेवेने रहावे. ॥२०॥

ब्राह्मणांनी वेदांचे अध्ययन-अध्यापन करून, क्षत्रियांनी पृथ्वीचे पालन करून, वैश्यांनी व्यापार करून आणि शूद्रांनी तीन वर्णांची सेवा करून आपला जीवननिर्वाह करावा. (२०)

विवरण :- चातुर्वर्णांचे स्पष्टीकरण आणि प्रत्येकाचे नेमून दिलेले कार्य इथे सांगितले आहे. ब्राह्मण (ज्ञानदान, वेदात सांगितल्याप्रमाणे यज्ञयाग;) क्षत्रीय (रक्षण); वैश्य (व्यापार); शूद्र (सेवा). (२०)



कृषिवाणिज्यगोरक्षा कुसीदं तूर्यमुच्यते ।
वार्ता चतुर्विधा तत्र वयं गोवृत्तयोऽनिशम् ॥ २१ ॥
वार्तावृत्तीत गोरक्षा कृषी वाणिज्य व्याजि हे ।
गोरक्षा एकची आम्ही धारिली वृत्ति ती पहा ॥ २१ ॥

कृषिवाणिज्यगोरक्षा (इति त्रयम्) - कृषिकर्म, व्यापार, पशूपालन ही तीन - तुर्यं (च) कुसीदं - व चौथा व्याजबट्टा - चतुर्विधा वार्ता उच्यते - चार प्रकारची उपजीविका सांगितली आहे - तत्र - त्यामध्ये - वयम् - आपण - अनिशं गोवृत्तयः (स्मः) - रात्रंदिन गाईंवर उपजीविका करणारे आहो. ॥२१॥

वैश्यांचे व्यवसाय चार प्रकारचे आहेत. शेती, व्यापार, गुरांचे पालन आणि सावकारी. आम्ही त्यांपैकी फक्त गोपालनच नेहमी करीत आलो आहोत. (२१)


सत्त्वं रजस्तम इति स्थित्युत्पत्त्यन्तहेतवः ।
रजसोत्पद्यते विश्वं अन्योन्यं विविधं जगत् ॥ २२ ॥
स्थिती उत्पत्ति अंताचे सत्त्वादी गुण कारणी ।
रजात जन्मती जीव संयोगे नर नारिच्या ॥ २२ ॥

सत्त्वं रजः तमः - सत्त्वगुण, रजोगुण व तमोगुण - इति स्थित्युत्पत्त्यन्तहेतवः (सन्ति) - हे उत्पत्ति, स्थिति व नाश यांना कारणीभूत आहेत - रजसा विश्वं उत्पद्यते - रजोगुणाने हे विश्व उत्पन्न होते - अन्योन्यं - स्त्री-पुरुषांच्या संयोगाने - विविधं जगत् (उत्पद्यते) - नानाप्रकारचे जीवमय जगत होते. ॥२२॥

सत्त्वगुण, रजोगुण आणि तमोगुण हे या संसाराच्या स्थिती, उत्पत्ती आणि विनाश यांना कारणीभूत आहेत. हे विविध प्रकारचे संपूर्ण जग स्त्री-पुरुषांच्या संयोगाने रजोगुणामुळे उत्पन्न होते. (२२)


रजसा चोदिता मेघा वर्षन्त्यम्बूनि सर्वतः ।
प्रजास्तैरेव सिध्यन्ति महेन्द्रः किं करिष्यति ॥ २३ ॥
रजाने वर्षती मेघ त्या अन्ने जगती जिव ।
देणे घेणे न इंद्राचे करेल काय ते बघू ॥ २३ ॥

चोदिताः मेघाः - रजोगुणाने प्रेरित असे मेघ - सर्वतः अंबूनि वर्षंति - सर्व ठिकाणी उदकांची वृष्टि करितात. - तैः एव - त्या उदकानीच - प्रजाः सिद्ध्यन्ति - लोक जगतात - (तत्र) महेंद्रः किं करिष्यति - त्यात इंद्र काय करणार. ॥२३॥

त्या रजोगुणाच्या प्रेरणेने मेघ सगळीकडे पाऊस पाडतात. त्यापासून अन्न आणि अन्नापासून सर्व जीवांची उपजीविका चालते. यात इंद्र काय करतो ? (२३)

विवरण :- वर्णांचे पुन्हा अधिक स्पष्टीकरण केले आहे. त्यापैकी वैश्य (व्यापार) याचे चार प्रकार सांगितले आहेत. कृषी, व्यापार, गोपालन आणि सावकारी. यापैकी श्रीकृष्ण व गोप हे गोपालक होते. मग पुन्हा गायींचा अधिपती इंद्र झाला असता. (गायींचे चारा-पाणी वर्षाधीन, वृष्टीचा अधिपती इंद्र मानला गेल्यास तोच श्रेष्ठ ठरला असता.) परंतु सत्त्व, रज, तम या त्रिगुणांपैकी जो रजोगुण त्याच्याकडून परमात्म्याच्या प्रेरणेने जगाची उत्पत्ति व पालन होते. (हे कार्य अन्योन्य संबंधाने होते. रजोगुणाच्या प्रेरणेने स्त्री-पुरुषांकडून जगाची उत्पत्ति व पालन होते.) त्याच गुणामुळे मेघ वृष्टी करतात व धान्योत्पादन होऊन जगाचे पालन-पोषण होते. इंद्र इथे काहीच करीत नाही. (२१-२३)



न नः पुरोजनपदा न ग्रामा न गृहा वयम् ।
नित्यं वनौकसस्तात वनशैलनिवासिनः ॥ ॥
न राज्य आपणा मोठे स्वामित्व नगरीं नसे ।
न गाव घर ही तैसे पहाड घर आपुले ॥ २४ ॥

तात - हे तात - पुरःनः न - नगरे आमची नव्हेत - जनपदः न - देश नव्हे - ग्रामाः गृहाः न - गावे व घरे नव्हेत - वयं वनौकसः - वन हेच ज्यांचे घर असे - नित्यं - निरंतर - वनशैलनिवासिनः - अरण्य व पर्वत यांमध्ये राहणारे आहोत. ॥२४॥

तात ! आमच्याजवळ नगरे नाहीत, गावे नाहीत की घरेही नाहीत. आम्ही कायमचे वनवासी. जंगले, पर्वत हीच आमची घरे होत. (२४)


तस्माद्‍गवां ब्राह्मणानां अद्रेश्चारभ्यतां मखः ।
य इंद्रयागसंभाराः तैरयं साध्यतां मखः ॥ २५ ॥
म्हणॊनि द्विज गाई नी गिरिराजास पूजिणे ।
सामग्री इंद्र यज्ञाची या यज्ञी खर्चु या पहा ॥ २५ ॥

तस्मात् - यास्तव - गवां ब्राह्मणानां अद्रेः च - गाई, ब्राह्मण व पर्वत यांच्यासाठी - मखः आरभ्यतां - यज्ञ आरंभावा - ये इंद्रयागसंभाराः - ज्या इंद्राच्या यज्ञाकरिता संपादन केलेल्या वस्तू आहेत - तैः - त्यांनी - अयं मखः साध्यतां - हा यज्ञ साधावा. ॥२५॥

म्हणून आपण गाई, ब्राह्मण आणि पर्वत यांच्याच पूजेला आरंभ करू. इंद्रयज्ञासाठी जी सामग्री गोळा केली आहे, त्यातूनच या यज्ञाचे अनुष्ठान होऊ द्या. (२५)


पच्यन्तां विविधाः पाकाः सूपान्ताः पायसादयः ।
संयावापूपशष्कुल्यः सर्वदोहश्च गृह्यताम् ॥ २६ ॥
पुर्‍या खीर शिरा मूगडाळ ती शिजवोनिया ।
पक्वान्न करणे ऐसे व्रजीचे सर्व दूध ते ॥ २६ ॥

पायसादयः सूपान्ताः - खिरीपासून आमटीपर्यंत - विविधाः पाकाः - नानाप्रकारचे पदार्थ - संयावापूपशष्कुल्यः (च) - गव्हाचा शिरा, करंज्या इत्यादि - पच्यन्ताम् - शिजविले जावेत - सर्वदोहः च गृह्यतां - आणि दुधाचे सर्व पदार्थ घ्यावे. ॥२६॥

वरण, शिरा, अनरसे, करंज्या, खीर इत्यादि अनेक प्रकारचे अन्नपदार्थ बनवा. सर्व दूधही बरोबर घ्या. (२६)


हूयन्तामग्नयः सम्यग् ब्राह्मणैर्ब्रह्मवादिभिः ।
अन्नं बहुगुणं तेभ्यो देयं वो धेनुदक्षिणाः ॥ २७ ॥
वेदवादी द्विजांहस्ते करूया हवनो असे ।
तयांना अन्न नी गाई दक्षिणा बहु अर्पिणे ॥ २७ ॥

ब्रह्मवादिभिः ब्राह्मणैः - वेद पठण करणार्‍या ब्राह्मणांकडून - अग्नयः सम्यक् हूयंतां - अग्नि चांगल्या रीतीने पूजिले जावेत - वः तेभ्यः - तुम्हांकडून त्या ब्राह्मणांना - बहुविधं अन्नं देयं - नानाप्रकारचे अन्न दिले जावे - धेनुदक्षिणाः (च) देयाः - आणि गाईरूपी दक्षिणा दिल्या जाव्या. ॥२७॥

वेदज्ञ ब्राह्मणांच्या द्वारा चांगल्या रीतीने अग्नीत हवन करा आणि तुम्ही त्यांना अनेक प्रकारचे अन्न, गाई आणि दक्षिणा द्या. (२७)


अन्येभ्यश्चाश्वचाण्डाल पतितेभ्यो यथार्हतः ।
यवसं च गवां दत्त्वा गिरये दीयतां बलिः ॥ २८ ॥
चांडाळ पतितो आणि गाई कुत्र्यास अन्न ते ।
देवोनी गिरिराजाला भोग ते चढवू पहा ॥ २८ ॥

अन्येभ्यः - त्याप्रमाणेच इतर - आश्वचांडालपतितेभ्यः च - म्हणजे कुत्रे, चांडाल, पतित यांपर्यंत सर्वांना - यथार्हतः (अन्नं दत्वा) - योग्यतेप्रमाणे अन्न देऊन - गवां च - आणि गाईंना - यवसं दत्त्वा - तृण देऊन - गिरये बलिः दीयतां - पर्वताला नैवेद्य द्यावा. ॥२८॥

याखेरीज चांडाळ, पतित इत्यादिंपासून कुत्र्यांपर्यंत सर्व प्राण्यांना यथोयोग्य अन्न देऊन गाईंना चारा घालावा आणि गोवर्धन पर्वताची पूजा करावी. (२८)


स्वलङ्‌कृता भुक्तवन्तः स्वनुलिप्ताः सुवाससः ।
प्रदक्षिणां च कुरुत गोविप्रानलपर्वतान् ॥ २९ ॥
प्रसाद का‍उया खूप सजू लेवोनि वस्त्र नी ।
अलंकार, गिरी अग्नी गाई विप्रा परिक्रमू ॥ २९ ॥

च - आणि - स्वलंकृताः - चांगले अलंकार धारण केलेले - भुक्तवंतः - व जेऊन तृप्त झालेले - स्वनुलिप्ताः - अंगाला चांगल्या उटया लाविलेले - सुवाससः (यूयम्) - व सुंदर वस्त्रे धारण केलेले असे तुम्ही - गोविप्रानलपर्वतान् - गाई, ब्राह्मण, अग्नि व पर्वत यांना - प्रदक्षिणं कुरूत - प्रदक्षिणा करा. ॥२९॥

सर्वांनी अंगाला सुगंधी उटी लावून सुंदर वस्त्रे परिधान करून, अलंकार घालावेत आणि भोजन करून गायी, ग्राह्मण, अग्नी व गोवर्धनाला प्रदक्षिणा घालावी. (२९)


एतन्मम मतं तात क्रियतां यदि रोचते ।
अयं गोब्राह्मणाद्रीणां मह्यं च दयितो मखः ॥ ३० ॥
पिताजी संमती माझी तुचले तर हे करा ।
यज्ञ हा गायि विप्रांना मला नी गिरिला प्रिय ॥ ३० ॥

तात - अहो तात - एतत् मम मतं - असे माझे मत आहे - यदि (तुभ्यम्) - जर तुम्हाला - रोचते तर्हि क्रियतां - आवडत असेल तर करा - मह्यं च - मला तर - गोब्राह्मणाद्रीणां - गाई, ब्राह्मण व पर्वत यांच्यासाठी - अयं मखः - केलेला हा यज्ञ - दयितः - आवडतो. ॥३०॥

बाबा ! माझे तर मत असे आहे. जर आपणाला योग्य वाटत असेल, तर तसे करा. हा यज्ञ गाई, ब्राह्मण, पर्वत यांना आणि मलासुद्धा अतिशय प्रिय आहे. (३०)


श्रीशुक उवाच -
कालात्मना भगवता शक्रदर्पं जिघांसता ।
प्रोक्तं निशम्य नन्दाद्याः साध्वगृह्णन्त तद्वचः ॥ ३१ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
कालात्मा भगवान् इच्छी इंद्राचा गर्व छेदण्या ।
नंदबाबादि गोपांनी आनंदे मानिले तसे ॥ ३१ ॥

शक्रदर्पं जिघांसता - इंद्राचा गर्व नष्ट करण्याची इच्छा करणार्‍या - कालात्मना भगवता - कालस्वरूपी कृष्णाने - प्रोक्तं - बोललेले - निशम्य - श्रवण करून - नंदाद्याः - नंद आदिकरून मंडळी - तद्वचः - त्याचे भाषण - साधु अगृह्‌णन्त - चांगले म्हणून स्वीकारते झाले. ॥३१॥

श्रीशुकदेव म्हणतात - कालरूप भगवंतांनी, इंद्राची घमेंड उतरविण्यासाठी जे सांगितले, ते नंदादि गोपांनी मनापासून स्वीकारले. (३१)


तथा च व्यदधुः सर्वं यथाऽऽह मधुसूदनः ।
वाचयित्वा स्वस्त्ययनं तद् द्रव्येण गिरिद्विजान् ॥ ३२ ॥
कृष्णाने कथिले तैसा जाहला यज्ञ तो सुरू ।
स्वस्तिवाचन ही झाले ब्राह्मणा दक्षिणा दिल्या ॥ ३२ ॥

च - आणि - यथा - ज्याप्रमाणे - मधुसूदनः आह - कृष्ण बोलला - तथा (ते) सर्वं व्यदधुः - त्याप्रमाणे ते सर्व करिते झाले - स्वस्त्ययनं वाचयित्वा - पुण्याहवाचन करवून - तद्‌द्रव्येण - त्या द्रव्यानेच - गिरिद्विजान् - पर्वत व ब्राह्मण यांना. ॥३२॥

भगवान श्रीकृष्णांनी जसे सांगितले होते, तसेच सर्व केले. अगोदर ब्राह्मणांकडून स्वस्तिवाचन करवून घेऊन इंद्रयज्ञाच्या सामुग्रीने पर्वताला आणि ब्राह्मणांना आदरपूर्वक भेटवस्तू दिल्या. (३२)


उपहृत्य बलीन् सम्यग् सर्वान् आदृता यवसं गवाम् ।
गोधनानि पुरस्कृत्य गिरिं चक्रुः प्रदक्षिणम् ॥ ३३ ॥
पर्वता अर्पिल्या वस्तू गाईंना हरळी तशी ।
पुढे गाई करोनीया झाली गिरिपरिक्रमा ॥ ३३ ॥

बलीन् उपहृत्य - पूजा समर्पण करून - गवां (च) यवसं (उपहृत्य) - तसेच गाईंना गवत देऊन - आदृताः - आदराने युक्त असे - गोधनानि पुरस्कृत्य - गाईंना पुढे करून - गिरिं प्रदक्षिणं चक्रुः - पर्वताला प्रदक्षिणा करिते झाले. ॥३३॥

तसेच गुरांना चारा घातला. नंतर त्यांनी गुरांना पुढे घालून गोवर्धनाला प्रदक्षिणा घातली. (३३)


अनांस्यनडुद्युक्तानि ते चारुह्य स्वलङ्‌कृताः ।
गोप्यश्च कृष्णवीर्याणि गायन्त्यः सद्विजाशिषः ॥ ३४ ॥
आशिर्वाद द्विजांचा तो घेता शृगारल्या स्त्रिया ।
बैलगाडीत बैसोनी कृष्णलीलाच गान ते ।
करीत निघले सारे करण्याती प्रदक्षिणा ॥ ३४ ॥

च - आणि - स्वलंकृताः ते - अलंकार धारण केलेले ते गोप - अनडुद्युक्तानि अनांसि आरुह्य - बैल जुंपलेल्या गाडयात बसून - गोप्यः च - आणि गोपीही - कृष्णवीर्याणि गायंत्यः - कृष्णाचे पराक्रम गाणार्‍या अशा - सद्विजाशिषः - ब्राह्मणांच्या त्या आशीर्वादाने युक्त अशा - गिरिं प्रदक्षिणं - पर्वताला प्रदक्षिणा - चक्रुः - करित्या झाल्या. ॥३४॥

ब्राह्मणांचे आशीर्वाद घेऊन आणि चांगल्या तर्‍हेने साजशृंगार करून गोपी-गोप, बैल जुंपलेल्या गाड्यांमध्ये बसून, भगवान श्रीकृष्णांच्या लीलांचे गायन करीत गिरिराजाची प्रदक्षिणा करू लागले. (३४)


कृष्णस्त्वन्यतमं रूपं गोपविश्रम्भणं गतः ।
शैलोऽस्मीति ब्रुवन् भूरि बलिमादद् बृहद्वपुः ॥ ३५ ॥
द्यावया धीर गोपांना कृष्णाने दुसर्‍या रुपे ।
प्रचंड देह धारोनी बैसला गिरिच्या वरी ।
गिरिराज असे मी हो वदता अन्न भक्षिले ॥ ३५ ॥

गोपविश्रंभणं - गोपांना विश्वास उत्पन्न होईल असे - अन्यतमं - दुसरे - बहद्वपुः गतः - मोठे आहे शरीर ज्यांचे असे रूप धारण करणारा - शैलः अस्मि - मी पर्वत आहे - इति ब्रुवन् - असे बोलून - भूरिं बलीं आददत् - अर्पण केलेला अन्नाचा ढीग खाता झाला. ॥३५॥

श्रीकृष्णच पर्वतावर गोपांचा विश्वास बसेल असे दुसरे विशाल शरीर धारण करून प्रगट झाले आणि "मीच गोवर्धन आहे" असे म्हणत सर्व अन्न खाऊ लागले. (३५)


तस्मै नमो व्रजजनैः सह चक्रेऽऽत्मनाऽऽत्मने ।
अहो पश्यत शैलोऽसौ रूपी नोऽनुग्रहं व्यधात् ॥ ३६ ॥
त्या रूपा स्वयही कृष्णे नमिले व्रजियां सवे ।
वदला गिरिराजा हा कृपें प्रगट जाहला ॥ ३६ ॥

तस्मै आत्मने - त्या आपल्याच स्वरूपाला - व्रजजनैः सह - गोकुळातील लोकांसह - आत्मना नमः चक्रे - आपणच नमस्कार करिता झाला - अहो पश्यत - अहो पहा - असौ शैलः - हा पर्वत - रूपी (भूत्वा) - शरीर धारण करणारा होऊन - नः अनुग्रहं व्यधात् - आम्हांवर अनुग्रह करिता झाला. ॥३६॥

भगवान श्रीकृष्णांनी आपल्या त्या स्वरूपाला इतर व्रजवासींसह स्वतःसुद्धा नमस्कार केला आणि म्हणू लागले - "पहा ! केवढे आश्चर्य आहे ! या गिरिराजाने साक्षात प्रगट होऊन आमच्यावर कृपा केली आहे." (३६)


एषोऽवजानतो मर्त्यान् कामरूपी वनौकसः ।
हन्ति ह्यस्मै नमस्यामः शर्मणे आत्मनो गवाम् ॥ ३७ ॥
धारितो रूप हा तैसे द्वेषिता मारितो जिवां ।
या या कल्याण साधाया गिरिराजा नमा पहा ॥ ३७ ॥

कामरूपी एषः - सर्पादि ऐच्छिक रूपे धारण करणारा हा पर्वत - अवजान - अपमान करणार्‍या - वनौकसः मर्त्यान् - वनात राहणार्‍या लोकांना - हंति - मारितो - आत्मनः - स्वतःच्या - गवां च शर्मणे - व गाईंच्या कल्याणाकरिता - अस्मै हि - ह्याला आपण खरोखर - नमस्यामः - नमस्कार करू या. ॥३७॥

पाहिजे तसे रूप धारण करू शकणारा हा पर्वत, जे वनवासी याचा अनादर करतात, त्यांना नष्ट करतो. म्हणून आपले आणि गुरांचे कल्याण होण्यासाठी आपण याला नमस्कार करू या. (३७)


इत्यद्रिगोद्विजमखं वासुदेवप्रचोदिताः ।
यथा विधाय ते गोपा सहकृष्णा व्रजं ययुः ॥ ३८ ॥
इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
संहितायां दशमस्कन्धे पूर्वार्धे चतुर्विंशोऽध्यायः ॥ २४ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
कृष्णाच्या प्रेरणें ऐसे वृद्ध नंदादि गोपने ।
पूजिले गिरिराजाला गाई विप्रां विधी जसा ।
व्रजात पातले सर्व कृष्णाच्यासह गोप ते ॥ ३८ ॥
॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर चोविसावा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

इति - याप्रमाणे - वासुदेवप्रणोदिताः ते गोपाः - कृष्णाने प्रेरणा केलेले ते गोप - अद्रिगोद्विजमखं - पर्वत, गाई व ब्राह्मण यांची पूजा - यथा (वत्) विधाय - यथाशास्त्र करून - सहकृष्णः - कृष्णासह - व्रजं ययुः - गोकुळात जाते झाले. ॥३८॥

अशा प्रकारे श्रीकृष्णांच्या प्रेरणेने त्या गोपांनी गोवर्धन, गाई आणि ब्राह्मणांची विधिपूर्वक पूजा केली आणि नंतर श्रीकृष्णांसह सर्वजण व्रजामध्ये परत आले. (३८)


अध्याय चोविसावा समाप्त

GO TOP