|
श्रीमद् भागवत पुराण
शकटभङ्ग; तृणावर्तवधः; जृम्भमाणस्य छकडा मोडणे आणि तृणावर्त उद्धार - संहिता - अन्वय - अर्थ समश्लोकी - मराठी
( अनुष्टुप् )
श्रीराजोवाच येन येनावतारेण भगवान् हरिरीश्वरः । करोति कर्णरम्याणि मनोज्ञानि च नः प्रभो ॥ १ ॥
( अनुष्टुप् ) राजा परीक्षित म्हणाला - प्रभो रम्य अशा लीला हरीच्या छान वाटती । अवतारलिला सर्व हृदया प्रीय वाटती ॥ १ ॥
प्रभो - हे शुकाचार्या - ईश्वरः भगवान् हरिः - समर्थ असा भगवान श्रीहरी - येन येन अवतारेण - ज्या ज्या अवतारांनी - नः कर्णरम्याणि - आमच्या कर्णाला गोड लागणारी - मनोज्ञानि च (कर्माणि) करोति - व मनाला आनंद देणारी कर्मे करितो. ॥१॥
राजाने म्हटले - गुरुवर्य ! सर्व शक्तिमान भगवान श्रीहरींनी जे जे अवतार धारण करून पुष्कळशा मनोहर आणि श्रवणीय लीला केल्या; (१)
( इंद्रवंशा )
यत् श्रृण्वतोऽपैत्यरतिर्वितृष्णा सत्त्वं च शुद्ध्यत्यचिरेण पुंसः । भक्तिर्हरौ तत्पुरुषे च सख्यं तदेव हारं वद मन्यसे चेत् ॥ २ ॥
( इंद्रवज्रा ) तहान भागे अरुची हटे ती नी शीघ्र होते हृदयो पवित्र । भक्तीत लाभे हरिप्रेम नित्य त्या सांगणे सर्व लिला हरीच्या ॥ २ ॥
यत् शृण्वतः पुंसः - जी ऐकणार्या पुरुषाचे मानसिक - अरतिः वितृष्णा च अचिरेण अपैति - औदासीन्य व नानाविध तृष्णा त्वरित दूर होतात - सत्त्वं शुद्ध्यति - अंतःकरण शुद्ध होते - हरौ भक्तिः (जायते) - परमेश्वराविषयी भक्ती उत्पन्न होते - तत्पुरुषे च सख्यं (जायते) - व त्याच्या भक्तांच्या ठायी मैत्री जडते - तत् एवं हारं - तेच रमणीय वृत्त - मन्यसे चेत् - तू मनात आणीत असशील तर - (मां) वद - मला सांग. ॥२॥
ज्यांचे श्रवण केल्याने प्रेम वाढते आणि विषयांची आशा नाहीशी होते, मनुष्याचे अंतःकरण तत्काळ शुद्ध होते. भगवंतांविषयी भक्ती आणि त्यांच्या भक्तांशी मैत्री जडते, त्या मनोहर लीलांचे आपल्याला योग्य वाटल्यास वर्णन करावे. (२)
विवरण :- श्रीकृष्णचरित्राची महतीच अशी आहे की, ते जितके म्हणून ऐकावे, तृप्ती न होता ऐकण्याची आस वाढतच जाते. (प्रारंभीच परीक्षिताने, 'विस्तरेण' असा शब्द वापरला आहे.) त्याच्या दहाहि अवतारातील कथा-श्रवणाने केवळ आनंदच मिळत नाही, तर मन शुद्ध होऊन शांती व समाधानहि मिळते. हे विशेष. (१-२)
( अनुष्टुप् )
अथान्यदपि कृष्णस्य तोकाचरितमद्भुतम् । मानुषं लोकमासाद्य तज्जातिमनुरुन्धतः ॥ ३ ॥
( अनुष्टुप् ) भगवान जरि तो कृष्ण जन्मला पृथिवी वरी । मानवी करितो लीला आणखी अन्य सांगणे ॥ ३ ॥
अथ - तसेच - मानुषं लोकं आस्थाय - मनुष्य लोकात येऊन - तज्जातिं अनुरुंधतः कृष्णस्य - त्या जातीप्रमाणे वागणार्या कृष्णाचे - अद्भुतं अन्यत् अपि तोकाचरितं (वद) - अद्भुत असे आणखीही बालपणी केलेले चरित्र सांग. ॥३॥
भगवान श्रीकृष्णांनी मनुष्यलोकी प्रगट होऊन मनुष्य स्वभावाचे अनुकरण करीत ज्या बाललीला केल्या, त्याही अद्भुत असतील. तरी आपण त्यासुद्धा मला सांगाव्यात. (३)
विवरण :- कृष्णाने फक्त मानवी शरीरच धारण केले नाही, तर त्याच्या सर्व लीला, क्रीडा बालसुलभच होत्या; म्हणूनच त्याच्या गोप-सवंगडयांना सामान्य गुराख्यांना तो आपला वाटला. परंतु कृष्णाने अशाहि काही लीला केल्या की त्यामुळे एकेका असुराचा नाश झाला. प्रथम मायावी पूतना, नंतर शकटासुर व तृणावर्त. (३)
श्रीशुक उवाच -
( मिश्र ) कदाचिदौत्थानिककौतुकाप्लवे जन्मर्क्षयोगे समवेतयोषिताम् । वादित्रगीतद्विजमन्त्रवाचकैः चकार सूनोरभिषेचनं सती ॥ ४ ॥
श्री शुकदेव सांगतात - ( इंद्रवज्रा ) तो बाळकृष्णो कुसपालटी तै त्या गोकुळी उत्सव जाहला तो । वाद्यी यशोदे अभिषेक केला त्या जन्मनक्षत्रिहि गोपि आल्या । मंत्रेचि विप्रे बहु पाथ केले बाळास आशिर्वच बोलते तै ॥ ४ ॥
कदाचित् - एके दिवशी - जन्मर्क्षयोगे - जन्मनक्षत्राच्या दिवशी - औत्थानिककौतुकाप्लवे - उपडे वळण्याच्या उत्सवानिमित्त स्नान घालण्याच्या प्रसंगी - समवेतयोषितां (मध्ये) - जमलेल्या स्त्रियांच्या मेळ्यात - वादित्रगीतद्विजमंत्रवाचकैः - वाद्ये, गीत, ब्राह्मणांचे वेदमंत्रपठण यांच्या योगे - सती - साध्वी यशोदा - सूनोः अभिषेचनं चकार - मुलाला मंगलस्नान घालती झाली. ॥४॥
श्रीशुकदेव म्हणतात - एकदा भगवान श्रीकृष्णांचा कूस बदलण्याचा अभिषेक-उत्सव साजरा केला जात होता. त्याच दिवशी त्यांचे जन्मनक्षत्रही होते. त्यामुळे घरात पुष्कळ स्त्रियांची गर्दी झालेली होती. गाणे बजावणे चालले होते. ब्रह्माणांचा मंत्रघोष चालू होता. त्यावेळी यशोदेने मुलाला अभिषेक केला. (४)
विवरण :- औत्यानिक विधी - बालकाला घराबाहेर (प्रथमच) देवदर्शनाला नेण्याचा विधी असावा. प्रसूतीनंतर साधारण दोन तीन महिन्यानंतर एखाद्या मंदिरात जाऊन आई व बाळ यांनी देवाचे आशीर्वाद घेणे. त्यानंतर बालकाला कोठेहि घराबाहेर घेऊन जाता येते. (४)
नन्दस्य पत्नी कृतमज्जनादिकं विप्रैः
कृतस्वस्त्ययनं सुपूजितैः । अन्नाद्यवासःस्रगभीष्टधेनुभिः सञ्जात निद्राक्षमशीशयच्छनैः ॥ ५ ॥
विप्रासि पूजी यशोदा तदा ती गो वस्त्र माला दिधल्या भिकूला । त्या लाडक्याला निज आलि तेंव्हा हळूच शय्ये वरि ठेविले तो । शय्या तयाची शकटा तळासी त्या पाळण्याच्या मधि होति तेंव्हा ॥ ५ ॥
नंदस्य पत्नी - नंदाची स्त्री यशोदा - कृतमज्जनादिकं - केले आहेत स्नान आदिकरून विधि ज्याचे अशा - अन्नाद्यवासःस्रगभीष्टधेनुभिः - अन्नादि पदार्थ, वस्त्रे, माळा, इच्छित वस्तू व गाई यांनी - सुपूजितैः विप्रैः - ज्याला उत्तमप्रकारे पूजिलेल्या ब्राह्मणांनी - कृतस्वस्त्ययनं - मंगल आशिर्वाद दिला आहे अशा - संजातनिद्राक्षं - झाले आहेत निद्रायुक्त डोळे ज्याचे अशा - शनैःअशीशयत् - हळू हळू निजविती झाली. ॥५॥
नंदराणीने ब्राह्मणांचा मोठा सन्मान केला. त्यांना अन्न, वस्त्रे, पुष्पमाळा, गाई इत्यादि प्रिय वस्तू देऊन उत्तम प्रकारे ब्राह्मणपूजन केले. तेव्हा त्यांनी मंगल स्नान घातलेल्या त्या बाळाला आशीर्वाद दिले. नंतर लाडक्याच्या डोळ्यांवर झोप आली आहे, असे पाहून तिने हळूवारपणे अंथरुणावर झोपविले. (५)
औत्थानिकौत्सुक्यमना मनस्विनी
समागतान् पूजयती व्रजौकसः । नैवाशृणोद् वै रुदितं सुतस्य सा रुदन् स्तनार्थी चरणावुदक्षिपत् ॥ ६ ॥
थोड्याचि वेळे हरि पान इच्छी रडे तशा उत्सवि कोण पाही ? न लक्ष्यि माता बहुदंग झाली रडोनि कृष्णो कर पाय झाडी ॥ ६ ॥
औत्थानिकौत्सुक्यमनाः - उपडा वळू लागल्याने जिचे मन आनंदयुक्त झाले आहे अशी - सा मनस्विनी - ती थोर मनाची यशोदा - समागतान् व्रजौकसः पूजयती (सती) - घरी आलेल्या गोकुळातील लोकांचा सत्कार करीत असता - सुतस्य रुदितं वै न एव अशृणोत् - मुलाचे रडणे खरोखर ऐकती झाली नाही - (ततः) स्तनार्थी रुदन् - नंतर स्तनपानाच्या इच्छेने रडणारा - (सः) चरणौ उदक्षिपत् - तो कृष्ण पाय वर करून झाडिता झाला. ॥६॥
थोड्याच वेळात जाग येऊन तो स्तनपान करण्यासाठी रडू लागला. त्यावेळी यशोदा उत्सवासाठी आलेल्या गोपगोपींचे स्वागत करण्यात गुंतली होती; त्यामुळे तिला त्याचे रडणे ऐकू आले नाही. तेव्हा रडत रडतच श्रीकृष्ण आपले पाय झटकू लागला. (६)
अधःशयानस्य शिशोरनोऽल्पक
प्रवालमृद्वङ्घ्रिहतं व्यवर्तत । विध्वस्त नानारसकुप्यभाजनं व्यत्यस्तचक्राक्ष विभिन्नकूबरम् ॥ ७ ॥
होता शिशू तै शकटातळासी ते कोवळे पायहि लागल्याने । ठिक्र्याचि झाला शकटो नि त्यात दह्या दुधाचे फुटलेचि माठ ॥ ७ ॥
अधःशयानस्य शिशोः - खाली निजलेल्या बालकृष्णाच्या - अल्पकप्रवालमृद्वंघ्रिहतं अनः - चिमुकल्या व कोवळ्या पानांप्रमाणे मृदु अशा पायाने लाथाडलेला गाडा - विध्वस्तनानारसकुप्यभाजनं - जेणेकरून नानाप्रकारचे रस भरलेली तांब्यापितळेची भांडी फुटली आहेत - व्यत्यस्तचक्राक्षविभिन्नकूबरं - व जेणेकरून चाके व आस मोडले आहेत जोखड अस्ताव्यस्त झाले आहे, अशा रीतीने - व्यवर्तत - उलथून पडला. ॥७॥
बाळ श्रीकृष्णाला एका छकड्याखाली झोपवले होते. त्याचे पालवीसारखे लाल चिमुकले पाय आपटताच तो छकडा उलटला. त्याच्यावर दूध, दही वगैरे पदार्थ घालून ठेवलेली भांडी होती, ती इकडे तिकडे विखरून गेली. तसेच त्या छकड्याची चाके, कणा, जोखड मोडून अस्ताव्यस्त होऊन पडली. (७)
दृष्ट्वा यशोदाप्रमुखा व्रजस्त्रिय
औत्थानिके कर्मणि याः समागताः । नन्दादयश्चाद्भुत दर्शनाकुलाः कथं स्वयं वै शकटं विपर्यगात् ॥ ८ ॥
ते पाहुनी गोप नि गोपि सार्या माता पिताही बहु दुःखि झाले । ते आपसा माजिचि बोलले की आपैस कैसे घडले असे हे ॥ ८ ॥
औत्थानिके कर्माणि याः समागताः - उपडा वळू लागण्याच्या प्रसंगीच्या समारंभासाठी ज्या गोळा झाल्या होत्या - (ताः) यशोदाप्रमुखाः व्रजस्त्रियः - त्या यशोदा आदिकरून गोकुळवासी स्त्रिया - नंदादयः गोपाः (च) - आणि नंदादिक गोप - (तत्) दृष्ट्वा - ते पाहून - अद्भुतदर्शनाकुलाः (बभूवुः) - अद्भुत देखाव्याने व्याकूळ झाले - शकटं स्वयं कथं वै विपर्यगात् - गाडा आपोआप कसा हो उलटला.॥८॥
उत्सवासाठी आलेल्या स्त्रिया, यशोदा, रोहिणी आणि नंद वगैरे गोप ही विचित्र घटना पाहून घाबरून गेले. ते म्हणू लागले, "अरे हा छकडा आपोआप कसा काय उलटला बुवा !" (८)
( अनुष्टुप् )
ऊचुरव्यवसितमती न्गोपान् गोपीश्च बालकाः । रुदतानेन पादेन क्षिप्तमेतन्न संशयः ॥ ९ ॥
( अनुष्टुप् ) तिथे जे बाळ गोपाळ खेळले वदले तदा । बाळाने रडता पाये शकटा ठोकरीयले ॥ ९ ॥
बालकाः - मुले - अव्यवसितमतीन् गोपान् - निश्चित झाली नाही बुद्धि ज्यांची अशा गोपांना - गोपीः च - आणि गोपींना - ऊचुः - म्हणाली - रुदता अनेन (कृष्णेन) एतत् पादेन क्षिप्तं - रडणार्या ह्या कृष्णाने हा गाडा पायाने उलट केला - न संशयः - ह्यात संशय नाही. ॥९॥
त्यांना याचे कोणतेच कारण कळले नाही. तेव्हा तेथे असलेली मुले गोप-गोपींना म्हणाली, "या कृष्णानेच रडताना आपल्या पायाने ठोकरून हा उलटविला, यात शंका नाही." (९)
न ते श्रद्दधिरे गोपा बालभाषितमित्युत ।
अप्रमेयं बलं तस्य बालकस्य न ते विदुः ॥ १० ॥
परी त्या ज्येष्ठ गोपांनी मुलांचे ऐकिले नसे । अनंताच्या अशा लीला बिचारे नच जाणती ॥ १० ॥
ते गोपाः - ते गोप - बालभाषितं इति न श्रद्दधिरे - हे मुलांचे बोलणे समजून त्यावर विश्वास ठेविते झाले नाहीत - उत ते तस्य बालकस्य - कारण ते त्या बालकृष्णाचे - अप्रमेयं बलं विदुः - अपरिमित बल जाणत नव्हते. ॥१०॥
परंतु त्या गोपांनी ’ती पोरांची बडबड’ मानून त्यावर विश्वास ठेवला नाही. कारण त्या मुलाचा असामान्य पराक्रम त्यांना माहीत नव्हता. (१०)
विवरण :- गोरसाने (दूध, दही इ.) भरलेले हंडे ठेवलेल्या गाडयाखाली कृष्णाला झोपविले होते. झोपेतून जागा झाल्यावर बालकृष्णाने रडत असता आपले मृदू कोमल पाय हवेत नाचवले व गाडा (शकट) उलटला. (ऐहिकाला परमात्म्याचा, पारलौकिकाचा पदस्पर्श झाला की, ऐहिकातील रस नाहीसा होतोच हे उघडच आहे.) हे सर्व आसपास खेळणार्या मुलांनी पाहिले होते. पण त्यांच्या सांगण्यावर कोणाचाच विश्वास बसला नाही. अर्थात हे शक्यच आहे. अशक्यप्राय गोष्टीवर कोण विश्वास ठेवेल ? त्यातून ते सांगणारी लहान मुले ! (७-१०)
रुदन्तं सुतमादाय यशोदा ग्रहशङ्किता ।
कृतस्वस्त्ययनं विप्रैः सूक्तैः स्तनं अपाययत् ॥ ११ ॥
ग्रहांचा कोप जाणोनी ब्राह्मणे मंत्र गायिले । पुन्हा माता करी बाळा आपुले स्तनपान ते ॥ ११ ॥
ग्रहशंकिता यशोदा - पिशाचबाधेची भीति वाटलेली यशोदा - रुदन्तम् - रडत असलेल्या - विप्रैः सूक्तैः कृतस्वस्त्ययनं सुतं - ब्राह्मणांनी रक्षोघ्नादिक सूक्तांनी स्वस्तिवाचन केलेल्या मुलाला - आदाय - घेऊन - स्तनं अपाययत् - स्तनपान करविती झाली. ॥११॥
हा ग्रहांचा कोप आहे, असे यशोदेला वाटले. तिने रडणार्या लाडक्याला मांडीवर घेऊन ब्राह्मणांकडून वेदमंत्रांनी शांतिपाठ करविला आणि त्याला दूध पाजले. (११)
पूर्ववत् स्थापितं गोपैः बलिभिः सपरिच्छदम् ।
विप्रा हुत्वार्चयान् चक्रुः दध्यक्षत कुशांबुभिः ॥ १२ ॥
गोपांनी जोडिला गाडा ठेविली सर्व भांडि ती । हवने भगवत्द्वारा पूजिला शकटो पुन्हा ॥ १२ ॥
विप्राः - ब्राह्मण - हुत्वा - होमहवन करून - बलिभिः गोपैः पूर्ववत् - शक्तिमान गोपांनी पहिल्याप्रमाणे - सपरिच्छदं स्थापितं शकटं - साहित्यासह जाग्यावर ठेविलेल्या गाडयाला - दध्यक्षतकुशांबुभिः अर्चयांचक्रुः - दही, अक्षता आणि कुशोदक यांनी पूजिते झाले. ॥१२॥
बलाढ्य गोपांनी छकडा पुन्हा व्यवस्थित ठेवून त्याच्यावर पहिल्याप्रमाणे सर्व साहित्य ठेवले. ब्राह्मणांनी हवन केले आणि दही, अक्षता, दर्भ आणि पाणी घेऊन त्या छकड्याची पूजा केली. (१२)
विवरण :- उलटलेला गाडा अनेक बलवान गोपांनी सरळ केला. इथे 'बलिभिः गोपैः' हे शब्द अर्थपूर्ण. जो गाडा सरळ करावयास अनेक बलवान गोपांना शक्ती लावावी लागली, तो गाडा बालकृष्णाने आपल्या छोटया छोटया पावलांनी उलथून टाकला. अर्थातच कृष्ण परमात्म्यास अशक्य ते काय ? (१२)
येऽसूयानृतदंभेर्षा हिंसामानविवर्जिताः ।
न तेषां सत्यशीलानां आशिषो विफलाः कृताः ॥ १३ ॥
त्यागिती द्वेष नी खोटे ईर्षा हिंसा नि दंभ तो । सत्यशील द्विजांची ती खोटी ना वचने कधी ॥ १३ ॥
ये असूयानृतदंभेर्प्याहिंसा - जे असूया, खोटे बोलणे, दंभ, द्रोह, हिंसा, - मानविवर्जिता (सन्ति) - गर्व इत्यादिकांनी रहित असतात - तेषां सत्यशीलानां कृताः - त्या सत्यशील पुरुषांनी दिलेले - आशिषः विफलाः न भवन्ति - आशीर्वाद कधीही निष्फळ होत नाहीत. ॥१३॥
असूया, दंभ, ईर्ष्या, हिंसा आणि अभिमान नसलेल्या सत्यशील ब्राह्मणांचे आशीर्वाद कधी विफल होत नाहीत, (१३)
इति बालकमादाय सामर्ग्यजुरुपाकृतैः ।
जलैः पवित्रौषधिभिः अभिषिच्य द्विजोत्तमैः ॥ १४ ॥
नंदाने घेतले बाळा चतुर्वेदोक्त मंत्र नी । पवित्र औषधीयुक्त जळाने बाळ न्हाविले ॥ १४ ॥
इति बालकं आदाय - असे म्हणत बालकाला घेऊन - द्विजोत्तमैः सामर्ग्यजुरुपाकृतैः - श्रेष्ठ ब्राह्मणांकडून ऋक्, यजु व साम ह्या तीन्ही वेदांतील मंत्रांनी - जलैः पवित्रौषधिभिः = अभिमंत्रण केलेल्या जलांनी व पवित्र औषधिमिश्रित उदकांनी - अभिषिच्य - अभिषेक करवून; ॥१४॥
असा विचार करून नंदांनी मुलाला उचलून घेतले आणि श्रेष्ठ ब्राह्मणांकडून सामवेद, ऋग्वेद आणि यजुर्वेदाच्या मंत्रांच्याद्वारे अभिमंत्रित आणि पवित्र औषधींनी युक्त पाण्याने त्याला स्नान घालून (१४)
वाचयित्वा स्वस्त्ययनं नन्दगोपः समाहितः ।
हुत्वा चाग्निं द्विजातिभ्यः प्रादादन्नं महागुणम् ॥ १५ ॥
स्वस्त्यन असा पाठ एकाग्रे होम जाहला । श्रेष्ठ अन्नचि वाढोनी द्विजा भोजन ते दिले ॥ १५ ॥
स्वस्त्ययनं च वाचयित्वा - पुण्याहवाचन करवून - अग्निं च हुत्वा - आणि अग्नीला आहुती देऊन - समाहितः नंदगोपः - स्वस्थचित्त झालेला नंद गवळी - द्विजातिभ्यः महागुणं अन्नं प्रादात् - ब्राह्मणांना उत्तमप्रकारचे अन्न देता झाला. ॥१५॥
पुण्याहवाचन करविले; आणि हवन करवून ब्राह्मणांना पंचपक्वान्नांचे भोजन घातले. तेव्हा कोठे नंदांचे समाधान झाले. (१५)
गावः सर्वगुणोपेता वासःस्रग् रुक्ममालिनीः ।
आत्मजाभ्युदयार्थाय प्रादात्ते चान्वयुञ्जत ॥ १६ ॥
व्हावया भद्र बाळाने ब्राह्मणा वस्त्र गायि त्या । सोन्याचे घालुनी हार दिधल्या तृप्तिले तयां ॥ १६ ॥
आत्मजाभ्युदयार्थाय - मुलाचा सर्वतोपरी उत्कर्ष व्हावा याकरिता - सर्वगुणोपेताः - सर्व लक्षणांनी युक्त - वासःस्रग्रुक्ममालिनीः गावः - व वस्त्रे, फुलांचे हार व सोन्याच्या पुतळ्यांच्या माळांनी विभूषित अशा गाई - (द्विजातिभ्यः) प्रादात् - ब्राह्मणांना देता झाला - ते च (आशिषः) अन्वयुंजत - ते ब्राह्मणहि त्या बालकाला आशीर्वाद देते झाले. ॥१६॥
नंतर त्यांनी मुलाच्या उत्कर्षासाठी ब्राह्मणांना सर्वगुणसंपन्न, वस्त्रे, पुष्पमाळा आणि सोन्याच्या साखळ्यांनी सजविलेल्या गाई दान दिल्या. तेव्हा ब्राह्मणांनी त्यांना आशीर्वाद दिले. (१६)
विप्रा मन्त्रविदो युक्ताः तैः याः प्रोक्तास्तथाशिषः ।
ता निष्फला भविष्यन्ति न कदाचिदपि स्फुटम् ॥ १७ ॥
वेदवेत्ते सदाचारी असती विप्र त्यांचिये । निष्फळ नच ती वाणी होते हो कधिही पहा ॥ १७ ॥
(ये) विप्राः वेदविदः युक्ताः (सन्ति) - जे ब्राह्मण वेदवेत्ते व योगाभ्यासी आहेत - तैः याः आशिषः प्रोक्ताः - त्यांनी जे आशीर्वाद दिलेले असतात - ते तथा (एव भविष्यन्ति) - ते खरेच व्हावयाचे - कदाचित् अपि निष्फलाः न भविष्यन्ति (इति) स्फुटं - कधीही निष्फल व्हावयाचे नाहीत हे स्पष्ट आहे. ॥१७॥
जे वेदवेत्ते आणि सदाचारी ब्राह्मण असतात, त्यांचे आशीर्वाद कधी निष्फळ होत नाहीत, ही गोष्ट स्पष्टच आहे. (१७)
विवरण :- पुढील अनर्थाच्या आशंकेने नंद-यशोदेने ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले. ते ब्राह्मण सामान्य नव्हते. सत्त्वशील, षड्विकाररहित आणि गुणसंपन्न होते. त्यांनी दिलेले आशीर्वाद निश्चितच फलद्रूप होणार हा भाव. (गाडयाखाली कृष्णाला चिरडून मारण्याचा शकटासुराचा डाव अयशस्वी झाला. उलट त्याचाच नाश झाला. आता दुसरा असुर तृणावर्त. (१३-१७)
एकदारोहमारूढं लालयन्ती सुतं सती ।
गरिमाणं शिशोर्वोढुं न सेहे गिरिकूटवत् ॥ १८ ॥
एकदा खेळवी बाळा यशोदा पोटि घेउनी । जाहला जड हा कृष्ण शिळेच्या परि ना सहे ॥ १८ ॥
एकदा आरोहं आरूढं - एके दिवशी मांडीवर घेऊन - सुतं लालयंती सती (यशोदा) - मुलाला खेळवीत असलेली साध्वी यशोदा - गिरिकूटात् शिशोः गरिमाणं - पर्वताच्या शिखरासारखे मुलाचे ओझे - वोढुं न सेहे - वहाण्यास समर्थ झाली नाही.
एके दिवशी यशोदा आपल्या मुलाला मांडीवर घेऊन त्याचे लाड करीत होती. त्यावेळी एकदम मोठ्या शिलाखंडाप्रमाणे तो जड वाटू लागला. (१८)
विवरण :- यशोदा कृष्णाला मांडीवर घेऊन खेळवीत असता तो इतका जड झाला की त्याचा भार तिला पेलवेना. तिने कृष्णाला जमिनीवर ठेवले. (ती भूमाता, एका मातेकडून दुसर्या मातेकडे.) जड होणे हीही कृष्णाची लीला. त्याचेशिवाय यशोदेने त्याला खाली ठेऊन ती दूर गेली नसती. आगामी वादळापासून तिचे रक्षण होण्याची ही योजना. (१८)
भूमौ निधाय तं गोपी विस्मिता भारपीडिता ।
महापुरुषमादध्यौ जगतामास कर्मसु ॥ १९ ॥
भाराने त्रासिली माता ठेविले पृथिवीवरी । आश्चर्य वाटले चित्ती घर कामास लागली ॥ १९ ॥
भारपीडिता गोपी विस्मिता (सती) - भाराने पीडित झालेली यशोदा आश्चर्यचकित होत्साती - तं भूमौ निधाय - त्याला जमिनीवर ठेवून - महापुरुषं आदध्यौ - परमेश्वराचे ध्यान करिती झाली - जगतां कर्मसू आस - आणि सृष्टिकर्मांपैकी जे आपले कृत्य त्या कृत्याला लागली. ॥१९॥
त्या भाराने कासावीस होऊन तिने श्रीकृष्णाला जमिनीवर बसविले. याचे तिलाही आश्चर्य वाटले. यानंतर तिने भगवंतांचे स्मरण केले आणि ती घरकामाला लागली. (१९)
दैत्यो नाम्ना तृणावर्तः कंसभृत्यः प्रणोदितः ।
चक्रवातस्वरूपेण जहारासीनमर्भकम् ॥ २० ॥ गोकुलं सर्वमावृण्वन् मुष्णन् चक्षूंषि रेणुभिः । ईरयन्सुमहाघोर शब्देन प्रदिशो दिशः ॥ २१ ॥
दैत्य नामे तृणवर्त कंसाचा निजसेवक । वादळी रूप घेवोनी कृष्णा आकाशि फेकले ॥ २० ॥ गोकुळी दाटली धूळ कोणा कांही न ते दिसे । भयान वादळी शब्दे दिशाही थर्र्र कापल्या ॥ २१ ॥
प्रणोदितः कंसभृत्यः नाम्ना तृणावर्तः दैत्यः - कंसाने पाठविलेला आपला सेवक तृणावर्त नावाचा दैत्य - सर्वं गोकुलं रेणुभिः आवृण्वन् - सर्व गोकुळ धुळीने झाकणारा - चक्षूंषि मुष्णन् - दृष्टि बंद करणारा - सुमहाघोरशब्देन - अतिशय महाभयंकर अशा आपल्या शब्दाने - दिशः प्रदिशः ईरयन् - दिशा व उपदिशा गाजवून सोडणारा - आसीनं अर्भकं - जमिनीवर असलेल्या बालकाला - चक्रवातस्वरुपेण जहार - वावटळीच्या रूपाने उचलून नेता झाला ॥२०-२१॥
तृणावर्त नावाचा एक दैत्य कंसाचा सेवक होता. कंसाच्या सांगण्यावरून प्रचंड वावटळीच्या रूपाने तो आला आणि बसलेल्या बालकाला उडवून घेऊन गेला. त्याने सगळे गोकूळ झाकळून टाकले. त्यामुळे लोकांचे डोळे धुळीने भरून त्यांना काहीसे दिसेनासे झाले. त्याने प्रचंड आवाजाने दाही दिशांचा थरकाप उडविला. (२०-२१)
मुहूर्तमभवद् गोष्ठं रजसा तमसाऽऽवृतम् ।
सुतं यशोदा नापश्यत् तस्मिन् न्यस्तवती यतः ॥ २२ ॥
दो घडी चालले ऐसे माता ते संपल्यावरी । शोधी कृष्णास त्या जागी न दिसे तेथ तो तिला ॥ २२ ॥
गोष्ठं मुहूर्तं रजसा तमसा आवृतं अभूत् - गोकुळ दोन घटिका धुळीने व अंधकाराने भरून गेले - यतः - ज्याठिकाणी - यशोदा न्यस्तवती - यशोदा मुलाला ठेविती झाली - तस्मिन् - त्याठिकाणी - (सा तं) न अपश्यत् - ती त्याला पाहती झाली नाही
संपूर्ण गोकूळ थोडा वेळ धुळीने आणि अंधाराने झाकोळून गेले होते. यशोदेने मुलाला जेथे ठेवले होते, तेथे जाऊन पाहिले, तर तेथे तो नव्हता. (२२)
नापश्यत् कश्चनात्मानं परं चापि विमोहितः ।
तृणावर्तनिसृष्टाभिः शर्कराभिरुपद्रुतः ॥ २३ ॥
वार्याने उडली वाळू कोणी बेशुद्ध जाहले । कळेना कांहि कोणासी आपुले पर काय ते ॥ २३ ॥
तृणावर्तनिसृष्टाभिः शर्कराभिः - तृणावर्ताच्या धूळ फेकण्याच्या सपाटयाने - उपद्रुतः कश्चन - त्रासलेला कोणीही मनुष्य - विमोहितः (सन्) - मूढ होऊन - आत्मानं च परं अपि - स्वतःला आणि दुसर्या मनुष्यालाही - न अपश्यत् - पाहू शकला नाही. ॥२३॥
तृणावर्ताने उडविलेल्या धुळीने सर्वजण इतके त्रस्त झाले की, दुसर्याला तर सोडाच, पण स्वतःलाही ते पाहू शकत नव्हते. (२३)
( पुष्पिताग्रा )
इति खरपवन चक्रपांशुवर्षे सुतपदवीमबला विलक्ष्य माता । अतिकरुणं अनुस्मरन्त्यशोचद् भुवि पतिता मृतवत्सका यथा गौः ॥ २४ ॥
( पुष्पिताग्रा ) न दिसत जधि कृष्ण येश्वदेला स्मरुनि मनी अति दुःखिताचि झाली । अति करुणामयि दिनोचि संपे पडलि धरेसि मरे जणू वत्स गो ॥ २४ ॥
इति - याप्रमाणे - खरपवनचक्रपांसुवर्षे सुतपदवीं - भयंकर वावटळीत व धूळीच्या वर्षावात - अविलक्ष्य - मुलाला न पाहिल्यामुळे - अबला माता - दीन अशी यशोदा माता - यथा मृतवत्सका गौः (तथा) - ज्याप्रमाणे वासरू मेलेली गाय त्याप्रमाणे - (तं) अनुस्मरंती - त्याला आठवीत - अतिकरुणं अशोचत् - अत्यंत करुणस्वराने शोक करिती झाली - भुवि (च) अपतत् - आणि पृथ्वीवर पडली. ॥२४॥
ते जोरदार वादळ आणि धुळीच्या वर्षावात मुलाचा पत्ता नाही, हे पाहून यशोदेला अत्यंत शोक झाला. पुत्राच्या आठवणीने ती अत्यंत व्याकुळ झाली आणि वासरू मेल्यावर गाईची जी अवस्था होते, तशी तिची दशा झाली व ती जमिनीवर कोसळली. (२४)
रुदितमनुनिशम्य तत्र गोप्यो
भृशमनुतप्तधियोऽश्रुपूर्णमुख्यः । रुरुदुरनुपलभ्य नन्दसूनुं पवन उपारतपांशुवर्षवेगे ॥ २५ ॥
जधि मरुत सरे तदा ध्वनी तो श्रवण करित गोपी तेथ पळाल्या । न बघत हरि तेथ दुःखिता त्या रुदन करितहि अश्रु ढाळियेला ॥ २५ ॥
पवने उपारतपांसुवर्षवेगे (सति) - वार्यातील धूळफेकीचा जोर कमी झाल्यावर - नंदसूनुं अनुपलभ्य - नंदाच्या मुलाला न पाहिल्यामुळे - भृशं अनुतप्तधियः - ज्यांचे अंतःकरण अत्यंत संतप्त झाले आहे - अश्रुपूर्णमुख्यः - व ज्यांचे मुख अश्रुप्रवाहांनी भरून गेले आहे अशा - गोप्यः - गोपी - तत्र (यशोदायाः) रुदितं - त्याठिकाणी यशोदेचे रडणे ऐकून - अनुनिशम्य रुरुदुः - आपणहि रडू लागल्या. ॥२५॥
तुफान शांत झाल्यावर धूळ कमी झाली, तेव्हा यशोदेच्या रडण्याचा आवाज ऐकून अन्य गोपी धावत तेथे आल्या. नंदनंदन न दिसल्याने त्या अत्यंत शोकाकुल झाल्या व त्यांच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागला. त्याही रडू लागल्या. (२५)
( अनुष्टुप् )
तृणावर्तः शान्तरयो वात्यारूपधरो हरन् । कृष्णं नभोगतो गन्तुं नाशक्नोद् भूरिभारभृत् ॥ २६ ॥
( अनुष्टुप् ) वारारूपी तृणावर्त न सहे जड कृष्ण तो । न चले बळ ते त्याचे वेग तो शांत जाहला ॥ २६ ॥
वात्यारूपधरः तृणावर्तः - वावटळीचे रूप धारण करणारा तृणावर्त दैत्य - कृष्णं हरन् शांतरयः नभोगतः - कृष्णाला घेतल्यावर आपला वेग थांबवून आकाशात गेला - ततः परं - त्यापुढे - भूरिभारभृत् - मोठे ओझे धारण करणारा तो - गंतुं नु अशक्नोत् - जाऊ शकला नाही. ॥२६॥
इकडे तृणावर्त वावटळीच्या रूपाने जेव्हा श्रीकृष्णाला आकाशात घेऊन गेला, तेव्हा त्याचे प्रचंड वजन त्याला सहन न झाल्याने त्याचा वेग शांत झाला. तो अधिक चालू शकला नाही. (२६)
तमश्मानं मन्यमान आत्मनो गुरुमत्तया ।
गले गृहीत उत्स्रष्टुं नाशक्नोद् अद्भुतार्भकम् ॥ २७ ॥
पहाडा परि हा बाळ तृणावर्त वदे मनीं । गळा पकडिला बाळे न होय दूर तो पुन्हा ॥ २७ ॥
गुरुमत्तया तं (कृष्णं) - अतिशय जड असल्यामुळे हा बालक म्हणजे - अश्मानं मन्यमानः (सः) - एक मोठा दगडच आहे की काय असे मानणारा तो दैत्य - (तेन च बालकेन) गले गृहीतः सन् - आणि त्या बालकाने आपला गळा पकडला असता - (तं) अद्भुतार्भकं - त्या अद्भुत बालकाला - आत्मनः उत्स्रष्टुं न अशक्नोत् - आपल्यापासून दूर लोटू शकला नाही. ॥२७॥
स्वतःपेक्षाही जास्त वजनदार असल्याने तृणावर्त श्रीकृष्णाला शिलाखंड समजू लागला. कृष्णाने त्याचा गळा असा पकडला की, तो त्या अद्भुत बालकाला आपल्यापासून बाजूला करू शकला नाही. (२७)
गलग्रहणनिश्चेष्टो दैत्यो निर्गतलोचनः ।
अव्यक्तरावो न्यपतत् सहबालो व्यसुर्व्रजे ॥ २८ ॥
निचेष्टित असा दैत्य बुबुळे पडले पहा । वाचाही बंद ती झाली सकृष्ण व्रजिं तो पडे ॥ २८ ॥
गलग्रहणनिश्चेष्टः - गळा आवळल्यामुळे हालचाल बंद झालेला, - निर्गतलोचनः - ज्याचे डोळे बाहेर आले आहेत असा - अव्यक्तरावः दैत्यः - आणि स्पष्ट शब्द न उमटणारा राक्षस - व्यसुः सहबालः व्रजे न्यपतत् - गतप्राण होत्साता मुलासह गोकुळात पडला. ॥२८॥
श्रीकृष्णाने इतक्या जोराने त्याचा गळा पकडला होता की तो दैत्य निश्चेष्ट झाला. त्याची बुबुळे बाहेर आली, बोलणे बंद झाले व प्राण निघून गेले. अखेर त्या बालकासह तो व्रजामध्ये येऊन पडला. (२८)
( इंद्रवज्रा )
तं अन्तरिक्षात् पतितं शिलायां विशीर्णसर्वावयवं करालम् । पुरं यथा रुद्रशरेण विद्धं स्त्रियो रुदत्यो ददृशुः समेताः ॥ २९ ॥
( इंद्रवज्रा ) आकाशि स्त्रीया बघती रडोनी प्रचंड दैत्यो पडला शिळेशी । जै शंकरे त्या त्रिपुरासुराचा ठेचूनि केला वध पूर्वकाळी ॥ २९ ॥
यथा रुद्रशरेण विद्धं पुरं - ज्याप्रमाणे शंकराच्या बाणाने छिन्नभिन्न झालेल्या त्रिपुरासुराला - अंतरिक्षात् शिलायां पतितं - आकाशातून शिळेवर पडलेल्या - विशीर्णसर्वावयवं करालं तं - व सर्व शरीर छिन्नभिन्न झालेल्या अशा त्या भयंकर दैत्याला - समेताः रुदत्यः स्त्रियः - एकत्र जमून रडत असलेल्या स्त्रिया - ददृशुः - पाहत्या झाल्या. ॥२९॥
तेथे ज्या स्त्रिया रडत होत्या, त्यांनी पाहिले की, एक आक्राळविक्राळ राक्षस आकाशातून एका मोठ्या शिळेवर येऊन आपटला आणि त्याचे सर्व अवयव मोडून पडले. जणू श्रीशंकरांच्या बाणांनी घायाळ होऊन पडलेला त्रिपुरासुरच. (२९)
( इंद्रवंशा )
प्रादाय मात्रे प्रतिहृत्य विस्मिताः कृष्णं च तस्योरसि लंबमानम् । तं स्वस्तिमन्तं पुरुषादनीतं विहायसा मृत्युमुखात् प्रमुक्तम् । गोप्यश्च गोपाः किल नन्दमुख्या लब्ध्वा पुनः प्रापुरतीव मोदम् ॥ ३० ॥
वक्षावरी तो लटकेहि कृष्ण विस्मीत झाल्या बघताचि गोपी । मातेस तो बाळ दिधला तयांनी खुशाल होता तरि बाळ तेंव्हा । नंदादि गोपे बघता तयाला आनंद झाला मनि खूप त्यांच्या ॥ ३० ॥
तस्य उरसि लंबमानं कृष्णं प्रादाय - त्या तृणावर्ताच्या उरावर लोंबणार्या कृष्णाला घेऊन - मात्रे प्रतिहृत्य - त्याच्या आईच्या स्वाधीन करून - विस्मिताः गोप्यः - आश्चर्यचकित झालेल्या गोपी - नंदमुख्यः गोपाः च - व नंदादिक गोप - विहायसा पुरुषादनीतं - आकाशात राक्षसाने नेलेल्या - मृत्यूमुखात् प्रमुक्तं - मृत्यूच्या तोंडातून सुटलेल्या - तं (सुतं) पुनः स्वस्तिमन्तं लब्ध्वा - त्या मुलाला पुनः सुखरूप स्थितीत मिळविल्यामुळे - अतीव किल मोदं प्रापुः - खरोखर अत्यंत हर्षाला प्राप्त झाले. ॥३०॥
श्रीकृष्ण त्याच्या वक्षःस्थलावर लोंबकळत होते, हे पाहून नंदादी गोप-गोपींना विस्मय वाटला. लगबगीने तेथे जाऊन त्यांनी श्रीकृष्णांना उचलून मातेकडे आणून दिले. मृत्यूमुखातून बालक सुखरूपपणे परत आले. जरी राक्षस त्याला आकाशात घेऊन गेला होता, तरीसुद्धा तो मृत्यूच्या तोंडून सुटून सुखरूप परत आला, हे पाहून सर्वांना अत्यंत आनंद झाला. (३०)
( मिश्र )
अहो बतात्यद्भुतमेष रक्षसा बालो निवृत्तिं गमितोऽभ्यगात् पुनः । हिंस्रः स्वपापेन विहिंसितः खलः साधुः समत्वेन भयात् विमुच्यते ॥ ३१ ॥
मोठेचि आश्चर्य घडे पहा की मृत्युमुखी बाळक दैत्य नेता । आला तिथोनी सुखरूप ऐसा त्या हिंसकाते तर पाप भक्षी । बोलोनि गेले मग गोप ऐसे संता न बाधा कुठल्याच काळी ॥ ३१ ॥
अहो - अहो - रक्षसा निवृत्तिं गमितः एषः बालः पुनः अभ्यगात् - अहो राक्षसाने मारलेला बालक पुनः परत आला - अत्यद्भुतं बत - हे खरोखर आश्चर्य होय - खलः हिंस्रः स्वपापेन विहिंसितः - दुष्ट व घातुक असा हा राक्षस आपल्या पापकर्माने मेला - साधुः समत्वेन भयात् विमुच्यते - सज्जन लोक समत्वबुद्धीने भयापासून मुक्त होतो. ॥३१॥
ते म्हणू लागले - "अहो ! हे केवढे आश्चर्य ! किती अद्भुत घटना घडली ते पहा ना ! या मुलाला राक्षसाने मृत्यूच्या मुखात टाकले होते, परंतु हा परत आला आणि त्या हिंसाचारी दुष्टाला त्याच्या पापानेच गिळून टाकले. साधुपुरुष आपल्या समतेनेच भयांपासून वाचतात, हेच खरे ! (३१)
किं नः तपश्चीर्णमधोक्षजार्चनं
पूर्तेष्टदत्तं उत भूतसौहृदम् । यत्संपरेतः पुनरेव बालको दिष्ट्या स्वबन्धून् प्रणयन् उपस्थितः ॥ ३२ ॥
तपो बगीचे अन दान यज्ञ ते काय झाले आमुच्या कराने ? मरोनि जाता परतेहि बाळ सौभाग्य मोठे अमुचे म्हणावे ॥ ३२ ॥
नः किं तपः चीर्णं - आम्ही कोणती तपश्चर्या केली होती - उत (किम्) अधोक्षजार्चनं (कृतम्) - किंवा ईश्वराचे काय पूजन केले होते - पूर्तेष्टदत्तं उत - किंवा पूर्व कर्म, यज्ञयाग, दान तसेच - भूतसौहृदं (वा किम् कृतम्) - प्राणिमात्रावर दया अशा तर्हेचे काय केले होते - यत् - ज्यामुळे - संपरेतः बालकः - मृत्यूमुखी पडलेला बालक - स्वबंधून् प्रीणयन् - आपल्या इष्टमित्रांना आनंद देत - दिष्टया पुनः एव उपस्थितः - सुदैवाने परत आला. ॥३२॥
आम्ही असे कोणते तप किंवा भगवंतांची पूजा केली होती ? किंवा पाणपोई घालणे, धर्मशाळा बांधणे इत्यादि लोकोपयोगी कामे केली होती ? किंवा यज्ञ, दान वगैरे केले होते ? किंवा लोकांचे भले केले होते की ज्यामुळे हा बालक मृत्यूच्या तावडीतून सुटून आपल्या स्वजनांना सुखी करण्यासाठी पुन्हा परत आला. काय आमचे भाग्य ! (३२)
( अनुष्टुप् )
दृष्ट्वाद्भुतानि बहुशो नन्दगोपो बृहद्वने । वसुदेववचो भूयो मानयामास विस्मितः ॥ ३३ ॥
( अनुष्टुप् ) अद्भुत घटना ऐशा घडता गोकुळी मनीं । नंद श्रीवसुदेवाला वारंवार स्मरे पहा ॥ ३३ ॥
इति बृहद्वने बहुशः अद्भुतानि दृष्ट्वा - महावनात याप्रमाणे वारंवार अनेक चमत्कार पाहून - विस्मितः नंदगोपः - आश्चर्यचकित झालेला नंद गोप - भूयः वसुदेववचः (सत्यं) मानयामास - वरच्यावर वसुदेवाचे भाषण खरे मानिता झाला. ॥३३॥
त्या महावनामध्ये पुष्कळशा अद्भुत घटना घडताहेत हे पाहून नंदाला आश्चर्य वाटले. त्याला वसुदेवाचे म्हणणे पुन्हा पटले. (३३)
विवरण :- 'सन्ति उत्पाताश्च गोकुले' असे सांगून कर भरण्यासाठी मथुरेत आलेल्या नंदाला वसुदेवाने लवकरात लवकर गोकुळात परत जाण्यास सांगितले. त्याच्या या द्रष्टेपणाची नंदाला वेळोवेळी प्रचीतीही येत होती. भगवान शंकराप्रमाणे जणू विषाचा पेला पिण्यासच श्रीकृष्ण गोकुळात आला होता. कंसाने त्याला मारण्यास अनेक दुष्ट शक्ती गोकुळात पाठविल्या होत्या. पण कृष्ण सर्वांना पुरून उरला ! (यः परस्य विषमं विचिन्तयेत् प्राश्रुयात् स कुमतिः स्वयं हि तत् ।) 'तृणावर्त' (निखिलं विश्वं तृणवत् आवर्तयति इति) सर्व जग गवताच्या पात्याप्रमाणे उडवून लावणारा असुर. असुर कृष्णाला आकाशात उंच उडवून ठार मारणार होता. (३१-३३)
एकदार्भकमादाय स्वाङ्कमारोप्य भामिनी ।
प्रस्नुतं पाययामास स्तनं स्नेहपरिप्लुता ॥ ३४ ॥
एकदा पाजिता माता बाळाला स्तनपान ते । वात्सल्ये झरले दूध आपोआप तदा पहा ॥ ३४ ॥
एकदा अर्भकं आदाय - एके दिवशी मुलाला उचलून - स्वांकं आरोप्य - आपल्या मांडीवर घेऊन - भामिनी स्नेहपरिप्लुता - स्नेहाने परिपूरित अशी यशोदा - प्रस्नुतं (स्तनं) पाययामास - प्रेमपान्हा फुटला असता त्याला स्तनपान करविती झाली. ॥३४॥
एकदा यशोदा आपल्या बाळाला मांडीवर घेऊन मोठ्या प्रेमाने त्याला दूध पाजत होती. (३४)
विवरण :- 'परिछुत' हा शब्द इथे महत्वाचा. निरतिशय पुत्रप्रेमाने आईला पान्हा येतो. दूध आपोआप स्रवते. जणू तिच्यातील वात्सल्यच दूध बनून ओसंडते. बालकाला स्तनाग्र ओढण्याचेहि श्रम करावे लागत नाहीत. (३४)
पीतप्रायस्य जननी सुतस्य रुचिरस्मितम् ।
मुखं लालयती राजन् जृम्भतो ददृशे इदम् ॥ ३५ ॥
बाळाचे भरता पोट प्रेमाने माय चुंबिता । जांभई दिधली बाळें मुखात माय पाहि तै ॥ ३५ ॥
राजन् - हे राजा - पीतप्रायस्य जृंभतः तस्य - बहुतेक पिऊन झाले आहे ज्याचे अशा जांभई देणार्या त्याचे - रुचिरस्मितं मुखं लालयती सा जननी - सुंदर हास्ययुक्त मुखाचे कौतुक करणारी ती यशोदा माता - इदं ददृशे - असे पाहती झाली. ॥३५॥
हे राजा ! त्याचे जवळ जवळ दूध पिऊन झाले होते. तेव्हा यशोदा त्याचे मधुर हास्ययुक्त मुख कुरवाळत होती. त्याचवेळी श्रीकृष्णांना जांभई आली आणि मातेने त्यांच्या मुखात असे पाहिले की, (३५)
विवरण :- स्तनपान पूर्ण झालेल्या कृष्णाने जांभई देण्यासाठी तोंड उघडले आणि यशोदेला विश्वरूप दर्शन घडले. ते पाहून ती आश्चर्यचकित आणि गलितगात्र झाली. बिचारी यशोदा ! तिला फक्त वात्सल्यभावच माहीत. एवढे तेज सहन करण्याची ताकद तिच्यात कोठून येणार ? (पुढे गीता सांगताना भगवंतानी अर्जुनासही विश्वरूप दर्शन दाखविले. पण योग्य ती शक्तीही त्याला आधी मिळाली होती. तरीही तो गर्भगळित झाला होताच !) (३५)
( इंद्रवज्रा )
खं रोदसी ज्योतिरनीकमाशाः सूर्येन्दुवह्नि श्वसनांबुधींश्च । द्वीपान् नगान् तद् दुहितॄर्वनानि भूतानि यानि स्थिरजङ्गमानि ॥ ३६ ॥
( इंद्रवज्रा ) ते अंतरीक्षो अन ज्योति सर्व दिशा शशी सूर्य नि अग्नि वायू । समुद्र द्वीपो अन पर्वतो ते नद्या वनो नी जिव सृष्टि सारी ॥ ३६ ॥
खं रोदसी ज्योतिरनीकं - आकाश, स्वर्ग, पृथ्वी, नक्षत्रचक्र - आशाः सूर्येदुवह्निश्वसनांबुधीन् - दिशा, सूर्य, चंद्र, अग्नि, वायु, समुद्र - द्वीपान् नगान् तद्दुहितृ - द्वीपे, पर्वत, नद्या - वनानि - अरण्ये - यानि च स्थावरजंगमानि भूतानि (तानि सर्वाणि) - व जे स्थावरजंगम असे पदार्थ ते सर्व. ॥३६॥
त्यात आकाश, अंतरिक्ष, ज्योतिर्मंडल, दिशा, सूर्य, चंद्र, अग्नी, वायू, समुद्र, द्वीप, पर्वत, नद्या, भवने आणि सर्व चराचर पदार्थ भरले आहेत. (३६)
( अनुष्टुप् )
सा वीक्ष्य विश्वं सहसा राजन् सञ्जातवेपथुः । सम्मील्य मृगशावाक्षी नेत्रे आसीत् सुविस्मिता ॥ ३७ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कन्धे पूर्वार्धे सप्तमोऽध्यायः ॥ ७ ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
( अनुष्टुप् ) बाळाच्या मुखि हे पाही मृगशावकलोचना । काटा अंगास तो आला आश्चर्ये मिटि लोचने ॥ ३७ ॥ ॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता । विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सातवा अध्याय हा ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
राजन् - हे राजा - सा मृगशावाक्षी - ती हरिणाच्या बालकाप्रमाणे नेत्र असणारी यशोदा - विश्वं वीक्ष्य - हे सर्व जग पाहिल्याबरोबर - नेत्रे संमील्य - डोळे मिटून - सहसा संजातवेपथुः - अकस्मात् जिच्या अंगाला कंप सुटला आहे - सुविस्मिता आसीत् - अशी अत्यंत आश्चर्यचकित झाली. ॥३७॥
परीक्षिता ! आपल्या पुत्राच्या मुखामध्ये अशा प्रकारे अचानक सर्व जग पाहून यशोदा थरथर कापू लागली. तिने अत्यंत आश्चर्यचकित होऊन आपले डोळे बंद करून घेतले. (३७)
अध्याय सातवा समाप्त |