|
श्रीमद् भागवत पुराण
भगवतो देवकीगर्भेऽनुप्रवेशस्तत्र भगवंतांचा गर्भ प्रवेश आणि देवतांकडून त्यांची स्तुती - संहिता - अन्वय - अर्थ समश्लोकी - मराठी
श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् ) प्रलम्बबकचाणूर तृणावर्तमहाशनैः । मुष्टिकारिष्टद्विविद पूतना केशीधेनुकैः ॥ १ ॥
( अनुष्टुप् ) श्रीशुकदेव सांगतात - स्वये बलिष्ट तोकंस जरासंध सहाय्य त्या । प्रलंब बक चाणूर तृणावर्त अघासुर ॥ १ ॥
प्रलंबबकचाणूर - प्रलंब, बक, चाणूर, - तृणावर्तमहाशनेः - तृणावर्त व खादाड अघासुर यांनी - मुष्टिकारिष्टद्विविद - प्रलंब, बक, चाणूर, - पूतनाकेशिधेनुकैः - प्रलंब, बक, चाणूर, पूतना, केशी व धेनुक यांनी. ॥ १ ॥
श्रीशुकदेव म्हणतात - बलवान कंसाने जरासंधाच्या साहाय्याने प्रलंबासुर, बकासुर, चाणूर, तृणावर्त, अघासुर, मुष्टिक, अरिष्टासुर, द्विविद, पूतना, केशी, धेनुक (१)
अन्यैश्चासुरभूपालैः बाणभौमादिभिर्युतः ।
यदूनां कदनं चक्रे बली मागधसंश्रयः ॥ २ ॥
मुष्टिकारिष्ट असुरो केशी द्वीवीद पूतना । बाण भौमासुरो धेनुक् कितेक दैत्यराज ते । सहाय्य घेउनी योजी नष्टिण्या यदुवंश तो ॥ २ ॥
अन्यैः च बाणभौमादिभिः - आणि दुसर्या बाणासुर, भौमासुर आदिकरून - असुरभूपालैः - राक्षसी वृत्तींच्या राजांनी - युतः - युक्त असा - मागधसंश्रयः - मगधराजाचा आश्रय आहे ज्याला असा बली बलवान कंस - यदूनां कदनं चक्रे - यादवांचा संहार करिता झाला. ॥ २ ॥
बाणासुर, भौमासुर इत्यादि पुष्कळसे दैत्य व राजे यांना हाताशी धरून तो यादवांचा संहार करू लागला. (२)
ते पीडिता निविविशुः कुरुपञ्चालकेकयान् ।
शाल्वान् विदर्भान् निषधान् विदेहान् कोशलानपि ॥ ३ ॥
भितीने सर्व ते लोक कुरु पांचाल केकयी । शाल्वो विदर्भ निषधी विदेहदेशि पातले ॥ ३ ॥
पीडिताः ते - पीडित झालेले ते यादव - कुरुपांचालकेकयान् - कुरु, पांचाल, केकय, - शाल्वान् विदर्भान् निषधान् - शाल्व, विदर्भ, निषध, - विदेहान् कोसलान् अपि निविवशुः - विदेह आणि कोसल ह्या देशांत जाऊन राहिले. ॥ ३ ॥
तेव्हा ते भयभीत होऊन कुरू, पंचाल, केकय, शाल्व, विदर्भ, निषध, विदेह आणि कौशल या देशांत जाऊन राहिले. (३)
विवरण :- कंसाने काही काळ आणलेला सद्वर्तनाचा आव गळून पडला आणि त्याची मूळ पाशवी, असुरी वृत्ती उफाळून वर आली. यादव हे त्याचे शत्रू. प्रलंब, बक, चाणूर इ. दैत्यांच्या साहाय्याने त्याने यादवांशी वैर मांडले, त्यांना पळवून लावले. जरासंध तर त्याचा प्रमुख साहाय्यक होताच. सुरशक्तीपेक्षा इथे असुरशक्ती वरचढ झाल्याचे दिसून येते. बरेच राजे कंसाला साहाय्य करीत होते. याअरूनच असत्याची भुरळ कशी पडते हे समजून येते. जरासंध तर इतका शक्तिमान होता की प्रत्यक्ष युद्धात त्याला पराभूत करणे अशक्य झाल्याने नंतर त्याचा वध करण्यास कूटनीतिचा वापर करावा लागला. आणि अधर्माचा नाश करण्यास भगवंताला पुन्हा पुन्हा अवतार घ्यावा लागला. एकूणच पाशवी शक्ती बलाढ्य झाल्या होत्या. (१-३)
एके तं अनुरुन्धाना ज्ञातयः पर्युपासते ।
हतेषु षट्सु बालेषु देवक्या औग्रसेनिना ॥ ४ ॥
मनात नसुनी कांही सेवा तत्पर दाविती । एकेक करुनी कंसे मारिता देवकी हिचे ॥ ४ ॥
एके ज्ञातयः - कोणी ज्ञातिबांधव - तं अनुरुंधानाः पर्युपासते - त्या कंसाच्या अनुरोधाने वागून त्याची सेवा करिते झाले - औग्रसेनिना - कंसाने - देवक्याः षट्सु बालेषु हतेषु - देवकीचे सहा पुत्र मारले असता.. ॥ ४ ॥
काही नातलग वरवर त्याच्या मनासारखे वागून त्याची सेवा करीत राहिले. कंसाने जेव्हा एक-एक करून देवकीची सहा मुले मारली, (४)
सप्तमो वैष्णवं धाम यं अनन्तं प्रचक्षते ।
गर्भो बभूव देवक्या हर्षशोकविवर्धनः ॥ ५ ॥
सातव्या गर्भि ते शेष देवकीगर्भि राहिले । देवकी हर्षली चित्ती भयाने दाटली तशी ॥ ५ ॥
यं अनंतं प्रचक्षते - ज्याला अनंत असे म्हणतात - तत् वैष्णवं धाम - ते विष्णूचे तेज - देवक्याः हर्षशोकविवर्धनः - देवकीचा हर्ष व शोक वाढविणारा - सप्तमः गर्भः बभूव - असा सातवा गर्भ झाला. ॥ ५ ॥
तेव्हा देवकीच्या सातव्या गर्भात भगवंतांचे अंशस्वरूप श्रीशेष, ज्यांना अनंत असेही म्हणतात, ते आले. त्यामुळे देवकीला स्वाभाविकच आनंद झाला, पण कंस कदाचित यालाही मारील, या भितीने दुःखही झाले. (५)
भगवान् अपि विश्वात्मा विदित्वा कंसजं भयम् ।
यदूनां निजनाथानां योगमायां समादिशत् ॥ ६ ॥
विश्वात्मा भगवंताने पाहिले यदुवंश तो । मलाचि मानितो स्वामी कंसाने त्रासिले तया । वदले योगमायेला आदेश दिधला असा ॥ ६ ॥
विश्वात्मा भगवान् अपि - जगदात्मा परमेश्वरही - निजनाथानां यदूनां - आपणच ज्यांचे त्राते आहोत अशा यादवांना - कंसजं भयं विदित्वा - कंसापासून उत्पन्न झालेले भय जाणून - योगमायां समादिशत् - योगमायेला आज्ञा देता झाला. ॥ ६ ॥
मलाच आपले सर्वस्व मानणारे यादव कंसामुळे त्रस्त झाले आहेत असे पाहून विश्वात्मा भगवंतांनी योगमायेला आज्ञा केली. (६)
गच्छ देवि व्रजं भद्रे गोपगोभिः अलंकृतम् ।
रोहिणी वसुदेवस्य भार्याऽऽस्ते नन्दगोकुले । अन्याश्च कंससंविग्ना विवरेषु वसन्ति हि ॥ ७ ॥
वज्री जा देवि कल्याणी तिथे गोप नि गाई ते । गोकुळी नंदबाबाच्या पत्न्या वसुदेवच्या । गुप्त वेषे तिथे होत कंसभेणे अशा पहा ॥ ७ ॥
भद्रे देवि - हे कल्याणकारिणी देवी - गोपगोभिः अलंकृतं व्रजं गच्छ - गोप व गाई ह्यांनी सुशोभित अशा गोकुळात जा - नंदगोकुले वसुदेवस्य भार्या रोहिणी आस्ते - नंदाच्या गोकुळात वसुदेवाची स्त्री रोहिणी आहे - अन्याः च (वसुदेवस्य भार्याः) - आणखीही दुसर्या वसुदेवाच्या स्त्रिया - कंससंविग्नाः विवरेषु वसंति हि - कंसाच्या भीतीमुळे तेथेच गुप्तस्थळी राहत आहेत. ॥ ७ ॥
देवी ! कल्याणी ! तू गोकुळात जा. गवळी आणि गायी यांनी तो प्रदेश सुशोभित झाला आहे. तेथे नंदांच्या गोकुळात वसुदेवांची पत्नी रोहिणी राहात आहे. त्यांच्या इतर पत्न्याही कंसाच्या भितीने गुप्त जागी रहात आहेत. (७)
देवक्या जठरे गर्भं शेषाख्यं धाम मामकम् ।
तत् संनिकृष्य रोहिण्या उदरे सन्निवेशय ॥ ८ ॥
देवकी गर्भि तो शेष अंश माझा स्थितो असे । काढुनी तेथुनी त्याला रोहिणी पोटि ठेव तू ॥ ८ ॥
देवक्याः जठरे स्थितं - देवकीच्या उदरातील - मामकं शेषाख्यं धाम - माझाच शेष नावाचा अंश अशा - गर्भं - गर्भाला - संनिकृष्य - काढून - रोहिण्याः उदरे संनिवेशय - रोहिणीच्या उदरात नेऊन ठेव. ॥ ८ ॥
सध्या माझा शेष नावाचा अंश देवकीच्या उदरात गर्भरूपाने राहिला आहे. त्याला तेथून काढून तू रोहिणीच्या पोटात नेऊन ठेव. (८)
विवरण :- असुरी शक्ती जरी बलाढ्य होत होत्या, तरी त्यावर उताराही निर्माण होतच होता. मात्र कोणत्याही गोष्टीची वेळ यावी लागते, या तत्त्वानुसार काही काळ जावा लागणार होता. देवकीच्या सहाही मुलांना ठार केल्यानंतर यथावकाश पुन्हा सातव्या वेळी गर्भधारणा झाली आणि असुर निःपाताची वेळ हळूहळू जवळ येत गेली.
अथाहं अंशभागेन देवक्याः पुत्रतां शुभे ।
प्राप्स्यामि त्वं यशोदायां नन्दपत्न्यां भविष्यसि ॥ ९ ॥
कल्याणी बल ज्ञानाने अंशे मी देवकी हिचा । होईल पुत्र नी तू त्या यशोदा गर्भि जन्म घे ॥ ९ ॥
शुभे - हे शुभकारिणी - अथ अहं - नंतर मी - अंशभागेन देवक्याः पुत्रतां प्राप्स्यामि - पूर्णरूपाने देवकीचा पुत्र होईन - त्वं नंदपत्न्या यशोदयां भविष्यसि - तूहि नंदाची पत्नी जी यशोदा तिच्या उदरी जन्म घेशील. ॥ ९ ॥
हे कल्याणी ! नंतर मी माझ्या सर्व शक्तींसह देवकीचा पुत्र होईन आणि तू नंदपत्नी यशोदेच्या ठिकाणी जन्म घे. (९)
अर्चिष्यन्ति मनुष्यास्त्वां सर्वकामवरेश्वरीम् ।
धूपोपहारबलिभिः सर्वकामवरप्रदाम् ॥ १० ॥
जे जे मागती लोक समर्थ वरदाचि हो । धूप दीप नि नैवेद्ये पूजितील तुला जन ॥ १० ॥
मनुष्याः - लोक - सर्वकामवरेश्वरीं - सर्व कामनारूप वर देण्यास समर्थ - सर्वकामवरप्रदां त्वां - व सर्व मनोरथरूप वर देणार्या अशा तुला - धूपोपहारबलिभिः अर्चिष्यन्ति - धूप, नैवेद्य व बलि ह्या सामग्रीच्या योगाने पूजितील. ॥ १० ॥
सर्व वर देण्यास समर्थ असणार्या तुला माणसे आपल्या सर्व कामना पूर्ण करणारी समजून धूप, दीप, नैवेद्य इत्यादि अर्पण करून तुझी पूजा करतील. (१०)
नामधेयानि कुर्वन्ति स्थानानि च नरा भुवि ।
दुर्गेति भद्रकालीति विजया वैष्णवीति च ॥ ११ ॥
अनेक स्थान ते तेथे देतील नाम ही अशी । दुर्गा नी भद्रकाली नी विजया वैष्णवी तशी ॥ ११ ॥
नराः च - आणि लोक - भुवि - पृथ्वीवर - दुर्गा इति भद्रकाली इति विजया वैष्णवी इति - दुर्गा, भद्रकाली, विजया व वैष्णवी अशी - तव नामधेयानि स्थानानि च कुर्वन्ति - तुला नावे देतील व तुझी मंदिरे बांधतील. ॥ ११ ॥
लोक पृथ्वीवर पुष्कळ ठिकाणी तुझी स्थापना करतील आणि तुला दुर्गा, भद्रकाली, विजया, वैष्णवी, इ. नावे ठेवतील व तुझी मंदिरे बांधतील. (११)
कुमुदा चण्डिका कृष्णा माधवी कन्यकेति च ।
माया नारायणीशानी शारदेत्यम्बिकेति च ॥ १२ ॥
कुमुदा चंडिका कृष्णा माधवी कन्यका असे । माया नारायणी शानी शारदा अंबिकाहि ते ॥ १२ ॥
कुमुदा चंडिका कृष्णा - कुमुदा, चंडिका, कृष्णा, - माधवी कन्यका इति - माधवी, कन्यका अशी - माया नारायणी ईशानी - आणि माया, नारायणी, ईशानी, - शारदा अंबिका इति च - तशीच शारदा, अंबिका अशी. ॥ १२ ॥
तसेच कुमुदा, चंडिका, कृष्णा, माधवी, कन्या, माया, नारायणी, ईशानी, शारदा, अंबिका इत्यादि अनेक नावे ठेवतील. (१२)
विवरण :- योगमायेला बलरामाचा गर्भ रोहिणीच्या उदरात स्थापन करावयास सांगून मग भगवान तिला म्हणाले की आपण देवकीचा पुत्र म्हणून जन्म घेणार व योगमाया नंदपत्नीच्या उदरात जन्म घेईल. देवकीच्या उदरातून गर्भसंकर्षण करून रोहिणीच्या उदरात स्थापन करण्याचे काम (ज्यामुळे बलरामाला संकर्षण हे नाव मिळाले) भगवंतांनी योगमायेस सांगितले. यामध्ये औचित्य दिसून येते. अशा प्रकारची कामे स्त्रीच अधिक धोरणाने आणि कौशल्याने करू शकते. त्याचवेळी भगवंत तिला म्हणाले ’या कर्माने लोक तुझी पूजा अक्रतील व तुला अनेक नावे देऊन तुझा आदर करतील.’ ते जी नावे आहेत ती अत्यंत यथार्थ आहेत. उदा० शत्रूवर संतप्त होणारी कोपीष्टा - चंडिका; सर्व दिशांवर विजय मिळविणारी - विजया; भद्र = कल्याण करणारी - भद्रकाली, मंगला; मधुकुलात निर्माण झालेली - विष्णुप्रिया माधवी. सर्वांवर राज्य करणारी - ईशाना. शत्रूची हिंसा करणारी (शार) - शारदा; नरसमुदायाला (बरोबर) घऊन जाणारी - नारायणी - जगन्माता - अंबिका.
गर्भसंकर्षणात् तं वै प्राहुः संकर्षणं भुवि ।
रामेति लोकरमणाद् बलं बलवदुच्छ्रयात् ॥ १३ ॥
गर्भी रोहिणिच्या जाता शेषा संकर्षणो असे । पडले नाम त्य अतैसे लोकरंजक राम नी । बलभद्र कुणी त्याला बल पाहोनि बोलती ॥ १३ ॥
भुवि - पृथ्वीवर - तं - त्या पुत्राला - गर्भसंकर्षणात् वै - खरोखर गर्भाचे आकर्षण केल्यामुळे - संकर्षणं प्राहुः - संकर्षण म्हणतील - लोकरमणात् रामः इति (आहुः) - लोकांना रमविणारा म्हणून राम म्हणतील - बलवदुच्छ्रयात बलं च (प्राहुः)- आणि अत्यंत बलवान असल्यामुळे बल असे म्हणतील. ॥ १३ ॥
देवकीच्या गर्भातून काढून घेतल्यामुळे शेषाला लोक जगात ’संकर्षण’ म्हणतील, तो लोकरंजन करणार असल्यामुळे त्याला राम म्हणतील, आणि बलवानांमध्ये श्रेष्ठ असल्यामुळे ’बल’ सुद्धा म्हणतील. (१३)
सन्दिष्टैवं भगवता तथेत्योमिति तद्वचः ।
प्रतिगृह्य परिक्रम्य गां गता तत् तथाकरोत् ॥ १४ ॥
जी आज्ञा ! वदली माया करोनी ती परिक्रमा । पृथ्वीशी पातली आणि वदे देव तसे करी ॥ १४ ॥
एवं भगवता संदिष्टा (योगमाया) - याप्रमाणे परमेश्वराने आज्ञापिलेली योगमाया - तथा इति ओम् इति - तसे असो, ठीक आहे, असे म्हणून - तद्वचः प्रतिगृह्य - त्याच्या आज्ञेचा स्वीकार केल्यावर - (तं) परिक्रम्य गां गता - त्याला प्रदक्षिणा करून पृथ्वीवर गेली - तत् तथा अकरोत् - ते सर्व त्याप्रमाणे करिती झाली. ॥ १४ ॥
जेव्हा भगवंतांनी अशी आज्ञा केली, तेव्हा योगमायेने "जशी आपली आज्ञा’ असे म्हणून त्यांचे म्हणणे शिरोधार्य मानले आणि त्यांना प्रदक्षिणा घालून पृथ्वीवर आली आणि भगवंतांनी जसे सांगितले तसे तिने केले. (१४)
गर्भे प्रणीते देवक्या रोहिणीं योगनिद्रया ।
अहो विस्रंसितो गर्भ इति पौरा विचुक्रुशुः ॥ १५ ॥
देवकी गर्भ हा जाता जठरी रोहिणी हिच्या । वदले लोक ते दुःखे देवकीगर्भ नष्टला ॥ १५ ॥
योगनिद्रया देवक्याः गर्भे - योगमायेने देवकीचा गर्भ - रोहिणीं प्रणीते - रोहिणीच्या उदराते नेला असता - पौराः - नागरिक लोक - अहो गर्भः विस्रंसितः इति विचुक्रुशुः - अहो गर्भ गळला असे बोलू लागले. ॥ १५ ॥
जेव्हा योगमायेने देवकीचा गर्भ नेऊन रोहिणीच्या उदरात ठेवला, तेव्हा तेथील नागरीक दुःखी अंतःकरणाने देवकीचा गर्भपात झाला, असे म्हणू लागले. (१५)
विवरण :- योगमायेने ’ठीक आहे’ असे म्हणून श्रीकृष्णाच्या आज्ञेप्रमाणे काम केले. परंतु इथे प्रश्न पडेल की, देवकीचा गर्भ रोहिणीच्या उदरात प्रविष्ट करताना त्या दोघी कोणत्या अवस्थेत असतील ? नुसती ’निद्रा’ म्हणून भागणार नाही, कारण इतल्या कठीण कामाचे वेळी जागृतावस्था येणारच. पण हे काम योगमाया करीत होते हे लक्षात घेतले पाहिजे. तिने त्यावेळी दोघींना ’योगनिद्रा’वस्थेत ठेवले आणि आपले काम यशस्वी केले. मात्र सगळीकडे देवकीचा ’गर्भपात’ झाल्याची बातमी पसरली. यामुळे एक महत्त्वाची गोष्ट साध्य झाली. लोकांना देवकीचा गर्भपात कंसाच्या भितीने, त्रासाने झाला असे वाटण्यास एक सबळ कारण मिळाले. वसुदेव-देवकीबद्दल सहानुभूती आणि कंसाबद्दल् अनादर, तिटकारा यांची भावना लोकांच्या मनांत निर्माण होऊ लागली. (१३-१५)
भगवानपि विश्वात्मा भक्तानां अभयंकरः ।
आविवेशांशभागेन मन आनकदुन्दुभेः ॥ १६ ॥
विशात्मा जरि तो विष्णू तरी ते भक्त रक्षिण्या । वसुदेवमना मध्ये कलांच्या सह जन्मला ॥ १६ ॥
भक्तानां अभयंकरः भगवान् विश्वात्मा अपि - भक्तांना अभय देणारा जगाचा आत्मा परमेश्वरही - अंशभागेन आनकदुंदुभेः मनः आविवेश - पूर्णरूपाने वसुदेवाच्या मनात प्रवेश करिता झाला. १६ ॥
भक्तांना अभय देणारे विश्वरूप भगवान वसुदेवांच्या मनामध्ये आपल्या सर्व कलांसह प्रविष्ट झाले. (१६)
स बिभ्रत् पौरुषं धाम भ्राजमानो यथा रविः ।
दुरासदोऽतिदुर्धर्षो भूतानां सम्बभूव ह ॥ १७ ॥
विद्यमान् असुनी झाला व्यक्त अव्यक्त रूपि तो । भगवत्ज्योत घेवोनि तेजस्वी वसुदेव ते । तेजाळले रवी ऐसे लोकांचे नेत्र फाकती । बल वाणी प्रभावाला कोणीही झाकू ना शके ॥ १७ ॥
पौरुषं धाम बिभ्रत् - परमेश्वराची मूर्ती हृदयात धारण करणारा - यथा रविः (तथा) भ्राजमानः सः - जसा सूर्य त्याप्रमाणे प्रकाशणारा तो वसुदेव - भूतानां दुरासदः अतिदुर्धषः (च) संबभूव ह - खरोखर जवळ जाण्यास कठीण व अजिंक्य झाला. ॥ १७ ॥
भगवंतांचे तेज धारण केल्यामुळे वसुदेव सूर्याप्रमाणे तेजस्वी झाले. त्यांना पाहून लोकांचे डोळे दिपून जात. त्यांना कोणीही जिंकू शकत नव्हते. (१७)
( उपेंद्रवज्रा )
ततो जगन्मंगलमच्युतांशं समाहितं शूरसुतेन देवी । दधार सर्वात्मकमात्मभूतं काष्ठा यथाऽऽनन्दकरं मनस्तः ॥ १८ ॥
( इंद्रवज्रा ) तो विश्व कल्याण नि ज्योति अंशो त्या देवकीने जठरी धरीला । प्राचे जशी तो शशि घेइ पोटी तै देवकीने धरिला हरी तो ॥ १८ ॥
ततः - त्यानंतर - देवीं - देवकी - शूरसुतेन समाहितं - वसुदेवाने स्थापिलेल्या - जगन्मंगलं - जगाचे मंगल करणारा, - सर्वात्मकं आत्मभूतं अच्युतांशं - सर्वांचा आत्मा व आत्मस्वरूप अशा परमेश्वराच्या पूर्ण स्वरूपाला - यथा काष्ठा आनंदकरं (चंद्रं दधाति तथा) - ज्याप्रमाणे पूर्व दिशा आनंदकारक चंद्रबिंबाला धारण करिते त्याप्रमाणे - मनस्तः दधार - हृदयात धारण करिती झाली. ॥ १८ ॥
जगाचे मंगल करणार्या, सर्वात्मक व आत्मरूप भगवंतांच्या अंशाला वसुदेवांनी मनाने प्रदान केल्यानंतर जशी पूर्व दिशा चंद्राला धारण करते, त्याचप्रमाणे देवकीने विशुद्ध मनानेच त्यांना धारण केले. (येथे भौतिक शरीराचा कोणताही संबंध नव्हता.) (१८)
विवरण :- विश्वनियामक आणि भक्तांना प्रसन्न वाटणारा षडैश्वर्यगुणसंपन्न परमात्मा वसुदेवाच्या मनात अंशभागाने प्रविष्ट झाला. त्यामुळे त्याच्या मनांतील भ्रांति, अज्ञान दूर होऊन तो एका अभूतपूर्व अशा तेजाने युक्त झाला. ते सगुण तेज त्याने देवकीच्या ठिकाणी प्रस्थापीत केले. अर्थातच परमात्मा पिता आणि माता यांचे ठिकाणी सगुणरूपाने अवतरला आणि कालांतराने प्रकट होण्यास योग्य पार्श्वभूमी तयार झाली. (१६-१८)
( इंद्रवज्रा )
सा देवकी सर्वजगन्निवास निवासभूता नितरां न रेजे । भोजेन्द्रगेहेऽग्निशिखेव रुद्धा सरस्वती ज्ञानखले यथा सती ॥ १९ ॥
ती देवकी त्याहि जगन्निवासा । निवास झाली घटिं दीप तैशी । विद्याप्रकाशा खळ झाकिती तै कोणास नाही गमला तदा तो ॥ १९ ॥
सर्वजगन्निवासन्निवासभूता - सर्व जगाला आधारभूत अशा परमेश्वराचे निवासस्थान झालेली - भोजेंद्रगृहे अग्निशिखा इव - कोंडलेल्या दिव्याच्या ज्योतीप्रमाणे - रुद्धा सा देवकी - कंसाच्या घरात कोंडलेली देवकी - यथा सती सरस्वती - ज्याप्रमाणे उत्तम विद्या - ज्ञानखले - ज्ञानाचा उपयोग न जाणणार्या जवळ असावी त्याप्रमाणे - नितरां न रेजे - उत्तमप्रकारे शोभली नाही. ॥ १९ ॥
घड्यामध्ये बंद केलेल्या दिव्याचा प्रकाश किंवा आपली विद्या दुसर्याला न देणार्या गर्विष्ठ ज्ञान्याच्या श्रेष्ठ विद्येचा प्रकाश जसा सगळीकडे पसरत नाही, त्याचप्रमाणे कंसाच्या कारागृहात बंद असलेल्या देवकीचासुद्धा प्रभाव जगन्निवास तिच्यामध्ये राहात असूनही लोकांना जाणवला नाही. (हा आनंद बाहेर प्रगट न करता देवकी अंतर्मनातच तो अनुभवत होती.) (१९)
( मिश्र )
तां वीक्ष्य कंसः प्रभयाजितान्तरां विरोचयन्तीं भवनं शुचिस्मिताम् । आहैष मे प्राणहरो हरिर्गुहां ध्रुवं श्रितो यन्न पुरेयमीदृशी ॥ २० ॥
विराजला तो हरि गर्भि तेंव्हा पवित्र हास्ये उजळोनि गेले । कारागृहो ते तनुतेज योगे पाहोनि कंसो वदला मनात । हे प्राण माझे हरि तो हराया गर्भात आला तयि तेज ऐसे ॥ २० ॥
तां अजितान्तरां प्रभया - हृदयस्थ ईश्वरामुळे आपल्या कांतीने - भवनं विरोचयंतीं - घराला प्रकाशमान करणार्या - शुचिस्मितां वीक्ष्य - त्या पवित्र हास्ययुक्त देवकीला पाहून - कंसः आह - कंस म्हणाला - एषः मे प्राणहरः - हा माझे प्राण हरण करणारा - हरिः गुहां श्रितः - हरि हिच्या उदरात राहिला आहे - यत्ः - कारण - इयं पुरा ईदृशी न (आसीत्) - ही पूर्वी अशी नव्हती. ॥ २० ॥
देवकीच्या अंतरंगात भगवंत विराजमान झाले होते. तिच्या देहर्यावर पवित्र हास्य होते; आणि तिच्या शरीराच्या कांतीने कारागृह झगमगत होते. कंसाने जेव्हा तिला पाहिले, तेव्हा तो मनात म्हणू लागला की, "यावेळी माझे प्राण घेणारे विष्णूच हिच्यात राहिले आहेत. कारण यापूर्वी कधीही देवकी अशी दिसत नव्हती. (२०)
विवरण :- देवकीच्या उदरात भगवंतांचे तेज असूनही ती बंदीवासामुळे तेजस्वी आणि उल्लसित दिसत नव्हती. मात्र तिची ही अवस्था फार काळ टिकली नाही. भगवंताच्या गर्भाच्या तेजाच्या प्रभावाने तई प्रसन्न आणि तेजस्वी होऊ लागली.
किमद्य तस्मिन् करणीयमाशु मे
यदर्थतन्त्रो न विहन्ति विक्रमम् । स्त्रियाः स्वसुर्गुरुमत्या वधोऽयं यशः श्रियं हन्त्यनुकालमायुः ॥ २१ ॥
मी कोणता तो करणे उपाय न मारितो वीर कुणीहि स्त्रीला । गर्भीण ही तो भगिनीच आहे नष्टेल कीर्ती मम आयु श्रीही ॥ २१ ॥
तस्मिन् - त्यावर - अद्य - आता - मे किं आशु करणीयं - मला कोणता उपाय लवकर करण्यासारखा आहे - यत् - कारण - अर्थतंत्रः (पुरुषः) विक्रमं न विहंति - कार्यसाधु पुरुष आपले शौर्य नष्ट करीत नाही - स्त्रियः स्वसुः गुरुमत्याः अयं वधः - स्त्री, बहिण व त्यात गरोदर अशा हिचा वध - यशः श्रियं आयुः (च) - कीर्ति, लक्ष्मी व आयुष्य ह्यांचा - अनुकालं हंति - तत्काल नाश होतो. ॥ २१ ॥
आता या बाबतील मला लवकरात लवकर काय केले पाहिजे बरे ? देवकीला मारणे तर उचित होणार नाही. कारण स्वार्थासाठी वीरपुरुष आपलापराक्रम कलंकित करीत नाही. शिवाय ही स्त्री असून, माझी बहीण आहे. तसेच गर्भवती आहे. हिला मारल्याने माझी लक्ष्मी आणि आयुष्य तत्काळ नष्ट होऊन जाईल आणि माझी कायमची अपकीर्ती होईल. (२१)
( इंद्रवज्रा )
स एष जीवन् खलु सम्परेतो वर्तेत योऽत्यन्तनृशंसितेन । देहे मृते तं मनुजाः शपन्ति गन्ता तमोऽन्धं तनुमानिनो ध्रुवम् ॥ २२ ॥
मेल्यापरी हे अति क्रोधि जीणे । शिव्याच देती मरताहि लोक । देहाभिमानी असती तयांना त्या घोर नर्कात अवश्य जाणे ॥ २२ ॥
यः अत्यंतनृशंसितेन वर्तेत - जो मनुष्य अतिशय क्रूर कर्मे करून राहतो - सः एषः जीवन् संपरेत् - जिवंत असून तो हा मेल्यासारखा होय - मनुष्याः तं शपंति - असे समजून मनुष्य त्याला निंदतात - देहे मृते - देह मरण पावला असता - तनुमानिनः - देहाचा अभिमान बाळगणारे जे पापी लोक - अंधं तमः ध्रुवं गन्ता - त्यांच्या अंध नावाच्या घोर नरकात निश्चयेकरून जातो. ॥ २२ ॥
जो अत्यंत क्रूरपणे वागतो, तो माणूस जिवंत असूनही मेल्यासारखाच आहे. त्याच्या मृत्यूनंतर लोक त्याला शिव्याशाप देतात, इतकेच नव्हे तर तो देहाभिमान्यांसाठी योग्य अशा नरकात निश्चितच जातो." (२२)
( अनुष्टुप् )
इति घोरतमात् भावात् सन्निवृत्तः स्वयं प्रभुः । आस्ते प्रतीक्षन् तज्जन्म हरेर्वैरानुबन्धकृत् ॥ २३ ॥
( अनुष्टुप् ) जरी मारू शके कंस परी निवृत्ति जाहली । बघे तो वाट विष्णूची जन्मण्या वैर बांधुनी ॥ २३ ॥
इति - याप्रमाणे विचार केल्यावर - प्रभुः घोरतमात् भावात् - कंस राजा अत्यंत घोर कर्मापासून - स्वयं संनिवृत्तः - स्वतःच परावृत्त झाला - हरेः वैरानुबंधकृत् (च) - आणि हरीचे शत्रुत्व निश्चयाने करणारा तो - तज्जन्म प्रतीक्षन् आस्ते - त्या परमेश्वराच्या जन्माची वाट पाहत राहिला. ॥ २३ ॥
कंस जरी देवकीला मारू शकत होता, तरीसुद्धा तो स्वतःच या अत्यंत क्रूर विचारापासून परावृत्त झाला. आता भगवंतांच्याबद्दल दृढ वैरभाव बाळगणारा तो त्यांच्या जन्माची वाट पाहू लागला. (भगवत् सान्निध्यामुळेच त्याचे दुष्ट विचार मावळले.) (२३)
विवरण :- इकडे देवकीच्या शरीरात होणार्या बदलावर कंसाचे सूक्ष्म लक्ष होतेच. आरंभीची तिची क्षीण, निस्तेज अवस्था पाहून तो निश्चितच सुखावला असणार. पण नंतर मात्र तिची कलेकलेने वाढणारी कांति पाहून तो धास्तावला. जळी स्थळी काष्ठी पाषाणी त्याला विष्णुरूप दिसू लागले. ’दिसामासानी वाढणारा हा काळ, शत्रू माझा वध करणार ! यावर उपाय काय ?’ मनात द्वंद्व सुरू झाले. देवकीलाच मारून रोगाचे समूळ उच्चाटन करावे का ? नको ! स्त्रीहत्यारा म्हणून जनात दुष्कीर्ति होईल. ती तर मरणाहूनही भयंकर. त्यातून देवकी बहीण, व त्यात गर्भवती ! तिला मारले तर घोर नरकातही स्थान नाही.
आसीनः संविशन् तिष्ठन् भुञ्जानः पर्यटन् महीम् ।
चिन्तयानो हृषीकेशं अपश्यत् तन्मयं जगत् ॥ २४ ॥
झोपी जागा पिता खाता उठता बैसताहि तो । लागला चिंतनी कृष्णी सर्वत्र कृष्ण पाही तो ॥ २४ ॥
आसीनः संविशन् तिष्ठन् - बसताना, निजताना, उभा असताना, - भुंजानः महीं पर्यटन् - भोजन करताना व पृथ्वीवर इकडे तिकडे फिरताना - हृषीकेशं चिंतयानः (सः) - परमेश्वराचे चिंतन करणारा तो कंस - जगत् तन्मयं अपश्यत् - जग परमेश्वरमय पाहता झाला. ॥ २४ ॥
तो उठता, बसता, खाता-पिता, जागेपणी-झोपेत आणि चालता-फिरताना नेहमी श्रीकृष्णांचाच विचार करीत असे. त्यामुळे त्याला सारे जगच श्रीकृष्णमय दिसत असे. (२४)
ब्रह्मा भवश्च तत्रैत्य मुनिभिर्नारदादिभिः ।
देवैः सानुचरैः साकं गीर्भिर्वृषणमैडयन् ॥ २५ ॥
बंदिशळेत ते आले ब्रह्मा नी शिव नारद । ऋषीही पातता त्याची स्तुति ती गाउ लागले ॥ २५ ॥
ब्रह्मा भवः च - ब्रह्मदेव आणि शंकर - नारदादिभिः मुनिभिः - नारदादिक ऋषि - सानुचरैः देवैः (च) साकं - व परिवारयुक्त इंद्रादि देव यांसह - तत्र एत्य - त्याठिकाणी येऊन - वृषणं (मधुराभिः) गीर्भिः ऐडयन् - परमेश्वराला मधुर वाणीने स्तविते झाले. ॥ २५ ॥
भगवान शंकर, ब्रह्मदेव, सर्व देवता आणि नारदादि ऋषी तेथे आले आणि श्रीहरींची स्तुती करू लागले." (२५)
विवरण :- आता मात्र कंसाच्या वृत्तीमध्ये हळूहळू बदल होऊ लागला. परमेश्वर आगमनाची तो वाअ पाहू लागला. कदाचित् ’विरोधी भक्ती’चाच हा परिणाम असावा. सर्व देवही विष्णुदर्शनास अधीर होऊन बंदीगृहात आले आणि त्याची स्तुती अक्रू लागले. यामध्ये देवाधिदेव शंकर, ब्रह्मा, पृथ्वी आणि इतर देवही होते. (२४-२५)
( इंद्रवज्रा )
सत्यव्रतं सत्यपरं त्रिसत्यं । सत्यस्य योनिं निहितं च सत्ये । सत्यस्य सत्यमृतसत्यनेत्रं सत्यात्मकं त्वां शरणं प्रपन्नाः ॥ २६ ॥
( इंद्रवज्रा ) सत्यव्रता सत्यपरं त्रिसत्या जे सत्य भासे तयिं सत्य तूची । सत्यस्वरूप समदर्शि सत्या आम्ही तुझ्या रे चरणासि आलो ॥ २६ ॥
सत्यव्रतं सत्यपरं - सत्यप्रतिज्ञ सत्य हेच ज्याला श्रेष्ठ आहे - त्रिसत्यं - व तिन्ही काळी ज्याचे रूप विद्यमान असते अशा - सत्यस्य योनिं सत्ये च निहितं - सत्याचे बीज अशा सत्यातच स्थापिलेल्या - सत्यस्य सत्यं - सत्याचेही सत्य - ऋतसत्यनेत्रं - आणि ऋत व सत्य यांचा प्रवर्तक अशा - सत्यात्मकं त्वां - सत्यमूर्ती तुला - शरणं प्रपन्नाः - शरण आलो आहो. ॥ २६ ॥
प्रभो ! आपण सत्यसंकल्प आहात. सत्य हेच आपल्या प्राप्तीचे श्रेष्ठ साधन आहे. सृष्टीच्यापूर्वी, प्रलयानंतर आणि सृष्टी असताना या तिन्ही वेळी आपणच सत्य असता. (म्हणून असत्य सृष्टी सत्य वाटते.) पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश या पाच भासमान सत्यांचे आपणच कारण आहात आणि अंतर्यामीरूपाने त्यांमध्ये विराजमान सुद्धा आहात." आपण या दृश्यमान जगाचे आधार आहात. आपणच मधुर वाणी आणि समदृष्टीचे प्रवर्तक आहात. आम्ही सर्वजण आपल्याला शरण आलो आहोत. (२६)
विवरण :- हे सत्यप्रत, सत्यपर परब्रह्मा ! आम्ही आपणांस शरण आलो आहो. सत्यव्रत, सत्यपर आणि इतर विशेषणांनी इथे सत्याचा महिमा गाइलेला आहे. या सत्याने काय साध्य होते ? ’भगवत्प्राप्ति’ ! सत्य हे भूत, वर्तमान आणि भविष्य या तीनही कालात व्याप्त आहे. जे जे सर्व स्थूल आणि सूक्ष्म, त्याचे मूळ सत्य हेच आहे. वेदांनीही परमात्याचे वर्णन ’सत्यस्य सत्यम्’ असे केले आहे. तिन्ही लोकामध्ये सत्य हेच अविनाशी आहे. प्रलयातही सत्यच आहे. (तत् सत्यमित्याचक्षते ।)
एकायनोऽसौ द्विफलस्त्रिमूलः
चतूरसः पञ्चविधः षडात्मा । सप्तत्वग् अष्टविटपो नवाक्षो दशच्छदी द्विखगो ह्यादिवृक्षः ॥ २७ ॥
अक्षेय वृक्षो तव ही प्रकृती फळे ययाची सुख दुःख दोन । बुंधे तयाचे तिन्हि त्या गुणांचे त्याची रसो ती पुरुषार्थ चारी । ज्ञानेंद्रिये ते मन भाव पाची स्वभाव याचा तिन्हि त्या अवस्था । त्या सात धातू तयिं साल आहे कोकाड त्याचे नवु द्वार ऐसे । ते प्राण त्याचे दशपर्ण थोर संसारवृक्षा वरि पक्षी दोन ॥ २७ ॥
असौ (संसाररूपः) आदिवृक्षः - हा संसाररूपी पुरातन वृक्ष - हि - खरोखर - एकायनः - प्रकृति हा एकच आहे आश्रय ज्याचा असा; - द्विफलः - सुख व दुःख ही दोन फळे आहेत ज्याची असा; - त्रिमूलः - सत्त्व, रज, तम हे तीन गुण आहेत मुळे ज्याची असा; - चतूरसः - धर्म, अर्थ, काम व मोक्ष ह्या चार रसांनी युक्त; - पंचविधः - पांच ज्ञानेंद्रिये हे ज्याचे भेद आहेत असा; - षडात्मा - षड्विकार हेच आहेत स्वरूप ज्याचे असा; - सप्तत्वक् - सप्तधातू ज्याची त्वचा आहेत असा; - अष्टविटपः - पंच महाभूते , मन, बुद्धी व अहंकार ह्या आठ ज्याच्या शाखा, - नवाक्षः - नऊ द्वारे ही ज्याची छिद्रे, - दशच्छदः - दहा प्राण ही ज्याची पाने - द्विखग (आस्ते) - आणि जीव व ईश्वर हे दोन पक्षी ज्यावर आहेत असा आहे. ॥ २७ ॥
हा संसार एक सनातन वृक्ष आहे. एक प्रकृती ही या वृक्षाचा आधार आहे. सुख आणि दुःख ही याला दोनफळे आहेत. सत्त्व, रज आणि तम ही तीन मुळे आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार रस आहेत. कान, त्वचा, नेत्र, जीभ आणि नाक हे याला जाणण्याचे पाच प्रकार आहेत. उत्पन्न होणे, स्थिर असणे, वाढणे, बदलणे, क्षय होणे आणि नष्ट होणे हे याचे सहा स्वभाव आहेत. रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा आणि शुक्र अशा सात धातू या वृक्षाच्या साली आहेत. पंचमहाभूते, मन, बुद्धी आणि अहंकार या आठ फांद्या आहेत. याला मुख, डोळे, कान, नाक, गुद, शिश्न अशी नऊ द्वारे म्हणजेच ढोली आहेत. प्राण, अपान, व्यान, उदान, समान, नाग, कूर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय हे दहा प्राण ही याची दहा पाने आहेत. या संसाररूप वृक्षावर जीव व ईश्वर हे दोन पक्षी आहेत. (२७)
विवरण :- स्तुति करताना देव पुढे म्हणतात - आपण सृष्टीचे एकमेव असे ’सर्वेश्वर’ आहात, निर्माते आहात. हा प्रपंच एक ’आदिवृक्ष’. तो ज्ञानरूपी अस्त्राने तोडायचा. या आदिवृक्षाला सुख आणि दुःख अशी दोन फळे येतात. जीव आणि ईश्वररूप असे दोन पक्षी त्यावर निवास करतात. एक पक्षी फळ खातो आणि दुसरा नुसतेच पहात राहतो. (अनश्नन् अन्यो अभिचाकशीति ।) एक पक्षी फळ खातो कारण त्याचे ज्ञान झाकलेले आहे. दुसरा पक्षी उदासीन आहे. याचाच अर्थ मायेपासून मुक्त आहे. मायेचे बंधन तुटता तुटत नाही (मा याति इथ् माया ।) ज्ञानी ज्ञानरूपी शस्त्राने ते बंधन तोडतात. परमेश्वराला एकरूप मानतात. उलट मायेत अडकलेले परमेश्वराला अनेक रूपात पाहतात.
त्वमेक एवास्य सतः प्रसूतिः
त्वं सन्निधानं त्वं अनुग्रहश्च । त्वन्मायया संवृतचेतसस्त्वां पश्यन्ति नाना न विपश्चितो ये ॥ २८ ॥
विस्तार त्याचा तुचि ऐकला की तू रक्षिसी नी लय ही करीशी । मायापटाने नच जाणवे ते ते तत्त्वज्ञानी रुप ते पहाती ॥ २८ ॥
अस्य सतः - ह्या कार्यरूप संसारवृक्षाच्या - त्वं एव एकः प्रसूतिः - उत्पत्तीला कारणीभूत तूच एकटा आहेस - त्वं संनिधानं - तूच त्याचे विलीन होण्याचे ठिकाण - त्वं च अनुग्रहः - आणि तूच त्याचा पालनकर्ता आहेस - त्वन्मायया संवृतचेतसः - तुझ्या मायेने ज्याचे ज्ञान झाकून गेले आहे असे लोक - त्वां नाना पश्यंति - तुला भेदबुद्धीने पाहतात - ये विपश्चितः (ते) न - जे ज्ञानी आहेत ते तसे समजत नाहीत. ॥ २८ ॥
या संसाररूप वृक्षावर जीव आणि ईश्वर हे दोन पक्षी आहेत. या संसाररूप वृक्षाच्या उत्पत्तीचा आधार एकमात्र आपणच आहात. आपल्यामध्येच याचा प्रलय होतो आणि आपल्या कृपेनेच याचे रक्षण सुद्धा होते. ज्यांचे चित्त आपल्या मायेने झाकले गेले आहे, तेच उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय करणार्या ब्रह्मदेव इत्यादि देवांना अनेक रूपांत पाहतात, ते ज्ञानी नव्हेत. (२८)
विवरण :- ’या दृश्यमान् जगताची उत्पत्ति, स्थिति आणि लयकर्ता तूच आहेस’ असे देवगण पुढे म्हणतात. मात्र इथे एक शंका मनात येण्याची शक्यता आहे. ’विश्वस्य कर्ता, भुवनस्य गोप्ता एकः रुद्रः एव ॥ असे उपनिषदकार म्हणतात. किंवा ब्रह्मा निर्माता, विष्णु पालनकर्ता आणि शंकर नाशकर्ता असेही म्हटले जाते, त्याचे काय ? त्याचे उत्तर म्हणजे ते ’नानात्त्व’ मानतात. त्यामुळे, आणि मायेने मन मोहित झाल्याने, अज्ञपणाने त्यांना असे वाटते. खरा एकमेव तूच आहेस, असे ज्ञानी लोक मानतात. (२८)
बिभर्षि रूपाणि अवबोध आत्मा
क्षेमाय लोकस्य चराचरस्य । सत्त्वोपपन्नानि सुखावहानि सतां अभद्राणि मुहुः खलानाम् ॥ २९ ॥
ज्ञानस्वरूपा हित साधण्याला अनेक रूपे धरिसी लिलेने । ते रूप संता सुख देइ शुद्ध तसाचि दुष्टां भय दंड देसी ॥ २९ ॥
(त्वं) अवबोधः आत्मा (च सन्) - तू ज्ञानस्वरूप व सर्वांचा आत्मा असून - चराचरस्य लोकस्य क्षेमाय - स्थावरजंगमात्मक जगाच्या कल्याणाकरिता - सत्त्वोपपन्नानि - सत्त्वगुणयुक्त - सतां सुखावहानि - सज्जनांना सुख देणारी - खलानां अभद्राणि रूपाणि - दुष्टांना अहितकारक अशी रूपे - मुहुः बिभर्षि - वारंवार धारण करितोस. ॥ २९ ॥
आपण ज्ञानस्वरूप आत्मा असून चराचर जगाच्या कल्याणासाठीच अनेक रूपे धारण करता. आपली ती रूपे विशुद्ध सत्त्वमय असून ती संतांना सुख देणारी व दुष्टांचे अकल्याण करणारी असतात. (२९)
विवरण :- तू जगत्कल्याणासाठी, सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा परिहार करण्यासाठी नानाप्रकारची रूपे धारण करतोस. ही केवळ तुझी लीला आहे, इतकेच. (२९)
त्वय्यम्बुजाक्षाखिलसत्त्वधाम्नि
समाधिनाऽऽवेशितचेतसैके । त्वत्पादपोतेन महत्कृतेन कुर्वन्ति गोवत्सपदं भवाब्धिम् ॥ ३० ॥
हे पंकजाक्षा जन वेगळे ते आश्रेय घेती मना लावुनीया । भवात जाती सहजी तरून ही नाव संते नित घेतलीसे ॥ ३० ॥
अंबुजाक्ष - हे कमलनयना - अखिलसत्त्वधाम्नि त्वयि - सर्व सत्त्वगुणाची केवळ मूर्ती अशा तुझ्या ठिकाणी - समाधिना आवेशितचेतसा - समाधीच्या योगाने लाविलेल्या मनाने - महत्कृतेन त्वत्पादपोतेन - मोठयांनी आदरलेल्या अशा तुझ्या चरणरूपी नौकेने - एके - कित्येक - भवाब्धिं गोवत्सपद कुर्वंति - भवसमुद्राला वासराच्या पायाने झालेल्या डबक्याप्रमाणे लेखितात. ॥ ३० ॥
हे कमलनेत्र ! सर्व पदार्थ आणि प्राण्यांच्या आश्रयस्वरूप आपल्या रूपात पूर्ण एकाग्रतेने आपले चित्त लावू शकणारे आणि आपल्या चरणकमलरूपी जहाजाचा आश्रय घेऊन या संसार सागराला, वासराच्या खुराने पडलेला खड्डा ओलांडावा तसे, सहजपणे पार करणारे विरळाच होत. संतांनी हाच मार्ग पत्करला आहे. (३०)
विवरण :- भवसागर हा दुस्तर आहे, पण कोणाला ? इतरांना. विठ्ठल आपले हात कटीवर ठेऊन माझ्या भक्तांसाठी भवसागर हा कमरेएवढ्या पाण्याप्रमाणे आहे, असे सांगत असतो. ’प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानां, नितम्बः कराभ्यां धृतो येन तस्मात् ॥ आद्य शंकराचार्यही आपल्या पांडुरंगाष्टकात हेच सांगतात. (३०)
( मिश्र )
स्वयं समुत्तीर्य सुदुस्तरं द्युमन् भवार्णवं भीममदभ्रसौहृदाः । भवत्पदाम्भोरुहनावमत्र ते निधाय याताः सदनुग्रहो भवान् ॥ ३१ ॥
तेजस्वरूपा ! तव भक्त सारे साधे हितैषी अति प्रेमि होति । तरावयाला भवसागरात तुझ्या पदाची मग नाव घेती ॥ ३१ ॥
द्युमन् - हे स्वयंप्रकाशा - अदभ्रसौहृदाः ते - अतिशय प्रेमभावाने वागणारे ते पुरुष - भीमं सुदुस्तरं - भयंकर व तरून जाण्यास कठीण - भवार्णवं स्वयं समुत्तीर्य - असा भवसमुद्र स्वतः तरून - भवत्पदांभोरुहनावं अत्र निधाय - परमेश्वराच्या चरणकमलरूपी नावेला या लोकी ठेवून - (पारं) याताः - परतीराला जातात - भवान् सदनुग्रहः - सज्जनांवर तू कृपा करणारा आहेस. ॥ ३१ ॥
हे प्रकाशरूप परमात्मन ! आपले भक्त जगाचे खरे हितैषी असतात. ते स्वतः तर या भयंकर आणि कष्टाने पार करता येण्यासारख्या संसार सागराला आपल्या चरणकमलांच्या नैकेने पार करतातच; परंतु इतरांच्या कल्याणासाठी ती येथेच ठेवतात. कारण आपण भक्तांवर अनुग्रह करणारे आहात. (३१)
येऽन्येऽरविन्दाक्ष विमुक्तमानिनः
त्वयि अस्तभावात् अविशुद्धबुद्धयः । आरुह्य कृच्छ्रेण परं पदं ततः पतन्त्यधोऽनादृतयुष्मदङ्घ्र्यः ॥ ३२ ॥
हे पंकजाक्षा ! नच भाव ऐसे भ्रमिष्ट मुक्तो वदती स्वताला । जरी तपाने अन साधनांनी चढोनि गेला तरि तो पडे की ॥ ३२ ॥
अरविंदाक्ष - हे कमलनयना - ये अन्ये - जे दुसरे - विमुक्तमानिनः - कित्येक आपल्याला मुक्त मानणारे - अनादृतयुष्मदंघ्रयः - व तुझ्या चरणकमलांचा अनादर करणारे - त्वयि अस्तभावात् अविशुद्धबुद्धयः - तुझ्या ठिकाणी श्रद्धा न ठेवल्यामुळे बुद्धिभ्रष्ट झालेले - कृच्छ्ररेण परं पदं आरुह्य - मोठया कष्टाने श्रेष्ठ पदवीला प्राप्त होऊन - ततः अधः पतंति - तेथून खाली पडतात. ॥ ३२ ॥
हे कमलनयन ! जे लोक आपल्या चरणकमलांना शरण येत नाहीत, तसेच आपल्याबद्दल ज्यांच्या मनात भक्ती नाही, त्यांची बुद्धीसुद्धा शुद्ध होत नाही. ते स्वतःला खोटे-खोटेच आपण मुक्त आहोत असे मानतात. त्यामूळे उत्तम कुळ, तपश्चर्या, ज्ञान इत्यादि साधने प्राप्त होऊनसुद्धा कोणत्याही प्रकारे का होईना, मोक्षपदाच्या जवळ पोहोचले तरी त्यांचे पतन होते. (३२)
तथा न ते माधव तावकाः क्वचिद्
भ्रश्यन्ति मार्गात्त्वयि बद्धसौहृदाः । त्वयाभिगुप्ता विचरन्ति निर्भया विनायकानीकपमूर्धसु प्रभो ॥ ३३ ॥
जे भक्त प्रीती धरितात पायी न ज्ञानियांच्या परिभेय त्यांना । शूरांशिरी ते पद ठेवुनीया ते चालती त्यां तुचि रक्षितोसी ॥ ३३ ॥
माधव - हे लक्ष्मीपते - तावकाः त्वयि बद्धसौहृदाः - तुझे म्हणविणारे व तुझ्या ठिकाणी दृढ प्रीती ठेवणारे जन - तथा मार्गात् क्वचित् न भ्रश्यन्ति - आपल्या मार्गापासून तसे कधीही भ्रष्ट होत नाहीत - प्रभो - हे समर्था - त्वया अभिगुप्ताः निर्भयाः ते - तू रक्षिलेले निर्भय असे ते जन - विनायकानकिपमूर्धसु विचरंति - विघ्नकर्त्याचे सैन्य बाळगणार्याच्या मस्तकावर पाय देत फिरतात. ॥ ३३ ॥
परंतु हे माधवा ! ज्यांचे आपल्या चरणांवर निस्सीम प्रेम आहे, असे आपले भक्त कधीही मोक्षाच्या मार्गापासून ढळत नाहीत. कारण हे प्रभो ! आपण त्यांचे रक्षण करत असल्यामुळे ते विघ्नकर्त्यांच्या डोक्यावर पाय ठेवून निर्भयपणे विहार करतात. (३३)
सत्त्वं विशुद्धं श्रयते भवान् स्थितौ
शरीरिणां श्रेय उपायनं वपुः । वेदक्रियायोगतपःसमाधिभिः तवार्हणं येन जनः समीहते ॥ ३४ ॥
कल्याणदाता सकळास तू तो तू सत्व शुद्धो शुभ दिव्यरूपा । त्यां दाविसी जे भजती तपाने ना आश्रयो तो भजतील कैसे ॥ ३४ ॥
भवान् - तू - (जगतः) स्थितौ - जगाचे पालन करण्याकरिता - शरीरिणां श्रेयउपायनं - प्राण्यांना कल्याण प्राप्त करून देणारे - विशुद्धं सत्त्वं वपुः श्रयते - शुद्ध सत्त्वमय शरीर धारण करतोस - येन - ज्याच्यायोगे - जनः - लोकसमुदाय - वेदक्रियायोग - वेदांतील कर्मकांड, उपासना, - तपःसमाधिभिः - तपश्चर्या व समाधि - तव अर्हणं समीहते - यांनी तुझी पूजा करितो. ॥ ३४ ॥
आपण जगाच्या स्थितीसाठी, सर्व प्राण्याचे कल्याण करणारे विशुद्ध सत्त्वमय, मंगलरूप धारण करता. ते रूप प्रगट होण्यानेच आपल्या भक्तांना वेद, कर्मकांड, अष्टांगयोग, तपश्चर्या, समाधी इत्यादि साधनांनी त्या रूपाचा आधार घेऊन आपली आराधना करता येते. (३४)
सत्त्वं न चेद्धातरिदं निजं भवेद्
विज्ञानमज्ञानभिदापमार्जनम् । गुणप्रकाशैः अनुमीयते भवान् प्रकाशते यस्य च येन वा गुणः ॥ ३५ ॥
तू जन्मदाता सकलो जिवांसी विशुद्धसत्वीं निजरूप तूझे । अज्ञान येणे मग भेदभावो होईल कैसे अपरोक्ष ज्ञान । हे विश्व सारे गुण रूप तूझे अंदाज घेते मन फक्त त्याचे । साक्षात रूपा नच ते बघो की होता कृपा ती मग सर्व शक्य ॥ ३५ ॥
धातः - हे जगत्कर्त्या - इदं सत्त्वं निजं (तव) न भवेत् चेत् - हे सत्त्वगुणात्मक शरीर तुला जर नसेल तर - अज्ञानभिदापमार्जनं - अज्ञान व द्वैत ही नाहीशी करणारे - विज्ञानं (न भवेत्) - विशिष्ट ज्ञान होणार नाही - च - आणि - यस्य येन वा गुणः प्रकाशते - ज्याचा बुद्धी आदिकरून गुण प्रकाशतो - (सः) भवान् - असा तू - गुणप्रकाशैः अनुमीयते - बाह्य पदार्थांच्या प्रकाशावरून अनुमानिला जातोस. ॥ ३५ ॥
हे प्रभो ! आपले हे विशुद्ध सत्त्वमय निजस्वरूप जर नसेल, तर अज्ञान आणि त्यामुळे उत्पन्न होणारी भेदबुद्धी नष्ट करणारे प्रत्यक्ष ज्ञान कोणालाच होणार नाही. तीन गुणही आपलेच आहेत आणि आपल्यामुळेच ते प्रकाशित होतात, परंतु या गुणांच्या प्रकाशात आपल्या स्वरूपाचे फक्त अनुमानच बांधता येते. (३५)
न नामरूपे गुणजन्मकर्मभिः
निरूपितव्ये तव तस्य साक्षिणः । मनोवचोभ्यां अनुमेयवर्त्मनो देव क्रियायां प्रतियन्त्यथापि हि ॥ ३६ ॥
अंदाज घेती श्रुति सर्व रूपा न दृश्य त्यांना परि साक्षि होसी । ते वर्णिण्याही न पुरेच वाणी योगेचि संता गमसी मनात ॥ ३६ ॥
देव - हे परमेश्वरा - साक्षिणः - सर्व गोष्टी प्रत्यक्ष पाहणारा - अनुमेयवर्त्मनः - व ज्याच्या ज्ञानाचा मार्ग अनुमानानेच कळण्याजोगा आहे - तस्य तव - अशा त्या तुझी - नामरूपे - नावे व रूपे - गुणजन्मकर्मभिः - तुझ्या गुणांनी, जन्मांनी व कर्मांनी - मनोवचोभ्यां - तसेच मनाने किंवा वाणीनेही - निरूपितव्ये न - निरूपण करिता येणारी नाहीत - अथापि हि - तथापि निश्चयेकरून - क्रियायां प्रतियन्ति - तुझ्या आराधनेने ती प्रतीतीस येतात. ॥ ३६ ॥
हे भगवन ! मन आणि वेद-वाणी यांच्या योगाने आपल्या स्वरूपाचे केवळ अनुमान करता येते. कारण आपण त्यांचे साक्षी आहात. म्हणून आपले गुण, जन्म आणि कर्म यांमुळे आपल्या नाम आणि रूपाचे निरूपण करता येत नाही. तरीसुद्धा आपले भक्त उपासनेने आपला साक्षात्कार करून घेतात. (३६)
शृण्वन् गृणन् संस्मरयंश्च चिन्तयन्
नामानि रूपाणि च मंगलानि ते । क्रियासु यस्त्वच्चरणारविन्दयोः आविष्टचेता न भवाय कल्पते ॥ ३७ ॥
जे हे तुझे मंगल नाम गाती जे ऐकती नी स्मरतात चित्ती । चित्तात ध्याती चरणारविंदा त्यांना पुन्हा ना भवसागरो हा ॥ ३७ ॥
यः - जो - ते मंगलानि नामानि रूपाणि च श्रृण्वन् - तुझी मंगलकारक नावे व रूपे ऐकत, - गृणन् संस्मरयन् - गात व दुसर्याकडून ऐकवीत - चिंतयन् - आणि त्याचे चिंतन करीत - क्रियासु - पूजादि कर्मामध्ये - त्वच्चरणारविंदयोः - तुझ्या चरणकमळांच्या ठिकाणी - आविष्टचेताः (भवति) - मन लाविलेला असतो - भवाय न कल्पते - संसार चक्रात पडत नाही. ॥ ३७ ॥
जो मनुष्य आपल्या मंगल नामांचे आणि रूपांचे श्रवण, कीर्तन, स्मरण आणि ध्यान करतो, तसेच आपल्या चरणकमलातच आपले चित्त गुंतवून ठेवतो, त्याला पुन्हा जन्माला यावे लागत नाही. (३७)
दिष्ट्या हरेऽस्या भवतः पदो भुवो
भारोऽपनीतस्तव जन्मनेशितुः । दिष्ट्याङ्कितां त्वत्पदकैः सुशोभनैः द्रक्ष्याम गां द्यां च तवानुकम्पिताम् ॥ ३८ ॥
तू नाशिसी दुःख तुझ्याऽवतारे तो नष्टला रे भुमिभार सारा । धन्यो ! प्रभो भाग्यचि आमुचे ते धराहि धन्या पद ठेविता हो ॥ ३८ ॥
हरे - हे ईश्वरा - दिष्टया - सुदैवाने - ईशितुः तव जन्मना - समर्थ अशा तुझ्या ह्या अवताराने - भवतः पदः - तुझे एक पाऊल - अस्याः भुवः भारः अपनीतः - अशी जी पृथ्वी तिचा भार दूर झाला - दिष्टया - सुदैवाने - गां - पृथ्वीला - सुशोभनैः - चांगल्या शोभणार्या - त्वत्पदकैः अंकितां - अशा तुझ्या कोमल पायांनी चिन्हित अशी - च - आणि - द्यां - स्वर्गाला - तव अनुकंपिताम् - तुझ्याकडून कृपा केलेली - द्रक्ष्याम - आम्ही पाहू. ॥ ३८ ॥
हे हरे ! आमच्या भाग्यामुले सर्वेश्वर अशा आपल्या अवताराने आपल्या चरणरूप पृथ्वीचा भार नाहीसा झाला. प्रभो ! आम्हांला आपल्या सुंदर चरणकमलांनी विभूषित झालेली पृथ्वी पाहायला मिळणार आणि आपल्या कृपेने स्वर्गलोकही कृतार्थ झालेला पाहायला मिळणार, हे आमचे केवढे सौभाग्य ! (३८)
न तेऽभवस्येश भवस्य कारणं
विना विनोदं बत तर्कयामहे । भवो निरोधः स्थितिरप्यविद्यया कृता यतस्त्वयि अभयाश्रयात्मनि ॥ ३९ ॥
असंभवा तो तुज जन्म कैसा अंदाज ना ये गमते लिला ती । तुला न स्पर्शी मुळि भेद कैसा आरोप सारे स्थितिचे तुला की ॥ ३९ ॥
हे ईश - हे समर्था - अभयाश्रय - हे निर्भय असे आश्रयस्थान देणार्या - अभवस्य ते - जन्मरहित अशा तुझ्या - भवस्य कारणं - जन्माचे कारण - विनोदं विना बत न तर्कयाम - विनोदाशिवाय खरोखर तर्क करता येत नाही - यतः - कारण - आत्मनि त्वयि भवः - आत्मस्वरूपी अशा तुझ्या ठिकाणी जन्म, - निरोधः स्थितिः अपि - स्थिति आणि नाश ही देखील - अविद्यया कृताः - अज्ञानानेच कल्पिली आहेत. ॥ ३९ ॥
हे प्रभो ! आपण अजन्मा असून जन्म घेता, याचे कारण ही आपली एक लीला आहे, असेच आम्हांला वाटते. कारण, हे नित्यमुक्त ! जगाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय हे आपल्यावर अज्ञानामुळे आरोपित केले जातात. (३९)
( वसंततिलका )
मत्स्याश्वकच्छप नृसिंहवराहहंस राजन्यविप्रविबुधेषु कृतावतारः । त्वं पासि नस्त्रिभुवनं च यथाधुनेश भारं भुवो हर यदूत्तम वन्दनं ते ॥ ४० ॥
मत्स्यो हयग्रीव नि कच्छ हंस वराह सिंहो अन पर्शुराम । तो वामनो राम हि कैक वेळा होवोनि केली तिन्हि लोक रक्षा । या वेळिही तू करि भार नष्ट पदी नमीतो यदुनंदनारे ॥ ४० ॥
ईश - हे ईश्वरा - यथा - ज्याप्रमाणे - मत्स्याश्वकच्छप - मत्स्य, घोडा, कासव, - नृसिंहवराहहंस - नृसिंह, वराह, हंस, - राजन्यविप्रविबुधेषु - क्षत्रिय, ब्राह्मण व देव यांमध्ये - कृतावतारः त्वं - अवतार घेतलेला तू - नः त्रिभुवनं च पासि - आमचे आणि त्रैलोक्याचे रक्षण करितोस - (तथा) अधुना भुवः भारं हर - त्याप्रमाणे सांप्रत भूमीचा भार हरण कर - यदूत्तम ते वंदनं (अस्तु) - हे यादवश्रेष्ठा, तुला नमस्कार असो. ॥ ४० ॥
प्रभो ! आपण जसे अनेक वेळा मत्स्य, हयग्रीव, कूर्म, नृसिंह, वराह, हंस, राम परशुराम आणि वामन अवतार धारण करून आमचे आणि तिन्ही लोकांचे रक्षण केलेत, त्याचप्रमाणे यावेळीसुद्धा पृथ्वीचा भार हलका करावा. हे यदुश्रेष्ठ ! आम्ही आपल्या चरणांना वंदन करीत आहोत. (४०)
( इंद्रवंशा )
दिष्ट्याम्ब ते कुक्षिगतः परः पुमान् अंशेन साक्षाद्भगवान् भवाय नः । माभूद् भयं भोजपतेर्मुमूर्षोः गोप्ता यदूनां भविता तवात्मजः ॥ ४१ ॥
माते तुझे भाग्यचि थोर पाही तो ज्ञान अंशे हरि गर्भि राही । नकोच भीती अणुमात्र कंसी रक्षील पुत्रो यदुवंश सारा ॥ ४१ ॥
अंब - हे माते देवकी - दिष्टया - सुदैवाने - परः पुमान् साक्षात् भगवान् - पुरुषोत्तम असा साक्षात भगवान - नः भवाय - आमच्या कल्याणासाठी - अंशेन ते कुक्षिगतः - पूर्णरूपाने तुझ्या उदरात प्रविष्ट झाला आहे - मुमूर्षोः भोजपतेः - मरणाच्या जवळ आलेल्या - (तव) भयं मा भूत् - कंसापासून तुम्हाला भय नाही - तव आत्मजः यदूनां गोप्ता भविता - तुझा मुलगा यादवांचे रक्षण करणारा होईल. ॥ ४१ ॥
हे देवकीमाते ! आपल्या उदरामध्ये आम्हा सर्वांचे कल्याण करण्यासाठी स्वतः भगवान पुरुषोत्तम आपल्या शक्तींसह आले आहेत, ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. आता आपण मृत्यूच्या दारी असलेल्या कंसाला अजिबात भिऊ नका. आपला पुत्र यदुवंशाचे रक्षण करील. (४१)
श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् ) इत्यभिष्टूय पुरुषं यद्रूपं अनिदं यथा । ब्रह्मेशानौ पुरोधाय देवाः प्रतिययुर्दिवम् ॥ ४२ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कन्धे पूर्वार्धे गर्भगतविष्णोर्ब्रह्मादिकृतस्तुतिर्नाम द्वितीयोध्याऽयः ॥ २ ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
श्रीसुखदेव सांगतात - ब्रह्मादि स्तविता ऐसे अनिश्चित रुपास त्या । शंकरा सह ते सर्व स्वर्गात पातले पुन्हा ॥ ४२ ॥ ॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता । विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर दुसरा अध्याय हा ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
यद्रूपं अनिदं - ज्याचे रूप दृष्टीला अगोचर आहे अशा - (तं) पुरुषं - त्या परमात्म्याला - इति - याप्रमाणे - यथा (वत्) अभिष्टूय - योग्य रीतीने स्तवून - ब्रह्मेशानौ पुरोधाय - ब्रह्मदेव आणि शंकर यांना पुढे करून - देवाः दिवं ययुः - देव स्वर्गास गेले. ॥ ४२ ॥
श्रीशुक म्हणतात - परीक्षिता ! ब्रह्मदेवादि देवांनी ज्यांच्याविषयी निश्चितपणे काही सांगता येत नाही, अशा भगवंतांची अशी स्तुती केली आणि ते स्वर्गाकडे गेले. (४२)
अध्याय दुसरा समाप्त |