श्रीमद् भागवत पुराण
अष्टमः स्कंधः
एकोनविंशोऽध्यायः

बलिवामनसंवादः, पदत्रयभूमियाचनम्, शुक्रद्वारा दाननिषेधश्च -

भगवान वामनांचे बलीकडून तीन पावले जमीन मागणे,
बलीचे वचन देणे आणि शुकाचार्यांनी त्याला अडविणे -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


श्रीशुक उवाच -
(अनुष्टुप्)
इति वैरोचनेर्वाक्यं धर्मयुक्तं स सूनृतम् ।
निशम्य भगवान् प्रीन्प्रीतः प्रतिनन्द्येदमब्रवीत् ॥ १ ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
(अनुष्टुप्‌)
बळीचे बोलणे होते धर्मयुक्त नि गोडही ।
ऐकता वामनो मोदे अभिनंदुनि बोलले ॥ १ ॥

इमि वैराचनेः धर्मयुक्तं सूनृतं वाक्यं निशम्य - याप्रमाणे बलिराजाचे धर्मयुक्त व मधुर भाषण ऐकून - प्रीतः सः भगवान् - प्रसन्न झालेला तो परमेश्वर - प्रतिनंद्य इदं अव्रवीत् - प्रशंसा करून असे म्हणाला. ॥१॥
श्रीशुक म्हणतात - बलीचे हे वचन धर्मयुक्त आणि अतिशय मधुर असे होते. ते ऐकून भगवान वामनांनी अत्यंत प्रसन्नतेने त्याचे अभिनंदन करून म्हटले - (१)


श्रीभगवानुवाच -
वचस्तवैतत् जनदेव सूनृतं
     कुलोचितं धर्मयुतं यशस्करम् ।
यस्य प्रमाणं भृगवः सांपराये
     पितामहः कुलवृद्धः प्रशान्तः ॥ २ ॥
श्री भगवान्‌ म्हणाले -
(इंद्रवज्रा)
राजा ! तुझे बोल कुलानुसार
    भक्ती यशा वाढविती मधूर ।
शिष्योत्तमो तू भृगुपुत्र यांचा
    पितामहा मानिसि वंद्य तू तो ॥ २ ॥

जनदेव - हे राजा - एतत् सूनृतं धर्मयुतं यशस्करं तव वचः कुलोचितं (अस्ति) - हे मधुर धर्मानुसारी कीर्तिमापक तुझे भाषण तुझ्या वंशाला साजेसेच आहे - यस्य सांपराये - ज्याच्या पारलौकिक धर्मांचरणात - भृगवः कुलवृद्धः प्रशान्तः पितामहः प्रमाणं (सन्ति) - भृगुऋषि आणि वंशांतील वृद्ध शांत आजोबा प्रल्हाद हेच प्रमाणभूत होत. ॥२॥
भगवान म्हणाले - राजन, आपण जे काही म्हणालात, ते आपल्या कुलपरंपरेला अनुरूप, धर्मपूर्ण, यश वाढविणारे आणि अत्यंत मधुर आहे. परलोकी हितकर असणार्‍या धर्माच्या बाबतील आपण भृगूंना प्रमाण मानता. त्याचबरोबर आपले कुलवृद्ध आजोबा परम शांत प्रह्लाद यांची आज्ञासुद्धा आपण प्रमाण मानता. (२)


(अनुष्टुप्)
न ह्येतस्मिन्कुले कश्चित् निःसत्त्वः कृपणः पुमान् ।
प्रत्याख्याता प्रतिश्रुत्य यो वादाता द्विजातये ॥ ३ ॥
(अनुष्टुप्‌)
तुझ्या वंशात कोणी ना कृपणो धैर्यहीनही ।
न मोडी शब्दही कोणी दानहीन कुणी नसे ॥ ३ ॥

एतस्मिन् कुले - या कुळात - कश्चित् पुमान् - कोणीही पुरुष - निसत्त्वः कृपणः नहि (जातः) - निर्बळ व कृपण असा उत्पन्न झाला नाही - यः द्विजातये प्रत्याख्याता प्रतिश्रुत्य वा अदाता (नास्ति) - जो ब्राह्मणाला देत नाही किंवा देण्याचे वचन देऊन न देणारा असा झाला नाही. ॥३॥
आपल्या वंशात कोणीही धैर्यहीन आणि कंजूष पुरुष कधी झाला नाही. तसेच ज्याने ब्राह्मणांना कधी दान दिले नाही किंवा कोणाला काही देण्याचे वचन देऊन नंतर माघार घेतली, असाही कोणी झाला नाही. (३)


न सन्ति तीर्थे युधि चार्थिनार्थिताः
     पराङ्‌मुखा ये त्वमनस्विनो नृपाः ।
युष्मत्कुले यद् यशसामलेन
     प्रह्राद उद्‍भाति यथोडुपः खे ॥ ४ ॥
(इंद्रवज्रा)
न युद्धतीर्थी भिरु तो कुणीही
    शत्रुसि पाहोनि पळोनि गेला ।
का ते न व्हावे ययि वंशि भक्त
    प्रल्हाद येशो जर शांतचंद्र ॥ ४ ॥

तीर्थे युधि च अर्थिना अर्थिताः (सन्तः) - दानप्रसंगी व युद्धामध्ये याचकाने प्रार्थिलेले - ये तु पराङ्‌मुखाः (सन्ति) - जे खरोखर माघार घेणारे होतात - (ते) अमनस्विनः नृपाः - असे अनुदार मनाचे राजे - युष्मत्कुले न सन्ति - तुमच्या कुळांत झालेले नाहीत - यत् - ज्या कुळात - यथा उडुपः खे - जसा चंद्र आकाशात - (तथा) प्रह्लादः अमलेन यशसा उद्‌भाति - तसा प्रल्हाद शुद्धकीर्तीने शोभतो. ॥४॥
याचकाची विनंती ऐकून किंवा युद्धाचे वेळी शत्रूने आह्वान दिल्यावर तिकडे पाठ फिरविणारा भित्रा मनुष्य आपल्या वंशामध्ये कोणी झाला नाही. आपल्या कुलातच जसा आकाशात चंद्र त्याप्रमाणे प्रह्लाद आपल्या निर्मल यशाने शोभत आहे. (४)


(अनुष्टुप्)
यतो जातो हिरण्याक्षः चरन्नेक इमां महीम् ।
प्रतिवीरं दिग्विजये नाविन्दत गदायुधः ॥ ५ ॥
(अनुष्टुप्‌)
हिरण्याक्षापरी वीर या कुळी जन्मला असे ।
सगदे हिंडला पृथ्वी परी युद्धार्थ जोड ना ॥ ५ ॥

यतः जातः - ज्या वंशात उत्पन्न झालेला - गदायुधः हिरण्याक्षः - गदा धारण करणारा हिरण्याक्ष - दिग्विजये इमां महीं एकः चरन् - दिग्विजयप्रसंगी या पृथ्वीवर एकटाच फिरणारा - प्रतिवीरं न अविन्दत - बरोबरीच्या योद्‌ध्याला मिळविता आला नाही. ॥५॥
आपल्या कुळातच हिरण्याक्षासारखा वीराचा जन्म झाला. तो वीर जेव्हा हातात गदा घेऊन एकटाच दिग्विजय करण्यासाठी बाहेर पडला, तेव्हा सर्व पृथ्वी पालथी घालूनही त्याला आपल्या जोडीचा कोणी वार मिळाला नाही. (५)


यं विनिर्जित्य कृच्छ्रेण विष्णुः क्ष्मोद्धार आगतम् ।
आत्मानं जयिनं मेने तद्वीर्यं भूर्यनुस्मरन् ॥ ६ ॥
जळात रक्षिण्या पृथ्वी विष्णु तो युद्ध योजुनी ।
काठिण्ये मेळवी येश परी तो न तसे म्हणे ॥ ६ ॥

विष्णुः - विष्णु - क्ष्मोद्धारे आगतं यं - पृथ्वी वर काढीत असता आलेल्या ज्याला - कृच्छ्रेण विनिर्जित्य - मोठया संकटाने जिंकून - भूरि तद्वीर्यम् अनुस्मरन् - त्याच्या मोठया पराक्रमाला स्मरत - आत्मानं जयिनं न मने - स्वतःला विजयी मानिता झाला नाही. ॥६॥
जेव्हा भगवान विष्णू पाण्यातून पृथ्वीला वर काढीत होते, तेव्हा तो त्यांच्या समोर आला. तेव्हा अत्यंत कष्टाने त्यांनी त्याच्यावर विजय मिळविला. परंतु त्यानंतर सुद्धा पुष्कळ काळपर्यंत वारंवार हिरण्याक्षाची शक्ती आठवून त्याला जिंकूनसुद्धा आपला विजय झाला, असे ते समजत नव्हते. (६)


निशम्य तद्वधं भ्राता हिरण्यकशिपुः पुरा ।
हन्तुं भ्रातृहणं क्रुद्धो जगाम निलयं हरेः ॥ ७ ॥
हिरण्यकश्यपू याला कळाला बंधुमृत्यु नी ।
वैकुंठी पोचला होता शत्रूला ठार मारण्या ॥ ७ ॥

भ्राता हिरण्यकशिपुः - भाऊ हिरण्यकशिपु - पुरा तद्वघं निशम्य - पूर्वी त्याचा वध झालेला ऐकून - क्रुद्धः भ्रातृहणं हन्तुं हरेः निलयं जगाम - रागावलेला असा भावाला मारणार्‍या विष्णूला मारण्याकरिता त्याच्या स्थानी गेला. ॥७॥
हिरण्यकशिपूला जेव्हा त्याच्या वधाचा वृत्तांत समजला, तेव्हा तो आपल्या भावाचा वध करणार्‍याला मारण्यासाठी म्हणून संतापून भगवंतांच्या निवासस्थानी पोहोचला. (७)


तं आयान्तं समालोक्य शूलपाणिं कृतान्तवत् ।
चिन्तयामास कालज्ञो विष्णुर्मायाविनां वरः ॥ ८ ॥
भगवान्‌ रचितो माया जाणितो समया तसा ।
लक्षिले मारण्या हा तो पोचला शूळ घेउनी ॥ ८ ॥

मायाविनां वरः कालज्ञः विष्णुः - मायिक पुरुषांमध्ये श्रेष्ठ असा काळाला ओळखणारा विष्णु - शूलपाणिं तं कृतान्तवत् आयान्तं समालोक्य - हातात शूळ घेऊन यमाप्रमाणे आलेल्या त्या हिरण्यकशिपुला पाहून - चिन्तयामास - विचार करू लागला. ॥८॥
हिरण्यकशिपू हातात शूळ घेऊन काळाप्रमाणे धावून येत आहे, असे पाहून वेळकाळ जाणणार्‍या श्रेष्ठ मायावी विष्णूंनी विचार केला. (८)


यतो यतोऽहं तत्रासौ मृत्युः प्राणभृतामिव ।
अतोऽहं अस्य हृदयं प्रवेक्ष्यामि पराग्दृशः ॥ ९ ॥
मृत्यु जै गाठितो जीवा तसा गाठील आपणा ।
भितीने विष्णु तै गेला तयाच्या हृदयात की ॥
हिरण्यकश्यपू तेंव्हा न पाहू शकला तया ॥ ९ ॥

अहं यतः यतः (गच्छामि) - मी जेथे जेथे जाईन - तत्र असौ - तेथे हा - प्राणभृतां मृत्यूः इव (स्यात् एव) - प्राण्यांच्या पाठीस लागलेल्या मृत्यूप्रमाणे असणारच - अतः अहं - म्हणून मी - पराग्दृशः अस्य हृदयं प्रवेक्ष्यामि - बाह्य विषयांकडे दृष्टि असणार्‍या ह्या हिरण्यकशिपुच्या हृदयात शिरेन. ॥९॥
ज्याप्रमाणे प्राण्यांच्या मागे मृत्यू, त्याचप्रमाणे मी जेथे जेथे जाईन, तेथे तेथे हा माझा पिच्छा पुरवील. म्हणून आपण त्याच्या हृदयात प्रवेश करावा. त्यामुळे तो मला पाहू शकणार नाही. कारण तो बहिर्मुख आहे. (९)


एवं स निश्चित्य रिपोः शरीरं
     आधावतो निर्विविशेऽसुरेन्द्र ।
श्वासानिलान्तर्हितसूक्ष्मदेहः
     तत्प्राणरन्ध्रेण विविग्नचेताः ॥ १० ॥
(इंद्रवज्रा)
दैत्येंद्र ! तेंव्हा भिउनी हरीने
    अतीव सूक्ष्मी रुप घेतले नी ।
श्वासे तया नासिकमार्ग द्वारा
    हृदी तयाच्याचि लपोनि ठेला ॥ १० ॥

असुरेन्द्र - हे बलिराजा - विविग्नचेताः सः - भीतियुक्त अंतःकरण झालेला तो विष्णु - एवं निश्चित्य - असा निश्चय करून - श्वासानिलान्तर्हितसूक्ष्मदेहः - श्वासवायूमध्ये गुप्त केला आहे सूक्ष्मदेह ज्याने असा - आधावतः रिपोः शरीरं - अंगावर धावून येणार्‍या शत्रूच्या शरीरात - तत्प्राणरन्ध्रेण - त्याचे प्राणरंध्र जे नाक तेथून - निर्विविशे - शिरला. ॥१०॥
हे असुरशिरोमणे, ज्यावेळी हिरण्यकशिपू त्यांच्यावर झडप घालीत होता, त्याचवेळी घाबरल्याप्रमाणे भगवंतांनी आपले शरीर सूक्ष्म बनविले आणि ते त्याच्या श्वासांत लपून नाकातून हृदयात जाऊन बसले. (१०)


स तन्निकेतं परिमृश्य
     शून्यमपश्यमानः कुपितो ननाद ।
क्ष्मां द्यां दिशः खं विवरान्समुद्रान्
     विष्णुं विचिन्वन् न ददर्श वीरः ॥ ११ ॥
धुंडीयली ही पृथिवी तयाने
    न सापडे तो हरि त्यास कोठे ।
दाही दिशांना करि सिंहनाद
    परी तया तो नच की मिळला ॥ ११ ॥

वीरः सः - पराक्रमी तो हिरण्यकशिपु - शून्यं तन्निकेतं परिमृश्य - शून्य अशा त्याच्या स्थानाला शोधून - अपश्यमानः - त्याला न पाहणारा - कुपितः ननाद - रागावून गर्जना करिता झाला - (च) क्ष्मां द्यां दिशः खं विवरान् समुद्रान् विष्णुं विचिन्वन् - आणि पृथ्वी, स्वर्ग, दिशा, आकाश, सप्तपाताळे, सातसमुद्र इतक्या ठिकाणी विष्णूला शोधूनही - न ददर्श - पाहता झाला नाही. ॥११॥
हिरण्यकशिपूने त्यांचा लोक बारकाईने धुंडाळला, पण त्यांचा काहीच पत्ता लागला नाही. यामुळे चिडून तो आरडाओरड करू लागला. त्या वीराने पृथ्वी, स्वर्ग, दिशा, आकाश, पाताळ आणि समुद्र असे सगळीकडे भगवंतांना शोधले, परंतु त्याला ते कुठेच दिसले नाहीत. (११)


(अनुष्टुप्)
अपश्यन् इति होवाच मयान्विष्टमिदं जगत् ।
भ्रातृहा मे गतो नूनं यतो नावर्तते पुमान् ॥ १२ ॥
(अनुष्टुप्‌)
कोठेही न दिसे तेंव्हा वदला भ्रातृघातकी ।
गेला असेल तो तेथे कोणी जेथून येत ना ॥ १२ ॥

विष्णुं अपश्यन् इति ह उवाच - विष्णूला न पाहिल्यामुळे तो ह्याप्रमाणे म्हणाला - मया इदं जगत् अन्विष्टं - मी हे जग शोधिले - भ्रातृहा - माझ्या भावाला मारणारा - यतः पुमान् न आवर्तते (तत्र) नूनं गतः - जेथून पुरुषाला परत येता येत नाही तेथेच खरोखर गेला. ॥१२॥
ते कुठेच नाहीत, असे पाहून तो म्हणू लागला, "मी सर्व जग पिंजून काढले, परंतु तो सापडला नाही. माझ्या भावाचा घात करणारा तो नक्कीच, जिथे गेल्यानंतर पुन्हा परत येता येत नाही, अशा लोकी निघून गेला असावा. (१२)


वैरानुबन्ध एतावान् आमृत्योरिह देहिनाम् ।
अज्ञानप्रभवो मन्युः अहंमानोपबृंहितः ॥ १३ ॥
संपले वैर ते सर्व वैर त्याच्या तनूस ते ।
अहंकारेचि अज्ञान अज्ञाने क्रोध वाढतो ॥ १३ ॥

एतावान् वैरानुबन्धः - इतका वैरसंबंध - इह - या लोकी - देहिनां - प्राण्यांमध्ये - आमृत्योः - मृत्यूपर्यंत - अज्ञानप्रभवः अहंमानोपबृंहितः मन्युः तावत् (भवति) - अज्ञानापासून उत्पन्न झालेला व अहंकाराने वाढलेला क्रोध तेथपर्यंत असतो. ॥१३॥
बस ! आता त्याच्याशी वैरभाव ठेवण्याची आवश्यकता नाही. कारण वैर देहाबरोबरच संपते. क्रोधाचे कारण अज्ञान आहे आणि अहंकारामुळे तो वाढतच जातो. (१३)


पिता प्रह्रादपुत्रस्ते तद्विद्वान् द्विजवत्सलः ।
स्वमायुर्द्विजलिंगेभ्यो देवेभ्योऽदात् स याचितः ॥ १४ ॥
पिता विरोचनो होते द्विजभक्त बहू असे ।
द्विजवेष धरोनीया देवता पातल्या जधी ॥
द्विजांचा छळ पाहोनी तयांना आयु अर्पिली ॥ १४ ॥

प्रह्लादपुत्रः ते पिता - प्रल्हादाचा मुलगा म्हणजे तुझा पिता विरोचन - द्विजवत्सलः (आसीत्) - ब्राह्मणांवर फारच प्रेम करीत असे - सः याचितः - त्याच्याजवळ याचना केली असता - तद्विद्वान् - त्यांना जाणूनही - द्विजलिङगेभ्यः देवेभ्यः स्वम् आयुः अदात् - ब्राह्मणांची स्वरूपे घेतलेल्या देवांना त्याने आपले आयुष्य दिले. ॥१४॥
राजा, तुझा पिता प्रह्लादनंदन विरोचन फार मोठा ब्राह्मणभक्त होता. इतका की, त्याचे शत्रू असणार्‍या देवांनी ब्राह्मणांचा वेष घेऊन त्याचे आयुष्य मागितले आणि त्यांचे कपट माहीत असूनही त्याने त्यांना आपले आयुष्य दिले. (१४)


भवान् आचरितान् धर्मान् आस्थितो गृहमेधिभिः ।
ब्राह्मणैः पूर्वजैः शूरैः अन्यैश्चोद्दामकीर्तिभिः ॥ १५ ॥
तुम्ही तो पाळिता धर्म शुक्राचार्य गुरुहि जो ।
प्रल्हाद पाळिती नी ज्या गृहस्थद्विज पाळिती ॥ १५ ॥

भवान् - तू - गृहमेधिभिः पूर्वजैः ब्राह्मणैः - गृहस्थाश्रमी अशा पूर्वीच्या ब्राह्मणांनी - च - आणि - अन्यैः उद्दामकीर्तिभिः शूरैः - दुसर्‍या अत्यंत शूर पुरुषांनी - आचरितान् धर्मान् आस्थितः (असि) - आचरिलेल्या धर्माप्रमाणे वागत आहेत. ॥१५॥
ज्या धर्माचे, गृहस्थ, ब्राह्मण, आपले पूर्वज आणि अन्य यशस्वी वीरांनी पालन केले, त्याच धर्माचे तुझी आचरण करीत आहात. (१५)


तस्मात् त्वत्तो महीमीषद् वृणेऽहं वरदर्षभात् ।
पदानि त्रीणि दैत्येन्द्र सम्मितानि पदा मम ॥ १६ ॥
दैत्येंद्रा ! मागता सर्व देण्या साठी समर्थ तू ।
तीन पाऊल ती पृथ्वी देयावी मजला अशी ॥ १६ ॥

तस्मात् दैत्येन्द्र - ह्याकरिता हे दैत्यपते बलिराजा - अहं वरदर्षभात् त्वत्तः - मी वर देणार्‍यात श्रेष्ठ अशा तुझ्यापासून - मम पदा संमितानि त्रीणि पदानि - माझ्या पावलाने मोजलेली तीनच पावले - ईषत् मही वृणे - थोडी भूमि मागतो. ॥१६॥
हे दैत्येंद्रा, मागितलेली वस्तू देणार्‍यांमध्ये आपण श्रेष्ठ आहात. म्हणून मी आपल्याकडे फक्त माझ्या पायांच्या मापाने तीन पावले एवढी थोडीशी जमीन मागत आहे. (१६)


न अन्यत् ते कामये राजन् वदान्यात् जगदीश्वरात् ।
नैनः प्राप्नोति वै विद्वान् यावदर्थप्रतिग्रहः ॥ १७ ॥
विश्वाचा स्वामि तू आणि उदार तरि अल्प हे ।
राजा तू मजला द्यावे, घ्यावे लागेल तेवढे ॥ १७ ॥

राजन् - हे बलिराजा - वदान्यात् जगदीश्वरात् ते - दानशूर व त्रैलोक्याधिपति अशा तुझ्याकडून - अन्यत् न कामये - मी दुसरे इच्छित नाही - यावदर्थपरिग्रहः विद्वान् - काम साधण्यापुरतेच मागणारा ज्ञानी पुरुष - एनः न वै प्राप्नोति - पापाला प्राप्त होत नाही. ॥१७॥
हे राजन, आपण सर्व जगाचे स्वामी आणि मोठे उदार आहात. तरीसुद्धा मला आपल्याकडून अधिक काही नको. कारण विद्वान पुरुषाने आपल्या आवश्यकते इतकेच दान घेतले असता त्याला पाप लागत नाही. (१७)


श्रीबलिरुवाच -
अहो ब्राह्मणदायाद वाचस्ते वृद्धसम्मताः ।
त्वं बालो बालिशमतिः स्वार्थं प्रत्यबुधो यथा ॥ १८ ॥
राजा बळी म्हणाला -
अहो ! द्विजकुमारा हे वृद्धाच्या परि बोलणे ।
बाळबुद्धी अशी कैसी हानी लाभ न जाणता ॥ १८ ॥

अहो ब्राह्मणदायाद - हे ब्राह्मणकुलोत्पन्न बटो - ते वाचः वृद्धसंमताः (सन्ति) - तुझी भाषणे वृद्ध लोकांनी मान्य करण्यासारखी आहेत - (किन्तु) त्वं बालः बालिशमति (असि) - बाल वयाचा तू पोरकट बुद्धीचा आहेस - स्वार्थं प्रति - स्वतःच्या कार्याविषयी - यथा अबुधः (अस्ति) - जसा अज्ञानी मनुष्य असतो. ॥१८॥
बली म्हणाला - ब्राह्मणकुमारा, तुझे बोलणे तर वृद्धासारखे आहे; परंतु तुझी बुद्धी अजून लहान मुलासारखीच आहे. अजून तू लहान आहेस ना ? म्हणून आपला फायदा-तोटा तुला समजत नाही. (१८)


मां वचोभिः समाराध्य लोकानां एकमीश्वरम् ।
पदत्रयं वृणीते यो अबुद्धिमान् द्वीपदाशुषम् ॥ १९ ॥
राजा मी या त्रिलोकाचे द्वीपही देउ ते शके ।
प्रसन्न करुनी माते मागणे बुद्धिचे नसे ॥ १९ ॥

यः - जो - लोकानाम् एकम् ईश्वरं द्वीपदाशुषं मां - त्रैलोक्याचा एकटा अधिपति व द्वीप देणार्‍या अशा मला - वचोभिः समाराध्य - भाषणांनी संतुष्ट करून - पदत्रयं वृणीते - तीन पावले मागतो - सः - अबुद्धिमान - (अस्तिः) - तो वेडा होय. ॥१९॥
मी तिन्ही लोकांचा एकमात्र अधिपती आहे आणि द्वीपचे द्वीप देऊ शकतो. जो मला आपल्या बोलण्याने प्रसन्न करून माझ्याकडून फक्त तीन पावले भूमी मागतो, त्याला बुद्धिमान म्हणावे काय ? (१९)


न पुमान् मां उपव्रज्य भूयो याचितुमर्हति ।
तस्माद् वृत्तिकरीं भूमिं वटो कामं प्रतीच्छ मे ॥ २० ॥
बटो ! मागोनिया जाती ते ना भिक्षूक राहती ।
जीविका चालण्या ऐशी भूमि ती मागणे मला ॥ २० ॥

बटो - हे मुला - पुमान् माम् उपव्रज्य भूयः याचितुं न अर्हति - एकदा माझ्या जवळ आले असता पुरुषाला पुनः याचना करावी लागणे योग्य नाही - तस्मात् कामं वृत्तिकरीं भूमिं मे प्रतीच्छ - त्या कारणास्तव यथेच्छ निर्वाह चालण्यापुरती भूमि तू माझ्यापासून मागून घे. ॥२०॥
हे ब्रह्मचारी, जो एक वेळ माझ्याकडे आला, त्याला पुन्हा कधी कोणाकडून काही मागण्याची आवश्यकता वाटता कामा नये. म्हणून आपली उपजीविका चालविण्यासाठी तुला जेव्हढ्या भूमिची आवश्यकता असेल, तेवढी माझ्याकडून मागून घे. (२०)


श्रीभगवानुवाच -
यावन्तो विषयाः प्रेष्ठाः त्रिलोक्यां अजितेन्द्रियम् ।
न शक्नुवन्ति ते सर्वे प्रतिपूरयितुं नृप ॥ २१ ॥
श्री भगवान्‌ म्हणाले -
इंद्रिया नसता ताबा सृष्टिच्या सर्व वस्तुही ।
एकाही व्यक्तिच्या इच्छा पूर्ण ना शकती करू ॥ २१ ॥

नृप - हे बलिराजा - त्रिलोक्यां यावन्तः प्रेष्ठाः विषयाः (सन्ति) - त्रैलोक्यात जेवढे मोठमोठे विषय आहेत - ते सर्वे (अपि) अजितेन्द्रियं प्रतिपूरयितुं न शक्नुवन्ति - ते सर्व इंद्रियनिग्रह न करणार्‍यांची तृप्ति करण्यास समर्थ नाहीत. ॥२१॥
श्रीभगवान म्हणाले - राजन, मनुष्य जर इंद्रियांना काबूत ठेवू शकत नसेल, तर संसारातील सर्वच्या सर्व प्रिय विषयही त्याच्या कामना पूर्ण करू शकत नाहीत. (२१)


त्रिभिः क्रमैः असन्तुष्टो द्वीपेनापि न पूर्यते ।
नववर्षसमेतेन सप्तद्वीपवरेच्छया ॥ २२ ॥
त्रिपाद भूमिमध्ये ज्या संतोष नसतो तया ।
नवू देशाचिये द्वीप देताही तोष ना तया ॥
इच्छितो सातही द्वीप असंतुष्ट असेल तो ॥ २२ ॥

त्रिभिः क्रमैः असंतुष्टः (पुरुषः) - तीन पावलांनी संतुष्ट न होणारा पुरुष - सप्तद्वीपवरेच्छया - सात द्वीपे मिळावी अशा इच्छेने - नववर्षसमेतेन द्वीपेन अपि न पूर्यते - नऊ खंडांनी युक्त अशा जंबूद्वीपाने तृप्त होत नाही. ॥२२॥
जो तीन पावले भूमीने संतुष्ट होत नाही, त्याला नऊ वर्षांनी युक्त असे एक द्वीप जरी दिले तरीसुद्धा तो संतुष्ट होऊ शकणार नाही; कारण सातही द्वीपे मिळविण्याची त्याच्या मनात इच्छा शिल्लक राहातेच. (२२)


सप्तद्वीपाधिपतयो नृपा वैन्यगयादयः ।
अर्थैः कामैर्गता नान्तं तृष्णाया इति नः श्रुतम् ॥ २३ ॥
पृथू नी गय राजाचे ऐकतो राज्य सात त्या ।
द्वीपी असोनि संपत्ती तरी ना तोषले मनीं ॥ २३ ॥

सप्तद्वीपाधिपतयः वैन्यगयादयः नृपाः - सात द्वीपांचे अधिपति असे पृथू, गय आदि करून राजे - अर्थैः कामैः - अर्थ व काम ह्यांनी - तृष्णायाः अन्तं न गताः - इच्छेच्या अंताला गेले नाहीत - इति नः श्रुतं - असे आम्ही ऐकले आहे. ॥२३॥
मी असे ऐकले आहे की, पृथू, गय इत्यादी राजे सातही द्वीपांचे अधिपती होते. परंतु इतके धन आणि भोग मिळूनसुद्धा त्यांचा लोभ संपला नाही. (२३)


यदृच्छयोपपन्नेन सन्तुष्टो वर्तते सुखम् ।
नासन्तुष्टः त्रिभिर्लोकैः अजितात्मोपसादितैः ॥ २४ ॥
प्रारब्धे मिळते त्यात तोषता सुख ते बहू ।
संयमी ना तया दुःख अतृप्ती आग जाळिते ॥ २४ ॥

यदृच्छया उपपन्नेन संतुष्टः (नरः) सुखं वर्तते - सहज रीतीने प्राप्त झालेल्या वस्तूने संतुष्ट झालेला मनुष्य सुखी होतो - अजितात्मा असन्तुष्टः उपसादितैः त्रिभिः लोकः न - इंद्रियनिग्रह न करणारा व संतुष्ट नसणारा मनुष्य त्रैलोक्यानेही संतुष्ट होत नाही. ॥२४॥
मिळेल त्यातच संतुष्ट राहणारा पुरुष आपले जीवन सुखाने व्यतीत करतो. परंतु इंद्रियांना काबून न ठेवणारा, तिन्ही लोकांचे राज्य मिळूनसुद्धा संतोष नसेल तर दुःखीच असतो. (२४)


पुंसोऽयं संसृतेर्हेतुः असन्तोषोऽर्थकामयोः ।
यदृच्छयोपपन्नेन सन्तोषो मुक्तये स्मृतः ॥ २५ ॥
धनभोगी न संतोषी भवचक्री पडे असा ।
मिळते त्यात संतोषी तोष तो मोक्षकारक ॥ २५ ॥

अर्यं अर्थकामयोः असंतोषः पुंसः संसृतेः हेतुः - अर्थ व काम याविषयी असंतोष हा पुरुषाला, संसारात पाडणारा होय - यदृच्छया उपपन्नेन - सहजगत्या मिळालेल्या वस्तूने होणारा - संतोषः मुक्तये स्मृतः - संतोष मोक्षाचे साधन होय असे शास्त्रामध्ये सांगितले आहे. ॥२५॥
धन आणि भोगांनी संतुष्ट न होणेच जीवाला जन्न्ममृत्यूच्या फेर्‍यात अडकविण्यास कारणीभूत आहे. पण जे काही मिळेल त्यातच संतोष मानणे मुक्तीला कारणीभूत ठरते. (२५)


यदृच्छालाभतुष्टस्य तेजो विप्रस्य वर्धते ।
तत्प्रशाम्यति असन्तोषाद् अम्भसेवाशुशुक्षणिः ॥ २६ ॥
संतुष्ट राहता विप्र तेजाची वृद्धि होतसे ।
तेज नष्टे अतृप्ताचे जले अग्नि विझे तसे ॥ २६ ॥

यदृच्छालाभतुष्टस्य विप्रस्य तेजः वर्धते - सहजरीतीने मिळालेल्या वस्तूने संतुष्ट असणार्‍या ब्राह्मणाचे तेज वाढते - आशुशुक्षणिः अम्भसा इव असंतोषात् तत् प्रशाम्यति - जसा उदकाने अग्नि त्याप्रमाणे असंतोषाने ते तेज नष्ट होते. ॥२६॥
जो ब्राह्मण, दैवाने प्राप्त झालेल्या वस्तूतच संतुष्ट असतो, त्याच्या तेजाची वृद्धी होते. तो असंतुष्ट राहिला तर जसे पाण्यामुळे अग्नी शांत होतो, तसे त्याचे तेज नाहीसे होते. (२६)


तस्मात्त्रीणि पदान्येव वृणे त्वद् वरदर्षभात् ।
एतावतैव सिद्धोऽहं वित्तं यावत् प्रयोजनम् ॥ २७ ॥
मागता सर्व ते देसी यात संदेह तो नसे ।
त्रिपाद भूमिने माझी कामना होय पूर्ण ती ॥
गरजे पुरता व्हावा धनाचा संचयो पहा ॥ २७ ॥

तस्मात् वरदर्षभात् त्वत् त्रीणि पदानि एव वृणे - म्हणून वर देणार्‍यांत श्रेष्ठ अशा तुझ्यापासून तीनच पावले मी मागतो - अहं एतावता एव सिद्धः (भवामि) - मी एवढयानेच धन्य होईन - वित्तं यावत्प्रयोजनं (स्यात्) - द्रव्य कामापुरतेच असावे. ॥२७॥
म्हणून वर देणार्‍यात श्रेष्ठ अशा आपल्याकडे मी फक्त तीन पावले भूमीच मागतो. तेवढ्यानेच माझे काम भागेल कारण आवश्यकते इतकेच धन जवळ बाळगावे. (२७)


श्रीशुक उवाच -
इत्युक्तः स हसन्नाह वाञ्छातः प्रतिगृह्यताम् ।
वामनाय महीं दातुं जग्राह जलभाजनम् ॥ २८ ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
ऐकता हासला राजा वदला ठीक गोष्ट ही ।
संकल्पा वामने तेंव्हा घेतले जलपात्र तै ॥ २८ ॥

इति उक्तः सः - असे बोललेला तो बलिराजा - हसन् आह - हास्य करून म्हणाला - वाञ्‌छातः प्रतिगृह्यताम् - इच्छेप्रमाणे घेतले जावे - ततः सः - नंतर तो बलिराजा - वामनाय महीं दातुं जलभाजनं जग्राह - वामनाला पृथ्वी देण्याकरिता पाण्याचे भांडे घेता झाला. ॥२८॥
श्रीशुकाचार्य म्हणतात - भगवंतांनी असे म्हटल्यानंतर बलिराजाला हसू आले. तो म्हणाला, "ठीक आहे. तुझी इच्छा असेल, तेवढेच घे." असे म्हणून वामनांना जमीन देण्याचा संकल्प करण्यासाठी त्याने झारी हातात घेतली. (२८)


विष्णवे क्ष्मां प्रदास्यन्तं उशना असुरेश्वरम् ।
जानन् चिकीर्षितं विष्णोः शिष्यं प्राह विदां वरः ॥ २९ ॥
जाणिले गुरुशुक्राने लीला ही विष्णुची असे ।
क्रोधोनी शापवाणीते राजाला बोलले असे ॥ २९ ॥

विदांवरः - ज्ञान्यांमध्ये श्रेष्ठ असा - उशना - शुक्राचार्य - विष्णोः चिकीर्षितं जानन् - विष्णूच्या मनातील गोष्ट जाणून - विष्णवे क्ष्मां प्रदास्यन्तं शिष्यं असुरेश्वरं - विष्णूला पृथ्वी देणार्‍या शिष्य अशा दैत्यपति बलिराजाला - प्राह - म्हणाला. ॥२९॥
ज्ञानी शुक्राचार्यांना सर्व काही कळले होते. भगवंतांची ही लीला जाणून त्यांना जमीन देणासाठी तयार झालेल्या बलीला ते म्हणाले - (२९)


श्रीशुक्र उवाच -
एष वैरोचने साक्षात् भगवान् विष्णुरव्ययः ।
कश्यपाद् अदितेर्जातो देवानां कार्यसाधकः ॥ ३० ॥
श्री शुक्राचार्य म्हणाले -
बळी ! हा भगवान्‌ विष्णु अविनाशी स्वयं इथे ।
देवांचे कार्य साधाया अदिती पोटि जन्मला ॥ ३० ॥

वैरोचने - हे बलिराजा - एषः साक्षात् भगवान् अव्ययः विष्णुः - हा प्रत्यक्ष षड्‌गुणैश्वर्यसंपन्न अविनाशी विष्णु - देवानां कार्यसाधकः - देवांचे कार्य साधणारा - कश्यपात् अदितेः जातः - कश्यपापासून अदितीच्या ठिकाणी उत्पन्न झाला. ॥३०॥
शुकाचार्य म्हणाले - विरोचनकुमारा, हे स्वतः अविनाशी भगवान विष्णू आहेत. देवांचे काम साधण्यासाठी कश्यपांची पत्‍नी अदितीपासून अवतीर्ण झाले आहेत. (३०)


प्रतिश्रुतं त्वयैतस्मै यद् अनर्थं अजानता ।
न साधु मन्ये दैत्यानां महानुपगतोऽनयः ॥ ३१ ॥
अनर्थ नच तू जाणी हिरावी सर्व हा तुझे ।
मला अयोग्य हे वाटे अन्याय घडतो पहा ॥ ३१ ॥

अनर्थम् अजानता त्वया - अनर्थाला न जाणणार्‍या तुझ्याकडून - एतस्मै यत् प्रतिश्रुतं - ह्याला जे वचन दिले गेले - (तत्) साधु न मन्ये - ते मी चांगले मानीत नाही - दैत्यानां महान् अनयः उपगतः - दैत्यावर मोठे संकट आले आहे. ॥३१॥
आपले सर्वस्व जाईल, हा अनर्थ न जाणताच तू यांना दान देण्याची प्रतिज्ञा केलीस. हे तर दैत्यांवर मोठे संकट आले आहे. हे मला योग्य वाटत नाही. (३१)


एष ते स्थानमैश्वर्यं श्रियं तेजो यशः श्रुतम् ।
दास्यत्याच्छिद्य शक्राय मायामाणवको हरिः ॥ ३२ ॥
योग माये स्वयें विष्णू बटू होवोनि पातला ।
ऐश्वर्य धन नी राज्य कीर्ती तेज हरील हा ॥
सर्व कांही तुझे जे जे इंद्रासी देई हा पहा ॥ ३२ ॥

एषः मायामाणवकः हरिः - हा मायेने मानवाचे सोंग घेतलेला विष्णु - ते स्थानं ऐश्वर्यं श्रियं तेजः यशः श्रुतं (च) आच्छिद्य - तुझे स्थान, ऐश्वर्य, लक्ष्मी, तेज, कीर्ति, व ज्ञान ही हिरावून - शक्राय दास्यति - इंद्राला देईल. ॥३२॥
स्वतः भगवंतांनीच आपल्या योगमायेने हे ब्रह्मचार्‍याचे रूप घेतले आहे. हे तुझे राज्य, ऐश्वर्य, लक्ष्मी, तेज आणि कीर्ती, तुझ्याकडून हिरावून घेऊन इंद्राला देतील. (३२)


त्रिभिः क्रमैः इमान् लोकान् विश्वकायः क्रमिष्यति ।
सर्वस्वं विष्णवे दत्त्वा मूढ वर्तिष्यसे कथम् ॥ ३३ ॥
विश्वरूप तिन्हि पदे त्रिलोक व्यापु हा शके ।
मूर्खा सर्वचि ते देता निर्वाह करिसी कसा ॥ ३३ ॥

विश्वकायः - विराटस्वरूपी विष्णु - त्रिविक्रमैः इमान् लोकान् क्रमिष्यति - तीन पावलांनी ह्या लोकांना आक्रमून टाकील - मूढ - हे मूर्खा - सर्वस्वं विष्णवे दत्वा - सर्व जवळ असलेले विष्णुला देऊन - कथं वर्तिष्यसे - कसा निर्वाह करशील. ॥३३॥
हे विश्वरूप आहेत. तीन पावलामध्ये हे सर्व लोक व्यापून टाकतील. मूर्खा, सर्वस्व विष्णूंना देऊन तुझा निर्वाह कसा चालेल ? (३३)


क्रमतो गां पदैकेन द्वितीयेन दिवं विभोः ।
खं च कायेन महता तार्तीयस्य कुतो गतिः ॥ ३४ ॥
पृथिवी एक पायाने दुजाने स्वर्ग झाकि हा ।
ठेवील तिसरा पाय कुठे ते सांग तू बळी ॥ ३४ ॥

एकेन पदा गां - एका पावलाने पृथ्वीला - द्वितीयेन दिवं - दुसर्‍या पावलाने स्वर्गाला - महता कायेन च - आणि मोठया शरीराने - खं क्रमतः विभोः - आकाशाला व्यापणार्‍या परमेश्वराच्या - तार्तीयस्य (पदस्य) गतिः कुतः - तिसर्‍या पावलाला ठेवण्यास जागा कोठून मिळणार ? ॥३४॥
हे विश्वव्यापक भगवान एका पावलाने पृथ्वी आणि दुसर्‍या पावलाने स्वर्ग व्यापून टाकतील. यांच्या विशाल शरीराने आकाश व्यापून जाईल. तेव्हा यांचे तिसरे पाऊल कुठे राहील ? (३४)


निष्ठां ते नरके मन्ये हि अप्रदातुः प्रतिश्रुतम् ।
प्रतिश्रुतस्य योऽनीशः प्रतिपादयितुं भवान् ॥ ३५ ॥
न शब्द पाळिशी तेंव्हा नर्काची गति ती असे ।
प्रतिज्ञा तव ना होई कधी पूर्ण तया पुढे ॥ ३५ ॥

प्रतिश्रुतम् हि अप्रदातुः ते नरके निष्ठां मन्ये - कबूल केलेले खरोखर न देणार्‍या तुला नरकात ठिकाण प्राप्त होणार असे मला वाटते - यः भवान् प्रतिश्रुतस्य प्रतिपादयितुं अनीशः - जो तू कबूल केलेले देण्यास समर्थ नाहीस. ॥३५॥
प्रतिज्ञा करून ती पूर्ण न केल्यामुळे तुला नरकात पडावे लागेल; कारण तू प्रतिज्ञा पूर्ण करण्यास असमर्थ ठरशील. (३५)


न तद्दानं प्रशंसन्ति येन वृत्तिर्विपद्यते ।
दानं यज्ञस्तपः कर्म लोके वृत्तिमतो यतः ॥ ३६ ॥
ज्या दाने न उरे कांही ज्ञाते त्याला न मानिती ।
धनाने दान यज्ञो नी उपकार तपो घडे ॥ ३६ ॥

येन वृत्तिः विपद्यते - ज्यायोगे निर्वाहाचे साधन नष्ट होते - तत् दानं न प्रशंसन्ति - त्या दानाची प्रशंसा करीत नाहीत - यतः लोके - कारण लोकांमध्ये - वृत्तिमतः (एव) - निर्वाहाचे साधन जवळ असणार्‍याच्या हातूनच - दानं यज्ञः तपः कर्म (भवति) - दान, यज्ञ, तप व कर्म होते. ॥३६॥
जे दान दिल्यानंतर जीवन निर्वाहासाठी काही उरत नाही, ते दान विद्वान पुरुष योग्य मानीत नाहीत. ज्याचा जीवन निर्वाह योग्य तर्‍हेने चालतो , तोच या संसारात दान, यज्ञ, तप आणि परोपकार ही कर्मे करू शकतो. (३६)


धर्माय यशसेऽर्थाय कामाय स्वजनाय च ।
पञ्चधा विभजन् वित्तं इहामुत्र च मोदते ॥ ३७ ॥
धन ते पाच भागात मनुष्ये वाटणे पहा ।
धर्म नी यश भोगार्थ स्वजना अभिवृद्धिसी ॥ ३७ ॥

धर्माय यशसे अर्थाय कामाय स्वजनाय च - धर्म, कीर्ति, अर्थ, काम व स्वजन ह्याकरिता - पञ्चधा वित्तं विभजन् - पाच भागांत वाटणी करणारा - इह अमुत्र च मोदते - ह्या लोकी व परलोकी आनंदित होतो. ॥३७॥
जो मनुष्य आपले धन धर्मासाठी, यशासाठी, धनाची वाढ करण्यासाठी, उपभोग घेण्यासाठी आणि स्वजनांसाठी, अशा पाच कारणांसाठी विभागतो, तोच इह-परलोकी सुख मिळवितो. (३७)


अत्रापि बह्वृचैर्गीतं शृणु मेऽसुरसत्तम ।
सत्यं ॐ इति यत्प्रोक्तं यत् नेति आहानृतं हि तत् ॥ ३८ ॥
दैत्येंद्रा श्रुति ऋग्वेदी सांगते ऐकणे पहा ।
संकल्प करिता दान अस्विकार असत्य तो ॥ ३८ ॥

असुरसत्तम - हे दैत्यश्रेष्ठा बलिराजा - अत्र अपि बह्वृचैः गीतं - ह्या ठिकाणीही ऋग्वेदांनी गाइलेले - मे शृणु - माझ्यापासून ऐक - ओम् इति - ठीक असे - यत् प्रोक्तं तत् सत्यं - जे बोलले ते सत्य होय - हि - त्याचप्रमाणे - न इति यत् आह तत् अनृतं - नाही म्हणून जे म्हटले जाते त्याला असत्य म्हणतात. ॥३८॥
हे असुरश्रेष्ठा, मी तुला ऋग्वेदातील काही श्रुतींचा आशय सांगतो. ऐक. श्रुती म्हणते, होय म्हणणे, हे सत्य आहे आणि नकार देणे हे असत्य आहे. (३८)


सत्यं पुष्पफलं विद्याद् आत्मवृक्षस्य गीयते ।
वृक्षेऽजीवति तन्न स्यात् अनृतं मूलमात्मनः ॥ ३९ ॥
तनुचे पुण्य ते सत्य ते नाशे तनु संपता ।
संचयो तनुचे मूळ संचयो धर्म हा खरा ॥ ३९ ॥

सत्यं आत्मवृक्षस्य पुष्पफलं विद्यात् - सत्य हे शरीररूपी वृक्षाचे फूल व फळ होय असे जाणावे - गीयते - असे गाइले आहे - वृक्षे अजीवति - शरीररूपी वृक्षच जिवंत राहिला नाही - तत् न स्यात् - तर ते फळ मिळत नाही - अनृतं आत्मनः मूलं (अस्ति) - असत्य हे आत्मरूपी वृक्षाचे मूळ होय. ॥३९॥
हे शरीर हा एक वृक्ष आहे आणि सत्य याचे फूल, फळ आहे. परंतु जर वृक्षच राहिला नाही तर त्याचे फूल, फळ कसे राहणार ? असत्य हेच शरीररूप वृक्षाचे मूळ आहे. म्हणून नकार देऊन शरीर वाचवावे. (३९)


तद् यथा वृक्ष उन्मूलः शुष्यति उद्वर्ततेऽचिरात् ।
एवं नष्टानृतः सद्य आत्मा शुष्येन्न संशयः ॥ ४० ॥
नासता मूळ ते वृक्ष पडतो धरणीस की ।
संचयो संपता सारे सुकोनी जाय जीवन ॥ ४० ॥

तत् यथा उन्मूलः वृक्षः शुष्यति - त्याचप्रमाणे जसा मुळे उपटलेला वृक्ष सुकतो - अचिरात् उद्वर्तते - लवकरच उन्मळून पडतो - एवं नष्टानृतः आत्मा सद्यः शुष्येत् - याप्रमाणे असत्यरहित शरीर तात्काळ सुकते - (अत्र) न संशयः - ह्यात संशय नाही. ॥४०॥
जसे मूळ राहिले नाही तर वृक्ष सुकून जाऊन थोड्याच दिवसात खाली पडतो, त्याचप्रमाणे असत्याशिवाय देह तात्काळ नष्ट होईल, यात शंका नाही. (४०)


पराग् रिक्तमपूर्णं वा अक्षरं यत् तदोमिति ।
यत्किञ्चित् ओमिति ब्रूयात् तेन रिच्येत वै पुमान् ।
भिक्षवे सर्वं ॐकुन् नालं कामेन चात्मने ॥ ४१ ॥
हां मी देतो अशा वाक्ये धन हे दूर धावते ।
याचके लुटिता सर्व न राही कांहि आपणा ॥ ४१ ॥

यत् ओम् इति अक्षरं - जे ‘ठीक आहे’ असे उच्चारिलेले अक्षर - तत् पराक् रिक्तं वा अपूर्णं - ते द्रव्य घेऊन दूर पळणारे, रिकामे अथवा अपुरे होय - पुमान् यत् किंचित् ओम् इति ब्रूयात् - पुरुष जे काही ‘ठीक आहे’ असे म्हणतो - तेन वै रिच्येत - त्यायोगे खरोखर रिकामा होतो - भिक्षवे च सर्वं ओम् कुर्वन् - आणि याचकाला सर्व काही ‘ठीक आहे’ असे म्हणणारा - आत्मने कामेन न अलं - स्वतःची कोणतीच इच्छा पूर्ण करू शकत नाही. ॥४१॥
हां, मी देईन हे वाक्यच धनाला आपल्यापासून दूर करते, म्हणून त्याचा उच्चारच अपूर्ण म्हणजेच धनापासून वंचित करणारा होय. याच कारणास्तव, जो पुरुष "हां, मी देईन" असे म्हणतो, त्याचे धन संपून जाते. जो मागणार्‍याला सर्व काही देण्याचे मान्य करतो, तो आपल्या भोगासाठी काहीच शिल्लक ठेवू शकत नाही. (४१)


अथैतत्पूर्णमभ्यात्मं यच्च नेति अनृतं वचः ।
सर्वं नेति अनृतं ब्रूयात् स दुष्कीर्तिः श्वसन्मृतः ॥ ४२ ॥
मी ना देतो अशा वाक्ये असत्ये धन राहते ।
शब्दीं गुंतोनि ना देता तयाची अपकीर्ति हो ॥ ४२ ॥

अथ - आता - यत् न इति अनृतं वचः - जे ‘नाही’ असे मिथ्या भाषण - एतत् पूर्णं अभ्यात्मं - हे पूर्ण स्वतःची भर करणारे आहे - च - आणि - (यः) सर्वं न इति अनृतं ब्रूयात् - जो सर्व काही ‘नाही’ म्हणून असत्य बोलेल - सः दुष्कीर्तिः श्वसन् मृतः - तो अपकीर्तिवान पुरुष जिवंत असून मेल्यासारखाच होय. ॥४२॥
याच्या उलट, "मी देणार नाही" हे जे अस्वीकारात्मक असत्य आहे, ते आपले धन सुरक्षित राखणारे तसेच पूर्ण करणारे आहे. परंतु असे सर्व वेळी करणे योग्य नाही. जो सर्वांना सर्व वस्तूंसाठी नाहीच म्हणत राहतो त्याची अपकीर्ती होते. तो जिवंत असूनही मेल्यासारखाच असतो. (४२)


स्त्रीषु नर्मविवाहे च वृत्त्यर्थे प्राणसंकटे ।
गोब्राह्मणार्थे हिंसायां नानृतं स्यात् जुगुप्सितम् ॥ ४३ ॥
इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां
अष्टमस्कन्धे वामनप्रादुर्भावे एकोनविंशोऽध्यायः ॥ १९ ॥
विनोदे नी विवाहात कन्यादानी नि पत्‍निसी ।
गो ब्राह्मण हितासाठी आणीक प्राण संकटी ॥
असत्य बोलणे नाही निंदनीयचि तेवढे ॥ ४३ ॥
॥ इति श्रीमद्‌भागवता महापुराणी पारमहंसी संहिता ॥
॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रुपांतर ॥ एकोणविसावा अध्याय हा ॥ ८ ॥ १९ ॥ हरिःॐ तत्सत्‌ श्री कृष्णार्पणमस्तु ॥

स्त्रीषु नर्मविवाहे वृत्त्यर्थे - स्त्रियांजवळ, थट्टेमध्ये, लग्नामध्ये, निर्वाहासाठी, - प्राणसङकटे गोब्राह्मणार्थे हिंसायां च - प्राणांवर संकट आले असता, गाई व ब्राह्मण ह्यांकरिता व हिंसेच्या बाबतीत - अनृतं जुगुप्सितं न स्यात् - असत्य भाषण निंद्य होत नाही. ॥४३॥
स्त्रियांना वश करण्यासाठी, हास्यविनोदामध्ये, विवाहाच्या वेळी, आपल्या जीवाचे रक्षण करण्यासाठी, प्राणसंकट उपस्थित झाल्यावर, गाय आणि ब्राह्मणांच्या हितासाठी, तसेच एखाद्याला मृत्यूपासून वाचविण्यासाठी असत्य भाषण निंदनीय नाही. (४३)


स्कंध आठवा - अध्याय एकोणिसावा समाप्त

GO TOP