श्रीमद् भागवत पुराण
अष्टमः स्कंधः
तृतीयोऽध्यायः

गजेंद्रकर्तृकं भगवत्स्तवनं , ग्राहाद् गजेंद्रमोक्षणं च -

गजेंद्राकडून भगवंतांची स्तुती आणि त्याचे संकटातून मुक्त होणे -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


श्रीबादरायणिरुवाच -
(अनुष्टुप्) एवं व्यवसितो बुद्ध्या समाधाय मनो हृदि ।
जजाप परमं जाप्यं प्राग्जन्मनि अनुशिक्षितम् ॥ १ ॥
ेंद्रे स्तोत्र गायिले ॥ १ ॥

एवं - याप्रमाणे - बुद्‌ध्या - स्वतःच्या बुद्धीने - व्यवसितः - निश्चय केलेला - मनः - अंतःकरण - हृदि - हृदयामध्ये - समाधाय - स्थिर करून - प्राग्जन्मनि - पूर्वजन्मी - अनुशिक्षितं - शिकलेल्या - परमं - श्रेष्ठ - जाप्यं - स्तोत्राला - जजाप - जपता झाला. ॥१॥
श्रीशुक म्हणतात - आपल्या बुद्धीने असा निश्चय करून गजेंद्राने आपल्या मनाला हृदयात एकाग्र केले आणि नंतर पूर्वजन्मी शिकलेले श्रेष्ठ स्तोत्र म्हणून तो भगवंतांची स्तुती करू लागला. (१)


श्रीगजेन्द्र उवाच -
ॐ नमो भगवते तस्मै यत एतद् चिदात्मकम् ।
पुरुषाय आदिबीजाय परेशायाभिधीमहि ॥ २ ॥
गजेंद्र म्हणाले -
"ॐ नमो भगवते वासुदेवाय ! "
जगाचा कारणी ऐसा सर्व जीवास स्वामि जो ।
ज्या तेजे जग विस्तारे ईशा त्या हृदि मी नमी ॥ २ ॥

यतः - ज्याच्यापासून - एतत् - हे - चिदात्मकं (भवती) - चैतन्यादि प्राप्त होते - तस्मै - त्या - ओम् - प्रणवरूपी - भगवते - सर्वगुणसंपन्न - पुरुषाय - सर्वांच्या शरीरात आत्मरूपाने राहणार्‍या - आदिबीजाय - सृष्टीचे आद्यबीज अशा - परेशाय - परमेश्वराला - नमः - नमस्कार - अभिधीमही - करितो.॥२॥
गजेंद्र म्हणाला - जे जगाचे मूळ कारण आहेत आणि सर्वांच्या हृदयामध्ये क्षेत्रज्ञरूपात विराजमान आहेत, तसेच सर्व जगाचे एकमात्र स्वामी आहेत, ज्यांच्यामुळे हे विश्व चेतनस्वरूप आहे, त्या भगवंतांना नमस्कार करून मी त्यांचे ध्यान करतो. (२)


यस्मिन्निदं यतश्चेदं येनेदं य इदं स्वयम् ।
योऽस्मात् परस्माच्च परः तंस्तं प्रपद्ये स्वयम्भुवम् ॥ ३ ॥
जग हे स्थिरले त्यात त्याच्याने दिसते असे ।
भासे तो याच रूपात स्वयं सिद्धास मी नमी ॥ ३ ॥

यस्मिन् - ज्याठिकाणी - इदं (स्थितं) - हे विश्व राहिले आहे - च - आणि - यतः - ज्यापासून - इदं (जातम्) - हे विश्व उत्पन्न झाले - येन - ज्याच्यामुळे - इदं (प्रतीयते) - हे विश्व दृग्गोचर होते - अस्मात् - ह्या कारणाहून - च - आणि - परस्मात् - कार्याहून - परः - पलीकडे असणार्‍या - तं - त्या - स्वयंभुवं - स्वतःसिद्ध परमेश्वराला - प्रपद्ये - शरण जातो. ॥३॥
हे विश्व ज्यांच्यामध्ये आहे, ज्यांच्या सत्तेने प्रेरीत होते, ज्यांनी हे व्यापले आहे आणि जे स्वतः याच्या रूपाने प्रगट झाले आहेत आणि जे, हे विश्व आणि त्याचे कारण प्रकृती यांच्याही पलीकडे आहेत, त्या स्वयंभू भगवंतांना मी शरण आलो आहे. (३)


यः स्वात्मनीदं निजमाययार्पितं
     क्वचिद्विभातं क्व च तत्तिरोहितम् ।
अविद्धदृक् साक्ष्युभयं तदीक्षते
     स आत्ममूलोऽवतु मां परात्परः ॥ ४ ॥
(इंद्रवज्रा)
वसोनि त्याच्या मधि विश्व सारे
    दिसे कधी तो न दिसेहि ऐसा ।
साक्षी जगाचा मुळ तो स्वताचा
    अतीत सर्वा नमितो तया मी ॥ ४ ॥

स्वात्मनि - स्वस्वरूपामध्ये - इदं - हे जग - निजमायया - स्वतःच्या मायेने - अर्पितं - आरोपिलेले - तत् - ते जग - क्वचित् - काही ठिकाणी - विभातं - भासलेले - च - आणि - क्व - कोठे कोठे - तिरोहितं - आच्छादिलेले - तत् - त्या - उभयं - दिसणार्‍या व न दिसणार्‍या अशा दोन्ही प्रकारच्या जगाला - यः - जो - अविद्धदृक् - दृष्टिलोप न झालेला असा - साक्षी - साक्षीरूपाने - ईक्षते - पाहतो - सः - तो - परात् - पराहून - परः - पलीकडे असणारा - आत्ममूलः - स्वयंप्रकाश ईश्वर - मां - माझे - अवतु - रक्षण करो. ॥४॥
हे विश्व ज्यांच्या मायेने स्वतःमध्ये निर्माण झाले आहे, ते कधी प्रतीत होते तर कधी नाही; परंतु ज्यांची दृष्टी जशीच्या तशी एकसारखी असते, जे विश्वाचे साक्षी असून प्रगट व अप्रगट या दोन्ही विश्वांना पाहतात, जे सर्वांचे आणि स्वतःचेही मूळ आहेत, प्रकृतीच्याही पलीकडे असणारे ते प्रभू माझे रक्षण करोत. (४)


कालेन पञ्चत्वमितेषु कृत्स्नशो
     लोकेषु पालेषु च सर्वहेतुषु ।
तमस्तदासीद् गहनं गभीरं
     यस्तस्य पारेऽभिविराजते विभुः ॥ ५ ॥
काळात लोको अन लोकपाल
    लयासि जाता तम घोर दाटे ।
अनंत ऐसा परमात्म तेंव्हा
    अलिप्त तोची मज ईश रक्षो ॥ ५ ॥

कृत्स्त्रशः - सर्वप्रकाराने - लोकेषु - लोक - पालेषु - लोकपाल - च - आणि - सर्व हेतुषु - सर्व कारणे - कालेन - कालगतीने - पञ्चत्वं - मृत्यूप्रत - इतेषु - प्राप्त झाला असता - तदा - त्या वेळी - गहनं - निबिड - गभीरं - अपरंपार - तमः - अंधार - आसीत् - होता - तस्य - त्या अंधाराच्या - पारे - पलीकडे - यः - जो - विभुः - व्यापक ईश्वर - अभिविराजते - शोभतो. ॥५॥
ज्यावेळी लोक, लोकपाल आणि या सर्वांना कारणीभूत असणारे संपूर्णपणे नष्ट होऊन जातात, त्यावेळी फक्त अत्यंत घनघोर आणि निबिड अंधारच अंधार राहतो. परंतु जे अनंत परमात्मा सर्वथैव त्याच्याही पलीकडे विराजमान असतात, ते प्रभू माझे रक्षण करोत. (५)


न यस्य देवा ऋषयः पदं विदुः
     जन्तुः पुनः कोऽर्हति गन्तुमीरितुम् ।
यथा नटस्याकृतिभिर्विचेष्टतो
     दुरत्ययानुक्रमणः स मावतु ॥ ६ ॥
लीला तयाच्या नच गम्य कोणा
    नटापरी तो बदलीहि वेश ।
न रूप त्याचे जगि कोणि जाणी
    अवर्णनीयो मज ईश रक्षो ॥ ६ ॥

यथा - ज्याप्रमाणे - आकृतिभिः - आकारांनी - विचेष्टतः - चेष्टा करणार्‍या - नरस्य - पुरुषाच्या - देवाः - देव - ऋषयः - ऋषी - यस्य - ज्याच्या - पदं - स्वरूपाला - न विदु - जाणत नाहीत - पुनः - पुनः तर - कः - कोणता - जन्तुः - प्राणी - गन्तुं - मिळविण्यास - वा - अथवा - ईरितुं - स्तविण्यास - अर्हति - योग्य होतो - दुरत्ययानुक्रमणः - ज्याचे चरित्र वर्णन करणे फारच कठीण आहे असा - सः - तो परमेश्वर - मां - माझे - अवतु - रक्षण करो.॥६॥
जे नटाप्रमाणे अनेक वेष धारण करतात, त्यांचे वास्तविक स्वरूप देव किंवा ऋषी जाणत नाहीत, तर मग सामान्य प्राणी कसा जाणील ? ज्यांच्या लीलांचे रहस्य जाणणे अत्यंत कठीण आहे, ते प्रभू माझे रक्षण करोत. (६)


दिदृक्षवो यस्य पदं सुमंगलं
     विमुक्तसंगा मुनयः सुसाधवः ।
चरन्त्यलोकव्रतमव्रणं वने
     भूतात्मभूताः सुहृदः स मे गतिः ॥ ७ ॥
ज्या मंगला पाहण्याते सदैव
    आसक्ति त्यागे व्रत घेति योगी ।
जे पाहती त्यां जगती विराज
    योगेश्वरो हो मज साह्यभूत ।
गाती जयाची मुनि नित्य कीर्ती
    माझी गती तो हरि नित्य आहे ॥ ७ ॥

यस्य - ज्याच्या - सुमङगलं - अत्यंत मंगलकारक अशा - पदं - स्थानाला - दिदृक्षवः - पाहण्याची इच्छा करणारे - विमुक्तसंगाः - सर्वसंगपरित्याग केलेले - सुहृदः - प्रेमळ अंतःकरणाचे - सुसाधवः - अत्यंत सदाचारसंपन्न - मुनयः - ऋषी - भूतात्मभूताः - सर्व प्राण्यांच्या ठिकाणी आपलेपणा बाळगणारे असे - वने - अरण्यामध्ये - अव्रणं - न्यूनत्वरहित अशा - अलोकव्रतं - अलौकिक व्रताला - चरन्ति - आचरितात - सः - तो परमेश्वर - मे - माझी - गतिः - आधार॥७॥
ज्यांच्या परम मंगलमय स्वरूपाचे दर्शन करण्यासाठी महात्मे लोक आसक्तींचा त्याग करून वनात जाऊन अखंडपणे ब्रह्मचर्यादी व्रतांचे पालन करतात, तसेच आपलाच आत्मा सर्वांच्या ठिकाणी विराजमान आहे, असे जाणून सर्वांचे कल्याण करतात, त्या मुनींचे सर्वस्व असणारे भगवान माझे रक्षण करोत. तेच माझी गति होत. (७)


न विद्यते यस्य च जन्म कर्म वा
     न नामरूपे गुणदोष एव वा ।
तथापि लोकाप्ययसम्भवाय यः
     स्वमायया तान्यनुकालमृच्छति ॥ ८ ॥
न जन्म कर्मो नच नाम रुप
    तो काय स्पर्शी गुणदोष त्याला ।
उभारण्या सृष्टि नि संहराया
    माया स्विकारी तयि आपुली तो ॥ ८ ॥

यस्य - ज्याला - जन्म - जन्म - वा - किंवा - कर्म - कर्म - न विद्यते - असत नाही - च - आणि - नामरूपे - नाव व रूप - वा - अथवा - गुणदोषः एव - गुण आणि दोषही - न - नाही - तथापि - तरीसुद्धा - यः - जो - लोकाप्ययसंभवाय - लोकांचा नाश व उत्पत्ति करण्याकरिता - स्वमायया - आपल्या मायेने - तानि - ती - अनुकालं - त्या त्या काळाला अनुसरून - ऋच्छति - स्वीकारतो. ॥८॥
ज्यांना जन्म-कर्म, नाम-रूप नाही, की ज्यांच्यात गुण-दोष नाहीत. असे असून सुद्धा विश्वाची निर्मिती आणि संहार करण्यासाठी वेळोवेळी ते आपल्या मायेने त्यांचा स्वीकार करतात. (८)


(अनुष्टुप्)
तस्मै नमः परेशाय ब्रह्मणेऽनन्तशक्तये ।
अरूपायोरुरूपाय नम आश्चर्यकर्मणे ॥ ९ ॥
(अनुष्टुप्‌)
परब्रह्म परेशाते परमात्म्या नमो नमः ।
अरूप बहुरूपी तो नमो आश्चर्य कर्मिका ॥ ९ ॥

तस्मै - त्या - अनन्तशक्तये - अलोट शक्तीच्या - ब्रह्मणे - ब्रह्मस्वरूपी - परेशाय - परमेश्वराला - नमः - नमस्कार असो - अरूपाय - निराकार अशा - ऊरुरूपाय - अनेक रूपे धारण करणार्‍या - आश्चर्यकर्मणे - ज्याची कर्मे आश्चर्य जनक आहेत अशा - नमः - नमस्कार असो. ॥९॥
त्या अनंत शक्तिमान सर्वैश्वर्यसंपन्न परमात्म्याला मी नमस्कार करतो. ते अरूप असूनही बहुरूप आहेत. माझा त्यांना नमस्कार. (९)


नम आत्मप्रदीपाय साक्षिणे परमात्मने ।
नमो गिरां विदूराय मनसश्चेतसामपि ॥ १० ॥
नमो आत्मप्रदीपाला जीवसाक्ष्या नमो नमः ।
जो दूर वाणि चित्ताला परेशा त्या नमो नमः ॥ १० ॥

साक्षिणे - साक्षिरूपाने राहणार्‍या - आत्मप्रदीपाय - स्वयंप्रकाशी - गिरां - वाणीच्या - मनसः - मनाच्या - चेतसां - चित्तवृत्तीच्या - अपि - सुद्धा - विदूराय - अगदी पलीकडे असणार्‍या - परमात्मने - परमेश्वराला - नमोनमः - वारंवार नमस्कार असो. ॥१०॥
स्वयंप्रकाश, सर्वांचे साक्षी अशा परमात्म्याला मी नमस्कार करतो. जो मन, वाणी आणि चित्त यांना कळत नाही, त्या परमात्म्याला मी नमस्कार करतो. (१०)


सत्त्वेन प्रतिलभ्याय नैष्कर्म्येण विपश्चिता ।
नमः कैवल्यनाथाय निर्वाणसुखसंविदे ॥ ११ ॥
कर्म संन्यास योगाने वा कृष्णार्पण भावने ।
विवेकी शुद्ध जे होती मेळिती तेच त्याजला ॥
ज्ञानरूप स्वयें मुक्त कैवल्यदानि एकटा ॥ ११ ॥

विपश्चिता - ज्ञानी पुरुषाकडून - नैष्कर्म्येण - फलेच्छारहित कर्माच्या योगे - सत्त्वेन - सत्त्वगुणाच्यायोगे - प्रति लभ्याय - मिळविल्या जाणार्‍या - कैवल्यनाथाय - मोक्षाधिपति अशा - निर्वाणसुखसंविदे - मोक्षसुखाचा अनुभव घेणार्‍या - नमः - नमस्कार असो. ॥११॥
विवेकी पुरुष कर्मसंन्यास किंवा कर्मसमर्पणाच्या द्वारे आपले अंतःकरण शुद्ध करून ज्यांना प्राप्त करतात, तसेच जे स्वतः नित्यमुक्त, परमानंद व ज्ञानस्वरूप असून दुसर्‍यांना कैवल्यमुक्ति देणारे आहेत, त्या प्रभूंना मी नमस्कार करतो. (११)


नमः शान्ताय घोराय मूढाय गुणधर्मिणे ।
निर्विशेषाय साम्याय नमो ज्ञानघनाय च ॥ १२ ॥
तिन्ही गुणासि धारी जो शांत घोर नि मूढ या ।
क्रमाने धारि तो रूपे निर्भेळ समभाव जो ॥
ज्ञानघन प्रभू त्याला नमस्कार पुनःपुन्हा ॥ १२ ॥

शान्ताय - शान्तस्वरूपी - घोराय - उग्रस्वरूपी - मूढाय - मूढस्वरूपी - गुणधर्मिणे - गुणांच्या धर्माप्रमाणे वागणार्‍या - निर्विशेषाय - न्यूनाधिकभावरहित बुद्धीने चालणार्‍या - साम्याय - साम्यावस्थेत असणार्‍या - च - आणि - ज्ञानघनाय - ज्ञानपूर्ण अशा - नमोनमः - वारंवार नमस्कार असो.॥१२॥
जे सत्त्व, रज, तम या तीन गुणांच्या धर्मांचा स्वीकार करून अनुक्रमे शांत, घोर आणि मूढ अवस्था सुद्धा धारण करतात, त्या भेदरहित स्वभावाने स्थित असणार्‍या ज्ञानघन प्रभूंना मी वारंवार नमस्कार करतो. (१२)


क्षेत्रज्ञाय नमस्तुभ्यं सर्वाध्यक्षाय साक्षिणे ।
पुरुषायात्ममूलाय मूलप्रकृतये नमः ॥ १३ ॥
सर्वांचा स्वामि तू ज्ञाता सर्वसाक्षी तुला नमो ।
स्वयं कारण नी मूळ तुजला नमितो पुन्हा ॥ १३ ॥

सर्वाध्यक्षाय - सर्वत्र अध्यक्षत्वाने पाहणार्‍या - साक्षिणे - साक्षिभूत अशा - क्षेत्रज्ञाय - शरीरात आत्मरूपाने राहणार्‍या - पुरुषाय - पुरुषस्वरूपी - आत्ममूलाय - आत्मा हेच ज्याचे मूळचे स्वरूप आहे अशा - मूलप्रकृतये - सर्वांचे मूळस्वरूप अशा - तुभ्यं - तुला - नमोनमः - वारंवार नमस्कार असो. ॥१३॥
आपण सर्वांचे स्वामी, सर्व क्षेत्रांना जाणणारे आणि सर्वसाक्षी आहात. आपल्याला मी नमस्कार करतो. आपण स्वतःच आपले कारण आहात. पुरुष आणि मूळ प्रकृतीच्या रूपामध्ये सुद्धा आपणच आहात. आपणास माझे वारंवार नमस्कार. (१३)


सर्वेन्द्रियगुणद्रष्ट्रे सर्वप्रत्ययहेतवे ।
असताच्छाययोक्ताय सदाभासाय ते नमः ॥ १४ ॥
इंद्रिया विषया द्रष्टा जीवां आधार एकटा ।
असच्छायेतुनी होते प्रतीत तव रुप ते ॥
सर्वत्र भाससी तूची नमस्कार तुला असो ॥ १४ ॥

सर्वेंद्रियगुणद्रष्ट्रे - सर्व इंद्रियांच्या गुणांना पाहणार्‍या - सर्वप्रत्ययहेतवे - सर्व वस्तूंचे ज्ञान होण्यास कारणीभूत अशा - सदाभासाय - विषयांच्या ठिकाणी खरा वाटणारा आहे आभास ज्याचा अशा - असता छायया उक्ताय - मिथ्याभूत प्रतिबिंबाने बोलून दाखविलेल्या - ते - तुला - नमः - नमस्कार असो. ॥१४॥
आपण सर्व इंद्रिये आणि त्यांच्या विषयांचे साक्षी आहात, सर्व प्रचीतींचे आधार आहात. अहंकार इत्यादि भासमान असत् वस्तूंतून आपलेच अस्तित्व प्रगट होते. सर्व वस्तूंच्या सत्तेच्या रूपातसुद्धा केवळ आपलाच भास होत आहे. मी आपणास नमस्कार करीत आहे. (१४)


नमो नमस्तेऽखिलकारणाय
     निष्कारणायाद्‍भुतकारणाय ।
सर्वागमाम्नायमहार्णवाय
     नमोऽपवर्गाय परायणाय ॥ १५ ॥
(इंद्रवज्रा)
तू कारणांचा मुळ एकला नी
    तुला न त्याचा मुळि स्पर्श कांही ।
ओढे नद्यांना जयि सागराचा
    तसाचि वेदा तव आश्रयोही ।
मोक्षस्वरूपा तुज संत सर्व
    ध्याती म्हणोनी नमितो तुला मी ॥ १५ ॥

अखिलकारणाय - सर्व पदार्थांच्या उत्पत्तीला कारण अशा - निष्कारणाय - ज्याच्या उत्पत्तीला कोणतेही कारण नाही अशा - अद्‌भुतकारणाय - आश्चर्योत्पत्तीला कारणीभूत अशा - ते - तुला - नमोनमः - वारंवार नमस्कार असो. - सर्वांगमाम्नाय महार्णवाय - संपूर्ण वेदशास्त्रांचा मोठा समुद्रच अशा - परायणाय - साधूंना आश्रय देणारा अशा - अपवर्गाय - मोक्षरूपी ईश्वराला - नमः - नमस्कार असो. ॥१५॥
आपण सर्वांचे मूळ कारण आहात’ पण आपले कोणी कारण नाही. आपण सर्वांचे विलक्षण कारण आहात. आपणांस माझा वारंवार नमस्कार असो. जसे सर्व नद्या, झरे, इत्यादींचा अंतिम आधार समुद्र आहे, तसेच आपण सर्व वेद आणि शास्त्रांचे मुख्य आधार आहात. आपण मोक्षस्वरूप आहात आणि सर्व भक्तांची परम गती आहात. आपल्याला मी नमस्कार करतो. (१५)


गुणारणिच्छन्नचिदुष्मपाय
     तत्क्षोभविस्फूर्जितमानसाय ।
नैष्कर्म्यभावेन विवर्जितागम
     स्वयंप्रकाशाय नमस्करोमि ॥ १६ ॥
काष्ठात अग्नी जयि गुप्त राही
    मायेत तैसा हरि गुप्त राही ।
क्षोभे गुणांनी रचितोस सृष्टी
    अर्पोनि कर्मा भजती तुला जे ।
स्वयेंचि त्यांच्या हृदयात तूची
    प्रकाशसी की नमितो तुला मी ॥ १६ ॥

गुणारणिच्छन्नचिदूष्मपाय - गुणरूपी अरणीने आच्छादिलेला अग्निच अशा - तत्क्षोभविस्फूर्जितमानसाय - त्या गुणांचा क्षोभ झाल्यामुळे ज्याच्या अंतःकरणाचे तेज सर्वत्र फाकू लागते अशा - नैष्कर्म्यभावेन - फलेच्छारहित कर्मे करण्याची भावना ठेविल्यामुळे - विवर्जितागमस्वयंप्रकाशाय - वैदिक मार्ग झुगारणार्‍यांच्या अंतःकरणात स्वतः ज्ञानप्रकाश देणार्‍या - नमस्करोमि - मी नमस्कार करितो.॥१६॥
ज्याने त्रिगुणरूप अरणीमध्ये ज्ञानरूप अग्नी गुप्त ठेवला आहे आणि त्या गुणांमध्ये क्षोभ निर्माण करून त्यांच्याद्वारा विविध प्रकारची सृष्टी रचण्याचा ज्याने संकल्प केला, जे लोक आत्मचिंतनाने वेदाने सांगितलेल्या विधिनिषेधांच्या पलीकडे जातात, त्यांच्या अंतःकरणात जे स्वतःच प्रकाशित होतात, त्या तुम्हांला मी नमस्कार करतो. (१६)


मादृक् प्रपन्नपशुपाश विमोक्षणाय
     मुक्ताय भूरिकरुणाय नमोऽलयाय ।
स्वांशेन सर्वतनुभृन् मनसि प्रतीत
     प्रत्यग्दृशे भगवते बृहते नमस्ते ॥ १७ ॥
(वसंततिलका)
मायाळु मुक्त करिती फसता पशूला
    तूही तसाचि करिशी भवमुक्त जीवा ।
भक्तार्थ ना तुज मुळी मनि आळसो की
    ऐश्वर्यपूर्ण तुजला नमितो हरी मी ॥ १७ ॥

मुक्ताय - मुक्त झालेल्या - भूरिकरुणाय - अत्यंत दयाळू अशा - मादृक्प्रपन्नपशुपाशविमोक्षणाय - माझ्यासारख्या शरण आलेल्या पशूंची, पाशांतून मुक्तता करणार्‍या - आलयाय - आळसरहित - नमः - नमस्कार असो - स्वांशेन - आपल्या अंशाने - सर्वतनुभृन्मनसि - सर्व प्राण्यांच्या अंतःकरणात - प्रतीतप्रत्यग्दृशे - प्रसिद्ध ज्ञानप्रकाश दाखविणार्‍या - बृहते - विशाल अशा - भगवते - षड्‌गुणैश्वर्यसंपन्न अशा - ते - तुला - नमः - नमस्कार असो.॥१७॥
जाळ्यात अडकलेल्या पशूला सोडवावे, त्याप्रमाणे आपण माझ्यासारख्या शरणागताचा संसारपाश तोडून त्याला मुक्त करता. याबाबतीत आपल्याला आळस नाही. आपण नित्यमुक्त आहात, परम करुणामय आहात. आपण सर्व प्राण्यांच्या हृदयात आपल्या अंशाने अंतरात्म्याच्या रूपामध्ये उपलब्ध होत असता. आपण सर्व ऐश्वर्यांनी पूर्ण तसेच अनंत आहात. मी आपणांस नमस्कार करीत आहे. (१७)


आत्मात्मजाप्तगृहवित्तजनेषु सक्तैः
     दुष्प्रापणाय गुणसंगविवर्जिताय ।
मुक्तात्मभिः स्वहृदये परिभाविताय
     ज्ञानात्मने भगवते नम ईश्वराय ॥ १८ ॥
देहादि पुत्र गुरु द्रव्य ययात गुंते
    त्यांना मुळीच नच तू हरि पावशी की ।
जे मुक्त राहुनि तुला भजतात चित्ती
    तू ज्ञानपूर्ण तुजला नमितो पहा मी ॥ १८ ॥

आत्मात्मजाप्तगृहवित्तजनेषु - शरीर, पुत्र, संबंधी, घर, द्रव्य व इतर लोक ह्यांचे ठिकाणी - सक्तैः - आसक्ती ठेवणार्‍यांना - दुष्प्रापणाय - मिळण्यास कठीण अशा - गुणसंगविवर्जिताय - त्रिगुणांची संगति सोडणार्‍या - मुक्तात्मभिः - मोक्ष मिळविलेल्या प्राण्यांनी - स्वहृदये - आपल्या हृदयामध्ये - परिभाविताय - चिंतिलेल्या - ज्ञानात्मने - ज्ञानरूपी - भगवते ईश्वराय - भगवान परमेश्वराला - नमः - नमस्कार असो. ॥१८॥
जे लोक शरीर, पुत्र, बांधव घर, संपत्ती आणि स्वजनांमध्ये आसक्त आहेत, त्यांना आपली प्राप्ती होणे कठीण आहे. आपण गुणांच्या पलीकडे आहात. जीवन्मुक्त पुरुष आपल्या हृदयात आपले निरंतर चिंतन करीत असतात. त्या सर्व ऐश्वर्यपूर्ण ज्ञानस्वरूप भगवंतांना मी नमस्कार करतो. (१८)


यं धर्मकामार्थविमुक्तिकामा
     भजन्त इष्टां गतिमाप्नुवन्ति ।
किं चाशिषो रात्यपि देहमव्ययं
     करोतु मेऽदभ्रदयो विमोक्षणम् ॥ १९ ॥
(इंद्रवज्रा)
धर्मार्थ कामो अन मोक्ष हेते
    भजेल त्याला करिशी कृपा ती ।
नी पार्षदोही करिशी कधी तू
    प्रभो दयाळू मज तारि वेगे ॥ १९ ॥

धर्मकामार्थविमुक्तिकामाः - धर्म, काम, अर्थ व मोक्ष यांची इच्छा करणारे पुरुष - यं - ज्या ईश्वराची - भजन्तः - सेवा करून - इष्टां - इच्छित - गतिं - गति - आप्नुवन्ति - मिळवितात - किंतु - एवढेच नव्हे तर - आशिषः - इतर भोग्य पदार्थ - अव्ययं देहम् अपि - अविनाशी देहसुद्धा - राति - देतो - अदभ्रदयः - अत्यंत दयाळु असा - मे - माझी - विमोक्षणं - सुटका - करोतु - करो. ॥१९॥
धर्म, अर्थ, काम आणि मोक्षाच्या इच्छेने मनुष्य ज्यांचे भजन करून आपले इष्ट ध्येय प्राप्त करून घेतो. इतकेच नव्हे तर जे त्याला सर्व प्रकारचे सुख देऊन अविनाशी पार्षद शरीरसुद्धा देतात, तेच परम दयाळू प्रभू मला मुक्त करोत. (१९)


एकान्तिनो यस्य न कञ्चनार्थं
     वाञ्छन्ति ये वै भगवत्प्रपन्नाः ।
अत्यद्‍भुतं तच्चरितं सुमंगलं
     गायन्त आनन्दसमुद्रमग्नाः ॥ २० ॥
अनन्य प्रेमे भजती तुला जे
    त्यां मोक्ष तुच्छो नच अन्य मोह ।
आनंद डोही रमतात ते नी
    लीला तुझ्या मंगल गान गाती ॥ २० ॥

यस्य एकान्तिनः - ज्या ईश्वराची अत्यंत भक्ती करणारे - कंचन अर्थं - कोणत्याही अर्थाला - न वाञ्‌छन्ति - इच्छित नाहीत - (तथा) वै - त्याचप्रमाणे - ये - जे - भगवत्प्रपन्नाः - भगवंताला शरण गेलेले - अत्यद्‌भुतं - अत्यंत आश्चर्यजनक - सुमंगलं - अत्यंत कल्याणकारक - तच्चरितं - त्या भगवंताच्या चरित्राला - गायन्तः - गाणारे - आनन्दसमुद्रमग्नाः (भवन्ति) - आनंदसागरात गढून जातात. ॥२०॥
ज्यांचे अनन्य भक्त त्यांना शरण जाऊन त्यांच्याकडून कोणत्याही वस्तूची अभिलाषा धरीत नाहीत. उलट त्यांच्या परम दिव्य मंगलमय लीलांचे गायन करीत आनंद समुद्रात डुंबत राहतात. (२०)


तमक्षरं ब्रह्म परं परेशं
     अव्यक्तमाध्यात्मिकयोग गम्यम् ।
अतीन्द्रियं सूक्ष्ममिवातिदूरं
     अनन्तमाद्यं परिपूर्णमीडे ॥ २१ ॥
जो अक्षरो ब्रह्म परं परेश
    अव्यक्त आध्यात्मिक योगगम्य ।
अनंत आदी अन ब्रह्मरूप
    त्या आत्मरूपा स्तवितो असा मी ॥ २१ ॥

अक्षरं - अविनाशी - ब्रह्म - सर्वाहून मोठा अशा - परं - सर्वांच्या पलीकडील - परेशं - श्रेष्ठ ईश्वर अशा - अव्यक्तं - कोणाच्याही दृष्टीला गोचर न होणार्‍या - आध्यात्मिकयोगगम्यं - अध्यात्मज्ञानाच्या योगानेच जाणता येणार्‍या - सूक्ष्मं इव - जणू काय लहानाहून लहान अशा - अतीन्द्रियं - इंद्रियांना न कळणार्‍या - अतिदूरं - अत्यंत दूर असणार्‍या - अनन्तं - अनंत अशा - आद्यं - सर्वांच्या अगोदर अस्तित्वात असणार्‍या - परिपूर्णं - सर्व गुणांनी पूर्ण अशा - तं - त्या ईश्वराला - ईडे - मी स्तवितो.॥२१॥
जे अविनाशी, सर्वशक्तिमान, अव्यक्त, इंद्रियातीत आणि अत्यंत सूक्ष आहेत, जे अत्यंत जवळ असूनसुद्धा अतिशय लांब आहेत, असे वाटते, जे ज्ञानयोगाने प्राप्त होतात, त्या आदिपुरुष, अनंत, तसेच परिपूर्ण परब्रह्म परमात्म्यांची मी स्तुती करीत आहे. (२१)


(अनुष्टुप्)
यस्य ब्रह्मादयो देवा वेदा लोकाश्चराचराः ।
नामरूपविभेदेन फल्ग्व्या च कलया कृताः ॥ २२ ॥
यथार्चिषोऽग्नेः सवितुर्गभस्तयो
     निर्यान्ति संयान्त्यसकृत्स्वरोचिषः ।
तथा यतोऽयं गुणसम्प्रवाहो
     बुद्धिर्मनः खानि शरीरसर्गाः ॥ २३ ॥
स वै न देवासुरमर्त्यतिर्यङ्
     न स्त्री न षण्ढो न पुमान्न जन्तुः ।
नायं गुणः कर्म न सन्न चासन्
     निषेधशेषो जयतादशेषः ॥ २४ ॥
(अनुष्टुप्‌)
ज्याचा तेजांश घेवोनी ब्रह्माही सृष्टि निर्मितो ।
गुणांनी प्रगटे ईश न तो देव न आसुर ॥ २२ ॥
(इंद्रवज्रा)
पक्षी पशू ना नर स्त्री नि षंढ
    मनुष्य नी अन्य न प्राणि कोणी ।
कर्मो नसे नी गुण कर्मकर्ता
    न कारणी तो प्रभू त्या अलिप्त ॥ २३ ॥
गाळूनि चोथा मग शेष राही
    तै रूप त्याचे उरते तळाशी ।
असा गुणातीत प्रभूच यावा
    उद्धार माझा करण्या त्वरेने ॥ २४ ॥

यस्य - ज्या ईश्वराच्या - फल्ग्व्या कलया - अति सूक्ष्म अंशाने - ब्रह्मादयः - ब्रह्मादिक - देवाः - देव - वेदाः - वेद - च - आणि - चराचराः - स्थावरजंगमात्मक - लोकाः - लोक - नामरूपविभेदेन - नावे व स्वरूपे ह्यांच्या भेदाने - कृताः - निर्माण केले आहेत. ॥२२॥ यथा - ज्याप्रमाणे - स्वरोचिषः अग्नेः - स्वतःसिद्ध प्रकाशमान अशा अग्नीपासून - अर्चिषः - ज्वाळा - च - आणि - सवितुः - सूर्यापासून - गभस्तयः - किरण - असकृत् - वारंवार - निर्यान्ति - बाहेर पडतात - संयान्ति - त्यात लीन होतात - तथा - त्याप्रमाणे - यतः - ज्या परमेश्वरापासून - बुद्धि - बुद्धि - मनः - अंतःकरण - खानि - इंद्रिये - शरीरसर्गाः - देहोत्पत्ति - अयं - हा - गुणसंप्रवाहः - गुणांचा प्रवाह - संयाति निर्याति च - बाहेर पडतो व आत लीन होतो. ॥२३॥ सः - तो परमेश्वर - वै - खरोखर - देवासुरमर्त्यतिर्यक् - देव, दैत्य, मनुष्य व पशुपक्षी - न - नव्हे - स्त्री - स्त्री - न - नव्हे - षण्ढः - नपुंसक - न - नव्हे - पुमान् - पुरुष - न - नव्हे - जन्तुः - प्राणी - न - नव्हे - अयं - हा - गुणः - गुण - न - नव्हे - कर्म - कर्म - न - नव्हे - सत् - चांगले - च - आणि - असत् - वाईट - न - नव्हे - निषेधशेषः - निषेध केल्यावर उरणारा - अशेषः - जेथे काहीएक शेष राहात नाही असा ईश्वर - जयतात् - जय पावो.॥२४॥
ज्यांच्या अत्यंत लहानशा अंशाने अनेक नामरूपांनी युक्त अशा ब्रह्मदेवादी देव, वेद आणि चराचर लोकांची उत्पत्ती झाली, जसे धगधगणार्‍या आगीपासून ज्वाळा आणि सूर्यापासून त्याचे अनेक किरण वारंवार उत्पन्न होतात आणि त्यातच लय पावतात, तसेच ज्या स्वयंप्रकाश प्रमात्म्यापासून बुद्धी, मन, इंद्रिये, शरीर, रूप इत्यादे गुणांचा प्रवाह वारंवार प्रगट होतो आणि त्यातच लय पावतो तो परमात्मा, देव नाही, असुर नाही, मनुष्य नाही, नपुंसक नाही की कोणी प्राणी नाही की कारण नाही. सर्वांचा निषेध झाल्यावर जे काही शिल्लक राहते, तेच त्यांचे स्वरूप आहे. तसेच ते सर्व काही आहेत. तेच परमात्मा माझा उद्धार करण्यासाठी प्रगट होवोत. (२२-२४)


जिजीविषे नाहमिहामुया किम्
     अन्तर्बहिश्चावृतयेभयोन्या ।
इच्छामि कालेन न यस्य विप्लवः
     तस्यात्मलोकावरणस्य मोक्षम् ॥ २५ ॥
ना मी जगूं इच्छितो हत्तियोनी
    अज्ञानरुपी उपयोग काय ।
तेजार्थ मी हा तम त्यागु इच्छी
    काळात मुक्ती प्रभू ना करी तो ॥ २५ ॥

अन्तः - आत - च - आणि - बहिः - बाहेर - आवृतया - वेष्टिलेल्या - अमुया - ह्या - इभयोन्या - गजयोनीशी - (मे) किम् - मला काय कर्तव्य आहे - अहं - मी - इह - या गजयोनीत - न जिजीविषे - जगण्याची इच्छा करीत नाही - यस्य - ज्याचा - कालेन - कालगतीने - न विप्लवः - नाश होत नाही - तस्य - त्या - आत्मलोकावरणस्य - आत्मप्रकाशाला आच्छादणार्‍या अज्ञानापासून - मोक्षं - सुटका - इच्छामि - इच्छितो.॥२५॥
मी जिवंत राहू इच्छित नाही. कारण हा हत्तीचा जन्म आतून, बाहेरून, सगळीकडून अज्ञानाने झाकला गेलेला आहे. हा देह जगून काय फायदा ? आत्मप्रकाश झाकणार्‍या त्या अज्ञानरूप आवरणातून मी सुटका करून घेऊ इच्छितो. हे आवरण कालक्रमानुसार आपले आपण नाहीसे होत नाही. ते केवळ आपल्या कृपेनेच नाहीसे होणारे आहे. (२५)


(अनुष्टुप्)
सोऽहं विश्वसृजं विश्वं अविश्वं विश्ववेदसम् ।
विश्वात्मानमजं ब्रह्म प्रणतोऽस्मि परं पदम् ॥ २६ ॥
(अनुष्टुप्‌)
विश्वाचा रचिता तोची विश्वरूप तयास मी ।
नमो ब्रह्म परेशाला अंतरात्म्या नमो नमः ॥ २६ ॥

सः - तो - अहं - मी - विश्वसृजं - जगाची उत्पत्ति करणार्‍या - विश्वं - विश्वस्वरूपी - अविश्वं - जगाहून निराळ्या - विश्ववेदसं - जगाला ओळखणार्‍या - विश्वात्मानं - जगात आत्मस्वरूपाने वावरणार्‍या - अजं - जन्मरहित - ब्रह्म - ब्रह्मात्मक - परं पदं - श्रेष्ठ आश्रयस्थान अशा परमेश्वराला - प्रणतः - नम्र झालेला - अस्मि - आहे.॥२६॥
जे विश्वरहित असूनही विश्वाचे निर्माते आणि विश्वस्वरूप आहेत, त्याचबरोबर जे विश्वाच्या अंतरात्म्याच्या रूपात, विश्वरूप सामग्रीने क्रीडासुद्धा करतात, त्या परब्रह्म परमात्म्यांना म्हणूनच मी शरण आलो आहे. त्या अजन्मा परमपदस्वरूप ब्रह्माला मी नमस्कार करीत आहे. (२६)


योगरन्धितकर्माणो हृदि योगविभाविते ।
योगिनो यं प्रपश्यन्ति योगेशं तं नतोऽस्म्यहम् ॥ २७ ॥
जाळुनी वासना कर्म योगी योगास साधिती ।
जाणिती भगवंता ज्या तो प्रभू नमितो पुन्हा ॥ २७ ॥

योगरन्धितकर्माणः - योगाने दग्ध झाली आहेत कर्मे ज्यांची असे - योगिनः - योगी - योगविभाविते हृदि - योगाने शुद्ध झालेल्या हृदयामध्ये - यं - ज्याला - प्रपश्यन्ति - पाहतात - तं - त्या - योगेशं - योगाधिपति परमेश्वराला - अहं - मी - नतः - शरण आलेला - अस्मि - आहे. ॥२७॥
योगी लोक योगाच्या द्वारे कर्म, कर्म-वासना आणि कर्मफलाला भस्म करून आपल्या योगशुद्ध हृदयामध्ये ज्या योगेश्वर भगवंतांचा साक्षात्कार करून घेतात, त्या प्रभूंना मी नमस्कार करतो. (२७)


नमो नमस्तुभ्यमसह्यवेग
     शक्तित्रयायाखिलधीगुणाय ।
प्रपन्नपालाय दुरन्तशक्तये
     कदिन्द्रियाणां अनवाप्यवर्त्मने ॥ २८ ॥
(इंद्रवज्रा)
असह्य झाले गुणवेग माते
    नमो तुला तू मन रूप तूची ।
न संयमी त्या तव प्राप्ति नाही
    अनंत शक्ती तुजला नमस्ते ॥ २८ ॥

असह्यवेगशक्तित्रयाय - ज्याच्या तीनही शक्तींचा वेग असह्य आहे अशा - अखिलधीगुणाय - सर्व इंद्रियांच्या ठिकाणी विषयस्वरूपाने असणार्‍या - कदिन्द्रियाणां - दुष्ट इंद्रिये असणार्‍या दुर्जनांना - अनवाप्यवर्त्मने - ज्याचा मार्ग सापडत नाही अशा - प्रपन्नपालाय - शरणागतांचे रक्षण करणार्‍या - दुरन्तशक्तये - ज्याच्या शक्तींचा पार लागणे कठीण आहे अशा - तुभ्यं - तुला - नमोनमः - वारंवार नमस्कार असो.॥२८॥
प्रभो ! सत्त्व, रज आणि तम या आपल्या तीन शक्तींचे रागादी वेग असह्य आहेत. सर्व इंद्रिये आणि मनाच्या विषयांच्या रूपामध्ये सुद्धा आपणच प्रतीत होत असता. म्हणून इंद्रिये ज्यांच्या ताब्यात नाहीत, त्यांना तर आपल्या प्राप्तीचा मार्गसुद्धा सापडत नाही. आपली शक्ति अनंत आहे. आपण शरणागतवत्सल आहात, आपल्याला मी वारंवार नमस्कार करतो. (२८)


(अनुष्टुप्)
नायं वेद स्वमात्मानं यच्छक्त्याहंधिया हतम् ।
तं दुरत्ययमाहात्म्यं भगवन्तं इतोऽस्म्यहम् ॥ २९ ॥
(अनुष्टुप्‌)
तुझी माया अहंकार आत्मरूपासि झाकिते ।
तेणे मी तुजसी नेणो अपार महिमा तुझी ॥
माधुर्यनिधि तू शक्त भगवान्‌ तुजला नमो ॥ २९ ॥

अयं - हा - यच्छक्त्या - ज्या ईश्वराची मायाशक्ती अशा - स्वं - स्वतःच्या - आत्मानं - आत्म्याला - न वेद - जाणत नाही - अहं - मी - तं - त्या - दुरत्यमाहात्म्यं - ज्याचे माहात्म्य समजणे कठीण आहे अशा - भगवंतं - परमेश्वराला - इतःअस्मि - शरण गेलो आहे. ॥२९॥
आपल्या मायेच्या अहंबुद्धीने आत्म्याचे स्वरूप झाकले गेले आहे. म्हणूनच हा जीव आपले स्वरूप जाणू शकत नाही. आपला महिमा अपरंपार आहे, अशा भगवंताना मी शरण आलो आहे. (२९)


श्रीशुक उवाच -
एवं गजेन्द्रमुपवर्णितनिर्विशेषं
     ब्रह्मादयो विविधलिंगभिदाभिमानाः ।
नैते यदोपससृपुर्निखिलात्मकत्वात्
     तत्राखिलामरमयो हरिराविरासीत् ॥ ३० ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
(वसंततिलका)
ऐशी गजेंद्र करिता स्तुति ती विशेष
    ब्रह्मादि ते विविध देव न धावले तै ।
देवाधिदेव भगवान्‌ परि सर्व आत्मा
    तो श्रीहरी मग स्वयें प्रगटोनि आला ॥ ३० ॥

विविधलिंगभिदाभिमानाः - अनेक मूर्तिभेदांचा अभिमान धरणारे - एते - हे - ब्रह्मादयः - ब्रह्मदेव आदिकरून - एवं - याप्रमाणे - उपवर्णितनिर्विशेषं - वर्णिले आहे भेदरहित स्वरूप ज्याने अशा - गजेन्द्रं - गजेंद्राजवळ - यदा - जेव्हा - न उपससृपुः - प्राप्त झाले नाहीत - निखिलात्मकत्वात् - सर्वांचा आत्माच असल्यामुळे - अखिलामरमयः - सर्वदेवस्वरूपी - हरिः - श्रीविष्णु - तत्र - तेथे - आविरासीत् - प्रगट झाला.॥३०॥
श्रीशुक म्हणतात - गजेंद्राने नामरूपरहित भगवंतांची स्तुती केली होती. म्हणून वेगवेगळी नावे आणि रूपे यांचे अभिमानी ब्रह्मदेवादि देव त्याचे रक्षण करण्यासाठी आले नाहीत. त्यावेळी सर्वात्मा असल्याकारणाने सर्वदेवस्वरूप भगवान श्रीहरी स्वतः प्रगट झाले. (३०)


तं तद्वदार्तमुपलभ्य जगन्निवासः
     स्तोत्रं निशम्य दिविजैः सह संस्तुवद्‌भिः ।
छन्दोमयेन गरुडेन समुह्यमानः
     चक्रायुधोऽभ्यगमदाशु यतो गजेन्द्रः ॥ ३१ ॥
ते ऐकुनी त्वरित येहि जगन्निवास
    शंखादि अस्त्र करि घेउनि त्या गरुडीं ।
त्या देवताहि गज जैं पिडला तिथे तैं
    आल्या स्तवीत हरिला स्तुतिगीत सर्व ॥ ३१ ॥

जगन्निवासः - श्रीविष्णु - चक्रायुधः - हातात सुदर्शन चक्र घेऊन आलेला - तद्वत् - तशा रीतीने - आर्तं - पीडिलेल्या - तं - त्या गजेंद्राला - उपलभ्य - जाणून - स्तोत्रं - स्तुतीला - निशम्य - श्रवण करून - संस्तुवद्‌भिः - स्तुति करणार्‍या - दितिजैः सह - देवांसह - छंदोमयेन गरुडेन - वेदमय गरुडाने - समुह्यमानः - वाहून आणिला जाणारा असा - यतः - जेथे - गजेन्द्रः (आसीत्) - गजेंद्र होता - आशु - सत्वर - अभ्यगमत् - प्राप्त झाला.॥३१॥
विश्वाचा एकमेव आधार असलेल्या भगवंतांनी, गजेंद्र संकटात असल्यामुळे स्तुती करीत आहे, असे पाहून चक्रधारी भगवान, वेदमय गरुडावर आरूढ होऊन अत्यंत वेगाने जेथे गजेंद्र होता, तेथे आले. तेव्हा त्यांची स्तुती करीत देवसुद्धा त्यांच्याबरोबर तेथे आले. (३१)


सोऽन्तःसरस्युरुबलेन गृहीत आर्तो
     दृष्ट्वा गरुत्मति हरिं ख उपात्तचक्रम् ।
उत्क्षिप्य साम्बुजकरं गिरमाह कृच्छ्रात्
     नारायणाखिलगुरो भगवन्नमस्ते ॥ ३२ ॥
व्याकूळ तो गज बघे हरि पातला तो
    शुंडेचि कंज खुडुनी त‌इ फेकले ते ।
त्या श्रीहरीवरि नि कष्ट करुन बोले
    नारायणाखिलगुरो तुजला नमस्ते ॥ ३२ ॥

अंतःसरसि - सरोवरामध्ये - उरुबलेन (नक्रेण) - बलाढय अशा नक्राने - गृहीतः - धरलेला - आर्तः - पीडिलेला - सः - तो गजेंद्र - खे - आकाशात - गरुत्मति (आसीनं) - गरुडावर बसलेल्या - उपात्तचक्रं - सुदर्शन चक्र धारण केलेल्या - हरिं - श्रीविष्णुला - दृष्ट्‌वा - पाहून - साम्बुजकरं - कमळयुक्त सोंडेला - उत्क्षिप्य - वर उचलून - कृच्छ्रात् - मोठया कष्टाने - नारायण - हे नारायणा - अखिलगुरो - हे जगद्‌गुरो - भगवन् - हे भगवंता - ते - तुला - नमः - नमस्कार असो. - (इति) गिरं - अशी वाणी - आह - उच्चारिता झाला.॥३२॥
शक्तिमान मगराने सरोवरात गजेंद्राला पकडून ठेवले होते, त्यामुळे तो कासावीस झाला होता. गरुडावर स्वार होऊन, हातात चक्र घेतलेल्या भगवान श्रीहरींना आकाशात पाहून त्याने आपल्या सोंडेने कमळ त्यांना समर्पण करून कसेबसे तो म्हणाला, "हे नारायणा, जगद्‌गुरो, भगवन्, आपणास नमस्कार असो." (३२)


तं वीक्ष्य पीडितमजः सहसावतीर्य
     सग्राहमाशु सरसः कृपयोज्जहार ।
ग्राहाद्विपाटितमुखादरिणा गजेन्द्रं
     संपश्यतां हरिरमूमुचदुस्त्रियाणाम् ॥ ३३ ॥
इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां
अष्टमस्कन्धे गजेन्द्रमोक्षणे तृतीयोऽध्यायः ॥ ३ ॥
नारायणे बघितला गज संकटी नी
    सोडोनिया गरुड तो बहु धावले तै ।
नक्रासहीतचि गजा वर काढिले नी
    चक्रेचि नक्र वधिला गज मुक्त केला ।
त्या देवता बघुनिया तयि मुग्ध झाल्या
    सर्वां समक्ष हरिने चिरलाचि नक्र ॥ ३३ ॥
॥ इति श्रीमद्‌भागवता महापुराणी पारमहंसी संहिता ॥
॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रुपांतर ॥ तिसरा अध्याय हा ॥ ८ ॥ ३ ॥ हरिःॐ तत्सत्‌ श्री कृष्णार्पणमस्तु ॥

अजः - जन्मरहित श्रीविष्णु - तं - त्या गजेंद्राला - पीडितं - पीडिलेला - वीक्ष्य - पाहून - सहसा - त्वरेने - अवतीर्य - खाली उतरून - कृपया - दयेने - सग्राहं - नक्रासह - सरसः - सरोवरातून - आशु - लवकर - उज्जहार - वर काढिता झाला - हरिः - श्रीविष्णु - उस्रियाणां संपश्यतां - देव पाहत असताना - अरिणा - सुदर्शनचक्राने - विपाटितमुखात् - ज्याचे तोंड चिरून टाकिले आहे अशा - ग्राहात् - नक्रापासून - गजेंद्रं - गजेंद्राला - अमूमुचत् - सोडविता झाला.॥३३॥
गजेंद्राला अत्यंत पीडा होत आहे असे जेव्हा भगवंतांनी पाहिले, तेव्हा त्यांनी गरुडावरून एकदम खाली उडी घेतली आणि करुणा येऊन गजेंद्राबरोबर मगरालाही अत्यंत वेगाने सरोवराच्या बाहेर काढले. नंतर सर्व देवांच्या देखतच भगवान श्रीहरींनी चक्राने मगराचे तोंड फाडले आणि गजेंद्राला सोडविले. (३३)


स्कंध आठवा - अध्याय तिसरा समाप्त

GO TOP