श्रीमद् भागवत पुराण
सप्तमः स्कन्धः
द्वादशोऽध्यायः

ब्रह्मचर्यवानप्रस्थाश्रमयोर्धर्माः -

ब्रह्मचर्य आणि वानप्रस्थ आश्रमांचे नियम -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


नारद उवाच -
ब्रह्मचारी गुरुकुले वसन्दान्तो गुरोर्हितम् ।
आचरन् दासवत् नीचो गुरौ सुदृढसौहृदः ॥ १ ॥
श्रीनारदजी म्हणाले -
(अनुष्टुप्‌)
ब्रह्मचर्ये गुरूकूली संयमी राहणे तसे ।
आचार दासवत्‌ व्हावा सुहृदो गुरूशी सदा ॥१॥

ब्रह्मचारी - वेद शिकणार्‍याने - गुरोः कुले - गुरूच्या घरी - वसन् - राहत - दांतः (भूत्वा) - इंद्रियनिग्रही होऊन - दासवत् - चाकराप्रमाणे - गुरोः हितं आचरन् - गुरूचे हित करीत - नीचः - नम्रतेने वागत - गुरौसुदृढसौहृदः (स्यात्) - गुरूच्या ठिकाणी अत्यंत दृढ आहे प्रेम ज्याचे असे असावे. ॥ १ ॥
नारद म्हणतात – गुरुकुलात निवास करणार्‍या ब्रह्मचार्‍याने आपली इंद्रिये स्वाधीन ठेऊन दासाप्रमाणे आपल्याला लहान समजावे, गुरुदेवांच्या चरणी दृढ प्रेम ठेवावे आणि त्यांच्या हिताचे असेल तेच कार्य करावे. (१)


सायं प्रातरुपासीत गुर्वग्न्यर्कसुरोत्तमान् ।
सन्ध्ये उभे च यतवाग् जपन्ब्रह्म समाहितः ॥ २ ॥
सकाळ सांजवेळेला अग्नी सूर्य गुरूस नी ।
दैवताते उपासावे मौने गायत्रि जापणे ॥२॥

सायंप्रातः - सांजसकाळ - गुर्वग्न्यर्कसुरोत्तमान् उपासीता - गुरु, अग्नि, सूर्य व श्रेष्ठतर देव यांची उपासना करावी - समाहितः (भूत्वा) - आणि एकाग्रचित्त होऊन - ब्रह्म जपन् - गायत्रीचा जप करीत - उभै संध्ये यतवाक् (स्यात्) - दोन्ही संध्यांच्या समयी मौन धारण करावे. ॥ २ ॥
सायंकाळी आणि प्रात:काळी गुरू, अग्नी, सूर्य आणि श्रेष्ठ देवतांची उपासना करावी आणि मौन राहून एकाग्रतेने गायत्रीचा जप करीत दोन्ही वेळेची संध्या करावी. (२)


छन्दांस्यधीयीत गुरोः आहूतश्चेत् सुयन्त्रितः ।
उपक्रमेऽवसाने च चरणौ शिरसा नमेत् ॥ ३ ॥
गुरू आज्ञापिती तेंव्हा नेमाने वेद वाचिणे ।
पाठारंभी तसे अंती डोके टेकून वंदिणे ॥३॥

गुरोः आहूतः चेत् - गुरुंनी बोलाविले म्हणजे - सुयंत्रितः - व्यवस्थित रीतीने - छंदांसि अधीयीत - वेदाध्ययन करावे - उपक्रमे अवसाने च - आणि प्रारंभी व शेवटी - (गुरोः) चरणौ शिरसा नमेत् - गुरुंच्या चरणावर मस्तक ठेऊन वंदन करावे. ॥ ३ ॥
गुरुजी जेव्हा बोलावतील, तेव्हा संपूर्ण शिस्त पाळून त्यांच्याकडून वेदांचे अध्ययन करावे. पाठाच्या प्रारंभी आणि शेवटी त्यांच्या चरणांवर डोके टेकवून नमस्कार करावा. (३)


मेखलाजिनवासांसि जटादण्डकमण्डलून् ।
बिभृयाद् उपवीतं च दर्भपाणिर्यथोदितम् ॥ ४ ॥
मेखला मृगचर्मो नी जटा वस्त्र कमंडलू ।
यज्ञोपवित नी दंड करी कुशहि धारिणे ॥४॥

दर्भपाणिः - ज्याच्या हातात दर्भ आहे अशा त्याने - मेखलाजिनवासांसि - कटिसूत्र, मृगचर्मे व वस्त्रे - जटादंडकमंडलून् - जटा, दंड व कमंडलु - यथोदितं उपवीतं च - आणि शास्त्रांत सांगितल्याप्रमाणे यज्ञोपवीत - बिभृयात् - धारण करावे. ॥ ४ ॥
शास्त्राच्या आज्ञेनुसार मेखला, मृगचर्म, वस्त्र, जटा, दंड, कमंडलू, यज्ञोपवित आणि हातामध्ये दर्भपवित्र धारण करावे. (४)


सायं प्रातश्चरेद्‍भैक्ष्यं गुरवे तन्निवेदयेत् ।
भुञ्जीत यद्यनुज्ञातो नो चेदुपवसेत् क्वचित् ॥ ५ ॥
सकाळ सांजवेळेला भिक्षा मागून आणणे ।
गुरूसी अर्पिणे सर्व अनुज्ञे भक्षिणे पुन्हा ।
अनुज्ञा नसता तेंव्हा करावा उपवास तो ॥५॥

सायंप्रातः भैक्षं चरेत् - सांजसकाळ भिक्षा मागावी - तत् गुरवे निवेदयेत् - ती गुरूला अर्पण करावी - यदि अनुज्ञातः (तर्हि तां) भुञ्जीत - जर गुरुजीने आज्ञा दिली तर ती भक्षण करावी - नो चेत् - नाही तर - क्वचित् उपवसेत् - कधी उपाशी राहावे. ॥ ५ ॥
सायंकाळी आणि प्रात:काळी भिक्षा मागून आणावी आणि ती गुरुजींना समर्पित करावी. त्यांनी अनुज्ञा दिली तर भोजन करावे, नाहीतर उपास करावा. (५)


सुशीलो मितभुग् दक्षः श्रद्दधानो जितेन्द्रियः ।
यावदर्थं व्यवहरेत् स्त्रीषु स्त्रीनिर्जितेषु च ॥ ६ ॥
सुशिलो अल्पची खाणे कार्यामाजी निपूणता ।
श्रद्धा जितेंद्रियी व्हावे स्त्रियांशी अल्प बोलणे ॥६॥

सुशीलः - सुस्वभावी - मितभुक् दक्षः - अल्पाहारी व दक्ष - श्रद्दधानः जितेंद्रियः (सन्) - श्रद्धा ठेवणारा आणि इंद्रियनिग्रह करणारा होत्साता - स्त्रीषु स्त्रीनिर्जितेषु च - स्त्रिया आणि स्त्रियांनी वश केलेले लोक यांच्याशी - यावदर्थं व्यवहरेत् - कामापुरता व्यवहार ठेवावा. ॥ ६ ॥
आपल्या शीलाचे रक्षण करावे. थोडे खावे, आपले काम निपुणतेने करावे, श्रद्धा ठेवावी आणि इंद्रियांना आपल्या ताब्यात ठेवावे. स्त्री आणि स्त्रियांच्या अधीन राहणारे यांच्याशी आवश्यक असेल, तेवढाच व्यवहार करावा. (६)


वर्जयेत्प्रमदागाथां अगृहस्थो बृहद्व्रतः ।
इन्द्रियाणि प्रमाथीनि हरन्त्यपि यतेर्मनः ॥ ७ ॥
स्त्रियांशी गोष्टिपासोनी वेगळे राहणे सदा ।
बलवान्‌ इंद्रिये सर्व मनाला चेतवीत ते ॥७॥

बृहदव्रतः अगृहस्थः - गृहस्थ नाही अशा नैष्ठिक ब्रह्मचर्यव्रत पालन करणार्‍याने - प्रमदागाथां वर्जयेत् - स्त्रियांच्या गोष्टी वर्ज्य कराव्या - प्रमाथीनि इंद्रियाणि - अनावर इंद्रिये - यतेः अपि - संन्याशाचेही - मनः हरंति - मन हरण करितात. ॥ ७ ॥
जो गृहस्थाश्रमी नाही आणि ब्रह्मचारी आहे, त्याने स्त्रियांविषयी चाललेल्या गोष्टींपासून अलिप्त राहावे. इंद्रिये अतिशय बलवान आहेत. प्रयत्‍न करणार्‍यांचे मनसुद्धा ती क्षुब्ध करून त्यांना आपल्याकडे ओढतात. (७)


केशप्रसाधनोन्मर्द स्नपनाभ्यञ्जनादिकम् ।
गुरुस्त्रीभिर्युवतिभिः कारयेन्नात्मनो युवा ॥ ८ ॥
युवती गुरूपत्‍नीच्या हाताने विंचरू नये ।
मालिश उटणे स्नान करें त्यांच्या असू नये ॥८॥

युवा - तरुण पुरुषाने - आत्मनः केशप्रसाधनोन्मर्दस्नपनाभ्यंजनाजदिकं - आपले केश विंचरणे, अंग रगडणे, स्नान व उटी लावणे इत्यादि - युवतिभिः गुरुस्त्रीभिः - गुरूच्या तरुण स्त्रियांकडून - न कारयेत् - करवून घेऊ नये. ॥ ८ ॥
तरुण ब्रह्मचार्‍याने तरुण गुरूपत्‍नीकडून भांग पाडणे, शरीराला मालिश करणे, स्नान घालणे, उटणे लावणे यांसारखी कामे करून घेऊ नयेत. (८)


नन्वग्निः प्रमदा नाम घृतकुम्भसमः पुमान् ।
सुतामपि रहो जह्याद् अन्यदा यावदर्थकृत् ॥ ९ ॥
अग्नीच्या परि ज्या स्त्रीया कन्याही असली जरी ।
एकांती तरि ना राहो कार्याकार्यीच बोलणे ॥९॥

ननु प्रमदा नाम अग्निः (अस्ति) - खरोखर स्त्री म्हणजे अग्नि होय - पुमान् च घृतकुंभसमः (अस्ति) - आणि पुरुष तुपाच्या घडयासारखा होय - सुतां अपि - कन्येलाही - रहः जह्यात् - एकांती टाळावे - अन्यदा यावदर्थकृत् (भवेत्) - इतर वेळीही कामापुरता व्यवहार ठेवणारा असावे. ॥ ९ ॥
स्त्रिया अग्नीप्रमाणे तर पुरुष तुपाच्या घड्याप्रमाणे होत. आपल्या कन्येबरोबरसुद्धा एकांतात राहू नये. इतर वेळी सुद्धा जरुरीपुरतेच तिच्याजवळ असावे. (९)


कल्पयित्वाऽऽत्मना यावद् आभासमिदमीश्वरः ।
द्वैतं तावन्न विरमेत् ततो ह्यस्य विपर्ययः ॥ १० ॥
साक्षात्काराविना केंव्हा द्वैत ते का मिटे कधी ।
संसर्गी राहतो तेंव्हा भोग्य बुद्धीच जन्मते ॥१०॥

आत्मना इदं - आत्मज्ञानाने हे सगळे - आभासं कल्पयित्वा - केवळ भ्रममूलक आहे असे समजून घेऊन - यावत् ईश्वरः न भवेत् - जोपर्यंत पुरुष स्वतंत्र होणार नाही - तावत् द्वैतं न विरमेत् - तोपर्यंत द्वैतबुद्धि थांबणार नाही - तत् हि - आणि त्या द्वैतापासून खरोखर - अस्य विपर्ययः (भवति) - ह्या जीवाला उलट बुद्धि होते. ॥ १० ॥
जोपर्यंत हा जीव आत्मसाक्षात्काराने हा देह आणि इंद्रिये केवळ आभास आहेत असा निश्चय करून स्वतंत्र होत नाही, तोपर्यंत "हा पुरुष आणि ही स्त्री" हे द्वैत संपत नाही. तोपर्यंत त्याची भोगबुद्धी कायम असते. हे निश्चित. (१०)


एतत् सर्वं गृहस्थस्य समाम्नातं यतेरपि ।
गुरुवृत्तिर्विकल्पेन गृहस्थस्यर्तुगामिनः ॥ ११ ॥
शीलरक्षादि हे तत्व संन्याशासीहि बंधन ।
ऋतूगमन कालात गृहस्थे तेथ ना वसो ॥११॥

एतत् सर्वं समाम्नातं - हे सर्व सांगितलेले - गृहस्थस्य यतेः अपि (युक्तं स्यात्) - गृहस्थाला व यतीलाही लागू आहे - ऋतुगामिनः गृहस्थस्य - ऋतुकाळी स्त्रीशी गमन करणार्‍या गृहस्थाला मात्र - गुरुवृत्तिः विकल्पेन (भवति) - गुरुची सेवा करणे हे विकल्पाचे आहे. ॥ ११ ॥
शील-रक्षणाचे हे सर्व नियम गृहस्थ व संन्यासी या दोघांनाही लागू आहेत. गृहस्थाश्रम्याने गुरुकुलात राहून गुरूची सेवा करणे हे (समयानुसार) ऐच्छिक आहे. कारण पत्‍नीच्या ऋतुकाळी त्याला तेथून घरी जावे लागते. (११)


अञ्जनाभ्यञ्जनोन्मर्द त्र्यवलेखामिषं मधु ।
स्रग् गन्धलेपालंकारान् त्यजेयुर्ये बृहद्व्रताः ॥ १२ ॥
न ल्यावे सुरमा तैल ब्रह्मचर्यव्रती तये ।
उटीही नच लावावी न रेखो चित्र स्त्रीचिये ।
फुलांचे हार नी फूल त्यजिणे चंदनादि ही ।
आभूषणे न ल्यावी नी मांस मद्य नकोच ते ॥१२॥

ये धृतव्रताः (ते) - ज्यानी ब्रह्मचर्यव्रत धारण केले आहे त्यांनी - अञ्जनाभञ्जनोन्मर्दस्‌त्र्यवलेखामिषं - अंगाला व डोक्याला तेल लावणे, रगडणे, स्त्रीचे चित्र पाहणे, मांस - मधु स्रग्गंन्धलेपालंकारान् - मद्य, माळा, उटी व अलंकार ही - त्यजेयुः - वर्ज्य करावी. ॥ १२ ॥
ब्रह्मचार्‍याने काजळ घालणे, तेल लावणे, मालिश करणे, स्त्रियांची चित्रे काढणे, मांस खाणे, मद्य पिणे, फुलांचे हार घालणे, अत्तर, सुवासिक तेल, चंदन लावणे आणि अलंकार घालणे यांचा त्याग करावा. (१२)


उषित्वैवं गुरुकुले द्विजोऽधीत्यावबुध्य च ।
त्रयीं साङ्‌गोपनिषदं यावदर्थं यथाबलम् ॥ १३ ॥
यथाशक्ती द्विजांनी ते वेद वेदांग कल्प नी ।
वाचोनी ज्ञान मेळावे गरजेपरि ते तसे ॥१३॥

एवं गुरुकुले उषित्वा - याप्रमाणे गुरुच्या घरी राहून - द्विजः - ब्राह्मणाने - यावदर्थं यथाबलं - आपल्या अधिकारानुसार यथाशक्ति - सांगोपनिषदं त्रयीं - अंगे व उपनिषदे ह्यांसह तीन्ही वेद - अधीत्य च अवबुध्य - पठण करून व समजावून घेऊन. ॥ १३ ॥
अशा प्रकारे गुरुकुलात वास्तव्य करून द्विजांनी आपली शक्ती आणि आवश्यकता पाहून वेद, त्यांची सहा अंगे आणि उपनिषदे यांचे, अध्ययन करावे. तसेच त्यांचा अर्थ समजून घ्यावा. (१३)


दत्त्वा वरमनुज्ञातो गुरोः कामं यदीश्वरः ।
गृहं वनं वा प्रविशेत् प्रव्रजेत् तत्र वा वसेत् ॥ १४ ॥
सामर्थ्य असता अंती गुरू मागेल ती तया ।
दक्षिणा देउनी त्यांच्या आज्ञेने पुढिलाश्रमी ।
प्रवेश करणे आणि ब्रह्मचर्येच जीवनी ।
राहणे असणे त्यांनी आश्रमी नित्य राहणे ॥१४॥

यदि ईश्वरः (स्यात्) - जर समर्थ असेल तर - गुरोः कामं वरं दत्त्वा - गुरूला इच्छित देणगी देऊन - (तेन) अनुज्ञातः - त्याने आज्ञा दिलेला असा - गृहं वा वनं प्रविशेत् - गृहस्थाश्रमांत शिरावे किंवा वनांत प्रवेश करावा - प्रव्रजेत् - अथवा संन्यास घ्यावा नाही - वा तत्र वसेत् - तर त्या ब्रह्मचर्याश्रमांत नैष्ठिक होऊन राहावे. ॥ १४ ॥
तसेच जर सामर्थ्य असेल, तर गुरू मागतील तेवढी दक्षिणा द्यावी. नंतर त्यांच्या आज्ञेने गृहस्थ, वानप्रस्थ किंआ संन्यास आश्रमात प्रवेश करावा किंवा जन्मभर ब्रह्मचर्याचे पालन करीत त्याच आश्रमात राहावे. (१४)


अग्नौ गुरावात्मनि च सर्वभूतेष्वधोक्षजम् ।
भूतैः स्वधामभिः पश्येद् अप्रविष्टं प्रविष्टवत् ॥ १५ ॥
सर्वत्र भरला देव येणे जाणे तया नसे ।
अग्नी गुरू नि आत्म्यात विराजे तो विशेषची ।
म्हणोनी नित्य ती दृष्टी तयात लावणे असे ॥१५॥

अग्नौ गुरौ आत्मनि सर्वभूतेषु च - अग्नि, गुरु, आत्मा व सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी - स्वधामभिः भूतैः - आपल्या आश्रित जीवांसह - अप्रविष्टं अधोक्षजं - वस्तुतः प्रविष्ट नसलेल्या इंद्रियांना अगोचर अशा प्रभूला - प्रविष्टवत् पश्येत् - प्रविष्ट झाल्याप्रमाणे पाहावे. ॥ १५ ॥
जरी भगवंत स्वाभाविकपणे सर्व ठिकाणी व्यापून असल्यामुळे त्यांचे येणेजाणे असू शकत नाही, तरीसुद्धा अग्नी, गुरू, आत्मा आणि सर्व प्राण्यांमध्ये स्वत:च्या अंशभूत जीवरूपाने ते प्रविष्ट आहेत, असे पाहावे. (१५)


एवं विधो ब्रह्मचारी वानप्रस्थो यतिर्गृही ।
चरन्विदितविज्ञानः परं ब्रह्माधिगच्छति ॥ १६ ॥
या परी ब्रह्मचारी नी वानप्रस्थी यती गृही ।
विज्ञानपूर्ण होवोनी परब्रह्मात डुंबणे ॥१६॥

एवंविधः चरन् - याप्रमाणे आचरण करणारा - ब्रह्मचारी गृही वानप्रस्थः यतिः (वा) - ब्रह्मचारी, गृहस्थाश्रमी, वानप्रस्थ अथवा संन्यासी - विदितविज्ञानः - आनुभविक ज्ञानाने संपन्न असा - परं ब्रह्म - परब्रह्मरूपाला - अघिगच्छति - प्राप्त होतो. ॥ १६ ॥
अशा प्रकारे आचरण करणारा ब्रह्मचारी, वानप्रस्थ, संन्यासी किंवा गृहस्थ विज्ञानसंपन्न होऊन परब्रह्मतत्वाचा अनुभव घेतो. (१६)


वानप्रस्थस्य वक्ष्यामि नियमान् मुनिसम्मतान् ।
यानास्थाय मुनिर्गच्छेद् ऋषिलोकमुहाञ्जसा ॥ १७ ॥
वानप्रस्थाश्रमी यांचे आता तत्त्वासि सांगतो ।
ऋषींचे मत ते ऐसे महर्लोक यये मिळे ॥१७॥

वानप्रस्थस्य - वानप्रस्थाच्या - मुनिसंमतान् नियमान् - मुनींना मान्य अशा नियमांना - वक्ष्यमि - मी सांगतो - यान् अतिष्ठन् मुनिः - जे आचरणारा मुनि - इह - या लोकी - अञ्जसा - अनायासे - ऋषिलोकं गच्छेत् - ऋषिलोकाला जातो. ॥ १७ ॥
आता मी ऋषींच्या मतानुसार वानप्रस्थ आश्रमाचे नियम सांगतो. यांचे आचरण केल्याने वानप्रस्थाश्रम्याला अनायासेच ऋषींचे लोक जे महर्लोक त्यांची प्राप्ती होते. (१७)


न कृष्टपच्यमश्नीयाद् अकृष्टं चाप्यकालतः ।
अग्निपक्वमथामं वा अर्कपक्वमुताहरेत् ॥ १८ ॥
पेरता धान्य जे येते तयांनी भक्षु ते नये ।
कच्चे नी भट्टीचे अन्न कदापी नच भक्षिणे ।
सौरऊर्जेमुळे पक्व फळ मूळचि भक्षिणे ॥१८॥

कृष्टपच्यं - नांगरलेल्या भूमीत पिकणारे - अकृष्टं च अपि अकालतः - आणि न नांगरलेल्या भूमीत पिकणारेही अयोग्य काळी - न अश्नीयात् - खाऊ नये - उत अग्नीपक्वं - तर एक अग्नीने पक्व झालेले - अथ आमं - अथवा कच्चे - वा अर्कपक्वं - अथवा उन्हाने पिकलेले - आहरेत् - भक्षण करावे. ॥ १८ ॥
वानप्रस्थ आश्रमात असणार्‍याने नांगरलेल्या जमिनीतून उत्पन्न होणारे धान्य खाऊ नये. न नांगरलेल्या जमिनीतील धान्यसुद्धा अयोग्य वेळी पक्व झाले असेल तर खाऊ नये. अग्नीवर शिजविलेले अथवा कच्चे अन्नही खाऊ नये. फक्त सूर्याच्या उष्णतेने पिकलेली कंदमुळे, फळे इत्यादी सेवन करावी. (१८)


वन्यैश्चरुपुरोडाशान् निर्वपेत्कालचोदितान् ।
लब्धे नवे नवेऽन्नाद्ये पुराणं च परित्यजेत् ॥ १९ ॥
वनी जे उगवे धान्य त्याचे चरू यजात ।
त्याचाच तो पुरोडाश नित्य नैमित्तिकात हो ।
पहिला भार तो येता फल धान्यादिकास तो ।
एकत्र करूनी सर्व त्यजावा नच भक्षिणे ॥१९॥

वन्यैः - वनातील धान्यांनी - कालचोदितान् चरुपुरोडाशान् - ज्या ज्या काळी जे विहित असतील ते चरुपुरोडाश - निर्वपेत् - हवन करावे - नवे नवे अन्नाद्ये लब्धे - नवीन नवीन अन्नादिक मिळाली असता - पुराणं तु परित्यजेत् - मग जुने टाकावे. ॥ १९ ॥
जंगलात आपोआप उगवलेल्या धान्याचे नित्य-नैमित्तिक कर्मांचे वेळी चरू पुरोडाश करून हवन करावे. जेव्हा नवीन धान्य वगैरे मिळू लगेल, तेव्हा अगोदर साठविलेले धान्य टाकून द्यावे. (१९)


अग्न्यर्थमेव शरणं उटजं वाद्रिकन्दरम् ।
श्रयेत हिमवाय्वग्नि वर्षार्कातपषाट् स्वयम् ॥ २० ॥
अग्निहोत्रार्थ रक्षाया अग्नी साठीच ते घर ।
आश्रयार्थ असो गुंफा किंवा पर्णकुटी बरी ।
शीत वायू तशी वर्षा अग्नि घामास साहिने ॥२०॥

स्वयं हिम वाय्वग्निवर्षार्कातपषाट् - स्वतः थंडी, वारा, अग्नि, पाऊस, ऊन्ह सोसणारा होत्साता - अग्न्यर्थं एव - अग्निसंरक्षणाकरिताच - शरणं उटजं वा अग्निकंदरां - घर, झोपडी अथवा पर्वताची गुहा - श्रयेत - स्वीकारावी. ॥ २० ॥
अग्निहोत्राच्या अग्नीचे रक्षण करण्यासाठीच घर, पर्णकुटी किंवा गुहेचा आश्रय घ्यावा. स्वत: थंडी, वारा, अग्नी, पाऊस आणि सूर्याचे ऊन सहन करावे. (२०)


केशरोमनखश्मश्रु मलानि जटिलो दधत् ।
कमण्डल्वजिने दण्ड वल्कलाग्निपरिच्छदान् ॥ २१ ॥
दाढी मिशा जटा राखो जटाही नच त्या धुणे ।
कंमडलू मृगचर्म वल्कले आणि वस्त्र नी ।
सामग्री अग्निहोत्राची संग्रही ठेविणे असे ॥२१॥

केशरोमनखश्मश्रुमलानि - मस्तकावरील व इतर ठिकाणचे केस, नखे, दाढी, मिशा व मळ - कमंडल्वजिने - कमंडलु व मृगचर्म - दंडवल्कलाग्निपरिच्छदान् - दंड, वल्कले व अग्निसाहित्य - दधत् जटिलः - धारण करणार्‍या जटाधारी ॥ २१ ॥
डोक्यावर जटा धारण कराव्यात आणि केस, नखे, दाढी-मिशा काढू नयेत. तसेच शरीरावरील मळही काढू नये. कमंडलू, मृगचर्म, दंड, वल्कले आणि अग्निहोत्राची सामग्री आपल्याजवळ ठेवावी. (२१)


चरेद् वने द्वादशाब्दान् अष्टौ वा चतुरो मुनिः ।
द्वावेकं वा यथा बुद्धिः न विपद्येत कृच्छ्रतः ॥ २२ ॥
विचारी पुरूषे बारा आठ चार द्वि वर्ष वा ।
एक वर्ष व्रती व्हाव न व्हावी क्लेशबुद्धि ती ॥२२॥

मुनिः - मुनीने - वने द्वादश अब्दान् - अरण्यात बारा वर्षे - अष्टौ वा चतुरः - आठ किंवा चार - द्वौ वा एकं - दोन किंवा एक वर्ष - यथा - जेणेकरून - बुद्धिः कच्छ्रतः न विपद्येत (तथा) - तपश्चर्येच्या कष्टानी बुद्धि नष्ट होणार नाही तसे - चरेत् - राहावे. ॥ २२ ॥
विवेकी मुनीने बारा, आठ, चार, दोन किंवा एक वर्षपर्यंत वानप्रस्थ आश्रमाच्या नियमांचे पालन करावे. अधिक काळ तपश्चर्या केल्यामुळे बुद्धी विकल होणार नाही, याचे भान राखावे. (२२)


यदाकल्पः स्वक्रियायां व्याधिभिर्जरयाथवा ।
आन्वीक्षिक्यां वा विद्यायां कुर्यादनशनादिकम् ॥ २३ ॥
वानप्रस्थी व्रती याला जरा व्याधी असेल तै ।
उपवासव्रता घ्यावे सामर्थ्य नसल्या वरी ॥२३॥

यदा - जेव्हा - व्याधिभिः अथवा जरया - रोगाने किंवा वृद्धपणामुळे - स्वक्रियायां - स्वकर्म करण्याविषयी - आन्वीक्षिक्यां विद्यायां वा - किंवा ज्ञानाभ्यास करण्याविषयी - अकल्पः (स्यात्) - असमर्थ होईल - अनशनादिकं कुर्यात् - उपोषणादिक करावे. ॥ २३ ॥
वानप्रस्थ पुरुष आजार किंवा म्हातारपण यांमुळे आपली कर्मे पूर्ण करू शकत नसेल आणि वेदांत-विचार करण्याचे सामर्थ्यही त्याच्यामध्ये नसेल तर त्याने अनशनादी व्रत करावे. (२३)


आत्मन्यग्नीन् समारोप्य सन्न्यस्याहं ममात्मताम् ।
कारणेषु न्यसेत् सम्यक् संघातं तु यथार्हतः ॥ २४ ॥
त्याने अनशनापूर्वी आहवनीय अग्निला ।
आत्म्याशी करणे लीन मीपणा सर्व त्यागिणे ॥२४॥

आत्मनि अग्नीन् समारोप्य - आमच्या ठिकाणी अग्नीचा समारोप करून - अहंममात्मतां संन्यस्य - मी व माझे ह्या अहंकाराला सोडून - संघातं तु - देहरूपी संघाताला तर - कारणेषु यथार्हतः सम्यक् न्यसेत् - कारणांच्या ठिकाणी योग्य रीतीने नीटपणे ठेवावे. ॥ २४ ॥
अनशन सुरू करण्यापूर्वीच त्याने आपल्या आहवनीय इत्यादी अग्नींना आपल्या आत्म्यामध्ये विलीन करून घ्यावे. ’मी माझेपणा’ चा त्याग करून शरीराला त्याच्या कारणभूत तत्त्वांमध्ये योग्य तर्‍हेने विलीन करावे. (२४)


खे खानि वायौ निश्वासान् तजःसूष्माणमात्मवान् ।
अप्स्वसृक्श्लेष्मपूयानि क्षितौ शेषं यथोद्‍भवम् ॥ २५ ॥
छिद्राकाशास आकाशी प्राणाला वायुच्या मधे ।
उष्णता अग्निच्या मध्ये जलीय तत्त्व त्या जलीं ।
अस्थ्यादी पृथीवीमध्ये जितेंद्रे लीन हे करो ॥२५॥

आत्मवान् - ज्ञानी पुरुषाने - खानि खे - इंद्रियांची छीद्रे आकाशात - निःश्वासान् वायौ - श्वास वायूत - उष्माणं तेजसि - उष्णता तेजात - असृक्श्लेष्मपूयानि अप्सु - रक्त, कफ व पू उदकात - शेषं यथोद्भवं क्षितौ (न्यसेत्) - इतर राहिलेले जेथून उत्पन्न झाले त्या पृथ्वीत मिळवावे. ॥ २५ ॥
जितेंद्रिय पुरुषाने आपल्या शरीरातील आकाशाला आकाशात, प्राणांना वायूमध्ये, उष्णतेला अग्नीमध्ये, रक्त, कफ, पू या पाण्याच्या तत्त्वांना पाण्यामध्ये आणि हाडे इत्यादी कठीण वस्तूंना पृथ्वीमध्ये लीन करावे. (२५)


वाचमग्नौ सवक्तव्यां इन्द्रे शिल्पं करावपि ।
पदानि गत्या वयसि रत्योपस्थं प्रजापतौ ॥ २६ ॥
स्वरादी अग्निच्या मध्ये इंद्राशी कर कौशल ।
विष्णू गति ती सर्व उपस्था त्या प्रजापतीं ॥२६॥

सवक्तव्यां वाचं अग्नौ - बोलण्याच्या विषयांसह वाणीला अग्नीमध्ये - गत्या पदानि वयसि - गतिसह पायांना विष्णुदेवतेत - रत्या उपस्थं प्रजापतौ (न्यसेत्) - रतीसह उपस्थ इंद्रियाला प्रजापतिदेवतेत लीन करावे. ॥ २६ ॥
हे राजा, याचप्रमाणे वाणी आणि भाषण यांना त्यांची अधिष्ठात्री देवता अग्नीमध्ये, हात आणि कलाकौशल्याला इंद्रामध्ये, पाय आणि त्यांच्या गतीला कालस्वरूप विष्णूमध्ये, रती आणि उपस्थ इंद्रियाला प्रजापतीमध्ये, (२६)


मृत्यौ पायुं विसर्गं च यथास्थानं विनिर्दिशेत् ।
दिक्षु श्रोत्रं सनादेन स्पर्शेनाध्यात्मनि त्वचम् ॥ २७ ॥
मळाला मृत्युशी लीन करावे व्रतिने तदा ।
दिशात श्रोत्रिचे ज्ञान वायूत स्पर्श नी त्वचा ॥२७॥

पायुं विसर्गं च मृत्यौ - गुदेंद्रिय आणि मलविसर्ग ह्यांना मृत्यूदेवतेत - सनादेन श्रोत्रं दिक्षु - नादविषयांसह श्रोत्रेंद्रिय दिशांमध्ये - त्वचं स्पर्शं च अध्यात्मनि - आणि त्वचा व स्पर्श वायूंत - (एवं) - याप्रमाणे - यथास्थानं विनिर्दिशेत् - ज्याचा त्याचा ज्याच्या त्याच्या मूळ कारणात लय करावा. ॥ २७ ॥
पायू आणि मलोत्सर्गाला त्यांच्या आश्रयानुसार मृत्यूमध्ये लीन करावे. कान आणि शब्दाला दिशांमध्ये, स्पर्श आणि त्वचेला वायूमध्ये, (२७)


रूपाणि चक्षुषा राजन् ज्योतिष्यभिनिवेशयेत् ।
अप्सु प्रचेतसा जिह्वां घ्रेयैर्घ्राणं क्षितौ न्यसेत् ॥ २८ ॥
रसनादी जळीं मेळो घ्राणेंद्रिय धरेसि ते ।
गंधाच्या सह अर्पावे वानप्रस्थी व्रती तये ॥२८॥

राजन् - हे राजा - चक्षुषा रूपाणि ज्योतिषि - नेत्रासह रूपे तेजात - अभिनिवेशयेत् - प्रविष्ट करावी - प्रचेतसा जिह्वां अप्सु (न्यसेत्) - वरुणासह जिह्वेला उदकात लीन करावे - घ्रेयैः घ्राणं क्षितौ न्यसेत् - गंधांसह घ्राणेंद्रिय पृथ्वीत लीन करावे. ॥ २८ ॥
डोळ्यांसहित रूपाला ज्योतीमध्ये, रसांसहित रसनेंद्रियाला पाण्यामध्ये आणि गंधासह नाकाला पृथ्वीमध्ये विलीन करावे. (२८)


मनो मनोरथैश्चन्द्रे बुद्धिं बोध्यैः कवौ परे ।
कर्माण्यध्यात्मना रुद्रे यदहं ममताक्रिया ।
सत्त्वेन चित्तं क्षेत्रज्ञे गुणैर्वैकारिकं परे ॥ २९ ॥
मनोरथा मनिचंद्री बुद्धी ब्रह्मात स्थापिणे ।
अहंकारासह कर्म रूद्री लीन तये करो ।
या परी चेतना-चित्ता क्षेत्रज्ञे जीव तो पुन्हा ।
परब्रह्मात लावावा विकारी जीवतो असा ॥२९॥

मनोरथैः मनः चंद्रे - मनोरथांसह मनाला चंद्रांत - बोध्यैः बुद्धिं - ज्ञेयविषयांसह बुद्धीला - परे कवौ - श्रेष्ठ कवि जो ब्रह्मदेव त्यामध्ये - यत् अहं ममता क्रिया - ज्यापासून अहंता ममता चालतात अशी - अध्यात्मना कर्माणि रुद्र - अहंकारासह कर्मे रुद्रदेवतेत मिळवावी - सत्त्वेन चित्तं क्षेत्रज्ञे - चेतनेसुद्धा चित्तक्षेत्रात - गुणैः वैकारिकं परे (न्यसेत्) - गुणांसह अहंकाराला परब्रह्मात लीन करावे. ॥ २९ ॥
मनोरथासह मनाला चंद्रामध्ये, जाणण्याजोग्या पदार्थांसह बुद्धीला ब्रह्मदेवामध्ये, तसेच अहंता आणि ममतारूप क्रिया करणार्‍या अहंकाराला त्याच्या कर्मांसह रुद्रामध्ये विलीन करावे. याचप्रमाणे चेतनेसहित चित्ताला क्षेत्रज्ञामध्ये आणि गुणांमुळे विकारी वाटणार्‍या जीवाला परब्रह्मामध्ये लीन करावे. (२९)


अप्सु क्षितिमपो ज्योतिषि अदो वायौ नभस्यमुम् ।
कूटस्थे तच्च महति तदव्यक्तेऽक्षरे च तत् ॥ ३० ॥
पृथिवीचा जळामध्ये जळाचा अग्निच्या मधे ।
अग्नी वायूत नी वायू आकाशी लीन तो करो ।
अहंकारात आकाश महत्तत्त्वात सर्व हे ।
अव्यक्तात महतत्त्व अव्यक्त परमात्मि ते ॥३०॥

क्षितिं अप्सु - पृथ्वीला उदकात - अपः ज्योतिषि - उदकाला तेजात - अदः वायौ - तेजाला वायूंत - अमुं नभसि - ह्या वायूला आकाशात - तत् कूटस्थे - त्या आकाशाला अहंकारात - तत् च अक्षरे (न्यसेत्) - आणि त्या प्रकृतीला अक्षर अशा परब्रह्मरूपी लीन करावे. ॥ ३० ॥
त्याचबरोबर पृथ्वीला पाण्यात, पाण्याला अग्नीमध्ये, अग्नीला वायूमध्ये, वायूला आकाशात, आकाशाला अहंकारामध्ये, अहंकाराला महत्तत्त्वामध्ये, महत्तत्त्वाला अव्यक्तामध्ये आणि अव्यक्ताला अविनाशी परमात्म्यामध्ये विलीन करावे. (३०)


इत्यक्षरतयाऽऽत्मानं चिन्मात्रमवशेषितम् ।
ज्ञात्वाद्वयोऽथ विरमेद् दग्धयोनिरिवानलः ॥ ३१ ॥
॥ इति श्रीमद्‌भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां सप्तमस्कंधे युधिष्ठिरनारदसंवादे सदाचारनिर्णयो नाम द्वादशोऽध्यायः ॥ १२ ॥
अवशिष्ट असे रूपो आत्मा चिद्‍वस्तु तोचि मी ।
अद्वितीय अशा रूपीं भार तो स्थिर ठेविणे ।
जसा काष्ठाश्रितो अग्नी काष्ठा जाळोनि शांत हो ।
स्वरूपी शांत तै व्हावे साक्षात्कार असा असे ॥३१॥
॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर बारावा अध्याय हा ॥ ७ ॥ १२ ॥
॥ हरिः ॐ तत्सत्‌ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

इति - याप्रमाणे - अवशेषितं चिन्मात्रं आत्मानं - उरलेल्या चैतन्यस्वरूप आत्म्याला - अक्षरतया ज्ञात्वा - नाश न पावणारा असे समजून - अथ - नंतर - अद्वयः सन् - दुजाभाव नसलेला असा होत्साता - दग्धयोनिः अनिलः इव - उत्पत्तिस्थान अशी काष्टे जळून गेलेल्या अग्नीप्रमाणे - विरमेत् - शांत व्हावे. ॥ ३१ ॥
याप्रमाणे अविनाशी परमात्म्याच्या रूपामध्ये शिल्लक राहिलेली जी चिद्वस्तू आहे, तो आत्मा आहे, तो मी आहे, हे जाणून अद्वितीय भावामध्ये स्थिर व्हावे. जसे आपले आश्रय असणारे लाकूड भस्म झाल्यावर अग्नी शांत होऊन आपल्या मूळ रूपात राहतो, तसेच त्यानेसुद्धा राहावे. (३१)


स्कंध सातवा - अध्याय बारावा समाप्त

GO TOP