श्रीमद् भागवत पुराण
तृतीयः स्कन्धः
एकत्रिंशोऽध्यायः

मातुः कुक्षौ प्रविष्टस्य जीवस्य देहप्राप्तिवर्णनं गर्भस्थजीवकृता
भगवत्स्तुतिः,जीवस्य बाल्यादि अवस्था क्लेशवर्णनं च -

मनुष्ययोनी प्राप्त झालेल्या जीवाच्या गतीचे वर्णन -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


श्रीभगवानुवाच -
कर्मणा दैवनेत्रेण जन्तुर्देहोपपत्तये ।
स्त्रियाः प्रविष्ट उदरं पुंसो रेतःकणाश्रयः ॥ १ ॥
भगवान कपिलदेव म्हणाले -
( अनुष्टुप्‌ )
पूर्व कर्मानुसाराने ईशाच्या प्रेरणे मुळे ।
पुरुषवीर्य बीजाने स्त्री देहात प्रवेशतो ॥ १ ॥

जन्तुः - प्राणी - देहोपपत्तये - शरीराच्या प्राप्तीकरिता - दैवनेत्रेण - परमेश्वर आहे प्रेरक ज्याचा अशा - कर्मणा - कर्माच्या योगाने - पुंसः - पुरुषाच्या - रेतःकणाश्रयः - वीर्याच्या कणांचा आश्रय करणारा असा - स्त्रियाः - स्त्रीच्या - उदरम् - उदरात - प्रविष्टः - प्रवेश केलेला असा - भवति - होतो ॥१॥
श्रीभगवान म्हणतात - जीव मनुष्यशरीरात जन्म घेण्यासाठी भगवंतांच्या प्रेरणेने आपल्या पूर्वकर्मांनुसार पुरुषाच्या वीर्यकणाच्या आश्रयाने स्त्रीच्या उदरात प्रवेश करतो. (१)


कललं त्वेकरात्रेण पञ्चरात्रेण बुद्‍बुदम् ।
दशाहेन तु कर्कन्धूः पेश्यण्डं वा ततः परम् ॥ २ ॥
खल तो एक रात्रीत पाच रात्रीत बुड्‌बुडा ।
बोरापरी दहारात्रीं पेश्यंड रुप होतसे ॥ २ ॥

एकरात्रेण - एका रात्रीने - कललम् - वीर्य व रक्त यांनी मिश्रित असे - पञ्चरात्रेण - पाच रात्रींनी - बुद्‌बुदम् - बुडबुडा - दशाहेन - दहा दिवसांनी - तु - तर - कर्कन्धूः - बोरासारखा कठीण गोळा - ततःपरम् - त्याच्यापुढे - पेशी - मासाचा पिंडासारखा आकार - वा - किंवा - अण्डम् - अण्डे - भवति - होते ॥२॥
तेथे वीर्यकण एका रात्रीत स्त्रीच्या रजामध्ये मिसळून एकरूप बनतो. पाच रात्रीत बुडबुडयासारखा होतो. दहा दिवसात बोरासारखा थोडासा कठीण होतो. आणि त्यानंतर मांसपेशी किंवा अंडज प्राण्यांमधील अंडयाच्या रूपात त्याचे रूपांतर होते. (२)


मासेन तु शिरो द्वाभ्यां बाह्वङ्घ्र्याद्यङ्गविग्रहः ।
नखलोमास्थिचर्माणि लिङ्गच्छिद्रोद् भवस्त्रिभिः ॥ ३ ॥
मासात शिर उत्पन्न द्वीमासी हात पाय ते ।
त्रिमासी नख नी रोम अस्थी लिंग नि छिद्रही ॥ ३ ॥

मासेन - एका महिन्याने - तु - तर - शिरः - मस्तक - व्दाभ्याम् - दोन महिन्यांनी - बाह्वंघ्रयाद्यङ्गविग्रहः - हात, पाय इत्यादि अवयवांचा विभाग - त्रिभिः - तीन महिन्यांनी - नखलोमास्थिचर्माणि - नखे, लव, हाडे व कातडी - च - आणि - लिङ्गच्छिद्रोद्धवः - लिङ्गाची व योनीच्छिद्राची उत्पत्ति - भवति - होते ॥३॥
एक महिन्यात त्याला डोके उत्पन्न होते, दोन महिन्यात हात, पाय इत्यादी अवयव तयार होतात आणि तीन महिन्यात नखे, रोम, हाडे, चामडे, उत्सर्जक इंद्रिये तसेच अन्य छिद्रे उत्पन्न होतात. (३)


चतुर्भिर्धातवः सप्त पञ्चभिः क्षुत्तृडुद्‍भवः ।
षड्भिर्जरायुणा वीतः कुक्षौ भ्राम्यति दक्षिणे ॥ ४ ॥
चौमासी सप्तही धातू भूक तृष्णादि पंचमी ।
षण्मासी वेष्ठिला जातो फिरे डाव्या कुशीत तो ॥ ४ ॥

चतुर्भिः - चार महिन्यांनी - सप्त - सात - धातवः - धातु - पञ्चभिः - पाच महिन्यांनी - क्षुत्तृडुद्भवः - भुकेची व तहानेची उत्पत्ति - षड्‌भिः - सहा महिन्यांनी - जरायुणा - गर्भवेष्टनाने - वीतः - वेष्टिलेला असा - दक्षिणे - उजव्या - कुक्षौ - कुशीमध्ये - भ्राम्यति - फिरतो ॥४॥
चार महिन्यात त्यात मांसादी सात धातू उत्पन्न होतात. पाचव्या महिन्यात तहान-भूक लागू लागते आणि सहाव्या महिन्यात पापुद्रयाने लपेटला जाऊन तो उजव्या कुशीत फिरू लागतो. (४)


मातुर्जग्धान्नपानाद्यैः एधद् धातुरसम्मते ।
शेते विण्मूत्रयोर्गर्ते स जन्तुर्जन्तुसम्भवे ॥ ५ ॥
माता जे खातसे अन्न तेणे धातूहि वाढती ।
कृमीं जंतू मल मुत्रीं लोळतो निंद्य स्थानि तो ॥ ५ ॥

मातुः - मातेच्या - जग्धान्नपानाद्यैः - खाल्लेल्या अन्नपान इत्यादिकांच्या योगाने - एधद्धातुः - वाढत आहेत सप्त धातु ज्याच्या असा - सः - तो - जन्तुः - प्राणी - असंमते - संमत नसलेल्या अशा - जन्तुसंभवे - जन्तूंची आहे उत्पत्ति ज्यामध्ये अशा - विण्मूत्रयोः - विष्ठा व मूत्र यांच्या - गर्ते - खळग्यामध्ये - शेते - शयन करितो ॥५॥
त्यावेळी मातेने खाल्लेल्या अन्नपाणी इत्यादीपासून त्याच्या शरीरातील सर्व धातू पुष्ट होऊ लागतात आणि तो कृमिकीटकांचे उत्पत्तिस्थान असलेल्या निकृष्ट मलमूत्राच्या खड्डयात पडून राहातो. (५)


कृमिभिः क्षतसर्वाङ्गः सौकुमार्यात्प्रतिक्षणम् ।
मूर्च्छां आप्नोति उरुक्लेशः तत्रत्यैः क्षुधितैर्मुहुः ॥ ६ ॥
कोवळ्या शरिरा त्याच्या चावती कृमि कीटके ।
क्षणोक्षणीहि क्लेशाने अचेत हो‌उनी पडे ॥ ६ ॥

तत्रत्यैः - तेथे असलेल्या अशा - क्षुधितैः - भुकेलेल्या अशा - कृमिभिः - कृमींनी - मुहुः - वारंवार - क्षतसर्वाङ्गः - टोचलेले आहेत सर्व अवयव ज्याचे असा - सौकुमार्यात् - कोमलपणामुळे - उरुक्लेशः - अतिशय आहेत क्लेश ज्याला असा - सः - तो प्राणी - प्रतिक्षणम् - प्रत्येकक्षणी - मूर्छाम् - मूर्च्छेला - प्राप्नोति - प्राप्त होतो ॥६॥
तो कोमल असतो, म्हणून जेव्हा तेथील भूक लागलेले किडे त्याच्या अंगप्रत्यंगाला टोचे मारू लागतात, तेव्हा अत्यंत क्लेश होऊन तो क्षणोक्षणी मूर्च्छित होतो. (६)


कटुतीक्ष्णोष्णलवण रूक्षाम्लादिभिरुल्बणैः ।
मातृभुक्तैरुपस्पृष्टः सर्वाङ्गोत्थितवेदनः ॥ ७ ॥
तीक्ष्ण खारट नी उष्ण शुष्क आंबट जेवणी ।
माता जे सेविते अन्न तेणे पीडीत होतसे ॥ ७ ॥

मातृभुक्तैः - मातेने भक्षण केलेल्या अशा - उल्बणैः - सहन करण्यास अशक्य अशा - कटुतीक्ष्णोष्णलवणरुक्षाम्लादिभिः - कडू, तिखट, उष्ण, खारट, रुक्ष, आंबट इत्यादि पदार्थांनी - उपस्पृष्टः - स्पर्श केलेला असा ॥७॥
मातेने खाल्लेल्या कडवट, तिखट, गरम, खारट, कोरडे, आंबट इत्यादी उग्र पदार्थांच्या स्पर्शाने त्याच्या सर्व शरीराला पीडा होऊ लागते. (७)


उल्बेन संवृतस्तस्मिन् अन्त्रैश्च बहिरावृतः ।
आस्ते कृत्वा शिरः कुक्षौ भुग्नपृष्ठशिरोधरः ॥ ८ ॥
वेष्टने वेष्टिला ऐसा घेरतो आतड्याही ।
लोळे पोटी वळे आणि कुंडलाकर भासतो ॥ ८ ॥

उल्बेण - गर्भाशयाने - संवृतः - झाकलेला असा - च - आणि - बहिः - बाहेर - अन्त्रैः - आतड्यांनी - आवृतः - वेष्टिलेला असा - सः - तो प्राणी - भुग्नपृष्ठशिरोधरः - कमानदार आणि मस्तकाला धारण करणारा असा - कुक्षौ - कुशीत - शिरः - मस्तक - कृत्वा - करून - तस्मिन् - त्या ठिकाणी - आस्ते - असतो ॥८॥
तो जीव मातेच्या गर्भाशयात पापुद्रयाने झाकलेला आणि आंतडयांनी वेढलेला असतो. त्याचे डोके पोटाकडे आणि पाठ व मान गोलाकार झालेली असते. (८)


अकल्पः स्वाङ्गचेष्टायां शकुन्त इव पञ्जरे ।
तत्र लब्धस्मृतिर्दैवात् कर्म जन्मशतोद्‍भवम् ।
स्मरन् दीर्घमनुच्छ्वासं शर्म किं नाम विन्दते ॥ ९ ॥
पंजरी बंद जै पक्षी तसा तोही पराधिन ।
अदृष्टे स्मरतो पूर्व शेकडो जन्म कर्मही ।
कोंदाटे श्वासही सर्व कैसी शांती तिथे मिळे ॥ ९ ॥

पञ्जरे - पिंजर्‍यात - शकुन्तः - पक्षी - इव - जसा तसा - स्वाङ्गचेष्टायाम् - आपल्या अवयवांच्या हालचालीविषयी - अकल्पः - असमर्थ असा - तत्र - त्या ठिकाणी - दैवात् - पूर्वकर्मामुळे - लब्धस्मृति - उत्पन्न झाले आहे स्मरण ज्याला असा - जन्मशतोद्भवम् - शंभर जन्मात उत्पन्न झालेल्या अशा - कर्म - कर्माला - स्मरन् - स्मरणारा - दीर्घम् - लांब - अनुच्छवासम् - उच्छ्‌वास न होईल अशा रीतीने - स्थितः - असलेला असा - किं नाम - काय बरे - शर्म - सुख - लभते - मिळवितो ॥९॥
पिंजर्‍यात बंद असलेल्या पक्ष्याप्रमाणे तो पराधीन आणि अवयवांची हालचाल करण्यास असमर्थ असतो. यावेळी अदृष्टामुळे त्याला स्मरणशक्ती प्राप्त होते. तेव्हा आपली शेकडो जन्मातील कर्मे आठवून तो बेचैन होतो. श्वास कोंडलेल्या अवस्थेत त्याला कसली शांती मिळणार ? (९)


आरभ्य सप्तमान् मासात् लब्धबोधोऽपि वेपितः ।
नैकत्रास्ते सूतिवातैः विष्ठाभूरिव सोदरः ॥ १० ॥
सप्तमासात उन्मेष पावतो ज्ञानशक्तिचा ।
प्रसूति वायुने हाले विष्ठीं ना स्थिर राहतो ॥ १० ॥

सप्तमात् - सातव्या - मासात् - महिन्यापासून - आरभ्य - आरम्भ करून - लब्धबोधः अपि - प्राप्त झाले आहे ज्ञान ज्याला असा असूनहि - सूतिवातैः - प्रसूतीच्या वायूंनी - वेपितः - कापविलेला असा - सोदरः - एका उदरात जन्म पाविलेल्या अशा - विष्ठाभूः इव - विष्ठेतील कृमीप्रमाणे - एकत्र - एका ठिकाणी - न आस्ते - असत नाही ॥१०॥
सातवा महिना सुरू झाल्यानंतर त्याच्यात ज्ञानशक्तीचा उगम होतो, परंतु प्रसूतिवायूच्या हालचालीमुळे तो त्या पोटात उत्पन्न झालेल्या विष्ठेतील किडयांप्रमाणे एका ठिकाणी स्थिर राहू शकत नाही. (१०)


नाथमान ऋषिर्भीतः सप्तवध्रिः कृताञ्जलिः ।
स्तुवीत तं विक्लवया वाचा येनोदरेऽर्पितः ॥ ११ ॥
बांधिता सप्तधातूंनी भोगिता गर्भवास तो ।
भयाने जोडुनी हात प्रभूची याचना करी ॥ ११ ॥

नाथमानः - पश्चाताप पावलेला - ऋषिः - देह व आत्मा यांच्या स्वरूपाला जाणणारा असा - भीतः - भ्यालेला असा - सप्तवध्रिः - सात आहेत बंधनभूत धातु ज्याला असा - सः - तो प्राणी - कृताञ्चलिः - जोडिलेले आहेत हात ज्याने असा - येन - ज्या परमेश्वराने - उदरे - उदरात - अर्पितः - घातला - तम् - त्या परमेश्वराची - विक्लवया - सद्‌गदित अशा - वाचा - वाणीच्या योगाने - स्तुवीत - स्तुति करितो ॥११॥
तेव्हा सातधातुमय स्थूल शरीराने बांधलेला तो, देह व आत्मा यांना वेगळेपणाने जाणणारा, भयभीत होऊन दीनवाणीने कृपायाचना करीत हात जोडून, ज्याने त्याला मातेच्या गर्भामध्ये टाकले, त्या प्रभूची स्तुती करतो. (११)


जन्तुरुवाच -
तस्योपसन्नमवितुं जगदिच्छयात्त
     नानातनोर्भुवि चलत् चरणारविन्दम् ।
सोऽहं व्रजामि शरणं ह्यकुतोभयं मे
     येनेदृशी गतिरदर्श्यसतोऽनुरूपा ॥ १२ ॥
जीव म्हणतो -
(वसंततिलका )
आहे बहु अधम मी मज योग्य शिक्षा
    केली असेचि प्रभुने बहुरुपि तो तो ।
हे नश्वरी जगत त्या करण्यास रक्षा
    तो भूतळी विचरतो नमि त्या पदा मी ॥ १२ ॥

येन - ज्या परमेश्वराने - ईदृशी - अशा प्रकारची - असतः - दुष्ट अशी - मे - मला - अनुरूपा - योग्य अशी - गतिः - गर्भवासरूप स्थिती - अदर्शि - दाखविली - सः अहम् - तो मी - तस्य - त्या - उपसन्नम् - शरण आलेल्या अशा - जगत् - जगाचे - अवितुम् - रक्षण करण्याच्या - इच्छया - इच्छेने - आत्तनानातनोः - स्वीकारिलेली आहेत अनेक शरीरे ज्याने अशा परमेश्वराच्या - अकुतोभयम् - कोठूनही भय नाही ज्याला अशा - भुवि - पृथ्वीवर - चलच्चरणारविन्दम् - संचार करणार्‍या अशा चरणकमलाला - शरणं व्रजामि - शरण जातो ॥१२॥
जीव म्हणतो - मी मोठाच अधम आहे. भगवंतांनी मला जी ही गती दाखविली, ती योग्यच आहे. ते आपल्याला शरण आलेल्या या नश्वर जगताचे रक्षण करण्यासाठीच अनेक प्रकारची रूपे धारण करतात. म्हणून मीसुद्धा भूतलावर वावरणार्‍या त्यांच्या निर्भय चरणांना शरण आलो आहे. (१२)


यस्त्वत्र बद्ध इव कर्मभिरावृतात्मा
     भूतेन्द्रियाशयमयीमवलम्ब्य मायाम् ।
आस्ते विशुद्धमविकारमखण्डबोधम्
     आतप्यमानहृदयेऽवसितं नमामि ॥ १३ ॥
मातेचिया उदरि इंद्रिय देह माया
    घेवोनि आश्रय इथे बहु पाप पुण्ये ।
बंदिस्त कर्मि पडलो, हृदयी प्रतीत
    होतो अखंड मज तो नमितो तया मी ॥ १३ ॥

यः - जो - तु - तर - अत्र - मातेच्या शरीरात - भूतेंद्रियाशयमयीम् - भूते, इन्द्रिये आणि अन्तःकरण हेच आहे स्वरूप जिचे अशा - मायाम् - मायेचा - अवलम्ब्य - आश्रय करून - कर्मभिः - कर्मांनी - आवृतात्मा - झाकलेले आहे स्वरूप ज्याचे असा - बद्धः इव - बांधलेल्याप्रमाणे - आस्ते - रहातो - सः अहम् - तो मी - अखण्डबोधम् - अखंड आहे ज्ञान ज्याचे अशा - विशुद्धम् - निर्मल अशा - आतप्यमानहृदये - सर्वतोपरि तापल्या जाणार्‍या अशा हृदयात - अवसितम् - निश्चित होणार्‍या अशा - अविकारम् - विकाररहित अशा - त्वाम् - तुला - नमामि - नमस्कार करितो ॥१३॥
जो या मातेच्या उदरात देह, इंद्रिये आणि अंतःकरणरूप मायेचा आश्रय घेऊन पुण्य-पापरूप कर्मांनी आच्छादित राहिल्याकारणाने बद्ध असल्यासारखा वाटतो, तोच मी आपल्या संतप्त हृदयामध्ये स्फुरित होणार्‍या त्या विशुद्ध अविकारी आणि अखंड बोधस्वरूप परमात्म्याला नमस्कार करतो. (१३)


यः पञ्चभूतरचिते रहितः शरीरे
     च्छन्नोऽयथेन्द्रियगुणार्थचिदात्मकोऽहम् ।
तेनाविकुण्ठमहिमानमृषिं तमेनं
     वन्दे परं प्रकृतिपूरुषयोः पुमांसम् ॥ १४ ॥
मी देहहीन परि बद्धचि पंचभूते
    तेणेचि इंद्रिय गुणी अन शब्दभास ।
जाणू शके जरिहि वेष्टित मी महीमा
    वंदी परं प्रकृति-पुरुष त्यानियंत्या ॥ १४ ॥

यः - जी - पञ्चभूतरचिते - पंचमहाभूतांनी निर्मिलेल्या अशा - शरीरे - शरीरात - छन्नः - आच्छादिलेला असा - तेन - त्या शरीराने - रहितः - रहित असा - अस्ति - आहे - सः - तो - अयथेन्द्रियगुणार्थचिदात्मकः - मिथ्याभूत अशी इन्द्रिये, सत्वादिगुण, शब्दादि विषय व चिदाभास ह्यांच्या स्वरूपाचा - अहम् - मी - प्रकृतिपुरुषयोः - प्रकृति व पुरुष यांचा - परम् - नियन्ता अशा - ऋषिम् - सर्वज्ञ अशा - तेन - त्या शरीराने - अविकुण्ठमहिमानम् - लुप्त झाला नाही स्वरूपानंद ज्याचा अशा - तम् एनं पुमांसम् - त्या ह्या पुरुषाला - वन्दे - नमस्कार करितो ॥१४॥
जो शरीरापासून वेगळा असूनही पंचभूतात्मक शरीराने बद्ध दिसतो आणि म्हणून इंद्रिये, गुण, शब्दादी विषय आणि अहंकाररूप असा जाणवतो, तोच मी या शरीरादी आवरणाने ज्याचा महिमा कुंठित झाला नाही, अशा प्रकृती आणि पुरुषाचा श्रेष्ठ नियंता असणार्‍या सर्वज्ञ अशा परमपुरुषाला वंदन करतो. (१४)


यन्माययोरुगुणकर्म निबन्धनेऽस्मिन्
     सांसारिके पथि चरन् तदभिश्रमेण ।
नष्टस्मृतिः पुनरयं प्रवृणीत लोकं
     युक्त्या कया महदनुग्रहमन्तरेण ॥ १५ ॥
मायेमुळेचि स्वरुपी स्मृति नष्ट होते
    सत्वादि गूण अन कर्म ययात बद्ध ।
होतो नि कष्ट उठवी फिरतो सदाचा
    युक्ती नसे हरिकृपे विण रुप पाह्या ॥ १५ ॥

यन्मायया - ज्याच्या मायेच्या योगाने - नष्टस्मृतिः - नष्ट झाली आहे स्मृति ज्याची असा - उरुगुणकर्मनिबन्धने - अनेक सत्त्वादिगुणनिमित्तक जी कर्मे ती आहेत अतिशय बन्धने ज्यामध्ये अशा - अस्मिन् - ह्या - सांसारिके पथि - संसारसंबंधी मार्गामध्ये - तदभिश्रमेण - त्या संसाराच्या क्लेशाच्या योगाने - चरन् - संचार करणारा असा - अयम् - हा - महदनुग्रहम् अन्तरेण - ईश्वराच्या अनुग्रहावाचून - पुनः - पुनः - कया युक्त्या - कोणत्या साधनाच्या योगाने - लोकं प्रवृणीत - स्वरूपानंदाने सेवन करील ॥१५॥
त्याच्याच मायेने आपल्या स्वरूपाची स्मृती नाहीशी झाल्याकारणाने अनेक प्रकारच्या सत्त्वादी गुण आणि कर्माच्या बंधनांनी युक्त अशा या संसारमार्गावर निरनिराळे कष्ट झेलीत जो जीव भटकत राहातो, त्याला त्या परमपुरुष परमात्म्याच्या कृपेविना आणखी कोणत्या मार्गाने आपल्या स्वरूपाचे ज्ञान होऊ शकेल बरे ? (१५)


ज्ञानं यदेतद् अदधात्कतमः स देवः
     त्रैकालिकं स्थिरचरेष्वनुवर्तितांशः ।
तं जीवकर्मपदवीं अनुवर्तमानाः
     तापत्रयोपशमनाय वयं भजेम ॥ १६ ॥
त्रीकालज्ञान मज जे हरि तोचि देइ
    तो अंतरात वसतोच चरांचरांच्या ।
तेणेचि जीव स्वरुपी निज कर्म वर्ते
    शांत्यर्थ ताप भजतो पद श्रीहरीचे ॥ १६ ॥

यत् - जे - एतत् - हे - त्रैकालिकम् - तिन्ही कालात उत्पन्न होणारे असे - ज्ञानम् - ज्ञान - अस्ति - आहे - तत् - ते - तं विना - त्यावाचून - मयि - माझ्या ठिकाणी - कतमः - कोणता पुरुष - अदधात् - उत्पन्न करील - किंतु - परंतु - सः देवः - तो देव - स्थिरचरेषु - स्थावर व जंगम या दोन्हीमध्ये - अनुवर्तितांशः - अन्तर्यामिरूपाने रहात आहे अंश ज्याचा असा - अस्ति - आहे - अतः - म्हणून - जीवकर्मपदवीम् - जीवरूप कर्ममार्गाला - अनुवर्तमानाः - अनुसरणारे असे - वयम् - आम्ही - तापत्रयोशमनाय - त्रिविध तापांच्या शान्तीसाठी - तम् - त्या परमेश्वराला - भजेम - भजतो ॥१६॥
मला जे हे त्रिकालज्ञान झाले आहे, तेसुद्धा त्यांच्याशिवाय आणखी कोणी दिले बरे ? कारण स्थावर-जंगम सर्व प्राण्याच्या अंतर्यामी तेच अंशरूपाने आहेत. म्हणून कर्मजनित जीवरूप धारण करणारे आम्ही त्रिविध तापांच्या शांतीसाठी त्यांचेच भजन करीत आहोत. (१६)


देह्यन्यदेहविवरे जठराग्निनासृग्
     विण्मूत्रकूपपतितो भृशतप्तदेहः ।
इच्छन्नितो विवसितुं गणयन् स्चमासान्
     निर्वास्यते कृपणधीर्भगवन् कदा नु ॥ १७ ॥
मातेचिया उदरि देह मळात न्हातो
    तापे शरीर जठराग्नि रुधीरकूपीं ।
मुक्ति इथून भगवान्‌ मनिं मागतो मी
तेणेचि मास मनिं मोजित मी राहतो ॥ १७ ॥

अन्यदेहविवरे - दुसर्‍याच्या देहाच्या विवरात - असृग्विण्मूत्रकूपपतितः - रक्त, विष्ठा व मूत्र यांच्या विहिरीत पडलेला असा - जठराग्निना - जठराग्नीच्या योगाने - भृशतप्तदेहः - अतिशय संतप्त झाला आहे देह ज्याचा असा - इतः - येथून - विवसितुम् - बाहेर निघण्यासाठी - इच्छन् - इच्छा करणारा असा - स्वमासान् गणयन् - आपल्या महिन्यांना मोजणारा असा - कृपणधीः - दीन झाली आहे बुद्धि ज्याची असा - देही - प्राणी - कदा - केव्हा - नु - अहो - निर्वास्यते - बाहेर जाईल ॥१७॥
हा देहधारी जीव दुसर्‍या देहाच्या पोटातील मल, मूत्र आणि रक्ताच्या कुंडात पडलेला आहे, त्या देहातील जठराग्नीने याचे शरीर पोळत आहे. त्यातून बाहेर पडण्याची इच्छा करणारा हा आपले महिने मोजीत आहे. भगवन, आता या दीन जीवाला येथून आपण केव्हा बाहेर काढणार ? (१७)


येनेदृशीं गतिमसौ दशमास्य ईश
     सङ्ग्राहितः पुरुदयेन भवादृशेन ।
स्वेनैव तुष्यतु कृतेन स दीननाथः
     को नाम तत्प्रति विनाञ्जलिमस्य कुर्यात् ॥ १८ ॥
स्वामी ! दयाळु असमी दशमास मध्ये
    उत्कृष्ट ज्ञान मजला तवची कृपाही ।
संतुष्ट तूं म्हणुनि हा उपकार केला
    बद्धांजलीविण नसे मजपाशी काही ॥ १८ ॥

ईश - हे परमेश्वरा - पुरुदयेन - पुष्कळ आहे दया ज्याला अशा - भवादृशेन - तुझ्यासारखा - येन - ज्याने - दशमास्यः - दहा महिन्यांचा - असौ - हा जीव - ईदृशीं गतिम् - अशा प्रकारच्या ज्ञानाप्रत - संग्राहितः - प्राप्त केला - सः दीननाथः - अनाथांचा त्राता - स्वेन एव - स्वतःच्याच - कृतेन - कृतीने - तुष्यतु - संतुष्ट होवो - अञ्जलिं विना अन्यत् - नमस्कारावाचून दुसरे - अस्य - ह्या परमेश्वराच्या - तत्प्रति - त्या उपकाराबद्दल - कः नाम - कोण बरे - कुर्यात् - करील ॥१८॥
स्वामी, आपण फार दयाळू आहात. आपल्यासारख्या उदार प्रभूनेच या दहा महिन्यांच्या जीवाला असे उत्कृष्ट ज्ञान दिले आहे. दीनबंधो, या आपण केलेल्या उपकारानेच आपण प्रसन्न व्हा; कारण कोणीही आपल्याला हात जोडण्याखेरीज दुसर्‍या कशाने या उपकाराची परतफेड करू शकेल ? (१८)


पश्यत्ययं धिषणया ननु सप्तवध्रिः
     शारीरके दमशरीर्यपरः स्वदेहे ।
यत्सृष्टयाऽऽसं तमहं पुरुषं पुराणं
     पश्ये बहिर्हृदि च चैत्यमिव प्रतीतम् ॥ १९ ॥
संसारि पक्षि पशु ते सुख दुःख घेती
    मी तो तुझ्याचि कृपये शम दम जाणी ।
जी तूचि ही दिधलिसे मज बुद्धि, मी तो
    जाणी समक्ष तुज आत नि बाह्य देवा ॥ १९ ॥

अयम् - हा - अपरः - दुसरा - सप्तवध्रिः - सप्त धातूंच्या बंधनांनी बांधलेला जीव - स्वदेहे - आपल्या शरीरातील - शारीरिके - शरीरसंबन्धी सुखदुःखे - ननु - निश्चयाने - पश्यति - पहातो - अहम् - मी - यत्सृष्टया - ज्याने उत्पन्न केलेल्या - घिषणया - बुद्धीच्या योगाने - दमशरीरी - दम, शम इत्यादि आहेत शरीरामध्ये ज्याच्या असा - आस - झालो - तम् - त्या - पुराणं पुरुषम् - अनादि पुरुषाला - बहिः - बाहेर - च - आणि - हृदि - हृदयात - चैत्यम् - जीवाला - इव - जसा तसा - प्रतीनम् - प्रत्यक्ष झालेला असा - पश्ये - पहातो ॥१९॥
संसारातील हे पशु-पक्षी इत्यादी अन्य जीव तर आपल्या मूढ बुद्धीनुसार आपल्या शरीराला होणार्‍या सुख दुःखांचाच अनुभव घेतात; परंतु मी तर आपल्या कृपेने शम-दमादी साधनसंपन्न शरीराने युक्त आहे, म्हणून आपण दिलेल्या विवेकी बुद्धीने पुराणपुरुषाचा आपल्या शरीराच्या आत-बाहेर अहंकारयुक्त आत्म्याप्रमाणे प्रत्यक्ष अनुभव घेत आहे. (१९)


सोऽहं वसन्नपि विभो बहुदुःखवासं
     गर्भान्न निर्जिगमिषे बहिरन्धकूपे ।
यत्रोपयातमुपसर्पति देवमाया
     मिथ्या मतिर्यदनु संसृतिचक्रमेतत् ॥ २० ॥
गर्भात दुःख गमते बहुही परी त्या
    संसार कूप तम तो नच इच्छितो मी ।
कां की तिथेचि रिघता तव घेरि माया
    होतो अहं नि पडतो भवसागरात ॥ २० ॥

विभो - हे परमेश्वरा - बहुदुःखवासम् - अनेक दुःखांनी युक्त अशा या गर्भवासामध्ये - वसम् अपि - वास करणारा असा असूनही - सः अहम् - तो मी - गर्भात् बहिः - गर्भाच्या बाहेर - न निर्जिगमिषे - निघू इच्छित नाही - यत् - कारण - देवमाया - परमेश्वराची माया - अन्धकूपे - अंधकाराचा खड्डा अशा - यत्र - ज्या संसारामध्ये - उपयातम् - प्राप्त झालेल्या अशा - जीवम् - जीवाच्या - उपसर्पति - जवळ येते - यदनु - जिच्यामागे - मिथ्या मतिः - मिथ्या बुद्धि - च - आणि - एतत् - हे - संसृतिचक्रम् - संसार चक्र - उपसर्पति - प्राप्त होते ॥२०॥
भगवन, अत्यंत दुःखाने भरलेल्या या गर्भाशयात मी मोठया कष्टानेच राहात आहे; तरीसुद्धा यातून बाहेर निघून संसाररूप अंधार्‍या विहिरीत पडण्याची माझी इच्छा नाही. कारण तेथे जाणार्‍या जीवाला आपली माया वेढून टाकते. ज्यामुळे त्याच्या शरीरात अहंबुद्धी निर्माण होते आणि परिणामतः त्याला पुन्हा या संसारचक्रातच पडावे लागते. (२०)


तस्मादहं विगतविक्लव उद्धरिष्य
     आत्मानमाशु तमसः सुहृदाऽऽत्मनैव ।
भूयो यथा व्यसनमेतदनेकरन्ध्रं
     मा मे भविष्यदुपसादितविष्णुपादः ॥ २१ ॥
सोडीन खेद मनिचा हृदयात पाय
    श्री विष्णुचे करिन स्थापित त्याच योगे ।
शीघ्रेचि मी करिन पार भवास आणि
    भीती मुळी नच पुन्हा भवसागाची ॥ २१ ॥

तस्मात् - यास्तव - उपसादितविष्णुपादः - प्राप्त केले आहेत विष्णूचे चरण ज्याने असा - अहम् - मी - विगतविक्लवः - गेले आहे दुःख ज्याचे असा - सुहृदा - साह्यकारी अशा - आत्मनाएव - स्वतःच्याच योगाने - आत्मानम् - स्वतःला - तमसः - अज्ञानातून - आशु - लवकर - उद्धरिष्ये - वर काढीन - यथा - जेणेकरून - भूयः - पुनः - तत् - त्या - अनेकरन्ध्रम् - अनेक आहेत गर्भवासरूप छिद्रे ज्यामध्ये असे - व्यसनम् - दुःख - मे - मला - मा भविष्यत् - होणार नाही ॥२१॥
म्हणून मी व्याकुळता टाकून देऊन हृदयामध्ये भगवान श्रीविष्णूंचे चरण स्थापन करून आपल्या बुद्धीच्या साहाय्याने स्वतःचा अगदी लवकरच या संसारातून उद्धार करून घेईन. ज्यामुळे मला अनेक प्रकारच्या दोषांनी युक्त असे हे संसारदुःख पुन्हा प्राप्त न होवो. (२१)


कपिल उवाच -
(अनुष्टुप्)
एवं कृतमतिर्गर्भे दशमास्यः स्तुवन्नृषिः ।
सद्यः क्षिपत्यवाचीनं प्रसूत्यै सूतिमारुतः ॥ २२ ॥
भगवान्‌ कपिलदेव सांगतात- ( अनुष्टुप्‌ )
माते तो दश मासाचा विवेके गर्भ प्रार्थितो ।
अधोमुख अशा बाळा वायू बाहेर काढितो ॥ २२ ॥

एवम् - याप्रमाणे - कृतमतिः - केला आहे निश्चय ज्याने असा - दशमास्यः - दहा महिन्याचा - ऋषि - ज्ञानयुक्त झालेला जीव - स्तुवन् - स्तुति करणारा असा - गर्भे - गर्भात - यावत् - जोपर्यंत - आस्ते - असतो - तावत् - तितक्यात - सूतिमारुतः - प्रसूतिवायु - अवाचीनम् - खाली मुख असलेल्या अशा - तम् - त्या जीवाला - प्रसूत्यै - प्रसूतीसाठी - सद्यः - तत्काल - क्षिपति - फेकतो ॥२२॥
कपिलदेव म्हणतात- तो दहा महिन्यांचा जीव गर्भातच जेव्हा अशा प्रकारे विवेकसंपन्न होऊन भगवंतांची स्तुती करतो, तेव्हा त्या अधोमुख बालकाला प्रसूतीचे कारण वायू तत्काळ बाहेर येण्यासाठी ढकलून देतो. (२२)


तेनावसृष्टः सहसा कृत्वावाक् शिर आतुरः ।
विनिष्क्रामति कृच्छ्रेण निरुच्छ्वासो हतस्मृतिः ॥ २३ ॥
दाबाने रड ते बाळ कष्टाने जन्म घेतसे ।
रोधितो श्वास नी तेंव्हा पूर्वस्मृती गमावतो ॥ २३ ॥

तेन - त्या प्रसूतीवायूने - अवसृष्टः - खाली फेकलेला असा - आतुरः - व्याकुळ झालेला असा - निरुच्छ्‌वास - उच्छ्‌वासरहित असा - सः - तो जीव - हतस्मृतिः - नष्ट झाली आहे स्मृति ज्याची असा - शिरः - मस्तक - अवाक् - खाली - कृत्वा - करून - कृच्छ्रेण - कष्टाने - सहसा - एकाएकी - विनिष्क्रामति - बाहेर निघतो ॥२३॥
त्याच्या ताबडतोब ढकलण्याने ते बालक अत्यंत व्याकूळ होऊन खाली डोके करून मोठया कष्टाने बाहेर येते. त्यावेळी त्याची श्वासाची गती थांबते आणि त्याची पूर्वस्मृती नष्ट होते. (२३)


पतितो भुव्यसृङ्‌मूत्रे विष्ठाभूरिव चेष्टते ।
रोरूयति गते ज्ञाने विपरीतां गतिं गतः ॥ २४ ॥
वळ्‌वळे रक्तमूत्रात विष्ठेच्या कीटकापरी ।
गर्भीचे ज्ञान नष्टोनी गतीनें रडतो पुन्हा ॥ २४ ॥

भुवि - पृथ्वीवर - पतितः - पडलेला असा - विष्ठाभूः इव - विष्ठेतील किड्यांप्रमाणे - असृङ्मूत्रे - रक्तात व मूत्रात - चेष्टते - वळवळतो - ज्ञाने गते - ज्ञान नष्ट झाल्यामुळे - विपरीतां गतिम् - विरुद्ध गतीला - गतः - प्राप्त झालेला असा - रोरूयति - अतिशय रडतो ॥२४॥
मातेच्या रक्त आणि मूत्रात जमिनीवर पडलेले ते बालक विष्ठेतील किडयाप्रमाणे तडफडते. त्याचे गर्भवासाच्या वेळचे सर्व ज्ञान नष्ट होते आणि ते देहाभिमानरूप अज्ञान-दशा प्राप्त होऊन वारंवार जोरजोराने रडू लागते. (२४)


परच्छन्दं न विदुषा पुष्यमाणो जनेन सः ।
अनभिप्रेतमापन्नः प्रत्याख्यातुमनीश्वरः ॥ २५ ॥
त्याचे ते मन ना कोणा कळते पोषितो तया ।
उलटा घडतो हेतू निषेधा शक्ति कोठली ॥ २५ ॥

परिच्छन्दम् - अभिप्रायाला - न विदुषा - न जाणणार्‍या अशा - जनेन - लोकांकडून - पुष्यमाणः - पोषिला जाणारा असा - सः - तो बालक - अनभिप्रेतम् - अनभिलषित वस्तूला - आपन्नः - प्राप्त झालेला असा - प्रत्याख्यातुम् - प्रतिबंध करण्यासाठी - अनीश्वरः - असमर्थ असा असतो ॥२५॥
नंतर जे लोक त्याचा मनोदय समजू शकत नाहीत, त्यांच्या द्वारा त्याचे पालन-पोषण होते. अशा अवस्थेत त्याला जी प्रतिकूलता प्राप्त होते, तिचा निषेध करण्याची शक्तिसुद्धा त्याच्यात असत नाही. (२५)


शायितोऽशुचिपर्यङ्के जन्तुः स्वेदजदूषिते ।
नेशः कण्डूयनेऽङ्गानां आसनोत्थानचेष्टने ॥ २६ ॥
मळक्या घाण शय्येसी बाळाला टाकिती जिथे ।
स्वेदजो ढेकणादींच्या चाव्याने कष्ट पावतो ॥ २६ ॥

जन्तुस्वेदजदूषिते - स्वेदज प्राण्यांनी दूषित झालेल्या अशा - अशुचिपर्यङ्के - घाणेरड्या अंथरुणावर - शायितः - निजविलेला असा - सः - तो बालक - अङ्गानाम् - अवयवांना - कंडूयने - खाजविण्याविषयी - च - आणि - आसनोत्थानचेष्टने - बसणे, उठणे, हलणे याविषयी - न ईशः - असमर्थ असा असतो ॥२६॥
जेव्हा त्या शिशु-अवस्थेतील जीवाला मळकट बाजेवर झोपविले जाते, जेथे ढेकूण इत्यादी स्वेदज जीव चिकटलेले असतात, तेव्हा त्या शरीराला खाजविणे, उठून बसणे किंवा कुशी बदलण्याचेही सामर्थ्य नसल्याने फार कष्ट होतात. (२६)


तुदन्त्यामत्वचं दंशा मशका मत्कुणादयः ।
रुदन्तं विगतज्ञानं कृमयः कृमिकं यथा ॥ २७ ॥
इत्येवं शैशवं भुक्त्वा दुःखं पौगण्डमेव च ।
अलब्धाभीप्सितोऽज्ञानाद् इद्धमन्युः शुचार्पितः ॥ २८ ॥
कोवळी कातडी त्याची डास ढेकूण तोडिती ।
हारपे गर्भिचे ज्ञान रडणें फक्त ते उरे ॥ २७ ॥
बाल पौगंड दुःखात वाढे तरुण होतसे ।
इच्छिला भोग ना प्राप्त तै क्रोधे दुःख पावतो ॥ २८ ॥

दंशाः - डास - मशकाः - माशा - च - आणि - मत्कुणादयः - ढेकूण इत्यादी प्राणी - विगतज्ञानम् - नष्ट झाले आहे ज्ञान ज्याचे अशा - आमत्वचम् - कोमल आहे त्वचा ज्याची अशा - रुदन्तम् - रडणार्‍या अशा - तम् - त्या बालकाला - यथा - ज्याप्रमाणे - कृमयः - किडे - कृमिकम् - लहान किड्याला - तथा - त्याप्रमाणे - तुदंति - पीडा देतात - इति एवम् - ह्याप्रमाणे - शैशवम् - बाल्यावस्थेतील - च - आणि - एवम् - असेच - पौगण्डम् - आड वयातील - दुःखम् - दुःख - भुक्त्वा - भोगून - अलब्धाभीप्सितः - प्राप्त झाल्या नाहीत इष्ट वस्तु ज्याला असा - शुचा - शोकाने - अर्पितः - व्याकुळ झालेला असा - अज्ञानात् - अज्ञानामुळे - इद्धमन्युः - प्रदीप्त झाला आहे क्रोध ज्याचा असा - भवति - होतो ॥२७-२८॥
त्याची त्वचा अतिशय कोमल असते. त्याला डास, चिलटे, आणि ढेकूण असे चावतात की जसे मोठे किडे लहान किडयाला (चावतात). अशा वेळी त्याचे गर्भावस्थेतील सर्व ज्ञान नाहीसे होते आणि ते रडण्याखेरीज दुसरे काही करू शकत नाही. (२७) अशा प्रकारे कुमार आणि पौगंड अवस्थेतील दुःख भोगून ते बालक युवावस्थेत पोहोचते. यावेळी त्याला इच्छित भोग मिळाले नाहीत तर, अज्ञानाने ते क्रुद्ध होऊन शोकाकुलही होते. (२८)


सह देहेन मानेन वर्धमानेन मन्युना ।
करोति विग्रहं कामी कामिष्वन्ताय चात्मनः ॥ २९ ॥
गर्व क्रोध चढे अंगी कामासी वश पावतो ।
स्वनाशार्थ दुजा कामी अज्ञाने वैर साधतो ॥ २९ ॥

कामी - विषयाभिलाषी असा तो जीव - देहेन सह - देहाबरोबर - वर्धमानेन - वाढणार्‍या अशा - मानेन - मानाच्या योगाने - च - आणि - मन्युना - क्रोधाच्या योगाने - आत्मनः - आपल्या - अन्ताय - नाशासाठी - कामिषु - कामी लोकांमध्ये - विग्रहम् - वैर - करोति - करतो ॥२९॥
देहाबरोबरच अभिमान आणि क्रोध वाढल्याकारणाने कामाच्या अधीन झालेला तो जीव आपलाच नाश करण्यासाठी दुसर्‍या कामी पुरुषांशी वैर करतो. (२९)


भूतैः पञ्चभिरारब्धे देहे देह्यबुधोऽसकृत् ।
अहं ममेत्यसद्‍ग्राहः करोति कुमतिर्मतिम् ॥ ३० ॥
पंचभूतात्म देहाचा असत्य बुद्धिवादि तो ।
मिथ्या अभिनिवेशाने मी माझे गर्वही करी ॥ ३० ॥

अबुधः - अज्ञानी असा - कुमतिः - दुष्ट आहे आग्रह ज्याचा असा - देही - देहवान प्राणी - पञ्चभिः - पाच - भूतैः - भूतांनी - आरब्धे - उत्पन्न केलेल्या अशा - देहे - देहावर - अहम् - मी - मम - माझे - इति - अशी - असकृत् - निरंतर - मतिम् - बुद्धि - करोति - करतो ॥३०॥
खोटी बुद्धी धारण करणारा तो अज्ञानी जीव पंचमहाभूतांनी तयार केलेल्या या देहात चुकीच्या समजुतीने नेहमी मी-माझे असा अभिमान धरू लागतो. (३०)


तदर्थं कुरुते कर्म यद्‍बद्धो याति संसृतिम् ।
योऽनुयाति ददत्क्लेशं अविद्याकर्मबन्धनः ॥ ३१ ॥
वृद्धत्वी कष्टतो देह अविद्या कर्मबद्ध जो ।
मानितो आपुले सर्व भवाच्या चक्रि तो पडे ॥ ३१ ॥

अविद्याकर्मबन्धनः - अज्ञान व अदृष्ट ही आहेत बंधने ज्याची असा - यः - जो - क्लेशम् - दुःख - ददत् - देणारा असा - अनुयाति - प्राप्त होतो - तदर्थम् - त्या देहासाठी - कर्म - कर्म - कुरुते - करितो - यद्‌बद्धः - ज्या देहामुळे बद्ध झालेला असा - संसृतिम् - संसारात - याति - जातो ॥३१॥
जे शरीर याला वृद्धावस्था इत्यादी अनेक प्रकारचे कष्ट देते तसेच अविद्या आणि कर्म यांनी बद्ध झाले असल्याकारणाने याचा पिच्छा सोडीत नाही, त्याच्याचसाठी हा निरनिराळी कर्मे करीत राहातो, ज्याच्या बंधनामुळे याला वारंवार संसारचक्रात पडावे लागते. (३१)


यद्यसद्‌भि पथि पुनः शिश्नोदरकृतोद्यमैः ।
आस्थितो रमते जन्तुः तमो विशति पूर्ववत् ॥ ३२ ॥
सन्मार्गे चालता त्याचा जिव्हा वाजननेंद्रियी ।
भोगात रमती त्यांशी समागमहि होतसे ॥
अनुगमे तसा तोही पुनश्च नरकी पडे ॥ ३२ ॥

जन्तुः - प्राणी - यदि - जर - असद्भिः - दुष्ट अशा - शिश्नोदरकृतोद्यमैः - शिश्न व उदर यांच्यासाठी केलेल्या उद्योगांनी - आस्थितः - व्याप्त झालेला असा - तेषाम् - त्यांच्या - पथि - मार्गात - रमते - रमू लागेल - तर्हि - तर - पुनः - पुनः - पूर्ववत् - पूर्वीप्रमाणे - तमः - अज्ञानात - विशति - प्रवेश करील ॥३२॥
सन्मार्गाने चालणार्‍या या जीवाची एखाद्या जिह्वा आणि उपस्थ इंद्रियांच्या भोगात रममाण झालेल्या विषयी पुरुषाशी गाठ पडली आणि हाही त्यात आस्था ठेवून त्याचे अनुकरण करू लागला तर पहिल्याप्रमाणे तो पुन्हा नारकी योनींमध्ये पडतो. (३२)


सत्यं शौचं दया मौनं बुद्धिः श्रीर्ह्रीर्यशः क्षमा ।
शमो दमो भगश्चेति यत्सङ्गाद्याति सङ्क्षयम् ॥ ३३ ॥
तेष्वशान्तेषु मूढेषु खण्डितात्मस्वसाधुषु ।
सङ्गं न कुर्याच्छोच्येषु योषित् क्रीडामृगेषु च ॥ ३४ ॥
सत्यशौच दया मौन धन लज्जा क्षमा यश ।
बुद्धि संयम ऐश्वर्य सद्‌गुणो सर्व नष्टती ॥ ३३ ॥
शोचनीय रमे स्त्रीसी अशांत तनु गर्वि जो ।
खोट्या ऐशा पुरुषाचासंग केव्हाहि ना घडो ॥ ३४ ॥

सत्यम् - सत्य - शौचम् - शुद्धता - दया - दया - मौनम् - मौन - बुद्धिः - बुद्धि - श्रीः - संपत्ति - ह्रीः - लज्जा - यशः - कीर्ति - क्षमा - सहनशीलता - शमः - इंद्रियनिग्रह - दमः - मनोनिग्रह - च - आणि - भगः - ऐश्वर्य - इति - हे - यत्संगात् - ज्याच्या संगतीमुळे - संक्षयम् - क्षयाला - याति - जाते ॥३३॥ तेषु - त्या - अशान्तेषु - शान्तिरहित अशा - मूढेषु - अज्ञानी अशा - खण्डितात्मसु - संकुचित आहे बुद्धि ज्यांची अशा - शोच्येषु - कीव करण्यास योग्य अशा - च - आणि - योषित्क्रिडामृगेषु - स्त्रियांना खेळातील मृगाप्रमाणे झालेल्या अशा - असाधुषु - दुष्ट लोकांच्या ठिकाणी - सङ्गम् - संगति - न कुर्यात् - करू नये ॥३४॥
ज्यांच्या संगतीमुळे सत्य, अंतर्बाह्य पवित्रता, दया, वाणीचा संयम, बुद्धी, धन-संपत्ती, लज्जा, यश, क्षमा, मन आणि इंद्रियांचा संयम, ऐश्वर्य इत्यादी सर्व सद्‌गुण नष्ट होतात. म्हणून त्या अत्यंत शोचनीय, स्त्रियांच्या हातातील बाहुले बनलेल्या अशांत, मूर्ख, आणि आत्मघात करणार्‍या असत्पुरुषांची संगत कधीच करू नये. (३३-३४)


न तथास्य भवेन्मोहो बन्धश्चान्यप्रसङ्गतः ।
योषित्सङ्गात् यथा पुंसो यथा तत्सङ्‌गिसङ्गतः ॥ ३५ ॥
स्त्रियांचा संग तो बाधे स्त्रैणांचाही तसाच तो ।
त्यागिता संग ना बाधी मोह दुष्यकर्म वागण्या ॥ ३५ ॥

यथा - ज्याप्रमाणे - योषित्संगात् - स्त्रियांच्या संगतीमुळे - च - आणि - तत्सङ्गिसंगतः - त्या स्त्रियांचा समागम करणार्‍या पुरुषांच्या संगतीमुळे - अस्य - ह्या - पुंसः - पुरुषाला - मोहः - मोह - च - आणि - बन्धः - बंधन - भवेत् - होईल - तथा - त्याप्रमाणे - अन्यसंगतः - दुसर्‍याच्या संगतीपासून - न भवेत् - होणार नाही ॥३५॥
कारण या जीवाला जसे स्त्री आणि स्त्रियांच्या संगतीत राहाणार्‍यांशी संगत केल्याने मोह आणि बंधन प्राप्त होते, तसे अन्य कोणाचीही संगत केल्याने होत नाही. (३५)


प्रजापतिः स्वां दुहितरं दृष्ट्वा तद् रूपधर्षितः ।
रोहिद्‍भूतां सोऽन्वधावद् ऋक्षरूपी हतत्रपः ॥ ३६ ॥
पुत्रीचे रुप पाहोनी ब्रह्माही मोह पावला ।
हरिणीरुप घेवोनी धावली पुत्रि तेधवा ॥
निर्लज्य मृग रुपाने धावला पाठिशी तिच्या ॥ ३६ ॥

सः प्रजापतिः - तो ब्रह्मदेव - स्वाम् - स्वकीय अशा - दुहितरम् - कन्येला - दृष्ट्वा - पाहून - तद्रूपधर्षितः - तिच्या रूपाने मोहित झालेला असा - रोहिद्भूताम् - हरिणीचे स्वरूप धारण केलेल्या अशा तिच्या - हतत्रपः - नष्ट झाली आहे लज्जा ज्याची असा - ऋक्षरूपी - हरिणस्वरूप - भूत्वा - होऊन - अन्वधावत् - मागे धावू लागला ॥३६॥
एकदा आपली कन्या सरस्वतीला पाहून ब्रह्मदेवसुद्धा तिच्या रूप-लावण्यावर मोहित झाले होते आणि ती हरिणी होऊन पळत असताना तिच्यामागे निर्लज्जपणे हरीण होऊन पळू लागले. (३६)


तत्सृष्टसृष्टसृष्टेषु को न्वखण्डितधीः पुमान् ।
ऋषिं नारायणमृते योषिन् मय्येह मायया ॥ ३७ ॥
त्यानेचि मरिची आदी मरिच्ये कश्यपादिका
देव मानव सृष्टीही कश्यमे निर्मिली तदा ।
ऋषिप्रवर विष्णू तो सोडिता कोणता नर
जयासी बुद्धि स्त्री रुपी मोहवू न शके कधी ॥ ३७ ॥

नारायणम् ऋषिम् ऋते - नारायण ऋषीवाचून - तत्सृष्टसृष्टसृष्टेषु - त्या ब्रह्मदेवाने उत्पन्न केलेले जे मरिच्यादि ऋषि, त्यांनी उत्पन्न केलेली जी कश्यपादि ऋषिसृष्टि, व तीमुळे उत्पन्न झालेले देव व मनुष्य यांमध्ये - कः नु - कोण बरे - पुमान् - पुरुष - इह - ह्या जगात - योषिन्मय्या - स्त्रीस्वरूप अशा - मायया - मायेच्या योगाने - अखण्डितधीः - खण्डित झाली नाही बुद्धि ज्याची असा - अस्ति - आहे ॥३७॥
त्याच ब्रह्मदेवांनी मरीची इत्यादी प्रजापतींची तसेच मरीची इत्यादींनी कश्यप आदी आणि कश्यप आदींनी देव-मनुष्यादी प्राण्यांची सृष्टी (निर्माण) केली, म्हणून यांपैकी एकमेव ऋषिप्रवर नारायण सोडून असा कोणता पुरुष आहे की ज्याची बुद्धी स्त्रीरूपी मायेने मोहित होत नाही. (३७)


बलं मे पश्य मायायाः स्त्रीमय्या जयिनो दिशाम् ।
या करोति पदाक्रान्तान् भ्रूविजृम्भेण केवलम् ॥ ३८ ॥
अहो स्त्री रुपिणी मायाबळ माझे कसे पहा ।
तुडवी भ्रुकटीमात्रे दिग्वीजयिहि वीर ते ॥ ३८ ॥

स्त्रीमय्याः - स्त्रीस्वरूप अशा - मे - माझ्या - मायायाः - मायेचे - बलम् - सामर्थ्य - पश्य - पहा - या - जी - केवलम् - केवळ - भ्रूविजृम्भेण - भुवया चढविण्याने - दिशां जयिनः - दिग्विजय करणार्‍या पुरुषांना - पदाक्रान्तान् - पादाक्रांत - करोति - करिते ॥३८॥
अहो, माझ्या या स्त्रीरूपी मायेचे सामर्थ्य तर पाहा. जी आपल्या नेत्रकटाक्षाने मोठमोठया दिग्विजयी वीरांना पायदळी तुडविते. (३८)


सङ्गं न कुर्यात्प्रमदासु जातु
     योगस्य पारं परमारुरुक्षुः ।
मत्सेवया प्रतिलब्धात्मलाभो
     वदन्ति या निरयद्वारमस्य ॥ ३९ ॥
( इंद्रवज्रा )
जो योगि इच्छी पदि श्रेष्ठ जाण्या
    आत्मा-अनात्माचि विवेक होता ।
स्त्री संग त्याने कधि ना करावा
    ते नारकीद्वार तशा नराला ॥ ३९ ॥

मत्सेवया - माझ्या सेवेच्या योगाने - प्रतिलब्धात्मलाभः - प्राप्त केला आहे आत्मरूप लाभ ज्याने असा - योगस्य - योगाच्या - परं पारम् - अत्युच्च स्थितीला - आरुरुक्षुः - चढण्याची इच्छा करणार्‍या अशा - पुमान् - पुरुषाने - प्रमदासु - स्त्रियांच्या ठिकाणी - सङ्गम् - संगति - जातु - केव्हाही - न कुर्यात् - करू नये - याः - ज्या स्त्रियांना - नरकव्दारम् - नरकाचे व्दार - वदन्ति - म्हणतात ॥३९॥
जो पुरुष योगाच्या उच्च पदावर आरूढ होऊ इच्छितो किंवा ज्याला माझ्या सेवेच्या प्रभावाने आत्मा-अनात्माचा विवेक उत्पन्न झाला आहे, त्याने स्त्रियांचा संग कधीही करू नये. कारण स्त्रियांना अशा पुरुषांसाठी नरकाचे उघडलेले दार म्हटले आहे. (३९)


योपयाति शनैर्माया योषिद् देवविनिर्मिता ।
तामीक्षेतात्मनो मृत्युं तृणैः कूपमिवावृतम् ॥ ४० ॥
सेवादी रुप घेवोनी मायास्त्री रुपिणी हळू ।
ढकली झाकल्या कूपीं मृत्यु प्रत्यक्ष मानणे ॥ ४० ॥

या - जी - देवनिर्मिता - परमेश्वराने निर्मिलेली अशी - माया योषित् - मायारूप स्त्री - शनैः - हळूहळू - उपयाति - जवळ येते - ताम् - तिला - तृणैः - गवताने - आवृतम् - आच्छादिलेल्या अशा - कूपम् - कूपाला - इव - जसे तसे - आत्मनः - स्वतःचा - मृत्युम् - मृत्युच असे - ईक्षेत - पहावे ॥४०॥
भगवंतांनी रचलेली ही स्त्रीरूपिणी माया जेव्हा हळू हळू कोणत्याही निमित्ताने जवळ येते, तेव्हा तिला गवताने झाकलेल्या विहिरीप्रमाणे आपला मृत्यूच समजले पाहिजे. (४०)


यां मन्यते पतिं मोहान् मन्मायामृषभायतीम् ।
स्त्रीत्वं स्त्रीसङ्गतः प्राप्तो वित्तापत्यगृहप्रदम् ॥ ४१ ॥
तां आत्मनो विजानीयात् पत्यपत्यगृहात्मकम् ।
दैवोपसादितं मृत्युं मृगयोर्गायनं यथा ॥ ४२ ॥
आसक्त राहता स्त्रीसी मृत्युच्या वेळि चिंतिता ।
मिळते योनि ती स्त्रीची धन गेह नि पुत्र दे ॥ ४१ ॥
मानिते पति तो नित्य दुसरा जीव पूरुष ।
व्याधगाणे फसे पक्षी तसा तो नष्ट पावतो ॥ ४२ ॥

स्त्रीसङ्गतः - स्त्रियांच्या संगतीमुळे - स्त्रीत्वम् - स्त्रीरूपाला - प्राप्तः - प्राप्त झालेला - जीवः - प्राणी - मोहात् - अज्ञानामुळे - याम् - ज्या - ऋषभायतीम् - पुरुषाप्रमाणे आचरण करणार्‍या अशा - मन्मायाम् - माझ्या मायेला - वित्तापत्यगृहप्रदम् - द्रव्य, पुत्र व घर यांना देणार्‍या असा - पतिम् - पति - मन्यते - मानतो ॥४१॥ ताम् - त्या मायेला - यथा - ज्याप्रमाणे - मृगयोः - पारध्याचे - गायनम् - गाणे - तथा - त्याप्रमाणे - पत्यपत्यगृहात्मकम् - पति, पुत्र व घर हे आहे स्वरूप ज्याचे अशा - दैवोपसादितम् - दैवाने प्राप्त झालेल्या अशा - आत्मनः - स्वतःच्या - मृत्युम् - मृत्यूला - विजानीयात् - समजावे ॥४२॥
स्त्रीमध्ये आसक्त राहिल्याकारणाने तसेच अंतसमयी स्त्रीचेच चिंतन करीत राहिल्याने जीवाला स्त्रीयोनी प्राप्त होते. अशा प्रकारे स्त्रीयोनीला प्राप्त झालेला जीव पुरुषरूपात असलेल्या माझ्या मायेला धन, पुत्र, घर, इत्यादी देणारा आपला पती मानतो. अशा रीतीने जसे शिकार्‍याचे गाणे हरिणाच्या नाशाला कारणीभूत होते, त्याचप्रमाणे स्त्रीने त्या पुत्र, पती, गृह इत्यादींना विधात्याने आपल्यासाठी निश्चित केलेला मृत्यूच समजावा. (४१-४२)


देहेन जीवभूतेन लोकात् लोकमनुव्रजन् ।
भुञ्जान एव कर्माणि करोत्यविरतं पुमान् ॥ ४३ ॥
देवी जीव उपाधीच्या लिंग देहे पुरुष तो।
मेळवी दुसरा लोक प्रारब्ध कर्म भोगतो ॥
मेळिण्या दुसरा देह नित्य तो कर्म आचरी ॥ ४३ ॥

जीवभूतेन - जीवभूत अशा - देहेन - लिङ्गशरीराने - लोकात् - लोकापासून - लोकम् - लोकाला - अनुव्रजन् - जाणारा असा - भुञ्जानः एव - कर्मफलांचा उपभोग घेणारा असा - पुमान् - मनुष्य - अविरतम् - निरंतर - कर्माणि - कर्मे - करोति - करितो ॥४३॥
जीवाचा उपाधी असणार्‍या लिंगदेहाने जीव एका लोकातून दुसर्‍या लोकात जातो आणि आपल्या प्रारब्ध कर्मांना भोगीत निरंतर दुसर्‍या देहाच्या प्राप्तीसाठी दुसरी कर्मे करीत राहातो. (४३)


जीवो ह्यस्यानुगो देहो भूतेन्द्रियमनोमयः ।
तन्निरोधोऽस्य मरणं आविर्भावस्तु सम्भवः ॥ ४४ ॥
लिंगदेह उपाधीन मोक्षापर्यंत राहतो ।
भूत इंद्रिय नी चित्त स्थूलरुप शरीर ते ॥
भोगाधिष्ठानची त्याचे मेळुनी कार्य साधिती ।
तेंव्हा जन्म तया होतो तुटता मृत्यु तो घडे॥ ४४ ॥

जीवः - जीवाचा उपाधि जो लिङ्गदेह तो - अस्य - ह्या आत्म्याचा - अनुगः - मागोमाग जाणारा - अस्ति - आहे - भूतेन्द्रियमनोमयः - भूते, इन्द्रिये आणि मन एतद्रूप - देहः - स्थूल देह - अस्ति - आहे - तन्निरोधः - त्या दोघांची अडवणूक - अस्य - ह्या जीवात्म्याचे - मरणम् - मरण - अस्ति - आहे - तु - परंतु - आविर्भावः - प्रगट होणे - संभवः - जन्म - अस्ति - होय ॥४४॥
जीवाचे भूत, इंद्रिये, मनरूप लिंगशरीर (मोक्षापर्यंत) त्याच्यासमवेत राहाते. तसेच कार्यरूप स्थूलशरीर त्याच्या भोगाचे अधिष्ठान आहे. या दोघांनी एकमेकांशी संगठित होऊन कार्य न करणे हाच प्राण्याचा मृत्यू आहे. आणि दोघांनी बरोबर प्रगट होणे यालाच जन्म म्हणतात. (४४)


द्रव्योपलब्धिस्थानस्य द्रव्येक्षायोग्यता यदा ।
तत्पञ्चत्वं अहंमानाद् उत्पत्तिर्द्रव्यदर्शनम् ॥ ४५ ॥
भोगणे भोग्य वस्तूसी अयोग्य ठरता मरे ।
स्थूलाच्या अभिमानाने पाहता जन्म होतसे ॥ ४५ ॥

द्रव्योपलब्धिस्थानरय - पदार्थांच्या अनुभवाचे स्थान जे स्थूल शरीर त्याची - द्रव्येक्षायोग्यता - पदार्थांच्या दर्शनाविषयी अयोग्यता - भवति - होते - तत् - ते - पञ्चत्वम् - मरण - अस्ति - होय - अहम्मानात् - अहंकारामुळे - द्रव्यदर्शनम् - पदार्थांचे त्याला दर्शन होणे - उत्पत्तिः - जन्म - अस्ति - होय ॥४५॥
पदार्थांच्या उपलब्धीचे स्थान असणार्‍या या स्थूल शरीरात जेव्हा ते ग्रहण करण्याची योग्यता राहात नाही, ते त्याचे मरण होय आणि हे स्थूल शरीर म्हणजेच मी आहे, अशा अभिमानाने त्याला पाहाणे हाच त्याचा जन्म होय. (४५)


यथाक्ष्णोर्द्रव्यावयव दर्शनायोग्यता यदा ।
तदैव चक्षुषो द्रष्टुः द्रष्टृत्वायोग्यतानयोः ॥ ४६ ॥
अंधूक दृष्टि होताची नेत्राने पाहु ना शके ।
दृष्टि नी इंद्रिये दोन्ही साक्षी जीवास त्यागिती ॥ ४६ ॥

यथा - ज्याप्रमाणे - यदा - ज्यावेळी - अक्ष्णोः - नेत्र गोलकांची - द्रव्यावयवदर्शनायोग्यता - पदार्थांच्या अवयवांच्या दर्शनाची अयोग्यता - भवत् - होते - तदा - त्यावेळी - चक्षुषः - चक्षुरिन्द्रियाची - अयोग्यता - अयोग्यता - भवति - होते - यदा - ज्यावेळी - अनयोः - नेत्रगोलक आणि चक्षुरिन्द्रिय यांची - अयोग्यता - अयोग्यता - भवति - होते - तदा एव - त्यावेळीच - द्रष्टुः - पहाणार्‍या जीवांची - द्रष्टत्वायोग्यता - पहाणेपणाची अयोग्यता होते ॥४६॥
एखाद्या दोषामुळे जेव्हा डोळ्यांमध्ये रूप इत्यादी पाहाण्याची योग्यता असत नाही, तेव्हा त्यात राहाणारे चक्षु-इंद्रियसुद्धा रूप पाहाण्यास असमर्थ होते, आणि जेव्हा डोळे आणि त्यात राहाणारे इंद्रिय दोघेही रूप पाहाण्यास असमर्थ होतात, तेव्हा या दोघांचा साक्षी असलेल्या जीवामध्येसुद्धा ती योग्यता राहात नाही. (४६)


तस्मान्न कार्यः सन्त्रासो न कार्पण्यं न सम्भ्रमः ।
बुद्ध्वा जीवगतिं धीरो मुक्तसङ्गश्चरेदिह ॥ ४७ ॥
सम्यग्दर्शनया बुद्ध्या योगवैराग्ययुक्तया ।
मायाविरचिते लोके चरेन्न्यस्य कलेवरम् ॥ ४८ ॥
इति श्रीमद्‌भागवते महापुराणे पारमहंस्यं संहितायां तृतीयस्कंधे
कपिलेयोपाख्याने जीवगतिर्नाम एकयस्त्रिंशोऽध्यायः ॥ ३१ ॥
म्हणुनी संतदेहाला मृत्यु भय नि दीनता ।
नसावी, जाणणे रुप धैर्याने संगवर्जित ॥ ४७ ॥
संसारी योग वैराग्य युक्त संम्यक्‌ नि ज्ञानची ।
बुद्धिने शरिरा दूर ठेवोनि संग तोडणे ॥ ४८ ॥
॥ इति श्रीमद्‌भागवता महापुराणी पारमहंसी संहिता ॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रुपांतर ॥
॥ एकतिसावा अध्याय हा ॥ ३ ॥ ३१ ॥ हरिः ॐ तत्सत्‌ श्री कृष्णार्पणमस्तु ॥

तस्मात् - यास्तव - संत्रासः - दुःख - न कार्यः - करू नये - न कार्पण्यम् - दैन्य करू नये - न संभ्रमः - घाबरटपणा करू नये - धीरः - धैर्यवान् पुरुषाने - जीवगतिम् - प्राण्यांच्या गतीला - बुद्धा - जाणून - मुक्तसंग - टाकलेली आहे संगती ज्याने असा - इह - या भूतलावर - चरेत् - संचार करावा ॥४७॥ योगवैराग्ययुक्तया - योगाभ्यास व वैराग्य यांनी युक्त अशा - सम्यग्दर्शनया - उत्तम प्रकारे विचार करणार्‍या अशा - बुद्ध्या - बुद्धीच्या साह्याने - मायाविरचिते - मायेने उत्पन्न केलेल्या अशा - लोके - जगात - कलेवरम् - शरीराला - न्यस्य - ठेवून - चरेत् - संचार करावा ॥४८॥
म्हणून मुमुक्षू पुरुषाला मरणाची भीती, दीनता, किंवा मोह असता कामा नये. त्याने जीवाचे स्वरूप जाणून धैर्यपूर्वक निःसंगभावाने येथील व्यवहार करावे. तसेच या मायामय संसारात योग-वैराग्याने युक्त असणार्‍या सम्यक ज्ञानमय बुद्धीने शरीर ही ठेव समजून त्याच्याबद्दल अनासक्त राहून व्यवहार करावे. (४७-४८)


स्कंध तिसरा - अध्याय एकतिसावा समाप्त

GO TOP